मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ कथा : पांघरूण… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ कथा : पांघरूण सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

मी डी. एड. कॉलेजला होते, तेव्हाची गोष्ट. मला बर्‍याचदा ‘समाजसेवा’ हा विषय शिकवायला असे. या विषयांतर्गत एक उपक्रम होता, समाजसेवी संस्थांना भेटी. यात अनाथाश्रम, वृद्धाश्रम, रिमांड होम, मूक-बधीर मुलांची शाळा, गतिमंद मुलांची शाळा अशा अनेक संस्था असत.

एका वर्षी मला कळलं, कॉलेजपासून पायी वीस मिनिटांच्या अंतरावर एक चर्च आहे. त्या चर्चने एक क्रेश चालवलं आहे. क्रेश म्हणजे संगोपन गृह. या क्रेशची माहिती घेण्यासाठी मी माझ्या विद्यार्थिनींना घेऊन तिथे गेले. क्रेशला आर्थिक मदत जर्मन मिशनची होती. इथे आस-पासच्या वस्तीतली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणार्‍यांची मुले येत. सकाळी ८ वाजता मुले येत. तिथे त्यांना दूध, नाश्ता दिला जाई. शिक्षण, दुपारचे जेवण, पुन्हा शिक्षण, खेळ, गाणी, चित्रे काढणे, सगळं तिथे करायला मिळे. दुपारी बिस्किटे, फळे वगैरे दिली जात. संध्याकाळी ६ वाजता मुले आपआपल्या घरी जात.

तिथल्या मदतनीस क्रेशबद्दलची माहिती सांगत होत्या. ‘ इथल्या मुलांना जर्मनीतील काही लोकांनी दत्तक घेतले आहे. त्यांचा खर्च ते करतात. तिथल्या मुलांना खेळणी पाठवतात. चित्रे पाठवतात. ग्रीटिंग्ज पाठवतात. आम्ही ते सगळं मुलांना देतो.. पण इथे खेळायला. बघायला. त्यांना खेळणी वगैरे घरी नेऊ देत नाही. आपल्या घराचे फोटोही मुलांचे दत्तक पालक पाठवतात. पत्रे पाठवतात. आम्ही या मुलांच्या आयांना नेहमी

सांगतो, ‘तुम्ही पण त्यांना पत्र लिहा. काय लिहायचे, ते सांगा. आम्ही इंग्रजीत लिहून त्यांना पाठवू. ’ पण आम्हाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. ’

त्यांनी मग आम्हाला अशी काही पत्रे, खेळणी, ग्रीटिंग्ज दाखवली. कुठली कोण माहीत नसलेली मुले.. पण चर्चच्या सांगण्यावरून ते परदेशी, या मुलांचा खर्च करत होते. सामाजिक बांधिलकीचा केवढा व्यापक विचार. चर्चचा आदेश म्हणजे त्यांच्यासाठी जणू प्रभू येशूचा आदेश होता.

त्या दिवशी त्या क्रेशमध्ये आणखी एक कार्यक्रम होता. थंडीचे दिवस होते. त्यामुळे तिथे मुलांसाठी त्या दिवशी चादरी वाटण्यात येणार होत्या. प्रमुख व्यवस्थापिका रेमंड मॅडमनी त्या दिवशी मुलांच्या आयांना बोलावून घेतले होते. हॉलमध्ये सगळे जमले. दोघे शिपाई सोलापुरी चादरींचे गठ्ठे घेऊन आले.

प्रार्थना, सर्व उपस्थितांचे स्वागत झाले. प्रभू येशूची शिकवण, तो सगळ्यांकडे कसा कनवाळू दृष्टीने बघतो, असं सगळं बोलून झालं. मुलांच्या परदेशातील पालकांनी चादरीचे पैसे दिल्याचे सांगितले गेले. ‘ त्यांचे आभार मानणारे पत्र आमच्याकडे लिहून द्या. आम्ही तिकडे ते पाठवू, ’ असंही तिथे सांगण्यात आलं.

तिथे चादरी वाटप सुरू झाले आणि माझ्या मनात एक कथा साकारू लागली. तिथल्याच शाळेतील एक मुलगा. — त्याचं नाव मी ठेवलं सर्जा आणि त्या क्रेशचं बारसं केलं ‘करूणानिकेतन क्रेश. ’

हिंडेनबुर्गमधील एका मोठ्या नामांकित चर्चची इथल्या चर्चला आणि क्रेशला मदत होती, ही तिथे मिळालेली माहिती. त्या चर्चने त्यांच्या देशातील सुखवस्तू सज्जनांना, इथल्या एकेका मुलाला दत्तक घ्यायला सांगितले होते. क्रेशमध्ये सध्या अशी ५० मुले होती. त्यांचे ५० दत्तक पालक, त्यांचा रोजचा खर्च करणारे. क्रेशच्या माध्यमातून त्यांना ती मिळत होती. हे अर्थातच तिथे कळलेले वास्तव.

कथेतल्या सर्जालाही तिथल्या एका कुटुंबाने दत्तक घेतलय. ते कुटुंब मात्र माझ्या कल्पनेतलं.

ज्यो पप्पा, मेरी मम्मी, अग्नेस, मार्था, डेव्हीड हे त्याचं दत्तक कुटुंब. त्यापैकी डेव्हीड त्याच्या साधारण बरोबरीचा. पप्पांचं, डेव्हीडचं त्याला पत्र येत असे. पण त्याला ते वाचता येत नसे. मॅडम पत्र वाचून दाखवत. मराठी भाषांतर करून सांगत. पत्र वाचता आलं नाही, तरी सर्जा किती तरी वेळ त्या गुळगुळीत कागदावरून हात फिरवत राही. पत्र नाकाजवळ नेऊन त्याचा सुगंध घेत राही. अशा अनेक कल्पित

प्रसंगांची मालिका मी कथेत गुंफली आहे. त्यातून सर्जाचं साधं, भोळं, निरागस व्यक्तिमत्व आणि त्याच्या बालमनातले विचार, भावना कल्पना प्रगट करण्याचा मी प्रयत्न केला आहे.

डेव्हीड एकदा सर्जाला पत्र पाठवतो. त्याबरोबरच तो आपल्या लाडक्या कुत्र्याचा- जिमीचा फोटो पाठवतो. पत्रात तो लिहितो, ‘तुझा म्हणून मी रोज जिमीचा स्वतंत्र कीस घेतो. ’ मग सर्जा फोटोतल्या जिमीच्या अंगावरून हात फरवतो आणि फोटोतल्या जिमीची पप्पी घेतो.

डेव्हीड सर्जाला, ’ तू तुझ्या घराचे फोटो पाठव, ’ असं पत्रातून लिहीत असे. सर्जाला वाटे, कसलं आपलं घर… घाणेरडं, कळकट. आपली भावंडे, शेंबडी, केस पिंजारलेली. फाटक्या लुगड्यातली आई, खोकून खोकून बेजार झालेली आजी… यांचे कसले फोटो काढून पाठवायचे आणि काढणार तरी कोण? सर्जाच्या मनात तुलना सुरू व्हायची. — फोटोत बघितलेलं ज्यो बाबांचं घर कसं – मॅडम गोष्टी सांगत, त्यातल्या राजाच्या

महालासारखं. घरातली सगळी माणसं कशी छान दिसणारी. झकपक कपड्यातली. आणि सर्जाचं घर–

सर्जाचं घर, मी, तळागाळातलं कुठलंही प्रातिनिधिक घर असेल, तसं रंगवलं. त्याची आई विड्या वळून संसार चालवणारी. म्हातारी, दमेकरी सासू, दोन भावंड–दिवसभर उनाडणारी, बाप रिक्षा चालवायचा पण सगळा पैसा बाई-बाटलीत उडवायचा. मनात येईल, तेव्हा बायकोच्या तोंडावर काही नोटा फेकायचा. तेवढंच त्याचं आपल्या संसाराबाबतचे कर्तव्य. ‘साल्या, भडव्या, रांडेचा ’ शिवाय बोलणं नाही. आई देखील सदा कारवादलेली.

सर्जावर झालेले स्वछतेचे संस्कार तो आपल्या भावंडांवर करू शकत नाही, याचे त्याला दु:ख आहे. नुकताच तो शाळेत येऊ लागला होता, त्यावेळचा प्रसंग… एकदा त्याने नाश्त्याच्या वेळी प्लेटमधले पोहे आपल्या भावंडांना देण्यासाठी शर्टाच्या खिशात भरले. खिशाला तेलकट, पिवळट डाग पडले. मॅडमनी चोरी पकडली. सर्जाला वाटले, आता आपल्याला मार बसणार. मॅडमनी त्याला मारलं नाही पण त्या रागावल्या. ‘चोरी करणं पाप आहे’ म्हणाल्या. त्यांनी त्याला येशूच्या फोटोपुढे गुडघे टेकून बसायला सांगितलं. प्रार्थना करायला सांगितली. क्षमा मागायला सांगितली. मग त्या म्हणाल्या, ‘लेकराच्या

हातून चूक झाली. तू त्याला माफ कर. तुझं अंत:करण विशाल आहे. तू आमचा वाटाड्या आहेस. आम्हाला क्षमा कर. ’

– – हा प्रसंग लिहिताना, म्हणजे मॅडमबद्दल लिहिताना, कुठे इकडे तिकडे काही पाहिलेलं, ऐकलेलं, मनात रुजून गेलेलं आठवलं. त्याचा उपयोग मी त्या प्रसंगात केला. त्यानंतर सर्जाने असं पाप पुन्हा केलं नाही. त्याच्या धाकट्या भावंडांना उचलेगिरीची सवय होती. सर्जा त्यांना म्हणे, ‘प्रभू येशू म्हणतो, असं करणं पाप आहे. ’ त्यावर आई म्हणे, ‘तुला रं मुडदया रोज चांगलं चुंगलं गिळाया मिळतय, तवा हे पाप हाय, सुचतं.

कधी भावा-बहिणीसाठी येवढं- तेवढं काय-बाय आणलंस का?’ आणावसं वाटे, पण तो आणू शकत नव्हता. त्याची तगमग होई.

त्याला या शाळेत त्याच्या मामानं आणलं होतं. त्याने ठरवलं होतं, खूप अभ्यास करायचा. खूप शिकायचं आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी जर्मनीला ज्यो पप्पांकडे जायचं. ज्यो पप्पा त्याला पत्रातून नेहमी असंच लिहीत.

त्या दिवशी क्रेशमध्ये चादरी वाटपांचा कार्यक्रम झाला. चादरी वाटायला व्यवस्थापिका रेमंड बाई स्वत: आल्या होत्या. चर्चचे प्रमुख फादर फिलीप यांच्या हस्ते चादरींचे वाटप होणार होते. सुरूवातीला डोळे मिटून प्रभू येशूची प्रार्थना झाली.

– – मी माझ्या कथेत प्रार्थना घेतली – – 

‘ मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला

कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला. ’

– – ही प्रार्थना, मी डी. एड. कॉलेजमध्ये लागल्यानंतर आमच्या विद्यार्थिनींनी म्हणताना

ऐकली होती. तिचा उपयोग या कथेसाठी मी केला.

त्यानंतर मॅडम रेमंडनी सर्वांचं स्वागत केलं. येशूच्या उपदेशाबद्दल सांगितलं आणि

चादरी वाटप सुरू झालं. माझ्या कल्पनेने मात्र त्या चादरींची ब्लॅंकेट्स् केली. निळ्या, हिरव्या, लाल,

गुलाबी, सोनेरी रंगांची ब्लॅंकेट्स् मोहक. आकर्षक डिझाईन असलेली ब्लॅंकेट्स्.

आपल्याला कोणतं ब्लॅंकेट मिळेल, याचा सर्जा विचार करतोय. कधी त्याला वाटतं आपल्याला निळं, निळं, आभाळासारखं ब्लॅंकेट मिळावं, कधी सोनेरी, कधी हिरवं. त्याला लाल ब्लॅंकेट मिळतं. मग त्याला आठवतं डेव्हीडच्या खोलीतल्या बेडवर याच रंगाचं ब्लॅंकेट आहे. ज्यो बाबांनी डेव्हीडसारखंच ब्लॅंकेट आपल्यालाही पाठवलं, म्हणून तो खूश होऊन जातो.

कार्यक्रम संपला. बायका आपआपल्या चादरी घेऊन आपआपल्या घरी निघाल्या. माझं मन कथेतल्या सर्जाच्या आई पाठोपाठ त्याच्या घरी निघालं. काय घडलं पुढे?

– – सर्जा भयंकर उत्तेजित झाला होता. त्याला आज जेवण-खाण काही सुचत नव्हतं. तो घरी आल्या आल्या आपल्या भावंडांना बोलावतो आणि सगळे ते ऊबदार ब्लॅंकेट पांघरून झोपून टाकतात.

सर्जाचा बाप दारू पिऊन घरी येतो आज त्याच्या खिशात दमड्या नसल्यामुळे त्याला बाईकडे जाता आलेलं नाहीये. तो अस्वस्थ आहे. घरी येताच त्याचा पाय त्या नव्या ब्लॅंकेटमध्ये अडकतो. तो खाली पडतो. उठता उठता त्याचे लक्ष एकदम त्या आकर्षक ब्लॅंकेटकडे जाते. त्याच्या डोक्यात वीज चमकते… ‘ हे ब्लॅंकेटच आज तिला द्यावं. ती एकदम खूश होऊन जाईल… अशी चिकटेल, लई मजा येईल. ’

तो सर्जाच्या अंगावरचे ब्लॅंकेट ओढू लागतो. ब्लॅंकेट दे म्हणतो. सर्जा म्हणतो, ‘ माझ्या जर्मनीतल्या

बापाने माझ्यासाठी पाठवले आहे. मी देणार नाही. ’

‘ तुझ्या जर्मनीतल्या बापाकडेच निघून जा, ‘ असं म्हणत सर्जाचा बाप ते ब्लॅंकेट हिसकावून निघून जातो. पाठीमागच्या सीटवर ब्लॅंकेट ठेवून तो रिक्षा सुरू करतो.

सर्जा रडत राहतो. त्याच्या अश्रूभरल्या डोळ्यासमोर येते, ते फोटोतल्या ज्यो बाबांचे उबदार घर. त्याला अधिकच उघड्यावर पडल्यासारखं वाटतं. रडत रडत तो आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो. आई आपल्या फाटक्या धडुत्याचा पदर त्याच्या अंगावर सरकवते.

‘पांघरूण’ या माझ्या कथेची ही जन्मकथा. साधारण १९८२- ८४ च्या दरम्यान ही कथा मी लिहीली. त्या काळात दर्जेदार समजल्या जाणार्‍या किर्लोस्करमध्ये ती प्रकाशित झाली. अनेक वाचकांची कथा आवडल्याची खुषीपत्रे मला आली. पुढे या कथेचा हिंदीमध्येही अनुवाद झाला. तो ‘प्राची’सारख्या प्रतिष्ठित मासिकात प्रकाशित झाला.

“ पांघरूण “ ही कथा वास्तवाच्या पायावर उभी राहिलेली आहे. कथेमधले अनेक तुकडेही वास्तव आहेत. त्याच्या विविध प्रसंगांच्या भिंती, त्याला मिळालेलं भाव-भावनांचं रंगकाम, पात्रांच्या मनातील विचारांचं नक्षीकाम आणि एकंदर घराच्या अंतर्भागातील सजावट कल्पनेने सजवली आहे.

– – मला नेहमीच वाटतं, त्या दिवशी त्या क्रेशला आम्ही भेट दिली नसती, वा त्याच दिवशी तिथे चादरी वाटपाचा कार्यक्रम झाला नसता, तर इतकी चांगली कथा मला सुचली नसती.

© सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समज, गैरसमज व अफवा… भाग-२ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

समज, गैरसमज व अफवा… भाग-१ ☆ श्री सुनील देशपांडे 

(मृतदेहाचं डिसेक्शन करणे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गरजेचे असल्याने त्याची विटंबना होण्यासारखे काही नाही.) – इथून पुढे 

खरं म्हणजे मृतदेह जाळून किंवा पुरून टाकणे किंवा कोणत्याही प्रकारे तो देह नष्ट करणे हीसुद्धा तसं पाहिलं तर त्या मृतदेहाची विटंबनाच आहे. मृत्यूनंतर देहाला तिरडीवर बांधणे त्याची मिरवणूक काढणे त्याला वेगवेगळे विधी करून हळूहळू जाळणे या सुद्धा खरं म्हणजे विटंबनाच आहेत की. मुख्यतः हे लक्षात घेतले पाहिजे की मृत्यूनंतर त्या देहाची कोणत्यातरी पद्धतीने विल्हेवाट लावणे आवश्यक असते.  हे सर्वांनाच मान्य आहे. देहदान ही सुद्धा मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत नव्हे काय ?  परंतु ती विल्हेवाट लावण्या अगोदर त्या मृतदेहाच्या डिसेक्शन मधून वैद्यकीय विद्यार्थ्यांना ज्ञान मिळते. संशोधनाला चालना मिळते. ही सगळ्यात मोठी  पुण्याचीच (यात ‘पुणे’ या शहराचा कांहीं संबंध नाही) गोष्ट आहे हे जाणून घेतले पाहिजे. सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जेव्हा मृतदेह डिसेक्शन साठी घेतला जातो त्यावेळेला डिसेक्शन सुरू करण्यापूर्वी सर्व विद्यार्थी त्या मृतदेहाला हात जोडून प्रार्थना करतात आणि आदर व सन्मान पूर्वक त्या मृतदेहाला म्हणतात की ‘तुमच्या या त्यागामुळे, दानामुळे आम्हाला ज्ञान मिळत आहे. आमचं शिक्षण पूर्ण होतं आहे, ही तुमची खूप मोठी कृपा आहे. त्याबाबत आम्ही आपले कृतज्ञ आहोत’  अशा प्रकारचा संदेश असणारी ही प्रार्थना असते. जगामध्ये बहुतेक सर्व वैद्यकीय महाविद्यालयात अशा प्रकारच्या विविध प्रार्थना करून मगच डिसेक्शन चालू केले जाते. त्यामुळे कुठल्याही तर्‍हेचा अनादर किंवा विटंबना त्या मृतदेहाची होत नाही. काही महाविद्यालयांमध्ये विशेषतः नाशिकच्या वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात वर्षातून एक दिवस कृतज्ञता दिन म्हणून साजरा करून त्यादिवशी देहदान करणाऱ्या कुटुंबियांचा कृतज्ञतापूर्वक आदरसत्कार आयोजित केला जातो त्यांनी केलेल्या या महान कृत्याबद्दल त्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात येतो. 

याबाबतीत एक आगळे वेगळे व जगातले पहिले आणि आदर्श उदाहरण के.एल.ई. या संस्थेच्या बेळगाव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये घडले आहे.  त्याचा आदरपूर्वक उल्लेख करणे आवश्यक आहे असे मला वाटते.  २०२० या वर्षी के.एल.ई. महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. महांतेज यांनी स्वतः स्वतःच्या वडिलांचे शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राची माहिती दिली.  डॉ. महांतेज यांचे वडील डॉ. रामण्णावर यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली  होतीच, परंतु मृत्युपत्रात त्यांनी अशीही इच्छा व्यक्त केली होती की स्वतःच्या मुलाने त्यांचे शवविच्छेदन करावे. दोन वर्षांपूर्वी डॉ. रामण्णावर यांच्या निधनानंतर त्यांचे देहदान करण्यात आले होते. आणि यावर्षी त्यांचे चिरंजीव डॉ. महांतेज यांनी त्यांच्या देहाचे शवविच्छेदन करून विद्यार्थ्यांना शरीरशास्त्राचे ज्ञान दिले. अशा तऱ्हेने त्यांनी वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण केली. हे जगाच्या इतिहासातील पहिले आणि सध्यातरी एकमेव उदाहरण आहे. डॉ. महांतेश आणि त्यांच्या वडिलांना आमचे शतशत नमन. आमचे भाग्य मोठे म्हणून चौथ्या पदयात्रेच्या शेवटी  बेळगाव येथे के.एल.ई. संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आमच्या पदयात्रेचा सांगता समारंभ बहारदार रीतीने साजरा झाला. यावेळी डॉ. महांतेश यांच्या प्रत्यक्ष भेटीचा योग आला. धन्य ते वडील कै डॉ. रामण्णावर आणि धन्य त्यांचे पुत्र डॉ. महांतेश !

देहदानाच्या बाबतीत गैरसमजांना दूर ठेऊन तटस्थपणे आणि धीरोदात्तपणे देहदानाचा आग्रह धरणाऱ्यांपैकी आणखी एक उदाहरण म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय कै शंतनुराव किर्लोस्कर. त्यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केलीच होती, परंतु तसा विशेष आग्रहही धरला होता.  जेव्हा त्यांनी देहदानाचा संकल्प जाहीर केला, तेव्हा त्यांचे एक स्नेही डॉ. गुजर यांनी तुम्ही देहदान करू नका असे पत्र त्यांना लिहिले होते. त्या पत्राला त्यांनी जे उत्तर दिले ते खरोखरच वाचण्यासारखे आहे म्हणून मुद्दामच मी खाली उद्धृत करीत आहे.  विचार करा एक इंजिनियर एका डॉक्टरला हे पत्र लिहितोय लक्षपूर्वक वाचा….. 

” प्रिय डॉ. गुजर, 

आपले १९ जानेवारी १९९० चे पत्र मिळाले. आपण माझ्याबद्दल दाखविलेल्या आपलेपणासाठी मी आपला आभारी आहे. मागील ४० वर्षात माझ्यावर लहान-मोठ्या बारा ते चौदा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. प्रत्येक वेळी मला आधुनिक वैद्यकशास्त्राचा चमत्कार जाणवला आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डॉक्टरांशी अनौपचारिक चर्चा करत असताना, माझ्या असे लक्षात आले आहे की माझे देहदान हे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या संशोधनासाठी एक संशोधन प्रकल्प म्हणून उपयोगी पडू शकेल. इतक्या वर्षांमध्ये पार पडलेल्या शस्त्रक्रिया कशा झाल्या आणि त्यातून काही शिकण्यासारखे आहे काय यावरही काही संशोधन होऊ शकेल.  वस्तुतः या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या एका विशिष्ट धमणी मधील रक्तावरोध सुरु होऊन त्यासाठी कराव्या लागलेल्या शस्त्रक्रियेने झाली. हे सर्व अचानक कसे घडले, कोणत्याही लक्षणां शिवाय कसे घडले, हे सर्वांनाच अनाकलनीय वाटते. कदाचित माझ्या मृत्यूमुळे वैद्यकीय संशोधकांना हे कसे घडले असावे त्याचा माग मिळू शकेल व त्यातून दुसऱ्या कुणाला ते होऊ नये म्हणून प्रतिबंधक उपाय शोधून काढता येऊ शकतील. 

“माझ्या देहाची राख होण्यापेक्षा माझ्या देहदानामुळे वैद्यकीय ज्ञानाच्या क्षेत्रात काही भर पडू शकत असेल तर ते नक्कीच जास्त श्रेयस्कर होईल असे माझे ठाम मत आहे”

… हे मूळ पत्र इंग्रजी भाषेत असून वरील मजकूर हा त्याचा मराठी अनुवाद आहे. परंतु एक इंजिनियर एका डॉक्टरला किती ठामपणाने कळवतो यावरून त्यांना देहदानाचे महत्त्व किती मनोमन पटले होते याची साक्ष पटते.  देहदान किंवा अवयवदान याबाबत आपल्याला जे पटले आहे ते ठामपणे इतरांना आणि विशेषत: आपल्या कुटुंबियांना तेवढ्याच ठामपणे समजावून सांगता आले पाहिजे. त्यांची मानसिक तयारी करता आली पाहिजे. म्हणजे आपला संकल्प हा नुसता संकल्प न राहता मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी होण्याची निश्चिती होते. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री कै. ज्योती बसू व सुप्रसिद्ध साहित्यिक आदरणीय कै विंदा करंदीकर हे सुद्धा असेच देहदान या गोष्टीबाबत आग्रही असत. त्यांचेही मृत्यूनंतर देहदान झाले आहे. 

देहदानाच्या बाबतीत कोकणा मधील आमच्या एका कार्यकर्त्याचा अनुभव सांगण्यासारखा आहे. आमच्या पदयात्रेच्या दरम्यान एकदा सभेमध्ये चर्चा करत असता त्या कार्यकर्त्याने हा अनुभव सांगितला. त्याच्या वडिलांनी मृत्यूनंतर त्यांचे देहदान झालेच पाहिजे असे त्याला निक्षून सांगितले होते. त्यांनी देहदानाचा फॉर्मही भरला होताच. पण मुलाला आवर्जून याबद्दल जाणीव करून दिली होती. देहदान नेहमी मेडिकल कॉलेजमध्येच म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयामध्येच करावयाचे असते.  मृत्यूनंतर सहा तासाच्या आत देह मेडिकल कॉलेजमध्ये नेऊन द्यावा लागतो. त्यामुळे देहदान करायचे असल्यास बाहेरगावाहून येणाऱ्या कोणत्याही नातेवाईकांची वाट पाहणे शक्य नसते. या मुलाने वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर ताबडतोब शववाहिकेची व्यवस्था केली.  त्यांच्या गावापासून जवळचे मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथे होते आणि कोल्हापूरला जाण्यासाठी किमान तीन ते चार तासाचा अवधी लागणार होता. कुणालाही कल्पना न देता त्याने शववाहिकेमध्ये वडिलांचे शव ठेवले आणि कोल्हापूरच्या दिशेने निघाला.  जाण्यापूर्वी त्याने मृतदेहाचा फोटो मोबाईल वर घेतला आणि सगळ्या नातेवाईकांना संदेश पाठवला “वडिलांचे निधन अमुक अमुक वाजता येथे झाले आहे. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यासाठी मी कोल्हापूर येथे घेऊन चाललो आहे. आपल्यासाठी प्रत्यक्ष देहदर्शन शक्य होणार नाही. परंतु मृतदेहाच्या दर्शनाची सोय मी आपल्याला व्हाट्सअप च्या माध्यमातून करून देत आहे. घर बसल्या मृतदेहाचे दर्शन घेऊन वडीलांसाठी प्रार्थना करावी, आणि इकडे येण्याची धावपळ करू नये ही विनंती.” अशा तऱ्हेने सोशल मीडियाचा एक चांगला वापर करून नातेवाईकांची इच्छा आणि वडिलांची इच्छा या दोन्हीचा मान राखत देहदानाची पूर्तता केली. त्या तरुणाची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. आजच्या तरुणाईच्या डोक्यामध्ये अशा चांगल्या कल्पना येतात त्या कल्पनांना माझा सलाम !

मृत्यूनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायच्या काही पद्धती आहेत. आनंदवनामध्ये आदरणीय बाबा आमटे यांनी प्रचलित करून ठेवली आहे ती पद्धत जास्त पर्यावरण स्नेही आणि सर्वोत्कृष्ट आहे असे मला वाटते.  त्या ठिकाणी जमिनीत खोल खड्डा खणून मृतदेहाला केळीच्या पानामध्ये गुंडाळून तो मृतदेह खड्ड्यांमध्ये पुरला जातो. त्या मृतदेहाच्या खाली आणि आजूबाजूला मीठ टाकले जाते आणि नंतर तो खड्डा बुजवून त्यावर एक वृक्ष लावला जातो. ही माझ्या मध्ये सगळ्यात उत्कृष्ट देहाची विल्हेवाट लावण्याची पद्धत आहे.  लिंगायत समाजामध्ये सुद्धा व्यक्तीच्या मृत्यूनंतर व्यक्तीला जमिनीत पुरण्याची पद्धत आहे.  व्यक्तीच्या देहाची माती होऊन जाण्याची प्रक्रिया व त्या मातीवर एखादा वृक्ष जगवणे ही पर्यावरणपूरक पद्धत ही जगात सगळीकडे असावी असे माझे वैयक्तिक मत आहे. अर्थात आपल्या देशामध्ये याबाबतीत बदल होणे अशक्यच. अनेक धर्म, अनेक जीवनपद्धती अनेक प्रचलित समजुती यांचा पगडा आहेच. त्यातही समजा आनंदवनाच्या पद्धतीने मला माझ्या देहाची विल्हेवाट लावायची असली तरी ती होईल का ?  प्रत्येक धर्माची वेगवेगळी दफनभूमी आहे. त्या दफनभूमी मध्ये दुसर्‍या धर्माच्या व्यक्तिचा देह नेला जाऊ शकत नाही. भविष्यात माझ्या मृत्यूनंतर तशी वेळ आलीच तर मला दफनभूमी मिळू शकणार नाही. कारण हिंदूंमध्ये दहनाची पद्धत असल्यामुळे हिंदूंसाठी दफनभूमी नाही. कोणत्याही शहरामध्ये अजून निधर्मी अथवा सर्वधर्मी सर्वसमावेशक दफनभूमी निर्माण करण्याचे प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे याबाबत सरकार दरबारी समविचारी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे वाटते. मृत्यूनंतर आपल्या देहाचे काय व्हावे याबाबत, तसेच मृत्युपूर्वीही आपल्या देहावर वेळप्रसंगी उपचार कशा पद्धतीने व्हावेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून वैद्यकीय इच्छापत्र करण्याचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. अजून त्याला कायदेशीर मान्यता नाही. पण याबाबतीत कायदेशीर मान्यतेचा लढा लढण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत. एखाद्या व्यक्तीने देहदान अवयवदान या बाबतही जर स्वतःचे खुले वैद्यकीय इच्छापत्र बनवले असेल, त्यामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीला त्याबाबतचे अधिकार दिले असतील, तर त्याची अंमलबजावणी कायदेशीररित्या झाली पाहिजे. त्याच्या कुटुंबीयांच्या इच्छेपेक्षा त्या व्यक्तीची मृत्यूपूर्वीची इच्छा ही सगळ्यात महत्त्वाची मानली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे मृत्युपत्राने स्वतःच्या संपत्तीचे वाटप व्यक्तीला करता येते आणि त्या पद्धतीने ते होणे ही कायदेशीर जबाबदारी असते. त्याचप्रमाणे शरीरसंपत्ती बाबत सुद्धा वैद्यकीय इच्छापत्र मान्य करून त्याप्रमाणे इतर कोणाच्याही इच्छेचा विचार न करता अंमलबजावणी करता आली पाहिजे. अशा पद्धतीने कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न करावयाचे आहेत. 

— समाप्त —

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गोष्ट एक आण्याची… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

??

☆ गोष्ट एक आण्याची… ☆ सौ. उज्ज्वला केळकर

आमच्या सोसायटीत यंदा हनुमान जयंतीचा उत्सव करायचा ठरला. बर्‍याच दिवसात सार्वजनिक कार्यक्रम सोसायटीत झाला नव्हता, हे एक कारण आणि दुसरं म्हणजे त्या दिवशी रविवार होता. लहान-थोर सार्‍यांनाच सुट्टी होती. बेत ठरला. प्लॅनिंग केलं गेलं. घरटी 25 रु. वर्गणी काढायचं ठरलं. पुरोहितांकडून मारूतीचा फोटो  आणला. विधीवत पूजा झाली. गंध, फूल, धूप, दीप, अक्षता सगळं यथासांग पार पडलं. ‘भीमरूपी महारुद्रा… ‘आरती झाली. नारळ फुटले. सर्वांना प्रसाद म्हणून खोबर्‍याचे तुकडे दिले. दामले वाहिनींनी प्रसादासाठी खोबर्‍याच्या वड्या करून आणल्या होत्या. त्याही वाटल्या. त्यानंतर स्पर्धा सुरू झाल्या. सूर्य नमस्कार, मनाचे श्लोक, कथाकथन (यात मारुतीच्या किंवा समर्थ रामदास स्वामींच्या कथा सांगणे) इ. कार्यक्रम झाले. सारे वातावरण आनंद, उल्हास, चैतन्य यांनी भरून गेले.

कार्यक्रमात सहभागी होताना स्मृतीवरचा धुराळा उडून गेला आणि मन बालपणात, प्राथमिक शाळेत असतानाच्या काळात भटकू लागले. आमच्या शाळेतही हनुमान जयंतीचा उत्सव दणक्यात साजरा होई.

मी कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. घरापासून शाळा दहा-पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती. सुरुवातीला माझे धाकटे मामा मला शाळेत पोचवायला येत. आम्ही त्यांना तात्या म्हणत असू. थोड्या दिवसांनी मी एकटी जाऊ-येऊ लागले. तशी आमची शाळा तळा-गाळातली म्हणता येईल अशी होती. पहिली ते चौथी चार वर्ग. प्रत्येकी एक तुकडी. लहानशीच इमारत.

दर शनिवारी शाळा सकाळची असे. शेवटच्या तासाला प्रत्येक वर्गात मारुतीच्या फोटोची पूजा केली जाई. उदबत्ती लावली जाई. फुले वाहिली जात. नारळ फोडला जाई. मग प्रसाद म्हणून खोबर्‍याचे तुकडे वाटले जात. आपल्याला मोठा तुकडा मिळावा, म्हणून सगळे टपून असत. यासाठी दोन पैसे वर्गणी घेतली जाई. त्यात सगळे बसे.

घरातून निघताना मात्र मी वर्गणीसाठी एक आणा घ्यायची. दोन पैसे वर्गणी. दोन पैसे माझ्याकडे उरत. शाळा सुटली आणि शाळेच्या बाहेर पडले की उजवीकडे पंचवीस-तीस पावलांवर एक चौक लागे. डावीकडे वळले की घरी जायचा रस्ता. सरळ गेले की म. गांधी रोड लागे. तिथून चाळीस – पन्नास पावले चालले की उजवीकडे एक आईस फॅक्टरी होती. एक लालबुंद, गोरे, गोल-मटोल पारशी गृहस्थ त्या फॅक्टरीचे मालक होते. तिथे दोन पैशाला आईसफ्रूट मिळे. आम्ही मैत्रिणी तो घेऊन तिथेच पायरीवर चोखत राहू. मग अबाउट टर्न आणि उजवीकडे वळून घराच्या रस्त्याला. अशी चंगळं मी पहिली ते चौथी चार वर्षे केली.

क्वचित कधी तरी घरात एक आणा गवसे. त्या दिवशी मधल्या सुट्टीत एक आण्याचा दुधाचा आईसफ्रूट ‘काय मस्ताय ना!’ असे म्हणत म्हणत चव घेत घेत तो चोखायचा.

आमच्या शाळेसमोर, गोळ्या, शेंगा, पेरू, चिंचा, आवळे असा माकडमेवा काही काही बायका विकायला बसत. माझ्या मैत्रिणी काही-बाही घेत. मग सगळ्या मिळून शेअर करून खात असू. माझ्याकडे पैसे नसत. घरी मागायची हिंमत होत नसे. त्यामुळे मैत्रिणींकडून फक्त घ्यायचं, द्यायचं काहीच नाही, याची फार खंत वाटायची.

यथावकाश वर्ष संपलं. परीक्षा झाली. आम्ही दुसरीत गेलो. माझे मोठे मामा कॅम्प एजुकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत मुखाध्यापक होते. आम्ही त्यांना आण्णा म्हणत असू. तेच माझे पालकही होते. त्यामुळे मला नादारी होती. तरीही चार आणे फी द्यावी लागे.

मी दुसरीत गेले, तेव्हा माझ्या धाकट्या मामांना, तात्यांना वाटलं की मी वरच्या इयत्तेत गेले, म्हणजे माझी फीदेखील एक आण्याने वाढली असणार, म्हणून त्यांनी मला फीचे पाच आणे दिले. प्रत्यक्षात बाईंनी फीचे चार आणेच घेतले. माझ्याकडे एक आणा उरला. त्या दिवशी मी एक आण्याच्या माशाच्या आकाराच्या भरपूर गोळ्या घेतल्या आणि मैत्रिणींमध्ये वाटल्या. मला त्यावेळी इतका आनंद झाला, काहीसा अभिमानही वाटला. मनात म्हंटलं, गेल्या वर्षीचं उट्टं काढलं. पण हा आनंद फक्त महिनाभरच टिकणार होता.

एक तारखेला प्रगती पुस्तक मिळालं. त्यावर पालकांची सही आणायची होती. मी दप्तरातून प्रगती पुस्तक काढून आण्णाना दिले. त्यांनी सही केली. प्रगती पुस्तकात फीचा कॉलम होता. त्यात चार आण्याची नोंद होती. तात्या म्हणाले, ‘मी तर तुला पाच आणे दिले होते. एक आणा कुठाय? ‘ मग मी प्रथम मोठ्याने गळा काढला. मग रडत रडतच सांगितले, ‘एक आण्याच्या गोळ्या घेऊन मैत्रिणींना वाटल्या.’ हेही संगितले की त्या अधून मधून काही बाही घेतात, बोरं,चिंचा ,शेंगा, गोळ्या…माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला त्यांना आत्तापर्यंत काहीच देता आलं नव्हतं म्हणून मी त्या दिवशी गोळ्या आणून वाटल्या.

मला वाटलं होतं, तसा त्या दिवशी आण्णाचा मार काही खावा लागला नाही. त्यांनी मला कधीच मारले नाही. ते फक्त एवढंच म्हणाले, ‘ त्या दिवशीच घरी आल्यावर तसं सांगायला हवं होतंस! त्या दिवसापासून पुढे कायमच मी पैशाच्याबाबतीत अगदी चोख व्यवहार करू लागले. त्यानंतर आणखीही एक गोष्ट घडली. मला घरून गोळ्या, शेंगा, पेरू असं काही-बाही आणण्यासाठी अधून-मधून आणा- दोन आणे मिळू लागले.

सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “नाक…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “नाक…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

सकाळी सकाळी आस्था चॅनलवर प्राणायाम पहात असताना छोटा चेतन म्हणाला “ आई आई त्या बाबांनी नाक मुठीत धरलय बघ.”  तसे आई म्हणाली “ नाही बाळा ते प्राणायाम करताहेत.”  पण एवढं साधं याला कळू नये का वाटून त्याच्या काकूने नाक मुरडले .तिकडे दुर्लक्ष केलेल्या चेतनचे प्रश्न चालूच झाले. ते नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडत आहेत पाहून त्याने पुन्हा विचारले “ आई तू म्हणतेस ते नाक दाबले की तोंड उघडते ते हेच का?  .. नाहीतर असं तरं नाही नाक धरी तो पाद करी ••• म्हणजे या बाबांनी••••• “ 

आईने आलेले हसू आवरले.  म्हणाली “ नाही रे बाळा नाक दाबणे हा येथे एक प्रकारचा व्यायाम आहे. “ 

तोपर्यंत बाबांनी साष्टांग नमस्कार घातला तर चेतन म्हणाला “ यांनी नाक रगडले का? “

या बाबांची मुद्दामच टर उडवली असे वाटून काकूबाईंच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. आपल्या मुलाला एकदा या काकूंनी पण नावे ठेवली होती आठवून म्हटल्याच काकूबाई ..  “ बघा काय आपलं पोरं दिवे लावतय ते••• हंऽऽ याला म्हणतात आपण हसे लोकाला अन शेंबूड आपल्या नाकाला. “  आता कस्स नाकं कापलं मनात म्हणत असतानाच  या बाईसाहेबांनीही नाक फुगवल. नाकाचा शेंडा लाल झाला. नाकावरचा राग स्पष्ट झाला.

तिने पण चढवला आवाज आणि म्हणाली, “ उगाच नाकाने कांदे सोलू नकोस हं. कशाला आमच्या मायलेकरां मधे नाक खुपसतेस गं? एरवी नाकावरची माशी उठत नाही . आणि आता नाक उडवून माझ्या लहान लेकराला नावं ठेवतेस होय? हंऽऽ नकटी लावी नाक अन् नाकवालीला लावती धाक••• “ 

“ ए••• तोंड आवर बरका••• तुझं तरी नाक न्हायी जाग्यावं अन् नखरा तिच्या बिघ्यावं••• एरवी नाका समोर चालणारी तू अनं आज काय असा हडळीचा अवतार घेतीयस आं••••”

दोघींचा असा अवतार बघून सासूबाई आल्या, आणि म्हणाल्या, “ कशाला एकमेकींपुढे नाक खाजवताय गं? असं म्हणतात  नाकातली नथ लावते तोंडाला कुलूप पण इथे तर नाकापेक्षा मोतीच जड व्हायला लागलाय की••• “ 

झालं आता सासूबाईंच्या नाकात कोण वेसण घालणार ? दोघी नाक वेंगाडून बसल्या फुरंगटून . 

सासूबाई म्हटल्या “ अगं तुमच्या दोघींची भाडणं सोडवायला माझ्या नाकी नऊ येतं गं . नका उगाच भांडू . दोघींना बोलून आपटलं तरी पडूनही नाक वरच असतय सारखं. अगं बायांनो संसाराच्या प्रवाहात नाका तोंडात पाणी जायची वेळ आणू नका•••  अगं बायांनो लेक असती नाकाचा शेंडा अन सून पाठीवरला गोंडा  तुम्ही माझे दोन दोन गोंडे आहात गं जरा गोंडस रहायला शिका.” 

सासूबाईंचे बोल ऐकून नाकातून पाणी गळायला लागले. डोळ्यातूनही वहायला लागले. नाईलाजाने दोघीही आपापल्या खोलीत निघून गेल्या. सासूबाईंनी उगाच नाकपुड्या फुगवून दीर्घ श्वास घेतला•••

‘ प्राणायामाचा ‘ —- 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्विक हील – Quick Heal… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ क्विक हील – Quick Heal… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री. कैलास काटकर

दहावीनंतर शाळा सोडलेल्या मराठी मुलानं दोन हजार कोटींची QUICK HEAL आयटी कंपनी उभी केली.

नाव कैलास काटकर. गाव मूळचे सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूर. राहायला पुण्याच्या शिवाजीनगर मधल्या नरवीर तानाजीवाडी मध्ये. वडील फिलिप्स कंपनीमध्ये हेल्पर, आई घरकाम करणारी. एक लहान भाऊ आणि एक बहिण. असं हे पाच जणांचं कुटुंब नतावाडीतल्या एका छोट्याशा खोलीत राहायचं.

कैलाश सगळ्यात थोरला. त्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा त्याच्याकडूनच. घरची परिस्थिती कशीही असली तरी त्याला शाळेत घातलेलं. पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत, फी भरायला पैसे नाहीत. कसंबसं रडतखडत दहावी पर्यंत पोहचला. पण दहावीनंतर पुस्तकी शिक्षणाला रामराम ठोकला आणि खऱ्या शिक्षणाला सुरवात केली. आयुष्य शिकवत असलेलं व्यावहारिक शिक्षण.

तसं कैलासला लहानपणापासूनच घरातल्या बिघडलेल्या वस्तू सोबत खटपट करायची आवड होती. वडिलांचं बघून बघून सहावीमध्ये असतानाच रेडियो दुरुस्त करायला सुरवात केली होती. त्याबद्दलचा एक महिन्याचा कोर्ससुद्धा केला होता. काही तरी करू असा आत्मविश्वास होता. दहावीच्या निकालाची वाट न बघता नोकरी शोधायला सुरवात केली.

एक दिवस त्याला पेपर मध्ये एक जाहिरात दिसली. एका कंपनीमध्ये कॅलक्युलेटर दुरुस्त करणाऱ्याची आवश्यकता होती. कैलासने आयुष्यात कधी कॅलक्युलेटर बघितला सुद्धा नव्हता. तरी त्याने अप्लाय केले. नशिबाने मुलाखतीसाठी आलेल्या पंचवीस जणांमधून त्याची निवड झाली. अंगभूत खटपटेपणा कामी आला. त्या कंपनीत कॅलक्युलेटर दुरुस्तीचं काम तर शिकलाच, शिवाय बँकांमधल लेजर पोस्टिंग मशीन, फॅसेट मशिन, अशा वेगवेगळ्या मशिनरी दुरुस्त करायला यायला लागल्या.

किती जरी झालं तर खटपट्या माणूस नोकरीत किती दिवस शांत बसेल? नोकरी सोडली आणि मंगळवार पेठेत स्वतःचं दुरूस्तीचं दुकानं सुरु केलं. सोबत एक हरकाम्या मुलगा सुद्धा ठेवला. त्यांची दिवसभर वेगवेगळ्या मशीन सोबत झटापट चालायची. पैसे बऱ्यापैकी मिळू लागले. 

एक दिवस कैलासला एका बँकेत एक नवीनच मशीन दिसलं. त्याने चौकशी केली, कोणी तरी सांगितलं, ”याला कॉम्प्युटर म्हणतात. आता येणार युग कॉम्प्यूटरचं असणार आहे.”

कैलास विचारात पडला. येणारं युग जर कॉम्प्युटरचं आहे तर आपल्याला शिकून घेतलं पाहिजे. पण शिकायचं कुठे हा सुद्धा प्रश्न होता.

नव्वदच्या दशकातला तो काळ. कॉम्प्यूटरने नुकताच भारतात चंचू प्रवेश केला होता. त्याच्या येण्यानं आपल्या नोकऱ्या जातील म्हणून डाव्या-उजव्या संघटना एकत्र लढा देत होत्या. कॉम्प्यूटर प्रचंड महाग होते आणि फक्त मोठ्या ऑर्गनायझेशनमध्येचं दिसायचे. कैलाशला कोणी कॉम्प्यूटरच्या जवळ देखील येऊ देत नव्हत.

एकदा चान्स मिळाला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोडवर टाईम्स ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. त्यांचे तीन प्रिंटर बंद पडले होते. दुरुस्तीला आलेल्यांनी सांगितलं ते फेकुनच द्यायच्या लायकीचे उरले आहेत. ऑफिसवाल्यांनी तशीच तयारी केली होती. पण योगायोगाने कैलाश तिथे आले होते. त्यांनी पैजेवर ते मशीन दीड तासात दुरुस्त करून दाखवले. 

टाईम्स ऑफ इंडियानं फक्त प्रिंटरचं नाही तर कैलाशच्या हातात आपले कॉम्प्यूटरसुद्धा देऊन टाकले. दोन वर्षाचा दुरुस्तीचा करार केला. कैलाशच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट ठरला. टाईम्स ऑफ इंडियाचं बघून बाकीच्या कंपन्या, बँकादेखील त्यांना काम देऊ लागल्या. पुण्यात कॉम्प्यूटर हार्डवेअर दुरुस्तीमध्ये कैलाश काटकर हे नाव प्रसिद्ध झालं.

स्वतःचं शिक्षण अर्धवट सुटलं पण कैलाश यांनी आपल्या भावाबहिणीच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीच तडजोड केली नाही. धाकटा भाऊ संजयसुद्धा हुशार होता. त्याला त्यांनी मॉडर्न कॉलेजमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियरिंगला प्रवेश घ्यायला लावला. तो देखील दिवसभर कॉलेज करून संध्याकाळी भावाच्या कामात मदत करत होता.

त्याकाळी व्हायरस हे प्रकरण नव्यानेचं उदयास आले होते. साथीच्या रोगाने जसे माणसे आजारी पडतात त्याप्रमाणेच कॉम्प्यूटरदेखील एखाद्या विशिष्ट प्रोग्रॅमचा प्रादुर्भाव झाला तर आजारी पडतात. मग ते आजारी पडू नयेत यासाठी असत रोगप्रतिबंधकारक औषधं. यालाच म्हणतात अँटी व्हायरस.

या व्हायरसच्या साथीची लागण झालेले बरेच कॉम्प्यूटर पुण्यात दुरुस्तीला कैलाश यांच्याच दुकानांत यायचे. लोक सांगायचे की तुम्हीच याला दुरुस्त करा. पण हा विषय होता सॉफ्टवेअरचा. हार्डवेअर वाले त्यात काय करणार. काहीतरी करून कैलाश ते कॉम्प्यूटर सुरु करून द्यायचे. त्यांच्या धाकट्या भावाने, संजयने सारख्या सारख्या लागण होणाऱ्या व्हायरसवर उपाय म्हणून एक टूल बनवले होते. जे त्यांच्या कस्टमरला खूप आवडले.

त्याचवेळी कैलास काटकर यांच्या बिझनेस माइंडमध्ये आयडिया आली की हा अँटी व्हायरसचा धंदा बराच पैसा कमावणार. त्यांनी भावाला एक स्पेशल कॉम्प्यूटर घेऊन दिला. नतावाडीमधल्या त्या वस्तीतल्या एका खोलीच्या घरात संजय काटकर अँटी व्हायरस बनवायच्या मागे लागला. दीड वर्षे लागली पण मराठी माणसाच स्वतःचं अँटी व्हायरस तयार झालं. त्याला नाव देण्यात आलं.क्विक हील.

वर्ष होतं १९९५. संजयनी स्वतःच या अँटी व्हायरसचा लोगो डिझाईन केला, पॅकेजिंग तयार केलं. कैलास काटकर कंपन्यांच्या दारोदारी फिरून आपलं प्रोडक्ट खपवू लागले. कॉम्प्यूटरमधल्या डाटाची नासाडी करणाऱ्या व्हायरसवर उतारा असलेला अँटी व्हायरस असणं किती गरजेचे आहे हे पटवून सांगेपर्यंत त्यांना नाकी नऊ यायचे पण त्यांनी जिद्द सोडली नाही.

त्याकाळात पुण्यात बऱ्याच आयटी कंपन्या सुरु होत होत्या. आयटी पार्क उभं राहत होतं. अशा सगळ्या नव्या जुन्या कंपन्यांना परदेशी अँटी व्हायरस पेक्षा चांगलं आणि स्वस्त असलेलं हे देशी अँटी व्हायरस पसंतीस पडलं. क्विकहिल अँटी व्हायरस बरोबर अनेक कंपन्यांनी वर्षाचे करार केले.

अजून मोबाईल फोन देखिल आले नव्हते. अशा काळात आफ्टर सर्विसला देखील भरपूर महत्व होतं. कैलाश काटकर यांनी मेहनतीने आपले ग्राहक सांभाळले. पुण्याबरोबर नाशिक, मुंबई येथे देखील आपली टीम उभी केली. वेगवेगळ्या शहरात जाण्याचाही त्यांना फायदा झाला. 

क्वालिटीच्या जीवावर स्पर्धेच्याकाळातही क्विकहिल मोठी झाली. मंगळवर पेठेत असणाऱ्या ऑफिसमधून कधी एक लाख स्क्वेअर फुट च्या ऑफिसमध्ये रुपांतर झाले कळले देखील नाही.

आज क्विकहिल हे भारतीय आहे, पुण्यात तयार झालंय, यावर कोण विश्वास ठेवणार नाही. तिथं तेराशेच्या वर कर्मचारी काम करतात. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचे ऑफिसेस उघडलेले आहेत. आज ऐंशीहून अधिक देशातल्या कॉम्प्यूटरमध्ये हे देशी अँटी व्हायरस बसवलेलं दिसेल. 

…. आणि हे सगळं साम्राज्य उभं केलंय, दहावीनंतर शाळा सोडलेल्या एका मराठी मुलानं.

विशेष माहिती : हा उद्योजक मराठी माध्यमातून शिकला होता. हे आजकालच्या पालकांनी लक्षात घ्यावे.

लेखक – अनामिक.

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सनातन संस्कृती आणि विज्ञान… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

📖 वाचताना वेचलेले  📖

सनातन संस्कृती आणि विज्ञान☆ श्री अनिल वामोरकर ☆

फ्रान्समधील ट्रेले नावाच्या शास्त्रज्ञाने हवनावर संशोधन केले, ज्यामध्ये त्याला कळले की हवन मुख्यत्वे आंब्याच्या लाकडावर केले जाते.

जेव्हा आंब्याचे लाकूड जळते तेव्हा फॉर्मिक अल्डीहाइड नावाचा वायू तयार होतो. जे धोकादायक जीवाणू आणि जीवाणू मारतात आणि वातावरण शुद्ध करते. या संशोधनानंतरच शास्त्रज्ञांना हा वायू आणि तो बनवण्याचा मार्ग कळला.

गूळ जाळला तरी हा वायू तयार होतो. तौतिक नावाच्या शास्त्रज्ञाने हवनावर केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, जर कोणी अर्धा तास हवनात बसले किंवा शरीर हवनाच्या धुराच्या संपर्कात आले, तर टायफॉइडसारखे घातक आजार पसरवणारे जीवाणूही मरतात आणि शरीराला शुद्ध होते. हवनाचे महत्त्व पाहून लखनऊच्या नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनीही यावर संशोधन केले की, हवनामुळे खरोखरच वातावरण शुद्ध होते आणि बॅक्टेरिया नष्ट होतात का? त्यांनी ग्रंथात नमूद केलेले हवन साहित्य गोळा केले आणि ते जाळल्यावर ते विषाणू नष्ट करते.

मग त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या धुरावरही काम केले आणि पाहिले की फक्त एक किलो आंब्याचे लाकूड जाळल्याने हवेतील विषाणू फारसा कमी होत नाही. पण त्यावर अर्धा किलो हवन साहित्य टाकून जाळले असता तासाभरात खोलीतील बॅक्टेरियाची पातळी ९४% कमी झाली.

एवढेच नाही तर त्यांनी खोलीच्या हवेत असलेल्या बॅक्टेरियाची आणखी चाचणी केली आणि त्यांना असे आढळले की खोलीचा दरवाजा उघडून सर्व धूर निघून गेल्याच्या २४ तासांनंतरही बॅक्टेरियाची पातळी सामान्यपेक्षा ९६ टक्के कमी होती.

वारंवार केलेल्या चाचण्यांनंतर असे आढळून आले की या एकवेळच्या धुराचा प्रभाव महिनाभर टिकला आणि ३० दिवसांनंतरही त्या खोलीतील हवेतील विषाणूची पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी होती.

हा अहवाल डिसेंबर 2007 मध्ये एथनोफार्माकोलॉजी 2007 च्या संशोधन जर्नलमध्ये देखील आला आहे.  हवनाद्वारे केवळ मानवच नाही तर वनस्पती आणि पिकांचे नुकसान करणारे जीवाणूही नष्ट होतात, असे या अहवालात लिहिले होते.  त्यामुळे पिकांमध्ये रासायनिक खतांचा वापर कमी होऊ शकतो.

ही माहिती तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना कळवावी. हवन केल्याने केवळ देव प्रसन्न होत नाही तर घरही शुद्ध होते. परमेश्वर सर्व कुटुंबातील सदस्यांना रक्षण आणि समृद्धी देवो.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समज, गैरसमज व अफवा… भाग-१ ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

समज, गैरसमज व अफवा… भाग-१ ☆ श्री सुनील देशपांडे 

अनंत फंदींचा एक फटका आठवतो-……

बिकट वाट वहिवाट नसावी,

धोपट मार्गा सोडु नको,

संसारामध्ये ऐस आपल्या 

उगाच भटकत फिरू नको.

… पण एकदा समाजकार्यात शिरायचं म्हटल्यावर आपल्याला हा फटका वेगळ्या पद्धतीने म्हणावा लागेल 

बिकट वाट वहिवाट असूदे,

धोपट मार्गे जाऊ नको,

संसारामध्ये कशास नुसता,

समाजकार्या सोडू नको.

एकदा समाजकार्यामध्ये रममाण व्हायचं ठरवलं की ती वाट बिकट असणार हे नक्कीच. आपण बघतोच की समाज प्रबोधन ही अत्यंत बिकट आणि खडतर वाट आहे. तरी त्यातून कसा मार्ग काढायचा याचे वेगवेगळे पैलू आपण पाहत आहोत. अवयवदानाच्या क्षेत्रात चुकीच्या धार्मिक संकल्पनांमुळे ज्या काही अडचणी उभ्या राहतात तसेच चुकीच्या सामाजिक कल्पना आणि सोशल मीडियावर अथवा सांगोपांगी ज्या काही चुकीच्या घटना वा संकल्पना लोकांच्या मनावर ठसवल्या जातात त्याबाबत आपण पाहू.

ग्रामीण भागातील एका डॉक्टरशी चर्चा करताना तो असं म्हणाला “आपण देहदान करून टाकायचं. एकदा देह घेतल्यानंतर ते, त्यातलं जे काय पाहिजे ते काढून घेतील. पण लोकांना अशी भीती वाटते की देहदान केल्यानंतर त्यातले वेगवेगळे अवयव काढून त्याचा धंदा करतील. त्यामुळे देहदानासाठी माणसे तयार होत नाहीत. ” हे आता एका डॉक्टरने म्हणावे हे आश्चर्यकारक आहे. आता डॉक्टरांना सुद्धा अवयवदाना बद्दलची फारशी माहिती नसते हे बर्‍याच वेळेला लक्षात आलेलं आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये जे डॉक्टर झाले आहेत त्यांना थोडीफार माहिती आहे. पण तरी सविस्तर व योग्य ज्ञान नाही. ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील सुद्धा कांही डॉक्टर लोकांशी चर्चा करताना लक्षात येते की डॉक्टर मंडळींना सुद्धा या विषयाचे योग्य ते व सखोल ज्ञान नाही. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे सुद्धा प्रबोधन होणे आवश्यक आहे, कारण त्यांच्या सांगण्यावर लोक तज्ञ म्हणून विश्वास ठेवतात. तर डॉक्टर्स नर्सेस आणि अर्धवट माहितीच्या आधारे जनजागृती करण्याच्या फंदात पडणारे काही कार्यकर्ते या सर्वांचे पहिल्यांदा प्रबोधन केले पाहिजे. म्हणजे या तथाकथित तज्ञ मंडळींकडून समाजामध्ये चुकीचे संदेश जाणार नाहीत. सरकारकडे आम्ही बरीच वर्षे आग्रह धरला आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये अवयवदानाचा समावेश असावा. परंतु अजूनही त्याला म्हणावे तसे यश आले नाही. तरीसुद्धा सध्या दहावीच्या सायन्स-२ पुस्तकात एक परिच्छेद अवयवदान या विषयावर आहे. त्यामुळे थोडी उत्सुकता म्हणून का होईना त्याबाबत विद्यार्थी माहिती मिळवतील. निदान ज्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे जायचे आहे ते या बाबतीत जागृत होतील. अभ्यासक्रमाचा जरी भाग नसला तरी जनरल नॉलेज म्हणून या विषयाची तोंड ओळख अनेक डॉक्टरांना नक्की आहे.

वास्तविक पाहता हृदयक्रिया बंद पडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की तीन मिनिटात त्याचं रक्ताभिसरण थांबतं आणि शरीरातील अंतर्गत अवयव निष्क्रिय होतात. निरुपयोगी होतात. त्यामुळे प्रत्यारोपणासाठी कोणताही अवयव उपयोगाला येत नाही. किमान एवढे ज्ञान तर्कदृष्ट्या तरी डॉक्टरांना असणे आवश्यक आहे. एकंदर याबाबतीत जागृती करणे गरजेचे आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे आवश्यक ठरते. डॉक्टरांच्या बाबतीत ही अवस्था आहे तर नर्सिंग विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याबाबत माहिती असणे अवघड आहे. म्हणून वैद्यकीय अभ्यासक्रमाबरोबर नर्सिंग अभ्यासक्रमामध्येही या विषयाचा समावेश होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आमच्या पदयात्रेच्या दरम्यान काही ग्रामीण रुग्णालयांमध्ये अशा वर्कर्सबरोबर आम्हाला या विषयासंबंधीची चर्चा करण्याची संधी मिळाली. तेंव्हा असे लक्षात आले की जर अशा वर्करना या विषयाची माहिती करून दिल्यास समाजाच्या तळागाळापर्यंत या विषयाची ओळख लोकांना नक्की होईल आणि ती योग्य पद्धतीने होईल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाला आम्ही सूचना दिलेली होती की अशा वर्करच्या प्रशिक्षणामध्ये या विषयाचा समावेश व्हावा.

हृदयक्रिया बंद पडून म्हणजेच सर्वसाधारण ज्या पद्धतीने मृत्यू होतो या पद्धतीने मृत्यू झाल्यावर त्या व्यक्तीच्या शरीरातला कोणताही अवयव प्रत्यारोपणासाठी योग्य राहत नाही. तो प्रत्यारोपणासाठी निरुपयोगी असतो. त्यामुळे देहदान केल्यास त्यातील अवयवांचा व्यापार होण्याची शक्यता शून्य आहे. हे समजावून सांगणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांचा याबाबतीतला गैरसमज दूर करण्यासाठी या गोष्टीची नितांत आवश्यकता आहे.

व्हाट्सअप अथवा इतर सोशल मीडियावर विकृत माहिती प्रसृत करणाऱ्या मनोवृत्तीचे लोक अनेक वेळा गैरसमज पसरवणारे मेसेज टाकत असतात. त्यामुळे लोकांना या चुकीच्या संदेशापासून सावध करणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही मृत व्यक्तीचे अवयवदान करायचे असेल तर ती व्यक्ती मेंदू-मृत असलीच पाहिजे. मेंदू-मृत म्हणून निश्चित केलेली व्यक्ती ही रुग्णालयाच्या अतिदक्षता विभाग (आय. सी. यू. ) मध्येच असू शकते. ती व्हेंटिलेटरवरच असू शकते. ज्यावेळेला वेंटिलेटरच्या सहाय्याने श्वासोच्छवास कृत्रिम पद्धतीने चालू ठेवला जातो तेव्हा, जरी व्यक्ती मृत असली तरीही या कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणेमुळे मृतदेहामध्ये रक्ताभिसरण चालू असते. त्यामुळे सगळे अवयव जिवंत अथवा कार्यरत म्हणजेच वर्किंग कंडिशनमध्ये असतात. असे जिवंत-कार्यरत अवयवच दुसऱ्या जिवंत व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रत्यारोपणासाठी बसविण्यास योग्य असतात. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट समाजामध्ये आपल्याला परत परत आणि ठासून सांगितली पाहिजे.

या सोशल मीडियाची चुकीचे मेसेज देण्याची अजून एक पद्धत जाणून घेणे आवश्यक आहे. कधीतरी आपल्याला व्हाट्सअप वर एखादा मेसेज येतो की … ” एक माणूस मृत्यूशय्येवर आहे आणि त्याला आपल्या किडन्या दान करायच्या आहेत. ज्या कुणाला गरज असेल त्यांनी त्वरित दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा. हा संदेश त्वरित आपल्या सर्व संबंधितांना फोरवर्ड करा ज्यामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो ” 

अशा किंवा थोड्याबहुत याच्यासारखा संदेश असलेल्या पोस्ट व्हाट्सअपवर अनेक वेळेला येत असतात. आपण त्याची शहानिशा न करता खऱ्याखोट्याचा विचार न करता सद्भावनेपोटी आपल्या बऱ्याच मित्रांना तो मेसेज फॉरवर्ड करतो. असे चुकीचे मेसेज अनेक व्यक्तींना बऱ्याच वेळेला येत असतात. तोच मेसेज काही महिन्यांनी पुन्हा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. असे मेसेज सतत फिरत असतात. ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा आपल्यापर्यंत पोहोचत असतात. अशा प्रकारच्या मेसेजबाबत एक सगळ्यात महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे. प्रथम हे जाणून घेतलं पाहिजे की अशा प्रकारचे मेसेजेस हे सन १९९४ मध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या ‘मानवी अवयव प्रत्यारोपण आणि ऊती प्रत्यारोपण कायद्या’ च्या विरोधात आहेत. एखाद्याला अवयव दान करायचे असले तरी जाहिराती देऊन असे अवयवदान करता येत नाही. हे बेकायदेशीर आहे. दुसरी गोष्ट एखाद्या व्यक्तीने की ज्याला या कायद्याचे ज्ञान नाही अशा व्यक्तीने चुकून असा संदेश पाठवण्याची शक्यता गृहीत धरली तरी आपण, प्रथम दिलेल्या क्रमांकावर फोन करून या घटनेबद्दलची सत्यता पडताळून पाहिली पाहिजे. जर खरोखरच कोणी फोनवर उपलब्ध असेल तर त्याला हे समजावून सांगितले पाहिजे की अशा तऱ्हेने संदेश प्रसृत करणे हे बेकायदेशीर आहे. अवयवदान हे ज्या रुग्णालयास अवयव प्रत्यारोपणचा परवाना असेल अशा रुग्णालयामार्फतच (झेड टी सी सी) ‘विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र’ या सरकारमान्य यंत्रणेशी संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच अवयवदान करायचे असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या पद्धतीचे मेसेज चुकीचेच असतात. हा फोन आपण फिरवला आणि जर तो लागला नाही किंवा नो रिप्लाय मिळाला तर शंभर टक्के समजायचं कि हा मेसेज खोटा आहे आणि तो पुढे पाठवायचा नाही. म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत असा मेसेज आपल्याला आला तर तो बेकायदेशीर असतो आणि आपण पुढे पाठवायचा नसतो. एक तर शहानिशा करून घ्या किंवा सरळ तो काढून टाका आणि ज्या व्यक्तीकडून आपल्याला हा मेसेज आलेला आहे त्या व्यक्तीला हा मेसेज ताबडतोब डिलीट करून टाकायला सांगावा तसेच ज्या व्यक्तींना तू हा मेसेज पाठवला असशील त्यांना सुद्धा हा मेसेज खोटा आहे हे कळवण्याची खबरदारी घ्यावी असे सांगावे. ही सर्व माहिती वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांचेकडून आलेली माहिती ही तज्ञ व्यक्तीकडून आलेली माहिती असे समाज समजतो. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये या माहितीचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. मला आणि कित्येकांना अनेक डॉक्टरांकडून सुद्धा असे मेसेज फॉरवर्ड झालेले आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील आणखी एका गोष्टीबद्दल आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आत्तापर्यंत अनेक वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मी व्याख्याने दिली आहेत. त्या प्रत्येक वेळी मी एक प्रश्न नेहमी विचारत असतो. ” इथे बसलेल्या व्यक्तींपैकी ज्या कुणी देहदानाचा संकल्प केला आहे त्यांनी हात वर करावेत “. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दहा टक्के व्यक्तीसुद्धा हात वर करत नाहीत. याचा अर्थ असा की वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे किंवा जे उद्या डॉक्टर होणार आहेत त्यांनासुद्धा देहदानाचे महत्व समजून सांगणे खरंच आवश्यक आहे. याबाबतीत त्यांचेमध्ये अनास्था आहे. कुणाच्यातरी देहदानाच्या कृतीमुळे या डॉक्टरांना शिक्षण मिळते आणि समाजामध्ये डॉक्टरीसारखा प्रतिष्ठेचा व्यवसाय करण्याची संधी मिळते. ते देहदान डॉक्टरांनी स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबियांचे करण्याचा संकल्प का करू नये ? याबाबत एक उदाहरण आवर्जून सांगावेसे वाटते. अकोला येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला माझे व्याख्यान झाले त्यावेळेला मी हा प्रश्न विचारला असता 100% विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे सुद्धा हात वर झाले होते. त्यावेळी डॉ. कार्यकर्ते हे प्रभारी डीन म्हणून तेथे कार्यरत होते. त्यांनी व्याख्यानानंतर असेही सांगितले की विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून आम्ही स्वेच्छेने फॉर्म भरून घेतच असतो. परंतु त्यांना आम्ही हे सुद्धा आवाहन करतो की आपल्या कुटुंबीय आणि मित्रमंडळी पैकी किमान पाच जणांचे याबाबत प्रबोथन करून त्यांचे फॉर्म भरून आपले वैद्यकीय शिक्षण संपायच्या पूर्वी सादर करावे. अशा प्रकारची कल्पना व कृती प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयांनी राबविल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येईल. बऱ्याच वेळेला प्रत्येकामध्ये ही अनास्था असतेच असे नाही, परंतु त्यांना याबाबत आवाहन करणे आणि प्रवृत्त करणे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता मात्र नक्की आहे. सर्वच वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांनी तसे केल्यास या क्षेत्रातील ही अनास्था दूर होऊ शकेल हे नक्की.

देहदानाबाबत लोकांची अजून एक गैरसमजूत असते. ती म्हणजे देहदान केल्यानंतर मृतदेहाची विटंबना होते. देहदान करतानाच हे दान वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आहे हे माहिती असलं पाहिजे. या मृतदेहांचं डिसेक्शन म्हणजेच शवविच्छेदन करण्यासाठीच हे मृतदेह देण्यात आलेले आहेत याची जाणीव देहदान करणाराला असली पाहिजे. मृतदेहाचं डिसेक्शन करणे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गरजेचे असल्याने त्याची विटंबना होण्यासारखे काही नाही.

 – क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काहीतरी हरवलेले… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆

सौ. अर्चना गादीकर निकारंगे

??

☆ काहीतरी हरवलेले… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे 

हल्ली आपल्या आजूबाजूला सध्या बर्‍याच ठिकाणी जुन्या चाळी, जुन्या को- आँप. सोसायट्या रिडेवलपमेंटला जाऊन नवीन नवीन टॉवर होताना दिसताहेत. नुकतीच कानावर अशीच बातमी आमच्या मागच्या ३५ ते ४० वर्षांपूर्वीच्या सोसायटीबद्दल पण ऐकीवात आली. आज दुपारी सहजच खिडकीजवळ उभी राहून पाऊस बघताना ही गोष्ट मनात आली. म्हटले, ” अरे, हो खरच की ! आता या सोसायटीतील लोक पण इथून वेगवेगळ्या ठिकाणी पांगतील. एवढे वर्ष त्यांना पाहत असताना काही चेहर्‍याने, तर काही आणखीन जास्त परिचित होते. सहजच एका घराकडे लक्ष वेधले गेले. आताशा ते घर मुकं झाल्यासारखे वाटत होते. त्या घरात एक १७-१८ वर्षांची मुलगी पाहिल्याचे आठवले. शाळकरी असताना वडीलांचा हात पकडून जाताना तिला बरेच वेळा पाहिले होते. त्यानंतरसुद्धा तिला अधूनमधून मैत्रिणींच्या घोळक्यात पाहिल्याचे आठवते. शैशवावस्थेतून यौवनावस्थेत शिरताना तिच्यात पण खूप बदल झालेला दिसला होता. हळूहळू त्या खिडकीखाली उभे राहून तिला हाका मारणारे आवाज थांबत चालले होते. वाढदिवसाला ऐकू येणारा तो मुलांचा कलकलाट पण थांबलेला दिसत होता. वाढदिवसाच्या छोटेखानी पार्ट्यांना पूर्णविराम मिळाला होता.

एक सळसळतं जिवंतपण आटत होतं हे ध्यानातच येत नव्हतं. बर्‍याच वर्षांचा काळ मागे पडला असावा. नंतर जाऊन कळले की त्या मुलीचे लग्न पण झाले. आता तर त्या खिडकीत शांतता जाणवत होती. तिच्या जाण्याने जणू ते घर एक बडबड आणि एक उत्साह हरवून बसले होते.

दिवसाच्या प्रकाशात ते थोडं हर्षभरीत जाणवत असलं तरी पण नंतर सहजच दिवेलागणीच्या वेळेस त्याकडे लक्ष गेले असता दिव्यांच्या कृत्रिम झगमगाटात ते हरवल्याप्रमाणे वाटत होते. पुढे जाऊन टाॅवरमध्ये नवीन रुपडे लाभले तरी त्याचे ते हरवलेपण त्याला गवसेल का ? हा प्रश्न शेवटी मनामध्ये अनुत्तरीतच राहीला.

© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

??

☆ “विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

विवेकाचा दिवा हृदयात जपून ठेवा – हाच या दिवाळीचा सांगावा.

 

हजारो वर्षापासून मेंदूवर चढलेली अज्ञानाची काजळी खरडून काढण्याचा प्रयत्न ज्यांनी केला 

त्यांनाच या अंधाऱ्या संस्कृतीने संपवून टाकले आहे. त्यांनी दिलेला विचार गिळंकृत करून 

समाजाला मोडून-तोडून सांगितला जात आहे. विज्ञान तंत्रज्ञानात जगाने अभूतपूर्व मुसंडी मारलेली असताना 

भारतात आताच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी धर्मग्रंथांची पाने चाळली जात आहेत.

 

डार्विन, न्यूटन, आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग या सगळ्यांना वेड्यांच्या पंक्तीत बसविण्याची सत्तेला घाई झाली आहे. शास्त्रज्ञ म्हणवून घेणारे सोवळे परिधान करून मंदिरात घंटा बडवत बसले आहेत.

राफेल सारख्या अत्याधुनिक फायटर विमानांवर निंबू-मिरची उतरवल्या जात आहेत. गाय, गोमुत्र आणि गोपालनाला राष्ट्रीय स्वरूप आले आहे….. अशा काळात अज्ञानाची काजळी अधिक घट्ट होताना दिसत आहे. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना शत्रुस्थानी मानले जावून नवे अभ्यासक्रम तयार केले जात आहेत.

 

विवेकाचा एक मंद दीप घेवून मूठभर व्यक्ती चार्वाकाच्या काळापासून चालत आहेत, पण त्यांना ध्येय गाठता आले नाही. कारण अविवेक आजही प्रभावीच आहे… परंतु विवेकाने पराभव अजून पत्करला नाही.

 

तुमचाही विवेक धडका देतोय.. मेंदुतील अंधश्रद्धांच्या पोलादी तटबंदींना…

.. त्याला बघा एकदा मोकळे करून…

.. विवेकाचा दीप पेटवून तर बघा.. हृदयाच्या एखाद्या कोनाड्यात…

…. मग बघा सारं विश्व कसं प्रकाशमान होतेय ते… !

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अ लॉंग वे फ्रॉम होम…” लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ “अ लॉंग वे फ्रॉम होम…” लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

ते १९८०चे दशक होते. तेंव्हाही तरुण पिढीवर पाश्चिमात्य संगीताचा प्रभाव होताच. उलट तो नव्यानेच पडू लागलेला असल्याने संख्येने थोड्या लोकांवर असला तरी फार खोलवर उमटत होता. त्यातच निग्रो लोकांचा (हो, तेंव्हा ‘निग्रो’ हा शब्द निषिद्ध नव्हता!) एक संगीत ग्रुप होता- बोनी ‘एम’ ! त्या चार जणाच्या ग्रुपने एके काळी जगभर धूम करून टाकली होती. अगदी ताजेतवाने संगीत, मनाला भुरळ घालणारे सूर आणि त्यावेळच्या संथ नाचांना सोयीचा ठरणारा ठेका असलेली ही गाणी फार लोकप्रिय झाली होती. शिवाय गाण्याच्या संथ गतीमुळे त्यातील कविता समजणेही सोपे जाई. आणि खरे सांगायचे तर फॅशनला कसले आलेय लॉजिक? तेंव्हा ही गाणी अचानक फॅशनमध्ये आली होती, बस्स ! ‘आमचे’ आहे, ‘आमच्या पिढीचे’ आहे म्हणूनच ते मस्त आहे, अशी हट्टी श्रद्धा कशाबद्दलही बाळगू शकणारे ते निरागस वय ! त्यात या ग्रुपच्या गाण्यांनी आम्हाला चांगलेच पकडले होते. बोनी’एम’ची सगळीच गाणी खूप लोकप्रिय होत गेली. चटकन लक्षात येण्यासाठी ‘डॅडी, डॅडी कुल’ हे गाणे आठवले तरी पुरे ! तोच बोनी ’एम’ ग्रुप ! जगभर त्यांच्या लॉंगप्ले तबकड्या मिळू लागल्या.

घरात लॉंग प्ले रेकॉर्ड प्लेयर असणे हे खानदानी श्रीमंतीचे लक्षण समजले जाई. ज्यांच्याकडे तो नव्हता त्यांच्यासाठी हॉटेलमध्ये अशा तबकड्या लावल्या जात आणि फक्त कपावर कप चहा पीत बसलो तरी मुंबई पुण्यातील इराणी हॉटेल्स आणि इतरत्र गावाबाहेरची धाबेवजा हॉटेल्स मुलांना कितीही वेळ अशी गाणी, गझला, अगदी ‘शोले’ आणि ‘दिवार’चे डायलॉग्ज ऐकत बसू देत. तिथेच तरुणाईच्या सगळ्या ‘कहाण्या’ घडत. त्या हळव्या कहाण्यांच्या पुढच्या एपिसोडची ‘स्क्रिप्ट’ कधीकधी अगदी जवळच्या मित्र-मैत्रीणीत सामुहिकपणे सुद्धा लिहिली जाई. नंतर अगदी आतून हुरहूर लावणारे क्षण कधीकधी डोळ्यासमोर घडत तर कधी घडून गेलेल्या हुरहूर लावणा-या क्षणाची श्राद्धेही साजरी होत असत. असो, अजून काही काही घडत राही…!

बोनी ’एम’ ग्रुपच्या एका गाण्याने मला खूप खोल आणि खूप हळवी जखम करून ठेवली होती. अजूनही अनेकदा ‘युट्युब’वर हे गाणे ऐकून मी जुन्या ‘दाग’ चित्रपटातील तलत महेमूदने गायलेल्या गाण्याप्रमाणे ‘जख्म फिर से हरा’ करून घेतो. लीझ मिशेलने गायलेल्या या गाण्यात फक्त चार-पाच ओळीच होत्या. पण त्यांचा आशय मात्र अमेरिकेतील निग्रो लोकांचे काही शतकांचे दु:ख पोटात सामावण्याइतका सखोल होता.

“समटाईम्स आय फील,

लाईक अ मदरलेस चाईल्ड”

हे धृवपद गाण्यात वारंवार येई आणि लीझ मिशेलच्या को-या, धारदार पण मुग्धमधुर आवाजात ‘ऑन्ट दिनाज सॉंग’चे ते करूण शब्द काळीज चिरत जात. ‘कधीकधी मला आपण आई नसलेले मुल आहोत असे वाटते’ हे भाषांतर त्या कवितेतली आर्तता मराठीत आणूच शकत नव्हते. या गाण्यातली वेदना ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ मधली होती. तिचे भाषांतर शक्यच नव्हते. अलीकडे सहज या गाण्याबद्दल पुन्हा वाचले आणि मन अनेकदा भरून आले. अमेरिकेत हे गाणे पहिल्यांदा १४७ वर्षांपूर्वी म्हणजे १८७० साली गायले गेले. ते गाणा-या ग्रुपचे नाव होते ‘फिस्क जुबिली सिंगर्स. ’ पुढे या ‘ऑन्ट दिनाज सॉंग’च्या अनेक आवृत्या निघाल्या. मूळ कवितेतही बरेच बदल झाले, पण कृष्णवर्णीयांच्या गुलामीच्या वेदनातील तीव्रता त्यातून नेहमीच व्यक्त होत राहिली.

तब्बल २४५ वर्षे अमेरिकेसारख्या देशात माणसांची खरेदीविक्री जनावरांप्रमाणे केली जाई हे आज कुणाला खरेही वाटणार नाही. त्यावेळी निग्रोंची विक्री करताना जर एखादी निग्रो बाई लेकुरवाळी असेल तर गुलाम विकत घेणारा गोरा माणूस कधी फक्त काळे मुलच खरेदी करी. मग त्या मुलाला आईच्या कडेवरून खेचून काढले जाई आणि नव्या मालकाच्या स्वाधीन केले जाई. कोवळे लुसलुशीत मास खायला चटावलेल्या खाटीकाने गाईपासून तिचे पाडस ओढून काढावे तसे ! मग आफ्रिकेतील जंगलातून आणलेले ते काळे घाबरलेले रडणारे मूल गुलामांनी गच्च भरलेल्या जहाजातून श्रीमंत अमेरिकन जमीनदाराच्या शेतात आणले जाई. तिथे त्याच्यातून दिवसरात्र काम करणारा गुलाम घडविला जाई. खरे तर एक मूक पशूच. कारण त्याला मालकाची भाषा येत नसे. त्याची भाषा बोलणारे कुणी आसपास नसे. थोडी चूक झाली तर चामड्याच्या चाबकाचा कळवळून टाकणारा फटका ! संपले त्याचे माणूस म्हणून असलेले जीवन ! त्याच्या आफ्रिकेतील कुटुंबाची आणि त्याची परत कधीही भेट होऊ शकत नसे. मरेपर्यंत आपल्या गरीब काळ्या आईचे रडवेले डोळे आठवत, तिच्या वत्सल स्पर्शासाठी तडफडणारे ते मूल आयुष्यभर झुरत राही आणि जनावरांसारखे काबाडकष्ट करताना एक्कलकोंडे आयुष्य कंठून एक दिवस मरून जाई.

निग्रोंच्या या सार्वत्रिक सत्यकथेवर हे गाणे बेतलेले होते. त्यातील शब्द होते,

‘समटाईम्स आय फील

लाईक अ मदरलेस चाईल्ड,

अ लॉंग, लॉंग वे,

वे फ्रॉम माय होम.’

ध्रुवपदापाठोपाठ हे शब्द वारंवार येत तेंव्हा आमच्यापैकी प्रत्येकाच्या मनाच्या पडद्यावर त्या काळ्या निग्रो आईच्या हातातून तिचे मूल ओढून काढणारे क्रूर गोरे शिपाई दिसत राहत, तिचा मूक आक्रोश जणू आम्हाला ऐकू येत असे. आमचे भाबडे डोळे ओलावत. नंतर मग उगाच आमचे गाव, गावाकडचे कायमचे सुटलेले घर, मागे राहून गेलेले बालपण, देवाघरी गेलेले आईवडील, नोकरीसाठी सुटलेला देश, असे काही काही आठवत राही. त्यात लीझ मिशेलचे काळजात धारदार पाते घुसविणारे शब्द पुन्हा कानावर येत…

‘नो वे, नो, नो, नो वे, टू गेट होम.’… आता घर पुन्हा कधीच दिसणार नाही ही जीवघेणी जाणीव लीझ हृदयाला छिद्र पाडून आत खुपसते आहे असेच वाटे. अस्वस्थ करणारा अनुभव होता तो ! आशाताईनी गायलेले –

‘जिवलगा, राहिले दूर घर माझे,

पाउल थकले, माथ्यावरचे

जड झाले ओझे’

… हे जसे अगदी खोल आत शिरून अस्वस्थ करत राहते तसे या गाण्याने होई.

वय वाढते तसे हळूहळू माणूस आतूनही राठ होत जातो. आपण हळवे नाही असे मानणे आणि विशेषत: तसे दाखविणे मर्दपणाचे किंवा परिपक्वपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. आपण दुस-याच्या दु:खाने अस्वस्थ होणे, त्याच्या वेदनेने आपल्याला रडू येणे, दुर्बलपणाचे मानू लागतो. निबरपणाच्या प्रवासात नंतर त्याहीपुढे जावून स्वत:च्या दु:खानेही डोळ्यात पाण्याचा थेंब न येऊ देणे हे मोठेपणाचे लक्षण मानले जाऊ लागते. हे असे आतले माणूसपण सुकविणे, डोळ्यातून थेंबच सांडू नयेत म्हणून मनातली 

‘ रिलेटिव्ह ह्युमिडीटी ’ संपविणे म्हणजे समर्थ होणे ठरू लागले आहे.

खरे तर साता समुद्रापलीकडे – अमेरिकेत ज्यांचे आई -वडील शतकांपूर्वी गुलामीचे जिणे जगले त्यांचे अडीचशे-तीनशे वर्षापूर्वीचे दु:ख आठवून स्वत: अस्वस्थ होणे हा आपल्या माणूसपणाचा पुरावा असतो. संत पौलाने म्हटलेले माणसाच्या आत असणारे ‘देवाचे घर’ शाबूत असल्याची ती खूण असते. जर काहीतरी सिद्ध करण्याच्या भरात ती वेदना जाणवत नसेल तर आपण देवाच्या घरापासून किती दूर आलोय, नाही? कदाचित आता घरी परत जाणे कधीच शक्य नाही !

“अ लॉंग वे….

नो, नो, नो वे 

टू गेट होम !’…

*******

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

 72086 33003

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print