मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सहावे सुख… — लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सहावे सुख… — लेखिका : शांता शेळके ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

चिनी लोकांत एक प्रथा आहे. ते परस्परांचे अभिष्टचिंतन करतात त्यावेळी ” तुला सर्व सहा सुखे मिळोत ” असा आशीर्वाद देतात. पाच सुखे म्हणजे – आरोग्य, संपत्ती, नावलौकिक, चांगला जोडीदार व चांगली मुलं.

सहावे सुख म्हणजेच ज्याचे त्याला कळावे असे सुख. ते त्याचे त्यानेच आयुष्यात शोधून काढायला हवे. ते सहावे सुख समोरच्या माणसाला सापडावे, लाभावे असे अभिष्टचिंतन करणारा म्हणत असतो.

आपल्याकडे तर ज्ञानेश्वरमाऊलींनी सांगितले आहेच  “जो जे वांछील तो ते l लाहो प्राणिजात “

प्रत्येकाचं हे सहावे सुख निराळे असेल.

 समाजात प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, आर्थिक स्तर वेगळे, गरजा वेगळ्या. ह्या सगळ्याचा विचार केल्यावर वाटलं त्याचं त्याचं सहावे सुख वेगळे.

आजच्या टप्प्यावर ज्या गोष्टी मला व्हायला हव्या आहेत त्या त्या माझं सहावे सुख असू शकतात.

पण त्या सहाव्या सुखामागे पळायला मला आवडणार नाही. जे आहे, जे मिळतंय ते माझं सहावं सुख आहे.

छान कार्यक्रम बघायला मिळावेत, ट्रिपला जायला मिळावं, आरोग्यपूर्ण असावं – निदान तब्येतीची तक्रार नसावी. चांगलं चांगलं लिहायला सुचावं. ही माझी सहावी सुखं आहेत. तसं तर यादी करू तितकी कमी वा जास्त होईल.

आत्तापर्यंत राहिलेल्या गोष्टी करायला मिळाल्या तर ते ही सहावं सुख असेल. ह्या लेखाच्या शेवटाकडे येताना शांताबाई ते सुख कसे सापडेल हे सांगतात. त्या म्हणतात, त्याचा शोध आपोआपच लागतो.

खरं आहे ते. सुखाच्या खूप मागे लागण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीच्या मागोमाग जाण्यातच खरं सुख आहे. त्या वाटेवर चालताना आनंदाचं झाडं मिळेल, खळाळणारा झरा लागेल, कधी ऊन कधी सावलीचा लपंडाव असेल, गाणारी वाट असेल…. स्वतःची चित्तवृत्ती समाधानी ठेवणं हे सहावं सुख सगळ्यांना लाभावं.

लेखिका : शांता शेळके

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ कालचा पाऊस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कालचा पाऊस… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

काल रात्री गाढ झोपेत असताना अचानक पाऊस बरसून गेला… कळलंच नाही मला… दारं खिडक्या घराची घट्ट बंद होती ना.. कुणास ठाऊक किती वेळ तरी कोसळून गेला असावा.. सकाळी जाग आली तेव्हा खिडकीची तावदाने न्हाऊन निघालेली दिसत होती… थंडीचेही दिवस असल्याने हवेतल्या गारठ्याने खिडक्यांच्या काचेवरील पावसाचे थेंब थेंब थरथर कापत  खाली ओघळून जात होते.. समोरचं आंब्याच्या झाडाने नुकतेच सचैल स्नान केल्यावर पानांपानांतुन  मंत्रोच्चाराची   सळसळ करताना प्रसन्न दिसला… मधुनच वाऱ्याची हलकी झुळूक त्याला लगटून गेलीं. जाता जाता होईल तेव्हढी पानं कोरडी करून गेली.. खिडकी उघाडण्याचं धैर्य मला होईना.. पाऊस पडून गेला असला तरी घरात शिरकाव करायचा होता गुलाबी थंडीला… एक हलकासा हात काचेवरून मी फिरवला.. हाताच्या उबदारपणा मुळे काचेवर जमा झालेल्या बाष्पानं सगळं अंग आकसून घेत काच  मला म्हणाली, “काल रात्री तुला जागं करायचा खूप प्रयत्न केला.. अगदी पावसानं गारांचा तडतड ताशा वाजवून पाहिला.. सरीवर सरी सप सप  चापट्या देत मला सांगत होत्या, अगं उठीव त्याला बघ म्हणावं ऐन दिवाळीच्या मोसमात पाऊस कसा कंदील, फटाके भिजवायला आलायं तो.. पण तू खरचं गाढ झोपेत होतास.. मग पाऊस हिरमुसला होऊन गेला.. हळूहळू थांबत गेला.. जाताना मला म्हणाला त्याला सांग रागावलोय त्याच्या वर.. आतापर्यंत बऱ्याच रात्री उशिराने घरी येत होतास, तेव्हा म माझं कारण घरात  आई, बाबा नि आजोंबाना सांगुन सुटका करून घेत होतास.. तुला तर कधीच मी भिजवलं सुध्दा नाही.. कारण तुझी माझी भेट कधीच झालेली नाही… पण आज अचानक येऊन तुला भेटायचं होतं.. तुला बघायचं होतं.. म्हणून रात्री उशिरानं आलो.. तू बेडरूममध्ये झोपलेला असताना तूला जागं करावं आणि एकदा डोळे भरून पाहावं… पण तू गाढ झोपेतून हलला सुद्धा नाही.. आता माझी कटृटी आहे कायमची असं सांग त्याला.. “. खिडकीची काच हे सारं मला सांगताना खूप हळवी झाली.. भरलेले डोळयांतली आसवं स्यंदन करत गेली…

… मी ही तिला सांगितले कि, ‘रात्री माझ्या स्वप्नात पाऊस आला होता मला भेटायला, आम्ही खूप दंगामस्ती केली.. त्यानं मला खूप खूप भिजवलं.. आम्हा दोघांना भेटून खूप आनंद झाला… बराचवेळ बोलत राहिलो, हसत राहिलो… मला म्हणाला आता त्यावेळी माझं खोटं कारणं सुटका करून घेत होतास ना.. म्हणून आज अचानक आलो तुला भेटायला नि मनसोक्त भिजवायला… ‘आणि तो  नेमकं हेच बोलून गेला.. ‘मला खूप नवल वाटलं पावसाचं.. रात्रभर झोपेत त्यालाच स्वप्नात तर पाहात होतो… आणि आता तर प्रत्यक्षात हिथं येऊन गेल्याच्या ठेवून गेलाय त्याच्या साक्षित्त्वाच्या खुणा… ज्या तू जपून ठेवल्यास मला दाखवायला… काचं आता स्वच्छ झाली होती नि मंद मंद हसत होती…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पाणीपुरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “पाणीपुरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अरे किती मोठ्ठा घास घेतला आहेस. चावता तरी येतय का? तोंड बघ…… फुगलय नुसत. येवढा मोठ्ठा घास घेतात का? अस दरडावून, रागाने, किंवा प्रेमाने विचारणाऱ्यांच तोंड पाणीपुरी खाताना याच पद्धतीने भरलेल असत. पाणीपुरी खाण्याची दुसरी पद्धतच नाही.

इतर पदार्थांचा घास किती मोठा असावा हे आपण ठरवू शकतो. पण छोटा छोटा घास घेऊन पाणीपुरी खाताच येत नाही. पाणीपुरीचा घास हा फक्त आणि फक्त त्या पुरीच्या आकारावरच ठरत असतो. या पुरीच्या आकारात स्माॅल, मिडीयम, लार्ज असा प्रकार माझ्या पाहण्यात नाही.

वेगवेगळ्या चवीच चवदार पाणी एकत्र  त्या पुरीत भरून जेव्हा ती तोंडात भरतो किंवा सरकवतो तेव्हा त्यातलं पाणी तोंडावाटे बाहेर पडणार नाही ना याचीच कसरत करावी लागते.

ही कसरत करुन ती पूरी तोंडात सरकवल्यावर जर आतल तिखट पाणी पटकन घशात उतरल तर मात्र काही क्षण जिवाचं पाणी पाणी होतच आणि नकळत डोळ्यांच्या कडांना देखील पाणी जमा झाल्यासारखं वाटत. कधी कधी तर नाकावाटे सुध्दा……

जळजळ हा शब्द आपण कधी कधी वापरतो. पण तो समजवून सांगायचा असेल तर….. पाणीपुरी तोंडात सरकवल्यावर ती खातांना नकळत आणि पटकन जे तिखट पाणी घशातून छातीपर्यंत गेल्यावर जी जाणीव होते ती जळजळ. आणि ही तात्पुरती असली तरी पाणीपुरी खाताना व्यवस्थित जाणवते.

या पुरीला नाजूकपणे व हळूवार हाताळाव लागत. नाहीतर आपला जबडा उघडण्या अगोदरच ती तिचा जबडा उघडते आणि त्यातल्या पाण्याने बोटं चिकट होतात. त्यामुळे तिने तिचा जबडा उघडण्याअगोदर आपला जबडा उघडा करून ती त्यात ढकलण्याची काळजी घ्यावी लागते.

पाणीपुरी मधल पाणी कमी वाटत कि काय, त्यात अजून उकडून बारीक केलेला बटाटा आणि उकडून किंवा भिजवून ठेवलेले हरभरे घालून परीक्षा थोडी कठीण करतात.

पाणीपुरी ही तोंडात भरावी, सरकवावी, किंवा ढकलावीच लागते. या पध्दतीने खाल्ली तरच तिला न्याय दिल्यासारख होत. नाहीतर तिच्यावर झालेला अन्याय ती पाणी अंगावर किंवा प्लेटमध्ये काढून व्यक्त करते.

ही तोंडात भरण्याची सुध्दा एक खास पध्दत आहे. दोन बोट आणि अंगठा यात तिला धरून तोंडाचा जबडा उघडा करून तोंडाजवळ आणली की लगेच वेळ न घालवता तर्जनीने तोंडात सरकवतात.

यावेळी मला सहज शेव, चकली, कुरडइ यांच ओल पिठ, किंवा चिक त्या मोकळ्या साच्यात भरतात त्याची आठवण होते.

पाणीपुरी खायला वेळेच बंधन नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र. जेवणाअगोदर किंवा नंतर अशी कोणतीही वेळ त्यासाठी योग्य असते. पण ठिकाण मात्र बऱ्याचदा बाग, मैदान, तलाव याच्या जवळ आणि जवळजवळ रस्त्यावरच असत. बंद वातावरणात मजा नाही. आता घरातल्या सगळ्यांना घरातच करतो तेव्हा पर्याय नाही. पण शक्यतो उघड्यावर खाण्यातच मजा येते.

पाणीपुरी साधारण एकाचवेळी बऱ्याच जणांना एक एक करून दिली जाते. त्यामुळे पहिली तोंडात सरकवल्यावर दुसरीचा नंबर लागेपर्यंत पहिली संपवावीच लागते.

पाणीपुरी हा काही जणांचा विकपाॅइंट असतो. तर विकली कुठल्या कुठल्या पाॅइंटवर पाणीपुरी खायची हे काही जणांच ठरलेल असत. तरीसुद्धा गावात पाणीपुरी कुठे चांगली मिळते याची माहिती घेण्याचा प्रयत्न असतोच. आणि तिथे भेट देणं गरजेचं वाटतं.

बरेच पदार्थ हे हातगाडीवर उभ्या उभ्या खाल्ले जात असले तरी एक दोन बाक त्या गाडीजवळ बसण्यासाठी असतात. पण पाणीपुरीच्या गाडी जवळ असे बाक क्वचित दिसतात. त्यामुळे स्टॅंडींग ओवेशन देउन खायचा मान पाणीपुरीला आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ म्हातारी… भाग-१ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(बरोबर दोन वर्षांपूर्वी दिवाळीमध्ये भाऊबीजेच्या दिवशी घडलेला हा प्रसंग… आज आठवण्याचे कारण म्हणजे मागील दिवाळीत ती नव्हती… या दिवाळीत सुद्धा नव्हती आणि पुढेही कधी नसणार…!)

ती मला भेटली होती साधारण चार वर्षांपूर्वी…. वय असावं साधारण साठीच्या आसपास…

ती तिच्या यजमानांसह अंगाचं मुटकुळं करून पुण्यातल्या नामांकित रस्त्याच्या फुटपाथला एका कडेला शून्यात नजर लावून बघत बसलेली असायची…

येता जाता मी तिला पाहायचो…मी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचो पण ती कधी दाद द्यायची नाही…. 

तिला अंधुक दिसायचं… जवळपास नाहीच….. वयाच्या मानाने तिचे यजमान बऱ्यापैकी धडधाकट दिसायचे, परंतु ती मात्र पूर्णतः खचलेली…. वयापेक्षा पंधरा-वीस वर्षांनी जास्त आहे असं वाटायचं…. 

मी तिच्या यजमानांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनीही दाद दिली नाही. मला याचं काहीच कारण कळत नव्हतं…. असंच वर्ष निघून गेलं…

 पावसाळा सुरू झाला. एके दिवशी त्या रस्त्याने जात होतो, माझ्या अंगावर रेनकोट होता…. सहज फूटपाथ कडे लक्ष गेलं, ते दोघे भिजत होते… पावसापासून लपण्याचा प्रयत्न करत होते…. ! सगळ्यांनीच छळलं होतं…. पाऊस बरा यांना सोडेल? खूप वाईट वाटलं.. परंतु ते दोघेही सहकार्य करायला तयार नव्हते… मी तरी काय करणार ? 

तरीही एके दिवशी जुन्या बाजारात गेलो आणि तिथून प्लास्टिकची मोठीच्या मोठी ताडपत्री आणि सुतळी विकत आणली…. पाऊस  धो धो कोसळत होता… ते भिजत होतेच…ते ज्या ठिकाणी बसले होते तिथे जाऊन मग त्यांच्याशी काहीही न बोलता या टोकापासून ते त्या टोकापर्यंत प्लास्टिकची ताडपत्री टाकून छत होईल असा काहीतरी देशी जुगाड केला…. 

तिला दिसत नव्हते… तिने शेजारी बसलेल्या नवऱ्याला विचारले, “ एवढ्या जोरात पाऊस पडत होता अचानक कसा थांबला ?”  … यजमानांनी तिच्या कानात काहीतरी सांगितले. 

मी छत टाकून निघणार इतक्यात त्या आजीने मला हाक मारली…. ए बाबा… हिकडं ये….

मी छताखाली गेलो, मला म्हणाली, “ तू हायस तरी कोण?  आनी आमच्या मागं का लागला हायस?  तुला काय पाहिजेन…. जगू दे ना बाबा हितं तरी सुखानं…” 

घरातून बाहेर पडलेले हे दोघे….. जगाने यांना, या ना त्या कारणाने खूप फसवले होते, आता मीही त्यांना असाच फसवणार असा त्यांचा गैरसमज झाला होता…. . अनेकांनी यांना धोका दिला होता….

… खरंच, विश्वास किंमती असेलही.. पण धोका खूप महाग असतो…!

पुढे तासभर मी त्यांच्याशी बोलत होतो. मी नेमकं काय करतो आणि कशासाठी हे त्यांना समजेल अशा भाषेत यांना समजावून सांगितलं…. माझ्याकडून तुमची काहीही फसवणूक होणार नाही, झाली तर मदतच होईल याची मी त्यांना खात्री दिली…! मी निघालो. जाताना या वेळी तिच्या चेहऱ्यावर हसू होतं… 

यानंतर अनेक वेळा मी तिच्या त्या तात्पुरत्या उभारलेल्या छताखाली जायचो, जाताना प्रत्येक वेळी संसाराला उपयोगी होईल अशी काहीतरी वस्तू घेऊन जायचो…. बघता बघता दोन माणसांना स्वयंपाक करून खाता येईल आणि जगता येईल अशा सर्व गोष्टी घेऊन दिल्या.

तिचं माझ्याविषयीचं मत आता बदलत चाललं… मी तिला फसवणार नाही, याची तिची खात्री झाल्यावर त्या कुटुंबाबरोबर माझा स्नेह जुळला…. यानंतर तिला माझ्या गाडीवर बसवून तीन ते चार वेळा डोळ्यांच्या डॉक्टरांकडे घेऊन गेलो. ऑपरेशन केली आणि … शेवटी एकदाचं तिला दिसायला लागलं…. 

एका पायान ती अधू  होती…. तिला मग एक व्हीलचेअर पण घेवून दिली….

आता नाती घट्ट झाली होती….

मी तिला गमतीने, प्रेमाने नेहमी “ए म्हातारे” असं म्हणूनच हाक मारायचो.

तिला बाकी कशाचा नाही, पण म्हातारी म्हटल्याचा राग यायचा. बस एवढ्या एकाच गोष्टीने ती चिडायची….

दरवेळी ती मला म्हणायची, ‘ म्हातारे नको ना म्हणू…. ताई म्हणत जा की मला ‘

मी तिचं ऐकायचो नाही….. मी तिला ‘ ए म्हातारे ‘च म्हणायचो आणि मग ती तोंडाचा पट्टा सुरु करायची, तोंडातून शिव्या यायच्या, मला मस्त गंमत वाटायची.. .. वर  अजून म्हणायचो , ‘ म्हातारीच तर आहेस…. तुला काय ताई म्हणायचं गं ? ‘  यावर  चिडून ती चप्पल दाखवायची….

लोक फूटपाथवर राहणाऱ्या या दोघांना शर्ट-पॅंट साड्या पैसे असं बरंच काही द्यायचे…. 

दर भाऊबीज आणि रक्षाबंधनाला मात्र मला ती बोलावून घ्यायची आणि ओवाळून झाल्यानंतर तिला भिकेमध्ये  मिळालेल्या शर्ट पॅन्ट बूट अशा अनेक वस्तू ती मला भेट म्हणून द्यायची….बोचक्यातले शर्ट काढून मला ते होतील की नाही हे ती  माझ्या अंगाला लावून बघायची….  तिला मिळालेले फाटके बूट….. त्यातल्या त्यात चांगले निवडून ती मला द्यायची आणि घालून बघ म्हणून आग्रह करायची…. ‘ होतील गं..  दे मी घालतो ‘ असं म्हणून, गुपचूप मी त्या  गोष्टी घ्यायचो…. 

‘ व्वा…मला असाच शर्ट हवा होता ‘ असं मी तिला म्हणालो की तिचा चेहरा उजळून जायचा….

‘ मला असाच बूट हवा होता आणि तू नेमका आज तसाच दिलास ‘ म्हटलं की तिला आभाळ ठेंगणं व्हायचं…. 

भीक म्हणून तिला मिळालेल्या गोष्टी ती मला द्यायची आणि मी त्या वस्तू बहिणीने दिल्या आहेत म्हणून सांभाळून ठेवायचो ….’ शर्ट आणि बूट घाल बरं का….. न्हायी बसला तर फूडल्या बारीला देते ‘ हे पण ती आठवणीने सांगायची… 

अशा प्रेमानं मिळालेल्या अनेक गोष्टींचा मी संग्रह केला आहे…. 

ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अशा वस्तूंची  संग्रहालयं उभारली….आठवणीसाठी स्मारकं बांधली…

खूप नंतर कळलं….. स्मारक बांधायला आणि संग्रहालय उभं करायला पैसा लागतच नाही….

स्मारक तयार करायचं असतं मनात आणि संग्रहालय उभं करायचं असतं हृदयात….! 

मिळालेल्या वस्तूला किंमत असेलही, नसेलही, देणाऱ्याच्या भावनेला मात्र मोल नसतं…

भावनांचं हे स्मारक बांधून उरात घेऊन मिरवायचं असतं…! 

तू डॉक्टर मी अडाणी, तू जरा बऱ्या घरातला मी रस्त्यावर राहणारी, असा काही भेद-भाव ती माझ्या बाबतीत करत नसे…. तिला मी म्हणजे तिच्या कुटुंबाचाच  एक भाग वाटतो.. ती तिच्यात आणि माझ्यात काहीही फरक करत नाही…. ती मला तिच्याचसारखा समजते…. तिने मला तिच्याचसारखं समजणं, हा मी माझा विजय मानतो.

मी म्हणजे तूच आहे आणि तू म्हणजे मीच आहे, हे ती समजत होती आणि मी अनुभवत होतो…

अद्वैत ही संकल्पना नुसती वाचली होती …  तिच्यामुळे मला अनुभवायला मिळाली

लोक बाहेर सर म्हणतात, ही मला मूडद्या म्हणते…

एरव्ही, ‘ आपणास कधी वेळ असतो ?  कधी आपणास फोन करू ? ‘ लोकांचे असे नम्रतेने मेसेज येतात…

ती मात्र बेधडक रात्री बारा वाजता फोन करते, ‘ मुडद्या मेलास का जिवंत हायेस ?  भयनीची काय आटवण हाय का नाय ?’ म्हणत ठेवणीतल्या शिव्या देते…. 

मी हसत तिला म्हणतो, “ बहीण कसली तू कैदाशीण आहेस, हडळ आहेस  म्हातारे …”  

मग काय …. यानंतर आणखी स्पेशल शिव्या सुरू होतात आणि मी तिने उधळलेल्या या फुलांच्या सुगंधाचा आस्वाद घेतो…. त्यात बहिणीच्या मायेचा आस्वाद असतो…. ! 

… वजन फुलाचं होत असेलही…. सुगंधाचं करता येत नाही….

… अगरबत्ती किलोत मोजत असतील सुद्धा, परंतु त्या अगरबत्तीपासून निघालेल्या सुगंधी वलयाचं वजन कशात करावं मी ….? 

ती तशीच होती …  काटेरी फणसासारखी… बहीण म्हणून ती करत असलेली “माया” मोजायला माझ्याकडे कोणताही तराजू नाही…. 

तिला छत टाकून तात्पुरता निवारा करून दिला होता,  त्या झोपड्याला तिने घर म्हणून रूप दिलं होतं. मी त्यात जगण्यासाठी आवश्यक अशा सर्व वस्तू तिला घेऊन दिल्या होत्या.

लोक भीक देत होते, त्यात तिची गुजराण होत होती. परंतु माझी बहीण भीक मागून जगत आहे, हा माझा अपमान होता…

.. .. आणि म्हणून त्या दोघांनी काहीतरी व्यवसाय करावा अशी माझी इच्छा होती….  

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – ३ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – ३ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(साहेबांनी त्या पळपुट्यांकडे पाहून असे काही म्हटले की त्यापैकी दोन साधे शिपाई परतले आणि म्हणाले… “साब… अब हम आपके अंडर हैं… आप जो कहेंगे वो करेंगे!” त्यांचा अधिकारी मात्र तिथून पळून गेला तो गेलाच.) इथून पुढे —  

समरपाल सिंग साहेबांनी आपल्या आडोशाच्या वर थोडेसे डोके वर काढण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा त्यांच्या शेजारचा राजपूत सैनिक, जो खरं तर वयाने मोठा पण अधिकाराने कमी स्तरावरचा होता… समरपाल सिंग साहेब त्याचे वरिष्ठ होते, खास राकट आवाजात म्हणाला, ”साब जादा उछलो मत! ये आपका नीला हेल्मेट उनको दिखेगा तो टरबुजे की तरह फट जाओगे!” तो बिचारा आपल्या या साहेबाच्या काळजीपोटी तसं म्हणून गेला होता. साहेब म्हणाले, “अरे भाई, देखने तो दो दुश्मन है कौन और कितने!”   

साहेबांनी आदेश दिला, “एक गोली… एक दुश्मन!” गोळी वाया जाता कामा नये! 

समरपालसिंग साहेबांनी रायफल तयार केली… आपला नेताच आपल्या खांद्याला खांदा लावून लढणार म्हटल्यावर त्या राजपुतांना आणि तिथल्या इतर सैनिकांना भलताच चेव चढला. 

आता बंडखोर अगदी नजरेच्या टप्प्यात दिसत होते. त्यांचे ते लालबुंद डोळे.. दारूच्या नशेत तर्र हजारो यमदूत पुढे पुढे येताहेत…. त्यांना त्यांचे विरोधक संपवून टाकायचे होते… आणि मध्ये येणाऱ्या शांतिसैनिकांनाही ते ठार मारायला तयार होते! 

शेजारच्या राजपुताने आपली रायफल लोड करीत करीत साहेबांकडे डोळे मोठे करून पाहिले… डोळे सांगत होते जणू…. ‘अब समय आ गया है…. मारेंगे तो साथ साथ… मारते मारते मरेंगे तो साथ!’ साहेबांनीही डोळ्यांनीच हुंकार भरला… उजव्या हाताची मूठ बंद केली आणि ‘जरूर’ अशा अर्थाने अंगठा वर करून दाखवला…

कुंपणापलीकडून यमदूत पुढे पुढे सरकत होते… त्यांचे लालबुंद डोळे भिरभिरत होते… सावज शोधत होते… आपल्या बहादुरांनीही त्या मृत्यूच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्याचे धाडस सुरू केले….. आपल्याही सैनिकांच्या नजरा म्हणत होत्या… तु एकदा ट्रिगर तर दाबून बघ रे…… एक गोळी तर झाडून पहा आमच्या दिशेने… मग पहा आमच्या गोळीचा निशाणा! 

दिवसभर गोळीबार सुरू होता…. आपला एकही भारतीय सैनिक जागचा हलला नाही… कुणीही जीवाच्या भीतीने पळून गेलं नाही… शत्रू टप्प्यात येताच त्याला अचूकपणे टिपले जात होते….. 

दिवस संपता संपता हल्लेखोरांचा एक प्रतिनिधी शिबिरापर्यंत बोलणी करण्यासाठी म्हणून आला. ‘शिबिरात आश्रय घेतलेल्या त्या छत्तीस जणांना आमच्या हवाली करा… आम्ही माघारी जाऊ!’ त्याने अट ठेवली.  

समरपाल सिंग साहेब म्हणाले…. “शरणार्थ्यांना मृत्यूच्या हवाली करणं आमच्या तत्वात बसणारं नाही….” प्रतिनिधी परतला. 

रात्र झाली. आपल्या सैनिकांपैकी कुणाच्याही डोळ्याला डोळा लागला नव्हता! सकाळी त्या बंडखोरांनी एकदम तोफगोळे डागायाला आरंभ केला! साहेबांच्या सैन्याने जोरदार उत्तर द्यायला आरंभ केल्याने हल्लेखोर मागे सरकू लागले.. 

पण एक चमत्कारच झाला म्हणायचा. नदीच्या तीरावर असलेल्या आपल्या सैनिकांच्या तुकडीच्या गोळीबाराच्या टप्प्यात हे मागे सरकत असलेले बंडखोर आपसूक आले. त्यांचे आता सॅंडविच झाले होते. आपल्या त्या सैनिकांनी समरपाल सिंग साहेबांना संदेश दिला… ‘साहेब… शत्रू आमच्या टप्प्यात आलाय… तुम्ही बंकरमध्ये लपून रहा… आम्ही इकडून गोळीबार करू….’ आणि त्यांनी तसे केलेसुद्धा. त्यात कित्येक बंडखोर रक्ताच्या थारोळ्यात पडले! उरलेले बंडखोर मग आता शिबिराच्या दिशेने पळाले.

मग समरपाल सिंग साहेबांनी आपल्या या नदी तीरावरल्या सैन्याला आदेश दिला… “तुम्ही गोळीबार थांबवा… आडोसा घ्या… आता आम्ही इकडून गोळीबार सुरू करतो!” मग… ‘एक गोली एक दुश्मन’ असा हिशेब सुरू होता तो पुढे सुरू झाला…. केवळ छत्तीस भारतीय जवानांनी अनेक बंडखोरांचा निकाल लावला होता…

शिबिरात असलेले अधिकारी, शरणार्थी जीव मुठीत धरून होते! मदत आली काही तासांनी, पण ती सुद्धा अगदी तुटपुंजी आणि अप्रशिक्षित सैनिकांची. 

इतका वेळ समरपाल साहेबांचे गाढे वीर खिंड लढवतच राहिले होते! या धुमश्चक्रीत आपले दोन वीर कामी आले! सुभेदार धर्मेश संगवान (८,राजपुताना रायफल्स) आणि आर्मी मेडिकल कोअरचे सुभेदार कुमार पाल सिंग हे ते दोन हुतात्मा जवान! अमेरिकन महिला लष्करी अधिकारी आणि आणखी काही जणांना तेथून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

या प्रचंड संघर्षानंतर भारतीय तुकडीला माघारी फिरण्याचा आदेश मिळाला! आपले सैनिक शब्दाला, कर्तव्याला प्राणांची बाजी लावून जागले होते….. युद्ध कुठेही असो…. आमचा लढाऊ बाणा कायम असतो… हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

संयुक्त राष्ट्रसंघाने भारतीय सैन्याचा नेहमीच गौरव केला आहे. काहीच काळापूर्वी आपल्या एक हजार जवानांना संयुक्त राष्ट्र संघाने खास स्मृतिचिन्हे देऊन त्यांना सन्मानीत केले आहे… आजही आपले शेकडो सैनिक आणि अधिकारी आंतरराष्ट्रीय शांतिसेनेमध्ये तैनात आहेत… तिथेही ‘भारत माता की जय!’ घोषणा गुंजत असतात! भारतीय सोनं जगातल्या कोणत्याही आगीत घातलं तरी तेजानेच चकाकतं!  

युद्ध भयावह असतं… पण त्याला सैनिकांचा इलाज नसतो… त्यांना फक्त कर्तव्य पार पाडणं माहित असतं.. नव्हे, त्यासाठीच त्यांना प्रशिक्षण दिलेले असते. आणि याबाबतीत भारतीय सैनिकांची बरोबरी इतर फारसे कुणी करू शकत नाही… कारण आपले सैनिक एकमेवाद्वितीय आहेत… आपलं सैन्य देशाशी इमान राखणारं आहे…  प्राणांची आहुती देऊनही!

कॅप्टन हुद्द्यावरून नंतर मेजर हुद्दा प्राप्त समरपाल सिंग साहेब आता सेवानिवृत्त आहेत. त्यांच्या आफ्रिकेतील अनुभवाविषयी इंटरनेटवर खूप काही वाचण्या, ऐकण्यासारखं, पाहण्यासारखं आहे.

मेजर गौरव आर्य (सेवानिवृत्त) नावाचे एक माजी लष्करी अधिकारी सुद्धा विडीओजच्या माध्यमातून आपल्या सैनिकांविषयी भरभरून आणि अभ्यासपूर्ण सांगत असतात.. धन्यवाद! 

इंग्लिश आणि हिंदीत असलेली ही माहिती आपल्या मराठी वाचकांसाठी मी जमेल तशी मराठीत लिहिली आहे… यात माझे स्वत:चे काही नाही. तपशील, नावे, घटनाक्रम, यांत काही तफावती असू शकतात…. पण त्यातील आशय नक्कीच महत्त्वाचा आहे. 

नऊ जुलै हा दक्षिण सुदानचा स्वातंत्र्यदिन…. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या आपल्या भारतीय सैनिकांविषयी या दिवसाच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख सविनय सादर. 

– समाप्त –

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “काळ जुना होता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “काळ जुना होता…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆

काळ जुना होता.

अंग झाकायला कपडे नव्हते,

तरीही लोकं शरीर झाकण्याचा प्रयास करायचे. आज कपड्यांचे भंडार आहेत. तरीही जास्तीत जास्त शरीर दाखवायचे प्रयत्न सुरू आहेत.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

रहदारीची साधने कमी होती. तरीही कुटुंबातील लोक भेटत असत.

आज रहदारीची साधने भरपूर आहेत.पण प्रत्येक जण  लोकांना न भेटण्याच्या सबबी सांगत आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

घरची मुलगी अख्ख्या गावाची मुलगी होती. आजची मुलगी ही शेजाऱ्यापासूनच असुरक्षित आहे.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

लोकं गावातील वडीलधार्‍यांची

चौकशी करायचे. आज पालकांनाच

वृद्धाश्रमात ठेवले जाते.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

खेळण्यांचा तुटवडा होता. तरी शेजारची मुलं एकत्र खेळायची .

आज खूप खेळणी आहेत, मात्र मुले मोबाईलच्या कचाट्यात अडकलेली आहेत.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

 

काळ जुना होता.

रस्त्यावरील प्राण्यांनासुध्दा भाकरी दिली जायची. आज शेजारची मुलंही भुकेली झोपी जातात.

समाज सुसंस्कृत झाला आहे

 

काळ जुना होता.

शेजारच्या व आपल्या घरी नातेवाईक भरलेले असायचे, आता परिचय विचारला तर आज मला शेजाऱ्याचे नावही माहीत नाही.

समाज सुसंस्कृत झाला आहे.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ही तर निसर्ग पूजा ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

?  विविधा ?

☆ ☘️ ही तर निसर्ग पूजा 🌿 ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

विविध रंगांच्या आतषबाजीने, रंगलेली, प्रकाशलेली दीपावली हा प्रकाशाचा सण संपत आलेला. आता त्याची गडबड संपलेली. तिखट गोड पदार्थांची सुस्ती जाणवते. आज दुपारीच मी तुळशी वृंदावन साफसूफ करून थोडं पाणी घातलं आणि वृंदावनही रंगून ठेवलं.तसं तर वसुबारसे पासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दिवाळी असते.या दीपोत्सवाची तेव्हाच सांगता होते . कार्तिक शुद्ध एकादशी पासून तुलसी विवाह सुरू होतात ते पौर्णिमेपर्यंत. त्यानंतर लग्नाचे मुहूर्त असतात .आधी देवाचं लग्न त्यासाठी तर वृंदावन छान रंगवलं.ऊसाचे खांब करुन,मांडव सजवायचा आणि छान आरास करायची .तोरण बांधायचं. देव्हाऱ्यातला बाळकृष्ण वृंदावनात तुळशीजवळ ठेवायचा. तुळशीची , बाळ कृष्णाची पूजा करायची पण त्याआधी सुपारीच्या गणपतीच प्रथम पूजन!

तुळशीला, बाळ कृष्णाला नवीन वस्त्र वस्त्र घालायची तुळशीच्या हातात म्हणजे फांद्यांना हिरव्यागार बांगड्या घालायच्या. मंगलाष्टक म्हणून अक्षदा वहायच्या की झालं तुळशीचं लग्न. मग फटाके उडवायचे वाजंत्री म्हणून. मणी मंगळसूत्र तुळशीला वहायच.म्हणजे फांदीवर अडकवायचे.फणी करंडा, आरसा ,खण पुढे  ठेवायचा.तुळशीची ओटी भरायची.आरती करायची.मनोभावे नमस्कार करायचा.असा हा विवाह सोहळा म्हणजे आनंदोत्सवच! जणू घरच्या लेकीचा विवाहसोहळा.

आमच्या लहानपणी तुळशीचं लग्न लावायला भटजी यायचे. दादा म्हणजे माझे वडील रेशमी  कद नेसून तर आई रेशमी जरीची साडी दागिने घालून नटायची .जणू त्यांच्याच लेकीचं लग्न आणि करवली म्हणजे मी नटून थटून तबकात तेवत्या निरांजनांचा. करादिवा घेऊन वृंदावनाच्या मागे उभी राहायची. भटजी अंतर पाठ धरायचे अन मंगलाष्टक म्हणायचे .आईची नैवेद्याची धांदल ,भावंड नव्या कपड्यात ,झाडं-चक्र,अशा आतषबाजीच्या तयारीत असायची.

शेजारचे सगळे  यायचे ते व-हाडी म्हणूनच. धुमधडाक्यात, फटाक्यांच्या आवाजात तुलसी विवाह व्हायचा. बायकांना हळदी कुंकू द्यायचे .सर्वांना साखर खोबऱ्याचा, पेढ्याचा प्रसाद वाटायचा. पान सुपारी द्यायची. ते दिवस वेगळेच होते.

लग्नानंतर आम्ही दारातल्या तुळशीचं लग्न कधी चुकवलं नाही ,घरच्या घरी लग्न लावायचो.आमची लेक करवली व्हायची .हा दिवस साधून सगळ्यांना फराळाचं आमंत्रण करायचो.

आता काळ काम वेगाच्या चक्रात सगळ्यांना हे एवढं जमतच असं नाही हे मात्र खर आहे.

आपले सगळे सण उत्सव धार्मिक असले तरी शास्त्रीय तत्वावर आधारलेले असतात .ओटी भरायची तुळशीची तीही चिंचा, आवळे ,बोरं अशा मोसमी फळांनी. आता तुळशीच पहा, पानं ,  खोड ,मंजि-या या सगळ्यांचे आयुर्वेदात औषधी गुणधर्म आहेत.या  विवाह सोहळ्यामुळे आपण तुळशीजवळ किती वेळ बसतो मनांपासून सगळी पूजा करतो . ही मनाची प्रसन्नता  आपल्या आरोग्याला पोषकच आहे.

विवाह सोहळा संपन्न झाला आणि नातवंडांनी फटाक्यांची माळ लावली.

खरंच दिव्यांच्या रोषणाईत उसाच्या मांडवात विवाह वेदीवरील अंगभर मंजिऱ्यांनी डवरलेली तुळस कशी साजरी दिसत होती. अगदी नव्या नवरी सारखी..! हळदी कुंकू आणि नंतर प्रसाद वाटप झालं.बाळकृष्ण- तुळशीला नमस्कार करताना नकळत डोळे ओलावले. आज केवळ वेळ नसला तरी कुंडीतल्या तुळशीजवळ देव्हाऱ्यातला बाळकृष्ण ठेवून नुसतं हळदीकुंकू वहावं.अक्षता टाकाव्यात. सौभाग्याचं म्हणजे केवळ सुवासिनीचंच असं नाही संपन्नतेच भाग्याचं दान मागाव. श्रद्धेन एवढं जरी केलं तरी ही हरिप्रिया नक्कीच प्रसन्न होईल आरोग्याचं वरदानही देईल.

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम ! — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

??

विश्वरूप दर्शनाचे दोन परिणाम !  भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

(यानंतर श्रीकृष्णाने मूर्ख दुर्योधनाच्या अहंकाराला, त्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या त्याच्या महत्वाकांक्षांना, आणि त्या महत्वाकांक्षापुढे अगतिक होऊन दुर्योधन करत असलेल्या अधर्माला आवर न घातल्याबद्दल संपूर्ण दरबाराला बोल लावला.) इथून पुढे —-

अहंकारीला अहंकारी म्हटल्यास त्याचा अहंकार दुखावला जातो. दुखावलेल्या अहंकारी मनात आत्मपरीक्षण करण्याची इच्छा निर्माण होण्याऐवजी राग उत्पन्न होतो. अहंकारावर टीका झाल्यास मूर्ख व्यक्ती हरप्रकारे आपल्या अहंकाराचे रक्षण करायचा प्रयत्न करतो. ते शक्य होत नसेल तर शेवटी तो अहंकारावर टीका करणाऱ्यावर शाब्दिक वा शारीरिक प्रतिहल्ला सुरू करतो. प्रतिहल्ला हा सर्वात चांगला बचाव असतो. दुर्योधनाचेही तसेच झाले. 

श्रीकृष्णाच्या बोलण्याने दुर्योधनाचा अहंकार दुखावला गेला. दुर्योधनाला श्रीकृष्णाचा प्रचंड राग आला. रागाच्या भरात त्याने श्रीकृष्णाला बंदी बनवण्याचा आदेश आपल्या सैनिकांना दिला. यावर श्रीकृष्णाने सर्व दरबाराला श्रीकृष्ण खरा कोण आहे त्याची जाणीव करून दिली. आपले प्रचंड विश्वरूप त्याने दरबाराला दाखवले. दुर्योधनाच्या आदेशाने श्रीकृष्णाला अटक करायला पुढे सरसावलेले हस्तिनापूरचे सैनिक मृत्यूच्या भीतीने जागीच खिळून राहिले. विश्वरूपाच्या तेजाने बहुतेकांचे डोळे दिपले. दरबारातील बहुतेक सान-थोर या विश्वरूपासमोर लीन होऊन हात जोडून उभे झाले. श्रीकृष्णाला हात लावण्याचेही धाडस कुणाला झाले नाही. तशात श्रीकृष्ण दरबार सोडून बाहेर पडला. 

श्रीकृष्णाने हरप्रकारे समजावल्यानंतर आणि विश्वरूप दाखवल्यानंतरही  दुर्योधनाने आपला हेका सोडला नाही. श्रीकृष्णाची शिष्टाई अयशस्वी ठरल्यावर दोन्ही पक्ष युद्धाला समोरासमोर ठाकले. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या मध्यभागी समोर कुलगुरू, गुरू, आजोबा आणि आप्त पाहून अर्जुनाला युद्ध न करण्याचा अधर्म सुचला. श्रीकृष्णाने त्याला गीतेच्या स्वरूपात धर्म समजावून सांगायला सुरुवात केली. गीतेच्या सुरुवातीलाच श्रीकृष्णाने अर्जुनाला अनार्य, षंढ, क्षुद्र म्हणून हिणवले. पण अर्जुन अहंकारी नव्हता. त्यामुळे त्याला श्रीकृष्णाच्या बोलण्याचा राग आला नाही. शांत डोक्याने विचार केल्याने अर्जुनाला जाणवले की श्रीकृष्ण आपल्या हिताचीच गोष्ट सांगतो आहे. मग अर्जुन अंतर्मुख झाला आणि शांत डोक्याने आत्मपरीक्षण करू लागला. पूर्ण श्रद्धेने तो श्रीकृष्णाला शरण गेला. श्रीकृष्णाने आपल्याला शिष्य करून घ्यावे आणि मार्गदर्शन करावे अशी विनंती अर्जुनाने केली. त्यामुळे श्रीकृष्णाने पुढील गीता अर्जुनाला सांगितली. अर्जुनाने दुर्योधनाप्रमाणे अहंकार फुगवून छोट्या छोट्या गोष्टींवरून तो दुखवून घेतला असता तर श्रीकृष्ण अर्जुनाला पुढील गीता सांगायच्या फंदात पडला नसता. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणाऱ्या गीतेच्या ज्ञानाला अर्जुन दुर्योधनाप्रमाणेच मुकला असता. पण अर्जुनाने अहंकार दूर ठेवण्याचे शहाणपण दाखवले आणि गीतेचे कल्याणकारी ज्ञान पदरी पाडून घेतले. शेवटी विश्वरूप दाखवून श्रीकृष्णाने अर्जुनाला पूर्णपणे धर्म मार्गावर परत आणले. अर्जुनाचे सकल कल्याण झाले. 

असाच प्रयत्न श्रीकृष्णाने दुर्योधनासोबत आधी केला होता. पण पालथ्या घड्यावर सर्व पाणी पडले. अहंकारी दुर्योधनाने आत्मपरीक्षण करण्याऐवजी श्रीकृष्णालाच अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पुढील संवाद संपला. शेवटी श्रीकृष्णाने दुर्योधनालाही विश्वरूप दाखवून त्याला त्याची लायकी दाखवून दिली. मोठेपणाच्या अहंकारातून निर्माण होणाऱ्या महत्वाकांक्षेपुढे दुर्योधन हतबल झालेला होता. त्याच्या धर्म-अधर्मात भेद करणाऱ्या विवेकबुद्धीला अहंकारातून उत्पन्न झालेल्या हावेचे ग्रहण लागलेले होते. त्यामुळे साक्षात परमेश्वराने त्याला धर्माच्या मार्गावर आणण्याचे प्रयत्न करूनही त्याने अधर्माची कास सोडली नाही. महाभारताच्या युद्धात दुर्योधनाने स्वतःसह कुळाचा नाश करून घेतला. त्यामुळेच कदाचित म्हण पडली असावी, “अहंकारी गाढवासमोर गीता वाचून उपयोग नसतो “ 

कुठलाही सल्ला मिळाल्यास लगेच त्याला इगोवर न घेता डोके शांत ठेवून आधी तो सल्ला नीट समजून घेतला पाहिजे. आपला अहंकार या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो. जितका मोठा अहंकार तितक्या लवकर तो दुखावला जाण्याची शक्यता असते. अशा अहंकाराला उपयोगी समजून त्याचे संगोपन करणे हे अज्ञान आहे. स्वतः ठेच खावून तोंडावर पडूनच सर्व धडे शिकायचे नसतात. पुढच्याला ठेच लागल्याचा अनुभव ऐकून जो मागचा शहाणा होतो तो खरा शहाणा. पण अहंकारी व्यक्तीला कुठलाही सल्ला दिला तरी तो सल्ला त्याला स्वतःच्या अहंकारावरील टीका वाटते. अहंकार दुखावल्याने तो चिडून दुर्योधनासारखा वागतो. अशा व्यक्तीला सल्ला देवून पोळलेला माणूस परत त्याला कधीही काहीही सांगायला जात नाही. कुणाचेही न ऐकणारा अहंकारी व्यक्ती ठेच खाऊन तोंडावर पडल्यास त्याबद्दल कुणालाही सहानुभूती वाटत नाही. उलट त्याचे हसे होते. तेव्हा स्वतःचे कल्याण करून घेण्यासाठी स्वतःचा अहंकार कमी ठेवण्याचे ज्ञान अंगी हवे. तसेच स्वतःच्या दूरोगामी हिताशी प्रामाणिक रहायची अक्कलही अंगी हवी. हा स्मार्टनेस आहे आणि तो फार थोड्या लोकांजवळ असतो. हा स्मार्टनेस अंगी नसेल तर प्रत्यक्ष परमेश्वराचेही आपल्यासमोर हात टेकलेले असतील. आपल्या अहंकारी स्वभावाची कल्पना असलेले सामान्य लोक तर आपल्याला सल्ला द्यायच्याही भानगडीत पडणार नाहीत. आपल्या आधी अनेकांनी ठेचा खावून जमा केलेल्या ज्ञानाला आपण मुकू. अहंकारामुळे अज्ञान हटणार नाही आणि अज्ञानामुळे अहंकार हटणार नाही. 

— समाप्त — 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ परकीय युद्धभूमीवरचं भारतीय शौर्यगीत ! – मेजर समरपाल सिंग तूर !… भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके 

(सैनिक बलिदानासाठीच तर निर्माण झालेला असतो.. इथं भावनांपेक्षा कर्तव्यच श्रेष्ठ !) – इथून पुढे —

आफ्रिकेतील मोहिम वाटते तितकी सोपी नाही… शांतता रक्षणासाठी प्रसंगी प्राणांचे बलिदानही द्यावे लागणार याची जाणीव प्रत्येक जवानाला होती!

८,राजपुताना रायफल्सचे जवान दक्षिण सुदान मध्ये उतरले. विशिष्ट गणवेश आणि डोक्यावर यु.एन. लिहिलेलं निळ्या रंगाचे हेल्मेट. भारतासह अनेक देशांचे सैन्य तिथे तैनात होते. हे संयुक्त सैन्य असते आणि या सैन्याचे नेतृत्व संयुक्त राष्ट्र संघाने नेमलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या हाती असते.

भारतीय सैनिकांची संख्या अर्थातच लक्षणीय असते आणि कामगिरी तर अतुलनीय असतेच असते. कारण भारतीय सैनिक अत्यंत कणखर मनोवृत्तीचे, शिस्तबद्ध आणि नैतिकतेचे पालन करणारे, उच्च दर्जा प्रशिक्षित असतात. देशाने सोपवलेली कामगिरी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे हे कर्तव्य मानले जाते आणि हे कर्तव्य प्राणांच्याही पलीकडे जपले जाते. सैनिक आणि अधिकारी आपापल्या बटालियन, रेजिमेंट, तुकडी इत्यादींशी संबंधित व्यक्तींशी, चिन्हाशी, बलिदानाशी अगदी आत्मियतेच्या धाग्यांनी बांधले गेलेले असतात. हे सैनिक एकमेकांचे बंधू असतात. कुणीही कुणाला मागे एकट्याला सोडून पुढे निघून जात नाही. साथ जियेंगे, लडेंगे, मारेंगे और जरुरत पडी तो मरेंगे असा यांचा खाक्या असतो.

दक्षिण सुदानमधील परिस्थिती अत्यंत स्फोटक होती. डिंका आणि नुअर जमातीतले सर्वजण एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले होते. त्यांनी आजवर एकमेकांच्या टोळीतील लाखो लोकांचा जीव घेतलेला होता.

काहीच दिवसांपूर्वी तिथे एक मोठा सामुहिक नरसंहार घडून आला होता. एक फूटबॉलचे मोठे मैदान भरून जाईल इतके मृतदेह कित्येक दिवस सडत पडले होते. बऱ्याच दिवसांनी मोठ्या क्रेन्स आणून त्याच मैदानावर खड्डे घेऊन ही प्रेतं पुरली गेली!

आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमुळे या दोन्ही टोळ्यांमध्ये काहीकाळ युद्धविराम झाला होता. डिंका टोळीचा एक नेता अध्यक्ष आणि नुअर टोळीचा एक नेता उपाध्यक्ष अशी व्यवस्था निर्माण केली गेली होती. जागतिक संघटना औषधे, वैद्यकीय सहाय्य, अन्नधान्य इ. मदत करत होत्याच. पण अन्याय होत असल्याच्या आणि सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याच्या भावनेतून नुअर लोकांनी अचानक डिंका जमातीचा अध्यक्ष असलेल्या सरकारविरुद्ध उठाव केला. हे बंडखोर आणि त्यावेळच्या सरकारी फौजांमध्ये तुफान धुमश्चक्री झाली. हजारो लोक बेघर झाले. जाळपोळ, लुटालुट माजली.

कॅप्टन समरपाल सिंग साहेबांनी गेल्या गेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या नेमणूकीच्या भागात एक तात्पुरते शरणार्थी शिबिर त्यांना उभारावे लागले. कारण मारले जाण्याच्या भीतीने डिंका जमातीचे छत्तीस लोक शांतिसेनेच्या आश्रयाला आले होते. त्यांच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी आता शांतिसेनेची होती.

बंडखोर आता या शांतिसेनेच्या सैनिकांवरही डूख धरून होते. समरपाल साहेबांनी आपल्या सैनिकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. संयुक्त सेना असल्याने समरपाल सिंग साहेबांच्या हाताखालील तुकडीत आपले छत्तीस भारतीय सैनिक होते. इतर राष्ट्रांतील काही ख्रिस्ती, मुस्लीम सैनिक होते इतर तुकड्यांमध्ये! पण असे असले तरी सच्चे सैनिक दिलेल्या आदेशाचे पालन करण्यात धन्यता मानतात. ह्या सर्वांच्या धार्मिक भावना, आहार, विचार अगदी भिन्न असले तरी आता ते एकाच आदेशाखाली एकत्रित आलेले होते…. आणि मुख्य म्हणजे कर्तव्यासाठी प्राणांची आहुती देण्यास तयार होते.

डिसेंबर महिना. डिंका लोक शांतिसेनेच्या आश्रयाला आल्याची खबर नुअर टोळीला लागली! या डिंकाना ठार मारण्यासाठी या शरणार्थी शिबिरावर सुमारे दीड-दोन  हजार बंडखोर सशस्त्र आक्रमण करणार होते… अशी पक्की खबर मिळाली होती!

यावेळी या शिबिरात शांतिसेनेच्या अमेरिकन महिला वरिष्ठ लष्करी अधिकारी, आणखी काही तीन-चार महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. मुख्य शहरापासून हे शिबिर पाचशे किलोमीटर्सवर स्थित होते… अर्थातच दारूगोळ्याची कमतरता होती… लगेचच मदत मिळण्याची शक्यता धुसर होती….. आणि या ठिकाणी तैनात सैनिकांची संख्या अगदी तुटपुंजी! आणि शिबिराकडे दीड-दोन हजार सशस्त्र बंडखोर वेगाने झेपावत होते…. जंगली कुत्र्यांची भुकेलेली टोळीच जणू!

शिबिरात असलेला एक विदेशी अधिकारी समरपाल सिंग साहेबांकडे आला आणि म्हणाला, ”माझा फक्त भारतीय सैन्याच्या शौर्यावर विश्वास आहे… इतरांवर नाही! मी त्यांना पळून जाताना पाहिले आहे. तुमच्याकडे असलेल्या रायफल चालवण्याचे प्रशिक्षण मला द्या… मी मेलो तर तुमच्या खांद्याला खांदा लावून लढता लढता मरेन!”

वरिष्ठांची परवानगी घेऊन समरपाल साहेबांनी त्या अधिकाऱ्याला ती रायफल चालवायची कशी हे तिथल्या तिथे शिकवले….. आता आपल्या छत्तीस सैनिकांसोबत हा सदतिसावा सैनिक सज्ज होता!

शरणार्थी शिबिराच्या सभोवती आठ नऊ फूट उंचीचे गवत माजलेले होते. त्यामुळे शिबिराजवळ कुणी येत आहे हे दिसणे अशक्यप्राय होते.

सकाळचे सात वाजताहेत…. आज पहाटेपासूनच समरपाल सिंग साहेब अस्वस्थ आहेत. हल्ला होणार…! आपल्या ताब्यात असलेले शरणार्थी ही आपली जबाबदारी आहे!

समरपाल सिंग साहेब बाहेर आले. शिबिराच्या एका कोपऱ्यात दोन रिकामे कंटेनर एकमेकांवर असेच ठेवून दिले गेले होते. आणि त्यांच्या टोकापर्यंतची उंची आठ फुटांपेक्षा जास्त होती. साहेब त्या कंटेनर्सवर चढले आणि त्यांनी सभोवार नजर टाकली.

आफ्रिकेतील विल्डर बिस्ट्स नावाच्या प्राण्यांच्या लाखोंच्या झुंडी बेफाम पळत निघालेल्या आहेत, हे दृश्य आपण कित्येक वेळा डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक चॅनेलवर पहात असतो ना, तशी हजारो शस्त्रधारी बंडखोरांची एक अजस्र लाट शिबिराकडे झेपावत होती… त्यांची संख्या खरं तर याही पेक्षा अधिक असावी. पण छत्तीस जवानांच्या समोर हे म्हणजे अजस्र आव्हानच!

समरपाल सिंग साहेबांनी धाडकन खाली उडी घेतली. आपल्या सैनिकांना सावधनतेचा इशारा दिला. अगदी साधे बंकर्स… पत्र्यांचे…. आत फक्त वाळूने भरलेली काही पोती… गोळीबारापासून बचाव करण्यासाठी! त्यात मर्यादित शस्त्रसाठा. कुणी मदतीला येण्याची शक्यता नाहीच. जे मदत करू शकतील ते थोडेथोडके नव्हेत… पाचशे किलोमीटर्स अंतरावर होते… त्यांना येण्यास वेळ लागला असताच.

नाही म्हणायला आपल्या सैनिकांची आणखी एक छोटी तुकडी तिथून दीड किलोमीटर अंतरावर नदीच्या तीरावर तैनात होती. पण ते आणि शरणार्थी शिबिर यांच्यातल्या या दीड किलोमीटर्स अंतरामध्ये हे बंडखोर अचानकपणे उपटले होते. म्हणजे आपल्या त्या सैनिकांना आपल्या सैनिकांच्या मदतीला येण्याच्या मार्गात हे एवढ्या मोठ्या संख्येत असलेले बंडखोर होते. परिस्थिती बिकट होती!

बंडखोरांनी संधीचा फायदा उचलून शिबिरावर अंदाधुंद गोळीबार सुरु केला. आपल्या सुदैवाने त्या अप्रशिक्षित हल्लेखोरांना बंदुकीने नेमका नेम कसा साधायचा हे माहित नव्हते. प्रशिक्षण नसल्याने ते कसेही वेडेवाकडे फायरिंग करीत होते. अधूनमधून गोळीबार थांबायचा.

साहेब स्वत: एका बंकरमध्ये घुसले आणि त्यांनी रायफलचा ताबा घेतला… कारण तेथे तैनात असलेली एक परदेशी सैनिकांची तुकडी एवढा मोठा हल्ला बघून तिथून पळून चालली होती. साहेबांनी त्या पळपुट्यांकडे पाहून असे काही म्हटले की त्यापैकी दोन साधे शिपाई परतले आणि म्हणाले… “साब… अब हम आपके अंडर हैं… आप जो कहेंगे वो करेंगे!” त्यांचा अधिकारी मात्र तिथून पळून गेला तो गेलाच.

– क्रमशः भाग दुसरा 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “भांडणशास्त्र…” – लेखक :श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆

आपल्या आयुष्यातला सर्वात जास्त फुकट गेलेला वेळ कोणता? तर निरर्थक, हेतुशून्य, आणि फक्त ‘मी’ ( ! ) जपण्यासाठी भांडणात घालवलेला.

हो. हेसुद्धा शास्त्र आहे,प्रशिक्षण आहे. जगाच्या शाळेत आपण ते शिकतो.एक भांडण आपलं नियतीशीसुद्धा सुरूच असतं, आतल्या आत.पद्धत चुकली की आपण चुकतो आणि जीवनाची रहस्ये कायम गूढच रहातात. उत्तरं न मिळता नियतीशी झगडण्यातच सगळं आयुष्य निघून जातं.

संतपदाला पोहोचणं प्रत्येकाला शक्य नाही. सॉक्रेटीसच्या बायकोने एकदा चिडून त्याच्यावर पाणी फेकलं. यावर तो म्हणाला,

“जरा जास्त तरी फेकायचेस. अंघोळीचं काम झालं असतं.”

लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वाद सुद्धा एक आदर्श उदाहरण आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं ‘स्मृतीचित्रे’  वाचलं तर लक्षात येईल की तापट व्यक्तीसोबत भांडण टाळणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे,कौशल्य आहे.हे शिकून झालं, असं कधीच नसतं. आपण आयुष्यभर शिकतच असतो.

भांडण करताना काही नियम पाळले, तर आपलं जगणं सोपं होऊ शकेल.मनाला हे नियम पाळण्याची सक्ती करा.कुठेतरी लिहून ठेवा पण काहीही करून या नियमांना अनुसरूनच भांडण करायचे, हे आधी पक्कं करा.

सर्वात पहिला नियम म्हणजे मूळ मुद्दा,विषय सोडायचा नाही.आज, आत्ता समोर असणाऱ्या समस्येपुरतंच बोलायचं. भूतकाळ, भविष्यकाळ नकोच, विधाने करायची नाहीत. म्हणजे ‘तू नेहमी …, तू … ने सुरु होणारी वाक्ये टाळायची.नातेवाईक, मित्रमंडळी यांचे उल्लेख वेळ वाया आणि प्रकरण हाताबाहेर घालवायचेच असेल तरच करायचा.आपण भांडण करताना सुंदर दिसत नाही, हा विचार केला तरी संयम येईल.

प्रश्न सुटला पाहिजे हा हेतू हवा आणि भविष्यात पुन्हा हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तो सुटला पाहिजे ही तळमळ हवी.सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका विषयावर एकदाच भांडायचं. पुन्हा कधीच नाही,वेळ आणि शक्ती वाया जाऊ द्यायची नाही हे मनात पक्के हवं.

आपल्या सगळ्या संस्कारांचा, वाचनाचा, शिक्षणाचा कस लागतो तो याच परीक्षेत.त्यामुळे हे शिकलंच पाहिजे.यशस्वी व्यक्ती,आपले आदर्श हे टीकेला किंवा नकारात्मक वर्तणुकीला कसा प्रतिसाद देतात, याचं खरंच सूक्ष्म निरीक्षण करायला हवं. यासाठी चरित्रे,आत्मचरित्रे वाचता येतील.

आपल्या नकळत आपण अनुकरण करत असतो आपल्या आई वडिलांचे, मोठ्यांचे, समाजाचे.सतत जिंकणारे,शब्दात पकडणारे काही  हुन्नरी कलाकार या क्षेत्रात पहायला मिळतात.यांची स्मरणशक्ती दांडगी असते. शब्दांचे अचूक अर्थ यांना माहीत असतात.नवखे तर गोंधळून जातात यांच्या समोर.हे मात्र जिंकूनसुद्धा आतल्या आत हरलेले असतात. कारण कधीकधी जिंकण्यापेक्षा जे गमावलेले असते तेच मौल्यवान सिद्ध होते.

एकदा एका नवरा बायकोचं भांडण झाले.दोघांनी दोन कागद घेतले आणि एकमेकांचे दोष लिहायचे ठरवले. लिहून झाल्यावर बायकोने दोषांचा कागद वाचून दाखवला.आणि नव-याने तिच्या हातात कागद दिला त्यावर फक्त लिहिलं होतं,

… But I like you.

कधी कधी ‘हारके जितनेवाले बाजीगर’ असतात ते असे.

जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम,

फिर नहीं आते … हेच खरं !

असं म्हणतात की एखादा माणूस गेल्यावर आपण कधी कधी रडतो. ते तो गेला म्हणून नाही तर तो जिवंत असताना आपण त्याच्याशी किती वाईट वागलो, ते आठवून! अशी वेळ येऊच नये यासाठी हा अट्टाहास.

लेखक :श्री. विकास शहा

प्रस्तुती :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares