मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-1 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पुरोगामिनी सावित्री…’ – भाग-1 ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

एक होता राजा.अश्वपती त्याचं नाव.                                                                

काळ ? महाभारताच्या पूर्वीचा.

राज्य ? मद्र देश.— म्हणजे सध्याचं जम्मू काश्मीर. 

— या प्रदेशाला भारताचं मस्तक उगीच नाही म्हटलं जात. कश्यप ऋषींच्या तपश्चर्येची ही भूमी– पांडित्याची परंपरा असलेला प्रदेश. देशभरातून साधक ,तत्वचिंतक या प्रदेशात आले आणि हिमालयाच्या विशाल, प्रशांत पार्श्वभूमीवर त्यांनी जीवनविषयक चिंतन केले, सिद्धांत मांडले. ज्ञान विज्ञान कला साहित्य इथे बहरले.

आदि शंकराचार्यांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत थोर विभूतींनी इथे चिंतन केले.

त्या काळातील ज्ञानाच्या परंपरेला साजेसा राजा अश्वपती.वैयक्तिक सुखापेक्षा समाज,लोकहित याला प्राधान्य देणारा.राज्याच्या वैभवाला, सुख समृद्धीला आधार होता ते मद्रप्रदेशातील विख्यात, सुलक्षणी, ताकदवान अश्वांचा.मद्र देश उत्तम व प्रशिक्षित अश्व अन्य राज्यांना युद्धाकरता पुरवत असे.या वैभवाला कोंदण होते ते सत्शील व धर्मपरायण अश्वपतीच्या पराक्रमाचे.

पण राजा होता निपुत्रिक.त्या काळच्या पद्धतीनुसार म्हणा किंवा त्या परिभाषेनुसार म्हणा,त्यानं पुत्रकामेष्टी यज्ञ करायचं ठरवलं. इथे आपण कुचेष्टेने हसतो !यज्ञाने का कुठे मुलं होतात, म्हणून.

पण यज्ञ म्हणजे तरी काय ? एखादे ध्येय साध्य करण्या करता केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा.दिवसरात्र त्या ध्येयाचा ध्यास आणि त्या करता शक्य ते सर्व करणे.आहुती द्यायची आपल्या कष्टांची,त्या ध्येयप्राप्तीकरता त्यागाव्या लागणाऱ्या सुखांची.मन एकाग्र करायचं त्या एकाच विचारावर, आणि त्या करता मदत घ्यायची एखाद्या मंत्राची.मानवी प्रयत्न अपुरे असतात याची नम्र जाणीव ठेवून विश्वातल्या चैतन्याला आवाहन करायचं .

अश्वपतीने तेच केलं.विश्वातील शाश्वत सत्य म्हणजे सूर्य.त्याची आराधना करायची.त्याकरता त्यानं गायत्री मंत्राचं अनुष्ठान मांडलं.दररोज एक लाख मंत्र जपायचा.आता हे एकट्यानं शक्य आहे का ? तर नाही .पण त्या करता त्यानं अन्य सत्प्रवृत्त लोकांची मदत घेतली.राजा स्वतः कठोर बंधने पाळत असे.तीन दिवसातून एकदा अन्न ग्रहण करे.असं किती काळ ? अठरा वर्षं केलं.राजाचं देहबल,मनोबल,तपोबल आणि इच्छाबळ किती वाढलं असेल ! 

अखेर या साधनेचं फळ मिळायची वेळ आली.त्याला विश्वमाता प्रसन्न झाली.पण ती म्हणाली, तुझ्या भाग्यात ब्रह्मदेवानं पुत्रयोग लिहिलेला नाही.तुला कन्या होऊ शकते. अश्वपती म्हणाला, तर मग तूच माझ्या पोटी जन्माला ये.राजाचं अजून एक वेगळेपण हे की त्याला अशा संतानाची इच्छा होती जो मानववंशाला सत्याचा मार्ग दाखवेल.तो दिव्य संतान मागत होता ते विश्वकल्याणाची कामना धरून.

आणि मग अशा कठोर प्रयत्नांच्या आणि विशाल हेतूच्या पोटी जन्मली सावित्री!तिला जन्म दिला अश्वपतीची देखणी आणि समंजस राणी मालवी हिनं.राजा राणीनं तिला अत्यंत मुक्त, निर्भर वातावरणात वाढवली.

तिचं उपनयन करून तिला गुरूगृही पाठवली.तिला सर्व प्रकारच्या विद्या,

कला यात पारंगत केली.अत्यंत देखणी,अतिशय बुद्धिमान,कलासक्त, विलक्षण तेजस्वी मनस्वी अशी ही कन्या.हिचं बुद्धिवैभव आणि स्व-तंत्र विचार पेलणारा कुणी युवक राजाला मिळेना.तिच्या विवाहाची चिंता त्याला लागली..

राजानं एक अतिशय धाडसी पाऊल उचललं.सावित्रीला एक सुसज्ज रथ दिला आणि सांगितलं की जा,आणि तुला सुयोग्य असा पती तूच शोध.सावित्री निघाली.किती सुंदर असेल तिचा हा प्रवास !हे काही पर्यटन नव्हते.राजाने विचारपूर्वक दिलेले स्वातंत्र्य,दिलेली संधी होती.सावित्रीच्या वर संशोधना आधी तिला या प्रवासात आत्मशोध घ्यायचा होता.आपण कोण आहोत,जगात काय चालू आहे,आपल्याला भावी आयुष्यात काय साध्य करायचं आहे आणि त्या करता आपल्याला कसा जोडीदार हवा याचं चिंतन तिनं केलं.

ती आसपासच्या राज्यांत गेली.

राजवाड्यांत गेली.तिच्या रूपानं मोहित होणारे देखणे, बलदंड पण अहंकारी राजपुत्र तिला भेटले.तिच्या संपन्न पार्श्वभूमीवर भाळलेले आणि तिच्याकडून निव्वळ देहिक सुखाच्या अपेक्षा करणारे राजपुत्र तिनं पहिले.काही सत्शील पण क्षात्र तेजाचा अभाव असलेले तर काही इतके सत्वहीन की हिच्या दृष्टीला दृष्टीही भिडवू शकले नाहीत.

ती गावात गेली. राबणारे श्रमसाधक तिनं पाहिले,ती आश्रमांत गेली तिथे तिनं अनेक ज्ञान साधक पहिले..तिला आस होती ती सर्वगुणसंपन्न परिपूर्ण पुरुषाची.जो बुद्धी, बळ, ज्ञान, रूप, गुणसंपन्न असेल.. आपलं कर्तृत्व आणि पुरुषार्थ यांसह तिची स्वप्नं जपणारा तिला समान आदर देणारा असेल..जो जीवनाचा अर्थ जाणत असेल, या विश्वनाट्यातील आपली भूमिका समजून निसर्ग आणि भौतिक सुखाचं संतुलन करणारा असेल, जो स्पर्धा, युध्द यापेक्षा संवाद,सहयोग यावर विश्वास ठेवत असेल, जो मनुष्यत्वाला, साहचर्याला, सहजीवनाला पुढच्या पायरीवर नेईल असा जोडीदार..

अश्वपतीचीच लेक ती ! प्रयत्न थोडेच सोडणार !

कुठेही असा परिपूर्ण युवक तिला भेटला नाही म्हणून ती थेट अरण्यात गेली.जिथे तिचे वनबांधव रहात,

जिथल्या जटिल रानातल्या एकाकी स्थानांवर ऋषी तपश्चर्या करत, अशा वनात.तिथे तिला तो भेटला .तिच्या मनातला पुरुषोत्तम,सत्यवान.शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन याचा एकुलता..देखणा-तेजस्वी-बलदंड पण हळुवार अन सच्च्या मनाचा. वनासारखा निर्मळ, शांत, निष्पाप.अहंकारविहीन,नम्र सौम्य बोलणारा.पढतपोपट नाही तर अनुभवश्रीमंत असणारा.वल्कले नेसून वनातील आश्रमात आपल्या मातापित्या सोबत रहाणारा.दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.एकमेकांशी बोलले,एकमेकांना सर्वार्थानं जाणून घेतलं, सावित्रीला सत्यवान त्याच्या आश्रमीय जीवनशैलीसह आवडला. तिनं त्याला मनोमन वरलं. दोघांनी गांधर्व विवाह केला आणि मग सावित्री परतली,आपल्या पित्याला हे सांगायला, की मला माझा जीवनसाथी मिळाला आहे.

ती आनंदाने, उत्साहाने परत आली तेव्हा अश्वपती-मालवी दोघे नारदमुनींशी बोलत बसले होते.तिचा चेहरा पाहूनच सर्वांनी काय ते ओळखले! तिनं सत्यवानाविषयी भरभरून सांगितलं. राज्यातून निष्कासित झालेला शाल्वराज द्युमत्सेन आणि शैब्या यांचा सद्गुणी पुत्र सत्यवान.. अश्वांचे जिवंत पुतळे  बनवणारा सत्यवान.. देखणा व आरोग्यसंपन्न सत्यवान ..

राजा राणी ने सहज नारदमुनींना विचारले की हा युवक तुम्हाला सावित्रीच्या योग्य वाटतो का ? तुम्ही याला ओळखता का? याच्यासोबत आमच्या गुणवती पण मनस्वी कन्येचा संसार सुखाचा होईल का ?

नारद म्हणाले की याच्यासारखा जामात तुम्हाला त्रिभुवन शोधूनही मिळणार नाही.मात्र याच्यात एकच वैगुण्य आहे ते म्हणजे याचे आयुर्मान केवळ एक वर्ष इतकेच उरले आहे.

राजाराणीने सावित्रीला समजावले की याचा मोह सोड आणि पुन्हा वरसंशोधनास जा.पण सावित्री ठाम होती .ती म्हणाली, मी याला तन-मन-अंतःकरणपूर्वक निवडला आहे. माझी बुद्धी, तर्क आणि संवेदना याच्याचकडे धाव घेत आहेत. मी आता माझा निर्णय बदलणार नाही. राहिले दैव, तर मी क्षात्रकन्या आहे. मी जीवनाशीच काय, मृत्यूशीही झुंजेन ! माझ्यावर विश्वास ठेवा .

— क्रमशः भाग पहिला 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “रुजण्या” वरून सहजच… ☆ सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆

सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

??

☆ “रुजण्या” वरून सहजच… ☆ सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे ☆ 

मध्यंतरी lockdown मुळे बाहेर फिरणं बंदच होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ एखादी चक्कर गच्चीवर असायचीच. आमचं राहणं फ्लॅट मध्ये. त्यामुळे गच्ची सगळ्यांचीच कॉमन. आमचा फ्लॅट तिसऱ्या अन सगळ्यात वरच्या मजल्यावर. आमच्या खाली राहणाऱ्या बिऱ्हाडकरुंना गॅलरीतल्या बागेची मोठी हौस. आमच्या गॅलरीतून त्यांची विरुद्ध बाजूची गॅलरी व्यवस्थित दिसते. सुंदर सुंदर फुलं बघून मन प्रसन्न होतं नेहमीच.  त्यांच्या गॅलरीत सतत कुंडयांची भर पडतांना दिसायची. शेवटी  इतक्या कुंड्या झाल्या की त्यांनी त्यातल्या  बऱ्याचशा कुंड्या गच्चीवर आणून ठेवल्या. आता गच्चीवरचं  फिरणं अजूनच प्रसन्न व्हायला लागलं. त्यात त्यांनी दोन मोठ्ठ्या थम्प्स अप च्या बाटल्यांना गोल गोल छिद्र करून त्यात माती भरली अन प्रत्येक छिद्रात ऑफिस टाइम (टेन ओ क्लॉक) ची एक एक काडी लावलेली. सकाळी 10 च्या सुमारास त्या राणी कलरच्या पिटुकल्या फुलांनी भरलेल्या बॉटल्स इतक्या सुंदर दिसायच्या की मलाही मोह आवरला नाही. मी त्यातल्या दोनतीन  काड्या तोडल्या अन आमच्या हॉल च्या खिडकीत एका छोट्याश्या बोळक्यात दिल्या टोचून.  

पावसाळी हवा असल्याने म्हणा किंवा काय माहिती तीन चार दिवसातच  त्या इतक्या छान भराभरा वाढल्या अन त्या दिवशी बघते तर काय! तीन पिटुकली टवटवीत  फुलं मस्त डोलताहेत मजेत! सहजच  विचार आला मनात की  किती पटकन, विनासायास ही रुजली नवीन मातीत, नवीन जागेत. आणि इथेही उधळून देताहेत आनंद सभोवती. जागा बदलली, माती बदलली म्हणून कुठ्ठे कुरकुर नाही, खेद नाही, कुढणं नाही की नाखुषी नाही. गच्चीवर आनंदाची उधळण होतीच त्यांची अन तिथून उचललं तरी बहरणं सुरूच! 

आणि ह्याउलट आपण केवढे सवयीचे गुलाम! अगदी सकाळच्या टूथपेस्ट पासून आपल्याला कुठ्ठे, कुठ्ठे म्हणून बदल सहन होत नाही. टूथपेस्ट तीच हवी, चहा तोच अन त्याच चवीचा आवडणार, दूध अमुक एकच, वर्तमानपत्राची सुध्दा सवय झालेली. बदलून बघितला की, “छे बुवा! हयात काही राम दिसत नाही. आपला नेहमीचाच बरा शेवटी” असंच म्हणणार हे पक्के! दिवसभरात कितीतरी गोष्टी असतात आपल्या “अमुकच हवं” वाल्या. अगदी सकाळच्या टूथपेस्टपासून  ते थेट  झोपायची जागा, उशी आणि पांघरूण पर्यंत सर्व! माणूस शेवटी सवयीचा गुलामच!  वाटलं ह्या टेन ओ क्लॉक ला गुरु करून कुठेही पटकन ऍडजस्ट होणं शिकायला हव माणसांनी. किती सोपं होईल सगळ्यांचं आयुष्य! 

अर्थातच सगळ्या परिस्थितीत स्वतःला सहज बदलवू शकणारेही बघतोच आपण आजूबाजूला. नक्कीच त्यांचे आयुष्य तुलनेने सहज, सोपे जात असणार ह्यात शंकाच नाही. रुजणं शब्दावरून मग सहजच मनात आले की अगदी जुन्या काळामध्ये मुलामुलींची फार लवकर लग्न व्हायची त्यामुळे बालवयातच सासरी आलेल्या मुलींना त्या नवीन वातावरणामध्ये स्वतःला रुजवून  घेणे तितकेसे कठीण जात नसे नंतर नंतर म्हणजे आमच्या पिढीमध्ये थोडा बदल झाला. मुलींची लग्न वयाच्या वीस-बावीस च्या वयात व्हायला लागलीत त्यामुळे थोडा त्यांना सासरी जमवून  घ्यायला किंचित वेळ लागू लागला पण तरीही लहानपणापासून शेवटी सासर हेच तुझं खरं घर आहे असं मनावर पक्क बिंबवले गेले असल्याने बहुतांश जणीनी हे सहज मान्य केले आणि विनातक्रार रुजल्या. त्यानंतरची पिढी म्हणजे सध्याची तरुण पिढी (आपल्या मुला-मुलींची पिढी) ह्यामध्ये आणखी थोडा बदल झाला आता मुलं किंवा मुली अजून जास्त परिपक्व झाल्यानंतर लग्न व्हायला लागलीत. कदाचित त्यामुळेही असेल पण “थोडं तुझं थोडं माझं” असं म्हणत व्यवस्थित संसार होतांना दिसत आहेत, (अर्थात अपवाद असतातच म्हणा!) आजकालच्या मुलामुलींना हे तेवढं कठीण जात नाही कारण बहुतेक सगळीकडे राजाराणीचे संसार असतात. दोघेही समजदार पणा दाखवत  “थोडं तुझं,थोडं माझं” करत एकमेकांशी जुळवून घेत गोडीगुलाबीने, गुण्यागोविंदाने  राहतांना दिसतात. त्यात बहुतांश ठिकाणी दोघेही नोकरी करणारेच असतात. त्यामुळे खूप कमी वेळ एकमेकांच्या सहवासात राहतात. अर्थात स्वतंत्र मनोवृत्तीमुळे  थोडे फार संघर्ष अटळ असतात पण ते त्यांचे निभावतात. आणि ह्या पिढीमध्ये मुलांच्या विश्वामध्ये, संसारामध्ये आई-वडिलांनीही स्वतःला थोडं बदलवत रुजवून घेतलेलं आहे. यानंतरच्या पिढीमध्ये मात्र काय होईल सांगता येत नाही. मला तरी वाटतं “थोडं तुझं,थोडं माझं” असा सुवर्णमध्य न गाठता “तू तुझं नी मी माझं”  ह्या प्रकारात जर सर्व व्यवहार चालणार असतील तर बाकी कठीण आहे! कारण संसार सुरळीत चालण्यासाठी हे एकमेकांच्या विश्वात  “रुजणं” दोघांनाही व्यवस्थित जमलं तरच  संसार रुपी रोपटे छान सुंदर बहरणार हे नक्की! अगदी टेन ओ क्लॉक सारखे!

तसं पाहिलं तर अगदी शाळेत पहिल्यांदा जाणाऱ्या  मुलालाही त्या नव्या वातावरणात रुजावंच लागतं आणि थेट रिटायर्ड झालेल्या आजोबांनाही नव्याने आपल्या स्वतःच्याच घरात पुन्हा रुजावंच लागतं! थोडक्यात काय तर रुजणं म्हणजे बदललेल्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेता येणं! सध्याच्या आमूलाग्र बदललेल्या युगात सगळं नवीन तंत्रज्ञान नीट माहिती करून घेणं आणि वेगवेगळ्या माध्यमांचा योग्य रीतीने वापर करणं म्हणजे तरी काय शेवटी? स्वतःला डिजिटली रुजवण्याचाच एक प्रकार! आयुष्यातल्या असंख्य टप्प्यांवर वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जितकं सहज स्वतःला रुजवता येतं तितकं तुमचं आयुष्य कमीअधिक सोपं होत जातं हे निश्चित! रुजणं टेन ओ क्लॉक चं असो का तुमचं आमचं! शेवटी तात्पर्य एकच हो!

© सुश्री मधुमती वऱ्हाडपांडे

मो 9890679540

अकोला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “फुलवणारे/सुकवणारे…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “फुलवणारे/सुकवणारे…” – प्रा. माधव सावळे ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै. ☆

पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खूश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले, म्हणून रडत बसणारेही बघितले.

जॉब अचानक गेल्यामुळे आता तसंही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायासे सुट्टीच आहे, तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.

जिभेच्या कॅन्सरमुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि ‘नको त्या गर्दीत नाटक बिटक, उगीच कशाला आजाराला निमंत्रण?’म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.

‘बाल्कनीतुन किती छान दिसतंय इंद्रधनुष्य!’ म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि ‘कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं’, म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे

फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅटमध्ये  तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता, म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंब ही बघितलं आहे.

हे नको खायला- असं होईल, ते नको प्यायला- तसं होईल ह्या टेन्शनमध्ये ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅकची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी, मिळेल ते झणझणीत, चटपटीत  बिनधास्त खाऊनही ‘काही नाही होत यार’, म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.

आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं; पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात

आता त्याला कोण काय करणार?

संकलक:प्रा. माधव सावळे

संग्राहिका :सौ. राधा पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चंद्रभागेतीरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ चंद्रभागेतीरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

आषाढी कार्तिकी भक्तजन येती

(कार्तिकी एकादशी निमित्ताने एक छोटासा लेख)

चंद्रभागेतीरी। भक्तांची ही दाटी।

चालतसे वाटी । पंढरीची ।।

दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला थंडी, वारा, ऊन, पाऊस कशाचीही तमा न बाळगता स्त्रिया, पुरूष, आबालवृद्ध सर्व भक्तगण माथ्यावर तुळस घेऊन आणि मुखाने हरिनाम घेत पंढरीची वाट चालत असतात.

वारी म्हणजे भक्तीचा उत्सव!भक्ताचा परमेश्वराशी संवाद!अनन्यसाधारण भक्ती!

चौर्‍यांशीलक्ष योनीतून फिरत फिरत हा मानवाचा जन्म लाभलेला आहे.आता ओढ लागली आहे ती मोक्षाची.ह्या मोक्षाप्रती जाण्यासाठी एकच मार्ग म्हणजे भक्तीयोग!परमेश्वराला कुठेही शोधत फिरण्याची गरज नाही.तो जीवात्मा आहे.त्या ह्रदयस्थ परमेशाशी एकरूपता होणे म्हणजेच परमेश्वराशी मीलन होणे.

पांडुरंग हा दासांचा दास आहे.आपल्या भक्तांसाठी तो प्रगट होतो व त्याचे रक्षण करतो.म्हणून विठूमाऊलीचे अखंड भजन करावे असे संत तुकाराम त्यांच्या कित्येक अभंगांतून साधकांना सांगत असतात.ते म्हणतात,

दास करी दासांचे । उणे न साहे तयाचे ।

वाढिले ठायीचे । भाणे टाकोनिया द्यावे ।।

ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटी कर ।

सर्वस्वे उदार । भक्तालागी प्रगटे ।।

वारीत सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताला ही पांडुरंगाच्या भेटीची तळमळ लागून राहीली आहे. विठूच्या दर्शनाच्या ह्या तळमळीने त्यांच्या शरीराला कोणतेही क्लेश जाणवत नाहीत कारण प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्यांना आश्रय दिला आहे.

साधकाने चिंता कशाची करावी?भार वहाण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर ठाकला आहे.तेव्हा पांडुरंगाशी समर्पण केले की योगक्षेम  वहाण्यासाठी भगवंत सतत भक्ताच्या पाठीशी उभा आहे.

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘कुचंबले किचन’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘कुचंबले किचन’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

जिथे नव्या हाऊसिंग स्कीम्स उभारल्या जात आहेत, सोसायट्यांचा पुनर्विकास झाला आहे/ होत आहे, नवीन टाॕवर्स, नव्या इमारती बांधल्या गेल्या आहेत किंवा जात आहेत, त्यांच्या १-२-३ बीएचके फ्लॅटमध्ये किचनचा एवढा संकोच करून ठेवला आहे की, जेमतेम एक माणूस कसाबसा उभा राहू शकतो ! गेल्या ५-७ वर्षात मुख्यतः महानगरातून हे विशेषत्वाने आढळून येते. 

नक्की काय खूळ (कदाचित व्यावसायिक लाभाचे गणित?) बसले आहे या पुनर्विकासक/ बिल्डर/इंटीरियर करणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही कळत नाही.

ह्या लोकांना असे का वाटते की, हल्ली कोणी घरी स्वयंपाक करतच नाही. सगळे रोज सकाळ संध्याकाळ बाहेरील हाॕटेलांत आॕर्डर देऊन तिथून घरी पार्सल मागवून खातात.

हल्ली कोणी कोणाच्या घरी जात नाही की येत नाही. कुटुंबे लहान आहेत. (घरात जास्तीत जास्त तीन सदस्य!) घरी पाहुण्यारावळ्यांचा राबता नसतो. मामाच्या घरी येऊन धुडगूस घालणारी, मामीकडे शिक्रण पोळीचा हट्ट धरणारी व्रात्य भाचरे नसतात. त्यामुळे भांडी, ताटे, वाट्या, पातेली, डाव, ओगराळी किंवा गेला बाजार क्रोकरी असले अवजड सामान ठेवायला कशाला जागा लागते? तेव्हा ती वाचवलेली जागा या नवीन रचनेत बेडरूम, हॉल मोठा करण्यात वापरू या. त्यांचे मानस खरेच असे आहे का?

ज्या लोकांचे १९८५ ते ९५ सालापर्यंत घेतलेले फ्लॕट आहेत, ते लोक नवीन फ्लॕट  बघायला जातात, तेव्हा तिथले किचन पाहिल्यावर त्यांचे डोकेच सटकते. 

मी काय म्हणतो, बांधकाम व एफ एस आय इ.चे नियम बदलले आहेत/असतीलही. त्यामुळे घराच्या – साॕरी फ्लॕटच्या, रचनेत बरेच बदल करावे लागत असतील, हेही मान्य करूया. पण भारतीय संस्कृतीमध्ये  घरातील सगळ्यात महत्त्वाचे असलेले स्वयंपाकघर म्हणजे किचन, चक्क त्याचाच बळी पडत आहे. किचनचा असा श्वास कोडणारा संकोच करणे अमान्य आहे. अहो, असे करुन कसे चालेल बरे?

पुनर्विकास करताना या किचन कुचंबणेचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. गृहिणींनीही नव्या फ्लॕटमधे मोठ्या किचनचा आग्रह धरावा. मला वाटते की, हा स्त्रीहट्ट योग्य आहे आणि तो पुरवायला हवा.

सोसायट्यांच्या पुनर्विकास समित्यांनी व विकासकांनी या सूचनेचा गंभीरपणे विचार करावा. या सूचनेला महत्व व प्राधान्य द्यावे. 

घरोघरीच्या (गृह) लक्ष्मींना प्रसन्न करण्याची, पुनर्विकासाच्या निमित्ताने घर चालत आलेली ही सुवर्णसंधी, कोणाही ‘धूर्त व चाणाक्ष’ पुरुषाने अजिबात दवडू नये.

लेखक : श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

माउलींनी पसायदानात ‘ जे खळांची व्यंकटी सांडो ‘ असे का म्हटले आहे, वाचा ही गोष्ट !

एक कीर्तनकार महाराज तीर्थाटनाला निघाले. वाटेत एका गावात मुक्कामी थांबले. ईश्वरसेवा म्हणून तेथील मंदिरात कीर्तन करू लागले. गावकऱ्यांना त्यांचे कीर्तन खूप आवडले. महाराजांची कीर्ती पसरू लागली. पंचक्रोशीतून त्यांना कीर्तनासाठी बोलावणे येऊ लागले. त्यांच्या कीर्तनात पांडुरंगाच्या दर्शनाची  भाविकांना अनुभूती येत असे. 

ही गोष्ट बादशहाच्या कानापर्यंत गेली, तेव्हा त्याने महाराजांना आपल्या राजदरबारात बोलावले आणि विचारले, “ तुम्ही मोठे कीर्तनकार आणि पांडुरंगाचे भक्त अशी तुमची कीर्ती ऐकली. तुमच्याशी देव बोलतो, तुमचे ऐकतो असे लोकांकडून  समजले. तुम्हाला मी इथे बोलावले आहे, ते तुमची भक्ती सिद्ध करण्यासाठी. समजा, मी जर एक गाय मारली, तर तुम्ही ती जिवंत केली पाहिजे. नाहीतर ढोंगी बनून तुम्ही माझ्या प्रजेची दिशाभूल केल्याबद्दल मी तुम्हारा ठार मारीन.” 

कीर्तनकार महाराज म्हणाले,  “ माझ्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी गायीने आपला जीव का गमवायचा? तुम्ही खुशाल तिच्या जीवावर उदार झालात. तुम्हाला तिच्या जीवाची किंमत नाही. मी परीक्षा द्यायला तयार आहे. परंतु तुम्ही गायीऐवजी तुमच्या जवळच्या कोणा व्यक्तीचा बळी द्यायला तयार असाल तर सांगा.”

बादशहा चक्रावला. महाराजांकडून अशा प्रश्नाची त्याला अजिबात अपेक्षा नव्हती. त्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून महाराज म्हणाले,  “ तुम्ही तुमच्या राजपुत्राचा बळी देता का? मी माझ्या पांडुरंगाला सांगून त्याला पुन्हा जिवंत करून दाखवतो.”

बादशहा स्वत:च्याच बोलण्यात अडकला. गायीच्या जागी आपल्या स्वत:च्या मुलाचा जीव घेण्याच्या कल्पनेनेही त्याचे हात थरथरू लागले. तो महाराजांना म्हणाला, “ तुमच्या भक्तीची परीक्षा घ्यायला मी माझ्या मुलाचा बळी देऊ शकत नाही. मात्र, तुम्ही आता तुमची कीर्तन प्रवचन सेवा थांबवा आणि तुमचा मुक्काम इथून हलवा.”

यावर महाराज म्हणाले,  “ बादशहा, तुम्हाला माझ्या भक्तीचा त्रास झाला की तुमच्या विकृत मानसिकतेचा? आपण गायीचा जीव घ्यायला तयार होतात, परंतु मुलाच्या जीवाचा प्रश्न आल्यावर आपण आपला विचार बदललात. याउपर आपण जरी राजपुत्राचा जीव घेण्याची तयारी दर्शवली असती, तरी मी आपल्याला नक्कीच अडवले असते. कारण, कोणाच्याही जीवापेक्षा आमचा पांडुरंग मोठा नाही. नव्हे, तर प्रत्येक जीवात आमचा पांडुरंग आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या भक्तीची परीक्षा बघू नका.  तुम्ही म्हणालात तर मी गाव सोडून जाईनही ! पण आपण परत कधी अशी कोणाची परीक्षा घेऊ नका एवढी विनंती करतो.”

महाराजांचे बोल ऐकून बादशला वरमला. त्याने महाराजांची क्षमा मागितली. त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना नमस्कार करून म्हणाला, “ महाराज, तुमच्या पांडुरंगानेच माझ्या मुलाचे प्राण वाचवले, अन्यथा माझ्या अहंकारापोटी मी त्याचे प्राण घ्यायलाही बधलो नसतो. परंतु, तुम्ही मला भगवंताच्या अस्तित्वाची ओळख करून दिलीत. आजवर गावकऱ्यांकडून ऐकले होते, की तुमच्या कीर्तनात पांडुरंग भेटतो, तो आज मला तुमच्यात दिसला.”

महाराज म्हणाले, “ बादशहा, याचे श्रेय मला नाही, तर संतांना आहे. त्यांनी आमच्यावर घातलेले हे संस्कार आहेत. माऊली म्हणते, ‘ जे खळांची व्यंकटी सांडो ‘ – अर्थात, कोणतीही व्यक्ती वाईट नसते, तिच्यातील व्यंकटी अर्थात वाईट वृत्ती बाजूला केली, तर चांगली व्यक्ती शिल्लक राहते. तुम्हीदेखील तुमचे वाईट विचार दूर सारलेत,म्हणून तुम्हाला ईश्वराचे अस्तित्त्व जाणवले. तुमच्याप्रमाणे प्रत्येकाने वाईट वृत्तीचा, विचारांचा, विकारांचा त्याग केला, तर हे ईश्वरनिर्मित जग किती सुंदर होईल नाही? “

संग्राहिका :  स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जाणता राजा… ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? विविधा ?

☆ जाणता राजा… ☆ श्री राजीव गजानन पुजारी 

छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करतांना समर्थ रामदास स्वामी म्हणतात,

“निश्चयाचा महामेरू।  बहुत जनांसी आधारू ॥

अखंड स्थितीचा निर्धारू।  श्रीमंत योगी ॥”

समर्थ पुढे म्हणतात,

“यशवंत कीर्तिवंत। समर्थ्यवंत वरदवंत॥

नीतिवंत पुण्यवंत। जाणता राजा॥”

पहिल्या कडव्यातील प्रत्येक चरणामध्ये नीट पाहिले तर महाराज एक शासक व व्यवस्थापक म्हणून कसे होते याचे वर्णन आहे. यातील ‘श्रीमंत योगी’ हा शब्द महत्वाचा आहे. महाराज श्रीमंत असून श्रीमंतीपासून अलिप्त होते. ‘ खजिन्यात जमा झालेली संपत्ती रयतेची आहे ’ यावर महाराजांचा ठाम विश्वास होता, ती संपत्ती त्यांनी फक्त आणि फक्त रयतेच्या कल्याणासाठीच वापरली. हे त्यांच्या व्यवस्थापनाचे महत्वाचे तंत्र होते.

दुसऱ्या कडव्यातील पहिल्या तीन चरणांमध्ये  महाराजांचा गुणगौरव केला आहे. शेवटच्या चरणातील ‘जाणता राजा’ हे शब्द महत्वाचे आहेत. महाराज ‘राजे’ होतेच, पण तो एक ‘जाणता’ राजा होता. जाणता म्हणजे जाणणारा. ज्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाण असते व जो प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल कसे बनवायचे हे जाणतो, त्याला ‘ जाणता ‘ म्हटले जाते. महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. आजदेखील त्यांनी दिलेल्या व्यवस्थापन तंत्रांचा वापर केल्यास आपला देश निश्चितच ‘विश्वगुरु’ होऊ शकतो.

व्यवस्थापनाचा मूलमंत्र म्हणजे ‘दूरदृष्टी’.  आपल्या प्रजेचा जर विकास करायचा असेल तर पारतंत्र्याचे जोखड झुगारून स्वतःचे राज्य –  म्हणजे स्वराज्य निर्माण करावे लागेल हे त्यांनी बालपणीच ओळखले. कारण स्वातंत्र्यातच रयतेचा विकास होतो हे जाणण्याची दूरदृष्टी लहान वयातच त्यांचेकडे होती. या त्यांच्या दूरदृष्टीमुळेच त्यांना ‘आनंदभुवन’ समान स्वराज्याची निर्मिती करता आली.

रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती करायची तर त्यासाठी ‘कार्याप्रती समर्पित मनुष्यबळ’ हवे. त्यासाठी माणसे ओळखावी लागतात, ओळखलेली माणसे जोडावी लागतात, जोडलेली माणसे संघटित करावी लागतात. एक संघटित शक्ती निर्माण करावी लागते आणि त्यातूनच कोणतेही महान कार्य घडत असते, हे शिवरायांनी ओळखले होते. महाराज रत्नपारखी होते. त्यांचेकडे माणसांतील गुण ओळखण्याचे अलौकिक कौशल्य होते. त्यामुळे त्यांनी येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, जिवा महाला, तानाजी मालुसरे अशी एक नाही अनेक माणसे हेरून त्यांच्या मनात स्वराज्याचे बीज रोवले.

त्यानंतर प्रत्येक सुलतानशाहीस कधी दिशाभूल करून, कधी गहाळ पाडून तर कधी नुसते झुलवत ठेऊन महाराजांनी आपला कार्यभाग साधण्यास सुरुवात केली. आपल्या राजकीय हालचालींचा कोणासही सुगावा लागू न देता अचानक हल्ला करणे, शत्रूस गाफिल ठेऊन त्याचा मुलुख लुटणे इत्यादी कामांत महाराजांची राजनीती दिसून येते. आपल्या शत्रूला आपल्या विरोधात कोणी सहाय्य केले तर, नंतर वेळप्रसंगानुसार त्याचा बदला घेणे हाही महाराजांच्या राजनीतीचा भाग होता. पुरंदरच्या तहाशिवाय इतर कोणताही तह त्यांनी पाळला नाही. त्यांच्या दृष्टीने तह म्हणजे संकटमय परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी एक तात्पुरता इलाज होता. केवळ आपला हेतू साध्य करण्यासाठी महाराज तह करीत असत.

शत्रू जर आपल्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्याला हरवण्यासाठी महाराजांनी गनिमी काव्याचा वापर केला. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही उक्ती त्यांनी वारंवार खरी करून दाखवली आणि बेसावध शत्रूला गनिमी काव्याने वारंवार धूळ चाटवली. त्यांच्या ह्या गनिमी काव्याचा युद्धनीती म्हणून आजही जगभरातील सैन्यांद्वारे अभ्यास केला जातो.

जुलूमी परकीय सत्तेला विरोध करत असतानाच महाराजांनी राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित बसवून आर्थिक स्थैर्य निर्माण केले. शेतीला बिनव्याजी कर्ज देणे, पुरोगामी शेतसारा पद्धत राबविणे, व्यापाराला प्रोत्साहन देणे, पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, ठिकठिकाणी बाजारपेठा निर्माण करणे या बाबींना प्राधान्य दिले व त्याची अंमलबजावणी केली.

शिवाजी महाराज हे पहिले भारतीय राजे होते, ज्यांनी नौदल किंवा आरमार उभारले. त्यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज या परकीय सत्तांवर दबाव निर्माण झाला व त्यांच्या बरोबरीने समुद्रात सार्वभौमत्व सिद्ध झाले.

महाराजांनी अगदी सुरुवातीपासूनच पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या बाबतीत दक्षता घेतली होती. स्वराज्यात वृक्षतोडीस सक्त मनाई होती. अगदी जुन्या व जीर्ण झालेल्या साग, आंबा व जांभळीच्या लाकडांचाच उपयोग जहाज बांधणीसाठी होत असे. वृक्षांच्या संरक्षणासाठी खास सेवक असत. तुकाराम महाराजांची  ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’  ही उक्ती शिवाजी महाराजांनी तंतोतंत अमलात आणली होती.

स्वराज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्यात पाण्याचा साठा असणे महत्वाचे होते. त्यामुळे पाण्याचे संधारण आणि साठा साधारण वर्षभर पुरेल अशी उपाययोजना महाराजांनी केली होती. म्हणजे चुकून गडावर हल्ला झाला तरी आणीबाणीच्या परिस्थितीतसुद्धा गडावर आवश्यक तेवढा पाणीसाठा कसा राहील ह्याची काळजी घेतली गेली होती. आज आपण जे ‘रेन हार्वेस्टिंग’ म्हणतो त्याचे जनक शिवरायच होत.

शिवाजी महाराजांना कायमच सर्व धर्मांबाबत आदर होता. महाराजांचे अनेक सेवक मुस्लिम होते व ते महाराजांशी अत्यंत एकनिष्ठ होते. स्वराज्यात धर्मावर नाही तर शौर्य, बुद्धी, स्वामीनिष्ठा आदि गुणांवर बढती दिली जात असे. युद्धकाळात इस्लाम धर्माचा धर्मग्रंथ सापडला असताना महाराजांनी त्याचा आदरच केल्याचा उल्लेख आहे.

महाराज प्रत्येक स्त्रीला देवीसमान मानत. कोणत्याही युद्धात महाराज किंवा त्यांचे सैनिक यांचेकडून स्त्रियांना उपद्रव झाला नाही. चोरी व स्त्रीचा अवमान या गोष्टींना कडक शासन केले जात असे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेवकांना बक्षीस म्हणून मौल्यवान वस्तू दिल्या जात.

वरील विवेचनावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जाणतेपणामुळे आपणास दिलेली व्यवस्थापन तंत्रे खालील प्रमाणे सांगता येतील :

  • विविध कर आदि प्रकारे देशाच्या खजिन्यात जमा झालेली संपत्ती जनतेची आहे याची जाणीव ठेऊन तिचा विनियोग जनतेच्या सोयी सुविधांसाठी करणे.
  • देशाच्या विकासासंदर्भातील निर्णय दूरदृष्टीने घेणे.
  • कार्याप्रती समर्पित असे मनुष्यबळ प्रशिक्षण व समुपदेशनाद्वारे तयार करणे व त्यांच्यात देशप्रेमाचे बीजारोपण करणे.
  • आपल्या देशाच्या सार्वभौमत्वास सर्वोच्च प्राधान्य देणे व ते टिकविण्यासाठी वेळप्रसंगानुसार कोणताही मार्ग अवलंबणे.
  • शत्रूस गाफिल ठेऊन त्याचेवर चढाई करणे.
  • आपल्या शत्रूस आपल्या विरोधात कोणी सहाय्य केल्यास त्याचा बदला योग्य प्रसंगी घेणे.
  • शत्रुवर आवाजवी भूतदया न दाखविणे.
  • देशाच्या हिताचा विचार सर्वोच्च ठेवणे. त्यासाठी केलेले तह पायदळी तुडवायला मागेपुढे न पाहणे.
  • शत्रू बलाढ्य असेल तर गनिमी काव्याचा अवलंब करून त्याला नेस्तनाबूद करणे
  • देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी कर व इतर मार्गानी मिळालेला पैसा पायाभूत सुविधांमध्ये गुंतविणे जेणेकरून त्यापासून अधिकचे उत्पन्न मिळेल.
  • शिवाजी महाराजांनी काळाचा विचार करून आरमार उभारले. तसेच आपण काळाचा विचार करून नवीन तंत्रज्ञान वापरून भविष्यातील युद्धप्रसंगांसाठी सज्ज असायला हवे. कदाचित भविष्यातील युद्ध अंतराळात लढले जाईल किंवा माहिती-तंत्रज्ञानाधारित असेल.
  • पायाभूत सुविधा निर्माण करतांना पर्यावरणाचे भान ठेवणे.
  • पाण्याचे योग्य नियोजन करणे.
  • सर्व धर्मांचा आदर ठेवणे.
  • स्त्रियांचा आदर करणे. तो न करणाऱ्यास कडक शासन करणे.
  • चोरी व फितूरीस कडक शिक्षा ठोठावणे, व त्याची अंमलबजावणी त्वरित करणे.

महाराजांनी दिलेली वरील व्यवस्थापनाची तंत्रे आजच्या काळातही तितकीच लागू पडतात, त्यांचा वापर केल्यास आणि त्यामागील त्यांचे ‘ जाणतेपण ‘ शिकण्याचा प्रयत्न केल्यास– नव्हे त्याचा ध्यास घेतल्यास , भविष्यात आपला देश महासत्ता होईल यात शंका नाही.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “टिप टॉक !” —☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? मनमंजुषेतून ?

☆ “टिप टॉक !—  ☆ श्री संभाजी बबन गायके 

टीप हा शब्द अगदी मनाच्या तळाशी जाऊन बसला आहे लहानपापासूनच ! जो पर्यंत टीप द्यावी लागत नव्हती तो ही टीप तशी तळटीपच होती !

ही टीप पुस्तकांत खाली छापलेली दिसायची. आमंत्रण पत्रिकेत जवळ जवळ धमकी या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून नजरेस पडायची.

कपडा फाटला की त्याला टेलर काकांना विनंती करून ही टीप मारून घ्यावी लागे ! त्यांनी जास्त पैसे मागितले की डोळ्यांतून टिपे गळायची बाकी रहात ! अशावेळी एवढ्याशा कामाचे एवढे पैसे? असे शब्द अगदी tip of my tongue यायचे ! पण घाबरून जिभेची हीच टीप चावावी आणि गप्प बसावे,असे होई !

काही लोक पोलिसांना टीप देतात, किंवा त्यांना ती कुठून तरी मिळते,असेही वाचनात येते अधून मधून !

टीपटॉप नावाची टेलरिंग दुकाने असतील तर अशी टीप मारून देणे ते लोक कमी पणाचे समजतात ! असो.

शहरातल्या हॉटेलात जायला लागल्यापासून टीप शब्दाचा आणि त्यामागचा ‘ अर्थ ‘ समजू लागला.

खरं तर या कल्पनेमागे खूप सुंदर कल्पना आहे,असे वाटते ! विशेषतः hospitality industry मध्ये नम्रता, ग्राहकाभिमुख सेवा, आणि अचूक सेवा या बाबी महत्त्वाच्या असतात. लोक सारं काही छान, भारी मिळावं म्हणून पैसे खर्च करतात. हल्ली तर hospital industry आणि hospitality industry सारख्याच महाग असतात. कोरोना काळात या दोन्ही सेवा मेवा मिळवत राहिल्या ! श्रीमंतांनी five star उपचार घेतले आणि गरिबांनी दिवसा star पाहिले डोळ्यांसमोर ..बिलाचे आकडे पाहून ! असो. .. तर ..वेटर इत्यादी मंडळी हसतमुख सेवा देतात, काय खावे, काय परवडेल याचे मार्गदर्शन करतात, वेळेवर पदार्थ आणून देतात, उरलेले पदार्थ तत्परतेने पार्सल करून देतात, इत्यादी शेकडो कारणांनी या सेवकांना काही रक्कम स्वखुशीने देणे,अपेक्षित असते. यात आता स्वखुशीे दूर गेली आहे ! काही हॉटेल मध्ये काम करणाऱ्या वेटर मंडळीमध्ये सुका आणि ओला असे दोन प्रकार असतात म्हणे ! सुका म्हणजे फक्त पगार घ्यायचा ! तिथले अन्न मिळणार नाही. ओला म्हणजे अन्न आणि पगार ! या ओलाचा पगार तसा कमीच असणार !

मुळातच या व्यवसायात बिचारी नाडलेली मंडळी दिसतात. नाईलाजाने हा डगला अंगावर चढवलेली… बँडवाल्यांसारखी ! अन्न वाढणारे वेटर आणि आनंदाच्या धुना वाजवणारे वादक यांचे चेहरे पाहून घ्यावेत !

या लोकांची काही वरकमाई करण्याची इच्छा असते. ग्राहकाने झालेलं Bill पूर्ण देऊन काही रक्कम यांच्यासाठी ठेवावी,अशी त्यांची मूक मागणी असते. विशेषतः आपण त्यांच्याकडे bill चे पैसे दिले, त्याने ते pay करून आणून त्या पाकिटात ठेवले तर उरलेले सुट्टे पैसे ग्राहकाने तसेच ठेवावेत,असे त्यांना वाटते. त्यासाठी हे सेवक आपल्या टेबलच्या आसपास अदबीने आणि छुप्या रीतीने घुटमळत राहतात. आपली पाठ वळताच लगबगीने त्यातील पैसे खिशात घालतात. अपेक्षेनुसार रक्कम नसेल तर एकमेकांना नजरेने इशारे करत राहतात. अर्थात हे हॉटेलनुसार बदलते. भारी हॉटेलात जाणारे भारी लोक काही वेळा keep the change असं म्हणून उठून जातात. त्यांच्यामुळे इतर सामान्य लोकांना change व्हायला लागले आहे.  मोठ्या हॉटेलांत पहिल्यांदा गेलेले लोक चक्क तिथल्या स्मार्ट वेटर बांधवांना काहीसे बिचकुन असतात !

मोठ्या हॉटेलच्या bill मध्येच काही टक्के रक्कम आधीच कापून घेतात म्हणे ! काही ठिकाणी टीप टाकण्यासाठी box असतात. ही रक्कम वेटर आपसात वाटून घेत असावेत. जास्त महागडे पदार्थ मागणाऱ्या ग्राहकांकडून जादा टीप मिळण्याची शक्यता असल्याने तिथे अधिकचे सौजन्य दाखवले जात असावे का? टिप देण्यास टाळाटाळ केली किंवा अगदीच कमी दिली तर कदाचित पुढल्या वेळच्या सेवेत काही बदलही होऊ शकतात ! आपला नवरा किंवा मुलगा वेटरसाठी किती रक्कम मागे ठेवतो,यावर काही पत्नी,माता लक्ष ठेऊन असतात. आणि त्यातील काही रक्कम परस्पर कमीही करतात !

पण टीप देणे ही एक नाजूक गोष्ट असते. याचे चलन आपल्याकडे परदेशातून आले असले तरी दिवाळी पोस्त,बक्षिसी इत्यादी प्रकार आहेतच आपल्याकडे आधीपासून. राजे लोक तर चक्क त्यांच्या हातातल्या, गळ्यातल्या सोन्याच्या वस्तू सेवकांना बहाल करीत असत. 

परदेशात आणि आता आपल्याकडेही महिला वेटर मोठ्या प्रमाणात असतात. गोष्ट परदेशातील आहे…एक गरोदर महिला वेटर…ती धावपळ करीत होती..तिला आणखी काही महिने तरी काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. एका टेबलवरील चार मित्रांनी तिची अवस्था जाणली..आणि तिला तीन महिने पुरेल एवढी रक्कम आपसात जमा करून टीप म्हणून दिली…तिच्या डोळ्यांतील भाव अवर्णनीय होते !

एक आणखीन गोष्ट ! दुपारी हॉटेल बंद होण्याची वेळ. एक आठ दहा वर्षांचा मुलगा सायकलवर घाईघाईत आला. महिला वेटर वैतागली..आता हा कशाला आला काम वाढवायला ! तिने विचार केला. काहीशा नाराजीनेच त्याच्यापुढे मेन्यू कार्ड ठेवले. त्याला ice cream पाहिजे होते. एक छान ice cream १०० रुपयांचे होते आणि त्यापेक्षा स्वस्त आणि साधेसे ८० रुपयांचे. त्याच्याकडे १०० रुपये होते ! पण त्याने ८०चे मागवले. वेटर महिलेने काय भिक्कार ग्राहक म्हणून नाराजीने order serve केली आणि ती आवरायला निघून गेली. ती परत टेबलाशी आली तोवर तो मुलगा निघून गेला होता…तिने bill ठेवतात ते पाकीट उघडलं.. त्यात २० रुपये ठेवले होते…टीप म्हणून ! तिला टीप देता यावी म्हणून त्यानं कमी किमतीचे ice cream order केलं होतं ! ती वेटर महिला आपल्या डोळ्यांतले अश्रू रोखू शकली नाही !

टिप: इथेच थांबतो. बाकी तुम्ही सांगा… शेवटी या विषयाच्या हिमनगाचे हे मी लिहिले ते फक्त एक tip म्हणजे टोक आहे !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ प्रतिमेच्या पलिकडले : गजरा लगा के…गजरा सजा के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : गजरा लगा के…गजरा सजा के… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

 गजऱ्यातल्या कळयानां तू जरा समजावून सांग बरं… इतकं  दुसऱ्याला  वेडावून दाखवणं हे शोभत नाही खरं… अंबाडयाच्या   कुंतलातील  छचोर बटा सुगंधाने किती  धुंदल्या… वाऱ्याच्या झुळूकेवर  डोल डोल डोलू लागल्या…कळी कळीच्या गजऱ्याच्या भाराने अंबाडाही मानेवर झुकला..हलकासा घामही चमचमता फुटला… तिच्या हाताच्या पाच नाजूक बोटांना लागला तो चाळा… सैल झाला का अंबाडा चाचपून पाहती कैक वेळा…मऊ मुलायम बोटांच्या स्पर्शानीं कळया कळया मोहरुन गेल्या…लाजुनी घेतले आक्रसून सर्वांगाला…शिंपडलेल्या अत्तरागत सुंगध तो  चोहीकडे दरवळला….काळया केसांच्या अंबरी शुभ्र मोगऱ्याचा गजरा तो विसावला… वेढयावर वेढे फिरले चक्राकार कुंतलाच्या वेटोळी.. जसा धुंद होउनी अहि लपे केवड्याच्या बनी…आसमंती घुमला घमघमाट तो मोगऱ्यांचा…उत्फुल्ल झाली मनं, गंधीत नासिक  शोध घेती रमणीचा… फुला फुलावर भ्रभर जसे भिरभिरती,अनुरागाचे पाय रमणी भोवती घोटाळती…उठे एकच कळ प्रत्येक हृदयात…कळी कळीचा शुल असुयेचा उमटे  त्या मनात..अहाहा  अहाहा.. काय भाग्यते मोगऱ्याच्या कळीचे… मलाही त्यातील एक कळी होता आले असते तर…भाग्यवंत मी स्वतःलाच समजले का नसते…मग कधीतरी ती मुलायम बोटं मजवरूनीही फिरली असती…अंगा अंगावर प्रीत  सरसरून गेली असती…आभासाचा  भास मनाचा मनात शमला… तिच्या सैल झालेल्या अंबाडयावरुन गजरा तो अलगद ओघळला… कळी कळी ती सुटू लागली… अन पायतळीची भुमी आता सुगंधी झाली…अन मी जर कळी त्यातली असतो…तर माझंही जीवन धन्य  नसते का पावलो असतो…..क्षणैक मोहाची ती मिठी दुरावली…फुलण्या आधी कळी कळी निमाली… कळी तशीच निमाली… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “अंक, आकडा…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

अंक किंवा आकडा यांचा व माझा प्रत्यक्ष संबंध शाळेपासून आला असला तरीही सुरुवात झाली ती मात्र जन्मापासूनच.  कशी ते शेवटी सांगेनच.

आपल्याकडे जसे काही देवांना अनेक नांवे आहेत ना तसेच अंकांचे देखील आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे वेळ या नावाने फिरत असतात.

कॅलेंडरवर ते तारीख म्हणून विराजमान असतात. तारीख म्हणून ते ठसठशीत असतात. पण या तारखेच्या चौकोनातच बाजूला कुठेतरी बारीक अक्षरात कृ. म्हणजे कृष्ण आणि शु. म्हणजे शुक्ल पक्ष असे एक ते चौदा पर्यंत असतात. तेव्हा ते तिथी या स्थितीत असतात. 

रेल्वे, विमान, बस, नाट्य आणि चित्रपट गृहात, तसेच परिक्षेच्या वर्गात ते सीट नंबर असतात. तर वर्गात रोल नंबर म्हणून परिचित असतात. 

काहीवेळा त्यांचा नंबर असा उल्लेख होतो. मग तो नंबर चष्म्याचा, फोनचा, परिक्षेचा, गाडीचा, अगदी बॅंकेचा अकाउंट नंबर ते आधार कार्ड वरचा असा कशाचाही असू शकतो. थोडक्यात आकडे आपला आधार आहेत.

परिक्षेत मिळालेले गुण असतात. तर पत्रिकेत देखील गुणच असतात. पण परिक्षेत मिळवावे लागतात आणि पत्रिकेत ते जुळावे लागतात.

कोणत्याही खरेदी केलेल्या वस्तू बद्दल कागदावर ते मांडले गेले की त्यांचे बिल होते. शींप्याने कागदावर लिहीली तर मापे, आणि  घराच्या संदर्भात देखील मापेच असतात, पण घरांच्या बाबतीत त्यांना कार्पोरेट फिल येतो आणि ते कार्पेट एरिया म्हणून ओळखले जातात.

एकाच माणसाचे वेगवेगळ्या व्यक्तींसोबत वेगवेगळे नाते आणि त्या नात्याची किंमत असते. तसेच यांनी देखील एकक, दशक, शतक असे स्थान बदलले की यांची किंमत बदलते.

हल्ली मोठे आकडे सुध्दा लहान स्वरूपात सांगतात. जसे घराची किंमत १ किंवा १.५ CR. असे. लहानपणी देखील आम्हाला CR. आणि WR. असे ठाऊक होते. पण ते सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे असेच होते. नंतर काॅलेजमध्ये CR शी संबंध आला पण पैशातील CR चा संबंध अलीकडच्या काळातील आहे.

हे आकडे सरळ आले असते तर चालले असते. पण त्यात परत बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आले. सोबत सरासरी आणि टक्केवारी देखील आणली. इथेच थांबले नाहीत. पूर्णांक, अपूर्णांक असे भाऊबंद घेऊन येतांना सम, विषम, मुळसंख्या अशा लवाजम्यासह आले.

कामाच्या बदल्यात पदरी पडलेले आकडे पगार असतात. यात देखील ते ढोबळ आणि निव्वळ असे वेगवेगळे असतात. 

शुभ, अशुभ असे आपणच यात केले आहे. तेरा अशुभ, तर एकमेकांशी पटत नसले तर छत्तीस चा आकडा हे यांच्या बाबतीत आपणच ठरवले.

हे वजन आणि उंची देखील सांगतात. वजनाने घेतलेल्या गोष्टी ग्रॅम, लिटर मध्ये तर अंतराच्या भाषेत फर्लांग, मैल, किलोमीटर मध्ये, आणि उंची फुटात, इंचात, सेंटिमीटर मध्ये सांगतात.

आकडे हे गणित घालतात. निवडणुकांमध्ये देखील हे आकड्यांचे गणित जमवावे आणि सोडवावे लागते.

नुकत्याच जाहीर झालेल्या परिक्षेच्या निकालाचे पहा. सगळे आकड्यातच होते. एकूण परिक्षेला बसलेले किती? पास झालेले किती? मुले किती? मुली किती? मुले आणि मुली यांचे प्रमाण आणि पास होण्याचे प्रमाण किती?

या शिवाय वाणिज्य, विज्ञान, कला यात किती? आणि विभागवार पुणे, कोल्हापूर, कोकण, मराठवाडा, विदर्भ इ….. सगळे एकूण आणि टक्केवारीसह पण आकड्यातच.

सगळे आकडे दिसणारे, समजणारे असतात. पण काही आकडे वेगळे असतात. हे साधारण लटकवायला किंवा विद्युत तारांवर टाकतात. आकड्यात वैध आणि अवैध आकडे आहेत का माहित नाही. पण विद्युत तारांवर टाकलेले आकडे अवैध असतात असे म्हणतात.

माझी आजी अंबाडा घालतांना आकडे वापरायची. पण त्यात मला कोणताही आकडा किंवा आकड्यासारखा आकार दिसलाच नाही.

ग्रामीण भागात काही लोकं आकडी आली असे म्हणतात. पण आकड्यांचे हे स्त्रीलिंगी रूप मला नीट समजलेले नाही.

हत्तीच्या बाबतीत जसे त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात असे म्हणतात. तसेच काही ठिकाणी कागदावरचे आणि प्रत्यक्षातले आकडे वेगळे असतात असे ऐकले आहे. पण असतात ते आकडेच.

आकड्यांची सोबत जन्मापासून झाली ते कसे हे सांगतो. माझा जन्म झाल्यावर तारीख, महिना, वर्ष इतकेच काय वेळेसह  ते नोंदले गेले तरी ते सगळे आकडेच, अंकच आहेत. आणि मी गेल्यावरही ते नोंदवले गेले तरीही आकडेच राहणार आहेत.

असे हे आकडे विमा कंपनीच्या जाहिराती सारखे “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी|” सोबत असणार आहेत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares