मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतेचा सोपा अर्थ… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ गीतेचा सोपा अर्थ… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत “मोह” म्हटले आहे.

जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत “लोभ” म्हटले आहे.

कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो, त्याला गीतेत ” ईर्षा” म्हटले आहे.

काही वेळेस कुल्फी संपण्याच्या आधीच कुल्फी कशी खायची असते, हे न समजल्याने दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते, त्याला गीतेत ” क्रोध” म्हटले आहे.

झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात, त्याला गीतेत “आळस”असे म्हटले आहे.

हॉटेलमध्ये भोजन झाल्यावर, ओंजळभर बडीशेप व साखर खातो, त्याला गीतेमध्ये,

“भिकारी”पणाचे लक्षण म्हटले आहे.

बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पहाणे, ह्याला गीतेत “भय” म्हटले आहे.

व्हाॅटस् अपवर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहणे किंवा फेसबूकवर एखादी पोस्ट टाकली तर त्याला किती लाईक्स मिळाले, हे सतत पहात रहाणे, ह्याला गीतेत “उतावळेपण” म्हटले आहे.

पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी, “साधी पुरी, कधी मसाला पुरी, कधी गोड पुरी दे रे, भैय्या,” असे म्हणतो, त्याला गीतेत “शोषण ” म्हटले आहे.

फ्रुटी पिऊन झाल्यानंतरही स्ट्राॕने शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणे, ह्याला गीतेत ” मृगतृष्णा” म्हटले आहे.

चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे, ह्याला गीतेत “अक्षम्य अपराध ” असे म्हटले आहे.

जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा जिलेबी वाढणारा येत आहे, हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन आणि अख्खी जिलेबी तोंडांत कोंबून आणखी जिलब्या ताटात वाढून घेतो, त्याला गीतेत “छळवाद” असे म्हटले आहे.

ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे ” मोक्ष.”

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ न सांगितले गेलेले छत्रपती… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ न सांगितले गेलेले छत्रपती… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

न सांगितले गेलेले छत्रपती…!!!

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात….!

1.अफजलखानाचा कोथळा 

2.शाहीस्तेखानाची बोटे आणि

3.आग्र्याहून सुटका

पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील….!

१. आपल्या आईला, जिजाऊ माँसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!

२. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे”लोकपालक” राजे होते…!

३. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे”उत्तम प्रशासक” होते…!

४. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे “पर्यावरण रक्षक” होते…!

५. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती. तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे “स्व-धर्मचिकित्सक” होते …!

६. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून  “अंधश्रध्दा निर्मूलनाचा संदेश देणारे  चिकित्सक राजे होते. !

७. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! “जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय !!

८. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे  १०० हून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, “उत्तम अभियंते राजे” !

९. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे !!

१०. परस्त्री मातेसमान मानत महिलांना  सन्मानाने वागवणारे ” मातृभक्त, नारीरक्षक ” छत्रपती शिवराय ! 

११. संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्री नर्तिका नाचवली गेली नाही, की मद्याचे प्यालेही रिचवले गेले नाहीत. !

— खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते.  कारण ते धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते, आणि  हीच खरी शिवशाही होती…..!

जय जिजाऊ जय शिवराय 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सावित्री…” श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ “सावित्री…” श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सावित्री ही राजकन्या. अत्यंत सुंदर अत्यंत गुणवान तितकीच बुद्धिमान सुद्धा. तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती अशी पसरली असते की तिच्याशी विवाह करण्याचे प्रस्ताव देव सुद्धा नाकारतात, ते पण या भीतीने की आपण तिच्याशी विवाह करण्यास पात्र नाहीत म्हणून.

अश्या सावित्रीचा जीव सत्यवानावर जडतो. सत्यवानाचे वडील हे राजे असतात, परंतु त्यांचे राज्य हरण होते. त्यांना अंधत्व येते आणि आता सत्यवान लाकडे तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. अश्या सत्यवानाशी विवाह करायचे सावित्री ठरवते. नारदमुनी तिला त्याचे आयुष्य लग्नाच्या नंतर एकच वर्ष आहे या शापाची पूर्वकल्पना देतात, तरीही ती अविचल राहते आणि त्याच्याशीच विवाह करते.

इथे एक पराकोटीची बुद्धिमान आणि सुंदर राजकन्या, जिची अभिलाषा देवांना सुद्धा आहे आणि त्याच वेळी आपण तिच्या पात्रतेचे नाहीत याची कल्पना असल्याने ते तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात, हे दोन्ही सत्य समजून घ्या.. 

त्यानंतर तिला सत्यवान आवडतो आणि ती त्याला वरते. इथे मुलीला स्वतःचा वर निवडण्याची मुभा होती हे सुस्पष्ट होते. आज सुद्धा जिथे ऑनर किलिंग होतात तिथे हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. 

जुन्या काळात बऱ्याचदा असा प्रश्न येत असे. तुम्हाला बुद्धिमान पुत्र हवा असेल तर अल्पायु असेल. मंदबुद्धी चालणार असेल तर दीर्घायू होईल. त्याचप्रमाणे सावित्रीच्या समोरही प्रश्न निर्माण होतो. तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे तिचा विवाह अशक्य होऊन बसलेला असतो. त्यावेळी सत्यवान आवडला आहे, पण तो अल्पायु आहे हे समजते. 

परंतु अल्पकाळ का होईना आपल्याला मनोवांच्छित पतीचा सहवास प्राप्त होईल म्हणून सावित्री त्याच्याशी लग्न करते. त्यात तिची गुणग्राहकता दिसते आहे. 

नंतर यम ज्यावेळी त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो, तेव्हा ती त्याच्याशी शास्त्रार्थ करते आणि त्याच्याकडून तीन वरदान मिळवते. यमाशी शास्त्रार्थ करणारे फक्त दोनच जण आहेत :  एक नचिकेता आणि दुसरी सावित्री ( एक स्त्री आणि एक बालक. आपण या दोघांना सुद्धा अजाण समजतो ). 

ती पहिल्या वरदानात सासऱ्याच्यासाठी नेत्र मागते. दुसऱ्या  वरदानात त्याचे राज्य मागते आणि तिसऱ्या वरदानात पती मागून घेते. 

ती पहिल्यांदा आपल्या कुलाच्या हिताचा विचार करते. यमाने तिला पुढील वरदान दिले नसते तर तिचे सहगमन झाले असते. मग त्या दोघांच्या पश्चात वृद्ध आणि अंध सासऱ्याला नेत्र मिळणे आवश्यक , राज्य मिळणे आवश्यक, इतका विवेक तिचा त्याक्षणी सुद्धा जागा असतो. 

सावित्रीची ही बुद्धिमत्ता आणि आपल्या कुलाप्रती असणारा समर्पण भाव हा आजच्या तरुणींनी आत्मसात करण्याच्या सारखी गोष्ट आहे.

आपल्याला आवडलेला पुरुषच पती म्हणून निवडणे आणि त्याच्यासह संसार करण्याच्यासाठी साक्षात मृत्यूशी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावून शास्त्रार्थ करण्याचे धाडस आणि बुद्धिमत्ता असणारी स्त्री, म्हणून सुद्धा आपण सावित्रीकडे पाहू शकतो. 

राजकन्या असणारी सावित्री आपल्या वडिलांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा घेऊ शकली असती. परंतु ती मदत स्वीकारत नाही. नवऱ्याच्यासह झोपडीत सुखाने संसार करते. आपल्या आवडत्या पुरुषाच्यासाठी तडजोड करणे ती स्वीकारते, पण मनाविरुद्ध आणि गुणहीन असा नवरा स्वीकारत नाही. तिचा स्वाभिमानी स्वभाव हा गुण सुद्धा आत्मसात करण्याच्या सारखा आहे. 

आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याच्या परिणामांची सुद्धा संपूर्ण जबाबदारी घेणे, समोर आलेल्या परिस्थितीसमोर हतबल होऊन हातपाय न गाळता आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्या समस्येवर मात करणे, हे एक व्यक्ती म्हणून सावित्रीचा विकास किती परिपूर्ण झाला आहे याचे निदर्शक आहे. 

जर वटसावित्रीची आपण पूजा करणार असलो तर प्रत्येक स्त्रीला या कथेतील हा सगळा भाग ज्ञात असणे आवश्यक आहे. या कथेतून यमाच्या तावडीतून नवऱ्याला सोडवून आणणे हा भाग गौण आहे. एक व्यक्ती म्हणून आयुष्यातील सगळे निर्णय स्वतः घेणे, त्याच्या परिणामांची कल्पना असूनही आपल्या तत्वांशी तडजोड न करणे, आणि ज्यावेळी सर्वस्व पणाला लावायची वेळ येईल त्यावेळी त्या पातळीवरील त्यागाच्या साठी सुद्धा उद्युक्त असणे, हे दैवी गुण ही कथा आपल्याला आत्मसात करायला प्रेरित करते.

ही कथा प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला, असे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून सांगितली पाहिजे. ही कथा प्रत्येक पुरुषाने आपल्याला सावित्रीसारखी गुणवान पत्नी हवी असेल तर आपल्याला सुद्धा तितके चांगले लोकोत्तर गुण आत्मसात करायला हवे हे ध्यानात घेण्यासाठी वाचली पाहिजे.  

यातील स्त्रीचे शोषण आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व शोधून काढणारे लोक महान आहेत.

लेखक : श्री सुजीत भोगले.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘स्पर्शाचं महाभारत.!’ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘स्पर्शाचं महाभारत.!’  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?

…आठवतं का?

 

बर्‍याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.

अंधशाळेच्या प्रिन्सिपल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि

त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचं सुंदर मिश्रण होतं त्यात..

नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम.

शबाना आजमी प्रिन्सिपल  आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..

हे सगळं आठवायला एक कारण घडलं.

काल-परवा

आपलं माणूस 

हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!

नाना आणि सुमित राघवन..

त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमितला बोलता-बोलता

विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतांस?

कधी आउटिंगला?

बाहेर जेवायला?”

सुमित गप्प…

इथपर्यंत ठीक..

पण नंतर नाना सुमितला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्‍याला?”

आणि अंगावर सरसरून काटा आला..

नाना पुढे म्हणतात,

“एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे स्पर्श करत नाही,ही साधी गोष्ट नाही.” हा तर पुढचा कहर..

 

किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो,  पण खरंच स्पर्श टाळतो का?

आणि

तो खरंच इतका महत्वाचा असतो?

आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण?

 

खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक.

स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..

 

लहानशी गोष्ट. स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..

पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय?

 

आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो?

आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात!

उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..

दिवाळीत आंघोळीआधी,

पाडव्याला आईने,

भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श..

तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला.

रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित..

 

ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श..

 

लग्नात लज्जा होमाच्या वेळी, एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श..

 

स्पर्श लाजरे असतात, बुजरेअसतात..

मायेने ओथंबलेले असतात कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात, पण ते बोलतात..

 

पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…

 

आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी कदाचित नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..

 

स्पर्श रेशमी असतात..

जाडेभरडे असतात..

आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..

 

आज माझी आई सत्तरीच्या  पुढे

आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टीव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते,“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत

कितीतरी देवाण-घेवाण करते..

 

स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी

एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बाद दिली जाते, तशीच दसर्‍याला सुद्धा गळाभेट असतेच की.

पाश्चात्य संस्कृती मध्ये

शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही

परिचयाची, भेटीची पद्धत.

इथेही स्पर्श महत्त्वाचा..

 

का असेल स्पर्श महत्त्वाचा?

मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात..

हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..

मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.

आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..?

म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला?”

 

लक्षातच येत नाही आपल्याला..

हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं

काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत..

ती आपली गोष्ट सांगत राहतात .

कुठे तरी, कोणाचे तरी,

हात ताटकळतात..

डोक्यावरून फिरण्यासाठी.,

कुणाचेतरी तळवे,

कोमेजून जातात तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..

सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसुसते, नातवांनी ओढून पाहावी म्हणून..,

पण वेळ नसतो ना आपल्याकडे.

पैसा असतो,

टीव्ही असतो,

गाड्या, घोडे सगळ काही आहे.

पण, पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “जेवलीस का गं ?” असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसलो आहोत आपण…!

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

बालपण सारखं पायात कडमडतं . वय वाढत. तिथच बिघडत.  मनाला मी पणाची चाहूल लागते.  मग सुरू होतो डाव रडीचा.  हे माझं . ते माझं . तेव्हा सुटते सुसाट धावत मनाची कोती हाव.  मग चक्रावत डोकं. ते सिद्ध करण्यासाठी.  सगळं मलाच हवं.  माझं ही आणि दुस-याच ही. का कुणास ठाऊक हा अचानक झालेला बदल मनात घर करून बसतो आणि मरे पर्यंत तिथेच वस्तिला रहातो.  त्याचा छळ सोसत जगताना वर्तनावर अनेकानेक बंधन लादावी लागतात. अंगावर पडणा-या जबाबदा-या ही त्याच अनुषंगाने पारपाडल्या जातात. मनातलीआपुलकीची भावना नकळत कुठे परागंदा होते ते कळतच नाही. आत्मकेंद्री बनताना आवडलेल्या सगळ्यांनाच दूर लोटाव लागत.

आपलं अस्तित्त्व अबाधित राखण्यासाठी. असा कुठला चमत्कार हे सारं घडवत असतो आणि आपणही त्याला खुशाल दुजोरा देत जातो . दुस-याला कमी लेखत आपलं मोठेपण सिद्ध करण्यातच आपण आपल्याला धन्यमानतो. अनुभवलेल्या अप्रतिम अनुभवांवर विरजण टाकून मोकळे होतो.  का? कशासाठी? पुनः प्रत्यय सोडा त्याची अनुभूती ही क्षीण होत जाते.  हळूहळू लोपत जातं भोगलेल , आवडलेल, जगण्याच्या रबाडग्यात कायमचं.

असं करताना आपण ,आपणच निर्माण केलेल्या एका भ्रामक भावविश्वत भ्रमिष्ट होऊन वारत असतो. तेलंघाण्याच्या बैला सारख. तिथं वाटत सगळं आपलंच आहे. आपणच राजे आपल्या विश्वाचे. पण हे लक्षात येतनाही आपल्या. आपण कमावलेली एखादी गोष्ट हरवली तर ती आपण परत मिळवू शकतो पण जे देवाने आणि दैवाने  दिलेलं असतं ते हरवलं तर उभ्या जन्मात परत मिळवू शकत नाही. जीवनात स्थिरावण्यासाठी कल्पकता, कष्ट, संघर्ष , सत्ता मग उपभोग हे सार लचांड सांभाळता सांभाळता अमाप झिजून झाल्यावर मावळणारा उत्साह आणि थकलेले शरीर भेडसावत असते. जप स्वतःला नाही तर अचानक बला यायची वाट्याला. मग घाबरगुंडी जीवाची आणि धावपळ देहाची.  कपात काळाची.  अनवरत इच्छा ध्येय गाठायची.  या सा-यांचा ताळमेळ बसवताना  संधीच मिळत नाही उपभोग घेण्याची.

हस्य हुश्य करत मग आठवण जुन्या लाघवी मनसोक्त जगलेल्या जीवनाची. हातात असतंच काय त्यांच्या शिवाय. म्हणून आठवणीची साठवण होते पुनरपी दर्शन नाही. 

हे कळत फार उशीरा. संधी निघून गेल्यावर हातातून . वाटत हा शाप भोवतोका प्रत्येक जीवाला. का अहं पणाच्या प्रभावाखाली स्वतःला सिद्ध करण्यासाठी उडताना आपल्या पेक्षा आकाशात उंच उडत गेलेल्या असंख्य गरुडांच विस्मरण कसं होतं आपल्याला. याची जाणीव झाल्यावरच आपण म्हणतो आत्मपरीक्षण करतोय.

कशासाठी ? उपयोग काय त्याचा ?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – ऋभु (देव / देवांची देवता)

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील विसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी ऋभु या देव / देवांच्या देवतेला  आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त ऋभुसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद

अ॒यं दे॒वाय॒ जन्म॑ने॒ स्तोमो॒ विप्रे॑भिरास॒या । अका॑रि रत्न॒धात॑मः ॥ १ ॥

जननाच्या क्लेशापासुनिया ज्या देवा ना मुक्ती

त्यांच्यासाठी अपुल्या कंठे पंडित स्तोत्रे गाती

या स्तवनांनी प्रसन्न होउनी आशिष देती देव

त्यांच्या योगे ऋत्विजांना प्राप्त होई वैभव ||१||

य इंद्रा॑य वचो॒युजा॑ तत॒क्षुर्मन॑सा॒ हरी॑ । शमी॑भिर्य॒ज्ञमा॑शत ॥ २ ॥

या देवांनी इंद्रासाठी केली अश्व निर्मिती

आज्ञा करिता सेवेसाठी स्वतःहुनी येती

अद्भुत कर्मांनी आपुल्या सन्माना पात्र

आवाहन हे सार्थ करावे हे अमुचे होत्र ||२|| 

तक्ष॒न्नास॑त्याभ्यां॒ परि॑ज्मानं सु॒खं रथं॑ । तक्ष॑न्धे॒नुं स॑ब॒र्दुघा॑म् ॥ ३ ॥

यांनी निर्मिला अश्वीदेवांसाठी दिव्य शकट

अतिसुखदायी सहजी करतो संचार सर्वत्र

साकारली अश्वीदेवांस्तव धेनू बहूगुणी

क्षुधा नि तृष्णा निवारीतसे क्षीर मधुर देऊनी ||३||

युवा॑ना पि॒तरा॒ पुनः॑ स॒त्यम॑न्त्रा ऋजू॒यवः॑ । ऋ॒भवो॑ वि॒ष्ट्यक्रत ॥ ४ ॥

निर्व्याज अश्या वृत्तीची कीर्ति ऋभू देवाची

मातपित्यासी अर्पियली दक्षीणा तारुण्याची 

अपुल्या भक्तांच्यासाठी ते कनवाळू असती

प्रार्थनेसिया प्रसन्न होऊनी दान फलाचे करिती ||४||

सं वो॒ मदा॑सो अग्म॒तेन्द्रे॑ण च म॒रुत्व॑ता । आ॒दि॒त्येभि॑श्च॒ राज॑भिः ॥ ५ ॥

वैभवमंडित आदित्यासह देवराज इंद्र

मरुद्गणासह सिद्ध जाहले रथीं होऊनी स्वार

त्यांच्या संगे सहभागाचा मूर्तिमंत आनंद 

सत्वर येउनी आम्हा देती ऋभू किती आमोद ||५||

उ॒त त्यं च॑म॒सं नवं॒ त्वष्टु॑र्दे॒वस्य॒ निष्कृ॑तम् । अक॑र्त च॒तुरः॒ पुनः॑ ॥ ६ ॥

त्वष्टादेवाने निर्मिले दिव्य सोमपात्र 

तयात सारे साठविती ठेवूनी सोमरस

ऋभूदेवाने तया पासूनी केले चार चमस

अशी अलौकिक कर्मे त्यांची असती ज्ञात आम्हास ||६||

ते नो॒ रत्ना॑नि धत्तन॒ त्रिरा साप्ता॑नि सुन्व॒ते । एक॑मेकं सुश॒स्तिभिः॑ ॥ ७ ॥

वर्णन करण्या तुमचे शौर्य आम्ही वाचाहीन

तुम्ही इतुके चंडप्रतापी तुमच्या पायी लीन

एकवीस भक्तां प्रत्येकी एक रत्न हो द्यावे 

उत्तम तुमचे आशीर्वच देवा आम्हाला द्यावे ||७|| 

अधा॑रयन्त॒ वह्न॒योऽ॑भजन्त सुकृ॒त्यया॑ । भा॒गं दे॒वेषु॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ८ ॥

अपुल्या श्रेष्ठत्वाने यांसी प्राप्त थोर मान 

समस्त देवांसम यांनाही यज्ञी मिळतो मान

अर्पण केला आम्ही त्यांना हविर्भाग त्यांचा

स्वीकारुनिया त्यासी त्यांनी मान राखिला अमुचा ||८||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे… 

https://youtu.be/QyH4F4zpSNI )

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आदरणीय छ.शिवाजी महाराज… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ आदरणीय छ.शिवाजी महाराज… ☆ सौ राधिका भांडारकर 

आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज,

यांना सविनय दंडवत..

राजा कसा असावा? हा प्रश्न जगात कुणालाही विचारला तर त्याचे उत्तर एकच,” राजा असावा तर शिवाजी सारखा”.

महाराज ! नुसत्या आपल्या नामोच्चाराने आम्ही रोमांचित होतो!  शिवरायासारखा एक जाणता राजा या देशात, महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला, आणि त्याने कधीही विसर न पडणाऱ्या पराक्रमाचा, संस्काराचा, नैतिकतेचा, महान इतिहास घडवला, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहेच.

व्हिएतनाम आणि अमेरिकेत वीस वर्षे युद्ध चालले. अमेरिकेला वाटत होते की या देशाला नष्ट करण्यासाठी अगदीच थोडा वेळ लागेल.  पण युद्ध लांबले.  अमेरिकेस माघार घ्यावी लागली.  व्हिएतनामचा  विजय झाला. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्या राष्ट्रपतींना त्यांच्या विजयाचे रहस्य विचारले असता, ते उत्तरले,

“युद्धकाळात हिंदुस्थानातील एका शूर राजाचे चरित्र माझ्या हाती आले.  त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच आम्ही युद्धनीती ठरवली.  आणि ती ठामपणे राबवली.  आणि आम्ही विजयी झालो.”

पत्रकारांनी विचारले,” तो हिंदुस्थानी राजा कोण?”

राष्ट्रपती उत्तरले, “ छत्रपती शिवाजी महाराज.  हा महापुरुष आमच्या देशात जन्माला आला असता तर आज आम्ही जगावर राज्य केले असते.”

याच राष्ट्रपतींनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी आपली अंतिम इच्छा लिहून ठेवली होती की, 

“माझ्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे”

 “छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा समाधीस्थ झाला!”

 आणि आजही त्यांच्या कबरीवर हे वाक्य वाचायला मिळते.

महाराज असे तुम्ही!  जगाचे आदर्श राजे. आपल्याबद्दल म्या पामराने काय आणि किती बोलावे?

शिव म्हणजे पावित्र्य, मांगल्य, सौंदर्य आणि शक्तीही. आपल्या नावानेच आमचे हृदय उचंबळते. 

पण महाराज आज या पत्राच्या निमित्ताने, एक खेदही व्यक्त करावसा वाटतोय् . आज कुठेतरी आपल्या ऐतिहासिक नावाचा, आदर्शाचा, पराक्रमाचा केवळ दुरुपयोग केला जातोय.  स्वार्थी माणसे निमित्त साधून भांडणे, दंगली माजवतात.  झुरळ मारायचीही शक्ती नसलेली ही माणसे, केवळ मतांसाठी छाती फुगवून, “आम्ही शिवरायांचे वंशज आहोत!” अशा आरोळ्या ठोकतात.  याचे प्रचंड दुःख होते.  मान खाली जाते. लाज वाटते.

महाराज ! या अशा रणछोडदासांसाठी मी आपली नम्रपणे क्षमा मागते. आणि यांना सद्बुद्धी दे अशी प्रार्थनाही करते. शिवाजीचे वंशज म्हणून त्यांना खरोखरच अभिमान असेल तर त्यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास करावा. लोकनेता कसा असावा याचे ज्ञान मिळवावे.

आपली,

 प्रयत्नपूर्वक आपले आदर्श जपणारी कुणी एक…

 

राधिका भांडारकर

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंद… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ आनंद ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

मी पेपर उघडला.

त्यात  मीच दिलेली

जाहिरात होती-

‘हरवला आहे .. “आनंद “

पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद …

 

रंग … दिसेल तो

उंची ..भासेल ती

 

कपडे सुखाचे

बटण  दुःखाचे

 

कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून

थकलो आहोत सगळीकडे शोधून

 

“आनंदा,परत ये.

कुणीही तुझ्यावर रागवणार नाही

तुझ्यावर  कसलीही सक्ती करणार नाही

 

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट

दार उघडं ठेवलंय

 वाढून ठेवलंय आशेचं  ताट”

 

शोधून आणणाऱ्याला दिलं  जाईल इनाम’

मग म्हटलं आपणच करावं हे  काम

 

काय आश्चर्य ..

सापडला की गुलाम ..

 

एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड

एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड

 

आठवणींच्या मोरपिसात

अगरबत्तीच्या मंद वासात

 

मोगऱ्याच्या  मखमली स्पर्शात …

अवेळी येणाऱ्या पावसात

 

त्यानेच मारला पाठीत धप्पा

जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा

 

मी म्हटलं अरे , इथेच होतास ,

उगाच दिली  मी जाहिरात

तो म्हणाला

वेडी असता तुम्ही माणसं

बाहेर शोधता .. . मी असतो तुमच्याच मनात … !

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ शिलाई यंत्र… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ शिलाई यंत्र… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

प्रतिकुलतेच्या सुईने तिच्या हाताच्या बोटांनां कितीतरी वेळा टोचलं, जखमातून रक्ताची थेंबा थेंबाने ठिपक्यांची रांगोळी निघाली, टोचले बोटांना पण कळ निघाली हृदयातून, स्स स्स चा आवाजाची कंपनं उमटली, तरीही तिनं शिवण सोडलं नाही. मायेचा दोरा वापरून हाती घेतलेलं शिवणाचं काम ती पूर्णत्त्वाला नेल्याशिवाय तिला फुरसत ती नसायची. शिलाई तर किती मिळायची म्हणता चार आणे. ती देखिल लोक त्यावेळी रोखीने फारच कमी देत असत. अन पहिला कपडा उधारीवर शिवून घेऊन दुसऱ्यावेळेला शिलाईचे निम्मेच पैसे हातावर ठेवले जायचे..ती पहिली उधारी कधीच वसुल न होणारी असे… कधी मधी मागुन बघितले तर असू दे या वेळेला ,पुढच्या वेळेला सगळी उधारी चुकती करु बरं.. जरा अधिक ताणून धरलं तर, आम्ही काय कुठं पळून जाणार आहे का तुझी शिलाई बुडवून?.. विश्वास नसेल तर राहू दे आम्ही दुसऱ्या शिंप्याकडं कापडं टाकतो.. तुझी भीडभिकंची भन नकोच ती… असा कांगावा आणि वर असायचा. जरा खर्जातला आवाजाने सगळी गल्ली गोळा व्हायची नि ते बघून आणखी चार गिर्हाईकं न बोलताच पसार होत असं… बुडलेली पहिली उधारी भुतालाच जमा होत असे… सकाळ पासून मशीनला मारलेलं पायडलं एकदा दुपारच्या नि रातच्या जेवणाला जरासं ईस्वाटा घ्यायचं.. ते रात्रीचं साडे अकराच्या दरम्यान चिमणीतलं तेलं संपल गेल्यानं घरात मिटृ अंधार पडल्यावरच त्या दिवसाला थांबायचं… मग भूईला पाट टेकली जाईची. सणावारचं तर उसंत ती कसली मिळायची नाही.. कधी कधी वादीच कंटाळून तुटायची तर कधी दोऱ्याची बाॅबीन सारखी निखळून पडायची.. घरात दारिद्र्याचा जाजम कायम अंथरलेला असायचा… कमावता हात एक दादल्याचा असे पण तुटपुंजी मिळकत खर्चाच्या फाटक्या खिशातून घरी येई पर्यंत गळून गेलेली असे…देणेकऱ्यांचं तोरण तर दाराच्या आड्याला कायमच लावून ठेवलं असायचं…ते कधीच उतरलं नाही…चार कच्चीबच्ची आणि मोठी दोन पोटाची खळगी पाठीलाच चिकटलेली…वितभरच्या पोटाला क्षुधाशांतीचा शापच होता जणू..अंगभर लेयाला कपडाच लाजायचा. जर्मनच्या पातेल्यात भात नसलेली पेजेचं पाणी खवळलेल्या भुकेला नुसत्या वासानंचं पोट भरल्याचा आभास वाटायचा… एका हाताची मिळकत पुरत नसायची महणून तिनं आपलं किडूक मिडूक चवलीच्या दामाला आणि सावकाराकडं गहाणवटं ठेवलं आयुष्याच्या काबाडकष्टाला नि शिलाई मशीन आणलंच एकदा चंद्रमौळीत झोपडीला.. जिद्दीचा दिवा आशेचा प्रकाश तिला दाखवत गेला.. हळूहळू शिलाईत जम बसू लागला..बऱ्यापैकी चार पैसे हाती आले नि सुखाच्या झुळूकेने घर हरकले..सावकाराचा जाच संपला. एकाला दोन तर दोनाची चार शिलाई मशीनची संख्या वाढत चालली..कपडे शिवून देण्याचं कंत्राट वर कंत्राट मिळत गेली… पसारा वाढला जागा अपूरी पडू लागली .तिने आता स्व:ताची फॅक्टरी उभा केली..अख्ख घरच मदतीला धावून आलं… गावात नगरात तिचं नाव रुपाला आलं.. चार गरजू बायांना रोजगार मिळाला.. मेहनतीला एक दिवस यशस्वी महिला उद्योगक्षेत्रातला पुरस्कार लाभला… तिने तो मानसन्मान आणि पुरस्कार त्या तिच्या पहिल्या वहिल्या शिलाई मशीनलाच अर्पण केला… आता ते मशीन काचेच्या कपाटात चकचकीत करुन ठेवलेलं असतयं.. फॅक्टरीच्या दर्शनी भागात दिमाखात मंदस्मित करत उभं असतयं..त्याला रोजचं पहिलं वंदन करूनच ती फॅक्टरीत प्रवेश करत असते… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “काम छोटं, महत्व मोठं…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “काम छोटं, महत्व मोठं…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सरासरी बघता  माणूस आपापल्या क्षेत्रात दिवसभर काबाडकष्ट करीत असतो, मग कधी तो आपल्या दैनंदिन गरजा भागेल इतपत कमावतो तर कधी थोडंफार पुरुन उरेल इतकं. अगदी बोटावर मोजण्याइतक्या व्यक्ती ह्या भरघोस कमावतात अगदी पोटभर पुरुन त्याहूनही कितीतरी पट जास्त उरेल इतकं.

वेगवेगळ्या व्यक्तींच्या कमाईत फरक असला तरी एक गोष्ट मात्र काँमन असते,ती म्हणजे हे कमवायला माणसाला भरपूर कष्ट मात्र घ्यावेच लागतात. कष्ट, मेहनत ह्या गोष्टी म्हणजे जसं अन्नामध्ये मिठाचं महत्त्व असतं तसं जीवनात ह्याचं महत्त्व. आणि ह्याच अपार कष्टानंतर खायला कोंडा आणि उशाला धोंडा असेल तरी निद्रादेवी मात्र कायम प्रसन्न असते.

प्रत्येक व्यक्ती ही भरपूर कामं करीत असली तरी प्रत्येक व्यक्तीच्या कामाकामांत फरक हा असतोच.त्याच्या काम करण्याच्या पद्धती, काम करण्याचा कालावधी, कामाचा दर्जा ह्यामध्ये विवीधता ही आढळतेच. काही व्यक्ती प्रचंड कष्ट, कामे करतात पण त्यांच्या कामात निगुती नसते तर काहींच कामं हे अतिशय मोजकं असतं पण त्यांनी केलं की दुसऱ्या ला परत त्या कामाकडे वळून बघावं लागतं नाही इतकं ते परिपूर्ण असतं. काही व्यक्ती ह्या घरातील कामांमध्ये तरबेज तर काही घराबाहेरील कक्षेत असलेल्या कामांमध्ये पटाईत.

ह्या कामाबद्दलची एक छोटीशी पण मस्त पोस्ट वाचनात आली. कालनिर्णय ह्या दिनदर्शिकेच्या मागील पानावर छापलेली आहे. “छोट्या कामांच मोठ महत्त्व” असं शिर्षक असलेली . एक मस्त वाचनीय पोस्ट.

काम हे सुद्धा आपण बघूनबघून अनुभवातून शिकतो.चांगल,उत्कृष्ट कामाची नोंद आपला प्रत्येकाचा मेंदू ताबडतोब घेत असतोच,प्रश्न असतो तो आपल्या स्वतः च्या आळसामुळे त्यावर अंमलबजावणी न करण्याचा. असो

कामाचा उरकं, शाळेत एकही लेटमार्क न होऊ देता सातत्याने कितीतरी वर्षे चारीठाव स्वयंपाक माझी आई सकाळी चारला उठून रांधायची.हे.सगळं आठवून खरंच आता समज आल्यावर आईच खूप कौतुक वाटतं. आमच्या अहो आईंकडुन कुठलही काम कस शेवटापर्यंत व्यवस्थित करता येतं हे बघतं आलेयं. बहीणी कडून ,नणंदे कडून कामाचा झपाटा बघत आलेयं.माझी बहीण तर आताची कमलाबाई ओगलेच जणू.कुठलाही पदार्थ चवीला तसेच दिसायला आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम ह्यात तिचा हातखंडा. बरेचदा आपण आपल्या कामाच्या ठिकाणी वा आजुबाजुला वावरणाऱ्या व्यवस्थित काम करणाऱ्या लोकांना आपोआप आपल्या निरीक्षणशक्तीने नजरेत टिपतो आणि मनोमन त्यांचं कौतुक ही वाटतं.

त्या कालनिर्णय मधील एक गोष्ट खूप भावली आणि पटली सुद्धा. त्यात सांगितलयं आपण सकाळी प्रथम उठल्याबरोबर जे पहिलं काम करतो,ते म्हणजे बिछान्यातून उठून तो आवरणे ,हे काम जर सर्वोत्तम निगुतीने जमलं तर दिवसभरातील सगळी कामं आपल्याकडून सकारात्मक भावाने सर्वोत्कृष्टच केल्या जातात. त्यामुळे उठल्याबरोबर प्रत्येकाने आपला बिछाना खूप छान,निटनेटका आवरून हा ठेवलाच पाहिजे. अर्थातच हा नियम काही व्यक्ती ह्या पाळतच असतील म्हणा. पण जे पाळत नसतील त्यांनी हा नियम तयार करुन त्याची काटेकोर अंमलबजावणी केल्यास खूप चांगला सकारात्मक फरक आपल्या आयुष्यात पडेल.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares