☆ मला भावलेले अध्यात्म… ☆प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆
अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.
अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.
अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.
अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.
अध्यात्म म्हणजे वेदा बरोबरच वेदना वाचता येणे.
अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.
अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.
अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.
अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.
अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.
अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.
अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.
अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.
अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.
अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.
अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.
अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.
अध्यात्म म्हणजे ….
साधं………
सोपं……..
सरळ………
आणि निर्मळ ……….असणं – दिसणं आणि वागणं.
आहार या विषयावर अनेक विद्वानांची मते सर्वश्रुत आहेत आणि प्रत्येक जाती धर्मात यावर मत भिन्नता आहे माझ्या मते वैचारिक शाकाहारच असणे हेच अध्यात्म आहे महत्त्वाचे.
अध्यात्म म्हणजे फक्त पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर……
अध्यात्म म्हणजे केलेली पूजा – पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.
अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.
थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे.
संग्राहिका – सौ. जयश्री पाटील
विजयनगर.सांगली.
मो.नं.:-8275592044
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज वटपौर्णिमा… भारतीय संस्कृतीने जतन केलेला पती,पत्नीच्या अतूट व अलौकिक प्रेम धाग्यात गुंफलेला एक अजोड पुष्पहारच जणू. पौराणिक कथेनुसार यमराजाच्या हातून ज्या सावित्रीने सत्यवानाला अत्यंत नम्र विनंती करुन, बुध्दीचातुर्याने, विवेकाने ज्या निर्धाराने सोडविले व चार वर मोठ्या खुबीने मिळविले, .म्हणजेच सौभाग्य मिळविले, ती सावित्री त्रिखंडात अजरामर आहे. पतीवरील नितांत प्रेम व अखंड सौभाग्याची शिंपण ही ह्या व्रतामागील मूलभूत प्रेरणा आहे.
आज समाज कितीतरी बदलला आहे. मानवी जीवनाची गतिमानता वाढली आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असल्यामुळे आजची स्त्री घराचे कुंपण ओलांडून बाहेर पडली आहे. शिक्षणाने ती समृद्ध झाली आहे. तिचा भौतिक विकास झाला आहे. तिचा शैक्षणिक विकास झाला आहे. परंतू शिक्षणाचा जो दुसरा आणि महत्त्वाचा उद्देश ‘संस्कृती संवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना करणे‘ आहे– हे कार्य आजचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आजच्या स्त्रीला परंपरागत जीवन जगणे अशक्यप्राय झाले आहे. आजच्या प्रगत समाजात प्रगत जीवन पद्धतीत स्त्रीला दोन्ही तारांवर नाचता येत नाही. पण दोन्ही मतांचा सुवर्णमध्य मात्र साधता येतो. जीवनाच्या अंधारमय रस्त्यावर नव्या विचारांच्या नव्या प्रकाश वाटा दिसू लागतात. या सुवर्ण मध्याचा उपयोग केल्यास मानवी जीवन सुखकर होऊन समृद्ध होऊ शकते.
ढासळलेल्या कुटुंब पद्धतीला व समाजाला आधार देण्याचे काम हा सुवर्णमध्य साधू शकतो. एकत्र कुटुंब पद्धतीतील सेवा व्रत हे कोणत्याही धार्मिक व्रताच्या योग्यतेचे नव्हे का? प्रेम जिव्हाळा आपुलकी यांना पारख्या झालेल्या नात्याला नव संजीवनी मिळू शकते व निद्रिस्त नात्याला उजाळा मिळू शकेल.
आजच्या समानतेच्या जीवन संघर्षात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे. कधी तिला कौटुंबिक, सामाजिक, तर कधी आर्थिक संघर्ष करावा लागतो. या संघर्षात पतीने पत्नीला साथ देणे आवश्यक आहे. भारतीय स्त्री ही समर्पिता आहे. षड्ररिपूवर नियंत्रण ठेवून, कर्तव्य म्हणजेच देव मानणारी तिची भूमिका असावी. सुख व दु:ख पती पत्नीचे समान खेळणे असावे. यशस्वी संसाराकरता, समृद्ध जीवनासाठी उत्तम संकल्पाचे बीजारोपण केल्यास मानवी जीवन वृक्ष वृध्दींगत होऊ शकतो.
आज आपण कलियुगाच्या मध्यावर आहोत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विशाल छायेत माणूस राहत आहे. भौतिक व चंगळवाद व दहशतवाद यांचे प्रचंड तांडव आज सुरू आहे. अहंकाराला कवेत घालून माणूस जगत आहे. मानवी मूल्यांचा नाश होत आहे. अशा वेळी मानव्याला जपणाऱ्या संस्कारांची नितांत गरज आहे. ही गरज वटसावित्री या सणातून आधुनिक सावित्री भागवू शकते. नात्यातील समरसता, प्रेम, निष्ठा, कर्तव्य भावना, विशाल दृष्टिकोन, सेवाभाव, सहकार्याची भावना, ही सर्व या व्रताची सूत्रे आहेत. ही सूत्रे परस्परांनी जोपासल्यास कुटुंब व्यवस्था भर भक्कम पायावर उभी राहून समाजाला उन्नत अवस्था प्राप्त होईल… आधुनिक सावित्री या वाटेने गेल्यास प्रेमवीणेवरून संसाराची तार छेडली जाईल. जुने व नवे यांचा मेळ घालून, सणांचे ओझे न घेता, मानवी मूल्यांचे जतन करून, स्त्री समृद्ध होऊ शकेल.
☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 2 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
डाॅ.भालचंद्र फडके
(“जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या जूचे त्यांनी वर्णन केले.) इथून पुढे.
पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तेव्हा धुळे जिल्हा होता. धुळे जिल्ह्य़ातील महाविद्यालयीन प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांच्या जिल्हा बैठकीसाठी विभागातील आम्ही सगळे अधिकारी धुळयाला गेलो होतो. एका गेस्ट हाऊसमध्ये आदल्या रात्री आमचा मुक्काम होता. रात्रीचे जेवण आटोपल्यावर आम्ही सगळेजण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी जिल्हा बैठक होती. रात्री साधारणत: एक वाजला असेल. मी सहज गेस्ट हाऊसच्या बाहेर पडलो. पुढच्या खोलीतला लाईट जळत होता. तिथे फडके सर होते. दुसऱ्या दिवशी सरांशी बोलताना समजलं की, काही दिवसांतच त्यांचं एक व्याख्यान होतं. त्याची टिपणे काढण्यासाठी सर रात्रभर जागे होते.
गुजरातमधील एका विद्यापीठातर्फे एक राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्र होतं.आमच्या विभागातर्फे या चर्चासत्रासाठी मी जावं असं सरांनी सांगितलं. यापूर्वी चर्चासत्र, कृतिसत्रं वगैरेमध्ये भाग घेण्याचा मला बिलकुल अनुभव नव्हता. तेही महाराष्ट्र सोडून इतर राज्यात तर अजिबात नव्हता. सरांच्या या निर्णयाने मी पुरता भांबावून गेलो होतो. या चर्चासत्रासाठी कुलगुरूंची मंजूरी वगैरे तांत्रिक बाबी सरांनीच पूर्ण केल्या.
पुणे ते मुंबई आणि मुंबईहून सुरत असा प्रवास करत मी सुरतमार्गे बलसाडला पोहोचलो. टीव्हीवर काळे कोट घातलेली माणसं गंभीर चेह-याने चर्चासत्रात बसलेले मी पाहिले होते. इथं ते अनुभवलं. उद्घाटनानंतर लगेच मला पेपर सादर करण्यास सांगण्यात आलं. सगळं बळ एकवटून मी मनाचा हिय्या करून पेपर सादर केला. सुरवातीला वाटलं होतं तितकंसं अवघड वाटलं नाही. आपल्या ज्युनियर सहका-याला संधी देऊन त्यासाठी त्याला मदत करण्याची सरांची ती कार्यपध्दत मला आयुष्यात खूपच मौलिक वाटली.
माझं लग्न रजिस्टर पध्दतीनं झालं. सर्व धार्मिक बाबींना यात फाटा दिला होता. काही निवडक लोकांसाठी लग्न झाल्यावर सायंकाळी रिसेप्शन ठेवलं होतं. सर आवर्जून आले होते. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हातात एक बाॅक्स त्यांनी ठेवला. ” सर,कोणताही आहेर किंवा भेटवस्तू आणू नयेत असं आम्ही पत्रिकेत म्हटलं होतं” असं मी सरांना बोललो.
“अहो शिरसाठ, हा आहेर नाही. मिठाई आहे ” सरांनी दिलेल्या मिठाईचा मी अव्हेर करू शकलो नाही.
भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत सरांनी काम केले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे केलेल्या धर्मांतराच्या वेळी झालेल्या नाटकाचे दिग्दर्शन सरांनी केले ही आठवण कुणीतरी मला सांगितली होती. बाबासाहेबांसोबत काम केल्याने सामाजिक परिवर्तन आणि समाजातील उपेक्षित, सर्वसामान्य माणसांविषयी सरांना वाटणारी कळकळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संपूर्ण जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिली होती. भारतातील अनेक विद्यापीठांतून प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू होता. मात्र ह्या कार्यक्रमातून साक्षरता प्रसाराबरोबरच समाजप्रबोधन आणि परिवर्तन घडवून आणण्याची दिशा सरांनी घालून दिली होती. त्यामुळेच गावोगावचे प्रौढ शिक्षण कार्यक्रम हे समाजपरिवर्तनाची केंद्रे बनली होती. यातून अनेक सामाजिक कार्यकर्ते तयार झाले. लोकांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वावलंबी बनविणे हे प्रौढ शिक्षण कार्यक्रमाचे ध्येय बनले होते. या कार्यक्रमातून अनेक ध्येयवादी कार्यकर्ते तयार झाले. सामाजिक अभिसरणाच्या अनेक यशोगाथा या कार्यक्रमातून उदयाला आल्या. मला चांगलंच आठवतं, विद्यापीठाच्या प्रौढ शिक्षण केंद्रातील प्रौढांचा एक आनंदमेळावा आम्ही दापोडी येथील जीवक संस्थेत आयोजित केला होता. विविध सामाजिक स्तरांवरील शेकडो स्त्री-पुरुष प्रौढ या मेळाव्यात सहभागी झाले होते.
साहित्य क्षेत्रात लिहू लागलेल्या अनेक नवोदित लेखक, कवींच्या पाठीशी सर नेहमीच उभे असत. त्यांना ते लिहिण्याला सतत प्रोत्साहन देत. दलित साहित्याचे ते खंदे समर्थक होते. खेडोपाडी, झोपडपट्टीतील अनेक दलित कार्यकर्त्यांना ते नेहमीच मदत करत .यामुळे ‘ दलित फडके’ अशी त्यांच्यावर टीका होई. मात्र समाजपरिवर्तनाचा झेंडा सतत खांद्यावर घेणा-या सरांनी अशा टीकाही हसत हसत स्वीकारल्या.
सर खूप आजारी होते. विभागातील आम्ही अनेकजण त्यांच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो. सर बोलू शकत नव्हते. मात्र नेहमीप्रमाणे हसून त्यांनी आमचे स्वागत केले. अशाही स्थितीत डाव्या हाताने ते लिहीत होते. एका लढवय्या वीराची ती जिद्द नक्कीच प्रेरणादायी होती.
सर गेले, तरी त्यांच्या पत्नी हेमाताई आणि कन्या सई यांच्याशी माझा संपर्क होताच. विद्यापीठातून सेवानिवृत्त झाल्यानंतर एकदा मी माझे एक पुस्तक त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. फडके बाई थकल्या होत्या. मात्र मी पाहिलं की,आईची सेवा करणं हे आपलं जीवनकार्य समजून सई त्यांचं सगळं करत होत्या. बाईंनी लिहिलेलं पुस्तक- ‘ जीवनयात्री ‘ त्यांनी मला दिलं. हे पुस्तक मी अनेकदा वाचून काढलं. त्यातील त्यांचं एकूणच लिखाण वाचून वाटलं, हे पुस्तक त्यांनी शाईने नाही तर डोळ्यातील अश्रूंनी लिहिलं आहे. या पुस्तकात बाईंनी सरांविषयी लिहिलंय. सर त्यांना म्हणायचे, ” तू एखादया पाटलाची बायको व्हायची तर माझ्यासारख्या गरीब मास्तराची बायको झालीस ” बाईंना मात्र असं कधीच वाटलं नाही. आपल्या गोड स्वभावाने अनेक लोकांचं प्रेम सरांनी मिळवलं होतं. आर्थिक बाबतीत त्यांची स्थिती फारशी चांगली नव्हती. पण मनाने मात्र ते नक्कीच अतिश्रीमंत होते.
☆ हो ‘पोनोपोनो’… ☆ प्रस्तुती – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.
आज आपण एका अतिशय सुंदर ध्यान-साधने संबंधी जाणून घेऊ या।
याची माहिती मागच्या वर्षी एका अंकात आलेली आहे पण अंक कायम रहात नाहीत, ब्लॉगवर आणि पोस्ट द्वारे ही कोणीही केव्हाही वाचू शकेल।
तर काय झालं, काही वर्षांपूर्वी हवाई बेटावर एक हॉस्पिटल होतं जे केवळ खुनशी वेड्यांसाठी होतं। ज्यांना समाजाने ‘क्रिमिनली इनसेन’ ठरवून हाता – पायात साखळदंड बांधून डांबून टाकलं होतं.
त्यांना भेटायला फारसं कुणी येत नसे। ती इतकी भीषण जागा होती की नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी व डॉक्टर ही काही आठवडे, एखाद – दोन महिन्यांच्यावर तिथे टिकू शकत नसत.
अनेक रिसर्च सेन्टर्स, हॉस्पिटल, मनोवैज्ञानिक लोक मात्र येऊन येऊन वेगवेगळी संशोधनं करत।
रुग्णांवर त्याचा काहीही परिणाम होत नसे। ही थोर माणसं येऊन निष्कर्ष करून डिग्र्या घेत, ते कैदी मात्र आपल्या काळ्या विश्वात तळमळत, संतापत असत।
मग एक नवा माणूस आला. ‘ मी एक काही प्रयोग करू का?’ म्हणाला.
तिथले मोठे डॉक्टर्स म्हणाले, ‘ कर बाबा, तू ही ‘ कर।
त्याने सगळ्या रुग्णांच्या फाईल्स मागवल्या. एक छोटी खोली पुरेल म्हणाला. तो रोज सकाळी ९ला यायचा। खोलीचं दार बंद करून आतच असायचा. संध्याकाळी ५ वाजता निघून जायचा। परत दुसऱ्या दिवशी ९ला हजर.
तिथल्या लोकांनी फारसं लक्ष दिलं नाही. मग काही आठवड्यात फरक जाणवू लागला।
‘अरेच्चा ! हे खुनशी लोक जरा बरं वागतायत की.’
हळूहळू त्यांच्यात सुधारणा होऊ लागली. संताप, उद्विग्नता, क्रौर्य कमी दिसू लागलं.
ती परोलवर जाण्या योग्य झाली… बाहेरच्या कसलाही कंट्रोल नसलेल्या जगात, त्यांच्या राग – संतापाच्या नात्यात जाऊनही, ते मुदत संपल्यावर नीट परत येऊ लागले।
नर्सिंग स्टाफ, स्वयंपाकी, माळी, सुरक्षा कर्मचारी, सगळेच टिकू लागले. बदल होत होत ते रुग्ण बरेही होऊन बाहेर जाऊ लागले।
आणि चारच वर्षांनंतर एक दिवस असा उजाडला, की आता रुग्णच नाहीत म्हणून ते हॉस्पिटल चक्क बंद करावं लागलं ! असे दोनच राहिले होते ज्यांना सरकारने अमेरिकेतल्या हॉस्पिटलात हलवलं आणि ते खुनशी वेड्यांचं हॉस्पिटल बंद केलं !
सर्वच मानसोपचार तज्ञ, संशोधक, प्रसार माध्यमांना चक्रावून टाकणारी गोष्ट होती ही…..
त्यांनी विचारलं की ‘ हा चमत्कार झाला कसा?’
तिथल्या नर्सेस, डॉक्टर, सगळ्यांनी सांगितलं की ‘आधी’ व ‘नंतर’ यात ‘तो’ माणूस हा एकच फरक होता।
खरं तर तो एकाही रुग्णाला प्रत्यक्ष भेटलाही नाही. ‘ तुझं दु:ख सांग ‘ नाही, ‘ रडून मोकळा हो ‘ नाही, – काहीच नाही. त्याने नक्की काय केलं, ते आता त्यालाच विचारा, पण हे रुग्ण मुळापासून बरे झाले आहेत हे मात्र खरं।
ते गेले त्याच्याकडे। म्हणाले, ‘ नक्की काय केलात तुम्ही? इतके रुग्ण, तेही सगळी दुष्ट कर्म केलेले, वेडे, मनावर ताबा नसलेले, तुम्ही बरे कसे केलेत? काय जादू केलीत? ‘
त्या हवाईयन माणसाचं नाव होतं डॉक्टर इलाहीकेला हयू लेन.
त्याने हसून शांतपणे उत्तर दिलं…..
“आमच्या हवाईयन प्रथेत असं मानतात की बाहेरच्या जगात, समाजात जे काही चाललं आहे, ते फक्त आपल्या आत मनात जे आहे, केवळ त्याचंच प्रतिबिंब आहे. तुम्हाला बाहेरची परिस्थिती बदलायची असेल तर तुमच्या मनाची स्थिती बदला. “
त्यांनी स्वत:वर उपचार केले होते ! —-
— कसे?
त्यांनी हवाईयन संस्कृतीतलं ‘हो’पोनोपोनो’ केलं होतं. या शब्दाचा अर्थ आहे ‘ चूक दुरुस्त करणं ‘.
डॉक्टर लेननी प्रत्येक गुन्हेगाराची केस-फाईल आधी नीट वाचली. त्याने केलेले खून, दरोडे, सगळं जाणून घेतलं. मग फाईल बंद करून शांतपणे बसून त्या व्यक्तीला उद्देशून मनाशी चार वाक्यं म्हटली —
१. माझं चुकलं. (I am sorry).
२. मला माफ कर. (Please forgive me).
३. मी तुझे आभार मानतो. (Thank you).
४. माझं तुझ्यावर प्रेम आहे. (I love you).
समाजात सगळ्या प्रकारच्या वृत्ती – प्रवृत्ती असतात. संताप, निराशा, हिंसा, क्रूरपणा – मनाने दुर्बल असलेले — या वृत्ती एखाद्या स्पंजसारख्या शोषून घेतात. मग त्याच गुणाकाराने सगळीकडे वाढतात.
डॉक्टर लेननी असं मानलं की “ माझ्या मनातल्या अशा सुप्त वृत्तींचंच बाह्य प्रक्षेपण या रुग्णांतून होत आहे. यांना सुधारायचं असेल तर मला माझ्या मनातली हिंसा कमी केली पाहिजे.”
प्रत्येक रुग्णाची फाईल वाचून त्याला ‘ माझं चुकलं’, ‘मला माफ कर’, ‘मी तुझा आभारी आहे’ व ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’ असं सांगून त्यांनी त्या रुग्णाला तर सबळ, सकारात्मक बनवलाच, पण स्वत:च्या मनातली सुप्त हिंसाही शांत केली.
आपल्याला जगात काय चाललंय ते कळतच नाही, ‘ लोक असे कसे वागतात न? ‘ असं म्हणायची खोड आहे, पण स्वत:च्या मनाचा अजिबात थांग नसतो. आजूबाजूच्या जगातल्या घडामोडीमधून तुम्हाला जर सतत हिंसाच दिसत असेल तर तुमच्या मनात ती भरपूर आहे. तिची खाज कमी करायच्या प्रयत्नात तुम्ही त्या बातम्या चवीने वाचता, चर्वितचर्वण करता, घरच्यांवर भडकता, सरकारला शिव्या देता व सगळ्यांना फाशी दिल्याशिवाय देशाचं काही भलं होणारच नाही असं छातीठोकपणे सांगता…..
विचार करा !—
ही चार वाक्यं एक अतिशय शक्तिशाली अशी साधना आहे. तुम्ही प्रत्येकाने ही नक्की करून बघा.
कशी करावी?—-
एक जागा निवडून तिथे डोळे मिटून २ मिनिटं {तरी!} शांत बसा.
ज्या व्यक्तीशी तुमचे संबंध चांगले नाहीत, त्रास होतो, तिला नजरेसमोर आणा.
मग तिला उद्देशून ही ४ वाक्यं मनापासून म्हणा.
मनातच म्हणायची आहेत, म्हणून माफी मागायला हरकत नसावी !
आपल्या कुटुंबियांपासून सुरुवात करा.
तुम्हीच त्यांना जन्म घेण्याआधी निवडलं आहे, म्हणून संबंध सुधारून पुढच्या प्रगतीसाठी मोकळे व्हा।
Ps: The Hawaiian word ho’oponopono comes from ho’o (“to make”) and pono (“right”). The repetition of the word pono means “doubly right” or being right with both self and others. In a nutshell, ho’oponopono is a process by which we can forgive others to whom we are connected.
ओम शांती
माहिती संग्रहिका :सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वेळ- दोनच अक्षरी शब्द.पण नाना प्रकारचे अर्थ सामावणारा. कारण संदर्भानुसार अर्थ बदलत जातात हो. नीला मैत्रिणीला म्हणाली, ‘अग,एक प्रदर्शन पाहायला जायचं आहे. वेळ आहे का तुला माझ्याबरोबर यायला.’ ‘ हो.एका पायावर तयार आहे बघ यायला.’ नीला पटकन उत्तरली. तोच आई नीलाला जेवायला बोलवू लागली, नि नीला आईस म्हणाली, “नाही ग आई. वेळ लागेल थोडा. मी एक आर्टिकल लिहितेय. ते पुरं होत आलय. ते झाल्यावर येते. इथं पहिल्यांदा वेळ या शब्दाचा अर्थ सवड होतो तर तर दुसऱ्या उदाहरणात वेळ म्हणजे उशीर.
रामराव असेच मित्रांच्यात बसून बोलतांना म्हणाले, “ माझ्या एका मित्रावर, दिनेशवर काय वेळ आलीय बघा. लेकीला कॅन्सर झाला नि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही उपयोग झाला नाही. शिवाय कर्जही वाढले.” इथं “वेळ ” म्हणजे वाईट परिस्थिती.
कोणत्याही गोष्टीसाठी वेळ महत्वाची असते. आपले नियोजन योग्य, काटेकोर असेल तर कोणत्याही वेळेस एखादे नवीन काम सुरू केले तर ते नीट पार पडते. याउलट आपली योग्य तयारी नसेल तर अगदी मुहूर्त पाहून काम सुरू केले तरी ते यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.वेळ पाळणे सुद्धा महत्वाचे असते हं. वेळ पाळण्याची सवय म्हणजे वक्तशीरपणा. वक्तशीरपणा हा एक चांगला गुण आहे, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दुसऱ्यावर चांगला पडतो.
कोणतेही काम वेळेत करण्याच्या सवयीमुळे आपण कामे वेळेत पूर्ण करतो.वेळ दरवेळी सोयिस्कर असतेच असे नाही. पण काही वेळा अवेळही योग्य प्रकारे हाताळल्याने आपण कोणत्याही प्रसंगातून सहीसलामत बाहेर पडतो.चांगली वेळ आपण हसतमुखाने चांगल्या प्रकारे वर्तन करतोच पण वेळ वाईट असताना सुद्धा जो विवेकाने वर्तन करुन त्या वाईट वेळीही चांगला वागतो नि कोणत्याही प्रसंगास व्यवस्थित सामोरा जातो तोच खरा.
कातरवेळ म्हणजेच तिन्हीसांजेची वेळ थोडी हुरहूर निर्माण करणारी असते.सकाळची वेळ प्रसन्नच ! कारण सूर्यदेवांच्या आगमनानं पृथ्वीवर चैतन्यमय वातावरण असते. फुलांच्या उमलण्याची, सूर्यविकासी कमळे उमलण्याची ही वेळ खरच आनंदमय असते. सकाळपासून सूर्यास्तापर्यंत प्रकाशाची सोबत असते. त्यामुळे एकाकीपणा जाणवत नाही. त्यामानाने रात्रीच्या वेळी एकाकी वाटते. कधीकधी मनात भीतीही दाटते.
परीक्षार्थी ज्या वेळेची उत्सुकतेने वाट पाहतात ती वेळ निकालाची. निवडणुक लढविणारे उमेदवारसुद्धा मतमोजणीनंतर विजय घोषित होण्याच्या वेळेची वाट पाहतात अगदी उतावीळपणे. म्हणूनच म्हणावे वाटते वेळेचे नियोजन हवेच. मग काम बौद्धिक असो, आर्थिक असो की अन्य कोणत्याही प्रकारचे….. कारण वेळ काही कधी सांगून येत नाही.
☆ एका श्रीमंत गरिबाची गोष्ट… भाग – 1 ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
डाॅ.भालचंद्र फडके
डाॅ.भालचंद्र फडके. एक ज्येष्ठ मराठी साहित्यिक. विद्यार्थीप्रिय आणि समाजप्रिय प्राध्यापक. समाजातील अनेकांना प्रेरणा आणि साहाय्य दिलेला कल्पवृक्ष.
याचबरोबर सामाजिक परिवर्तन, लोकशिक्षण अशा अनेक क्षेत्रांत मुक्त संचार केलेल्या निस्पृह आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या सरांच्या सहवासाचा परीसस्पर्श ज्यांना लाभला त्यांच्या आयुष्याचे सोने झाले. फडके सर म्हणजे अमृताचा अथांग सागर. त्यांना पहाण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य मला मिळाले…
फडके सर हे मोठे साहित्यिक होते. मात्र त्यांचे एकही पुस्तक शाळेत माझ्या वाचण्यात आले नव्हते. याचं एक मुख्य कारण होतं की,शाळेतल्या पुस्तकांत त्यांचे धडे नव्हते. हायस्कूल संपवून मी पुढे ओतूरमधील काॅलेजात गेलो. पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या सेंट्रल कॅम्पसाठी काॅलेजकडून माझी निवड झाली होती. कॅम्प विद्यापीठाच्या परिसरातच होता. विद्यापीठाच्या विस्तीर्ण आणि निसर्गरम्य वातावरणात आमचा मुक्काम होता. तिथं अनेक जणांची उत्तमोत्तम भाषणं ऐकली. फडके सर तेव्हा विद्यापीठाच्या प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे संचालक होते. ‘ सामाजिक परिवर्तन आणि युवकांची भूमिका’ अशा कुठल्याशा विषयावर ते तास दोन तास बोलले रहाण्याच्या तंबूंबाहेरच्या उन्हात आम्ही ते मन लावून ऐकत होतो. अतिशय पोटतिडीकीने सर बोलत होते. सरांना मी पहिल्यांदाच पहात होतो. तरी यांना कुठंतरी मी पाहिलंय असं जाणवत होतं. टीव्हीवर किंवा कुठल्यातरी वर्तमानपत्रात मी सुप्रसिद्ध गायक सुधीर फडके यांना पाहिलं होतं. त्यांच्यात आणि फडके सरांमध्ये मला खूप साम्य जाणवले.
काॅलेजमध्ये शिकत असताना मी काॅलेजतर्फे चालणा-या राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रमात संघटक आणि पर्यवेक्षक म्हणून काम केले. विद्यापीठात त्याच विभागाचे फडके सर संचालक होते. त्यावेळी सर्वसामान्य माणसं आणि कार्यकर्ते यांच्याविषयी सतत पत्रे ,निरोप आणि फोनवरून काळजी करण्याची त्यांची प्रवृत्ती मी अनुभवली.
बी.ए. झाल्यावर मी पुण्यातील कर्वे इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सर्व्हिसेस या संस्थेतून एम.एस.डब्ल्यू.केले.
नंतर मी पुणे विद्यापीठातील प्रौढ, निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झालो. सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी सरांचा दांडगा लोकसंपर्क, सर्वसामान्य माणसांविषयी कळकळ आणि साध्या रहाणीतून त्यांची महानता मी अनुभवली. आमच्या विभागातर्फ प्रौढ शिक्षण आणि विविध सामाजिक विषयांवर सतत चर्चासत्रे, कृतिसत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यक्रम आणि विविध पातळ्यांवर परिषदा आयोजित केल्या जात. त्यावेळी समाजाच्या अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि नामवंत अभ्यासकांना सर आवर्जून घेऊन येत.
माझ्या मते १९८५ वर्ष असावं. देशातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने आयोजित केलेले पहिले ‘समर इन्स्टिटय़ूट’ आमच्या विद्यापीठात झाले. त्याचे संपूर्ण नियोजन फडके सरांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम हा केंद्राधारित होता. यात वस्ती किंवा गाव हा आधार होता. यात तीस निरक्षरांना केंद्रात शिक्षण देणे अपेक्षित होते. मात्र एक अडचण सतत जाणवत होती. अनेक दुर्गम भागात निरक्षरता असूनही तीस निरक्षर एकत्र मिळवणे, इतके लोक एकत्र बसतील अशा जागेची उपलब्धता, साहित्याची उपलब्धता होणे अडचणीचे होते. प्रौढ शिक्षण कार्यक्रमातील ही अडचण लक्षात घेऊन एका नवीन कार्यक्रमाचे सूतोवाच फडके सरांनी समर इन्स्टिटय़ूटमध्ये केले. पुढे ‘ कार्यात्मक साक्षरता सामूहिक कार्यक्रम ‘ (Mass program for Functional Literacy) देशभर कार्यान्वित झाला. या कार्यक्रमाची बीजे मला फडके सरांच्या त्या भाषणातील मांडणीत दिसून येतात. पुणे शहरातील विविध वस्त्यांतून विद्यापीठाने प्रायोगिक प्रौढ शिक्षण केंद्रे चालवली. मी या केंद्रांचा समन्वयक होतो. यावेळी या केंद्रातून अनेक उपक्रम राबवले गेले. त्यातून कार्यक्रमांचे नियोजन आणि व्यवस्थापन मी शिकलो.
फडके सरांची एक आठवण मला सांगावीशी वाटते. दिल्ली विद्यापीठातील प्रौढ ,निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभागाचे संचालक डाॅ.एस.सी.भाटिया होते, त्यांनी सांगितलेली ती आठवण…
तेव्हाच्या केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांनी भाटिया सरांकडे सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र त्यावेळी त्यांनी फडके सरांच्या नावाची सूचना मंत्र्यांना केली. सरकारच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी फडके सर अधिक प्रभावीपणे बोलू शकतील असा विश्वास त्यांनी मंत्र्याकडे बोलून दाखवला. मंत्र्यांना भेटायला फडके सर बुशशर्ट आणि पायात चप्पल घालून रेल्वेने गेले आणि सरकारला प्रौढ शिक्षण कार्यक्रमाविषयी परखड शब्दांत सुनावले होते.
बारामतीतील एका काॅलेजने प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला मदत करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा एक दिवसीय मेळावा आयोजित केला होता. यासाठी सरांसोबत आम्ही विभागातील सर्वजण गेलो होतो. काॅलेजने आयोजित केलेला हा एक अभिनव उपक्रम होता. तो अतिशय यशस्वी झाला. पुण्यात पोहचल्यावर सरांनी यावर मला एक लेख लिहायला सांगितलं .तो लेख त्यांनी सकाळ या नावाजलेल्या वर्तमानपत्रात प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न केले.
सरांसोबत विभागातील आम्ही अनेक सहकारी नाशिक जिल्ह्य़ातील सिन्नर काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी गेलो होतो. काॅलेजमधील प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिका-यांनी विड्या वळणा-या कारखान्यातील प्रौढ शिक्षण केंद्रात आमची भेट आयोजित केली होती. एका हाताने विड्या वळत तेथील निरक्षर महिला शिक्षण घेत होत्या. कामात मग्न असलेल्या महिलांना कसं शिकवायचं हे आव्हान होतं. फडके सरांनी ते आव्हान लिलया पेलले. .तिथल्या फळयावर सरांनी एक शब्द लिहिला- काजू.या शब्दावर सरांनी चर्चा सुरू केली. सरांनी महिलांना विचारलं,” काजू हा एक शब्द आहे.या शब्दांत दोन शब्द लपले आहेत. कोणते ?”
” का आणि जू ” उत्तर आले.
सर ‘का’ विषयी बोलले- “ जगात कोणतेही प्रश्न ‘का ‘या शब्दांतून निर्माण होतात ” असं सांगून ‘ जू ‘म्हणजे काय?”
असा प्रश्न त्यांनी विचारला.स्तब्धता पसरली.सरच म्हणाले, ” जू तुमच्या मानेवर नेहमीच असते.” असं म्हणून स्त्रियांच्या रोजच्या जीवनातील विविध प्रकारच्या जूचे त्यांनी वर्णन केले.
☆ “एकटेपणा…” – लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर ☆ प्रा.भारती जोगी ☆
‘थिंक पॉझिटिव्ह’ नावाचा एक दिवाळी अंक आज लायब्ररीत हाती आला.. आणि याची थीम आहे “एकटेपणा”. पूर्ण अंक याच विषयाला वाहिलेला आहे.
या दिवाळी अंकातील “एकटेपणातून बाहेर येण्याचा रियाज !” हा श्री ऐश्वर्य पाटेकर यांचा लेख वाचनात आला. सदर लेखक हे पहिल्या युवा साहित्य अकादमी पुरस्कार चे मानकरी आहेत, आणि त्यांची ‘भुईशास्त्र’ आणि ‘जू’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या लेखातील एक सुंदर भाग खाली देत आहे.
*********
“मला आमच्या इथं गावातील बिया वाल्या बाईची गोष्ट आठवते. बिया वाली बाई. सतत बिया गोळा करत असायची. म्हणजे तेच तिचं आयुष्यभराचं काम होऊन गेलं होतं. जिथे बी खोचली तिथं झाड उभं राहायचं. हा तिचा हात गुण होता की झाडा -कोडावरची माया? माहित नाही.
मी तिला माझ्या लहान वयापासून पहात आलो. ती सारखी बिया गोळा करायची. तिने पेरलेल्या बियांमधून किती झाडे उगवून आली, याची मोजदाद कशी करणार? अगणित झाडं. ज्या झाडाकडे बोट दाखवलं ते झाड बियावाल्या बाईनेच लावलेलं असायचं. म्हणजे तसं पाहायला गेलं तर उगवून आलेल्या एकूण एक झाडांवर तिची मालकी होती. पण तीने तशी कुठल्याच झाडावर मालकी सांगितली नाही.
बियावाल्या बाईला मूलबाळ काही झालं नाही. त्याचेही तिला कधी काही वाटलं नाही.
तिला एकदा आई म्हणाली होती,
“आत्याबाई, तुम्हाला मुलबाळ झाले असतं तर आता नातू -पणतू तुमच्या अंगाखांद्यावर खेळले असते!”
तेव्हा तिचे उत्तर होतं, “नाही झालं तेच बरं! नाहीतर ही झाडा-कोडाची पोरं कुणी सांभाळली असती? ”
” कसा जन्म जावा ओ आत्याबाई तुमचा?”
तेव्हा ही बिया वाली बाई म्हणाली, “जसा तुझा भाकरी थापत थापत जाणार तसा माझी झाडे लावता लावता! हा आता मला सांग तुझ्या भाकरी कुणी मोजल्या का? माझी झाडं मात्र मोजली जातात. तुला काय वाटलं मला मुलाची आस नव्हती?
होती ग.. पार झुरणीला लागले होते. त्यावेळेला माझी आत्या आली मदतीला धावून. तिलाही मूलबाळ नव्हतं. तिने मला एक बी दिली. म्हणाली, आपली कूस आपण नाही उजवू शकत मात्र मातीची तर उजवू शकतो ना…
दिलेली बी जेव्हा मी आळ्यात लावली तर चौथ्या-पाचव्या दिवशी मातीवर आलेला हिरवा पोपटी कोंब पाहून मी हरकले. जणू मीच बाळंत झाले. मग नादच लागला..
अन तसही, किती लेकरा बाळावाल्या आया बाया होत्या माझ्या भवतीच्या. पण आज त्या एकट्याच उरल्या. मी तरी माझ्या झाडांसोबत आहे.
माझ्या या लेकरा बाळांना पाय नाहीत, हे एका अर्थी बरंच झालं.! त्यामुळे ते मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. “
*********
खूप अंतर्मुख केलं बियावाल्या बाईंच्या या छोट्याश्या कथेने.
…….
वर उल्लेखलेल्या बियावाल्या बाईंना अशिक्षित, अडाणी कसं म्हणायचं? एकटेपणाच्या जाळ्यात सापडू नये यासाठी 3 सूत्र नकळत आपल्या वागण्यातून देऊन जातात त्या…
पाहिलं सूत्र म्हणजे, “आपल्यातील पॅशन ओळखा, त्यात व्यस्त रहा”,
दुसरं, “आपलं दुःख कुरवळणं थांबवून, जे आहे त्यातही माझ्या दृष्टीने कसं चांगलंच होतंय असा दृष्टिकोन ठेवा”
आणि तिसरं, खूप महत्वाचे सूत्र म्हणजे, “आपण लावलेल्या झाडांवर कधीही आपली मालकी सांगू नका, थोडक्यात, detach राह दुसऱ्यांसाठी काही करण्याची सेवावृत्ती अंगी असू द्या.”
लेखक : श्री ऐश्वर्य पाटेकर
माहिती संकलक : प्रा. भारती जोगी
पुणे.
फोन नंबर..९४२३९४१०२४.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈
… ” तुला हजार वेळा बजावून देखील का येतेस या विहिरीवर पाणी भरण्यासाठी… या विहिरीवर फक्त गावातल्या उच्च जमातीच्या लोकांना पाणी भरण्याचा हक्क आहे… तुमच्या सारख्या कनिष्ठ जमातीला हिथं पाण्याचा थेंब देखील मिळणार नाही… आणि हे सांगुन देखील तू इथं रोजच सकाळ पासून उभी असतेस… तुझी सावली या विहिरीवर पडली तर त्यातले पाणी विटाळले गेले तर आम्हाला पाणी कसे बरे मिळेल… तुला इथचं उभी राहण्याची हौस जर असेल तर जरा या विहिरी पासून दूर उभी राहा कि जरा… आमच्या घरी कडक सोवळं ओवळं पाळलं जातं म्हटलं… गावाच्या कोसोदूर असलेल्या या विहिरीवरून पाणी न्यायची तंगडतोड करावी तेव्हा कुठे घरातले आम्हाला दोन वेळेचं खाऊ पिऊ घालतात घरात ठेवून घेतात…तुझ्या सारखं नाही.. सकाळीच तुला त्यांनी इथं पाण्यासाठी पिटाळली कि बसले ते दिवसभर चकाट्या पिटायला घराच्या ओट्यावर.. संध्याकाळ पर्यंत पाण्याचा एखादा माठ भरून घरी नेलास तरी तुझं किती कौतुक करत बसतात… आणि आमच्या घरी आम्हाला मात्र जरा उशीर होण्याचा अवकाश लाखोली वाहत असतात.. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो आम्हाला… जा जा दुसरीकडे कुठे विहीर शोध जा.. इथं बिलकुल थांबू नकोस.. “
… ” ताई आपल्या गावात हिच एक विहीर आहे हे तुम्हा सगळ्यांना ठाऊक आहे… तुमची उच्च जमातीच्या घरांपेक्षा आमची कनिष्ठ जमातीची घरं हाताच्या बोटावर मोजता येणारी.. या वैराण वाळवंटात शेकडो मैल दूरवर गाव नि वस्ती आहेत.. तिथं देखील एखादं दुसऱ्या विहिरींना पाणी आहे.. आता आपल्या गावाची हिच विहीर गावकुसाबाहेर कोसांवर असल्यानं तुम्हाला पाणी नेण्यासाठी किती सायास करावे लागतात मगं आमची काय कथा… तुमचं सगळयांच भरून झालं कि द्याल आम्हाला प्रत्येकाला निदान दोन दोन घागरी.. एक पिण्याला नि दुसरी स्वयंपाकाला… भागवून घेऊ आम्ही कसंतरी… पण तुम्ही नाही म्हणू नका.. पाणी देण्याचं पुण्य तेव्हढं तुम्हाला नक्कीच मिळेल… माणसांसारखी माणसचं आहोत आपण एकाच आकाराच्या देहाची, जन्माने उच्च निच्च माणसात भेदभाव जरी झाला तरी माणुसकी मात्र अभेद्य असते कि… तहान भूक जशी तुम्हाला तशीच ती आम्हालाही आहेच कि.. त्यांना कुठे असतो भेदभाव… तुमचे माठ मातीचे आणि आमचेही त्याच मातीपासून बनलेले.. प्रत्येक माठामाठात भरलेले पाणी हे त्या विहिरीतलेच एकच आहे.. ते तुमच्या माठातले सोवळयाचे नि आमच्या ओवळयातले हा भेदभाव पाणी कुठं करते.. त्याला फक्त तहानलेल्याची तृष्णा भागविणे एव्हढेच ठाऊक असते… आपला स्त्री जन्मच मुळी अभागी आहे बघाना.. तुम्हाला तुमच्या घरी दासीचं जिणं जगावं लागतयं तेच आमच्या घरी सुद्धा चुकलेलं नाही.. या पुरुषसत्ताक परंपरेत स्त्रियांच्यावर अन्याय होत आलेत आणि आपण सगळ्या आपापल्या कोषात राहून मूकपणे सहन करत आहोत.. आपण आपापसातील दरी जर मिटवली नाही तर या अन्यायाचं परिमार्जन कसं करणारं… एक स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीचं दुख समजू शकते.. कारण स्त्रीच्या हृदयात प्रेमाचा झरा अखंडपणे स्त्रवत असतो…माझी हि बडबड कदाचित तुम्हाला आवडणार नाही.. पण तो दिवस दूर नाही…स्त्रीचं समाजाचं नव्यानं परिवर्तन घडवून नक्की आणेल… पाण्यात काठी मारुन भेद होत नसतो… हेही लवकरच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही… “
आमच्या छकुलीचा १० वा वाढदिवस झाला परवा. हां हां म्हणता छकुली दहा वर्षाची झाली. काल परवा पर्यंत पिटुकली, सोनुकली होती… मलाच मी खूप मोठा झालो आहे, असं वाटलं, वयानंही आणि विचारानंही. त्यालाही दोन कारणं होती. गेल्या दहा वर्षात मुलांबरोबर त्यांच्याच वयाचे होऊन खेळता खेळता काळ कसा सरला कळलंच नाही. मुलं मोठी होत होती, आम्ही ही एक एक नवीन अनुभव घेत मोठे झालो.
दुसरं म्हणजे मला आणि नंदिताला , माझ्या पत्नीला, गेल्या दोन महिन्यात एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरे जावे लागले. नवीन वर्षाची सुरुवात झाली तीच टेन्शनमध्ये. आईची तब्येतीची तक्रार होती म्हणून चेकअप साठी हाॅस्पिटलमध्ये गेली आणि पाच वर्षांपूर्वी झालेल्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर परत तेच दुखणं, आजारपण समोर ठाकलं . तिच्या ह्रदयावर परत शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तीही ताबडतोब.
मनात खूप गोंधळ माजला. वैद्यकीय शस्त्रक्रिया, उपचार याबाबतीत नेहमीच उलटसुलट मते असतात. चहू बाजूंनी लोक अनेक सल्ले देत असतात. खूपदा सर्वच वास्तवात आणणे शक्य नसते. त्यामुळे गोंधळ, साशंकता निर्माण होते. मुख्य म्हणजे सल्ले द्यायला लोक एका पायावर तयार असतात. प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा कोणीही जवळ नसतो. जवळचेही सोबतीला नसतात. हा सर्वसामान्य दुनियादारीचा अनुभव आम्हालाही आला.
मी आणि नंदितानं सगळा धीर एकवटला. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची मनाची तयारी केली.
शस्त्रक्रियेची तारीख ठरली. मन धास्तावलं होतंच. त्याला कारणही तसंच होतं.आईचं वय, नाजुक तब्येत, दुस-यांदा शस्त्रक्रिया. एकीकडे काळजी, जबाबदारी, तर दुसरीकडे अॅडमिट करण्याचे सोपस्कार.
माझ्या ऑफिसचे माझे सहकारी सतत माझ्याबरोबर होते. रक्तपुरवठ्याची जुजबी तयारी केली होती. पण आदल्या दिवशी अठरा रक्तबाटल्यांची सोय करण्याची सूचना हाॅस्पिटलमधून देण्यात आली आणि पळापळ सुरू झाली. फोनवरून एकमेकांना निरोप सुरू झाले.
तासाभरातच चार तरूणांचा ग्रुप आला मला शोधत, ” साहेब, रक्त द्यायला आलोय.”
हाॅस्पिटलमध्ये फाॅर्म भरून रक्त घेण्याचे काम सुरू झाले. त्या चौघांचं संपता संपता आणखी दोघं आले. पाठोपाठ एका गाडीतून सहा जणांचा ग्रूप आला. सर्व जण फाॅर्म भरत होते, रक्त देत होते. मी आणि नंदिता अक्षरशः अवाक् झालो. आम्ही या शहरात नवीन होतो. रोजच्या संपर्कात येणा-यांशिवाय इतरत्र ओळखी करायला वेळच नव्हता. पण अनोळखी असूनही स्वयंस्फूर्तीनं स्वतःचं रक्त देणं, तेही कसलाही मोबदला न घेता. त्या फाॅर्म भरून घेणा-या नर्सताई मला तिथूनच हात हलवून सांगत होत्या, don’t worry, everything will be good! त्यांच्या डोळ्यांतही तेच भाव होते. मुलं घरी असल्याने नंदिता घरी चालली होती. जाताना त्या नर्सताईंना सांगायला गेली. तेव्हा त्या ” काळजी करू नका, सर्व ठीक होईल ” असं म्हणाल्या. कठीण परिस्थितीत ह्या एका शब्दाचा केव्हढा आधार वाटतो.
ज्या हाॅस्पिटलमध्ये आठ-दहा लाखांची बिलं आधी भरल्याशिवाय इलाज, उपचार सुरू होत नव्हते, तिथेच माणुसकीची ही श्रीमंती अनुभवली. शिवाय जाताना प्रत्येक जण प्रेमानं, आपुलकीनं आणि थोड्याशा प्रेमळ हक्कानं सांगत होते, ” काहीही, कसलीही गरज लागली तर लगेच फोन करा, फोन नंबर दिलाय. आम्ही आहोतच. ” जवळ जवळ रात्री १२ पर्यंत लोक रक्त द्यायला येत होते. गरजेपेक्षा जास्तच रक्त उपलब्ध झालं.
गेले चार-सहा तास हे चालू होते. मी झपाटल्यासारखा दिग्मूढ झालो होतो. जणू काही रक्तदानाचा एक सोहळा घडत होता. सगळे वातावरण परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती देत होते.
उद्या आईचं ऑपरेशन. पापणी मिटत नव्हती. मनात देवाचा धावा सुरू होता. नंदितानं देवाजवळ अखंड दिवा लावला होता. आम्हां दोघांना जाणवलं, ह्या सर्व मित्रांच्या रूपात ( हो, आता ते अनोळखी नव्हते, मित्र होते) देवच आमच्या बरोबर आहे.
दुसरे दिवशी ऑपरेशन व्यवस्थित झालं. डाॅक्टरनी बाहेर येऊन सांगितलं तेव्हा चार वाजले होते. दुपारनंतर अनेक रक्तदात्यांचे फोन आले आईची चौकशी करायला. आठ दहा दिवस झाले, आईची तब्ब्येतही दिवसागणिक सुधारू लागली. आईसारखा positive minded पेशंट लवकर बरा होतो. पंधरा दिवसांनी ती घरी आली.
मित्रांचे, त्या रक्तदात्यांचे आभार कसे मानू? त्यांची नावे माहीत नाहीत फक्त फोन नंबर आहेत माझ्याकडे. सर्वांना फोन करून छकुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावले. छकुलीचे दोस्त होतेच, आमचे शेजारी, माझे ऑफिस सहकारी बोलवले होते. नर्सताईंना बोलवायला मी हाॅस्पिटलमध्ये गेलो पण त्या भेटल्या नाहीत. काऊंटरवर निरोप ठेवला. पण तो स्टाफ ” मी कोणाबद्दल बोलतोय?” अशा संभ्रमात दिसला.
फूल ना फुलाची पाकळी म्हणून सर्वांना छोटीशी सस्नेह भेट दिली. सगळ्यांना Thank you म्हणताना माझ्या मनात एक विचार होता, इतक्या निस्वार्थी आणि निरपेक्षतेने दिलेल्या मदतीच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ का? नर्स ताई आल्या. मला खूपच बरं वाटलं. आईची सगळ्यांशी ओळख करून दिली. नर्स ताईंची ओळख करून देणार होतो, पण त्या तिथे खुर्चीवर दिसल्या नाहीत.
हळूहळू सर्व लोक परतू लागले. त्यांना निरोप देता देता मी नर्सताईंना शोधत होतो. तिथे बसलेल्या एक दोघांना विचारले, त्या लाल साडी नेसलेल्या, आणि मोठ्ठं कुंकू लावलेल्या बाई गेल्या का? नंदिता पण त्या कुठे गेल्या म्हणून शोधू लागली. सेक्युरिटीला विचारले. त्यांना कळेना, कुठली लाल साडीवाली ताई? अशी कुणीच नव्हती. आम्हाला कळेना, कुठे गेल्या? त्यांनी फक्त गोड खीर खाल्याचे मी बघितले होते. पण माझ्याशिवाय आणि नंदिताशिवाय दुस-या कुणीच त्यांना बघितलेच नव्हते…असं कसं?
……
मनाला चुट्पुट लागली……
त्या बसल्या होत्या त्या खुर्चीवर आमच्या कुलदेवीचा फोटो आणि गुलाबाचं फूल होतं. ……
ते कसं तिथे आलं? त्यांना आमची कुलदेवी कशी माहीत? शेजारचे ८५ वर्षाचे आजोबा म्हणाले, “ अहो, तुमची देवीच आली असणार…. किती भाग्यवान आहात तुम्ही ! “
आम्ही निःशब्द…..
देवीनं दिलेला फोटो आणि फूल घेऊन घरी आलो. ऊर भरून आला होता देवासमोर हात जोडून दंडवत घातलं….