मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ देवाविषयीचे प्रश्न — लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे ☆

१) देव कुठे आहे?

२) देव काय पाहतो?

३) देव काय करतो?

४) देव केव्हा हसतो?

५) देव केव्हा रडतो?

६) देव काय देतो?

७) देव काय खातो?

१) देव कुठे आहे? – जसे दुधात तूप कुठे आहे? तर दुधात तूप सर्वत्र आहे. तसेच देव सर्वत्र आहे. सर्व देशात, सर्व काळात व सर्व वस्तूत आहे.

तो नसे ऐसा ठाव असे कवण | सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ||

– नामदेव…

विठ्ठल जळी स्थळी भरला | रिता ठाव नाही उरला ||

– ज्ञानदेव…

२) देव काय पाहतो? – जसे दिवा कुठे पाहतो? तर सर्व ठिकाणी पाहतो. तसा देव सर्वांना पाहतो. त्याचे डोळे विशाल आहेत.

‘मनोजगर्वमोचनं विशाललोल लोचनं’ |

– श्रीशंकराचार्य…

त्याच्या दृष्टीतून काहीसुद्धा सुटू शकत नाही. ना खारुताईची सेवा ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत. कोणी असं समजू नये मला कोणी पाहत नाही. तो सर्वांना आणि सर्वत्र पाहतो.

३) देव काय करतो? – भक्तांचा सांभाळ व दुष्टांचे निर्दालन.

घेऊनिया चक्र गदा | हाची धंदा करितो ||१||

भक्ताराखे पायापाशी | दुर्जनासी संहारी ||

– तुकाराम…

तुका म्हणे आले समर्थाच्या मना | तरी होय राणा रंक त्याचा ||

– तुकाराम…

४) देव केव्हा हसतो? – जीव जेव्हा जननीच्या उदरात असतो तेव्हा देवास सांगतो, “या संकटातून मला सोडव. मी तुझा अंश आहे.” जीव म्हणतो, “सोहं, तू आणि मी समान.” पण जीव जेव्हा संकटातून सुटतो, बाहेर येतो तेव्हा म्हणतो, कोहं (क्यां)! मी कोण आहे?” देव तेव्हा हसतो. आणि देवास फसविणाऱ्या जीवाच्या मागे अहं लावून देतो. अहंमुळे जीव दु:ख भोगतो.

५) देव केव्हा रडतो? – भक्ताची दीन दशा पाहून. जेव्हा सुदामदेव श्रीकृष्णास भेटण्यास आले. त्यांनी सुदामाची दशा पाहिली. फाटके कपडे, पायात चप्पल नाही, शरीर कृश झालेले. हे पाहून देवास अश्रू आवरता आले नाहीत. 

देव दयाळ दयाळ | करी तुकयाचा सांभाळ ||

– तुकाराम…

६) देव काय देतो? – देव सर्वांना सर्व देतो. देह देतो, इंद्रिय देतो, प्रेम, क्षमा शांती आणि शक्ति देतो.

देवे दिला देह भजना गोमटा | तया झाला फाटा बाधीकेचा ||

– तुकाराम…

दिली इंद्रिये हात पाय कान | डोळे मुख बोलाया वचन |

जेणे तू जोडसी नारायण | नाशे जीवपण भवरोग ||

– तुकाराम…

प्रेम देवाचे हे देणे | देहभाव जाय जेणे ||

– तुकाराम…

देव सर्वांना उचित तेच सर्व देतो. कारण हे सर्व देवाचेच आहे.

७) देव काय खातो? – देव प्रथम भक्ताचे दोष खातो.

माझ्या मीपणाचा करोनि फराळ | उरले खावयासी बैसला सकळ |

ऐसा भुकाळ हा नंदाचा गोवळ | यासी न पुरेची ग्रासीता माझा खेळ ||

– निळोबा…

यानंतर भक्ताचे चित्त हरण करतो व जन्म-मरणपण खाऊन टाकतो. हे सर्व केल्यानंतर भक्ताची बोरे अथवा कण्या खातो.

“सप्त द्विप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार |

एक बार शबरीके घर, एक बार विदुरके घर स्वाद लिया दो बार ||”

भक्ताने सद्भावपूर्ण अर्पण केलेले पत्र, पुष्प, फळ, पाणी प्रार्थना अथवा साधा प्रेमाने केलेला नमस्कारसुद्धा  आनंदाने ग्रहण करतो… अगदी भृगू ॠषिंनी मारलेल्या लाथेच्या पदचिन्हालाही श्रीवत्स चिन्ह म्हणून छातीवर ग्रहण केले!

देवाबद्दल अनंत प्रश्न आणि शंका आपल्याला असतात पण त्याचं असणं मान्य नसतं. साक्षीभावाने तो सर्वांबरोबर सर्वकाळ असतोच फक्त त्याच्या कुठल्याही स्वरुपाचे श्रद्धेने भक्तिभावाने आणि विश्वासाने स्मरण केले की तो आपल्या जीवनात कार्यशील होतो.

॥श्रीगुरुदेवदत्त॥

जय जय श्री स्वामी समर्थ

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – बोलकी मुखपृष्ठे ☆ “सुवर्णसुखाचा निर्झरू” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “सुवर्णसुखाचा निर्झरू” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आकाशात तांबूस आभा ••• तोच तांबूल रंग जमीनीवर सांडलेला••• या दोघांना सांधणारी डोंगराची रांग•••डोंगर माथ्यावर चमचमणारी सोनेरी किरणे असलेला सोन्याचा गोळा•••

अहाहा नेत्रसुख देणारे हे सुंदर चित्र••• उगवत्या सूर्याचे आहे का मावळतीच्या सूर्याचे आहे हे समजणे कठीण. 

पण काय सांगते हे चित्र? फक्त सकाळ किंवा संध्याकाळ झाली आहे एवढेच  ? नक्कीच नाही. 

१.झरा म्हटले तरी एक सदा पुढे जाणारा चैतन्याचा स्रोत जाणवतो. पण या सोनेरी रंगामुळे हा झरा रुपेरी न रहाता सोन्याचा होऊन जातो. 

२.झर्‍याचा उगम नेहमीच डोंगरमाथ्यावरून होतो.  हा सोन्याचा झरा पण डोंगर माथ्यावर उगम पावला आहे. 

३.  पुढे पुढेच वाहणारा हा स्रोत अनेक आशेची, यशाची, प्रगतीची रोपटी वाढवतो आणि याच रोपट्यांचे डेरेदार वृक्षात परिवर्तन होणार असल्याची ग्वाही देतो. हे सांगताना या सोनेरी वाटेवर चितारलेली छोटी झुडुपे आणि वर मोठ्या झाडाची फांदी एक समाधानकारक लहर मनात निर्माण करते.

४. जमीन आणि आकाश सांधणारे डोंगर खूप मोठा आशय सांगतात. जमिनीवर घट्ट पाय रोऊन उभे राहिले तरी आकाशा एवढी उंची गाठता येते.

५. तुमच्या मनात आले तर तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकता .ते सामर्थ्य तुमच्यामधे आहे .फक्त त्याची जाणिव सूर्यातील उर्जेप्रमाणे तुम्ही जागवा.

६. सूर्यातून ओसंडणारी ही आभा दिसताना जरी लहान दिसली तरी तिचा विस्तार केवढा होऊ शकतो हे प्रत्यक्ष तुम्ही जाणा.

७. जैसे बिंब तरि बचके एवढे।

     परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडे।

     शब्दांची व्याप्ति तेणें पाडे।

     अनुभवावी।। (श्रीज्ञानेश्वरी : ४-२१३)

ज्ञानेश्वरीतील या ओवी प्रमाणे तुम्ही स्वत: जरी लहान वाटलात तरी तुमच्यातील सामर्थ्य तुमचे कर्तृत्व यामुळे तुम्ही मोठे कार्य निश्चित करू शकता या आदर्शाची आठवण करून देणारा हा दीपस्तंभ अथवा तेवती मशाल वाटतो .

८. त्यापुढे आलेला देवळाचा भाग , देवळाची ओवरी, त्यावर विसावलेला माणूस ••• हे सगळे जे काही माझे माझे म्हणून मी गोळा केले आहे ते माझे नाही .हे या परमात्म्याचे आहे याची जाणिव मला आहे हे मनापासून या भगवंताच्या दरबारात बसून मी भगवंताला सांगत आहे. असा अर्थ प्रतीत करणारे हे चित्र वाटते .

०९. देवाला जाताना नेहमी पाय धुवून जावे. तर मी देवळात जाताना या सुवर्णसुखाच्या झर्‍यात पाय धुवून मी तुझ्याकडे आलो आहे .हे सांगत आहे.

१०. हे सगळे नक्की काय आहे हे सांगायला सोन्यासारख्या पिवळ्या धम्मक अक्षरांनी लिहिलेले सुवर्णसुखाचा निर्झरू हे शिर्षक.

११. यातील निर्झरू या शब्दाने त्यातील लडिवाळपणा जाणवतो. आणि हा निर्झर सुवर्णाचाच नाही तर तसेच सुख देणारा आहे हे सांगतात.

१२. ना सकाळ ना रात्र, ना जमिनीवर ना आकाशात, ना मंदिरात ना मंदिराबाहेर, ना दृष्य ना अदृष्य अशा परिस्थीतीत नरसिंहासारखे  ना बालपणी ना वृद्धापकाळी घडलेले हे परमात्म्याचे दर्शन आहे असे वाटते .

अशा छान मुखपृष्ठासाठी सुनिल मांडवे यांना धन्यवाद.

अशा छान मुखपृष्ठाची निवड केल्याबद्दल प्रकाशक सुनिताराजे पवार आणि लेखक  एकनाथ उगले यांचे आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अचूक शब्द… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🌸 विविधा 🌸

☆ अचूक शब्द… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

मला एक लहानपणी ऐकलेली गोष्ट नेहेमी आठवते. एक कोळी असतो. रोज मासेमारी करुन आपला चरितार्थ चालवत असतो.आणि एका झोपडीत रहात असतो. त्याची बायको पण कष्ट करत असते.पण तिचा दैव,भाग्य यावर जरा रोषच असतो. कोळी आहे त्यात समाधानी असतो व मिळेल त्या साठी देवाचे आभार मानत असतो. शक्य तितके परोपकार करत असतो. बरेच दिवस दोघे प्रार्थना करत असतात. एक दिवस प्रार्थना सफल होते आणि एक दैवी शक्ती समोर येते आणि म्हणते तुमच्या तीन इच्छा मी पूर्ण करेन. काय इच्छा आहेत ते सांगा. कोळी म्हणतो आम्हाला भरपूर घरभर मासे पाहिजेत. त्याच क्षणी त्याची इच्छा पूर्ण होते. तो आनंदून जातो. तितक्यात त्याची अविचारी बायको म्हणते “इतके मासे माझ्या नाकाला चिकटवू का” त्याच क्षणी सगळे मासे तिच्या नाकाला चिकटतात. नाईलाजाने ते तिसरी इच्छा मागतात “हे सगळे मासे गायब होऊ दे.” योग्य विचार व योग्य शब्द याचा वापर न केल्या मुळे सगळे वर वाया गेले.

अजून एक गोष्ट लक्षात आहे.आणि ती फार आवडती आहे. एक अंध भिकारी असतो.अनेक वर्षे एका मंदिराच्या बाहेर बसत असतो. त्यालाही एक दैवी शक्ती प्रसन्न होते आणि एकच वर माग असे सांगते. त्याने मागितलेला वर सर्वांनी लक्षात घेण्या सारखा आहे. त्यात त्याची हुशारी व अचूक शब्द दिसतात.जणू ते शब्द म्हणजे आपल्याला शिकवण आहे. त्याचे मागणे असे असते, माझा खापर पणतू राजाच्या गादीवर बसलेला बघायचा आहे.

एकाच वरात त्याने किती इच्छा व्यक्त केल्या.असे अचूक शब्द वापरायला शिकले पाहिजे.

प्रत्येक शब्दाला त्याचे वलय असते. शब्दातून स्पंदने बाहेर पडतात. आणि तिच आपल्या भोवती असतात.   म्हणूनच शब्द योग्य व जपून वापरावेत. शब्दांमध्ये खूप ताकद असते. आपल्या घरातील मोठी माणसे नेहेमी सांगत असतात. शब्द जपून वापरा.सकारात्मक वापरा. समजा आपण ज्या व्यक्ती विषयी अपशब्द वापरतो किंवा राग,चिड व्यक्त करतो ते ऐकायला ती व्यक्ती समोर  नसेल किंवा त्या व्यक्तीने ते स्वीकारलेच नाहीत तर काय होईल. भिंतीवर चेंडू टाकल्या सारखे होईल. तो चेंडू भिंतीने न स्वीकारल्या मुळे पुन्हा आपल्यालाच लागेल. तसेच शब्दांचे असते.

म्हणून मंत्रे,स्तोत्रे,जप याला व त्यातील शब्दांना महत्व असते. त्यामुळे सकारात्मक व अचूक शब्दांची निवड महत्वाची असते.

वैश्विक,दैवी शक्ती देत असते.फक्त आपल्याला योग्य शब्दात सांगता यायला हवे. योग्य शब्दांवर फोकस करता यायला हवे. या साठी वैचारिक परिपक्वता,चांगले विचार,परोपकार अशी वृत्ती असायला हवी. तरच आपली योग्य ध्येयाकडे वाटचाल होते.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

३०/११/२०२३

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “फुलपुडा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “फुलपुडा…” ☆ श्री मंगेश मधुकर

“एक फुलपुडा द्या”

“कितीचा”

“वीसचा” पुडा बांधताना काकूंनी प्रत्येक पिशवीतून मूठभर फुलं घेतली. किमतीच्या मानानं फुलं जास्त होती. मी आणि सौनं एकमेकांकडे पाहिलं.

“काकू,वीस रुपयांचा फुलपुडा पाहिजेय” सौ. 

“माहितीये”

“मग एवढी फुलं”

“घ्या हो. तेवढीच माज्याकडून देवाची सेवा” प्रसन्न हसत काकू म्हणाल्या.

“खूप जास्त देतायेत”

“असू द्या.” काकूंच्या प्रेमळ बोलण्यानं क्षणात माणुसकीचं नातं जोडलं गेलं.

“डोळ्याचं ऑपरेशन कधी झालं ? ” सौनी आस्थेनं विचारलं.

“आठ दिस झाले”

“घरी आराम करायचा”

“असं कसं चाललं,पोटाची खळगी भरावी लागते ना. मी ही अशी म्हातारी, पोरं मोठी झाली. सुना आल्यात पण आज बी म्या कुणावर अवलंबून नाय. माज्या पैशानं फुलं आणून इकते. पैसे मिळवते म्हणून घरात अजूनही मान हाये.”

“या वयातही काम करता कौतुक वाटतं”

“तेत माजा स्वार्थ हायेच की”

“म्हणजे”

“इथं फुलं इकायला बसते त्यात जीव रमतो. येगयेगळी लोकं भेटतात.ईचारपुस करतात ते बरं वाटतं. घरी नुसतं बसून डोकं कामातून जातं. माज्याशी कुणालाबी बोलायला येळ नाई. काई ईचारल तर वसकन वरडतात. त्यापरिस इथं बसलेलं बरं”

“काकू,एक विचारू”

“काय ईचारणार ते माहितेय. जास्त फुलं का देता”

“बरोबर”

“ताई,आतापतूर लई पुडे दिले पण ह्ये इचरणारी तूच पयली.”

“इतर दुकानदार असं करत नाही. माल देताना हात आखडता घेतात.वर परवडत नाही असं ऐकवतात.”

“ते बी खरंय.”

“कमी फुलं दिली तर पैसे जास्त मिळतील की”

“जास्त दिल्यानं डबल फायदा व्हतो. माज्याकडून फुलपुडा घेतलेलं गिर्हाइक पुना पुना येतं. जास्त फुलं मिळाल्यावर  लोकाला जो आनंद व्हतो ते पावून लई बरं वाटतं.”

“पण यात तुमचं नुकसान होतं ना”

“हा आता पैशे कमी मिळतात पण माल संपतो. फुलं ताजी हायित तोपतूर मागणी.  एकदा का शिळी झाली की मग फेकूनच द्यायची. माणसाचं जगणं सुद्धा फुलासारखच .. उपयोग हाय तवर मान, नायतर….”

“म्हातारपणी पैसा उपयोगाला पडतो” सौ 

“तो कितीबी कमवला तरी कमीच. पैसा हा पाणीपुरीसारखा असतो,कधीच मन भरतं नाई. अन गरजंपेक्षा जास्त मिळालं की जगण्याला फाटे फुटतातच”

“वा,कसलं भारी बोललात.”

दोन दुकानदारांचे टोकाचे अनुभव. परिस्थिती भिन्न. एक माल देताना हात आखडणारा पक्का व्यवहारी तर दुसरी सढळ हातानं फुलपुडा देणारी. दोघेही आपआपल्या जागी बरोबर !! पहिल्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक तर दुसऱ्या ठिकाणी भावनेची. 

“निघतो,आता भेट होत राहिलच” आम्ही फुलपुडा घेऊन  निघाल्यावर गुलाबांचं टपोरं फुल देत काकू म्हणाल्या “ *माणसानं घेताना आवर घालावा पर देताना हात कायम सैल सोडवा.*” खूप मोठी गोष्ट काकूंनी अगदी सहज सांगितली. 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत… लेखक : डॉक्टर नील वाघमारे ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ सामान्य ब्राह्मणांची असामान्य दानत…लेखक : डॉक्टर नील वाघमारे ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आज संध्याकाळी इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंगचे प्रक्षेपण करेल.

आपण सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगाचे साक्षीदार होऊ.

या पार्श्वभूमीवर, इस्रोच्या आर्मीत असलेल्या एका हिऱ्याची गोष्ट शेअर करायची आहे.  त्यांचे नाव श्री भरत कुमार के, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ…

कोळशाच्या खोल खाणीत पडलेला हा हिरा श्री रामदास जोगळेकर आणि त्यांच्या वहिनी सौ वनजा भावे यांनी भिलाई (छत्तीसगड) जवळील चारोडा गावातून 10’x 10’ च्या झोपड्यातून शोधून काढला.  गावाच्या आजूबाजूला कोळसा आणि लोखंडाच्या खाणी आहेत आणि तिथे तासभर उभे राहिल्यास कोळशाला हात लावला नाही तरी तुमचे कपडे काळे होतील अशी परिस्थिती आहे….

श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना कळले की सेंट्रल स्कूल, भिलाई मार्शलिंग यार्डमधील एका मुलाने गणित आणि भौतिकशास्त्रात 99% आणि रसायनशास्त्रात 98% गुण मिळवले आहेत आणि त्याला इंजिनीअरिंग करायचे आहे, तेव्हा ते त्याला भेटण्यासाठी आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी गेले. त्यांना त्या मुलामध्ये ‘स्पार्क’ दिसला आणि त्यांनी त्याच्या आयआयटी कोचिंगची फी भरली.

मुलाने आयआयटी धनबादमध्ये प्रवेश मिळवला त्याची फी देखील दोघांनी भरली आणि श्री. भरत कुमार के हा टॉपर होता आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये 8 पैकी 7 सेमिस्टरमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले!!

आयआयटी धनबादमधून कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये SAIL ने सिलेक्ट केलेला तो एकमेव कॅन्डीडेट होता आणि फायनली 2019 मध्ये  इस्रो ने त्याची निवड केली.

त्यांचे वडील सुरक्षा रक्षक आहेत आणि आई खाणीतील कामासाठी वाट पाहत असलेल्या रोजंदारी कामगारांना इडली विकते.

श्री भरत कुमार के आणि त्यांच्या पालकांना सलाम.  कोळशाच्या खाणीतून हिरा शोधून तो चमकदार बनवण्याचे श्रेय श्री जोगळेकर आणि श्रीमती भावे यांना जाते. त्या दोघांनाही नमन….

लेखक : डॉक्टर नील वाघमारे

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचतांना वेचलेले ?

☆ ‘स्त्रियांच्या सुंदरछटा…’ – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन 

डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो.

तिथे एकाच ठिकाणी

” दूध, दही, ताक, लोणी, तूप”

बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!

पाहूया कसे ते..?

“दूध”

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन:.. कुमारिका .

दूध म्हणजे माहेर .

दूध म्हणजे आईवडिलांशी नातं .

शुभ्र,

सकस,

निर्भेळ,

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं.

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

“दही”

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की कुमारिकेची वधू  होते .

दुधाचं  नाव बदलून दही होतं !

दही म्हणजे त्याच अवस्थेत  थिजून घट्ट होणं !

लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते.

दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा, व्यसनी, व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला तरी ” स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ?

नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

“ताक”

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या कि दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात, त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.

“दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”

‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)’

ताक दोघांनाही शांत करतं.. यांवर उत्तम उपाय असं आयुर्वेद म्हणतो.

“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं.सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच !

‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नावर  कामी येतं .

“लोणी”

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं  तेव्हा, मऊ .. रेशमी ..  मुलायम .. नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो .

हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात.पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही.

तरुण दिसण्यासाठी ती त्याचं तोंड काळं करते.

‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

“तूप”

‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही.

ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी,

नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते;त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”

वरणभात असो

शिरा असो

किंवा

बेसन लाडू असो

घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं. हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.

“दूध ते तूप”

हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास.

“स्री आहे तर श्री आहे हे म्हणणं वावगं ठरूं नये.”

“असा हा स्रीचा संपूर्ण प्रवास …. न थांबणारा, सतत धावणारा, न कावणारा, न घाबरणारा, कुटूंबासाठी झिजणारा, कुटूंबाची काळजी घेणारा”

… ह्या प्रवासास तथा ” स्त्री ” जातीस मानाचा मुजरा.ll.

लेखक : अज्ञात

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ आठवणींचा त्रिपूर…! ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आज त्रिपुरी पौर्णिमा! दसरा- दिवाळीपासून सुरू झालेल्या सर्व सणांची सांगता या त्रिपुरी पौर्णिमेने होते! त्रिपुरी पौर्णिमा आली की डोळ्यासमोर आपोआपच आठवणींचा त्रिपुर उभा राहतो!

तेलाच्या पणत्यांनी उजळलेली असंख्य दिव्यांची दीपमाळ दिसावी तसा हा आठवणींचा त्रिपुर डोळ्यासमोर येतो. लहानपणी त्रिपुर पाहायला संध्याकाळी सर्व देवळातून फिरत असू! वर्षभर उभी असलेली दगडी त्रिपुर माळ उजळून गेलेली दिसत असे.गोव्यातील तसेच कोकणातील देवळातून अशा दीपमाळा मी खूप पाहिल्या..

त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही,असा वर मागून घेतला.या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांना मुद्दाम खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना .देवांनी भगवान शंकराची प्रार्थना केली, तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाऊ लागले.

या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते. तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. एकादशी पासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. बौद्ध आणि शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे.

पण….. माझ्यासाठी ही त्रिपुरी पौर्णिमा मोठी भाग्याची होती बहुतेक! कारण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेला झाला. सासुबाई सांगत, “समोर देवळात त्रिपुर लावून आले आणि मग यांचा जन्म झाला.” त्याकाळी जन्म वेळ अगदी परफेक्ट नोंदली जाण्याची शक्यता कमी असे, पण यांचा जन्म त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी झाला एवढे मात्र खरे! त्यामुळे लग्नानंतर तारखेपेक्षा त्रिपुरी पौर्णिमेला यांचा वाढदिवस साजरा केला जाई!

सांगलीला आमच्या घरासमोर असलेल्या मारुती मंदिरात संध्याकाळी त्रिपुर लावण्यात माझे धाकटे दीर आणि मुले यांचा पुढाकार असे. आम्ही सर्वजण पणत्या, मेणबत्ती घेऊन त्रिपुर लावण्यास मदत करत असू. मंदिराचे सौंदर्य पणत्यांच्या प्रकाशाने उजळून गेलेले पाहण्यात आम्हाला खूप आनंद मिळत असे. या काळात आकाश साधारणपणे निरभ्र असे.शांत वातावरणात वाऱ्याची झुळूक आणि गारवा असला तरी पणत्या तेवण्यासाठी योग्य हवा असे. सगळीकडे निरव शांतता आणि अंधार असताना ते दिवे खूपच उजळून दिसत! अगदी बघत राहावे असे!

प्रत्येक सण आपले वैशिष्ट्य घेऊन येतो. तसा हा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस! यानंतर थंडीचे दिवस ऊबदार शालीत गुरफटून घेत डिसेंबर, जानेवारी येतात., पण बरेचसे मोठे सण संपलेले असतात. संक्रांतीचे संक्रमण सोडले तर फाल्गुनातील होळी आणि चैत्र पाडव्यापर्यंत सर्व निवांत असते.

ह्यांच्या आयुष्याचा एक एक त्रिपुर पूर्ण होत असताना मनाला खूप आनंद होतो! या त्रिपुरी पौर्णिमेच्या आनंदात आम्ही परिपूर्ण जीवन जगलो, असेच आनंदाचे, आरोग्याचे टिपूर चांदणे ह्यांना कायम मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना! जीवेत शरदः शतम्!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “हाय फाय, न्हाय काय”… ☆ श्री मनोज मेहता ☆

श्री मनोज मेहता

? मनमंजुषेतून ?

 “हाय फाय, न्हाय काय… ☆ श्री मनोज मेहता 

माझ्या वडिलांचं इंग्रजी अतिशय उच्च दर्जाचं होतं. मला मराठीत कमी मार्क मिळाले तर ते खूप ओरडायचे, पण इंग्रजीत कायम काठावर पास होऊन सुद्धा कधीच काही बोलले नाहीत.

माझे सर्व नातेवाईक अजूनही सांगतात की तू ३/४ वर्षांचा असताना सन, मून, दुडियाच वगैरे शब्द मध्ये टाकत ३० मिनिटं थुकी न गिळता भाषण करायचास.

तर मंडळी आजही माझं इंग्रजी असं-तसंच आहे, तरीही माझ्या मैत्र खजिन्यात, परदेशी मित्रांची मोठी संपत्ती आहे. मनापासून सांगतो, मी भारत भ्रमंती करतो त्यावेळी मी फॉरेनर ह्या आकर्षणामुळे सहज त्यांच्याशी गप्पा मारायला जायचो, अन् पुढे ते माझे छान मित्र-मैत्रिणी झाले. ते सगळे आजही  संपर्कात आहेत, हे माझ्यासाठी विशेष आहे.

आता तुम्ही म्हणाल ‘त्यात काय इतकं ?’  हं, इथेच तर खरी गंमत आहे. हाय, हॅल्लो, व्हॉट इज युअर गुड नेम?, यु कमिंग फ्रॉम?, व्हॉट आर यु डुइंग? डु यु लाईक इंडिया? ओह, या या, हं, ओके ओके, वाव व्हॉट अ लव्हली, गिव मी युअर एड्रेस प्लिज, ओके सी यु अगेन, बाय!

हसू नका, माझ्याकडून इतकं इंग्लिश संभाषण म्हणजे भरपूर झालं हो! पण त्यांचं बोलणं मला कळतं आणि मग माझं टेबल टेनिस सुरु होतं.  आणि म्हणूनच आमची गट्टी हो. असो, माझ्या व्यवसायात खऱ्या अर्थाने माझी परीक्षा देवानेच घ्यायची ठरवली म्हटल्यावर काय ?

बायर इंडिया हे माझं अशील. (क्लायंट) डोंबिवलीचा माझा मित्र, ज्येष्ठ गिर्यारोहक श्री. सतीश गायकवाड ह्याच्या कडून १९८३ ला युनियनच्या सदस्यांचे फोटो काढायची पहिली ऑर्डर मिळाली अन् चांगल्या दर्जाच्या फोटोमुळे बघता-बघता अर्थातच मी तिथल्या प्रत्येकाचा मित्रही झालो.

एके दिवशी अचानक मला ठाणे- कोलशेत ऑफिस मधून श्री. पाटणकर यांचा दूरध्वनी आला, “मनोज, तुला आव्हानात्मक छायाचित्रं काढायची आहेत, दुपारी दोन पर्यंत पोच.”

मग काय स्वारी खूष! मी कपंनीत पोचल्यावर त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. ती हकीकत अशी होती की, ‘मुंबई ऑफिस मधून हे पार्सल आलेलं होतं. मुंबईच्या फोटोग्राफर्सनी केलेली कामं आवडली नाहीत, म्हणून आता हे आपल्याला आव्हान म्हणून स्वीकारून, टकाटक करून दाखवायचं आहे. 

मी कामाला लागलो. सुमारे दोन तासांनी पूर्ण केलं व उद्या मी फोटो घेऊन येतो, असं सांगून मार्गस्थ झालो. माझी स्वतःची रंगीत फोटोची लॅब असल्यामुळे, रोल डेव्हलप करून झक्कास प्रिंट्स बनवून बायर इंडिया कोलशेत ऑफिसला पोचलो. ती देशपांडे सरांना दाखवताच ते अन् पूर्ण ऑफिसातले सगळे उडालेच! “मनोज, यार तू कमाल आहेस, मस्त मस्त !” असं म्हणत त्यांचे बॉस म्हणजेच जर्मन डायरेक्टरना त्यांनी ते दाखवले. त्यांनाही आनंद झाला, “ब्युटीफुल फोटोज् !” मान वरखाली करून त्यांनी मला दाद दिली. 

दोन दिवसांनी मी बिल दिलं तर फोटो पाहून उडाले होते, त्यापेक्षा जास्तच उडाले. “तू काय स्वतःला मोठा फोटोग्राफर” वगैरे… सुरु झालं. “इतकं बिल? अजिबात इतके पैसे मिळणार नाही,” हे पांच सहा दिवस  सुरु होतं. 

शेवटी मी त्यांना संगितलं की “मला तुमच्या डायरेक्टरला भेटायचं आहे, मला अपॉइंटमेंट घेऊन द्या.” 

इकडे माझ्या घरी अजून वेगळाच धुमाकूळ. “स्वतःला काय समजतो, तुला इंग्रजी बोलायला येत नाही अन् कोणाला भेटायला चाललाय, व्यवसाय करायची अक्कल नाही” वगैरे मोठ्या बंधूनी हाणला. 

खरंच मला इंग्रजी बोलायला येत नाही, पण मी स्वतःशी ठाम होतो. काहीही झालं तरी माझं म्हणणं मी पटवून देणार, कारण मी खरा होतो. 

तारीख, वेळ ठरली. मी श्री. केलर साहेबांच्या केबिनमध्ये शिरल्यावर, लगेच त्यांनी मला हॅलो, करून शेकहँड केला. उंचेपुरे, निळे डोळे आणि सोनेरी केस, क्या बात! प्रसन्न व्यक्तिमत्व! मला चहा की कॉफी विचारून फोनवर ऑर्डर दिली, अन मी सुरु झालो ना ! “नमस्ते, गुड मोर्निंग सर, आय एम् मनोज, प्रोफेशनल फोटोग्राफर, धिस जॉब इज ॲबसुल्यूटली कमर्शिअल, अँड माय ब्रेनी वर्क, धिस इज नॉट फंक्शनल फोटोग्राफी, सो आय सबमिटेड द बिल! प्लीज, सर यु अंडरस्टॅण्ड ना ?” 

तोपर्यंत चहा आला, पांढरे चौकोनी तुकडे चमच्यात घेत, त्यांनी विचारलं “हाऊ मच?” मी गोंधळून म्हटलं “फ फोर!”  माझ्या आयुष्यात प्रथमच साखरेचे क्यूब पहात होतो. काय सांगू .

ती माझी दोन तासांची आयुष्यातील पहिली प्रोफेशनल मिटिंग, साखरेपेक्षा गोड झाली. माझं म्हणणं मी पटवून दिलं, ते त्यांना पटलं अन् लगेच मुंबई ऑफिसला फोन करून, त्यांनी माझं बिल द्या म्हणून ऑर्डरच काढली. 

मी खूष होऊन त्यांना अक्षरशः मिठी मारली व डोंबिवलीला येण्याचं आमंत्रण दिलं आणि मला एका आठवड्यात चेक मिळाला.

इकडे केलर साहेबांच्या कॅबिन बाहेर बसलेल्या माझ्या मित्राला घाम फुटला होता.

मंडळी, बरोब्बर पंधरा दिवसांनी रविवारी श्री. केलर, त्याची बायको, मुलगी व मुलगा चौघेही आमच्या बंगल्यात चक्क जेवायला आले. माझा भाऊ आणि वहिनींबरोबर त्याचं बोलणं सुरु होतं. मध्येच मी “या, या, परफेक्ट !” म्हणून दाद द्यायचो. मजा करून मंडळी निघाली, तेव्हा केलर यांची मुलं मलाही चल म्हणत होती. हा माझ्यासाठी आयुष्यातला खास क्षण होता, आहे व चिरंतन असणार.

माझ्या या ‘मैत्र पोतडी’त ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इराण, नेदरलँड्, चायना, जपान, सिंगापूर, कॅनडा, अमेरिका व भारतातील विविध राज्यातील मित्र-मैत्रिणी आहेत. उगाच नाही अमेरिकेत जाऊन आंतरराष्ट्रीय टुरिस्ट बसमध्ये, मी ‘लाल टांगा घेऊनी आला’ हे मराठी गाणं गायलं.

जगात कुठेही फिरा, काम करा, मजा करा, मनापासून स्वतःवर प्रेम करत असाल, तर भाषेची भिंत कधीच आड येणार नाही.

© श्री मनोज मेहता

डोंबिवली  मो ९२२३४९५०४४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पांडवकालीन किरीट… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पांडवकालीन किरीट… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

दीपावली लक्ष्मीपूजन व सोमवती अमावस्येनिमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग मंदिरात दुर्मिळ असा प्राचीन रत्नजडीत मुकूट व सुवर्ण मुखवटा भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. या मुकुटाला स्थानिक जन पांडवकालीन किरीट संबोधतात.

हा मुकूट अत्यंत मौल्यवान असून आजच्या बाजारभावानुसार सोने व रत्नांच्या किंमतीचा विचार करता त्याचे मुल्य २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, मात्र त्याचे प्राचीनत्व लक्षात घेता हा मुकूट अत्यंत अमोल आहे. या मुकुटाचे उल्लेख सहाशे वर्षांपूर्वीच्या कागदपत्रात सुद्धा सापडतात.

शुद्ध सोन्याच्या या मुकुटाचे तीन भाग असून देशविदेशातील अत्यंत दुर्मिळ व मौल्यवान रत्ने जडविलेली आहेत. पैलू न पाडलेले हजारो अतिदुर्मिळ गुलाबी हिरे, पाचू, माणिक, पुष्कराज, श्रीलंकेतील नीलम, अति मूल्यवान बसरा मोती या मुकुटावर जडवलेली आहेत. मुकुटाच्या आतील बाजूवर प्राचीन कन्नड लिपीत अक्षरे कोरलेली आहेत.

असा हा अतिशय मौल्यवान मुकुट सुर्याजी त्रिंबक प्रभुणे या मराठा सरदाराने इसवी सन १७४०मध्ये त्र्यंबकगडावरील विजयाप्रित्यर्थ श्री त्र्यंबकराजाच्या चरणी अर्पण केला. हा मुकुट पूर्वी म्हैसूरच्या राजघराण्याच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून तो मोगलांनी लुटला. नंतर मराठ्यांनी दिल्ली काबीज केल्यानंतर अनेक जडजवाहिरांसमवेत तो पेशव्यांच्या खजिन्यात दाखल झाला व नंतर वर उल्लेख केल्याप्रमाणे त्र्यंबकेश्वराच्या पदरी आला. मंदिराच्या खजिन्यात असल्यामुळेच इसवी सन १८२० मध्ये ब्रिटीशांनी त्र्यंबकच्या केलेल्या लुटीतून तो बचावला. 

या मुकूटासोबतच पेशव्यांनी पंचमुखी सुवर्णमुखवटाही श्री त्र्यंबकेश्वरास अर्पण केला. हा मुखवटाही शुद्ध सोन्याचा असून तब्बल साडेनऊ किलो वजनाचा आहे. हा मुखवटा दर सोमवारी कुशावर्त तीर्थात स्नान झाल्यानंतर नगरप्रदक्षिणेदरम्यान पालखीतून मिरवला जातो. भाविक दुतर्फा उभे राहून दर्शन घेतात.

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा,

चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,

चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे,  दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,

चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे, 

चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत,मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,

चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,

चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,

चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.

मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू  तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नविन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,

त्यामुळे सर्वांनी चोराचा पण आदर करावा …..

चोर आणि दारू अर्थ व्यवस्थेचा कणा आहेत !

कवी : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares