“शब्द.” मूल बोलू-चालू लागण्यापूर्वी च ऐकण्याच्या माध्यमातून ‘अडगुलं-मडगुलं’ सारखी बडबडगीतं ऐकतं नि मोठं होतं.चिऊकाऊच्या गोष्टी ऐकत, चांदोबाकडे पाहत, आजुबाजुचा परिसर न्याहाळत ते भोवताल समजून घेतं.लहानपणी आकलनक्षमता जास्त असते त्यामुळे मूल पटकन शिकतं.अक्षर ओळख झाल्यानंतर कांही काळ गेला कि तेच मूल मोठ्या टाइपमधील गोष्टींच पुस्तक वाचू लागतं ,यातून पुढे वाचनाची आवड निर्माण होते नि वाचनाची सवय जडते.
शब्द एकदा जवळचे झाले कि मग ते सर्वस्वच बनतात.संत तुकाराम महाराज तरी म्हणतात
आम्हां घरी थन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्नें करू ||१||
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन जन लोका ||२||
तुका म्हणे पहा,शब्दची हा देव
शब्देचि गौरव , पूजा करू ||३||
केवढा अर्थ भरला आहे या अभंगात.आपण थन कशाला म्हणतो तर सोने,चांदी,रत्ने,माणके,रुपये इ.ना.पण तुकाराम महाराज शब्दांनाच धन मानतात.कारण त्यांच्याकडं शब्दांच असं ऐश्व्य आहे कि जे हिरावून घेताच येणार नाही.शब्दांनाच ते शस्त्र मानतात .हे सुद्धा पटतं कारण महात्मा गांधींच्या “चले जाव “किंवा “छोडो भारत ” या शब्दात शस्त्रासारखं सामर्थ्य होतंं ज्यामुळं ब्रिटीश साम्राज्य हादरलं.अजूनही शिकण्यापूर्वी किंवा शिटताना प्रारंभी श्री सरस्वतीची,शब्द ब्रह्माची पूजा करतात.
संत रामदास स्वामी सुद्धा म्हणतात _
नाना शब्द,नाना स्पर्श |
नाना रुप नाना रस |
नानागंध ते विशेष |
नरदेह जाणे ||
एवढच म्हणून ते थांबत नाहीत तर ते देवाजवळ मागण मागतात
कोमल वाचा दे रे राम |
संगीत,गायन दे रें राम |
आलाप,गोडी दे रे राम
रसाळ मुद्रा दे रे राम |
शब्द मनोहर देरे राम ||
म्हणूनच या शब्दांशी मैत्री करु या
शब्दसंग्रह वाढवू या नि त्याचबरोबर शब्दांची गोडी जाणु या नि कटु शब्द टाळू या.
खरोखरच शब्द हे सुंदर आहेत.मनातल्या भावना आपण शब्दातूनच व्यक्त करतो. अगदी एकाक्षरी हुंकारातुनही हे घडू शकतं.
उदा.” हं ” हा शब्द कधी संमती दर्शवितो,तर कधी समाधान.कधीकधी तिरस्कार किंवा क्रोध सुद्धा हुंकारातूनच प्रगटतो.
गोड शब्द दुसर्याला आपलसं करुन घेतात नि नाती जोडतात. याउलट कटु शब्द दुरावा निर्माण करतात नि नाती तोडतात.अशक्य वाटणारं मोठं काम नुसत्या गोड शब्दांच्या वापरातून पूर्ण होतं.म्हणूनच या शब्दास आपण
“शब्दब्रह्म “म्हणुया नि नि नि:शब्द होऊन शब्दांपुढे नतमस्तक होऊ या. 🙏
☆ रानपाखरू – भाग २ – लेखिका – डॉ. क्षमा शेलार ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
(मागील; भागात आपण पहिले – “आता तू म्हनशील..मग या वर्सालाच का घाट घातला? तर बयो त्याचं असंय..सांजसकाळ तू लगीन करून दुसऱ्याच्या घरला जाशीन. उद्याला तुझ्या सासूनं म्हनाया नको, का ही पोर बिनआईची म्हनून हिला कुरडया येती नाईत.तिच्या आतीनं येवढंबी शिकवलं नाई..”)
बोलता बोलता आतीचं हुरदं दाटून आलं. आता इथून पुढे)
संगी खाली बघत गहू खालवर करीत उपसत व्हती . आतीनं नीट केलेल्या गव्हाचं पानी बदलीत व्हती .जरा ईळ गव्हाची वली रास रांजनात सांडन्याचा आवाज,पान्याचा चुबूक चुबूक आवाज येत राह्यला.समजूतीचं पानी गव्हात मुरत व्हतं,अवखळ नादीक असं काई निथळून जात व्हतं.
मध्यान्हीला गुंजाळाच्या तात्यानं फटफटीवर जाता जाता पारावर बसलेल्या मामांना हाळी दिली.मामांबरोबरची सगळी माणसं वळू वळू पाह्या लागली.
मामांनी घरी आल्या आल्या ही बातमी आतीला सांगातली.आती खुश तर झाली पण ‘कसं व्हैल? काय व्हैल? समदं बैजवार झालं म्हंजे बरं..’ असा तिला काळजीकाटा लागला. कायतरी आठवल्यासारखं करीत आती म्हनली,
संगीच्या केसात माळलेल्या गजऱ्याची टवटवी तिच्या चेहऱ्यावानीच कोमावली व्हती.आतीनं एकदम विचारलं,
“यंदाच्या ऐतवारीच म्हनले व्हते ना? तात्यानं नीट निरोप दिला ना? तुमी परासलं का नाई नीट?”
” हा मंग! पाडव्यानंतरचाच ऐतवार..मी चांगलं ठाकूनठोकून इचारलं की तात्याला”
“आस्सं! पाडव्यानंतरचा ऐतवार हाच ना गं पोरीओ?”
“व्हय गं मावशे! हाच ऐतवार..येतीन वली.नको तकतक करू तू.उन्हामूळं थांबत थांबत येत असतीन.” जोडीदारीन म्हनली.
थांबतीन कशाला? मोठे बागायतदार हाईत.चारचाकी हाये घरची…
…मरूंदे!! पावनी येतीन तवा येतीन.तवर घोट घोट च्या तरी घेऊ पोरीओ”
आतीनं आमटीचं भगूनं औलावर ठिवलं आन चुलीवर चहाचं आधन टाकलं. वट्यावरच्या तुळशीपासल्या गवत्याची दोन पानं चुरडून आधनात टाकली.च्या ला कढ आला नाई कुडं तोच मामांची हाळी आली.आतीनं पुढल्या दारातून पायलं तर मामा छातीला येक हात लावीत पळतच आतमंदी आले,
“अगं!! पावनी आलीत बर्का!!”
संगीच्या काळजातून लक्कन गोळा सरकून गेला.छाती धाडकनी धडकत व्हती. आतीनं त्याच च्या त पानी वाढीवलं.पटकनी पदर सावरीत भरला तांब्या मामांकडे दिला. मामांनी मोठ्यांदी हसत पावन्यांना ‘रामराम,श्यामश्याम’ केलं. महिपतरावाशी वळख व्हतीच.बाकीची पावनीबी मोकळंढाकळं बोलत व्हती. जोडीदारीन खिडकीच्या फटीतून समदं लक्ष देऊन बघत व्हती.पोराचे हावभाव बारकाईने बघत ती खुसफूसली,
“संगे! पोरगा लय चिकना हाय बघ.आक्षी कपिल देव सारखा”.आती जिवाचा कान करून बैठकीच्या खोलीतली बोलनी ऐकत व्हती.तिचं लक्ष नाई आसं पाहून जोडीदारनीनं पटकनी संगीलाबी खिडकीपाशी बोलवलं.तिनं खिडकीच्या फटीतून दिसनाऱ्या चेहऱ्याकडे पाह्यलं आन तिच्या काळजात लकलक व्हायला लागलं. तरनाताठा, रूबाबदार, येक बारकं लिंबू लपल येवढा भरघोस मिशीचा आकडा, घाटदार दंडावर तटतटलेला काळ्या धाग्यातला ताईत आन या समद्या पैलवानी बाजाला ठिगळावानी दिसनारं बुजरं हसू.संगीनं त्या चेहऱ्यावर तिच्याबी नकळत जीवाची कुरवंडी करून टाकली.नजर आपोआपच खाली झुकली.बोटं पदराशी चाळा करू लागली.काळजाचं रानपाखरू कवाच त्याच्या खांद्यावर जाऊन बसलं व्हतं. जोडीदारीन कायतरी आंबटचिंबट बोलली. संगीनं डोळे मोठे केले.लाजनारी संगी आक्षी जिवतीवानी दिसत व्हती.
तितक्यात ‘पोरीला बोलवा’ असा पुकारा झाला.आती पदराची सळसळ करीत आत वळली. संगीच्या हातून च्या पाठवला गेला.तिची लांबसडक बोटं लाजेनं थरथरत व्हती. कपबशीबी कापरं भरलं. मनात गोड हुरहूर सुरू झाली व्हती. सपनांची पाखरं गिर्र गिर्र गिरक्या घेत होती.महिपतरावानं आन दुसऱ्या येका हुलबावऱ्या पावन्यानं काय काय प्रश्न इचारले ह्ये आता तिच्या ध्यानातबी नवतं.
ती आत आल्यावर लगेचच मामांनी पावन्यांना न्याहारीचं ईचारलं.हुलबावरा पावना भसकनी म्हनला,
“अवो नाई नाई.येतांना त्या शिंदेसायबांकडं बुंदीलाडूची न्याहारी करून आलो आम्ही.म्हनून तर उशीर झाला इकडं यायला. त्यांच्याबी दोन पोरी लग्नाला आल्यात ना!”
महिपतरावानी पावन्याला कोपर ढोसून इशारा केला आन तो सोत्ता मोठ्यानं म्हनला,
“अवो शिंदेसायेब सहजावारी रस्त्यावर भेटलं. म्हने चला च्या घेऊ एक कप..आता येवढ्या मोठ्या मानसाला नाई म्हंता नाई येत ना..मग गेलो जरायेळ..नाईतर इकडंच यायला निघालो व्हतो.” त्यानी इषय हुशारीनी बदलला. हुलबावरा वरमून गप्प बसला व्हता.
संगीच्या मनातली पाखरं चिडीचूप झाली.आतीबी ईचार करू लागली,
“म्हंजे हा पावना आधीच दोन पोरी पाहून आलाय व्हय?शिंदेसाह्येब पोरीच्या वजनाइतकं म्हनलं तरी सोनं देईल खुशाल.महिपत्या वंगाळच शेवटी.पैशापुडं नांगी टाकली आसंन त्यानं.मोठ्याचीच लेक करायची व्हती तर आलाच कशाला इथं? उगाच पहाटपासून आदबाया लावलंय.”
पावनी आलीच हाईत तर साजरी करायची म्हनून जेवनंखावनं चालली खरी पन त्याच्यात राम नवता. आग्रह केल्यावर पावनी नकं म्हनू लागली तवा आती बोललीच,
पावनी गेल्यावर समदी थकून बसली.आतीच्या डोक्यात राग मावत नवता. मनात उलटेपाल्टे इचार चालले व्हते.डंख मारीत व्हते.
‘पोरगा देखना ,महिपत्या तालेवार .त्यांना उचलू उचलू धरतील अशाच ठिकानी सोयरीक करतीन.आपली गरीबाची पोर कवा आवडायची त्यानला? पन मंग आलीच कशाला इथं? उगाच पुरनावरनाचा घाट घालायला लावला.पोरीला हुरहूर लागली असंन.तिच्या जिवाला काय वाटत असंन?’
संगीचं मन मातूर कायतरी येगळंच म्हनत व्हतं,
‘पोरगा तर लय आवडला.असाच तर पायजेल व्हता..रूतून बसलाय काळजात पन् तरीबी जिथं आतीमामांना कायम खाली पाह्यची वेळ येईल आसं सासर मला नकोच. दिसत्यात फक्त मोठ्या घरची. पन त्यांचे वासे पोकळ असत्यात. उगाच आशा लावून ठिवायचं काय कारन पडलंय?कसा गचबशावानी जेवत व्हता.आवाजबी ऐकला नाई त्याचा. मरूदे..कितीबी आवडला तरी त्याचा ईचार नाई करायचा आता’
तिनं पार पक्कं ठरीवलं.संध्याकाळची हुरहूर सोडली तर संगी परत घरात हसूखेळू लागली. तिला हसतांना पाहून आतीचा बी जीव भांड्यात पडला.तवर मामाबी दुसऱ्या स्थळांच्या तपासाला लागले.
‘ द केरला स्टोरी ‘ हा बहुचर्चित सिनेमा बघितला. धर्मांध झालेली माणसे पशुपेक्षा किती क्रूर वागतात हे पाहून मनाचा थरकाप उडाला. काफिरांच्या मुलींना पद्धतशीरपणे ट्रॅप करून त्यांचे योनशोषण करणे, त्यांना हिंदू धर्माचा तिरस्कार करायला लावणे, प्रेग्नेंट करून त्यांना धर्मांतर करायला लावणे, धर्माचे युद्ध खेळणारे सैनिक म्हणून सिरीयात पाठवणे, माणसांच्या रूपातील हैवानांच्या लैंगिक वासना भागवण्यासाठी मुलींना गुलाम ( sex slave) करणे, वापरून झाल्यावर निर्दयीपणे हत्या करणे.. एकापेक्षा एक भयानक वास्तव त्यात दाखवले आहे.
मला जुळ्या मुली आहेत, आई वडील म्हणून त्यांना चांगले संस्कार देण्याचं आमचं कर्तव्य डोळ्यात तेल घालून आम्ही पार पाडत असतो. पण हा सिनेमा बघितल्यावर शांतीधर्मीय मुलांच्यापेक्षा त्यांच्या मुलींची भीती जास्त वाटू लागली आहे. या सिनेमात असिफा नावाची मुलगी एजंट बनून कसं पद्धतशीरपणे तिच्या रूममेटचे ब्रेनवॉश करत असते हे दाखवलं आहे. जर एखादी असिफा आपल्या मुलींची मैत्रीण झाली तर .. या विचाराने झोप उडाली आहे.
हा चित्रपट मनोरंजन म्हूणन नका बघू, आपल्या डोळ्यात अंजन टाकण्याचं काम या सिनेमाने केले आहे. कोणत्याही प्रकारचा तेढ निर्माण व्हावा हा मुळीच हेतू नाही.
मी तर म्हणतो शांतीधर्मिय मुलींनी पण हा सिनेमा बघावा. अरब देशांच्या मानाने हिंदुस्थानमध्ये स्त्री किती सुरक्षित आहे हे त्यांना कळेल.
द केरला स्टोरी पाहून सुचलेले पुढील काव्य आपण वाचावे आणि आपल्या मित्र मंडळीना फॉरवर्ड.. शेअर करावे…
“सेंगोल” – या राजदंडाची उंची ५ फूट आहे. तो चांदीचा असून त्यावर सोन्याचे पाणी दिलेले आहे. त्याच्या माथ्यावर शिवाचे प्रिय वाहन “नंदीबैल” विराजमान आहे, ज्याला निष्पक्षता आणि न्यायाचे मूर्त स्वरूप मानले गेले आहे. हा राजदंड राजाने हाती धारण करणे म्हणजे धर्माशी अतूट, अविचल आणि तत्त्वनिष्ठ राहून शासन करण्याची जबाबदारी पार पाडणे.
१४ ऑगस्ट १९४७ रोजी, शेवटचा ब्रिटिश व्हॉईसरॉय – लॉर्ड माऊंटबॅटन यांना सत्तांतराचे प्रतीक म्हणून काही दृष्यस्वरूपातील चिन्ह हवे होते. तसे त्यांनी पं.नेहरूंना सुचवले. त्यावेळी ब्रिटिश भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल होते – माननीय सी. राजगोपालाचारी ऊर्फ राजाजी. ते थोरापल्ली, जिल्हा कृष्णगिरी, तामिळनाडू (तेव्हाचे मद्रास राज्य) येथील रहिवासी होते. त्यांच्या मनावर चोल राजवंशाचा मोठा प्रभाव होता. राजसत्तेच्या सत्तांतराच्या समारंभात हा ‘सेंगोल’ (राजदंड) विधिपूर्वक नव्या शासकाच्या हाती सुपूर्द करण्यात येई. राजाजींनी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील “थिरूवदुथुराई अधिनाम (मठ), (Thiruvaduthurai Adheenam (Mutt) या धर्मपीठाशी संधान साधून चेन्नईतील “व्युमिडी बंगारू चेट्टी” या सराफी-पेढीकडून हा “सेंगोल” तयार करून घेतला. त्यावेळी त्याची किंमत रू.१५,०००/- होती.
अशा रीतीने १४ ऑगस्ट १९४७ रोजी हा “सेंगोल” (राजदंड) पं. नेहरूंच्या घरी त्यांचे हाती या मठाच्या साधूंकडून विधीपूर्वक सुपूर्द करण्यात आला.
तो ‘सेंगोल’ (राजदंड) अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील संग्रहालयात वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे प्रदर्शित करण्यात आला होता.
मात्र आता, कालच उद्घाटन झालेल्या नव्या संसद-भवनामध्ये, लोकसभा अध्यक्षांच्या सन्मान्य आसनाशेजारी त्याची सन्मानपूर्वक स्थापना होत असून, ती तामिळनाडूतील त्याच मठाच्या साधूंकडून विधिपूर्वक केली जाईल.
माहिती संग्रहिका :: सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की
बदक की गरुड
तुमचे तुम्हीच ठरवा.
दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट, वर टाय.
ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. आणि बोलला,
” माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जोपर्यंत मी तुमचे सामान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे, सर.”
त्या कार्ड वर लिहिले होते,
जॉन चे मिशन
माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.
मी भारावून गेलो होतो.
गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती.
जॉनने मला विचारले.
“आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?”
मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. “नाही, मला ज्यूस हवा आहे.”
तात्काळ जॉन उत्तरला…
“काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे.”
तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत.
जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता.
मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण
पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण स्वरात विचारले. “सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?” त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ?
न राहवून मी त्याला विचारले,
” तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?”
त्यावर तो उत्तरला, “नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरुवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे. आणि असमाधानी राहत असे. पण एकदा एका डॉक्टरकडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले.
त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते. ” तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो” ज्यात पुढे लिहिले होते. जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत, तर खरेच तसेच होईल. तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.
बदक बनू नका
गरुड बना
बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.
आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे.
म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले.
मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.
मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो.
आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे.
तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालकाद्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो.
जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लिमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे. जॉनने बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे. आणि गरुडासारखी भरारी मारायला सुरुवात केली आहे.
तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.
तुम्ही काय ठरवले आहे ?
बदकासारखे सतत आवाज करत (रडत), तक्रार करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर उडण्याचे ?
लक्षात ठेवा….
निर्णय तुमचा आहे
हे कुलूप फक्त आतून उघडते….
संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
भगवद्गिता ज्ञानेश्वरीतील “सांख्ययोग” या अध्यायात हेच तर ज्ञानसूत्र फक्त अंकशास्त्राऐवजी तत्वसिध्दांताद्वारे सांगीतले गेले आहे.
आपण सगळे वेळेच्या बंधनात हे कर्म करीत असतो.प्रत्येक घडणार्या क्रिया ठरलेल्या वेळेनुसार एक जीवनाचे गणितीय सिध्दांतानुसार फिरत असते. पंचमहाभूते आणि हे त्रिगुणातीत सजीव घड्याळ भगवंताचे एक सांख्यीकिय कालगतीचे चक्र आहे. जिथे मृत्यू हा नाहीच. फक्त आत्मा एक देह सोडून दुसर्या देहात प्रवेश करतो. जसे घड्याळातील वजाबाकीचे उणे होत जाणारे काटे परत बेरजेतून तासात मोजतो तसे.🙏
☆ “दग्ध शौर्य- आम्रफले !” — ☆ श्री संभाजी बबन गायके☆
आपल्या देश-वृक्षाला लगडलेल्या एकशे चाळीस कोटी विविध फळांपैकी पाच आम्रफळं काल-परवा जळून गेली… याची एकशे चाळीस कोटींमधल्या किती जणांना माहिती आहे, देव जाणे!
रमज़ानचा महिना संपायला दोनेक दिवसच शिल्लक आहेत. दिवसभराचा उपवास सोडणं म्हणजे ‘इफ्तार’ एक आनंदाचा क्षण असतो… सर्वधर्मसमभाव तत्वाला जागून आणि उच्च दर्जाच्या सैन्य परंपरेचा एक अविभाज्य भाग म्हणून जम्मूमध्ये तैनात असलेल्या भारतीय सैन्यानं तिथल्या एका गावासाठी ‘इफ्तार’ देऊ केला आहे… त्याचं आमंत्रण साऱ्या गावानं स्वीकारले आहे… कार्यक्रम ठरला आहे. सैन्य या पवित्र कार्यासाठी तयारीला लागलं आहे. आज रात्री सारं गाव एकत्रित उपवास सोडेल… त्यासाठी लागणारी साधनसामग्री आणि विशेषत: फळं खरेदी करून काही जवान शहरातून लष्करी-वाहनातून निघाले आहेत.
दुपारनंतरची साधारणत: चारची वेळ. जोराचा पाऊस सुरू झाला… अंधारून आलं आहे. समोरचं दिसणं दुरापास्त झालेलं आहे… आणि अचानक जवानांच्या वाहनांवर जणू वीज कोसळते… म्हणजे उठलेला आगीचा प्रचंड मोठा लोळ आणि झालेला आवाज यावरून कुणालाही वाटावं… वाहनावर वीजच कोसळली आहे !
पण ती वीज नव्हती… प्रचंड शक्तीचा आणि रॉकेट डागतात त्या उपकरणातून डागला गेलेला हातबॉम्ब होता… जोडीला ऑटोमॅटिक रायफल्समधून काही क्षणांसाठी केला गेलेला गोळीबार. हे सारं काही क्षणांत घडलं.
आग भडकली आहे…. शक्य झाले त्या जवानांनी वाहनाबाहेर उड्या घेतल्या… पण पाच तरूण, तडफदार, शूर, बळकट देह मात्र त्या गदारोळात वेळेत बाहेर नाही पडू शकले. त्यांच्या देहाला आगीने एखाद्या अजस्र अजगरासारखा विळखा घातला होता…
अग्निदेवतेने या देहांवर कोणतीही दयामाया नाही दाखवली… कारण आगीला माणसं नाही ओळखता येत. ही तर नामर्द, भित्र्या, पळपुट्या शत्रूनं लपून लावलेली आग. आग लावलेले नपुंसक लगेच पसारही झाले तिथल्या जंगलात.
बचावलेल्या सैनिकांनी ही जळती शरीरं कशीबशी वाहनाबाहेर ओढून काढली… वेदनेनं आकांत मांडलेला होता… देहापासून त्वचेने फारकत घेतलेली आणि प्राणवायू देहात प्रवेश करायला कचरत असलेला… आणि बाहेर पडलेला श्वास पुन्हा न परतण्यासाठी निघून चाललेला…
काही क्षणांत चौघांचा जीवनवृक्ष जळून गेला… पाचवा त्याच मार्गावर निघून गेला काही वेळानं. त्यांच्या सवंगड्यांच्या दु:खाला, रागाला, अगतिकतेला पारावर नाही राहिला… कसा रहावा… सततचा सहवास… घट्ट मैत्री.. एकमेकांसाठी जीव द्यायची आणि घ्यायचीही तयारी असलेले हे रणबहाद्दर… पण असल्या भित्र्या हल्ल्यात लढण्याची साधी संधीही न मिळता बळी गेले… त्यांच्यासोबत त्यांनी नेलेली फळेसुद्धा काळीठिक्कर पडलेली होती… फुलांची राखरांगोळी झालेली होती. पाच माणसंच नव्हे तर पाच कुटुंबं बेचिराख झाली होती क्षणार्धात!
हल्ल्याचा कट कुणी रचला, कुणी मदत केली, कुणी घात केला… सारं शोधून काढलं जाईलच… आणि प्रतिशोधही घेतला जाईल एक न एक दिवस! समोरासमोरच्या हातघाईच्या लढाईत तर शत्रू वाऱ्यालाही उभा राहण्याच्या लायकीचा नाही. पण कपटाने वार करतो!
त्या पाच जवानांच्या आई-वडिलांच्या, बहिणींच्या, भावांच्या, पत्नींच्या, लहानग्या लेकरांच्या प्रश्नांना उत्तर नाही आजमितीला कुणाकडे. शत्रूला उत्तर दिले जातेच… पण हे पाच देह पुन्हा दिसणार नाहीत. आधीच जळून गेलेले हे देह आता तर खऱ्याखुऱ्या सरणामध्ये जळून राख झालेत आणि कदाचित जळाला अर्पितही झाले असतील.
ज्या देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी हि कोवळी फुलं अकाली गळून जातात, जळून जातात त्यांची या देशातल्या सामान्य जनतेला काही तमा आहे की नाही, हा प्रश्नच आहे. की केवळ एकशे चाळीस कोटी वजा पाच असा हिशेब होणार आहे… यापूर्वी झाला तसा?
हा देश या शूरवीरांच्या सन्मानार्थ एक क्षणही स्तब्ध होत नाही. या राज्यातील जनतेला त्या राज्यातील गेलेल्या सैनिकाबद्दल विशेष काही वाटत नाही. वृत्तपत्रांत, दूरदर्शन वाहिन्यांवर एक बातमी म्हणून ही घटना दिसते आणि लुप्त होऊन जाते. आप्तांचे शोकग्रस्त चेहरे दाखवण्यात, आजकालच्या प्रथेनुसार झालंच तर शॉर्ट रील बनवून ते लाईक्स, शेअरसाठी प्रसृत केले जातात. ‘तेरी मिट्टी में मिल जावॉ…’ ‘याद करो कुर्बानी’ म्हणून झालं की राष्ट्रीय कर्तव्य संपले. चित्रपटगृहात सिनेमापूर्वी बावन्न सेकंद कसंबसं उभं राहून नंतर हवं ते एन्जॉय करायला प्रेक्षक सज्ज होतात तशातली त-हा!
का नाही हा देश हुतात्म्यासाठी एक दोन मिनिटं देत त्या दिवशी? का नाही सार्वजनिक प्रार्थना होत, शोकसभा होत ठिकठिकाणी? का बलिदानं प्रादेशिक झालीत आजकाल? विदर्भातील जवान धारातीर्थी पडला की फक्त विदर्भानेच आसवं गाळायची? बाकीच्यांनी आयपीएलच्या लुटुपुटुच्या लढाया बघण्यासाठी महागडी तिकीटं विकत घेऊन मज्जा करायची!
सैनिकांच्या कल्याणासाठी देणारे नियमित देणग्या देतात… ज्यांची ऐपत नाही त्यांनी देऊ नये. हुतात्मा, जखमी सैनिकांच्या परिवारांची काळजी घेणारी काही सहृदय माणसं आहेत या देशात… इतरांना नसेल जमत हे तर नको जमू देत. पण ज्यांनी आपल्यासाठी आपले प्राण वाहिले त्यांच्या प्रती एका दमडीची संवेदनाही दर्शवू नये लोकांनी याचे सखेद आश्चर्य वाटते.
जनतेची चूक नाही. जनता अनुकरणशील असते. ह्या सवयी राज्यकर्त्यांनी, समाजधुरीणांनी लावायच्या असतात, संवेदंशीलतेच्या, कृतज्ञतेच्या परंपरा निर्माण करायच्या असतात. रशियात नवविवाहित जोडपी पहिली भेट देतात ती त्या देशासाठी लढताना प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या थडग्यांना ! आपण कधी बोध घेणार… हाच सवाल आहे.
“धगधगत्या समराच्या ज्वाळा… या देशाकाशी… जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी “ .. हे कुसुमाग्रजांचे शब्द सत्यात उतरत राहतीलच… कारण सैनिक कधी मरणाला घाबरणार नाही ! पण आपले काय? आपण प्रार्थनाही करू शकणार नाही का निघून गेलेल्या सैनिकांच्या आत्म्यासाठी? धीराचे दोन शब्दही नाही का देऊ शकणार रडणाऱ्या विधवांसाठी, म्हातारपणाची काठी हरवलेल्या आई-बापांसाठी, तडफडणाऱ्या बहिणींसाठी, मूकपणाने आसवं ढाळणाऱ्या भावांसाठी आणि विव्हळणाऱ्या बालकांसाठी?
सैनिकांच्या हौतात्म्याचा शोक घरातून जेव्हा राष्ट्रीय सार्वजनिक पातळीवर पोहोचेल तेव्हाच हुताम्याच्या हौतात्म्याला अर्थ प्राप्त होईल ! तुमच्या आमच्या सुदैवाने हे हुतात्मे यापेक्षा अधिक काही मागत नाहीत !
२० एप्रिल,२०२३ रोजी जम्मू जवळच्या पूंछ येथे झालेल्या अतिरेकी भ्याड हल्ल्यात धारातीर्थी पडलेले लान्स नायक कुलवंत सिंग यांचे वडील बलदेव सिंग हे सुद्धा कारगील युद्धात हुतात्मा झाले होते. कुलवंत सिंग यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सैन्यात पाऊल ठेवले होते. या दुर्दैवी घटनेत हवालदार मनदीप सिंग, लान्स नायक देबाशिष बसवाल, शिपाई हरिक्रिशन सिंग, शिपाई सेवक सिंग ही चार आणखी आम्रफळे देशाच्या वृक्षावरून खाली कोसळून पडली…. हा वृक्ष याची वेदना अनुभवतो आहे का?
(जरा जास्तच झालं ना लिहिताना? पण इलाज नाही. इतर कुणाला हे सांगावंसं वाटलं तर जरूर सांगा. नावासह कॉपीपेस्ट्, शेअर करण्यासाठी परवानगीची गरज नाही. शक्य झाल्यास या जळीताचा व्हिडीओ बघून घ्या इंटरनेटवर… धग जाणवेल !)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला पद्मश्री पुरस्कार दिलाच पाहिजे… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
(डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून बंडूला विषयाचं गांभीर्य लक्षात आलं.) इथून पुढे —
“डॉक्टर साहेब, या प्लेटलेट्स गोळा कशा केल्या जातात ? प्लेटलेट्स देण्यासाठी दात्याचे काही निकष असतात का आणि प्लेटलेट्सचेही रक्तगट असतात का हो ?” – रजत.
— जरा शास्त्रीय आणि तर्कशुद्ध महत्त्वाचे प्रश्न ऐकून डॉक्टरसाहेबांची कळी खुलली आणि ते समजावून सांगू लागले.—-
“रक्तदानापेक्षा प्लेटलेट डोनेशनचे निकष कांकणभर जास्तच काटेकोर असतात. दाता वैद्यकीयदृष्ट्या सुदृढ असावा लागतोच, शिवाय डोनेशनच्या किमान ४८ तास आधीपासून दारू पिणे, तंबाखू सेवन हे सगळंच कटाक्षाने बंद ठेवावे लागते. हिमोग्लोबीन १२.५ पेक्षा अधिक असावं लागतं आणि प्लेटलेट संख्या प्रति मिलीलिटर २,६५,००० पेक्षा जास्त असावी लागते.– दात्याच्या शरीरातून रक्त काढणे सुरू करतात, यंत्राद्वारे त्या रक्तातून प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात आणि उरलेले रक्त पुन्हा दात्याच्या शरीरात सोडलं जातं. (डायलिसिस करताना कसं शरीरातील रक्त काढलं जातं, शुद्ध केलं जातं आणि ते शुद्ध रक्त पुन्हा शरीरात सोडलं जातं, तसंच.) साधारण एक दीड तास ही प्रक्रिया चालू राहते. तसेच ही प्रक्रिया करणाऱ्या यंत्राचा संच हा फक्त एकदाच वापरला जातो. व त्या वापरानंतर तो मोडीत काढला जातो (only one time use, disposed after single use). त्यामुळे दात्याला संसर्ग होण्याची तिळमात्रही शक्यता नसते. रक्तदानात तुमच्या शरीरातून रक्त काढून घेतले जाते, म्हणून तुम्हाला recovery साठी तीन महिन्यांपर्यंत परत रक्तदान करता येत नाही. प्लेटलेट डोनेशन मात्र दर पंधरा दिवसांनी करता येते. आणि तसं ते करावंही, आज प्रचंड गरज आहे. आणि हो, प्लेटलेट्सना रक्तगटाचं बंधन नसतं, बरं का ! कोणत्याही रक्तगटाच्या प्लेटलेट्स कोणत्याही रक्तगटाच्या पेशंटना चालतात. करोना काळात पेशंटची मोठी गैरसोय होत होती, अशा वेळी व जेव्हा कधी तातडीची गरज असेल, तर दाता सुदृढ असेल तर डबल डोनेशनही घेतले जाते. आणि हो, आपण दिलेल्या प्लेटलेट्स कोणाला दिल्या गेल्या हे दात्याला कधीच सांगितले जात नाही. आजवर फक्त एकदाच हा रिवाज मोडला गेला. ज्यांच्या सांगण्यावरून मी त्या दिवशी डोनेशनला गेलो होतो त्या बालविभागाच्या प्रमुखांनी दुसऱ्या दिवशी ज्या लहानग्याला माझ्या प्लेटलेट्स दिल्या होत्या, त्याच्या पालकांचा आलेला आभाराचा मेसेज मला forward केला होता. दानाच्या प्रक्रियेसाठी इतका वेळ देणं, त्या मोठ्या सुईच्या वेदना सहन करणे, आणि पुन्हा पंधरा दिवसांनी हीच प्रोसेस रिपीट करणं – तुम्हाला अनाकलनीय वाटेल कदाचित, पण आपली ही कसरत कोणाचा तरी जीव वाचवत आहे, ही भावना, ही जाणीव आपल्याला प्रेरणा देत रहाते. दान केलेले रक्त तीन आठवड्यांपर्यंत साठवता येते, पण प्लेटलेट्स फक्त पाचच दिवस टिकू शकतात, त्यामुळे आणखीन दाते पुढे येण्याची नितांत गरज आहे.”
— डॉक्टर सुयोग भरभरुन सांगत होते.
घरी परतताना, चक्क बंड्याही शांत होता, रजत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसला होता, आणि एकदम तो उद्गारला, “बंडूशेठ, तू म्हणतोस तेच खरं. तो ब्राझीलचा चिकिन्हो स्कार्पा आणि हे डॉक्टर सुयोग दोघेही एकाच माळेचे मणी आहेत. — त्या चिकिन्होने गाडी जमिनीत गाडायचा गाजावाजा केला, एवढंच तुला आठवलं. पण त्याने पुढे काय म्हटलं, ठाऊक आहे का तुला ?”
बंड्यांनं नकारार्थी मान हलवली.
” तो म्हणाला, ही गाडी माझ्या मृत्यूनंतर मला उपयोगी पडेल म्हणून मी गाडायचे ठरवले, तर तुम्ही माझी हुर्यो उडवलीत, मला नावं ठेवलीत, माझी अक्कल काढलीत. मग तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अनमोल अवयव तुम्ही जेव्हा जमिनीत गाडता, तेव्हा तुमची ही बुद्धी कुठे जाते ? त्यापेक्षा अवयव दान करा, अन्य गरजूंना मदत करा.”
“ अरे Organ donation ला प्रसिद्धी देत होता तो. तसंच या डॉक्टरांना स्वतःच्या कौतुकाची, मानमरातबाची हौस नाहीये. पण असं हे आचरट title पाहिलं, असं heading पाहिलं, असा मथळा पाहिला, की कोण आहे हा टिकोजीराव ? या उत्सुकतेने तरी लोकं ही बातमी वाचतील आणि प्लेटलेट डोनेशनला प्रेरित होतील – उद्युक्त होतील, म्हणून त्यांचा हा खटाटोप. – तुला माहित आहे का, डॉक्टरांनी आत्तापर्यंत तब्बल ७५ वेळा प्लेटलेट डोनेशन केले आहे ?”
— रजत विचारत होता, आणि बंड्या प्लेटलेट डोनेशन करण्यासाठी कोणाला संपर्क करायचा हे विचारणारा मेसेज सुयोग सरांना पाठवत होता.
— समाप्त —
(डॉ. सुयोग कुळकर्णी MD आयुर्वेद आणि त्यांनी ७५ वेळा केलेले प्लेटलेट डोनेशन ही १००% सत्य घटना आहे. प्लेटलेट डोनेशन या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण डॉ. सुयोग यांना ९८२०२५९५६९ या क्रमांकावर अवश्य संपर्क करू शकता.)
☆ “पु.ल. आणि वारा…” लेखिका :सौ. मंगला गोडबोले ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
पुलंचा हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता किती अफाट होती ह्याची एक झलक…
1960-61च्या आसपास कधीतरी वसंत सबनीस यांनी पुलंची एक जाहीर मुलाखत घेतली होती.त्यातील संवाद पाहा:
वसंत सबनीस : आजपर्यंत तुम्ही भावगीत गायक, शिक्षक, नट, संगीत दिग्दर्शक, नाट्य दिग्दर्शक, प्राध्यापक, पटकथाकार आणि साहित्यिक यांच्या वरातीत सामील झाला होता. हीच ‘वरात’ तुम्ही आता ‘वाऱ्यावर’ सोडली आहे, हे खरं आहे काय?
पुलं : “वाऱ्याचीच गोष्ट काढलीत म्हणून सांगतो…”
“भावगीत गायक झालो तो काळ ‘वारा फोफावला’ चा होता…!”
“नट झालो नसतो तर ‘वारावर’ जेवायची पाळी आली असती…”
“शिक्षक झालो त्यावेळी ध्येयवादाचा ‘वारा प्यायलो’ होतो…”
“संगीत दिग्दर्शक झालो त्यावेळी पेटीत ‘वारा भरून’ सूर काढत होतो…”
“नाट्य दिग्दर्शक झालो त्यावेळी बेकार ‘आ-वारा’ होतो…”
“प्राध्यापक झालो तेव्हा विद्वत्तेचा ‘वारा अंगावरून गेला’ होता…”
“पटकथा लिहिल्या त्या ‘वाऱ्यावर उडून’ गेल्या…”
“नुसताच साहित्यिक झालो असतो तर कुणी ‘वाऱ्याला उभं नसतं राहिलं…!”
“ही सर्व सोंगं करतांना फक्त एकच खबरदारी घेतली. ती म्हणजे ‘कानात वारं शिरू न देण्याची…!
“आयुष्यात अनेक प्रकारच्या ‘वाऱ्यांतून हिंडलो.’ त्यातून जे जिवंत कण डोळ्यात गेले ते साठवले आणि त्यांची आता ‘वरात’ काढली…!”
“लोक हसतात… माझ्या डोळ्यात आतल्या आत कृतज्ञतेचं पाणी येतं आणि म्हणूनच अंगाला अहंकाराचा ‘वारा लागत’ नाही!”
🙏🙏🙏 वा राव !
पुलंना उभा महाराष्ट्र
साष्टांग दंडवत घालतो
ते उगीच नाही!
(सौ.मंगला गोडबोले यांच्या – ‘पुलं… चांदणे तुझ्या स्मरणाचे’ या पुस्तकातून).
संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कुठलाही महत्त्वाचा प्रसंग आयोजित करतांना माणूस आजकाल एखाद्या महत्वाच्या,वैशिष्ट्यपूर्ण वा खास दिवसाचे औचित्य साधायचा प्रयत्न करतो.त्यायोगे तो खास दिवस अजूनच खास होऊन कायमचा चांगल्या आठवणींनी स्मरणात राहायला मदतच होते.
स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत जर टप्प्याटप्प्याने गेलेल्या काळाचा विचार केला तर आपल्याला आपल्या भारताची झालेली लक्षणीय प्रगती लक्षात येईल. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या अधिपत्याखाली भारताची वेगवेगळी प्रगती झालेली दिसून येईल.आपल्या होणाऱ्या प्रगतीमध्ये तसेच विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंहाचा वाटा आहे ह्यात कुठलीच शंका नाही. हे युगच यंत्रांच युग आहे.पण फक्त मनात मात्र एक भिती दडून बसलीयं की हे प्रगत यंत्रयुग चालत्याबोलत्या माणसाला यंत्र तर बनवीत नाही नां ? अर्थातच ही भिती काही अगदीच अनाठायी नाही बरं का,ब-याच अनुभवाने जाणवलेली ही भिती आहे. तरीही नाण्याला दोन्ही बाजू असल्या तरी आधुनिक तंत्रज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे तंत्रज्ञानाबाबत उजव्या विचारसरणीचं पारडं नक्कीच जड आहे हे विसरून चालणार नाही. 11 मे हा “तंत्रज्ञान दिन “!
विज्ञानामुळे नवनवीन क्रांती उदयास येते आणि हीच क्रांती आपली उत्तरोत्तर प्रगती घडवून आणते.हल्ली काळ खूप बदललायं. परंतु पूर्वीच्या काळी ह्या विज्ञानाच्या अद्भूत कामगिरीमुळे निर्माण झालेले चमत्कार आणि त्या चमत्कारांमुळे तयार झालेले अविष्कार जनमानसाकडुन पचविल्या जाणं ही खूपच अवघड गोष्ट होती.
विज्ञानाचे अविष्कार येतांनाच दोन रुप घेऊन येतं.त्याच्या योग्य वापरामुळे झालेली प्रगती, विकास आणि उत्कर्ष हे एक रुप आणि त्याच्या अतिरेकी ,चुकीच्या वापरामुळं झालेली अधोगती,पिछेहाट हे दुसरं रुपं.
पूर्वी माणसं ही नोकीयाच्या जाहीराती प्रमाणे ” कनेक्ट दी पीपल ” ह्यावर विश्वास ठेवणारी होती. माणसाचं माणसावाचून अडायचं असा हा “अच्छे दिन” असलेला काळ होता. ह्या यंत्रयुगामुळे माणसाला माणसाची गरज नसल्याची परिस्थिती निर्माण होऊ घातलीयं आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे.
पूर्वी एकमेकांची मदत घेणं ह्यात प्रेम,आपुलकी हक्क दडलेला होता आणि तोच एकमेकांतील दरी मिटवून त्यांना जोडण्याचं दुव्याचं काम करायचा. आता ह्या यंत्रयुगांने एकमेकांची मदत घेतांना एकप्रकारची “हिचकीच”आलीयं.मुळात मदत घेणं हे कमीपणाचं लक्षण हा अत्यंत चुकीचा विचार मनात ठसवतं पिढी उत्तरोत्तर पुढे जातेयं.साधं उदाहरणं पूर्वी एकमेकांना पत्ते विचारतांना,ते शोधतांना खूप मजा यायची. पत्ता विचारणारा, शोधणारा थोडा काळजीत विचारायचा आणि समजावून सांगणारा अगदी तो प्रश्न चुटकीसरशी सोडवूंन दिलासा द्यायचा. आता मुळात पत्ता शोधणेच जवळपास बंद झालयं कारण एकमेकांकडे जाणीयेणीच मुळात कमी झालीयं आणि अगदीच नाईलाजाने जावं लागलं तर कमीपणा न वाटू देणारं “जीपीएस”वरील कोरडी बाई तुम्हाला पोहोचवते इप्सित स्थळी.
आता अत्याधुनिक बँकींग चे बदलते रुपं बघतांना तर हा अनुभव पावलोपावली येतोयं. अर्थातच ह्या नवीन तंत्रज्ञानाने सगळं खूप सहज,सोप्प झालयं हे ही खरचं किंवा ही काळाची गरज म्हणू हवतरं.मध्ये एक आजोबा आणि नातू बँकेत आले होते. ते दोघेही त्या आजोबांना घरबसल्या बँकींग करता यावे म्हणून अँप डाऊनलोडींगसाठी बँकेत आले होते. अर्थातच आजोबांची सोय बघणं हा निरपेक्ष प्रामाणिक उद्देश नातवाचा होता पण आजोबा ह्यातून काय मिळवतात आहेत हे बघण्याच्या नादात आजोबा खूप काही गमावतात आहे हे त्याच्या लक्षातच येत नव्हते. आजोबा गमावतं होते त्यांचा वेळ घालवणं, आजोबा गमावत होते संवाद साधणं,आजोबा गमावत होते तो पासबुकातील आकडे बघतं राहण्याचा,मनाशी हिशोब करण्याचा आनंद, ते गमावतं होते मित्रमंडळी,समवयस्क परिचीत लोकांना एकत्र भेटण्याचा,वैचारिक देवाणघेवाणीचा आनंद,ते गमावतं होते अतिशय काटकसरीतून जमा केलेल्या पुंजीतुन केलेले फिक्स डिपाँझीट परतपरत वाचण्याचा, हाताळण्याचा आनंद.हे त्या नातवाला कळतच नव्हते वा जाणवतही नव्हते. असो कालाय तस्मै नमः हेच खरे.दोघही योग्यच होते फरक फक्त पिढीचा होता.”कुछ पाने के लिये कुछ तो खोना पडता है”ह्यावर परत एकदा विश्वास बसला.
11 मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ 11 मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात 1998 ची ‘पोखरण अणु चाचणी’ आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरण मध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.अणूबॉम्बची चाचणी करून भारताने जगात आपला दबदबा वाढवला होता. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यामुळे कधी न संपणाऱ्या पाश्चात्य देशांच्या शक्तीला आणि वर्चस्वाला भारताने आव्हान दिले.11 मे 1998 रोजी सकाळी वाळवंटातील पोखरण मधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. 58 किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम केलेच कसे ह्या विचारानेच जगाला धक्का बसला.
भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती. १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.
तंत्रज्ञानाचा विषय निघाला तेव्हा अजून लक्षात आलं अणुचाचण्यांशिवाय भारताने बंगळूरच्या राष्ट्रीय एरोस्पेस प्रयोगशाळांनी विकसित केलेल्या हंसा 3 या पहिल्या स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी केली. ह्या व्यतिरिक्त भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) जमिमीवर हवेत मारा करणाऱ्या त्रिशूल क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी करुन आजच्या दिवसाचं महत्त्व आणखी वाढवलं. हे सैन्य आणि नौदल यांनी एकत्रित केले आणि भारत मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग बनला.
आजचा हा तंत्रज्ञान दिन आपल्यासाठी एखादा सोहळा,समारंभ ह्या सारखाच महत्त्वाचा आहे हे नक्की. आजच्या ह्या तंत्रज्ञान दिनी ह्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनापासून धन्यवाद.