☆ “निवांत जगणं..” – लेखक : श्री विजय चौधरी ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला असता एका निर्भेळ क्षणी एका खेडूत मुलीने त्यास सहजच प्रश्न विचारला, “भारत जिंकल्यावर तुम्ही काय करणार?” तो म्हणाला,”पुढचे देश जिंकीन आणि मजल दरमजल असं जिंकून मी जगज्जेता होईन.” “मग काय करणार?” हा प्रश्न पुन्हा त्या मुलीने विचारला. यावर तो म्हणाला,”मग काय?निवांतपणे जगेन.” यावर ती मुलगी खुदकन हसत म्हणाली, “मग आतापासूनच का निवांत जगत नाही?”
यातून सिकंदरला काय कळलं माहीत नाही;पण खरंच ही कहाणी बरंच काही सांगून जाते. आपणही असेच जगण्यातला निवांतपणा घालवून धावपळ करतोय, ती पुढे कधीतरी निवांत जगू, या भाबड्या आशेवर.
बऱ्याचदा इतरांना मागे टाकण्याच्या नादात आपल्याला आपलं वळण कधी येऊन गेलं, याचं भानही रहात नाही.
कितीही वेगाने पळालो तरी आपल्यापुढे कोणीतरी असणारच, कोणाजवळ काहीतरी वेगळे असणारच, कोणालातरी जास्त संधी मिळणारच, कोणाचंतरी वलय आपल्यापेक्षा अधिक असणारच, कोणीतरी आपल्याहून सुंदर असणारच हे आपण विसरतो. तेव्हा, लक्ष आपल्या स्वाभाविक ध्येयावर आणि जगण्यावर केंद्रित करावं, आपली गती आपल्या० प्रकृतीला साजेशी ठेवत आनंदाने जगत जावं; अन्यथा मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्यापेक्षा आपण पुढे आहोत, हे सिद्ध करण्याच्या नादात आपण आयुष्याला वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो.म्हणून केवळ एकटं पुढे रहाण्यापेक्षा सवंगड्यांसोबत थोडं मागे राहिलेलं उत्तम नाही का? अन्यथा बऱ्याचदा यामुळे विनाकारण असुरक्षिततेची भावना वाढते, करायच्या राहून गेलेल्या गोष्टी आयुष्यात वैफल्य निर्माण करतात.
यासाठी पहिल्यांदा गरज आणि चैन यात फरक करणं, नितांत गरजेचं आहे. इतर धावतायेत म्हणून आपणही धावणं ठीक नाही. जगणं हे राईसप्लेटसारखं असावं, त्यात कसं साऱ्या पदार्थांना आपापल्या मर्यादेत स्थान असतं आणि त्यामुळेच ते रुचकर ठरतं. जर चटणीची जागा भाजीला दिली, तर ताटाचं संतुलन बिघडतं आणि जेवणाचा गोंधळ उडतो. जगण्याचंही काहीसं असंच आहे. ते सर्वसमावेशक, चौफेर असेल, तर ते सुखकर ठरतं. एखाद्या मोठ्या यशाच्या प्रतिक्षेत रोजच्या जगण्यातील छोटे छोटे आनंदाचे क्षण निसटून जाऊ देऊ नका.ते क्षण तेव्हाचे तेव्हाच जगून घ्या, लुटून घ्या.
आपल्या आवडीच्या व आनंद देणाऱ्या गोष्टींसाठी आयुष्य पडलेय, हे पालुपद आयुष्यच कुरतडून टाकते. त्यामुळे ते क्षण वेचा.
तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे शक्ती असते, पैसा असतो; पण वेळ नसतो आणि उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो पण शक्ती उरत नाही.यातील सुवर्णमध्य गाठून समरसून जगावं.
स्टीव्ह जॉब्स म्हणतात, हरवलेल्या वस्तु गवसतील; पण वेळ नाही. आजारी पडून शस्त्रक्रियेच्या टेबलावर पोचल्यानंतर “निरोगी कसं जगावं” हे पुस्तक वाचुन काय उपयोग ?
एक शायर म्हणतो……
उम्र-ए-दराज
माँगकर लाये थे चार दिन,
दो आरजु में कट गये,
दो इंतजार में
लेखक : श्री विजय चौधरी
प्रस्तुती : सौ.शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रत्येक भाषेत प्रत्येक शब्दाला पर्यायी शब्द उपलब्ध असतातच.ते समानार्थी तरी असतात किंवा त्या शब्दाच्या अर्थछटेशी जवळीक दाखवणारे तरी. मात्र क्वचित कधी वरवर एकाच अर्थाचे वाटणाऱ्या दोन शब्दांमधे ठळकपणे विरोधी सूर उमटत असल्याचे प्रत्ययास येते. ‘अधिक’ आणि ‘अति ‘ हे मराठी भाषेतले असे दोन शब्द! यातील ‘अधिक’ या शब्दात सकारात्मकता ओतप्रत भरलेली तर ‘अति’ हा शब्द थेट नकारात्मकतेकडे झुकणारा!
‘अधिक’म्हणजे जास्त, जादा. हे झाले त्याचे सर्वसाधारण अर्थ. पण त्याच्या वरकड, वरचढ या अर्थांतून वेगळीच छटा दृश्यरूप होते. अतिरिक्त, फार हे दोन्ही अर्थ अपेक्षा आणि वास्तव यातील संख्यात्मक किंवा गुणात्मक प्राबल्य ध्वनित करतात. गैरवाजवी, सव्याज, बहुसंख्य या अर्थांचा रोख वर उल्लेखित अर्थांपेक्षा सर्वस्वी वेगळ्या बाबींकडे जाणवतो.
‘अधिक’ या शब्दाच्या संयोगाने तयार झालेल्या इतर अनेक शब्दांचे अर्थ,रंग,रुप आणि आवाका विचारात घेतला तर एखाद्या शब्दाची व्याप्ती किती थक्क करणारी असू शकते याची प्रचिती नक्कीच येईल.उदाहरणार्थ अर्धेअधिक,निम्मेअधिक, सर्वाधिक, अधिकउणा, अधिकरण, अधिकाधिक, अधिकार,अधिकाराग्रहण यासारखे ‘अधिक’ शब्दाचे बोट धरून आपली स्वतंत्र वाटचाल करणारे कितीतरी शब्द! ‘अधिक’ या शब्दाला अपेक्षित असणारे ‘अधिक्य’ या शब्दांनाही अभिप्रेत आहेच आणि हे अधिक्य हाच या सर्व शब्दांचा ठळक असा गुणविशेष आहे!
‘अधिक’ आणि ‘उणे’ या परस्परविरुद्ध अर्थ असणाऱ्या दोन भिन्न शब्दांची न् आपली पहिली भेट आणि ओळख होते ती एकत्रितपणेच आणि तीही अगदी आपल्या बालवयात.याला निमित्त असतं प्रथमच नव्याने परिचय होणाऱ्या गणित या विषयाचं! तेव्हापासूनच ‘अधिक ‘ आणि ‘उणे’ हे शब्द एरवीही कधी कानावर पडले तरी नजरेसमोर येतात ती गणिताला अभिप्रेत असणारी त्यांची विशिष्ट अशी चिन्हांकित रुपेच.
या दोन्ही शब्दांना अपेक्षित असणारी बेरीज आणि वजाबाकी आयुष्यातही समजून घेतली तर जगणं अधिकच अर्थपूर्ण होईल.जगणं खरंतर सर्वांनाच आनंदी असावं असंच वाटतं खरं,पण त्या आनंदाचं गणित मात्र सांख्यिकी गणितासारखं किचकट होऊन बसतं बऱ्याचदा.योग्यवेळी हितकारक गोष्टींची बेरीज आणि अहितकारक गोष्टींची वजाबाकी करता आली तर किचकट वाटणारं आनंदाचं गणित नकळत सहज सोडवता येईल.ते कसं सोडवायचं हे सांगायला वेळोवेळी आपल्याला सहाय्यभूत होतात त्या अनेक अर्थपूर्ण शब्दांच्या सहाय्याने आकाराला आलेले सार्थ वाक्प्रचार न् म्हणीच!
अगदी ‘अधिक’ या शब्दाच्या संदर्भापुरता विचार केला तरी अशा कितीतरी म्हणी चटकन् आठवतात.’अधिकस्य अधिकं फलं’ असा संदेश देत सत्कर्मांना प्रवृत्त करतानाच त्या ‘अति सर्वत्र वर्जयेत’ अशा उपदेशाबराबरच ‘अति तेथे माती’ असा सावधानतेचा इशाराही देतात.त्या सगळ्याच जगण्याची दिशा दाखवणाऱ्या म्हणींना अभिप्रेत असणारं जगणं समजून घेतलं तरच आयुष्यातलं आनंदाचं गणित किचकट न वाटता सहजपणे सुटणं अधिकच सुलभ होईल एवढं खरं!!
☆ “आरती चैतन्य विनायकाची…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
अवयवदानाचा प्रणेता गणपती बाप्पा याला मी ‘चैतन्य विनायक‘ म्हणतो.
ज्यांच्या आयुष्यातील चैतन्य हरवून गेलं आहे, अशांचे जीवन पुन्हा चैतन्यदायी करण्याची किमया अवयवदानामध्ये आहे. जगातील प्रत्यक्ष असेल-नसेल पण किमान कल्पनेतील, पहिल्या अवयव प्रत्यारोपणाचे उदाहरण म्हणून आपण या देवाकडे पाहतो आणि पाहूया. म्हणूनच या चैतन्य विनायकाची मी रचलेली आरती या गणेशोत्सवात आपण सर्वांच्या तोंडी यावी यादृष्टीने प्रयत्न करूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी याला योग्य ती चाल देऊन चालीवर म्हणावी आणि त्याची ऑडिओ व्हिडिओ क्लिप आपल्या ग्रुप वर टाकावी अथवा मला पाठवावी. या अवयवदानाच्या चळवळीला एक नवं अधिष्ठान प्राप्त करून देऊ या आणि या गणेशोत्सवात मोठा जनजागर घडवूया.
एकदा एक कुटुंब त्यांच्या चारचाकी गाडीतून फिरायला चालले होते, वडील गाडी चालवत होते. जाताना त्यांच्या गाडीला २-३ गाड्या ओव्हरटेक करून पुढे गेल्या. ते बघून मुलगा वडिलांना म्हणाला, “बाबा, स्पीड वाढवा ना !” म्हणून बाबांनी स्पीड वाढवला व पुढील १-२ गाड्यांना ओव्हरटेक केले.
पुन्हा एका गाडीने त्यांच्या गाडीला ओव्हरटेक केले व पुढे निघून गेली म्हणुन त्या मुलाने पुन्हा भुणभुण सुरु केली, “बाबा स्पीड वाढवा ना”. म्हणुन बाबांनी पुन्हा थोडासा स्पीड वाढवला. थोड्याच वेळात अजून १-२ गाड्यांनी त्यांना ओव्हरटेक केले. म्हणून पुन्हा तो मुलगा म्हणाला की “बाबा, स्पीड अजून वाढवा ना.”
तेव्हा ते बाबा त्या मुलाकडे बघून हसले व म्हणाले, “बाळा ! आपल्या गाडीच्या मानाने आता आपला स्पीड खूपच जास्त आहे. ज्या गाड्या आपल्याला ओव्हरटेक करून जात आहेत, त्या जास्त ताकदीच्या आहेत. त्यांची बरोबरी करायला आपण गेलो, तर आपल्या गाडीचे नुकसान होईल. त्यापेक्षा ज्या गाड्यांना आपण मागे टाकले आहे, त्यांच्याकडे बघ आणि समाधान मान रे.”
यावर तो मुलगा म्हणाला.
“बाबा, हे समीकरण तुम्हाला गाडीच्या बाबतीत कळतंय. मग माझ्या अभ्यासाच्या बाबतीत का नाही कळत ?”
खरोखर अंतर्मुख करणारी ही गोष्ट आहे.
आज प्रत्येक पालक आपल्या पाल्याला “Rat Race” मध्ये पळवतोय, पण त्याची बौद्धिक व शारीरिक ताकद याचा अंदाज घ्या व मगच त्याने किती गती ठेवावी हे प्रामाणिकपणे ठरवा. मग तो अभ्यास असो वा Extracurricular Activities असोत.
थोडा स्पीड वाढवायला काहीच हरकत नाही पण दमछाक होईपर्यंत नका पळवू पाल्याला. बिचारा अर्धाच पल्ला गाठून थकून जाईल !
प्रस्तुती : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ अस्तासी गेला चंद्र काचेचा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… ‘थांब थांब!… असा करू नकोस अविचार… अधीर मनात उलट सुलट विचारांचे माजलेले तांडव घेऊन,.. मोडल्या शपथा, भाका, आणांचे पोकळ शाब्दिक वासे हाती धरून… ओल्या वाळूवरची कोरलेली आपली जन्माक्षरे पुसली जाताना बघून… आपणच बांधलेल्या किल्लाला ध्वस्त झालेला पाहून… चिडून दाणदाण पाय आपटत याचा अर्थ काय?,असा जाब त्या चंद्राला विचारायला निघालीस!… का तो आता हाताच्या अंतरावर आला आहे म्हणून?…तुझ्या प्रीतीचा एकमेव साक्षीदार होता म्हणून!.. त्यालाच विचारणार अशी का प्रीती दुभंगली जी अक्षर आणि अमर अशी महती असताना तिची! . मग माझ्या वाटय़ाला हे आलचं कसं.?.. माझं ऐकतेस का थोडं!.. शांत हो शांत हो!..बेचैन मन स्थिर कर… अवघड असतं सुरूवातीला पण प्रयत्न केलास तर सवयीने हळूहळू स्थिरावतयं … मग कर आपुलाच संवादु आपुल्याच मनाशी..तुझ्या एकेक प्रश्नांची भेट घडेल तुझ्याच मनात दडलेल्या उत्तराशी… अविवेकाने करून घेतला असतास सर्वनाश जीवनाचा.. समोर दिसतयं ते क्षितिज त्याला तरी कुठं ठाऊक आहे का पत्ता अंताचा!.. तू जितके चालत निघालीस तसा तसा पावला पावलाने मागे मागे सरकत निघालेय.. गवसले का ते कधी तुला!.. मनाच्या संभ्रमावस्था तुला कधीच नव्हत्या त्या कळणाऱ्या ,पण नाहक जन्मभर होत्या छळणाऱ्या…गोडगुलाबी रंगाची उधळण भिडली आकाशात.. निळया स्वप्नांचे पक्षी पंख पसरून बसलेत गगनात.. किरमीजी छटेचा काळोख नैराश्याची झालर लावतोय आकाशी मंडपात… अर्थाचे बुडबुडे तरंगले भ्रामक शब्दांच्या वायूतून… विराणीचे उसासे झंकारले तुटल्या तारातून…अन तो उदास चंद्र बापुडा पाहतो तुज कडे मान वाकडी करुन… ‘
‘अगं वेडे तो तुला सांगतोय…कालपर्यंत मी सगळ्यांच्या गुजगोष्टी बघता बघता साठवत गेलो.. रुपेरी,चंदेरी लखलखत्या कोंदणी…माझ्या कडून कोणी हिरावून घेणार नाही हा दिला होता विश्र्वास.. कारण मी तेव्हा खूप खुप दूर होतो.. पण काल चांद्रयान ते मजवर उतरले आणि मधले अंतरच नाही उरले गं… वाटेवरच्या बागेत जावे तसे आता येथेही वर्दळ वाढली ,अन जो तो उदर माझे फोडू लागला कुतूहलापोटी.. गुपितं लपविण्याचा खटाटोप व्यर्थ ठरला..माझा चंद्राचा बाजारभावच घसरला… म्हणून आलो सांगायला.. सख्यांनो आता मला वगळा नि तुम्ही दुसरा चंद्र शोधा.. झालंगेल़ विसरून जाऊया तोच चंद्रमा नभीचा हवा हट्ट सोडून द्या…तो एक दूर दूर काचेचा चंद्र होता, हाती येता खळकन फुटूनी गेला… अस्तासी गेला चंद्र काचेचा… ‘
केस मोकळे सोडलेले,कपाळावर ठसठशीत कुंकू,डोईच्या मधोमध पाडलेल्या भांगामध्ये कुंकवाची जाडसर रेघ,गळ्यात लांब मंगळसूत्र…अशी ती,बहुदा नवविवाहिता,अनवाणी पायांनी लोकल रेल्वेगाडीच्या पुढ्यात उभी होती. मोटरमनने शक्य होईल तितक्या जोराने हॉर्न वाजवला तेंव्हा ती पटकन बाजूला झाली….आणि गाडी आणखी पुढे सरकताच पुन्हा गाडी समोर आली. यावेळी मात्र ती दोन्ही रूळांच्या मधोमध पालथी पडली…मान एका रूळावर ठेवून. ‘हे भगवान! मध्यम वयाचा तो मोटरमन उदगारला…त्याची इच्छा असूनही गाडी थांबू शकणार नव्हती! गाडी तिला स्पर्श करणार त्या अगदी शेवटच्या क्षणाला तिने चटकन आपली मान बाजूला घेतली! पण तिचं शरीर तर दोन्ही रूळांच्या मधोमध होतंच….मोटरमनने एक क्षणासाठी डोळे बहुदा मिटून घेतले असावेत. खाडकन आवाज झाला…रेल्वेचा एक डबा तिला ओलांडून पुढे गेला होता…मोटरमनने पटकन गाडीमधून खाली उडी मारली. ती गाडीखाली निपचित पडलेली. तो पुन्हा गाडीत चढला आणि गाडी मागे घेतली. तिच्या किंकाळ्यांनी ऐकणा-यांची मनं बधीर झाली होती! उजव्या हाताची चार बोटं जागेवर नव्हती आणि डोक्याला डाव्या बाजूला मोठी खोल जखम! तिला दवाखान्यात न्यायला किमान वीस मिनिटे लागणार होती….ती वाचण्याची शक्यता नव्हती आणि तिच्या डोळ्यांतली जगण्याची आशा केविलवाण्या नजरेने सभोवार पहात होती…….का नाही बघणार? कुणाला मरायचं असतं?
तो कितीतरी वेळ त्या उंच पुलाच्या अलीकडे असलेल्या दिव्याच्या खांबाखाली बसून राहिला. पुलाखाली खोल समुद्र शांतपणे वा-यावर डुलत होता. येणारे-जाणारे आपापल्या येण्या-जाण्यात मश्गूल होते. तो तिथून उठणार इतक्यात तिथून जाणारी एक महिला त्याच्याजवळ थांबली. तिला तिच्या लहानग्या मुलीसोबत त्या पुलाच्या आणि समुद्राच्या पार्श्वभूमीवर एक छानसा फोटो काढून हवा होता. त्याने मोठ्या आनंदाने त्या मायलेकींचे फोटो काढून दिले. ती महिला आणि ती लहान मुलगी त्याला हसून टाटा करीत तेथून निघून गेले. कुणीतरी थोड्यावेळासाठी का होईना,खोटं खोटं का होईना छान बोललं, याचं समाधान त्याला मिळालं. पण पुन्हा त्याचं मन त्याच्या खाजगी आयुष्यात डोकावलं आणि तो पुलाकडे निघाला. कितीतरी वेळ त्या पुलाच्या कठड्यावर खोल समुद्राकडे पाय सोडून बसून राहिला….आणि एका क्षणी त्याने स्वत:ला खाली झोकून दिले! खाली पाण्यापर्यंत त्याचं शरीर पोहोचायला काही सेकंद तर लागणारच…ते पाच-सहा सेकंद त्याला युगासारखे भासले…आपण चूक करतो आहोत…नव्हे केलीच आहे याची त्याला जाणीव झाली! आता फार उशीर तर झाला नाही ना….हा विचार करायला? कुणीतरी आपल्याला वाचवायला हवं! आता त्याला मरायचं नव्हतं! कुणाला असं मरायचं असतं?
तिला जणू आता काहीही जाणवत नव्हतं…वेदनेच्या संवेदना मेंदूकडे वाहून नेणा-या नसा काळवंडून गेल्या होत्या…स्वत:चाच चेहरा आरशामध्ये बघण्याची सोय नव्हती राहिली….आणि दुसरं कुणीही या तिच्या चेह-याकडे पाहण्याची हिंमत दाखवत नव्हतं! त्यांना माहित होतं की आगीच्या धगीनं हिच्या शरीरातली धुगधुगी जवळ जवळ विझवत आणलेली आहे…फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे…हीची सुटका होईल आणि आपलीही! तिने तिच्या आयुष्यात असं कुणाला तरी मरताना पाहिलं होतं…पण तिला नाही मरायचं असं..आणि इतक्यात. कुणाला असं मरायचं असतं?
आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं ही तर समस्त प्राणी जगताची अंत:स्थ प्रेरणा. मग का कुणी असं या स्वत:च्या अस्तित्वच्या जीवावर उठतं? एरव्ही आपल्याला वेदना होतील,आपला जीव जाईल म्हणून स्वत:ला पदोपदी जपणारं माणूस,अगदी एवढ्याशा काट्यच्या एवढ्याशा टोकालाही बिचकणारा माणूस असा एकदम स्वत:ला त्या अंध:कारात का बरं झोकून देत असेल…काही समजत नाही!
दुस-या कुणीतरी आपल्याला जन्माला घातलं आहे…त्यामुळे दिला गेलेला जन्म आपला आपण मरणात परावर्तीत करण्याचा अधिकार आपल्याला नाही…असा विचार शहाणी माणसं करतात आणि प्राक्तन भोगत जीवनाच्या वाटेवर रक्ताळलेल्या पावलांनी चालत राहतात. त्यांना ठाऊक असतं की या वाटेवर कुठे न कुठे तरी एखादं सावलीचं झाड असतंच,त्याच्या खाली चार-दोन मखमली फुलं पडलेली असतात. इथं क्षणभर विश्रांती घेता येईल की. कुठंतरी एखादा झरा आढळेल आणि जन्माची तृष्णा निववता येईल. अगदीच आणि काहीही सुख नाही असं आयुष्य असूच शकत नाही मूळी. श्वास घेणं काय कमी सुखावह आहे? पाण्याखाली मिनिटभर डोकं बुडवून पाहिल्यावर कळतं की श्वासांमधलं सुख!
एखाद्या जागी पोहोचण्याचे दोन मार्ग असतात…लांबचा मार्ग अवघड पण सुरक्षित. जवळचा मार्ग त्याचं हशील वसूल करून घेतो वाटसरूंकडून. याच जवळच्या मार्गावरून काहीजण जाण्याचा प्रयत्न करतात आणि अकाली मरणाच्या वाटमारांना बळी पडतात!
समस्त जगताच्या कल्याणासाठी प्राणार्पण करणारे दधिची मान्य आणि पुज्य! पण संघर्षाला पाठ दाखवून पळणारे कोणत्याही दयेस पात्र नाहीत. किमान त्या दुस-या दुनियेत तर नाहीतच नाहीत. अर्थात हा विचार धर्मपरत्वे बदलत जात असावाही. पण कुठंही गेलं तरी आगंतुकपणे जाणे स्वत:ला अपमानास्पद तर आहेच पण जिथं जातो आहोत त्यांनाही संकोचून टाकणारं!
राग,चिंता,निराशा,वैफल्य,मान-सन्मानाच्या,अपमानाच्या बेगडी कल्पना इत्यादी शेकडो कारणांनी माणसं आपल्याच हातांनी जेंव्हा आपली जीवनपुष्पे कुस्करून टाकतात तेंव्हा ती मागे राहिलेल्यांसाठी दुर्गंधीच सोडून जातात… वेदनांची! मृत्यूनंतर काय? हा प्रश्न कदाचित जगन्नियंत्यास कायम अनुत्तरीत रहावा, असं वाटत असावं असं वाटतं…कारण आजवर त्याचं विश्वासर्ह उत्तर नाही गवसलेलं! किंवा मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या लोकोक्तीनुसार प्रत्यक्ष अनुभवता न येणारं हे उत्तर असल्यानं…ते अविश्वसनीय वाटणंही साहजिकच आणि क्षम्यही! पण जाणारा कदाचित सुटून गेला असं वाटत असलं तरी त्याच्या मागे राहणारे आयुष्यभर पितामह भिष्मा सारखे बाणांच्या शय्येवर निजत असतात….हे मात्र अनुभवास येऊ शकते!
एखाद्याला आपल्यातून उठून जावंसं वाटतं याचाच अर्थ आपलं त्याच्याकडे पुरेसे लक्ष नव्हतं. त्याचं ऐकून घेण्याची तसदी आपण नाही घेऊ शकलो..उलट त्यालाच ऐकवत राहिलो आपण..आपलंच रडगाणं!
मग त्यांनाही वाटूच शकतं ना…आपण गेल्यावर यांनाच त्रास होईल,मग कळेल यांना आपली किंमत!
दरवर्षी असं जगातल्या सात लाख लोकांना वाटतं! १० स्पटेंबर हा दिवस अशाच माणसांसाठी आहे. आपल्या प्रेमाच्या माणसांच्या सतत आगेमागे रहा..त्यांना उपद्रव होणार नाही अशा बेतानं. देवानं आपल्याला दोन कान दिलेत…एक हृदय दिलंय…दोन डोळे दिलेत…ऐकायला,विचार करायला आणि बघायला. एक मेंदू दिलाय अंदाज घ्यायला…धोके ओळखायला. आपल्या लोकांना याचा लाभ द्यायला आपण मागे राहून चालणार नाही!
कुणालाही मरायचं नसतं…स्वत:चं स्वत: तर कधीच मरायचं नसतं…म्हणूनच मरू पाहणारी शेवटच्या क्षणी जगू पाहतात! चला, या जागतिक आत्महत्या विरोधी दिनाच्या निमित्ताने आपल्या माणसांशी संवाद साधायला आरंभ करूयात! ज्यांच्याशी आपण रक्ताने,नात्याने आणि समाजाने बांधले गेलो आहोत..ती सर्व आपलीच माणसे आहेत. कुणालाही एकटं पडू देता कामा नये!
कुणाला जगण्यानं छळलं असलं तरी मरणानं सुटका करेपर्यंत थांबण्याचं धैर्य त्याच्यात निर्माण करणं म्हणजे आपण त्याचं हितचिंतक असणं! शतदा नव्हे तर अगणितदा प्रेम करावं, असा जन्म लाभलेले आपण….प्रेम करीत रहावे…बोलावणे येईपर्यंत!
(दहा सप्टेंबर…जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन. यानिमित्त सुचलेलं. यातील पहिला प्रसंग नजरेसमोर घडलेला पंचवीस वर्षांपूर्वी घडलेला…अजून जसाच्या तसा नजरेसमोर तरळणारा. यातून सकारात्मक विचार प्रसारीत व्हावेत, अशी भाबडी आशा मनात ठेवून केलेला अभिनिवेशविरहीत शब्दप्रपंच. संभाजी बबन गायके. ९८८१२९८२६०)
आपले दु:ख, तेवढ्या मोठ्या मात्रेचे नसतांना अचानक कुणीतरी मोठ्या मात्रेने सांत्वन करायला पुढे आले की, थोडे गोंधळायला होते. हे सात्वंन झिडकारावे की त्यामागचा आपलेपणा पाहून नम्रपणे स्वीकारावे ? अशा संभ्रमात पडायला होते खरे… बागेतल्या पिंपळाला असेच काहीसे त्यादिवशी झाले.
बागेतले आंब्याचे झाड त्याला सांगत होते, “बघवत नाही रे तुला पिंपळा.. शिशिर ऋतूने तुला अगदीच पर्णहीन, निस्तेज करून टाकलय. पण धीर धर. काही दिवसाच वसंत सुरू होईल आणि येईल पुन्हा पालवी…. होईल पुन्हा पूर्वीसारख रूप … होशील माझ्यासारखा…”
शिशिरात पर्णहीन अवस्थेत नीरव शांततेतली आनंददायी ध्यानावस्था अनुभवणाऱ्या पिंपळाला यावर काय बोलावे, हे क्षणभर समजेना. अनेकदा दुसऱ्याचे सांत्वन करतांना त्याचा दुःखभार हलका करण्याच्या हेतुपेक्षा, आपण खूप सुखात आहोत याचा काकणभर का होईना अभिमान दाखविण्याचा हेतू सांत्वन करणाऱ्याच्या मुखावर झळकत असतो. पण हा हेतू दिसला तरी त्यावेळी तसे बोलता येत नाही, याची समज आणि उमज पिंपळाला होती.
मंद स्मित करून पिंपळ आब्यांला म्हणाला, “तुझ्या प्रेमळ शब्दांसाठी खूप आभार. पण एक सांगू.. मी अजिबात दु:खात नाही. सृष्टीने सहाही ऋतूत आपले प्रारब्ध आधीच लिहून ठेवले आहे. कोणत्या झाडाने केव्हा फुलावे, बहरावे, कोमेजावे सगळे सगळे. आपल्या हातात फक्त मूळं आहेत आणि त्यांच्या व्दारे जमिनीतून जीवनरस घेणे आहे.हे एकदा उमगले की दुःखाचा लवलेश नाही”
“आपली मूळं आत सारखीच आहेत. फरक दिसतो, तो फक्त बाहेर.. जमिनीवर… पाने, फळे, फुले, खोड, उंची यात फक्त फरक. विविधता आणि सौंदयासाठी केलेला… हे एकदा कळलं की, आहे त्यात आनंद.
सुखदुःखापलीकडील समाधानाचा, आनंदाचा अनुभव. आपल्या बाहयरूपातल्या बदलांकडे पहाण्याची एक वेगळीच दृष्टी येते… एक समाधानी अवस्था येते. जिथे कुणाशीही तुलना नाही, तक्रार नाही. ठेविले अनंते तैसेचि रहावे। चित्ती असो द्यावे समाधान।”
पिंपळाच्या या बोलण्याने आंब्याचे समाधान झाले नाही. त्याने पिंपळाला विचारले, “खरे खरे सांग! पर्णहीन झाल्याने तुझं रूप कुरूप झालय, पक्षी येईनासे झालेत, पानांची सळसळ नाही… याचे खरेच तुला दुःख नाही?”
धीरगंभीर आवाजात पिंपळ उत्तरला, ” नाही. अजिबात नाही. बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टींशी आपल्या सुखाला जोडून घ्यायचं आणि त्या गोष्टी बदलल्या की दुःखी व्हायचं, ही माणूसं करीत असलेली चूक आपण का करायची! माझं सद्भाग्य की, तथागताचा सहवास मला लाभला आणि पानं, फुलं, फळ
यापलीकडे जाऊन कायम मूळाकडेच पाहण्याची खोड मला जागली. ‘घट्ट मूळ’ आणि ही ‘खोड’ असली की आनंदाला बाधा नाही. बाह्य बदलांकडे पाहण्याची दुष्टीच बदलून जाते”
“‘तू म्हणतोस पाने नाहीत त्याचं दुःख. पण खरं सांगू शिशिर ऋतू माझा ५-६ हजार पानांचा भार हलका करतो. ते २-३ महिने खुप हलकं हलकं वाटत! तू हे सुख नाही अनुभवू शकत.. पानांचा भार नाही.
सळसळ नाही, पक्षांचे आवाज नाही. त्यामुळे ध्यान समाधीही दीर्घकाळ लावता येते. अधिक मूळाकडे जाऊन चैतन्याचा स्रोत देहभर भरून घेता येतो. वसंताला सामोरे जाण्याची ही पूर्व तयारी असते. म्हणूनच वसंत आला रे आला की अवघ्या सात दिवसात माझ्या देहभर पालवी फुललेली दिसते “
आंब्याला हळूहळू पिंपळाचे विचार पटत होते. पिंपळ पुढे बोलू लागला.” कुणाला आपण किती प्रिय आहोत, यावर आपण आपली प्रियता ठरवू नये. तुझाही मोहोर कधी जळतो.. कधी गळतो.. फळं नाही येत तेवढी… लोकं नाराज होतात.. फळांच्या अपेक्षेने प्रियता, जवळीकता असली की ती कधीतरी लोप पावते. पण फळाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष प्रेम केलं की प्रियता कायम रहाते. अशा निरपेक्ष प्रेम करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या प्रेमाची आठवण म्हणून त्यांच्या वहीत, पुस्तकात पिंपळपान कायमचं ठेवतात. शिशिरात देहावरची पाने गळाली तरी ती वह्या-पुस्तकातील पाने तशीच असतात. त्यांना बघून मी धन्य होत असतो.”
आपल्या फळाला बाजारात मोठा भाव / प्रसिध्दी आहे, अशा समजूतीत असणाऱ्या आंब्याला पिंपळ आपल्याहून जाणीवेने, विचाराने खूप मोठा आहे, हे एव्हाना जाणवले होते. पिंपळाप्रती आदरभाव, कौतुक व्यक्त करावं म्हणून आंबा पिंपळाकडे वळला तर काय? पिंपळ डोळे मिटून ध्यानस्थ झाला होता. पर्णहीन पिंपळाचं झाड आंब्याला त्याच्याहून सुंदर दिसलं..समाधानी जाणवलं…आणि मूळाकडे जायची खोड लावून घेण्याचा निश्चय त्याने मनोमन केला.
पूर्वीच्या गावगाड्यातील प्रत्येक घरा-घरात आढळणारा हा औषधी गुणधर्म असलेला बिब्बा घरातील गाडग्या-मडक्यात हमखास पहायला मिळत असे. आज्जीबाईच्या बटव्यात तर याला मानाचे स्थान होते. असा हा बिब्बा अलीकडच्या काळात बऱ्याच जणांच्या खिजगणतीतही नसावा. याचे आश्चर्य वाटते.
कोकण पट्ट्यातील डोंगररांगा आणि मला माहित असलेल्या सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डोंगर तसेच कराड तालुक्यातील दक्षिण भागातील डोंगररांगा आणि इतर पडीक मोकळ्या रानात या बिब्ब्याची झाडे पहावयास मिळतात.
जंगल संपत्ती असल्याने आदिवासी किंवा स्थानिक लोकांना बिबव्याची फळे चार पैश्याचा आधार देऊन जातात. साधारण बिबव्याच्या झाडाची फळे ही दिवाळीच्या वेळेला पिकायला सुरुवात होते. काजूसारखी येणारी पिवळसर केशरी बोंडे असलेल्या फळाचे काळसर बिब्बे काढून त्या फळाच्या माळा तयार करून ते खुंटीला वाळवण्यासाठी अडकवून ठेवतात. मग अश्या वाळलेल्या फळांच्या माळा जवळपासच्या आठवडी बाजारात किंवा शहरात विकावयास येतात. चवीला तुरट आणि रुचकर असणारे हे फळ पिष्ठमय असते. कच्चे पिवळसर फळ खाल्ले तर घश्यात खवखव सुरू होते. त्यामुळे पिकल्यानंतरच खाणे योग्य होते.
माझा आणि या बिब्ब्याचा खूप जवळचा संबंध आहे. पूर्वी दिवस उगवायला डोक्यावर पाट्या घेऊन गळयात धोतर किंवा लुगड्याचा धडपा बांधून त्यात झोपलेल्या तान्हया बाळाला पाठीवर टाकून सुया-पोती विकणाऱ्या नऊवारी लुगड्याला ‘दंड’ घालून कासुटा घातलेल्या कोकणी बायका, ” ये काकू ? ये मावश्ये ? ” अश्या मोठमोठ्याने हळ्या मारत वेशीतून वाड्या-वस्त्यांवर प्रवेश करायच्या, तेव्हा प्रथम त्यांचे स्वागत हे पाळीव कुत्री करायची. मग त्या बायकांच्या हळ्या आणि कुत्र्याच्या भुंकण्याचा कालवा ऐकून सगळ्या आळीची पोरं-पोरी जागी व्हायची, आणि डोळे चोळतच कालव्याच्या दिशेने पळत सुटायची. ” ओ, आमच्या आयनं बोलावलंय? ओ आमच्या आळीला चला? ओ आमच्या अंगणात बसा? ओ आमच्या सोप्यात बसा? ” म्हणून त्या बायकांच्या विनवण्या करत असायची. त्या बायकांच्या टोपलीत सुई, दाबन, तोडे, वाळे, मनगट्या, लबरी कडे, वगैरे वगैरे साहित्याबरोबरच या बिब्याचा ही मुख्यता समावेश असायचा.
तर अश्या या कोकणी बायकाकडून आपल्याला लागणाऱ्या वस्तू घेतल्याकी त्यात चार-पाच बिब्यांचा ही समावेश असायचा. मग त्या बायकांना कालवण असेल तर कालवण नसेल तर चटणी भाकरी देऊन पाठवले जाई. असे ही बिब्बे शेतकऱ्यांना कधी आणि केव्हा लागतील याचा नेम नसायचा. म्हणून ते बिब्बे करंड्यात, बारक्या गाडग्यात किंवा घराबाहेर असणारया भिंतीच्या देवळीत सुरक्षित ठेवले जात. याचे ही कारण असे की लहान मुलांच्या हाती हा बिब्बा चुकून लागू नये. कारण चुकून बिब्बा लहान मुलाने तोंडात घातला तर बिब्ब्याच्या तेलाने त्या मुलाचे तोंड उतू जाते. त्यालाच ‘बिब्बा उतला’ असे म्हटले जायचे.
असा हा बिब्बा पूर्वी खूप उपयोगी होता. जनावरांना एखाद्याची नजर लागू नये . तसेच जनावराला ‘बाहेरवाश्याचे’ होऊ नये म्हणून, बैलांच्या गळ्यातील कंडयात तसेच गाई, म्हैस, शेळी व्यायला झाली म्हणजे तिच्या गळ्यातील कंडयात हा बिब्बा मानाने विराजमान व्हायचा.
पूर्वी आजच्या सारख्या प्रत्येकाच्या पायात चपला नसायच्या. घरातील कर्ती माणसं सोडली तर बाकीच्या सदस्यांना चपला ह्या दुर्मिळच असायच्या. एकतर लोकांना रानामाळात, काट्याकुटयात अनवाणी पायाने भटकावे लागत. अशावेळी नजर चुकीने एखाद्याचा बाभळीच्या फांदीवर पाय पडून पायात काटा मोडला तर ती व्यक्ती दिडपायावर चालायची. जवळ कोणी बाई माणूस असेल तर तिच्या हातातील बांगड्यामध्ये असणारी पिन घेऊन किंवा बाभळी, बोरीच्या काट्यानेच काटा टोकरुन काढला जायचा. परंतु एखादा काटा खोलवर घुसून मोडला असेल तर तो या वरील उपचारांना दाद द्यायचा नाही. मग टोकरलेल्या जागेवर रुईचा चीक लावून संध्याकाळ व्हायची वाट पहावी लागे.
दिवस मावळताना घरी जाऊन हातातले काम बाजूला टाकून तो काटा सुईच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न केला जाई. किंवा एखाद्या जाणकार वयक्तीकडून तो काटा काढला जाई. मग काटा काढलेल्या जागी बिब्बा घेऊन त्याला वाकळेच्या सुईने किंवा दाबनाने टोकरून त्यात दाबन खुपसून ते पेटत्या दिव्यावर धरले जाई. जोपर्यंत बिब्ब्यातून चरचर असा आवाज घरत तेल गळत नाही, तोवर बिब्बा त्या दिव्याच्या ज्योतीवर धरला जाई. एकदा का बिब्ब्यातून गरम गरम तेल गळायला लागले की लगेच तो बिब्बा काटा काढलेल्या जागी पटकन दाबून धरला जाई. यालाच चरका किंवा चटका देने म्हणतात. चरका दिल्याबरोबर पायात काटा मोडलेली वयक्ती “आयो” म्हणून जी बॉंब ठोकायची, ती सगळ्या आळीला त्याचा पत्ता लागायचा. एवढी कळ बिब्ब्याचा चटका दिल्यावर त्या वयक्तीला सोसावी लागायची…! चटका दिल्यावर त्या ठिकाणी पाणी किंवा ‘पु’ होत नसे. पण एक व्हायचे एकदा का असा चरका दिला की दिड पायावर चालणारी वयक्ती सकाळी उठून दोन पायावर चालू लागे…! आणि आपले रोजचे काम त्याच जोमाने करे…!
पावसाळ्यात पायाला चिखल्या पडल्या, भेगा पडल्या, सांधे दुखणे, अर्ध शिशी यावर बिब्बा घालणे हा जालीम उपाय होता.
ते सुगीचे दिवस होते. खळ्यात मळणीचे काम चालू होते. कडक उन्हामुळे का आणखी काही कारणाने माझ्या आज्जीचे डोके खूप दुखत होते. ते काही केल्या राहत नवहते. आम्ही त्यावेळी खळ्यावर काम करत होतो, तश्या ही परिस्थितीमध्ये आज्जी डोक्याला धडपा बांधून काम करत होती. एकदाचा सूर्य मावळला.धारा-पाणी करून आम्ही घरी आलो. घरी आल्या-आल्या मी आज्जीची चुलत जाऊ जिजीला बोलवून आणले. जिजी ‘बिब्बा घालण्यात पटाईत’ होती. आज्जीचे तिला सविस्तर सांगितले. मग मी डब्यातला बिब्बा अन दाबन काढून जिजीला दिले. आज्जी दुखण्याने कण्हत होती. मग चुलीत दाबनाचे टोक गरम करून जिजीने आज्जीच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आणि भुवयांच्या कडेला डोळ्याच्यावर तीन- तीन कडक चटके दिले. आज्जींने ती कळ कशी सोसली हे तिलाच माहीत.पण त्या चटक्याची कळ आज्जीपेक्षा मलाच जास्त बसली. मला घामच फुटला होता. मग त्यावर जिजीने चुलीतली राख घेतली आणि डोळ्यात जाणार नाही अश्या रीतीने जळलेल्या भागावर ती पसरली. आणि वरून फुंकर मारली….! काही दिवसातच आज्जी डोकेदुखीतुन बरी झाली.
असंच एकदा आमच्या पिराच्या पट्टीच्या बंधावरची बाभळ धनगरांनी ‘सवाळली’ होती. मी शहाणपणा करून त्या काट्याच्या फेसात विटी-दांडू काढायला गेलो. सोबत माझा मित्र संभा नलवडे ही होता. एक लाकूड हेरुन आम्ही लाकडाला हात घातला. आणि बाहेर ओढताना माझा हात निसटून मी मागे चार पावले फेकलो जाऊन काट्याच्या फांजरीत पडलो. माझ्या टाचेत कचकन काटा मोडला. “आज्जे” म्हणून मी मोठयाने किंचाळलो. संभाला काहीच कळेना. मी त्याला पायात मोडलेला काटा दाखवला. मग लगेच संभाने माझा पाय त्याच्या गुडघ्यावर धरून काटा मोडलेल्या ठिकाणी थुंकी लावून टाच स्वच्छ केली. आणि मला कानात बोटे घालायला लावून तो काट्याने काटा काढू लागला. बऱ्याच वेळाने त्याने काटा काढण्यात यश आले. मग आम्ही विठी-दांडू घेऊन घरी आलो. आज्जी-बाबांना न सांगताच आम्ही काटा लागलेल्या जागी चरका दिला. पण आमच्याकडून एक चूक झाली. चरका दिल्या जागी आम्ही चुलीतल्या राखे ऐवजी मातीचा फुफाटा लावला. आणि देवळाकडे खेळायला पळालो…!
मी सकाळी दात घासत नसे. अंघोळ ही करत नसे. मग नेहमीप्रमाणे उठलो. सकाळची सर्व कामे आटोपली, आणि चहा प्यायला घरी आलो. कसेतरी तोंड धुतले, आणि पायावर पाणी घेऊन पाय धुऊ लागलो. तर माझ्या पायाच्या डाव्या गोळ्याला अंड्याच्या आकाराचा फोड आलेला होता, त्यात माझे बोट घुसले. मी जोरात बॉंबलो. त्याबरोबर आज्जी बाहेर अंगणात आली अन, “काय झालं ? “म्हणून मला ओरडायला लागली. मग घडलेली सारी कहाणी तिला सांगितली. मग तर तिने मला, “किरड्या, मुडद्या…!”, म्हणून शिव्याचा भडिमारच केला…! त्याचे झाले होते असे. आज्जी मारील म्हणून आम्ही घराऐवजी गुरांच्या गोठ्यातच चरका देण्याचे काम केले होते. त्यावर मातीच्या फुफाट्याऐवजी राख टाकायला हवी होती. कारण राख मऊ असलयाने ती ओलसरपणा लगेच खेचून घेते. आणि नेमकी तीच चूक आमच्या हातून झाली होती. रात्री जेवायला बसल्यावर माझ्या टाचेवर डाव्या पायाच्या गोळ्याचा भार पडल्यामुळे बिब्ब्याचे तेल गोळयाला लागल्यामुळे तेथे बिब्बा उतला होता. त्याचा डाग आज हि माझ्या डाव्या पायाच्या गोळ्याला आहे.
बिब्ब्याचा आणखी एक काम मला माहित आहे, ते म्हणजे मी लहान असताना आज्जीने औंधच्या बाजारातुन कोंबड्याची अंडी ठेवण्यासाठी एक कळकाची करंडी विकत आणली होती. मग तिने एका जर्मनच्या तोंडफाटक्या गडूमध्ये दहा-,बारा बिब्बे दाबनाने दुःखवून टाकले. तो गडू जाळावर धरून ते चांगले रटारटा शिजविले. त्यातील बिब्ब्याचे सर्व तेल काढले आणि ते त्या नव्या कळकाच्या सर्व कांब्यांना आतून बाहेरून लावले. काय विशेष असेल ते असेल आज्जीलाच माहीत. पण ती करंडी आज ही आमच्या गणेशवाडीच्या घरी सुस्थितीत आहे.
लेखक : आनंदराव रामचंद्र पवार(औंध)
जैतापूर – सातारा – मो.नं.9881791877
संग्राहक : श्री आशिष बिवलकर
बदलापूर – मो 9518942105
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तहानलेल्या माणसाची कथा ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
तो वाळवंटात चुकला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं,त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं, तर आपलं मरण निश्चित आहे, हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूरदूरपर्यंत जेवढी नजर जाईल, तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. ..हा भास तर नाही?
नाहीतर मृगजळ असेल.
पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल, असा विचार करत पाय ओढत स्वतःचं थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता. झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला.
आणि समोरचं दृष्य पाहून तो थबकलाच.
माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं, जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलं नाही. नुसताच पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली .तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.
त्यावर लिहिले होते, “हे पाणी पंपात ओता.पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवा.”
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं?
या सूचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सूचनेप्रमाणे करावं?
To be or not to be?
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर? पंपाचा पाईप तुटला असेल तर? खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल. सगळा खेळ खल्लास!
पण सुचना बरोबर असेल तर?तर भरपूर पाणी.
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही, यावर त्याच मत ठरेना.
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी आलं.त्याला काय करू नि काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला.स्वतः जवळच्या बाटल्या काठोकाठ भरल्या त्याने.
तो खूप खूश झाला होता.
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष दुसऱ्या कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून लक्षात आलं की तो मानवी वस्तीपासून खूप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली. “विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता.पाणी येतंच.”
आणि तो पुढे निघाला.
———-*——–
ही गोष्ट आहे देण्याचं महत्त्व सांगणारी.
काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं, हे अधोरेखित करणारी.
काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.
त्याहीपेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खूप आनंद देते.
खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या.
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
कालपासूनच खुप प्रसन्न वातावरण झालंय कारणं आपल्या लाडक्या आराध्य दैवताच आगमन होणार होत. खरचं गणपती गौरी हा मंगल सणांचा काळ खुप उत्साहाचा आल्हादकारक वाटतो.सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे,नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात.ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. त्यामुळें ह्या दिवसात कामाची खुप जास्त धांदल असूनही आम्हा बायकांची अजिबात चिडचिड होत नाही. सगळं कसं मनापासुन करावस वाटत.
आता दहा दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलच जणू. दुर्वा, लाल फुल व्हायलेली ती हसरी, प्रसन्न, आश्वासक गणरायाची मुर्ती खुप चैतन्य देते.