☆ “शेतकरी शेतमाल आणि भाव…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
खरं म्हणजे याबाबतीत कित्येक वर्षै तेच चर्वित चर्वण ऐकतो आहे. शेतमालाला भाव का मिळत नाहीत ? तसं पाहिलं तर भाज्या महाग झाल्या तर असा किती फरक कोणाचेही बजेटमध्ये पडणार आहे ? नाही म्हणलं तरी कांदे बटाटे हे सुद्धा शंभरीच्या जवळपास अनेक वेळेला जाऊन आलेले आहेत. शेतमालाचे भाव वाढले की सगळ्यांचेच एकदम वाढत नाहीत. कुठल्यातरी दोन तीन गोष्टींचेच भाव वाढतात. बाकीच्यांचे कमीच असतात. त्यामुळे ज्यांना बजेट सांभाळायचे आहे त्यांनी जास्त भाव असलेल्या भाज्या काही दिवस खाऊ नयेत. भाव वाढले तरी किती दिवस वाढलेले राहतात? महिना दोन महिन्यात पुन्हा शेतकऱ्याला भाव मिळत नाहीतच. शेतकऱ्यांच्या हिताची सगळीच सरकारे येऊन गेली. प्रत्येक सरकार शेतकरी हिताचे निर्णय घेते असे म्हणतात. तरीही शेतकऱ्यांना शेतमालाला भाव मिळावेत यासाठी आंदोलन करावेच लागते. अगदी शरद जोशींच्या रस्ता रोको पासून आम्ही पाहतो आहोत. कोणतेही सरकार शेतमालाच्या भावाच्या बाबतीत उदासीन का असते ? शेतमालाचे भाव वाढल्यास साधारण मध्यमवर्गीयांमध्येच काहीशी नाराजी पसरते. मला असे वाटते की मध्यमवर्गीयांची मते ही कोणत्याही पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. कारण तेच मोठ्या संख्येने मतदान करणारे मतदार असतात. या मतदारांच्या नाराजीला घाबरून कोणतेही सरकार शेतमालाच्या भावांबद्दल निर्णय घेत नाही असे वाटते.
खरं म्हणजे सगळ्याच शेतमालाचे कमीत कमी भाव म्हणजेच बेसलाईन एकदा ठरवून घ्यावी आणि दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जशी महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ मिळते त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या भावालाही महागाई निर्देशांका प्रमाणे वाढ मिळावी असे ठरवून टाकावे. काय हरकत आहे ? सर्व पक्षांनी येत्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यावर शेतमालाच्या भावासंबंधी आम्ही काय करणार आहोत आणि शेतमालाला नक्की कमीत कमी किती भाव देणार आहोत हे जाहीर करून मते मागावीत. शेतकऱ्यांकडे पैसा आला तर शेतकरी तो खर्च करतोच. शेतकऱ्याकडून पैसा खर्च झाला की तो मार्केटमध्ये येतो. मार्केटमध्ये आला की मार्केट सुधारेल. मार्केट सुधारल्यावर उत्पादन सुधारेल उद्योग सुधारतील. संपूर्ण अर्थव्यवस्थाच मजबूत होऊ शकेल असे आपले माझ्या अल्पमतीला वाटते. यात अडचण काय आहे हे सुद्धा सर्व राजकीय लोकांनी एकदा जाहीर करावे. पण आम्ही शेतकरी हिताचे निर्णय घेणार एवढेच म्हणून मते मागून सत्ता मिळाल्यावर, कुठलाही शेतकरी हिताचा निर्णय घेतला जात नाही. असे मागील पन्नास साठ वर्षे मी पाहतो आहे. तर मला वाटते एकदा असे होऊन जाऊ द्या. सर्व राजकीय पक्षांनी ते निवडून आल्यानंतर शेतमालाला कमीत कमी कसा आणि किती भाव देतील आणि त्याची अंमलबजावणी कशी करतील हेच त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात जाहीर करून टाकावे. आहे कोणी डेरिंगबाज? अर्थात जो कधीच निवडून येऊ शकणार नाही अशांनी डेरिंग दाखवण्यात अर्थ नाही हेही खरे. परंतु महत्त्वाच्या मोठ्या राजकीय पक्षांनी याबाबत निश्चित योजना आकडेवारी सह जाहीरनाम्यात जाहीर करावी. करा तर खरं एकदा डेअरिंग! माझ्यासारखे मध्यमवर्गीय सुद्धा नक्की मत देतील अशा डेरिंगबाजांना !
☆ दि लास्ट एम्परर… भाग-१ – लेखक : श्री राज ठाकरे ☆ श्री सुनीत मुळे ☆
‘प्रभुकुंज’मध्ये मी एकदा ‘विम्बल्डन’ची एक जबरदस्त मॅच पाहिली होती. मी आणि लतादीदी सोफ्यावर गप्पा मारीत बसलो होतो. तेवढ्यात समोरून मीनाताई आल्या. आमच्या गाण्यांबद्दलच्या गप्पा ऐकून त्याही बसल्या. मग ‘अगं दीदी, ही हरकत अशी नाही, अशी आहे’ वगैरे त्या सांगू लागल्या. इतक्यात उषाताई आल्या, त्या गप्पांत सामील झाल्या. या गप्पा सुरू असल्याचं पाहून हृदयनाथजी आले आणि तेही गाण्यांबद्दल अधिक माहिती देत सामील झाले. मग दीदींनी ‘अरे बाळ. ते गाणं कुठलं’ वगैरे विचारणं सुरू झालं. वेगवेगळ्या गाण्यांच्या आठवणी निघू लागल्या, त्या गाण्यांचे मुखडे गायले जाऊ लागले, गाण्यांची बरसात सुरू झाली आणि त्याच क्षणी समोरून आशाताई आल्या. आशाताई आल्यावर त्या गप्पांची लज्जत अशी काही वाढली, की मला ऐकायला दोन कान कमी पडू लागले. माझ्यासाठी तर रॉजर फेडरर, नदाल, जोकोविच, अँडी मरे, बोर्ग, बेकर हे सगळे जणू एकाच वेळी खेळत होते. ‘दीदी, हे गाणं तसं नाही गं’, ‘आशा, ही ओळ अशी होती’, ‘उषा, ते जरा गाऊन दाखव बरं…’ मी फक्त आणि फक्त श्रवणभक्ती करीत होतो. हे सगळं सलग काही तास सुरू होतं. त्या गप्पा आणि चर्चा रेकॉर्ड करता आल्या असत्या, तर ती चिरंतन स्मृती राहिली असती. मला आजही ती हुरहूर लागून राहिली आहे. ‘आपण किती भाग्यवान आहोत’ असं वाटणारे जे मोजके क्षण आयुष्यात येतात, त्यातला हा एक क्षण होता. दीदी आज आपल्यात नाहीत. सुदैवानं आशाताई आहेत आणि त्यांच्या वयाची नव्वदी साजरी होताना आपण पाहत आहोत. एका अभिजात, श्रेष्ठ आवाजाची नऊ दशकं! आपल्याला अवर्णनीय आणि कालातीत असा आनंद देणारी नऊ दशकं!
मी त्या विशिष्ट काळाचा जेव्हा जेव्हा विचार करतो, तेव्हा मला आशाताई शम्मी कपूरसारख्या वाटतात. शम्मी कपूरसमोर राज कपूर होते, देव आनंद होते, दिलीपकुमार होते. या सगळ्यांनी चित्रपटसृष्टीचा अवकाश व्यापला होता. त्यांच्या प्रचंड लोकप्रियतेतून मार्ग काढत, शम्मी कपूर यांनी मोठं यश मिळवलं. स्वतःची वेगळी शैली प्रस्थापित केली. नृत्याची वेगळी स्टाइल लोकप्रिय केली. सोलो फिल्म हिट करून दाखवल्या. हे तीन दिग्गज समोर असताना इतकं सगळं करून दाखवणं महाकठीण होतं. आशाताईंच्या बाबतीतही आपल्याला तेच म्हणता येईल. साक्षात दीदी समोर असताना, गीता दत्तसारखी व्हर्सटाइल गायिका ऐन भरात असताना, आधीच लोकप्रिय झालेल्या शमशाद बेगम, सुरैया या गायिका असताना, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणं, ही खरं तर अशक्यप्राय भासणारी गोष्ट होती; पण आशाताईंनी ती करून दाखवली. आजबाजूला चौफेर प्रतिभांचा सुकाळ असतानाही, शम्मी कपूर यांनी आपल्या नावाचा स्वतंत्र ब्रँड तयार केला; तशीच किमया आशाताईंनीही करून दाखवली.
उत्तुंग काम केलेले काय एकेक कलावंत होऊन गेले आहेत! आजच्या क्षणाचा विचार केला, तर ज्या व्यक्ती हयात आहेत, त्यात केवळ आशाताई या एकच अशा आहेत, की ज्यांना ‘भारतरत्न’ मिळायला हवं. भारताच्या सांगीतिक क्षेत्राकडं पाहिलं, तर माझ्या मते, संगीताच्या क्षेत्रातली आपली जी श्रेष्ठ आणि संपन्न परंपरा आहे, त्यातील आशाताई ‘लास्ट एम्परर’ आहेत. अखेरच्या सम्राज्ञी आहेत. एकाच घरात दोन दोन ‘भारतरत्न’ कसे देता येतील वगैरे सारखे प्रश्न विचारणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. एका घरात दोन महान व्यक्ती जन्माला आल्या आहेत, त्याला काय करणार? ही जर भारताची रत्नं नसतील, तर मग कोण आहेत? ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं आपण तोंडानं म्हणतो; परंतु ‘भारतरत्न’ देण्याची वेळ आली, की प्रत्येक जण आपापल्या प्रांतातली नावं पुढं करतो. ‘भारत माझा देश आहे’ हे साफ विसरून जातो.
आशाताईंना दुय्यम गाणी मिळाली, असं अनेकांना वाटतं. मला काही ते फार पटत नाही. दुसरं म्हणजे, त्या काळात फक्त ओ. पी. नैयर यांनीच आशाताईंना नायिकेची आणि महत्त्वाची गाणी दिली, या म्हणण्यातही तथ्य नाही. ओपीनं गाणी दिली हे खरं आहेच, त्याबद्दल वादच नाही. ‘आँखो से जो उतरी है दिल में’, ‘आओ हुजूर तुम को’, ‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा’, ‘आईये मेहरबाँ’ अशी पन्नास-शंभर गाणी मी लागोपाठ सांगू शकेन. या दोघांच्या गाण्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं ठरवणार आपण? एकाच ताटात आमरसाची वाटी असेल आणि श्रीखंड असेल, तर त्यातलं कुठलं अधिक चांगलं, ते कसं सांगणार? प्रत्येकाची स्वतःची चव आहे आणि ती तेवढीच श्रेष्ठ आहे; तसंच या गाण्यांचं आहे.
त्या काळातली आशाताईंनी म्हटलेली एस. डी. बर्मन यांची गाणी बघा. मी काही उदाहरणं सांगतो. ‘सुजाता’मधलं ‘काली घटा छाए मोरा जियरा तरसाए’, ‘काला बाजार’मधलं ‘सच हुए सपने तेरे’, ‘बंबई का बाबू’मधलं ‘दिवाना मस्ताना हुवा दिल…’ कसली अफाट गाणी आहेत ही! दीदी आणि एस. डी. बर्मन यांच्यात त्या काळात काही कारणानं वाद झाला होता, म्हणून आशाताईंना ही गाणी मिळाली, असं म्हणणंही साफ चुकीचं आहे. त्या वादामुळं कदाचित चार गाणी जास्त मिळाली असतीलही; परंतु दीदींशी संबंध उत्तम असतानाही एस.डी.नं अत्यंत वेगळी आणि महत्त्वाची अनेक गाणी आशाताईंना दिली आहेत. नायिकांची गाणी आशाताईंना मिळाली नाहीत, असं उगाचच कुणी तरी हवेत पसरवलेलं आहे. हजारो गाणी आहेत आशाताईंनी नायिकांसाठी गायलेली. ‘बंदिनी’ या चित्रपटाच्या वेळेस लतादीदी आणि बर्मनदा यांच्यातला वाद मिटला. त्या चित्रपटातही दीदींना दोन गाणी आहेत आणि आशाताईंनाही दोन गाणी आहेत. मला वाटतं गुलजार साहेबांचं कारकीर्दीतलं पहिलं गाणं ‘मोरा गोरा अंग लईले…’ याच चित्रपटातलं आहे आणि ते दीदींचं आहे. याच चित्रपटातली ‘अब के बरस भेज भैया को बाबूल’ आणि ‘ओ पंछी प्यारे’सारखी दोन अतिशय मोहक, मधाळ गाणी आशाताईंनी गायली आहेत. या गाण्यांना दुय्यम म्हणायची हिंमत कोणी करील का?
– क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री राज ठाकरे
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ हिंदू म्हणजे काय हो ?… – लेखक : अज्ञात ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
आपण हिन्दू आहोत हे खरे आहे परंतु, हिंदू म्हणजे काय हो???
सांगाल का???
तर मंडळी वाचा आणि एखाद्याने विचारले की हिंदू म्हणजे काय, तर, चट्दिशी सांगता आले पाहिजे…!!!
“हिंदू” शब्द ‘सिंधु’ शब्दाचा अरबी अपभ्रंश आहे, असे आपल्याला आतापर्यंत सांगितले गेले आहे, पण, खालील लेखामध्ये ते कसे असत्य आणि दिशाभूल करणारे आहे, हे सप्रमाण सिद्ध करून दाखवले आहे.
“हिंदू” हा शब्द “हीनं दुष्यति इति|
हिन्दु: म्हणजे- ‘जो अज्ञान *आणि हीनतेचा त्याग करतो’ त्याला हिन्दू म्हणतात’.
‘हिन्दू’ हा शब्द अनन्त वर्षांपासून असलेला प्राचीन मूळ संस्कृत शब्द आहे.
या संस्कृत शब्दाचा सन्धीविग्रह केल्यास तो हीन+दू=हीन भावना+पासून दूर असलेला,मुक्त असलेला तो हिन्दू होय *आणि आपल्याला हे वारंवार खोटे सांगून फसविले जात होते, की, ‘सिन्धूचे अपभ्रंशित रूप म्हणजे हिन्दू’ हा शब्द आपल्याला मोगलांनी दिला. खरे म्हणजे ‘हिन्दू’ या शब्दाची उत्पत्ती ‘वेदकाळा पासून आणि वेदातूनच झालेली आहे, म्हणून, हिन्दू हा शब्द कुठून आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली, हे अवश्य जाणून घेऊयात, आपल्या वेद आणि पुराणातही ‘हिन्दू’ या शब्दाचा उल्लेख सापडतो.
आज आपण ‘हिन्दू’ या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, ते पाहूयात…
‘बृहस्पति अग्यम’ (ऋग्वेद) मध्ये हिन्दू शब्दाचा उल्लेख असा आलेला आहे. “हिमलयं समारभ्य यावत इन्दुसरोवरं। तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।l”
म्हणजेच …
‘हिमालयापासून इन्दू सरोवरा (हिन्दी महासागर) पर्यन्त ईश्वर निर्मित राष्ट्र म्हणजे हिन्दुस्थान (‘हिन्दूं’ चे स्थान) होय.
केवळ ‘वेदांत’ च नव्हे, पण, ‘शैव’ ग्रंथातही ‘हिन्दू’ शब्दाचा उल्लेख असा आलेला आढळतो, “हीनं च दूष्यते एव्, हिन्दुरित्युच्चते प्रिये।”
म्हणजेच- “जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो तो हिन्दू होय.”
कमीअधिक प्रमाणात असाच श्लोक ‘कल्पद्रुमा’तही आढळतो- “हीनं दुष्यति इति हिन्दु:।” म्हणजे- “जो अज्ञान आणि हीनत्व यांचा त्याग करतो त्याला हिन्दू म्हटले जाते.”
“पारिजात हरण” या संस्कृत नाटकात हिन्दूंचा असा उल्लेख आलेला आढळतो-
“हिनस्ति तपसा पापां,दैहिकां दुष्ट.
हेतिभिः शत्रु वर्गंच,स हिन्दुरभिधीयते।।”
.. म्हणजे,”जो आपल्या तप:सामर्थ्याने शत्रू,दुष्ट आणि पापाचा नाश करतो,तो हिन्दू होय.”
“माधव दिग्विजय,”मध्ये हिन्दू या शब्दाचा असा उल्लेख केला गेलाय- “ओंकारमन्त्रमूलाढ्य,पुनर्जन् गौभक्तो भारत:,गरुर्हिन्दुर्हिंसन दूषकः।।”
.. म्हणजे- “जोॐ काराला ईश्वर रचित रचना मानतो,ज्याची पुनर्जन्म आणि कर्मसिद्धान्त यावर श्रद्धा आहे,जो गौ पालन करतो आणि वाईटाला दूर ठेवतो, तो हिन्दू आहे.”
केवळ एव्हढेच नव्हे, तर, आपल्या ऋग्वेदात (८:२:४१) विवहिन्दू नावाच्या अति पराक्रमी आणि दानी राजाचे वर्णन आलेले आहे, ज्याने ४६००० गाईंचे दान केल्याचा उल्लेख आहे आणि ‘ऋग्वेद मंडला’तही त्याचा उल्लेख येतो.
“हिनस्तु दुरिताम्।” … ‘वाईटाला दूर सारण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आणि सनातन धर्माचे पालन पोषण करणारे हिन्दूच आहेत.’
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डब्यातला श्रीकृष्ण – एक सुंदर दृष्टान्त — लेखक – मनोहर कानिटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆
एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता.त्याचे सहज लक्ष गेले.त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे,बरण्या होत्या.त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले,” यात काय आहे?” दुकानदार म्हणाला – “त्यात मीठ आहे.” संन्यासी बुवांनी आणखी एक डब्याकडे बोट दाखवून विचारले- “यात काय आहे?” दुकानदार म्हणाला- “यात साखर आहे.” असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले-“आणि यात काय आहे?” दुकानदार म्हणाला, ” यात श्रीकृष्ण आहे.” संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “अरे, या नावाची कोणती वस्तू आहे?मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” दुकानदार संशयी बुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला,”महाराज तो रिकामा डबा आहे. पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत. त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”
बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले.ते ईश्वराला म्हणाले “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस.ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एक दुकानदाराच्या तोंडून मला ऐकवलीस.परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे”. असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.
जे मन-बुद्धी- हृदय काम, क्रोध, लोभ, मोह,मद,मत्सर, अहंकार,ईर्षा,द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख अशा लौकिक गोष्टींनी भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी म्हणजे अशाच मन,बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो.
लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली, तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही, म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.
लेखक : श्री मनोहर कानिटकर
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काल परवा दोन तीन ठिकाणी गोपाळकाला प्रसाद म्हणून मिळाला.तो अगदीं घास घास मिळालेला गोपाळकाला खाल्ला अन् काय स्वादिष्ट लागला म्हणून सांगू, आणि शिवाय पोट शांत, तृप्त झाल्याची अनुभुती. खरचं ही किमया पदार्थाची नसून त्या प्रसादाची असतें.
ह्या प्रसादा वरील दोन तीन खुप छान पोस्ट वाचनात आल्या.सोशल मिडीया मुळे खूप सा-या पोस्ट वाचायला मिळतात. त्यापैकी काही पोस्ट ह्या खूप आवडतात,पटतात आणि नकळतच आपल्या मेंदूमधील एका कप्प्यात हलकेच विराजमान होतात. कधी त्या आवडलेल्या पोस्टच्या लेखकाचं नावं त्यावर असल्यास कळतं तर कधी त्यावर नाव नसल्याने ही आवडलेली पोस्ट कुणी बरं लिहीली असेल हा प्रश्न कायम मनात रेंगाळत राहातो.
सध्या सणवार,उत्सव,सोहळे ह्यांचे दिवस. त्यामुळे सर्वत्र मंगलमय ,धार्मिक वातावरण. ह्या सोहोळ्याची सांगता कशाने होत असेल तर ती होते प्रसादाने.
प्रसाद हा शब्द उच्चारल्याबरोबर तो एक पदार्थ, एक जिन्नस न राहता त्यांच रुपांतर एका अतूट विश्वास, भक्कम आधार, शांती,तृप्ती, समाधान देणा-या एका जादूमय शक्तीत होतं. एकवेळ आपल्या मनात पदार्थांविषयी मनात संदेह निर्माण होईल पण त्याचं प्रसादात रुपांतर झालं की मनात ना कुठली शंका येतं ना कुठला विकल्प येतं.
एखाद्या पदार्थाचं प्रसादात रुपांतर झालं की त्या पदार्थांचं एका चविष्ट, जिभेवर रेंगाळणा-या,मनाला शांती,समाधान आणि पोटाला तृप्ती पुरविणा-या पदार्थांत होतं.
प्रसादाची खासियत म्हणजे तो जिन्नस प्रसादामध्ये जितका चविष्ट बनतो तितका तो एरवी कधी होतं नाही. उदाहरण घ्यायचं झालं तर कुठल्याही पुजेनंतर वा भजनानंतर केलेल्या गोपालकाला ह्या प्रसादाची चव एरवी खायला मुद्दाम केलेल्या काल्याला कधीच येत नाही. प्रसादाची अजून एक खासियत म्हणजे कितीही मोठा व्यक्ती असला तरी हात समोर करून प्रसाद मागण्यात कधीच कमीपणा मानत नाही, जी व्यक्ती प्रसाद मागायला काचकुच करते तेव्हा एकतर श्रद्धेचा अभाव तरी असतो वा त्या व्यक्तीची प्रसाद आणि अन्य पदार्थ ह्यांच्यातील फरक ओळखण्याची ताकदच नसते. गणपती, महालक्ष्मी वा अन्य कुठलाही महाप्रसाद ह्यांच्या प्रसादाच्या जेवणातील तृप्ती, समाधान हे फार आगळवेगळं असतं.
अशीच काल “प्रसाद”हा विषय घेऊन एक अनामिक पण अतिशय विलक्षण पोस्ट वाचनात आली. त्यातीलच काही आवडलेल्या मुद्द्यांची आजच्या माझ्या पोस्ट मध्ये मदत घेते आहे.
एकदा खूप अग्निदिव्य,संकट ह्यातून भरडल्या गेलेल्या एका अत्यंत धार्मिक,आस्तिक अशा गुरुजींना “हे सगळं कसं सहनं केलंत हा प्रश्न विचारल्या गेल्यावर गुरुजी उत्तरले, “आयुष्यात जे आपल्याला मिळते तो देवाचा प्रसाद मानला. चिकित्सा नाही. चिरफाड नाही. चिडचिड नाही त्यामुळे सगळं सहज,सोप्पं आणि अनिवार्य, आवश्यक भाग म्हणून आपोआप स्विकारल्या गेलं” अजून पुढे मास्तर म्हणतात,”प्रसाद हातात आला की चटकन तोंडात टाकतो की नाही आपण? चवीचा विचार नाही करत. ताजे-शिळे म्हणत नाही. त्याला पेढा, मला गूळ का? म्हणत नाही. घेतो. खातो. धन्य होतो. हे कधी विसरलो नाही”. प्रसाद हा माझ्या देवाचा प्रतिसादच मानला !’खरोखरच खूप काही शिकवून जाते ही मास्तरांची शिकवण.
खरोखरच मंदिरात आपल्याला प्रसाद मिळतो त्याची आपण चिकित्सा तर दूरच पण साधी चर्चाही करत नाही. आपण प्रसाद घेतो, खातो आणि कृतकृत्यतेने हात जोडतो. खरंच देवळातल्या प्रसादासारखेच मानावेत आयुष्यात आलेले सगळे आंबट,गोड,कडू चवींचे प्रसंग. जणू ह्या शिकवणीने मनातील घालमेल, तळमळ सगळं जणू निमायला होतं.
प्रसादावरुनच अजून एक प्रसंग त्या पोस्ट मध्ये सांगितला. एका वृद्ध स्त्रीला प्रवचन झाल्यावर प्रसाद न मिळाल्याने ती प्रसाद मागायला येते. प्रसाद संपुष्टात आल्याने त्या वृद्धेला एक भक्त स्वतःजवळील लाडू देतो . तेव्हा ती आजीबाई त्यातील कणभर लाडू प्रसाद म्हणून घेते आणि उरलेला लाडू असचं कोणी बिनाप्रसादाचे जाईल त्यांच्यासाठी म्हणून वापस करते. ती आजीबाई खूप मौलिक गोष्ट सांगून जाते, ती म्हणते,”परसाद जीव निवण्यासाठी पायजे.. पोट भरण्यासाठी नाय् !’’ आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन,हाव वाढतच जाते,कुठे थांबायचं ते कळतचं नाही आणि शेवटी ओंजळ रिती ती रितीच राहते. खरतरं आयुष्य हाच एक महाप्रसाद आहे. तो वाटता वाटता स्वतः घेतला तरच परमानंद मिळतो. त्या पोस्ट मधील एका आवडलेल्या वाक्याने आजच्या पोस्टची सांगता करते,”परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे…”
किचनमध्ये शिरताना ,सवयीने रेडिओ सुरू केला.विविध भारतीवर बाईस स्कोपकी बाते मध्ये ” तिसरी कसम “ची कहाणी लागली होती. लगेचंच राजकपूर, वहिदा,पान खाए सैया हमारे …. सारं सरसर डोळ्यांपुढं आलं… .. नाजूक, नखरेल,डौलदार, तेवढीच खानदानी, शालीन दिसणारी वहिदा… माझी आवडती…..
…एकीकडे कथा पुढे पुढे सरकत होती….संवाद, गीतं, कथा, तर एकीकडे मिक्सरचा आवाज,,फोडणी,..फोन .. येणारे, जाणारे, अशा दोन्ही रुळांवर समतोल साधत मी गुंगून गेले.
या रेडिओमूळे, असे सहज जगण्याचे क्षण सुंदर होऊन जातात. तो माझा ” सखा सोबतीच” आहे….. मला हवी तेव्हा सोबत करणारा.
मी किचनमध्ये काम करतेय, अन् तो गप्प आहे, असं सहसा होत नाही. आणि जर असं झालंच तर तो बिघडलेला असेल, किंवा मी तरी. दुसरी शक्यता जास्त !!! कधीही कोणत्याही वेळेला सदासर्वकाळ, बिनशर्त सेवा द्यायला तो एका बटणावर तयार असतो.
तशीही मी मनातल्या मनात एकटी बडबडतच असते. ऐकायलाही मीच. पण हा माझा सखा, माझ्यासाठी बोलतो खूप कांही… अगदी ‘ चिंतन ‘ पासून दिनविशेष, बातम्या, दिलखुलास सारखे ज्ञानवर्धक आणि रंजक कार्यक्रम, सखी सहेली,अजून खूप काही, ऐकवतो सतत . रोजच ! कधी कधी छळतो, कंटाळवाणे, प्रायोजित ऐकवून. मग जरा कान पिळायचा. इकडे तिकडे बघायचं अन्नू कपूरचा कार्यक्रम अचानक ऐकू शकते.
सर्वात महत्वाचं तो काय ऐकवतो, तर सुमधुर गीतं. अगदी बरसातच असते. फक्त बटण दाबायचं अन् कानांनी सुश्राव्य आनंद टिपायचा … .बस दिन बन जाता है ! मूड बन जाता है ! एखादं आवडीचं जुनं गाणं लागलं की.
लहानपणी रात्री रेडिओवर श्रुतिका लागायच्या. आम्ही बहिणी कान देऊन ऐकायचो. कधी ऐकता ऐकता झोप लागून जायची. मग दुसऱ्या दिवशी पुढे काय झालं, ते विचारायचं… फार मज्जा असायची. साऱ्यांचे जग एकच असायचे घरात तरी. ही रेडिओची खासियत. आता स्मार्ट फोन आल्यापासून घरातल्या प्रत्येकाचं विश्व वेगळ झालंय.
एखादी मैत्रीण येते,काही बाही ऐकवून उदासी देऊन जाते, तर कोणी उत्साहाचं गुलाबपाणी शिंपून आपली उदासी पळवते. तर कोणी कर्तृत्वाची कहाणी ऐकवून प्रेरणा देते. तसेच रेडिओमुळे माझ्या मनात वेगवेगळ्या मुड्सची फुलं उमलत राहतात.
रेडिओ हे एक यंत्र असलं तरी त्याचा शोध लावणाऱ्यापासून आकाशवाणीचे सारे कलाकार, कामगार, तंत्रज्ञ, इतरही असंख्य लोकांचं योगदान आहे. त्यांच्या कृपेने, सेहगल, बालगंधर्व, भीमसेनजी, कुमारजी ….. अशा अनेक अनेक मान्यवरांची गीतं आपण घरात राहून एक बटणावर ऐकू शकतो , हे केवढं अप्रुप आहे.
त्यासाठी त्यांचे सर्वांचे ऋणी रहायला हवं.
2001 साली घेतलेला आमचा फिलिप्सचा हा रेडिओ, टेपरेकॉर्डर (2 इन वन) 20 वर्ष सेवा देतोय.
आता टेप बंद पडलाय. काटाही जागचा हलत नाही. अंदाजाने फेरे मोजून स्टेशन बदलता येतं.
Tv, इंटरनेट, असे रेडिओपेक्षा खूप प्रगत शोध लागले तरी रेडिओ, तो रेडिओच — जिवाभावाचा सखा सोबती — त्याची सर कशालाच नाही !
माणुसकी नावाचा एक माणूस, खरोखरी माणूस असणारा माणूस राहत होता. त्याची पत्नी नीती.
दोघांचा संसार अत्यंत सुखाचा आणि चांगला चालला होता. त्यानंतर त्यांना मुले झाली प्रत्येक मुलाचे नाव त्यांनी धर्म असे ठेवले. फक्त ओळखू यावा म्हणून त्याला धर्म एक, धर्म दोन, धर्म तीन … अशा क्रमाने नावे दिली. हे धर्म काही दिवसांनी आपापली वेगवेगळी घरे बांधून आपापल्या घरात राहू लागली. त्यानंतर त्यांची ही कालांतराने लग्ने झाली. त्यांनाही ज्या पत्नी मिळाल्या त्यांचीही नावे श्रद्धा१, श्रद्धा२,. … अशी होती. हे वेगवेगळे धर्म आपापल्या घरामध्ये थोड्याफार कुरबुरी असल्या तरी बऱ्यापैकी सुखाने नांदत होते. परंतु काही काळानंतर त्यांना त्यांनाही मुले झाली आणि ती मुले धर्मपंथ एक, धर्मपंथ दोन, धर्मपंथ तीन … अशा नावाने संबोधले जाऊ लागले. कालांतराने त्यांची लग्ने झाली आणि त्यांना मिळालेल्या पत्नींची नावे अशीच अंधश्रद्धा एक, अंधश्रद्धा दोन, अंधश्रद्धा तीन, … अशी झाली.
अशी प्रत्येक धर्माची वंशावळ वाढू लागली आणि पंथ व अंधश्रद्धा यांची मुले पुन्हा वेगळ्या पद्धतीने विभागून एकमेकात भांडू लागली एकमेकांमध्ये भांडत असताना एकमेकांचे जीव घ्यायलाही कमी करत नव्हती. भांडता भांडता एकमेकां पासून मनाने दूर दूर जाऊ लागली. धर्म दोन आणि धर्म तीन ….. मध्ये सुद्धा अनुक्रमे असेच होऊ लागले. मग कुठल्यातरी धर्मपंथाचा कुठल्यातरी दुसर्या धर्मपंथाच्या वंशजाला म्हणू लागला तू माझ्याकडे ये. महत्वाचे म्हणजे आपल्या पंथाचे वर्चस्व वाढवण्यासाठी त्याला आपले समर्थक वाढवायचे होते. त्यामुळे प्रत्येक पंथाचे वंशज वेगवेगळ्या धर्माच्या वंशजांकडे वळून त्या धर्माच्या वंशजांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहिल्यानंतर काही जण तात्पुरते आपापल्या पंथातल्या मारामाऱ्या थांबवून दुसऱ्या धर्मांच्या बाबत आक्रमक बनू लागले. अशा तऱ्हेने या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून सगळीकडे मारामाऱ्या आणि हिंसाचाराचा उद्रेक झाला. प्रत्येक पंथाचा व त्या पंथातील प्रत्येकाचा स्वार्थ आणि स्वतःचे महत्त्व वाढवण्याची स्पर्धा यामुळे हे धर्मातले म्हणा किंवा पंथातले म्हणा किंवा त्यांच्या वंशजातले म्हणा आक्रमक होऊन भांडू लागले. याचे स्वरुप इतके क्लिष्ट होत गेले की नक्की कोण कोणाला मारतो आहे कोण कुणाचा खून करतो आहे काहीच समजेनासे झाले.
माणुसकी आणि नीती दोघेही बिचारे प्रचंड म्हातारे झाले होते त्यांना हे सगळे आवरता येणे शक्य होईना त्यांनी ठरवले की हा सर्व विनाश आपल्या डोळ्यांनी बघण्यापेक्षा आत्महत्या करणे चांगले परंतु माणुसकी आणि नीती या दोन गोष्टींमुळे आत्महत्या करण्यासाठी त्यांचे मन धजेना.
कालांतराने त्यांच्या वंशजातील काही लोकांनी या आपल्या सर्व भांडणाचे मूळ कारण आपला मूळ पुरुष आहे असा निष्कर्ष काढून त्यांच्यावरच ते चाल करून गेले. माणुसकी आणि नीतीचा खून करू लागले.
परंतु दुर्दैवाने त्या दोघांनाही इच्छामरणाचा शाप असल्यामुळे त्यांना मरणही येईना आणि जखमा आणि वेदनांमुळे त्यांना जगता ही येईना. अशीही दुर्दैवी कहाणी माणूसकी आणि नीती यांची केव्हा व कशी संपेल कोण जाणे ?
☆ आँखों से जो उतरी हैं दिल में… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
माझ्यासाठी वाचन हा दिव्यानंदाची अनुभूती देणारा अनुभव आहे. एखादी छान पौर्णिमेची रात्र असावी आणि खिडकीतून चांदणं आत झिरपत यावं तसा शांत, दिव्य आणि प्रसन्न अनुभव वाचन आपल्याला देतं. या प्रसन्न अनुभवाचं माध्यम असतं एखादं आवडतं पुस्तक, कथा किंवा कविता. डोळ्यांच्या मार्गानं हे चांदणं थेट आतपर्यंत झिरपतं आणि आत्मानंदाचा प्रसन्न अनुभव देतं . एखाद्या पट्टीच्या गायकाला जसा मैफलीत सूर गवसावा आणि मैफल उत्तरोत्तर रंगत जावी तसाच हा अनुभव असतो. या मैफलीत श्रोते जसे सुरांच्या वर्षावाने सचैल न्हाऊन निघतात, तसाच आनंद चांगल्या पुस्तकाचं वाचन आपल्याला देतं.
बरं हे वाचन आणि त्याचे प्रकारही वेगवेगळे. मार्ग वेगवेगळे आणि माध्यमही वेगवेगळे. पण परिणाम मात्र एकच असतो आणि तो म्हणजे आनंदाची अनुभूती. जेव्हा मी माझ्यासाठी वाचतो, तेव्हा पुस्तकातील ती अक्षरे अमूर्त रूप धारण करून डोळ्यांच्या खिडकीवाटे थेट मनाच्या गाभाऱ्यात प्रवेश करतात. येताना ती अक्षरे एकेकटी येत नाहीत. ते आपल्यासोबत आनंद, प्रसन्नता कणाकणाने घेऊन आत शिरतात. काळोख्या रात्रीत जसे एखाद्या काचेच्या बरणीत काजवे एकत्र गोळा करावेत आणि ती काचेची बरणी प्रकाशमान व्हावी, तिचा प्रकाश आपल्या चेहऱ्यावर पडावा आणि आपला चेहरा काळोखातही उजळून निघावा तसेच वाचन माझ्या अंतरंग प्रकाशाने भरून टाकते. मनाचा कोपरा न कोपरा उजळून निघतो. उन्हाळ्यात तहानलेल्या धरणीवर जसे पावसाचे थेंब पडावेत आणि थोड्याच वेळात आपल्या शीतलतेने त्यांनी धरित्रीला शांत करावे तसे उत्तम वाङ्मय मनाच्या तहानलेल्या धरणीवर अमृताचे सिंचन करते. मग उन्हाने कोमेजलेले, करपलेले अंकुर टवटवीत होऊन वर येतात आणि ते ‘हिरवे हिरवे गार गालिचे ‘ मनाला प्रसन्नता आणि शांतता देतात.
जेव्हा एखादे बुवा, पुराणिक, कथाकार, कीर्तनकार आपल्या रसाळ वाणीद्वारे रामायण, भागवत, हरिविजय, पांडवप्रताप यासारखा एखादा ग्रंथ श्रोत्यांसमोर वाचतात, तेव्हा ते स्वतःबरोबर इतरांनाही आनंदाची अनुभूती देतात. मुळातच हे ग्रंथ भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले आहेत, त्यात सांगणाऱ्या बुवांची वाणी रसाळ आणि प्रासादिक असेल तर मग विचारायलाच नको. श्रोते त्या वर्षावात चिंब न्हाऊन निघतात. आताही माध्यम तेच असते. म्हणजे बुवांच्या समोर असलेला प्रासादिक ग्रंथ. पण त्या ग्रंथातील अक्षरे आता बुवांच्या हृदयातील ओलावा, आनंद, प्रसन्नता घेऊन ध्वनीचे रूप धारण करतात. आता त्यांचा हृदयात उतरण्याचा मार्ग बदलतो. डोळ्यांच्या ऐवजी ती कानावाटे प्रवेश करती होतात. कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. पण परिणाम मात्र तोच असतो. आणि तो परिणाम म्हणजे दिव्यानंदाची अनुभूती.
ज्ञानेश्वर माऊलींनी जेव्हा ज्ञानेश्वरी सांगितली आणि तेव्हा जे श्रोते हजर असतील, ते किती भाग्यवान म्हणावेत ! ते दृश्य जेव्हा मी कल्पनेने डोळ्यासमोर आणतो, तेव्हा मला दिसते ते मंदिर. माऊली खांबाला ( पैस ) टेकून बसल्या आहेत. समोर त्यांचे बोल आपल्या कानात साठवून घेण्यासाठी चातकाप्रमाणे आतुर झालेला श्रोतृवर्ग बसलेला आहे. बाजूला निवृत्तीनाथ आहेत. माऊलींच्या दोन्ही बाजूला दोन समया प्रकाशमान आहेत. त्या समयांच्या प्रकाश माऊलींच्या मुखमंडलावर पडला आहे. मुळातच तेजस्वी असलेली माऊलींची मुद्रा त्या प्रकाशात आणखीनच दिव्य प्रकाशाने उजळून निघाली आहे. माऊलींच्या मुखातून आता अमृतासमान अशा एकेक ओव्या बाहेर पडताहेत. ओम नमोजी आद्याने सुरुवात झाली आहे. एकामागून एक निरनिराळी रूपके, उपमा घेऊन त्या ओव्या श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेत आहेत. इथे श्रोत्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. हा आनंद किती आणि कुठे कसा साठवावा हे त्यांना उमजत नाही. जणू त्यांच्या सर्वांगाचे कान झाले आहेत. ज्ञानेश्वर माऊलींचे अमृतमयी बोल ते आपल्या हृदयात साठवून घेत आहेत. हृदयीचे हृदयी घातले अशी ही अवस्था !
‘तरी आता अवधान दिजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे‘ असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ते उगीच नाही.
महर्षी वाल्मिकींनी लिहिलेलं रामायण लव कुश यांनी जेव्हा श्रीरामांच्या दरबारात श्रीराम आणि श्रोत्यांसमोर गायिले तेव्हा सर्वांची काय अवस्था झाली ते आपण रामायणात वाचतोच. ज्यांना आपण आधुनिक वाल्मिकी म्हणतो ते ग दि माडगूळकर गीतरामायणाच्या लेखनामुळे अजरामर झाले. हेच गीतरामायण बाबूजी उर्फ सुधीर फडके यांनी गाऊन अजरामर केले. यातील ते गीत सहजच ओठांवर येते
स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती.
मग ही गाणारी मुले कशी आहेत याचे चित्रमय वर्णन गदिमा करतात. ते म्हणतात
राजस मुद्रा वेष मुनींचे, गंधर्वच ते तपोवनींचे
अशा एकेक ओळी आठवत जातात. या सगळ्यांचा श्रोतृवृंदावर काय परिणाम होतो, तो पण गदिमा जणू सचित्र आपल्या डोळ्यांसमोर उभा करतात. ते म्हणतात
सामवेदसे बाळ बोलती, सर्गामागुनी सर्ग चालती
सचिव मुनिजन प्रिया डोलती, आसवे गाली ओघळती.
प्रत्यक्ष श्रीरामांवर काय परिणाम झाला तर…
सोडून आसन उठले राघव, उठुनि कवळती अपुले शैशव
पुत्रभेटीचा घडे महोत्सव, परी जो उभया नच माहिती.
अशी जादू जणू हे शब्द करतात ! मग ते शब्द वाल्मिकींचे असोत वा गदिमांचे. ती अमूर्त अक्षरे ध्वनीचे रूप घेऊन कानावाटे हृदयापर्यंत पोहोचतात. आनंदाच्या चांदण्याची बरसात होते. कर्तव्यकठोर असलेल्या श्रीरामांचे देखील डोळे पाणावतात. माया, ममता, प्रेम, करुणा सगळे सगळे भाव हे शब्द उभे करतात.
असं म्हटलं जातं की प्रख्यात जर्मन कवी गटे यांनी कालिदासाच्या शाकुंतल या नाटकाचं जर्मन भाषेत केलेलं भाषांतर जेव्हा वाचलं, तेव्हा त्यांना इतका आनंद झाला की हा जर्मन कवी आपलं देहभान विसरून शाकुंतल डोक्यावर घेऊन नाचला. कुठून आला हा आनंद ? पुस्तकाच्या वाचनातूनच ना ? या आनंदाला उपमा नाही आणि त्याची तुलना इतर कुठल्या आनंदाशी होऊ शकत नाही. त्या काळात पाश्चात्य साहित्यात सौंदर्यवाद ( romanticism ) मूळ धरू लागला होता. अशा काळात कालिदासाने लिहिलेलं शकुंतलेचं आणि निसर्गाचं वर्णन वाचून हा कवी अक्षरशः वेडा झाला. त्याने त्यावेळी शाकुंतल या ग्रंथाबद्दल काढलेले उद्गार असे आहेत. ‘ वसंतऋतूतला मोहोर आणि ग्रीष्म ऋतूतलं फळ हे सर्व एकाचवेळी ( युगपद्) ज्यात आहे, जे ( एकाच वेळी) मनाला शांत करणारे ( संतर्पणम्) आणि मोहितही करणारे आहे. किंवा स्वर्ग आणि पृथ्वी यांचं ऐश्वर्य जर एकाच वेळी एकत्र हवं असेल तर प्रियमित्रा, तू शाकुंतलाचा आस्वाद घे. ‘ मला वाटतं हेच उद्गार सर्व ग्रंथांना लागू होतात .
ज्ञानेश्वर माऊलींची माफी मागून त्यांच्या भाषेत मला असे सांगावेसे वाटते
ग्रंथ सर्व रसांचा आगरु, ग्रंथ सर्व सुखांचा सागरु
तरी ग्रंथ हाती घेईजे, मग सर्व सुखाते पात्र होईजे.
जशी प्रेशर कुकरमध्ये कोंडलेली वाफ बाहेर पडणे आवश्यक असते त्याचप्रमाणे आपल्या मनात साठलेल्या भावनांचे सुद्धा मुक्त होणे, निचरा होणे किंवा ज्याला आपण विरेचन असे म्हणू तेही आवश्यकच असते. पुस्तके आणि त्यांचे वाचन अशा प्रकारचे भावनांचे विरेचन ज्याला इंग्रजीत कॅथर्सिस म्हटले जाते ते घडवून आणतात. मी वाचकही आहे आणि लेखकही. माझा तर श्वास म्हणजे वाचन ! मी जेव्हा आनंदी असतो तेव्हा एखादे आवडते पुस्तक हातात घेतो आणि माझा आनंद दुणावतो. मी जेव्हा दुःखात असतो तेव्हाही एखादे पुस्तक हातात घेतो आणि माझे दुःख उणावते. थोडक्यात म्हणजे गणपतीच्या आरतीत म्हटल्याप्रमाणे चांगल्या पुस्तकांचे वाचन हे ‘ सुखकर्ता दुःखहर्ता’ अशा प्रकारचे आहे. स्वानंदासाठी वाचन करावे, विचार, अनुभव आणि भावना समृद्ध होण्यासाठी वाचन करावे. ‘मेरा पढने में नही लागे दिल…‘ असे न म्हणता ‘मेरा पढने मे हीं लागे दिल ‘ असे म्हणू या.
☆ नाचकीन ! एक सहज कानकोरणं ! ☆ श्री संभाजी बबन गायके☆
इअर बड अस्तित्वात येण्याआधी आणि ते सुधारीत आवृत्तींच्या कानाशी लागण्यापूर्वी नाचकीन किंवा नाचकिंड नावाचं शस्त्र प्रत्येक घरी असायचंच. बाजारात,एस.टी.स्टॅन्ड्सवर,रेल्वे स्टेशन्सवर एका गोल तारेत गुंफून ठेवलेली ‘नाचकिंड’ विकणार-या (बहुदा) महिला दिसायच्या. या बाबीला विविध नावे असतीलच गावां-गावांनुसार हे निश्चित.
हे स्वस्तातलं आणि बहुपयोगी अवजार म्हणून जनतेत,त्यातल्या त्यात ग्रामीण भागात प्रसिद्ध होतं. यात प्रामुख्याने तीन पाती असायची. एक दांडपट्ट्यासारखं…टोकाला तिरकं…धार आणि एक टोक असणारं. ग्रामीण भागात बाभळी आणि त्यांचे काटे टाळता न येणा-या बाबी असतात. पायांत चामडी जाड वहाणा नसतील, तर कंटक हे समाजाच्या तळपायांत घुसखोरी करायला सदैव वाटेवर पसरलेले असायचेच. त्याकाळी चप्पल म्हणजे चैनीची बाब असायची. नंतर आलेल्या एकोणीस रुपये नव्य्याण्णव पैसे फक्त स्लीपर्सचा काट्यांना धाक नसायचा. मग पायांत काटा घुसणं सहज व्हायचंच. शिवाय हे बेटे काटे बाहेर काढताना त्यांची टोकं टाचेतच रुतून बसून रहायची…एखादी अप्रिय गोष्ट मनात रुतून बसते तशी. मग हा उर्वरीत काटा बाहेर काढण्याची मोठी कसरत करावी लागत असे…त्यासाठी नाचकीन मधलं हे हत्यार उपयोगात यायचं. तळपायातला हा काटा एक्तर दिसणं दुरापास्त असे. अंदाजाने शस्त्र वापरावं लागे. आधी त्या काट्याभोवतीचा मांसल भाग कोरून तिथे जागा करून घ्यावी लागे. काट्याचा किंचित जरी भाग वर दिसू लागला की लगेच नाचकीन मधील चिमटा हाती घेतला जाई. हे ऑपरेशन तसं बराच वेळ चाले. कधी कधी काटा निघाला आहे, असं समाधान वाटे…पण चालायला गेलं तर ‘काही तरी राहून गेल्यासारखं’ फिलींग येत राही…आणि मग ही हत्यारं पुन्हा परजली जात.
पण यातलं एक अस्त्र मात्र अगदी उपयोगाचं असे…कानकोरणं. दुधारी शस्त्र. उपयोग चुकला की जग आपल्यासाठी मुकं होण्याची शक्यता खूप जास्त. याच्या टोकाला खोलगट वाटीसारखा एक भाग असतो. कानात ही वाटी अलगद सरकवावी लागे आणि अंदाजाने कान ‘कोरला’ जाई. पाषाणातून मूर्ती कोरणा-या कलावंतासारखंच पूर्ण एकरूप होऊन हे काम करावं लागे. यात जवळपास कुणीही असता कामा नये…धक्का लागी बुक्का !
कानकोरण्याच्या या वाटीमध्ये जमा होऊन आलेला मळ वाटीतून कोरून काढावा लागे आणि त्याचं नेमकं करायचं काय याचा विचार आधीच न करून ठेवल्यामुळे मग त्याची विल्हेवाट लावणं मुश्किल व्हायचं.
काही लोक या कानकोरण्याला कापसाचा बोळा लावून कानकोरणं कानात घालत. हेच पाहून कंपनी वाल्यांना प्लास्टीकच्या काडीला मेडिकेटेड कापूस बोंड लावून बड (म्हणजे कळी) लावण्याची कल्पना सुचली असावी. पण ही बड नीट नाही वापरली तर इतरांची बडबड ऐकू येण्याचा प्रसंगही उदभवत येऊ शकतो. कानकोरण्याची एकच बाजू वापरता येते…बड मात्र दोन्ही बाजूंनी कान टवकारून उभी. मात्र या कळीवरचा मळ काढून टाकण्याची सोय मुद्दामच केली नसावी. वापरून झालं की सरळ फेकून द्यायचं. नाचकिन मात्र वापरलं आणि ठेवून दिलं की पुरे. मात्र ही वस्तू शेजारी पाजारी हक्काने मागून घ्यायची वस्तू म्हणून घेऊन जात आणि मागितल्याशिवाय परत करण्याची परंपरा नसते! कुणी मागितलीच तर उद्या आमचं आमचं विकत घेऊन येऊ…त्यात काय एवढं, असं ऐकून कानातला मळ आणखीन घट्ट होत असे. असो.
नाचकिन फेकून देण्याची गरज नसे…पण जॉन नावाच्या कुणा इसमाच्या मुलाने तयार करून दिलेले हे काडीपैलवान फेकून दिल्याशिवाय पर्याय नसतो. समुद्रात जो कचरा बाहेर काढला जातो..त्यात सर्वांत जास्त कचरा ह्या कापूसधारी काड्यांचा असतो युरोपात…असं म्हणतात.
कान कोरताना एक अनुभव निश्चित येतो…तो म्हणजे खोकला ! काय असेल ते असो…मात्र मानेवरील जे अवयव असतात ते एकमेकांशी अत्यंत जवळचे संबंध ठेवून असतात. कानांच्या आत कुणी खाजवलं की घशाला त्याची संवेदना जाणवते आणि मग थोडं थांबून कान कोरण्याचा खो खो पुन्हा खेळायला सुरूवात करावी लागते. कान कोरताना जास्त जोर लागला की तिथली खेळपट्टी खरवडून निघते आणि मग शब्दांचे चेंडू स्पिन व्हायला लागतात या खेळपट्टीवर पडलेले. म्हणून खूप हळूवार फलंदाजी करावी लागते…राहूल द्र्विड सारखी. पण आधुनिक वैद्यकशास्त्र हा द्राविडी प्राणयाम करू नका असं सुचवते…अगदी बरोबर! पण बडने कान कोरण्यात तसे कमी थ्रील असते म्हणून बरेच दिवस ऐकतच नव्हते डॉक्टरांचे. आणि शिवाय या बडचा कापूस कानातच राहून गेल्याच्या केसेस सापडतात खूप…म्हणून लोकांना कान कोरणं बरं वाटायचं. कान कोरणं ते शेवटी कान कोरणं. कोणतीही किल्ली चालते लोकांना कानात घालायला. काही बहाद्दर तर काडेपेटीतली गुलाची काडीही आत घालायला कमी करीत नाही. कानात मळाचा खडा झालेला असेल आणि त्या खड्यावर हा गुल घासला गेला तर केवढा जाळ निघेल ना? आणि नंतर घरचे कानाखाली काढतील तो जाळ असेल तो वेगळाच.
(हाताच्या) बोटांचा वापर कानात घालण्यासाठीही होतो. फक्त अंगठा,मधले बोट याला अपवाद. करंगळीला प्राधान्य कारण ती बिचारी काहीशी सडपातळ असते बहुतेकांची. पण बोटांनी कानात गेलेलं आणि तिथंच रेंगाळत राहणारं पाणी बाहेर निघू शकतो…पण त्यासाठी कानाची फार कानधरणी करावी लागते. हे पाहणं मात्र नयनरम्य असते….ज्या वेगाने बोटाची हालचाल करावी लागते, मान एका बाजूला खाली घालावी लागते…सर्वच प्रेक्षणीय! पण ते पाणी बाहेर पडताना कानांना मिळणारं सुख दैवी. हल्ली यासाठी अनेक स्वयंचलित यंत्रे मिळतात म्हणे. पण अजून या गोष्टी ब-याच लोकांच्या कानावर आलेल्या दिसत नाहीत.
हलक्या कानाचे लोक या इशा-याकडे डोळेझाक (की कान झाक?) करू शकतील…पण कानातील मळ हा जबरदस्तीने काढण्याचा पदार्थ नव्हे…तो आपल्या मनाने हळूहळू बाहेर येतोच. तो गोडीगुलाबीने काढून घ्यायचा पदार्थ आहे…एखाद्याकडून आपण त्याची सिक्रेटस काढून घेतो तशी. तशीही मळ ही ‘सीक्रीट’ होणारी गोष्ट आहे..म्हणजे स्रवणारी! .कानांना निसर्गाने दिलेलं संरक्षण आहे मळ म्हणजे! (यह) मैल अच्छा होता है! आपल्याकडे कानांत तूप किंवा तेल त्यात लसणाची एखादी पाकळी घालून,थोडंसं गरम करून आणि थंड करून,कापसाच्या बोळ्यानं घालण्याची पद्धत आहे. त्यानं नेमकं काय होतं हे डॉक्टरांना विचारायला पाहिजे….पण फारसं नुकसान झाल्याचं कानावर नाही आलेलं अजून. काही लोक आपल्या हाताच्या बोटांची नखे कानात घालतात…खूप वाईट्ट आहे हे…पण त्याने बरे वाटत असेल तर आपण कशाल कुणाचे कान भरा? भिंतीला असलेलं कान कशाने बरं कोरत असतील असाही प्रश्नच आहे. या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही असं कसं बरं शक्य आहे. पण निसर्गाने दोन्ही कानांचा एकमेकांशी काहीहे संबंध ठेवला नाही ते एक बरे आहे. एक खराब झाला तरी दुसरा सगळ्यांचं ऐकून घ्यायला तयार. दोन कान शेजारी पण भेट नाही संसारी हेही खरेच.
कानकोरणं आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एखादं घरात किल्यांच्या जुडग्यात असेल तर काढून हुकला अडकवून ठेवा….पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी. फक्त ते कानांत घालायचं नाही (आणि इतरही काही…पेंसिल,पेन इत्यादी) एवढी गोष्ट मात्र या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ नका !
सहज वाटलं म्हणून तुमच्या कानावर घातले झालं ! वाटल्यास कर्णोपकर्णी होऊन जाऊ द्या !
वयाच्या एका टप्प्यावर माणसाला तटस्थता येते. आयुष्यभर माणसांचे, नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रगल्भता आलेली असते. प्रत्येक गोष्टीकडे, घटनेकडे, प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. घडून गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन करता येते. हे खरंच घडलं का? मग घडलं तर का घडलं? आपलं काय चुकलं? ह्याचा विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते. साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग आता येत नाही. मनःशांती मिळायला सुरुवात होते. कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट, हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची, ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच आपल्याला मिळालेले असते. एखाद्या घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे? ती महत्वाची आहे का? आपल्या मताची गरज आहे का? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात, त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.
आता वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. आपले कोण, परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं, ती माणसे आता दुरावलेली असतात. आपल्याला हवं तशी माणसे वागतच नाहीत, हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझं हळूहळू कमी होत जातं आणि एक अंतर आपोआपच तयार होतं . हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर असतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणं कमी होते. कर्तव्यभावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते. त्यामुळे तटस्थता येते.
आपल्या आजूबाजूचा गोतावळा आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर होतं. हा एकटेपणा जास्त सुंदर असतो. जग जास्त सुंदर दिसायला लागतं. खरं म्हणजे ते सुंदर होतंच; पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक उमेद देते. कारण आता कसलंही ओझं नसत. कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते, कोण काय म्हणेल, ह्याची भीती नसते. आपण कुणाला बांधील नसतो. आपल्या कर्तव्यातून आपण मोकळे होऊ शकत नाही; पण दूर राहून ती करू शकतो, हे अनुभवायला येते. ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो, त्या गोष्टी किती फोल होत्या, हे कळते. त्यामुळे आत्मपरीक्षण केलं जातं .
नव्या आयुष्याला सुरुवात होते. आता माहीत झालेलं असतं की कसं जगलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि काय करू नये. त्यामुळे आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आलेली तटस्थता ही छान वाटू लागते. हे ज्याला कळलं/उमगलं ती व्यक्ती खरंच भाग्यवान.
तर, काहींचे आयुष्य मात्र ‘आम्ही अजूनही शिकतोय !’
आधीच्या पिढीकडून पैसे वाचवायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून पैसा वापरायला शिकतोय.
आधीच्या पिढीकडून सहवासाने नाती जपायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून डिजिटली नवीन नाती जोडायला शिकतोय.
आधीच्या पिढीकडून मन मारून जगायला शिकलो;
नंतरच्या पिढीकडून मन भरून जगायला शिकतोय.
आधीच्या पिढीने, Use and use more मधली उपयुक्तता शिकवली;
नंतरच्या पिढीकडून Use and throw मधली नावीन्याची गंमत अनुभवायला शिकतोय.