सुश्री विभावरी कुलकर्णी
विविधा
☆ व्रतोपासना – ७. कोणत्याही ऋतूची निंदा करु नये ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
जसे आपण काही व्रत कथा वाचल्या की, त्यात प्रथम लिहिलेले असते ‘उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. ‘ त्याच प्रमाणे कोणती व्रते करावीत हे आपण बघत आहोत. ही व्रते जुनीच आहेत फक्त काळानुसार आपण त्यात थोडा बदल करुन अंमलात आणावे.
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर अशा सहा ऋतूंनी आपले संवत्सर पूर्ण होते. आणि हे ऋतूचक्र अव्याहत चालू असते. त्या मुळेच संपूर्ण जीवसृष्टीला, माणसाला जगण्यासाठी आवश्यक गोष्टी मिळतात. कधी कधी काही ऋतूंचा त्रास होऊ शकतो. पण तो काही जणांनाच होतो. काहींना ऋतू बदलाचा पण त्रास होतो. या बदलाच्या काळात काहींना आरोग्याशी संबंधित समस्या येऊ शकतात. पण त्यात ऋतूंचा दोष नसतो. आपली प्रत्येकाची प्रकृती भिन्न असते. त्या नुसार आपल्याला त्रास होतात. पण आपण आहार, विहार, विश्रांती, यात ऋतू प्रमाणे बदल करुन कधी आवश्यक ती औषध योजना करुन हे त्रास, आजार नियंत्रित करु शकतो. परंतू या कोणत्याही ऋतूंची निंदा करणे योग्य नाही.
आपण निसर्गा कडे बघितले की निसर्ग प्रत्येक ऋतुशी कसे जमवून घेतो, पशुपक्षी कसे जमवून घेऊन राहतात हे समजते. आणि कोणत्याही परिस्थितीत आनंदी कसे रहायचे हे शिकवतात. एक माणूसच असा आहे की आनंद शोधण्या पेक्षा दु:ख शोधत रहातो. आपल्याला जर कोणी आठवणी विचारल्या किंवा लिहायला सांगितल्या तर आनंदी प्रसंग फार कमी समोर येतात. आणि अवघड, दुःखाचे प्रसंग जास्त आठवतात. ही सवय जर आपण बदलू शकलो तर आपण कायम आनंदात राहू शकतो. हेच ऋतूंच्या विषयी करायचे. प्रत्येक ऋतुतील आनंद शोधायचा. आयुर्वेदिक औषधे देणाऱ्यांना या ऋतूंचे खूप महत्व असते. आपली संस्कृती, आपले सण समारंभ बघितले तर त्यात निसर्गाचेच पूजन दिसते. आपल्या पूर्वजांनी सगळे सण व त्यातील आहार, पूजा, व्रते त्या त्या ऋतू नुसार ठरवलेली होती. ऋतू बदलतात म्हणून तर आपल्याला विविध फळे, फुले यांचा आस्वाद घेता येतो. आणि अनेक प्रकारची धान्ये, भाज्या मिळतात. हा सर्व विचार करून विविधता देणाऱ्या ऋतूंचा सन्मान करु या. आणि या ऋतूंची निंदा बंद करु या.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.
९/११/२०२४
सांगवी, पुणे
– ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈