मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कडी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

कडी… ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

घराची ही साधी कडी. पण काम चोख. आतला सुरक्षित आणि बाहेर गेलेल्याला घर सुरक्षित आहे, याची खात्री देणारी ही कडी. खरं तर घराची देखणी नथच मानावी.

ज्या घराला कडीकोयंडेच नाहीत,ते घर सुरक्षित नाही. कडीशिवाय घर पुरं नाही. आजवर कडीकुलपांनीच स्थावर मालमत्ता सुरक्षित ठेवली. भित्र्या माणसांना कडी सुरक्षितता पोहोचवते. विशेषतः  स्त्री घरात एकटी असेल तर ही कडीच तिला ‘मैं हूं ना!’ असं बेलाशक सांगते. कडी नुसती कडी नसते, तर आधारासाठी कायम खडी असते. ती आपल्या सुरक्षिततेची कवच कुंडल असते. अगदी रात्री घरात एकटे असू आणि दार नुसतंच लोटलेलं असेल, तर झोप लागता लागणार नाही. कडी तिचं काम फारच इमाने इतबारे करते.

मनाच्याही दरवाजाला अशा कड्या असाव्यात. वेळोवेळी त्या लावता याव्यात. सताड उघड्या घरात कोण कसं शिरेल आणि विध्वंस करुन जाईल, याची नुसती कल्पना करा. आपण अस्वस्थ होतो.

मन जर कायम असं सताड उघडं असेल तर….

कोणीही आपल्याला गृहीत धरून   आपल्याशी कसेही व्यवहार करु लागतील. त्यांना जर थोपवायचे असेल, तर मनाची कडी मजबूत असावी. कोणालाही कसेही आपल्या मनात, जीवनात डोकावता येणार नाही. बऱ्याचदा आपण मनाची कडी लावायला विसरतो आणि मग अनेक घोळ होतात. कडी ही आपल्या अस्तित्वासाठी आवश्यकच आहे. म्हणजे मग आपण फार कमी वेळा दुःखी होऊ. म्हणजे इतरही ठरावीक अंतर ठेवून आणि अदबीने आपल्याशी वागतील.

बोलता बोलता कधी कधी आपण बेताल होतो, वाहवत जातो. आपल्याला पश्चाताप होतो. तोंडाला जरा कडी लावायला हवी होती, हे सहज विसरुन जातो.

नेमकं आणि योग्य वेळी निर्णायक बोलणारी जी माणसं असतात त्यांच्या शब्दाला सभेत,घरात, समाजात भारी किंमत असते. कोणत्या विषयाला कोठे कडी घालायची हे त्यांना पक्के ठाऊक असते.

कधी कधी नको तिथे मनाला कडी घालणारी माणसं दुसऱ्याला कायम ताटकळत उभे ठेवतात. आपल्यासाठी जीवतोड करणाऱ्यांच्या बाबतीत ही कडी फार क्लेश देणारी ठरते. आयुष्यभर मग नाव घ्यायचं नाही, असं मन ठरवून टाकतं. हे कितपत योग्य आहे?

आगरकर आणि टिळक यांनी  एकमेकांसाठी आयुष्याच्या उत्तरार्धात अशाच कड्या घातल्या. एकत्र शाळा चालवणारे, शाळा शेणाने सारवणारे हे मित्र खूप दुरावले. शेवटच्या क्षणी मात्र न राहून टिळक आगरकरांना भेटायला गेले. डोळे भरुन एकमेकांना पाहिले. पण बोलले नाहीत. टिळक घराबाहेर पडले आणि आत आगरकरांनी जीव सोडला. टिळकांना अतिव दुःख झाले. पण काय उपयोग?मित्र कायमचा गेला.

आपणही जरुर कड्या लावा. पण योग्य तिथेच. नको त्या ठिकाणी लावून बसाल तर फार फार काही गमावून बसाल. योग्य ठिकाणी लावाल तर जीवन हलके कराल.

म्हणून ती लावायची कुठे आणि कधी यावर जरुर विचार करा.

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : कण कण वेचिताना… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

… असं म्हणतात की जो इथं जन्माला आला त्याच्या अन्नाची सोय झालेली असतेच. अर्थात चोच आहे तिथे चाराही असतो.. फक्त ज्याला त्याला तो शोधावा लागतो.. त्यासाठी त्याला जन्मताच मिळालेले हातपाय योग्य वेळ येताच हलवावे लागतात.. असेल माझा हरी देई खाटल्यावरी असे भाग्यवंत खूप विरळे असतात.. अदरवाईज जिथे जिथे दाणा पाणी असेल तिथवर यातायात हि करावीच लागते.. बरं पोटाची व्याप्ती पण एकच एक दिवसाची असते.. होय नाही तर ते एकदा ओतप्रोत.. नव्हे नव्हे तट्ट ( फुटेपर्यंत) भरले एकदा आता पुढे चिंता मिटली असं का होतं. तुमचा आमचा अनुभव असा तर अजिबात नाही ना हे सर्व मान्य अक्षय सत्य आहे. दुसरं त्यात पहाना आपलं एकटयाचंच उदरभरणाची गोष्ट असती तर एकवेळ थोडा पोटाला चिमटा घेऊन रोजची हि दगदग न करता एक दोन दिवसाच्या फरकाने चाऱ्याचा शोधात हिंडता आले असते. पण तसं नशिबात नसतं. आपल्या बरोबर आपलीच रक्तामासाची, आपुलकीच्या वीणेने बांधलेली नाती यांची जबाबदारी …घरटयातला कर्त्याला कर्तव्य चुकत नसतं.. अन मग रोज मिळालेला चारा सर्वांना पुरणारा नसेल तर स्वताच्या पोटाला चिमटा घ्यावा लागतो तो खऱ्या अर्थाने. तैल बुद्धीच्या माणसांसारखा हा अन्नाचा साठा करून ठेवण्याची क्षमता आमच्या  पक्ष्यांच्या घरटयात नाही.. त्यामुळे फार काळ साठवलेले अन्नधान्य नाहक नाशवंत होण्याचा धोकाही होत नाही…उन्हाळ्या असो वा पावसाळा, वा हिवाळयाचा कडाका , दाण्याच्या शोधात गावात करावा लागतोच फेरफटका… हि आम्हाला पक्ष्यांना नैसर्गिक शिकवण दिलीयं.. गरजेपुरते आजचे घ्या आणि इतर भुकेलेल्यांना शिल्लक ठेवा निस्वार्थ बुद्धीने.. त्यामुळे कधीही कमतरता पडलीच नाही, भुकबळी झालाच नाही, ना चाऱ्यासाठी आपापसांत भांडण तंटे, चोऱ्यामाऱ्या झाल्या नाहीत.. जे आम्हाला माणसांच्या जगात नेहमी दिसत आलयं.. जे मिळालयं त्यात तृप्तता आमच्या अंगाखांद्यावर दिसून येते..निसर्गत: सामाजिक बांधिलकीची समज असते ती आपल्या सर्वप्राणीमात्रात फक्त आम्हाला उमजलीय .. नि तुम्हा मानवांना स्वार्थाचा तण जो असतो तो मात्र उमजून घेण्याची तसदी घेत नाही… ती लवकरच उमजून यावी हि त्या जगनियंत्याला प्रार्थना..

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “त्या तीन कविता…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

“त्या तीन कविता…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आपल्याला वाचनाची गोडी असली की आपण वेळ मिळेल तेव्हा,वाचायला जे मिळेल ते अधाशासारखं वाचीत असतो.वाचतावाचता काही साहित्य मात्र मेंदूच्या कप्प्यात, ह्रदयाच्या गाभाऱ्यात अलवार जाऊन विराजमान होतं आणि कायमस्वरूपी ठाणच मांडून बसतं. वाचतांना एक गोष्ट लक्षात आली लेखन करतांना पद्यरचना जरा तरी लिहावयास सुलभ कारण आपल्याला जे सांगायचं असतं त्यासाठी भरपूर लेखन आपण करु शकतो पण त्यामानाने गद्यलेखन मात्र जरा अवघड, किचकट कारण अत्यंत कमी शब्दांत आपल्याला सगळं सार उलगडून सांगावं लागतं. त्यामुळेच कविता,चारोळ्या करणाऱ्या मंडळींच जरा जास्त कौतुक वाटतं.

अशाच तीन कविता माझ्या डोक्यात फिट बसल्यात, मनात घर करून बसल्यात. त्या तीन कविता म्हणजे प्रणय पत्रिका, चाफा बोलेना आणि गाई पाण्यावर…..

दरवेळी ह्या कविता वाचतांना, ऐकतांना नव्यानेच ऐकल्यागत एक वेगळीच ओढ,उर्मी जाणवते. मग अजून अभ्यास करता लक्षात आलं की ह्या तिनही कवितांचा रचयिता ही एकच व्यक्ती आहे.आज ह्या कवीचा जन्मदिन.  त्यांना विनम्र अभिवादन.

कवी “बी” म्हणजेच कवी नारायण मुरलीधर गुप्ते ह्यांनी प्रणय, कौटुंबिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवर कविता केल्या आहेत.  मी मागेच कवी बी ह्यांच्या विषयीचा समग्र लेख त्यांच्या दोन  कवितांबद्दल लिहीला होताच. आज त्यांच्या प्रणय पत्रिका ह्या कवितेबद्दल विचार करू.

त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्‍हाडात चिखलदरा येथे दिनांक १४ सप्टेंबर १८९१ रोजी लिहिली गेली. त्यावेळी ते सुमारे १९ वर्षांचे असावेत. अवघं एकोणवीस वर्षांचे वय,त्यावेळेचा काळ आणि विषय प्रणय पत्रिका म्हणजे एक धाडसचं. अजूनही ह्या विषयाच्या उल्लेखाने भु्वया ह्या उंचावल्या जातात. त्याकाळी हा विषय हाती घेणं म्हणजे एक दिव्यच. ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली.

अनेक दिवस झाले तरी प्रियकराची क्षेमकुशल सांगणारी खबरबात असलेले पत्र  आले नाही म्हणून जरा बावरलेल्या,चिंताग्रस्त  प्रेयसीने आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका’..काय नसतं ह्या भावनेत, एक उत्कटता,काळजी,प्रेम ,घालमेल ह्या सगळ्याचा अविष्कार.

किति तरि दिन झाले ! भेट नाही पदांची,

करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.।।

ह्या ओळींवरुन बरेच दिवस भेट न झाल्याने होणारी तगमग,ओढ जाणवते.भेट न झाल्याने क्षण न क्षण हा हळूहळू युगासारखा भासू लागतो.

    तरल मन नराचे राहते ऐकते मी

    विसर बघुनि पावे अन्य पात्रास नामी.

    ह्या तरल भावनेचा,मानसिकता गुंतवणूकीचा

विसर तर पडला नसेल ना ह्या भितीने मनात घर केल्या गेल्यावर ह्या ओळी सुचतात.

     कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी

      अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.

 

     विसर पडुनि गेला काय माझाही नाथा ?

     म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

त्या भ्रमराला नित्य सहवासात म्हणजे कोषात ठेवल्याने हे प्रेम वाढीस लागतं .तुझं हे मौन प्रेमाचा विसर पडल्याचं द्योतक तर नाही ही भिती वारंवार जाणवते.

ह्यात एक दुसराही गहन अर्थ लपलायं तो म्हणजे प्रेयसीचा उद्वेग, वैताग, तडफड हा प्रेमाचा एक अविष्कार तर तेवढीच तीव्रता तिचा प्राणप्रिय सखा आपल्या मौनाद्वारे मनातल्या मनात दाबून टाकतो.

“चाफा बोलेना,चाफा चालेना” ही कविता आम्हाला अकरावी,बारावीत मराठी अभ्यासक्रमात होती.खरतरं  घटना एकचं, पण निरनिराळ्या व्यक्ती ह्या घटनेकडे वेगवेगळ्या अँगलने बघतात.हे बघितल्यावर अचंबित व्हायला होतं.”चाफा”ही कविता खरतरं पूर्णतः सहजासहजी कोणाला नीटशी कळत नाही. बरेचदा वाटतं हे प्रेमगीतं असावं,तर कधीतरी अचानकच वाटायचं हे त्यापलीकडेही काहीतरी कळण्यासंदर्भात वेगळं किंवा त्यापलीकडचं पण असावं. ही आपल्यातील आपल्यावरच आपलेपणाने रुसलेली एक काव्य प्रतीभाच आहे असही कधीकधी भासून जात़ं.

तसेच “गायी पाण्यावर” ही कविता तर बापलेकीच्या नात्याचा एक सर्वोत्तम दाखलाच जणू. कळायला लागल्यानंतर बाबा ही कविता गुणगुणायचे तेव्हा बापलेकीच्या अलवार नात्यानं भडभडून यायचं.अजूनही ह्यातील ओळी कानी पडल्या तरी मन आपोआपच कातर,हळवं हे होतचं.

या तिन्ही कवितांवर लिहावे तेवढे थोडेच  आहे.कवी बी म्हटले की या तीन कविता प्रामुख्याने डोळ्यासमोर  येतात. लिहावेसे वाटले म्हणून  ‘प्रणय पत्रिके’ विषयी थोडे लिहून थांबते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(“सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये” हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.) इथून पुढे —- 

एका चकमकीत, त्याच्या युनिटच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोर सैनिकांच्या चौकीला वेढा घातला होता. बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती. शेवटी, निकराचा हल्ला चढवून भारतीय सैनिकांनी पाकिस्तान्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढला. चौकीमध्ये पाकिस्तानी सैनिकांची प्रेते इतस्ततः पडलेली होती. भारतीय हद्दीत छुपी घुसखोरी केलेली असल्याने त्या सैनिकांच्या अंगावर युनिफॉर्मऐवजी स्थानिक रहिवाश्यांसारखेच कपडे होते. मात्र, हे आपल्या आयुष्यातले शेवटचेच युद्ध असल्याचे ओळखून, मुलकी कपड्यांमधल्या त्या प्रत्येक सैनिकाने छातीवर आपापली पदके लावलेली होती! एक सच्चा सैनिक म्हणून वीरमरण पत्करण्यासाठी त्यातला प्रत्येकजण सज्ज होता!

चौकीवर विजय मिळवल्यानंतर या भारतीय मेजरने सर्वप्रथम, पाकिस्तानी सैनिकांच्या ओळखपत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली. एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी सेनेकडे पाठवून, त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली! 

काही काळानंतर त्याला समजले की त्याच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता!   

त्याच युद्धात, बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळे त्याचा चेहरा असा विचित्र, आणि ओबड-धोबड झालेला होता, हेही सहजच बोलल्यासारखे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याच्या मणक्यांमध्ये आणि पायांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते. म्हणूनच, सोबतच्या महिला सहप्रवाश्यांना तो स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकला नव्हता हेही त्याने काहीश्या दिलगिरीच्या स्वरातच सांगितले! 

आर्मीच्या डॉक्टरांचे तो तोंड भरून कौतुक करीत होता. “माझे फाटलेले थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा त्यांनीच तर दिला ना!” हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. त्याउलट, एक मिश्किल भावच मला जाणवला! मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या त्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटले? असे आम्ही विचारताच तो हसून म्हणाला, “माझी बायको, आणि आमची सहा वर्षांची मुलगी म्हणतात, आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो!”

काश्मिरातल्या खेड्या-पाड्यांमधल्या घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणे आणि त्यांना ठार करणे, हे त्याच्या मते सगळ्यात अवघड काम होते. (त्यावेळी नुकताच मुंबईवर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता.  सैन्यदलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी ‘ताज’ हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली). 

“Cordon & Search कारवाई म्हणजे एक जीवघेणा लपंडावाचा खेळ असतो. त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. अशा कारवाया बहुदा रात्रीच्या अंधारातच होतात. संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एकेक घर तपासत जातो. अतिरेकी नेमका कुठे लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो. त्याला बेसावध गाठून आम्ही ठार करणार, की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र ‘काळ’च ठरवतो!”

मेजर शांतपणे बोलत राहिला, “आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो आहोत.  पण, अतिरेकीसुद्धा अधिक शहाणे झाले आहेत. ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम धरत नाहीत. मांड्यांवर गोळ्या झाडतात. मांडीमधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीने हॉस्पिटलात न्यावेच लागते. नाही तर अत्यधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि अतिरेक्यांना नेमके तेच हवे असते.” 

ऐकता-ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप केंव्हाच उडून गेली होती. मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन, जणू तो थरार प्रत्यक्ष अनुभवत होतो. 

मी सहज त्याला विचारले, “अतिरेक्यांविरुद्धच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला एखादे शौर्यपदक मिळाले असेल ना?”

“नाही, मॅडम.”

मी आश्चर्यानेच विचारले, “का बरं? का नाही मिळालं?”

“मॅडम, मी जे केलं, ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्यपदक देणं सुरु केलं, तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल!” तो हसत-हसत म्हणाला. 

त्याच्या या अनपेक्षित उत्तराने आम्ही सगळेच अवाक झालो होतो. आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होते, ती त्याच्या दृष्टीने जणू एखादी सामान्य घटनाच होती. 

कदाचित, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे तेच दैनंदिन जीवन असेल! 

निःस्वार्थ सेवा म्हणजे काय, ते मला माझ्या डोळ्यासमोर, मूर्तस्वरूपात दिसत होते, आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते.  

एका सहप्रवाशाने अचानकच विचारले, “कुठून येते ही एवढी प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये?”

“या देशावर, देशवासीयांवर असलेले प्रेम, आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?”

अगदी सहजपणे त्याने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मला माझे लहानपण आठवले. त्या काळी, सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे. आम्ही सगळे उठून उभे राहायचो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौजमजा करण्याचे, सुट्टीचे दिवस नव्हते. आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो, आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो. “जय जवान, जय किसान” हे वाक्य उच्चारत, मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो. 

आजदेखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वीइतकीच नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात, खोल कुठेतरी, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे. मात्र, तो मनातच न ठेवता, बाहेर काढून, झाडून, झटकून, छातीवर मिरवायची आज गरज आहे. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला होत राहिली तरच आपल्या वागण्या-बोलण्यातही तो आदर दिसत राहील. 

“… मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?” —- “जय हिंद”

– समाप्त –

मूळ इंग्रजी अनुभव लेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]— ९४२२८७०२९४ (#केल्याने भाषाटन) 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ II विठ्ठलनामाचा रे टाहो II ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ II विठ्ठलनामाचा रे टाहो II ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

।। परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ।। 

ज्येष्ठ अर्धा सरलाय ,आकाशात ढगांची जमवाजमव सुरु झालीय ..या दिवसात आकाशात मळभ दाटून येतं पण मराठी मन मात्र मरगळ झटकून एका निराळ्याच चैतन्ययात्रेची वाट पहात असतं.त्याला आषाढी एकादशीला पंढरपुरात जाऊन त्या सावळ्या परब्रह्माचं दर्शन घ्यायचं असतं.शतकानुशतकं ही चैतन्यदायी परंपरा मराठी माणसानं जिवंत ठेवली .

कदाचित पंढरपूरची वाट चालून आमची पावलं प्रत्यक्ष मळणार नाहीत ,पण मनं अबीर गुलालानं रंगल्याशिवाय कशी रहातील ? मग वाटतं की पांडुरंगाच्या भेटीकरता निदान मानसवारी करु ! मनाच्या वाटेवर ओव्यांचं शिंपण घालू ,कवितांच्या रांगोळ्यांनी नटवू ,आरत्यांचे दीप लावू , चित्रगीतांच्या पताका उभारु आणि लोकगीतांनी ती वाट दुमदुमवून टाकू ! 

या वाटेवरुनच पोचायचं मनगाभार्‍यात आणि तिथं विराजत असलेल्या त्या श्रीमूर्तीचं दर्शन घ्यायचं अंतःचक्षूंनी ..तो आपली वाट पहातोच आहे ..

अनेक संतांनी विठ्ठलाच्या योगमूर्तीचं वर्णन करणाऱ्या सुंदर रचना केल्यात.

ही परंपरा किती जुनी? सातव्या आठव्या शतकात भारतभ्रमण करताना आदि शंकराचार्य भीमेच्या तटावर आले असतील.. या भूमीवर आल्यावर हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर महायोगपीठ असल्याची जाणीव त्यांना झाली असेल..आणि मग त्या योगिराजाचं सगुण दर्शन झाल्यावर त्याचं वर्णन करणारं हे नितांतसुंदर पांडुरंगाष्टक त्यांच्या अमृतवाणीतून झरलं असेल..

॥ परब्रह्मलिंगं भजे पांडुरङ्गम् ॥

महायोगपीठे तटे भीमरथ्या        

वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः ।        

समागत्य निष्ठन्तमानंदकंदं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ १ ॥        

 

तटिद्वाससं नीलमेघावभासं        

रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम् ।        

वरं त्विष्टकायां समन्यस्तपादं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ २ ॥

 

प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां        

नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात् ।        

विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ३ ॥

 

स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशे        

श्रिया जुष्टकेयूरकं श्रीनिवासम् ।        

शिवं शांतमीड्यं वरं लोकपालं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ४ ॥

 

शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं        

लसत्कुण्डलाक्रांतगण्डस्थलांतम् ।        

जपारागबिंबाधरं कञ्जनेत्रं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ५ ॥

 

किरीटोज्वलत्सर्वदिक्प्रांतभागं        

सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः ।        

त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम॥ ६ ॥

 

विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं        

स्वयं लीलया गोपवेषं दधानम् ।        

गवां बृन्दकानन्ददं चारुहासं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ७ ॥

 

अजं रुक्मिणीप्राणसञ्जीवनं तं        

परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् ।        

प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं        

परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॥ ८ ॥

 

स्तवं पाण्डुरंगस्य वै पुण्यदं ये        

पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यम् ।        

भवांभोनिधिं ते वितीर्त्वान्तकाले        

हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति ॥ ९ ॥

 

भीमेच्या तीरावर आहे ते पंढरीचं महायोगपीठ ! 

तिथं पुंडलिकाच्या भेटीकरता तो आनंदकंद युगानुयुगं उभाच आहे ! त्या भक्तवत्सलास नमस्कार ! 

सजल श्यामवर्णी मेघातून वीज चमकावी तसं त्याचं तेज , रमेच्या हृदयात विराजमान होणारं त्याचं चित्तप्रसादक रुप ,त्याचे नेटके समचरण ,यानं जे नेत्रसुख होतं ,त्यापुढं स्वर्गही फिका पडेल ! त्या राजस सुकुमार मदनपुळ्यास वंदन ! 

तो कमरेवर हात ठेवून सांगतो आहे ,बघ जीवनाचा सागर माझ्या कमरेइतकाच खोल आहे ! माझ्या भक्ताला मी सहज त्यापार पोचवतो ..अन् तिथून केवळ चार बोटांवर ब्रह्मलोक ,असं नाभीकडे बोटं करुन सहज दाखवतो आहे, त्या दयानिधीस नमन ! 

कंठात झळाळता कौस्तुभमणी ,भुजांवर केयूरबंध ,शिरी धरलेलं शिवलिंग नि हृदयात लक्ष्मीचा वास असं हे रमणीय रूप ! शारदीय पौर्णिमेसारख्या तेजाळ सुहास्य मुखचंद्रावर कुंडलांची रत्नप्रभा फांकलेली, सूर्यबिंबासम रक्तवर्णी असलेल्या जास्वंदीसारखे त्याचे अधर ,आणि ते आकर्ण कमलनयन ! 

त्याच्या हिर्‍याचा झळाळत्या मुकुटानं आसमंत तेजाळला आहे ,त्याला पुजण्याला देवही हाती रत्नमाला घेऊन उभे आहेत .तीन जागी वाकून उभा राहिल्यानं अन गळ्यात वनमाळा नि मुकुटात मोरपीस ल्यायल्यामुळं तो बाळकृष्णच शोभतो आहे ..

ह‍ाच लीलानाटकी सर्वसंचारी गोपालक .. हाच वेणूचा नाद ,हाच वादक .गोपगोपींना मोहक हास्यानं वेड लावणारा हाच ! याला ना आदि ना अंत,

हा अजन्मा -अजर -अमर -अनुपम -अद्वितीय !

हा दीनबंधू ,हा कृपासिंधू . हे रुक्मिणीचे चित्सुखधाम ,हा जगताचा विश्राम .

याच्या केवळ दर्शनानंच मोक्षाचा लाभ होतो .

या परब्रह्मलिंगाच्या उपासनेचं हे स्तोत्र  आपल्या वाणीवर कानावर आणि मनावर संस्कार करतं.शक्य तर हे मुखोद्गत करावं, निदान काही निमित्ताने ठरवून ऐकावं आणि अपार प्रसन्नतेची अनुभूती घ्यावी!

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ ओंजळ… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रोज सकाळी उठताना ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती….’ ‘म्हणत दोन्ही हाताची ओंजळ सर्वप्रथम डोळ्यासमोर येते आणि ‘प्रभाते कर दर्शनम्’….’ म्हणत रोजचा दिवस दाखवणाऱ्या परमेश्वराला त्याच हाताने आपण नमस्कार करतो !

‘ओंजळ’ म्हटली की डोळ्यासमोर येतो तो कर्ण ! सकाळच्या वेळी गंगेच्या पाण्यात उभा राहून सूर्याला अर्घ्य देताना केलेल्या ओंजळीतून पाणी देत असलेला ! दानशूर कर्णाची ओंजळ कधी रीती रहा ]त नव्हती.  गंगा स्नानानंतर तो हा दानयज्ञ ओंजळीने करीत असे !  दानशूर कर्णाची भरली ओंजळ ज्याला जे पाहिजे ते देण्यात व्यस्त असे ! त्यामुळे कर्णाकडून कोणाला काही पाहिजे असेल तर ते सूर्योदयाला दानाच्या वेळी त्याला भेटले तर मिळत असे. इंद्राने त्याची कवच कुंडले ही अशाचवेळी मिळवली. 

‘ओंजळ’ हे दातृत्वाचे प्रतीकच आहे जणू ! दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना जुळवून ओंजळ तयार होते. तहानलेल्या माणसाला ओंजळीत पाणी ओतत असताना प्यायले की पोटभर पाणी प्याल्यासारखे वाटते, तसेच ओंजळभर धान्य एखाद्याच्या झोळीत टाकले की झोळी भरल्यासारखी होते. ओंजळ ही नेहमी भरलेली असावी. दानासाठी आपण हाताचे महत्त्व सांगतो, तसेच ओंजळ ही नेहमी दोन हाताने काही देण्यासाठीच असते !

फुलांनी भरलेली हाताची ओंजळ डोळ्यासमोर आली की मन प्रसन्न होते. सकाळच्या वेळी जर कोणी सुवासिक जाई, जुई, मोगरा, बकुळी यासारखी फुले ओंजळ भरून दिली तर अगदी श्रीमंत असल्यासारखेच वाटते मला ! त्या फुलांचा वास भरभरून मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो आणि तीच फुले देवाच्या देव्हाऱ्यात सजलेली पाहताना ते फुलांनी सजवलेले परमेश्वराचे रूप पाहून मन भरून येते ! 

ओंजळ हे छोटेसे प्रतीक आहे जीवनाचे ! आकाशात भरून आलेला पाऊस हत्तीच्या सोंडेने जरी धरतीवर कोसळत असला तरी त्या धारेची साठवण आपण हाताच्या ओंजळीत करतो तेव्हा ती सीमित असते. ओंजळ आपल्याला तृप्त राहायला शिकवते असे मला वाटते !….. भुकेच्या वेळी मिळालेले ओंजळभर अन्न  किंवा तृषार्त असताना मिळालेले ओंजळभर पाणी याचे महत्त्व माणसाला खूपच असते. अशावेळी तृप्तीचे आसू आणि हसू आल्याशिवाय रहात नाही. जे मिळते ते समाधानाने घ्यावे, त्यातच जीवनाचे सार सामावलेले असते ! 

ओंजळ भरून लाह्या जेव्हा पती-पत्नी लाजा- होमात घालत असतात तेव्हा हीच त्यागाची भावना एकमेकांसाठी मनात भरून घेतात ! जीवनाच्या वेदीवर पाऊल टाकताना नवरा- बायको लाह्यांची ओंजळ समर्पण करून एकमेकासाठी आपण आयुष्यभरासाठी जोडलेले आहोत ही जाणीव एकमेकांना देत असतात., तर कन्यादानाच्या वेळी मुलीचे आई-वडील आणि नववधू- वर हाताच्या ओंजळीत पाणी घेतात, जणू आई-वडिलांकडून कन्येचे दान या ओंजळीतून होत असते !

‘ओंजळभर धान्य ‘ या संकल्पनेतून घराघरातून धान्य जमा करून एका सेवाभावी संस्थेत देत असलेले ऐकले आहे. त्याठिकाणी प्रत्येक घरातून आलेल्या ओंजळभर धान्याचे रूपांतर एका खूप मोठ्या धान्यासाठ्यात होते. देणाऱ्यांना एक ओंजळभर धान्य देताना फारसा त्रास वाटत नाही, पण अशा असंख्य ओंजळीच्या एकत्रीकरणातून नकळत खूप मोठी समाजसेवा घडत असते… गोंदवलेकर महाराज म्हणत असत की दारी आलेल्या भुकेल्या माणसाला कधी हाकलून देऊ नये. फार तर त्यांना पैसे देऊ नयेत पण ओंजळभर धान्याची भिक्षा द्यावी. त्याकाळी अन्नदानाचे पुण्य मोठे वाटत असे आणि त्या अन्नाचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळत असे.

आपण लक्ष्मीचे चित्र बघतो तेव्हा ती ओंजळीने नाणी ओतत असते आणि तिची ओंजळ सतत भरभरून वाहत असते ! अशा लक्ष्मीची कृपा आपल्यावर सतत राहू दे असंच मनात येते. लक्ष्मीपूजनाला आपण अशा लक्ष्मीची पूजा करतो. 

आत्ता सहज आठवली ती व्ही. शांताराम यांच्या चित्रपटात सुरुवातीला दाखवली जाणारी कमनीय स्त्री, जी ओंजळीतून फुले उधळीत असते.  त्या कमनीय  देहाचे सौंदर्य त्या ओतणाऱ्या ओंजळीतून इतके प्रमाणबद्ध रेखाटले आहे की, ते चित्र आपल्या सर्वांच्या मन: पटलावर कोरले गेले आहे !

आपल्या दोन हातावरील रेषा आपले भविष्य दाखवतात असे आपण म्हणतो. जेव्हा ते दोन हात एकत्र येतात आणि जी ओंजळ बनते ती आपल्याला काम करण्यास प्रवृत्त करते. अशी ही ‘ओंजळ’ शब्दबद्ध करताना माझी शब्दांची ओंजळ अपुरी पडते असे मला वाटते ! पण भावपूर्ण शब्दांच्या या ओंजळीला सतत ओतत राहण्यासाठी सरस्वती मला साथ देऊ दे, असंच या छोट्या ओंजळीसाठी  मला वाटते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ संसारी लोणचं… लेखक : श्री. प्रमोद पाटकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

संसारी लोणच्याच्या फोडी आधी करकरीत असतात,

नंतर कुरकुरत का होईना,

हळूहळू मुरतात.

 

हे लोणचं बाजारात मिळत नाही.

कुटुंबानं मिळून ते घालायचं असतं.

त्याशिवाय जगण्याला

चव येत नाही.

 

कडवट शब्दांची मेथी जरा

जपूनच वापरावी.

स्वत:च्या हातांनी कशाला

लोणच्याची चव घालवावी ?

 

जिभेने तिखटपणा आवरला, तर

बराच फायदा होतो.

लोणच्याचा झणझणीतपणा

त्यानं जरा कमी होतो.

 

‘मी’पणाची मोहरी जास्त झाली,

तर खार कोरडा होतो

इतरांच्या आपुलकीचा रस

त्यात उगाच शोषला जातो.

 

रागाचा उग्र हिंग तसा तितकासा

बाधत नाही.

लवकर शांत झाला तर

लोणच्याची चव बिघडत नाही.

 

प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते.

विकारांच्या बुरशीपासून संरक्षणही करते.

 

समृध्दीचं तेल असलं, की

काळजीचं कारण नसतं.

त्या थराखाली लोणचं बरचसं सुरक्षित असतं.

 

लोणचं न मुरताच नासावं, तसं काही संसारांचं होतं.

सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण बहुधा कमी पडलेलं असतं.

लेखक : श्री.प्रमोद पाटकर

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “नात…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “नात…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

जोडल तर आपल असत. तोडल तर मात्र ना….. ते….. आपल असत. आणि नाही ते समोरच्याच.

नात म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. अगदी एकमेकांच्या पाठीला पाठ लावून असतात. या दोन बाजूमुळेच नात्याला किंमत असते.

या पैकी कोणतीही एक बाजू दुसऱ्या बाजूपासून वेगळी करता येत नाही. आणि करण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत रहात नाही.

आपण सोबत असलो तरच आपल्याला किंमत आहे हे दोन्ही बाजूंनी समजून घ्यायच असत. आणि हे सगळ्या नात्यांच्या बाबतीत आहे. बऱ्याचदा तर काही नात्यामुळेच आपली ओळख असते.

नोटांच बांधून ठेवलेल बंडल आपण अनेक वेळा अनेक ठिकाणी पाहिल असेल. जेव्हा एक एक नोट या बंडलमध्ये जाते तेव्हा प्रत्येक नोटेची किंमत जरी तेवढीच रहात असली तरी बंडलची एकूण किंमत मात्र वाढत असते. तसच या बंडल मधून नोट काढल्यावर त्या नोटेची किंमत तेवढीच रहात असली तरी बंडलची एकूण किंमत मात्र कमी होते.  यापेक्षा आणखीन काहीही वेगळ नात्यांमध्ये नसत. आपल्या नात्याची किंमत एकत्र राहिल्यानेच वाढते.

नात्यानुसार, वयानुसार व्यक्तिची किंमत वेगळी असली तरी जेव्हा ते नातं म्हणून ओळखल जात तेव्हा दोघांची किंमत असते. आणि आपल्यामुळे दुसऱ्या बाजूला किंमत राहणार आहे हे लक्षात ठेवायच असत.

लहान मुलाला चालतांना आधार म्हणून आपण आपल बोट धरायला देतो. तसच वृध्द व्यक्तीला देखील देतो. त्यांना आधाराची गरज असते ती आत्मविश्वास यावा म्हणून. आणि तो आधार दिला की आत्मविश्वास येतो हे नात शिकवत. मग ते अगदी काही वेळासाठीच असल तरी सुद्धा.      

सगळी नाती कायम स्वरुपाचीच असतात अस नाही. फक्त ते जोडायची मनाची तयारी असली पाहिजे.

नात हे बंधनात अडकवत. पण नात हे रक्ताचच असल पाहिजे अस बंधन अजीबात नसत. रक्ताच्या नात्या इतकीच घट्ट ती असू शकतात.

नात हि अशी गोष्ट आहे की ती एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या नात्याने स्वतः कडे आणि इतरांकडे बघायला शिकवते. जबाबदारीची जाणीव करून देते. एक नात जोडल की अनेक वेगवेगळी नाती त्या सोबत आपोआप जोडली जातात. आणि एक तुटल की अनेक तुटतात.

नात जोडायचा मोठेपणा मनात असला की नात्यातला मोठेपणा आपोआप मिळतो. नात एकमेकांना जवळ आणत. तसच जवळ आलेली एकमेकांत नात्याने बांधली जातात.

नात मग ते कोणतेही असो. हा ठेवा आहे‌. नाती होती, आणि आहेत, ती राहतील सुध्दा…….जर आपण ती समजून घेतली, फुलवली, आणि सांभाळली तर….. नात्यात रंगलो की नाती आपोआप रंगतात. ती रंगवावी लागत नाही.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विठ्ठल ! विठ्ठल !” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

? मनमंजुषेतून ?

☆ विठ्ठल ! विठ्ठल !☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

विठोबा. मला मनापासून आवडतो.अगदी लहान असल्यापासनं. कमरेवर हात ठेवून उभा ठाकलेला.. .गालातल्या गालात खुदकन् हसणारा. काळासावळा.साधासुधा. आपला देव वाटतो.

पंढरपूरला गेलो की सहज भेटायचा. आपुलकीनं बोलणार. ‘ काय, कसा काय झाला प्रवास ? यावेळी अधिकात येणं झालं. जरा गर्दी आहे. चालायचंच. सगळी आपलीच तर माणसं. असं करा.उद्या सक्काळी सक्काळी या. काकडआरतीला. मग निवांत बोलू.’ मला पटायचं. 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाचच्या सुमारास मी एकटाच मंदिरात जायचो. फारशी गर्दी नसायचीच. विठोबा निवांत भेटायचा. वेगळ्याच दुनियेत गेल्यासारखं वाटायचं. काकडआरती चाललेली. धूप उदबत्तीचा  सुगंध. सगळं अदभुत. एवढ्या गर्दीतसुद्धा विठोबा माझ्याकडेच बघायचा. डोळ्यातल्या डोळ्यात हसायचा. “अरे वा ! आज सकाळी सकाळी दर्शन. वा ! वा! आनंद वाटला. काय कसा काय चाललाय अभ्यास ? तेवढं गणिताकडे लक्ष द्या. पुढच्या वेळी याल तेव्हा पाढे पाठ पाहिजेत हं तीसपर्यंत. जरा लिहायची सवय ठेवा. आम्ही पाठीशी आहोतच.तरीही तुम्ही मेहनतीत कमी पडता कामा नये. बाकी अक्षर छान आहे हो तुमचं…”

मला भारी वाटायचं. “तीसपर्यंत पाढे नक्की पाठ करतो. गाॅडप्राॅमीस.” मी गाॅडप्राॅमीस म्हणलं की विठोबा गालातल्या गालात गोड हसायचा. “बरं बरं..”

देवाशपथ सांगतो. लहान असताना विठोबाशी असं सहज चॅटींग व्हायचं. माझे आजी आजोबा. पालघरला  रहायचे. दरवर्षी दोघंही वारीला जायचे. चातुर्मासात चार महिने पंढरपूरला जाऊन रहायचे. दरवर्षी आम्हीही जायचो पंढरपूरला. साधारण 80 ते 85 चा सुमार असेल. चार पाच वर्ष सलग जाणं झालं पंढरपूरला. तेव्हा महापूजा असायच्या. आजोबांच्या पंढरपूरात ओळखी फार. माझे दोन्ही मामा मामी, आई बाबा सगळ्यांना महापूजेचा मान मिळाला. गाभाऱ्यातला विठोबा आणखीनच जवळचा झाला. हिरव्याकाळ्या तुळशीची माळ काय छान शोभून दिसायची विठोबाला. त्याच्या कपाळावरचं ते गंध. दूध दह्यानं घातलेली आंघोळ. विठोबाच्या चेहऱ्यावरील अलौकिक तेज. त्याचे ते अलंकार. लगोलग हात जोडले जायचे. असं वाटायचं पूजा संपूच नये कधी….

पंढरपूरला आजी आजोबा बांगड धर्मशाळेत रहायचे. धर्मशाळा नावालाच. अतिशय उत्तम सोय. सेल्फ कंटेन्ड रूम्स. भल्यामोठ्या. दोन खोल्यात आजीआजोबांचा संसार मांडलेला असायचा. गॅसपासून सगळी सोय. आम्ही गेलो की दोन खोल्या अजून मिळायच्या. प्रत्येक खोलीसमोर रूमएवढीच भलीमोठी गॅलरी. तीन चार मजली मोठी इमारत. नवीनच बांधलेली. अतिशय लख्ख स्वच्छ. धुडगूस घालायला पुरेपूर स्कोप. समोरचा वाहता रस्ता. गॅलरीत रेलिंगला टेकून रस्त्यावरची गंमत बघायला मला जाम आवडायचं. ही जागा मंदिरापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. पंढरपूरला गेलो की दोन दिवस रहाणं व्हायचंच व्हायचं. सकाळी महापूजा आवरली की दिवस मोकळा. मी चौथी पाचवीत असेन तेव्हा.

सक्काळी सक्काळी जाग यायची. लाऊडस्पीकरवर भीमसेन आण्णांचा आवाज कानी पडायचा. “माझे माहेर पंढरी…”. आपण युगानुयुगे पंढरपूरला रहातोय इतकं प्रसन्न वाटायचं. सगळं आवरून मी शून्य मिनिटात तयार व्हायचो. मग आजोबांबरोबर चंद्रभागेतीरी. बोटीत बसायला मिळावं ही प्रामाणिक इच्छा. मी पडलो नगरवाला. पाऊस, पाणी, नदी, बोटींग या गोष्टी परग्रहावरल्या वाटायच्या. नदी पाण्यानं टम्म फुगलेली. माझी बोटींगची इच्छा विठोबा, थ्रू आजोबा सहज पूर्ण करायचा. चूळूक चूळूक आवाज , ओल्या पाण्याचा हवाहवासा वास, घाटांवर विसावलेली असंख्य कळसांच्या भाऊगर्दीत हरवलेली पंढरी. अलंकापुरी. हे स्वर्गसुख बघायला दोन डोळे पुरायचे नाहीत. 

चंद्रभागेला भेटून पुन्हा बांगड धर्मशाळेत परतायचं. तोवर आजीचा स्वयंपाक झालेला असायचा. जेवण झालं की मी पुन्हा गुल. तेव्हाही पंढरपूरात गर्दी असायचीच. तरीही आजच्याइतकी नाही. भलीमोठी दर्शनरांग, दर्शनमंडप वगैरे नसायचं. दिवसातून ईन्फाईनाईट टाईम्स मी मंदिरात जायचो. दहा पंधरा मिनिटात सहज दर्शन व्हायचं. विठोबाशी मैत्र जुळायचं. कंटाळा आला की नामदेवाच्या पायरीपाशी जाऊन बसायचो. 

मला आठवतंय, एके दिवशी सकाळी नामदेवपायरीपाशी गेलेलो. एक वारकरी नाचत होता. हातात चिपळ्या. गळ्यात वीणा आणि तुळशीच्या माळा. कपाळी गंध. कुठलातरी अभंग म्हणत होता. दिवसभरात चार पाच वेळा चकरा झाल्या माझ्या तिथं. प्रत्येक वेळी तो भेटला. भान हरपून नाचणारा. मला रहावलं नाही. सुसाट धर्मशाळेत गेलो. आजीला सगळं सांगितलं. ” सकाळपासून नाचतोय बिचारा. जेवला सुद्धा नाही गं.” आजी खुदकन् हसली. “तोच खरा विठोबा. जा नमस्कार करून ये त्याला.” मी रिवर्स गिअरमधे पुन्हा मंदिरात. त्याला वाकून नमस्कार केला. तो मनापासून हसला. मला कवेत घेतलं. गळ्यातली तुळशीची माळ माझ्या गळ्यात घातली. धन्य. धन्य. काय सांगू राव? त्याच्या डोळ्यात विठोबा हसत होता.

धर्मशाळेत मॅनेजरची खोली होती. विठोबा, ज्ञानेश्वर, तुकाराम आणि इतर अनेक संतांच्या तसबिरी होत्या. वीस पंचवीस असतील. मॅनेजरकडे मोठ्ठी सहाण होती. गंध उगाळायला अर्धा तास सहज लागायचा. मग प्रत्येक तसबिरीला गंध लावणं., जुना हार काढून ताजा हार घालणं, उदबत्ती लावणं. मला हे सगळं बघायला खूप आवडायचं. मॅनेजर माझी परीक्षा घ्यायचे. संतांची मांदियाळी मी बरोबर ओळखायचो. मॅनेजर खूष. बक्षीस म्हणून विठोबाला हार मी घालायचो. बत्तासा मिळायचा. मला भारी वाटायचं.

धर्मशाळेत खालच्या मजल्यावर कुठलेतरी कीर्तनकारबुवा आलेले असायचे. सकाळी त्यांची पूजा आटोपली की रियाज असायचा. मी जाऊन बसायचो. रात्री त्यांचं मंदिरात किर्तन असायचं. साथीदार तयारीचे…  मृदुंगाला शाई लावली जायची. टाळ चिपळ्यांचा आवाज घुमायचा. बुवांची रसाळ  वाणी. प्रेमळ चेहरा. लाईव्ह परफाॅर्मन्स. श्रोता मी एकटाच. कीर्तन मस्त रंगायचं. माझा चेहरा बघून बुवा खूष व्हायचे. सहज शेजारी लक्ष जायचं. वाटायचं विठोबाच शेजारी बसून प्रसन्न चित्ताने कीर्तन ऐकतोय. भारीच.

दुसऱ्या मजल्यावर एक चित्रकार असायचे. संस्थानाच्या कामासाठी आलेले. महाभारत, रामायण, विठोबाची अप्रतिम चित्रं काढायचे. एकदम जिवंत. भल्यामोठ्या कॅन्व्हासवर. मी गुपचूप तिथं जाऊन बसायचो. तासन्तास. हरवून जायचो. मोठा कसबी कलाकार. तासाभरानं त्यांचं माझ्याकडे लक्ष जायचं. मी पटकन् विचारायचो, ” इतकी छान चित्रं कशी काय  काढता ?” ते नुसतेच हसायचे. “मी नाही काढत. विठोबाच रंगवून घेतो माझ्याकडनं.”. झालं. मला कमरेवरचे हात काढून, ब्रश घेवून चित्र रंगवणारा विठोबा दिसू लागायचा. नंतर कळायचं. त्यांनीच काढलेली अप्रतिम चित्रं मंदिरात लावली आहेत. त्यांचं म्हणणं पटायचं.

पंढरपुरातले दोन दिवस शून्य मिनिटात संपून जायचे. दोन दिवसात ईन्फाईनाईट टाईम्स, ईन्फाईनाईट रूपात विठोबा भेटायचा. जड पावलांनी टांग्यात बसायचं. स्टॅन्डवर पोचलो की नगरची गाडी तयारच असायची. टिंग टिंग. डबलबेल. खिडकीतून बाहेर लक्ष जायचं. “या पुन्हा पुढच्यावर्षी…” विठोबा हात हलवून निरोप द्यायचा. डोळ्यात चंद्रभागा दाटून यायची.

नंतर पुन्हा फारसं पंढरपूरला जाणं झालं नाही. आज ठरवून  पासोड्या विठोबाला भेटलो. विठोबा ओळखीचा हसला.

“काय चाललंय ? झाले का पाढे पाठ ?” .मी जीभ चावली.

“बरं…बरं. असू देत.एकदा हेडआॅफीसला जावून या.”

“नक्की…”.मी पंढरपूरचं प्लॅनिंग करायला लागतो.

विठ्ठल ! विठ्ठल…||

©  श्री कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-1 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

बारा-चौदा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. इंदौरमधल्या एका नामवंत शाळेत, आठवड्याभराची कार्यशाळा संपवून मी रेल्वेने मुंबईला परत निघाले होते. 

एसी २-टियरच्या डब्यात, पॅसेजमधला खालचा बर्थ मला मिळाला होता. सूटकेस बर्थखाली ठेवून आणि हँडबॅग खुंटीला लटकावून, हुश्श म्हणत मी बसले. रात्रभराच्या शांत झोपेची मला नितांत गरज होती.

आतील बाजूच्या कूपेमधले चारही प्रवासी आधीच आलेले होते. दोन पुरुष आणि दोन स्त्रिया. एकंदर सोबत तर ठीकठाक वाटत होती. त्या दोन पुरुषांपैकी, वयाने लहान असलेल्या पुरुषाचा चेहरा एका बाजूने वाकडा आणि ओबडधोबड होता. केसही अगदी बारीक कापलेले होते. एकंदरीत, तो दिसायला जरा विचित्रच होता. पण त्याच्याकडे फार काळ रोखून पाहणे वाईट दिसेल, म्हणून मी नजर वळवली. 

एकदाची गाडीत बसून स्थिरावल्यावर, मी मोबाईल बाहेर काढला. नौदल अधिकारी असलेल्या माझ्या नवऱ्याला, माझी हालहवाल, (म्हणजे नौदलाच्या भाषेत, SITREP किंवा Situation Report) कळवणे आवश्यक होते. माझे वडील, सासरे, आणि नवरा अशा तीन ‘फौजी’ लोकांसोबत अनेक वर्षे राहिल्यामुळे, सैन्यदलात वापरले जाणारे कित्येक शब्द माझ्या बोलण्यात आपसूकच येतात!

मी फोनवर बोलत असताना, दणकट शरीरयष्टीचे तीन तरुण आले आणि काहीही न बोलता-विचारता खुशाल माझ्या बर्थवर बसले. नवऱ्याला फोन चालू ठेवायला सांगून मी त्या तरुणांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिले. त्यांच्यापैकी एकाने वरच्या बर्थकडे बोट करून, तो बर्थ त्याचा असल्याचे मला खुणेनेच सांगितले. तात्पुरते समाधान झाल्याने मी पुन्हा नवऱ्यासोबत बोलू लागले. 

त्या तिघांनी, आपसात गप्पा आणि हास्यविनोद करत-करत, हळू-हळू माझ्या बर्थवरची बरीच जागा बळकवायला सुरुवात केली. अंग चोरून बसता-बसता, शेवटी बर्थच्या एका कोपऱ्यात माझे मुटकुळे झाले. मग मात्र मी फोन बंद केला आणि त्या तिघांना उद्देशून सांगितले की मला आडवे पडायचे असल्याने त्यांनी आता माझ्या बर्थवरून उठावे. त्यांच्यापैकी एकाने, बर्थच्या वर लिहिलेली नोटीस बोटानेच मला दाखवली आणि म्हणाला, “रात्री नऊनंतरच बर्थ झोपण्यासाठी वापरता येतो. तोपर्यंत त्यावर बसूनच राहावे असा नियम आहे.”

त्याला चांगले खरमरीत उत्तर मी देणारच होते. पण कुणाला काही कळायच्या आत, कूपेमधला तो विचित्र चेहऱ्याचा मनुष्य उठून माझ्या शेजारी येऊन उभा राहिला. कमालीच्या थंड नजरेने त्या तिघांकडे पाहत, अतिशय मृदू आवाजात, व सौम्य शब्दात, त्याने त्या तिघांनाही दुसऱ्या डब्यात निघून जाण्यास सांगितले. त्यांपैकी एकजण उलटून त्याला काही बोलण्याच्या तयारीत होता. पण माझ्या त्या ‘रक्षणकर्त्या’ च्या थंड नजरेतली जरब त्याला जाणवली असावी. तिघेही मुकाट्याने उठून चालते झाले. 

मी “थँक यू” म्हणताक्षणी त्याच्या तोंडून आलेल्या, “Not at all, Ma’am” या वाक्यामुळे, तो फौजी असणार हे मी बरोबर ताडले. तरीही खात्री करून घेण्यासाठी मी विचारले, “तुम्ही सैन्यदलात आहात का?” 

“होय, मॅडम. मी इन्फन्ट्री ऑफिसर आहे.  महूला एका छोट्या ट्रेनिंग कोर्सकरिता आलो होतो.”

“अच्छा. माझे मिस्टर नौदलात आहेत. माझे वडील आणि सासरे आर्मीमध्ये होते.”

सहजपणे आमच्या गप्पा सुरु झाल्या. देशातील एकंदर वातावरण, आणि विशेषतः काश्मीरमधल्या परिस्थितीकडे आपसूकच बोलण्याचा ओघ वळला. एक-एक करीत इतर सहप्रवासीदेखील आमच्या गप्पात सहभागी झाले. त्या सगळ्यांपैकी कोणीही दिल्लीच्या पुढे उत्तरेला कधीच गेलेले नसल्याने, माझ्यापेक्षा त्यांनाच काश्मीर खोऱ्यातील ‘आँखोंदेखी’ ऐकण्यात अधिक रस होता. पुढचे दोन-तीन तास, अक्षरशः आपापल्या जागेवर खिळून, आम्ही त्या मेजरचे एकेक थरारक अनुभव ऐकत राहिलो. (त्या मेजरचे नाव मी सांगू इच्छित नाही). 

ट्रेनिंग संपवून ज्या दिवशी तो युनिटमध्ये अधिकारी म्हणून दाखल झाला, त्याच दिवशी त्याच्या हातून एक मनुष्य (अर्थातच पाकिस्तानी अतिरेकी) मारला गेला होता, आणि तोही अगदी काही फुटांच्या अंतरावरून! 

ती कारवाई संपल्यानंतर मात्र, जेमतेम २०-२२ वर्षांच्या त्या तरुण अधिकाऱ्याचे मन अक्षरशः सैरभैर होऊन गेले होते. युनिटमधल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची अवस्था ओळखून, त्याची काळजी घेतली आणि योग्य शब्दात त्याची समजूत घातली. एक सेनाधिकारी म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडताना, त्याला अशा अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे याची त्याला जाणीव करून दिली. जणू काही अर्जुनाला भगवान श्रीकृष्णच भेटले! 

युनिटमधल्या सर्व अधिकारी व जवानांमध्ये असणारा बंधुभाव आणि एकमेकांवरचा विश्वास लाखमोलाचा असतो हे त्या मेजरने आम्हाला आवर्जून सांगितले. कारण, याच  भावना आणि हेच  घनिष्ट  परस्परसंबंध, अनेक वेळा जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अभेद्य भिंत बनून उभे राहतात!

मला जाणवले की तो मेजर खराखुरा हाडाचा सैनिक होता. “सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये” हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभव लेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]— ९४२२८७०२९४ (#केल्याने भाषाटन) 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares