मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ ! नथ एक सौंदर्य आभुषण ! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ ! नथ एक सौंदर्य आभुषण ! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

पारंपरिक स्त्री अलंकार आभुषणात नथीचा थाट न्याराच असतो. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत विवाहच्या वेळी सालंकृत कन्यादान करतांना  पायाच्या बोटातील जोडवी पासून डोक्यावरच्या बिंदीपर्यंत सर्व प्रकारच्या विविध नक्षी कलाबुतीने सजलेले अलंकार नि आभुषणाने नटलेली चि.सौ.का. आपण पाहात आलो आहोत. यात नाकातील नथ हा आगळा वेगळा आकाराने छोटेखानी पण तितकाच तो नाजूक नजाकतीने घडवलेला दागिना ,तो त्या स्त्रीच्या सौंदर्यात भरच घालतो. काही वेळा असाही प्रश्न पडतो की नथीमुळे सौंदर्य खुलले आहे कि मुळच्या स्त्री सौंदर्याने नथीची  शोभा वाढली. थोडसं खट्याळ पणे बोलण्याची मुभा घेतली तर असं म्हणता येईल की नाक कसे का असेना… चपटं,नकटं,बसकं,बाकदार, धारदार, अपरं, चाफेकळी, वगैरे वगैरे….चेहऱ्याचा रंग  कुठला का असेना…गौरवर्ण, गहूवर्ण,काळासावळा, ….पण नाकात ती  अडकवलेली नथ मात्र तो चेहरा छान सजवून टाकतो…

नथीचा तो आकडा,एक सोनेरी तार आणि त्यात जडावलेले ते नाजूक लोभस मोती, हिरे,निलमणी,त्यांना एकमेकांना बांधून घेणारे ते छोटे छोटे लाल पिवळे मणी आणि सर्वात मेरु म्हणजे चमचम करणारा तो पाचुचा डाळिंबी  वा हिरा म्हणजे क्या कहना ?…

स्त्रियांचा मुळात नटण्यामुरडण्या चा स्थायीभाव आहे. तशातच नाकातील नथीमुळे भर पडली नाही तरच नवल. मुरकणे म्हणजे काय असते स्त्रियांना सांगावे लागत नाही पण नाकातील नथीचा तो लडिवाळ मारलेला मुरका बघून ….

तसे बघायला गेलं तर नथीसाठी आधी नाक टोचून घेणं आवश्यक ठरतं.. नाजूक नजाकतीच्या  सौंदर्याखाली सुद्धा एक वेदना दडलेली असते पण ती आनंददायी असते.. आता आजकाल चापाच्या सुद्धा नथ बाजारात उपलब्ध आहेत…नथीचं वजन हलकं असलेलं पाहिले जातं म्हणून तर नाकाला झेपेल इतकेच मोती, पाचूची जडणघडण  बघतली जाते नाहीतर नाका पेक्षा मोती जड झाला तर नाक ओघळले म्हणून समजा…आणि ही म्हण रुढ झाली..

…तिकडे उत्तर भारतात नथीनी ,राजस्थान मेवाडात मोठ्या रिंगा असलेले नथीचे प्रकार प्रचलित आहेत…और क्या सौंदर्य खुल जाता है..?

…मला वाटतं आता नथ पुराणास पूर्ण विराम द्यावा .नाहीत तर तुम्ही म्हणाल एव्हढा नथीतुन तीर मारून आम्हाला नवीन ते काय सांगितले?…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भारत एक सार्वभौम राष्ट्र आणि नवे शैक्षणिक धोरण … ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ?

☆ भारत एक सार्वभौम राष्ट्र आणि नवे शैक्षणिक धोरण ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

२६ जानेवारी हा ७४ वा प्रजासता दिन साजरा करत असताना आत्मनिर्भर भारत व नवनिर्मित भारताच्या विकासासाठी शैक्षणिक धोरणातील क्रांतिकारक बदल नव्या सार्वभौम भारतासाठी नव्या वाटा घेऊन येत आहे हे निश्चितच नव्या भारतासाठी सदृढ वातावरण आहे असे वाटते .

आजचे युग हे स्पर्धांचे युग आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते पिणारा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे तितकेच खरे आहे. आजचे आधुनिक युग डिजिटल युग म्हणूनही ओळखले जातेय . या युगात प्रत्येक सुविधा डिजिटल होत जाताहेत . जुन्या काळी साक्षर आणि निरक्षर संकल्पनेतून सामाजिक राष्ट्रीय स्तर ठरवला जायचा .आता डिजिटल साक्षर व डिजिटल निरक्षर संकल्पना मोठ्या प्रमाणात विचारात घेतली जातेय . त्यातून शिक्षणाबरोबर शिक्षण प्रक्रिया अधिक गतिमान होणेसाठी वेगवेगळे तंत्रज्ञान वापरले जातेय .शालेय शिक्षणात नर्सरी -बालवाडी – प्राथमिक – माध्यमिक – उच्च माध्यमिक – महाविद्यालयाच्या जडण घडणीत सध्या डिजिटल शैक्षणिक धोरणाचा वेगवान बदल विद्यार्थ्यांच्या तसेच शिक्षक व सामाजिक बदलावर होताना दिसून येतोय . पुढची पिढी सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणाकडे पाहिले जातेय . युवा पिढी व त्यांच्या आकांक्षा व सामाजिक हित व सरकारी व खाजगी शिक्षण पद्धती व त्यांची अंमलबजावणी शैक्षणिक क्षेत्राला नव्या योग्य दिशेला घेऊन जाताना आढळतेय .समाजातील शैक्षणिक , आर्थिक , सामाजिक विषमता यामुळे दूर होण्याच्या आशा निर्माण होत आहे .

बदलत्या काळानुसार शाळांमध्ये ही बदल होणे अपेक्षित आहे .

आज लोक सहभागातून चांगल्या सुविधा मिळविण्यासाठी शिक्षक व शैक्षणिक व्यवस्था झटत आहेत . त्यातून मॉडेल स्कूल विकसित होत आहेत .

इ-लर्निंग सारख्या सुविधा खेडोपाडी उपलब्ध होत आहेत .शिक्षण तज्ञ योगी अरविंद म्हणतात की – “प्रत्येक गोष्ट शिकवता येणे शक्य नाही. मात्र प्रत्येक गोष्ट शिकता येणे शक्य आहे .” – त्यामुळे कोणतीही मुले शिक्षणापासून वंचित होऊ नयेत याविषयी शिकता येणे गरजेचे वाटते .त्यासाठी टॅब  ,स्मार्टफोन इ . माध्यमे शिक्षणाची समीकरणे बदलण्यासाठी  पूरक ठरली आहेत . स्मार्ट अभ्यासिका घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे . विविध नवोपक्रमाव्दारे शिक्षक अपडेट होणे आवश्यक आहे .

नवे शैक्षणिक धोरण :

१९८६ च्या शैक्षणिक धोरणातील अनेक मुद्दे मागील ३४ वर्षात राबविले गेले. त्याचे  पूर्वावलोकन महत्वपूर्ण वाटते . त्यातून सुधारण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. नवीन शैक्षणिक धोरणात २०३५ पर्यंत प्राथमिक ,माध्यमिक शिक्षणाच्या बरोबरीने उच्च शिक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत वाढवण्याचे उदिष्ट दिसून येते.महिला, बालवाडी व व्यवसायिक शिक्षणाकडे नवीन शैक्षणिक धोरणात जादा लक्ष देण्यात आल्याची बाब चांगली आहे .गरिब व श्रीमंत यांच्यातील शैक्षणिक विषमता मिटवणे,सरकारी व खाजगी शाळेत शिक्षणाची समानता आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल यातून उचलले गेले आहे .

देशातील युवा पिढीच्या आकांक्षा त्यांची स्वप्ने आणि हित लक्षात घेऊन लक्ष केंद्रित केले आहे . जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे वेगाने होणारे बदल होत आहेत आणि भारत एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येत असल्यामुळे भविष्यकालीन योजना राबविणे आवश्यक आहे . राष्ट्रीय शैक्षीणक धोरण – 2020 अंतर्गत शिक्षणावर ६ टक्के खर्च व्हावा हे अपेक्षित आहे . भारताच्या भविष्यावर होणारे क्रांतिकारक बदल व शिक्षणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बदल निश्चितच देशाच्या विकासात क्रांती घडवेल असे वाटते .

बालवाडी आणि अंगणवाडी किंवा १ ली ते दुसरी पर्यंतच्या इंग्रजी शाळांचे जाळे विस्तारत असताना शालेय शिक्षण प्रशासनामार्फत नवीन बदल स्विकारून नव्या शैक्षणिक रचना तयार करण्यात येत आहेत. बहुशाखीय शिक्षण हे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणाचे वैशिष्ट बनत आहे .यामुळे संशोधन, शिक्षण व सर्वसाधारण अभ्यासक्रम राबविले जातील .

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर या नव्या राष्ट्रीय धोरणात भर देण्याचा विचार करण्यात आला आहे . मातृभाषा, इंग्रजी व प्रादेशिक भाषा असे त्रिभाषीय सूत्र बनविले आहे .

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्याला कशाचेच बंधन नाही .आयुष्यभर मनुष्यप्राणी विद्यार्थीच असतो . तो प्रत्येक अनुभवातून नवनवीन बाबी शिकत असतो . प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगावर विचार करून मार्ग काढत पुढे जात असतो.वर्षानुवर्षे सुरु असणाऱ्या पारंपारिक शिक्षण पद्धतीला छेद देत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पद्धतीत समग्र बदल होत आहेत. ग.दि.मा. यांच्या कवितेत –

 ” बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु ” असे व्यक्त होतात .

हे नवे शैक्षणिक धोरण जाहीर झाल्याच्या वर्षापूर्तीनिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असे म्हणाले की – ‘आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षात आहोत.एका प्रकारे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हा आता अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे. नवीन भारत आणि भविष्यासाठी तयार युवा पिढी घडवण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘

हे २१ शतकातील सर्वात दूरदर्शी धोरण आहे – असे मत शिक्षणमंत्री धरमेन्द्र प्रधान यांनी मांडले आहे. याद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतांचा योग्य वापर,शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, क्षमता विकास आणि शिक्षणाच्या माध्यमांमध्ये परिवर्तन घडून येणार आहे.

नवे शैक्षणिक धोरण 2020 हा नक्कीच एक मार्गदर्शक दस्तऐवज आहे. नव्या युगातील नवी आव्हाने लक्षात घेता विविध शैक्षणिक गरजा,संरचनात्मक असमानता आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करण्यामध्ये येणार्‍या समस्यांचे निराकरण हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या राष्ट्रात शिक्षण क्रांती निर्माण होणार आहे. \ सोबतच शिक्षण व्यवस्थेतील अनेक संकटांना तोंड देण्याचे सर्वात आव्हानात्मक कार्यही या धोरणाद्वारे पूर्ण करायचे आहे.

भारताच्या अफाट लोकसंख्येला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्याद्वारे असंख्य रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या धोरणाच्या अंमलबजावणीवर ठरणार आहे. कोविड महामारीच्या काळात जलद पावले उचलून अवघड निर्णय घेऊन ते पूर्तीस नेण्याचे कौशल्य आपल्या भारताने  दाखवून दिले आहे. याच कौशल्याचा फायदा शिक्षण क्षेत्रातही होणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी काही राज्यांनी केली आहे तर काही राज्ये त्या प्रक्रियेतून जात आहेत. तरीही अजून लांबचा पल्ला गाठायचा बाकी आहे. याच बरोबर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता संविधान साक्षर व्हावी यासाठी संपूर्ण भारतामध्ये संविधान साक्षर अभियान राबविणे गरजेचे आहे असे वाटते. भारत हे संपूर्ण प्रजासत्ताक राष्ट्र आहे. आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी निश्चितच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आपला भारत नवीन क्रांती घडवेल यात तिळमात्र शंका नाही असे वाटते.

२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन नवनव्या संकल्पनानी साजरा करताना सर्व भारतीय एक आहेत ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. तरच देशप्रेमाने तिरंगा अभिमानाने लहरत राहील असे मनोमन वाटते .

नव क्रांतीची मशाल हाती

उजळू अंधार अज्ञानाचा

 नवनिर्मितीने मार्ग शोधूया

 शिक्षणाचा सज्ञानाचा

               प्रजासत्ताक हे राष्ट्र आपुले

               चला उभारू देश नवा

विकसित करू राष्ट्र आपुले

शिक्षणाचा ध्यास हवा …!

जय भारत…

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समर्थांनी केलेले गणेश स्तवन…  ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले  ☆

? विविधा ?

☆ समर्थांनी केलेले गणेश स्तवन…  ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

समर्थानी दासबोधाची रचना लोकविलक्षण पद्धतीने केली आहे. सामान्यपणे विघ्नहर्त्याला नमन करून ग्रंथारंभ केला जातो. परंतु समर्थानी असे न करता दासबोधात नक्की काय आहे ?  समर्थाना नक्की काय सांगायचे आहे, याचे सूतोवाच त्यांनी प्रथम समासात केले आहे. दुसऱ्या समासात मात्र समर्थ जनरीतीप्रमाणे विघ्नहर्त्या गजाननाचे यथार्थ गुणवर्णन करतात, स्तवन करतात. स्तवन करणे म्हणजे फक्त स्तुती करणे नव्हे, तर कृतज्ञता व्यक्त करणे.

श्री गणेश ही आपली आद्यदेवता आहे. कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात आपण गणेशपूजनानेच करतो. श्री गणेश ओंकारस्वरूप आहे. सृष्टीची उत्पत्ती ओंकारातून झाली असे मानतात. म्हणून कोणत्याही कार्याच्या आरंभी गणपतीस आद्यपूजेचा मान दिला जातो. गणपतीची पूजा करून कार्य केल्यास संकटे येत नाहीत अशी भक्तांची श्रद्धा आहे. समर्थानी इथे आधी गणपतीतत्वाचे, अर्थात निर्गुण रूपाचे आणि पुढे  पौराणिक सगुण गणेशरूपाचे गुणवर्णन केले आहे.

श्री गणपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा स्वामी आहे. सर्वसिद्धी प्राप्त करून देणारा, अज्ञान दूर करणारा, ओंकाररूप असणाऱ्या गणपतीस समर्थ  सर्वप्रथम वंदन करतात. सर्व चराचर सृष्टीचे मूळ असलेल्या गणपतीस ब्रह्मा, विष्णू आणि महेश सुद्धा वंदन करतात. गणपतीची कृपा असेल तर सर्व सिद्धी प्राप्त होतातच आणि काळसुद्धा आपला गुलाम बनतो. तसेच  इतर संकटे गणपतीच्या नुसत्या नामस्मरणाने दूर पळून जातात. समर्थ पुढे अशी प्रार्थना करतात की “ अध्यात्मशास्त्राचा हा ग्रंथ लिहिण्याचा मी संकल्प केला आहे, म्हणून देवा! तुम्ही माझ्या अंतःकरणात नित्य वास करावा, जेणेकरून मला ग्रंथ लिहिणे सुलभ होईल.” या जगात जे जे उत्तम आहे त्याचे भांडार म्हणजे 

श्रीगणेश आहे. विघ्नहर्त्याचे स्मरण करून कोणतेही कर्म केल्यास मनुष्य त्यात नक्कीच यशस्वी होतो.

वक्रतुंड महाकाय कोटीसूर्यसमप्रभ ।

निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।

गणपती आपली आद्यदेवता असल्यामुळे त्याचे गुणवर्णन याआधीही प्रत्येकाने आपापल्या प्रतिभेनुसार केले आहे. गणपतीच्या नुसत्या चिंतनानेदेखील आपल्याला समाधान प्राप्त होते. गणपतीचे रूप अत्यंत मनोहर आहे. गणपतीचे नृत्य पाहताना सर्व देव मंत्रमुग्ध होऊन जातात. हा गणपती सदा मदमस्त असतो, परमानंदाने सदा डुलत असतो. त्याचे वदन नेहमीच प्रसन्न असते. ते प्रसन्न वदन पाहून आपण सुद्धा आनंदित होतो. गणपती धिप्पाड आणि सर्वशक्तीमान आहे. त्याचे भाळ विशाल असून त्यावर शेंदूर लावलेला आहे. त्याची सोंड खूप मोठी असून ती सतत हलत असते. ” थबथबां गळती गंडस्थळे।…..” (दासबोध 1.1.11) गणपतीच्या गंडस्थळातून जो ‘मद’ पाझरतो तो ‘ज्ञाना’चा असतो आणि त्याभोवती ‘ज्ञानार्थी भुंगे’ गुंजारव घालत असतात, असा अनेक अधिकारी साधकांचा अनुभव आहे.

गणपतीचे डोळे अतिशय लहान असून तो त्याची सतत उघडझाप करीत असतो. त्याचे कान विशाल आहेत. मस्तकी रत्नजडीत मुकुट आहे , कानात कुंडले धारण केली आहेत आणि त्यातील निलमण्याचा प्रकाश विशेष आकर्षित करीत असतो. गणपतीने नाना अलंकार धारण केलेले आहेत. हिंदू संस्कृतीमध्ये सर्व देव आणि देवता ह्या शस्त्रधारी आहेत. गणपती चतुर्भुज असून  त्याने एका हातात परशु आणि दुसऱ्या हातात अंकुश अशी दोन शस्त्रे धारण केली आहेत. तसेच तिसऱ्या हातात कमळ आणि चौथ्या हातात मोदक आहे. आपल्याकडे अहिंसा परमधर्म मानला गेला आहे, पण ही अहिंसा बलवानाची आहे. दुर्बल मनुष्याच्या अहिंसेला काहीही किंमत नसते. बेगडी अहिंसा आपल्याच सर्वनाशाला कारणीभूत ठरते, आणि याचे दुष्परिणाम आपण आज सुद्धा भोगत आहोत. गणपतीने गळ्यात नाना प्रकारचे सुवर्ण अलंकार धारण केलेले आहेत. कंबरेला जिवंत नागाचा वेढा आहे. पितांबर नेसलेला गणपती खूप सुंदर दिसत आहे. टाळ मृदुंगाच्या तालावर गणपती अत्यंत कुशलतेने नृत्य करतो. त्याचे नृत्य पाहणे हा अनुपम्य सोहळा असतो. तसा गणपती शरीराने स्थूल आहे, त्याचे पोट मोठे आहे. पण तरीही तो अत्यंत चपल आहे. तो चालत असताना त्याच्या पायातील पैंजणांची रुणझुण कानाला गोड वाटते. गणपती जिथे जिथे जातो तेथे त्याच्या उपस्थितीमुळे, त्याच्या दिव्य, भरजरी वस्त्रांमुळे त्या सभेला,  जागेला विशेष शोभा प्राप्त होत असते. असा हा गणपती सर्वांगसुंदर आहे. त्याला समर्थ साष्टांग नमस्कार करतात. 

गणपतीच्या सगुण रुपाला विशेष अर्थ आहे असे जाणवते. गणपतीचे  बारीक डोळे मनुष्याला सूक्ष्म अवलोकन करायला सुचवितात. विशाल  कर्ण जास्तीत जास्त ऐकायला शिकवितात. मोठे पोट मानापमान पोटात घ्यायला शिकविते. गणपतीचे मुख हे हत्तीचे आहे. त्यामागे विविध कथा सांगितल्या जातात. एक तर त्याकाळी विज्ञान प्रगत होते असे म्हणता येईल आणि दुसरे म्हणजे एखाद्याला उपजत सौंदर्य नसेल किंवा पुढे अपघाताने ‘विद्रूपता’ प्राप्त झाली, तरी मनुष्य स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर श्रेष्ठत्व प्राप्त करू शकतो, किर्ती मिळवू शकतो. गणपतीच्या  हातातील शस्त्र भक्ताने  शस्त्रसज्ज असावे आणि अखंड  सावधान असावे असे सुचवितात. कारण तो सेनानायक आहे. पायातील पैंजण मनुष्याच्या अंगी नाना कला (‘कळा’ नव्हे) ) असाव्यात असे सूचित करतात. दैनंदिन व्यवहारात कधी कोणती कला उपयोगी पडेल याचा नेम नाही म्हणून जे जे शक्य ते मनुष्याने शिकले पाहिजे. महाभारतात महापराक्रमी अर्जुनाला ‘बृहन्नडा’ व्हावे लागले होते. गणपती चपळ आहे कारण युद्धात चपळता जास्त कामी येते. गणपतीला मोदक आवडतो. मोदकात असलेले नारळ, गुळ आणि भात हे शरीरासाठी पोषक आहेत, तसेच ते इथल्या मातीत पिकणारे आहे. असे विविध गुण आपण गणपतीच्या सगुणरूपातून आत्मसात करू शकतो. पूर्वी शाळेत सुद्धा सर्वप्रथम “श्री गणेशाय नमः” असेच शिकवत असत.

गणपती शब्द दोन शब्दांचा समूह आहे. गण आणि पती. गण म्हणजे समूह आणि पती याचा अर्थ नेता किंवा सांभाळणारा, संचालन करणारा. म्हणून ज्याला ‘गणपती’ व्हायचे असेल म्हणजे ज्याला समूहाचे, समाजाचे नेतृत्व करायचे असेल त्याने गणपतीची उपासना करावी. समर्थांचा महंत असाच ‘गण’पती आहे. ज्याची बुद्धी मंद असेल त्याने गणपतीची उपासना करावी. गणपती सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि सर्व संकटांचे हरण करणारा आहे.

आजची देशकाल परिस्थिती बघितली तर स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे, फक्त एकाच देवीची अर्थात भारतमातेची पूजा करण्याची गरज आहे. भारतमातेची पूजा करणे म्हणजे किमान एका सामाजिक उपक्रमात सहभागी होणे. समाजाचे काम करायचे असेल , नेतृत्व करायचे असेल तर गण-पती व्हावे लागेल. किमान गणातील एक ‘ आदर्श सदस्य’ होण्याचा तरी आपण यथाशक्ती प्रयत्न करूया. उत्तम समूहसदस्यच पुढे उत्कृष्ट नेता (गणपती) होऊ शकतो.

जय जय रघुवीर समर्थ।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ त्या तश्या दोघीही आवडीच्या … अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ त्या तश्या दोघीही आवडीच्या… ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

गुळाची पोळी अन् पुरणाची पोळी… 

अन ‘त्या दोघी’ हे मराठी मनाच्या अगदी जिव्हाळ्याचे विषय!

 

मकर संक्रांतीला मान गुळाच्या पोळीला. वर्षातून एकदा…. पण एकदाच ! त्यामुळे ही जरा ‘एक्सक्लुजीव’ वाटते.

पुरणाच्या पोळीचे मात्र तसं नाही…. गौरी, श्रावणी शुक्रवार, होळी हे खास दिवस आहेतच, परंतू कुळधर्म कुळाचार याही वेळेस पुपो शिवाय पान हलू शकत नाही. 

 

गुळाच्या पोळीचा सोबती एकच….  साजुक तूप.

तर पुरणपोळीची जिवलग दोस्त तुपाची धार…आणि शिवाय इतरही. म्हणजे दूध, नारळाचे दूध, कटाची आमटी.

हे ही तिचे प्रिय सोबती…. अगदी आमरस सुद्धा.

 

गुळपोळी साखरेची बनवता येत नाही. 

पुरणपोळीत साखरेचे पुरणही चालते… असं ऐकलंय. खाल्ली नाहीये मी कधी.

 

एका बाबतीत मात्र साम्य दोघींमध्ये….गृहिणीची कसोटी लागते त्या बनवतांना…. त्या उत्तमपैकी करायला जमणे हे म्हणजे ‘फेदर इन कॅप’!.. दोन्ही पोळ्यांत व्यवस्थित पुरण असणे, ते पोळीच्या कडेपर्यंत भरलेले असणे, पोळीचे आवरण अधेमधे फाटलेले नसणे, त्यातून पुरण ओघळलेले नसणे, ती तव्यास न चिकटणे ….अश्या बऱ्याच कसोट्यांवर पोळी उतरावी लागते, तेव्हा कोठे ‘सुगरणी’चा किताब प्राप्त होतो !

 

पुपो तव्यावरची गरम गरम खाण्यात मजा. 

तव्यावरून थेट ताटात.

गुळपोळी गरमगरम खायची अट नाही. अन तशी ती खाणेही कठीण. 

कारण त्यातला चटका देणारा गुळ. 

गुळाचीपोळी कधी शिळीबिळी होत नाही. 

पुरणपोळी जरी झाली शिळी तरी ती शिळी झाली की जास्तच छान लागते. खुसखुशीत होते. 

 

आता ‘मोस्ट इंपॅार्टंट’ सवाल! 

 

“गुळपोळी आणिक पुरणपोळी यातील कोण आवडे अधिक तुला?

सांग मला रे सांग मला” 

असं कोणी गाऊन मला जर विचारू लागले तर?

अवघड आहे उत्तर देणे. 

हं…..पण गुळाची पोळी हे उत्तर द्यावं लागेल. 

आज तरी.

तुम्हाला वाटेल, आज संक्रांत म्हणून ‘देखल्या देवा दंडवत’ असणार!

ते एक आहेच. 

 

पण अजुन एक कारण आहे.

पुरणपोळ्या दोन खाल्या, फार फार तर तीन, की पोट कसं भरून जातं.

पुपो अंगावर येते. 

गुळाच्या पोळीचे मात्र तसे नाही. 

गुळाचीपोळी म्हणजे चोरटे खाणे!

चार पाच सहज पोटात जातात, अन तरीही अंगावर येत नाहीत म्हणून. 

 

लेखिका : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकाच या जन्मी जणू… लेखक – श्री सुधीर मोघें ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ एकाच या जन्मी जणू… लेखक – श्री सुधीर मोघें ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आयुष्य म्हटलं, की कष्ट आले, त्रास आला,

मनस्ताप आला ,भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं…मग ते घरचं असो नाहीतर दारचं….

बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात…

75 वर्षाच्या म्हातारीनेपण भाजी तरी चिरुन द्यावी, अशी घरातल्यांची अपेक्षा असते….

ही सत्य परिस्थिती आहे…..

आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे रहाणारच……

त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो…ती मरेपर्यंत करावी लागणार…

ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्याला सत्तरीतही करावा लागणार….

” मी म्हातारी झाल्यावर ,माझी मुलं खूप शिकल्यावर, त्यांच्याकडे खूप पैसे येतील, मग माझे कष्ट कमी होतील,” ही खोटी स्वप्नं आहेत….

मुलं , मुली कितीही श्रीमंत झाली तरी ..

” आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव, पण जेवण तू बनव..”

असं म्हटलं की झालं…

पुन्हा सगळं चक्र चालू..

 

आणि त्या चक्रव्युहात आपण सगळ्या अभिमन्यू ….,

 

पण..पण ..जर हे असंच रहाणार असेल..

जर परिस्थिती बदलू शकत नसेल, तर मग काय रडत बसायचं का ??

तर नाही…..

परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं…..

 

मी हे स्वीकारलंय…. खूप अंतरंगातून आणि आनंदाने….

 

माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते… खूप उर्जा आणि उर्मीने भरलेली…..

 

सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच उर्जेने बोलू शकते आणि रात्री दहा वाजताही…

आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत….दुसरा दिवस हा नवाच असतो….

 

काहीच नाही लागत हो…

हे सगळं करायला …

रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा…

छान आपल्या छोट्याश्या टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या..आपणच प्रेमाने लावलेल्या झाडावरून हात फिरवा…

आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या.

इतकं भारी वाटतं ना….

अहाहा….!

सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा…

अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला….ग्लास भरुन पाणी पिलं आणि मस्त…आल्याचा चहा पित…. खिडकी बाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना

की भारी वाटतंं👌👍…..

 

रोज मस्त तयार व्हा….

आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत रहा.

कधी हे कानातले ..कधी ते गळ्यातले…..

कधी ड्रेस…कधी साडी….

कधी केस मोकळे…कधी बांधलेले….

कधी ही टिकली तर कधी ती….

सगळं ट्राय करत रहा….नवं नवं नवं नवं…

रोज नवं…..

रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजे….

 

स्वतःला बदललं कि…. आजूबाजूला आपोआपच सकारात्मक उर्जा पसरत जाईल……..तुमच्याही नकळत……

आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याश्या वाटू लागाल……

 

मी तर याच्याही पार पुढची पायरी गाठलेली आहे….

माझ्याबद्दल नकारात्मक कुणी बोलायला लागलं, की माझे कान आपोआप बंद होतात….काय माहीत काय झालंय त्या कानांना….

 

आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते….

मनातल्या मनात मस्त टुणटुण उड्या मारत असते…..

 

जे जसं आहे….ते तसं स्वीकारते आणि पुढे चालत रहाते…

कुणी आलाच समोर तर .. “आलास का बाबा..बरं झालं” ..म्हणायचं… पुढे चालायचं….

अजगरा सारखी…सगळी परिस्थिती गिळंकृत करायची….

 

माहीत आहे मला…

सोपं नाहीये….

 

पण मी तर स्विकारले आहे…

आणि एकदम खुश आहे….

आणि म्हणूनच रोज म्हणते….

 

” एकाच या जन्मी जणू…

फिरुनी नवी जन्मेन मी…

हरवेन मी हरपेन मी..

तरीही मला लाभेन मी…”

हो. अप्रतिम लिहिलंय

श्री सुधीर मोघें नी

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला फक्त मज्जा हवीय… लेखक – अनामिक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? विविधा ?

☆ मला फक्त मज्जा हवीय… लेखक – अनामिक ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

(अतिशय गंभीर चिंतनीय पोस्ट!)

“मला फक्त मज्जा हवीये” (Todays Goal of Every Youth)

तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?

प्राचीन काळी “ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना” हे उदात्त उत्तर मिळत असे.

अर्वाचीन काळी “प्रापंचिक सुख” हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत.

आत्ता काल-परवा “पैसा, समाधान, शांती” हे शब्द ऐकू यायचे.

हल्ली थेट विकेट पडते –

“मला फक्त मज्जा करायचीये”.

विषय संपला.

“मज्जा केलीच पाहीजे” ही बळजबरी माणसं एकमेकांच्या ऊरावर पांघरू लागलीयेत.

इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहीली नाहीये; ती “निकड” झालीये; केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही; ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.

तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –

“बर्थडे सेलिब्रेशन घरात? शी…”

“पार्टी नाही? शी…”

“फ्रायडे नाईट, आणि तू घरी आहेस? शी… पथेटिक…”

तुम्ही घरी स्वयंपाक वगैरे करून खाता विकेंडला!? फारच बोरिंग ….

“तू आजवर कधी पब मध्ये गेलीच नाहीस? काय काकूबाई आहेस गं…”

“वेलेन्टाईन डे; आणि नो रोजेस? शी, बोअर…”

“डेटवर चाललायस? आणि हातात नो गिफ्ट्स? So sad…”

“वीकेन्ड घरच्यांबरोबर? नो फ्रेन्ड्स? नो आऊटिंग? शी…”

यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.

तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात।पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच.

TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला.

न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रितीचं झालं.

सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या.

“अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं?” असं झालं.

जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं.

एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं; घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेन्ट्स” झाले.

मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती. आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.

तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.

कमवा; आणि उडवा.

तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !!

भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.

विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही “वीड”, “ग्रास” हे शब्द येऊ लागलेत.

यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही.

या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. “मनाली ट्रान्स” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवणऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो  मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त  इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं.

चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.

मग मेलात तरी चालेल.

आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?

चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत”, “आमचं कित्ती मस्त चालू आहे”, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय”, हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.

ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.

मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना;  त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो.

तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.

मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहीलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.

गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात.

त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग “तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही”, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.

हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यातली बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.

जागे होऊया रे.

स्वत्व नको विकूया आपण.

दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहीजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !! 

उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंतकाळ चमकतो.

आपण सूर्य निवडू या.

लेखक – अज्ञात 

प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हिंदुत्व म्हणजे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ हिंदुत्व म्हणजे… ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी  ☆

हा किस्सा आहे थोर संत स्वामी चिन्मयानंदजींचा.

एकदा, इतर साऱ्या धर्मांसमोर हिंदुत्वाला अगदी क्षुल्लक समजणाऱ्या, एका तथाकथित ‘सेक्युलर’ स्त्री पत्रकारानं स्वामीजींना विचारलं :  

पत्रकार : “इस्लामचा संस्थापक कोण आहे?”

स्वामीजी :  “मोहम्मद पैगंबर”

पत्रकार :   “आणि ख्रिस्ती धर्माचा?”

स्वामीजी :   “येशु ख्रिस्त.”

पत्रकार :   “आणि हिंदु धर्माचा संस्थापक?”

आपण स्वामीजींना निरुत्तर केलं आहे, असा तिचा समज झाला होता. ती विजयी स्वरात पुढे म्हणाली.. :

” या धर्माचा कुणीच संस्थापक नाही आणि म्हणूनच हिंदुत्व हा धर्म नाही, हेच सिद्ध होतं.”

स्वामीजी म्हणाले :

“अगदी बरोबर.!”

” हिंदुत्व हा धर्म नाहीच मुळी ! हिंदुत्व म्हणजे निखळ विज्ञान आहे. मानवी जीवन जगण्याचा सत्य मार्ग आहे.”

— त्या महिला पत्रकाराला काहीच कळलं नाही…. 

आता, स्वामीजींनी तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.

स्वामीजी : ” भौतिक शास्त्राचा संस्थापक कोण? “

पत्रकार : ” कुणाही एका व्यक्तीचं नाव नाही सांगता येणार.”

स्वामीजी :-  ” बरं, रसायनशास्त्राचा संस्थापक कोण? “

पत्रकार : ” इथंही कुणा एका व्यक्तीचं नांव, नाही सांगता येणार.”

स्वामीजी : ” प्राणिशास्त्राचा संस्थापक कोण?”

पत्रकार : “अर्थातच, कुणा एका व्यक्तीचं नांव नाही सांगता येणार. अनेक शास्त्रज्ञांनी, तसंच वेगवेगळ्या काळात; ह्या शास्त्रांबद्दलच्या ज्ञानात आपापल्या परीनं वेळोवेळी भर घालून, ही शास्त्रे समृद्ध केली आहेत.”

यावर स्वामीजी बोलले – 

“आधुनिक शास्त्रज्ञांनी मानवाच्या भौतिक गरजांचा विकास करण्यासाठी, वैज्ञानिक संशोधन केले आहे.  त्याप्रमाणे,

हिंदूधर्मही विज्ञानच आहे— 

‘ ऋषी ‘ या शब्दाचा अर्थ ‘शास्त्रज्ञ’ ! त्यांनी मानवाचा मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास करण्यासाठी संशोधन करून, लोक जागृती केली. अनेक ग्रंथ लिहून मार्गदर्शन केले आणि शतकानुशतकं त्याचा विकास  होत आलेला आहे. अनेक थोर संतमहंतांनी, ऋषिमुनिंनी यावर वेळोवेळी संस्कार करून आणि आपल्या संशोधन आणि अनुभवांद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचं कार्य अव्याहतपणे सुरूच ठेवलेलं आहे.—- इस्लामचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – कुराण – पुरेसा आहे. ख्रिस्ती धर्माचा अभ्यास करायला एकच ग्रंथ – बायबल – पुरेसा आहे.—— 

— पण हिंदुत्व म्हणजेच ‘ मानव जीवन मार्गाचा ‘ अभ्यास करण्यासाठी, अनेक ग्रंथालयांत जाऊन शेकडो पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. कारण हिंदू धर्म हा संपूर्णपणे विज्ञानाधिष्ठित धर्म आहे.  तो एकाच कोणी व्यक्तीने स्थापन केलेला धर्म नाही.  मानवाच्या जीवन विकासाकरिता आणि मानवाचे जीवन सुखी आणि संपन्न होण्याकरिता जो मार्ग भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीराम, अनेक ज्ञानी ऋषी, मुनी आणि संतांनी दाखवला आहे; त्या सत्य महामार्गालाच ‘ सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म ‘ असे म्हणतात.”

— यावर ती महिला पत्रकार निरुत्तर झाली.

आज हिंदू धर्मीय लोकांनाही त्यांच्या धर्माबाबत अज्ञान आहे, कारण ते धर्मग्रंथांचा अभ्यास करत नाहीत. म्हणूनच म्हणतात, की जर ग्रंथ समजले तर संत समजतील, आणि संत समजले तर भगवंत समजेल; तसेच धर्म ही समजेल.

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लईच_बीजी… सुश्री योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ लईच_बीजी… सुश्री योगिता कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

सध्या हळदी कुंकवाचा सिझन आहे… 

त्यामुळे शाळेतून घरी आलं की आधी मॅसेजेस चेक करावे लागतात की आज किती घरी हळदीकुंकू आहे. मग एक घरी असेल तर ड्रेस, दोनचार घरी असेल तर साडी शोधावी लागते.. 

काय आहे ना…… एका घरासाठी साडी नेसणं म्हणजे बारशासाठी लग्नाची तयारी करण्यासारखं आहे… त्यामुळे मग ड्रेस अडकवायचा.

जर आपल्याला फारच मेकअप वगैरे काहीही करायला वेळ नसेल तर मग तर मी त्या घरी पटापट सहा वाजताच जाऊन यायचं बघते… म्हणजे अगदी सुंदर तयार होऊन आलेल्या बायकाही भेटत नाहीत आणि आपल्याला उगच आपल्याकडे सगळं असून लंकेची पार्वती बनल्याचं दुःखही होत नाही.. 

असो.  पण हळदीकुंकवामुळे ज्या मैत्रिणी गणपतीच्या मिरवणुकीनंतर भेटल्या नव्हत्या त्याही भेटतात आणि त्या भारतातच असल्याची खात्री पटते….. तेवढेच बरे वाटते हो दुसरं काय… 

शिवाय अनेक ठेवणीतल्या साड्यांना हवा लागते नी त्यानिमित्ताने त्या नेसल्या जातात……..

काही मैत्रिणींच्या नवीन साड्यांच्या घड्या मोडल्या जातात…

चांदीची भांडी त्यानिमित्ताने कपाटरुपी जेलमधून बाहेर येतात आणि त्यांना आंघोळ पांघोळ घालून आपण चकाचक करतो… 

तेच ठेवणीतल्या मोठ्या पातेल्याच्या बाबतीतही होतं…. कपाटात वर कुठेतरी पडलेले मोठ मोठे भांडे बाहेर येतात नी चकाचक स्वच्छ होऊन त्यात मसाला दूध खळखळ उकळायला लागतं… 

दार झाडून पुसून स्वच्छ होतं नी तिथे सुंदर रांगोळी काढली जाते… भलेही मग उठताना पायही आखडतात आणि कंबरही… तुटून हातात येतात की काय असं वाटायला लागतं, नी पाच मिनिटं म्हाताऱ्या आज्जीसारखं वाकूनच  चालावं लागतं.. 

हळदीकुंकवाच्या दिवशी पोळ्या सकाळीच केल्या जातात आणि एखादी साधी भाजी किंवा खिचडी होणार हे जगजाहीर असतं.. 

घरातला पुरुष वर्ग दबकत दबकत बुटासकट थेट बेडरूम गाठतो नी तिकडेच आरामात डुलक्या घेतो…. 

…. असं करत करत पावणेदहा होतात आणि आता कुणी राहिलं तर नाही ना?? याचा कानोसा घेत आपण साडी फेडून गाऊन घालतो आणि जेवायला पान घेतलं की टाणकन बेल वाजते… 

“ उशिरच झाला गं जरा “म्हणत मैत्रिण येते नी पुन्हा आपण हळदीकुंकवाचं ताट हाती घेतो…… आणि अशा रितीने साडीपासून सुरु झालेला हळदीकुंकवाचा प्रवास गाऊनवर येऊन संपतो..

संक्रांतीचा हा पर्वकाळ म्हणजे खरंच एक पर्वणीच असते सगळ्या मैत्रिणींना भेटण्याची…… आणि लई म्हणजे लईच बिजी असण्याची…. 

सखी (फक्त महिलांसाठी)

लेखिका – सुश्री योगिता कुलकर्णी

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शब्द… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ शब्द… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

 शब्दांमुळे आनंद मिळतो—–

शब्दांमुळे दुःख मिळते—–

शब्दांमुळे समस्याही निर्माण होतात—–

शब्दांमुळे उत्तरंही सापडतात—– 

शब्द शापही  देतात—–

आणि शब्द आशीर्वादही देतात—–

आणि शुभेच्छाही देतात—– 

शब्द शत्रुत्वही देतात—–

आणि शब्द मित्रही जोडतात—– 

 

शब्दांच्या आजारावर औषधही शब्दच असतात!!!!!

त्यामुळे जीवनात प्रत्येक शब्द सुंदर असला पाहिजे!!!!!!!

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शिशिरऋतूचे  गान…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “शिशिरॠतूचे गान…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

दोन दिवसांपासून वातावरणात हलका बदल व्हायला सुरवात झालीयं. ही शिशिराची चाहूल . हे बदलते ऋतू आणतात आयुष्यात वैविध्य, रंगत आणि शिकवितात एक मोलाचा संदेश. आयुष्यात दिवस हे देखील ऋतुंप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे कुठल्याही चांगल्या स्थितीत हुरळून जायचं नाही आणि कुठल्याही वाईट स्थितीत डगमगायचं नाही, कारण दिवस हे ऋतुंप्रमाणे बदलत असतात.

दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष  आणि पौष ह्या मराठी महिन्यात शिशिर ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या इंग्रजी महिन्यात शिशिर ऋतू असतो.

शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत काही प्रमाणात गारवा व थंडी असते आणि काही प्रमाणात उन्हाळ्याची चाहूल देखील एकीकडे येणे सुरू होते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात . 

या काळात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. उन्हाळा सुरू झाला की पहिले दोन चार दिवस ती पानगळ,पिकली पानं गळतांना बघून मन हुरहुरतं,उदास होतं पण हे तर निसर्गचक्र. परत नवीन पालवी फुटतांना बघितली की परत मन हरखतं,प्रफुल्लित होतं.सगळे आपले मनाचे खेळ. आंब्याचा मोहोर,डवरलेला गुलमोहर आणि फुललेला पळस बघणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं सुख,आनंद.तो पळस आणि गुलमोहर डोळ्यात किती साठवून ठेवू असं होतं खरं.

ह्या शिशिराची आठवण होतांना हमखास आठवण होते वा.रा.कांत ह्यांच्या “शिशीरऋतूचे गान ” ह्या कवितेची.त्या कवितेतील शेवटचे कडवे आणि त्याचे माझ्या शब्दांत रसग्रहण पुढीलप्रमाणे

हलके हलके हसते,गळते तरुचे पान न पान

पानझडीत या ऐकुन घ्या गं शिशीर ऋतुचे गान

 

फुले जळाली, पाने गळली,  

फळांत जरी रसधार गोठली,

सर्व स्रुष्टी जरी हिमे करपली,

 

पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान

पानझडीत ह्या ऐकून घ्या गं शाशीरऋतुचे गान

खरंच हा ऋतु साक्षात वृक्षांच्या उदाहरणावरुन आपल्याला शिकवून जातो.अगदी हलके हलके सहजतेने वृक्षाची पानगळ झाली, फुलं जळाली, अगदी परिसीमा म्हणजे अवघी स्रुष्टी जरी हिमे करपली. तरी आपलं मनं मात्र कायम आशावादी सकारात्मक ठेवा कारण येणारा उद्या कायम आपल्यासाठी वसंत ऋतू म्हणजे भरभराट घेऊन येणारच आहे.त्यामुळे खचून न जाता उद्याची वाट बघत आशावादी सकारात्मक हसतमुख रहा. आपल्यातील कित्येक आदर्श पिकली पानं जरी गळून पडली तरी त्यांचा आदर्श आपल्याला कायम शिकवण देत राहील

त्यांच्या आठवणी,आदर्शवाद आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा असेल,तो कायम स्मरणात ठेवा आणि आचरणात आणा.

आजचा शिशिर खूप मोलाची शिकवण देऊन गेला हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares