मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ OUTLET —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ OUTLET —  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  हिटलरने शेवटी आत्महत्या केली !……..

सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात.

मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विज्ञानानंद मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भैय्युजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूतनं नैराश्यातून आत्महत्या केली.

-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या शीतल (आमटे) करजगी आपलं जीवन संपवतात. 

-आजची नागपूरची बातमी उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ……..

पाण्यात शांतपणे पोहणारे बदक वरून शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात…… माणूस वरवर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही. त्याच्या मनात वेगळी खळबळ असू  शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय…?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

भय्यूजी महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.

त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक अध्यात्मिक गुरू होते, परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील स्ट्रेस बाहेर काढायला त्यांच्या जवळ outlet नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात -) त्याचंही अगदी भैयु महाराजांसारखं झाले.)

इतकं महत्वाचं असतं का हे outlet ? तर होय !!!

— कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir …मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक धरणच आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?—  मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.

म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंतर्मनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध…वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलाच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा….  हे केव्हाही सोपं नाही का.?

म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट म्हणजे परिवार आणि मित्र !—– 

— हसा ! बोला ! रडा ! भांडा ! व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!

काळजी घ्या…. सोडून गेल्यावर “ᴍɪss ʏᴏᴜ” म्हणण्यापेक्षा,  सोबत आहे तोपर्यंत “ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ” म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागतं…

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ पारिजातक कथा ॥ ☆ प्रस्तुती – सुश्री वर्षा सुनील चौगुले ☆

? इंद्रधनुष्य ?

॥ पारिजातक कथा ॥ ☆ प्रस्तुती – सुश्री वर्षा सुनील चौगुले ☆

रात्रीच पारिजात का फुलते, बहरते, त्यामागे एक अतिशय गोड प्रेमकथा आहे. अशी कथा की जी सर्व काळातील सर्वोत्कृष्ट प्रेमकथांंना सुद्धा लाजवेल….  

या कथेनुसार, राजकुमारी पारिजातक सूर्याच्या… होय भगवान सुर्य देवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पुर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्याने लग्न करण्याचे वचन दिले. अट अशी होती की, काहीही झाले तरी तिने त्याच्याकडे कधीही पहायचे नाही. अट विचित्रच होती खरी…पण प्रेमात रममाण झालेल्या परीजातने याचा कधी विचारच केला नाही.  

त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला. उन्हाळा येताच सूर्य देवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली…. इतकी, की पारिजात त्याच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य पारिजातच्या दारात खाली उतरला आणि पारिजात भान हरपून त्याच्याकडे पाहातच राहिली. वचनभंगामुळे तो प्रचंड क्रोधीत झाला आणि रागाच्या भरात अजूनच तापला. या सगळ्यात पारिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली….  तथापि, जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला पारिजातच्या जीवापाड प्रेमाची जाणिव झाली. शरीर भस्म झाल्याने देवांनी तिला एका झाडाच्या रुपात पुन्हा जिवंत केले. आणि पुन्हा असं घडू नये यासाठी रात्रीच सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत परिजातची फुले रात्रीच्या वेळी बहरुन इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने त्यांंचं चुंबन घेतलं असेल आणि प्रेमात ती दोघं स्वतःला विसरुन जात असतील…. 

पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू होतात आणि त्यांच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करताच फुले खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसर्‍या आवृत्तीत असे म्हटले जाते की सुर्यदेवाने पारिजातचे प्रेम नाकारले आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारले आणि तिचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढले.  पडलेली फुलं तिचे अश्रू मानली जातात, ती फुले वाहते, तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास ती फुलं असमर्थ असतात……!

पारिजातक वृक्ष थेट स्वर्गातून आलेला आहे. समुद्रमंथनातून निघालेले हे तेरावं रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होतं. स्वर्गातील इंद्राच्या रोपवाटिकेत तो लावला होता. एकदा नारदमुनींनी ही फुलं रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षासाठी दोघींनी  हट्ट केला. रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती. सत्यभामेला तर आख्खा वृक्षच हवा होता….श्रीकृष्णाने सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. कृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला पण फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत…

याशिवाय असं म्हटलं जातं की पारिजातका खाली उभं राहून एखादी गोष्ट मागितली तर पारिजातक ती इच्छा पूर्ण करतो. इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं…. 

तुम्ही कितीही थकून आलात आणि पारिजातकाच्या खोडाला स्पर्श केल्यास ते तुमचा थकवा काढून घेऊन तुम्हाला उत्साह देतो असंही म्हणतात.

लेखक : अज्ञात

संग्राहिका :  सुश्री वर्षा सुनील चौगुले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हात… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ हात… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मला सांगा हात म्हणजे काय? हात तिच्या ••• एवढच?

हात एक अवयव आहे. शरीराचा महत्वाचा भाग आहे.हाताशिवाय काम करू शकत नाही. तरी कामात हात असणे म्हणजे ‘कामात’ हात ••• का कामात ‘हात’ •••हा प्रश्न पडल्याने हातातले काम तसेच राहू शकते.

असो पण आज मी तुम्हाला हाताची गोष्ट सांगणार आहे.

एका गावात एक कष्टाळू माणूस रहात होता. त्याचा हात चांगलाच चालायचा. त्यामुळे त्याच्या कामाच्या गतीसाठी कोणीच त्याचा हात धरू शकत नव्हते. यामुळेच तो आपली कामे तर आटोपायचाच पण सगळ्या गावकर्‍यांना हात द्यायचा.  त्याच्या याच स्वभावा मुळे तो ग्रामप्रमुखाचा उजवा हात बनला. त्याने असा हातात हात दिल्यामुळे ग्रामप्रमुखालाही कोणापुढे हात पसरायची किंवा हात जोडायची वेळच यायची नाही.

परंतु या कष्टाळू माणसाच्या मुलीचा हात एका धनाढ्य माणसाच्या मुलाने मागितला. तेव्हा ग्राम प्रमुखाच्या हातावर तुरी देऊन त्याला हातोहात फसवून स्वत: मुलीचे दोनाचे चार हात करण्यासाठी हातावर पाणी सोडून तिचे कन्यादानही केले.

त्यामुळे त्या ग्राम प्रमुखाचा हात अचानक सोडल्यामुळे हातच मोडला गेला. पण याला धडा शिकवण्यासाठी त्याने तयारी केली. तो म्हटला मी काही हातात बांगड्या भरल्या नाहीत.  मी असा हातावर हात धरूनही बसणार नाही. मी तुझ्याशी चार हात करायला तयार आहे.

या गरीब कष्टाळू माणसाला हात उचलणे शक्य नव्हते. त्याने पुन्हा त्याच्याशी हस्तांदोलन करणेही अशक्य होते. त्याच्या हातात काहीच राहिले नव्हते. यांच्यात फूट पाडण्याच्या कामात धनाढ्य माणसाचा हात असल्याचे उशीरा कळले.

जणू काही आयुष्याचे पत्ते खेळताना त्या धनाढ्याने याचा हात ओढला होता.

काय नशीबात आहे हे जाणण्यासाठी ज्योतिष्याला हात दाखवला. त्याचा हात बघून ज्योतिष्याने मात्र हात साफ केला.त्याच्या भावनांवर हात मारला.

हात उंचावून म्हणाला सारं काही त्याच्या हातात आहे. असे म्हणून हात हलवून तो गेला सुद्धा.

निराश अंत:करणाने तो हात हलवत रिकाम्या हाताने परत आला.

पण म्हणतात ना••• हातच्या कंकणाला आरसा कशाला? तसे ग्राम प्रमुखाला चांगल्या कामाच्या प्रचितीने कष्टाळू माणसाचा हातगुण चांगला असल्याचे लक्षात आले आणि रातोरात या हाताचे त्या हातालाही कळू न देता त्याच्याशी हात मिळवणी केली. गावाच्या भल्यासाठी असे करणे त्याच्या हातचा मळच होता.  त्यानंतर मात्र यांचे हात कधी सुटले नाहीत.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ …मी  मध्यम वर्गीय… – लेखिका – सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ …मी  मध्यम वर्गीय… – लेखिका – सुश्री नीलिमा जोशी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

” नेहा, मी  आज दुपारी दादरला जाऊन येणारे. ” 

माझं  वाक्य पूर्ण व्हायच्या  आत नेहा म्हणाली, “आई, ओला,  उबेर किंवा टॅक्सीने  जा हं .. “

सोफ्यावर पेपर  वाचत बसलेला नवरा हसून  लगेच  म्हणाला. 

” नेहा,  ती मध्यम वर्गीय आहे. ती  ट्रेन किंवा बसनेच जाणार”

” अरे, साठी उलटून गेली तरी ट्रेन, बसने फिरू शकते  याचं  खरं  तर कौतुक करायला हवं  तुम्ही. माझी काटकसर  कसली बघता. ” मी  पण हसण्यावारी  नेलं  ते . 

” काहीतरी खायला करून ठेवीन. म्हणजे अथर्व शाळेतून आल्यावर  त्याची पंचाईत नको व्हायला. “

” आई, अहो  एक दिवस आणेल की काहीतरी पार्सल.. बाबाही  enjoy करतील. Burger किंवा  वडापाव पाव. “

” नेहा, अबब  एवढाले  पैसे  खर्च करायचे ते junk फूड खायला ? तुझ्या मध्यमवर्गीय सासूला पटणार 

का ? “

नवऱ्याने  मला बोलायची संधी  नाहीच सोडली. 

” बरं  चालेल “असं  म्हणून मी  विषय संपवला. मुलगा  त्याच्या बेडरूम मधे अजूनही लॅपटॉपवर  काम करत होता.

” सुजीत, आज ऑफिसला नाही जायचं का ? “

” अगं आज गाडी गॅरेजमध्ये दिलीय. कुठे ते टॅक्सी शोधत  बसा. “वर्क फ्रॉम होम “करतोय. by the  way तू आज दादरला कशासाठी जातेयस? .” – आता याला का जातेय हे सांगितलं  तर परत माझ्या  मध्यम वर्गाचा  उद्धार  होईल. म्हणून मी  ” काम आहे जरा ” एवढं  मोघम उत्तर दिलं.

पूर्वीच्या आमच्या दादरच्या घराशेजारी, मालतीकाकू घराला हातभार लावायला त्यांच्या  भावाने कोकणातून पाठवलेले पदार्थ  विकतात. दुकानातून  घ्यायचं  तर मी त्यांच्याकडे जाऊन आणते. तेवढीच त्या भावंडाना मदत. पण हे आमच्या घरच्यांच्या पचनी पडणं  जरा कठीणच. म्हणून मी  सुजीतला काही बोलले नाही..

दुपारी गर्दीची वेळ टळून गेल्यामुळे आरामात ट्रेनने दादर ला गेले. इकडची तिकडची विचारपूस केली.   गप्पा टप्पा केल्या. आणि चहा पिऊन बस स्टॉपवर आले. 

याच्यासाठी घे, त्याच्यासाठी  घे (टिपिकल मध्यम वर्गीय !!!) असं करताना सामान अंमळ  जडच  झालं. 

कष्ट उपसायचेच  असा काही हव्यास नव्हता माझा. मी टॅक्सी करायचं ठरवलं

स्टॉपवर उभ्या असलेल्या दोघी तिघीना  नकळत विचारलं, ” पार्ल्यापर्यंत जातेय. कोणाला वाटेत सोडू का ?  “

“टिपिकल मध्यमवर्गीय “– हा मीच  मला taunt  मारला बरं का. अरे एवीतेवी  दोनशे रुपये खर्चच  करायचे तर एकटीसाठी कशाला.. नाही का .. ! माझं मलाच हसू आलं. घरी जर  हे सांगितलं  तर 

सुजीतचा तर स्फोटच  होईल. माझं  फुटकळ  समाजकार्य  कसं  अंगलट  येऊ शकतं  याच्यावर  हिरीरीने चर्चा होईल—  ” काळ  बदललाय,  पण तरीही सतत अविश्वासाचे  चष्मे घालून का रे वावरता ?  चांगुलपणा अजूनही येतो अनुभवायला. ” — हे माझं  म्हणणं  मोडीत काढलं  जाईल  किंवा मध्यम वर्गीय विचारात त्याची गणना  होईल हे मला माहित होतं . 

मी  घरी आले तर मस्त MacD च्या पार्सलवर तिघांनी ताव मारल्याची वर्दी ओट्यावरच्या  पसाऱ्याने  दिली… सवयीनुसार  take away चे  कंटेनर  धुऊन  पुसुन   कपाटात ठेवले. कामवाल्या  बाईंना , मावशींना, पदार्थ घालून द्यायला उपयोगी  पडतात. , ” टिपिकल  मध्यमवर्गीय ” वागणं. !!! “

सोफ्यावर जराशी टेकले. आणि मनात विचार आला —- 

“मध्यमवर्ग ” हा  स्तर जरी  ‘ पैशाची आवक ‘ यावरून  पडला असेल तरी मध्यमवर्गीयांचे  विचार,  वागणूक,  संस्कार  यात खूप श्रीमंती आहे. आज पैशाची थोडी उब मिळाली,  सुबत्ता आली म्हणून हे संस्कार पाळायचे नाहीत हे कितपत  योग्य आहे.? — चालत जाता येण्यासारखं  अंतर असेल , किंवा बस ट्रेननी  जाणं  सोयीचं  असेल, तर परवडतंय  म्हणून टॅक्सीने जाणं  जर मला चैन वाटत  असेल तर त्यात  मध्यमवर्ग  कुठे आला.? काटकसर कुठे आली? पैशाची नाहक उधळमाधळ  नको ह्या  संस्काराची  जपणूक आहे यात. —-

सहजपणे  कोणाला  मदत करणं, वस्तू जपून वापरणं, आपुलकीने  कोणाशी  वागणं, गरजा मर्यादित  ठेवणं, उच्च  राहणीमान  ठेवूनही  दिखाऊपणा न  करणं — या वागण्याचा संबंध आजची पिढी पैशाशी  का जोडू पहाते ? हे वागणं  टिपिकल  मध्यमवर्गीय  म्हणून त्याची खिल्ली का उडवते ?– हे आकलनाच्या पलीकडे आहे आणि न पटणारे आहे. आजकालच्या  आत्मकेंद्रित  पिढीला या कशातही रस  वाटत नाही .  

एकमेकांच्या  संपर्कात  राहणं, जुडलेलं  राहणं, “थेट ” भेटणं,  हे  मध्यमवर्गीय  का वाटावं  या पिढीला? . “आई, आजकाल असं  नाही आवडत  लोकांना. त्यांना त्यांची अशी space  हवी असते ” असं  म्हणत आपसातलं अंतर वाढवणं हे ‘उच्चभ्रू ‘??  

माझ्या मध्यम वर्गीय विचारात न बसणारं आहे हे !!!  आपल्याला हवं  तसं  वागायची  मोकळीक आहे ना आपल्याला…..  मग मनातल्या मनात तरी कशाला चर्चा करायची…. ‘ मी  मध्यमवर्गीय आहे ‘  याचा मला  अभिमान आहे ना….  मग झालं की !! 

— असं  म्हणून मी सगळ्यांसाठी फक्कड चहा करायला स्वयंपाक घरात  घुसले. 

लेखिका : नीलिमा जोशी

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पतंग… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ पतंग… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

निळ्या आकाशात पतंग उंच उंच का भरारी घेतो माहित आहे ? त्याचा विश्वास असतो दोर पकडलेल्या त्या हातांवर !  त्याला माहित असतं की हे हात जोपर्यंत माझी ढील सैल करत नाहीत तोपर्यंत मी वर वर लहरत जाईन .. आकाशाला स्पर्श करेन .. वाऱ्याशी स्पर्धा करेन अन जमलेच तर ते खुणावणारे तारेही स्पर्शेन … एवढासा पतंग किती उच्च स्वप्ने पहातो केवळ त्या दोर पकडलेल्या हातांवर अन उंच उंच उडत राहतो !

माणसाचे ही असेच असते आपल्या माणसांच्या, कुटुंबांच्या भक्कम पाठिंब्यावर, विश्वासावर तो आनंदाने पळतो, मोठी मोठी स्वप्ने पहातो, ती पूर्णत्वास नेतो, केवळ या अदृश्य चिवट नाते बंधावर … जोपर्यँत हा विश्वास असतो बंधाचा, आधाराचा तोपर्यंत तो प्रचंड आत्मविश्वासाने संकटे, अडचणी आनंदाने झेलतो.

आपलाही अदृश्य दोर कधी असतो भाऊ, कधी मित्र, कधी मैत्रीण, सहचर, बहीण, पती, पत्नी बनून दृढ  विश्वासाचा दोर मजबूत पकडत असतात आणि आपण आनंदाने जीवनाच्या विशाल अथांग आकाशात उंच उंच लहरतो ….आनंदी पतंग होऊन …

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मला आवडलेली बोधकथा… भाग -1 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? वाचताना वेचलेले ?

मला आवडलेली बोधकथा… भाग -1 ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

एका जुन्या इमारतीत त्या वैद्याचे घर होते. घराच्या मागच्या भागात त्याने संसार थाटला होता आणि पुढच्या भागात दवाखाना. त्याच्या पत्नीची सवय होती कि, दवाखाना उघडण्यापूर्वी संसाराला लागणारी, त्या दिवसाच्या सामानाची एक चिठ्ठी, ती दवाखान्यात ठेवत असे. पूजाअर्चा करून वैद्य महाराज दवाखान्यात येत आणि भगवंताचे नाव घेऊन ती चिठ्ठी उघडत. पत्नीने ज्या गोष्टी त्यात लिहिल्या आहेत, त्यांच्यासमोर ते त्या वस्तूंचे भाव लिहीत असत आणि त्याचा हिशेब करत असत. 

नंतर मग परमात्म्याची प्रार्थना करून म्हणत, “हे दयाघना भगवंता, मी केवळ तुझ्याच आदेशानुसार, तुझी भक्ती सोडून, इथे या दुनियादारीच्या चक्रात येऊन बसलो आहे.” वैद्यजी कधीच आपल्या तोंडाने रोग्याला फ़ी मागत नसत. कुणी द्यायचे तर कुणी नाही, परंतु एक बाब निश्चित होती, कि त्या दिवसाच्या सामानाचा लावलेल्या हिशेबाची रक्कम पूर्ण झाली की, नंतर आलेल्यांकडून ते काहीच फी घेत नसत, मग तो येणारा रोगी कितीही पात्र आणि श्रीमंत असो. 

एक दिवस वैद्याने दवाखाना उघडला. गादीवर बसून परमात्म्याचे स्मरण करून पैशाचा हिशेब लावण्यासाठी चिठ्ठी उघडली आणि ते अवाक झाले, एकटक बघतच राहिले. काही क्षण त्यांचे मन भरकटले, डोळ्यासमोर तारे चमकायला लागले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानी आपल्या मनावर नियंत्रण मिळवले. गव्हाचे पीठ, तेल-तूप-मीठ, तांदूळ-डाळ या सामानानंतर पत्नीने शेवटी लिहिले होते, “मुलीचे लग्न येत्या २० तारखेला आहे, तिच्या लग्नाला, हुंड्याला लागणारे सामान”.

काही वेळ विचार करून बाकी सगळ्या सामानांची किंमत लिहून लग्नाला लागणाऱ्या सामानासमोर त्यांनी लिहिले, “हे काम भगवंताचे आहे, तो जाणे आणि त्याचे काम जाणे.” 

नेहेमीप्रमाणे काही रोगी आले, त्यांना वैद्यांनी औषधी दिली. या दरम्यान एक मोठीशी कार त्यांच्या दवाखान्यासमोर येऊन थांबली. वैद्यांनी काही खास लक्ष दिले नाही, कित्येक कार त्यांच्याकडे येत असत. आधी आलेले रोगी औषधी घेऊन चालले, गेले. तो सूटा-बुटातला साहेब कारमधून बाहेर आला आणि नमस्कार म्हणत बेंचवर बसला. वैद्य म्हणाले, “आपल्याला जर औषधी पाहिजे असेल तर आपण इकडे स्टूल वर या म्हणजे मी आपली नाड़ी परीक्षा करू शकेन आणि कुणा इतरांसाठी औषधी हवी असेल तर रोगाचे, स्थितीचे वर्णन करा.”

ते साहेब म्हणू लागले, ” वैद्यजी, तुम्ही मला ओळखले नाही का? माझे नाव कृष्णलाल आहे. आणि आपण तरी कसे ओळखणार, कारण मी १५-१६ वर्षानंतर आपल्याकडे आलो आहे. आपल्याला मी आपल्या मागच्या मुलाखतीबद्दल सांगतो, म्हणजे सारे काही समजून येईल. जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो ना तेव्हा मी स्वतःहून आलो नव्हतो, खरे तर ती ईश्वरी योजनाच होती. ईश्वराला माझ्यावर कृपा करण्याची इच्छा झाली होती, कारण त्याला माझे घर आबाद करायचे होते, माझ्या जीवनात भरभरून सुख आणायचे होते. आणि आपली ती पहिली भेट आठवली की, आज देखील ईश्वराच्या त्या साहजिक कृपेच्या प्रसंग आठवणीने, मी विनम्र होतो, नतमस्तक होतो, नि:शब्द होतो. “

“ झाले असे होते की, मी आपल्या पैतृकांच्या घरी जात होतो. अगदी आपल्या दवाखान्याच्या समोर माझी कार पंक्चर झाली. ड्रायव्हर कारचे चाक काढून पंक्चर काढायला गेला. आपण बघितले की, मी उन्हामध्ये कारजवळ उभा आहे. आपण माझ्याजवळ आलात आणि दवाखान्याकडे बोट दाखवून आत यायला विनंती केली, इथे खुर्चीमध्ये सावलीत बस म्हणून म्हणालात. आंधळ्याला काय दोन डोळेच पाहिजे असतात, मी खुर्चीमध्ये येऊन बसलो. आपण मला यथोचित गूळ-पाणी देऊन तृप्त केले. का कोण जाणे पण ड्रायव्हरने देखील काही जास्तच वेळ घेतला होता. दुपार झाली होती. एक छोटीशी मुलगी आपल्या गादीपाशी उभी होती आणि म्हणत होती, “चला ना बाबा, मला भूक लागली आहे.” आपण तिला म्हणत होता, ‘ बाळा थोडा धीर धर,, जाऊयातच आपण. ‘ “ 

“ मी हा विचार केला की इतक्या वेळचा आपल्याजवळ बसलो आहे आणि माझ्यामुळे आपण जेवायला देखील जाऊ शकत नाहीत. म्हणून काहीतरी औषधी विकत घेऊन टाकू, म्हणजे माझ्या बसण्याचा भार हलका होईल, काही उद्देश प्राप्त होईल.  मी आपल्याला बोलता बोलता म्हणालो, “वैद्य महाराज, मागच्या ५ – ६ वर्षांपासून मी इंग्लंडमध्ये राहतो, व्यवसाय करतो तिथे. इंग्लंडला जाण्यापूर्वीच माझे लग्न झाले आहे, पण संतती-सुखापासून मात्र अजून वंचित आहे. इथे भारतात देखील बरेच इलाज केले, तिथे इंग्लंडमध्ये देखील दाखवले, पण पदरी निराशाच पडली आहे. “ 

“आपण म्हणालात, ” भगवंतापासून निराश होऊ नका, तो अत्यंत दयाळू आहे, तो खूप मोठा दाता आहे. आपण म्हणालात, लक्षात ठेवा त्याच्या कोषागारात कशाचीही कमी नाही. कशाचीही आस तो पूर्ण करतो. संतती, धन-दौलत, इज्जत, सुख-दुःख, जीवन-मृत्यु, सारे काही त्याच्याच हातात आहे. ते कुणा वैद्य किंवा  डॉक्टरच्या हातात नसते. ते कोणत्या औषधाने मिळत नाही. जे काही व्हायचे असते ते सारे भगवंताच्या आदेशाने होत असते. संतती जरी द्यायची असेल तरी दाता तोच आहे.” –  आजदेखील तो प्रसंग जशाच्या तसाच माझ्या नजरेसमोर आहे. माझ्याशी हे सारे बोलत असताना, आपण एकीकडे औषधाच्या पुड्या बांधत होतात. सगळ्या औषधी आपण दोन भागात विभाजित करून, दोन वेगवेगळ्या पाकिटात टाकल्या, आणि मला विचारून एका पाकिटावर माझे नाव टाकले, आणि दुसऱ्यावर माझ्या पत्नीचे. माझ्या हातात ते सुपूर्द करून औषधी घेण्याची विधी आपण समजावलीत.” 

– क्रमशः भाग पहिला. 

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरी तृतीया (तीज), आणि मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया.) ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ गौरी तृतीया (तीज), आणि मत्स्य जयंती (चैत्र शुद्ध तृतीया.) ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेला चैत्रगौर बसविली जाते. या दिवशी देवघरातच किंवा आपल्या सोयीनुसार इतर पवित्र ठिकाणी गौरीची स्थापना केली जाते. 

तृतीयेपासून चैत्र गौर बसविली जाते. या दिवसाला गौरी तीज असेही म्हणतात .देवातल्या अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया ) पर्यंत तिची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. हा चैत्र महिन्यातील मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्या सुंदर पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात. या दिवशी आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे,बत्तासे,भिजवलेले हरभरे,टरबूज,कलिंगड यासारखी फळे असा नैवेद्य देवीला अर्पण करण्याची पद्धत आहे. महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.काही ठिकाणी घरी आलेल्या स्त्रिया आणि कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजवलेले हरभरे,फळे यांनी त्यांची ओटी भरतात आणि कैरीचे पन्हे,आंब्याची डाळ देऊन त्यांचे स्वागत करतात. काही ठिकाणी चैत्र गौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते . आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते अशी कल्पना आहे. या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात रांगोळीने चैत्रांगण काढले जाते. या चैत्रांगणाच्या रांगोळीत देवीची शस्त्रे, तिची वाहने , तिची सौभाग्याची लेणी,स्वस्तिक , कमळ , सूर्य , चंद्र , गोपद्म यासारखी शुभ चिन्ह काढली जातात. रांगोळीत मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र,राधाकृष्ण , तुळशी वृंदावन अशी चित्रे काढली जातात . हीच ती चैत्रांगणाची रांगोळी.

मत्स्य जयंती, चैत्र शुद्ध तृतीया.

हिंदू वर्षाचा तिसरा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीया . हा दिवस मत्स्य जयंती म्हणून ओळखला जातो. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. हा मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणकथेनुसार पृथ्वीला प्रलयापासून वाचविण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला अशी कथा आहे.

राजा सत्यव्रत नदीत स्नान करून जलांजली देत असताना त्यांच्या ओंजळीत एक मासा आला. त्या माशाच्या विनंतीवरून राजा त्याला घरी घेऊन गेला. हा मासा दररोज असाधारण रीतीने मोठा होऊ लागल्याने राजाने त्याला मूळ रुपात दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले. पुढे सात दिवसांनी होणाऱ्या प्रलयाची कल्पना त्यांनी राजाला दिली पुढे त्यांनी राजाला प्राणी आणि सप्तर्षी यांना घेऊन माझ्या नावेतून चल असे सांगितले. या नावेतून जाताना मत्स्याने राजाला जी माहिती दिली ती मत्स्य पुराण म्हणून प्रचलित आहे. सत्यवत राजाने वाचविलेल्या काही प्रमुख लोकांपैकी राजा चाक्षुष हा राजा पुढे मनू म्हणून प्रसिद्धीस आला. याच मनूचे वंशज म्हणजे मानव किंवा मनुष्य, म्हणजेच आपण मानव.

या मत्स्य जयंतीच्या दिवशी “ओम मत्स्याय मनुपालकाय नम:” या मंत्राने मत्स्य अवतार प्रतिमेची किंवा भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे.

मत्स्य अवतारामागे हयग्रीव राक्षसाची पण कथा आहे. या राक्षसाने ब्राम्हदेवांचे सारे वेदांचे ग्रंथ चोरले.  त्यामुळे सर्वत्र अज्ञानाचा अंध:कार पसरला. अशा वेळी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून हयग्रीवचा वध केला आणि वेद सुरक्षितपणे ब्रम्हदेवांकडे पोहोचवले असे सांगतात.

संग्रहिका : श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

संपर्क – ‘अनुबंध’, कृष्णा हॉस्पिटल जवळ, सांगली, 416416.        

मो. – 9561582372, 8806955070.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ “नाव नसलेले भांडे….” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

पूर्वी घराघरात एक पद्धत अस्तित्वात होती. ती पद्धत म्हणजे दुकानातून घरात वापरायची कोणतीही भांडी आणली की ती दुकानातून आणतांना त्यावर नावे घालून आणायची. भांडे लहान वा मोठे प्रश्नच नसे, त्यावर नांव हे असलेच पाहिजे. समजा बायको सोबत नसतांना नवरा एकटा दुकानात गेला व गरजेचे भांडे घेतले व घरी आला की गृहिणी भांडे नंतर पहायची. आधी त्यावर नांव काय घातले आहे की नाही ते पहात असे. त्या भांड्यावर तिला तिचे नांव दिसले की देव भेटल्याचा आनंद मिळत असे. नांव जर दिसले नाही तर मात्र काही खरे नसे, ती आल्या पावली नवऱ्याला परत दुकानात पाठवून त्यावर नांव घालून आणा असे सांगत असे किंवा स्वत: जाऊन नांव घालून आणून मगच ते वापरायला सुरवात करीत असे.  आजही तुमच्या घरात नांव घातलेली खूप भांडी असतील पहा.

लग्नकार्यात वा अन्य प्रसंगी आलेली भांडी पहा, त्यात वर्गवारी होत असे, नांव घातलेली व नांव न घातलेली भांडी वेगळी केली जात असत. नांव असलेली भांडी वापरात घेतली जायची व नांव नसलेली भांडी प्रसंगा प्रसंगाने देण्या घेण्यासाठी वापरली जात असत. अशी ही नांव नसलेली भांडी या हातातून त्या हातात, या घरातून त्या घरात नुसती फिरत रहायची, उपयोग काहीच नाही.

असो हे सारे आले कशावरुन तर नांवावरुन. आता ती भांडी जरा घडीभर बाजूला ठेवा व विचार करा.  आपला देह हे एक पंचमहाभूतांनी बनलेले भांडेच आहे. ते जन्माला येते तेव्हा त्यावर काही नांव नव्हते. ते असेच फिरत फिरत आपल्या घरात आले, मग त्या देहाला नांव दिले जाते ते मरेपर्यंत रहाते.  पण देह संपला- नांव संपले – व बिना नावाचा आत्मा पुन्हा योनी योनीतून फ़िरायला जातो.

आता ही पळापळ थांबायला उपाय काय सांगितला आहे..? आपल्या संत, सत्पुरुष, गुरु, सद्गुरु, समर्थांनी सांगितले आहे की, ‘ जमेल तेव्हा जमेल तसे जमेल तितके देवाचे नाव घे. म्हणजे काय होईल ? देह पडला तरी देवाचे नाव तुझ्यासोबत येईल. ते नांव देवाने पाहिले की देव म्हणेल याच्यावर माझे नाव आहे, याला माझ्या घरात पाठवा. ज्या भांड्यांवर माझे नांव नसेल त्यांना पाठवून द्या या घरातून त्या घरात –  म्हणजे या योनीतून त्या योनीत फ़िरायला.’ 

आपले काय होते माहिती आहे का ? आपण म्हणतो जमेल तसे, जमेल तेव्हा, जमेल तिथे नांव घे, नाम घे असे सांगितले आहे.  झाले– आपण पळवाट शोधण्यात पटाईत. आपण म्हणतो जमेल तसे ना ! अहो नाही जमले त्याला आम्ही काय करणार. मग देव म्हणतो– हरकत नाही मग रहा फिरत निवांत घरोघरी, या योनीतून त्या योनीत….. 

नाम घे असे देव कधीच सांगत नाही, तो म्हणतो हे सांगायचे काम मी माझ्या प्रतिनिधींना म्हणजे संत, सत्पुरुष, गुरु, सद़्गुरु, समर्थ यांना दिले आहे व ते काम ही मंडळी चोख करतात. माझे काम फ़क्त भांडे माझ्याकडे आले की त्यावर नांव आहे का ते पहायचे. नांव असेल तर माझ्यापाशी ठेवायचे व नांव नसेल तर पुढील प्रवासाला पाठवणे.

बघा –  वाचा –  व विचार करा. 

लेखक – अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 

🌸 विविधा 🌸

☆ स्वतःवर प्रेम करा… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

स्वतः वर प्रेम करा..

म्हणजे नक्की काय? आणि याचे फायदे काय?

आपण जसे आहोत तसा स्वीकार करणे.रंग,रूप,उंची,तब्येत,एकूणच व्यक्तिमत्व यांचा स्वीकार करणे.आपण जरा समाजात बघितले तर बरीच माणसे अशी दिसतात की, आकर्षक अशा बाह्य गोष्टी काहीच नसतात.पण तरीही ती यशस्वी असतात.अगदी बरेच दिव्यांग सुद्धा असे असतात की ते इतरांसाठी काम करतात.मग आपणाच आपल्याला का कमी लेखायचे? या साठी एक उपयुक्त वस्तू आहे. ती प्रत्येक घरात अगदी प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असते.ती म्हणजे आरसा.याचा उपयोग कसा करायचा ते बघू.

मिरर थेरपी

सकाळी उठल्यावर प्रथम स्वतःला आरशात बघावे.आणि सुंदर हसून म्हणावे मी स्वतःचा स्वीकार करत आहे.व स्वतःचे आभार मानवेत.ही कृती दिवसातून शक्य असेल तेवढ्या वेळा करावी.या मुळे काय होते? आपले मन स्वतःचा स्वीकार करते.व तसे मनाचे प्रोग्रॅमिंग होते.आणि तशाच सूचना मिळतात. आपण सगळ्या गोष्टी स्वीकारू लागतो.स्वतःला नावे ठेवणे बंद करतो.आपण बरेचदा दोन चेहरे घेऊन जगत असतो.इतरांसाठी आपला वेगळा चेहरा असतो.आणि स्वतः साठी वेगळा चेहरा असतो.त्या मुळे आपल्यावर ताण येतो. हे कमी करणे आपल्याच हातात असते.स्वतः वर प्रेम करणे व स्वाभिमान,अभिमान वाटणे यात फरक आहे.ज्यावेळी स्वतः वर प्रेम करतो त्यावेळी स्वाभिमान वाटतो.स्वाभिमान वाढला तर त्याचे रूपांतर अभिमान म्हणजे गर्व यात होते.यात खूप पुसट रेघ असते.आपल्याला अभिमान व स्वाभिमान सोडून स्वभान आणायचे आहे. त्या साठी स्वतःचा स्वीकार करून स्वतःवर प्रेम करावे.

स्वतःवर प्रेम केले की आपण आनंदी होतो.खोटा मुखवटा धारण करत नाही.स्वतः कडे साक्षी भावाने बघायला शिकतो.त्या मुळे स्वतः मधील गुण व दोष लक्षात येतात.एकदा हे लक्षात आले की आपण दोष कमी करू शकतो आणि गुणांची वाढ कशी होईल या कडे लक्ष देऊ लागतो.आणि अशी गुणी आनंदी असणारी व दुसऱ्यांना आनंदी करणारी व्यक्ती सर्वांनाच हवीशी वाटते.इथे आपल्या बाह्य रूपाचा काहीही संबंध उरत नाही.

हे सगळे फक्त एका साध्या गोष्टीमुळे घडते.आणि ती गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणे.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ चैत्रगौर… सुश्री रश्मी भागवत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

? मनमंजुषेतून ?

🍃 चैत्रगौर… सुश्री रश्मी भागवत ☆ प्रस्तुती सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला

इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्‍याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे

चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी

गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी

गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

 गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी

कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती

ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला

ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

चैत्र नवरात्री ,झुल्यावर बसलेली गौर आणि चैत्रातील हळदी कुंकू ,मंतरलेले बालपणीचे दिवस आठवांचे सुंदर हिंदोळे… घरातील साध्या सुध्या ट्रंक ,टेबल स्टूल आणि पारंपरिक गालिचे शेले असे ठेवणीतले सामान घेऊन आणि शोकेस मधील पक्षी प्राणी फुले फुलदाण्या घेऊन सजावटीत सुंदर पितळी झोपाळ्यावर गौर नटून सजून बसे . त्यात आमची पितळी भातुकली मांडली जाई .दारचे मोगऱ्याचे गजरे ,जाई जुईचे हार ,सोंनचाफ्याच्या  वेण्या ,आंब्याच्या पानांची तोरणे , बागेतल्या कैऱ्या , आणि इतर उन्हाळी फळे ,कलिंगड ,काकड्या ,टरबूज ,द्राक्षे आंबे अशा रसरशीत फळांच्या सुंदर सजावटीची उतरंड गौरीच्या पायथ्याशी सजवली जात असे . परिसरातील मुबलक पळसाची पाने धुवून पुसून आंब्याच्या डाळीसाठी दिली जात ,कैरीचे गूळ वेलची जायफळ केशर युक्त पन्हे अक्षरशः छोटे पिंप भरून केले जाई ,आदल्या रात्री टपोरे हरभरे भिजवून रोवळी रोवळी भरून उपसले जात .  ओल्या नारळाच्या करंज्या ,काही फराळाचे जिन्नस सजावटीत मांडले जात . केशरी भात , पाकातील चिरोटे अशी साधी पक्वान्ने रांधली जात.

दारात सुबक चैत्रांगण रेखत असू त्यावेळी  आम्ही… 

डाळ पन्हे हरभरे फळे यातील पोषणमूल्ये आणि कॅलरीज यांचा उहापोह न करता सख्यांसाठी हे पाठवत आहे .

आजूबाजूच्या चार पाच वाड्यांमधील बिऱ्हाडातील सख्या, त्यांच्या लेकी बाळी ,अगदी लांबच्या ओळखितील सुद्धा स्त्रिया पारंपरिक ठेवणीतील वस्त्र चार दागिने घालून एकमेकींची चैत्र गौर आवर्जून बघायला जात ,त्या निमित्ताने भेटी गाठी आणि ऐसपैस बोलणे बसणे होई.. सुंदर ताजी हळद ,पिंजर ,वाळ्याचे अत्तर ,गुलाबपाणी शिंपडून स्वागत होई .

बतासा , आंब्याची डाळ ,पन्हे देऊन समारंभ होई ,आणि प्रत्येकीची ओल्या हरभर्याची ओटी भरली जाई….घरी मग चटपटा चना तव्यावर परतला जाई ,त्याची चव खमंग खुमासदार लागत असे.

प्रत्येकीची कैरी डाळ त्याची खुमासदार फोडणी आणि पन्हे अगदी विविध चविंचे पण सुंदर चवीचे असे .

चैत्राची पालवी ,मनामनावर आलेली मरगळ झाकोळ सगळे घालवी आणि वसंताच्या चाहुलीने निसर्गातील चैतन्य पुन्हा सदाबहार होण्यासाठी अनुकूल असे .

हवेतील उष्मा सुसह्य करण्यासाठी पांढरा शुभ्र मोगरा , वाळा ,जाई जुई अशी फुले भरभरून फुलत , आसमंतात कडुलिंबाचा नाजूक फुलांचा मोहोर मधुर गंधाची बरसात करीत असे . उत्साहाची आनंदाची श्रीराम भक्तीची  गुढी उभारून चैत्राची सुरुवात होत असे . घरोघरी श्रध्देने जपलेले गीत रामायणाचे सुंदर सूर आवर्जून गुंजत असत.

चैत्राची अशी ही जादू अजूनही मनावर आपला  ठसा उमटवून आहेच.

चैत्रातील ही गौर म्हणजे पार्वतीचे माहेरघरी येणे होय. अशा माहेर वाशिणीचे कौतुक चराचराने केले नाही तर नवलच !! वर दिलेले गीत हे कोकणात पारंपरिक गौरीचे गीत म्हणून. गायले जाते. हा चैत्र गौरीचा चंदन झुला अनुभवला असेल त्या प्रत्येकीच्या मनात दर वर्षी नक्कीच झुलत असणार..

इरकली टोप पदरी अंजिरी जांभळ्या काठाची गर्भ नऊवारी साडी ,टपोरी मोत्याची नथ , चार मोजकेच पण ठसठशीत  दागिने , आईचा सात्विक चेहरा , कर्तृत्ववान कष्टाळू समाधानी वावर ….आत्ता कळतंय की पार्वती म्हणजे दुसरे तिसरे कोण ….ती आईच….जगन्माता ….आणि प्रत्येकाच्या घराघरात नांदणारी आपापली आईच !!!! 

लेखिका : सुश्री रश्मी भागवत

प्रस्तुती :  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares