☆ सुगंधित चिता… वीर हुतात्म्यांच्या !! ☆ श्री संभाजी बबन गायके☆
कवी थॉमस मेकॉले यांनी १८४२ मध्ये लिहून ठेवलंय…. ‘मरण तर प्रत्येकाला येणारच आहे… कुणाला आधी तर कुणाला नंतर. परंतू भयावह विपरीत परिस्थितीशी दोन हात करतांना, आपल्या पित्याच्या राखेसाठी आणि मंदिरातल्या देवांसाठी झुंजत असताना येणारं मरण सर्वांगसुंदर!
आपली तरणीताठी पोरं अशीच मरणाला सामोरी जाताहेत. आजवरच्या सर्व मोठ्या युद्धांपेक्षा जास्त भयावह युद्ध आपले सैन्य आपल्याच सीमेमध्ये लढते आहे. आपलेच जंगल आहे मात्र त्यात परकी क्रूर श्वापदं शत्रूच्या मदतीने घुसून दबा धरून बसलेली आहेत. त्यांनी आपल्यावर झेपा टाकण्याआधी त्यांच्या अंगावर धावून जाणं हा एक धाडसी पण अपरिहार्य मार्ग उरला आहे आपल्या हाती. कारण ही जनावरं जर मुलुखात शिरली तर किती निरपराध माणसं मारतील ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्या पावलांचा माग काढीत काढीत त्यांच्या गुहांमध्ये शिरावंच लागतं. यात आपल्या जीवाला सर्वाधिक धोका आहे आणि हे प्रत्येकाला ठाऊक आहे… आणि तरीही आपली मुलं त्या अरण्यात शिरतात. कधी शिकार गवसते तरी कधी शिकार बनावं लागतं.
या जीवघेण्या खेळात जाणाऱ्या जीवांचा हिशेब ठेवण्यास कुणाला सवड असो नसो…. आईबापाला एकुलती एक असलेली, थोड्याच दिवसांत लग्नाच्या बोहल्यावर उभी राहण्याच्या तयारीत असलेली, सणासुदीला नाही निदान नंतर काही दिवस घरच्यांना, म्हाताऱ्या आईबापांना, कोवळ्या लेकरांना भेटायला जावं म्हणून तळमळणारी तरूण, धडधाकट, वाघाच्या काळजाची पोरं आपल्या जीवाचा हिशेब मांडत बसत नाहीत. ती लढताहेत ते आपल्या बापजाद्यांनी प्राणांची बाजी लावून जपलेल्या देशाच्या अखंडत्वासाठी, हृदयमंदिरातल्या देश नावाच्या देवासाठी. ही पोरं जर तिथं उभी राहिली नाहीत तर देश आणि देव यांना वाली कोण असेल?
पण भारतमातेचं सुदैव असं की, एक पडला तर दुसरा त्याच जागी पाय रोवून उभा राहतो… त्याच्या रक्ताचा प्रतिशोध घेण्यासाठी. जबर जखमी झालेलाही बरा झाल्यावर पुन्हा सीमेवर जाण्याची शपथ घेतो…..
देशवासियांनो…. सुखनैव रहा….. पोरं तिथं जागता पहारा देताहेत….. त्यांना जगण्याचा अर्थ कळाला आहे आणि मरण्याची रीत. हे जग सोडून निघून जाणाऱ्या हुतात्म्यांनो.. शुभास्ते पंथान: संतु! इकडे तुमचे देह मांडीवर घेऊन बसणाऱ्या चिता तुमच्या बलिदानाने सुगंधित झाल्या आहेत… सदगतीस प्राप्त व्हालच!
☆ शेवटचे चौदा मीटर… लेखक : श्री कपिल काळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
उत्तराखंडमधील बारकोट ते सिलक्यारा ह्या बोगद्यात अडकलेले 41 कामगारांची सुटका होण्याकरिता आता फक्त 14 मीटर अंतर खोदायचे राहिले आहे !
12 नोव्हेंबर रोजी हे कामगार बोगदा कोसळल्याने अडकले त्यांना 10 दिवसात आता बाहेर पडण्याचा मार्ग दिसू लागला आहे. शेवटचे 14 मीटर अंतर पार झाले की उद्यापर्यंत हे सगळे सुखरूप बाहेर पडलेले असतील.
हा आहे नवा भारत! तांत्रिक प्रगती आणि आत्मविश्वास ह्या बळावर हे साध्य झाले आहे.
चार धाम रस्ते प्रकल्पाअंतर्गत हा सिलक्यारा बारकोट बोगदा राष्ट्रीय महामार्ग 134 वरती यमुनोत्रीच्या बाजूला बनवला जात आहे.
काम सुरू असताना 12 नोव्हेंबर रोजी अचानक बोगद्यावरील जमीन माती कोसळून 41 कामगार आत अडकले. त्यानंतर सुरू झाला त्यांना सोडवण्याचा प्रयत्न !
1.नॅशनल हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन,
2.टीहरी हायड्रोइलेक्ट्रिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, 3.सतलज जल विद्युत निगम,
4.ओएनजीसी आणि
5.रेल विद्युत निगम लिमिटेड
.. ह्या पाच सरकारी कंपन्या ह्याच परिसरात काही ना काही काम करत आहेत. त्यांना ह्या सुटकेच्या कामासाठी पाचारण केले गेले.
याकरिता एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला गेला. ह्यातील प्रत्येक कंपनीला त्यातील एकेक जबाबदारी दिली गेली.
ह्यात बोगद्याच्या सिलक्यारा बाजूकडून साधारण 80 मीटर लांबीचा आडवा, 900 मिमी व्यासाचा बोगदा तयार करून त्यातून 800 मिमी व्यासाचे लोखंडी पाईपटेलिस्कोपिक पद्धतीने घालणे.ह्या 800 मिमी व्यासाच्या पाइपलाइनमधून ह्या कामगारांना सोडवणे.
बोगद्याच्या बारकोट बाजूने 480 मीटर लांबीचा आडवा बोगदा खोदणे.
हा बोगदा ज्या टेकडी खालून जातो, तिच्या माथ्यावरून सुरुवात करून साधारण 90 मीटर खोलीचे विवर खोदून त्यातून कामगरापर्यंत पोचणे .
बारकोट बाजूनेएक खोल विवर खोदणे.
कामगारापर्यंतअन्नपाणी तसेच व्हिडिओ कॅमेरा पोचवण्याकरिता चार इंच पाईप लाईन बनवणे.
ह्या प्रत्येक कामगिरी वरील कंपन्यांना अनुक्रमे देण्यात आल्या.
ह्या कामाकरीता लागणारी अजस्त्र यंत्रसामग्री, खोदाई यंत्रे, युद्ध पातळीवर प्रयत्न करून परदेशातून मागवण्यात आली.
भारतात वेगवान माल वाहतुकीकरिता समर्पित रेल्वे परिवहन मार्ग बनवला गेला आहे. त्यावरून एक खास मालगाडी चालवून गुजरातमधील करंबेली ते ऋषिकेशपर्यंत सामग्री पोचवली गेली. ह्या मालगाडीने 1075 किमी अंतर 18 तासात पार केले.
सर्व पाचही कंपन्यांनी त्यांना नेमून दिलेले काम एकाच वेळी सुरू केले. जो पहिल्यांदा पोचेल तिथून कामगारांना बाहेर काढायचे ठरवले. ह्यासाठी अजस्त्र मालवाहू ट्रक ट्रेलर जातील असे रस्ते बनवण्यात आले.
अडकून 6 दिवस झाल्याने आणि कोणताही संपर्क न झाल्याने, आतील कामगारांचे मनोधैर्य खचत चालले होते. बोगद्याच्या ज्या भागात कामगार अडकले होते त्याची लांबी 2 किमीआहे आणि त्या भागात सिमेंट काँक्रिट चे छत सुद्धा पूर्ण झाले आहे. त्यामुळे कामगार सुरक्षित असण्याबाबत खात्री होती. फक्त त्यांना बाहेर काढण्याकरिता नवा भारत कामाला लागला. नवीन भारताची इच्छाशक्ती आणि तांत्रिक प्रगती कामाला लागली.
18 नोव्हेंबर रोजी रेल विद्युत निगमला चार इंची पाईप कामगारांपर्यंत पोचवण्यात यश आले. त्यातून व्हिडिओ कॅमेरा टाकून त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला. कामगारांच्या नातेवाईकांना त्यांच्याशी बोलायला दिले गेले. कामगारांना सहा दिवसानंतर काही पहिल्यांदाच काहीतरी खायला मिळाले. ह्यात सुकामेवा चॉकलेट पॉपकॉर्न असा आहार होता. एका मानसोपचार तज्ञ , योगा प्रशिक्षक ह्यांची नियुक्ती करून कामगारांचे मनोधैर्य खचणार नाही ह्याची काळजी घेतली गेली
त्यानंतर ह्या चार इंची पाईप लाईन च्या जागी सहा इंची पाईपलाईन टाकण्यात आली. त्यातून खिचडी दलिया असे गरम अन्न कामगारांना देण्यात आले अडकल्यानंतर 7 दिवसांनी असे गरम अन्न त्यांनी खाल्ले. तसेच कामगारांना टूथ ब्रश, पेस्ट, टॉवेल, कपडे, अंडरगारमेंट, साबण असे अत्यावश्यक सामान सुद्धा ह्या नवीन पाइपलाइन द्वारे पोचवण्यात आले.
ह्यातील बरेच कामगार तंबाखू खाणारे आहेत , त्यांनी गेले दहा दिवस तंबाखू खाल्ला नाही, त्यामुळे त्यांना withdrawl symptom येऊ नयेत त्यातून मानसिक विकार होऊ नयेत म्हणून त्यांना तंबाखू सुद्धा पोचवण्यात आला.
त्यांच्या कुटुंब तसेच इतर बाहेरील कामगारांनी त्यांना सतत बोलत ठेवले जेणेकरून त्यांचे मनोधैर्य कायम राहील.
तारीख 19 नोव्हेंबर भारतीय वायू दलाने झारखंड येथील खाणीमधून काही महत्वाची यंत्रसामुग्री मालवाहू विमानाने आणली. तसेच अमेरिकेहून खास खोदाई मशीन आणण्यात आली. त्याने बचाव कार्याला अजून जोर प्राप्त झाला.
हे सगळे बचाव कार्य National Disaster Management Authority चे प्रमुख निवृत्त जनरल अता हसनैन ह्यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.
त्यांनी एक गोष्ट फार उत्तम केली, की कोणत्याही चॅनलवाल्यांना बोगद्याजवळ येऊन बातम्या चालविण्यास आणि बचाव कार्याचे व्हिडिओ काढून ब्रेकिंग न्युज चालविण्यास मज्जाव केला. भारताच्या पंतप्रधान कार्यालयाकडून रोज आढावा घेतला जात होता.
तारीख 20 नोव्हेंबर रोजी जिनिव्हा येथील International Tunneling and Undergound Space Association चे प्रमुख अरनॉल्ड डिक्स ह्यांना सुद्धा बचाव कार्यासाठी आणण्यात आले. त्यांनी पंचसूत्री कार्यक्रमाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे बाचवपथकाला काही इजा झाल्यास किंवा तिथे जमीन खचल्यास , स्वतःच्या सुटकेचा कोणताही मार्ग नसल्याने काँक्रिट बॉक्स कल्वर्ट टाकून बचाव पथकाच्या सुटकेचा मार्ग प्रशस्त करण्यात आला. अरनॉल्ड डिक्स ह्यांनी बारकोट टेकडीच्या माथ्यावर जाऊन तेथील विवर खोदणारे पथक( पंचसूत्री पैकी तिसरा पर्याय) पहिल्यांदा कामगारांपर्यंत पोचेल असा अंदाज बांधला.
तारीख 21 नोव्हेंबर, आज बोगद्याबाहेर 41 अँब्युलन्स 2 हेलिकॉप्टर तयार ठेवण्यात आली. कोविड करिता बनवलेले एक छोटे हॉस्पिटल पुन्हा धुवून पुसून स्वच्छ करण्यात आले. तिथे 15 डॉक्टर ची एक टीम तयार ठेवली गेली.
काल परवा पासून पंचसूत्री पैकी पर्याय क्रमांक 1 म्हणजे सिल्क्यारा बाजूने आडवा बोगदा खोदणाऱ्या टीमला भलतेच यश मिळाले त्यांनी अमेरिकन ऑगर ड्रिलचा वापर करत दोन दिवसात जबरदस्त प्रगती केली आणि कामगारांपासून फक्त 14 मीटर अंतरापर्यंत येऊन त्यांचे ड्रिल एका कठीण वस्तूला आदळले.
हे ड्रिल मशीन पुन्हा बाहेर काढून त्याची दुरुस्ती करण्यात आली. आणि दुप्पट जोराने खोदाईचे काम सुरू केले गेले.
चिली देशात असेच एका खाणीत अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात 69 दिवस लागले होते. तेव्हा देखील आंतरराष्ट्रीय समुदायाने प्रचंड मदत कार्य केले होते. थायलंड आणि म्यानमार सीमेवर एका गुहेत अडकून पडलेल्या मुलांना असेच दहा दिवसानंतर बाहेर काढण्यात आले होते.
हा लेख तुम्ही वाचेपर्यंत नॅशनल हायवे इन्फ्रा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या चमूला 900 मिमी व्यासाची पाइपलाइन आडव्या स्थितीत ड्रिल मारून कामगारांपर्यंत पोचण्यात यश आले असेल आणि शेवटचे 14 मीटर अंतर पार करून कामगार यशस्वी रित्या बाहेरदेखील आले असतील. ह्यामागे सर्वांची मेहनत फळाला येईलच !
हा आहे नवीन भारत, तांत्रिक प्रगती आणि इच्छाशक्तीच्या बळावर हा भारत कोणत्याही आव्हानाला सामोरा जाण्यास सक्षम आहे. ह्या बदलेल्या भारताचा मला अभिमान आहे!
लेखक : श्री कपिल काळे
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
उपोषण हे हत्यार आहे याची खात्री पटली. त्यातही आपला पोषणकर्ता उपोषण करत असेल तर आपल कुपोषण होण्याची भिती असते.
सध्या वातावरणात गारवा येत असतानाच आमच्या घरातल वातावरण मात्र तापत होत. कारण एकच होत. ऑफिसच्या धावपळीतून येणाऱ्या दिवाळीसाठी तयारी करायला त्यांना वेळ मिळत नव्हता.
तापलेल्या वातावरणाची धग मधे मधे भांड्यांच्या वाढणाऱ्या आवाजाने आणि तोंडाने होणाऱ्या भडिमाराने जाणवत होती.
काय मेली मदत ती काडीची नाही. घर, ऑफिस सांभाळून सगळी मरमर करायची ती आपणच. आणि त्यात यांना कौतुक त्या वर्ल्डकप च. तो मिळायचा त्याला मिळेल. त्यांच काय?…. जाहिरातवाले सगळ त्यांच्या घरी वेळेअगोदर पाठवतील. यांच काय…… यांचे चहाचे कप मात्र वाढत चालले आहेत.
काही नाही….. हे चालणार नाही…. मी तुम्हाला काही वेगवेगळ्या दिवसांची मुदत देते. या दिवशी सांगितलेली सगळी कामं झाली तर ठिक…… नाहीतर उपोषण हे नक्की…..
हे अल्टिमेटमचे सगळे दिवस वेचून वेचून भारताची मॅच असणारेच होते.……
मी पण आपल मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात…… जरा दिवस तरी बदलता येतील का? सगळ्या दिवशी भारताचीच नाहीतर एक चांगली मॅच आहे……
म्हणूनच….. म्हणूनच हे दिवस…. कारण सगळेच तुमच्या सारखे टाळ्या वाजवत, नाहीतर कसं खेळायला पाहिजे होतं याची बडबड करत टी.व्ही. समोर बसतील. बाजारात गर्दी कमी असेल. तुमचा पार्किंग चा प्रश्न पण निकालात निघेल. आणि मॅच चांगली होईल का सांगता येत नाही, पण खरेदी चांगली होईल…… तिने थर्ड अंपायर ने निर्णय द्यावा तसा ठोस निर्णय सांगितला.
झाल…… अशा उपोषणाची चर्चा फोनवर मैत्रिणींशी झाली सुध्दा…… संध्याकाळी मैत्रीणी (वेळात वेळ काढून) बराचवेळ हजर. नुसत्या नाही. कोणी वेफर्स ची पाकिट, कोणी थंडपेयाची लहान खोकी, किंवा बाटल्या आणल्या. अगं उपोषण म्हटल्यावर कोणीतरी तुला पाहायला येतीलच. तु पाणी पिशील. पण त्यांना नको का काही…
दुसरी…. पाण्यावरून आठवल. तुला पण पाणी लागेलच. मी दहा बारा बाटल्या पाठवते. राहू दे. कामाला येतील. सारख तुला कोणाकडे पाणी मागायला नको. आणि परत येणाऱ्यांशी थोड बोलण होइलच. घशाला कोरड पडते. (दोन बायकांमध्ये ऐकण थोडच आणि बोलण जास्त असत हे यांना सांगावस वाटत होत. पण बोललो नाही….. नाहीतर उपोषण लगेच सुरू झाल असत. आणि उपोषण करणाऱ्यांची संख्या पण वाढली असती.)
अगं खरंच. माझ्याकडे पण ग्लुकोज पावडरचे डबे आहेत. कुठला ऑरेंज फ्लेवर पाठवू का?……. आणखीन एक आवाज.
आणि हो, आत्ता बोलायला नको, पण लागला तर सलाइन लावायचा स्टॅण्ड पण आहे माझ्या कडे…… सासूबाई आजारी असतांना त्यांनीच आणायला लावला होता. येवढा लगोलग आणला पण मोजून दोनदाच लागला त्यांना. आता घरात येताजाता तो पायालाच लागतो. सध्या हातरुमालच वाळत असतात त्यावर…….. एक आवाज…..
आणि हे काय?……बसणार कुठे?…. तु आपली हाॅलमधेच बैस. रिमोट मात्र तुझ्या हाताशी ठेव. प्राईम व्हिडिओ, नाहीतर ते यु ट्यूब वरचे कार्यक्रम चांगssssssले पहात बैस. यात चांगले कार्यक्रम बराचवेळ असे दोन्ही भाव होते. परत एक आवाज…..
एक्स्टेन्शन बाॅक्स आहे का? नाहीतर तो पण आणते. फोन चार्ज करायला उठायला नको. आपल जवळ असलेला बरा. आणि मऊ उशा, शाल, आणि तक्या मात्र राहू दे जवळ. त्या शिवाय उपोषणाचा फिल येणार नाही.
आणि तु उपोषणाला बसलीस की कळव. म्हणजे येताना ती नवीन लागलेली आहे ना… तिला घेऊन येईन. अगं मोबाईल मधे काय मस्त शुटिंग करते ती. आणि बॅकग्राऊंडला समर्पक गाणीपण भरायला जमत तिला. यंग जनरेशन……. उपोषणावर गाणी आहेत का?….. नाहीतर सॅड म्युझिक टाकू.
यंग जनरेशन म्हणतांना त्यात कौतुक होत की आपल्याला जमत नाही याची खंत याचा सुगावा काही लागला नाही. पण शुटिंगची व्यवस्था होणार होती.
जमेल तसं आम्ही लंच ब्रेक मध्ये येऊच. नाहीतरी नंतर अर्धा तास गप्पांमध्येच जातो. त्या काय इथे सुध्दा होतील. आणि पाठिंबा सुद्धा मिळेल.
अशी उपोषणाच्या अगोदरची तयारी झाली.
सगळे गेल्यानंतर मी म्हटलं. मी दोन दिवस सुट्टी घेतो. काय हव ते सगळ आणू. आणि यावेळी तुला साडी ऐवजी पैठणी. आणि एक दागिना. चालेल…….. आणि या आश्वासनानंतर उपोषण स्थगित.
आता काय?…….. आज सुटीच्या दिवशी मी दिवाणावर….. मऊ तक्यासोबत. समोर ती आधीच कोणीतरी आणलेली थंडपेयाची बाटली……. आणि वेफर्सच पाकीट.
आणि हाॅलमधेच खाली बायको चिवड्यासाठी खोबऱ्याचे काप करतेय. आणि आम्ही दोघंही मॅच बघणार आहोत.
पं. पिंपळखरे, पं.जितेंद्र अभिषेकी, पंडिता शोभा गुर्टू हे गायनातील गुरू.पंडिता रोहिणी भाटे यांना कथक नृत्याला २५ वर्षे गायन संगत. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेत संगीत शिक्षिका. ललित कला केंद्र आणि भारती विद्यापीठ येथे संगीत गुरू.
पुरस्कार
आदर्श शिक्षक,आचार्य अत्रे शिक्षकोत्तम पुरस्कार.
गुणवंत युवा कलाकार,
गुणीदास पुरस्कार
पंडिता रोहिणी भाटे स्मरणार्थ आदर्श संगतकार पुरस्कार
ह्रदयनाथ मंगेशकर करंडक
लेखन
बिंदादीन महाराजांच्या कारकिर्दीवर पुस्तक ” बिंदा कहे”
अस्तित्व,रानपाखरं एकांकिका पुरस्कार प्राप्त.
फलकलेखनावर पुस्तक बोलका फळा.
मनमंजुषेतून
☆ “तुळस” ☆ डॉ. माधुरी जोशी☆
मी अनेकदा अगदी मागून आणून,विकत आणून तुळस लावली.पण ती कधी रूजलीच नाही.तसं फेसबुकवर खूप लोक या संदर्भात सल्लाही मागत असतात… कारण अनेकांना ही समस्या असते. म्हणजे ही ओढ अनेकांना आहे तर. मला तुळस आवडते फार…लावायची असते पण जगत नाही. आजवर उपाय शोधत राहिले… वाट पहात राहिले सुंदर, डौलदार तुळशीची…
काही कामासाठी एकदा कोकणात गेले होते..बसची वाट पहात होते. बसथांब्यावर बसायची काहीच सोय नव्हती…पण बसथांब्याशेजारीच ग्रामपंचायतीची इमारत होती. मग तिथल्याच एका पायरीवर रुमाल पसरला आणि वाट पहात थांबले.जरा इकडेतिकडे पहात होते अन् ती दिसली. जराशी कोपऱ्यात.बऱ्यापैकी मोठी… हिरवट काळसर पानांनी रसरशीत फुललेली…असंख्य जांभळट छटेच्या मंजिऱ्यांनी डवरलेली….
ना कुणी तिची निगा घेत होतं…ना कसली कुंडी, ना बांधलेला पार… ना तुळशी वृंदावन….पण ती खूष होती…अगदी तृप्त… समाधानानं डवरलेली… आनंदानं फुललेली… मी आश्चर्यचकित!! ही अशी माझ्याकडे का नाही भेटतं… मी तर पाणी, उन्हं,औषधं, माया सगळं देते हिला….उत्तर मिळालं नाहीच… आणि बसही आली. मी परतीला निघाले…
काही दिवसांनी अशीच बहिणीच्या फार्म हाऊसवर गेले….दोन चार पायऱ्या चढून वर दार होतं घराचं….पायरीवर पाऊल ठेवलं आणि परत ती दिसली.त्या पायरीला जरा लहानसा तडा गेला होता.जरा मातीची फट झाली होती म्हणा ना…त्या चिरेत तुळशीचं चिमुकलं रोप डोलंत होतं…सतेज पानांचं …अगदी सात आठ इंचच उंचीचं….जरा वाऱ्याची झुळूक आली की आनंदानं हासणारं ते रोप पाहून मला परत आश्चर्य वाटलं.कोण सांभाळतं याला?कोण पाणी देतं?काळजी घेतं….कोsssणी नाही….तरी ते घट्टमुट्टं उभं आहे…आपल्यातच रमलंय जसं काही…..मी तर थक्कंच…कारण मी किती धडपडत होते आणि माझी तुळस काही जगंत नव्हती….आम्ही तिला पाहून काळजीनं पायरी चढलो होतो..पण मला वाटलं दुसऱ्या कुणाचा पाय पडू शकतो…आपण तिला तिथून हालवलं पाहिजे…त्या एवढ्याशा पायरीच्या फटीत ती अशी काही खोल घट्ट मुळं धरून रूजली होती ती सहज निघेना.मग उलथनं,खुरपं अलगद वापरून ती काढली आणि शेजारी रिकाम्या जमिनीत लावली…वाटलं ती आनंदेल, खूप खूष होईल,,,पण कसलं काय? तिनं संध्याकाळी मानंच टाकली…जणू पायरीच्या हक्काच्या, प्रेमाच्या तिच्या घरातून तिला बेघर केलं मी….
खूप अपराधी वाटलं.वाटलं बिच्चारी छान डोलत होती…वारा पीत होती…निरागस बाळासारखं हासत होती…. कशाला केलं मी हे?आम्ही परतलो . मनात सल राहिला.परत काही महिन्यांनी एका रविवारी गेलो.पायरीशी गेलो…त्या तुळशीची आठवण झाली…संकोचायला झालं… आणि क्षणात पुन्हा नवा आश्चर्याचा धक्का बसला….तिथे तसंच चिमुकलं,हासरं,सतेज तुळशीचं रोप डोलत होतं.मेव्हणे म्हणाले ते लावलेलं नाही ..ते आपोआप येतंच….मला निसर्गाचं आणि त्या रोपाचंही नवल वाटलं..ही काय जादू…परत तिथंच ही निर्मिती कशी? किती महान आहे निसर्ग यांची साक्षंच पटली…. आणि माझी खंत परत उफाळून आली.मला सुंदर तुळस हवी होती.सुदैवानं अंगण होतं.अगदी कावेच्या रंगाचं वृंदावन ..पणतीचा कोनाडा सगळे लाड केले असते तिचे.छोटा सुबक कट्टा केला असता.परवचा ,गप्पा गोष्टी रंगलं असतं.तिळाचं तेल कापसाची वात वृंदावनाच्या कोनाड्यात उजळलं असतं मंद,शांत,मंगल,पवित्र….शहरी झगमगाटापासून दूर…बालपणापासून ठसलेलं….पण ती माझ्या अंगणात रमतंच नव्हती….त्या ग्रामपंचायतीच्या अंगणातली नाही तर पायरीच्या फटीतली तुळस मला चिडवत होती जणू..
एवढं का हवं होतं मला तिचं अस्तित्व?….कारण तिच्या सान्निध्यातला श्वास प्राणवाचक…प्रसन्न…हवाहवासा….खरंतर ना तिला फूल ना रंगांची पखरण…
पण तिचा हिरवट काळसर पानांचा विस्तार आगळा सुगंधी…औषधी….थेट गाभाऱ्यात भेटणारी तुळस….तिचं रोप कुठेही भेटो नमस्काराला हात जुळणार अशी तिच्यावर श्रद्धा…. श्वासात शुद्ध गंध भरणारच तिचा..मनात आठव कृष्णसख्याचा, विठू माऊलीचा नाही तर सत्यनारायणाच्या पूजेच्या विष्णूसहस्रनामात वाहिल्या जाणाऱ्या तबकातल्या सहस्र तुळशीपत्रांचा….मनात विसावलंय सुवर्णतुलेतलं ते तुळशीपत्र नाही तर दानावर त्यागाची मोहर उमटवणारं एक पान…निर्मळ,निर्मोही मनाचं रुपडं जणू… नाही तर द्रौपदीच्या अक्षयपात्राचा अन्नपूर्णेच्या थाळीचा दाखला… नाही तर अंतिम प्रवासात मुखावर ठेवलं जाणारं ते पान…
उदात्त विचार,अध्यात्म असो नाहीतर आजीबाईच्या बटव्यातलं बाळाचं औषध,काढा…सगळीकडे तुळशीचं अस्तित्व…सहज,सोप्पं पण अनमोल…म्हणून तर तिला अंगणात,पूजेत मान…केवढीही बाग फुलुदे,अनेक रंग,गंध,आकारांची उधळण होऊदे...तुळशीचं महात्म्य,सौंदर्य,पूजन अ बा धि त!!!!
आणि ती रूजणार तिच्या मर्जीने,,,, तिच्या आनंदानं…. कारण तिला खात्री आहे किती ही माजलेलं तण,गवत उपटा… त्यात वाढलेलं तुळशीचं रोप उपटून फेकणार नाहीत… त्यांची काळजी घेणारंच…फारतर नव्या मातीत नव्या कुंडीत रुजवणार कारण तुळस आहेच मंगल,पवित्र, सात्विक म्हणून तर देवांची ही लाडकी….साधी पण जीव लावणारी , जीव जपणारी…रांगोळीनं साधी तिरकी रेषा काढा आणि तुळशीपत्र ठेवा शेजारी…मनात कृष्णसख्याची बासरी गुंजले आणि रांगोळीच्या रेषात कटीवर कर आणि गळ्यात तुळशीहार मांडा…टाळ मृदंगाच्या घोषात विठुमाऊलीची गळाभेट होईल जणू.. म्हणून तर शेतीची कामं संपवून…कपडे दोनचारंच पण टाळ,मृदंग, वीणा डोईवर तुळशीवृंदावन घेऊन या संतांना आणि विठुरायाला भेटवणारे वारकरी..त्यांची श्रद्धा,माया,प्रेम जाणून या प्रवासात संगत करते आणि पंढरपुरात अधिक सुखानं, समाधानानं डवरते.,, विठुरायाला आलिंगन देणे…गाभारा तिच्या गंधाने कोंदतो …अशी साजिरी……तुळस !!!
अंदमान निकोबार बद्दल महाराष्ट्रीयन लोकांना आकर्षण आहे कारण आपल्या सावरकरांना तिथेच काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती..तिथला सेल्युलर जेल,बारी, काळेपाणी ह्या गोष्टी अनेकांना माहिती आहेत..
या series चे नावच ‘काला पानी’ असल्यामुळे याचा संबंध अंदमानशी आहे हे उमगत होतंच..
दिवाळीची मिळालेली सुट्टी आणि त्यातही लेकीबरोबर निवांतपणे वेगळं काहीतरी बघायचं म्हणुन ही series बघायची ठरवली..एखादा एपिसोडच बघायचा असं ठरवून आम्ही दोघी बघायला बसलो खऱ्या पण या series ची पकड एवढी मजबुत बसली की दोन दिवसात सातही एपिसोडस बघितले..
तीन मुख्य पण अशा कितीतरी गोष्टींची जाणीव जसं वय वाढेल तसं आपोआपच आपल्याला होत असते..
१.नशीब किंवा destiny ही एक अद्भुत गोष्ट आहे..
२.आपण सगळे एकमेकांशी कोणत्यातरी अदृश्य धाग्याने जोडलेले असतो.
३.पृथ्वीवर कुठंही रहात असलो तरी आपल्या सगळ्यांचे आयुष्यावर असणारी मालकी ही निसर्गाचीच असते..
हे परत एकदा अधोरेखित करायचे काम ह्या series मध्ये केले आहे..
अंदमान हा अनेक बेटानी बनलेला भारताच्या main land पासुन दुर असलेला भाग.. पोर्ट ब्लेअर ही अंदमानची राजधानी.. इथल्या विमानतळावर उतरलेले एक साधेसुधे मध्यमवर्गीय बिहारी कुटुंब -नवरा बायको,तेरा चौदा वर्षाचा मुलगा आणि सहा सात वर्षांची मुलगी..टुरिस्ट गाईड म्हणुन त्यांना मिळालेला चिरंजीवी (चिरू ),त्याचा मित्र आणि ड्राइव्हर,चिरूचे कुटुंब-आई,आजारी वडील आणि निसर्ग प्रेमी अभ्यासक भाऊ,त्याची मैत्रीण ज्योत्स्ना, लेफ्टनंट काद्री, भ्रष्टाचारी SDOP केतन ,मेडिकल ऑफिसर सौदामिनी सिंग,त्यांचे assistant डॉक्टर्स, ATOM या मल्टिनेशनल कंपनी चे अधिकारी,त्यांच्या मुख्य डायरेक्टर ची पत्नी आणि इतर बरेच लोक या सगळ्यांचीच एकत्रितपणे एका संसर्गजन्य जैविक आजाराने कशी ससेहोलपट होते,याची कथा म्हणजे ही series..ORAKA ही मूळ आदिवासी जमात निसर्गाशी एकरूप होऊन जगणारी आहे..त्यांच्या जाणीवा या आधुनिक माणसापेक्षाही प्रगल्भ आणि निसर्ग पूरक आहेत आणि त्याच आधारावर या संकटाशी कशा प्रकारे त्यांना मात करता येते,हे यात आहे..
आधुनिक जीवनशैली,तिचा उपभोग घेणे,मज्जा करणे आणि त्यासाठीच वाटेल त्या मार्गाने पैसा मिळवणे ही गोष्ट साध्य करणारा माणुस योग्य की प्रतिकूल परिस्थितीतही मूल्य शाबीत ठेवून निसर्ग जपणारी माणसे योग्य?माणसाचे माणुसपण हे देण्यात आहे,हिसकावून,ओरबाडून घेण्यात नाही,अंतर्मनातील जाणीवा प्रगल्भ असणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे हेच खरे आयुष्य,अनेकांना वाचवण्यासाठी प्रसंगी एकाचा बळी देणे हे निसर्गाचे तत्व समूहाशी असणारी बांधिलकी दाखवते पण एका व्यक्तीसाठी,तिच्या निव्वळ ऐषारामासाठी जेंव्हा हजारोचे जीव धोक्यात आणले जातात ते निसर्गविरोधी असते आणि म्हणुनच Human नसते..हे यात सांगितले आहे.. याची शिक्षा अनेक लोक भोगतात आणि विनाकारण मरून जातात..
माणसाचा स्वार्थीपणा आणि निव्वळ स्वतःसाठी जगणे हे कुठल्या थराला पोचु शकते?आयुष्य क्षणभंगूर आहेच पण तरीही ते आहे,जगावेच लागते आणि जेंव्हा अत्यंत विपरीत परिस्थितीत ते टिकवावे लागते तेंव्हा मूळ स्वभाव हा पूर्णपणे नाहीसा होतो आणि उरतो तो त्याक्षणी instinct नुसार करायच्या बधीर आणि निर्रढावलेल्या कृती..survival of fittest म्हणजे सद्यस्थितीत नक्की काय?असे अनेक प्रश्न ही series उपस्थित करते आणि आपण फक्त्त एक बाहुले आहोत नशिबाच्या हातचे या जाणीवेने अस्वस्थ होतो..
या series चे screenplay writing, cinematography, acting एकदम best..चिन्मय मांडलेकर,अमेय वाघ,आशुतोष गोवारीकर ही मराठी मंडळी यात आहेत आणि सुंदर अभिनय करतात..मोना सिंग ही माझी आवडती नटी यात आहे पण थोड्या काळासाठीच.. यातला सगळ्यात मोठा ऍक्टर आहे तो निसर्ग आणि तो पुरेपूर acting करतो आणि मनात घुसतो..
thriller entertainment म्हणुन नक्की बघण्यासारखी ही series आहे,हे नक्की..
ग्रंथसंपदा : * सृजनभान, सांजवर्खी शकुन, माझ्यातील बुद्धाचा शोध हे तीन कवितासंग्रह . उत्सव कथांचा हा प्रातिनिधिक कथा संग्रह प्रकाशित नामांकित मासिकातून लेख प्रकाशित . वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन , तसेच सदर लेखन. विविध विषयांच्या पुस्तकांचे परिक्षण, परिचय व रसग्रहण वर्तमान पत्रातून प्रसिद्ध. २० हून अधिक पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन* मराठी सोबतच हिन्दी व इंग्रजी कविता लेखन *In Marathi, बोभाटा या प्रसिद्ध पोर्टल साठी लेखन
सामाजिक : १. समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा- कार्यवाह२. महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य परिषद- कार्यकारी विश्वस्त ३. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य व कला आकादमी- मुख्य कार्यवाह ४. यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभाग- सदस्य.
मानसन्मान व पुरस्कार:
१. शब्दधन काव्यमंच यांचा ‘छावा’ पुरस्कार २. नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेत ‘प्रथम’ परितोषिक ३. कोकण म सा प राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत द्वितीय परितोषक प्राप्त; चारूतासागर प्रतिष्ठान यांचे उत्कृष्ट लेख पारितोषक४. सर्वोदय साहित्य पुरस्कार, कोल्हापूर ५. बाल कुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांचा ‘साहित्यसृजन’ पुरस्कार ६. ‘आवाज महाराष्ट्राचा’ या न्यूज चॅनल चा ‘क्रांतीज्योती’ पुरस्कार ७. महाकवी कालिदास प्रतिष्ठान,पुणे यांचा ‘कालिदास काव्यगौरव पुरस्कार’ ८. ग.दी.मा.प्रतिष्ठान,पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद,भोसरी व कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांचा ‘ग.दी.मा. साहित्य पुरस्कार ‘ ९. करम प्रतिष्ठान चा ‘करमज्योत’ पुरस्कार १०. डॉ. अशोक शिलवंत काव्यभूषण पुरस्कार.
मराठी चित्रपटासाठी गीतलेखन, चित्रपट कथालेखन व रेडियोसाठी जाहिरात लेखन, विविध कादंबर्या, कथासंग्रह, काव्यसंग्रह यांचे शब्दांकन, विविध संस्था,संमेलनात व्याख्याती म्हणून सहभाग,
स्वत:च्या कथांच्या अभिवाचनाचे प्रयोग. कथाकथन, कविता लेखन,अभिवाचन, बालगीते,नाट्यछटा स्पर्धा यात परीक्षक म्हणून सहभाग *’कवितासखी’ या स्वरचित कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच ‘ ही कविता आली तुम्हास भेटायला’ या समूह कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन *विविध शाळांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम
उपक्रम : ‘कवितासखी’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम
विविधा
☆ “मनचाफा…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆
संध्याकाळची गडबड चालू होती.. मी आपली स्वयंपाकात मग्न. लौकर स्वयंपाक संपवून मला लिहायला बसायचे होते. मी पोळ्या करता करता त्याला हाक मारली पण रोजच्यासारखी आलो, आलो ची आरोळीही आली नाही की काय गं सारखी हाका मारत असतेस ची भुणभुणही आज नव्हती. कुठे गेला हा असा संध्याकाळचा? असा मी विचार करतानाच
हयाने मागून येवून घट्ट गळामिठी मारली.. मी ओरडले,
“अरे काय हे !!!दिसत नाही का पोळ्या करतेय.. एवढा मोठा झालास तरी खोड्या काही संपत नाहीत तुझ्या. “
तो हिरमुसला… पटकन हातातल्या रूमालाची पुरचूंडी त्याने कट्ट्यावर ठेवली आणि गेला… मी लक्षच नाही दिले.. नंतर तो ही अजिबात आला नाही लूडबूड करायला..
जेवायची वेळ झाली तरी नेहमीसारखा भूक म्हणून पण ओरडला नाही.. मीच दोन हाका मारल्या पण एक नाही की दोन नाही. अचानक लक्ष कट्ट्यावरच्या रूमालाकडे गेलं. उघडून पाहिलं तर मला आवडणारी चाफ्याची फूलं होती.. माझी चटकन ट्यूब पेटली आणि लक्षात आलं.. महाराज कुठे गेले होते ते. मी तसाच रूमाल घेवून त्याच्या खोलीत गेले.. खिडकीतून बाहेर बघत पाठमोरा उभा होता.. माझ्या हातातली फुलं बघून मला म्हणाला, ..
“आई… तुला आवडतात ना गं.. म्हणून तेजस च्या बागेतल्या झाडाची तोडून आणलीत.. मी स्वतः चढलो गं वर…. हे बघ ना कित्ती सुंदर आहेत ना… !!”
खरंच नुकतीच उमललेली ती चाफ्याची फुलं खूप सुंदर होती.. आणि त्यांच्या दरवळानं माझेही हात सुगंधीत झाले होते. मी क्षणभर तो सुगंध मनात भरून घेतला.. माझे डोळे भरून आले… त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवतं राहीले काही न बोलता.. सुगंध काय फक्त फुलांनाच येतो? नात्यातला सुगंधही असाच अविट असतो. काही दरवळ फक्त नाकाचीच नाही तर मनाचीही तृप्ती करतात. नात्यांचे दवरळही तसेच असतात काहीसे. निरनिराळ्या भावनांचे, तशाच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे प्रत्येक नात्याचा गंध वेगळा, तसाच दरवळही वेगळा. जे नातं पुन्हा जगावासं वाटतं त्या नात्याचा फ्लेवर आठवायचा आणि अनुभवायचे त्यांचे दरवळ. खासकरून त्यात मायेचा ओलावा मिसळला असेल तर ते तसेच दरवळत राहतात वर्षानुवर्ष..
काही नाती जन्मभर जोडलेली असतात काही बंधनात अडकतात तर काही जपली जातात कोणतेही नाव न देता.. एकमेकांना सांगितले जाते, नात्याला काही नाव नसावे तु ही रे माझा मितवा.
हा जो काही नात्यांचा बंध असतो तो सहवास, आपुलकी, माया अशा धाग्यांनी गुंफला गेला तरच चिरकाल टिकतो.. त्यातली सहजता तितकीच महत्वाची. आपण जितके एखादे नाते सहजतेने वागवू तेवढे ते फुलत जाते, मोकळे होते. हे सहजपण म्हणजे तरी काय? तर उत्स्फुर्तता जपणे. क्रियेला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणे आणि गुंफण गुंफत राहणे. हे नात्यांचे रेशिमबंध घट्ट असतील तर त्यातील मऊ, मुलायम, स्निग्ध भाव.. आणि तेच बंध उसवलेले, विसविशीत असतील तर त्यातील टोकदारपणा, शुष्कता.. हे देखील तेवढ्याच संयतपणे समजून घेण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करणे हे देखील गुंफण जपणेच होय..
सहजतेवरून आठवले नाती जपताना, गुंफताना माणसं घडवायची पण आपल्या हातातली छिन्नी दिसू द्यायची नाही.. मुळात घडवायची हा शब्दही चूकच.. त्यांना त्यांच्या कलेन घडू द्यायचं.. त्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार व्हायचं.. शान्तपणे सोबत करायची.. अविर्भावाचा असुरी रंग स्वतःला स्पर्शू द्यायचा नाही… अशा नितळ प्रक्रियेतच खरेपण जोपासायचे ही नात्यांची विण आणि गुंफण.. मनात विचारांच्या सरी झिरझिरू लागल्या आणि डोळ्यांतून ओघळताना हातातल्या चाफ्याला भिजवू लागल्या.
माझे भरलेले डोळे पाहून त्याचा रुसवा क्षणात छू.. झाला. तो गोंधळला. त्याला कळेना आपली आई का रडतेय?…
“आई.. रडू नको ना गं.. ! काय झालं तुला…. ?तू रागावलीयस का माझ्यावर? अगं काय झालं तुला?” तो विचारत राहीला..
काहीच नाही बोलले.. पण एक मात्र नक्की, नात्यांतले हे दरवळ नकळत जपताना आज तो माझी आई झाला होता..
☆ “डोंबिवली आठवणीतली, साठवणीतली !” ☆ श्री मनोज मेहता☆
डोंबिवली जुन्या जमान्यातली,
डोंबिवली गर्द हिरव्या झाडीत लपलेली !
इवलुशा लाल लाल मातीच्या रस्त्यांची ! टुमदार बंगल्यांची, सुंदर,
चिकनी -चिकनी, डोंबिवली !!
माझी फोटोग्राफी १५ मे १९७२ पासून, माझ्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सुरु झाली. भावाने सांगितले की इथे जाऊन अमुक अमुक यांना भेट, लग्नाचे इतकेच फोटो काढायचेत. हो, त्या जमान्यात ३६ ते ४८ म्हणजे ३ / ४ रोलची छायाचित्रं, म्हणजे भरपूर मोठा अल्बम. बारा फोटो एका रोल मध्ये. मग माझी स्वारी कॅमेऱ्याची बॅग घेऊन इच्छित स्थळी, म्हणजे त्यांच्या घरी पोचायची. ‘अरे वा वा, ‘ये मनोज ! अगं, मनोज आलाय, आटपा गं लवकर, अशा आरोळीनं माझं स्वागत व्हायचं. कारण त्याकाळी घरी देवाला नमस्कार करताना, हातावर दही देताना, मनांत असेल तर एक समूह फोटो असा शुभकार्याच्या फोटोंचा क्रम असायचा.
नंतर छान कौलारू घराच्या बाहेरील मंडपात किंवा आफळे राम मंदिरात अथवा मोजक्या मंगल कार्यालयात ही कार्य होत असत. सुरूवातीला गुरुजींच्या पाया पडून, माझा छायाचित्रणाचा प्रवास सुरु व्हायचा.
मी लग्नाचे सर्व ब्राम्हण -विधी अन् जेवणावळींचे फोटो काढून, माझ्या घरी दुपारी १२ पर्यंत परतायचो.
त्यात सीकेपींचं लग्न असेल तर अर्धा तास अगोदरच घरी ! मग सायंकाळी ६ ते ८ स्वागत समारंभ असायचा. तेव्हा आलेल्या प्रत्येकाला प्रचंड प्रसिद्ध असा गोल्डस्पॉट, व्हॅनिला / तिरंगी / टूटी-फ्रूटी आईस्क्रीम किंवा जॉय आईस्क्रीमचे कप, अशाप्रकारे हे डोंबिवलीतील स्वागत समारंभाला असायचं हं ! नो जेवण भानगड ! आणि या स्वागत समारंभाचे फोटू काढून मी अन नवरा नवरी साडेआठला आपापल्या घरी असायचो बरं !
तर मंडळी सत्तर ते ऐंशीच्या दशकात फोटोग्राफर, गुरुजी, वाजंत्रीवाले व मंगल कार्यालयं यांची संख्या अगदीच तुटपुंजी असायची. आणि मुख्य म्हणजे ज्यांना बोलावलं जायचं ते वेळेच्या आधी हजर असायचे. माझ्या छायाचित्रणाच्या सुरवातीच्या, म्हणजे १९७२ पासूनच्या कार्रकिर्दीत, साखरपुडा, लग्न- समारंभ इ. साठी, श्री. धामणकर, दीक्षित वा भातखंडे गुरुजी असायचे. त्यात प्रामुख्याने मला गुरु म्हणून लाभले ते ‘धामणकर गुरुजी’. मी इतक्या लहान वयात फोटो काढतो, म्हणून कौतुक आणि त्यांचं माझ्यावर खूप प्रेमही होतं. शिस्तबद्ध पण शांत स्वभाव हे त्यांचं वैशिष्ट्य ! प्रत्येक विधीचा अर्थ वधू -वरास समजावून, मगच त्यांच्याकडून कृती करून घ्यायचे. त्यात अजून एकाची भर पडली तो म्हणजे मी ! ‘मनोज, आता या विधीचा फोटो काढ. नीट काढ हो, पुन्हा मी फोटो काढायला देणार नाही. ‘ ते अर्थ सांगत असताना, माझंही लक्ष असायचं. धामणकर गुरुजींच्या ‘गुरुकृपेने’ मी हळूहळू का होईना पण सर्व आवश्यक विधींचे फोटू काढण्यात तरबेज होऊ लागलो होतो.
सुमारे ४८ वर्षांपूर्वीची घडलेली गोष्ट आहे ही ! मला नक्की आठवत नाही १९७५ की ७६, पण डोंबिवली पश्चिमेला नाख्ये यांच्या एव्हरेस्ट मंगल कार्यालयात लग्न होते. त्या मंडळीचं नावही आता लक्षात नाही. कार्यालयाच्या चौफेर फेरी मारून, कुठं क्लोजअप फोटो घेता येतील, याचा मी आधी अंदाज घ्यायचो. मग पुढचा प्रवास सुरु व्हायचा.
तर मंडळी, त्यादिवशी या लग्नकार्यात गुरुजींचा पत्ताच नाही, कुजबुज सुरु झाली. काही मंडळी गुरुजींच्या घरी जाऊन आली, अजून कोण गुरुजी उपलब्ध आहेत का ते ही पाहून झालं. दोन्हीकडची मंडळी चिंतेत ! बरं गंमत म्हणजे, मला याचा काहीच थांगपत्ता नाही. काही वेळाने मी विचारायला गेलो की एवढा का उशीर होतोय, तेव्हा मला हे कारण समजलं. मी भाबडेपणाने विचारलं, ‘ मी करु का विधी ? मला मंत्र येत नाहीत, पण सगळे विधी व्यवस्थित करून घेईन आणि हो, मंगलाष्टका मात्र म्हणा कोणीतरी, हे सांगताच ते उडालेच की ! एकतर मी अर्ध्या चड्डीत फोटो काढायला आलेलो आणि हा एवढासा मुलगा हे काय सांगतोय ?
नंतर कोणीतरी आजोबा आले व त्यांनी माझी नीट चौकशी करून, खात्री करून, होकार दिला.
मग मी सीमांतपूजन करून, मुलीला गौरीहाराजवळ बसून पूजन करायला सांगितलं. नंतर कार्यालयाच्या मुख्य दारात वराकडच्या मंडळींना उभं करून, वधूच्या आईने वराचे पाय धुवून, तिलक लावून ओवाळायला सांगितलं. वधूच्या बाबांनी वराच्या हातात नारळ देऊन त्याला मंडपापाशी आणलं. माझ्या नशिबाने दोघा तिघांनी मंगलाष्टका म्हटल्या. बरोबर मुहूर्तावर, ‘आता वधू-वरांनी एकमेकांना हार घाला, ‘ अशी मी जोरात आरोळी ठोकली, मी दोघांचे फोटो काढले अन् वाजंत्रीही वाजली. ‘वधूवरांना करवल्यांनी ओवाळा हो !’ ते झाल्यानंतर नवरा-नवरीला मी पाटावर बसण्यास सांगितलं. नंतर कन्यादान, सप्तपदी इ. झालं. इतकं सारं, मी फोटो काढत -काढत (आजच्या जमान्यातील 20-20 की. ) पार पाडलं. लक्ष्मीपूजनाला नवऱ्यामुलाला मी विचारलं, ‘तुझ्या बायकोचं नाव काय ? तेच लिहायचं हं, ताटातल्या तांदुळात ! हे सारे विधी मी प्रत्येक विधीचा फोटो काढून व पुढच्या विधीला काय करायचं ते सांगत, असं एक तासात आटोपलं. आता हे सर्व पाहायला, दर्दी ज्येष्ठांची गर्दी होतीच. सर्व विधी झाल्यावर, त्या ज्येष्ठांपैकी कोणी आजी होत्या, त्यांनी वधुवराला माझ्या पाया पडायला लावलं. ‘अहो, ते नवरा नवरी माझ्यापेक्षा मोठे आहेत, मीच त्यांच्या पाया पडतो ! असं मी म्हटल्यावर तुफानी हास्यकल्लोळ झाला ! पण मला काही कळेना, हे माझ्या का पाया पडतायत ? आणि वरती हातात पाकिट देऊन, मला आजींनी जवळ घेऊन माझी पापी घेतली, मला त्यांच्या जवळ बसवून प्रेमानं जेवायला घातलं.
ते पाकिट न उघडता, मी घरी आल्यावर वहिनीच्या हातात दिलं. तिने विचारलं, ‘ काय आहे यात ?’ मी म्हटलं, ‘मला काय माहित ? लग्नात दिलं मला. ‘ तिनं उघडल्यावर कळलं, त्यात २१ रू. होते.
नंतर फोटोचा अल्बम घ्यायला, ती मंडळी घरी आल्यावर, मी केलेले प्रताप भावाला व माझ्या वडिलांना कळले. ‘मनोजनेच आमच्याकडच्या लग्नात सर्व विधी पार पाडले !’ ’काहीतरी काय सांगताय ? आम्हाला काही बोलला नाही, ‘ असं म्हणत, भावानी मला हाक मारली. त्यांच्या समोर आल्यावर मी सांगितलं, यांच्याच आजीनं नवरा -नवरीला माझ्या पाया पडायला लावलं !’ हे ऐकताच सगळे खो खो हसायला लागले.
पण त्यादिवशी गुरुजी न आल्यामुळे हे सुंदर लग्न- रामायण घडलं. या प्रसंगातील प्रेमळ आज्जी, नवरा -नवरी, माझी चौकशी करून मला विधी करायला परवानगी देणारे आजोबा अन् सारी मंडळी… आजही हे आठवलं की मला गुदगुल्या झाल्याशिवाय रहात नाहीत.
यानंतर असा प्रसंग कधीही परत माझ्या वाट्याला आला नाही.
हां, कधी बारशाला तर कधी साखरपुड्याला मला समोरून कधीतरी कोणी विचारतं, ‘तुम्हीच सांगा हो मेहताजी, आता पुढे काय ते !’ मग मी त्या त्या प्रसंगी, कोणी काय करायचं ते व्यवस्थित सांगतो.
पण पण मी लग्नात कुण्या मुलीचा भाऊ तर कधी मामाचं पात्र, आयत्यावेळी अजूनही वठवतोय अन् कार्य सुरळीत पार पडतं. ते ही फोटोग्राफी करता करता हं.
हे घडून आलं ते फक्त अन फक्त माझ्या कारकिर्दीला वळण देणाऱ्या, गोविंद धामणकर गुरुजींच्या गुरुकृपेमुळेच, अन तेही बाल वयात !
मी : “ मी न……. ५…… बघ हं… माझी आजी, माझी आई, मी, माझी मुलगी आणि माझी नात… तू…”
नात: ” यापैकी कोणती generation तुला सर्वात जास्त आवडते ?”
मी : “ तुझी…. “
नात : “ वॉव…. पण का ?”
मी: “ कारण ती सर्वात जास्त colourful आहे. ”
नात: “ म्हणजे कशी ?”
मी : “ म्हणजे असं….. की माझ्या आजीच्या पिढीचा एकच रंग होता… ‘ घर… घर काम, घरच्यांची सेवा आणि घरी येणाऱ्यांचे आदरातिथ्य.
मग माझी आई… या घरकामाच्या रंगात अजून एक रंग वाढला…
तो म्हणजे शिक्षणाचा…. आणि या शिक्षणाबरोबर खेळ, कला, जवळपासचा समाज… यामुळे आईच्या जीवनात बरेच रंग आले.
मग माझी पिढी… माझ्या पिढीत उच्च शिक्षण आणि विस्तृत समाज यामुळे आमचं क्षितिज बरंच रुंदावलं…
नवनवीन प्रयोग, प्रवाह, पाऊलवाटा तयार होऊ लागल्या… generation colourful होऊ लागली.
मग.. तुझ्या आईची generation………
Technology चा एक जबरदस्त रंग बाकी सगळ्या रंगांवर हावी होऊ लागला…. ‘स्पर्धेचा नवीनच रंग भराभर गडद होऊ लागला. नवनवीन पाश्चिमात्य रंग डोकावू लागले… जागतिकीकरणाचा पहाट-रंग क्षितिजावर दिसू लागला…
आणि त्यानंतर…
नात : “ मी….. पण माझीच generation तुला का आवडते ?”
मी: “ कारण आधीच्या सगळ्या रंगात घोळून आत्मविश्वासाचा प्रसन्न रंग लेवून जन्मलेली तुझी पिढी…. technology ला तर तुम्ही आपली दासी बनवलयं… जग तुमच्या बोटांवर नाचतं…
ग्रहांच्या पलिकडे तुमचं क्षितिज विस्तारलयं…
समानता खऱ्या अर्थाने तुमच्या नसानसात भिनली आहे….
माझ्या आजीच्या ‘घर आणि संस्कार’ पासून ते…
तुमच्या ‘अवकाश’ या प्रचंड कक्षेतील सगळे ‘सुखद’ रंग जपण्याचा आणि ‘दु:खद’ रंगांशी झुंजण्याचा तुमचा ‘Cool’ रंग मला फार आवडतो……
तुमच्या या रंगात आधीच्या सगळया पिढ्या अक्षरशः न्हाऊन निघतात…
BE BOLD FOR CHANGE….
व्हा धाडसी…. बदलासाठी… !!!
लेखक : अज्ञात
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“वाचवा. !.. वाचवा.. !. कोणी हाये का तिथं?… ऐका !… ऐका. !. मी बुडतोय!… अहो कुणीतरी लवकर मला बाहेर काढा हो!… नाका तोंडात पाणी गेलयं… श्वास कोंडलाय!… लवकर धावून या!.. नका उशीर करू… आता फार वेळ दम धरवणार नाही!… कसेही करा पटकन इथे उडी मारून या आणि मला इथून बाहेर काढा… “
जिवाच्या आकांताने तो ओरडून सांगत होता बिचारा… पाण्याच्या खोल डोहात फसला होता.. गरगर फिरत होता… त्याचे स्व:ताचे सुटकेचे प्रयत्न निष्फळ ठरले होते… तो अधिकाधिक डोहात गुरफटत गेला होता… त्याचा आरडाओरडा ऐकून बघ्यांची खूप गर्दी जमा झाली तेथे.. पण त्यांना या लाईव्ह ऑंखे देखा हालचं व्हिडिओ शुटींग करण्याचा मोह आवरला नाही.. ते बुडणाऱ्या माणसाला म्हणाले,
” अरे थांब!लगेच असा बुडू नकोस.. दोन मिनिटे आधी शुटींग करून घेऊया मग तुला कसा यातून वाचविता येईल याची आम्ही आपआपसात चर्चा करतो… पट्टीचा पोहणारा तरी आमच्यात कुणी दिसत नाही.. एखादा मोठा दोरखंड मिळतोय का ते पहावे लागेल.. तो आणे पर्यंत तरी तुला असेच थांबणे गरजेचे आहे… आमच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटिंग करून झाले कि मग कुणाला तरी गावात पाठवतो.. तुझ्या घरी तसा निरोप देऊन ताबडतोब मदतीला या म्हणून सांगतो.. तू आता काळजी करू नकोस… तुझ्या जीवावर बेतलं आहे याची आम्हाला काळजी किती वाटते ते या व्हिडीओ शूटिंग व्हायरल झाले कि सगळ्यांना कळेल.. जो धाडसी आणि पट्टीचा पोहणारा असेल त्याने हा व्हिडिओ बघितला कि तो लगेच धावून आल्याशिवाय राहणार नाही… मग तू नक्की वाचशिल यात शंका नाही… तुला वाचताना पुन्हा आम्हाला शुटींग घेता येईल… एक माणूस, सुजाण नागरिक या नात्याने आम्हाला आमचं माणुसकिचं कर्तव्य पार पाडल्याचं समाधान मिळेल… तू धिराचा आहेस, .. अखेर पर्यंत तुला लढा द्यायचा आहे… हिथं थांबून आम्ही हे शुटींग करता करता तुझं माॅरल कसं वाढेल हे आम्ही पाहतो… तू थोडावेळ असाच धीर धरून रहा मदतीला कोणी येईलच इतक्यात… आणि कुणी आलं कि तुला आम्ही मोठ्याने आवाज देऊ… होईल होईल तुझी सुटका नक्की होईल… मग आमच्या सोबत एक सेल्फी घेऊ… चॅनेलवर ब्रेकिंग न्यूज झळकवू काळ आला होता पण वेळ आली नव्हती.. देव तारी त्याला कोण मारी अशी सनसनाटी हेड लाईन देऊन आम्हीच तुझ्या वतीने मुलाखत देऊ… या या व्हिडिओ शुटींगचा रिल व्हायरल झाल्याने बुडणाऱ्या माणसाचे प्राण वाचवले… पण पण हे केव्हा तूला मदत मिळून बाहेर काढल्यावरं.. बघं एका रात्रीत तू हिरो होणार आहेस.. तोवर हे तुला या डोहात गटांगळ्या खाऊन का होईना जिवंत राहावे लागणार आहे… अरे टि आर. पी. किती वाढेल याची तुला काहीच कल्पना करता येणार नाही.. ते सगळं आम्ही बघून घेतो.. तू मात्र डोहात लढते रहो हम कपडा संभालके देखते है… “
काही वेळा खूप लिहायचं असतं.. पण विषय सुचत नाही.एखादा विषय सुचलाचं तर, काय लिहायचं हेच कळत नाही. कथा लिहायची, कविता लिहायची, की ललित लेख..? का आजकाल सर्वांनाच आवडणारी गझल लिहायची..? नक्की काय लिहायचं हेच कळत नाही. हे सारं ठरवत असताना सुचलेला विषय हळूहळू पुसट होत जातो आणि मग आपण पुन्हा नव्याने एखाद्या विषयाच्या शोधत हरवून जातो.. हे सगळं करत असताना सहज हसू येतं ते लहान पणीच्या एका कवितेने
“घड्याळात वाजला एक,
आईने आणला केक
केक खाण्यात एक तास गेला
मी नाही अभ्यास केला”
हे असंच काहीसं.. अजूनही होतंय की काय असं वाटतं राहत… दिवस भर विचार करून जेव्हा काहीचं लिहलं जात नाही तेव्हा आपल्यातला लेखक कुठे हरवलाय की काय..? असं वाटू लागतं. हे करता करता, दिवसा मागून दिवस जातात आणि एखाद्या दिवशी काहीच ठरवलं नसताना अगदी सहज भरं भर कागदावर काहीतरी उतरतं.. आणि मग… इतके दिवस ह्या विषयावरुन त्या विषयावर फिरणारं मन, एक वेगळाच विषय घेऊन कागदावर स्थिरावतं. तेव्हा कागदावर उतरलेले शब्द पाहिले ना की मनात येतं.. “
कित्येक दिवस दूर दूर चा प्रवास करून कुठल्याशा गावचे हे पक्षी..
ह्या पांढ-या शुभ्र कागदाच्या पाणवठ्यावर उतरले असावेत..
ह्या पाणवठ्याचा एकांत दूर करण्यासाठी…!
हे पक्षी काही क्षण थांबतील किलबिलाट करतील आणि पुन्हा उडून जातील..
एका नव्या प्रवासाच्या दिशेने…!
एका नव्या पाढं-या शुभ्र पाणवठ्यावर…
मी मात्र पुन्हा एका नव्या विषयाच्या शोधत फिरत राहीन पुढचे कित्येक दिवस वहिचा पांढरा शुभ्र पाणवठा घेऊन… पुन्हा काही नवे पक्षी , पांढ-या शुभ्र पाणवठ्यावर येतील ह्या एकाच आशेवर…!