मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिसरी पोळी…” लेखक – श्री आशिष चांदुरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “तिसरी पोळी…” लेखक – श्री आशिष चांदुरकर ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

पत्नीच्या मृत्यूनंतर, रामेश्वरचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्या मित्रांसह गप्पाटप्पा करून उद्यानात फिरणे नेहमीचे ठरले होते.

तसा घरात त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. प्रत्येकजण त्याची खूप काळजी घेत असे. 

आज सर्व मित्र शांत बसले होते. एका मित्राला वृद्धाश्रमात पाठवल्याबद्दल दुःखी होते.

“तुम्ही सर्वजण मला नेहमी विचारत असता मी देवाला तिसरी पोळी कशासाठी मागतो ? आज मी सांगेन.” रामेश्वर बोलला !

“सून तुला फक्त दोनच पोळ्या देते का?” एका मित्राने मोठ्या उत्सुकतेने विचारले !

“नाही यार ! असं काही नाही, सून खूप छान आहे……   वास्तविक “पोळी” चार प्रकारची असते. पहिल्या “मजेदार” पोळीमध्ये “आईची” ममता “आणि” वात्सल्य “भरलेले असते. जिच्या सेवनाने पोट तर भरते, पण मन कधीच भरत नाही. *

एक मित्र म्हणाला, “शंभर टक्के खरं आहे, पण लग्नानंतर आईची भाकरी क्वचितच उपलब्ध असते”.

” दुसरी पोळी ही पत्नीची आहे, ज्यामध्ये आपुलकी आणि समर्पणाची भावना आहे, जी “पोट” आणि “मन” दोन्ही भरते.” तो पुढे म्हणाला

“आम्ही असा विचार केलाच नाही, मग तिसरी पोळी कोणाची आहे? ” मित्राने विचारले.

“तिसरी पोळी ही सूनेची आहे, ज्यात फक्त “कर्तव्या ची” भावना आहे, जी थोडी चव देते आणि पोट देखील भरते, सोबतच चौथ्या पोळीपासून आणि वृद्धाश्रमांच्या त्रासांपासून वाचवते “.

तिथे थोडा वेळ शांतता पसरली !

“मग ही चौथी पोळी कसली आहे?”  शांतता मोडून एका मित्राने विचारले!

“चौथी पोळी ही कामवाल्या बाईची आहे, जिच्याने आपले पोटही भरत नाही किंवा मनही भरत नाही ! चवीचीही हमी नसते.”

“ मग माणसाने काय करावे? …… 

आईची उपासना करा, बायकोला आपला चांगला मित्र बनवून आयुष्य जगा, सूनेला आपली मुलगी समजून तिच्या लहान-सहान चुकांकडे दुर्लक्ष करा. जर सून आनंदी असेल तर मुलगा देखील तुमची काळजी घेईल.

जर परिस्थिती आम्हाला चौथ्या पोळीपर्यंत आणते, तर देवाचे आभार माना की त्याने आपल्याला जिवंत ठेवले आहे, आता चवीकडे लक्ष देऊ नका, फक्त जगण्यासाठी फारच थोडे खावे जेणेकरुन म्हातारपण आरामात कापले जाऊ शकेल.” 

सर्व मित्र शांतपणे विचार करीत होते की, खरोखरच आपण किती भाग्यवान आहोत !!

लेखक : आशिष चांदुरकर

(गोधनी रेल्वे, नागपुर)

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पैशाची रोख देवघेव करणारे स्वयंचलित यंत्र ”- मूळ लेखक: अज्ञात ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “पैशाची रोख देवघेव करणारे स्वयंचलित यंत्र ”  – मूळ लेखक:  अज्ञात ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी 

   

(ATM – Automated Teller Machine) — हे आता आपल्या आयुष्याचा एक अपरिहार्य भाग झालेले आहे.                                                             

स्नानपात्रात (टबमध्ये) बसून स्वतःच्याच आळशीपणावर वैतागलेल्या जॉन शेफर्ड-बॅरॉनला (हा शिलाँगमध्ये जन्मलेला स्कॉटिश इसम) अकस्मात स्फूर्तिदेवता प्रसन्न झाली. १९६०च्या मध्यास, एके दिवशी बँकेतून पैसे काढायला म्हणून हा गेला आणि नेमका बँक बंद झाल्यावर एक मिनिट उशीरा पोहोचला. त्यामुळे झालं काय की, सप्ताहाची अखेर त्याला पैशांविना घालवावी लागली.  तो चडफडला, विचारात पडला की, ‘बँकेच्या कामकाजाच्या वेळाव्यतिरिक्त पैसे काढता यायला हवेत. काय करावं बरं?’  

दिवसाच्या किंवा रात्रीच्या कुठल्याही वेळी पैसे टाकल्यावर चॉकलेट देणारे स्वयंचलित विक्रीयंत्र त्याच्या मनःचक्षूंसमोर चमकून गेले. अशा त-हेने, एका मुद्रणसंस्थेत काम करणा-या शेफर्ड-बॅरॉनने एक स्वयंचलित रोख पैसे देणारी पद्धती शोधून काढली.  

१९६०च्या अखेरीस अकस्मात एक दिवस जेवणाच्या सुट्टीत त्याची गाठ बार्कलेज बँकेच्या महाव्यवस्थापकांशी पडली आणि त्यांच्याकडे केवळ ९० सेकंदांचा वेळ मागून, छानशा गुलाबी वाईनचे घुटके घेत शेफर्ड-बॅरॉनने आपल्या अभिनव स्वयंचलित रोखीच्या यंत्राची कल्पना त्यांच्यापुढे मांडली. “तुम्ही तुमच्या बँकेशेजारी एक खाच बसवली, की ज्यात तुमचा अधिकृत धनादेश टाकला, तर तिथून कोणत्याही वेळेला प्रमाणित रोकड मिळू शकेल, अशा कार्यपद्धतीची कल्पना माझ्याकडे आहे.”  त्यावर बँकेचे महाव्यवस्थापक म्हणाले, “तू सोमवारी सकाळी मला येऊन भेट.”  

बार्कलेज बँकेने शेफर्ड-बॅरॉनला सहा स्वयंचलित रोखीची यंत्रे कार्यान्वित करण्याचे काम दिले. त्यापैकी पहिले यंत्र लंडनच्या उत्तर भागातील एन्फिल्ड उपनगरात दि.२७ जून १९६७ रोजी बसविण्यात आले.                                                                       

शेफर्ड-बॅरॉनचा जन्म १९२५ साली, भारतात शिलाँग येथे झाला. पुढे त्याने भारतीय सैन्याच्या हवाई दलाच्या दुस-या तुकडीत नोकरी केली आणि गुरखा सैनिकांना हवाई छत्रीचे प्रशिक्षण दिले.                                                                  

तसाच त्याने अजून एक अभिनव शोध लावला – भारतीय सैन्यातील परिचय क्रमांकाप्रमाणे PIN चा (Personal Identification Number) शोध ! सुरूवातीला त्याने हा क्रमांक सहा अंकी करण्याचे ठरवले. पण त्याच्या पत्नीने – कॅरोलिनने तक्रार केली की सहा अंकी क्रमांक फार लांबलचक होतो, म्हणून त्याने तो चार अंकी केला. त्याची आठवण सांगतांना त्याने म्हटले की, “स्वयंपाकाच्या मेजावर चर्चा करतांना ती म्हणाली की, चार अंक सहजपणे तिच्या लक्षात रहातात. मग काय? चार अंकी क्रमांकाला मिळून गेला जागतिक दर्जा.”   

ही गोष्ट शक्य होण्याचे कारण म्हणजे भारतीय प्रतिभावान गणितज्ञ – श्रीनिवास रामानुजन — अपारंपारिक प्रतिभावान गणितज्ञ – श्रीनिवास रामानुजन् यांनी गणिताचे कोणतेही अधिकृत शिक्षण घेतले नव्हते आणि मद्रास विद्यापीठातही त्यांना पुढचे शिक्षण घेता आले नव्हते. परंतु त्यांचे मद्रास पोर्ट ट्रस्टमधील कार्यालयीन वरिष्ठ, जे इंग्लिश होते, त्यांनी ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिजमधील प्राध्यापक हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यास त्यांना उद्युक्त केले. श्रीनिवास रामानुजन् यांनी आपली गणितीय समीकरणे मांडून एक भले मोठे पत्र लिहिले, ज्यामुळे प्रा. हार्डी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी कुठल्याही पूर्वपरीक्षेशिवाय, इतकेच काय, अत्यंत कठीण समजली जाणारी ‘ट्रायपॉस परीक्षा’ पास होण्याच्या अटीशिवाय श्रीनिवास रामानुजन् यांचा कॉलेज-प्रवेश नक्की करून टाकला. केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजने सर्व नियम मोडून टाकून त्यांना कॉलेज-प्रवेश दिला नसता, तर त्यांना आपल्या ‘विभाजन सिद्धांता’ने प्राप्त झालेल्या जागतिक ख्यातीला वंचित व्हावे लागले असते, यात शंकाच नाही. 

जेव्हा तुम्ही तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यंत्रामध्ये सरकवता आणि तुम्हाला हवी असलेली रक्कम यंत्राने द्यावी, असे फर्मावता – तेव्हा यंत्र तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचे विभाजन – रामानुजन् ‘विभाजन सिद्धांता’नुसार करून ती तुमच्या हाती पडेल, असे बघते. जसे की पुढीलप्रमाणे :-                           

अंकगणितात सकारात्मक पूर्णांकांचे विभाजन (n), जे पूर्णांक विभाजन म्हटले जाते, ती ‘n’ ही सकारात्मक पूर्णांकांची बेरीज पद्धति आहे. दोन बेरजा ज्या दोन किंवा अधिक प्रमाणात वेगवेगळ्या निर्दिष्टांमध्ये दर्शविल्या असतील, त्याही समान विभाजन मानल्या जातील.                                                                                                                     

उदा. “४” ह्या संख्येचे विभाजन पाच प्रकारे करता येईल :-                                              

४  =   ३ + १                                                             

         २ + २                                                                   

         २ + १ + १                                                              

         १ + १ + १  + १                                                                                                   

 हे स्वयंचलित रोखीचे यंत्र ह्या श्रीनिवास रामानुजन् यांच्या ‘विभाजन सिद्धांता’नुसार बरोबर रकम रोख अदा करते.

(एक छानशी टिप :- श्रीनिवास रामानुजन नावाच्या प्रसिद्ध भारतीय गणितज्ञांच्या नावाने ‘रामानुजन समेशन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मालिकेबद्दल तुमच्यापैकी जे अपरिचित आहेत त्यांच्यासाठी: – त्यात असे नमूद केले आहे की तुम्ही सर्व नैसर्गिक संख्या जोडल्यास, म्हणजे 1, 2, 3, 4, आणि असेच, अनंतापर्यंत सर्व मार्ग, तुम्हाला ते  -1/12 च्या बरोबरीचे आढळेल.) 

तर, दोन अत्यंत आदर्श सद्गृहस्थ, जे कधीही एकमेकांना भेटले नाहीत आणि ज्यांनी आपल्या संशोधनाच्या/कल्पनेच्या स्वामित्वहक्काबद्दल जराही फिकीर केली नाही, त्यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार म्हणजे स्वयंचलित रोखीच्या यंत्राकडून तुमच्या हातात पडणारी रोकड !  

आता जेव्हा जेव्हा तुम्ही स्वयंचलित रोखीच्या यंत्रासमोर उभे रहाल, तेव्हा या दोन प्रतिभावंतांची जरूर आठवण करा – एक, ज्याला कल्पना सुचली आणि दुसरा, ज्याला स्वयंचलित रोखीचे यंत्र अवतरण्यापूर्वी त्याच्यासाठी वापरायची गणिती कार्यपद्धती सुचली.   

(मूळ इंग्लिश लघुलेखाचे हे रूपांतर आहे.)

मूळ लेखक:  अज्ञात

अनुवाद : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषेचे सौंदर्य पहा… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ मराठी भाषेचे सौंदर्य पहा… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

इलेक्ट्रिकच्या  दुकानवाल्याने फलकावर लिहिलं होतं..

” तुमच्या बुध्दीचा प्रकाश पडो ना पडो, आमच्या बल्बचा नक्की पडणार “.. 

 

इलेक्ट्रॉनिक दुकानावर लिहिलेलं वाचून माझं मन भरून आलं ..

“आपला कुणी फॅन नसेल तर आमच्याकडून एक घेऊन जा “..

 

चहाच्या टपरीवर असाच फलक होता..

” मी साधा माणूस आहे पण चहा मात्र खास बनवतो..”

 

एका उपाहारगृहाच्या  फलकावर वेगळाच मजकूर होता  ..

” इथे घरच्यासारखं खाणं मिळत नाही, आपण बिनधास्त आत या..” 

 

पाणीपुरीवाल्यानं लिहिलं होतं..

” पाणीपुरी खाण्यासाठी मन मोठं नसलं तरी तोंड मात्र मोठं हवं ” ..

 

फळं विकणाऱ्या माणसाने तर कमालच केली. ..

“तुम्ही फक्त पैसे देण्याचे कर्म करा, फळं आम्ही देऊ “.. 

 

घड्याळाच्या दुकानदाराने अजब मजकूर लिहिला होता  ..

” पळणाऱ्या वेळेला काबूत ठेवा, पाहिजे तर भिंतीवर टांगा किंवा हातात बांधा..”

 

ज्योतिषाने फलक लावला होता आणि त्यावर लिहिलं होतं…..

” या आणि फक्त १०० रुपयांत आपल्या आयुष्याचे पुढील एपिसोड बघा …”

 

आणि आमच्या ग्रुपवर लिहिले होते …… 

इथे दररोज येऊन तर बघा

सर्व अडचणी विसरून जाल… 

संग्रहिका – सौ अंजली दिलीप गोखले 

मो 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “नातं अश्रूंचं…” ☆ सौ राधिका भांडारकर

त्यादिवशी  माझी मदतनीस निर्मला मला म्हणाली, “ ताई आताशा मले रडाया बी येत नाय. इतकं दुःख पेललंय् की डोळ्यातलं सारं टिप्पूस पार सुकूनच गेलय  बगा.”

ती इतकी सहज आणि निर्विकारपणे  हे उद्गारली की तिच्या वक्तव्याने माझ्या डोळ्यातून टपकन अश्रू ओघळले. आणि त्याच क्षणी जाणवलं तिच्या कोरड्या डोळ्यांशी माझं अश्रूंचं एक कणवेच नातं होतं. एक स्त्रीत्वाचा जाणता गहिवर होता. 

… असे कित्येक अश्रू मी माझ्या हृदयात सांभाळून ठेवलेत.  कारण त्यांच्याशी माझं खोल नातं आहे.

अश्रू आनंदाचे, अश्रू दुःखाचे, वियोगाचे, भेटींचे, निरोपाचे, कधी ते केवळ आपल्याशी संबंधित तर कधी अवाढव्य पसरलेल्या या जगात कुणाकुणाच्या डोळ्यातून वाहताना पाहिलेले, अनपेक्षित आणि साक्षी भावाने.  त्या त्या वेळी त्या अश्रूंविषयी उमटलेल्या भावनांशी  माझ्या अस्तित्वाचा, माझ्या सजीवतेचा दाखला देणारं नातं नक्कीच होतं.  त्या साऱ्यांचे फायलिंग माझ्या अंतःकरणात वेळोवेळी झालेलं आहे. 

माझ्या आजीचं हार्नियाचं ऑपरेशन होतं. १९५६ साल असेल ते.  त्यावेळी शल्यशास्त्र आजच्या इतकं प्रगत नव्हतं.  माझे पपा अत्यंत अस्वस्थ, व्याकूळ होते. पपांनी आम्हा साऱ्यांसाठी त्यांच्या डोळ्यातलं पाणी बांधून ठेवलं होतं. पण जेव्हा डॉक्टर ओ.टी. मधून बाहेर आले आणि पपांचे  हात हाती घेऊन म्हणाले,” डोन्ट वरी.  ऑपरेशन ईज सक्सेसफुल. ” ….  हे ऐकल्यावर माझे पपा  भवताल विसरून ढसढसा रडले. इतका वेळ धरुन ठेवलेला चिंतेचा लोंढा अश्रूंच्या रुपात वहात होता.  त्या अश्रूंच्या पावसात मीही भिजले. वास्तविक तो क्षण किती आनंदाचा, तणाव मुक्ततेचा होता ! पण त्यावेळी जाणवलं होतं ते मात्र माय लेकाचं घट्ट नातं ! ते त्या अश्रूंमध्ये मी पाहिलंं आणि माझ्या मनात कायम रुजलं.

अगदी आजही रणजीत देसाईंची “स्वामी” कादंबरी वाचताना शेवटचा— रमा सती जातानाचा जो प्रसंग आहे तो वाचताना माझ्या डोळ्यात पाणी येतच.  हे अश्रू म्हणजेच त्या प्रसंगाशी, त्या शब्दांशी जुळलेलं एका  वाचकांचं नातं असतं. 

गीत रामायणातलं सीतेच्या मुखातलं… मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे?

                                                          पती चरण पुन्हा मी पाहू कुठे?

हे गाणं आणि तिने फोडलेला टाहो ऐकून ज्याचे हृदय आणि  डोळे भरून येणार नाहीत तो माणूसकुळातलाच  नाही असेच मी म्हणेन.  कारण माणसाच्या संवेदनशील मनाशी अश्रूंचं थेट नातं असतं.  ते सदा वाहत असतं, वारंवार जाणीव करून देणार असतं.

पु.लंचे चितळे मास्तर जेव्हा म्हणतात, ” अरे पुर्षा ! आमच्या डोळ्यातच मोतीबिंदू असणार.  खरे मोती आम्ही कुठे पाहणार?”

… असं अल्प शब्दातलं पण इतकं खरं दारिद्र्याचं  स्वरूप पाहताना डोळे पाझरणारच ना?

माणूस दुःखातच रडतो असं नाही. सुखातही ओलावतो. शब्दात, कथेत, गाण्यात, अपयशात आणि यशातही ओलावतो. शिखरावर पोहचल्यानंतर माथ्यावरच्या आकाशाकडे  तो साश्रु नयनाने पाहतो. ते अश्रु काहीतरी साध्य केल्याचं समाधान देणारे असतात. ब्रह्मपुत्रा नदीचे विस्तीर्ण पात्र पाहताना त्या दिव्यत्वाच्या तेजानेही मी पाझरले. ही अशी अव्यक्त नाती फक्त अश्रूच  व्यक्त करतात… नि:शब्दपणे. जिथे शब्द संपतात तिथूनच अश्रूंचं नातं सुरु होतं.

वीस-बावीस वर्षांनी जेव्हां  मी माझ्या मावस भावाला अमेरिकेत भेटले, तेव्हा कितीतरी वेळ आम्ही एकमेकांशी बोलूही शकलो नाही.  नुसते डोळे वाहत होते आणि वाहणाऱ्या डोळ्यातून आमचं सारं बालपण पुन्हा पुन्हा दृश्यमान होत होतं.  एका रम्य काळाचं प्रतिबिंब त्या अश्रूंच्या पाण्यात उमटलं  होतं.  हे लिहिताना आताही  या क्षणी माझे डोळे ओलावलेले आहेत. 

… नात्यातल्या प्रेमाची एक खरी साक्ष हे अश्रूच देतात.

एकदा आमच्या घरी काम करणाऱ्या गणूला एक पत्र आलं होतं.  त्याने ते वाचलं, डोळे पुसले आणि पत्राची पुन्हा घडी करून ठेवली.  मला वाटलं काहीतरी दुःखद घटना घडली असावी गणूच्या गावी.  म्हणून मी चौकशी केली, तेव्हा त्याने आढेवेढे घेतले आणि मग तो हळूच म्हणाला, ” माझ्या कारभारणीचा कागद हाय.” आणि तो कागद त्याने माझ्या हातात दिला.  मी तो उलगडला तर काय एका कोऱ्या कागदावर ओल्या थेंबामुळे  पुसलेली एक आडवी रेष होती फक्त.  मी गणूकडे पाहिलं तेव्हा तो इतकंच म्हणाला, 

” तिला लिवता वाचता येत नाय.” डोळ्यातल्या थेंबाने पुसलेली रेष जणू हेच सांगत होती का?…  ” तुमची भारी सय येते धनी.” वाह ! क्या बात है ! एका कागदावर एक सुकलेला अश्रू अंतःकरणातल्या खोल भावनाही किती सुंदरपणे व्यक्त करू शकतो !

” गड आला पण सिंह गेला ! “ हे म्हणताना तो युगपुरुषही अश्रूंना थोपवू शकला नव्हता. त्या स्वामीभक्ताला प्रत्यक्ष स्वामींनी दिलेली ही साश्रु मानवंदना इतिहासात कोरली गेली.

… अनेक प्रसंग अश्रूंच्या माध्यमातून असे कोरले गेले आहेत.

आमच्या एका मित्राने मृत्यूशी  अचाट झुंज देऊन जगाचा निरोप घेतला.  त्याचा लोकसंग्रह,  लोकप्रियता अफाट होती. त्याच्या अंत्यदर्शनाला सारा गाव लोटला होता. पण हा माणूसप्रिय आत्मा शांत पहुडला होता.  त्याची पत्नी शांत होती. स्वतःला सावरत होती. वयाच्या अठराव्या  वर्षापासूनच्या जीवनसाथीला निरोप देणं किती कठीण होतं !  पण तो एक क्षण माझ्या मनात घर करून आहे. खूप प्रेमाचं नातं होतं त्यांचं.  तसं परिपूर्ण आयुष्य दोघांनी जगलं होतं.  जेव्हां त्याच्या निर्वाणाची  वेळ आली तेव्हां तिच्या डोळ्यातून गळलेला अश्रू त्याच्या स्थिर निश्चल पापणीवर ओघळला आणि त्याच क्षणी त्याचा देह  चार खांद्यावर विसावला. त्यावेळी माझ्या मनात आलं ‘ हा सारं वैभव इथेच ठेवून गेला पण जाताना पत्नीच्या प्रेमाचा एक अश्रू मात्र सोबत घेऊन चाललाय.’  त्या अश्रूशी  त्याचं असलेलं नातं चिरंतन होतं. 

आमच्या आईनेही जाताना शेवटच्या क्षणी आम्हा पाची बहिणींना जवळ घेतलं, आणि एवढेच म्हणाली, ” मी तृप्त आहे. माझी जीवनाविषयी कोणतीही तक्रार नाही. तुम्ही साऱ्या सुखी रहा. शोक करु नका. ” बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. निरोपाचाच तो क्षण. तिचा एक एक अश्रू म्हणजे जीवनातल्या मूल्यांचा, संस्काराचा  एक एक मोती होता.  जगातले सारे मोती एकत्र केले ना तरी या एका अश्रूच्या थेंबांची किंमत त्यांना लाभणार  नव्हती. तो एका स्त्रीचा, आईचा अश्रू होता. महान, शक्तिमान… तिची शक्ती त्या अश्रूंच्या माध्यमातून जणू आमच्यात झिरपत होती.

तेव्हा हे असं आहे अश्रूंचं नातं…..  

आता नक्राश्रू, रुदालीचे अश्रू, मोले घातले रडाया, या शब्दप्रयोगांना आपण तूर्तास तरी दूर ठेवूया आणि अश्रूंशी जीवनभर असलेल्या नात्याला रचनात्मक रितीने स्मरूया. 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिचं मंगलपण…” भाग-2 ☆ सुश्री मृणालिनी चितळे ☆

सुश्री मृणालिनी चितळे

??

☆ “तिचं मंगलपण…” भाग-2 ☆ सुश्री मृणालिनी चितळे 

गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर

(करोना काळात  घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे.) इथून पुढे —

प्रत्येक गोष्टीचा वापर… पुनर्वापर 

होता होई तो, एकही गोष्ट वाया घालवायची नाही आणि पर्यावरणाला हानी पोचेल असं काही करायचं नाही याचा वसा तिनं घेतला आहे. त्यासाठी तिच्यातील कलागुणांना तिनं कल्पकतेची जोड दिली आहे. सभासमारंभात मिळणाऱ्या शालींचे  मुलांसाठी गरम कोट स्वत: शिवून अनेकांना भेट दिले आहेत. लहान मुलांसाठी कपडे शिवताना कपड्यांना ती अस्तर अशा खुबीने लावते की त्याची शिवण अजिबात टोचू नये. साडीबरोबर येणाऱ्या डिझाईन्सच्या ब्लाउज पिसमधून नातींसाठी झबली, परकर पोलकी शिवली आहेत. नुकतंच तिनं मला मायक्रोव्हेवमध्ये ठेवून गरम करता येईल असं हिटिंग पॅड भेट दिलं. आयताकृती कापडाला कप्पे करून त्यामध्ये धान्य भरल्यानंतर ते शिवून टाकले होते. मायक्रोव्हेवमध्ये ठेवल्यावर हे पॅड त्यातील धान्यासह गरम होते आणि बाहेर काढून मस्त शेक घेता येतो. हे पॅड कुणाकडे तरी पाहून तिनं बनवलं असलं तरी ते बनवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि सुबकता वाखाणण्याजोगी आहे. लॉक डाऊनच्या सुरवातीला जुन्या मऊ साड्या वापरून, तिनं तीन पदरी मास्क बनवले. अगदी एन ९५ मास्क इतकेच सुरक्षित ठरावेत असे. दरवर्षी राख्या ती स्वत: बनवते. एकदा तिच्या राहत्या इमारतीच्या वरती मधमाशांनी पोळी केली. माणूस बोलवून तिनं पोळी तर उतरवलीच पण त्यानंतर स्वच्छ कापडानं मध गाळून घरोघर वाटण्याचा उपद्व्याप केला. घरात नवा फ्रिज घेतल्यावर त्याचं भलं मोठं खोकं टाकून न देता नातींना खेळायला दिलं. नातींनी त्यामध्ये दारखिडक्या कापून एक झोपडी बनवली. उरलेल्या कचऱ्यातून मंगलताईनं झोपडीच्या दारांसाठी कड्या – नातींच्या शब्दात ‘क्लेव्हर बोल्ट.’ बनवले. आजीनातींचा खेळ अजूनही रंगला असता, परंतु दिवाणखान्यात ती झोपडी इतकी मध्येमध्ये यायला लागली की तिला आपल्या घरी घेऊन जाण्याचा वटहुकुम जयंतरावांना काढावा लागला. अलीकडे ते थकल्यामुळे पायी फिरायला बाहेर पडलं की त्यांना मध्येमध्ये बसावं लागे. वाटेत बाक असत, पण त्यांची उंची कमी असल्याने ते सोयीचे ठरत नसत. मंगलताईनं लगेच यावर तोडगा काढला. घरच्या उशीला पट्टा शिवला. पर्सप्रमाणे ती उशी स्वत:च्या खांद्याला लटकवून फिरायला जाण्यात खंड पडू दिला नाही.   

 

लेखन… वाचन… सामाजिक बांधिलकीचं भान…

जयंतराव आणि मंगलताई दोघांनाही अभिजात साहित्याची विलक्षण जाण आहे आणि आवडही. त्यांच्या दिवाणखान्यातील कपाटं पुस्तकांनी खचाखच भरलेली असतात आणि टीपॉयवर पुस्तकं नि मासिकं ढिगानं रचलेली असतात. दोघांनी विपुल लेखन केलं आहे. मंगलताईनं तिच्या लेखनातून आपल्या समाजातील चुकीच्या प्रथापरंपरांवर अनेकदा टीका केली आहे तर कधी अनेक गोष्टींमागचं विज्ञान उलगडून दाखवलं आहे. जयंतरावांनी लिहिलेल्या ‘आकाशाशी जडले नाते’ या ग्रंथांचे तिनं इंग्रजीत भाषांतर केले आहे. दोन्ही भाषांवर प्रभुत्व असल्यामुळे ही गोष्ट शक्य झाली, हे निश्चित ! तिला आवडलेली पुस्तकं अनेकांपर्यंत पोचावी, या उद्देशानं, ती पुस्तकांच्या प्रती विकत घेऊन ग्रंथालयांना भेटीदाखल देते. लेखनवाचनाइतकाच शिक्षकी पेशा तिच्या रोमारोमात भिनला आहे. तिचं वैशिष्ट्य असं की पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवताना तिला जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद पहिली दुसरीतल्या मुलांना शिकवताना मिळतो. काय शिकवतो यापेक्षा आपण जे शिकवतो ते समोरच्यापर्यंत पोचणं तिला महत्वाचं वाटतं. आत्तापर्यंत आर्थिक कमकुवत गटातील असंख्य शाळकरी मुलांना तिनं तन्मयतेनं शिकवलं आहे. अनेकांना शिक्षण, आजारपण यासाठी मदत केली आहे, परंतु लग्नखर्चासाठी म्हणून कुणी पैशाची मागणी केली तर ती नाकारण्याइतका सडेतोडपणा तिच्यापाशी आहे.

 

आजाराशी दोन हात

विविध आघाड्यांवर कार्यरत असताना १९८६ साली वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ तिच्यावर आली. शरीरमनाची ताकद खच्ची करणाऱ्या आजाराला तिनं खंबीरपणे तोंड दिलं. त्यानंतर १९८८ साली आणि अलीकडे २०२१ आणि २०२२ साली त्यानं परत डोकं वर काढलं. प्रत्येक वेळी आपली सारी व्यवधानं सांभाळत अपराजित वृत्तीनं ती लढली आहे. आजही लढत आहे. तिच्या तिन्ही मुली आणि जगभर विखुरलेले असंख्य सुहृदजन तिची काळजी घेत आहेत. तिची हिंमत पाहून स्तिमित होत आहेत. 

मंगलताईच्या व्यक्तिमत्वाचं एका शब्दात वर्णन करायचं ठरवलं तर ओठावर शब्द येतो, ‘सहजता’. सहजता हाच तिच्या व्यक्तिमत्वाचा स्थायीभाव आहे. एकाच वेळी ती करत असलेल्या असंख्य गोष्टी पाहून बघणाऱ्याला वाटतं हे सगळं सहजसोपं असतं म्हणून. कारण हे सगळं करताना आपण खूप काही करतोय असा तिचा भाव नसतो नि अभिनिवेशही. असते ती तिची गणिती बुद्धी आणि कलावंताची मनस्वी वृत्ती. त्यामुळे काळ, काम वेगाचं व्यस्त गणित ती बिनचूक रीतीनं सोडवू शकली आहे. तिच्या वाट्याला आलेली प्रश्नपत्रिका नक्कीच सोपी नव्हती. कठीण प्रसंग… अवघड माणसं तिच्याही आयुष्यात आली. परंतु रडतकुढत न बसता सगळ्यांना तिनं व्यवस्थित कोष्टकात बसवलं. तिच्या बोलण्यात स्पष्टपणा असतो, तेवढाच मायेचा ओलावाही. शिस्त असते, पण शिस्तीची धास्ती वाटावी इतकी कठोर ती कधीच नसते. यातच तिच्या व्यक्तिमत्वातील ‘मंगलपण’ सामावलेलं आहे. 

***समाप्त***

© सुश्री मृणालिनी चितळे

मोबाईल ९८२२३०१७५० 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अतिप्राचीन अतिप्रगत हिंदुस्तानी संख्या मापन… ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ अतिप्राचीन अतिप्रगत हिंदुस्तानी संख्या मापन☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा.

१०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,०००

एकं, दहं, शतं, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अर्व, दशअर्व, खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिति, दशक्षिति, क्षोभ, दशक्षोभ, ऋध्दि, दशऋध्दि, सिध्दि, दशसिध्दि, निधि, दशनिधी, क्षोणी, दशक्षोणी, कल्प, दशकल्प, त्राही, दशत्राही, ब्रम्हांड, दशब्रम्हांड, रुद्र, दशरुद्र, ताल, दशताल, भार, दशभार, बुरुज, दशबुरुज, घंटा, दशघंटा, मील, दशमील, पचूर, दशपचूर, लय, दशलय, फार, दशफार, अषार, दशअषार, वट, दशवट, गिरी, दशगिरी, मन, दशमन, बव, दशबव, शंकु, दशशंकु, बाप, दशबाप, बल, दशबल, झार, दशझार, भीर, दशभीर, वज्र, दशवज्र, लोट, दशलोट, नजे, दशनजे, पट, दशपट, तमे, दशतमे, डंभ, दशडंभ, कैक, दशकैक, अमित, दशअमित, गोल, दशगोल, परिमित, दशपरिमित, अनंत, दशअनंत.

मोजा आणि इतरांनाही सांगा….. 

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

☆ पर्यावरण दिनाच्या निमित्ताने… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

गेल्या काही वर्षात पाच जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून शाळा शाळातून साजरा केला जातो. माझा नातू लहान असताना पर्यावरण दिनाच्या दिवशी त्याच्याबरोबर मी शाळेत गेले होते. तेव्हा तेथील वातावरण पाहून मी थक्क झाले! शाळेत प्रवेश करताक्षणी सगळीकडे हिरवाई दिसत होती. हरीत रंगाने विविध प्रकारच्या कलाकृती केलेल्या होत्या.भिंतीवर निसर्ग चित्रे लावलेली होती. मुलांना आधीच सूचना देऊन कुंड्यांमध्ये काही बिया पेरायला सांगितल्या होत्या .कोणी मोहरी,मेथी,हळीव अशा लवकर येणाऱ्या रोपांच्या बिया रूजवल्या होत्या.त्यांची छोटी छोटी रोपे उगवून आली होती.आणि प्रत्येकाला त्या सृजनाचे रूप इतके कौतुकाचे होते की मुले त्या छोट्या कुंड्या मिरवत शाळेत आली होती! वर्गा वर्गातून त्या छोट्या कुंड्या, वनस्पतींची माहिती देणारे बोर्ड तसेच पर्यावरणाचे महत्त्व दाखवणारे प्रसंग आणि ते सांगणारे छोटे विद्यार्थी असे उत्साहाने भरलेले वातावरण होते! त्या वातावरणाने मला भारावून टाकले! लहानपणापासूनच ही जागृती मुलांमध्ये निर्माण झाली तर ही वसुंधरा पुन्हा जोमाने सजेल आणि निसर्गाची वाटचाल चांगली होत राहील, असा विश्वास पर्यावरण दिनाच्या दिवशी माझ्या मनात निर्माण झाला.

घरी येताना मन सहज विचार करू लागले की पन्नास एक वर्षाखाली असा हा पर्यावरण दिन आपण करत होतो का? नाही, तेव्हा ती गरज जाणवली नाही. मनात एक कल्पना आली की, परमेश्वराने पृथ्वीला मायेने एक पांघरूण घातले आहे. त्या उबदार पांघरूणात ही सजीव सृष्टी जगत आहे. पण अलीकडे या पांघरूणाला न जुमानता मनुष्य प्राणी आपली मनमानी करीत आहे, त्यामुळे एकंदरच सजीव सृष्टीचा तोल बिघडू लागला आहे. काही सुजाण लोकांना याची जाणीव झाली आणि साधारणपणे 1973 सालापासून जागतिक पातळीवर पर्यावरणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी अमेरिकेत “पर्यावरण दिन” साजरा होऊ लागला!

पर्यावरण म्हणजे काय? ही  सजीव सृष्टी टवटवीत ठेवण्यासाठी असलेली सभोवतांची हवा, पाणी, माती आणि जमीन या सर्वांचे संतुलन ! ते जर चांगले असेल तर आपले अस्तित्व चांगले रहाणार !

आपल्याला ज्ञात असलेला मानवी जीवनाचा इतिहास अभ्यासताना असे लक्षात येते की, आदिमानवापासून ते आत्तापर्यंतच्या मानवी इतिहासात खूप बदल हळूहळू होत गेलेले आहेत. गुहेत राहणारा मानव निसर्गाशी आणि इतर प्राण्यांची जुळवून राहत होता. माणसाला मेंदू दिला असल्याने त्याने आपली प्रगती केली आणि त्यामुळे आजचा आधुनिक माणूस आपण निसर्गावर मात केली आहे असे समजतो. पूर्वी यंत्र नव्हती तेव्हा प्रत्येक काम हाताने करणे, वाहने नव्हती तेव्हा प्रवास चालत किंवा प्राण्यांच्या मदतीने करणे, गुहेमध्ये किंवा साध्या आडोश्याला घर समजून रहाणे, अन्नासाठी कंदमुळे, तृणधान्ये, फळे यांचा उपयोग करणे हे सर्व माणूस करत असे.अन्न,वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा भागल्या की बास!. पण आज या सर्व गोष्टी बदलल्या आहेत. त्यामुळे नकळत पर्यावरणावर आपण हल्ला केला आहे !

हवेचा विचार केला तर प्रदूषण ही समस्या आपणच निर्माण केली. विविध प्रकारचे कारखाने वाढले. पेट्रोल, डिझेल यासारख्या पदार्थांच्या वापर वहानात होत असल्याने हवा प्रदूषित झाली. रस्त्यांसाठी, घरांसाठी झाडे तोडणे यामुळे हवेतील गारवा कमी झाला. एकंदरच वातावरणातील उष्णता वाढू लागली. सावली देणारी, मुळाशी पाणी धरून ठेवणारी वड, पिंपळासारखी मोठी झाडे  तोडून टाकली. डोंगर उघडे बोडके दिसू लागले. या सर्वाचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा समतोल बिघडला. वेळच्यावेळी पाऊस पडेना. त्याचा परिणाम इतर सर्व ऋतूंवर आपोआपच होऊ लागला. पाणी पुरत नाही म्हणून नद्यांचे पाणी आडवणे, धरणे बांधणे यामुळे नैसर्गिक रित्या असलेले पाण्याचे स्त्रोत जमिनीखाली विस्कळीत होऊ लागले. हवा, पाणी, पाऊस, जमीन या सर्वांचा नैसर्गिक असलेला परिणाम जाऊन प्रत्येक गोष्ट अनियमितपणे वागू लागली !

माणसाला याची जाणीव लवकर होत नव्हती. घरात गारवा नाही, एसी लावा.. नळाला पाणी नाही, विकत घ्या ! चांगली हवा मिळत नसेल तर ऑक्सिजन विकत घ्या ! माणसाचा स्वार्थी स्वभाव त्याच्याच नाशाला हळूहळू कारणीभूत होऊ लागला. जगभर होणारा प्लास्टिकचा वापर जसजसा वाढू लागला तस तसे हे लक्षात आले की प्लॅस्टिक हे पर्यावरणासाठी मोठा अडथळा आहे. प्लास्टिक कुजत नाही. त्यातील घटकांचे विघटन होत नाही. प्लास्टिक मुळे नाले ,ओढे यांतून नद्यांकडे वाहत जाणाऱ्या पाण्याबरोबर प्लास्टिक ही पुढे समुद्राला जाऊन मिळते. दररोज कित्येक टन प्लास्टिक समुद्रामध्ये वाहत जाते, साठत जाते. या सर्वाचा परिणाम नकळत पर्यावरणावर होत असतो. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. गेल्या काही वर्षात प्लास्टिक वापरावर थोड्या प्रमाणात बंदी आली आहे, त्यामुळे नकळतच प्लास्टिकचा वापर थोडा कमी केला जात आहे.

५ जून १९७३ रोजी अमेरिकेत “पर्यावरण दिन” प्रथम साजरा केला गेला आणि आता जगभर हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा होतो. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने माणसाचे लक्ष निसर्गाकडे वेधले जाते. जर प्रदूषण वाढत राहिले तर नकळत आपणच आपला नाश करून घेऊ याची जाणीव थोड्याफार प्रमाणात होत आहे.या दिवशी एक तरी रोप लावावे, एक तरी झाड वाढवावे आणि पर्यावरण चांगले ठेवायला मदत करावी एवढा जरी संकल्प आपण केला तर खऱ्या अर्थाने या वसुधेची आपण काळजी करतो हे दिसून येईल  !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

पुणे

मो. 8087974168 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पासिंग द पार्सल – लेखिका – सुश्री प्रतिभा तरवडकर ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

?जीवनरंग ?

☆ पासिंग द पार्सल – लेखिका – सुश्री प्रतिभा तरवडकर ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

राजेशने बेलवर ठेवलेला हात काढलाच नाही.बेलचा टिंग टॉंग टिंग टॉंग असा कर्कश्श आवाज घुमतच राहिला.रंजना कणकेने भरलेले हात धुवून येईपर्यंत बेल अधीरपणे वाजतच राहिली.

‘हो हो,आले आले’म्हणत रंजनाने येऊन दार उघडले.राजेश उत्फुल्ल चेहऱ्याने उभा होता.सॅटीनच्या रिबिनचा बो बांधलेले, सुंदर वेष्टनातील एक भलेमोठे खोके त्याच्या पायाजवळ होते.राजेशचे डोळे आनंदाने चमकत होते.’सरप्राईज गिफ्ट?’रंजना कोड्यात पडली.राजेशचा स्वभाव कधीच रोमॅंटिक नव्हता.त्याच्याकडून असं सरप्राईज गिफ्ट वगैरे?रंजनाचा बुचकळ्यात पडलेला चेहरा पाहून राजेशने खुलासा केला,’अगं मागच्या वर्षीचा माझा परफॉर्मन्स बघून ऑफिसने गिफ्ट दिलंय.तसं प्रत्येकालाच गिफ्ट दिलंय पण मला सगळ्यात मोठं मिळालंय.’सांगतांना त्याची छाती आनंदाने फुलली होती.रंजनाच्या डोळ्यात आपल्या नवऱ्याच्या कौतुकाने चांदणं फुललं.राजेश आणि रंजनाने मिळून तो खोका घरात आणला.

‘सान्वी,सुजय बाबांनी काय गंमत आणलीये पहा,’बेलचा आवाज कानावर पडूनही न उठलेले सान्वी आणि सुजय ‘  गंमत’ हा परवलीचा शब्द ऐकून पळत आले.नाहीतरी एव्हढं महत्वाचं काम थोडंच करत होते?आईच्या मोबाईलचा ताबा सान्वीने घेतला होता तर सुजय लॅपटॉप वर कार्सच्या मॉडेल्स मध्ये बुडाला होता.दोघेही पळतच आले.त्या आकर्षक अशा वेष्टनात काय बरं दडलं असेल याबद्दलची सर्वांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती.खोक्याचं वरचं पुठ्ठ्याचं झाकण उघडून सर्वजण आत डोकावले आणि त्यांचे डोळेच विस्फारले.

आत अतिशय सुंदर, नाजूक असा काचेचा डिनर सेट होता.रंजना काळजीपूर्वक एक एक प्लेट काढून खाली ठेवू लागली.उत्कृष्ट दर्जाची पांढरी शुभ्र काच,त्यावर कडेने निळसर फुलांची नाजूक वेलबुट्टी….. सहा मोठ्या प्लेट्स, सहा छोट्या प्लेट्स,छोटे बाऊल्स,मोठे बाऊल्स, सर्व्हिंग बाऊल्स, ट्रे…. प्रत्येक वस्तू काढतांना रंजना अगदी नाजूक हातांनी काढत होती.मध्येच अधीरपणे सुजय एक प्लेट उचलायला गेला तशी रंजनाने त्याच्या हातावर चापट मारली.’उगाच धुसमुसळेपणा करशील आणि प्लेट फोडून ठेवशील.’

‘आई,आज आपण या प्लेटमध्ये जेवायचं का?’

‘गुड आयडिया,आई आपण आज याच प्लेट्स मध्ये जेवू या नं’सान्वी आईला लाडीगोडी लावत म्हणाली.

रंजनाच्या डोळ्यासमोर रात्रीच्या जेवणाचा मेन्यू आला.त्या नाजूक, सुंदर प्लेट्स मध्ये वाढलेली चटणी, कोशिंबीर,शेपूची भाजी, भाकरी आणि बाऊलमध्ये वाढलेली आमटी….. आणि तिने जाहीर केले,’आज नको, काहीतरी स्पेशल मेन्यू केला की या प्लेट्स काढू.’आणि रंजना  सगळ्या काचेच्या वस्तू परत खोक्यात भरु लागली.

‘काय गं आई,’सान्वी हिरमुसली.’बाबांना एव्हढं छान गिफ्ट मिळालंय आणि तू ते वापरत नाहीस’

‘अजिबात नाही.’रंजना आपल्या मतावर ठाम होती.’आपल्या भाजी,आमटीच्या तेल आणि हळदीचे डाग पडून त्या पांढऱ्याशुभ्र प्लेट्स खराब झाल्या तर! शिवाय या प्लेट्स,बाऊल्स आपल्यालाच धुवायला लागणार.तुम्ही तयार आहात का ती क्रोकरी धुवायला?’

त्याबरोबर जादू व्हावी तशी दोन्ही मुलं तिथून अदृश्य झाली.त्यांच्या बाबांनी म्हणजे राजेशने नेहमीप्रमाणे तटस्थ भूमिका घेतली.

डिनर सेटचे खोके कोपऱ्यात पडून राहिले.

‘काय गं,काल राजेश कसलं खोकं घेऊन आला होता?’शेजारच्या अरुणाताईंनी चौकशी केली.

‘त्यांना बेस्ट परफॉर्मन्स साठी ऑफिसकडून काचेचा डिनर सेट मिळाला.’रंजना थंडपणे म्हणाली.’एव्हढी सुंदर,महागडी क्रोकरी कशी वापरणार? धुताना साबणामुळे हातातून प्लेट निसटून फुटली तर? म्हणून तो खोका तसाच ठेवून दिलाय.’

‘बरं केलंस, अजिबात वापरू नकोस!’अरुणाताई गूढपणे म्हणाल्या तशी ‌रंजनाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.अरुणाताईंनी तिला त्यांच्या घरात येण्याची खूण केली.

‘ही बघ गंमत,’एक कपाट उघडत अरुणाताई म्हणाल्या.रंजनाचे‌ डोळे विस्फारले.एखाद्या गिफ्ट शॉप मध्ये शिरावे तसे तिला वाटले.लाफिंग बुद्धाच्या अंगठ्या एव्हढ्या मूर्तीपासून ते फूटभर उंचीच्या सोनेरी मूर्ती, काचेच्या छोट्या ट्रे मधील काचेचे कासव,तोंडात नाणं धरलेला बेडूक, फोटो फ्रेम्स, चिनी तोंडवळा असलेल्या गणपती आणि राधाकृष्णाच्या मूर्ती,स्टफ्ड टॉईज…..

‘हे कपाटभर सामान का बरं ठेवलंय?’रंजनाने आश्चर्याने विचारले.

‘गिफ्टस् म्हणून मिळाल्यात’,अरुणाताई नाक वाकडं करत म्हणाल्या.’मला सांग,यातील एक तरी वस्तू उपयोगाची आहे का?या मूर्ती धूळ बसून एका दिवसात खराब होतात.कोण पुसत बसेल रोज रोज?या फोटो फ्रेम्स तर इतक्या आहेत की सगळ्या लावायच्या म्हटल्या तर घराच्या एकूण एक भिंती भरुन जातील.अजून एक कारंजं मिळालं होतं विजेवर चालणारं.म्हणे समृद्धी येते त्याने.इतकं भलंमोठं की एक कोपरा व्यापेल खोलीचा!’

‘मग कुठंय ते?दिसत नाहीये इथं?’

‘अगं पासिंग द पार्सल केलं त्याचं!’अरुणाताई परत गूढपणे हसत म्हणाल्या.

‘म्हणजे?’

‘म्हणजे इधरका माल उधर करायचं.आपण लहानपणी नाही का तो खेळ खेळायचो, जोपर्यंत गाण्याचा आवाज ऐकू येतो तोपर्यंत आपल्या हातातील वस्तू शेजारच्याकडे सरकवायची.’

‘हां, आलं लक्षात.’रंजनाने‌ मान डोलावली.

‘कपाटावर सगळी खोकी सोडवून,सपाट करून ठेवली आहेत.’कपाटाच्या छताकडे निर्देश करीत अरुणाताई म्हणाल्या.’कोणाकडे काही फंक्शन असलं की यातील एक एक वस्तू पुढे करायची.लहान मुलाचा वाढदिवस असला तर स्टफ्ड टॉय, नवीन घर घेतलंय…. फोटो फ्रेम वगैरे.छानपैकी चकचकीत कागदात गुंडाळून,सॅटीनच्या रिबिनीने सजवून द्यायची.पंधरा वीस ‌रुपये खर्च येतो फक्त आणि महत्वाचं म्हणजे घरातील अडगळ कमी होते.’

रंजनाला अरुणाताईंचा सल्ला एकदम पटला.तिनेही तो डिनर सेट कपाटात ठेवून दिला.

तिच्याच गावातील सुनंदावन्संच्या अनिलचे लग्न ठरले.तसं लांबचं नातं असलं तरी गावातच असल्याने बऱ्यापैकी येणं जाणं होतं.सगळ्यांनाच अहेर करायला हवा होता. रंजनाने‌ डोकं लढवून काचेचा तो सुंदर डिनर सेट अहेर म्हणून पुढे केला आणि सुटकेचा निःश्वास टाकला.

हळूहळू तिच्या कडे सुद्धा अरुणाताईंसारख्या निरुपयोगी भेटवस्तू जमा होऊ लागल्या पण त्यांची हुशारीने विल्हेवाट लावण्यात रंजना एक्सपर्ट झाली आणि ‘पासिंग द पार्सलचा खेळ’  ती लीलया खेळू लागली.

रंजनाची सान्वी मोठी झाली.शिक्षण पूर्ण करुन नोकरीला लागली.ऑफिसमधल्याच एका मुलाशी तिचा प्रेमविवाह जुळला.सान्वीला तो सर्वप्रकारे अनुरूप असल्याने नकाराचा प्रश्नच नव्हता.लग्नाचा मुहूर्त काढला,खरेद्या झाल्या.लग्न समीप आले.लग्नाआधी घरी करायचे धार्मिक विधींची गडबड सुरु झाली.बरेच पाहुणे आले होते.रंजना धार्मिक विधी आणि येणाऱ्या पाहुण्यांची उठबस यात पार बुडून गेली.विधींनंतर अहेरांची देवाण घेवाण झाली.पाहुणे आपापल्या घरी गेले.रंजनाला जरा निवांतपणा मिळाला.राजेश,सान्वी,सुजय, रंजना सारेजण उत्सुकतेने एक एक अहेर पाहू लागले.कोणी भरजरी साड्या,शर्ट पँट चं कापड दिलं होतं तर कोणी चांदीच्या छोट्या मोठ्या वस्तू, कोणी काही तर कोणी काही.सारेजण अहेर पहाण्यात पार रंगून गेले होते.

‘हे खोकं अमिताकाकूने दिलं’,सुजयने एक जड खोकं ढकलत आणलं.’बघू बघू,उघड तो खोका,’सारेजण एक्साईट झाले होते.सुजयने कात्रीने त्या खोक्यावरची रिबिन कापली आणि खोकं उघडलं आणि रंजनाचा चेहरा पडला.

तिने सुनंदावन्संना दिलेला काचेचा डिनर सेट फिरत फिरत परत तिच्याकडे आला होता.

‘पासिंग द पार्सल’ चं एक राऊंड पूर्ण झाले होते.

लेखिका – सुश्री प्रतिभा तरबडकर

प्रस्तुती – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “तिचं मंगलपण…” भाग-1 ☆ सुश्री मृणालिनी चितळे ☆

सुश्री मृणालिनी चितळे

??

☆ “तिचं मंगलपण…” भाग-1 ☆ सुश्री मृणालिनी चितळे 

गणितज्ञ डॉ. मंगल नारळीकर ! विख्यात खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची पत्नी. माझी आत्ते नणंद. माझ्यापेखा पंधरा वर्षांनी मोठी, परंतु तिच्याशी गप्पा मारताना, ना कधी तिच्या बुध्दिमत्तेचं आणि प्रसिद्धीचं वलय आड येतं, ना वयातील अंतर. गप्पांच्या ओघात आपण मैत्रीच्या पातळीवर कधी उतरतो हे कळत नाही. हा माझ्या एकटीचा नाही, तर तिच्या सहवासात येणाऱ्या अनेकांचा अनुभव. नुकतीच १७ मे रोजी वयाची ८० वर्षे तिनं पूर्ण केली आहेत. त्या निमित्ताने तिच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची एक झलक.

गणित म्हणलं की भल्याभल्या हुशार लोकांना धडकी भरते, परंतु गणिताविषयी जन्मजात प्रेम असणाऱ्या मंगलताईसारख्या व्यक्तींच्या दृष्टीनं गणित म्हणजे नुसती आकडेमोड नसते तर पूर्णत्वाकडे घेऊन जाणारी वहिवाट असते. या संबंधीची तिच्या लहानपणची एक आठवण. एकदा हौसेनं ती पुऱ्या तळायला बसली होती. तिला कुणीतरी काही विचारलं असता ती पटकन म्हणाली, “मध्ये बोलू नकोस, माझे आकडे चुकतात. पुरी तेलात टाकल्यावर सहा आकडे मोजून झाले की मी उलटते आणि बारा आकडे मोजून झाले की तेलातून काढते. त्यामुळे सगळ्या पुऱ्या टम्म फुगतात आणि पाहिजे तेवढ्या खमंग होतात.” आपल्याला क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी अंकगणितामध्ये बसवायची आणि अचूक पद्धतीनं करायची तिला अशी लहानपणापासून आवड होती. 

मंगलताई ही पूर्वाश्रमीची मंगल राजवाडे. शालेय जिवनापासून अनेक बक्षिसे मिळवत ती एम.ए. झाली. मुंबई विद्यापिठात सर्वप्रथम आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) या संस्थेमध्ये तिनं संशोधनाला सुरवात केली, परंतु तिच्या करिअरला यू टर्न मिळाला तो १९६६ साली जयंतरावांशी झालेल्या विवाहामुळे. जयंतरावांनी तरुण वयात फ्रेड हॉईल यांच्याबरोबर केलेल्या संशोधनामुळे जगप्रसिध्द शास्त्रज्ञ म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होते. लग्नानंतर केंब्रिजमध्ये तिनं संसाराचे प्राथमिक धडे गिरवताना गणित विषयातील अध्ययन चालू ठेवले. तिची हुशारी बघून चर्चिल कॉलेजमध्ये टीचिंग फेलोशिपसाठी तिचं नाव सुचवलं गेलं, परंतु जयंतरावांना विविध देशांमध्ये व्याख्याते म्हणून निमंत्रित केलं जात असल्याने हा प्रस्ताव तिनं नाकारला. पुढे १९७२ साली भारतात परत येण्याचा निर्णय दोघांनी मिळून एकमताने घेतला. त्यामागे आपल्या मातृभूमीविषयी वाटणारं प्रेम तर होतंच शिवाय आपल्या वृध्द आईवडलांची जबाबदारी घ्यायला हवी ही जाणीव होती आणि आपल्या मुलींवर भारतीय संस्कार व्हावेत अशी इच्छाही. भारतात आल्यावर जयंतरावांनी टीआयएफआरमध्ये संशोधन आणि अध्यापनाचे काम सुरु केले. मंगलताईनं तिचं पीएच. डी. चे काम हाती घेतलं. १९८१ साली संश्लेषात्मक अंक सिध्दांत या विषयात पीएच. डी. मिळवली आणि पदव्युत्तर आणि एम. फिल.च्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे काम सुरू केलं. अनेक संशोधनात्मक लेख लिहिले. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणितगप्पा, गणिताच्या सोप्या वाटा यासारखी पुस्तकं लिहिली. ही झाली तिची औपचारिक ओळख. कुणाही कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या व्यक्तीची असते अशी; परंतु मंगलताईचं वैशिष्ट्य असं की गणितामुळे आत्मसात केलेलं तर्कशास्त्र आणि जयंतरावांच्या सानिध्यात वृध्दिंगत झालेला विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तिनं जपला. 

स्वयंपाकघर नव्हे प्रयोगशाळा

अनेकदा वेगवेगळ्या देशांत राहायची संधी मिळाल्यामुळे तेथील पाककृती तिनं शिकून घेतल्या. त्या जशाच्या तशा बनविण्यात ती वाकबगार आहे. चाळीस वर्षांपूर्वी तिच्या विदेशी पाककृतीसाठी लागणारे मालमसाले सहजगत्या उपलब्ध व्हायचे नाहीत. तेव्हा त्यांच्या योग्य देशी पर्याय तिनं निवडले. मॅपल सिरप ऐवजी वेगवेगळ्या स्वादाची काकवी. ओरॅगॅनोऐवजी ओव्याची ताजी पानं तर चीजकेकसाठी पनीर. ‘हर्बल टी’ बनविण्यासाठी बागेतील फुलापानांचा वापर ती करते, तेव्हा ते खाण्यायोग्य आहेत यांची शहानिशा केल्यावरच. घरच्या कुंडीत वाढलेली मोहरीची कोवळी रोपं सँण्डविच आणि सॅलेडमध्ये घातल्यावर स्वाद वाढविणारी कशी ठरतात याचा अनुभव मी तिच्याकडे घेतला आहे. बटाटेवड्याचं सारण हरबरा डाळीच्या पिठात बुडवून तळण्याऐवजी उडदाची डाळ भिजवून, वाटून त्याच्या पिठात बुडवून तिनं तळले तेव्हा वड्यांची चव अफलातून लागत होती. कुठेतरी वाचलेले किंवा कुणाकडे तरी खाल्लेले पदार्थ लक्षात ठेवून त्यात यथायोग्य बदल करण्याची प्रयोगशीलता तिच्याकडे आहे. रोजचा स्वयंपाक करताना किंवा पाहुण्यांसाठी बनवतानाही त्यामध्ये पिष्ठ, प्रथिन, स्निग्ध पदार्थांचा समतोल साधण्याचा तिचा प्रयत्न असतो. ठरावीक मोसमात मिळणारी फळं वर्षभर खायला मिळावीत यासाठी त्यावर शास्त्रीय पद्धतीनं प्रक्रिया करण्यात ती पटाईत आहे. एकदा तिच्या नेहमीच्या फळवाल्यानं ती मोठ्या प्रमाणात संत्री कशासाठी नेते म्हणून कुतूहलानं विचारलं. तेव्हा संत्र्यापासून बनवलेल्या मार्मालेडची बाटली तिनं त्याच्या मुलांसाठी भेट दिली. एवढंच नाही तर बियांमधील पेप्टीनचं महत्त्व त्याला सांगायला ती विसरली नसणार. कच्च्या पालेभाज्यांचा वापर करताना त्या पूर्णपणे निर्जंतुक करण्यासाठी पोटॅशियम परमँगनेटचा वापर ती करते. पोटॅशियम पाण्यात टाकलं की पाण्यातील प्राणवायू शोषून घेते. त्यामुळे त्या पाण्यात भाज्या बुडवून ठेवल्या की कीड मरून जाते, शिवाय पोषण मूल्य अबाधित राहते हे त्यामागचं शास्त्र! करोना काळात  घराघरातून सॅनिटायझरने भाज्या, फळे धुतली गेली नि करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी ही कृती विस्मृतीत गेली. मंगलताई मात्र कटाक्षाने स्वयंपाकघरातील विज्ञान कायम आचरणात आणत आहे. 

— क्रमशः भाग पहिला

© सुश्री मृणालिनी चितळे

मोबाईल ९८२२३०१७५० 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ महाविष्णूंना प्रिय आठ पुष्पे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ महाविष्णूंना प्रिय आठ पुष्पे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सुधा मूर्ती यांना त्यांच्या आजोबांनी एक श्लोक शिकवला होता. त्यात, भगवान महाविष्णूंना प्रिय असलेली आठ पुष्पे कोणती याची माहिती दिली होती. आजोबांनी अर्थासकट सांगितलेला श्लोक सुधा मूर्ती यांच्या बालमनावर ठसला. ती शिकवण आयुष्यभर आपल्या आचरणात आणून सुधा मूर्तींनी विष्णूभक्तीत कायमस्वरूपी आठ पुष्पे अर्पण केली. ती आठ पुष्पे कोणती, ते आपणही जाणून घेऊ या.

अहिंसा प्रथमं पुष्पम्

पुष्पम् इन्द्रिय निग्रहम् ।

सर्व भूतदया पुष्पम् 

क्षमा पुष्पम् विशेषत:।

ध्यान पुष्पम्

दान पुष्पम् 

योगपुष्पम् तथैवच।

सत्यम् अष्टविधम् पुष्पम्

विष्णु प्रसिदम् करेत ।।

अर्थ : –

१. जाणते-अजाणतेपणी हिंसा न करणे, अर्थात अहिंसा, हे पहिले पुष्प,

२. मनावर नियंत्रण ठेवणे हे दुसरे पुष्प,

३. सर्वांवर प्रेम करणे हे तिसरे पुष्प,

४. सर्वांना क्षमा करणे हे चौथे पुष्प,

५. दान करणे हे पाचवे पुष्प, 

६. ध्यान करणे हे सहावे पुष्प, 

७. योग करणे हे सातवे पुष्प,

८. नेहमी खरे बोलणे, सत्याची कास धरणे हे आठवे पुष्प आहे.

जो भक्त भगवान महाविष्णूंना ही आठ पुष्पे अर्पण करतो, तो त्यांच्या कृपेस पात्र होतो. 

ही सर्व पुष्पे कुठे सापडतील? तर आपल्या देहरूपी वाटिकेत ! या सर्व गोष्टी आपल्या वागणुकीशी निगडित आहेत. म्हणून मोठे लोक नेहमी सांगतात, ‘आचार बदला, विचार बदलेल.’ कोणतीही कृती, विचारपूर्वक केली पाहिजे. आपले विचार चांगले असले, तर हातून वाईट काम, चुकीचे काम घडणारच नाही. कोणावर हात उगारणार नाही, अपशब्द बोलणार नाही, अतिरिक्त माया, संपत्ती गोळा करणार नाही, अनावश्यक गोष्टी साठवणार नाही, मनात कोणाबद्दल द्वेष ठेवणार नाही. कोणाही प्राणिमात्राचा, जीवांचा दु:स्वास करणार नाही. ध्यान, दान, योग याबाबतीत सदैव तत्पर राहीन आणि शाळेतली शिकवण म्हणजे `नेहमी खरे बोलेन.’

देवाच्या आपल्याकडून किती साध्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करता आल्या, तर संपूर्ण आयुष्यच सार्थकी लागेल. तर मग तुम्ही कोणकोणती पुष्पे अर्पण करणार ?

संग्रहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares