मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

‘मिसाईल मॅन’ ए.पी.जे.अब्दुल कलाम ☆ श्री राजीव गजानन पुजारी

आज २७ जुलै – आपले माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन.  

… “यशस्वी होण्याचा माझा निर्धार पुरेसा मजबूत असेल तर अपयश कधीही माझ्या आड येणार नाही” – असा आत्मविश्वास बाळगणारे आणि तो खरा करून दाखवणारे कलामसर, म्हणजे ही मोलाची शिकवण जणू संपूर्ण देशालाच देणारे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. 

ए.पी.जे. अब्दुल कलाम भारताचे ११ वे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म तत्कालीन मद्रास इलाख्यातील रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव अवूल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलाब्दिन होते, जे  एक नावाडी असून इमाम म्हणून देखील ते काम बघत. त्यांच्या आईचे नाव आशीअम्मा होते. त्या एक गृहिणी होत्या. कलाम यांना चार भाऊ व एक बहीण होते. सर्व भावंडांमध्ये कलाम हे शेंडेफळ होते.

कलामांचे पूर्वज श्रीमंत व्यापारी होते, पण कालौघात त्या कुटुंबावर कठीण परिस्थिती आली होती. अब्दुल कलाम लहानपणी वृत्तपत्रे विकून कुटुंबाच्या माफक उत्पन्नात भर घालायचे हे आवर्जून सांगण्यासारखे आहे. 

कलाम यांनी रामनाथपुरम् येथे शालेय शिक्षण घेतले आणि सेंट जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली येथून भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली. १९५५ मध्ये ते एरोस्पेस अभियांत्रिकी करण्यासाठी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये गेले. फायटर पायलट होण्याचे त्यांचे स्वप्न पात्रता फेरीत अगदी काही गुणांनी भंग पावले. ते नवव्या क्रमांकावर होते. पण आय.ए.एफ. कडे फक्त आठ जागाच उपलब्ध होत्या. त्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या(DRDO) एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट मध्ये शास्त्रज्ञ म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी प्रख्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम केले. 

१९६९ मध्ये कलाम यांची बदली भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रो मध्ये करण्यात आली. इस्रोमध्ये ते एस.एल.व्ही. या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे प्रकल्प संचालक होते. एस एल व्ही प्रक्षेपकाने १९८० मध्ये रोहिणी उपग्रह यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित केला. एस एल व्ही हा भारताचा पहिला प्रक्षेपक होता. कलाम यांनी ध्रुवीय प्रक्षेपण वाहन (PSLV) विकसित करण्यासाठीही काम केले. एसएलव्ही तंत्रज्ञानातून बॅलॅस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्यासाठीच्या प्रोजेक्ट व्हॅलीअंट आणि प्रोजेक्ट डेव्हिल या दोन प्रकल्पांचे ते संचालक देखील होते. त्यांच्या संशोधन आणि नेतृत्वगुणांमुळे त्यांना प्रगत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे संचालकपद मिळाले. आर्. वेंकटरमन संरक्षण मंत्री असताना कलाम यांची क्षेपणास्त्रांचा ताफा विकसित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मुख्य कार्यकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ‘ बेलास्टिक ‘क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये त्यांनी दिलेल्या योगदानामुळे, तेव्हापासूनच त्यांना ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाऊ  लागले होते.

१९९२ ते १९९९ पर्यंत कलाम हे पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार आणि डीआरडीओ चे सचिव होते. पोखरण-२ चाचण्यांदरम्यान कलाम हे मुख्य प्रकल्प समन्वयक होते. याच काळात कलाम भारतातील  आघाडीचे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले.

२००२ मध्ये अब्दुल कलाम यांची भारताची ११ वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली. भारताचे राष्ट्रपती बनणारे ते पहिले शास्त्रज्ञ होते. २००७ पर्यंतचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाळ देशासाठी महत्त्वाचा ठरला. लोकांमध्ये, विशेषतः शाळकरी मुलांमध्ये ते फार लोकप्रिय ठरले, इतके की त्यांना ‘पीपल्स प्रेसिडेंट’ म्हटले जाऊ लागले. त्यांनी देशाच्या अनेक भागांना भेटी दिल्या. त्यांची भाषणे, त्यात असणाऱ्या प्रेरणादायी विचारांमुळे लोकप्रिय ठरली. राष्ट्रपतीपदासाठी दुसऱ्यांदा उमेदवारी मिळावी म्हणून लोकांचा दबाव  असतांनाही त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला.

राष्ट्रपतीपदानंतर कलाम आय.आय.एम.- अहमदाबाद, आय.आय.एम.-शिलॉंग, आय.आय.एम.- इंदूर,  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अण्णा विद्यापीठ, आदींमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर बनले.

२७ जुलै २०१५ रोजी आय.आय.एम.- शिलॉंग येथे व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी, रामेश्वरम् येथे पूर्ण शासकीय इतमामाने आणि अतिशय सन्मानाने त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. 

अब्दुल कलाम हे त्यांच्या सचोटी व प्रामाणिकपणासाठी ओळखले जात. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी काही पुस्तके व लॅपटॉप व्यतिरिक्त कोणतीही वैयक्तिक संपत्ती मागे सोडली नाही. ते विविध धर्माच्या शिकवणुकींचे जाणकार होते, आणि आंतरधर्मीय संवादाचे प्रतीक होते हे आवर्जून नमूद करायलाच हवे. 

त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात:

  • India-2020:A vision for the new  Millennium
  • Wings of fire
  • Ignited minds- Unleashing the power within India
  • A manifesto for change: A sequel to India 2020
  • Transcendence: My spiritual experiences with Pramukh swamiji

  — आदि पुस्तकांचा समावेश होतो.

तसेच त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये :

  • पद्मभूषण -१९८१
  • पद्मविभुषण – १९९०
  • भारतरत्न – १९९७
  • वीर सावरकर पुरस्कार – १९९८
  • रॉयल सोसायटी, इंग्लंड यांचेकडून दिला जाणारा किंग चार्ल्सII पदक – २००७
  • इडिनबर्ग युनिव्हर्सिटी, इंग्लंड यांचेकडून डॉक्टर ऑफ सायन्स – २०१४

  —– आदि पुरस्कारांचा समावेश होतो.

आजच्या त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना अतिशय आदरपूर्वक प्रणाम. 

© श्री राजीव गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆  उतराई… ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित

एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते.पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले. श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला आले असता ते म्हणाले, ” महाराज, माझ्या अपेक्षेबाहेर माझी जी भरभराट झाली, ती माझी कर्तबगारी नाही. भगवंताच्या कृपेनेच ती झाली, यात शंका नाही. आता काय केल्याने मी त्याचा उतराई होईन?” हा प्रश्न ऐकून श्रीमहाराज प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले, “आपल्यावर ज्याने उपकार केले, त्याच्याजवळ जी वस्तू नाही, ती त्याला देणे म्हणजेच खऱ्या अर्थाने उतराई होणे होय. जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यात फारसे स्वारस्य नाही. सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताचीच असल्याने दृश्य वस्तू  त्याला देणे म्हणजेच त्याचेच त्याला दिल्यासारखे आहे. त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे, ती म्हणजे त्याला स्वतःचे स्वतःवर प्रेम करता येत नाही. आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केले म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखे होते. भगवंतावर मनापासून प्रेम करणे शक्य होण्यासाठी त्याला शरण जावे. शरणांगती साधण्यास, मी कोणीही नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे. ती नामस्मरणाने निर्माण होते. म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा”.

प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

वादळासोबत उडू न जाणारी झाडंच मातीत घट्ट पाय रोवून उभी रहातात सावधपणे. डवरतात.फळाफुलानी बहरतात. भुकेल्याची तहान भूक शमवण्यात स्वतः ला धन्यमानतात. पांथस्थाना देतात सावली. पाखरांना देतात आधार.मातीलाही आपल्या मुळाशी बांधून ठेवतात आपलीशी करून आपल्याशी. परिसराला नसती शोभाच  नाही तर ऐश्वर्यसंपन्न ही बनवतात आपल्या परीने . विश्वासाने त्यांच्या कडे बघणाराच्या मनातील आनंद , हर्षोल्लास द्विगुणित करतात .आपल्या जागेवर अटल राहून. ती असता स्थितप्रज्ञ. अबोल. तुम्हाला नसतं त्याच कसलंच निमंत्रण. गरजवंतालाच जावलागतं  त्यांच्या कडे .तुम्ही गेलात त्यांच्याकडे तर ती करतनाहीत तुमचा आव्हेर. कशालाच ती  विरोध नाहीत करत. तुम्हाला हव ते घ्याही म्हणत नाहीत आणि नाही ही म्हणत नाहीत. माणसान असलच झाड बनाव आपलं सर्वस्व दान करणार.

परोपकाराच प्रतीक बनाव. मार्गदर्शक बनाव. झाडाच्या जगण्याचा आदर्श घ्यावा. जन्मावं, वाढावं, तगावं, माणसांच्यासाठी. तेव्हा सगळा समाजच संपन्न होईल, निरागस, निर्मळ, परोपकारी. माग कळेल झाडांची ममता आणि महानता. पण त्यासाठी मातीशी अतूट नाळ जोडावी लागते. देण्यातला आनंद लूटण्यआलआ शिकावं लागतं.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ “सामान्यांचे कंबरडे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

जगात सगळ्यात ताकदवान कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे सामान्यांचे कंबरडे. हे नेहमी मोडण्यासाठीच असतं.  पेट्रोल डिझेलची भाववाढ झाली की सामान्यांचे कंबरडे मोडते.

सिलेंडर चे भाव वाढले की सामान्यांचे कंबरडे मोडते.  दर वर्षी केंद्रात आणि राज्यात अशी दोनवेळा अंदाजपत्रके म्हणजेच बजेट येतात. त्या दोन्ही वेळेला विरोधी पक्षांच्या मते सामान्यांचे कंबरडे मोडलेले असते.  तसं पाहायला गेलं तर मी एक सर्वसामान्य माणूस आहे.  पण कंबरडे हा अवयव कुठे आहे हे मला अजून समजलं नाही.  कंबर आणि त्याच्या जवळपास कुठेतरी तो असला पाहिजे कारण त्याचं नाव कंबर या नावावरून तयार झालेलं आहे असा आपला माझा सर्वसामान्य माणसाचा बाळबोध अंदाज. तर हा कंबरडे नावाचा सर्वशक्तिमान अवयव मी सर्वसामान्य असून सुद्धा मला काही अजून सापडला नाही.  बहुधा तो शरीराच्या आत कोठेतरी दडला असावा.  कारण माझी कंबर दुखते हे माझ्या आई ग ! उई ग ! वरून सगळ्यांनाच समजतं.  परंतु कंबरडं मोडतं म्हणजे काय होतं हे काही अजून मला समजलं नाही. ते मोडत असून सुद्धा पुन्हा ते कसं जोडलं जातं तेही समजत नाही. कारण एकदा मोडल्यानंतर पुन्हा मोडण्यासाठी मध्यंतरीच्या काळात ते जोडलं जाणं आवश्यक आहे.  कारण न जोडता ते पुन्हा मोडणार कसं ? त्यामुळे हा कंबरडं नावाचा अवयव कुठे असतो, तो सतत मोडून सुद्धा कसा जोडला जातो, या साऱ्या चमत्काराची फोड कुणी करत असेल तर मला हवी आहे.  बघा तुम्हाला जमतय का –  हे कबरडं कुठे आहे आणि ते कसं मोडलं आणि जोडलं जातंय हे शोधून काढायला ?

मला कळवा हं तुम्हाला समजलं तर…

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “’रम डे’ ची  कथा” ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

एवढा धो धो पाऊस पडतोय. अशा वेळेस दोनच गोष्टींची निवड करणे शक्य असते – एक म्हणजे पुस्तक-वाचन आणि दुसरी म्हणजे अपेयपान !    

अशा पावसात अस्सल दर्दी माणसाला व्हिस्की, बीअर, व्होडका, वाईन यातील कुठलेच पेय लागत नाही. या अस्सल दर्दी माणसाची पसंती असते एकाच पेयाला – ते म्हणजे – रम ! हा परिचित ब्रँड तुमच्या जमान्यातला असेल, पण ही ‘रम’ ब्रिटिश जमान्यात मुंबईत बनत होती, हे तुम्हाला माहीत नसेल.  आज तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. 

१८५३ साली पहिली आगगाडी व्हिक्टोरिया टर्मिनसवरून निघाली. तेव्हा पुढचं स्टेशन होतं – भायखळा. दादर नव्हतं, कुर्ला नव्हतं, मुलुंड नव्हतं, पण एक स्टेशन होतं, ते म्हणजे भांडुप ! आश्चर्याचा धक्का बसेल, पण बाकी कुठलंही स्टेशन नव्हतं. 

आता भांडुप स्टेशन असण्याचं कारण काय?  कारण फार गंमतीदार आहे. भांडुपला गाडी थांबली, तर बरेचसे गोरे भांडुपला उतरले आणि तिथे गावात जाऊन चार-पाच पेग रम मारली आणि परत गाडीत येऊन बसले.  तेव्हा भांडुपची लोकसंख्या असून असून किती असणार? तर तीनशे, चारशे… कारण १८८१ साली जेव्हा जनगणना झाली, तेव्हा भांडुपची लोकसंख्या होती – जेमतेम पाचशे चव्वेचाळीस ! आता एवढ्या छोट्या गावात तेव्हा रम कशी बनवली जायची? …. 

त्याचं झालं असं – मुंबई जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात आली, तेव्हा त्यांनी ल्यूक ॲशबर्नर नावाच्या माणसाला भांडुप हे गाव नाममात्र भाड्याने दिले. हा ल्यूक ॲशबर्नर ‘ बॉम्बे कुरियर ‘ नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होता. त्याला सांगितलं गेलं की, ‘ तू वर्तमानपत्र पण सांभाळायचं आणि इथे रम पण बनवायची.’ तो काय करणार बिचारा? तो अग्रलेख लिहिणार की रम बनवणार? मग त्याने एक युक्ती केली. त्याचा कावसजी नावाचा मॅनेजर होता. त्यानं त्याच्या हाती कारभार सोपवला आणि त्याला सांगितलं की, ‘ रम बनवणे तुझं काम आहे.’                                                        

तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की, त्या काळी साडेचार लाख लिटर रम बनवली जायची आणि आख्ख्या भारतभर ब्रिटिश सैनिकांना पुरवली जायची. त्याच्यानंतर गंमत काय झाली की, मॉरिशसला स्वस्त रम तयार व्हायला लागली आणि मग भांडुपचा ‘रम’चा धंदा बंद करावा  लागला .  ‘बॉम्बे गॅझेटियर’च्या चव्वेचाळीसाव्या पानावर ल्यूक ॲशबर्नरच्या नावासकट ही माहिती उपलब्ध आहे.  

आता ही सगळी माहिती आम्हाला कुठून मिळाली? तर आमचे एक मित्र आहेत – श्री. माधव शिरवळकर. त्यांनी ” मुंबई ब्रिटिशांची होती तेव्हा…” या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात अशा अनेक गंमतीजमती आम्हाला वाचायला मिळाल्या. तेव्हा आज आपल्याला माधव शिरवळकरांचेही आभार मानलेच पाहिजेत. त्यांचे हे पुस्तक आपण जरूर वाचा.

तोवर ….. “ चीअर्स ! “   

लेखक : अज्ञात. 

(https://www.instagram.com/p/Cuej5u-NBh-/) – या सूत्रधाग्यावरून (link) साभार.

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माफक अपेक्षा… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

माफक अपेक्षा ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

एका निवांत क्षणी भावुक होऊन तिला त्याने विचारलं…”काही हवंय का तुला?”

अशा अनपेक्षित प्रश्नाने ती दचकली.40 वर्षाच्या संसारात साधं पाणीही न विचारलेला माणूस आज का असं विचारतोय?

कारण आज त्याला जाणीव झाली…. आपल्या जीवनाची नौका किती सहजपणे पार झाली, या भ्रमातून सुटून त्या नौकेची नावाडी त्याची बायको होती, याची जाणीव.

डोळ्यावरचा चष्मा सुरकुतलेल्या कानामागे सरकवत ती म्हणाली,

“हो, खूप काही हवं होतं. पण योग्य वेळी.आता या वयात काय मागू मी?

लग्न झालं आणि या घरात आले, हक्काचा माणूस म्हणून फक्त तुम्ही जवळचे होता. पण तुम्हाला ना कधी बोलायला सवड,ना माझ्यासोबत वेळ घालवायची आवड.सतत आपले मित्र, नातेवाईक आणि भाऊ बहीण…आपल्याला एक बायको आहे.तिच्या काही मानसिक गरजा आहेत,हे तुम्ही ओळखून मला तुमच्याकडून मानसिक ऊब हवी होती.

घरातली कामं करून दमायचे, आल्या गेल्याचं जेवण, नाष्टा, पाणी, त्यांचा मुक्काम.. अंगावर ओढून घ्यायचे.कितीतरी स्वप्नं पाण्यावर सोडायचे, आजारपण अंगावर काढायचे, जीव नकोसा व्हायचा, पण संसाराचे नाव येताच त्राण परत आणून पुन्हा सज्ज व्हायचे.

त्यावेळी गरज होती मला. दोन शब्दांनी फक्त विचारपूस केली असती, तर पुढची चाळीस वर्षं जोमाने आणि आनंदाने  जबाबदाऱ्या पार पाडल्या असत्या.

तुमच्या घरात जेव्हा सर्वजण एका बाजूला राहून माझ्यावर खापर फोडायचे, मला एकटं पाडायचे, तेव्हा मला गरज होती ती तुमची. तुम्ही मात्र तटस्थ.तेव्हाची झालेली जखम आजतागायत मनावर ओली आहे. वेळ निघून गेली, आता कशी पुसणार ती जखम?

गर्भार असतांना माझ्या आई- वडिलांवर जबाबदारी टाकून मोकळे झालात, पण माझे डोहाळे पुरवायचे तुमच्याकडून राहून गेलेत..त्या नऊ महिन्यांत तुम्ही माझ्यासोबत वेळ घालवावा,आपल्या बाळाशी बोलावं…हे हवं होतं मला तेव्हा.आज काय मागू मी?

माझंही शिक्षण झालं होतं, मलाही काहीतरी करून दाखवायचं होतं. तेव्हा प्रेरणा हवी होती, आधार हवा होता तुमचा.आज सगळं संपून गेल्यावर काय मागू मी?

मुलांमागे धावताना, त्यांच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकताना तुम्ही माझा भार जरा हलका करावा हे हवं होतं मला, तेव्हा शरीराची जी झीज झाली त्याचे व्रण अजूनही तसेच आहेत…आज ती वेळ निघून गेल्यावर कसे पुसणार ते व्रण?

संसाराच्या नावाखाली झालेला अन्याय मी पदराआड लपवला…तुम्हाला कसली शिक्षाही नाही मिळणार.मी कोण तुम्हाला शिक्षा देणारी? पण एका स्त्रीचं आयुष्य तुम्ही तुमच्या गरजेखाली पणाला लावत तिचं आयुष्य व्यर्थ घालवलं, याची नोंद मात्र त्या विधात्याकडे अबाधित असेल…

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर ☆

? काव्यानंद ?

☆ द्यायचे तर… श्री वैभव जोशी ☆ रसास्वाद – सुश्री अर्चना देवधर

वैभव जोशी यांच्या गझलचं रसग्रहण

आज त्यांची  देवप्रिया(कालगंगा)वृत्तातली एक गझल मी रसग्रहणासाठी घेतली असून त्यातील प्रत्येक शेराचा आशय माझ्या कुवतीनुसार मांडण्याचा प्रयत्न केला आहे.आणखी अनेकांना यातील शेरांच्या अर्थाचे वेगळे पदर उलगडतीलच.

आजची रचना

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

 

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

 

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

 

काय कामाचा गड्या कंठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

 

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वैभव जोशी

आता प्रत्येक शेराचा आशय आपण पाहू..

शेर क्र.१

द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा

लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा

एका लेखकासाठी किंवा साहित्यिकासाठी त्याची लेखणी हीच त्याला मिळालेली अमोघ अशी ताकद असते.आपल्यापाशी असलेली शब्दसंपदा लेखणीच्या माध्यमातून तो रसिक मायबापापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो.पण या लेखणीतून फक्त शब्दबुडबुडे बाहेर न पडता जगातल्या दुःखितांच्या,पीडितांच्या वेदना जाणून घेण्याचं सामर्थ्य दे असं मागणं गझलकार ईश्वराकडे मागत आहे!खूप सुंदर असा मतल्याचा शेर!

शेर क्र.२

तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी

पण भुकेशी झुंजण्याचे त्राण दे रे ईश्वरा

या शेरात गझलकार वरवर अगदी साधं वाटणारं पण अतिशय कठीण,सत्वपरीक्षा पाहणारं मागणं ईश्वराकडे मागत आहेत.आपल्या अवतीभवती भुकेने तडफडणारे अनेक लोक आहेत आणि अशी वेळ कुणावरही,कधीही येऊ शकते!यदाकदाचित असा प्रसंग स्वतःवर कधी आलाच तर एकवेळ पोटाची खळगी भरायला भाकरी नाही दिलीस तरी चालेल,पण भूक सहन करण्याचं बळ दे,आणि तशा अवस्थेतही स्वत्वाची भावना कधी ढळू देऊ नकोस,पोटासाठी लाचारी पत्करायला लावू नकोस असं गझलकारांचं मागणं आहे..असं कुणी एखादाच मागू शकतो कारण आज माझं हक्काचं आहे ते हवंच पण दुसऱ्याचं आहे तेही हवं अशी लोकांची मनोधारणा बनत चालली आहे!खूप गहन अर्थाचा शेर!

शेर क्र.३

जे युगांपासून काहीही कधी ना बोलले

त्या मुक्या ओठांस स्फूर्तीगान दे रे ईश्वरा

वाह! या जगात जसे असामान्य लोक आहेत तसेच अतिसामान्यही आहेत.कुणी सडेतोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतो तर कुणी मूग गिळून बसत सतत अन्याय सहन करत राहतो.बळी तो कान पिळी या न्यायाने मोठा अधिक मोठा होत जातो आणि सर्वसाधारण आहे तो जैसे थे अवस्थेत पिचून जातो.प्रत्येक युगात हे असंच चालत आलंय पण अशा वंचितांना आपली व्यथा बोलून दाखवण्याची स्फूर्ती परमेश्वराने द्यावी,त्यांच्या जाणिवा जागृत व्हाव्यात असं या शेरात गझलकारांचं मागणं आहे!सुंदर शेर!*ज्येष्ठ दिवंगत गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांची

बोल बाई बोल काही

हा अबोला ठीक नाही

असा शेर असलेली गझल मला सहज आठवली हा शेर वाचताना!

शेर क्र.४

काय कामाचा गड्या ओठातला हा हुंदका

त्यापरी डोळ्यांमधे आव्हान दे रे ईश्वरा

हाही शेर खूप उंचीचा खयाल असलेला!आधीच्या शेरात म्हटल्याप्रमाणे युगानुयुगे केवळ अन्याय सहन करत कुढत जगणाऱ्या माणसांच्या शब्दांना कधी तरी वाचा फुटावी आणि मनात दाटून आलेलं सगळं बाहेर यावं जेणेकरून पुढची वाटचाल सुकर होईल!

हो मोकळी बोलून तू हृदयात जे जे दाटले

का भावनांना आपल्या अव्यक्त मग ठेवायचे

या शेरात म्हटल्याप्रमाणे मनातल्या भावनांची कोंडी फुटल्याशिवाय जगणं सुखाचं होणार नाही आणि त्यासाठीच ईश्वराने आपलं मन मोकळं करण्याची स्फूर्ती माणसांना द्यावी,मूक हुंदके सहन करण्यापेक्षा परिस्थितीचं,काळाचं आव्हान पेलण्याची ताकद दे,अश्रूंपेक्षा हिम्मत दे असं गझलकार इथे सुचवतात.

शेर क्र.५

मी कुठे म्हणतो मला दे अढळपद गगनातले

माणसांच्या काळजातच स्थान दे रे ईश्वरा

वाह,हा शेवटचा शेर तर एखाद्या पोथीचा कळसाध्याय असावा तसा आहे!सामान्य माणसाला रोजची भाकरी आणि रहायला मठी असावी एवढीच अपेक्षा असते,त्याला कुठल्या शिखरावर जायची आस नसते आणि किमान सुखाचं आयुष्य लाभावं इतकं त्याचं अल्प मागणं असतं.

प्रस्तुत शेरात गझलकार म्हणतात की मला त्या ध्रुवासारखं आकाशातलं अढळपद मिळण्याची लालसा नाही तर अवतीभवतीच्या माणसांच्या काळजातच जागा हवी आहे जेणेकरून त्यांची सुखदुःख,व्यथा वेदना जाणून घेता येतील.स्वतःपुरेसंच जगण्याची संकुचित वृत्ती न जोपासता इतरांची मनं वाचण्याचा व्यापक दृष्टिकोन या शेरात प्रभावीपणे व्यक्त झाला आहे आणि म्हणूनच या शेरातला खयाल खूप उच्च दर्जाचा वाटतो!एका कवीसाठी, गझलकारासाठी माणसं वाचण्याहून  दुसरं मोठं काही नसतं असाही एक विचार इथे गवसतो!खूप आवडला हा शेर!

ही रचना मला का आवडली?

देवप्रिया वृत्तातली ही खूप सुंदर रचना आदर्श मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारी असून त्यातला प्रत्येक शेर खास आहे. दे रे ईश्वरा या रदिफला अगदी समर्पक असे वरदान,जाण, त्राण, स्फूर्तीगान,आव्हान आणि स्थान हे कवाफी चपखलपणे वापरले आहेत. लेखणी,भूक,भाकरी,हुंदका,गगनातलं अढळपद अशी प्रतीकं, रूपकं आणि प्रतिमा या रचनेचं सौंदर्य खुलवतात त्यामुळे प्रत्येक शेर वाचकाच्या हृदयाला जाऊन भिडतो!श्री.वैभव जोशी यांच्या तरल आणि संपन्न प्रतिभेला मनापासून नमस्कार!आजच्या वाढदिवशी त्यांना मनापासून शुभेच्छा!

© सुश्री अर्चना देवधर 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ॲनिमल फार्म… भाग-३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ ॲनिमल फार्म…  भाग-३ ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

कादंबरीचे सुरुवातच भविष्यकालीन सूचक अशा घटनातून केली आहे. मॅनोर फार्मचा मालक ‘जोन्स ‘ हा दारू ढोसून झोपतो. बाहेर टांगलेला दिवा जोर जोरात झोके घेत असतो. एक ,एक प्राणी हळूहळू मोकळे व्हायला लागतात. ओल्ड मेजर हा वयोवृद्ध डुक्कर (लेनिन) याला सर्वजण मान देत असतात. त्याला स्वप्न पडतं की ,सर्व प्राणी स्वतंत्र होऊन त्यांचीच शेती झाली आहे. तो सर्वांना एकत्र बोलावून आपले स्वप्न सांगतो. सर्वांना पटवून देतो की, हा माणूस तुम्हाला लुटतोय. कोंबड्यांची अंडी ,गाईचे दूध , मेंढ्यांची लोकर सगळं तो वापरतोय. Man is the only enemy we have. Man is the only creature, that consumes without producing. स्वप्न साकार करायचे म्हणून प्रेरणा देतो. सर्वांना उत्साह येतो. सर्व प्राणी फेर धरून गाणे म्हणतात. “beasts of england, beasts of Ireland. beasts of every land and clime. herken to my joyful things of the golden future time. “

प्राण्यांमध्ये प्रचंड उत्साह सळसळतो. आणि सर्वजण मिळून जोन्स  (झारला) मॅनोर फॉर्म मधून हाकलून ,ते ताब्यात 1घेतात. ओल्ड मेजर चा अंत होतो. नेपोलियन, बॉक्सर आणि स्क्विलर हे तीन स्वतःला बुद्धिमान समजणारे डुक्कर, (बुद्धिमान बोल्शेविक फार्मचा ताबा घेऊन , मॅनोर फार्मचे नाव बदलून “ॲनिमल फार्म “असे नाव देतात. सर्वांच्या भल्यासाठी, असं सांगून सात तत्व ( कमांडमेंट ) तयार करून ,एका पाटीवर लिहिली जातात. ती रोज सर्वांनी वाचायची असे ठरते.

  1 ). What ever goes upon two legs is an enemy.

 2) what ever goes upon four legs or has wings,is a friend.

 3) no animal shall wear  clothes.

  4) no animal shall sleep in bed.

  5) no  animal shall drink  alcohol.

  6)no  animal  shall  kill any other animal.

  7)all animals are equal.

हे वाचता येणारे फक्त बेंजामिन गाढव आणि म्युरिअल शेळी इतकेच होते. मार्च 1917 ला  मोन्शेविक गटाने क्रांती केली़. नंतर लेनिन परतला. आणि त्याने बंड करून बोलशेविक क्रांती केली. सर्वसामान्य माणसे स्वातंत्र्याचे स्वप्न पहात होती. समानता आणि स्वातंत्र्याचे स्वप्न बाळगणारा ,बॉक्सर घोडा अखंड कष्टाला तयार असतो. बेंजामिन गाढवही मूकपणे कष्टाला तयार असते. शेळ्या ,मेंढ्या ,छोटे छोटे कोंबड्या, बदकासारखे प्राणी आलेल्या सूचनांप्रमाणे  शहानिशा न करता वागणारे नागरिक. लवकरच नेपोलियन आणि स्नो बॉल यांच्यामध्ये संघर्ष होतो. आणि दुसरी क्रांती होते. 26 ऑक्टोबर 1917. नेपोलियनने कुत्र्यांच्या पिलांना बाजूला ठेवून, शिकवून तयार केलेले असते. (गुप्त पोलीस पथक ) त्यांना स्नो  बॉलच्या अंगावर सोडून त्याला हाकलून लावून ,सर्वांकष सत्तेवर येतो  तो नेपोलियन. (स्टलिन).

हुकूमशाहीला सुरुवात होते. नेपोलियनची पैसा आणि सत्तेची हाव वाढायला लागली. प्रत्येक वाईट गोष्टींना स्लोबल कारणी भूत आणि चांगल्या गोष्टी नेपोलियन मुळे, असा विचार प्राण्यांच्या मनावर  बिंबवला गेला. माँली  घोडी   चैनी होती. ती शहरात पळून गेली.

हळूहळू विंकर या माणसाच्या मध्यस्थीने ,दूध ,अंडी, लोकर, अगदी चारा सुद्धा बाहेर विकून, डुकरांसाठी चैनीच्या वस्तू यायला लागल्या. इतरांची उपासमार व्हायला लागली. काही प्राणी पुन्हा जोन्सकडे जाण्याचा विचार करायला लागले. त्यांना सरळ सरळ मारून टाकले. सगळ्यांच्या काबाडकष्टाने उभी केलेली पवनचक्की शेजारच्या मालकांनी त्यांची फसवणूक केल्याने त्याने उद्ध्वस्त करून केलेल्या गोळीबारात अनेक प्राणी मरून गेले. या सगळ्या गोष्टींना स्नो बॉलच कारणीभूत आहे, असे पसरवले गेले. प्रत्येक वेळी स्क्विलर जोन्सचा गुप्तहेर म्हणून काम करायचा. दूध, अंडी, सफरचंद डुकरे स्वतःसाठी बाजूला ठेवायला लागली. गाद्यांवर झोपायला लागली. दारू प्यायला लागली. मोजेस कावळा ढगांनी पलीकडच्या स्वर्गीय गप्पा सर्वांना ऐकवून , डुकरांकडून दारू मिळवायला लागला. प्राण्यांचं अन्न कमी झालं. हळूहळू करत सातही तत्त्वात बदल झाले.

1)  four legs good. two legs better.

2) no animal shall drink excess.

अस करत प्रत्येक तत्व बदल करत  करत  शेवटी स्वार्थ साधून , सोयिस्करपणे   all  animals are equal,but some animals are more equal than other. पूर्वीच बिस्टस ऑफ इंग्लंड हे गाणं रद्द झालं. कोणी म्हटलं तर त्याला मृत्युदंड. नवीन गाणं सुरू झालं.

“Friends of fatherless, fountain of. Happiness —– – – – -like the sun in the sky., Comrade Nepoleon.   झेंड्याचा रंगही बदलला. सगळं पहाताना प्राण्यांचा गोंधळ व्हायला लागला. अ पवन चक्की चा दगड ओढताना बॉक्सर जखमी झाला.

अत्यंत स्वाभिमानाने प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या बॉक्सरला दवाखान्यात नेतो असं सांगून खोटं सांगून कसा याकडे पाठवलं जातं बेंजामिन गाढवाला सगळं कळत होतो पण गप्प बसून तो सगळं पाहत होता इतर प्राणी खवळले नेपोलियन महान आहे असं शेवटी बॉक्सर बोलला आणि त्याला वीर मरण आले असं स्केलर ने सांगून सर्वांचा राग शांत केला

हळूहळू डुकरे (बोलशेविक) पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखे वागायला लागतात. सर्वसामान्यांना काहीच कळत नाही. जी तात्विक मूल्ये दाखवून सत्तेवर आले , ती मूल्ये बदलून, पूर्वीचे आणि आत्ताचे सत्ताधारी मॅनोर फार्म वर गप्पा मारत असतात. सगळे प्राणी खिडकीतून पाहतात. त्यांना प्राणी आणि माणसात काहीच फरक कळत नाही. सर्वसामान्यांना गप्प बसण्या वाचून मार्ग नसतो.  येथे कादंबरीचा शेवट होतो.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ” काहीपण देगा देवा…” ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ ” काहीपण देगा देवा…” ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

ज्योतिष शास्त्रासंबंधीत ‘ व्यवसाय जातक’  नावाचे एक पुस्तक वाचनात आहे. यात ‘सुखवस्तू’ लोकांचे ग्रहयोग दिले आहेत. थोडक्यात खूप काही Ambitious नसलेले , आहे त्यात  समाधानी, फारशी रिस्क न घेणारे, परंपरेने आलेला व्यवसाय चालवणारे, मुळ गाव न सोडणारे इ इ लोक्स या वर्गीकरणात येतात. यांच्या पत्रिकेतील ग्रहांचे नाते एकमेकांशी गुण्या- गोविंदाचे असते. उगाच कोण वक्री नसतो, एकमेकांशी स्फोटक केमिस्ट्री नसते ,  शुभ ग्रह खूप चांगले नसतात, पापग्रह खूप त्रास देत नाहीत.दशा ही फारशा वाईट नसतात. जन्म, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, संतती, निवृत्ती, वृधत्व हे चक्र व्यवस्थित पार पडते.

ऍडजेस्टमेंट, फ्लेक्झिबलपणा त्यांच्या रक्तात असतो. पत्रिकेतील बहुसंख्य ग्रह द्विस्वभाव राशींसंबंधित असतात.

त्यामुळे त्यांचा विशेष काही आग्रह नसतो 

थोडक्यात जातकाला आणि ज्योतिषांनाही फारसा ताप न देणारी यांची पत्रिका असते.

” काहीपण ” चालेल हे यांच्या जीवनाचे सूत्र. 

आज नाष्टयाला काय करायचे असे घरी विचारले गेले(च) तर   – “काहीपण” हेच उत्तर ब-याचदा त्यांच्याकडून येते

फिरायला कुठे जायचे – कुठेही, सिनेमा कुठला बघायचा – ‘कुठलाही’ हीच वृत्ती ते कायम ठेवतात.

उद्या हे मंत्री झाले आणि खातेवाटपाच्या वेळीही फारशी किरकिर न करता  ‘काही पण’ चालेल (पण द्या )ही भूमिका ठेवतील.

अशा व्यक्तींसाठी तुकोबांची रचना वेगळ्या शब्दात — 

 

काहीपण देगा देवा

पोहे,मॅगी ,उपमा !

 

जया अंगी ‘काही’पण

तया यातना कठीण !

 

महापूरे झाडे जाती

तेथे ‘काहीपण’ वाचती !

#काहीपण_देगा_देवा

 

  श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर  घड्याळ … ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पहा पुणे विद्यापीठातील हे सुंदर  घड्याळ … ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

◆ 1:00 वाजण्याच्या स्थानावर ब्रह्म लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की ब्रह्म एकच आहे. 

    एको ब्रह्म द्वितीयो नास्ति 

◆ 2:00 वाजण्याच्या स्थानावर अश्विनौ लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की अश्विनी कुमार दोन     आहेत. 

◆ 3:00 वाजण्याच्या स्थानावर त्रिगुणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे आहे की गुण तीन प्रकारचे आहेत. 

     सत्वगूण, रजोगूण आणि तमोगूण. 

◆ 4:00 वाजण्याच्या स्थानावर चतुर्वेदा: लिहिलेले आहे, तात्पर्य हे की वेद चार आहेत. 

    ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। 

◆ 5:00 वाजण्याच्या स्थानावर पंचप्राणा: लिहिलेले आहे, ज्याचे तात्पर्य हे की प्राण पांच प्रकारचे आहेत. 

     अपान, समान, प्राण, उदान आणि व्यान. 

◆ 6:00 वाजण्याच्या स्थानावर षड्र्सा: लिहिलेले आहे, याचा अर्थ असा की रस 6 प्रकारचे आहेत. 

     मधुर, अमल, लवण, कटु, तिक्त आणि कसाय. 

◆ 7:00 वाजण्याच्या स्थानावर सप्तर्षय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सप्त ऋषि आहेत. 

     कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वशिष्ठ. 

◆ 8:00 वाजण्याच्या स्थानावर अष्ट सिद्धिय: लिहिलेले आहे, याचे तात्पर्य हे की सिद्धि आठ प्रकारच्या आहेत. 

     अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, इशित्व आणि वशित्व. 

◆ 9:00 वाजण्याच्या स्थानावर नव द्रव्यणि अभियान लिहिले आहे याचे तात्पर्य हे की 9 प्रकारच्या निधी आहेत. 

     पद्म, महापद्म, नील, शंख, मुकुंद, नंद, मकर, कच्छप, आणि खर्व. 

◆ 10:00 वाजण्याच्या स्थानावर दशदिशः लिहिले आहे, याचे तात्पर्य हे की दिशा 10 आहेत. 

     पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षीण, आग्नेय , वायव्य, नैऋत्य, इशान्य, उर्ध्व आणि अध 

◆ 11:00 वाजण्याच्या स्थानावर रुद्रा: लिहिले आहे, तात्पर्य हे की रुद्र 11 आहेत.

     कपाली, पिंगल, भीम, विरुपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिर्बुध्न्य, शम्भु, चण्ड आणि भव. 

◆ 12:00 वाजण्याच्या स्थानावर आदित्या: लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ हा आहे की सूर्य 12 आहेत. 

     अंशुमान, आर्यमन, इंद्र, त्वष्टा, धातु, पर्जन्य, पूषा, भग, मित्र, वरुण, विवस्वान आणि विष्णु.

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares