आपण जेवढी बडबड लोकांशी दिवसभर करतो ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त मनातल्या मनात करतो..
बघा हं…
(सकाळचा अलार्म झाल्यावर)
यार्रर्रऽऽऽ झाली लगेच सकाळ..
आत्ता तर डोळा लागला होता..
(ब्रश करताना)
काय भाजी बनवू आता..?
(गॅस जवळ आल्यावर)
एवढीच झाली भाजी…! पोरं खातील की नाही देव जाणे…
(आंघोळीला जाताना)
कोणता ड्रेस घालू याऽऽऽऽर… सापडत नाही एकही जागेवर… निळ्यानी गरम होईल.. काळा कालच घातला.. पांढरा पावसाने खराब होईल… जाऊ दे पिवळा अडकवते… (त्यात एखादा कपडा अंगावर पडतो… तेव्हा कपड्यांनाही आपण बोलतो..)
या… या.. आता माझ्या अंगावर, पडा एकदाचे.. नाही, या ना या.. कितीही आवरा… पुन्हा तेच!
(घरातून निघताना)
×××ला, काय घड्याळ पळतंय… कितीही लवकर उठा, तीच बोंब…
(रेडिओ बंद करताना, भीमसेन जोशींचा अभंग चालू असतो)
पंडितजी, तुम्ही कसलं भारी गाताय! पण माफ करा, मला जावं लागेल आता.. सात वाजलेत..
(गाडी चालवताना – एखादा ओव्हरटेक करत असेल तर..)
“नाही, ये ना ये… घाल माझ्या अंगावर एकदाचा… तूच राहिला होतास.. कुठं झेंडे गाडायचेत देव जाणे…. तूही यमसदनी जा आणि मलाही ने….
(खूपजण बॅक मिरर मधून मागे बघत असतात…. तेव्हा)
अरे बाबा काय बघतोस मागे? दोन दोन पोरांची आई आहे मी… चल नीघ पुढं…
(शाळेत पोचल्यावर)
हुऽऽऽऽऽऽश्…. झालं एकदाचं टाईममधे इन.. झालं… देव पावला..
(लिफ्ट बंद असेल तर)
नाही बरोबर आहे देवा…. माझ्या वेळीच तू लिफ्ट बंद करणार… घे अजून काबाडकष्ट करुन घे माझ्याकडून… हाडं मोडून जाऊ देत माझी…
(जेवताना)
किती लवकर ब्रेक संपतो… भारत सरकारने निदान जेवायला तरी नीट वेळ द्यावा..
(दुपारी पाठ टेकवताना)
×××ला कंबरडं मोडतं का काय देव जाणे एखादं दिवशी…. टेकली एकदाची पाठ बाबा….. देवा..
(चहाच्या वेळी)
कोणी एखादा कप चहा करुन देईल तर शपथ….. वॉकिंग करावं लागेल.. ढिगभर वजन वाढतंय… या वजनाचं एक काय करावं.. देव जाणे…
(वॉक करताना)
आताच फोन उरकून घ्यावेत, वॉकिंग टाईम पण लवकर संपतो…..
एखादी बाई फास्ट वॉक करत असेल तर..
नाही जा अजून जोरात, करा वॉकिंग, मला काही फरक पडत नाही… कुणाकुणाला माधुरी दीक्षित बनायचंय? बना.. मला काही फरक पडत नाही..
(संध्याकाळी स्वयंपाक करताना)
एखाद्या दिवशी पण कुणी म्हणत नाही..
आज काऽऽऽऽऽऽऽही करु नको..
अजिबात भूक नाही…. एवढी भूक लागतेच कशी माणसाला?
(किचन आवरताना)
नाही आवरतेना… मीच आवरते… सगळं मीच करते…. कुण्णी काही करु नका.. बसा सगळे सोफावर….. सिंहासन आणून देऊ का…??
(झोपताना)
आता कुणीही माझ्या खोलीत टपकू नका तासभर….. जरा बघू द्या मोबाईल मला.. इतके मेसेज येतात, एक धड वाचून होत नाही….
(दुसऱ्याचे स्टेटस बघून)
यांना बरा भटकायला वेळ मिळतो.. इथं मला मरायला फुरसत नाही….
काय बाबा, हल्ली तर कुणी काही पण कपडे घालतं….
(झोप आली असताना)
झोपा बाबा आता…. पुन्हा पाचला उठायचं आहे….. सुट्टी नाहीये उद्या… परिक्षा चालू आहेत, वेळेच्या आधी तडमडावं लागेल..
(आणि मध्यरात्री जाग आल्यावर)
बापरे, तीन वाजले…? दोन तासात उठायचंय… झोपा पटकन् थोडा वेळ..
……..
लेखक : अज्ञात.
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
मो – 9421053591
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-2” ☆ श्री वि. दा.वासमकर☆
(सारांश सतराव्या शतकामध्ये रामदास स्वामींनी घरामध्ये पोरवडा वाढविण्याचे दुष्परिणाम अत्यंत परखडपणे वर्णन केले आहेत.)
आता ग. दि. माडगूळकरांची ‘आकाशाची फळे’ या कादंबरीचा विचार करूया. ग. दि. माडगूळकर हे मराठी साहित्यविश्वाला गीतकार, पटकथाकार, आणि ‘गीतरामायण’ या अजरामर काव्यग्रंथाचे निर्माते म्हणून परिचित आहेत. किंबहुना ‘गीतरामायणा’च्या निर्मितीने त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून समाजात आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांची ‘आकाशाची फळे’ ही कादंबरी त्यांच्या पद्य साहित्याइतकीच महत्त्वाची आहे या कादंबरीचा आशय लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम वर्णन करणारा आहे. ही कादंबरी 1960 मध्ये प्रकाशित झाली. आणि 1961 मध्ये या कादंबरीचे महत्त्व जाणून प्रपंच हा सिनेमा मराठी मध्ये निघाला आणि तो महाराष्ट्र सरकारने गावोगावी मोफत दाखविला.
आता या कादंबरीचा आशय थोडक्यात पाहू. विठोबा कुंभार व पारू यांच्या कौटुंबिक जीवनाची ही कथा आहे. त्यांचा दरिद्री फटका संसार आणि सहा मुले यामुळे विठोबा कर्जबाजारी झाला आहे. आणि त्यातूनच तो आत्महत्या करतो. शहरात बरीच वर्षे राहिलेला आणि कुंभारव्यवसायाचे आधुनिक शिक्षण घेतलेला विठोबाचा भाऊ शंकर याच्यावर त्याच्या भावाच्या म्हणजे विठोबाच्या कुटुंबाची जबाबदारी येते. भावाच्या कुटुंबाला सुखी करण्यासाठी आपण लग्न करणार नाही, अशी प्रतिज्ञा तो करतो. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसतो. आणि आजारी पडतो. आपल्या दिराने आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या कुटुंबासाठी झिजणे हे सहन न होऊन आपल्या आजारी दिराला म्हणजे शंकरला चंपाच्या हवाली करून पारू मुलांसह दूर निघून जाते. शेवटी शंकर आणि चंपाच्या लग्नासाठी ती परत येते. इत्यादी घटना प्रसंग या कादंबरीत येतात. या कादंबरीत इतरही उपकथानके येतात आहेत. चंपा आणि तिचे वडील रामू तेली यांचे कुटुंब रामू तेल्याच्या पिठाच्या गिरणीचा आणि तेलाच्या घाण्याचा व्यवसाय आहे. तेलाच्या व्यवसायामुळे त्याचे कुंभार हे आडनाव मागे पडून तो रामू तेली म्हणूनच ओळखला जातो. आपल्या मुलीला म्हणजे चंपाला त्याने मुलासारखेच वाढवलेले असते. चंपाला शंकरबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे. मात्र शंकर आपल्या भावाच्या कुटुंबासाठी लग्न करायला तयार नसतो. त्यामुळे चंपा आणि रामू तेली दोघेही कष्टी होतात. गावात जगू शिंपी आणि त्याची बायको राधा यांचे कुटुंब आहे. या दांपत्याला अपत्यहीनतेचे दुःख जाळीत असते. त्यांच्या जीवनात बाकेबिहारी या ढोंगी साधूचा प्रवेश होऊन राधा या ढोंगी साधूबरोबर पळून जाते. जगु शिंप्याला एकट्यानेच भयानक आयुष्य जगावे लागते. शंकरचा बालमित्र रघू आणि त्याची बायको सरू यांचा दारिद्री संसार हे आणखी एक छोटे उपकथानक या कादंबरीत येते. वडगावच्या बाजारातील जोशी काका, गफूर भाई हे विठोबाच्या व्यवसायातील सहकारी. यातील जोशी काकांचे मोठे कर्ज विठोबाने घेतले असून ते त्याला फेडणे अशक्य झाल्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग पत्करला. या सर्वांच्या जोडीला शंकर आणि चंपा यांची अव्यक्त स्वरूपातील प्रेमकहाणी या कादंबरीत महत्त्वाची जागा व्यापते. मात्र कादंबरीचे शीर्षक ‘आकाशाची फळे’ हेच या कादंबरीचे सर्वात महत्त्वाचे आशयसूत्र आहे. विठोबा आणि पारूची जोडी प्रातिनिधिक स्वरूपाची आहे. त्या काळात 1960 च्या दरम्यान शिक्षणाचा प्रसार तितका झालेला नसल्यामुळे कुटुंब नियोजनाच्या बाबतीत भारतीय समाज अजून बराच मागासलेला होता. कुटुंबात वाढणारी मुलांची संख्या दारिद्र्याला कारणीभूत होते, हेच सामान्य माणसाला कळत नव्हते. उलट मुले म्हणजे देवाची देणगी, या देणगीला नकार देणे म्हणजे दैवाच्या विरोधी जाणे असा समज सार्वत्रिक होता. शिवाय देवाने जन्म दिलाय म्हणजे त्याच्या अन्नाची योजनासुद्धा देवाने केलेली असतेच. इत्यादी गैरसमज रूढ असल्यामुळे गरीब दरिद्री कुटुंबाला अपत्यांची वाढ हानिकारक असते हे समाजमनाला कळत नव्हते. याचेच प्रातिनिधिक चित्रण ग. दि. माडगूळकर यांनी या कादंबरीत विठोबा कुंभार आणि त्यांच्या कुटुंबाच्या द्वारे केले आहे.
आता या कादंबरीतील काही विधाने पाहू. घरात पोरांचं लेंडर झाल्यामुळे सगळ्यांना एखादी गोष्ट वाटायची म्हटले तर ते अवघड होते. विठोबाची पोर सहा. त्यांना एखादी खायची गोष्ट मिळाली तर ती त्याच्यावर कशी तुटून पडतात, याचे वर्णन माडगूळकरांनी अत्यंत प्रत्ययकारी रीतीने केले आहे. ते असे – ‘गोविंदाने नारळ पाट्यावर आपटला… त्याची दोन छोटी भकले इकडे तिकडे उडाली. ती उचलण्यासाठी गोप्या आणि सद्या यांची झोंबाझोंबी झाली. दोघांच्याही हाती एकेक तुकडा आला. ते तुकडे दातांनी खरवडत आणिकासाठी ती गोविंदाच्या पाठीमागे येऊन उभी राहिली. दरम्यान गोविंदाने एक मोठा खोबळा करवंटीपासून वेगळा केला. तो दातात धरला आणि दुसरे भकल तो कंगोरा गवसून पाट्यावर आपटत राहिला. म्हातारी नुसतीच ओठाची चाळवाचाळव करीत होती. तिच्या हाती काहीच आले नव्हते. गोविंदाने उरलेले खोबरे करवंटीपासून मोकळे केले न केले तोवर उरलेली दोघे त्याच्यावर तुटून पडली. बघता बघता नारळातील खोबरे वाटले गेले. आणि नरट्या इतस्ततः झाल्या. लटलट मान हलवीत म्हातारी म्हणाली, ‘मला रे गोविंदा-‘ माडगूळकरांच्या या निवेदनातून घरात पोरवडा असला की, कशी दुरवस्था होते, याचा प्रत्यय येतो.
देवळातील हरदासाने कृष्णाष्टमीचा प्रसाद म्हणून पारूच्या ओटीत नारळ घातला. बाळकृष्णाच्या पाळण्यातील नारळ पारूच्या ओटीत आला म्हटल्यावर विठोबाच्या आजीला आनंद होतो. ती म्हणते औंदाच्या सालीबी एक परतवंडं होणार मला. आणि विठोबाचा थंडपणा पाहून ती पुढे म्हणते- असं कसं बाबा देवाची देणगी असती ती. बामनवाड्यातली शिंपीन बघ नागव्याने पिंपळाला फेऱ्या घालते. तिचा कुसवा उजवला का? कुत्री मांजर पाळती ती अन् लेकुरवाळेपनाची हौस भागून घेती ! तुज्यावर दया हाय भगवानाची .
विठोबाच्या आजीच्या तोंडात आणखीही काही विधाने माडगूळकरांनी घातली आहेत. ती अशी- १) ज्यानं चोंच दिली, त्यो चारा देईल ; २) असं म्हणू नये इटूबा. देवाघरचा पानमळा असतोय ह्यो. ३) जे जे प्वार जन्माला येतं ते आपला शेर संगती आनतं. आंब्याच्या झाडाला मोहर किती लागला हे कुणी मापतं का?; पाऊस दर साल येतो पर कुणब्याला त्याचं कौतुक असतंच का नाही !;
विठोबाच्या आजीच्या या विधानांतून मुले ही देवाची देणगी असते. त्याला नाही म्हणता येत नाही; अशी समजूत व्यक्त होते.
ग दि माडगूळकर यांनी या कादंबरीच्या शेवट करताना या कादंबरीतील एक पात्र नारायण गिरी याच्या तोंडी एक अभंग लिहिला आहे. तो असा-
हाती नाही बळ दारी नाही आड/त्याने फुल झाड लावू नये/
सारांश समर्थ रामदास आणि ग. दि. माडगूळकर यांनी आपल्या साहित्यकृतीतून लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम स्पष्ट शब्दांत वर्णिले आहेत. साहित्य या कलेत समाजमनावर परिणाम करण्याची प्रभावी शक्ती असते. या शक्तीने आपल्या देशातील जनता सुबुद्ध होऊन हा लोकसंख्यावाढीचा भस्मासुर जाळून टाकतील अशी आशा करूया !
☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –5 ☆ श्री सदानंद आंबेकर☆
२७ जून :: झाला जन्म सुफळ– झाले विठ्ठलाचे दर्शन – पंढरपुर : अंतर २२.३१ कि. मी.
आता तो दिवस उजाडला ज्याची प्रतीक्षा मला होती। खूप वर्ष आधी विद्यार्थी जीवनांत पंढरपुरला आलो होतो. पण आजची वेळ एकदम विशिष्ट होती। वारीचा अर्थ आम्हाला पहिल्या दिवशी सांगितला गेला होता, तो म्हणजे ‘ प्रतिकूलतेतून अनुकूलता शोधणे।’ आध्यात्म क्षेत्रात यालाच तितिक्षा, (तपस्या नाही बरं का) असे पण म्हणतात। तर इतके श्रम करून आज देवदर्शन होणार हे खास होते। आज आम्ही भंडीशेगाववरून काल जसे आलो तो मार्ग न धरता, गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे थेट पंढरपुर येईल असा रस्ता धरला। इथे गर्दी पण अजिबात नव्हती अन् सडक पण खूप छान पक्की होती। आसपास उसाची शेते, द्राक्षांचे बगीचे, टयूबवेलची स्वच्छ जलधार हे सगळं बघत सुमारे अकरा वाजता पांडुरंगाच्या नगरीत आलो।
आमच्या वेळापत्रकाप्रमाणे २७ते ३० ता.पर्यंत पंढरपुरला राहता येणार होतं. पण एक दिवसानंतर एकादशी होती. तेव्हा येथे लक्षावधी लोक असतील तर देवाचे दर्शन तर नाहीच, पण कळस दर्शनसुध्दा कठीण होणार होते. म्हणून आम्ही आजच देवळात जायचे ठरवले। यात्रा सूचनांप्रमाणे मला माहिती होते की वारकरी फक्त कळस – दर्शन करतात. पण आज तर कमी गर्दी असल्यामुळे देवळात जाणं शक्य होतं।
शहरात खूप आत जाऊन जेव्हा पहिल्यांदा देवळाच्या नावाचा बोर्ड लांबूनच दिसला तेव्हा माझी जी मनःस्थिति झाली ती शब्दात सांगू नाही शकणार। मला असे वाटले की मी काय करू शकलो। पुण्याहून पंढरपूरपर्यंत पायी – हे सत्य आहे ?????? असं वाटलं की मी काय प्राप्त केलं, काय मी एवरेस्टवर पोहोचलो ? मी हे करू शकलो तर ते कसं इत्यादि !! नंतर आम्ही लांबून जे मुखदर्शन होते ते करायचं ठरवलं कारण प्रत्यक्ष दर्शनाकरिता खूप तास लागतील अशी सूचना मिळाली। सुमारे दीड किमी लांब रांगेत उभे राहिलो. पण हे चांगलं होतं की ती रांग सतत चालत होती. त्यामुळे ठीक एक तासात आम्ही देवळाच्या आत होतो। प्रचंड गर्दीचा दाब असल्यामुळे क्षणार्धात आम्ही तिघांनी दर्शन घेतलं. पण विठ्ठलाच्या देवळात मला शिपायानी जो धक्का मारून बाहेत केलं त्यामुळे पहिल्यांदा मी देव प्रतिमा बघूच शकलो नाही. मग बाहेर आल्यावर माझ्या ताईनी पुन्हा आत जायला सांगितले। दारातून उलटं जाणं फार कठीण होतं. पण देवकृपा झाली, एका सेकंदाकरिता गर्दी एकदम थांबल्यासारखी झाली, दार मोकळे होते. मी पटकन् आत शिरलो आणि देवाचे अगदी मन भरून दर्शन घेतले आणि नंतर रखुमाईच्या देवळांत दर्शन घेतले।
बाहेर आल्यावर प्रसादाच्या वस्तू, आणि लोकांना आठवण म्हणून द्यायला देवप्रतिमा इत्यादि घेतल्या। देवळात आत काहीच नेणं शक्य नाही म्हणून हे सगळं नंतर घ्यावं लागलं। आता मन एकदम तृप्त होते। एक फार मोठं लक्ष्य प्राप्त केलं असा भाव मनात होता।
या नंतर आम्ही आमच्या आजच्या ठिकाणावर गेलो। ही पण एक भली मोठी शाळा होती. तेथे आमच्याशिवाय इतर अनेक दिंडया आल्या होत्या। संध्याकाळ व्हायला लागली होती नि काही वारकरी परतीच्या प्रवासावर निघत होते। आम्ही पण आपलं सामान व्यवस्थित एकत्र जमवून घेतलं, कारण आज रात्री आमची पण मुंबईकरिता गाडी होती। वेळ होती हरिपाठाची, त्याप्रमाणे सौ माईनी हरिपाठ घेतला आणि आता वेळ होती सगळयांशी बिदाई घ्यायची। किती तरी उच्चशिक्षित, उच्च पदस्थ वारकरी आले होते पण त्यांचं दोन हप्त्यांचं हे प्रेम, ती चोवीस तासांची साथ, आता कसं वेगळं व्हायचं ?? भरलेल्या मनानी मी सर्वाना भेटलो, वाटलं आपल्या आप्तजनांपासून लांब होतो आहे। सौ माईसाहेबांनी प्रसाद दिला, दिंडी प्रमुखांचा निरोप घेतला। आमच्या दिंडीत एक गृहस्थ सिडनीहून आले होते. त्यांना भेटलो तर त्यांनी सिडनी ला यावे आणि त्यांच्या घरीच थांबायचं असा प्रेमळ आग्रह केला। इतरांनीसुध्दा आपापल्या गावी यायचे आमंत्रण दिले। दिंडी व्यवस्थापन टीमच्या सर्व बंधुंना भेटून सर्वात शेवटी त्या शाळेला नमस्कार करून आम्ही स्टेशनकडे प्रस्थान केले।
शेवटी :: माझे मनोगत :
या यात्रेत काही गोष्टी मला आढळल्या, त्यांचा उल्लेख येथे करणे म्हणजे निंदा किंवा दोषदर्शन करणे नव्हेच.पण वारीसारख्या पवित्र कार्याच्याबाबतीत यात सुधारणा झाली तर उत्तम। रस्त्यात जिथे-जिथे गावात अन्न-जल आदिचे मोफत वाटप व्हायचे, तिथे दिसणारा प्रचंड कचरा, लोकांनी एक घास खाऊन फेकून दिलेल्या भरलेल्या पत्रावळींची घाण, हा अन्नाचा अनादर, जागोजागी रिकाम्या, अर्ध रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा कचरा, केळाची सालं, हे पाहून वाटायचं की हे सगळं आपण व्यवस्थित नाही करू शकत का ? दुसरे असे की तीर्थयात्रेमधे चालत असतांनासुध्दा तंबाखू आणि बीडी सिगरेटचा प्रचंड वापर… तो टाळू शकत नाही का ?
ज्या मार्गावरून माऊलींची पालखी येत आहे त्यावर सगळीकडे तंबाखूची पिचकारी असावी का? आमच्या दिंडीत सुध्दा मी एका वारकऱ्याला सिगरेटचा वापर करतांना बघितले। निदान दोन हप्ते तरी हे बंद ठेवावे, हे विचारणीय नाही का ? पुढे असे की पूर्ण प्रवासात प्रत्येक गावात मांसाहार आणि परमिट रूम ची सोया असणारी खूप हॉटेल्स दिसली। देवकृपेने मी भारतात खूप यात्रा केल्यात. पण ज्या प्रमाणात इथे ही सामिष हॉटेल दिसली तितकी इतर कुठे नाही दिसली. असं नाही की तिथं मांसाहार किंवा मद्यपान मुळीच होत नाही, पण इथे प्रमाण जास्त दिसलं। आपली संस्कृति तर देवदर्शनाच्या वेळी कांदा लसूण सुध्दा वर्ज्य करते- पण असो, ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे। मी नुसते जे पाहिले ते व्यक्त केले. आलोचना करण्याचा माझा हेतु अजिबात नाही। क्षमस्व !!
पंढरपूरची आषाढी वारी म्हणजे तीर्थयात्रा, पुण्याईची संधी, सेवा-साधना करायची वेळ, असे मला वाटले। आता पुढल्या वर्षी मला जायला मिळते की नाही हे आज सांगणे कठीण आहे. पण या वेळेचा मधुर स्मृतींचा सुवास जीवनात दरवळत राहणार हे मात्र नक्की। दिंडीमधला तरुण वय ते सत्तर अधिक वर्षाच्या वारकऱ्यांचा स्नेह सतत मला जाणवत राहणार। ज्याला जमेल त्याने एकदा तरी हा अनुभव घ्यावा असा माझा विचार।
मी हे जे लेखन केले ते फक्त यात्रेची विस्तृत माहिती इतरांना मिळावी, आणि आठवणींचा संग्रह असावा याकरिता। लेखन किंचित मोठे झाले आहे, पण हा मोठ्ठा अनुभव कमी शब्दात तरी कसा लिहून होऊ शकणार? माझी मराठी येवढी उत्कृष्ट नाही, कारण मी मराठी असलो तरी, तीन पिढ्यांपासून हिंदी प्रांतातच माझे वास्तव्य झालेले आहे. तरी एक छोटासा प्रयत्न केला आहे तो गोड मानून घ्यावा ही विनंती। वर दिलेले रस्त्यांचे अंतर माझ्या गूगल एप चे आहेत, ते फक्त सांकेतिक मानावे।
वारीच्या पहिल्या दिवशी आळंदीत सौ माईंनी म्हटलेच होते की ‘ही यात्रा म्हणजे ईश्वराची, गुरुची कृपा, आई वडिलांची पुण्याई‘… म्हणून परमपिता विठ्ठल-रखुमाई, सर्व सहवारकरी बंधु भगिनी आणि ‘ संत विचार प्रबोधिनी दिंडी ‘ चे खूप आभार। ईश्वर आपणा सर्वांना खूप प्रसन्न, स्वस्थ आणि सुखी ठेवो ही प्रार्थना।
(या वर्षीपासून तीन ऑगस्ट हा राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून पाळावा असे केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने आवाहन केले आहे. त्यासाठी नेत्रदान, त्वचा दान, देहदान व अवयवदान याविषयी शक्य तितक्या सोप्या भाषेत या विषयाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठीचा हा प्रयत्न आहे.)
प्रथम हे जाणून घेतले पाहिजे की अवयवदान आणि देहदान असे या विषयाचे दोन भाग आहेत. अवयवदान आणि देहदान हे विषय एकमेकांपासून वेगळे आहेत. जेव्हा आपण अवयवदान करतो तेव्हा देहदान होऊ शकत नाही आणि जेव्हा देहदान करतो तेव्हा शरीराच्या अंतर्गत अवयवांचे अवयवदान होऊ शकत नाही. मुळातच देहदान आणि अवयवदान या दोन वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये करण्याच्या गोष्टी आहेत. अवयवदान हे एखादी व्यक्ती जिवंतपणी काही मर्यादित स्वरूपात व मेंदू मृत झाल्यानंतर विस्तृत स्वरूपात करू शकते. देहदान हे नैसर्गिक मृत्यूनंतर म्हणजेच हृदयक्रिया बंद पडून झालेल्या मृत्यू नंतर करता येते. अशावेळी देहदान करण्यासाठी देह वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूनंतर सहा तासांच्या आत पोहोचवावा लागतो. तत्पूर्वी फक्त नेत्रदान आणि त्वचादान होऊ शकते. अवयवदानाच्या बाबतीत मात्र अवयवदान हे जिवंतपणी आणि मेंदूमृत अशा दोन्ही परिस्थितीत होऊ शकते. याबाबत आपण विस्तृत पणाने जाणून घेऊया.
जिवंतपणी कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या नातेवाईकांना काही अवयवांचे दान करू शकते ते अवयव म्हणजे
१) दोन पैकी एक किडनी म्हणजेच मूत्रपिंड.
२) लिव्हरचा म्हणजेच यकृताचा काही भाग.
३) फुफ्फुसाचा काही भाग,
४) स्वादुपिंडाचा काही भाग,
५) आतड्याचा काही भाग.
६) गर्भाशय
कोणत्याही व्यक्तीचे आयुष्य एका किडनी वर म्हणजेच मूत्रपिंडावर व्यवस्थित व्यतीत होऊ शकते. त्यामुळे एक किडनी दान केल्याने त्याला कोणताही शारीरिक धोका संभवत नाही. त्याच प्रमाणे इतर ज्या अवयवांचे काही भाग आपण दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित करतो ते अवयव दोन्ही शरीरात काही कालावधीनंतर पूर्ण आकार धारण करून संपूर्ण पणे कार्यरत होतात. तशी शक्यता असेल तरच डॉक्टर अशा अवयवांचा काही भाग काढून घेण्यास मान्यता देतात. त्यामुळे एखाद्याच्या शरीरातून असे काही भाग काढून घेतल्यास त्याला पुढील आयुष्यात कोणताही शारीरिक धोका संभवत नाही.
एखाद्या स्त्रीचे गर्भाशय चांगल्या रीतीने कार्यरत असून त्या स्त्रीला पुढे मूल नको असल्यास त्या स्त्रीच्या शरीरातून गर्भाशय काढून ज्या स्त्रीच्या शरीरात गर्भाशय नाही किंवा असलेले गर्भाशय नीट कार्यरत होऊ शकत नाही अशा स्त्रीच्या शरीरात ते प्रत्यारोपित करता येते व त्यामुळे त्या स्त्रीला मूल होऊ शकते.
जिवंतपणी वरील प्रमाणे सर्व अवयव दान करून गरजू रुग्णाच्या आयुष्यात आनंद फुलवता येतो आणि दात्याला कोणताही शारीरिक धोका नसतो हे जाणून घेतले पाहिजे.
मृत्यूनंतर म्हणजेच ब्रेनडेड किंवा मेंदू मृत्यू नंतर. ( याला मस्तिष्क स्तंभ मृत्यू असेही म्हणतात) हा मृत्यू कसा होतो आणि कोणत्या परिस्थितीत होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मेंदू कार्य करणे बंद होते किंवा अपघातामुळे मेंदूला मार लागल्यावर मेंदूचे कार्य थांबते. किंवा मेंदूच्या खालच्या बाजूला मानेच्या पाठीमागे मस्तिष्क स्तंभ म्हणजेच ब्रेन स्टेम हा जो भाग असतो याला मार लागल्याने त्याचे कार्य बंद होते अशावेळी होणारा मृत्यू यास मेंदू मृत्यू किंवा मस्तिष्क स्तंभ मृत्यू असे म्हणतात. हा मृत्यू झाला हे कोणत्या परिस्थितीत समजते ते जाणणे आवश्यक आहे. मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ लागल्यानंतर प्रचंड डोके दुखू लागते. कधी कधी या डोकेदुखीने पेशंट बेशुद्धावस्थेत जातो, किंवा अपघातामुळे एखाद्याचे मेंदूला किंवा मेंदू स्तंभाला मार लागतो. या सर्व परिस्थितीत त्या रुग्णास त्वरित रुग्णालयात दाखल केले गेल्यास रुग्णालयामध्ये त्याला अतिदक्षता विभागात नेतात आणि व्हेंटिलेटरच्या सहाय्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात येतो. अशा वेळेला जर डॉक्टरांच्या लक्षात आले आणि जर काही विशिष्ट परीक्षणानंतर याची खात्री झाली की त्या व्यक्तीचा मेंदू किंवा मस्तिष्क स्तंभ कार्य करण्याचे पूर्णपणे थांबला आहे, तर त्या रुग्णाला मेंदू मृत असे घोषित करण्यात येते. मेंदू मृत म्हणजे मृत्यूच असतो.. तो अंतिम मृत्यूच होय. जरी कृत्रिम श्वासोच्छ्वासाच्या साह्याने रुग्णाच्या छातीची धडधड चालू असेल तरीही वेंटीलेटर काढल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू शंभर टक्के निश्चित असतो. अशा रुग्णाला मेंदूमृत म्हणतात. म्हणजे मेंदूमृत रुग्ण हा नेहमी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात व व्हेंटिलेटरवर असतो. विशिष्ट परीक्षणांद्वारे त्याचा मेंदू पूर्णपणाने कार्य करण्याचे थांबलेला आहे हे निश्चित करता येते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यावेळेला त्या रुग्णाच्या शरीरातील आठ ते नऊ अवयव एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात.
सुमारे चाळीस ते पन्नास अवयव हे एखाद्या रुग्णाच्या आयुष्यात त्याच्या अवयवाची कमी झालेली कार्यक्षमता वाढविण्यासाठी अथवा अवयवांमधे निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी प्रत्यारोपित करता येतात. त्यात प्रामुख्याने पुढील अवयवांचा समावेश होतो…….
दोन मूत्रपिंडे, यकृत, हृदय, दोन फुफ्फुसे, स्वादुपिंड, आतडी, नेत्र. काही अवयव दुसऱ्या रुग्णाच्या शरीरातील दोष दूर करण्यासाठी उपयोगी पडतात, उदाहरणार्थ हात (मेंदू मृत रुग्णाचे हात एखाद्या व्यक्तीच्या तुटलेल्या हातांच्या जागी प्रत्यारोपित करून नैसर्गिक हातांसारखे कार्य करू शकतात) गर्भाशय, कानाचे पडदे, हाडे, कूर्च्या, झडपा वगैरे.
वरील विवेचनावरून आपल्या लक्षात येईल की कोणत्याही प्रकारे व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे अवयव किंवा मृतदेह यांचा मानवी कल्याणासाठी उपयोग करता येतो. त्यामुळे प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विशेषत: वारस नातेवाईकांनी जर अवयवदान/ देहदान यास संमती दिली, तर अनेक रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या देशात दरवर्षी पाच लाख रुग्णांचा मृत्यू हा त्यांना प्रत्यारोपणासाठी अवयव उपलब्ध न झाल्याने होत असतो. यातले कित्येक मृत्यू आपण फक्त आपल्या संकल्पाने आणि आपल्या वारस नातेवाईक यांनी केलेल्या संकल्पपूर्तीने आपण वाचवू शकतो.
आज आपण अवयवदान / देहदानाचा संकल्प करूया आणि या संकल्पाची माहिती आपल्या कुटुंबियांना देऊन त्यांनाही या कार्यात सहभागी करून घेऊया. या माणुसकीच्या कार्यासाठी आपल्याला सजग राहता येईल आणि अनेकांचे प्राण वाचवले याचे पुण्य पदरी पाडून घेता येईल. दरवर्षी येणारा हा ‘अवयवदान दिन ‘ ही त्याची सुरुवात करण्याची नांदी ठरावी. ज्यांनी असे संकल्प केले नाहीत त्यांनी त्याची सुरुवात करावी, ज्यांनी केले आहेत त्यांनी हा विचार आपल्या कुटुंबात, नातेवाईकांमध्ये व सर्व समाजात पसरवून त्यांचे प्रबोधन करावे. हे आवाहन माणुसकी असणाऱ्या प्रत्येक सजग नागरिकास मी करीत आहे.
(अवयवदानाचा संकल्प नोटो या केंद्र सरकारच्या संस्थेच्या वेबसाइटवर जाऊन अवयवदानाचा फॉर्म भरून करता येतो. त्यांच्या वेबसाईटचा पत्ता पुढील प्रमाणे : www.notto.gov.in तसेच देहदानाचा संकल्प करण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीरशास्त्र विभागाकडून देहदानाचे संकल्पपत्र उपलब्ध होऊ शकते. वैद्यकीय महाविद्यालयांच्या वेबसाइटवरही असे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकेल. ते संकल्पपत्र भरून आपण देहदानाचा ही संकल्प करू शकता. त्याचप्रमाणे कोणत्याही नेत्रपेढी मार्फत नेत्रदानाचे संकल्प पत्र उपलब्ध होऊ शकते.)
जगातल्या तमाम लहान मोठ्या पोरांच्या आयांच गणित हे कच्चं असतं हे माझं ठाम मत आहे…मग ही आई ग्रामीण भागातील शेतकरी असो नाहीतर कॉर्पोरेट जगात मोठ्या हुद्द्यावर काम करणारी आई असो…दोघीही गणितात कच्च्या असतात हे मी सबळ पुराव्यानिशी सिध्द करू शकतो…
आता बघा परवाची गोष्ट…आमच्याचं घरातील हो…ही म्हाळसा एवढी इंजिनिअर झाली पण गणित कच्चं… परवा माझं बांगडू म्हणजे माझी कार्टी हो हॉस्टेलवर जायला निघाली… म्हाळसाने तिच्यासाठी सुक्यामेव्याचे पौष्टिक लाडू करून ठेवले होते …तो डबा तिच्या बॅगेत ठेवत ती पोरीला म्हणाली …” रोज एक लाडू सकाळी संपवायचाचं आहे, प्रत्येक दिवसाचा एक असे मोजून आठ लाडू दिलेत, ते रोज खाल्ले गेले पाहिजेत… ”
पोरगी तिचं आवरता आवरता फक्त ‘हो हो’ म्हणत होती…मी आपलं सहज लाडू कसे आहेत हे बघायला पोरीच्या बॅगेतला तो डबा बाहेर काढून उघडला तर त्या डब्यात जवळपास बारा तेरा लाडू होते…आता ‘मोजून आठ लाडू दिलेत’ असं म्हणून डब्यात बारा तेरा लाडू कसे?…आता मला सांगा आहे की नाही म्हाळसाईचं गणित कच्चं…?
अजून एक किस्सा सांगतो… आमच्या सोसायटीत एक आत्राप कार्ट बागेत खेळत होतं… त्याचा नुसता उधम चालला होता…IT मध्ये उच्च पदावर काम करणारी त्याची आई ऑफिसातून नुकतीच सोसायटीत आली होती…पोराला खेळताना बघून ती थबकली…आई पोराची गळाभेट झाली, मग जरावेळ पप्प्यापुप्प्या, शोन्यामोन्या, लाडेगोडे वगैरे झाले अन क्षणात ते पोरगं पुन्हा उच्छाद मांडायला पसार झाले आणि त्याच्या मागे ही आई उगाचंच आरडाओरडा करत त्याच्या मागे मागे गेली…’हे नको करू ते नको करू…असं नको करू, तसं नको करू’…अशा तिच्या हजार सूचना सुरू होत्या पण पोरगं काय ऐकेना… मग त्या पोराच्या आईने शेवटचं हत्यार काढलं…
” रोहन आता तू माझं ऐकलं नाहीतर तुला दोन सटके वाजवली हां…” त्या आईने दम भरला… बहुदा त्या पोराला आईच्या कच्च्या गणिताची कल्पना असावी…ते काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं…आता फटाके वाजलेले बघायला मिळणार म्हणून मी ही थबकलो, …पण ते पोरगं स्वतःच्याच धुंदीत मस्त खेळत होतं आणि इकडे त्याच्या आईने ‘ तू ऐकलं नाहीतर तुला चार सटके वाजवील’ हे वाक्य दहा बारा वेळा म्हंटल, एकदा हातही वर उचलला पण एक साधा सिंगल सटका काही वाजवला नाही…बघा आहे की नाही आईचं गणित कच्चं?…
अशा रोजच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जाणवतं की आईचं गणित हे कच्चंच असतं…
“डब्यात दोन पोळ्या, भाजी, वरण भात दिलाय…चटणीही आहे, वेळेत डबा खाऊन घे ” असे आई म्हणत असताना कॉलेजला जाणाऱ्या पोराच्या डब्यात तीन पोळ्या कशा असतात यावरूनच कळतं त्या आईच गणित कच्चं असतं…
” तुझ्या पर्स मध्ये दोन हजार ठेवलेत ” कॉलेजात जाणाऱ्या पोरीला असे एक आई म्हणतं असताना पर्स मध्ये पाचशेची एक नोट जास्त का निघते यावरून कळतं आईचं गणित कच्चं असतं…
” सकाळी एकदाचं उठविल, पुन्हा उठवणार नाही तुला कॉलेजला जायला उशीर झाला तू जबाबदार ” रात्री झोपायला जाताना अशी तंबी देणारी आई सकाळी दहा वेळा पोराला उठवायला जाते तेंव्हा कळतं आईच गणित कच्चं असतं…
पोरीला शॉपिंगला नेताना ” पाच हजाराच्या वर एक रुपया देणार नाही…” अशी धमकी देणारी आई जेंव्हा पोरीवर दहा हजार उधळून घरी येते तेंव्हा कळतं आईचं गणितं खूपच कच्चं आहे…
” भूक नाही म्हणजे काय?…चल दोन पराठे खाऊन घे…” अशी दमदाटी करून दोन पराठे खायला घालून पुन्हा तिसरा पराठा बळेबळेचं वाढताना ” छोटे छोटेचं आहेत खाऊन घे गपचूप ” अशी बतावणी करते ना त्यावेळी त्या पराठ्याच्या आकारावरून कळतं आईचं गणितंचं नाही तर भूमितीही कच्चं आहे…
सकाळी शाळेत गेलेलं पोरगं रोज बरोबर अकराच्या ठोक्याला स्कुलबस मधुन घरी येतं हे माहीत असूनही ती आई दहा वाजल्यापासून बाल्कनीत चार चकरा मारते ना तेंव्हा कळतं आईचं गणित कच्चं आहे…
” जास्त आवाज केला तर अशा उलट्या हाताच्या चार झापडी ठेऊन देईल ना…” असं म्हणून एकही झापड न मारणारी आई जेंव्हा चुकून रागाने दोन चापटी पोराच्या पाठीवर मारते अन मग स्वतःच डोळ्यातून दोनशे अश्रू गाळते ना तेंव्हा कळतं आईच्या गणिताची अवस्था फारच बिकट आहे…
जगाच्या पाठीवर कोठेही जा आईचं गणित कायम कच्चचं असतं पण त्याचं आईचं प्रेम, माया, ममत्व हे मात्र अगणित असतं…ते मात्र पक्कं असतं…
जगातील सर्व मातांना समर्पित …
संग्रहिका : मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अध्यापन : विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथून मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त.
अभ्यासक्षेत्र : साहित्य व समीक्षा
ग्रंथ : (१) संदर्भ : आयुष्याचे (कविता) अनघा प्रकाशन , ठाणे १९८६. (२) दत्तांकुराची कविता (संपादन) मंजुळ प्रकाशन, पुणे २०१३. (३) मराठीतील कलावादी समीक्षा (समीक्षा) अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर २०१९, (४) उद्ध्वस्त नभाचे गाणे (कविता) अक्षरदीप प्रकाशन कोल्हापूर २०१९.
‘मराठीतील कलावादी समीक्षा ‘ या ग्रंथाला १) म. सा. प. पुणे,२) द. म. सा. कोल्हापूर, ३) आपटे वाचन मंदिर इचलकरंजी यांचे पुरस्कार.
विविध नियतकालिकांतून समीक्षात्मक लेखन.
☆ “वाढती लोकसंख्या आणि मराठी साहित्य…भाग-1” ☆ श्री वि. दा.वासमकर☆
वाढती लोकसंख्या ही आज जगासमोरील सर्वात गंभीर समस्या आहे. मात्र जगातील लोकसंख्यावाढीची समस्या सर्वच राष्ट्रांना भेडसावत नाही. कारण संयुक्त संस्थाने, रशिया, इंग्लंड, कॅनडा अशा प्रगत राष्ट्रांमध्ये लोकसंख्या खूपच कमी आहे. तर आफ्रिका खंडातील देश, तसेच भारत आणि चीनसह सर्व दक्षिण आशियाई राष्ट्रांची लोकसंख्या भरमसाठ आहे. प्रगत राष्ट्रांची लोकसंख्या कमी तर आहेच; शिवाय या देशांना निसर्गाने प्रचंड साधन संपत्ती उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या देशांमध्ये लोकसंख्यावाढीची समस्या तितकी गंभीर नाही. मात्र अविकसित देशांच्या वाट्याला साधनसंपत्ती फारच कमी आली आहे. त्यामुळे या देशांना लोकसंख्यावाढीमुळे निर्माण होत असलेल्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत आतापर्यंत जगात दोन नंबरला होता. मात्र अलीकडेच चीनला मागे टाकून आता भारत पहिल्या नंबरला आला आहे. पहिला क्रमांक मिळणे हे इतर क्षेत्रात भूषणावह असते. मात्र लोकसंख्येच्या क्षेत्रात ते लाजिरवाणे आहे, असे म्हणावे लागते. लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न विसाव्या शतकापासून गांभीर्याने सुरू झाला असे दिसते.
भारतातील लोकसंख्यावाढीची कारणे पाहिली असता असे दिसते की, भारतीय समाजामध्ये असलेले अज्ञान, अंधश्रद्धा, रुढी आणि परंपरा यांच्याबरोबरच असाक्षरता ही कारणे महत्त्वाची आहेत. आजही भारतातील बहुतेक लोक निरक्षर आहेत. त्यामुळे अज्ञानापोटी ‘मुलांचा जन्म म्हणजे ईश्वरी देणगी’ असते, अशी समजूत ग्रामीण भागात बहुतांश रूढ आहे. अज्ञान व अंधश्रद्धेमुळे अजूनही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी अनेक मुले जन्माला घातली जातात. कायद्याचा वचक असतानासुद्धा बालविवाह लावले जातात. पुत्रप्राप्तीच्या हव्यासापोटी मुलाच्या जन्मास महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक मुलींच्या नंतरही मुलासाठी प्रयत्न केला जातो. बेसुमार लोकसंख्या वाढीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. लोकसंख्यावाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंची टंचाई होते. झोपडपट्ट्यांचा प्रश्न निर्माण होतो. बेकारीची समस्या उद्भवते. त्यामुळे पर्यायाने गुन्हेगारीप्रवृत्तीही वाढू लागते. लोकसंख्यावाढीचा परिणाम आरोग्यावरही होत असतो. लोकसंख्या वाढीचे सकारात्मक परिणामही होत असतात. पण ते कमी प्रमाणात असतात.
लोकसंख्यावाढीचे स्वरूप लक्षात घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे; अशा स्वरूपाच्या विचारांना भारतात स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या उत्तरार्धापासून कुटुंब नियोजन कार्यक्रम हाती घेतला आहे परंतु अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा इत्यादी गोष्टींनी ग्रासलेल्या समाजात कुटुंब नियोजन ही कल्पना सुरुवातीस रुजविणे अत्यंत कठीण गेले असे दिसते गेली 50-60 वर्षे भारतातील शासकीय यंत्रणा व समाजातील स्वयंसेवी संस्था कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात थोडेफार यशही आले आहे. मात्र अजूनही या प्रयत्नांना वेग येणे आवश्यक आहे. या कार्यक्रमास, या प्रयत्नास समाजाने योग्य ते सहकार्य दिल्यास लोकसंख्या वाढीवर निर्बंध घालता येणे सहज शक्य आहे. लोकसंख्यावाढीच्या समस्येवर निर्बंध घालण्यासाठी शिक्षण क्षेत्र, विविध कला, साहित्य यांच्या माध्यमातून प्रबोधन होणे आवश्यक आहे. लोकसंख्या समस्येवर निर्बंध घालण्यासाठी शिक्षण क्षेत्राचा उपयोग केला जातो. कारण शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षणामुळे समाजातील वाईट रूढी, अज्ञान व अंधश्रद्धा काढून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षणामुळे समाजातील लोकांना जशा चांगल्या सवयी लावता येतात; त्याप्रमाणेच समाजातील वाईट सवयी काढूनही टाकता येतात. त्यामुळे ही नवीन जबाबदारी शिक्षणक्षेत्रावर येऊन पडते. शिक्षणाबरोबरच साहित्यादी कला यांच्याद्वारेही समाजावर संस्कार करता येतो. कविता, नाटक, शाहिरीकाव्य तसेच कथा-कादंबऱ्या याद्वारेही समाजमनाला आवाहन करता येते. साहित्याच्या वाचनाने वाचकावर संस्कार होत असतो. मराठी साहित्याच्या इतिहासात आजपर्यंत अनेक साहित्यकृतींनी यामध्ये आपला आपले योगदान दिले आहे त्याचा येथे थोडक्यात विचार करू.
साहित्यात वास्तव जीवनाचे प्रतिबिंब पडत असते. कधी ते प्रत्यक्ष रीतीने पडते. तर कधी अप्रत्यक्षरीत्या. येथे लोकसंख्यावाढीचे चित्रण साहित्यात अप्रत्यक्षरीत्या कसे होते हे आधी पाहू. आणि त्यानंतर लोकसंख्यावाढीचा प्रत्यक्ष परिणाम कोणत्या मराठी साहित्यकृतीत चित्रित झाला आहे ते पाहू. हरिभाऊ आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो’ ही मराठीतील एक महत्त्वाची कादंबरी. ही कादंबरी 1891 ते 1893 या कालावधीत ‘करमणूक’ या साप्ताहिकात क्रमशः प्रसिद्ध होत होती. या कादंबरीत उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाचे चित्रण आले आहे. या काळातील ब्राह्मण समाज अनेक वाईट रूढींनी ग्रासलेला होता. स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. बालाजरठ विवाहाच्या पद्धतीमुळे स्त्रिया लहानपणीच विधवा होत. लहान वयात लग्न केल्यामुळे स्त्रियांना अनेक बाळंतपणे सोसावी लागत. त्यामुळे अनेक मुलांना आणि मातांना अकाली मृत्यू येत असे. यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आले आहे. हे सर्व लोकसंख्यावाढीचे अप्रत्यक्ष परिणाम म्हणून सांगता येतील. लोकसंख्या वाढीमुळे बेकारीची समस्या ही तीव्र स्वरूप धारण करत असते, याचे चित्रण ह.मो. मराठे यांच्या ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या लघु कादंबरीमध्ये प्रत्ययकारी रीतीने आलेले आहे. ज्योती म्हापसेकर यांच्या ‘मुलगी झाली हो’ या नाटकात अप्रत्यक्षपणे याच समस्येचे प्रतिबिंब पडले आहे, असे म्हणता येईल. बाबुराव बागुल यांचा ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह जर बारकाईने वाचला, तर त्यातील अनेक कथांमध्ये प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीतीने लोकसंख्यावाढीचे दुष्परिणाम चित्रित झाले आहेत, असे दिसेल. या संग्रहातील ‘लुटालूट’ आणि ‘मैदानातील माणसे’ यांसारख्या कथांतून दारिद्र्याचे अंगावर शहारे आणणारे वर्णन बागुल यांनी केले आहे. ‘लुटालूट’ या कथेत वेश्या वस्तीतील स्त्रियांचे अत्यंत खालच्या पातळीवरचे जगणे आले आहे. आणि ‘मैदानातील माणसे’ मधील मैदानात थंडीच्या रात्री असंख्य माणसांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी चालेला संघर्ष हे लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामाचे चित्रण म्हणावे लागते. अशा रीतीने लोकसंख्यावाढीचा अप्रत्यक्ष परिणामाचे चित्रण यांसारख्या साहित्यकृतीतून केले जाते, असे म्हणता येईल. आता लोकसंख्या वाढीचे प्रत्यक्ष परिणाम चित्रित करणाऱ्या काही साहित्यकृतींचा विचार करू.
लोकसंख्या वाढीचा परिणाम दर्शवणारी प्राचीन साहित्यकृती म्हणजे समर्थ रामदास स्वामींची ‘लेकुरे उदंड झाली’ या रचनेचा उल्लेख करता येईल. रामदास स्वामींच्या ‘दासबोध’ या ग्रंथामध्ये तिसऱ्या दशकातील चौथ्या आणि पाचव्या समासामध्ये लोकसंख्या वाढीच्या परिणामाचा आशय आला आहे. समर्थ म्हणतात-
लेकुरे उदंड जाली /तो ते लक्ष्मी निघून गेली /
बापडी भिकेस लागली / खावया अन्न मिळेना
या संपूर्ण रचनेचे सार थोडक्यात असे सांगता येईल – घरामध्ये मुले पुष्कळ झाली तर त्या घराची लक्ष्मी निघून जाते. ही मुले मग भिकेस लागतात. त्यांना खायला अन्न मिळत नाही. या मुलांपैकी एक खेळत असते; एक रांगत असते; तर एक पोटामध्ये असते. अशा तऱ्हेने घरभर मुलांची आणि मुलींची दाटी होते. त्यामुळे दिवसेंदिवस खर्च वाढतो. येणारे उत्पन्न बंद होते. मुली उपवर झाल्यावर त्यांना उजवण्यासाठी द्रव्य राहत नाही. आई-बाप श्रीमंत असले, तरी ह्या उदंड लेकरांमुळे त्यांना दारिद्र्य येत राहते.समाजातील प्रतिष्ठा आणि मान निघून जातो. खाणारी तोंडे वाढल्यामुळे बापाला चिंता लागून राहते. त्याचा उद्वेग वाढतो. मुली उपवर झाल्या की त्यांचे आणि मुले मोठी झाली की त्यांचे लग्न करावे लागते. मुले – मुली तशाच राहिल्या तर पुन्हा लोक लाज काढतात. लोकांकडून छीथू होते. आणि घरातील कर्त्या पुरुषाचे नाव जाते. म्हणून लग्नासाठी कर्ज काढावे लागते. त्यासाठीसुद्धा समाजात पत राहत नाही. मग घरातील पाडा-रेडा विकून ऋण घेऊन मुलाबाळांची लग्न करावी लागतात. परंतु असे घेतलेले ऋण फेडायचे कसे आहे हा प्रश्न पडतो. मग सावकार वेठीस धरतो आणि मग अशा कर्त्या पुरुषाला गाव सोडून काम धंदा मिळवण्यासाठी परदेशात जावे लागते. हे सर्व अनर्थ घरामध्ये उदंड लेकरे झाल्यानंतर होतात, असे रामदास स्वामी म्हणतात. आणि शेवटी या कर्त्या पुरुषावर रडायची पाळी येते, असे वर्णन करून शेवटी रामदास स्वामी म्हणतात, –
अरण्य रुदन करिता /कोणी नाही बुझाविता /
मग होय विचारता /आपुले मनी /
आता कासया रडावे /प्राप्त होते ते भोगावे /
ऐसे बोलुनीया जीवे /धारिष्ट केले /
सारांश सतराव्या शतकामध्ये रामदास स्वामींनी घरामध्ये पोरवडा वाढविण्याचे दुष्परिणाम अत्यंत परखडपणे वर्णन केले आहेत.
☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –4 ☆ श्री सदानंद आंबेकर☆
२२ जून :: धर्माच्या मार्गावर धर्मपुरी गाव : अंतर २७.७८ कि.मी.
आज बरड गावात पालखीचा मुक्काम होता पण आमची सोय सुमारे पाच किमी लांब धर्मपुरी या गावात होती। बरड गावापर्यंत तर सहज चालत आलो, आता थकवा वगैरेची जाणीव नव्हती होत. त्या नंतर तिथून किंचित अंतरावर राजुरा गावात पुढे जाण्याकरिता दिंडीतर्फे मिनी ट्रक आला. त्यातून काही लोक गेले नि आपल्या ठिकाणी आलो। आज मी पण या वाहनाने आलो। इथे ग्रामपंचायत भवनात सोय होती आणि मुख्य म्हणजे नळ आणि हैंडपंप दोन्ही असल्यामुळे सगळयांनी मनसोक्त कपडे धुतले, त्यात मी सुध्दा सामील होतो। आज संध्याकाळी येथे हरिपाठ आटोपल्यावर दिंडी संचालिका सौ माईसाहेब आणि दिंडी प्रमुख डॉ भावार्थ यांनी भारूड प्रस्तुत केले। भारूड म्हणजे सहज रीतिने धर्मशिक्षण। त्यात विशेष होती ती संत एकनाथांची रचना — ‘‘विंचू चावला विंचू चावला देवा रे देवा‘ हे भारूड !! श्री शंतनु गटणे यांच्यासोबत डॉ भावार्थ यांनी प्रस्तुत केलेलं हे भारूड खूप काही सांगून गेलं। खरोखर दिव्य होता तो अनुभव। याशिवाय आमच्यातल्या काही माउलीताईनी पण भारूड प्रस्तुत केले। अनेक लोकांनी आज पावली खेळली – तेही खूप छान प्रकारे। इथे लाइटनी खूप त्रास दिला पण नंतर सर्व ठीक झाले। आज रात्री तर जेवणात वेगळाच स्वाद होता अन् तो होता आम्रखंडाचा। दिंडीमधे काही बंधुंनी आपल्यातर्फे ही मेजवानी सादर केली होती। पुन्हा उद्याची तयारी करायला हवी म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या ओट्यावर खूप थंड हवेत झोपी गेलो.
येथे मी एका गोष्टीचा विशेष उल्लेख करू इच्छितो, मी एकटा असल्यामुळे मला बरेच वेळा जागा शोधावी लागायची. पण आमच्या गटातल्या अनेक माउलींनी बहुदा स्वतः बोलावून ज्या आपुलकीने आपल्या शेजारी जागा दिली त्याची आठवण मला नेहमी राहील।
२३ जून :: गाव नातेपुते : अंतर १२.५६ कि.मी.
बरड गाव सोडून नातेपुते करिता निघालो। गावातून बाहेर येता येता एक भली मोठी नहर अर्थात् कैनाल दिसली। किंचित वेळ थांबून पुढे निघालो। आज बारा दिवस झाले होते. आता मी आसपासच्या वारकरी लोकांना पाहत चालत होतो। श्रध्देचं प्रमाण इतकं होतं की कोणालाही आपण कपडे काय घातलेत, पायांत जोडे़ चपला आहेत की नाही, बाहेर ऊन आहे की सावली आहे, जेवण मिळते की नाही, ही काळजी नव्हतीच। खांद्यावर झोळी, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मुखाने हरिनाम आणि मनात विठ्ठल ठेवून चालणे हेच त्यांचं उद्दिष्ट। नातेपुते पण एक गांव आहे अन् आमची शाळा गावात एकदम आत होती। आज पण संध्याकाळी हरिपाठ होत असतांना बरेच वारकरी पावली खेळायला आले अन् खूप आनंद घेतला। फुगडीवर त्याची पूर्णता होते ती पण आम्ही बघितली। आज पण जेवणात खूप स्वाद होता नि आज एका बंधूंची विवाह वर्षगाठ होती, म्हणून त्यांच्यातर्फे आम्हाला मेजवानी होती। आता उद्या पुन्हा लांब चालायचे आहे म्हणून इथे विश्रांति घेऊया।
२४ जून :: माळशिरस : अंतर २१.९८ कि.मी.
आज पण आम्हाला सदाशिवनगर या ठिकाणी रिंगण बघायला मिळणार होतं। आजचे गोल रिंगण। मोठ्या शेतांत जागा करून त्यात चुन्याच्या रेघांनी मैदान तैयार केले होते। पोलिसांची सक्त व्यवस्था होती पण लोक ऐकत नव्हते। थोडयाच वेळात पालखीचे आगमन झाले अन् मागोमाग दोन अश्व आले। पहिल्यांदा पूर्ण मैदानाचा एक फेरा लावला नि नंतर रिंगण सुरू झाले। वर ड्रोन सतत रेकॉर्डिंग करत होते। लोकांचा जल्लोष, उत्साह आणि आकाशातून पावसाची भुरभुर चालू होती। रिंगण पूर्ण होताच गर्दी व्हायच्या आत आम्ही आपला मार्ग धरला। आधी पाऊस होऊन गेल्यामुळे आज गावात खूप चिखल होता. तरी आम्ही शोधत-शोधत आपलं ठिकाण मिळवलं। जागा मिळाल्यावर थोड्या वेळाने खूप जोरात पाऊस सुरू झाला नि शाळेच्या संपूर्ण मैदानात जणू तलाव निर्माण झाला। संध्याकाळी रोजच्याप्रमाणे हरिपाठ व रात्रीचे जेवण आटोपलं।
२५ जून :: आले वेळापुरः अंतर २३.४५ कि.मी.
जसे-जसे पंढरपूरचे अंतर कमी होत होते तसतसा उत्साह वाढत जात होता। आजही त्या उत्साहात पाणी चिखल असतांनासुध्दा कमी वेळात वेळापुरला आलो. मात्र गावात आमची शाळा शोधायला खूप विचारावे आणि चालावे लागले। शाळा पण एकीकडे होती जिची वाट पूर्णपणे पाणी आणि चिखलानी भरून गेली होती। इथे खडूसफाटा येथे गोल रिंगण होते पण आम्ही ते नाही पाहिले। या गावात एक अर्धनारी नटेश्वर मंदिर दिसले जे प्राचीन वाटत होते. पण दर्शनासाठी खूप रांग लागली होती, त्यामुळे बाहेरून दर्शन करून आपल्या ठिकाणावर पोचलो। येथे मात्र संध्याकाळी खूप पाऊस आला, त्यामुळे रोजचा हरिपाठ, प्रवचन लहानशा जागेत करावे लागले। शाळेच्या समोर एक मंच आणि मोठ्ठे अंगण होते, पण पाऊसामुळे तिथे झोपणे शक्य झाले नाही।
इथे सकाळी नित्यक्रियेकरिता जागा शोधावी लागली, कारण आसपास सगळी रहाती वस्ती होती, तरी प्रश्न कसाबसा सोडवला। रोजचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण घेऊन निघालो आपल्या शेवटच्या टप्प्या करिता। हा प्रवास पण फार लांबचा असणार होता.
२६ जून :: यात्रेची शेवटची पायरी – शेळवे गावः अंतर २८.८१ कि.मी.
सकाळी चालणे सुरू केल्यावर आज पावलं लवकर पडत होती। आज पण एका ठिकाणी गोल रिंगण होते. पण बहुतेक लोक सरळ चालत राहिले। दुपारी १२ वाजता मी भंडीशेगाव गावात आलो जिथून शेळवे गावाचा सहा किमी.चा रस्ता होता। फाटा येताच आमच्या वारीचे काही बंधु दिसले जे शेयर टेंपोत बाकी यात्रेकरूंची वाट बघत होते। आम्ही तीन लोक आल्यावर गाडी फुल झाली व तीस मिनिटांत आम्ही गावात उतरलो। इथे पण दोन दिशेला शाळा व एक बाजूस एक मंदिर आणि समोर काही टिनाचे वर्ग होते। आधी झाडाखाली विसावा घेतला नि चार वाजता जवळच असलेल्या भीमा नदीत आम्ही सात आठ लोकांनी मनसोक्त आंघोळ केली। आमच्या सोबत एक तरुण वारकरी होते त्यांनी पूर्ण तन्मय होऊन – ‘बाप रखुमादेवी वरू, विठ्ठलाची भेटी, जाईन गे माये तया पंढरपुरा‘—- या ओळी गायल्या, आम्ही पण त्याच स्वरात त्यांची साथ दिली। शाळाभवनांत परत आल्यावर कळले की या दिंडीची एक विशिष्ट परंपरा आहे, दिंडीप्रमुख स्वतः आपल्या हातानी सर्वांना भीमा नदीवर आंघोळ घालतात. त्याप्रमाणे आम्ही पुन्हा नदीवर जाऊन या परंपरेचा आनंद लुटला। नंतर आम्ही सर्वांनी त्यांना पण तसेच स्नान घातले। हीच भीमा पंढरपुरात चंद्रभागा म्हटली जाते असे सांगण्यात आले। पुढील दिवशी पहाटे स्त्रियांकरिता सौ माईसाहेब यांनी स्नानाची सोय केली होती। सूर्यास्त व्हायच्या आधी आज सर्व माऊलीभगिनींनी सौ माईंच्या गाण्यांवर मन भरून नाच केला, फुगड्या घातल्या। खूप ‘आनंदी आनंद गडे‘ होता। आज संध्याकाळचा हरिपाठ विशेष होता। आधी, आज जे एक विशिष्ट पाहुणे आमच्या दिंडीत आले होते, त्यांनी खूप सुरेख स्वरात अभंग ऐकविले अन् त्यानंतर विशेष उल्लेख म्हणजे, डॉ भावार्थ यांनी आपल्या पूर्ण टीमचा परिचय त्यांच्या कामा- -सकट करवून दिला। त्यात, आचारी भगिनी, चालक बंधू, साउंड लाइटवाले, इतर व्यवस्था करणारे हे सर्व होते, ज्यांच्या सहकार्याने ही यात्रा खूपच सोयीची झाली होती। आजचे जेवण पण विशिष्ट होते। आता सर्वांना उद्याची प्रतीक्षा होती जेव्हा श्रीहरिविठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते। उद्या कोण केव्हा परत निघून जाणार हे माहिती नसल्याने आजपासूनच एकमेकांचे संपर्क सूत्र फोन नंबर घेण्यास सुरुवात झाली होती।
☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले☆
आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले ” दुसरे हृदय ” म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.
सर्वांना हृदयाचे कार्य काय असते ते ठाऊक असेलच….. हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहत नाही.
पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो. होय. खर आहे. आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे… हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात. रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.
पायाच्या पोटरीमधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.
त्यांना ” मसल विनस सायनस असे ” म्हणतात. ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्यामध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदयाकडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.
घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो. आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपायातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते. रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या (DVT, Deep Vein Thrombosis) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते.
एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते. याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फुप्फुसात जाऊन फसू शकतात, ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.
जर पोटरीतील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे, घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे, खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.
थोडक्यात काय –- हे सगळे त्रास टाळायचे असतील तर …. चालत रहा, शक्य असल्यास धावत रहा.
निरोगी आणि सुदृढ रहा.
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक “एक उत्तुंग व्यक्तीमत्व”…” ☆ सौ राधिका भांडारकर☆
मुंबईच्या हायकोर्टाच्या आवारात एका संगमरवरी पाटीवर हे शब्द कोरलेले आहेत.
“IN SPITE OF THE VERDICT OF THE JURY IS STILL MAINTAIN THAT I AM INNOCENT. THERE ARE HIGHER POWERS THAT RULE THE DESTINY OF MEN AND NATION…“
“जुरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवू दे पण मी गुन्हेगार नाही लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी एक शक्ती या न्यायपिठाहून वरिष्ठ आहे. मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्यानेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जीतावस्था यावी अशी कदाचित या शक्तीचीच इच्छा असेल.”
हे स्पष्ट, कणखर, खडे बोल आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जहालमतवादी, उत्तुंग व्यक्तीचे.
राजेद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती. या काळात टिळकांना साबरमतीच्या तुरुंगात ठेवलं गेलं आणि नंतर रंगून मार्गे त्यांना मंडालेच्या तुरुंगात रवाना केलं गेलं .(१९०८) पण आरोप, शिक्षा, कारावास , टिळकांसारख्या महापुरुषाला यत्किंचीतही विचलित करत नसत. त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर नेत नसत. उलट या सहा वर्षाच्या अत्यंत कष्टमय, तापदायक आणि प्रतिकूल वातावरणात मंडाले येथील तुरुंगवास भोगत असतानाच गीतारहस्य हा अनमोल ग्रंथ त्यांनी लिहिला.
वास्तविक रत्नागिरी येथे जन्मलेले (२३जुलै १८५६) केशव गंगाधर टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांच्यात जन्मतःच काही ठळक गुण होते. शालेय जीवनात ते एक उज्वल विद्यार्थी होते. त्यांच्यात एक नैसर्गिक सच्चेपणा आणि सरलता लहानपणापासूनच होती. लहान वयातच त्यांची स्वतंत्र मते होती. त्यांची वृत्ती सहिष्णु होती आणि अन्यायाबद्दल त्यांना अपार चीड होती.
स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य टिळक होय. अनेक वर्ष इंग्रजांचे गुलाम झालेल्या जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम व स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम टिळकांनी केले.
लोकमान्य टिळक म्हणजे प्रखर पत्रकार.
थोर समाज सुधारक.
स्वातंत्र्य सेनानी.
राष्ट्रीय नेता.
संस्कृत भाषेचे पंडित आणि एक विद्वान शिक्षक.
जातीय व्यवस्थेचे योग्य समर्थन करणारे समाज सुधारक.
लोकमान्य टिळकांचे विचार हे जनतेद्वारे स्वीकृत होते म्हणूनच त्यांच्यापुढे लोकमान्य हे संबोधन लावलं गेलं.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रस्थानी ते होते. लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य खूप विस्तृत आहे. राष्ट्रीय कल्याणासाठी,, जनजागृतीसाठी आणि एक राष्ट्रीय मन घडवण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती.
शैक्षणिक जाण वृद्धिंगत व्हावी म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली आणि त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली जिथे टिळक स्वतः विद्यार्थ्यांना गणित व संस्कृत या विषयांचे धडे देत. या कार्यामध्ये आगरकर, चिपळूणकर, रानडे, भांडारकर या थोर राष्ट्रीय विभूती त्यांच्यासोबत होत्या. न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापनाही याच संस्थेच्या माध्यमातून झाली. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्वस्तात शिक्षण उपलब्ध व्हावे हा या मागचा प्रमुख हेतू होता.
आर्यभूषण छापखान्याची सुरुवात करून केसरी आणि मराठा ही दैनिके सुरू करून त्या माध्यमातून परखड लेख लिहून स्वातंत्र्यासाठी टिळकांनी जनजागृती केली. तरुणांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, सर्व समाज एकत्र यावा या भावनेने त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव यांना सार्वजनिक स्वरूप दिले. आजही देशभर हे उत्सव जोशाने साजरे केले जातात. मात्र यामागच्या टिळकांच्या पायाभूत संकल्पनेचे काय झाले हा विषय वेगळा आणि विचार करण्यासारखा आहे. होमरूल लीगची स्थापना टिळकांनी केली. ही एक राष्ट्रीय राजकीय संघटना होती.
स्वातंत्र्यलढ्यात जाणीवपूर्वक आणि आंतरिक तळमळीने उतरणारी अनेक माणसे होती. त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट एक असले तरी दिशा निराळ्या होत्या, वाटा निराळ्या होत्या, विचार प्रवाह भिन्न होते. टिळकांची विचारधारा ही प्रखर होती. थेट होती. ” सरकारचे डोके फिरले आहे का” असे निर्भीड वक्तव्य ते करत. त्यामुळे एकत्र काम करणाऱ्या धुरीणांमध्ये फूट पडली. दोन वैचारिक गट त्यातून निर्माण झाले. जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी. टिळकांनी जहाल गटाचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे टिळकांची आणि इतर जहाल मतवादी विचारसरणीच्या लोकांची काँग्रेस मधून हकालपट्टी झाली. या सगळ्या घटना १९०७/१९०८ या दरम्यान घडल्या.
स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य असा चतुसूत्रीचा कार्यक्रम त्यांनी राबवला. त्यातूनच परदेशी कापडाची होळी ही ऐतिहासिक घटना घडली. स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करण्यासाठी टिळकांनी जनजागृती केली.
टिळकांचा खरा भरवसा होता तो देशातील युवाशक्तीवर. त्यांना संघटित करण्यासाठी टिळकांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबवले. त्यांची “जाज्वल्य राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी काहीही, देश पहिला” ही मानसिकता त्यांनी त्यांच्या दमदार लेखनातून आणि भाषणातून तयार केली. ते तरुणांना सांगत, “धर्माची सत्यप्रियता, भीमाचे बाहुबळ आणि अर्जुनाची तत्परता आणि शौर्य अंगी बाळगण्याचा प्रयत्न करा”
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले. आणि टिळकांच्या या घोषणेमुळे स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन अधिक तीव्र झाले.
टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्री ही इतिहासात प्रसिद्ध. मात्र वैचारिक मतभेदांमुळे या मैत्रीत फाटाफूट झाली. आगरकरांचे म्हणणे होते स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला प्राधान्य द्यावे तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे अग्रक्रमावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज सुधारणेला गती मिळेल असे टिळकांचे ठाम, परखड मत. बालविवाहाच्या प्रश्नांवरून आणि संयत वयाच्या धोरणावरून ही मतभेदांची दरी रुंदावत गेली. वास्तविक दोघेही आपापल्या तत्वाशी तडजोड न करणारे. ध्येय एक असले तरी मार्ग भिन्न झाले पण या मतभेदातही परस्पर मैत्रीच इतिहासाने पाहिली. मतभेद झाले पण मने तुटली नाहीत .
कोण बरोबर कोण चूक हे अजूनही काळाला ठरवता मात्र आलेले नाही.
भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते स्फूर्तीदाते होते. सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे गुरु पद त्यांनी टिळकांनाच बहाल केलं होतं. सावरकरांच्यातलं स्फुल्लिंग टिळकांनीही टिपलं होतं.
टिळकांच्या नेतृत्वाचा दबदबा त्यावेळी वाढलेला होता आणि त्यातूनच सावरकरांसारखी तरुण क्रांतिकारी माणसं स्वातंत्र्यलढ्याच्या भविष्यासाठी तयार होत होती. टिळकांच्या उत्तुंग आणि दिव्य व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिशही हादरले होते.”वंदे मातरम्”ची गर्जना ब्रिटीशांची झोप उडवून देत होती.
लखनऊ करारानंतर चिरोलवर खटला भरण्यासाठी टिळक विलायतेला गेले होते निकाल विरुद्ध लागला आणि टिळक भारतात परतले. त्यावेळी टिळक लोकमान्यतेच्या शिखरावर होते. मात्र विलायतेच्या प्रवासाने त्यांना शारीरिक आणि मानसिक शीण आला होता. त्याही वेळी त्यांच्यातली जहाल वृत्ती टिकूनच होती. सरकारला सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हा शब्द चाणाक्षपणे वापरला. यावरून टिळक आणि गांधींमध्ये वादही झाले पण तरीही हिंदू मुस्लिम एकत्र येतील, ब्राह्मणेतर चळवळीला स्वराज्याची दिशा मिळेल अशी टिळकांनी तयारी करून ठेवली.
हळूहळू प्रकृती ढासळू लागली होती. तरीही आल्या गेल्यांशी ते हास्यविनोद करत होते. कौटुंबिक जीवनात ते अडकले नाहीत. शेवटपर्यंत ते फक्त देशाच्या राजकारणाबद्दलच बोलत होते.
एक ऑगस्ट १९२०चा दिवस! मुंबईच्या सरदार गृहापुढे लोक रस्त्यावर उभे होते. मध्यरात्र उलटली होती. लोकमान्य यांचे देहावसन झाल्याची बातमी आली आणि प्रचंड जनसमुदायांच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले. लोक अक्षरशः धाय मोकलून रडले.
महानिर्वाण यात्रेत स्त्रिया, पुरुष ,म्हातारे, हजारो गिरणी कामगार, हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी, जैन सारेच होते. आकाशाची शिवण उसवावी आणि आभाळ फाटावे असा पाऊस होता आणि त्या मेघगर्जनेपेक्षाही “टिळक महाराज की जय” ही लोकगर्जना अवघ्या महाराष्ट्राला हलवून सोडत होती.
आज हे सगळं लिहीत असताना, मागे वळून पाहताना मनात येतं, या थोर उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आपला देश आज कुठे चालला आहे? राष्ट्रासाठी यांचे संसार पणाला लागले. प्रत्येक वेळी तुरुंगात जाताना पत्नीकडून हातावर ठेवलेले दही घेताना टिळक पत्नीला म्हणत “तुमच्या खांद्यावर संसार ठेवून आम्ही हा राष्ट्राचा संसार सांभाळू शकतोत”. धन्य त्या स्त्रिया! कळत नकळत स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनीही अशा रितीने विडा उचलला होता.त्यांचे संसार सर्वसामान्यांसारखे नव्हतेच,
आज मनात येतं “कहाँ गये वो लोग”? त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान, त्यांचे कार्य देशवासीयांच्या मनात सदैव उजळत राहो हीच त्यांच्या स्मृतीला खरी श्रद्धांजली!
(लोकमान्य टिळकांवर लिहायला पाहिजे असेच ठरवले आणि ते एका कर्तव्य भावनेने, कृतज्ञतेच्या,ऋणी भावनेने. वास्तविक अशा लोकमान्य व्यक्तीवर लिहिणे किती अवघड आहे हे लिहिताना जाणवत राहिले पण तरीही…. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती)