☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
सोशल मीडिया विषयी बोलताना आपण फक्त जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात वापरले जाणारे दुसरे माध्यम म्हणजे फेसबुक या विषयी बघू.
आज पहाटे मला एक रिल मुलाने पाठवले.हा एक लोकप्रिय होत असलेला नवीन प्रकार काही सेकंदात आपले म्हणणे दुसऱ्यांच्या गळी उतरवणे कधी विनोद,कधी सावध करणे हे याचे काम.तर या रिल मध्ये एक नवीन फसवणुकीचा प्रकार सांगितला आहे.आपल्याला फेसबुक वर Look who died in an accident असा मेसेज येतो.त्यात एक लिंक येते.त्यावर क्लिक केले की आपले log in चे डिटेल्स विचारतात.ते दिले की आपण out आणि विचारणारा in होतो.आणि आपल्यालाच मोठा अपघात होतो.आपले बँक खाते रिकामे होते.थोडा तपास केला असता दुर्दैवाने यात फसलेले लोक सापडले.
अजून एक उदाहरण मी बघितले.एकीने घरातील लग्न सोहळ्याचे सतत रोज होणारे कार्यक्रम फेसबुक वर टाकले.अगदी फोटो सहित.येणारे लाइक्स बघून खुश झाली.घरी बसल्या बसल्या सर्वांना सगळे कार्यक्रम फोटो,व्हिडिओ याच्या माध्यमातून दाखवू शकली.आणि या वयात मी किती जगा बरोबर आहे ( हम भी कुछ कम नही ) हे ऐटीत दाखवू शकली.मग त्यात सगळेच फोटो,विधी अगदी कव्हर केले.लग्न छान झाले.लग्नात एक आकर्षक पाकीट आले.त्यात हरखून सोडणारे गिफ्ट सगळ्या फॅमिली साठी चार दिवसाची ट्रीप मिळाली अगदी तिकिटे सुद्धा मिळाली. मंडळी खूप आनंदली.लगबगीने तयारी करून निघाली.आणि या मॅडमचे फेसबुक वर अपडेट सुरू झाले.प्रवासाचे फोटो येऊ लागले.सगळे डिटेल्स आम्हाला कळू लागले.मोठ्या आनंदात घरी आले.बघतात तर घर पूर्ण रिकामे.आंघोळीची बादली सुद्धा घरात राहिली नव्हती.हे घरातील फेसबुक वर केलेले प्रसारण किती महागात पडले?
अशा फसवणूका पण मोठ्या प्रमाणावर चालू आहेत.यात चोरांना आपणच माहिती पुरवतो.ते फक्त त्यांची थोडी हुशारी वापरतात आणि आपल्याला अद्दल घडवतात.
एक घटना तर मन बधीर करणारी समजली.एका घरात राहणारी चार माणसे.घरातील वयस्कर आजोबा वारले.मुलाने ही बातमी सगळी कडे टाकली अर्थातच सोशल मीडिया वर. सांत्वन करण्यासाठी भरभरून संदेश आले.पण प्रत्यक्ष एकही माणूस फिरकला नाही.शेवटी ८/१० तास उलटून गेल्यानंतर इमारती समोर भाजी विकणारा भाजीवाला त्याचे मित्र घेऊन मदतीला आला.
काही मंडळी तर अशी आहेत की घरात आणलेले/ केलेले किंवा आत्ता जे खायचे ते पदार्थ देवाला नैवेद्य दाखवावा त्या प्रमाणे मोठ्या निष्ठेने फेसबुक वर पोस्ट केल्या शिवाय खात नाहीत.
मला तर हा प्रश्न पडतो आपणच आपले आयुष्य इतके सार्वजनिक ( जुन्या काळातील भाषेत सांगायचे तर चव्हाट्यावर मांडणे ) का करतो?
या काही घटना व सध्या फेसबुकवर जे सगळे बघायला मिळते ते बघून मन सुन्न होते.आणि वाटते समोरा समोर माणसांशी न बोलणारे आपण कुठे चाललो आहोत?कुठे पोहोचणार आहोत?आणि नवीन पिढीला कोणते संस्कार देणार आहोत?
हे सगळ्या घटनांनी माझ्या मनात अनेक तरंग उमटले.तरंग कसले वादळच उठले.आणि वाटले आपल्याच मंडळींना थोडे सावध करावे.नाहीतरी विष हे प्रत्येकाने थोडेच अनुभवायचे असते? त्या वरचे लेबल किंवा कोणी सांगितले तर आपण विश्वास ठेवून त्या पासून दूर जातोच की.तसेच लेबल दाखवण्याचा मी थोडा प्रयत्न केला.
माझी अगदी मनापासून विनंती आहे.ही सगळी साधने जगाची माहिती मिळवणे.परदेशातील आपल्या व्यक्तींशी संपर्क साधणे.चांगले विचार,चांगले कार्य यांचा प्रसार करणे.अशा कारणांसाठी करावा.माझी आजी कायम म्हणायची आपण आपलं जपावं आणि यश द्यावं घ्यावं हे अगदी पटते.
एक गाणे आठवते सावधान होई वेड्या सावधान होई आणि हीच सर्वांना विनंती आहे.
(आजची कथा सुश्री निर्मोही फडके यांची आहे. त्या लेखिका, व्याख्यात्या, संपादिका आणि भाषेच्या अभ्यासक आहेत.)
जीवनरंग
☆ ‘‘फिलोमेला‘…’ ☆ सुश्री निर्मोही फडके ☆
पुस्तक : गुंफियेला शेला – कथा 3: फिलोमेला – सुश्री निर्मोही फडके
जीव मुठीत घेऊन ती वेगानं धावत होती, खाचखळग्यांतून, काट्याकुट्यांतून, दगडपाण्यातून. अचानक तिला पंख फुटले आणि तिनं एका पायानं जमिनीला जोर देत दुसरा पाय दुमडून आपले हात पंखांना समांतर करत हवेत उंच भरारी घेतली.
‘ऊड फिलोमेला, ऊड, मिळालेल्या संधीचं सोनं कर,’ तिचं मन तिला आदेश देत होतं. अफाट आकाशात वारा अंगावर घेत उडताना तिला वाटत होतं, खूप जोरात ओरडून जगाला सांगावं, ‘मी फिलोमेला, राजकुमारी फिलोमेला, मी स्वतंत्र झालेय.’
हं, पण ओरडणार कशी? वाचा गमावली होती तिनं, त्या नराधमानं केलेल्या अत्याचारात.
फिलोमेलाच्या अलौकिक लावण्यावर, कोमल मनावर अनन्वित अत्याचार करून तिला मुकी, असहाय करून अज्ञातवासात बंदिवान करणारा तो, तिच्या सख्ख्या बहिणीचाच नवरा, राजा टेरिअस.
‘ऊड राजकुमारी फिलोमेला, दूर जा इथून… पंख होती तो उड आती रे… मिळालेत तुला पंख,मूव्हींचं वेड असणारी निशा अगदी भान हरपून मूव्ही बघत होती. ग्रीक पुराणातली एक शापित सौंदर्यवती, तिच्या कथेवरचा मूव्ही, ‘फिलोमेला – द नाइटिंगेल’.
थिएटरमध्येच हा भव्य मूव्ही पाहायचा असं निशानं ठरवलंच होतं नि ती एकटीच मूव्ही पाहायला आली.
‘वाह् काय मस्त जमलाय मूव्ही, स्टोरीच दमदार. मेहुण्याकडून अत्याचार सहन करणारी फिलोमेला, हातमागावर चित्र विणून, मोठ्या शिताफीनं बहिणीला त्यातून संदेश पाठवून सुटका करून घेते. जीभ छाटल्या गेलेल्या फिलोमालाचं न गाणा-या नाइटिंगेलमध्ये झालेलं रूपांतर, वाह्, सो सिम्बाॅलिक. स्क्रीन प्ले, डायरेक्शन, अॅक्टिंग, सिनेमाटोग्राफी, ग्राफिक्…परफेक्ट, या वर्षीची दोन ऑस्कर नक्की, लिहायला पाहिजेच या मूव्हीबद्दल.’
निशामधला चित्रपट-आस्वादक एकेक मुद्दे मनात नोंदवण्यात गर्क असताना तिला जाणवलं, थिएटरमधल्या अंधारात आपल्या शेजारच्या सीटवरचे दोन डोळे पल्याला न्याहाळतायत नि एक हात पुढे सरकतोय.
‘फिलोमेला… फिलोमेला…’ ती मनाशी पुटपुटली.
अंगाशी सलगी करू धजावणारा तो हात तिनं कचकन पिरगळला तशी अंधारात एक अस्फुट पुरुषी आवाजातली किंकाळी उमटली नि विरली. फिल्मच्या क्लायमॅक्सच्या गोंधळात कुणालाच काही कळलं नाही.
निशानं आपल्या आर्टिकलचं शीर्षक मनात पक्कं केलं, ‘अजूनही लढतेय आधुनिक फिलोमेला’.
चित्रपट संपल्यावर पडद्यावर अक्षरं उमटली,
…A New Beginning.
❤ ❤ ❤ ❤ ❤
टीप – कथा वाचून आणि चित्र पाहून वाचकांना जर त्या चित्रावर आधारित नवीन कथा, कविता, लेख वगैरे सुचलं, तर त्यांनी ई-अभिव्यक्ती आणि सुश्री सोनाली लोहार यांच्याशी संपर्क साधावा.
दरवर्षी चार जुलैला वाढदिवस असतो माझा आणि दरवेळी मागचे किती वाढदिवस कसे झाले, ते डोळ्यासमोर येऊन जातात! जणू फोटोच्या अल्बमची पाने मी उलटत होते! पन्नास वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते. कॅमेराच मुळी नवीन होता तेव्हा! साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता, अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट! माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे हे ते शिकले होते, त्यामुळे आमच्याकडे खूप जुने फोटो अजूनही बघायला मिळतात! स्वातंत्र्यापूर्वी वडिलांचे कुटुंब कराची ला होते, तेथील त्यांच्या घराचे, कराची शहरातील फोटो अजूनही आमच्या अल्बम मध्ये आहेत.
अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे सोळा आणि 24 फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये जसजशा सुधारणा होऊ लागल्या तस तसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले.आणि खर्च ही कमी येऊ लागला. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न,मुंजी, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बम ला नाव देत. “गोड स्मृती” नावाचा पहिला अल्बम अजूनही माझ्या माहेरी आहे. तिथे गेले की मी कौतुकाने ते जुने फोटो बघू शकते आणि त्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. अल्बम मधील काही व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्याला फोटो बघून ते जुने दिवस आणि माणसे यांचे स्मरण होते! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे, पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते!
स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या. आईच्या कडेवर बसलेली मी, तर कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोतून दिसली. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ऋजू ही एका फोटोत दिसली. दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्या रंगाचे पांढरे खडी असलेले परकर पोलके घालून वडिलांबरोबर समुद्रावर फिरायला गेलेली मी, मला फोटोत दिसली. त्यानंतर स्कर्ट ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की,’ तू आता मोठी झालीस!’ नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले!
शाळेत असताना माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम ही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच, नक्कल किंवा खेळ करून दाखवावे लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पावभाजी, केक नसे पण घरी केलेले दडपे पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली.
कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला. फोटोसेशन होऊ लागले. मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाणघेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला.
अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले ,परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत असलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले!
मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले.’ आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे’. म्हणत मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून येई! अरेच्या! किती मोठे झालो आपण! असे म्हणतच अल्बम मधल्या फोटो भर पडत होती!
आता काय साठी उलटली! मुलांची लग्न कार्ये झाली. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले! फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्याइतके ‘ केस नाही गं उरले’ असं लेकीला म्हटलं तरी,’ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय ‘ असं म्हटलं की त्या छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे. असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी उलटली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तर वाढदिवस असे वाटू लागले. इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला!
कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्वला आणि आता तर उज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटो मुळेच ही किमया झाली आहे. खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण वर्णन करून सांगू नाही शकत! पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते ,ही तर आहे फोटो अल्बम ची किमया!
आता दरवर्षी चार जुलैला वाढदिवस येतो. मुलांच्या सोबत साजरा करताना केक कापला जातो. फोटो काढून होतात. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले म्हणून! आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत राहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत….
बंड्या काळे त्याच्या मित्राकडे – क्राईम रिपोर्टर रजत सरदेसाईकडे आला होता. रजतच्या टेबलावर त्याने लिहिलेल्या एका लेखाचा मसूदा पडला होता – शीर्षक होतं – “आणखी एक कोयता गँग !”.
“आता ही कुठली बाबा कोयता गँग ? पुणे परिसरातील वेगवेगळ्या कोयता गँगबद्दल तू स्वत:च तर गेले सहा महिने लिहीत आहेस की.”
“बंडोपंत, हा लेख हातात कोयते घेऊन वार करणाऱ्या गुंडांबद्दल नाहीये. हा लेख सिकल सेल ॲनिमिया या रोगाबद्दल आहे – थॅलेसेमियाबद्दल. सिकल म्हणजे कोयता. जशी कोयता गँग धोकादायक आहे तसेच हा रोगही तसाच आणि तितकाच धोकादायक आहे हे सांगण्यासाठीचा हा प्रपंच.” रजत निरगाठ उकल तंत्राने समजावून सांगत होता.
“ॲनिमिया ? पण तो तर रक्तातील हिमो का काहीतरी कमी झाल्याने होतो ना ?”
“हिमोग्लोबिन.”
“हां, तेच ते.”
“पण मग त्याचा कोयत्याशी काय संबंध ?” बंड्या पूर्णपणे out of depth होता.
“तुला हिमोग्लोबिन म्हणजे काय ते ठाऊक आहे का ? रेड ब्लड सेल्स ?”
बंड्याचा चेहरा कोराच आहे हे पाहून रजतने समजावण्यास सुरुवात केली. — “रक्तात रेड ब्लड सेल्स असतात. यांचा नॉर्मल आकार मेदुवड्यासारखा असतो. त्यात हिमोग्लोबिन प्रोटीन असतात. ही प्रोटीन्स फुफ्फुसांमधून आलेला ऑक्सिजन शरीरात सर्वत्र पोचवतात आणि तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड गोळा करून फुफ्फुसांपर्यंत पोचवतात.”
बंड्याला फारसा काही अर्थबोध झालेला दिसत नव्हते.
“थोडक्यात सांगायचं तर हिमोग्लोबिनशिवाय ना प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळेल, ना प्रत्येक अवयवातून कार्बन डाय ऑक्साईड गोळा केला जाईल.”
“पण मग यात कोयता कुठे आला ?” बंड्याचा हैराण प्रश्न.
“काही अनुवांशिक बदलांमुळे या मेदुवड्यासारख्या असणाऱ्या रेड ब्लड सेल्स कोयत्यासारख्या (sickle) किंवा चंद्रकोरीसारख्या (crescent moon) होतात. त्यांचे ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड वहनाचे काम ते करू शकत नाहीत, शिवाय टोकेरी आकारामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते ती वेगळीच. ऑक्सिजन न मिळाल्याने अशा पेशंटसना धाप लागते, गुदमरल्यासारखं होतं, सतत अशक्तपणा राहू शकतो.”
“अरे बाप रे, असं लफडं आहे होय ?” लेखाची पानं चाळता चाळता बंडू म्हणाला. “पण हा रोग होतो कशाने ? चौरस आहार न घेतल्याने, अस्वच्छतेमुळे का संसर्गाने ?”
“नाही. यापैकी कशानेच हा रोग होत नाही. हा रोग आई वडिलांतील अनुवंशीय (genetic) बदलांमुळे होतो. ज्यांना थॅलेसेमिया झाला आहे अथवा जे थॅलेसेमियाचे वाहक (carrier) आहेत अशा आईवडिलांच्या मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता खूप जास्त असते. सिंधी, लोहाणा आणि पंजाबी समाजांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडली, पत्रिका जुळवून बघण्यापेक्षा आपण थॅलेसेमियाच्या दृष्टीने कोणत्या गटात – थॅलेसेमिया मुक्त, वाहक का रोगी – कोणत्या गटात मोडतो ते तपासून बघण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. आपण थॅलेसेमियाचे रोगी वा वाहक असलो तर दुसऱ्या थॅलेसेमिया रोगी वा वाहकाशी लग्नच करू नये अथवा केलेच तर मुलं होण्याचा चान्स न घेतलेलाच बरा. डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग हे गोंड समाजामध्ये कार्यरत आहेत. या समाजात ‘एक देव’, ‘दोन देव’ अशा उपजाती आहेत आणि वर वधू दोघंही एकाच उपजातीचे असलेले त्यांना चालत नाही. या समाजातही थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त आहे. म्हणून मग डॉ. बंग यांनी त्यांच्या धार्मिक भावनांचा आधार घेत त्यांना सांगितलं, की आता समाजात आणखी एक नवी उप-जात आली आहे – सिकल देव. ही उप-जात रक्त तपासणीतून ओळखता येते, आणि नवरा बायको दोघेही ‘सिकल देव’ उप-जातीचे असले तर तेही चालत नाही.”
“व्वा ! त्या बिचाऱ्यांना हे वाहक, रोगी प्रकरण कळणार नाही. पण त्यांच्या धार्मिक श्रद्धांना जोडल्याने हे काम सोप्पं होऊन गेलं,” बंड्याला हे पटलं….. “पण मग या रोगावर उपाय काय ? हा रोग कशाने बरा होतो ?”
“आजच्या घडीला तरी हा रोग पूर्णपणे बरा कधीच होत नाही. Prevention is better than cure हे इथं अगदी चपखलपणे लागू पडतं. बाळ आईच्या गर्भात असताना नाळ किंवा गर्भजलाची तपासणी करून बाळाला थॅलेसेमिया आहे का नाही हे सुनिश्चित करता येते. दुर्दैवाने जर बाळाला थॅलेसेमिया झालाच तर या रोगाच्या तीव्रतेनुसार विविध उपाययोजना करता येतात. चौरस आहार व व्हिटॅमिन यांनी पेशंटची प्रकृती चांगली रहाण्यास मदत होते. नियमितपणे हात धुणे, संसर्ग टाळणे यानेही पेशंटची आजारी पडण्याची वारंवारिता frequency कमी करता येते. अनेकदा गरजेनुसार महिन्यातून एकदा पेशंटला चांगले रक्त देणे – blood transfusion – हा उपाय प्रामुख्याने केला जातो. पूर्वी रक्तदात्याच्या आरोग्याबद्दल ठोस माहिती नसायची. व दात्याकडून मिळालेल्या रक्तामुळे कावीळ, HIV असे रोग पेशंटला होण्याची भीती असायची. पण आता मिळणाऱ्या रक्ताची सखोल परीक्षा होते, व हे रक्त निर्धोक आहे याची खात्री पटल्यानंतरच ते पेशंटला दिले जाते, त्यामुळे हा धोका आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच, रक्त स्वीकारतानाच्या सुया व अन्य वैद्यकीय अवजारे आता one time use असतात किंवा व्यवस्थित निर्जंतुक केली असतात, त्यामुळे त्यातून अन्य संसर्गाचे वा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता आता खूप कमी झाली आहे. (करोना काळात मात्र या पेशंटना रक्त मिळवण्यास खूप अडचणी आल्या.)
सारखे रक्त स्वीकारल्याने पेशंटच्या रक्तातील लोहाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढू शकते. त्यामुळे हे प्रमाण कमी करणारी औषधे पेशंटला घ्यावी लागतात. सुदृढ बाळाच्या नाळेतील पेशी वापरणे (stem cell therapy), bone marrow transplant असेही उपचार केले जातात. आयुर्वेद, होमिओपथी यांच्याही काही औषध पद्धती आहेत, परंतु आजच्या घडीला तरी, या जनुकीय आजारावर (genetic disease) १००% खात्रीलायक, १००% परिणामकारक उपाय नाही.
पाच दहा वर्षांपूर्वी, या रोगाची प्राणघातकता खूप भयावह होती. आजच्या घडीला हा इतका जीवघेणा रोग नाही, परंतु पेशंटला जपावे खूप लागते. जसं कोयता गँग बाबतीत वेळीच आणि नियमित सावधगिरी घेणं गरजेचं आहे, तसंच या रोगाचं आहे, आणि म्हणूनच या अशा सिकल सेल ॲनेमियाच्या कोयता गँगपासून सावध राहिलं पाहिजे,” रजतने सांगितले आणि तो समेवर आला.
पूर्वी नवी साडी घेतली की बायका कोणाला तरी घडी मोडायला द्यायच्या….
किती प्रेमळ रिवाज होता ना तो.. आतासारखी वारंवार साड्यांची खरेदी नसायची तेव्हा..वर्षाला एखाद – दोन साड्यांपर्यंतच मध्यमवर्गीयांची पण मजल असायची…. त्याच त्याच साड्या नेसाव्या लागत..पण तरीही आपली नवी कोरी साडी, नणंदेला, जावेला, शेजारणीला घडी मोडायला द्यायला, मन मोठंच असावं लागत असेल..
नात्यागोत्यातली एखादी गरीब बाई पण घडी मोडायला चालायची… त्यानिमित्ताने तिच्या अंगाला कोरं कापड लागायचं…. तिला कानकोंडं वाटू नाही म्हणून, ” तुम्ही नेसल्या की मला पटपट नव्या साड्या मिळतात “.. असंही वरून म्हणायचं..आणि गरिबीनं पिचलेल्या त्या माऊलीला तिचा पायगुण चांगला असल्याचा आनंद बहाल करायचा…..
…… आर्थिक श्रीमंती असो-नसो, पण मनांच्या श्रीमंतीचा तो काळ होता हे मात्र नक्कीच खरं ……
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ सोशल मीडिया पासून सावधान… भाग – १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
आज फक्त Whatsapp विषयी बघू या.पुढील काही वाक्ये बघू.विशेषत: महिलांनी लक्षात घ्यावे.
▪️ डी पी छान आहे.
▪️ Good morning
▪️ काय चालले आहे
▪️ आज काय केले?
▪️ फारच सुंदर डिश
▪️ मग फुलांच्या इमेज
▪️ एकाच ग्रुप वर असेल तर कोणतीही पोस्ट लाईक करणे.
▪️ किती अप्रतिम लिहिता.
▪️ फोन वर बोलू या
हे असे हळूहळू वाढत जाते.किंवा कधीकधी एकतर्फी गैरसमज पण करून घेतले जातात.जसे पोस्ट लाईक केली म्हणजे मी आवडले/आवडलो.संभाषण कसे वाढते हे खूप बघितले आहे. त्यातून उगाच दिवा स्वप्ने पाहिली जातात.जे घडलेच नाही पण मनात असते ते सांगितले जाते.किंवा काही कामा निमित्त फोन झाला तरी अमुक व्यक्ती मला सगळे सांगते.असे समज करून घेणे.या सगळ्यात एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे जे कौतुक घरातून मिळत नाही ते मिळू लागले की माणूस त्यात वाहवत जातो.हे सगळे फक्त पुरुष करतात असे नाही.सध्या हे प्रमाण ५०/५०% झाले आहे.बरेच जण या आभासी जगाला खरे मानतात.आणि मानसिक संतुलन गमावतात.
पण हे सगळे चालू असताना डोळे, कान,बुध्दी सगळे उघडे ठेवावे.साधे विचार या आभासी जगाचे वास्तव दाखवतात.साध्या ओळखीवर फुले,good morning येऊ लागले तर हा विचार करावा या व्यक्तीने हे कितीतरी जणींना/जणांना पाठवलेले असू शकते.किंवा असे संभाषण किती व्यक्तींशी चालू असेल.सुरुवातीलाच हा विचार करून बंदी घातली तर पुढचे सगळे टाळता येते.ज्या व्यक्ती फक्त Dp मध्ये बघतो त्यावर विश्वास कसा ठेवायचा?तो फोटो कोणाचाही असू शकतो.किंवा १० वेळा एडिट करून सुंदर बनवलेला असू शकतो.काही दिवसा पूर्वी एक तक्रार आली होती.शोध थोडा तपास लावला तर वेगळेच सत्य समोर आले.त्या महिलेचे अकाऊंट व फोन तिचा नवरा वापरून पुरुषांना नको ते मेसेज करत होता.आणि पुरुष त्यात वाहवत होते.असे संभाषण करून त्याने अनेक लोकांकडून पैसे घेतले होते.असे बरेच वेगवेगळे किस्से माझ्याकडे आहेत.
म्हणून सर्वांना विनंती आहे,या कडे फक्त एक करमणुकीचे साधन म्हणून बघावे.चांगले असेल ते घ्यावे.आणि कोणत्याही भ्रमात राहू नये.येथील ओळखी लाटांप्रमाणे येतात.आणि ओसरतात.मी ९५० नंबर ब्लॉक केले आहेत.
त्या पेक्षा वाचन,व्यायाम,पदार्थ बनवणे,जवळचे मित्र,मैत्रिणी यांच्यात जाणे.कुटुंबात गप्पा मारणे.गाणी ऐकणे,फिरणे,सहलीला जाणे हे करावे. व या आभासी जगा पासून सांभाळून रहावे.
माझ्या कडे समुपदेशनासाठी ज्या व्यक्ती येतात त्यांच्या अनुभवातून हे लिखाण केले आहे.
आयुष्याची ८ दशके सरली. सरली म्हणजे, कशी-बशी गेली नाहीत. छान मजेत गेली. आताशी मी त्याला म्हणते, ‘ये. लवकर ये. मी तयार आहे, गाठोडं बांधून.’ मग माझं मलाच हसू येतं. तो तर माझी कायाही घेऊन जाणार नाहीये. गाठोडं कुठलं न्यायला? तो माझ्यात कुठे तरी असलेलं प्राणतत्त्व घेऊन जाणार. हे सगळं माहीत असतं, तरी मी माझी गाठोडी कवटाळून बसते. दोन गाठोडी आहेत माझी…..
… पहिले एक गाठोडे आहे… ज्यात सुखद स्मृतींची तलम, मुलायम, नजरबंदी करणारी, बेशकीमती महावस्त्रे आहेत. त्यांच्या आठवणींनी मनावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं, पण कसं आणि का, ते कळत नाही, हे गाठोडं क्वचितच कधी तरी उघडलं जातं. दुसऱ्या गाठोडयाच्या तुलनेने हे गाठोडं आहे अगदीच लहान, चिमुकलंच म्हणता येईल, असं.
… दुसरं आहे, ते आहे एक भलं मोठं गाठोडं…. पर्वताएवढं.. नव्हे त्यावर दशांगुळे उरलेलं…..
अनेक विवंचना, चिंता, काळज्या, समस्यांच्या चिंध्या, लक्तरे, चिरगुटे… जगताना घेतलेल्या कटु स्मृतींचे हे गाठोडे. माझ्या बाबतीत कोण, कधी, काय चुकीचे वागले, कुणी माझा जाणीवपूर्वक अपमान केला, कुणी, केव्हा दुर्लक्ष केले, मला तुच्छ लेखले, या सगळ्या दु:खद आठवणी, .. आणि कुणी कधी दिलेल्या दु:खाचं, केलेल्या अपमानाचं, दुखावलेल्या अस्मितेचं, चिंता काळज्यांचं, ताण- तणावांचं, विवंचनांची चिरगुटं असलेलं …… हे असं सगळं… नकोसं – क्लेशकारक वाटणारं..तरीही मनात घट्ट चिकटून राहिलेलं सगळंसगळं या गाठोड्यातून ओसंडून वहात आहे. हा कचरा बाहेर टाकून देण्यासाठी मी हे गाठोडं पुष्कळदा उघडते. . कचरा बाहेर काढते. पण बहिणाबाईंनी म्हटले आहे त्याप्रमाणे,
‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर —
किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर’
किती प्रयत्न केला, हा कचरा काढून फेकून द्यायचा… केशवसुत म्हणाले आहेत त्याप्रमाणे जाळून किंवा पुरून टाकण्याचा…. पण नाहीच.. हा कचरा जणू अमरत्व लाभल्यासारखा आहे. पुन्हा पुन्हा येऊन गाठोड्यात बसतो. बुमरॅँग जसं ते फेकणार्याकडेच परत येतं, अगदी तसंच आहे हे.
हे मोठं गाठोडं, कटू स्मृतींचं….. सतत उघडलं जातं. विस्कटलं जातं. तो सारा कचरा, चिंध्या, चिरगुटं गाठोड्यातून बाहेर काढून फेकून द्यायचं ठरवते. फेकून देतेही. पण त्या पुन्हा लोचटासारख्या गाठोड्यालाच येऊन चिकटतात.
आता साधीशीच गोष्ट. मी एम. ए., एम. एड. पर्यन्त शिकले. 30 वर्षे अध्यापनाची नोकरी केली. निवृत्त होऊनही 20 – 22 वर्षे झाली. नशिबाने आणखी काय द्यायला हवं? पण सारखं मनात येत रहातं , मी पी. डी. सायन्स झाल्यावर आर्टसला का आले? आले तर आले, इकॉनॉमिक्स, मॅथ्स यासारखे चलनी विषय का घेतले नाहीत? ग्रॅज्युएट झाले. नोकरी मिळाली . मग लोकसेवा आयोगाच्या परीक्षा का दिल्या नाहीत? अधिक चांगल्या संधी मिळाल्या असत्या. आता या काळात आणि या वयात या विचारांना काही अर्थ आहे का? त्यांचा काही उपयोग आहे का? पण तो विचार उगीचच येत रहातो आणि मन खंतावत रहातं. ही झाली एक गोष्ट. अशा किती तरी जुन्या गोष्टी अकारणच मनात साठून राहिल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा उफाळून येत दु:खी करताहेत.
कधी कधी मैत्रिणी जमलो, की सहजच घरातल्या गोष्टी निघतात. ‘ सासू तेव्हा असं म्हणाली, नणंद तसं बोलली. कितीही करा आमच्या विहीणबाईंचा पापड वाकडाच. मुलांसाठी किती केलं, पण त्यांना कुठे त्याची पर्वा आहे.’ असंच काही- बाही बोलणं होतं. मी त्यांना म्हणते, “ नका ना या जुन्या आठवणी काढू ! अशा दु:खद आठवणी काढायच्या म्हणजे तेच जुनं दु:ख आपण पुन्हा नव्याने जगायचं. कशाला ते….”
अर्थात दुसर्याला सांगणं सोपं असतं. स्वत:च्या बाबतीत मात्र ‘ लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ‘ अशीच माझी स्थिती. मीही जुन्या जुन्या दु:खद आठवणी पुन्हा पुन्हा मनात घोळवत रहातेच.
परवा परवा ‘उमेद’ ग्रुपवर एक पोस्ट वाचली. 1 जून … एक टास्क.. आपल्या मनातील दु:खे, वाईट विचार, चिंता, काळज्या, लिहून काढा आणि त्यातून बाहेर पडा. आपली पाटी स्वच्छ ठेवा. मी म्हंटलं, बरी संधी आहे, आपण मोकळं व्हायला. मनाची पाटी कोरी करायला. मी सगळं लिहून काढलं. नंतर पाटी पुसू लागले. पण ती काही पुसली गेली नाही. त्यावरचं सारं लेखन शीलालेखासारखं अमीट झालं.
सध्या रहाते, तो माझा बंगला छान आहे. 37-38 वर्षे आम्ही या घरात रहातोय. इथले शेजारी-पाजारी चांगले आहेत. कामवाल्या घरच्यांसारख्याच आहेत. गरज पडली तर मदतीला कोणीही येईल, अशी परिस्थिती आहे. छान बस्तान बसलं आहे आमचं सध्याच्या घरी. पण सात-आठ महिन्यात बसेरा बदलायचा आहे. हे घर सोडून नव्या घरी फ्लॅटवर रहायला जाण्याची शक्यता आहे. आम्हा म्हातारा-म्हातारीला जमेल का सगळं? जुनाट वृक्ष नव्या वातावरणात रुजवायचे आहेत. रुजतील? तिथली फ्लॅट संस्कृती पचनी पडेल आमच्या? शेजारी कसे असतील? काही होऊ लागलं, तर कुणाची मदत मिळेल? मुलगा आणि सून आपआपल्या कामातून किती वेळ काढू शकतील? प्रश्न… प्रश्न… आणि फक्त प्रश्न ….खरं तर पुढच्या श्वासाची शाश्वती नाही, असं मी मनाला सतत बजावत असते आणि त्याचवेळी भवितव्याचा अनावश्यक विचार करत व्यथित होते. आपलंच टेन्शन वाढवते. ‘ देवा आजचा दिवस सुखाचा दाखवलास, उद्याची भिस्त तुझ्यावरच रे बाबा !’ असं म्हणण्याइतकी आध्यात्मिक उंचीही मनाने गाठलेली नाही.
अनेक गोष्टी अशा असतात, ज्या बाबतीत मी प्रत्यक्ष काहीच करायचं नसतं. तरीही काही गोष्टी, काही विचार भाकड गायीप्रमाणे मनात हुंदडत असतात आणि मन तणावग्रस्त करतात. आता हेच बघा, ‘ मुलाला प्रमोशन कधी मिळेल? सुनेला नोकरी मिळेल ना? नातीला मेडीकलला अॅडमिशन मिळेल ना? नातवाची टी.व्ही. ची क्रेझ जरा कमी होऊन तो थोडा मनापासून अभ्यास करायला लागेल का?’ …. यापैकी कशावरही माझं नियंत्रण नाही. पण तरीही याबाद्दलचे विचार काही मनातून हद्दपार होत नाहीत. आताशी एक विचार मनात घोळू लागलाय. अर्चनाताईची समुपदेशनासाठी अपॉईंटमेंट घावी. बघूया, त्याचा तरी काही उपयोग होतोय का?
अगदी अलीकडे अनघा जोगळेकर यांची .हॅँग टिल डेथ या इंग्रजी नावाची हिन्दी लघुकथा वाचली होती, ती अशावेळी हमखास आठवते. ती कथा मराठीत अशी आहे —
“ हॅँग टिल डेथ“
‘ मीनू, मी बघतोय, जेव्हा जेव्हा तुला वैताग येतो, किंवा तू काळजीत, चिंतेत असतेस, तेव्हा तेव्हा तू खोलीत जाऊन कपाट उघडतेस. तिथेच थोडा वेळ उभी रहातेस. मग थोड्याच वेळात तुझा चेहरा हसरा होतो. अखेर त्या कपाटात असं आहे तरी काय?’
पलाशचं बोलणं ऐकून मीनू हसली.
‘छे छे, केवळ हसून काम भागणार नाही. आज तुला हे रहस्य उलगडून दाखवावंच लागेल. ‘ पलाशच्या आवाजात थोडा आवेश होता. मग नजर चुकवत म्हणाला, ‘तुझ्या अपरोक्ष मी ते कपाट अनेक वेळा उघडून पाहिलं. शोधाशोध केली पण….. अखेर असं आहे तरी काय तिथे?’ तो जवळ जवळ ओरडतच म्हणाला.
मीनू थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग तिने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन आली. तिने कपाट उघडले.
‘ ते बघ माझ्या खुशीचं रहस्य!’
‘अं… तो तर एक हँगर आहे. …. रिकामा हँगर…’
‘ होय पलाश. तो हँगर आहे, पण रिकामा नाही. याच्यावर मी माझ्या सार्या चिंता, काळज्या, त्रास, वैताग लटकवून ठेवते आणि कपाट बंद करण्यापूर्वी त्यांना म्हणते,— ‘ मरेपर्यंत लटकत रहा ! ’ मी माझ्या काळज्या, त्रास, वैताग माझ्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. त्या माझ्यापासून दूर केल्यानंतरच त्या निपटून काढते. ‘
… आणि आता त्या कपाटात एकाऐवजी दोन हँगर लटकलेले आहेत…..
मी सध्या त्या कथेतील मिनूच्या शोधात आहे. एकदा भेटली की विचारणार आहे, “ बाई ग, तू त्या सार्या सार्या चिंता, काळज्या, त्रास, वैताग रिकाम्या हँगरवर कशा लटकावून ठेवतेस? एकदा प्रात्यक्षिक दाखव ना ! प्लीज…..”
☆ ब्रायटनची ब्राईट कहाणी… ! ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे☆
युद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक भारतात असणे ही नैसर्गिक गोष्ट आहे. ते आपले कर्तव्यही आहे. भारतात युद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय युद्ध स्मारक नुकतेच इंडिया गेटजवळ बांधण्यात आले आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे स्मारक कारगिलजवळ द्रास या ठिकाणी आहे. आपले कुटुंब, सणवार सगळं सगळं बाजूला ठेवून कोणत्याही देशाचे सैनिक प्रतिकूल परिस्थितीही आपले कर्तव्य बजावत असतात. या सैनिकांचा सन्मान करणे, त्यांच्या प्रति कृतज्ञ राहणे हे सरकारचे आणि आपलेही परम कर्तव्य आहे. भावी पिढीला त्यांच्या त्यागापासून प्रेरणा मिळावी हाही एक त्यामागील उद्देश असतो.
पण आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की पहिल्या महायुद्धात इंग्लंडसाठी लढणाऱ्या भारतीय सैनिकांचे एक अतिशय सुंदर स्मारक इंगलंडमधील ब्रायटन या शहराजवळ आहे. इंग्लंडमध्ये ज्या ठिकाणी हे स्मारक आहे अशा ब्रायटन गावाची आधी आपण थोडक्यात माहिती घेऊ. ब्रायटन हे इंग्लंडच्या दक्षिणेला समुद्रकिनारी वसलेले एक अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव. ब्रिटिशांसाठी एक पर्यटन केंद्रच ! आपल्याकडील महाबळेश्वर, माथेरान, पाचगणीची आठवण यावी अगदी तसे. इंग्लंडमधील उमराव, सरदार, उद्योगपती आणि श्रीमंत लोक यांचे या ठिकाणी बंगले. ते सुटी घालवण्यासाठी या ठिकाणी येत. याच ठिकाणी इंग्लंडचा राजपुत्र असलेल्या चौथ्या जॉर्जने एक बंगला विकत घेतला. हा बंगला आणि त्याचा परिसर अतिशय विस्तीर्ण होता. कलेची आवड असणाऱ्या जॉर्जने या बंगल्याचा कायापालट केला. बाहेरून भारतीय वास्तुकलेचा आणि आतून चिनी सजावटीचा हा बंगला एक उत्कृष्ट नमुना बनला. या बंगल्याचे नाव मरीन पॅव्हिलियन असे पडले. पुढे हा बंगला ब्रायटनच्या स्थानिक पालिकेने इंग्लंडच्या राजाकडून चक्क विकत घेतला.
एकोणिसाव्या शतकात युरोपातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बिघडत गेली. वातावरण ढवळून निघाले. ऑस्ट्रियन-हंगेरीचा सम्राट फर्डिनांड आणि त्याची गरोदर पत्नी यांची हत्या झाली आणि पहिल्या महायुद्धाची ठिणगी पडली. इंग्लंड, फ्रांस, रशिया, जर्मनी आणि दोस्त राष्टे असे गट युरोपात तयार झाले. ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध दंड ठोकले. जर्मनीने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला, तर रशिया सर्बियाच्या बाजूने रणांगणात उतरला. लवकरच फ्रान्सने रशियाला आपला पाठिंबा जाहीर केला आणि लष्करी हालचाली मोठ्या वेगाने सुरू केल्या. जर्मन फौजा बेल्जियममार्गे फ्रान्सपर्यंत येऊन धडकल्या आणि मग फ्रान्सचे दोस्त राष्ट्र इंग्लंडसुद्धा या युद्धात सामील झाले.
आतापर्यंत ज्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही अशी प्रतिमा असलेल्या इंग्लंडला जेव्हा प्रत्यक्ष युद्धात उतरावे लागले तेव्हा त्यांची खरी पंचाईत झाली. युद्धात सहभागी होण्यासाठी पुरेसे सैन्य इंग्लंडकडे नव्हते. सैन्यात नवीन भरती करून प्रशिक्षण देणेही त्यांना शक्य नव्हते. अशा परिस्थितीत भारत हा देश म्हणजे इंग्लंडच्या हातात असलेला हुकमी एक्का होता. भारतीय सैन्याची मदत मिळवण्यासाठी इंग्लंडने एक धूर्त चाल खेळली. पहिल्या महायुद्धात आपल्याला मदत केली तर आपण भारताला स्वायत्तता देऊ असे ब्रिटिशांनी जाहीर केले आणि लाखो भारतीय सैनिक इंग्लंडसाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार झाले.
३० सप्टेंबर १९१४ ला भारतीय सैनिकांची पहिली तुकडी फ्रान्समध्ये दाखल झाली. त्यानंतर यथावकाश आणखीही भारतीय सैन्याच्या तुकडया दाखल झाल्या. फ्रान्स आणि बेल्जीयमच्या आघाड्यांवर जर्मन सैनिकांशी प्राणपणाने लढू लागल्या. वातावरण अत्यंत प्रतिकूल होते. हाडे गोठवणारी थंडी होती. अंगावर पुरेसे गरम कपडे नव्हते. खायला धड अन्न मिळत नव्हते. अशा वातावरणात भारतीय सैनिक इंग्रजांच्या बाजूने लढले. लाखो सैनिक धारातीर्थी पडले तर हजारो सैनिक जखमी झाले. या जखमी झालेल्या सैनिकांना परत भारतात पाठवणे शक्य नव्हते. फ्रान्स किंवा बेल्जीयममध्येही त्यांच्या उपचारासाठी काही सोय करणे शक्य नव्हते.अशा परिस्थितीत त्यांना इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या ब्रायटन या ठिकाणी ठेवण्याचे ठरले. हे ठिकाण युद्धभूमीपासून फार लांब नव्हते. शिवाय येथील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात या सैनिकांना लवकर बरे वाटेल असे इंग्रज सरकारला वाटले.
या सैनिकांच्या उपचारासाठी मोठया आणि सुयोग्य जागेची आवश्यकता होती. ब्रायटन येथे उपचार करायचे ठरले तेव्हा हा राजवाडा म्हणजेच मरीन पॅव्हिलियन हेच ठिकाण राज्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर आले. मग ताबडतोब येथील उंची फर्निचर आणि इतर सामान हलवून सैनिकांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली. जवळपास दोन हजार जखमी भारतीय सैनिकांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले. यातील बरेचसे सैनिक उपचारांती बरे झाले. फक्त ५७ सैनिक अतिगंभीर जखमा किंवा आजारामुळे दगावले. या ठिकाणी भारतीय सैनिकांवर अनेक ब्रिटिश डॉक्टरांनी उपचार केले. भारतीय सैनिकांची व्यवस्था ब्रिटिशांनी अतिशय उत्तम ठेवली. हिंदू आणि शाकाहारी सैनिकांसाठी वेगळे स्वयंपाकघर, वेगळे आचारी यांची व्यवस्था त्यांनी केली. मुस्लिम सैनिकांसाठी स्वयंपाकाची वेगळी व्यवस्था होती. प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे जेवण मिळेल याची व्यवस्था केली गेली. भारतीय सैनिक या ठिकाणी उपचार घेत असताना स्थानिक इंग्रज लोक त्यांच्या भेटीसाठी येत. त्यांच्यासाठी भेटवस्तू आणत असत. या दरम्यान या स्थानिक इंग्रज लोकांमध्ये आणि भारतीय सैनिकांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध दृढ झाले.
स्थानिक लोकांबरोबरच या राजवाड्यातील रुग्णालयाला इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज आणि त्याची पत्नी मेरी यांनी २५ ऑगस्ट १९१५ रोजी भेट दिली. त्यांनी या शूर सैनिकांचा आपल्या हस्ते गौरव केला. जखमी झालेल्या सैनिकातील दहा सैनिकांचा मानचिन्ह देऊन सन्मान केला. या सैनिकातीलच एक असलेल्या हवालदार गगन सिंग याचा ‘ इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट ‘ हा पुरस्कार देऊन गौरव केला. या गगन सिंगचा पराक्रम पाहिल्यानंतर आपण स्तिमित होतो. मला तर त्याच्या पराक्रमाबद्दल वाचताना खिंडीत एकट्याने मुघल सैन्याशी लढणाऱ्या बाजी प्रभूंची आठवण झाली. गगन सिंग अत्यंत शूर सैनिक होता. त्याच्या हातात बंदूक असताना त्याने अनेक जर्मन सैनिकांना अचूक टिपले. पण दुर्दैवाने त्याच्या बंदुकीतील गोळ्या संपल्या. पण या पठ्ठयाने हार मानली नाही. आपल्या बंदुकीला बेयोनेट लावून त्याने त्याच्या साहाय्याने आठ जर्मन सैनिकांना यमसदनी पाठवले. पुढे एक वेळ अशी आली की त्याच्या बंदुकीचे बेयोनेटही तुटले. तेव्हा तेथेच पडलेल्या एका जर्मन सैनिकाची तलवार उपसून त्याने युद्ध सुरूच ठेवले. या भयंकर धुमश्चक्रीत तो जबर जखमी झाला आणि रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. तरी तो दोन दिवस युद्धभूमीवरच पडून होता. शेवटी इतर सैनिकांनी त्याला उचलून सुरक्षित ठिकाणी हलवले आणि नंतर रुग्णालयात दाखल केले. अशा सैनिकांची हकीगत वाचताना अक्षरशः थरारून जायला होते.
या दरम्यान जे सैनिक मृत झाले त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था ब्रिटिशांनी अतिशय चोख केली. हिंदू सैनिकांसाठी अग्निदहन करणे तसेच मुस्लिम सैनिकांसाठी दफनाची व्यवस्था करण्यात आली. जेथे या सैनिकांचा अंत्यसंस्कार करण्यात आला ते ठिकाण होते ब्रायटन जवळचे पॅचम नावाचे उपनगर. या ठिकाणी या धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक इंग्रज सरकारतर्फे उभारण्यात आले. त्याला ‘ ब्रायटनची छत्री ‘ असे म्हटले जाते. छत्री हा शब्द इंग्रजांनी देखील स्वीकारला आहे. या स्मारकाच्या ठिकाणी नदीकाठी घाट असतो तसे गोल कट्टे आहेत. त्यावर ग्रॅनाईट बसवला आहे. देवळासारख्या मजबूत आणि रुंद खांबावर ही वास्तू उभी आहे. वरती सुंदर असा संगमरवरी घुमट आहे.
या स्मारकाचे उदघाटन पंचम जॉर्ज यांचे चिरंजीव प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी केलेल्या भाषणात त्यांनी भारतीय सैनिकांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ” ही लढाई कुठल्या कारणासाठी लढली जात आहे याची पुरेशी कल्पना नसताना आणि या कारणांशी तसा त्यांचा काही एक वैयक्तिक संबंध नसताना आपल्या भारतीय बंधूनी जो अतुलनीय त्याग केला, त्याची जाणीव भावी पिढयांना राहावी म्हणून हे स्मारक आम्ही कृतज्ञतापूर्वक उभारत आहोत. ” या छत्रीसमोर दरवर्षी ब्रिटिश शासनातर्फे मानवंदना दिली जाते. यावेळी तेथील मोठमोठे नेते, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी देखील उपस्थित राहतात. आपले भारतीय वीर या ठिकाणी चिरनिद्रा घेत आहेत. त्यांच्या त्यागाचा यथायोग्य सन्मान ब्रिटिश सरकारतर्फे होतो. आपल्या देशाला इंग्रज पुढे स्वायत्तता देतील या आशेने हे सैनिकी पहिल्या महायुद्धात सामील झाले होते. आपले घरदार, देश, मुलेबाळे सोडून परक्या मुलखात येऊन त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. हे सगळे पाहिल्यानंतर, वाचल्यानंतर आपले मस्तक आदराने झुकते आणि ऊर अभिमानाने भरून येतो. या वीरांना सलाम !
☆ तो सावळा सुंदरू… — लेखिका : सुश्री उल्का खळदकर ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆
तो सावळा सुंदरू । कासे पितांबरू ।।
तो सावळा सुंदर विठ्ठल ! त्याला डोळे भरून पाहण्यासाठी मन आसुसलेलं असतं. सगळ्या भक्तांची तीच असोशी ! ‘ भेटी लागे जीवा लागलीसे आस ‘ असे आर्ततेने म्हणून तुकारामांची जी अवस्था तीच अवस्था एकनाथांची !
सर्व संतांना त्यानी वेडं केलंच पण सामान्यांनाही तो आपलासा वाटू लागला आणि मग वारकरी संप्रदाय स्थापन झाला. दिंड्या देहू आळंदीहून पंढरपूरला जाऊ लागल्या. हातात टाळ चिपळ्या मृदुंग आणि मुखात विठ्ठलाचं नाव घेत, पायांना पंढरपूरचा ध्यास घेत दिंडी चालली. कुणाच्या तोंडी अभंग, कुणी हरिपाठ म्हणत आज वर्षानुवर्ष दिंडी चालली आहे. तनाने मनाने वारकरी म्हणतात…….
काही वर्षे या करोना महामारीमुळे या दिंडीला खीळ बसली होती. सारंच कसं आभासी झालं होतं. पण प्रत्येकाच्या मनात विठ्ठल आहे. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल… असं कोणी मानतं, तर कुणी मनाने या दिंडीची वाट चालत आहे. जणू काही आपण वारीबरोबर चाललो आहोत ! आज एकादशीला सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले … विसरून गेले देहभान — मी माझ्या दारात या फुलांच्या कलाकृतीने दिंडी चालत आले. आज त्याची समाप्ती. वारकरी अलोट गर्दीमुळे कळसाचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. परतवारी मी माझ्या मनाने तुझ्या गाभाऱ्यात पोचले. तुझं सावळं सुंदर
मनोहर रुप पाहतच राहिले. रोजच तुझे रुप मी अनुभवत होते. तुला फुलातून साकारताना तुझी पूजा बांधत होते. माझे वारकरी दिंडी चालत होते. त्याची सांगता !
आता या चातुर्मासाच्या निमित्ताने मी भागवताचे सार लिहिणार आहे. या माझ्या उपक्रमाला तुझ्या आशीर्वाद असू देत रे विठ्ठला !
रंगा येई वो ये …. रंगा येई वो ये
माझ्या या लेखनात अर्थ भरायला ये. तुला मी आईच्या रुपात बघते.
वैकुंठवासिनी विठाई जगत्रजननी
तुझा वेधु माझे मनी
रंगा येई वो ये ……
माझ्या ह्या लेखणीवर तुझी कृपादृष्टी असू देत.
लेखिका : सुश्री उल्का खळदकर
प्रस्तुती : श्री अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
अनादी ,अनंत काळापासून कुत्रा हा प्राणी ज्याला माणसाने सर्वप्रथम पाळीव प्राणी बनविले. तो माणसाळला आणि माणसाचा उपकार कर्ता झाला .कुत्रा हा इमानदार आणि स्वामिनिष्ठ असा प्राणी आहे .माणसाच्या प्रेमाच्या मोबदल्यात, तो आपले सारे इमान आणि निष्ठा आपल्या मालकाला अर्पण करतो. त्याच्या इमानदार आणि प्रामाणिक स्वभावामुळे तो माणसाच्या जास्त जवळ आला. कुत्रा, ज्याला आपण श्वान असेही म्हणतो. त्याला माणसाच्या डोळ्यांकडे पाहून माणसाचे हावभाव ओळखता येतात. त्याची वासाची क्षमता माणसाच्या 1000 पट आणि ऐकण्याची क्षमता माणसाच्या पाचपट जास्त असते. त्यामुळे गुन्हे शोधून काढण्यासाठी ,कुत्र्यांना शिकवून तयार केले जाते. श्वानांची हुशारी, कर्तृत्व , पराक्रम आणि त्यांनी गाजविलेल्या मर्दुमकीची उदाहरणे किती सांगू तितकी कमीच ! पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धातले , आणखी इतरही ठिकाणचे पराक्रम ऐकून त्या श्वानांना खरोखरच मनोमन सलाम करावासा वाटतो. सलाम.
अमेरिकन नाविक सैनिक “डिन मार्क” हा अडीच वर्षानंतर घरी परतला. त्याने आनंदाने आणि गहिवरत आईला मिठी मारली .आईला म्हणाला, ” आज मी तुझ्यासमोर दिसतोय तो केवळ परमेश्वरी कृपा .म्हणजे मूर्तीमंत परमेश्वरी कुत्र्यामुळे. आईला उलगडा होईना . तेव्हा त्याने घडलेल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. अमेरिकन नाविक सैनिकांनी जपानने जिंकलेल्या न्यू गीनीतील एका बेटावर पाय ठेवला .तो “सिझर ” या अल्सेशियन कुत्र्याला सोबत घेऊनच .एका पायवाटेवर शत्रूने भूसुरुंग पेरून ठेवलेले होते .त्याच वाटेने “सिझर ” पुढे आणि सैनिक मागे असे चालू लागले. सुरुंग ठेवलेल्या जागा सीझर नाकपुड्या फुगवून पुन्हा, पुन्हा हुंगायला लागला. तत्परतेने असे सुरुंग काढून टाकून सैनिकांना पुढे जाणे सोपे झाले. एका ठिकाणी एका झुडूपात दबा धरून बसलेल्या जपानी सैनिकाची ” सिझरला” चाहूल लागली. गुरगुरत त्या बाजूला तो पाहायला लागला. अमेरिकन सैनिकांनी मशीन गन आणि हँड ग्रेनेडचा, त्या दिशेने भडीमार केला .नंतर पाहतात तो कितीतरी जपानी सैनिक शस्त्रांसह मरून पडलेले दिसले. एक आश्चर्य सांगायचे म्हणजे, एक जपानी सैनिक हातातील मशीन गन टाकून शरण आला. ( जपानी सैनिक शरण येत नाहीत, तर हाराकिरी करतात .) शरण येण्याचे कारण त्याला विचारले, तेव्हा त्याने उत्तर दिले ,”तुमचा हा इतका देखणा आणि सुंदर कुत्रा कदाचित मरेल. म्हणून मी गोळीबार केला नाही. यालाच म्हणतात श्वानप्रेम .! ‘डिन मार्क’ ने “माझे प्राण कुत्र्यामुळे , ‘ सीझर’ मुळे वाचले .तोच खरा माझा प्राण दाता असे उद्गार काढले .
‘ चिप्स ‘ नावाचा हा असाच एक कुत्रा . दुसऱ्या महायुद्धात असामान्य कामगिरी आणि धीटपणाबद्दल खूप गाजला. अमेरिकेच्या तिसऱ्या पायदळ तुकडी बरोबर उत्तर आफ्रिकेत ‘कैसा ब्लांका ‘ या बंदरावर उतरला. पुढे दोस्त सैन्य जर्मनीने व्यापलेल्या, इटली देशाच्या दक्षिण प्रांतातील , सिसेलीत उतरले. जर्मन सैन्या बरोबर झालेल्या लढाईत, ‘ चिप्स ‘ चे काम अत्यंत महत्त्वाचे होते. रणधुमाळीत एका जर्मन सैनिकाला ,त्याने मशीनगन सह पकडून आणले .आणि त्याच्या संपूर्ण प्लॅटूनला शरण येण्यास भाग पाडले .रात्रीच्या काळोखात पुढे येणाऱ्या जर्मन सैनिकांची चाहूल घेऊन ,त्याच्या मूक भाषेत तो इशारा देत असे .आणि अनेक जर्मन सैनिक पकडले जात असत. पुढे 1943 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांची ‘कैसाब्लांका ‘येथे बैठक झाली. तेव्हा हाच ‘ चिप्स ‘, बाहेर इतर सैनिकांच्या बरोबर खडा पहारा देत होता .आणि आपले काम चोख बजावत होता.
‘ डिक’ हा असाच एक गाजलेला कुत्रा. पॅसिफिक मधील एका बेटावर ,अमेरिकन सैन्याबरोबर उतरला. 53 दिवसांच्या लढाईत , 48 दिवस त्याच्या कामगिरीची लष्करात प्रशंसा केली गेली. दाट जंगलात लपून असलेल्या जपानी चौक्या त्याने दाखवून दिल्यामुळे, त्या नष्ट करणे अमेरिकन सैन्याला शक्य आणि सोपे झाले. विशेष म्हणजे या लढाईत ,एकही अमेरिकन सैनिक जखमी सुद्धा झाला नाही. त्याचं श्रेय ‘ डिकला ‘नक्कीच जातं.
‘अँड्री ‘ हा डॉबरमॅन कुत्रा, ‘ओकिनावा’ च्या लढाईत अमेरिकन सैन्याबरोबर दाखल होता .या लढाईत बरेच अमेरिकन सैनिक मारले गेले .पण ‘अँड्री ‘न घाबरता ,न डगमगता सर्वात पुढे जाऊन धोका हेरत असे . तीक्ष्ण नाकामुळे त्याला शत्रूची चाहूल हल्ला होण्यापूर्वीच लागत असे. त्यामुळे अनेक सैनिकांचे प्राण वाचले .अनेक सैनिकांचे प्राण वाचविणाऱ्या त्याच लढाईत एका गोळीने वीर मरण आले. सलाम त्या रणवीराला ! सलाम.
‘ फिप्का ‘ , हा एक जवान ( कुत्रा ) दुसऱ्या महायुद्धात, पाचव्या अमेरिकन दलाबरोबर, फ्रान्सच्या रणांगणावर उतरला. शत्रूची धोक्याची हालचाल नाकाच्या साहाय्याने दर्शविण्यात तो निष्णात होता. मातीत लपवून ठेवलेली विजेचे तार त्याला दिसताच ,त्याने दुरूनच भुंकून भुंकून धोका नजरेस आणून दिला. लगेच तो धोका नष्ट करण्यात आला. नंतर असे आढळून आले की, त्या तारेला जोडलेले तीन सुरूंग एकदम उडवून अनेक सैनिक गारद झाले असते .पण शेकडो सैनिकांचे प्राण वाचविणाऱ्या, ‘फिप्का” ला एका हात बॉम्ब मुळे प्राण गमवावा लागला . तो शहीद झाला .सलाम त्याच्या कर्तव्य पुर्तीला .नुकतंच वाचनात आलं करटणी बडझिन (अमेरिका ) नावाच्या महिलेचा ‘ टकर ‘ नावाच्या गोल्डन रिट्रीवर जातीच्या कुत्र्याची वार्षिक कमाई, आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे .तो एका जाहिरात कंपनीसाठी मॉडेलिंग करतो. त्यासाठी त्याला एक लाख डॉलर मिळतात. त्याला एका जाहिरातीसाठी पोज देण्याचे 6656 ते अकरा हजार 94 डॉलर (अंदाजे 55 ते 92) लाख रुपये मिळतात .इतके प्रचंड कमाई करणारा हा जगातील एकमेव कुत्रा आहे. तो आठ महिन्याचा असल्यापासून जाहिरात कंपनीसाठी मॉडेलिंग करतो.