अर्धवट झोपेत जाणवले की गाडी थांबली आहे. रात्री ११ वाजता नाशिक फाट्याला गाडीत बसल्यापासून ड्रायव्हरने दोन तीन वेळा चहापाण्यासाठी गाडी थांबवली होती. तशीच थांबली असेल असे वाटले. खिडकीतून बाहेर नजर टाकली अन दिसला एक डोंगर आणि वरपर्यंत गेलेली दिव्यांची रांग. पहाटेचे चार वाजत होते. शेजारी झोपेत असलेल्या मिनीला उठवलं आणि सांगितलं, “मिने, आलं कळसूबाई”. कळसूबाईच्या पायथ्याशी असणारं नगर जिल्ह्यातलं अकोला तालुक्यातलं बारी नावाचं गाव होतं ते. तिथून २०-२५ मिनिटं थोड्या चढाच्या रस्त्याने चालत निघालो.
मागे घर पुढे मोकळी जागा अशा बर्याच गडांवर टिपिकल रूपात दिसणार्या एका हाॅटेलमध्ये गेलो, हाॅटेल सह्याद्री त्याचं नाव. तिथे पोहे चहा घेऊन अंधारातच साडे तीनला चालायला सुरवात केली. पायथ्यापासून दिसणारी डोंगरावरची दिव्यांची रांग पाहून असं वाटलं होतं की तेवढंच चढायचं आहे, पण नंतर लक्षात आलं की तो पूर्ण डोंगराचा अगदी छोटासा टप्पा आहे. ओबडधोबड पायर्या होत्या, काहीची उंची फुटापेक्षा जास्त होती. बारीक बारीक दगडगोट्यांवरून पाय घसरत होते. मी तीन चार वेळा सह्याद्रीला लोटांगण घातलं. अफाट दम लागत होता. स्वतःच्या श्वासाचा आवाज ऐकू येत होता. पण महाराष्ट्राच्या सर्वोच्य ठिकाणी पोहचायचे आहे या जिद्दीने फक्त एकएक पावलावर लक्ष देऊन मार्गक्रमणा चालू होती. समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर उंच असलेल्या कळसूबाई शिखराचं वैशिष्ठ म्हणजे अगदी टोकाला पोहचल्याशिवाय खालून कुठूनही तिथला पिकपाॅईंट, कळसूबाईचं मंदिर दिसत नाही. आता बर्याच ठिकाणी रेलिंग बसवली आहेत. एकुण चार ठिकाणी लोखंडी शिड्या उभारल्या आहेत. त्यामुळे चढाई बरीच सोपी झाली आहे. पण इतक्या उंचीवर देवळाचे बांधकाम कसे केले असेल, पूर्वी लोकं देवीच्या दर्शनाला कशी जात असतील याचं आश्चर्य वाटतं.डोंगराच्या पायथ्याशी असणार्या गावात शुभकार्याची सुरवात देवीच्या दर्शनाने होते. त्यामुळे स्थानिक लोकांची तिथे बर्यापैकी ये जा असते. चालत असताना वर एक टप्पा दिसायचा आणि वाटायचे की तिथेपर्यंत पोहोचलो की झाले. पण तिथे पोहोचलो की कळायचे की अजून वर चढायचे आहे. असे भ्रमनिरास दूर करत एकएक टप्पा पूर्ण करत शेवटी त्या सर्वोच्य ठिकाणावर पोहोचलो. सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. मी मनातल्या मनात गाऊ लागले “आज मैं उपर,महाराष्ट्र नीचे”. महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणी पोहचल्याचा आनंद, तिथून चारी बाजूने खाली दिसणारे विहंगम दृष्य याचे वर्णन मला पामराला अशक्यच आहे. थोड्यावेळाने खाली उतरायला सुरुवात केली. चढण्यापेक्षाही उतरणे अवघड असणार याची कल्पना होती, आणि तसेच झाले.काही ठिकाणी तर बसून उतरावे लागले. उन्हाचे चटके बसत होते. लोखंडी शिड्या व रेलिंग तापले होते, पण त्यांचे चटके सहन करणे अनिवार्य होते. माझा थकला भागला जीव शेवटी हाॅटेल सह्याद्री पर्यंत पोहोचला. तांदळाची भाकरी, पिठंल, वांग बटाट्याची भाजी, मिरचीचा ठेचा, वरण भात असा फक्कड बेत होता. जेवण खरंच चवदार होते. त्या हाॅटेलचे मालक तानाजी खाडे दादांनी कळसूबाई देवीची माहिती सांगितली. छानच बोलले ते. तृप्त मनाने, अभिमानाने परतीचा प्रवास सुरू झाला. आॅगस्ट महिन्यात परत तुला भेटायला रायगडावर येईन असे सह्याद्रीसमोर नतमस्तक होऊन वचन दिले. परतीचा प्रवास जोरदार अंताक्षरीने अगदी मजेचा झाला.गंमत म्हणजे ११ जून म्हणजे किरण ईशानच्या लग्नाचा वाढदिवस. पुण्यात आल्यापासून मी इथे आहे तर तुम्ही दोघे ११ जूनला कुठेतरी बाहेर जा असे मी म्हणत होते, पण झाले उलटेच. अचानक ध्यानीमनी नसताना माझेच ट्रेकला जायचे ठरले. अर्थात याचे श्रेय नक्की मिनीचेच. ११ जूनला श्रीराम ट्रेकर्स या ग्रुपतर्फे केलेला हा ट्रेक म्हणजे किरण ईशानला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाठी मी दिलेली गिफ्ट आहे असे मला वाटते.
☆ ८८५ वर्षे जतन केलेले पार्थिव : श्री मिलिंद चिंचोळकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुनिता जोशी ☆
नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी रामानुजाचार्य यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केले. पण फारच थोड्या व्यक्तींना माहीत असेल की रामानुजाचार्य यांचे पार्थिव गेले ८८५ वर्षे जतन करून ठेवलेले आहे.
जगभरातील सर्वांनाच इजिप्तच्या राजांचे मृतदेह (ममी) आणि भारतातील गोव्यातील सेंट झेवियरचे संरक्षित मृतदेह पाहून आश्चर्य वाटते…. परंतु फारच कमी लोकांना हे माहित असेल की इजिप्तच्या राजांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी ज्या विशिष्ट कापडाचा वापर केला जात असे त्या कापडाला हल्ली मसलीन म्हणून ओळखलं जातं ते कापड मसली(मच्छली पट्टणम) श्रीरंग पट्टणम म्हणजेआपल्या भारतातूनच आयात केले गेले होते.
श्रीरंगम (जिल्हा: तिरुचिरापल्ली, तामिळनाडू) येथील “श्रीरंगनाथस्वामी मंदिर”, ज्यात भारतातील सर्वात मोठे मंदिर प्रासाद असल्याची मान्यता आहे, येथे स्वामी रामानुजाचार्य (१०१७ – ११३७) यांचे पद्मासन घातलेल्या अवस्थेतील भौतिक शरीर आहे, जे “विशिष्ठाद्वैत” तत्त्वज्ञानाचे महान आचार्य आणि श्रीवैष्णव परंपरेचे प्रणेते होते. त्यांचे ८८५ वर्षे जतन केलेले भौतिक शरीर या ठिकाणी बघायला मिळू शकते. हे भौतिक शरीर श्रीरंगनाथस्वामी मंदिराच्या पाचव्या परिक्रमा-मार्गावर असलेल्या “श्री रामानुज मंदिराच्या” दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात संरक्षित आहे. स्वामी रामानुजाचार्य १२० वर्षे आयुष्य जगले… सन ११३७ साली त्यांनी पद्मासन अवस्थेत समाधी घेतली होती. स्वतः श्रीरंगनाथस्वामींच्या आदेशानुसार, रामानुजाचार्यांच्या शिष्यांनी त्या अवस्थेत त्यांचे भौतिक शरीर जतन केले. या संरक्षित शरीरात डोळे, नखे वगैरे स्पष्ट दिसतात. या शरीरावर कुजण्यापासून संरक्षण करण्यासाठी दररोज कोणताही अभिषेक केला जात नाही. वर्षातून दोनदा हे शरीर औषधी वनस्पतींनी स्वच्छ केले जाते आणि त्या वेळी शारीरिक शरीरावर चंदन आणि केशर लावले जाते. हे उल्लेखनीय आहे की या पवित्र स्थानाचा प्रचार गोवा किंवा इजिप्तसारखा केला जात नाही. रामानुजाचार्यांनी वापरलेले एक भांडे आपण अजूनही आत बघू शकता.
संदर्भ : मिलिंद चिंचोळकर यांचा चेपू भिंतीवरील लेख.
प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज स्वयंपाकघर आवरायला काढलं होतं. आवरायच्या आधीच ठरवलं होतं की ज्या गोष्टी गेल्या वर्षभरात लागल्याच नाहीत, वापरल्या गेल्याच नाहीत, त्या सरळ काढून टाकायच्या आणि देऊनच टाकायच्या. अशा बर्याच निघाल्या पाहता पाहता. केवढा पसारा. विस्मृतीत गेलेल्या बर्याच गोष्टी.
कधीतरी त्या हव्या होत्या, पण वेळेवर कुठे ठेवल्या तेच आठवलं नाही. म्हणून ती वेळ भागवायला लगेच बाजार गाठला.
सगळं उरकल्यावर ती वस्तु सापडली. पण मग काय उपयोग?
आखीव, रेखीव, आटोपतं असं असावं ना सगळंच, असं वाटायला लागलंय हल्ली. माझी आजी म्हणायची दोन लुगडी हवीत. एक अंगावर आणि एक दांडीवर…
आता भांडी ढीगभर, कपडे कपाटातून उतू जाताहेत, खाद्यपदार्थांची रेलचेल. कशाचंच नावीन्य नाही राहिलं.
माझ्या ओळखीतली, नात्यातली, अशी उदाहरणे आहेत.
पेशंट असलेली, आजारी असलेली, त्यांनी जाण्याआधी आपलं सगळं सामान वाटून टाकलं. काहीजणांनी तर कुणाला काय द्यायचं, ते लिहून ठेवलं. खरंच नवल वाटलं मला. आपण काहीतरी शिकायला हवं, असं वाटून गेलं.
ह्या वस्तूंचा मोह सुटत नाही. शेवटपर्यंत माणसाला खाण्याचा मोह सोडवत नाही.
खाण्याची इच्छा आणि ह्या गोष्टीतली इच्छा संपली की माणूस जाणार, हे समजायला लागतं.
एक ओळखीच्या आजी होत्या, मुलं-बाळं काही नव्हती. एकट्या राहायच्या. एका वाड्यात.
पुतणे वगैरे होते, पण कुणाजवळ गेल्या नाहीत.आपली पेन्शन कुणी घेईल ह्या भितीने लपवून ठेवत असाव्यात.
गेल्या तेव्हा उशीमधे पण पैसे सापडले. जातांना म्हणत होत्या, ‘नवी नऊवार साडी कुणालातरी पिको करायला दिलीय. तिच्याकडेच आहे. आणा म्हणून.’ असंही उदाहरण आहे.
एक ओळखीच्या बाई गेल्या. कॕन्सर झाला होता, पण गेल्या तेव्हा एका वहीत सगळं लिहून ठेवलं होतं.
जी बाई जाईपर्यंत त्यांची सेवा सुश्रुषा करत होती, तिला स्वतःची सोन्याची चेन आणि वीस हजार रुपयाचं पाकीट ठेवून गेल्या. मुलींना काय द्यायचं, सुनेला काय द्यायचं सगळं लिहून गेल्या.
साड्या, बाकी सामान कोणत्या अनाथाश्रमाला द्यायच्या ते पण लिहून गेल्या. ह्याला म्हणतात प्लानिंग.
देवही तेवढा वेळ देतो आणि हे लोक पण आपल्याला जायचंय हे मान्य करतात. ह्याला हिंमतच लागते.
नाहीतर आपण एक गोष्ट सोडत नाही हातातून. कायमचा मुक्काम आहे पृथ्वीवर ह्या थाटातच वावरत असतो आपण.
तीन-तीन महिन्यांचा नेट पॕक किती कॉन्फिडन्सने मारुन येतो आपण. नवलच वाटतं माझंच मला.
चार प्रकारचे वेगवेगळे झारे, चार वेगवेगळ्या किसण्या, आलं किसायची, खोबरं किसायची, बटाट्याचा किस करायची जाड अशी.
असं बरंच काही. सामानातलं खोबरं आणल्यावर किसणं होत नाही लवकर.
खूप पाहुणे येतील कधी, म्हणून पंचवीसच्या वर ताटं, वाट्या, पेले. पण पाहुणे येतच नाहीत. आले तरी एक दिवस मुक्काम.
घरी एक नाश्ता आणि एक जेवण बाहेर. घरी जेवणं झाली तरी भांडीवाली बाई सुट्टी मारेल, खूप भांडी पडली तर, म्हणून युज अॕण्ड थ्रो प्लेट्स. कुणालाच घासायला नको.
पाहुणे मुक्काम करत नाहीत सहसा. कारण एक सतरंजी पसरवून सगळे झोपलेत असं होत नाही.
कुणाचे गुडघे दुखतात, कुणाला कमोड लागतो. तेव्हा प्रत्येकाला आपआपल्या घरी परतण्याची घाई. घरची बाई पण आग्रह करत नाही कारण तिच्या हातून काम होत नाही.
पाहुणी आलेली बाई मदत करत नाही. सगळ्यांच्या हातात नेऊन द्यावं लागतं. अशा तक्रारी ऐकू येतात.
असं खूप काही आठवत बसतं, पसारा पाहून.
एवढाच पसारा हवा की वरच्याचं बोलावणं आलं, चल म्हणाला की लगेच उठून जाता आलं पाहिजे.
पण तसं होत नाही. दिवसेंदिवस जीव गुंततच जातो. वस्तूंमध्ये, दागिने, पैसा, नाती आणि स्वतःमध्ये पण.
रोज कुणीतरी गेल्याच्या बातम्या येतात. पण तरी नाही.आपण काही सुधारणार नाही.
दरवर्षी घरातला पसारा काढायचा आवरायला. त्याच त्या वस्तु पुन्हा काढायच्या, पुन्हा ठेवायच्या असं चाललेलं असतं आपलं. देऊन टाकलं तरी पुन्हा नवीन आणायचं.
खरंतर जितक्या गरजा कमी, तितका माणूस सुखी …
पण मन ऐकत नाही..
ये मोह मोह के धागे…….
मग त्या धाग्यांचा कोष, मग गुंता, मग गाठ आणि मग पीळ…आणि मग सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
निसर्गाकडून शिकायला हवं, आपल्या जवळ आहे ते देऊन टाकायचं आणि रितं व्हायचं. फळं, फुलं, सावली, लाकडं सगळं सगळं देण्याच्याच कामाचं.
पण आम्ही नाही शिकत .
थोडक्यात काय तर पसारा करु नये, आटोपशीर ठेवावं सगळं. आणि पसारा करायचाच असेल तर तो करावा दुसऱ्यांच्या मनात.आपल्या चांगल्या आठवणींचा, सहवासाचा, आपल्या दानतीचा. दिसू द्यावा तो आपल्या माघारी. आपण परतीच्या प्रवासाला निघाल्यावर लोकांच्या मनात, डोळ्यात, अश्रुंच्या बांधात.
जातांना आपण मागे बघितलं तर दिसावा खूप पसारा आपल्या माणसांचा, जिव्हाळ्याचा, गोतावळ्याचा.
संग्राहिका :सौ. राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ निसर्गरुपे : पहाट… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
निसर्गाची सगळीच रूपे मला भावतात. पहाट, सकाळ, दुपार आणि दुपारच्या आधीची आणि नंतरची वेळा, संध्याकाळची विविध रूपे आणि नंतर येणारी रात्र. ऋतू कोणताही असो, त्यातील विविध प्रहरांची ही विविध रूपे मला सारखीच आकर्षित करतात. प्रत्येकच प्रहर काहीतरी नवीन घेऊन येतो. कोणीतरी एखादं छानसं गिफ्ट आकर्षक रूपात गुंडाळलेलं घेऊन यावं, ते उघडून पाहिल्याशिवाय त्यात काय आहे ही उत्सुकता जशी शमत नाही, तशाच या वेळा अनुभवल्याशिवाय त्या आपल्यासाठी काय घेऊन येतात हे नाही कळायचं. अशाच या निसर्गवेळा मला जशा भावल्या, तशा तुमच्यासमोर ठेवणार आहे. शब्दांचाच रूपाने त्यातील रूप, रस आणि गंध तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे.
‘प्रभाती सूर नभी रंगती, दश दिशा भूपाळी म्हणती… ‘ ही सुंदर भूपाळी आपल्यापैकी बहुतेकांच्या परिचयाची असेल. रमेश अणावकर यांचे सुंदर शब्द आशा भोसलेंनी अमर केले आहेत. या गीतात ‘ पानोपानी अमृत शिंपीत उषा हासरी हसते धुंदीत ‘ असे शब्द आहेत. मला वाटतं ही प्रभात वेळा जशी पानोपानी अमृत शिंपीत येते, तसेच अमृत आशाताईंच्या स्वरातून जणू आपल्यावर शिंपडले जाते. मरगळलेल्या मनाला हे अमृतस्वर संजीवनी देऊन ताजेतवाने करतात. या भूपाळीमध्ये अप्रतिम असे निसर्गाचे वर्णन आले आहे.
सकाळी आपण जशी परमेश्वराची पूजा करतो, तशीच पूजा निसर्गही पहाटेच्या रूपाने त्या परमात्म्याची बांधत असतो. त्याच्या पूजेसाठी विविध रंगांची, गंधांची फुले निसर्ग तयार ठेवतो. नदीचं, झऱ्याचं खळाळणारं संगीत असतं, वाऱ्याची बासरी आसमंतात लहरत असते, पक्ष्यांचं कूजन म्हणजे जणू मंत्रघोष ! अशी सगळी स्वागताला तयार असतात. त्यातच पूर्वेचं आकाश स्वागतासाठी गुलाबी वस्त्र परिधान करून तयार असतं. अशाच वेळी सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ होऊन या निर्गुण निराकाराच्या आरतीला जणू प्रकाशाची निरांजन घेऊन हजर होतात. पाहता पाहता या निरांजनाच्या ज्योती अधिकाधिक प्रकाशमान होऊन अवघे विश्व उजळून टाकतात. पूर्वेचा गुलाबी रंग आता सोनेरी रंगात बदलतो. रात्रभर प्रकाशाच्या प्रतीक्षेत असलेली झाडं, वृक्षवेली आपले हात पसरून या प्रकाशाचं स्वागत करतात. अशा वेळी भा रा तांब्यांच्या कवितेतील ओळी सहजच ओठांवर येतात. ‘ पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर…’ या कवितेतलं वर्णन कवीनं जरी सायंकाळचं केलेलं असलं तरी सकाळच्या वेळेलाही ते चपखल लागू पडतच. ‘ फिटे अंधाराचे जाळे…’ या गीतात म्हटल्याप्रमाणे अंधाराचे जाळे नाहीसे होऊन स्वच्छ दिवस उजाडलेला असतो. अशा वेळी परमेश्वर म्हणा की निसर्ग म्हणा मानवाला, पशुपक्ष्याना आणि अवघ्या सृष्टीला जणू म्हणतो, ‘ बघ, तुझ्यासाठी एक अख्खा सुंदर दिवस घेऊन आलो आहे. आता त्याचा कसा वापर करायचा ते तू ठरव. ‘
पहाटेच्या वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भासतात. पण मला सगळ्यात जास्त आवडते ती जंगलातील पहाट. या पहाटेसारखी सुंदर वेळच नाही. रात्र संपून दिवस उगवण्याच्या सीमारेषेवर ही पहाट उभी असते. अशा वेळी निसर्गाचं सौंदर्य अनुभवावं. रात्र संपून पहाट होतानाची वेळ इतकी सुंदर असते की अशा वेळी शहरातले भगभगीत दिवे नकोसे वाटतात. पहाटेला तिच्या नैसर्गिक रूपातच पाहावं, फुलू द्यावं, खुलू द्यावं. आकाशातल्या रात्रीच्या मुक्कामाला असणाऱ्या तारे आणि तारका आपल्या घरी हळूहळू परत जायला निघालेल्या असतात. हळूहळू त्या दृष्टीआड होतात. त्यांना अदृश्य होताना आणि पहाटवेळा उमलताना पाहण्यात एक वेगळाच अनोखा आनंद आहे. तो अनुभवावा.
पहाट मला एखाद्या अल्लड तरुणीसारखी भासते. कोणत्याही प्रकारचा साजशृंगार न करता ती आपल्या नैसर्गिक रूपातच येते. तिचं हे नैसर्गिक रूपच मनाला जास्त भावतं. जातीच्या सुंदराला जसं सगळंच शोभून दिसतं, तशीच ही पहाट असते. रम्य, देखणी. अशा वेळी जंगलातून एखादा फेरफटका मारावा. निसर्गाची भूपाळी अनुभवावी. रंग, रूप, रस, गंध सगळं सगळं असतं त्यात. फक्त ती अनुभवता आली पाहिजे. निसर्ग वेगवेगळ्या रूपात आपल्याशी बोलत असतो पण ते ऐकता आलं पाहिजे, अनुभवता आलं पाहिजे. त्यासाठी सुद्धा काही साधना आवश्यक असते. सगळ्या कवींना, महाकवींना, लेखकांना या पहाटेनं स्फूर्ती दिली आहे. अनेक सुंदर काव्य पहाटेच्या मंगल वेळेनं प्रसवली आहेत. अनेक ऋषी मुनी, लेखक, कवी यांना प्रतिभेचं देणं या पहाटेनच दिलं आहे.
आपल्या घराजवळ एखादा डोंगर किंवा एखादी टेकडी असेल तर पहाटे जरूर जावं. नसेल तर कधीतरी मुद्दाम वेळ काढून अशा ठिकाणी जावं. ही पहाट अनुभवावी. ही पहाट अनुभवण्यासाठी सध्या तरी कोणतंच शुल्क आकारलं जात नाही. काही चांगल्या गोष्टी अजूनही मोफत मिळतात. त्यातील पहाट, पहाटेचा गार वारा, नयनरम्य निसर्ग आपल्याकडून काही घेत नाही. देतो मात्र भरभरून ! ‘ आपल्याला ते घेता आलं पाहिजे. नाहीतर ‘ देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी अशी अवस्था व्हायची ! ‘
या पहाटेच्या प्रसंगी रानवाटा जाग्या होऊ लागतात. झाडे, वेली जाग्या होतात. आपण जंगलातून तर फेरफटका मारणार असू तर झाडांचा एक अनोखा गंध आपलं स्वागत करतो. अशा वेळी खोल श्वास घेऊन हा गंध, ही शुद्ध हवा फुफ्फुसात भरून घ्यावी. पक्ष्यांचे निरनिराळे आवाज कानावर पडत असतात. त्यांच्यातली विविधता, माधुर्य अनुभवावे. पूर्वेकडून होणाऱ्या सुवर्णप्रकाशाची उधळण अनुभवावी. तो प्रकाश अंगावर माखून घ्यावा. तळ्यात फुलणारी कमळे,उमलणारी फुले आकर्षक स्वरूपात आपल्यासमोर जणू हजर होतात. त्यांचं निरीक्षण करावं. त्यांचं रूप नेत्रांनी प्राशन करावं, श्वासावाटे गंध मनात साठवावा. पाण्यावर सूर्याचा सोनेरी प्रकाश पसरलेला असतो. तो दिवसभरात नंतर पुन्हा दिसत नाही. नदीचा, झऱ्याचा खळखळाट ऐकू येतो. आपण समुद्रकिनारी असू तर, समुद्राची गाज ऐकू येते. त्याच्या लाटांचे तुषार आपल्या अंगावर येऊन जणू आपल्याला पवित्र करत असतात. तुम्ही पहाटेला कुठेही असा. नदीकिनारी,समुद्रावर,डोंगरावर किंवा जंगलात. पहाट आणि तिचं मोहक रूप तुम्हाला आकर्षित केल्याशिवाय राहणारच नाही. ही पहाटवेळा तुम्हाला दिवसभराची ऊर्जा प्रदान करेल.
पहाटेनंतरची वेळ म्हणजे सकाळ. आता दशदिशा उजळलेल्या असतात. साऱ्या सृष्टीत चैतन्य भरून राहिलेलं असतं. माणसाचा, पशु पक्ष्यांचा दिवस सुरु होतो. जो तो आपापल्या कामाला लागलेला असतो. अवघ्या सृष्टीत लगबग सुरु असते. मंदिरातली आरती, धूप दीप आदी सारे सोपस्कार होऊन मंदिरातील मूर्ती प्रसन्न वाटतात. बच्चे कंपनी तयार होऊन शाळेला निघण्याची गडबड असते. गृहिणीची घरातली आणि कामावर जाणाऱ्यांची वेगळी धांदल सुरु असते. सकाळचे हे रूप वेगळेच असते. पहाट कोणताही मेकअप न करता नैसर्गिक रूपात आपल्यासमोर येते तर नंतर येणारी सकाळ मात्र छानपैकी सुस्नात आणि वेणीफणी करून आलेल्या तरुणीसारखी प्रसन्न भासते. ती जणू आपल्याला सांगते, ‘ चला, आता आपल्या कामांना सुरुवात करू या. दिवस सुरु झालाय. ‘ मग प्रभात समयीचे हे सूर हे हळूहळू मंद होत जातात.
माझ्या पाटनूर गावच्या पंचक्रोशीतील दोन तरुण, पुण्याच्या कोर्टात अधिकारी म्हणून रुजू झाले. त्यांना भेटण्यासाठी मी त्या दिवशी गेलो होतो. दोघे कामात होते. दोघांनीही थांबा थोडा वेळ, असा इशारा केला. मी कोर्टाच्या बाहेर आलो. बाहेर येणारे- जाणारे कैदी, भेटायला येणारे नातेवाईक, पोलिस, त्या कोर्टातली गर्दी किती मोठी… बापरे!
रागाच्या आणि इगोच्या, अहंकाराच्या भरात कायदा हाती घेणाऱ्या त्या प्रत्येकाला वाईट वाटत असेल; पण वेळ निघून गेल्यावर काही होणारे नव्हते. कैद्यांचे, सतत कोर्टाच्या पायऱ्या चढून सुकलेले डोळे आता वेळ निघून गेली, असेच सांगत होते. ते वातावरण कोर्टाची पायरी कुणीही चढू नये, असेच सांगत होते.
कोर्टात मागच्या बाजूला माझी नजर गेली. एक लहान मुलगी एका मुलाला राखी बांधत होती. माझ्या मनात विचार आला आता जवळपासही राखी पोर्णिमा नाही; तरीही ही मुलगी राखी का बांधत असेल? बाजूला एक चहावाला ते सारे दृश्य पाहून खांद्यावर टाकलेल्या रुमालाने, स्वतःचे डोळे पुसत होता. मी अजून बारकाईने पाहिले. एका बाजूने एक माणूस आणि दुसऱ्या बाजूला एक महिला दोघेजण बसले होते.
मी त्या चहावाल्याला विचारले “का रडताय तुम्ही? काय झाले?”
तो म्हणाला, “काय व्हायचे आहे साहेब, आम्ही दिवसभर कोर्टात असतो ना, आम्हाला पावलोपावली कलियुगाचे दर्शन होते.”
“तुम्ही ज्या मुलांकडे बघून रडताय ती कोण आहेत?”
चहावाला म्हणाला, “ते बाजूला एकमेकांच्या तोंडाकडे न पाहणारे नवरा-बायको आहेत ना, त्यांची ही मुले आहेत. यांच्या भांडणापायी या मुलांचा त्रास पाहवत नाही.” माझ्याशी एवढे बोलून चहावाला आपल्या कामात गुंतला.
त्या मुलांकडे बघून मलाही खूप वाईट वाटत होते. ती महिला उठली आणि चहा घ्यायला मी जिथे थांबलो होतो तिथे आली. तिने चहा घेतला आणि तिथूनच मुलाला ‘चल आता निघायचे,’ असा आवाज देत होती. त्या महिलेने त्या चहावाल्याकडे पहिले आणि त्याला म्हणाली, “कारे चहा चांगला करता येत नाही का? फुकट पैसे घेतोस का?” त्या बाईचे बोलणे ऐकून त्या चहावाल्याचा चेहरा एकदम पडला.
मलाही त्या बाईला काहीतरी बोलायचे होते; पण हिंमत होईना. त्या बाईसोबत एक म्हातारी बाई होती. जेव्हा ती बाई फोनवर होती तेव्हा मी त्या म्हाताऱ्या बाईला म्हणालो, “आजी, तुम्ही त्या ताईच्या आई का?”
त्या ‘हो’ म्हणाल्या. हळूहळू मी तिला बोलते केले. तो मुलगा, मुलगी आजीकडे आले. आजीने मुलीच्या पाठीवरून हात फिरवत जा म्हणत निरोप दिला. आता तो मुलगा, जाणार इतक्यात मी त्या चहावाल्याच्या बरणीतले दोन चॉकलेट बाहेर काढले आणि त्या मुलांच्या हातात ठेवले.
मुलगी नम्र होती. मुलगा जरा बेशिस्त होता. कोर्टात त्या दोघांनाही पुकारा झाला, त्या मुलांचे आईवडील दोघेही कोर्टात गेले. त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते.
ते गेल्याचे पाहताच मी, त्या आजी, ती दोन मुले, मध्येमध्ये तो चहावाला, असे आम्ही बोलत होतो. ‘देव देतो आणि कर्म नेते’ अशी कहाणी या कुटुंबाची होती. त्या आजी सांगत होत्या आणि आम्ही ऐकत होतो.
डॉ. मीरा देशमुख, डॉ. रमेश कांबळे (दोघांची नावे बदलली आहेत) या दोघांनी कॉलेजला असताना पळून जाऊन लग्न केले. लग्नाला दोघांच्याही घरच्यांचा प्रचंड विरोध होता. दोन मुले झाली तोपर्यंत यांचे चांगले होते; पण पुढे छोट्या छोट्या कारणावरून भांडणे व्हायला लागली. ही भांडणे जीव घेण्यापर्यंत गेल्यावर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
विभक्त झाल्यावर पोटगी देण्यावरून खूप वादंग झाले, ते
आजही कोर्टात सुरू आहेत. मुलगी सरिता बापाकडे राहते आणि मुलगा सचिन आईकडे. त्या आजीने बोलता बोलता अगदी थोडक्यात सारी कहाणी सांगितली.
ती आजी माझ्याशी बोलत असताना ती मुले एकमेकांशी बोलत होती. मुलगी म्हणाली, ‘दादा तू मला घरी भेटायला येशील ना?
मुलगा ‘मी नाही सांगू शकत, मम्मी काय म्हणेल, सुट्टी मिळेल का नाही, माहिती नाही’.
बिचारी मुलगी त्या मुलाचा नकारार्थी सूर ऐकून एकदम नाराज झाली. तो मुलगा जाग्यावरून उठला, त्या मुलीजवळ जाऊन म्हणाला, “अगं तायडे नाराज नको होऊ. मी येण्याचा प्रयत्न करीन ना?”
मुलगी पुन्हा म्हणाली, “मागेतर वर्षभर आला नाहीस ना?”
त्या दोघांचा तो भावनिक संवाद आणि संवादाशेवटी एकमेकाला मिठी मारत रडलेला तो क्षण पाहून आता काळजाचे ठोके बंद पडतात की काय, असे वाटत होते. ती मुले, आणि आम्ही सारे अक्षरशः रडत होतो.
ती आजी म्हणाली, “या कोर्टाच्या चकरा मारून खूप कंटाळा येतो. अगोदर माझी मुलगी आणि जावई या दोघांच्याही पाया पडून सांगितले होते, लग्न करू नका. आता यांनी केले, तर ते निभावून तरी दाखवावे ना..! यांची रोज होणारी भांडणे, पाहून मुले पोटाला येऊच नाही, असे वाटते.
मुलीने दुसऱ्या जातीचा नवरा केला म्हणून आमचे नाक कापले, दोन मुले झाली आता दुसरे लग्न करायचे आहे, असे दोघेही म्हणतात, पहिल्या लग्नाला न्याय देता आला नाही, दुसऱ्याला काय देणार.
आम्ही अडाणी माणसे. लग्नाच्या वेळी एकमेकांना पहिलेदेखील नव्हते. ही जेवढी शिकलेली आहेत, तेव्हढी ही माणसे वेड्यासारखी वागतात. लग्नामध्ये विधीच केल्या नाहीत, संस्कृती, परंपरा पाळल्या नाहीत, यांचे लग्न टिकणार कसे?” आजी अगदी पोटतिडकीने सांगत होत्या.
कोर्टात गेलेले ते दोघेजण पडलेला चेहरा घेऊन बाहेर येताना दिसताच त्या दोन्ही लहान मुलांनी एकमेकांचे हात घट्ट पकडले. आता आपण एकमेकांना सोडून जाणार, याची खात्री त्यांना झाली. त्या दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. ते दोघे जसे त्या मुलांजवळ आले, तसे ती महिला त्या मुलाला आणि त्या माणसाने त्या मुलीला धरून ओढले. त्या दोन्ही मुलांची ती ताटातूट पाहवणारी नव्हतीच. ते दृश्य पाहून चहावाला मामा पुन्हा रडताना मला दिसला.
त्या लहान मुलाला घेऊन ती महिला तिच्या आईला म्हणाली, ‘माझे पैसे वेळेवर दे नाहीतर जेलमध्ये जावे लागेल, असे न्यायालयाने खडसावले त्याला’, असे डोळ्यात अहंकाराचे आव आणून ती सांगत होती.
त्या छोट्या मुलाला घेऊन असलेला तो माणूस त्या तावातावाने बोलणाऱ्या बाईकडे रागारागाने पाहत होता. ती बाई, तिची आई आणि तिचा मुलगा तिथून गेला. तो माणूस आपल्या मुलीला घेऊन त्या चहावाल्याकडे आला त्याने चहा मागितला. तो माणूस एका हाताने चहा पीत होता आणि त्यांच्या दुसऱ्या हातात त्यांची असलेली मुलगी अजून तिचा भाऊ परत येईल, या आशेने तो गेलेल्या त्या वाटेकडे पाहत होती.
मी त्या माणसाला म्हणालो, “मुलांचे फार प्रेम आहे एकमेकांवर.”
मी बोलताच त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो काहीही बोलला नाही, एकदम शांत बसला. मी आणि तो चहावाला एकमेकांशी बोलत होतो. तो चहावाला त्या माणसाकडे बघत म्हणाला, “याची पत्नी जेव्हा जेव्हा येते तेव्हा खूप गोंधळ घालते आणि हे नेहमी शांत बसलेले असतात.”
तो माणूस अगदी शांतपणे म्हणाला, “एक दोन वेळा बोललो होतो. त्यामुळे एवढी स्थिती निर्माण झाली. माझ्या बायकोला काही सांगायचे म्हणजे कठीणच आहे. आमचे भांडण जातीवरून व्हायचे. लग्नाच्या आधी एकमेकांची जात काढायची नाही, असे ठरवले होते; पण छोट्या छोट्या भांडणामध्ये जात निघायची आणि हेच भांडण पुढे वाढत गेले.”
मी म्हणालो “आज न्यायालयात काय झाले साहेब?”
ती व्यक्ती म्हणाली, “न्यायालयाने पोटगी वेळेत द्या, ठरलेली रक्कम का देत नाही, नाही दिली तर शिक्षेला सामोरे जा, असे सांगितले.”
मी पुन्हा म्हणालो, “मग तुम्ही काय म्हणालात?”
“मी काय म्हणणार त्यांना, देण्याचा प्रयत्न करणार एवढे म्हणालो.”
त्या व्यक्तीने मला प्रतिप्रश्न केला “अहो माझ्याकडे नाहीच तर मी देऊ कसे? जे काही होते ते सर्व बायकोच्या नावे होते. मी हे खूप ओरडून सांगितले, पण माझे ऐकले गेले नाही.
पोटगीच्या नावाने मला खूप मोठी रक्कम द्या, असे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यापासून माझी मुलगी आजारी आहे. तिची शाळा, या सगळ्या कामात मी कामच केले नाही, तर पैसे येणार कुठून? माझी बायको मोठी डॉक्टर असून मलाच तिला पैसे द्या, असे सांगण्यात आले. सगळे कायदे महिलांच्या बाजूने आहेत.”
त्या व्यक्तीचे बोलणे ऐकूण मी शांत होतो. तो चहावाला एकदम म्हणाला, “रोज येथे असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. सगळ्यांचा इगो इथे दिसतो? बाकी काही नाही?”
ती लेक आणि बाप हळुवार पावलांनी तिथून गेले. त्या मुलीच्या डोळ्यात भाऊ आणि आईविषयी प्रचंड प्रेम दिसत होते.
मी ज्या मित्राची वाट पाहत होतो, ते आपाराव आणि संजय एक एक करून दोघेही आले. चहाचा एक एक घोट घेत आज कोर्टात काय झाले, ते सांगत होते. पहिला म्हणाला, “आज पोटगीच्या चार केस आल्या होत्या, कुठे महिलांचा द्वेष; तर कुठे पुरुष. सर्वांचे एकच असते, ते म्हणजे मीच खरा आहे. तिथे माणसे बोलतच नव्हते, त्यांचा इगो बोलत होता.” कोर्टातले ते सर्व वातावरण अत्यंत क्लेशदायक होते. दुसरा म्हणाला, “सर्व माणसे उच्च शिक्षित होती, कोणी नम्रपणे बोलायला तयार नाही. नवरा मुलगा कितीही गरीब असू द्या, त्याची परिस्थिती असो की नसो, पोटगीची रक्कम घेतांना त्याची कुणाला दया येतच नाही. आज दोन प्रकरणे तर अशी होती, अनेक वेळा समन्स पाठवूनही महिलेला पैसे दिले जात नाहीत. इतकी वर्षे सोबत राहून एकमेकांची तोंडे पाहणारच नाही, अशी भूमिका माणसे कशी काय घेऊ शकतात?”
मी दोन दिवसांपूर्वी राज्याचा रेषो पाहिला आणि हैराण झालो. पोटगी आणि घटस्फोट हा विषय सर्वच ठिकाणी गंभीर होऊन बसला आहे. चहावाला म्हणतो, “या कोर्टाची पायरी चढणाऱ्या प्रत्येक माणसाने मागच्या जन्मी अहंकारातून मोठे पाप केले असणार.”
पोटगीसंदर्भात जे काही वातावरण आणि किस्से होते, त्याने मी हादरून गेलो होतो. काय ती माणसे आणि काय त्यांचे जीवन! सर्व काही ईगोच्या रोगाने त्रासून गेलेले होते. आम्ही कोर्टातला तो विषय कट करून बाकी विषयावर बोलत होतो, पण माझे सर्व लक्ष पोटगी या विषयाकडे लागले होते.
आम्ही कोर्टातून बाहेर पडलो, ज्याच्या त्याच्या कामाला लागलो. कामात खूप व्यस्त झालो, तरी ती इगोवाली माणसे आणि त्या लहानग्याचा रडका चेहरा काही डोळ्यासमोरून काही जात नव्हता. कधी थांबणार हे कायमस्वरूपी?
(आजचा हा लघुलेख स्वतः लेखक श्री. संदीप काळे, संपादक, मुंबई सकाळ, यांच्या सौजन्याने.)
☆ एका वादळाशी झुंज… शब्दांकन : श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
निसर्गाच्या रौद्र रुपापुढे मानव नेहमीच खुजा ठरत आलेला आहे. आपलं विज्ञान किंवा आपला अभ्यास कितीही प्रगत झाला तरी निसर्गात घडणाऱ्या अनेक विध्वंसक गोष्टींची भविष्यवाणी अजूनही आपल्याला योग्य रीतीने करता येत नाही. त्यामुळेच अश्या नैसर्गिक आपत्तीमधे सगळ्यात महत्वाचे ठरते ते आपत्ती व्यवस्थापन आणि त्या आपत्तीचा मागोवा घेणं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगातील वातावरणात प्रचंड बदल गेल्या काही वर्षात झाले आहेत. तपमानात होणारे उतार-चढाव अधिक तीव्र झाले आहेत. त्यामुळेच वारे, पाऊस आणि एकूणच त्यांची निर्मिती यांच्या चक्रावर याचा खूप मोठा परीणाम होतो आहे. या सर्व बदलांचा परिणाम म्हणजे चक्रीवादळ.
भारताला ७५१६ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. एका बाजूला अरबी समुद्र तर दुसऱ्या बाजूला बंगालचा उपसागर तर एका टोकाला हिंद महासागर अश्या तिन्ही बाजूने भारत पाण्याने वेढलेला आहे. साहजिक वातावरणातील बदलांचा प्रभाव हा भारतावर पडणार हे उघड आहे. चक्रीवादळांच्या निर्मितीत अनेक गोष्टी महत्वाच्या ठरतात. त्यातील सगळ्यात महत्वाचं असते ते समुद्राच्या पाण्याचे तापमान. भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील पाण्याचं तपमान हे पश्चिम किनारपट्टीपेक्षा जवळपास २ ते ३ डिग्री सेल्सिअस ने जास्ती असते. त्यामुळेच आजवर प्रत्येक वर्षी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळांची निर्मिती होत होती. पण गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंगने अरबी समुद्राचं तपमान हे वाढत चाललं आहे. त्यामुळेच क्वचित येणाऱ्या चक्रीवादळांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांचा अभ्यास असं दर्शवतो की अरबी समुद्रावरील वादळांच्या संख्येत ५२% टक्के, तर चक्रीवादळांच्या निर्मितीत तब्बल १५०% टक्यांची वाढ दिसून आली आहे.
एखादं चक्रीवादळ निर्माण झालं तर ते किती संहारक असेल? त्याचा रस्ता कसा असेल? किंवा त्याने किती नुकसान होईल? याचा निश्चित अंदाज आजही बांधता येत नाही. कारण चक्रीवादळ मजबूत किंवा कमकुवत होण्यास मदत करणार्या विशिष्ट चढउतारांमुळे त्याचे मॉडेल्स त्याच्या तीव्रतेचा फारसा आधीच अंदाज लावू शकत नाहीत. जिकडे त्याची निर्मिती होते तिथली अप्पर एअर डायव्हर्जन्स, विंड शीअर आणि कोरडी हवा यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. चक्रीवादळ निर्माण झाल्यावर त्याला रोखता येणं अशक्य आहे. ते आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व गोष्टींची विलेव्हाट लावल्याशिवाय उसंत घेत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळेच जेव्हा अशी चक्रीवादळं नागरी वस्तीच्या दिशेने येणार असतील तर त्याचा अंदाज जर आपल्याला आधी बांधता आला तर खूप मोठी मनुष्य आणि वित्त हानी टाळता येऊ शकते.
गेल्या काही दशकात याच कारणांसाठी भारताने अनेक उपग्रह अवकाशात वातावरणाच्या या बदलांचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आहेत. भारताच्या आजूबाजूच्या प्रदेशात वातावरणात होणाऱ्या अनेक बदलांचा वेध घेऊन हे उपग्रह सतत याची माहिती भारतात प्रसारित करत असतात. याच माहितीच्या आधारे चक्रीवादळांची निर्मिती आणि त्यांची दिशा तसेच त्यांच्या शक्तीचा अंदाज लावला जातो.
भारताच्या याच तांत्रिक प्रगतीमुळे ११ जून २०२३ ला भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) ने अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याची चक्रीवादळाची निर्मिती झाल्याचं स्पष्ट केलं. १२ जून २०२३ उजाडत नाही तोच भारताच्या उपग्रहांच्या मिळालेल्या माहितीतून या चक्रीवादळाचं रूपांतर (Extremely severe cyclone) अत्यंत तीव्र चक्रीवादळात झाल्याचं स्पष्ट केलं. या तीव्र चक्रीवादळाचं नामकरण ‘चक्रीवादळ बिपरजॉय’ असं करण्यात आलं. बिपरजॉय हे नाव बांगलादेशने दिलेलं होतं. याचा बांगला भाषेत अर्थ होतो ‘आपत्ती’ (disaster). अत्यंत तीव्र चक्रीवादळात एखाद्या वादळाचा तेव्हाच समावेश होतो जेव्हा त्यातील वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी १६८ ते २२१ किलोमीटर / तास इतका प्रचंड वाढलेला असतो.
चक्रीवादळ बिपरजॉय भारताच्या पश्चिम किनारपट्टीला धडक देणार हे लक्षात आल्यावर तातडीने या वादळाच्या ताकदीचा अंदाज केंद्र आणि राज्य सरकारला देण्यात आला. महाराष्ट्र किंवा गुजरात या राज्यांना सगळ्यात जास्त धोका असल्याचं स्पष्ट झालेलं होतं. पण नक्की कुठे ते धडक देणार याबद्दल अंदाज बांधता येणं कठीण होतं. १३ जून आणि १४ जूनला त्याने घेतलेल्या वळणामुळे हे वादळ गुजरात मधील कच्छ, सौराष्ट्र भागात धडक देणार हे स्पष्ट झालं. त्यानंतर वेगाने सर्वच पातळीवर सरकारी आणि प्रायव्हेट यंत्रणांना सावध केलं गेलं. या चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेता यात प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्त हानी होण्याची शक्यता होती. पण केंद्र सरकार ज्यात पंतप्रधानांपासून, रक्षा मंत्री, गृहमंत्री, पंतप्रधान कार्यालय आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांनी राज्य सरकारच्या सहकार्याने वेळीच नागरिकांना सतर्क केलंच, पण त्यापलीकडे एका मोठ्या बचाव मोहिमेला सुरवात केली.
ज्या भागात चक्रीवादळ बिपरजॉय धडकणार होतं तो भाग इंडस्ट्रिअल हब होता. जामनगर मधे जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी कार्यरत आहे, तर इतर अनेक इंडस्ट्रिअल कंपन्या आणि तेल, वायू क्षेत्रातील ऑइल रीग्स इकडे कार्यरत होत्या. त्या सर्वांना वेळीच सावध करून त्या सर्वांचं काम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. चक्रीवादळ बिपरजॉय साधारण १५ जून २०२३ च्या संध्याकाळी त्या भागात आदळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या दोन दिवस आधीच या सर्व कामांना बंद करण्यात आलं. ज्यातून होणारं नुकसान हे तब्बल ५०० कोटी प्रत्येक दिवसाला इतकं जास्त होतं. या शिवाय एकही मनुष्य हानी न होऊ देण्याचं लक्ष्य सर्व सरकारी यंत्रणांना देण्यात आलं होतं. भारतीय सेना, वायूदल, नौदल, तटरक्षक दल यांच्या सह एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. च्या सर्व टीम ना सज्ज राहण्याचे आदेश दिले गेले होते. अवघ्या २ दिवसात सुमारे १ लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
चक्रीवादळ बिपर जॉयच्या येण्याने कोणत्याही नैसर्गिक स्थितीला सामोरं जाण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व स्तरावर कार्यान्वित करण्यात आली. मग तो धुवाधार पाऊस असो वा वारा, पूर असो वा भूस्खलन. ६३१ मेडिकल टीम्स, ३०० पेक्षा अजस्ती ऍम्ब्युलन्स, ३८५० हॉस्पिटल बेड्स कोणत्याही जखमी व्यक्तींना उपचारांसाठी तयार ठेवण्यात आले. तब्बल ११४८ गरोदर महिलांना हॉस्पिटलमधे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दाखल करण्यात आलं. त्यातील ६८० जणींची प्रसूती झाली. याशिवाय सर्व स्तरावर अभूतपूर्व अशी उपाय योजना केली गेली. त्यामुळे अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय ने गुजरातच्या किनारपट्टीला काल रात्री अंदाज लावल्याप्रमाणे धडक दिल्यावर सुद्धा आज हा लेख लिहिला जाईपर्यंत कोणतीही मनुष्य हानी झाल्याचं वृत्त नव्हतं. ( दोन जणांना आपल्या गुरांना वाचवताना मृत्यूला सामोरं झाल्याची घटना घडलेली आहे. पण त्याचा संदर्भ चक्रीवादळाशी आहे का हे स्पष्ट झालेलं नाही.)
भारत इसरो आणि इतर अवकाशीय यंत्रणांवर कोट्यवधी रुपये का खर्च करतो याचं उत्तर द्यायला काल दिलेली वादळाशी झुंज पुरेशी आहे. इसरोच्या आधुनिक उपग्रहांमुळे वातावरणात घडणाऱ्या अश्या घटनांचा योग्य वेळी अंदाज आल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अचूक अंदाज, केंद्र सरकार आणि राज्य सरकराची योग्य वेळेत टाकली गेलेली पावलं, अतिशय सुयोग्य नियोजन, भारताच्या तिन्ही दलांसोबत एन.डी.आर. एफ. आणि एस. डी. आर. एफ. आणि तटरक्षक दलाच्या लोकांनी लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याची जबाबदारी, यामुळे भारताने अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपर जॉय ला मात दिली आहे. या वादळाशी एकदिलाने भारतीय होऊन झुंज देणाऱ्या त्या अनामिक लोकांना माझा कडक सॅल्यूट.
जय हिंद!!!
शब्दांकन : श्री विनीत वर्तक
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पक्ष्यांची, प्राण्यांची पिलं मोठी झाली की घरटं सोडतात आणि त्यांच्या जन्मदात्यांनाही ! पण मानवप्राण्याची पिलं जन्मत:च परावलंबी. त्यांना जन्मानंतर कित्येक वर्षे सांभाळावं लागतं,भरवावं लागतं तेंव्हा कुठं ती चालू लागतात. सुरूवातीची कित्येक वर्षे आयता चारा खात राहतात आणि कित्येक वर्षांनी स्वत:चा चारा स्वत: कमावू लागतात. पक्षी-प्राण्यांची आयुर्मर्यादा मानवापेक्षा बरीच कमी असते, पण मानव अनेक वर्षे जगतो आणि मुख्य म्हणजे जरजर्जर होतो. त्याला आयुष्याच्या सायंकाळी पुन्हा बालपण प्राप्त होतं. आणि या बालकांना पुन्हा आई-बाप हवे असतात! यासाठी मनुष्य मुलांनाच आपले उतारवयातील आईबाप म्हणून घडवत राहतो…..हरप्रकारची दिव्यं पार पाडून. म्हातारपणी चालताना जाणारा तोल सांभाळता यावा म्हणून माणूस आपल्या मुलांच्या रूपात काठीची योजना करून ठेवतो. त्यापेक्षा अंतसमयी मुखात गंगाजलाचे दोन थेंब तरी पडावेत यासाठी देवाकडे अपत्यांची याचना करीत असतात. ज्यांच्या पदरात ही फळं पडत नाहीत त्यांचे पदर सदोदित पेटते राहतात. निदान आपल्याकडे तरी असंच आहे आणि बहुदा भविष्यातही असेल !
मुलांना जन्माला घालून त्यांचे संगोपन, ती आपलेही आपल्या वृद्धापकाळी असेच संगोपन करतील या भावनेने करणे हा विचार वरवर जरी एक व्यवहार वाटत असला तरी या व्यवहाराला किमान आपल्याकडे तरी काळीजकिनार असते. काळीज आणि काळजी हे दोन शब्द उगाच सारखे वाटत नाहीत ! पोटाला चिमटा काढणे, खस्ता खाणे, काळीज तिळतीळ तुटणे, हे वाक्प्रचार मराठीत निव्वळ योगायोगाने नाहीत आलेले. अनेक काळजं अशी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी निखा-यांवर चालत आलेली आहेत. पण सर्वच काळजांना त्यांच्या उतारवयात पायांखाली वात्सल्याची, कृतज्ञतेची फुलवाट गवसत नाही, हे ही खरेच !
पुरूष असूनही आपल्या आईचं काळीज आपल्या उरात बाळगून असलेले साने गुरूजी म्हणजे मातृ-पुत्र प्रेमाचा जिवंत निर्झर ! शाम आणि आई ही दोन नाती किमान मराठी मानसात साने गुरूजींमुळेच चिरस्थापित झालीत. शाम या नावापासून ‘शामळू’ असं शेलकं विशेषण जन्माला आलं असलं तरी या शाममुळे कित्येक मातांच्या पुत्रांना जन्मदातापूजनाचं पुण्य प्राप्त करण्याची सदबुद्धी झाली, हे कसं नाकारता येईल?
फादर फ्रान्सिस दिब्रिटो एकदा परदेश भेटीत असताना एका कुटुंबात मुक्कामी राहिले होते. मध्यरात्री त्यांना बालकाचा मोठ्याने रडण्याचा आवाज आला. त्या बालकाचे पालक आता त्या आवाजाने जागे होतील आणि त्याला शांत करतील ही त्यांची कल्पना होती. पण पंधरा मिनिटे उलटून गेली तरी काहीच हालचाल नाही असं पाहून त्यांनी त्या बाळाच्या खोलीत जाऊन त्या एकट्या झोपलेल्या बालकाला उचलून घेतलं, छातीशी धरलं….आणि मग ते बाल्य निद्रेच्या कुशीत शिरून शांत झालं ! सकाळी त्या बालकाच्या आईबापाशी संवादात असं समजलं की, त्यांच्याकडे पोरांनी स्वत:च रडायचं आणि स्वत:च आपली समजूत काढून झोपी जायचं ! या वृत्तीचे परिणाम विलायतेतील समाज भोगतो आहेच. आपल्याकडेही असे विलायती कमी नाहीत. आपल्या मुलांना “ श्यामची आई “ ही साने गुरुजींची कथा सांगणे आजही अगत्याचे वाटते ते यासाठीच…कारण आजही हा विषय कालसुसंगत आहेच.
आज सोसायटीच्या हॉलमध्ये “गुरुपौर्णिमा”साजरी करायला लेडीज स्पेशल जमल्या होत्या.
साहजिकच देवांचे फोटो, समई, बॅनर—-सगळं तयार होतं.”गुरुब्रम्हां गुरू विष्णू”म्हणत सुरवात झाली.थोडीफार टिपिकल भाषणं झाली.
आज सगळ्यात जेष्ठ अशा गोखले काकू प्रमुख पाहुण्या म्हणून बोलणार होत्या.सगळ्या सो कॉल्ड मॉडर्न मुली,बायका जरा चुळबुळतच होत्या.
काकू उठल्या, म्हणाल्या, मी आज तुम्हाला माझ्या गुरुबद्दल सांगणार आहे.
माझं लग्न अगदी कांदेपोहे पद्धतीने झालं. कोकणातून इथे मुंबईत आले.माहेरी सर्व कामांची सवय होती,पण इथे चाळीत दोन खोल्यात आठ माणसं ,हे गणित काही पचनी पडत नव्हतं. टॉयलेट घरातच होतं ही जमेची बाजू.पहिल्या दिवसापासून सासूबाई कमी बोलून पण मला निरखून काही सूचना करायच्या.कोकणातला अघळपघळपणा इथे का चालणार नाही हे त्यांनी समजावून सांगितलं. नारळ घालून रसभाज्या करणारी मी,डब्यासाठी कोरडी भाजी करायला शिकले.कोणतेही व्रत वैकल्य त्यांनी लादले नाही.जे पटते,जे झेपते आणि खिशाला परवडते ते करावं असं त्यांचं स्पष्ट मत होतं.त्यांनीच बीएड करायला लावलं, शाळेत नोकरी घ्यायला लावली.बाईने स्वतःच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे.
माझ्या मिस्टरांना त्या स्वतःच मागे लागून नाटक-सिनेमाची तिकिटं काढायला लावायच्या.त्या काळात पण आम्हाला क्वालिटी टाइम मिळावा हे त्या बघायच्या.
माझे दीर वेगळे झाले,आम्ही दोघे, आमची दोन मुले आणि सासूबाई असेच राहिलो.
चाळीची रिडेवलपमेंट होणार म्हंटल्यावर मीच धाय मोकलून रडले.पण त्या म्हणाल्या,”बदल हे होणारच,कशात गुंतून पडायचं नाही”
नऊवारीतून पाचवारीत आणि पुढे चक्क गाऊन मध्ये माझ्या सासूबाईंचं स्थित्यंतर झालं.केस सुध्दा स्वतःहून छोटे केले,मला त्रास नको म्हणून!
जातानाही प्रसन्नपणे गेल्या.नातसुनेला म्हणाल्या,”ही चांगली सासू होते की नाही,ती परीक्षा तू घे हो.”
परिस्थितीचं भान ठेवा,काटकसर करा पण सतत सर्वांची मनं मारून नाही,पैसे कमवा पण पाय जमिनीवर ठेवा, काळानुसार बदला, जे बदल पचणार नाहीत, त्याबद्दल मोकळेपणी बोला,transparancy महत्वाची.लोकांना हक्क दाखवत,धाक दाखवत बांधून ठेवू नका.प्रेमाने दुसऱ्यापर्यंत पूल बांधा, त्याने त्याच पुलावरून तुमच्याकडे यायचं का नाही हे त्याला ठरवू द्या.एकावेळी तुम्ही सर्वांना खुश नाही ठेवू शकत;पण म्हणून स्वतः खूश होणं विसरू नका.नियमांवर जास्त बोट ठेवलं की वर्मावर लागतं. आपल्या वागणुकीतून दुसऱ्याला आदर्श घालून द्या.पतंगाचा मांजा ढील दिल्यावरच पतंगाला उंच नेऊ शकतो.
नवीन पिढीला टोचून दूषणं देण्यापेक्षा नवीन शिकून घ्यावं. घरात भांडणं होणारच,पण”रात गई बात गई”. एक वेळचे जेवण तरी सर्वांनी एकत्र केले पाहिजे. बाहेरचं frustration, चिडचिड घरात बोलून शांत झाली पाहिजे.प्रत्येकाने आपला दिवस कसा गेला सांगितलं तरी खूप संवाद घडेल.
विश्वास,प्रेम घरात मिळालं तर बाहेरच्या चुकीच्या व्यक्तीकडून फसवणूक होणार नाही.
जेमतेम अक्षरओळख असणाऱ्या माझ्या सासूबाई टॉप कॉलेजातल्या MBA लाही लाजवतील अशा काटेकोर होत्या.त्या माझ्या गुरू,माझी मैत्रीण होत्या.
आज मुद्दाम हे सांगण्याचं कारण की गुरू म्हणजे कोणी फेमस व्यक्ती असायची गरज नसते.तिने सतत बरोबर राहून हात धरून चालवायचीही गरज नसते.ती आपल्या आजूबाजूच्या माणसांमधीलच एक असते.तिला सन्मान, फोटो, गिफ्ट याची अपेक्षा नसते.तिच्यातल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण झाले,पुढे नेले गेले की बास!
माझ्यातले चांगले माझ्या सुनेपर्यंत पोचवू शकले की माझ्या सासूबाईंना गुरुदक्षिणा मिळेल.
तुम्ही काही यातून घेतलं तर काही प्रमाणात आनंदाची शिंपडणी तुमच्याही घरात होईल
धन्यवाद!
एकमेकांच्या कागाळ्या करणाऱ्या, गॉसिप करत पराचा कावळा करणाऱ्या आणि खोटे फॉरवर्ड असल्याचे मुखवटे घालणाऱ्या आणि कुरघोडी करत राहणाऱ्या ,आम्हा सर्वांसाठी हे अंतर्मुख करणारं होतं, हे नक्की!
लेखिका :डॉ युगंधरा रणदिवे
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
काय राव… तुम्ही कमालच केली की… दुपारची झोप पार उडवली की… किती गोंधळ झाला सगळ्यांचा… नाही म्हटलं तरी काकासाहेब काही बोलले असतीलच नं… पण आता हे निस्तरणार कसं…
अहो मी कशाला निस्तरायचं… म्हणजे मी काही सगळ्यांना आणि सगळं सोडलेलं नाही… आता मी नाही… असा समज काकांचा झाल्यावर सावरायचं कसं?… आणि मी पण आलोय याची जाणीव या दोघांना झाल्यावर आवरायचं कसं?… हा त्यांचा प्रश्न आहे. जे होईल ते त्यांनी निस्तरायचय आहे. मी नाही…. ते काय करतात हे बघायचं काम माझं…
पण आता जी आरडाओरड होईल त्याच काय?…
अरे आरडाओरड अगोदरही होती, आणि नंतरही होणार आहे. आरडाओरड सगळेच करतात. बऱ्याचदा तर संदर्भ सुध्दा तेच असतात. फक्त नांव बदलावी लागतात. अगोदर कौतुक केलं असेल तर आता करायचं नाही. आणि अगोदर कौतुक केलं नसेल तर आता करायला विसरायचं नाही. हे लक्षात घेतलं की संपलं. मी काही कमी आरडाओरड केली का?… चालायचंच.
अहो पण लोकं अगोदर तुमच्यासाठी फिरले, झटले त्याचं काय?….. असं काही जणं विचारतात. त्यांना काय सांगायचं?…
अरे मग मी काय वेगळं करतोय?… लोकं आमच्यासाठी झटतात, झगडतात पण आम्ही पण त्यांच्यासाठीच झगडतोय ना. विरोधात असलो तर चांगल्या कामासाठी झगडतो. आणि सत्तेत असलो तर चांगली कामं झगडल्याशिवाय होत नाहीत. अनेक अडथळे येतात, आणले जातात ते पार करावे लागतात. असंच सांगतो ना. मग फरक आहे कुठे?… झगडणं दोन्ही बाजूला आहेच की…
आणि तुमच्या झोपेचं ते काय कौतुक? आम्ही सकाळी सकाळी काही केलं तरी त्रास, दुपारी केलं तरीही त्रासच. आमच्या झोपेचा विचार करा की. यासाठी रात्र रात्र सुध्दा जागवाव्या लागतात याचा विचार करा जरा…
सारखं वेगवेगळ्या पद्धतीने गणित मांडावं लागतं. उत्तर थोडं कुठे चुकतंय असं वाटलं की परत नवीन पद्धत. बरं गणित मांडायचं पण आपणच आणि सोडवायचं पण आपणच… हे गणित बरोबर आहे का? असं कोणाला विचारावं हा सुद्धा काही वेळा प्रश्न असतो. कारण ज्याला विचारावं तोच यावरून स्वतः नवीन गणित मांडू शकतो. त्यामुळे समोरचा वेगळं गणित मांडणारा नसावा. हे पण बघावं लागतं. वाटतं तेवढं सोपं नसतं हे…
काकांच काय… “सगळ्या समस्यांवर रामबाण उपाय” हे त्यांनीच लिहिलेलं पुस्तक त्यांच्याकडे आहे. प्रश्न आहे तो दुसऱ्या दोघांचा. ते कोणतं पुस्तक वापरतात हे बघायचं…
दुसरे दोघं म्हणजे कोण?… अगोदरचे की आता नव्याने जवळ केलेले…
परत तेच… मला गणित घालू नका. मी सांगितलं ना की गणित मांडायचं पण आपण आणि सोडवायच सुध्दा आपणच… चला निघतो. पुढची काही गणितं मांडून सोडवायची आहेत.
योग म्हणजे कृतीमधलं कौशल्य. कोणत्याही कृतीमध्ये कौशल्य प्राप्त करून घेणं म्हणजे योग. असं म्हणतात.
म्हणजे पहिल्यांदा आपल्याला उच्चार कौशल्य जाणून घ्यायचं असेल तर योग्य उच्चार करायला शिकलं पाहिजे. म्हणजेच – योगा नव्हे योग.– परदेशी लोकांना शुद्ध उच्चार करता येत नाहीत म्हणून ते योग ला योगा म्हणतात तसे ते लोक सुद्धा त्यांच्या भाषेतील आपल्या उच्चारांना हसत असतीलच ना ! पण आपण तरी योगा न म्हणतात योग म्हणूया.
तर मी म्हणत होतो – “ योग: कर्मसु कौशलम्. “
– म्हणजे कामामध्ये कौशल्य प्राप्त करून घेणे. तसे योगाचे अनेक प्रकार आहेत म्हणे. पण विवेकानंदानी सांगितलेले राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग. हे चार प्रकार. आपण त्यातल्या कर्मयोगाचे पालन मुख्यतः करत असतो म्हणून पहिल्यांदा कर्मयोगाबद्दल मनात काही सापडते का बघूया.
कर्मयोग म्हणजे ज्या गोष्टी व्यवहारासाठी आवश्यक, जगण्यासाठी आवश्यक आणि ज्या कराव्याच लागतात त्यांना आपण कर्मयोग म्हणूया. आपल्या प्रत्येक कृतीत कौशल्यपूर्ण पूर्णता आणणे यासाठी सतत प्रयत्नशील राहणे म्हणजे योगाभ्यास योग म्हणजे कौशल्यपूर्णता. आधुनिक भाषेत ‘टी क्यू एम’= टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. कॉर्पोरेट जगतात लाखो रुपये घेऊन शिकवतात ते बहुधा हेच असावे. ते शिकवताना कायझन,टी पी एम, हाउसकीपिंग वगैरे बरंच काही शिकवलं जातं. हाउसकीपिंगचा जरी विचार केला तरी घरात वस्तू जिथल्या तिथं असणं, स्वच्छता आणि व्यवस्थितपणा हेच तर शिकवतात. त्याला 5S असंही म्हणतात.
एका ठिकाणी एक छान बोर्ड पाहिला—
‘ कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणं म्हणजेच शिस्त ‘ .. हे वाक्य तयार करणाऱ्याचं फार कौतुक करावं वाटतं. यात हाउसकीपिंग, टीपीएम, कायझन, क्वालिटी मॅनेजमेंट सगळ्याचं सार या एका वाक्यात त्याने गुंफलं होतं. वाक्य कुणाचं माहीत नाही, पण एका कंपनीत तो बोर्ड पाहिला. हेच ते ‘कर्मसु कौशलम्’. मग ते कंपनीत असो, ऑफिसमध्ये असो, दुकानात किंवा घरात असो, शाळा-कॉलेजमध्ये असो— सगळीकडे हेच तत्व लागू पडतं.
चला तर मग आजपासून निदान एवढं तरी व्यवहारात, अमलात आणायचा प्रयत्न करूया. आपल्या घरात ऑफिसमध्ये, कंपनीत, सगळीकडे बोर्ड लावूया. पण प्रथम आपल्या मनात बोर्ड लावूया —-
” कोणतीही वस्तू जिथल्या तिथं, जशीच्या तशी आणि जेव्हाची तेव्हा मिळणे म्हणजे शिस्त ! “
आज मनाच्या गहन तळात एवढंच सापडलं. बघू पुन्हा काय सापडतंय…. पुन्हा एखादी खोल बुडी मारू तेंव्हा उद्या परवा…..