मराठी साहित्य – विविधा ☆ सार्क… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सार्क… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

वाचनक्षेत्र हे एक अथांग सागरासारखे अफलातून क्षेत्र आहे. ह्या वाचनातून आपल्याला कितीतरी विविध क्षेत्रातील माहिती मिळते,कधी ज्ञानात भर पडते,तर कधी भावनेला वाट मिळते, कधी खळखळून हसावसं वाटत तर कधी छान गंभीर विचारांच्या डोहात डुंबायला मिळतं. कधी कधी वाचल्यावर जाणवतं की हे खरंच छान लिहीलयं किंवा अरेच्चा आपल्याच मनातील शब्द तंतोतंत कागदावर उतरलेयं जणू.

हे वाचन करतांना काही गोष्टी आधी माहीत असलेल्या परंतु वेगळ्या शब्दांत मांडलेल्या असतात तर काहींच्या बाबतीत आपण संपूर्ण अनभिज्ञ होतो हे जाणवतं. असेच काही शब्द वाचनात येतात, हे शब्द फक्त आपण ऐकले असतात परंतु ह्याची माहिती म्हणाल तर शुन्य. मग कुतूहल जागं होतं आणि माहिती शोध मोहीम सुरू होते.काल असाच “सार्क संघटना” हा शब्द वाचनात आला.

कुठल्याही संघटना तयार होतांना त्या काहीतरी भरीव कामगिरी, चांगले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बनवितात.  अशीच एक संघटना म्हणजे सार्क संघटना ,जिच्या निर्मितीची तारीख होती 8 डिसेंबर 1985.

दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना (South Asian Association for Regional Cooperation  असं त्या संपूर्ण संघटनेचे नाव. त्या नावाचं संक्षिप्त रुप म्हणजे सार्क (SAARC); ही दक्षिण आशिया खंडातील  8 देशांची एक आर्थिक व राजकीय सहयोग संघटना आहे. अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्रांची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या 21 टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे हे उल्लेखनीय. 6 जानेवारी 2006 रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

सार्क संघटनेची कल्पना 1950 मध्ये  मूळ धरू लागली. 1970 च्या सुमारास भारत, बांगलादेश,भूतान, मालदिव, पाकिस्तान,नेपाळ श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांना एकत्रितपणे व्यापार व सहकार करण्याच्या दृष्टीने एका संस्थेची आवश्यकता भासल्याने ह्याची संकल्पना अस्तित्वात येण्याच्या दृष्टीने जोर धरु लागली. दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती  करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी सार्क संघटना एकत्रित ऊभी राहिली.

लोकसंख्या, संसाधने, लष्करी सामथ्र्य, आर्थिक आणि तंत्रज्ञानात्मक विकास, भौगोलिक स्थान या सर्व बाबींचा ऊहापोह आणि उपाययोजना ह्याबद्दल ही संघटना कार्य करते.  सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक क्षेत्रांत परस्परांच्या सहकार्याची अपेक्षा ह्यामध्ये व्यक्त करण्यात आली. तसेच महिलांचे प्रश्न व त्यांच्या शिष्यवृत्त्या, अभ्यासवृत्त्या, आर्थिक सहकार्य, महिला आणि मुले यांच्या भवितव्याचा तसेच दहशतवाद व स्त्रियांचे लैंगिक शोषण यांच्याबद्दल ठोस तजवीज ह्यामध्ये केल्या जाते. 

खरंच अशा अनेक संघटना विविध कार्य करीत असतात पण आपल्याला त्याबद्दल फारच कमी माहिती असते हे ही खरे.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ A N G A A R… आणि एक नवीन देश निर्माण झाला… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

३ डिसेंबर १९७१ रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्धाला तोंड फुटले…

त्यावेळी पूर्व आणि पश्चिम (आजचा बांग्लादेश) पाकिस्तानच्या समुद्री वाटा संपूर्ण तोडण्याची (complete naval blockade) महत्वाची जबाबदारी भारतीय नौदलाकडे सोपवण्यात आली.  

पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख सडेतोड उत्तर देण्यासाठी नौदलाच्या इतिहासातील घातक आणि धाडसी हल्ला करण्यास भारतीय नौदल सज्ज झाले. 

यासाठी गरज होती योग्य वेळ साधून अचानक हल्ला करण्याची, कारण हल्ला होणार होता तो थेट पाकिस्तानच्या कराची बंदरावर ! कराची बंदर हे पाकच्या नौदलाचे व संपूर्ण व्यापाराचे प्रमुख बंदर. येथूनच पाकिस्तानला अमेरिका व ब्रिटन या देशांकडून युद्धासाठी मदत मिळत असे व पूर्व पाकिस्तानला पाठवली जात असे. असे हे कराची बंदरच नष्ट करून पाकचा कणाच मोडण्याचं ठरलं. 

ह्या मोहिमेला नाव देण्यात आले “Operation Trident“. 

यासाठी भारतीय नौदलाने निवड केली ती आकाराने छोट्या, तेज व चपळ अशा क्षेपणास्त्रवाहू Osa-class missile boat जहाजांची –                                          

१) INS Nipat, २) INS Veer, ३) INS Nirghat, ४) INS Vinash, ५) INS Nashak, ६) INS Vidyut, ७) INS Vijeta, ८) INS Nirbhik

ह्या जहाजांची मर्यादा बघता ही जहाजे कराची बंदराच्या दक्षिण दिशेला दुसऱ्या जहाजांनी ओढून (TOE) नेण्याचे ठरले. तिथून पुढे हल्ला करून ती सर्व जहाजे तीन दिशांना जाणार होती. नुकतेच रशियाहून प्रशिक्षण पूर्ण करून आलेल्या, उत्तम अस्खलित रशियन भाषा बोलणाऱ्या अधिकारी वर्गाची निवड करण्यात आली. मोहिमेदरम्यान आपल्या सर्व जहाजांना रेडिओ वापरण्यास मनाई होती. गरज भासल्यास संभाषण हे रशियन भाषेतूनच करावे, जेणेकरून पाकला ह्या मोहिमेचा पत्ता लागणार नाही आणि रशियन नौदल समजून तो कोणतीही हालचाल करणार नाही, ह्या साठीचा हा डाव होता. 

पहिला हल्ला :–  ४ डिसेंबर १९७१ च्या रात्री ही सर्व जहाजं सौराष्ट्रच्या किनाऱ्याजवळून कराचीच्या दिशेने निघाली. कराचीजवळ येताच रडार पिंग करू लागले. त्यांना काही पाकिस्तानी जहाजं तिथे गस्त घालताना आढळली.

सुमारे १०.४५ ला INS Nirghat ला हल्ला करण्याचे आदेश मिळाले. तात्काळ पहिलं क्षेपणास्त्र सुटलं आणि जाऊन पाकिस्तानी जहाजावर धडकलं. ते जहाज होतं Battle-class Destroyer PNS Khaibar.– PNS Khaibar ने बुडता बुडता पाकिस्तानी नौदलाला रेडिओ संदेश पाठवला, “enemy aircraft attack-number one boiler hit – ship sunk…” (PNS Khaibar ला त्यांच्यावर हल्ला कुठून कसा झाला हेही समजलं नव्हतं.)

सुमारे ११.२० वाजता कराचीपासून अवघ्या ३२ मैलांवर असलेल्या INS Veer ला अजून एक जहाज दिसलं, ते होतं  PNS Muhafiz (Adjutant-class mine-sweeper) — INS Veerने क्षणाचाही विलंब न करता २ क्षेपणास्त्रे PNS Muhafiz च्या दिशेने सोडली. पुढची ७० मिनिटं Muhafiz जळत होतं. 

दरम्यान INS Nipat च्या अवघ्या २६ मैलावर एक जहाज टप्प्यात आलं, ते होतं venus challenger – पाकिस्तानसाठी दारुगोळा आणि हत्यारं आणतानाच नेमकं सापडलं. INS Nipat ने त्या जहाजाला तळ दाखवला. 

त्याच पाठोपाठ पाकिस्तानी PNS ShahJahan (British C class destroyer) यावर हल्ला केला. 

PNS ShahJahan बुडालं नाही, पण अगदीच निकामी झालं आणि INS Nipat तडक कराचीच्या दिशेने वेगात निघालं आणि अवघ्या १४ मैलांवरून कराची बंदराच्या मुख्य मार्गाच्या दिशेने क्षेपणास्त्र सोडलं. —

(जगातील युद्धाच्या इतिहासात कोणत्याही नौदलाने जहाजावरून जहाजावर मारा करण्यासाठी असलेल्या क्षेपणास्त्राचा उपयोग जमिनीवरील लक्ष्य भेदण्यासाठी आजपर्यंत केलेला नाही. भारतीय नौदलाने ते यशस्वीरित्या करून दाखवलं.) सुमारे ११.५९ वा.कराची बंदरातील भल्या मोठ्या तेलाच्या टाक्यांना त्यांनी लक्ष्य बनवलं. एक टाकी फुटताच इतर टाक्या फुटू लागल्या. संपूर्ण कराची हादरलं. मध्यरात्री भरदिवसासारखा उजेड पसरला. कराची बंदर धडधडून पेटत होतं.)

— आणि भारतीय नौदल मुख्यालयाला पहिला रेडिओ संदेश पाठवण्यात आला —-A N G A A R..

हा कोड होता दिलेली कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा ! 

दुसऱ्या दिवशी ५ डिसेंबर रोजी भारतीय वायुसेनेने उरलंसुरलं कराची ठोकून काढलं.

८ डिसेंबरच्या रात्री पुन्हा एकदा भारतीय नौदलाच्या फक्त तीन जहाजांनी Operation Pythonच्या अंतर्गत कराचीवर हल्ला चढवला. ह्या सततच्या हल्ल्यांमुळे अर्धं पाकिस्तानी नौदल रसातळाला गेलं आणि बरंचसं निकामी झालं. उरलेलं पूर्णपणे हादरून गेलं होतं. 

अश्या ह्या भारतीय नौदलाच्या कामगिरीसाठी आणि ह्या विजयासाठी ‘ ४ डिसेंबर हा भारतीय नौसेना दिवस ‘ म्हणून साजरा होतो आणि ज्या जहाजांच्या ताफ्याने हा हल्ला केला, त्यांना तेव्हापासून नौदलात killer squadron संबोधलं जाऊ लागलं.  

पुढे १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानने संपूर्ण शरणागती पत्करली आणि —-

आणि एक नवीन ‘बांग्ला देश’ निर्माण झाला… 

भारतीय नौदलाच्या  या अतुलनीय कामगिरीला विनम्र अभिवादन…!  जय हिंद !!!  

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

??

☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

(Innovative Communication Skills of Gadgebaba.)

आज २० डिसेंबर —- आज संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ  …….

☆  वंदन दीपस्तंभाला … ☆

बाबांचा संवाद होता ,

संवेदना गोठलेल्या कुष्ठरोग्यांशी ;

भारतवर्षातल्या प्रकांडज्ञानी,

संविधाननिर्मात्या बाबांशी |

पोटतिडीक होती,

वंचितांच्या शिक्षणाची;

विषमतेच्या चिखलात रुतलेल्या  –

माणसाच्या उत्थानाची |

घेतला ध्यास ग्रामस्वच्छतेचा 

आणि माणसांच्या मनांच्या 

आंतरबाह्य स्वच्छतेचा; 

 बाबा दीपस्तंभ अवघ्या मानवतेचा !!!

— संत श्री. गाडगे महाराजांना माझी ही शब्दरूपी श्रद्धांजली. त्यांचे कार्य आठवून त्यांच्याबद्दलची आणखी काही महत्वपूर्ण माहिती वाचकांना द्यावी असे अगदी आतून वाटले. म्हणून हा एक छोटासा लेख प्रपंच —

गाडगेबाबा हे भारतीय समाजाला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे.समाजातील उपेक्षित, वंचित, आदिवासी, स्त्रिया, खेडूत आणि वेगवेगळया स्वरूपाच्या संवेदना गोठून गेलेल्यांच्या प्रबोधनाबरोबरच, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवून त्यांना स्वयंनिर्भर बनवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. १८७३ ते १९५६  हा त्यांचा जीवनकाळ होता. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यावर त्यांनी जो समाज पाहिला, त्या निरीक्षणातून नकळत मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी पुढे, सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष, हे सारे बदलण्यासाठी स्वतःशी साधलेला आत्मसंवाद, कीर्तनाच्या स्वरूपात  जनसंवाद आणि इतर कितीतरी कार्यातून, कोणत्याही चॅनेलच्या मदतीशिवाय समाजात नैतिक मूल्यांची केलेली प्रतिष्ठापना—- अशी जी खूप मोठी,अवघड आणि महत्वपूर्ण कामे केली, त्यात त्यांचे संवाद कौशल्य त्यांना फार उपयोगी पडले होते. त्यांचे हे कौशल्य म्हणजे एक “अभिनव संवाद सिद्धांत” समजला जातो.

गाडगेबाबांनी पुढील माध्यमांतून आपली अभिनव संवाद कौशल्ये लोकांना दाखवून दिली—

कीर्तन – अतिशय साधे,काळजाला भिडणारे आणि लोकांच्या हिताची भाषा सांगणारे शब्द त्यांनी कीर्तनातून पेरले.

पत्रव्यवहार – शाळेचा उंबरठाही न चढलेले गाडगेबाबा आपले विचार इतरांना सांगून त्यांच्याकडून पत्रे लिहून घेत. सामाजिक विषमता, पैसा आणि इतर साधनांची उधळपट्टी थांबवा, माणसाला देवपण देऊ नका, असे संदेश ते आपल्या पत्रांतून देत.

समाजकार्याचे संस्थाकरण आणि समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना सहकार्य – सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजहिताची कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांना स्वयंपूर्ण केले.

गाडगेबाबांचा संदेश आणि त्यांचे मिशनरी कार्य – गाडगेबाबांच्या शब्दांतील रोकडा धर्म त्यांच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे दर्शन घडवतो. बाबांचे अतुलनीय कार्य पाहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘त्यांचे हे कार्य मिशनरी वृत्तीचे आहे’ असा निर्वाळा दिला होता.

नियतकालिकातून  केलेले कार्य – ‘जनता जनार्दन’ या नियतकालिकातून गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याचे दर्शन  ठायी ठायी दिसते. 

 अशा संवादाचे अनेक पुस्तकी सिद्धांत  आहेत. गाडगेबाबांनी विकसित केलेला ‘ नैतिक मूल्यांचा प्रसार ‘ हा त्यापेक्षा श्रेष्ठ वाटतो.

संदर्भ — 

१) श्री.संत गाडगे महाराज- इरगोंडा पाटील. 

२) श्री.संत गाडगे बाबा – प्रबोधनकार के.सी.ठाकरे. 

३) श्री.गाडगे महाराज- गोपाल नीलकंठ दांडेकर. 

४) लोकशिक्षक गाडगेबाबा – डाॅ.रामचंद्र देखणे.

५) श्री.देवकी नंदन गोपाला- गो.नी.दांडेकर. 

६) श्री.गाडगे महाराज गौरव ग्रंथ- संपादक- प्राचार्य रा.तु .भगत. 

७) गाडगेमहाराजांची पत्रे – इरगोंडा पाटील.

श्री. गाडगे महाराजांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन.🙏🏻

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- sks.satish@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – रिटर्न गिफ्ट ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 😅 🎁 रिटर्न गिफ्ट ! 🎁 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“गुडमॉर्निंग पंत !”

“हां, सुप्रभात.”

“हे काय, आज तुमचा मूड नेहमी सारखा दिसत नाही.”

“हो, आहे खरा आज थोडा त्रासलेला.”

“मला कारण सांगितलं पंत, तर तुम्हाला पण थोडं हलक हलक वाटेल आणि त्यावर काहीतरी… “

“तुला कधी, सरकारी किंवा कुठल्या ऑफिस मध्ये ‘लाल फितीचा’ त्रास झालाय ?”

“लाल फित म्हणजे…. “

“अरे, म्हणजे कुठचेही सरकारी काम, तू त्या ऑफिसला गेला आहेस आणि लगेच…. “

“काहीतरीच काय पंत, साध्या रेशन कार्डावरचा पत्ता…. “

“बदलायला पण दहा दहा खेपा माराव्या लागतात, बरोबर ना ?”

“आता कसं बोललात पंत !”

“अरे त्यालाच तर… “

“कळलं, कळलं, पण तुम्हाला कुठे आला हा लाल फितीचा अनुभव?”

“अरे त्याच काय झालं, मोनो रेल सध्या तोट्यात चालली आहे, म्हणून आता कमी गर्दीच्या वेळात त्याचा एखादा रेक…. “

“बारस, वाढदिवस, लग्न, कोणाची साठी, पंच्यातरी, असे समारंभ साजरा करायला भाड्याने देणार आहेत, ही बातमी कालच वाचली, पण त्याच काय ? तुम्हाला पण एखादा रेक भाड्याने…. “

“हवा होता म्हणून गेलो होतो चौकशी करायला तर… “

“पंत तुम्हाला कशाला…… “

“अरे माझ्यासाठी नाही, नातवाच बारस करणार होतो, मोनोच्या रेक मध्ये. कुणी विमानातून उड्या मारून हवेत हार घालून लग्न करतात, कुणी क्रूझवर मुंज ! म्हटलं आपण पण जरा वेगळ्या पद्धतीने नातवाचे बारसे करूया, म्हणून चौकशी करायला गेलो तर… “

“तर काय, उपलब्ध नाही म्हणाले का रेक ?”

“हो ना, म्हटलं कालच तर  तुम्ही रेक भाड्याने देणार असं जाहीर केलेत आणि आज लगेच बुकिंग फुल्ल कसं काय ?”

“मग काय म्हणाला तिथला माणूस ?”

“तो म्हणाला, चारीच्या चारी रेक राजकीय पक्षांनी बुक केले आहेत म्हणून.”

“ते कशा साठी ?”

“अरे ज्या दिवशी मला बारशाला रेक पाहिजे होता त्याच दिवशी त्या सर्व पक्षांची कसली तरी मिटिंग आहे.”

“पंत, पण त्यांना चारही रेक कशाला पाहिजेत, एकात पण मिटिंग….. “

“होऊ शकते, पण सध्या तीन पक्षाच सरकार आहे ना म्हणून…. “

“मग तीन रेक पुरे की, चौथा तुम्ही बुक …. “

“करू शकत नाही, कारण ज्या अपक्षांनी बाहेरून सरकारला पाठिंबा दिला आहे त्यांची वेगळी मिटिंग चौथ्या…. “

“कळलं, म्हणजे तुम्हाला आता एखादा छोटा हॉल घेण्या शिवाय….. “

“पर्याय नाही खरा.”

“तुम्ही काळजी करू नका पंत, आपल्या अहमद सेलर चाळींचे सभागृह द्यायची जबाबदारी माझी !”

“मला ठाऊकच होत, तू मला या बाबतीत मदत…. “

“झालंच तुमचं काम समजा पंत, तुम्ही निश्चिन्त असा.  पण मला एक वेगळाच प्रश्न पडलाय… “

“आता कसला प्रश्न?”

“ती तुम्ही आपल्या चाळीच्या गच्ची मधे कसली पोती….. “

“ती होय, अरे ती ‘बीटाची’ पोती आहेत, म्हणजे असं बघ…. “

“पंत आपण ज्या ‘बीटाची’ कोशिंबीर वगैरे करतो किंवा सॅलेड मध्ये….. “

“वापरतो तीच ही, अगदी  बरोबर ओळखलस.”

“हो पण एव्हढी पोती भरून बिटाचं तुम्ही…… “

“सांगतो, सांगतो. अरे मोनो रेल मध्ये बारसे केले असते तर जवळच्याच लोकांना बोलवावे लागले असते, मग बाकीचे चाळकरी नाराज होणार…. “

“म्हणून त्यांना शांत करायला तुम्ही काय बिट…… “

“काहीतरी बोलू नकोस, अरे तेव्हढी….. “

“पंत, पण तुम्ही एव्हढी पोती भर भरून ‘बिट’ आणल्येत ना,  की ती सगळी आपल्या आठ चाळींना…..

“पुरावित याच हिशोबानेच आणली आहेत बरं !”

“काय सांगता काय पंत, तुम्ही खरच आठी चाळींना….. “

“अरे नीट ऐकून तर घे, तू मगाशी मोनो भाड्याने देणार, ही बातमी वाचलीस म्हणालास ना, मग तशीच दुसरी एक बातमी तुझ्या नजरेतून सुटलेली दिसत्ये.”

“ती कुठची ?”

“अरे RBI चे ‘बिटकॉइन’ बद्दलचे अपील दिल्ली हायकोर्टाने फेटाळले, ती बातमी.”

“असं, म्हणजे आता ‘बिटकॉइन’ या आभासी चलनाला भारतात पण मान्यता….. “

“मिळाली आहे आणि बारशाच्या रिटर्न गिफ्ट मध्ये मला खरे ‘बिटकॉइन’ देण या जन्मीच काय पण पुढचे सात जन्म पण शक्य नाही, म्हणून मी बारशाचे रिटर्न गिफ्ट म्हणून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला त्या सगळ्या बीटांची कॉइन पाडून ती वाटायचा माझा विचार पक्का झाला आहे.”

“खरच धन्य, धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना धन्य, मग तुझ्यासाठी बारशाच्या दिवशी एक एक्सट्रा कॉइन आठवणीने घेऊन जा, मला बारशाला हॉल मिळवून देणार आहेस ना, त्या बद्दल !”

© प्रमोद वामन वर्तक

स्थळ – बेडॉक रिझरवायर, सिंगापूर.

मो – 9892561086, (सिंगापूर)+6594708959

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ४८ – असामान्य, अद्वितीय, स्वामी विवेकानंद ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ४८ – असामान्य, अद्वितीय, स्वामी विवेकानंद ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

आणि सर्वधर्म परिषद सुरू झाली. धर्मविषयक वेगवेगळ्या प्रश्नांवर चर्चा होत होत्या. यात प्रामुख्याने दोन भाग केले होते, पहिला भाग होता, प्रत्येक धर्मातील तत्वचिंतन आणि विविध सिद्धांत, तर दुसर्‍या भागात, परमेश्वराचे स्वरूप, धर्माचे महत्व, ईश्वरी साक्षात्कार, परमेश्वरचा अवतार, अंनैतिकतेच्या कल्पना असे विषय ठेवले होते. या चर्चा  दहा दिवस चालल्या होत्या. तर उत्तरार्धात चर्चेचे विषय होते, कौटुंबिक जीवन, ललितकला, विज्ञानातील शास्त्रे, नीतीविषयी सिद्धांत, अखिल मानवमात्रा विषयीचे प्रेम, ख्रिस्तधर्मप्रचारक मिशनर्‍यांची कार्यपद्धती. भिन्न धर्माच्या अनुयायांनी एकमेकांना समजून घ्यावे हा हेतु होता.

परिषदेच्या चौथ्या दिवशी, बॉस्टनचे रेव्हरंड जोसेफ कुक यांनी आवेशात विषय मांडला, तो असा, “आपण ईश्वराला टाकू शकत नाही किंवा आपली सद्सद्विवेक बुद्धी बाजूला सारू शकत नाही. मानवाच्या आत्म्याला शांती देईल, आपल्या पापांचे भान राखून ईश्वरापुढे नम्र होण्यास शिकवेल, असा कोणता धर्म या पृथ्वीवर वा परलोकात कोठे असेल, तर तो ख्रिस्त धर्म हा एकमेव होय”.

याशिवाय आपल्यावरची टीका समजून घेणारे आणि त्या टीकेपासुन आपण काय शिकावे याचा विचार करणारे पण काहीजण होते. रशियातून आलेले सर्जी वोल्कोन्सकी आणि केंब्रिजचे कर्नाल थॉमस वेंटवर्ध हिगीसन्स हे दोन जण समजून घेणारे होते. धर्म आकाशा एव्हढा व्यापक आणि सर्वांचा समावेश करून घेणारा हवा असं मत त्यांनी मांडलं. तर विवेकानंदांच्या विचारांचं त्यांनी स्वागत केलं.

हिंदुधर्मातील मूर्तीपूजेवर ख्रिस्ती धर्मप्रचारकांकडून फार टीका होत असे. तिला उद्देशून बॉस्टनच्या रेव्हरंड ई.एल.रेक्सफोर्ड यांनी आपल्या निबंधात म्हटले की, “जोवर कोणतेही दैवत रूप एखाद्या व्यक्तीच्या विनम्र `मनाला आणि अंतकरणाला धरून ठेवीत आहे तोवर न्यायाच्या दृष्टीने विचार केला, तर कोणाही माणसाला त्यावर निष्ठूरपणे प्रहार करता येणार नाही . एखादी मूर्ती फोडून टाकण्याचा खरा अधिकार या जगात एकाच व्यक्तिला असतो. आणि ती म्हणजे, जीने त्या मूर्तीची पूजा केली असते. त्या मूर्तीचे आपल्या दृष्टीने आता काही काम उरले नाही हे केवळ ती व्यक्तीच म्हणू शकते. आणि हे निश्चित आहे की, जी ईश्वरी शक्ती या सर्व आकारांच्या द्वारे, कार्य करीत आहे आणि त्या सर्वांना आपले माध्यम बनवीत आहे, ती दिव्य शक्ती एखाद्या ओबडधोबड मूर्तीच्या द्वारा देखील आपल्या बालकापर्यंत पोहोचू शकते”. ख्रिस्ती धर्माचे बहुतेक सारे प्रतिनिधी हिंदू धर्मावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत.

विवेकानंदांच्या भाषणातून चैतन्य सळसळत असायचे त्यामुळे हा विलक्षण प्रभाव कसा रोखायचा ही चिंता सतत धर्मोपदेशकांना होती. म्हणून त्यांचा हिंदू धर्मावरचा हल्ला परिषद पुढे जात होती तसतसा प्रखर होत गेला.

विवेकानंदांनी आपला हिंदू धर्मावरचा निबंध नवव्या दिवशी सादर केला. सकाळपासून आरोप प्रत्यारोप,टीका असे करत विवेकानंदांना संध्याकाळी पाच वाजता व्यासपीठ मिळाले. विषय हिंदू धर्म आहे हे माहिती असल्याने कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. सर्वजण जागा मिळावी म्हणून तासभर आधी येऊन बसले होते. काहींना प्रवेश मिळू शकला नाही इतकी गर्दी झाली. कोलंबस सभागृह गच्च भरले होते. स्त्रियांची संख्या जास्त होती.

आठवडा झाला विवेकानंद आपल्या हिंदू धर्मावर होत असलेली टीका आणि ख्रिस्त धर्माचा गौरव ऐकत आले होते. हिंदू धर्माला कमी लेखले जात होते त्यामुळे, स्वामीजींचा स्वाभिमान डिवचला गेला होता. त्यांनी या टीकेचा कठोर शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले, “ आम्ही पूर्वेकडून आलेले प्रतिनिधी गेले काही दिवस इथे बसलो आहोत आणि एका अधिकारपदाच्या भूमिकेतून आम्हाला सांगितलं जात आहे की, आम्ही सर्वांनी ख्रिस्त धर्माचा स्वीकार करायला हवा. का? तर ख्रिस्त धर्मीय राष्ट्रे आज सर्वात अधिक प्रगतिशील आहेत.

आम्ही आता आमच्या आसपास पाहतो, तर आम्हाला असं दिसतं की इंग्लंड हे ख्रिस्त धर्मीय राष्ट्र आज जगात सर्वात पुढारलेले आहे आणि ते पंचवीस कोटी लोकांच्या मानेवर पाय रोवून उभं आहे. आम्ही इतिहासात मागे वळून पाहतो, तर आम्हाला आढळून येतं की, ख्रिस्तधर्मी युरोपच्या समृद्धीचा प्रारंभ स्पेन पासून झाला. त्या स्पेनच्या समृद्धीची सुरुवात झाली ती, मेक्सिको वर आक्रमण करण्यापासून,आपल्या बांधवांचे गळे कापून ख्रिस्त धर्म प्रगतीशील होत जातो. अशा प्रकारची किंमत देऊन मिळणारी समृद्धी सौम्य प्रकृतीचा हिंदू स्वीकारणार नाही.

मी इथे बसलो आहे. आणि मी जे काही सारं ऐकलं तो असहिष्णु वृत्तीचा कळस होता. इस्लाम धर्माचे गोडवे गायलेले मी आता ऐकले, हे मुसलमान भारतात हातात तलवार घेऊन अत्याचार करीत आले आहेत. रक्तपात आणि तलवार ही हिंदूंची साधनं नाहीत. त्यांचा धर्म सर्वांविषयीच्या प्रेमाच्या आधारावर उभा आहे”. यावर श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हे तर जगातल्या ख्रिस्त धर्मियांबद्दल झाले. पण, भारतात मिशनरी हिंदू धर्माचा प्रचार करतात त्याला म्हणावे तेव्हढे यश येत नाही. यावर विवेकानंद म्हणाले, “एका हातात बायबल आणि दुसर्‍या हातात तलवार घेऊन तुम्ही येता.ज्या तुमचा धर्म केवळ कालपरवाचा म्हणावा, ते तुम्ही आम्हाला उपदेश करण्याकरता येता ज्या आम्हाला आमच्या ऋषीमुनींनी तुमच्या धर्माइतकीच उदात्त तत्त्वं आणि भगवान येशू ख्रिस्ताएव्हढीच पावन जीवनं यांचा आदर्श हजारो वर्षांपूर्वीच घालून दिला आहे. तुम्ही आम्हाला पायाखाली तुडविता आणि आपल्या पायाखाली असणार्‍या धुळी एव्हढीच किंमत आम्हाला देता. आमच्या लोकांना दारू पिण्यास शिकवून तुम्ही त्यांना अधोगतीचा रस्ता दाखविता. आमच्या स्त्रियांचा तुम्ही अपमान करता. आमच्या धर्माची हेटाळणी करता, की जो धर्म अनेक दृष्टीने तुमच्या धर्मापेक्षा सरस आहे, कारण तो माणुसकी अधिक जपणारा आहे. आणि असं सारं केल्यावर तुम्ही विचारात पडता की भारतात ख्रिस्ती धर्माचा एव्हढा थोडा प्रसार का होतो? याचं कारण मी सांगतो, याचं कारण हे आहे की, तुम्ही मंडळी त्या येशू ख्रिस्तासारखी नाही, की ज्याच्या बद्दल आम्हाला आदर वाटावा. तुम्हाला असं वाटतं का, त्याच्याप्रमाणच सर्वांसाठी प्रेमाचं संदेश घेऊन, त्याच्या सारखी ऋजुता व नम्रता धारण करून आणि इतरांसाठी कष्ट घेण्याची व काहीतरी सोसण्याची तयारी ठेऊन तुम्ही आमच्या दाराशी आलात,तर आम्ही तुमचं स्वागत करणार नाही? नाही, तसं कधी होणार नाही. अशा भूमिकेनं जो कुणी आमच्याकडे येईल त्याचं म्हणणं आम्ही आमच्या प्राचीन ऋषींचं म्हणणं ऐकण्याइतकच आदरानं ऐकू”.

विवेकानंदांनी मिशनर्‍यांच्या प्रचार पद्धतीवर कडक टीका केली आणि त्यांनी काय केल तर भारतात त्यांचं स्वागत होईल हे ही संगितले. वीस सप्टेंबरला ‘पापी मानवाचा ख्रिस्ताच्या द्वारा होणार उद्धार’ आणि ‘पेकिंगमधील (आताचा प्रचलित उच्चार बियींग)  धर्म’ हे दोन विषय मांडले गेले. पण यावरची चर्चा लवकर आटोपली. कारण काही नियोजित वक्तेच आले नव्हते. सभागृह तुडुंब भरलेले. याचवेळी विवेकानंद व्यासपीठावर आलेले दिसले. तर लोकांना हा एव्हढा आनंद झाला.

विवेकानंदांचे चार शब्द जरी ऐकायला मिळाले तरी ते श्रोत्यांना हवे असत. इतक त्यांचं आकर्षण होतं. कित्येक वेळा कंटाळवाणी झालेली भाषणे ऐकून श्रोते निघून जातील अशी भीती वाटली की व्यासपीठावरून सांगितले जायचे की सत्राच्या शेवटी विवेकानंद थोडा वेळ बोलणार आहेत.  मग श्रोते सहनशीलतेने बसून राहत.

20 सप्टेंबरला ‘पेकिंगमधील धर्म’ हा विषय श्री हेडलँड यांनी मांडला. चीनच्या धार्मिक परिस्थितिबद्दल जी विधाने हेडलँड यांनी केली त्याचा खरपूस समाचार विवेकानंदांनी घेतला. विवेकानंद यांनी ऐनवेळी विषय मांडला, कारण चीनवर होणारी टीका पर्यायाने भारतावर टीका होती. चीनमध्ये बुद्ध धर्म होता. बुद्ध धर्माबद्दल विवेकानंदांना आदर होता. यावर ते म्हणाले, “अमेरिकेतील माझ्या ख्रिस्तधर्म बांधवांनो, चीनी जनतेच्या आत्म्याचा उद्धार व्हावा यासाठी मिशनरी तेथे जातात. चीनमधल्या भीषण दरिद्र्याचा उल्लेख येऊन गेला. मला असं विचारायचं आहे, त्यांच्या आत्म्याचं राहू देत, त्यांची शरीर भुकेमुळे गतप्राण होऊ नयेत म्हणून मिशनर्यांनी कोणते प्रयत्न केले?  

भारतातील तीस कोटी लोकसंख्येपैकी अर्ध्याहून अधिक लोकांना एकवेळचं जेवण ही पुरत नाही. त्यांना मिशनरी जरूर मदत करतात पण केंव्हा? ते आपला धर्म सोडून ख्रिस्त धर्म स्वीकारतील तेंव्हा. मग हिंदूंना ती मदत मिळत नाही. पूर्वेकडच्या देशांना आज खरी गरज आहे, ती चतकोर भाकरीची. आमच्याकडे धर्म नको इतका आहे. त्यांना अन्न हवं आहे. पण त्यांना धोंडे मिळतात. तेंव्हा तुम्हाला मानवी बंधुत्वाचा अर्थ समजावून द्यायचा असेल तर, हिंदूंशी सहानुभूतीने वागा. मग भले हिंदूंनी आपला धर्म टाकला नाही तरी त्याचा विषाद मानू नका. मिशनरी जरूर पाठवा, पण रोजचे दोन घास अन्न सुलभतेने मिळण्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे हे शिकवण्यासाठी पाठवा. तत्वज्ञानातल्या सिद्धांतांचे घोट पाजण्यासाठी पाठवू नका”. ज्यांनी ज्यांनी भारतातल्या दारिद्र्याचा उपहासात्मक उल्लेख केला होता, त्यांना उत्तर म्हणून ते म्हणाले, माणसाची किंमत भारतात, तो दरिद्री आहे का धनवान यावर केली जात नाही. धर्माची शिकवणूक देणार्‍यांच्या बाबतीत तर दरिद्री असणं हे भूषण मानलं जातं. मी स्वत: निष्कांचन आहे. मला ओळखणारे काही लोक इथे व्यासपीठावर आहेत, ते तुम्हाला ग्वाही देतील की, माझं उद्याचं जेवण कुठे आहे हे मला माहिती नाही. अशा अवस्थेत माझी गेली कित्येक वर्षे गेली आहेत. तेंव्हा जवळ पैसा असणं की नसणं याला महत्व नाही. भारतात तर पैसे घेऊन जो धर्म सांगतो तो भ्रष्ट मानला जातो”.

समारोप करताना ते म्हणाले, “आपण सर्वजण जाणतो की, जो ख्रिस्ताचा अनुयायी होत नाही त्याला ख्रिस्त धर्मियांकडून कोणतीही मदत मिळणार नाही. मानवाचं मूलभूत स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य या गोष्टींना या देशात खूप मोठा मान आहे असं मी कितीतरी वेळा ऐकत आलेलो आहे. मी अद्याप धीर सोडलेला नाही. सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद!”  अशा प्रकारे धर्मविषयक सर्व तात्विक प्रश्नांचा ऊहापोह वेगवेगळ्या कार्यक्रमातून झाला.

विवेकानंदांच्या निबंधाबद्दल भगिनी निवेदिता यांनी मत व्यक्त केले की, असे म्हणता येईल की जेंव्हा त्यांनी बोलण्यास प्रारंभ केला,तेंव्हा त्यांचा विषय होता, हिंदूंच्या धर्मविषयक कल्पना. पण जेंव्हा त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला, तेंव्हा हिंदू धर्म एका नव्या रूपात अवतीर्ण झाला”. तर रोमां रोलां यांनी म्हटलंय, “विवेकानंदांचा निबंध हा भारतामध्ये तीन हजार वर्षात धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञान या संदर्भात जे काही चिंतन होत आले होते, त्याचा सारभूत निष्कर्ष होता”. 

निबंधाची मांडणी करता करता विवेकानंदांनी भिन्न धर्माच्या अनुयायांना आपलेसे करून घेतले होते. सर्वांच्या मनात भाव निर्माण केला की आपले मार्ग भिन्न असले, आपल्या विचारधारा वेगळ्या असल्या, तरी  आपण सर्वजण भिन्न मार्गाने जात असलेले पूर्णतेचे यात्रिक आहोत. हेच ते विश्वबंधुत्व होते.

विवेकानंद जे बोलत होते ते फक्त एखाद्या ग्रंथाच्या आधारे नव्हते, विचारांच्या आधारे नव्हते तर स्वत:च्या अनुभवावर आधारित बोलत होते. त्यामुळे सर्व लोकांना ते खात्रीने पटत होते. सतरा दिवस चाललेली ही परिषद समारोपाकडे वाटचाल करत होती.

२७ सप्टेंबर, परिषदेचा समारोप. आतापर्यंतच्या इतिहासात कधी झाली नव्हती अशी गर्दी लोटली होती. चोहोबाजूंनी श्रोते तासभर आधीपासून येत होते. कोलंबस आणि वोशिंग्टन सभागृह गच्च भरून गेले होते. सात ते आठ हजार लोक उपस्थित होते . ज्यांना प्रवेश मिळाला नाही ते लांबपर्यंत रस्त्यांवर उभे होते. ही परिषद उद्घाटनापासूनच उत्तरोत्तर यशस्वी होत होती. विवेकानंद व्यासपीठावर दुसर्‍या रांगेत बसले होते. त्या क्षणाला त्यांच्या मनाची अवस्था वेगळी होती. अस्वस्थ होती. लोकांना ते अज्ञात होते, पण आज ते समारोपाला जमलेल्या प्रचंड जनसमुदायातील आणि शिकागो शहरातील प्रत्येकाच्या परिचयाचे झाले होते, त्यांना ओळखत नाही असा एकही माणूस नव्हता. शिकागो शहरात त्यांची मोठमोठी छायाचित्रं लागली होती. त्यावर लिहिले होते, ‘हिंदू संन्यासी विवेकानंद’. ती सर्वांच लक्ष वेधून घेत होती.ते पाहताच येणारे जाणारे त्या छायाचित्रापुढे नतमस्तक होत होते. विवेकानंदांचे नाव अमेरिकेच्या कानाकोपर्‍यात वृत्तपत्राद्वारेपण पोहोचले होते. 

सर्वधर्म परिषदेच्या समारोपात एखाद्या संगीत मैफिलीची भैरवीने सांगता होते तसे विवेकानंदांनी सर्व धर्माच्या अनुयायांना संदेश देऊन भाषण संपवले. ते म्हणाले, “ कोणत्याही ख्रिस्ती माणसानं हिंदू वा बौद्ध होण्याची गरज नाही, किंवा कोणत्याही हिंदू वा बौद्ध माणसाने ख्रिस्त होण्याची गरज नाही. प्रत्येकानं दुसर्‍या धर्मातल सारभूत तत्व ग्रहण करायचे आहे. त्याच वेळी आपलं वैशिष्ट्यही जपायच आहे. आणि अखेर स्वत:च्या स्वाभाविक प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास करून घ्यायचा आहे”.

भारताच्या गौरवाचं हे सुवर्णाक्षरांनी लिहिलेल पान होतं. विश्वबंधुत्व आणि विश्वधर्म याचा उद्गाता असलेले स्वामी विवेकानंद, असामान्य! अद्वितीय !  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 2 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 2 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते. इथून पुढे —

ते म्‍हणाले, ” सर, आम्‍ही आमचा पेशंट गेलाच आहे असे समजत होतो , परंतू तुमची धडपड पाहून आम्‍हाला वाटते की आपणास जो योग्‍य वाटेल तो निर्णय घ्‍या. त्‍याला आमची सहमती आहे.” 

मी लगेचच पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये हालवले व ऑपरेशनला सुरूवात केली. पण यावेळी आणखीनच मोठा प्रॉब्‍लेम निर्माण झाला होता. एवढ्या सगळ्‍या रस्क्तस्त्रावानंतर पेशंटची रक्त गोठण्‍याची प्रक्रियाच बंद झाली होती. रक्‍त पाण्‍यासारखे वाहू लागले व काहीच करणे शक्‍य होईना. भूलतज्ञानी दुसर्‍या बाजूने त्‍याची लढाई चालू ठेवली. ते पेशंटला रक्‍त चढवत होते. मी कवटी उघडून शक्‍य होईल तेवढी रक्ताची गाठ काढली, पण मला माहित होते की, रक्‍त गोठण्‍याची प्रक्रिया बंद पडल्‍याने तेथे रक्‍तस्त्राव होत राहणार. म्‍हणून मी एक युक्ती केली. जिथे रक्तस्त्राव होत होता तिथे एक ड्रेन ठेवला. (ड्रेन म्‍हणजे एक रबरी नळी असून तिचे एक टोक कवटीमध्‍ये ठेवले जाते व दुसरे टोक बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जाते) या ड्रेनचा हेतू हा असतो की, आत होणारा रक्तस्त्राव तिथेच थांबून मेंदूवर प्रेशर निर्माण करण्‍याऐवजी, रक्‍त बाहेर पिशवीमध्‍ये सोडले जावे. ऑपरेशन पूर्ण करून मी पेशंटला आय. सी. यू मध्‍ये शिफ्‍ट केले. परंतु पेशंटच्‍या बुबुळांमध्‍ये अजूनही कोणतीही रिअ‍ॅक्‍शन आली नव्‍हती. आता मात्र मन अत्‍यंत निराश झाले. एवढे करूनही काही फायदा होईल असे वाटेना. मी डॉक्‍टर रूममध्‍ये जायला निघालो, तेवढ्यात एक सिक्‍युरिटी गार्ड पळत आला आणि म्‍हणाला, ” सर, तुम्‍ही तुमची गाडी कॅज्‍युअल्‍टिच्‍या दारामध्‍ये तशीच उघडी ठेवली होती, मी ती पाठीमागच्‍या बाजूस पार्किंगमध्‍ये पार्क केली आहे. ही चावी घ्‍या.”  मी त्‍याला धन्‍यवाद दिले व डॉक्‍टर रुममध्‍ये जाऊन बसलो. 

आता माझे सर्व प्रयत्न करून संपले होते. वेळ होती ती परमेश्‍वराला शरण जाण्‍याची ! मी परमेश्‍वराचे नामस्‍मरण करू लागलो.  या सर्व प्रयत्नांना यश येण्‍यासाठी नम्रपणे निवेदन ठेवले. तोच काय तो आधार होता ! साधारण अर्धा तास असाच गेला असेल एवढ्यात इंटेन्‍सिव्‍हीस्ट पळत आले आणि म्‍हणाले, ” सर, लवकर चला. पेशंटला बघा चला.” मी लगेचच जाऊन पाहिलं तर काय चमत्‍कार ! त्‍याच्‍या दोन्‍ही बुबुळांमध्‍ये आता रिअ‍ॅक्‍शन दिसत होती. 

माझ्‍याही जीवात जीव आला. नातेवाईकांनाही तसं समजावलं.

त्‍यानंतर मी निर्णय घेतला की, पेशंटला पुढचे ४८ तास बेशुद्धच ठेवायचे. कारण मेंदूमधील रक्‍तस्त्राव पूर्णपणे थांबला नव्‍हता. त्‍यानंतर पेशंटला जवळ जवळ १५ बाटल्‍या रक्‍त/पांढर्‍या पेशी दिल्‍या गेल्‍या. पुढचे ४८ तास माझ्‍यासाठी खूपच अवघड होते. त्‍या पेशंटसाठी जवळपास ३०-४० जणांचे फोन आले असतील. सर्वांचीच आशा माझ्‍यावरती होती. “मी प्रयत्न करतो!” या एका शब्‍दावर ते सगळे तग धरून होते. ४८ तास त्‍याचे सर्व नातेवाईक आय. सी. यू. च्‍या दारात बसूनच होते. मी देखील दिवसातून १०-१५ वेळा पेशंटला बघायचो. जर अचानक त्‍याची बुबुळे प्रतिसाद देणे बंद झाले तर पेशंटची तिसरी सर्जरी करावी लागण्‍याची शक्‍यता होती. नातेवाईकांना खूप शंका असायच्‍या. ते म्‍हणायचे “ डॉक्‍टर, पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये दुसर्‍या बाजूचा रक्तस्त्राव अजिबातच दिसला नाही असे कसे झाले? आणि पहिले ऑपरेशन झाल्‍यानंतर दुसर्‍या बाजूस एवढी मोठी रक्‍ताची गाठ कशी काय तयार झाली?” मग मी त्‍यांना सांगितले की, “ पेशंट ज्‍यावेळी पडला त्‍यावेळी त्‍याला डोक्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला मार लागला असावा. त्‍यामुळे दोन्‍ही बाजूला रक्‍तस्त्राव सुरू झाला, पण उजव्‍या बाजूला मोठी रक्तवाहिनी फुटल्‍यामुळे थोड्याच वेळात खूप रक्त जमा झाले व त्‍यामुळे मेंदूवर खूप प्रेशर आले. उजव्‍या बाजूने प्रेशर आल्‍याने मेंदू डाव्‍या बाजूस सरकला गेला आणि डाव्‍या बाजूचा रक्तस्त्राव तात्‍पुरता बंद झाला. पण जसे मी उजव्‍या बाजूची रक्ताची गाठ काढून घेतली तसे मेंदूवरील प्रेशर कमी होऊन मेंदू पूर्वस्‍थितीत आला. त्‍यामुळे डाव्‍या बाजूने थांबलेला रक्‍तस्त्राव पुन्‍हा सुरू झाला. त्‍यामुळेच दुसरे ऑपरेशन करून तीही रक्‍ताची गाठ काढणे आवश्‍यक वाटले. “  अशा तर्‍हेने त्‍यांच्‍या बहुतेक शंकाचे निरसन मी केले होते. 

पुढचे ४८ तास मी घरीही बैचैन असायचो. माझी तगमग बघून माझ्‍या पप्‍पांनी व माँसाहेबांनीही देवाला साकडे घातले. सर्व घरच परमेश्‍वरचरणी लीन झाले होते. आणि ४८ तासानंतर माझ्‍या परीक्षेचा दिवस उजाडला. पेशंटला स्‍कॅन करण्‍यासाठी शिफ्‍ट केले आणि काय आश्‍चर्य ! मी  केेलेली ती ड्रेनची युक्ती उपयोगी पडली होती. पेशंटचा स्‍कॅन एकदम छान होता. दोन्‍ही बाजूंचा रक्तस्त्राव  पूर्णपणे  निघाला होता. पेशंटला आय. सी. यू. मध्‍ये शिफ्‍ट केले व त्‍याला शुद्धीवर आणण्‍यासाठी प्रयत्न सुरू केले. पेशंटची भूल बंद केली आणि तासाभरात पेशंटने हातपाय हालवण्‍यास व डोळे उघडण्‍यास सुरूवात केली. आय .सी. यू. च्‍या पूर्ण टीमने जल्लोष केला. प्रत्‍येकजण एकमेकांचे अभिनंदन करीत होता. पुढच्या  ३/४ तासात त्‍याचा श्‍वासही चांगला चालू लागला त्‍यामुळे मी व्‍हेंटिलेटरही काढून घेतला.

आता त्याच्या आई-वडीलांना आय.सी.यू. मध्ये बोलावून घेतले गेले. ते बिचारे घाबरतच आत आले. काय माहित आपल्या मुलाला कुठल्या अवस्थेत बघावे लागेल? त्याची आई तर अजूनही मुलाला बघण्याआधी डोळे घट्ट मिटून देवाचा धावा करीत होती. मी त्यांना त्यांच्या मुलासमोर घेऊन गेलो आणि काय आश्चर्य ! तो डोळे उघडून आईवडिलांकडे बघून हसत होता. त्याच्या आई वडिलांना खरंच सुखद धक्का बसला. मी त्याला विचारले “ हे कोण आहेत? तू ओळखतोस का यांना?” तर तो म्हणाला, ” यस दे आर माय मॉम अँण्ड डॅड.” आईवडील तर जणू स्तब्धच झाले होते. दोघांच्याही तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मनातल्या साऱ्या भावना डोळ्यातील अश्रूवाटे बाहेर पडत होत्या. वडिलांनी अजूनही माझा हात घट्ट पकडून  ठेवला होता. त्यांचा हात माझ्या हातात तसाच ठेऊन मी म्हणालो. ” ही इज अ बॉर्न फायटर ! तुमचा मुलगा सुखरूप परत आला !” आणि आम्‍ही लढाई जिंकली होती ! एक जवळजवळ ब्रेन डेड होणारा  पेशंट जागा होऊन आमच्‍याशी बोलत होता. विशेष म्‍हणजे त्‍याला कोणतेही व्‍यंग (न्‍यूरॉलॉजिकल डेफिसिट) आले नव्‍हते. त्‍यांच्‍या नातेवाईकांच्‍या आनंदाला पारावार राहिला नव्‍हता. डोळ्‍यातून वाहणार्‍या पाण्‍याला सीमा राहिली नव्‍हती

हॉस्‍पिटलमध्‍ये आनंदाचे वातावरण होते. पुढच्या ७-८ दिवसांमध्ये तो पूर्णपणे बरा झाला आणि डिस्चार्ज र्होऊन घरी जाताना  त्याने मला आश्वासन दिले की, इथून पुढे मला बोनस म्हणून मिळालेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण सत्कारणी लावेन.

खरंच ! आयुष्‍यामध्‍ये असे काही अनुभव येतात की, जे तुम्‍हाला त्‍या दैवी शक्‍तीचे सामर्थ्‍य आणि अस्‍तित्‍व मान्‍य करण्‍यासाठी भाग पाडतात !

हीच खरी दिवाळी  

— समाप्त —  

लेखक : डॉ. प्रवीण सुरवशे

कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन, कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल, पुणे 

फोन : ७७३८१२००६०

प्रस्तुती : पार्वती नागमोती 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शहामृगाचे प्रेम… अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ शहामृगाचे प्रेम… अज्ञात ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

तुम्हांला शहामृगाच्या बाबतीतली एक गोष्ट माहिती आहे का ??

नर किंवा मादी शहामृग आयुष्यात एकदाच आपल्या साथीदाराची निवड करतात….

साथीदार मिळाला की ते जिवंत असेपर्यंत एकमेकांबरोबरच राहतात, एकमेकांची साथ सोडत नाहीत,,,

पण जंगलात रहाताना काही कारणाने जर एकाचा मृत्यू झाला, आणि तो मृत्यू दुसऱ्याने पहिला तर तो जिवंत असलेला शहामृग अन्नत्याग करतो ताबडतोब आणि बरोबर वीस दिवसांनी मरतो…..

बापरे,,,, ही माहिती मला जगप्रवासी सुधीर नाडगौडा यांच्याशी बोलताना कळली आणि मी अस्वस्थ झाले…

हा विषय मनातून जाईना….! इतके प्रेम……!! इतकी निस्सीम साथ पक्षाच्या विश्वात असते का…….????

Great……….¡¡

शहामृगाला आपल्या जोडीदाराचा मृत्यू सहनच होत नाही….पण तो मृत्यू त्याला कळलाच नाही तर तो जगतो….

हे जग वेगळेच आहे…….

….. 

रोज सकाळी फिरायला जाते तेव्हा अशा माणसातल्या शहामृगाच्या जोड्या मला भेटतात….

मला खूप आवडतं त्यांच्याकडे पहायला.

….

बरोबर साडेआठ वाजता एक आजोबा टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, स्वेटर घालून आपल्या केस पिकलेल्या सुरकुतलेल्या गोड आजीच्या हाताला धरून हळूहळू येतात…….दोघांनाही कमी ऐकायला येते बहुतेक……..मोठ्यांदा बोलतात.

आजोबा काहीतरी विचारतात…आज्जी वेगळेच ऐकतात….मग…काहीतरी बोलतात…. ते ऐकून आजोबा आज्जीकडे बघून मस्त हसतात….

…. मला त्यांच्यात शहामृग दिसतो.

मला पुण्यातले आज्जी आजोबा फार आवडतात, बालगंधर्वला नाटक बघायला जाते तेव्हा अशा शहामृगाच्या जोड्या असतातच…… आज्जीच्या छोट्याशा अंबाड्यावर किंवा पोनीवर मोगऱ्याचा मस्त सुगंधी गजरा असतो…

आजोबांनी आपल्या थरथरत्या हातानी तो माळलेला असतो, आजोबा कडक इस्त्रीच्या शर्ट पॅन्टमध्ये असतात.

आज्जी सलवार कमीज नाहीतर नाजूक किनार असलेल्या साडीत असतात……मध्यंतरात एकमेकांचा हात धरून ते हळुहळु बाहेर जातात……बटाटेवडा खातात…कॉफी पितात.  मग परत नाटक पाहायला आत येतात….

नाटक संपलं की एकमेकांना सांभाळत रिक्षातून घरी जातात……किती रसिक म्हातारपण आहे हे….!! 

एकदा मिलिंद इंगळेच्या गारवा या फेमस गाण्याच्या प्रोग्रामला गेले होते. तर त्या प्रोग्रॅमला निम्याहून अधिक शहामृगाच्या जोड्याच होत्या….. यांना पिकली पानं म्हणणं म्हणजे त्यांच्यांतल्या तरुण मनाचा अपमान करण नाही काय…!….. उद्या जर अरजितसिंगच्या गाण्याच्या कार्यक्रमात हे शहामृग दिसले तर मला बिलकुल आश्चर्य वाटणार नाही….

पुण्यातले आजीआजोबा अभीं तो, ‘मै जवान हूं’ या मानसिकतेतच राहतात, नव्हे तसे जगतात…

… माझं काय आता…. वय झालं. संपल सगळं अस जगणं यांना मान्यच नाही,,,

my God,,, इतकी पॉझिटिव्ह एनर्जी येते कुठून यांच्यात…..

वृथ्दापकाळ असा गोङ असावा ; असे ज्यांना वाटत असेल , त्या पती पत्नींनी त्यांच्यातील नाते – तरुणपणापासूनच जपा . सुखी व्हाल .

किती मस्त आहे ना हे शहामृगी प्रेम !!!!!!!!!!! 

अ ज्ञा त 

संग्रहिका : सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दिलजमाई… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ दत्त दर्शना जायाचं,जायाचं… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एखादी जखम वा पुटकुळी ही लगेचच ईलाज केला तर बरी होते अन्यथा ती वाढली, चिघळली तर ब-याच कालावधीनंतर बरी होऊन मागे काही तरी खूण वा व्रण ठेऊनच जाते. थोडक्यात काय तर तिचं अस्तित्व हे मागे शिल्लक उरतचं.

तसचं काहीसं मनाचं. मनाच्या तारा जुळल्या की जुळल्या,विचार पटले की पटले. ह्यावरून एक गोष्ट आठवली. दोन भाऊ वा दोन मित्र ह्या तश्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या दोन व्यक्ती असतात. आता सुरवातीपासूनच भिन्न विचारसरणी,वेगवेगळे पंथ,निरनिराळ्या चुली असल्या की ही सुरवातीची भिन्न मतं ही टोकांच्या भुमिकेकडून मार्गक्रमण करत करत दोन ध्रुवांवर जाऊन पोहोचतात. आता ह्यापैकी कुणीही एकजण मऊमातीचा,नरमाईचा असला तर प्रकरण न चिघळता आपापल्या मार्गाने शांत वाटचाल सुरू राहाते. परंतु जर दोघंही टोकांच्या विरोधी विचारणीसरणीचे,वेगवेगळ्या चुली मांडणारे असले तर मग अगदी सहजसाध्या एखाद्या वाक्याचा पण विपर्यास करण्याची संधी दोघांपैकी एकही जण सोडतं नसतं. कधीकधी माघारं घेणं,नमतं घेणं पण खूप फायद्याचं वा सुखाचं असतं हे त्या दोघांच्या गावीही नसतं. बरं हे करतांना ह्या भावांच्या कुटूंबियांचं वा ह्या मित्रांच्या जवळच्या लोकांच नुकसान होतयं ह्याच्याशी जणू ह्यांना काही देणघेणचं नसतं, म्हणजेच काय तर परतपरत हे चक्र स्वार्थासाठी ईगोपाशी येऊनच ठेपतं.

आता जवळजवळ ह्यांच्या स्वभावांची आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची सगळ्यांना मुळी सवयच झाली असते. परंतु ही परिस्थिती जेव्हा हितचिंतकांना डोईजड होते तेव्हा मग कुठे जरा फटफटतं आणि ती यंत्रणा खडबडून जागी होते. मग नेहमीप्रमाणेच दिलजमाई करणाऱ्या मंडळींना तडकाफडकी पाचारण करुन त्यावर तोडगा काढण्यासाठी सांगितल् जातं. अर्थातच ही तोडगा काढणारी मंडळी, दिलजमाई करुन देणारी मंडळी ही कोणाच्या तरी आदेशानुसार, कुठल्या तरी विशिष्ट हेतू मनात धरुनच कामाला लागतात. त्यांना संपूर्ण विचाराधारा बदलवून कायमची दिलजमाई करायची नसते तर तात्पुरत्या डागडुजी सारखा सध्याचे संकट टाळण्यासाठी, आपलं गाडं निर्वेधपणे,सुरळीत चालण्यासाठी तात्पुरती का होईना पण तातडीनं बायपास करायची असते. ह्या दिलजमाई चा अर्थ अजिबातच स्वतःची मतं,विचार बदलविणे असा नसतोच ती एक तत्कालीन आपद्स्थितीतील तडजोड असते. असो एका छोट्या जखमेवरुन ही गोष्ट आठवली. अशी ही दिलजमाई!

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 1 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 1 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो.

शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुममधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते. “सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरुवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो  जवळजवळ ‘ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत.” 

‘ब्रेन डेड’ म्‍हणजे ज्‍या पेशंटचा श्‍वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्‍त हृदय चालू आहे असा पेशंट ! मी डॉक्‍टरना विचारले की, “आता काय स्‍टेटस आहे? ” त्‍यांनी सांगितले की, ” सर त्‍याचा श्‍वास बंद पडलेला होता म्‍हणून आम्‍ही कृत्रिम श्‍वासाची नळी बसवली व व्‍हेंटिलेटरने श्‍वास देतोय. त्‍याचे दोन्‍ही प्‍युपिल्‍स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत.” सहसा नॉर्मल माणसामध्‍ये डोळ्‍यांच्‍या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्‍ये ती रिअ‍ॅक्‍शन दिसत नाही.) ” सर, मी ब्रेनचा सी.टी. स्‍कॅन करून वॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे.”

मी स्‍कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्‍या मेंदूमध्‍ये उजव्‍या बाजूला मोठा रक्‍तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्‍या बाजूला सरकला होता. स्‍कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्‍यांना सूचना दिल्‍या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेण्‍यास सांगितले. गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो. तोच पप्‍पा म्‍हणाले, ” मी येतो सोडायला, तुम्‍ही केसच्‍या नादात गाडी फास्‍ट चालवाल !” सगळेजणं जेवणावरून उठले. पण मी त्‍यांना सांगितलं, ” काळजी करू नका. मी गाडी सावकाश चालवतो.” मला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचलो. गाडी मी इमर्जन्‍सी रूमच्‍या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्‍पिटलमध्‍ये घुसलो. सिक्‍युरिटी गार्डनी सांगितले, ” सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्‍ये शिफ्‍ट केलाय.” लिफ्‍टसाठी न थांबताच जिना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्‍ये पोहोचलो. पेशंटला बघितलं तर त्‍याची दोन्‍ही बुबुळं प्रसरण पावलेल्‍या अवस्‍थेत होती. श्‍वास पूर्णपणे बंद पडलेला  होता आणि व्‍हेंटिलेटर द्वारा श्‍वास देण्‍यात येत होता. 

नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते. मी त्‍यांना म्‍हणालो, ” पेशंट वाचण्‍याचे चान्‍सेस ५% पेक्षाही कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्‍याची एक संधी द्यायला हवी. थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही.तुम्‍ही ठरवा ! “

नातेवाईक चांगलेच हडबडले होते.त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्‍हता. तीन तासांमध्‍ये सगळं होत्‍याचं नव्‍हतं झालं होतं ! ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते, पण त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो, ” पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या.” आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटरमध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता.  जनरली ऑपरेशन करण्‍याआधी इन्‍फेक्‍शन कंट्रोल म्‍हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्‍हलॉनने १० मिनिटं स्‍वच्‍छ धुतलं जातं. तसेच ऑपरेशन करणारे डॉक्‍टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते. पण ती १७ मिनिटे सध्‍या मी देऊ शकत नव्‍हतो कारण मेंदूमध्‍ये प्रेशर खूपच वाढत होते, आणि अशा अवस्‍थेत एका सेकंदाला हजारो न्यूरॉन्‍सची(मेंदूच्या पेशी) डेथ होते(मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार )होत नाहीत. त्‍यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्‍तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्‍टरना सांगितले, “ऑपरेशनच्‍या साहित्‍याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्‍य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्‍य मी घेतो.” ऑपरेशन थिएटरमधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते, जणू काही प्रत्‍येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्‍न होता भूलतज्ञांचा. त्‍यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती. आणि ते आल्‍यावरही पूर्ण भूल देण्‍यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता, त्‍यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्‍थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्‍यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्‍याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेतला जात नाही, परंतू इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्‍यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्‍दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला. मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्‍त गोठून रक्‍ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्‍ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्‍या रिस्‍पॉन्‍सची वाट बघू लागलो. पुढच्‍या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वस्‍थितीत आला आणि मेंदूचे पल्‍सेशन (हालचाल) दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्‍हणजेच मला फोन आल्‍यापासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्‍याच्‍या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्‍स होण्‍यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले.

ऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतू अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्‍याची जाणीव होत होती. आज माझा सिक्‍स्‍थ सेन्‍स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्‍हणून मी लगेचच सीटी स्‍कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्‍ट सी.टी.स्‍कॅन युनिटमध्‍ये शिफ्‍ट करण्‍यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूला (डाव्‍या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये हा रक्‍तस्त्राव अजिबातच दिसला नव्‍हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले, त्‍यामध्‍ये कोणतीही रिअ‍ॅक्‍शन दिसत नव्‍हती.आता मला प्रश्‍न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्‍य आहे का? पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. प्रवीण सुरवशे

कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन, कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल, पुणे 

फोन : ७७३८१२००६०

प्रस्तुती : पार्वती नागमोती 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हृदयस्थ साक्षात्कार…. सुश्री संपदा वागळे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ हृदयस्थ साक्षात्कार…. सुश्री संपदा वागळे ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

वरवर पहाता एखाद्याच्या अंतःकरणाची कल्पना येणं कठीण ! नारळाच्या कठीण कवचाआड लुसलुशीत खोबरं दडलेलं असतं किंवा फणसाच्या‌ काटेरी आवरणाखाली गोड गरे लपलेले असतात, तद्वत अनेकदा बाहेरून कडक,रागीट वाटणाऱ्या व्यक्तीच्या आतही ममतेचा झरा झुळूझुळू वहात असतो. जेव्हा हा हृदयस्थ साक्षात्कार होतो तेव्हा नतमस्तक होणं एव्हढंच आपल्या हाती उरतं.

मला आलेला हा अनुभव आहे महान अभिनेता विक्रम गोखले यांच्या बद्दलचा. सतरा वर्षांपूर्वीचा हा अनुभव त्यांच्या जाण्याने मनात पुन्हा एकदा लख्ख जागा झाला.

२००५ची गोष्ट. तेव्हा माझे यजमान कॅन्सरशी झगडत होते. ऑपरेशन झालं होतं. केमो सुरू होत्या. खूप अशक्तपणा आला होता. जेमतेम घरातल्या घरात फिरत होते इतकंच. एखादा दिवस आशा पालवीत उगवायचा तर पुढचा दिवस निराशेच्या खाईत ढकलायचा.असंच एकदा एका उत्साहाच्या दिवशी सकाळी पेपर वाचताना ते  म्हणाले, ” येत्या शनिवारी गडकरीला विक्रम गोखल्यांचं ‘ खरं सांगायचं तर ‘ हे नाटक लागलंय. बरोबर सुप्रिया पिळगावकर आहे, म्हणजे मेजवानी आहे. वेळही रात्री साडेआठची आहे. म्हणजे आपली बॉडीगार्डही (सीए होऊन नुकतीच कामाला लागलेली आमची मुलगी,पल्लवी ) बरोबर असणार.हे जमवूया आपण…”

माझ्या समोरील अनेक प्रश्न मी गिळून टाकले. वाटलं न जाणो, सध्याच्या तणावयुक्त दिवसात हे नाटक थोडा ओलावा घेऊन येईलही. त्यानंतर एसीमध्ये तीन तास एका जागी बसण्यासाठी आमची तयारी सुरू झाली.

 बनियन, वर स्वेटर, त्यावर फुलशर्ट, पायात गुढघ्यापर्यंतचे वुलन सॉक्स, बूट असा पेहराव चढवून हे सज्ज झाले. मधे खाण्यासाठी नाचणीची बिस्किटे, राजगिऱ्याची चिकी, आवळा सुपारी, पाण्याची बाटली, खोकला आला तर खडीसाखर, उलटी आली तर प्लॅस्टिक पिशवी इत्यादींनी माझी पिशवी गच्च भरली.

नाटक रहस्यप्रधान होतं. बघता बघता हे त्यात गुंतून गेले. आमचं मात्र अर्ध लक्ष यांच्याकडेच होतं. बऱ्याच दिवसांनी मिळालेलं वेगळं वातावरण,वेगळा विषय यामुळे स्वारी खुशीत होती. तो आनंद आमच्याही तनामनावर पसरला.

नाटक संपल्यावर पल्लवी म्हणाली, ” तुम्ही दोघं गेटजवळ थांबा. मी गाडी काढून तिथे येते.” आम्ही बरं म्हणून गेट जवळ तिची वाट पहात थांबलो. पण एक एक करत सर्व गाड्या गेल्या, तरी हिचा पत्ता नाही. म्हणून काय झालं ते बघायला आम्ही पार्किंगच्या जागी गेलो. बघतो तर तिथे तिची गाडीशी झटापट सुरू होती. आमच्या त्या जुन्या मारुती 800 ने असहकार पुकारला होता. हे पाहताच यांच्यातील इंजिनिअर जागा झाला.

“स्पार्क प्लग गेलाय का बघ, बॉनेट उघड. पाणी संपलय का पहा…” सूचना सुरू झाल्या आणि तिची निमूट अंमलबजावणी.

होता होता पार्किंगमध्ये फक्त आम्ही तिघेच उरलो . आमच्या गाडीच्या मागे एकच आलिशान कार उभी होती. नाटक संपून अर्धा तास झाला. घड्याळाचा काटा पावणेबारावर गेला. मी यांना म्हटलं, ” अहो,राहू दे ना आता. आपण गाडी इथेच सोडून रिक्षाने घरी जाऊया. उद्या मेकॅनिकला पाठवून गाडी आणू. आणखी उशीर झाला तर रिक्षाही मिळायची नाही…”

पण यांच्यातील इंजिनियरला एव्हाना चेव चढला होता. ते माझं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. इतक्यात कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज आला. बघितलं तर खुद्द विक्रम गोखले आपल्या एका सहकाऱ्याशी बोलत आमच्याच दिशेने येत होते. म्हणजे मागची गाडी त्यांचीच होती तर ! आम्हाला अगदी कानकोंडं झालं. मी खालमानेने त्यांची गाडी काढायला जागा आहे ना हे बघून घेतलं. वाटलं,’ हे लौकर कटलेले बरे, त्यांच्यासमोर शोभा नको.’ म्हणून आम्ही तिघेही बॉनेटमधे डोकं घालून ते जाण्याची वाट बघत राहिलो.

पण झालं भलतंच ! कानांवर शब्द आले, ‘ गाडी बंद पडलीय का ?’ चक्क विक्रम गोखले आम्हाला विचारत होते.

मी मानेनेच हो म्हटलं. यांच्याकडे पाहून एकंदर परिस्थिती त्यांच्या लक्षात आली असावी. आम्हाला काही कळायच्या आत त्यांनी आमच्या गाडीचा ताबा घेतला. आजूबाजूला शोधून एक तार आणली. कसल्याशा पॅकिंगसाठी रुपयाचं नाणं काढलं. आपल्या सहकलाकाराला हाताशी धरून रात्री बारा वाजता त्यांचा हा खटाटोप सुरू झाला.

साडे तीन तासांच्या तणावपूर्ण नाटकानंतर हा अभिनयाचा बादशहा पुसटशीही ओळख नसलेल्या प्रेक्षकांसाठी जीवाचं रान करत होता. काटा साडेबारावर सरकला. विक्रम गोखल्यांचे दोन्ही हात काळे झाले होते. तरी ते सोडून द्यायला तयार नव्हते. आम्ही पूर्ण संकोचून बाजूला उभे. वाटलं म्हणावं, ” मला तुमचं काम खूप आवडलं, मी तुमची फॅन आहे…” पण वाटलं ,या क्षणी हे अगदीच कृत्रिम होतंय. इतक्यात ते आपल्या मित्राला म्हणाले, ‘ आपण ढकलतंत्र वापरून बघूया.’  त्या बिचाऱ्याने मान हलवली. तोही आमच्यासारखाच हतबल ! हा नटसम्राट त्या जुन्या गाडीच्या व्हीलवर बसला, आणि त्यांचा तो मित्र व हाक मारून बोलवलेला वॉचमन दोघे गाडी ढकलू लागले.

माणुसकीचा हा गहिवर पाहून त्या गाडीलाही पाझर फुटला. इंजिनाने फुर्र…फुर्र करत साथ दिली. गाडी तशीच चालू ठेवत त्यांनी पल्लवीला भरपूर सूचना दिल्या. सिग्नलला देखील इंजिन बंद करू नको हे बजावून सांगितलं. रंगायतनच्या इमारतीला वळण घेऊन आम्ही बाहेरच्या रस्त्याला लागेपर्यंत ते तिथेच उभे होते.

जे घडलं त्यातून भानावर यायला आम्हाला पाच मिनिटं लागली. त्यांचे आभार मानायचेही राहून गेले.अर्थात त्या शब्दांची गरज होती असं नाही मला वाटत.

त्यावेळी मोबाईल नसल्यामुळे या प्रसंगाचा फोटो काढायचा राहिला. पण त्या भेदक नजरेच्या, भारदस्त व्यक्तिमत्वाच्या हळव्या हृदयाची अप्रतिम छबी मात्र काळजावर निरंतन कोरली गेली.

लेखिका : सुश्री संपदा वागळे

waglesampada@gmail.com

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares