“अरं ढवळ्या लेका! का असं गठुळ्यागत अंग मुडपूनशान खाली बसलास? मळ्याकडं जोताला जायचं नव्हं का आपुल्याला? धाकलं मालक आता वाड्यातून दहीभाकरचा तुकडा खाऊन बाहीर येतील कि मर्दा! आनी तु असा बसलेला बघितल्यावर खवळायचं न्हाई व्हयं?… आरं ह्यो आळस सोड नि गपगुमान उभा राहा बघू!.. “
“… पवळ्या दादा, म्या आता जो हथं बसलोय ना त्ये काय लवकर उठायचं नावं घेनार नायं… आवं दादा आता कालच दिव्याची आवस उलाटली.. अन सारवण सुरू झाला तरी पाउसाचा टिपुस काय गळाया तयार न्हाई… पार उन्हाळ्यातल्यावानी उनाचा कडाका तसाच पडतोय कि… आजवर चार बाऱ्या झाल्या नांगरटणीला खेटं घालून.. वळीवानं तोंड वळविलं, म्रिगानं तर तोंड दावलचं न्हाई, ती मधली दोनी बी लबाड नक्षत्रं पाठ दाखवूनच गायब… आरं जित्राबं सुध्दा बिळं सोडून गेली तत मानसांची नि आपली काय गत झालीया, तुला कायं येगळं सांगाय हवं काय? ढेकळांचा चोक शोष पडल्यावानी उताणी पडलेली रानं… हिरीचं, ओढयाचं खरवडून निघालेलं पानं.. रोज मैल मैल धुरळा उडवीत जाऊन एक कळशीभर पाणीची उसाभर करून आपला तर जीव पार धायकुतीला आला बघं… दादा आता अवसान गळाठयला बघं… चार पावलं उचलून टाकाया न्हाई जमायचं… ते धाकलं मालक येऊ देत न्हाई तर मोठ्ठं… मला इथचं पडून राहावंसं वाटतया… दादा आता माझा राम राम करायची येळ झाली बघा… तुम्ही वाईट वाटूनशान घेऊ नका… तुमचा आमचा संबंध इथवर छान जुळला… मला तुमी लै सांभाळून घेतलसा…. आता दादा तुम्ही सोताला सांभाळा… म्या जरा आता निवांत पडून राहतो… मालकानां माझा राम राम सांगा.. “
” अरं ढवळ्या, असं काय येड्यावानी बरळतूया! आरं ते बघं काळं निबारं ढग दाटून आल्याती… पावसाची झड येऊ लागली… गार वारं सुटलं लेका.. आला आला बघ पाऊस सुरू झाला कि येड्या! आरं उठं चटदिशी उभा राहा… पावसाच्ं पाणी पिऊन घे बघं कशी तरतरी येती ते… उठं कि रे गब्रु… अरं उठं.. उठं.. “
ढगांच्या गडगडाटात, विजेच्या लखलखाटात पावसाच्या रूपेरी धारा बरसू लागल्या… संजीवनी घेऊन आलेला पाऊस मात्र ढवळयाची तहान भागवू शकला नाही…
☆ “या जन्मावर शतदा प्रेम करावे…” ☆ सौ राधिका भांडारकर☆
या जन्मावर शतदा प्रेम करावे.
सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की, या विषयावर लेख लिहिताना माझी भूमिका उपदेश करण्याची नक्कीच नाही. हे करा, ते करा, असे करावे, असे वागावे, सकारात्मक काय, नकारात्मक काय असे काहीही मला सांगायचे नाही. कारण माझी पक्की खात्री आहे की जे लोक दुसऱ्याला सांगण्याचा किंवा उपदेश करण्याचा अधिकार गाजवतात, त्यांना एक श्रेष्ठत्वाची भावना असते आणि जी अहंकारात परावर्तित होते आणि तिथेच त्यांच्या आनंदी जगण्याची पहिली पायरीच कोसळते.
“या जन्मावर शतदा प्रेम करावे” हा ही एक सल्लाच आहे खरंतर. पण तो पाडगावकरांसारख्या महान कवीने अत्यंत नम्रपणे दिलेला आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाला मान देऊन मी फक्त माझ्या जगून झालेल्या आयुष्यात मी खरोखरच जगण्यावर प्रेम केले का या प्रश्नाचे फक्त उत्तर शोधणार आहे. आणि ते जर “हो” असेल तर कसे,आणि त्यामुळे मला नक्की काय मिळालं एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी तुमचं जीवन तुमचं जगणं यात मला ढवळाढवळ अजिबात करायची नाही.
जीवन एक रंगभूमी आहे, जीवन म्हणजे संघर्ष, जीवन म्हणजे ऊन सावली, खाच खळगे, चढ उतार, सुखदुःख,शंभर धागे, छाया प्रकाश असे खूप घासलेले, गुळगुळीत विचारही मला आपल्यासमोर मांडायचे नाहीत. कारण मी एकच मानते जीवन हा एक अनुभव प्रवाह आहे. आणि तो प्रत्येकासाठी वेगळा असूच शकतो. त्यामुळे आता या क्षणी तरी मी कशी जगले, हरले की जिंकले, सुखी की दुःखी, निराश की आनंदी, माझ्या जगण्याला मी न्याय दिला का, मी कुणाशी कशी वागले, कोण माझ्याशी कसे वागले या साऱ्या प्रश्नांकडे मी फक्त डोळसपणे पाहणार आहे. नव्हे, माझ्या आयुष्यरुपी पुस्तकातले हे प्रश्न मी स्वतःच वाचणार आहे.
७५ वर्षे माझ्या जीवनाच्या इनबॉक्समध्ये कुणी एक अज्ञात सेंडर रोजच्या रोज मला मेल्स पाठवत असतो. त्यातल्या मोजक्याच मेल्सकडे माझं लक्ष जातं आणि बाकी साऱ्या जंक मेल्स मी अगदी नेटाने डिलीट करत असते. आणि हे जाणत्या वयापासून आज या क्षणापर्यंत मी नित्यनेमाने करत आहे. आणि याच माझ्या कृतीला मी “माझं जगणं” असं नक्कीच म्हणू शकते.
मला माहित नाही मी आनंदी आहे का पण मी दुःखी नक्कीच नाही. त्या अज्ञात सेंडरने मला नित्यनेमाने माझ्या खात्यातील शिल्लक कळवली, सावधानतेचे इशारे दिले, कधी खोट्या पुरस्कारांचे आमीष दाखवून अगदी ठळक अक्षरात अभिनंदन केले, कधी दुःखद बातम्या कळवल्या, कधी सुखद धक्के दिले, अनेक प्रलोभने दाखवली, अनेक वाटांवरून मला घुमवून आणलं, दमवलं, थकवलंही आणि विश्रांतही केलं. पण त्याने पाठवलेली एकही मेल मी अनरेड ठेवली नाही. कधी व्हायरसही आला आणि माझे इनबॉक्स क्रॅशही झाले. मी मात्र ते सतत फॉरमॅट करत राहिले.
CONGRATULATIONS! YOU HAVE WON!
हा आजचा ताजा संदेश. या क्षणाचा.
पण हा क्षण आणि पन्नास वर्षांपूर्वीचा एक क्षण याचं कुठेतरी गंभीर नातं आहे याची आज मला जाणीव होत आहे.
पन्नास वर्षांपूर्वी मी एका भावनिक वादळात वाहून गेले होते. एका अत्यंत तुटलेल्या, संवेदनशील अपयशामुळे खचून गेले होते. माझा अहंकार दुखावला होता, माझी मानहानी झाली होती, मला रिजेक्टेड वाटत होतं.
घराचा जिना चढत असताना एक एक पायरी तुटत होती. दरवाजातच वडील उभे होते. त्यांची तेज:पूंज मूर्ती, आणि त्यांच्या भावपूर्ण पाणीदार डोळ्यांना मी डोळे भिडवले तेव्हा त्यांनी मूक पण जबरदस्त संदेश मला क्षणात दिला,
” धिस इज नॉट द एन्ड ऑफ लाईफ. खूप आयुष्य बाकी आहे. बघ, जमल्यास त्या “बाकी” वर प्रेम कर आपोआपच तुला पर्याय सापडतील.”
वडील आता नाहीत पण ती नजर मी माझ्या मनात आजपर्यंत सांभाळलेली आहे. आणि त्या नजरेतल्या प्रकाशाने माझे भविष्यातले सगळे अंधार उजळवले. तेव्हांपासून मी जीवनाला एक आवाहन समजले. कधीच माघार घेतली नाही. क्षणाक्षणावर प्रेम केले. फुलेही वेचली आणि काटेही वेचले. कधीच तक्रार केली नाही.
महान कवी पर्सी शेले म्हणतो
We look before and after,
And pine for what is not:
Our sincerest laughter
With some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.
शालेय जीवनात पाठ्यपुस्तकातील काळे सरांनी शिकवलेली ही कविता हृदयाच्या कप्प्यात चिकटून बसली आहे. तेव्हां एवढाच अर्थ कळला होता की,
“आपण मागे आणि पुढे बघतो आणि नसणाऱ्या,न मिळालेल्या गोष्टींवर दुःख करतो आणि या दुःखी भावनेवर आपण आपलं सारं हास्यच उधळून लावतो. मग आपले जीवन गाणे हे फक्त एक रडगाणे होते.
जगत असताना, पर्सी शेलेच्या या सुंदर काव्यरचनेतला एक दडलेला उपहासात्मक अर्थ आहे ना, त्याचा मागोवा घेतला आणि नकळतच कसे जगावे, जगणे एक मधुर गाणे कसे करावे याची एक सहज आणि महान शिकवण मिळाली. लिव्ह अँड लेट लिव्ह हे आपोआपच मुरत गेलं.
चार्ली चॅपलीन हे माझं दैवत आहे. तो तर माझ्याशी रोजच बोलतो जणू! मी थोडी जरी निराश असले तर म्हणतो,” हसा! हसा! भरपूर आणि खरे हसा. दुःखांशी मैत्री करा,त्यांच्यासमवेत खेळायला शिका.”
एकदा सांगत होता,” मी पावसात चालत राहतो म्हणजे माझ्या डोळ्यातले अश्रू कुणाला दिसत नाहीत.”
“अगं! मलाही आयुष्यात खूप समस्या आहेत पण माझ्या ओठांना त्यांची ओळखच नाही ते मात्र सतत हसत असतात.”
गेली ७५ वर्ष मी या आणि अशा अनेक प्रज्वलित पणत्या माझ्या जीवनाच्या उंबरठ्यावर तेवत ठेवल्या आहेत ज्यांनी माझं जगणं तर उजळलं पण मरणाचीही भिती दूर केली.
परवा माझी लेक मला साता समुद्रा पलीकडून चक्क रागवत होती.
“मम्मी तुझ्या मेल मध्ये फ्रेंड चे स्पेलिंग चुकले आहे. तू नेहमी ई आय एन डी का लिहितेस? इट इज एफ आर आय ई एन् डी.”
ज्या मुलीला मी हाताचे बोट धरून शिकवले ती आज माझ्या चुका काढते चक्क! पण आनंद आहे, मी तिला, “टायपिंग मिस्टेक” असं न म्हणता म्हटलं,
“मॅडम! मला तुमच्याकडून अजून खूपच शिकायचे आहे. तुम्ही नव्या तंत्र युगाचे,आजचे नवे शिल्पकार. त्या बाबतीत मी तर पामर, निरक्षर.”
तेव्हा ती खळखळून हसली. तिच्या चेहऱ्यावरचा हा दोन पिढ्यांमधला अंतर संपवून टाकणारा आनंद मला फारच भावला.
तेव्हा हे असं आहे. तुम्ही असं जगून पहा, शंभर वेळा प्रेम करा जीवनावर.
सॉरी! असा उपदेश मी तुम्हाला करणार नाही कारण मला तो अधिकारच नाही. मी फक्त माझा अनुभव सांगितला बाकी मर्जी तुमची.
☆ “इच्छामरण…” – भाग-१ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
अतिशय उद्विग्न मनानेच मी खोलीतून बाहेर पडले. नेहेमीच लक्ष वेधून घेणा-या बाहेरील बागेकडे आज मात्र माझे अजिबात लक्ष गेले नाही. माझे मनच मुळी था-यावर नव्हते. जन्म-मृत्यूच्या सीमारेषेवर, तळ्यात की मळ्यात हे न कळण्याच्या टप्प्यावर येऊन थबकलेली माझी आई आत खोलीत निपचित पडली होती. एरवी खुट्ट झाले तरी जागी होणारी आई, आज व्हेंटिलेटरच्या धकधक आवाजातही अगदी शांत झोपली होती. आणि हे पाहून माझ्या मनाला एक अनामिक हुरहूर लागली होती. चालू असलेला कृत्रिम श्वासोच्छवास सोडला तर तिची इतर गात्रे अगदी म्लान, जीवच उरला नसल्यासारखी होऊन गेली होती. आणि ते पाहून आम्ही सर्वजण हरवल्यासारखे, हतबल होऊन, एकमेकांकडे पहात बसण्याखेरीज काहीच करू शकत नव्हतो. अगदी काही क्षणांसाठी व्हेंटिलेटर काढला तरी श्वासासाठी होणारी आईची असह्य तडफड आम्हाला अत्यंत बेचैन करत होती. आणि कालपासून दोन-तीन वेळा हा प्रयोग झाल्यावर मग डॉक्टरांनीच आमच्यासमोर तो मन हेलावून टाकणारा विचार मांडला होता. व्हेंटिलेटर काढून टाकून,आईचा शेवटचा नैसर्गिक श्वास कोणता असेल ते पहात बसण्याचा…. तिच्या मरणाची वाट पहात बसण्यासारखेच होते हे.
याच विचाराने उद्विग्न होऊन मी खोलीबाहेर आले होते. जरा वेळाने नकळतच या उद्विग्नतेची जागा विचारांनी घेतली. आईची दिवसेंदिवस खालावणारी प्रकृती, त्यावर अगदी प्रामाणिकपणे केले जाणारे पण अजिबात उपयोगी पडत नसलेले अद्ययावत, दीर्घ उपचार, एकामागोमाग एक शिथिल होत गेलेले जवळजवळ सगळेच अवयव, आणि आता हा शेवटचा उपचार – कृत्रिम श्वासोच्छवास. हा सगळा प्रवास अशा शेवटच्या पायरीवर येऊन एखाद्या कोड्यासारखा थांबला होता. ते कोडे सोडविणा-या एका चुटकीचीच जणू वाट पहात, आणि ही चुटकी वाजवण्याचे अत्यंत क्लेशदायी, मनात अपराधीपणाची भावना कायमसाठी रुजवू शकणारे काम डॉक्टरांनी अगदी निर्विकारपणे आमच्यावर सोपवले होते. काय निर्णय घेणार होतो आम्ही? आपल्या जन्मदात्या आईचे आयुष्य जाणीवपूर्वक संपवून टाकण्याचा असा क्रूर निर्णय घेऊ शकणार होतो का आम्ही? काहीच सुचत नव्हते.
विचार करता करता नाण्याची दुसरी बाजू लख्ख दिसायला लागली. इतर सर्व अवयव निकामी झाले तरी श्वास चालू असेपर्यंत आईचे अंतर्मन नक्कीच जागे असणार. मग अतिशय कष्टाने, स्वावलंबनाने आणि उमेदीने घडवलेले, सजवलेले आपले मनस्वी आयुष्य, असे विकलांगी, परावलंबी, जाणीव-नेणिवेवर हिंदकाळतांना पाहून तिच्या स्वाभिमानी मनाला किती अतोनात यातना होत असतील, या विचाराने मी एकदम अस्वस्थ झाले आणि जराशी सावरून बसले. तिच्या शारिरीक यातना अगदी तज्ञ डॉक्टरही दूर करू शकत नाहीत हे जरी खरे असले, तरी तिच्या मनाला होणा-या असह्य यातना तर आम्हीच थांबवू शकलो असतो ना… व्हेंटिलेटर काढून टाकून? हा विचार मनात आला आणि मी केवढ्यांदा तरी दचकले.
…. पण मग वीस दिवसांपूर्वी, जेव्हा ती थोडे बोलू शकत होती, तेव्हाचे तिचे काकुळतीचे बोलणे आठवले. अगदी सहन करण्यापलिकडच्या त्या वेदनांमधून आम्ही तिला सोडवावे, असे ती अगदी आपणहून, मनापासून सारखं सांगत होती. ‘ आजपर्यंत तिने कधीच कोणाकडे काही मागितलेले नाही. तर आता तिचे हे पहिले आणि शेवटचेच मागणे आम्ही मान्य करावे. गांगरून न जाता नीट चौफेर विचार करावा व नाही म्हणू नये. दुखण्याच्या मरणयातनांपेक्षा प्रत्यक्ष मरणंच सुसह्य आहे तेव्हा आता आम्ही तिला जाणिवपूर्वक मरू द्यावं.’… असे आमच्यापैकी प्रत्येकाला ती सांगत होती. तेव्हा ऐकायलाही नकोशा वाटणा-या या बोलण्यावर, आता मात्र विचार करावा असे वाटू लागले. आज तिच्या स्पर्शातूनही तिची ही मरणेच्छा माझ्या मनाला स्पर्शून जात होती. माझ्याही नकळत मी मनाशी काही निश्चय केला आणि मन घट्ट करून सर्वांसमोर अशा इच्छामरणाचा विषय काढण्याचे ठरविले.
‘आईला या यातनांमधून सोडव देवा ’ या प्रार्थनेचा ‘ तिला आता मरण दे ’ असा थेट अर्थ लावायला साहजिकच सगळे घाबरत होते, पण हळूहळू सगळेच बोलते झाले. इच्छामरण काही अटींवर मान्य करावे, इथपासून ते इच्छामरणास अजिबात मान्यता नको, या टोकापर्यंत मतं मांडता मांडता, आपण आपल्या आईबद्दल बोलतो आहोत हा विचारही जरा वेळ नकळतच बाजूला झाला.
एका भावाचे असे म्हणणे होते की … ‘‘इच्छामरण’ ही संकल्पना मरणासन्न, जराजर्जर माणसाच्या संदर्भात खरोखरच विचार करण्यासारखी आहे. ज्यांची अवस्था ‘ मरण येईना म्हणून जिते हे, जगण्याला ना अर्थ दुजा ’ अशी आहे, त्यांना त्यांच्या मरणप्राय यातनांसह जबरदस्तीने जगवत ठेवणे हे खरे तर विचार करण्याजोगे पाप आहे. वाट्टेल तितके प्रयत्न करूनही हा माणूस त्याच्या दुखण्यातून पूर्ववत् बरा होऊ शकत नाही, इतकेच नव्हे तर कमीतकमी स्वावलंबनही यापुढे शक्य नाही, याची डॉक्टर वारंवार खात्रीपूर्वक सूचना देत असतील आणि ती व्यक्तीही स्वत:ला या यातनांतून सोडवावे अशी अगदी मनापासून, कळकळीची विनंती करत असेल, तर अशावेळी आणखी काही तज्ञ डॉक्टरांचे त्याच्या तब्येतीविषयी, बरे होण्याच्या शक्यतेविषयी मत घेऊन, त्यानुसार त्या आजारी व्यक्तीच्या विनंतीला त्याच्या नातलगांनी, स्वत:च्या मनाविरुध्द पण त्रयस्थ प्रामाणिकपणे विचार करायला खरोखरच काही हरकत नाही. काही धर्मांमध्ये वयोवृद्ध पण अगदी धडधाकट माणसेसुध्दा, संथारा व्रतासारख्या व्रताद्वारा अगदी जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, संयमाने व शांतपणे, अधिकृतपणे आपले आयुष्य धर्मसंमत मार्गाने संपवू शकतात.’
‘ स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या अतिशय निधड्या छातीच्या ध्येयवेड्या माणसानेही … ‘ प्रायोपवेशन ‘ करून स्वतःहून आपले आयुष्य संपवले होते– नाही का ? आत्ता खरं तर मला संत ज्ञानेश्वर आणि इतर काही संतही आठवताहेत, ज्यांनी आपले जीवनकार्य संपले हे जाणून जिवंत समाधी घेण्याचा मार्ग स्वीकारला होता, आणि अतिशय शांत आणि स्थिर मनाने ते हा इहलोक सोडून गेले होते. अर्थात हे सगळे संत आपल्यापेक्षा, आपल्याला विचारही करता येणार नाही आणि अजिबात गाठताच येणार नाही अशा फारच उच्च आध्यात्मिक पातळीवर पोहोचलेले होते हे मान्यच करायला हवे. ‘देहाबद्दल वाटणाऱ्या अहंकाराशी लढून, त्याचा पूर्ण नि:पात करून, कार्यकारण उपाधीवर विजय मिळवून जो आत्मरूप झाला आहे, त्याला मिळणारी एक फार महान पदवी म्हणजे संतत्व‘ असे म्हटले जाते. असामान्य आणि ईश्वरासदृश असणाऱ्या अशा दुर्मिळ आणि अपवादात्मक देवमाणसांशी आपल्यासारख्या सामान्य माणसांनी मनातल्या मनातही तुलना करणे हे खरं तर पापच आहे. तेव्हा या इच्छामरणाच्या संदर्भात त्यांचा विचारही आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या मनात येणे अतिशय चुकीचे आहे. आत्ता इथे, आपल्या या अशा समस्येसंदर्भात त्यांची आठवण यावी हेही खरोखरच पाप आहे. फार मोठी चूक करत होतो मी–आणि त्यासाठी त्या सगळ्या थोर पुरुषश्रेष्ठांची अगदी मनापासून क्षमा मागतो मी ताई …. ‘
क्रमशः भाग पहिला
प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
गायत्री मंत्र हा ऋग्वेदाचा साक्षात आत्मा अथवा कणा असल्याने तो आत्मसाक्षात्कार, आत्मशोध, स्व अनुभूती यांना परमेश्वराहूनही अधिक प्राधान्य देतो. डोळे उघडून प्रश्न विचारण्यास बाध्य करतो. यमनियमात बांधत नाही तर विचार करण्यास मुक्त करतो. हा निव्वळ धर्म नाही तर एक संयुक्तिक जीवनपद्धती व योग्यायोग्यतेची अचूक कारणमीमांसा आहे. स्वतःला जाणण्याकडे त्याचा कल अधिक आहे. सखोल अशा आत्मचिंतनावर ऋग्वेदाचा अधिक भर आहे. बाह्य जगताचा अभ्यास हा दुय्यम आहे. वैदिक शास्त्रांमध्ये; मग ते गणित असो वा विज्ञान, आतून बाहेर असा तत्त्वज्ञानाचाही प्रवास झाला आहे व अभ्यासाला उपासनेचे महत्त्व आले आहे. या अर्थाने ऋग्वेद हा तेजस्वी कर्मयोगी आहे. “आत्मा हा सचेतन जीवित तत्व आहे. तो शरीर धारण करतो व कालांतराने शरीर सोडून निघून जातो”, ही संकल्पना मूलतः ऋग्वेदाची आहे. ‘दशयंत्र’ या सूक्तात ‘यंत्र’ हा शब्दप्रयोग ‘इंद्रिय’ या अर्थाने केला आहे. पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये अशी दहा इंद्रिये म्हणजे ‘दशयंत्र’ होय.
ऋग्वेद हा जगातील सर्वप्राचीन ग्रंथराज इतक्या विस्तृत काळात लिहिला गेला की सुक्तांची भाषा, संस्कृतिक व धार्मिक परिस्थिती, वैदिक जीवन ते आताच्या हिंदू धर्मापर्यंतचा प्रवास यातून मानवी समाजाच्या उत्क्रांतीच्या पायऱ्या अधिकाधिक सुस्पष्ट होत जातात. अत्यंत कृतज्ञतेने प्रेरित होऊन झालेला सश्रद्ध प्रवास प्रश्न व शंकांवर येऊन थांबतो; ते अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्त, ऋग्वेदाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून आत्मीयतेने स्वीकारलं जातं. नेम भार्गव ऋषी सुरवातीला सर्वेसर्वा असणाऱ्या इंद्राच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह करतात. ते म्हणतात, “असाक्षात्कारी अशा इंद्राची आम्ही का म्हणून स्तुती करावी? कोण हा इन्द्र, कशावरून तो सत्य आहे?” यावर सखोलपणे विचार होऊ लागला आणि आपण बघतो की वेदकालातच इंद्र ही देवता संपुष्टात आली. “हे असंच का आहे व हे सारं कुणी निर्माण केलं?” यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं एकटी इंद्र ही देवता होऊ शकत नाही, हे लक्षात आलं. मग “इंद्राला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ तरी का करावा, यज्ञ करण्यामध्ये काही अर्थ आहे का नाही? ” अशीही शंका उत्पन्न होऊ लागली. ‘कण्व’ हे ऋग्वेदात गुप्त अग्नीचे प्रतीक मानले जातात. वास्तविक यज्ञयाग हा ऋग्वेदाचा गाभा..! ईशपूजा, एकत्रीकरण व दान ही समाजाभिमुख जगण्याची कला म्हणजे यज्ञ. त्या काळाची धार्मिक व सामाजिक संस्था म्हणजेच यज्ञसंस्था. यज्ञसंस्थेचा परिघ असा विस्तारला असल्याकारणाने ती काळानुसार टिकली. कालांतराने विचारात किती बदल होतात आणि वैदिक संस्कृती किती वैचारिक स्वातंत्र्य व समृद्धी प्रदान करू शकते याचे हे कळस उदाहरण आहे.
जेव्हा सगुणत्व सुटत नाही, तेव्हा “सृष्टीची उत्पत्ती परमेश्वराने केली की इतर कारणांमुळे ती झाली असावी, ” असा संशय व्यक्त झाला आहे. “अनेकत्व सर्व मिथ्या आहे विविध देवता या निव्वळ कल्पना असून एकाच उत्पादकतत्वाच्या विकृती आहेत.” ही काहीशी निरिश्वरवादाकडे व नास्तिकवादाकडे झुकणारी वृत्ती अस्य वामीय तत्त्वज्ञान सूक्तात प्रकट केली आहे. (कदाचित म्हणूनच जैन धर्म हा नास्तिकवादावर आधारित असून सुद्धा त्यात उच्च कोटीची भूतदया व विश्वाप्रती संवेदनशीलता आपल्याला दिसते.) त्यातून निर्माण झालेली नासदीय सूक्तासारखी विचारांना चालना देणारी सुंदर अशी अभिव्यक्ती. आपल्यालाही उमगत जातं की, “मी कोण? माझ्या असण्याचा उद्देश काय?” इथपासून ते “हे विश्व कुणी निर्माण केलं?” मग ईश्वर म्हणा, वा निसर्गातील एकतत्व; या संकल्पनेला एका निर्गुण निराकार अशा तत्त्वात आकारणं, हा सारा आपल्या व्यक्तिगत व सामाजिक विकासाचा टप्पा बनत जातो. आपली आकलनकक्षा विस्तारत जाते, तसतसा आपल्याबरोबर आपला धर्म देखील विस्तारत जातो. प्रत्येक आत्म्याचे स्वतःचे असे संचित असते त्याप्रमाणे प्रत्येक आत्म्याचा ध्येय व मुक्तीपर्यंत पोहोचण्याचा मार्गही निराळा असतोच.
(एकप्रकारे हा व्यक्तित्ववादाचा पायंडा आहे.) साहजिकपणे कुणाबद्दल कुठलेही सरधोपट विधान करणे हे मूलतः चुकीचे आहे, याचा विचार या प्राचीन ग्रंथांतही केला आहे. प्रत्येकाचा स्वधर्म हा त्याच्या स्थान व परिस्थितीप्रमाणे बदलत जातो. तो कुठल्याही चौकटीत बांधता येत नाही, हे आपल्याला टप्प्याटप्प्याने उमगत जातं. सुरुवातीला आपण धर्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत गेलो असलो तरी नंतर मात्र तोच आपल्याला चिंतनास प्रवृत्त करत जातो. आपल्यातील स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांचा तो आदर करतो. आणि कदाचित म्हणूनच भारतीय संस्कृतीचे मूलाधार असलेले ग्रंथ, वेद हे अपौरुषेय मानले आहेत. ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हे. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेद हे एका सिद्ध जीवन पद्धतीचे प्रतिबिंब बनत गेले व लोकमान्य परंपरा म्हणून स्थिरावले. वैदिक धर्म अद्वैतापासून ते नास्तिकवादापर्यंत प्रत्येकाच्या स्वभावधर्माप्रमाणे आपल्यात सहजतेने सामावून घेतो. आपल्या आकलनाच्या कित्येक पुढे जाऊन तो आपल्याला असीम ज्ञान, उद्देश्य व सकारात्मकता प्रदान करत जातो. आपल्या चार पावलं पुढे राहून आपल्याला मार्गदर्शन करत आपल्याबरोबर उत्तरोत्तर प्रवास व प्रगती करत जाणं हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे आणि म्हणूनच तो कालासमवेत टिकणारा आहे. Change is the only permanence.. हे आपल्या कित्येक आधी ह्याला ठाऊक आहे. आनंदाची, सुख समाधानाची व्याख्या व्यापक करणारा आहे. मला नाही वाटत की जगातील इतर कुठलाही धर्म स्वतःवर, धर्माचा जो आधारभूत त्या ईश्वरावर, यम नियम, त्यातल्या परंपरांवर, त्यावरील विश्वासावर, वर्षानुवर्षे निरीक्षणाने, लोकमताने सिद्ध झालेल्या विश्लेषणांवर, त्यावरच्या न दिसणाऱ्या श्रद्धांवर इतके प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देत असेल. याचा अर्थ सरळ आहे. प्रत्येकाला मुळातून विचार करण्यास बाध्य करावे असे या धर्माला वाटत असेल. मानवाने ईश्वराला शोधून काढून त्याच्यावर सर्वतोपरी आपला भार टाकण्यापेक्षा त्याने आत्मशोध घेणे महत्त्वाचे वाटत असेल. स्वतःत रमणाऱ्या, आत्मचिंतन करणाऱ्या माणसाला इतर काही शिकवण्याची क्वचितच गरज भासत असेल. वेद हे अपौरुषेय आहेत, हे ही त्या मागचं एक कारण असू शकतं. याही अर्थाने ईश्वर हा मानवी मनाचा प्रवक्ता आहे, कर्ता नव्हेच.
निरनिराळ्या देवता – मान्यता – श्रद्धा या सामाजिक एकीकरणाच्या दृष्टीने अद्वैतवादाच्या एकखांबी तंबूखाली येऊन विसावतात. त्याची सश्रद्ध अनुभूती आपल्याला अक्षर पुरुषसूक्तात येते.
गणपती ही देवता ऋग्वेदकालात होती की नव्हती याबद्दलही बरेच वाद आहेत. ऋग्वेदातील आठव्या मंडळातील ८१ व्या सूक्तात गणपतीच्या बाह्यरुपाचे वर्णन आहे. सुरुवातीला इंद्र हे सर्वनाम (श्रेष्ठ) या अर्थाने आढळते. यात म्हटले आहे की रिद्धी – सिद्धी आणि बुद्धी यांचा अधिपती तो गणपती. इंद्राचा डावा – उजवा हात ही गणपतीची डावी किंवा उजवी सोंड असा निर्देश आहे.
सुभाषितं ही आपल्याला ऋग्वेदाची अमूल्य अशी देण आहे. प्रथम ओळीत एखादे मूल्य अथवा सत्य मांडणे व दुसऱ्या ओळीत त्याचे उदाहरण देणे,अशी बहुतेक सुभाषितांची रचना असते. सुभाषितं ही व्यवहारी शहाणपणा व ज्ञानाचा आदर्श परिपाठ आहेत. संस्कृत भाषेतील सुभाषितं ही प्राचीन साहित्याचा मनोरंजक व मार्गदर्शक विभाग आहे
आत्मानुभव सूक्त हे देखील असीम शांतता मिळवून देणारे आहे. स्वतःला जाणणे म्हणजेच आत्मानुभव. प्रत्येक सजीव व निर्जीवात एक जागृत असे आत्मतत्त्व असते. त्या अमर आत्मतत्त्वाचा अनुभव घेणे म्हणजेच आत्मानुभव. सृष्टीची उत्पत्ती, परमेश्वराचे स्वरूप आणि सामर्थ्य, सृष्टीचे मूल, आत्मा, चैतन्य आणि अचेतन सृष्टीतील गूढ तत्वांचे विवेचन या सूक्तात आढळते.
महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर. तीन दिवस उपवास करून दुधात भिजवलेल्या भाताच्या शताहुती शिवास वाहतात. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असून याला रुद्रमंत्र व मृत संजीवनी मंत्र असेही म्हणतात. त्र्यंबकम मंत्र हा शिवाचे त्रिनेत्र दर्शवतो. महामृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणे. त्यामुळे दीर्घायुष्य प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
दानव, असुर, पिशाच,यक्ष, राक्षस या सर्वांचा मिळून एक राक्षससंघ वैदिक काळात मानला जात होता. वैदिक साहित्यात ‘रक्षस्’ शब्द आलेला असून त्यापासून राक्षस हा शब्द आला. राक्षस ही मायावी, अद्भुत, कपटी, मांसभक्षक, जादूटोणा करणारी, ज्ञानी लोकांचा व यज्ञयागांचा द्वेष करणारी जमात म्हणून ओळखली जाते. राक्षस हे दिवसा निष्क्रिय तर रात्री क्रियाशील असतात. पुलस्त्यापासून राक्षस उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाने भूतलावरील जलाच्या रक्षणार्थ राक्षसांना निर्मिले अशा कथाही आहेत. कश्यपानंतर ब्रह्मधनेपासून ब्रह्मराक्षस वंश प्रवर्तित झाला असे म्हटले आहे. पुढे आर्य व राक्षस या दोन संस्कृतींचा समन्वय होत गेल्याचे निदर्शनास येते. आर्य व राक्षस यांच्या चालीरीती व सामाजिक व्यवहार यात साम्य तसेच भिन्नताही होती. राक्षसांचा वंश मातेवरून चालत असे. पळवून आणलेल्या स्त्रियांशी विवाह करण्याची प्रथा राक्षसांत होती. त्यावरून मनुस्मृतीत राक्षस विवाहाचा संदर्भ आला असावा. त्यांचे विवाह अग्नीच्या साक्षीनेच होत. कदाचित राक्षस ही आर्यांचीच एक शाखा असावी जी कालांतराने दक्षिण भारतात स्थिरावली व तिने आपले वैभवशाली राज्य व संस्कृती निर्माण केली. (रावण व त्याची लंका) निरनिराळ्या प्रचंड वास्तूंशी राक्षसांचा संबंध जोडलेला दिसतो. हेमाडपंथी देवालयांसाठी ज्या अतिप्रचंड शीलांचा वापर होतो त्यावरून हे काम राक्षसांनी केले असावे, अशी समजूत होती. ऋग्वेदात मृत्यू देवता निऋऀत्ती ही राक्षस मानली जाते. ऋग्वेदातही तंत्रविद्या, भानामती,जारणमारण यासंबंधी अभिचार सूक्ते आहेत. ह्या वाममार्गालाच अभिचार योग असेही म्हणतात. (याचाही प्रभाव बुद्ध धर्मावर प्रकटपणे दिसून येतो.) ऋग्वेदकाल ते आजपर्यंतच्या काळात राक्षस जमात देखील किती उत्क्रांत होत गेली ते आपण बघतोच आहे. मुख्य म्हणजे त्यात जात-पात, वंश-वर्णभेद असा कसलाही दावा नाही.
सत्व रज तम हे गुण व त्यांची प्रतिकात्मक रूपं ही आपल्याला प्राचीन ग्रंथांमध्येही दिसून येतात. प्रत्येक व्यक्ती ही त्रिगुणात्मक असते. त्या गुणांचे नियमन व त्यांना व्यक्तिगत व जीवनोपयोगी तत्त्वांत परावर्तित कसे करावे, हे ही भगवद्गीतेसारखे महान ग्रंथ सांगतात. उपनिषदांसारखे ग्रंथ जीवन मृत्यु विषयक संकल्पना, गुंतागुंतीची उकल सोप्या शब्दात सांगतात. वैदिक कालापासून चालत आलेलं हे चिंतन एखाद्या सावलीसारखं इतकं आपल्या मागोमाग, अन हातात हात घालून चालत आलेलं असतं, की आज नाही तर एक दिवस आपण अपूर्णातून पूर्ण व शून्यातून शून्य हे ध्येय गाठू शकू, इतपत आपणही धडपडत राहतो, सश्रद्ध होऊन जातो.
आपल्यालाही उमगत जातं की, One that had granted us the Bliss of Ignorance, also acquires the Power to grant us the Strength to bear the Complete Knowledge…making us humble enough to believe that, “I know, that I do not know anything; yet not Insignificant in any way..”
ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।
लेखिका : सुश्री केतकी कानिटकर
संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माझ्या घराजवळ पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा आहे. त्या शाळेच्या पटांगणावर मी कधी कधी चालायला जाते. त्या पटांगणात निरागसतेच्या लहरी पसरलेल्या असतात, म्हणून की काय कोण जाणे, पण तिथे गेल्यावर अगदी प्रसन्न वाटतं.
काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला. त्यावरचा मजकूर बघून माझे पाय थबकले. “Buddy Bench” असे शब्द लिहिले होते. त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या. हा काय प्रकार आहे असा विचार करत मी उभी असताना एक नऊ वर्षाची, पोनिटेल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली.
मी तिला विचारलं, “ हा नवा आहे का ग बेंच?”
ती म्हणाली, “ नाही. ‘बडी बेंच’ नवा नाही. मागच्या बाजूला होता तो फक्त पुढे आणलाय.”
‘बडी बेंच’?माझी उत्सुकता वाढली. buddy म्हणजे मित्र पण buddy bench म्हणजे नक्की काय असावं?
माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती म्हणाली, “आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल, वाईट वाटत असेल, कुणी खेळायला घेत नसेल ना, तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं. मग इतर मुलांना समजतं आणि कुणीतरी येतं बोलायला, खेळात घ्यायला, मैत्री करायला आणि मग एकदम बरं वाटतं,” तिनं उलगडा केला.
“अगबाई! हो का?” मी चकित होऊन म्हणाले. किती सुरेख कल्पना आहे! केवढाली ओझी असतात या लहान जिवांच्या पाठीवर. अभ्यास, परीक्षा, रुसवे, फुगवे,एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताण-तणाव!
“पण कुणी आलंच नाही बोलायला तर?” आयुष्यातल्या अनुभवाने मला विचारण्यास भाग पाडले.
तिनं आश्चर्याने माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हाताने मागे केल्या व ती म्हणाली, “का नाही येणार?एकजण तरी येतंच. कारण त्यासाठीच तर आहे ना हा बेंच.” या बाईला इतके साधे कसे कळत नाही, असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता.
एकटं वाटणं, वाईट वाटणं, राग येणं या नैसर्गिक भावना आहेत. त्या भोळ्याभाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात. अपेक्षांचं ओझं असतं. एखाद्याला खेळात न घेणं असतं. एखादीला नावं ठेवणं असतं. आई-बाबांकडून रागवून घेणं असतं. आणि त्यावर Buddy Bench हा एक सोपा पर्याय आहे. मला कौतुक वाटलं.
“किती छान माहिती सांगितलीस ग! तू कधी बसली आहेस बडी बेंचवर?” माझ्या तोंडून गेलंच.
“होऽऽऽ. नवी होते तेव्हा खूप वेळा. त्यानंतर कित्तीऽऽ मैत्रिणी मिळाल्या.” तिच्या मोकळेपणाने मोहित होऊन मी पुढे चालू लागले.
मनात येत राहिलं…फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का? मोठ्यांसाठी का नाही? ऑफिसमधे,डॉक्टरकडे,वकिलाकडे, कॉलेजमधे, परीक्षा गृहात, लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर? त्यामुळे अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधारेल का? जगातील एकटेपणा कमी होईल का? काहीवेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं. नाहीतरी थेरपिस्टशी बोलणे आणि काय असते?
कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी,समदुःखी असणाऱ्याशी, चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल. त्यामुळे जड झालेले ओझे थोडेसे हलके होईल. नाही का?
त्या बेंचवर खाली दोन ओळी लिहिल्या होत्या..
चल..बसू, बोलू, गप्पा मारू, विचारू एकमेका काही प्रश्न
उदात्त हेतू मनी ठेवूनी होऊ buddy, यार, सखा, मित्र!
लेखिका : सुश्री ज्योती रानडे
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
नाव विचित्र वाटते ना? पण या मामांचा घेतलेला अनुभव सांगते,मग तुम्हालाही पटेल.तर गंमत अशी झाली परवा ( हे आपले म्हणायचे.शब्दशः घ्यायचे नाही.) घरा बाहेर पडले माझ्याच नादात आणि काही कळण्या पूर्वी एकदम हल्लाच झाला.अचानक डोक्यावर टप टप कशाचे तरी वार होऊ लागले.मी एकदम घाबरुनच गेले.वर बघते तर कावळे महाराज डोक्यावर अजून मार देण्याच्या प्रयत्नात होते.कशीबशी पुढे गेले.मनात नाना विचार.आता कावळा अंगावर आला काही अशुभ घडेल का? इतके विचार आले की मी पार याची डोळा ( मनातच हं ) मरण पण बघितले.पुन्हा घरी आल्यावर हे महाराज स्वागताला हजरच.घरात पण जाऊ देई ना.कुलूप उघडून घरात जाईपर्यंत पाठलाग केला.कशीतरी घरात गेले.नंतर समजले आज हा प्रसाद घरातले,शेजारचे,आमच्या घरा समोरून जाणाऱ्या प्रत्येकाला मिळाला होता.मग जरा निरीक्षण केले तर त्या कावळीणीचे पिल्लू खाली पडले होते.आणि त्याच्या रक्षणासाठी ती आमच्यावर हल्ला करत होती.
मग आधीचे काही दिवस आठवले,थोडे गुगलले आणि सगळे लक्षात आले.काही दिवसांपूर्वी वसंत ऋतूत कोकीळ कुजन चालू असते.तेव्हा हे कावळे घरटे ( झाडाच्या अगदी टोकावर उंच ) तयार करतात.यांची अंडी घरट्यात विराजमान झाली की कावळीणीचे काम असते.त्यात ही कोकीळ जोडी त्यांच्या घरट्या भोवती कर्कश्श ओरडुन त्यांना मागे यायला भाग पाडतात.कोकीळ त्यांना लांब घेऊन जातो.आणि कोकिळा कावळ्याच्या घरट्यात आपली अंडी घालते.जेवढी अंडी घालते तेवढी कावळ्याची अंडी खाली ढकलून देते.नंतर दुसरे घरटे शोधायला निघतात.आणि कावळ्याची जोडी त्या अंड्यांची निगुतीने काळजी घेतात.आमच्याही दारातील अशोकाच्या झाडावर हेच झाले होते.यथावकाश कावळ्याने पिल्लांना उडायला शिकवले.ते पण अगदी बघण्या सारखे होते.पिल्लू घरट्याच्या काठावर येऊन बसले की त्यांची आई पिल्लांना ढकलून देत असे.थोडा वेळ होलपटून ते पिल्लू छान गिरकी घेऊन उडत असे.हे सगळे बघणे मोठीच पर्वणी होती.त्यातच हे कोकीळेचे आळशी पिल्लू होते.त्याला ढकलल्या नंतर ते धप्पकन खाली पडले आणि आम्ही त्याला इजा करू नये म्हणून आपले मामा चे कर्तव्य पार पाडत,हे मामा आम्हाला डोक्यात चोचीने मारत होते.
अखेरीस एक दिवस ते पिल्लू उडाले आणि कावळे मामा कृतकृत्य झाले.ते पिल्लू लांब जाऊन बसले आणि कुहूकुहू करू लागले.
ही पक्ष्यांची गंमत बघताना आश्चर्य वाटून गेले.अवती भोवतीचा निसर्ग किती वास्तविकता दाखवतो.
जसा कावळा दरवर्षी फसतो तसेच आम्ही पण दरवर्षी कावळे मामांचा प्रसाद खातो.
☆ निसर्गरुपे : दुपार… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
निसर्गाची विविध रूपे मला भावतात. सगळीच रूपे तशी मनोहर असतात. अर्थात तशी दृष्टी तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला दुपार सुद्धा आवडेल. पौर्णिमेची रात्र तर सर्वांना आवडतेच पण निसर्गावर प्रेम करणाऱ्यांना अमावास्येची रात्र सुद्धा तेवढीच आवडते. पौर्णिमेला पूर्ण चंद्र आकाश प्रकाशमान करतो. समुद्राला भरती येते. रुपेरी चंद्रप्रकाश अवघे विश्व व्यापून टाकतो. कवी, लेखकांच्या प्रतिभेला बहर येतो. पण अमावास्येची रात्रही तेवढीच सुंदर असते. त्यावेळी आकाश म्हणजे जणू चंद्रकळा ल्यालेली एखादी घरंदाज गृहिणी वाटते. चांदण्याची नक्षी तिच्या साडीला जडवलेली असते. हा जरीपट खूप शोभून दिसतो.
खरा निसर्गप्रेमी कोकिळेवर जेवढे प्रेम करतो, तेवढेच प्रेम कावळ्यावर आणि घुबडावर सुद्धा करतो. अशीच निसर्गाच्या प्रेमात पडलेली व्यक्ती दुपार हे निसर्गाचेच रूप आहे हे समजून त्याचा आनंद घेते. गुलाब, जाईजुई, मोगरा ही फुले मला आवडतातच पण सदाफुली आणि गवतफुलासारखी फुलंसुद्धा मन मोहून घेतात. तेही निसर्गाचेच सुंदर अविष्कार आहेत.
बहुतेक सगळ्या कवी, लेखकांनी पहाटेच्या वेळेचं रम्य वर्णन केलं आहे. संध्याकाळ आणि रात्रीचंही केलं आहे. पण दुपारचं वर्णन फारसं कोणी केल्याचं वाचनात आलं नाही. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीच्या प्रसंगांचं वर्णन करणारी शेकडो गाणी आहेत पण दुपारच्या वेळेवर लिहिलेली गाणी मला कुठे आढळली नाहीत. या अर्थानं दुपार म्हणजे ‘ अनसंग हिरोईन ऑफ द डे ‘ असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही मला एखाद्या वेळी विचारलं की पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या दिवसांच्या वेळांना तुम्ही स्त्रियांचीच उपमा का देता आहात ?तुमचा प्रश्न बरोबर आहे. पण आपल्या मराठीत आपण हे शब्द स्त्रीलिंगीच वापरतो ना ! ती रम्य पहाट, ती प्रसन्न हसरी सकाळ, ती दुपार, संध्याकाळ, रात्र वगैरे. ‘ ती ‘ ऐवजी एखादा पुल्लिंगी शब्द वापरून पहा बरं. तो पहाट, तो सकाळ,तो रात्र वगैरे… सगळी मजा गेली ना !
कधी कधी फोनवर बोलणारी ती बाई अशा शब्दांची फार गल्लत करते, त्या वेळी असं वाटतं की ही समोर असती तर काही तरी सांगता आलं असतं. आपण एखाद्या व्यक्तीला फोन केला आणि त्या व्यक्तीनं फोन उचलला नाही तर बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं. ‘ ज्या व्यक्तीला आपण फोन केला आहे, तो व्यक्ती आपला फोन उचलत नाही किंवा उत्तर देत नाही. आता ‘ व्यक्ती ‘ हा शब्द सुद्धा स्त्री लिंगीच वापरला जातो. मग ‘ तो ‘ व्यक्ती कशाला ? पण जाऊ द्या विषय दुसरीकडेच चालला. आपल्या मूळ विषयाकडे येऊ या.
तर पहाटेचा आणि सकाळचा उल्लेख आधीच्या लेखात आपण पहाट म्हणजे अल्लड तरुणी आणि त्यानंतरची सकाळची वेळ म्हणजे वेणीफणी, गंधपावडर करून आलेली सुस्नात तरुणी असा केला. त्यानंतर जेव्हा सकाळचे अकरा वाजण्याचा सुमार होतो, तेव्हा दुपारचे वेध लागू लागतात. आता सकाळच्या या तरुणीचे रूपांतर तीस चाळीस वर्षांच्या गृहिणीत झालेलं असतं. तिला घरच्यांची काळजी असते. सकाळपासून आपापल्या कामात मग्न असलेल्या आपल्या पतीला, मुलाबाळांना भूक लागली असेल, याची जाणीव होऊन ती स्वयंपाकाला लागलेली असते. दुपारी साडेबारा एकच्या सुमारास ती त्या सगळ्यांना मोठया प्रेमाने बोलावते आणि जेवू घालते.
इथे दुपार येते ती आईचे रूप घेऊन. आई जशी आपल्या मुलांची काळजी करते,त्यांना वेळच्या वेळी खाऊपिऊ घालते, तशीच दुपार दमलेल्या, थकलेल्याना चार घास भरवते. आणि चार घास खाल्ल्यावर म्हणते, ‘ अरे लगेच नको लागूस कामाला. जरा अंमळ विश्रांती घे ना. ‘ त्या दुपारच्या कुशीत काही क्षण माणसे विश्रांती घेतात, ताजीतवानी होतात आणि पुन्हा आपल्या कामाला लागतात. गाई, गुरं सुद्धा एखाद्या झाडाखाली विश्रांती घेताना दिसतात.
सकाळ आणि संध्याकाळ यांच्या मधली वेळ म्हणजे दुपार. शेतकरी, कष्टकरी, मजूर हे सगळे सकाळपासूनच कामाला जुंपलेले असतात. दुपारी ते एखाद्या झाडाच्या सावलीत बसतात. आपल्या सोबत जी काही चटणी भाकरी आणली असेल ती खातात, दोन घोट पाणी पितात. आपल्या बरोबरच्या व्यक्तींशी गप्पा, हास्यविनोद करतात आणि ती ऊर्जा सोबत घेऊन पुन्हा आपल्या कामाला लागतात. या अर्थानं दुपारी ही एक प्रकारची ‘ होरेगल्लू ‘ आहे. ती मनावरचा ताण कमी करते.
जसा ऋतू असेल किंवा जसं हवामान असेल, तशी दुपारची रूपं वेगवेगळी असतात. ग्रीष्मातली दुपार अंगाची लाही लाही करते. कधी कधी तर वाराही बंद असतो. डोंगरावरील, जंगलातील झाडं एखाद्या चित्रासारखी स्तब्ध असतात. अशा वेळी दुपार तुम्हाला सांगते, ‘ बाबारे, बस थोडा. अंमळ विश्रांती घे. उन्हात विनाकारण फिरू नकोस. ‘ ती जणू सांगत असते, ‘ जरा विसावू या वळणावर…’ दुपार आहे म्हणून तर थोड्या वेळाने तुला हवीहवीशी वाटणारी सांज येईल, रात्र येईल आणि पहाटही उगवेल. थोडा धीर धर.
वसंतातली दुपार त्या मानाने जरा प्रसन्न असते. वसंत हा तर कवी, लेखकांचा आवडता ऋतू. मुबलक फळे, फुले उपलब्ध असतात. झाडांना नवी पालवी फुटलेली असते. दसरा दिवाळीला आपण जसे नवीन कपडे परिधान करतो, तशी वसंत ऋतूत निसर्गाचीही दिवाळी असते. जुनी पालवी टाकून देऊन झाडं नवीन पालवी धारण करतात. गुलाबी, पोपटी, हिरवी अशी विविध रंगछटा असलेली पानं दृष्टीस पडतात. या ऋतूत झाडांना मोहर आलेला असतो. त्याचा मंद दरवळ सगळीकडे पसरलेला असतो. या ऋतूत निसर्ग भरभरून रूप, रस आणि गंध प्रदान करतो. अशा ऋतूतली दुपारही छान वाटते. ऊन असतेच पण शीतल वाऱ्याच्या लहरी अंगावर जणू मोरपीस फिरवतात. उन्हाची तलखी कमी करतात.
वर्षा ऋतूतली दुपार बऱ्याच वेळा ढगांच्या छायेनं आच्छादलेली असते. अशा वेळी उन्हाचा तडाखा जाणवत नाही. वर्षा ऋतूत सकाळी आणि संध्याकाळी बऱ्याच वेळा हमखास पाऊस असतोच. पण दुपारही कधी कधी पाऊस घेऊन येते. पावसात भिजलेलं तिचं हे रूप आल्हादकारक वाटतं. दुपारी कधी कधी सोसाट्याचा वारा सुटतो. ‘ नभ मेघांनी आक्रमिले ‘ असेल तर अशा वेळी ऊन सावलीचा आणि ऊन पावसाचा लपाछपीचा खेळ सुरु असतो. निसर्गाच्या कॅनव्हासवरचं चित्र सारखं बदलत असतं. अशा वेळी तुमच्यात दडलेला रसिक, कलाकार या निसर्गचित्राला दाद देतो.
अशी ही दुपारची विविध रूपं. तऱ्हेतऱ्हेची आणि मजेमजेची. सकाळ, संध्याकाळ आणि रात्रीसारखीच मनमोहक रूपे. तिलाही भेटू या. तिचंही स्वागत करत राहू या. तिला म्हणू या…
‘ हे दुपार सुंदरी, तू अवश्य ये
येताना तू नेहमीच चारदोन निवांत क्षण घेऊन येतेस.
दिवसाच्या धामधुमीत तू आम्हाला चार घास प्रेमाने भरवतेस.
☆ अमूल डेअरी, न्यूझीलंड आणि – I too had a dream… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
“मॅडम, थोडं स्पष्ट बोलतो, राग मानू नका. पण सगळे हिंदुस्तानी एकाच वेळी जर हिंद महासागरात नुसते थुंकले जरी ना, तरी तुमचं अख्खं न्यूझीलंड पाण्यात बुडून जाईल. हे ध्यानात ठेवा आणि आम्ही काय करायचं आणि काय नाही, हा शहाणपणा आम्हाला शिकवू नका.”
न्यूझीलंडच्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला, बहुधा प्रत्यक्ष राजदूताला हे परखड बोल सुनावले होते अमूलचे तत्कालीन सर्वेसर्वा डॉ. व्हर्गीस कुरियन यांनी…
प्रसंग होता दिल्लीतील एका कार्यक्रमातील…
कुरियन यांनी तेव्हा नुकतीच अमूलची सूत्रे हाती घेतली होती, आणि जास्तीत जास्त दुधावर प्रक्रिया (milk processing) करण्यासाठी ते धडाक्यात कामाला लागले होते. स्वाभाविकच, भारत आणि भारतीय ज्यांच्या उत्पादनांची मोठी बाजारपेठ होती, अशा बड्या देशांच्या पोटात दुखू लागलं होतं.
त्या संदर्भातच, कोणी न विचारताच, न्यूझीलंडच्या एका अधिकारी महिलेने, कुरियन यांना अनाहुत सल्ला दिला होता – ” भारतासारख्या देशाने दुग्ध प्रक्रियेसारख्या तांत्रिक आणि किचकट क्षेत्रात शिरण्याचे दु:साहस करू नये. स्वित्झर्लंड, न्यूझीलंडसारख्या तज्ञ मंडळींकडे ही जबाबदारी सोपवलेली आहे आणि ती निभावण्यास तेच समर्थ आहेत.”
कुरियन यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी त्या महिलेला तडकाफडकी सुनावले.
हे असं सुनावणं ही सोपी गोष्ट नव्हती.
न्यूझीलंड त्याकाळी दुग्ध उत्पादन व दुग्ध प्रक्रिया क्षेत्रात अव्वल होता. त्यांचे तंत्रज्ञान अद्ययावत होते. उत्पादन, प्रक्रिया आणि तंत्रज्ञान या सगळ्याच क्षेत्रांत भारताचे स्थान कुठेच नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताला दुधाची भुकटी (milk powder) पुरवणाऱ्या देशात न्यूझीलंड अग्रेसर होता.
उन्हाळ्यात, जेव्हा दुधाचे उत्पादन कमी झालेले असते, तेव्हा दुधाची कमतरता भासू नये म्हणून, भारतातील अनेक राज्यांत दुधापासून मिठाई बनवण्याला कायद्याने मनाई होती, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात दूध पाठवण्यास मनाई होती.
न्यूझीलंडची तांत्रिक श्रेष्ठता वादातीत होती. स्वतः कुरियन कॉमनवेल्थ देशांतील कोलंबो प्लॅन शिष्यवृत्ती अंतर्गत न्यूझीलंड येथील मॅस्सी विद्यापीठात Plant Design and Dairy Engineering शिकले होते.
या पार्श्वभूमीवर अशा दादा देशाला ललकारणं हा कदाचित निव्वळ वेडेपणाच होता.
पण कुरियन यांनी हे आव्हान स्वीकारले. ” एक दिवस असा येईल की भारत न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करेल,” आपल्या ” I, too, had a dream ” असे या आत्मचरित्रात ते लिहून ठेवतात.
कुरियन निव्वळ दिवास्वप्नं पाहणारे नव्हते. बोलून मग – “अरे बापरे, हे मी काय बोलून बसलो ?” – असा विचार करणारे नव्हते, विचार करून बोलणारे होते. ते कामाला लागले.
१९७० साली भारतात ‘Operation Flood – white revolution ‘ – दुग्धक्रांती – सुरू झालं. भारतातील दूध आणि प्रक्रिया केलेले दुधाचे पदार्थ यांचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढू लागलं.
दुधासाठी आयातीवर अवलंबून असलेला भारत, आता नुसता स्वयंपूर्ण झाला नव्हता, तर जगात सर्वात जास्त दूध निर्माण करणारा देश झाला होता, दूध उत्पादने निर्यात करणारा देश झाला होता.
— आणि २००९ साली, भारताने न्यूझीलंडला दुग्धजन्य पदार्थ निर्यात करायला सुरुवात केली.
दुग्ध प्रक्रिया ही आता न्यूझीलंडची मक्तेदारी राहिली नव्हती.
कुरियन यांनी पाहिलेले हे स्वप्न, त्यांच्या हयातीतच, पूर्ण झाले होते.
ता. क.: २०१७ साली, आपले “अमूल” न्यूझीलंडच्या क्रिकेट संघाचे प्रमुख पुरस्कर्ते (sponsorer) झाले. “Third world country आहात, दुग्ध प्रक्रियेच्या नादी लागू नका” असं ज्या न्यूझीलंडने भारताला सांगितलं, त्याच भारताच्या “अमूल” चा लोगो न्यूझीलंडच्या खेळाडूंच्या T Shirt वर अभिमानाने झळकू लागला. अमूलच्या श्रेष्ठतेवर शिक्कामोर्तब झालं.