मराठी साहित्य – विविधा ☆ अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

अंगाई हा शब्द कसा आला असेल? खूप विचार केला. अगदी आपल्या गुगल गुरूला पण विचारलं. काही पत्ता लागला नाही. मीच उत्तर मिळवायचा प्रयत्न केला. पूर्वी ‘ गायी गं गायी, माझ्या बाळाला दूध देई ‘ असं म्हणायचे. म्हणजे बाळाच्या परिचयाच्या दोन्ही गोष्टी असणार. गोठ्यात गाय असणार आणि दूध ती देते हे बाळानं पाहिलं असणार.  बाळ रडायला लागलं की त्याची समजूत या गाण्यानं काढली जात असेल व गायी बद्दल आदर लहानपणीच निर्माण होत असेल. नंतर हळू हळू गोठे, गायी काळाच्या उदरात गडप झाल्या. नंतर ते गाणं ‘ गाई  गं अंगाई ‘ असं झालं. त्याचा अर्थ असा लावला गेला असेल की बाळाला, गाई म्हणजे झोप, ती येण्यासाठी गायलं गेलेलं गाणं म्हणजे अंगाई! ही आपली मी माझी काढलेली भाबडी समजूत! पण हे नक्की की आई व्हायचं झालं तर त्या मुलीला अंगाई म्हणता आली पाहिजे असा अलिखित नियम होता. होता म्हणते आहे कारण आज काल आईच्या मदतीला मोबाईल नामक मैत्रीण येते. अंगाई म्हटलं की एक शांत, सौम्य, सोज्वळ गाणं लागतं. अजूनतरी हं ! पुढची पिढी कदाचित ‘ आवाज वाढव डी जे ‘ सारखी गाणी लावतील सुद्धा! कारण तोपर्यंत मुलांना नाजूक आवाजातली गाणी ऐकू येणं बंदही झालं असेल, त्यांनाही मोठ्ठया आवाजातली गाणीच आवडायला लागतील.

मुलांना झोपवताना गाणं म्हणायची पद्धत खूप जुनी असावी. जसं जात्यावर बसलं की ओवी सुचते. तसं बाळ मांडीवर आलं की अंगाई सुचते. ओवी गाण्यासाठी जसं चांगला आवाज किंवा संगीतातील ज्ञान असावं लागत नाही तसंच अंगाईलाही! आपल्याकडे अजून लहान मुलांना झोपताना ऐकवायच्या ट्यूनची खेळणी आली नव्हती, त्या काळात मी लंडनला मला नात झाली म्हणून गेले होते. नातीसाठी तशी म्युझिकवाली खेळणी आणली होती. पण ती रडायला लागली की एवढ्या मोठ्ठयांदा रडायची की त्या खेळण्याचा आवाज कुठे ऐकूच यायचा नाही. मग पारंपारिक मोठ्या आवाजात ‘ हात हात गं चिऊ, हात हात गं काऊ ‘ अशी गाणी किंवा ओरडावं  लागायचं. मला त्यावेळी वाटलं की इंग्रज लोकांच्यात अंगाई गाण्याची परंपराच नसावी. त्यामुळं हे संगीत ऐकवण्याची पद्धत पडली असावी. पण तसं नाही म्हणे! तिथे बाळ आई वडिलांजवळ झोपतच नाहीत. बाळ हे बाळ असल्यापासून त्याची बेडरूम वेगळी असते. त्यामुळं बाळ रडलं तरी आईने जवळ घेण्याचा किंवा अंगाई गाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते म्युझिक!

आपल्याकडच्या परंपरा जरा माणसाच्या मानसिक गरजा बघून बनवल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. केवळ आपलंच कुटुंब नाही तर सगळा समाजच एकत्र बांधून ठेवणाऱ्या प्रथा आहेत.

स्पर्शात ओलावा असतो, तो शब्दात मिळणं सुध्दा अवघड आहे. स्पर्शात प्रेम असतं, आधार असतो, आता कशाचीही भिती नाही हा विश्वास असतो. हा विश्वास लहान बाळांना देण्यासाठी मांडी, कूस, पदर, बाळाशी केलेला संवाद यागोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे लहान बाळांना बोललेलं सगळं कळतं असं आपण समजतो. बाळ जन्माला आल्यावरच असं नाही तर अभिमन्यू  सारखे गर्भातही संस्कार होतात हा आपला विश्वास आहे. जिजाऊ यांनी तर शिवाजीला वीरश्रीने भरलेल्या गोष्टी ऐकवल्या, अंगाई ऐकवली आणि तो  शूरवीर झाला.    आपल्या सामान्य माणसांच्या अंगाई मध्ये चिऊ, काऊ, झाडं, चंदामामा अशी निसर्गाची ओळख असते.अंगाई वरून एक गम्मत आठवली. माझ्या दुसऱ्या मुलाला मुलगा झाला. तो जरा रडवाच होता. माझा मुलगा जरा जास्तच हळवा त्यामुळं तो रडायला लागला की हा कासावीस व्हायचा. त्याला तर  मराठी गाणी, अंगाई असं काही म्हणायला येत नव्हतं. हिंदी सिनेमातली गाणी यायची पण प्रेमाची नाहीतर विरहाची! ही सोडून एक गाणं त्याला यायचं, ते कुठलं सांगू?  ‘हमारीही मुठ्ठीमे आकाश सारा ‘ आणि तो हेच गाणं म्हणून मुलाला झोपावयाचा. मला खूप उत्सुकता आहे, तो नातू पुढे मोठ्ठा झाल्यावर कोण बनेल, कोणतं कर्तुत्व गाजवेल याचं!

आपल्याकडे एक जगावेगळी आई होऊन गेली, मदालसा! अंगाई चा विषय निघाल्यावर मदालसा चा उल्लेख व्हायलाच हवा. एकमेव आई जिने अंगाई तून मुलांना अध्यात्माचे धडे दिले. असं कां, हे कळण्यासाठी तिची गोष्ट थोडक्यात सांगावीच लागेल. ही ऋतूध्वज राजाची राणी ! पातालकेतू राक्षसाच्या मायावी कृत्यामुळे तिने मृत राजा पाहिला, आणि अग्निकाष्ठ भक्षण करून देह विसर्जित केला. राजा अतिशय दुःखी झाला. त्याला वैराग्य प्राप्त झाले. अजून राजाला मूलबाळ ही नव्हते, राज्यकारभार कोण पाहणार? मग कंबल व अश्र्वतल या नागऋषींनी शिवाराधना करून तशीच दुसरी मदालसा प्राप्त करून घेतली. ती शिवाचा अंश असल्यामुळे वैराग्यशील होती. अगदी नाईलाज म्हणून संसार यात्रा आक्रमू लागली. पहिल्या मुलाच्या नामकरणाच्या वेळी ती म्हणाली, नश्वर देहाला नाव कशाला ठेवायचे, मृत्तिका व शरीर दोघांची योग्यता सारखीच.राजाने तिला नामकरण व आत्मोन्नत्ती याची माहिती दिली, पण परिणाम उलटाच झाला. मुलांनी राज्यशकट हाकण्यापेक्षा आत्मोद्धार करावा म्हणून ती निवृत्ती विषयक, आध्यात्मपर अंगाई गात असे. त्याचा साधारण अर्थ असा – ‘सुबाहू उगा रडून शिणू नकोस, पूर्व जन्मीच्या संचितानेच या मायाजालात अडकलास, सावध हो, डोळे मिटून घे पण झोपू नकोस, दृष्टी प्रभुकडे ठेव, अज्ञानाने तू भवबंधनात अडकला आहेस, पण आत्मा मुक्त असतो, ही मायेची बंधने तुटणे कठीण आहे, सावध हो.’

या पुढे जाऊन ती विश्व निर्मितीची क्रिया, मायेचे पाच उद्गार, पंचतत्वे , पंचवायू, पंचेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच अवस्था, जड देह, लिंग देह, शरीर रचना, सर्व नाड्या व शटचक्रांची माहिती सांगते. पुढे नाडी जागृत करणे, आत्मज्योतीचे दर्शन, मोक्ष यांचीही माहिती देते. परिणामी सुबाहू, शत्रुमर्दन, शुभकिर्ती ही तिन्ही मुले राजवैभवाचा त्याग करून अरण्यात जातात. शेवटच्या  अलर्क या मुलाच्या वेळी राजा तिची मनधरणी करतो त्यामुळे ती अलर्क ला राजनीतीचे पाठ देते, पुढे तो अनेक वर्षे राज्य करतो. ज्यावेळी तो लढाईत हरतो त्यावेळी आईने जपून ठेवण्यासाठी दिलेले पत्र वाचतो, त्या पत्राप्रमाणे तो सह्याद्री पर्वतावर श्री दत्त प्रभुंच्याकडे जातो, त्यांचा अनुग्रह प्राप्त करून मुक्त होतो. मदालसाने ‘ माझ्या पोटातला गर्भ, कुण्या दुसऱ्या आईच्या पोटात जाणार नाही ‘ अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे तिने तिन्ही मुलांना मुक्तीमार्ग दाखवला. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले मदालसेचे अभंग म्हणजेच तिच्या अंगाईचे भाषांतर!

एकूण सांगायची गोष्ट अशी की हा आपला विश्वास आहे की अगदी लहानपणापासून आपण बाळांना जे सांगतो, जे शिकवतो ते ती आत्मसात करतात. त्यालाच आपण ‘ बाळकडू ‘ म्हणत असू.

आपण असं कितीही मानलं तरी याला कितीतरी अपवाद असल्याचं आपल्या लक्षात येतं. बाळ मोठ्ठं झाल्यावर कसं निपजेल हे सांगता येत नसलं तरी हे खरं आहे की आई आणि बाळ यांच्यात एक स्पर्शाचं नातं असतं, एक हळुवार नातं असतं, हे नाजूक बंध जास्त दृढ होतात, जेंव्हा आई त्याला आपल्या हाताने न्हाऊ, माखू घालते, चिऊ काऊ चे घास भरवते. मातृत्वाचं जे सुख असतं ते बाळाच्या बाललीलात, बालसंगोपनात ओतप्रोत भरलेलं असतं. हे संगोपन परक्याच्या हातात सोपवून, जन्माला आल्याबरोबर स्वतंत्र बेडवर, स्वतंत्र बेडरूम मध्ये झोपवून, आई या मातृसुखाला पारखी होत नसेल? कदाचित बाळ त्यामुळं धीट, स्वावलंबी आपल्या बाळापेक्षा लवकर होत असेल पण अशा बाळाला  जन्मदात्रीशी सांधणारा दुवा निर्माणच होत नसेल तर तो दुवा इतर कुठल्याही नात्याला सांधण्यासाठी निर्माण होणार नाही. त्यामुळं माणूस नुसता एकटा पडत नाही तर तो कोरडाही होतो. अर्थात ही आपल्या पिढीची मतं झाली. पुढच्या पिढ्या पाश्चिमात्य संस्करावर, विज्ञानातील प्रगतीवर  जोपासल्या जाणार आहेत. त्यामुळं जन्माला आल्यापासून मोबाईल किंवा त्याचं दुसरं एखादं व्हर्जन बघत बघत झोपतील, आईची किंवा अंगाईची गरज संपलेली असेल. असो, कालाय तस्मैनमः|

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ – दर्पणी पहाता रूप… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – दर्पणी पहाता रूप… – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

बालपणापासून मी, अमक्यासारखी दिसते, तमक्यासारखी दिसते, असं अनेकांनी माझ्या दिसण्यावरून मला सांगितलं होतं. लांब केस असताना कुणी अभिनेत्री ‘नूतन’सारखी दिसते म्हणायचे, तर लांब चेहर्‍यामुळे अगदी ‘नर्गिस’ म्हणायचे. एखाद्या कार्यक्रमात सुनील दत्त साहेबांची भेट व्हायची, तेव्हा माझं गाणं ऐकताना ते बराच वेळ टक लावून पहायचे आणि  ‘छोट्या पद्मजाचे’ लाड, कौतुकही करायचे! 

माझे गुरु पं. हृदयनाथजी मंगेशकर तर मला पारशी म्हणतात. साक्षात् ‘भारतरत्न’ लतादीदी तर हृदयनाथजींना, माझ्या नावापेक्षाही, “बाळ, तुझी पारशी पोरगी काय म्हणते रे?” असं गंमतीनं विचारत. आमच्या घरची मंडळी माझ्या बालपणी, मुद्दाम मला चिडवण्यासाठी,  “ए, ही पारशाच्या जव्हेरी हॉस्पिटलमध्ये बदलून आली बरं का! चुकून पारशाचं पोर आई घरी घेऊन आली!” असं सारे जेव्हा म्हणत, तेव्हा मला खरंच वाटे आणि मी रडून थयथयाट करीत असे. (वास्तविक माझे वडील शंकरराव गोरेपान, तजेलदार चेहऱ्याचे आणि धारदार नाकाचे…. ते खरे पारसी दिसत!) 

नूतन आणि नर्गिसचा तर मला उगीचच राग येत असे. लेखक श्री. अशोक चिटणीस काका तर मला “तू एखादं ग्रीक स्कल्पचर असावं, अशी वाटतेस,” असं म्हणत. 

मात्र अलीकडेच, एका नाटकाच्या निमित्ताने माझी आणि एका महान कलावंत स्त्रीची माटुंग्याच्या यशवंतराव चव्हाण सेंटर या सभागृहात भेट झाली. मला त्यावेळी आठवण झाली, ती म्हणजे आमचे शेजारी थोर गायक आणि एचएमव्हीचे त्यावेळचे सर्वेसर्वा श्री. जी. एन. जोशी यांची! ते माझ्या बाबांचे परममित्र! ज्यांनी मला बालपणापासून खूप प्रोत्साहन दिलं, कोडकौतुक केलं. ते नेहमी म्हणत, “तू – अगदी या बाईंसारखी दिसतेस बरं का!”  खरंतर या बाईंविषयी मी, चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत घडवणाऱ्या कडक दरारा असणार्‍या गुरू, असं त्यांचं वर्णन ऐकून होते. त्यांना टीव्हीवर आणि फोटोतही पाहिलं होतं. मात्र भेट प्रथमच त्यादिवशी ग्रीन रूममध्ये झाली. कुणीतरी आमची ओळख करून दिली. आरशात आम्ही एकमेकींना पाहिलं आणि त्यांना मी म्हंटलं, “अनेकजण म्हणतात…. आपल्यात खूप साम्य आहे म्हणून.” त्यावर त्या गोड हसल्या आणि अगदी सहजपणे, जणू काही रोजच भेटत असल्यासारखे, माझा हात हाती घेऊन त्या म्हणाल्या, “बरोबर आहे पद्मजा…. Our soul is the same!!!”

त्यांचे हे आशीर्वादरूपी बोल ऐकून, माझ्या अंगातून आनंदाने वीज चमकून गेली. आनंदाला पारावार उरला नाही. कारण त्या होत्या, अनेक सुप्रसिद्ध कलावंतांच्या गुरू, अभिनेत्री, बुद्धिमान, प्रतिभावंत व कलेची उपासक स्त्री, तसंच बर्‍याच नाटकांना चैतन्य देणार्‍या महान दिग्दर्शिका – आदरणीय ‘विजयाबाई मेहता’! 

“त्यांच्या मते, कला म्हणजे चैतन्याची शोधप्रक्रिया… कोणताही कलाकार आपली कला सादर करताना, स्वतःच्या वास्तवापलीकडे जाऊन मूळ सत्याचा, चैतन्याचा, स्रोताचा शोध घेण्याचा अविरत प्रयत्न करत असतो. संगीत, नाट्य, नृत्य यांसारख्या कला सादर करताना कलाकार व्यासपीठाच्या रिकाम्या पोकळीत एकटा असतो, मात्र आपल्या आविष्काराने तो सभागृहाला भारून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. अभिजात कलेतील साधकाला आपल्या कलेत प्रभुत्त्व मिळवण्याची ओढ म्हणजे एखाद्या श्रेष्ठ कलाकाराला लागलेले एक व्यसनच असते..”

त्यांचे हे विचार, तो तेजस्वी चेहरा आणि हाताचा मृदु मुलायम स्पर्श, ‘तो आशीर्वाद’……‘दर्पणी पहाता रूप’ म्हणत माझ्या मनात आजही दरवळत आहे!

(४ डिसेंबर… विजयाबाई मेहता यांचा जन्मदिवस! त्यानिमित्त त्यांना अनेकोत्तम शुभेच्छा)

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची –  भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

आंदोलनं  झोक्याची–झेप फिनिक्सची – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

श्रावण महिना. नागपंचमीचे दिवस . छान गोड हिरवाईचा पसरलेला सुगंध, मोठ्या वडाच्या झाडाला ,एका मोठ्या फांदीला, एक मोठा झोका बांधलेला होता. मुली झोका खेळत होत्या. झोका उंच उंच चढवत होत्या.  झोका जास्त उंच जायला लागल्यावर मात्र बाजूला  उभ्या असलेल्या बघ्यांचा दंगा, आरडा ओरडा चालू व्हायचा. झोका खाली यायला लागल्यानंतर मात्र मुलींना पोटात खड्डा पडल्यासारखं व्हायचं. झोक्याबरोबर सगळेच छान रंगले होते . सगळं दृश्य मी गॅलरीत बसून पाहत होते. झोक्याची ती आंदोलनं पहात असताना, मला सीताबाई म्हणजे, पूर्वाश्रमीच्या ‘ हेमवती ‘ या एका कर्तबगार स्त्रीने , उंच झोक्याचे स्वप्न पाहिले होते, त्याची आठवण झाली . सांगलीची हेमवती ही भावंडाची सर्वात मोठी बहीण. तिच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करायला शब्द अपुरे पडावेत असं रूप ! चेहऱ्यावर एक प्रकारच्या टवटवीतपणाचं सौंदर्य, सुडौल बांधा , विपूल केश संभार, आत्मविश्वासू वृत्ती, आणि तडफदार भाषा असंच व्यक्तिमत्व होतं तिचं. मुलींनी जास्त शिक्षण घेणं , त्या काळातल्या समाजाला मान्य नव्हतं . काळच वेगळा होता तो.  हेमवतीच चौथीपर्यंतच शिक्षण झालं. आता शिक्षण भरपूर झालं ,पुरे आता शिक्षण, असा घरात विचार सुरू झाला. हेमवती अभ्यासू वृत्तीची,   हुशार, नवनवीन खाद्यपदार्थ शिकण्याची आवड, शिवणकाम, विणकाम, भरतकाम ,सगळ्या कला पुरेपूर अंगी बांणलेल्या होत्या.

हेमवती आता 13 -14 वर्षाची झाली . म्हणजे काळानुसार उपवर झाली . स्थळं बघायला सुरुवात झाली. कोणीतरी कोल्हापूरच्या मुलाचं सुयोग्य वर म्हणून स्थळ सुचवलं . मुलगा रामचंद्र  हा मुंबईला पोस्टात अधिकारी पदावर नोकरीला होता. कोल्हापूरला स्वतःचं घर, घरात सासू-सासरे , दीर, असं घर भरलेलं होतं  आणि सर्वात भावलं म्हणजे श्री अंबाबाईच्या वासाचं पवित्र तीर्थक्षेत्र — दक्षिणकाशी  अस कोल्हापूर.

दोन्हीकडूनही नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. पसंता पसंती झाली.  लग्न ठरलं. आणि झालंही.  रामचंद्र यांनी आपल्या नावाशी अनुरूप असं पत्नीचं नाव ‘सीता ‘ असं ठेवलं.’ हेमवती’ आता ‘ सीताबाई ‘ झाल्या.

रामचंद्र आणि सीताबाईंचा मुंबईला आनंदाने संसार सुरू झाला. माहेरी दहा-बारा जणांच्या कुटुंबामध्ये राहिलेल्या, सीताबाईंना , मुंबईला प्रथम एकाकीपणा वाटायला लागला. पण नंतर त्या लवकरच छान रुळल्या . काही दिवसातच  पाळणा हलला आणि कन्यारत्न झाले .खरोखरच  ‘रत्न ‘ म्हणावी अशीच गोरीपान , सुंदर , घारे डोळे अगदी तिच्याकडे पहात रहावं असं रूप! सासरच्या घरातली पहिली नात. कोल्हापूरची म्हणून अंबाबाई असं नामकरण झालं. सर्वजण तिला अंबू म्हणत. सीताबाई अनेकदा कन्येच्या सौंदर्याकडे पहात रहात आणि माझीच नाही ना दृष्ट लागणार हिला , असं म्हणून तिच्या गालावरून हात फिरवून बोट मोडायच्या. अंबू साडेतीन वर्षाची झाली आणि सीताबाईंना बाळाची चाहूल लागली . आता बाळंतपणासाठी सासरी, कोल्हापूरला आल्या. दुसरी कन्या झाली . अंबुची बहीण म्हणून ही सिंधू ! दोघेही खूप विचारी होते. त्यामुळे दोघेही नाराज नव्हते. बाळाला तीन महिने होत आले. आता बाळ बाळंतिणीला मुंबईला घेऊन जावे, या विचाराने रामचंद्र कोल्हापूरला आले. दोन दिवसांनी निघायची तयारी झाली . सामानाची बांधाबांध झाली.

सगळ्या गोष्टी सरळपणान होऊन, त्यांना आनंद मिळू देणं नियतीला मान्य नव्हतं. सगळं उलटं पालटं झालं. रामचंद्रना हार्ट अटॅक आला . आणि त्यातच त्यांना देवाज्ञा झाली. सीताबाई खोल गर्तेत गेल्या. आभाळ कोसळलं त्यांच्यावर . घरदार दुःख सागरात बुडाले. कोणाला काहीच सुचेना. बाळाला तर वडील कळण्यापूर्वीच नियतीने हिरावून नेलं. वर चढलेला झोका खाली येणारच, पण खाली येताना पोटात खड्डा पडला. आणि झोका मोडूनच पडला.

दुःखद बातमी मुंबईच्या ऑफिसला कळवली गेली. तिकडे सामान आणायला जी व्यक्ती गेली , ती दोन-तीनच  वस्तू घेऊन आली. बाकी सामानाचं काय झालं , ही गोष्ट कोण कोणाला विचारणार! ती विचारण्याची वेळही नव्हती. आता पुढे काय? हे प्रश्नचिन्ह प्रत्येकासमोर उभे होते. दिवस वार झाल्यानंतर माहेरच्यांनी विचारणा करून , बदल म्हणून सीताबाईंना माहेरी घेऊन गेले. आपल्या मुलीला सावत्र सासूजवळ कशी वागणूक मिळेल याची काळजी होती. सीताबाई माहेरी दोन अडीच महिने राहिल्या. एरवी माहेरी जाण्यातला आणि रहाण्यातला आनंद वेगळा आणि आताचं माहेरपण म्हणजे,  नाराजीचे सूर आणि अश्रूंचा पूर , असं चित्र होतं. सतत कोणी ना कोणी समाचाराला यायचं. त्यांचे वेगवेगळे उपदेश ऐकायला लागायचे. सीताबाईंना कोणी, मुलीचा पायगुण म्हणायचे. मुलीची काय  चूक असं त्यांना वाटायचं. आणि डोळ्यातून अश्रू धारा वहायला लागायच्या. सीताबाई विचार करायच्या, -“त्या सीतामाईला वनवासात श्रीरामासारख्या पतीचा भक्कम आधार होता. पण मी ही सीता मात्र दोन लहान मुलींना घेऊन हाताशपणे उभी आहे. माझं काय चुकलं असेल बरं?  रामचंद्रना देवाने अशा आनंदातल्या संसारातून उचलून का नेलं असेल बरं? अनेक प्रश्न , अनेक विचार मनात गर्दी करायचे. पण त्या प्रश्नांना अजून उत्तर सापडत नव्हतं. माहेरचे लोक त्यांना “आता इकडेच रहा ” म्हणत होते. तेव्हा सीताबाईंनी निक्षून सांगितलं , “मुंबईचं माझं घर हक्काचं होतं , ते काळानं हिरावून नेलं .आता मी कोल्हापूरच्या घरात राहिले तर, सासर आणि माहेर अशी मला दोन घर मिळतील. दोन्हीकडे मी राहू शकेन. पण माहेरीच राहिले तर सासर तुटेल “. एक बुद्धिमान स्त्रीच इतका विचार करू शकेल.

– क्रमशः भाग पहिला 

 ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

१) देव कुठे आहे?

२) देव काय पाहतो?

३) देव काय करतो?

४) देव केव्हा हसतो?

५) देव केव्हा रडतो?

६) देव काय देतो?

७) देव काय खातो?

१) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.

तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||

– नामदेव…

विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला ||

– ज्ञानदेव…

२) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.

‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |

– श्रीशंकराचार्य…

त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो.

३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.

घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||

भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||

– तुकाराम…

तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा ||

– तुकाराम…

४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, “या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे.” जीव म्हणतो, “सोहं, तू आणि मी समान.” पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी कोण आहे?” देव तेव्हा हसतो. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो.

५) देव केव्हा रडतो? – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. 

देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ ||

– तुकाराम…

६) देव काय देतो? – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, क्षमा शांती आणि शक्ति देतो.

देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा ||

– तुकाराम…

दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |

जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग ||

– तुकाराम…

प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे ||

– तुकाराम…

देव सर्वांना उचित तेच सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.

७) देव काय खातो? – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.

माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |

ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ ||

– निळोबा…

यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.

“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |

एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”

भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ, पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कारसुद्धा  आनंदाने ग्रहण करतो… अगदी भृगू ॠषिंनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले!

देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला असतात पण त्याचं असणं मान्य नसतं. साक्षीभावाने तो सर्वांबरोबर सर्वकाळ असतोच फक्त त्याच्या कुठल्याही स्वरुपाचे श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो.

॥श्रीगुरुदेवदत्त॥

जय जय श्री स्वामी समर्थ

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “सुवर्णसुखाचा निर्झरू” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “सुवर्णसुखाचा निर्झरू” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आकाशात तांबूस आभा ••• तोच तांबूल रंग जमीनीवर सांडलेला••• या दोघांना सांधणारी डोंगराची रांग•••डोंगर माथ्यावर चमचमणारी सोनेरी किरणे असलेला सोन्याचा गोळा•••

अहाहा नेत्रसुख देणारे हे सुंदर चित्र••• उगवत्या सूर्याचे आहे का मावळतीच्या सूर्याचे आहे हे समजणे कठीण. 

पण काय सांगते हे चित्र? फक्त सकाळ किंवा संध्याकाळ झाली आहे एवढेच  ? नक्कीच नाही. 

१.झरा म्हटले तरी एक सदा पुढे जाणारा चैतन्याचा स्रोत जाणवतो. पण या सोनेरी रंगामुळे हा झरा रुपेरी न रहाता सोन्याचा होऊन जातो. 

२.झर्‍याचा उगम नेहमीच डोंगरमाथ्यावरून होतो.  हा सोन्याचा झरा पण डोंगर माथ्यावर उगम पावला आहे. 

३.  पुढे पुढेच वाहणारा हा स्रोत अनेक आशेची, यशाची, प्रगतीची रोपटी वाढवतो आणि याच रोपट्यांचे डेरेदार वृक्षात परिवर्तन होणार असल्याची ग्वाही देतो. हे सांगताना या सोनेरी वाटेवर चितारलेली छोटी झुडुपे आणि वर मोठ्या झाडाची फांदी एक समाधानकारक लहर मनात निर्माण करते.

४. जमीन आणि आकाश सांधणारे डोंगर खूप मोठा आशय सांगतात. जमिनीवर घट्ट पाय रोऊन उभे राहिले तरी आकाशा एवढी उंची गाठता येते.

५. तुमच्या मनात आले तर तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकता .ते सामर्थ्य तुमच्यामधे आहे .फक्त त्याची जाणिव सूर्यातील उर्जेप्रमाणे तुम्ही जागवा.

६. सूर्यातून ओसंडणारी ही आभा दिसताना जरी लहान दिसली तरी तिचा विस्तार केवढा होऊ शकतो हे प्रत्यक्ष तुम्ही जाणा.

७. जैसे बिंब तरि बचके एवढे।

     परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे।

     शब्दांची व्याप्ति तेणें पाडे।

     अनुभवावी।। (श्रीज्ञानेश्वरी : ४-२१३)

ज्ञानेश्वरीतील या ओवी प्रमाणे तुम्ही स्वत: जरी लहान वाटलात तरी तुमच्यातील सामर्थ्य तुमचे कर्तृत्व यामुळे तुम्ही मोठे कार्य निश्चित करू शकता या आदर्शाची आठवण करून देणारा हा दीपस्तंभ अथवा तेवती मशाल वाटतो .

८. त्यापुढे आलेला देवळाचा भाग , देवळाची ओवरी, त्यावर विसावलेला माणूस ••• हे सगळे जे काही माझे माझे म्हणून मी गोळा केले आहे ते माझे नाही .हे या परमात्म्याचे आहे याची जाणिव मला आहे हे मनापासून या भगवंताच्या दरबारात बसून मी भगवंताला सांगत आहे. असा अर्थ प्रतीत करणारे हे चित्र वाटते .

०९. देवाला जाताना नेहमी पाय धुवून जावे. तर मी देवळात जाताना या सुवर्णसुखाच्या झर्‍यात पाय धुवून मी तुझ्याकडे आलो आहे .हे सांगत आहे.

१०. हे सगळे नक्की काय आहे हे सांगायला सोन्यासारख्या पिवळ्या धम्मक अक्षरांनी लिहिलेले सुवर्णसुखाचा निर्झरू हे शिर्षक.

११. यातील निर्झरू या शब्दाने त्यातील लडिवाळपणा जाणवतो. आणि हा निर्झर सुवर्णाचाच नाही तर तसेच सुख देणारा आहे हे सांगतात.

१२. ना सकाळ ना रात्र, ना जमिनीवर ना आकाशात, ना मंदिरात ना मंदिराबाहेर, ना दृष्य ना अदृष्य अशा परिस्थीतीत नरसिंहासारखे  ना बालपणी ना वृद्धापकाळी घडलेले हे परमात्म्याचे दर्शन आहे असे वाटते .

अशा छान मुखपृष्ठासाठी सुनिल मांडवे यांना धन्यवाद.

अशा छान मुखपृष्ठाची निवड केल्याबद्दल प्रकाशक सुनिताराजे पवार आणि लेखक  एकनाथ उगले यांचे आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अचूक शब्द… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ अचूक शब्द… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट नेहेमी आठवते. एक कोळी असतो. रोज मासेमारी करुन आपला चरितार्थ चालवत असतो.आणि एका झोपडीत रहात असतो. त्याची बायको पण कष्ट करत असते.पण तिचा दैव,भाग्य यावर जरा रोषच असतो. कोळी आहे त्यात समाधानी असतो व मिळेल त्या साठी देवाचे आभार मानत असतो. शक्य तितके परोपकार करत असतो. बरेच दिवस दोघे प्रार्थना करत असतात. एक दिवस प्रार्थना सफल होते आणि एक दैवी शक्ती समोर येते आणि म्हणते तुमच्या तीन इच्छा मी पूर्ण करेन. काय इच्छा आहेत ते सांगा. कोळी म्हणतो आम्हाला भरपूर घरभर मासे पाहिजेत. त्याच क्षणी त्याची इच्छा पूर्ण होते. तो आनंदून जातो. तितक्यात त्याची अविचारी बायको म्हणते “इतके मासे माझ्या नाकाला चिकटवू का” त्याच क्षणी सगळे मासे तिच्या नाकाला चिकटतात. नाईलाजाने ते तिसरी इच्छा मागतात “हे सगळे मासे गायब होऊ दे.” योग्य विचार व योग्य शब्द याचा वापर न केल्या मुळे सगळे वर वाया गेले.

अजून एक गोष्ट लक्षात आहे.आणि ती फार आवडती आहे. एक अंध भिकारी असतो.अनेक वर्षे एका मंदिराच्या बाहेर बसत असतो. त्यालाही एक दैवी शक्ती प्रसन्न होते आणि एकच वर माग असे सांगते. त्याने मागितलेला वर सर्वांनी लक्षात घेण्या सारखा आहे. त्यात त्याची हुशारी व अचूक शब्द दिसतात.जणू ते शब्द म्हणजे आपल्याला शिकवण आहे. त्याचे मागणे असे असते, माझा खापर पणतू राजाच्या गादीवर बसलेला बघायचा आहे.

एकाच वरात त्याने किती इच्छा व्यक्त केल्या.असे अचूक शब्द वापरायला शिकले पाहिजे.

प्रत्येक शब्दाला त्याचे वलय असते. शब्दातून स्पंदने बाहेर पडतात. आणि तिच आपल्या भोवती असतात.   म्हणूनच शब्द योग्य व जपून वापरावेत. शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपल्या घरातील मोठी माणसे नेहेमी सांगत असतात. शब्द जपून वापरा.सकारात्मक वापरा. समजा आपण ज्या व्यक्ती विषयी अपशब्द वापरतो किंवा राग,चिड व्यक्त करतो ते ऐकायला ती व्यक्ती समोर  नसेल किंवा त्या व्यक्तीने ते स्वीकारलेच नाहीत तर काय होईल. भिंतीवर चेंडू टाकल्या सारखे होईल. तो चेंडू भिंतीने न स्वीकारल्या मुळे पुन्हा आपल्यालाच लागेल. तसेच शब्दांचे असते.

म्हणून मंत्रे,स्तोत्रे,जप याला व त्यातील शब्दांना महत्व असते. त्यामुळे सकारात्मक व अचूक शब्दांची निवड महत्वाची असते.

वैश्विक,दैवी शक्ती देत असते.फक्त आपल्याला योग्य शब्दात सांगता यायला हवे. योग्य शब्दांवर फोकस करता यायला हवे. या साठी वैचारिक परिपक्वता,चांगले विचार,परोपकार अशी वृत्ती असायला हवी. तरच आपली योग्य ध्येयाकडे वाटचाल होते.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

३०/११/२०२३

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुलपुडा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फुलपुडा…” ☆ श्री मंगेश मधुकर

“एक फुलपुडा द्या”

“कितीचा”

“वीसचा” पुडा बांधताना काकूंनी प्रत्येक पिशवीतून मूठभर फुलं घेतली. किमतीच्या मानानं फुलं जास्त होती. मी आणि सौनं एकमेकांकडे पाहिलं.

“काकू,वीस रुपयांचा फुलपुडा पाहिजेय” सौ. 

“माहितीये”

“मग एवढी फुलं”

“घ्या हो. तेवढीच माज्याकडून देवाची सेवा” प्रसन्न हसत काकू म्हणाल्या.

“खूप जास्त देतायेत”

“असू द्या.” काकूंच्या प्रेमळ बोलण्यानं क्षणात माणुसकीचं नातं जोडलं गेलं.

“डोळ्याचं ऑपरेशन कधी झालं ? ” सौनी आस्थेनं विचारलं.

“आठ दिस झाले”

“घरी आराम करायचा”

“असं कसं चाललं,पोटाची खळगी भरावी लागते ना. मी ही अशी म्हातारी, पोरं मोठी झाली. सुना आल्यात पण आज बी म्या कुणावर अवलंबून नाय. माज्या पैशानं फुलं आणून इकते. पैसे मिळवते म्हणून घरात अजूनही मान हाये.”

“या वयातही काम करता कौतुक वाटतं”

“तेत माजा स्वार्थ हायेच की”

“म्हणजे”

“इथं फुलं इकायला बसते त्यात जीव रमतो. येगयेगळी लोकं भेटतात.ईचारपुस करतात ते बरं वाटतं. घरी नुसतं बसून डोकं कामातून जातं. माज्याशी कुणालाबी बोलायला येळ नाई. काई ईचारल तर वसकन वरडतात. त्यापरिस इथं बसलेलं बरं”

“काकू,एक विचारू”

“काय ईचारणार ते माहितेय. जास्त फुलं का देता”

“बरोबर”

“ताई,आतापतूर लई पुडे दिले पण ह्ये इचरणारी तूच पयली.”

“इतर दुकानदार असं करत नाही. माल देताना हात आखडता घेतात.वर परवडत नाही असं ऐकवतात.”

“ते बी खरंय.”

“कमी फुलं दिली तर पैसे जास्त मिळतील की”

“जास्त दिल्यानं डबल फायदा व्हतो. माज्याकडून फुलपुडा घेतलेलं गिर्हाइक पुना पुना येतं. जास्त फुलं मिळाल्यावर  लोकाला जो आनंद व्हतो ते पावून लई बरं वाटतं.”

“पण यात तुमचं नुकसान होतं ना”

“हा आता पैशे कमी मिळतात पण माल संपतो. फुलं ताजी हायित तोपतूर मागणी.  एकदा का शिळी झाली की मग फेकूनच द्यायची. माणसाचं जगणं सुद्धा फुलासारखच .. उपयोग हाय तवर मान, नायतर….”

“म्हातारपणी पैसा उपयोगाला पडतो” सौ 

“तो कितीबी कमवला तरी कमीच. पैसा हा पाणीपुरीसारखा असतो,कधीच मन भरतं नाई. अन गरजंपेक्षा जास्त मिळालं की जगण्याला फाटे फुटतातच”

“वा,कसलं भारी बोललात.”

दोन दुकानदारांचे टोकाचे अनुभव. परिस्थिती भिन्न. एक माल देताना हात आखडणारा पक्का व्यवहारी तर दुसरी सढळ हातानं फुलपुडा देणारी. दोघेही आपआपल्या जागी बरोबर !! पहिल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक तर दुसऱ्या ठिकाणी भावनेची. 

“निघतो,आता भेट होत राहिलच” आम्ही फुलपुडा घेऊन  निघाल्यावर गुलाबांचं टपोरं फुल देत काकू म्हणाल्या “ *माणसानं घेताना आवर घालावा पर देताना हात कायम सैल सोडवा.*” खूप मोठी गोष्ट काकूंनी अगदी सहज सांगितली. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत… लेखक : डॉक्टर नील वाघमारे ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…लेखक : डॉक्टर नील वाघमारे ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आज संध्याकाळी इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण करेल.

आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार होऊ.

या पार्श्वभूमीवर, इस्रोच्या आर्मीत असलेल्या एका हिऱ्याची गोष्ट शेअर करायची आहे.  त्यांचे नाव श्री भरत कुमार के, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ…

कोळशाच्या खोल खाणीत पडलेला हा हिरा श्री रामदास जोगळेकर आणि त्यांच्या वहिनी सौ वनजा भावे यांनी भिलाई (छत्तीसगड) जवळील चारोडा गावातून 10’x 10’ च्या झोपड्यातून शोधून काढला.  गावाच्या आजूबाजूला कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत आणि तिथे तासभर उभे राहिल्यास कोळशाला हात लावला नाही तरी तुमचे कपडे काळे होतील अशी परिस्थिती आहे….

श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना कळले की सेंट्रल स्कूल, भिलाई मार्शलिंग यार्डमधील एका मुलाने गणित आणि भौतिकशास्त्रात 99% आणि रसायनशास्त्रात 98% गुण मिळवले आहेत आणि त्याला इंजिनीअरिंग करायचे आहे, तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांना त्या मुलामध्ये ‘स्पार्क’ दिसला आणि त्यांनी त्याच्या आयआयटी कोचिंगची फी भरली.

मुलाने आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळवला त्याची फी देखील दोघांनी भरली आणि श्री. भरत कुमार के हा टॉपर होता आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 8 पैकी 7 सेमिस्टरमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले!!

आयआयटी धनबादमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये SAIL ने सिलेक्ट केलेला तो एकमेव कॅन्डीडेट होता आणि फायनली 2019 मध्ये  इस्रो ने त्याची निवड केली.

त्यांचे वडील सुरक्षा रक्षक आहेत आणि आई खाणीतील कामासाठी वाट पाहत असलेल्या रोजंदारी कामगारांना इडली विकते.

श्री भरत कुमार के आणि त्यांच्या पालकांना सलाम.  कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून तो चमकदार बनवण्याचे श्रेय श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना जाते. त्या दोघांनाही नमन….

लेखक : डॉक्टर नील वाघमारे

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो.

तिथे एकाच ठिकाणी

” दूध, दही, ताक, लोणी, तूप”

बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!

पाहूया कसे ते..?

“दूध”

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:.. कुमारिका .

दूध म्हणजे माहेर .

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र,

सकस,

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

“दही”

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू  होते .

दुधाचं  नाव बदलून दही होतं !

दही म्हणजे त्याच अवस्थेत  थिजून घट्ट होणं !

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते.

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी ” स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ?

नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

“ताक”

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात, त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.

“दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”

‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)’

ताक दोघांनाही शांत करतं.. यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.

“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच !

‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं .

“लोणी”

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा, मऊ .. रेशमी ..  मुलायम .. नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो .

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही.

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

“तूप”

‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”

वरणभात असो

शिरा असो

किंवा

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं. हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.

“दूध ते तूप”

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.

“स्री आहे तर श्री आहे हे म्हणणं वावगं ठरूं नये.”

“असा हा स्रीचा संपूर्ण प्रवास …. न थांबणारा, सतत धावणारा, न कावणारा, न घाबरणारा, कुटूंबासाठी झिजणारा, कुटूंबाची काळजी घेणारा”

… ह्या प्रवासास तथा ” स्त्री ” जातीस मानाचा मुजरा.ll.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज त्रिपुरी पौर्णिमा! दसरा- दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते! त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो!

तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो. लहानपणी त्रिपुर पाहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू! वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून गेलेली दिसत असे.गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दीपमाळा मी खूप पाहिल्या..

त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही,असा वर मागून घेतला.या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना मुद्दाम खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना .देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली, तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले.

या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध आणि शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

पण….. माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला. सासुबाई सांगत, “समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला.” त्याकाळी जन्म वेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! त्यामुळे लग्नानंतर तारखेपेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात माझे धाकटे दीर आणि मुले यांचा पुढाकार असे. आम्ही सर्वजण पणत्या, मेणबत्ती घेऊन त्रिपुर लावण्यास मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या प्रकाशाने उजळून गेलेले पाहण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे.शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे निरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खूपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस ऊबदार शालीत गुरफटून घेत डिसेंबर, जानेवारी येतात., पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचा एक एक त्रिपुर पूर्ण होत असताना मनाला खूप आनंद होतो! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो, असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे ह्यांना कायम मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरदः शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares