मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ – कवि श्री.राजा बढे… श्री समीर जावळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ – कवि श्री.राजा बढे… श्री समीर जावळे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

 ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गाण्याच्या जन्माची रंजक गोष्ट काय आहे? महाराष्ट्र गीत कसं जन्माला आलं?

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत आपण जेव्हा ऐकतो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. शाहीर साबळे यांचा पहाडी आवाज. त्यानंतर महाराष्ट्राचं यथार्थ वर्णन करणारे शब्द आणि उत्कृष्ट असं संगीत या सगळ्याचा मिलाफ म्हणजे हा पोवाडा किंवा हे महाराष्ट्र गीत. आजच या गीताविषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ

स्वतंत्र भारताची निर्मिती झाल्यानंतर मराठी भाषिकांचं राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. या चळवळीत १०७ हुतात्म्यांनी रक्त सांडलं. या हुतात्म्यांनी सांडलेल्या रक्तामुळे आणि चळवळीसाठी उभ्या केलेल्या कष्टामुळे महाराष्ट्राची निर्मिती झाली. साहित्यिक, विचावंत, राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते अशा सगळ्यांचाच या चळवळीत मोलाचा सहभाग होता. ब्रिटिश काळात राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली गेली होती. मात्र भाषावार प्रांतरचना झाली नव्हती. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी मुंबईसह महाराष्ट्राचा पहिला ठराव आचार्य अत्रे, डॉ. आर. डी भंडारे यांनी मांडला होता. प्रांतरचनेसाठी नेमलेल्या समितीने मात्र ही मागणी फेटाळली होती.

डिसेंबर १९५३ मध्ये फाजलअली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची नियुक्ती झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या वतीने एस.एम.जोशी, धनंजय गाडगीळांसह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. इ.स.१९५५ रोजी आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत तत्त्व सगळ्यांना सारखी लागू केलेली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. त्यानंतर या आयोगाविरोधात चळवळ उभी राहिली. या सगळ्या चळवळीनंतर आपल्याला मुंबईसह महाराष्ट्र मिळाला.

१ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. त्याच दिवशी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली होती. याच दिवशी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गाणं सर्वात आधी सादर झालं. राजा बढे यांचे शब्द, शाहीर साबळे यांचा आवाज आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत असा त्रिवेणी संगम या गाण्यासाठी जुळून आला. हे गाणं सादर झालं. ते लोकांच्या पसंतीस पडलं. त्यानंतर हे गाणं घराघरात पोहोचलं. महाराष्ट्र गीत म्हटलं की जय जय महाराष्ट्र माझा, हाच पोवाडा प्रत्येकाच्या ओठावर आला. मनात घर करून राहिला. आज त्याच गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. १९फेब्रुवारी २०२३ पासून म्हणजे शिवजयंतीपासून हे गीत महाराष्ट्र गीत म्हणून ओळखलं जाईल. 

शाहीर साबळेंचे नातू आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी काय आठवण सांगितली?

‘जय जय महाराष्ट्र माझा’ हा पोवाडा आणि ‘महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, माझे राष्ट्र महान’ दोन गीतं होती. त्यातलं ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणं लोकांना प्रचंड भावलं. कवी राजा बढे यांनी अवघ्या दीड दिवसात हे गाणं लिहिलं होतं. महाराष्ट्र गीत गाण्याचा प्रस्ताव आला तेव्हा बाबांना (शाहीर साबळे) यांना सुरुवातीला तो मंजूर नव्हता. कारण त्यावेळी त्यांच्या नाटकांचे प्रयोग मोठ्या प्रमाणावर सुरू होते. आपल्याऐवजी हे गाणं शाहीर अमर शेख यांनी गावं असं बाबांना वाटत होतं. कारण अण्णाभाऊ साठे, तसंच शाहीर अमर शेख यांचं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठं योगदान होतं. मात्र त्यावेळी जी राजकीय परिस्थिती होती त्यात बाबांना आग्रह करण्यात आला की, हे गाणं तुम्हीच गावं. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांची तालीम करून बाबांनी (शाहीर साबळे यांनी) हे गाणं बसवलं. १ मे १९६० ला हे गाणं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर गायलं होतं. ६३ वर्षांपासून हे गीत मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलं आहे.

लेखक – श्री समीर जावळे

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती :A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder} ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ वयपरत्वे लक्षविचलीत वृत्ती :A.A.A.D.D. {Age-Activated Attention Deficit Disorder} ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

आता ही वृत्ती म्हणजे काय ते माझ्याच उदाहरणाने पाहू या.

एकदा मी बागेला पाणी घालायचे ठरविले. रबरी नळी नळाला जोडून ती उलगडत बागेकडे जातांना माझं लक्ष माझ्या कारकडे गेलं आणि ठरवलं. कार धुवायला हवी.! 

म्हणून मी माझा मोर्चा गॅरेजकडे वळवला तोच माझं लक्ष जिन्याजवळच्या टपाल पेटीकडे गेलं.

म्हटलं आता आधी काय टपाल आलंय ते आधी पाहूया आणि मग कार धुवूया.!

टपालपेटीवर कारची चावी ठेवून, टपालपेटीतले सर्वच टपाल दोन्ही हातात घेऊन मी घरी आलो. सर्व पाकिटे एक एक करुन उघडीत, निरुपयोगी कचरापेटीत टाकायची पत्रे एका बाजूला टेबलावर ठेवली.

ती टेबलाखालच्या डब्यात टाकण्यासाठी बघतो तर तो डबा कागदपत्रांनी तुडूंब भरलेला.! 

मग टाकायची पत्रं टेबलावर ठेऊन तो डबा प्रथम कचराकुंडीत रिकामा करायला खाली जिन्याजवळ जायचं ठरवलं.

आता खाली जातोच आहे तर तिथे जवळच बिलांचे चेक टाकायची पेटी आहे, त्यात आताच चेक टाकावे असं ठरवलं.

चेक लिहायला घेतल्यावर एकच चेक शिल्लक असल्याचे कळले. दुसरे चेकबुक घ्यायला कपाटाकडे वळलो तर टेबलाकडे नजर गेली आणि बरेच दिवसांपासून शोधत होतो तो माझा वाचायचा चष्मा दिसला.

तो उचलून जागेवर ठेवणार, इतक्यात त्याच्याजवळ फ्रीजमध्ये ठेवायची पाण्याची बाटली  रिकामी पडलेली दिसली. 

तेव्हा आताच ती पाणी भरुन फ्रीजमध्ये टाकावी म्हणून उचलून मी स्वयंपाकघरात गेलो. तिथे ओट्यावर कुणी टी.व्ही. चा रीमोट ठेवला होता.

मनात विचार आला की संध्याकाळी टी.व्ही. लावतांना रीमोट कुठे आहे ते आठवणार नाही. तेव्हा आताच तो टिपाॅयवर ठेवावा. पण तत्पुर्वी बाटली पाण्याने भरावी. तेव्हढ्यात ती काचेची बाटली माझ्या हातातून सटकली आणि खाली लादीवर पडून फुटली.!

लादीवरचे काचेचे तुकडे गोळा करुन लादी पुसतांना विचार करायला लागलो.

मी बागेला पाणी घातलं नाही,

कार धुतली नाही,

डबा कचराकुंडीत रिकामा केला नाही,

बिलांचे चेक टाकले नाहीत,

वाचायचा चष्मा, रीमोट जागेवर ठेवले नाहीत,

कारची चावी कुठे ठेवली तेही आठवत नाही.!

माझा सगळा दिवस कामाच्या घाईगडबडीत गेला आणि माझी खूपच दमछाक झाली. तरी एकही काम धड झालं नाही, असं का.?

अशी धरसोड वृत्ती वयपरत्वे सर्वच व्यक्तींना येईल असे नाही. खालील गोष्टींचा अवलंब केल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

१. शारीरिक व मानसिक द्दष्टीने सक्रीय रहावे.

२. कामाचे नियोजन करावे. करावयाच्या कामांची यादी करुन कामांचा प्राधान्यक्रम लावावा. 

३. प्राधान्यक्रम लावतांना केवळ तातडीची कामेच नव्हे तर महत्वाची कामेही लक्षात घ्यावी.

४. खिशात/पर्समध्ये आणि घरात हाताशी मिळेल अशा जागी, एक छोटी वही व पेन ठेवावे आणि कधीकधी अचानकपणे एखादी गोष्ट करायची आहे ते डोक्यात येते, तेव्हाच त्याची नोंद करावी. कधीकधी अशा गोष्टीचे थोड्याच वेळात विस्मरण होते आणि आठवण्याचा खूप प्रयत्न करुनही अाठवत नाही, म्हणून मन अस्वस्थ होते.

५. एका वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करु नये. एकच काम हाती घेऊन, ते पूर्ण केल्याशिवाय दुसरे काम हाती न घेण्याची सवय करावी.

६. स्वयंशिस्त बाळगावी.

७. वय वाढते तसे ‘मन धावते,  पण शरीर धावू शकत नाही’ याचेही भान ठेवावे. शारीरिक हालचाली झेपतील अशाच गतीने कराव्या. 

८. सर्व कामे स्वतःच करण्याचा हट्ट धरु नये. काही कामे दुसऱ्या व्यक्तींवर सोपवावयास मनाची तयारी करावी. 

९. कामे उरकायची आहेत, हा विचार ताणतणाव निर्माण करतो. मात्र प्रत्येक काम करण्यातील आनंद घेत काम केल्यास वेळ मजेत जाईल. 

ध्यानधारणेचा मन स्थिर ठेवण्यास उपयोग करा.

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “तत्परता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

? विविधा ?

☆ “तत्परता…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

नवीन आलेले फोन, आणि त्यातले संदेश, फोटो, आणि ध्वनीचित्रफीत पाठवण्याचे तंत्र याला सलाम. तत्परता म्हणजे काय? हे फोन आणि WhatsApp मुळे समजते‌‌.

या फोनमुळे व WhatsApp मुळे आम्ही आमचे तारतम्य काही प्रमाणात सोडले असा आरडाओरडा सगळ्या घरांमध्ये, सगळ्या स्तरावर, (मजल्यावर) सगळ्या खोल्यातून, सगळ्या वेळी होत असला तरी आम्ही यांचे वापरणे  सोडलेले नाही.

घरात आणि बाहेर नम्रता (मान खाली ठेवणे) आज याच मुळे आहे. त्यामुळे आम्ही (बहुतेक वेळा) खालमानेनेच वावरतो. बऱ्याचदा आता मान वर करून बोलावे लागते, त्यासाठी पूर्वी (मान वर करून बोलण्याबद्दल) खूप वेळा काही ऐकावे लागत होते. आता अगोदर मान वर कर… असे सांगावे लागते.

अगदी म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात सुध्दा आमचे अंगठे सतत या फोनमुळे व्यस्त असतात. आजवर दाखवण्या व्यतिरीक्त इतर कामाला क्वचितच आलेला अंगठा आता बराच वेळ बिझी असतो. मी तर तो दाखवण्यापेक्षा जास्त वेळ बघितला असेल.

अहो तत्परता तत्परता तरी किती? म्हणजे सुरू असलेल्या कार्यक्रमात आम्ही जागा दिसेल तिथून व काढता येतील तसे फोटो आणि ध्वनीचित्रफीत काढून काही सेकंदाच्या अवधीत ते पाठवून आम्ही त्या कार्यक्रमात शरीराने हजर असल्याचे पुरावे देतो. (फक्त नेटवर्क का काय म्हणतात ते नीट वर्क करायला हवे.)

परवा एका कार्यक्रमात मी बसल्याजागी (उगाचच कार्यक्रम करणाऱ्यांना अडथळा नको) चोरुन काही फोटो काढले, आणि अवघ्या काही सेकंदाची ध्वनीचीत्रफीत करून बसल्या जागेवरुनच पाठवली. (खरे सांगायचे तर रंगमंचावरील लाईट आणि कलाकाराचा नीळा झब्बा इतकेच काय ते त्यात समजेल असे दिसत होते. चेहरा कोणाचा आहे हे सांगावे लागणार होते.) पण अवघ्या काही मिनिटांतच उत्तर म्हणून पाच सहा अंगठे, दोन चार टाळ्या वाजवणाऱ्या हाताची चित्र, पाच सहा वेगवेगळे चेहरे (यांना स्माईली म्हणतात), आणि एक दोन छान दिसतंय असा आशय दाखवणारी बोटं उत्तरात परत आली.

(छान दिसतंय असा आशय दाखवणाऱ्या बोटांच्या चित्राच आणि ते पाठवणाऱ्यांच मला विशेष कौतुक वाटते. कारण त्यांना छान म्हणायचे आहे का ध्यान म्हणायचे आहे हे आपल्याला समजून घ्यावे लागते. महाभारतातील नरो वा कुंजरो वा या नंतर याच बोटांच्या खुणेचा अर्थ गहन असेल… छान की ध्यान…असो.) किती ही तत्परता… पण त्यांचा रंगमंचावर आणि आमचा फोनवर कार्यक्रम सुरू होता.

अमेरिकेवर फिरणारा तो फुगा चीनचा आहे हे समजून घेऊन त्या बद्दल अमेरिकेने चीनला विचारुन चीनने उत्तर देण्याआधीच दुरदर्शन वरुन आमच्या मोबाईल मध्ये त्यांचे फोटो आणि ध्वनीचित्रफीत पाठवून झालेली असते, आणि आम्ही आता त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांची वाट पहात असतो. (अमेरिका आणि चीन सोडून) आता तो फुगा फुटला, किंवा फोडला, पाडला. तर आम्ही फुटलेल्या फुग्याचे फोटो पाठवले.

लग्न समारंभात वधू आणि वर यांनी एकमेकांना हार घातल्यानंतर (खरे तर त्यांनी हार पत्करल्यानंतर किंवा स्विकारल्यानंतर असे म्हणायचे होते.)  ते सगळ्यांच्या शुभेच्छा घेण्यासाठी मंचावर येण्या अगोदर त्यांचेच फोटो त्यांच्या मोबाईलवर आलेले असतात. (फक्त त्यावेळी त्यांना तेवढा वेळ नसल्याने ते बघत नाहीत. पण इतरांनी ते तत्परतेने पाठवलेले असतात.)

जन्मलेल्या बाळाचे आणि अखेरीस दिलेल्या गंगाजळाचे, वाढदिवसाच्या औक्षणाचे, काही गोड क्षणांचे, काढलेल्या जावळाचे, आणि पडलेल्या टक्कलाचे, आलेल्या दातांचे, आणि लावलेल्या कवळीचे, पदार्थांनी भरगच्च वाढलेल्या पानाचे, समुद्रातील स्नानाचे, झाडांचे, फुलांचे, खेळण्यात गुंग असलेल्या मुलांचे, अशा कोणत्याही प्रसंगाचे फोटो, चित्रण तत्परतेने पाठवायचे साधन.

पण यामुळे चांगले देखील बघायला, वाचायला, ऐकायला मिळते हे पण खरं आहे.

फक्त ते बघायची आणि इच्छा असल्यास पाठवायची तत्परता तुम्ही दाखवली पाहिजे…… बाकी उरलेलं तो तत्परतेने करतो.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जे गरीब आणि निराधार रूग्ण दवाखान्यात ऍडमिट आहेत आणि त्यांना जेवण आणून देणारे कोणीही नाही…. या जगात ज्यांचं आपलं म्हणावं, असं कोणीही नाही….. अशा सर्व गरीब रुग्णांना आमच्या “अन्नपूर्णा प्रकल्पामधून” आपण रोज डबे पुरवित आहोत. ….. श्री अमोल शेरेकर, या कष्टाळू दिव्यांग कुटुंबाकडून आपण डबे तयार करून घेत आहोत , आणि जिथे खरंच गरीब आणि गरजू रुग्ण आहे, अशांनाच आपण हे मोफत जेवणाचे डबे देत आहोत.  (सरसकट दिसेल त्याला आपण जेवण देत नाही) …. याचे संपूर्ण व्यवस्थापन डॉ मनीषा पाहत आहे. 

यांनाही आयुष्यात उभं करायचं आहे ….परंतु, भरल्या पोटाने दिलेला सल्ला, उपाशी पोटाला पचत नाही…!

… बघू प्रयत्न सुरू आहेत…! 

  • ज्यांच्याकडे चुली आहेत, परंतु शिधा नाही, अशा गोरगरीब आणि रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांना आपण शिधा पुरवित आहोत.  या महिन्यात जवळपास ३०० लोकांना दोन महिने पुरेल इतका शिधा आपण दिला आहे. 

यांना चिंता आहे ती भविष्याची… त्यांच्या मुलांची… ! 

मेल्यावर जाळते ती “चिता” आणि मरण्याअगोदर जाळते ती चिंता…! 

फरक फक्त एका टिंबाचा….!

  • जवळपास ६०० लोकांच्या रक्त, लघवी आणि इतर सर्व शारीरिक तपासण्या आपण रस्त्यावर आणि रेड क्रॉस हॉस्पिटल येथून करून घेतल्या आहेत. तपासण्याचे रिपोर्ट पाहून त्यांना त्याप्रमाणे वैद्यकीय सेवा रस्त्यावरच दिली आहे. .. मी त्यांना रस्त्यावर  “मोफत” दवा देतो…. ते मला “अनमोल” दुवा देतात… ! 

… इथेही फरक फक्त… उकाराचा…!  मी हा उकार घेवून मस्त जगतोय…. शप्पथ घेऊन सांगतो… मनशांती मिळवायची तर फक्त हा उकार महत्वाचा ! 

आपण आपल्या विचारात त्रस्त असतो तेव्हा असते ती “मनःस्थिती”…. दुसऱ्यांचा विचार करायला लागतो तेव्हा होते ती “नमःस्थिती ” …! 

… फक्त शब्दांची अदलाबदल करायची…? की विचारांची आणि वागण्याची??  हे ज्यानं त्यानं ठरवायचं ! 

  • रस्त्यावर पडलेले… एक्सीडेंट होऊन हात पाय मोडलेले… डोके फुटलेले…. दहा रुपयांसाठी मारामारी होऊन, भोसकाभोसकी झालेले, कॅन्सर, कावीळ झालेले असे बारा रुग्ण आपण या महिन्यात मॉडर्न हॉस्पिटल येथे ऍडमिट केले आणि या सर्वांचे जीव वाचले आहेत. 

… हे पुन्हा उठून उभे राहतील अशी आशा आहे…! 

सूर्यापासून एक शिकायचं असतं ….संध्याकाळी मावळलं तरी रोज सकाळी पुन्हा उगवायचं असतं ! 

  • कडाक्याच्या थंडीत जे गारठले आहेत, अशा रस्त्यावरच्या सर्वांना…. कान टोपी, स्वेटर, ब्लॅंकेट, घोंगडी देऊन झालं आहे. सौजन्य : डॉ राजेश केणी, गोवा.
  • आयुष्याच्या अंताला जे लागले आहेत… रस्त्यावर पडून आहेत…. असे आजी आजोबा, जग सोडून गेले तर बेवारस म्हणून नोंद होऊन ते जातील…. ना कुणाला खंत, ना कोणाला खेद ! मला हे मंजूर नाही !  आणि म्हणून, अशा अनेकांना या महिन्यात वेगवेगळ्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं आहे. जेव्हा ते जातील, तेव्हा किमान वृद्धाश्रमातून मला फोन येईल आणि आम्ही त्यांचे मुलगा / नातू / सून म्हणून अंतिम संस्कार करू… 

… त्यांच्या आयुष्यात जगण्याची ठिणगी पेटवू शकलो नाही …  पण…. जाताना किमान अग्नी तरी देऊ…!

मनातलं काही…

भीक मागणाऱ्या / याचना करणाऱ्या अनेक लोकांच्या अंगात अनेक कला असतात, परंतु अनेक लोकांच्या अंगात कोणतीही कला आणि कौशल्य नसते…. !  ज्यांच्या अंगात कोणतेही कला आणि कौशल्य नाही अशा लोकांना हे कौशल्य शिकवावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

उदा. गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण, परफ्युम तयार करण्याचे प्रशिक्षण, साडीला फॉल पिको करण्याचे प्रशिक्षण, किंवा गिफ्ट आर्टिकल तयार करण्याचे प्रशिक्षण इ… इ…

प्रशिक्षण झाल्यानंतर त्या प्रकारचा ते व्यवसाय करू शकतील. पण अशा प्रशिक्षणासाठी जागा लागते.

याचना करणाऱ्या लोकांसाठी असे प्रशिक्षण केंद्र उभारणे हे माझे अंतिम स्वप्नं आहे…. यासाठी मी पुणे किंवा पुण्याजवळ पाच गुंठे जागा शोधत आहे. 

अगदीच नाही तर ८०० ते १००० स्क्वेअर फुटाचा बांधीव हॉल भाड्याने घेण्यासाठी पहात आहोत . 

महाराष्ट्र शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्याकडे गेल्या पाच वर्षापासून यासाठी मागणी / विनंती / अर्ज करून मी आता थकलो आहे…. पूर्णतः हरलो आहे…! 

… असो, त्यांच्याही काहीतरी अडचणी असतीलच !

तर, कोणाच्या पाहण्यात अशी जागा अथवा हॉल असेल तर कळवावे… जेणेकरून, याचना करणाऱ्या माझ्या लोकांसाठी मला “कौशल्य विकास केंद्र” निर्माण करून, या समाजाला स्वतःच्या पायावर उभे करता येईल. 

एखाद्याला ढकलून पाडायला ताकद लागत नाही… हात धरून उठवायला ताकद लागते…! 

आपणच माझी ही ताकद आहात…! 

ज्या कामाचा मी फक्त नोव्हेंबर महिन्याचा लेखा जोखा वर सादर केला आहे, त्याला अवाढव्य आर्थिक, शारीरिक आणि मानसिक मदत लागते. 

… वरील सर्व मदत समाजाकडून मला मिळत आहे आणि त्याबद्दल मी ऋणी आहे….! 

तरीही, माझ्यासमोर असलेले खर्च आणि माझ्याकडे उपलब्ध असलेला निधी यांची सांगड कधीच बसत नाही…! 

‘तुमचे बिल पुढील महिन्यात भागवतो साहेब,’ हे हात जोडून समोरच्या व्यक्तीला सांगण्याची नामुष्की दरवेळी माझ्यावर येतेच…!

हरकत नाही, घरोघरी मातीच्या चुली…! 

पडणं म्हणजे हरणं नव्हे… उठून उभंच न राहणं म्हणजे हरणं …! 

मी पडल्यानंतर, उठून उभे करण्यासाठी तुम्हा सर्वांचेच हात पुढे येतात… आणि दरवेळी मी उभा राहतो…

पुन्हा नव्याने… नव्या जोमाने ! 

… मी नतमस्तक आहे आपणासमोर…! 

माझा प्रणाम स्वीकार करावा जी… 

— समाप्त —

(मी करत असलेल्या कामाचे सर्व फोटो आपणास दाखविण्याचा मला खूप मोह होतो… परंतु असे फोटो फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया स्वीकारत नाही हा भाग एक …आणि दुसरा म्हणजे, असे फोटो {पायात अळ्या पडलेले, झोपेत कुत्र्याने पाय खाल्लेले, एक्सीडेंटमध्ये डोकं फुटलेले, हाडांचे तुकडे झालेले, ब्लेडने पोट फाडलेले, दगडाने बोट ठेचलेले इ.. इ… वाचूनच कसंसं  झालं ना ? } अनेक व्यक्तींना असे फोटो बीभत्स, ओंगळवाणे, किळसवाणे वाटतात. अनेक लोक हे फोटो पाहून कित्येक दिवस जेवू शकणार नाहीत किंवा झोपू शकणार नाहीत, याची जाणीव आहे, आणि म्हणून या कारणास्तव मी असे फोटो दाखवणे टाळत आहे.)

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीत गाया पत्थरों ने — लेखक श्री प्रकाश पिटकर ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? वाचताना वेचलेले ?

गीत गाया पत्थरों ने — लेखक श्री प्रकाश पिटकर ☆ डॉ. ज्योती गोडबोले

(Glory of Indian Architecture…) 

ऐहोळे, दख्खनचं पठार, कर्नाटक…

Khalil Gibran says ….  “And let to-day embrace the past with remembrance and the future with longing. Art arises when the secret vision of the artist and the manifestation of nature agree to find new shapes.“ 

पाषाणातली अथांग मृदुता ….

ही अद्वितीय निर्मिती सातव्या शतकातली आहे. म्हणजे आजमितीला बाराशे तेराशे वर्ष एवढा कल्पनेपलीकडचा काळ या मूर्तीने वादळं, उन्हाळे, पावसाळे झेलले आहेत. दख्खनच्या पठारावरचा अविरत वाहणारा वेडापिसा वारा झेललाय. तरीही ही कला दिमाखात उभी आहे. हे पाषाण चिरंजीव आहेत.

थोडंसं नीट बघा. मन देऊन बघा. तो किती आर्जव करतोय. आणि ती लटक्या रागाने हे सगळं सुख उपभोगत्येय. त्या दोघांचं हे प्रेम कालातीत आहे, हेच ही मूर्ती सांगत्येय. त्या शिल्पीनी … कलाकारांनी पराकोटीची कमाल केल्येय. महाकठीण पाषाणाला जुईच्या फुलासारखं नाजूक, मृदू केलंय. दोघांच्या शरीरातला कण न कण ती मृदुता … त्यांचं प्रेम, भावना दर्शवतोय. कलेची आपली परंपरा किती दिव्य आहे, हे आपल्याला सांगतोय. नीट बघा …कलाकारांच्या छिन्नी हातोडयाची अगाध किमया. त्यात त्यांनी प्राण ओतला. भावना, घाट, पोत, प्रमाणबद्धता, बारीक कलाकुसर यांची अजोड घडण सामान्य मनाला देखील जाणवत्येय. 

…… खरंच  पाषाणातली मृदुता अथांग आहे. 

चित्र साभार – श्री प्रकाश पिटकर 

लेखक – श्री प्रकाश पिटकर 

संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ गरज सरो… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ गरज सरो… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

मोडलेली गलबतं

“अगं माझं जरा ऐकतेस का?अशी सारखी सारखी मान वेळावून त्या दूर निघालेल्या गलबतांकडे कशासाठी पाहतेस?

आणि सारखे सारखे ऊसासे टाकतेस! त्यानं काही फरक पडणार आहे असं वाटतं तुला! वेडी आहेस झालं;अगं आता आपण मोडकळीस आलेलो शीडं फाटलेली गलबतं आहोत मालकाच्या दृष्टीने… म्हणून तर तुला नि मला या धक्काच्या कडेला नुसते उभे केलं आहे.. सागराच्या भरतीला लाटांच्या तडाख्यात आपण पाण्यात आडवे पडून हळूहळू हळूहळू पाणी आत शिरल्यावर आपण जड होऊन तळाशी खोल खोल बुडून जाणार आहोत.. आता आपली गरज संपलीय त्याच्या दृष्टीने… जो पर्यंत आपला सांगडा मजबूत दणकट होता तोपर्यंत त्यानं व्यापारउदीम करिता आपल्याला वापरुन घेतले आणि आज उपयोग नसल्यावर, नुसत्या सांगाडयाची देखभालीचा फुकटचा खर्च कोण करील… शिडाचं गलबत भंगारात चवलीच्या किंमतीला सुदधा कोणी घेत नाही..मग तिथं कोण कुणासाठी नि कशासाठी जिवाचा निरर्थक आटापिटा करेल… तरी बरं सागर अजूनही शांत बसून राहिला आहे… भरतीच्या लाटा किती भयानक असतात पण त्या देखील शांत होऊन पहुडल्या आहेत… कुणी नाही निदान सागराला तरी आपली दयामाया दाखवता आली आहे…”काही काळ असाच गेला पुन्हा सगळयांचं रूटीन सुरू. झाले… दोन्ही गलबतांच्या कृष्ण छाया त्यांच्याच पायदळी उतरल्या… 

.. अन अचानक लाटांवर लाटा धक्क्यावर येऊन आदळू लागल्या… महा प्रचंड लाटांच्या तडाख्यात शिडाची गलबत धक्क्यावर जोर जोरात आपटू लागली… आता शीडचं काय पण तो सगळा गलबताचा सांगडा छिन्नविछिन्न होउन गेला.. त्याचा एकेक अवषेश तुटून दूर दूर फेकला गेला काही जमिनीवर तर काही पाण्यात आता गलबताला खरी मुक्ती मिळाली… अन मालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले. चला इतके दिवस दोन निरूपयोगी गलबतांनी अडवलेली धक्कयाची जागा आता रिकामी झाली… गलबतावरील ते भगवे निशाण मात्र पाण्यावर दिमाखात डोलताना दिसत होते… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्मरण—सूर.. शब्दांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्मरण—सूर.. शब्दांचे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

“जन पळ भर म्हणतील हाय हाय” ह्या ओळी जरी सरसकट ख-या असल्या तरी काही व्यक्तींच्या बाबतीत ह्या लागू होत नाही हेच खरे. सहा  फेब्रुवारी! मागील वर्षी ह्याच तारखेला आपल्यातून लता मंगेशकर गेल्या.अर्थातच आपल्यासाठी त्या इतकी मोठी गाण्यांची ईस्टेट ठेऊन गेल्यात की रोज अजूनही त्यांची गाणी ऐकल्याशिवाय दिवस जात नाही आपला. त्यांना वर्षश्राद्धदिनी विनम्र अभिवादन.

ही  तारीख अजून एका जादुई शब्दांची किमयागाराची आठवण करुन देणारी तारीख. आज कवी प्रदीप ह्यांची जयंती त्यांना विनम्र अभिवादन.

लता म्हणजे एक अद्भुत आश्चर्य, लता म्हणजे साक्षात सरस्वती, लता म्हणजे एक जादू. आणि कवी प्रदीप हे सुप्रसिद्ध गीतकार. 

कवी प्रदीप ह्यांच मूळ नावं रामचंद्र नारायण द्विवेदी. कवी प्रदीप ह्यांच नाव घेतल्याबरोबर “ए मेरे वतन के लोगो” हे अजरामर गीत कानात गुंजायला लागतं. ह्या गाण्याला अतीशय सुंदर शब्दांत निर्मिलयं कवी प्रदीप ह्यांनी तर गोड गळ्याने  भावपूर्ण सुस्वर गाऊन सजवलयं लता मंगेशकर ह्यांनी. हे देशभक्तीपर गीत ऐकून आजही नशा चढते देशप्रेमाची,आठवतं शहीदांचे बलिदान. 1962 मध्ये झालेल्या चीन भारताच्या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला.काही प्रदेश आणि त्याहूनही अनमोल असलेल्या सैनिकांचे प्राण गमवावे लागले.ह्मा गीताचे थेट प्रक्षेपण लता मंगेशकर ह्यांनी 27जून 1963 रोजी रामलीला मैदानावर केले. तेव्हा पंडीत नेहरुंच्या डोळ्यात शहीदांचे बलिदान आठवून अश्रु दाटले.ह्या गीताची रक्कम कवी प्रदीप ह्यांनी “युद्ध विधवा सहायता निधी” मध्ये वळती करायला लावली. कवी प्रदीप ह्मांनी तब्बल 1700 गीतं लिहीलीतं

त्यामध्ये “जय संतोषी माँ,चल चल रे नौजवाँ., आओ बच्चो तुम्हे सिखाए” ही गीतं खूप प्रसिद्धीस पावली.

लता मंगेशकर ह्यांच्या गाण्यांविषयी माहिती लिहायला गेलं तर पुस्तकही लहानच पडेल. लता मंगेशकर ह्या एक भारतीय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील सर्वात महान आणि प्रभावशाली गायकांपैकी एक म्हणून त्यांना गौरविल्या जातं. भारतीय संगीत क्षेत्रामध्ये सात दशकांच्या कारकिर्दीतील योगदानासाठी त्यांना भारतीय गानकोकिळा  आणि क्वीन ऑफ मेलडी सारख्या सन्माननीय पदव्या मिळाल्या.

लता मंगेशकर ह्यांना दिदी म्हणूनही संबोधल्या जातं.लतादीदींनी तब्बल ३६ पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये आणि काही परदेशी भाषांमध्ये गाणी ध्वनिमुद्रित केली होती. त्या प्रामुख्याने हिंदी आणि मराठीत गात होत्या. आजच्या पोस्ट मध्ये त्यांना मिळालेल्या पुरस्कारांविषयी बघू.

त्यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. १९८७ मध्ये त्यांना भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. २००७ मध्ये फ्रान्स सरकारने त्यांना फ्रान्स चा  सर्वोच्च नागरी पुरस्कार, “द लीजन ऑफ ऑनर”ने सन्मानित केले. त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार, चार फिल्मफेअर  सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार, दोन  फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार आणि बरेच इतर पुरस्कार मिळाले. १९७४ मध्ये, लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये सादरीकरण करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या.पुरस्काराचे वयाच्या ६१ व्या वर्षी सर्वात वयस्कर विजेत्या होण्याचा विक्रम मंगेशकर यांच्या नावावर आहे. त्यांना या श्रेणीतील अलीकडचा पुरस्कार लेकीन चित्रपटातील गाण्यांसाठी मिळाला आहे. ज्युरींनी त्यांना  हा पुरस्कार “दुर्मिळ आणि शुद्ध शैलींसह उत्कृष्ट अभिव्यक्तीसह गाण्यासाठी” प्रदान केला आहे.

त्यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी गायलीत.तरी त्यातून काही गाण्यांना पुरस्कार मिळालेत ते खालीलप्रमाणे.

“परिचय “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

“कोरा कागज “चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार,”लेकीन” चित्रपटातील गाण्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, “चोरी चोरी” चित्रपटातील ‘रसिक बलमा’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.”मधुमती”मधील “आजा रे परदेसी”,”बीस साल बाद”मधील “कही दीप जले कही दिल”,”जीने की राह” मधील “आप मुझे अच्छे लगने लगे” हम आपके है कौन मधील “दीदी तेरा देवर दिवाना” साठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार..!

खरंच लता मंगेशकर ह्या भारताची “शान” होत्या आणि कायम राहतील. दिदींच्या पुण्यतिथीनिमित्त आणि कवी प्रदीप ह्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुनश्च एकदा अभिवादन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ मग मीही श्रीमंतच की ! भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक अपंग प्रौढ मुलगा…. याला तीन वर्षांपूर्वी व्हीलचेअर देऊन आपण व्यवसाय टाकून दिला होता… सर्व काही छान सुरू होतं , अचानक याच्या गुडघ्याला कलिंगडाएव्हढी गाठ आली… पाच नोव्हेंबर रोजी याचे ऑपरेशन करून पुन्हा याला पूर्ववत केलं आहे…. सायकल कॉलनी, क्वार्टर गेट नंबर चार समोर हा विविध वस्तूंची विक्री करत पुन्हा उठून उभा राहिला आहे. 

याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या….. बऱ्याचदा रडून तो मला सांगत असतो… खूपदा मला वाईट वाटतं…! 

पण मी त्याला सांगून ठेवलंय, ‘ येड्या, अडचणी जिवंत माणसाला येतात…. अंत्ययात्रेसाठी तर लोक स्वतःहून रस्ता रिकामा करून देतात… तेव्हा अडचण आली तर आपण जिवंत असल्याचा जल्लोष करायचा आणि अडचणीवर लाथ मारून पुढे जायचं….!’

मुलांकडून भीक मागून घेतली की भरपूर पैसे मिळतात आणि म्हणून पालक आपल्या मुलांना भीक मागायला लावतात, शाळेत टाकत नाहीत… तरीही त्यांच्यात आणि माझ्यात असलेल्या नात्याचा उपयोग करून घेऊन, आपण साधारण ५२ मुलांना भीकेपासून सोडवलं आहे…. आपण अशा मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत. (यांचे आईबाप / आजी आजोबा भीक मागतच आहेत, परंतु या मुलांची ओळख करून घेऊन, त्यांच्यातलाच एक मित्र होऊन, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना शिकण्यासाठी प्रवृत्त केले आहे) …. यात अनेक चिल्लीपिल्ली आहेत, दुसरी ते नववी पर्यंत…. 

पण येत्या काही दिवसात हाताशी येतील, अशी माझी पोरं पोरी सुद्धा आहेत….. 

१. ज्याचं संपूर्ण खानदान अजूनही भीक मागत आहे, अशा मुलाला आपण शिकवत आहोत. त्याची यावर्षीची एमपीएससी ची आणि कॉलेजची फी आपण १२ नोव्हेंबर रोजी भरली आहे. येत्या दोन वर्षात तो पीएसआय (इन्स्पेक्टर) होईल, अशी मला आशा आहे.

२. दुसऱ्या माझ्या मुलीचे आई वडील भीकच मागतात, परंतु या मुलीला सीए (चार्टर्ड अकाउंटंट) व्हायचं आहे… तिची बी कॉम थर्ड इयर ची फी आपण दहा नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

३. ज्याला वडील नाहीत, परंतु आई भीक मागते, असा एक मुलगा, BSC कॉम्प्युटर सायन्स करत आहे, याची या वर्षाची कॉम्प्युटर सायन्स ची फी आपण सहा नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

४. जिची आजी चिंचवड येथे भीक मागते, अशा एका माझ्या मुलीची अकरावी कॉमर्स ची फी आपण नऊ नोव्हेंबर रोजी भरली आहे. तिला प्रायव्हेट ट्युशन लावून, या प्रायव्हेट ट्युशनची फी सुद्धा भरली आहे….

५. दिवसा भीक मागून, रात्री शरीर विक्री करणाऱ्या, अशा माझ्या एका ताईच्या मुलाची आठवीची फी आपण दिनांक 22 नोव्हेंबर रोजी भरली आहे. 

६.  याच सोबत जिची आई अजूनही भीक मागते… अशा एका मुलीची एमबीए करण्याची इच्छा होती, तिला मागील वर्षी आपण MBA ला ऍडमिशन घेऊन दिलं आहे आणि आता दुसऱ्या वर्षाची फी भरून तिला पुस्तकेही घेऊन दिली आहेत. 

….. येत्या काही वर्षात इन्स्पेक्टर होणाऱ्या माझ्या मुलाला मी “जय हिंद सर” म्हणत, जेव्हा कडक Salute ठोकेन तेव्हा…. 

….. चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या माझ्या मुलीच्या केबिनमध्ये आत जाताना मी, ‘May I come in madam ?’  म्हणेन तेव्हा…. 

….. BSC Computer Science झालेलं माझं कार्ट, माझ्याकडे पाहून, ‘ तुम्हाला कॉम्प्युटर मधलं काय कळतंय ?’ असं मलाच विचारेल तेव्हा…. 

….. Masters in Business Administration (MBA) कम्प्लीट झालेली माझी मुलगी, गळयात पडून, जेव्हा “व्यवहाराच्या” चार गोष्टी मलाच सांगायला लागेल तेव्हा…. 

…… तेव्हा…. हो, तेव्हाच ….. “बाप” म्हणून खऱ्या अर्थाने माझा जन्म होईल !…. बाप म्हणून माझ्या जन्माला येण्याची… त्या दिवसाची मी वाट पाहतोय…. !

ज्या आज्यांना भीक मागायची नाही … काम करायचे आहे … ‘त्या आमास्नी कायतरी काम दे रं बाबा ….’ असं अजीजीने विनवतात…..पण अशा निरक्षर आणि कमरेत वाकलेल्या आज्यांना मी तरी काय काम देणार ? 

आणि म्हणून, माझे आदर्श, आदरणीय श्री गाडगे बाबांच्या प्रेरणेतून, अशा आज्यांबरोबर मी आणि मनीषा हातात खराटा घेऊन पुणे शहरातील कितीतरी अस्वच्छ जागा स्वच्छ करत आहोत…. आणि या बदल्यात मला मिळणाऱ्या डोनेशनमधून अशा आज्यांना पगार देणे सुरू केले आहे. या आज्यांची टीम तयार केली आहे या टीमला नाव दिले आहे “खराटा पलटण” ! 

…. ‘मला, मनीषाला आणि आमच्या खराटा मारणाऱ्या चाळीस आज्यांना, पुणे महानगरपालिकेने, “स्वच्छता अभियान” चे ब्रँड अँबेसिडर केले आहे… हे काहीतरी आक्रीतच म्हणायचं … ! 

— क्रमशः भाग दुसरा 

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्वांटम कम्युनिकेशन ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ क्वांटम कम्युनिकेशन  ☆ श्री राजीव गजानन पुजारी

डिजिटल दूरसंवादासाठी आपण ‘बिट’ हे एकक वापरतो. विजेच्या प्रवाहातील अनियमिततेचा वापर आपण बिट्स निर्माण करण्यासाठी करतो. वाय फाय मध्ये बिट्स निर्माण करण्यासाठी रेडिओ सिग्नल्स वापरतात. इथरनेट कनेक्शनमध्ये व्होल्टेजमधील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या इलेक्ट्रिक सिग्नल्सचा वापर बिट्स निर्माण करण्यासाठी केला जातो. तर फायबर कनेक्शन्समध्ये प्रकाशाच्या स्पंदनांचा वापर बिट्स निर्माण करण्यासाठी केला जातो. यानंतर बायनरी सिस्टीम्सचा वापर करून विविध अक्षरे वा आकडे दर्शविले जातात. थोडक्यात on आणि off कंडिशन म्हणूया हवं तर. ऑन 1 हा आकडा आणि ऑफ 0 हा आकडा दर्शवितो. या शून्य व एक यांच्या विविध मांडण्या वापरून मेसेज प्रक्षेपित केला जातो व प्रक्षेपित केलेला मेसेज परत उलट प्रकाराने कनव्हर्ट करून श्रोत्यांना वा दर्शकांना ऐकविला /दर्शविला जातो. बँकांचे वा इतर वित्तसंस्थांचे व्यवहारही या पद्धतीने होत असतात. या पद्धतीत ‘शून्य’ वा ‘एक’ हा शेवटपर्यंत ‘शून्य’ व ‘एक’च राहतो. त्यामुळे हॅकरने मध्येच पाठविलेला संदेश वा माहिती पकडली तर त्यांना त्याची उकल सापडू शकते. असे होऊ नये व पाठविलेल्या माहितीचा हॅकरद्वारा दुरुपयोग होऊ नये म्हणून क्वांटम कम्युनिकेशनवर जगभरात जोमाने संशोधन व सुधारणा सुरु आहेत. त्याची सर्वसाधारण माहिती खालील प्रमाणे :

आपण जाणतोच की, कोणताही अणू हा प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स व इलेक्ट्रॉन्स यांनी बनविलेला असतो. केंद्रात प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स असतात. केंद्राभोंवती विविध कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. हे प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स हे काही वर्षांपूर्वीपर्यंत मूलभूत कण मानले जात होते. पण आता असे निदर्शनास आले आहे कि, हे प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स सुद्धा ‘क्वार्क’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या कणांपासून बनलेले आहेत. असे अनेक क्वार्कस् आहेत. त्यांची नांवे अप, डाऊन, टॉप, बॉटम, चार्म, स्ट्रेन्ज वगैरे आहेत. सर्व मूलद्रव्यांच्या प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्समध्ये सर्वच क्वार्क्स नसतात, तर मूलद्रव्यानुसार प्रोटॉन्स वा न्यूट्रॉन्समध्ये ठराविक क्वार्क्सच असतात. या क्वार्क्सना गिरकी (spin) असते. काही क्वार्क्स स्वतःभोवती एकदा फिरल्यावर मूळ स्थितीत येतात, काही दोनदा फिरल्यावर मूळ स्थितीत येतात तर काही क्वार्क्स स्वतःभोवती अर्धी गिरकी घेतल्यावर मूळ पदाला येतात. या नवीन शोधलेल्या मूलकणांना एकमेकांत गुंतविता किंवा अडकविता (entangelment) येते. म्हणजे असे की, मी एकमेकांत अडकविलेले दोन क्वार्क्स घेतले. एक माझ्याजवळ ठेवला व दुसरा तुम्हाला दिला व तुम्हाला तो क्वार्क घेऊन लाखो प्रकाशवर्ष दूर असलेल्या एखाद्या ठिकाणी पाठविले. नंतर माझ्या क्वार्कला मी क्लॉकवाईज अर्धी गिरकी दिली, त्या क्षणी तुमच्या जवळील क्वार्क सुद्धा क्लॉकवाईज अर्धी गिरकी घेईल. समजा माझ्याकडे दहा क्वार्क्स आहेत व तुमच्याकडेही दहा क्वार्क्स आहेत व तुम्ही माझ्यापासून लाखो प्रकाशवर्ष दूर आहात. माझ्याकडील प्रत्येक क्वार्कला वेगवेगळ्या गिरक्या देऊन त्याद्वारे एक संदेश दिला, तर तुमच्या जवळील क्वार्क्स पण तशाच गिरक्या घेतील व मी पाठविलेला संदेश तुम्हास कळेल. या तंत्रज्ञानात चीन व अमेरिका आघाडीवर आहेत. त्यांनी अनेक मैलांपर्यंत या पद्धतीने दूरसंवाद साधला आहे. भारतीय अंतराळ संस्थेच्या (ISRO) साराभाई ऍप्लिकेशन सेंटर या केंद्रास या पद्धतीने तीस मीटर्स पर्यंत दूरसंवाद साधण्यास यश आले आहे. क्वांटम मेकॅनिक्समध्ये सुपरपोझिशन म्हणून एक कन्सेप्ट आहे. त्यामुळे हॅकर्सना आपण पाठविलेला मेसेज हॅक करता येत नाही. 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मरणा अगोदर जगून घ्या…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

? विविधा ?

☆ “मरणा अगोदर जगून घ्या…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

जीवन फार धावपळीचे झाले आहे. शिक्षण महाग झाले आहे.बाजारातील सर्वच आवश्यक असणा-या गोष्टी महाग झाल्या आहेत.मध्यमवर्गीय कुटुंब चालवणे खूपच कसरतीचे झाले आहे.आपण आपल्या जबाबदा-या पार पाडत असतोच, पण हे करत असताना समाधान मिळते का याकडे कुणाचे लक्ष आहे का?

तर मी म्हणतो,आपण कसे समाधानी राहू यावर लक्ष केंद्रित करा खूप दुर्घटना माणसांच्या आयुष्यात घडत असतात आणि आपल्याला या घटना पचवायची ताकद ईश्वर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाने देत असतो.ती संधी वेळीच स्वीकारा सत्य जे समोर येतं त्याकडे पाठ फिरवू नका. मग  ते सत्य आनंद देईल किंवा दु:ख देईल.

मेहनत सर्वजण करतात.रतन टाटा असे म्हणतात आपण कोण आहे या पेक्षा आपण कसे आहोत हे महत्वाचे आहे.स्वभाव जुळत नाहीत.जबरदस्तीने काही कामे करावी लागतात. पण काही वेळा इलाज नसतो.पण लादलेली कामे कर्तव्य म्हणून केली तर त्रास होणार नाही.सर्वच गोष्टी माणसाच्या मनासारख्या होत नाहीत हे मान्य करून घ्यायला शिकलंच पाहिजे.

मी आपल्याशी बोलता बोलता कुठला विषय कुठे घेवून जात आहे हे माझ्याच लक्षात आले नाही. आजचाच एक प्रसंग, एक माणूस गाडीवरून जात असताना छान गाणं गुणगुणत होता. म्हणजे मला ऐकू आलं इतका त्याचा आवाज होता. साधारण सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचा तो तरूण असावा.सांगण्याचा हेतू दिवसभर काम करून थकून घरी जात असताना तो इतका खूष असेल तर तो किती समाधानी आहे हे त्याच्या गाणे गुणगुनणण्यावरून लक्षात आले. पैसा खूप जवळ असला म्हणजे आपण खूप समाधानी आहोत आणि राहू ,हा मनाचा गोड गैरसमज  आहे.

लोक आपण न केलेल्या गोष्टीकडे फोकस करत बसतात. एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केले ते ही कोणत्या परिस्थितीमध्ये हे लक्षात घेत नाहीत.उलट त्यांनी काय केलं नाही यावर बोलत राहून मिळालेला आनंद त्यांना उपभोगता येत नाही. तर न केलेल्या गोष्टी उगाळत बसल्यामुळे येणा-या आनंदावर पाणी फिरून जात असतं हे त्यांच्या लक्षात येत नाही.

कुणामुळे कुठलेच कोणाचे काम थांबत नाही हे तर मान्य आहे.आपण एखादे काम केले नाही म्हणून ते काम काही काळ थांबेल पण कायमस्वरूपी ते काम थांबत नाही. कुणीच ते काम करणार नाही असं होत नाही…ते काम कोणाकडून तरी होणार हे नक्की!

सांगण्याचा उद्देश असा की जीवन जगत असताना समाधानी राहायला शिकलं पाहिजे.स्वप्नं बघताना जी स्वप्ने पूरी करता येतील अशीच स्वप्ने पहावी.आणि ती स्वप्ने पूरी करून त्याचा आनंद घ्यावा.रोजची धावपळ करत असताना आपल्यासाठी काही वेळ घालवावा मग त्यामध्ये आपला छंद जो आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे.मग तो छंद लिखाणाचा असेल, वाचनाचा असेल ,मुव्ही पाहण्याचा असेल, निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याचा असेल, मित्राशी गप्पी मारण्याचा असेल आपल्याला ज्यात मन रमेल तो छंद आपण मनापासून जोपासावा आणि का जोपासू नये?

गेलेली वेळ परत येत नाही वय वाढत जाते,अनुभव येत राहतात मागे वळून पाहिले तर आपण घेतलेले निर्णय चुकीचे वाटू लागतात.पण असे न होता एखादा निर्णय आयुष्य बदलून जातो.असं काहीसं घडत असतं!

समोरच्या माणसाने काय करावे, कसे वागावे, हे आपण नाही ठरवू शकत पण आपण मात्र योग्य दिशेने योग्य विचाराने वागण्यास काय हरकत आहे…

समोरचा माणूस चुकीचं वागत असेल तर आपला नाईलाज असतो आणि त्याच्या बदलण्याने त्रास होत असेल तर तो त्रास आपण का करून घ्यावा.जर त्याला तो त्रास होत नाही तर आपणतरी तो त्रास का करून घ्यायचा. काही वेळा समोरचा कसा वागतो त्याच्याशी तसेच वागावे लागते.

आपल्यातल्या मीपणालाही केव्हातरी संधी द्यावीच लागते. समोरचा माणूस मनासारखा वागत नाही म्हणून दु:खाला कवटाळून का बसावे.भांडण एकाशी त्याचा परिणाम आपण इतर गोष्टींवर करत असतो, हे का कळत नाही ? आपलं एकाशी भांडण होतं. पण इतर नात्यातून जो आनंद  मिळणार असतो तो का आपण घेत नाही. जीवन आपल्याला पुन्हा मिळणार आहे का हो, नाही ना ? आणि वय उलटी गिनती करणार आहे का नाही ना? लहानपण, तरूणपण व म्हातारपण चुकलं आहे का, नाही ना?

जगात एकच गोष्ट अटळ आहे

मरण….येणारच फक्त कधी येईल आणि कोणत्या रूपाने येईल माहीत नसतं, फक्त त्याला कारण हवे असते…म्हणून मरणा अगोदर जगून घ्या…जगून घ्या……….

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares