मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘आनंद पोटात माझ्या मायीना’ – सुश्री वर्षा बालगोपाल☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

‘पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी’, गाणे गात एक भिकारी जात होता. आजीने या गाण्यातील तत्त्वज्ञान छोट्या बंड्याला सांगितले आणि म्हटले, “अरे, असे भिक्षा मागून पोटाला भरणार्‍या, हातावर पोट असलेल्या , पोटाचा प्रश्न असणार्‍या , सगळ्यांना मदत करणे आपली संस्कृती आहे. आपल्या पोटासाठी केलेल्या अन्नातील काही अन्न भुकेल्यांना गरजूंना द्यावे म्हणजे मग त्यांचे समाधानाने भरलेले मन पाहून आपले पोट भरते.”

बंड्याला जरी सगळे समजले नाही तरी त्याने काही अन्न पोटात कावळे ओरडणार्‍या त्या भिक्षेकर्‍याला दिले.

नंतर त्याची पोटपूजा चालू झाली तशी आजी अजून त्याच्या पोटात शिरत म्हणाली, “तुला भूक का लागली?” बंडू म्हणाला, “काल पासून पोट उपाशी आहे म्हणून.” “बरोबर. म्हणूनच तुझे पोट खपाटीला गेले ना? अरे, आपल्या लेकरांच्या, आई वडिलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील पोटाला चिमटा घेऊन काम करत असतात बरं.

म्हणून घरात सुखशांती समृद्धी येण्यासाठी, तुला काय सांगते ते ऐक. पोट भरलेले असले ना , किंवा पोटात चारघास घातलेले असले ना की सगळे सुलभ होते. पण त्यासाठी आधी त्या परमेश्वराचे आभार मानायला हवेत. आधी पोटोबा मग विठोबा करू नये. देवाने सगळ्यांना पोट दिले आहे ना? सगळ्यांचे जीवन हे कशासाठी? पोटासाठी असते. तरी सगळ्यांना सारखे मिळत नसल्याने कोणाला पोट मारावे लागते, कोणाला पाणी पिऊन पोट भरावे लागते याचेच भान ठेऊन पोट तडीला लागेल एवढे खाऊ नये. एक तीळ सात जणांनी वाटून खावा म्हणून आपल्या अन्नातील काही भाग कायम दान करावा. दुसरे असे की आपल्यापेक्षा दुसर्‍यांकडे जास्त आहे म्हणून आपले पोट दुखू देऊ नये. कोणाच्या पोटावर पाय देऊ नये. कोणाला शिक्षा करायची झालीच तर एक वेळ पाठीवर मारावे पण पोटावर मारू नये.

तुम्ही पोटची पोरं रे. तुम्हाला अशी जीवनसुत्रे लहानपणापासूनच समजलेली बरी,”असे सांगून तिने बंड्याला पोटाशी धरले. 

आजी पुढे म्हणाली,”जे सुखवस्तू कुटुंबातले असतात त्यांची पोटे सुटलेली असतात. पोटाचा नगारा झालेला असतो. त्यांना गरीबांची दु:खे समजत नाहीत. ते अप्पलपोटीपणा करतात . आपला हेतू साध्य करण्यासाठी हे लोटपोट लोक पोटात एक ओठात एक नितीने वागतात . स्वत: च्या फायद्यासाठी ते दुसर्‍यांची पोटे जाळतात मग त्यांना पोटा ( कायदा) लागतोच. “

आजीने पोटतिडकीने सांगितलेले सगळे बंड्याला पटले. एका अनामिक हुरहुरीने त्याच्या पोटात कालवले. त्याचे समाधान पोटात न राहता चर्येवरून ओसंडत होते.

तेवढ्यात बंड्याची १३-१४ वर्षाची बहीण सोनी पळत पळत आजीच्या कुशीत शिरली. तिच्या पोटात भीतीने गोळा आला आहे हे समजत होते.आजीने विचारले, “सोनी, काय झालं बाळा?” सोनी म्हणाली, “आजी, मला आताच लग्न नाही करायचे. मला शिकायचंय.”

आजी म्हणाली, “हो की. अगं, अजून तुझं वय पण नाही झालं.”

“पण तो लखूशेठ आहे ना त्याच्या पोटात काही काळंबेरं आहे. तो लग्नाची गोष्ट घेऊन अण्णांकडे आला आणि अण्णांनी पोटदुखीवाला औषधाला आला त्याच्या बेंबीवर आयोडिनचा बोळा सारखे लगेच ‘आमच्या सोनीशी करशील का लग्न?’ विचारले आन तो तयार झाला.”

आजीचाही भीतीने पोटशूळ उठला.उगाच पोट गुरगुरू लागले. आजी म्हणाली, “मी समजावीन हो अण्ण्याला. तू नको भिऊस.”

अण्णाला समजावून आजीने ते संकट दूर लोटले. तर सोनीची चुलत बहीण मोनी-सात महिन्याची  पोटूशी- ती आजीपाशी आली. आजी गमतीनं म्हणाली, “आता जे काय आहे,ते अजून दोन महिने पोटातच ठेव बाई. मग दोन महिन्यांनी ते पोटात मावेनासे झाले की येऊ दे पोटातले मांडीवर.”

सगळेच पोट धरून हसले.

आजी मोनीला म्हणाली, “अगं मोने, तुमचा तसा नवाच संसार आहे. त्यात आता खाणारे तोंड वाढणार. म्हणून तुला पण चार गोष्टी सांगते बाई.  नेहमीच गोगलगाय पोटात पाय, असं असू नये.  तसेच पाठी येईन पोटी येईन पण सूड घेईन असे विचारही पोटात ठेवू नकोस. त्या बाळावर असले संस्कार करू नकोस. पण नवर्‍याला पोटाला न खाता  खर्च करण्याच्या वृत्तीपासून पोटातले ओठावर आणत घडाघडा बोलून दूर करण्याचा प्रयत्न कर.

अगं,प्रेमाचा मार्ग पोटातूनच जातो. तर प्रेमाने पोटात शिरून हे तू सहज साध्य करशील.

बरं, चल. तुला काहीतरी खावंसं वाटत असेल ना? तुझ्या पोटाच्या नावाखाली सगळ्यांच्या पोटाच्या वळलेल्या दामट्या सरळ करू. सगळ्यांनाच पोट खळबळल्याची जाणीव झाली. पोटार्थी असलेले सगळे खाण्यासाठी सज्ज झाले.  खरं तर आजीचं वयाने पाठ पोट अगदी एक झालं होतं.पण काटक आजीने मस्त चमचमीत झणझणीत थालीपिठं केली. हे आजीचं प्रेम सगळ्यांनीच पोटात बांधलं. त्यावर आडवा हात मारताना पोटात जागा नव्हती, तरी चार घास जास्तच खाल्ले. पोट डम्म झालय, म्हणत दिलेल्या तृप्तीच्या ढेकराने आजीच्या पोटात आनंद मावेनासा झाला.

लेखिका: सुश्री वर्षा बालगोपाल

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुठे शोधीसी…? ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ कुठे शोधीसी…? ☆ श्री अरविंद लिमये ☆

आपलं संपूर्ण जगणंच व्यापून टाकणारा, अपरिमित ऊर्जा ठासून भरलेला असा एक शब्द म्हणजे शक्ति ! हा शब्द स्वतःच शक्तिशाली आहे कारण शक्तिची असंख्य रुपे त्याने स्वतःत सामावून घेतलेली आहेत.

शक्ति या शब्दाच्या अर्थात लपलेले विविध बारकावे लक्षात घेतले तर जगरहाटीतलं शक्तिचं आस्तित्व आणि महत्त्व दोन्हींची कल्पना येईल.

शक्ति म्हणजे सामर्थ्य,बळ,जोर ताकत तसंच कुवत,दम आणि रगही.शक्ति म्हणजे प्राबल्य, क्षमता, मातब्बरी जसं तसंच त्राण, जोश, प्रभाव, पात्रता,अवसान,आवेग आणि आवाका सुध्दा!शक्ति म्हंटलं की हे सगळं सहज सुचणारं पण म्हणून फक्त एवढंच नाही तर यापेक्षाही बरंच कांही विचारप्रवृत्त करणारं आणि जगणं सजग करणारंही.

हिंदू धर्मानुसार जागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेली अतिशय प्राचीन अशी नैनादेवी, अमरनाथ, पुष्कर, अमरकंटक, सोमनाथ, वृंदावन, अंबाजी, मानसरोवर.. अशी एकूण पन्नास शक्तिपीठे आहेत.या आणि अशाच श्रध्देने मनात जपलेल्या इतरही विविध  दैवतांची ही शक्तिशाली देवस्थाने म्हणजे दैवीशक्तीची जनमानसातील प्रतिकेच! या श्रद्धेमुळे मिळणारी मन:शांती वादातीत असली तरी जीवन व्यतित करताना रोजच्या व्यवहारांसाठी अशा परस्वाधिन मन:शांतीकडे अनेकदा प्रश्नांची सोडवणूक करणारा एकमेव मार्ग म्हणून पहाणे उचित ठरणारे नाही.खरंतर त्यासाठी  शक्तिची प्रतिकारशक्ती,सहनशक्ती क्रयशक्ती, प्राणशक्ति, आत्मशक्ति,विचारशक्ति अशी इतर रुपेही प्रयत्नपूर्वक अभ्यासून त्यांची प्राप्ती होण्यासाठी प्रयत्नशीलही रहायला हवे.  

इथे दैवी शक्तीला नाकारणे अपेक्षित नाहीय तर तीच दैवी शक्ती कणरुपाने आपल्याठायीही वसते आहे हे लक्षात घेऊन शरीर आणि मनाच्या संदर्भात लिहिण्याच्या ओघात वर उल्लेख केलेली आणि इतरही शक्तिरुपे आपल्या भावनिक, मानसिक, बौध्दीक, शारीरिक आणि आत्मिक उत्कर्षासाठी कशी महत्त्वाची ठरतात हे जाणून घ्यायला हवे.हे साध्य होण्यासाठी, हे  शोधण्यासाठी कुठे बाहेर फिरत बसायची गरज नाहीय तर त्यासाठी फक्त स्वतःच्या आंत जाणीवपूर्वक डोकवायला हवे फक्त ! हे फार अवघड नाही आणि मनावर नाही घेतले तर सोपेही नाही !

‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हे खरेच,पण ते फक्त जन्म न् मृत्यू यापुरतेच.या दोन टोकांमधला प्रवासही जर आपण प्रत्येक क्षणी स्वतःला सर्वच बाबतीत पराधीन समजून ‘असेल माझा हरी…’ म्हणत प्रयत्नांची पराकाष्ठा न करता खाटल्यावर झोपूनच रहाणार असू तर परमेश्वराने जे असं इतकं मोलाचं आपल्याला दिलेय त्याची पुसटशीही जाणीव आपल्याला कधी होणंच शक्य नाही!

 हे मोलाचं म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं परिपूर्ण उत्तर एका शब्दात द्यायचं तर शक्ति!

 शक्ती म्हणजे सामर्थ्य, कुवत,  क्षमता हे झालंच. पण शक्ति या शब्दात सामावलेलं याही पलिकडचं बरंच कांही शक्ति या शब्दाचे अर्थ व्यक्त करणाऱ्या अशा मोजक्या शब्दांत मावणारं नाहीय.

 शक्ति म्हटलं की चटकन् नजरेसमोर येते ती आपली शारीरिक क्षमता. सहजपणे दृश्य रूप असणारी,अनुभवता येणारी ही शरीरक्षमता शरीराच्या स्वाधीन मात्र नसते.ती पूर्णतःपरस्वाधिनच  असते. आपण आपली शरीरक्षमता शिस्तबद्ध आचार आणि प्रयत्न याद्वारे सक्षम ठेवू शकत असलो तरी ते आपल्या मनाची साथ असेपर्यंतच. मन अस्वस्थ असेल तर  मनातील भावनांच्या कल्लोळामुळे निर्माण होणाऱ्या  अस्थिरतेत ही प्रयत्नपूर्वक मिळवलेली शारीरिक क्षमता जशी वेगाने कमीही होऊ शकते तसेच एरवी स्वस्थ,आनंदी असणारे मनही आपल्या शारीरिक आजार,तक्रारी यामुळे निर्माण होणाऱ्या बेचैनीच्या सावल्यांनी ग्रासूनही जाऊ शकते.

 याचाच अर्थ शारीरिक शक्ति आणि मनोबल याचा विचार करता शरीर आणि मन दोन्हीही याबाबतीत पूर्णतः परस्परावलंबी असतात हे ओघाने आलेच. शरीरमनाचा हा एकोपा अबाधित ठेवणं बऱ्याच प्रमाणात आपल्या हाती असेलही कदाचित पण त्यासाठी आवश्यक असणारी सजगता मात्र खूप कमी जणांकडे असते.त्यासाठी आवश्यक आहे ते आनंदी जगण्याचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करणं.पण सर्रास भौतिक सुखाला सर्वाधिक प्राधान्य देणाऱ्या आजच्या जीवनशैलीत ही रहस्यउकल सहजशक्य होणं कठीणच.कारण त्यांची निकड जाणवण्याइतकी उत्कट भावना व्यवहारी मन आणि विचारांमुळे निर्माण होणे अशक्यप्राय असते.

 जगणं आनंदी करण्यासाठी स्वतःच्या नैसर्गिक क्षमतांचे यथायोग्य आकलन करून घेऊन त्याचा योग्य वापर करणारे त्यामुळेच हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच असतील.

इथे स्वतःच्या नैसर्गिक क्षमता म्हणजे शारीरिक क्षमता किंवा मनाचा कणखरपणा, मनोबल वगैरे शब्दांतून व्यक्त होणाऱ्या मनाच्या क्षमता अभिप्रेत नाहीयेत. इथे अभिप्रेत आहे ते याही पलीकडचं ‘अंत:प्रेरणा’, ‘आतला आवाज’ वगैरे जिथून उमटतं कसं गृहित धरलेलं असतं ते. चराचर व्यापूनही कणभर उरत असणारं जे परमतत्त्व ते आपल्या अंतरातही जिथं वसलेलं असतं ते ! ते प्रत्येकाच्याच अंतरात असतंच !!

आपल्या विचारांमुळे, कृतीमुळे कुणालाही न दुखावता वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य विचार करून आपल्या      सद्सद्विवेकाला साक्षी ठेवून कार्यमग्न असणारी नास्तिक व्यक्ती देवाचं आस्तित्त्व न मानताही सुखी,आनंदी आणि यशस्वी जीवन जशी व्यतीत करु शकते तशीच एखादी आस्तिक व्यक्तीही देवपूजा,व्रतवैकल्ये, शुचिर्भूत विचार यांची कास धरून परमेश्वरावरील अतूट श्रद्धेने वाटचाल करीत जीवन कृतार्थही करू शकते.याचाच अर्थ वैचारीक बैठक वेगळी असली तरी आपल्या निसर्गदत्त क्षमतांचं महत्त्व जाणून घेऊन त्याचा पुरेपूर वापर करणेही अवघड नसते.या क्षमता हीच खरी निसर्गदत्त शक्ति! ही शक्ति नेमकी असते कुठे ?आणि ती सहजपणे जाणवत कशी नाही? असे प्रश्न पडले तरच त्यांच्या उत्तरांचा शोध सुरु होईल आणि त्या शोधवाटांवरचा प्रवासही!

या प्रश्नांचं उत्तर म्हंटलं तर अगदी सरळ साधं पण ते प्रथमदर्शनी तरी अनाकलनीय वाटेल असंच.

जळी,स्थळी,काष्ठी,पाषाणी जसा परमेश्वर तशीच ही परमशक्तीही ‘यत्र तत्र सर्वत्र’! त्यामुळेच ती अंशरूपाने आपल्याच अंतरातही वास करीत असतेच. ती सुप्त असल्यामुळे जाणवत नाही. तिला जाणून घेणे, ओळखणे हे जाणिवपूर्वक केले तरच शक्य असते.

आपल्याला निसर्गाकडून प्राप्त झालेल्या असंख्य क्षमतांसारखीच अतिशय मोलाची देन म्हणजे आपलं अंतर्मन! आपलं अंतर्मन म्हणजे आपल्या स्वतःच्या स्वाधीन असलेलं एक परमशक्तीकेंद्रच! निसर्गाकडूनच बहाल केलं गेलेलं ज्याचं त्याचं हक्काचं असं एक गूढ शक्तिपीठ! अगदी कलियुगातही थक्क वाटावेत असे चमत्कार घडवण्याची अपारशक्ती या शक्तीपीठातच सामावलेली आहे. वरवर पाहता आपल्या शरीर न् मनाची सूत्रं मेंदूकडे असतात असं आपण समजतो तो मेंदूही खऱ्या अर्थाने अधिकारकक्षेत येतो ते या अंतर्मनरूपी शक्तीपीठाच्याच! सर्वसाधारण दैनंदिन व्यवहार मेंदूच्या स्वाधीन करून अंतर्मन सुप्तावस्थेत रहाते खरे पण अचानक उद्भवलेल्या कसोटीच्या,आकस्मिक आणीबाणीच्या क्षणी आपल्याही नकळत तत्परतेने घडणाऱ्या आपल्या प्रतिक्षिप्त क्रिया घडवल्या जातात ते अंतर्मनाने समयसूचकतेने मेंदूला दिलेल्या तत्क्षणीच्या सूचनांमुळेच. अंत: प्रेरणा म्हणतात ती हीच! आपलं शरीर,मन,बुद्धी या  त्रिशक्तींचं भान सकारात्मक विचार आणि मूल्याधिष्ठित आचार यामुळे जाणिवपूर्वक प्रदूषणरहित ठेवण्याचा प्रयत्न प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण असेल तर अशा कसोटीच्या,आणीबाणीच्या, आकस्मिक संकटाच्या क्षणी कार्यरत होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया एखादा चमत्कार घडावा तशी आपलं सुरक्षाकवच बनून आपल्याला सावरतात.आपलं रक्षण करतात. आणि त्या मागचं रहस्य माहित नसलेले आपण ‘माझी वेळ चांगली होती’, किंवा ‘ही परमेश्वराचीच कृपा’ असे म्हणून आपले समाधान करुन घेतो. पण ती खरंतर आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचीच किमया असते!ही परमशक्ती हाच आपला अंतरात्मा..! पण हे कार्यकारणभाव आपण कधी जाणीवपूर्वक समजून मात्र घेतलेले नसतात.

हे समजून न घेतल्यामुळेच आपल्या आयुष्यभराच्या या जगातल्या वास्तव्यात आपल्या अंतर्मनाच्या सुप्तशक्तीचा वापर फार फार तर एखादाच टक्का केला जात असतो आणि एवढी मोलाची बाकी राहिलेली 99% परमशक्ती मात्र कधी वापरलीच न गेल्याने सुप्तावस्थेतच नाहीशी होत असते!

एरवीची आपली इच्छा कितीही प्रबळ असली तरी ती इच्छाशक्ति आपल्या अपेक्षेनुसार म्हणावी तशी सक्षम असूच शकत नाही. ती जेव्हा आपल्या अंतर्मनातून तिथल्या आंतरिक सशक्ततेने  वर झेपावते तेव्हाच ती इच्छाशक्ति ‘उत्कट’ असते आणि अशी उत्कट इच्छाशक्तिच आश्चर्यकारकरित्या फलद्रूप होऊ शकते!

‘कुठे शोधीसी रामेश्वर अन् कुठे शोधीसी काशी….

हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी..’ अशी आपली अवस्था आहे ते हे अंतर्मनाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न आपण कधीच न केल्याने. ते गूढ उकलण्याच्या असंख्य सहजसोप्या वाटा शोधण्यासाठी निखळ श्रध्देचं बोट धरुन अध्यात्माच्या वाटेवर पडणारं आपलं पहिलं पाऊलच महत्त्वाचं. पुढची वाटचाल अंत:प्रेरणेनेच आपसूक सुकर होईल हे निर्विवाद!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

साधारणतः एखाद्या गोष्टीचा आपण आधी अभ्यास करतो, ती आत्मसात करतो आणि मग आपण त्या गोष्टीला मानायला लागतो. पण शाळेत असतांना एक बाई जणू छोटासा अभ्यासवर्गच घ्यायच्या. तेव्हा खरतरं स्वाध्याय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दल तसं काहीही आधी माहीती नव्हतं.पण तो वर्ग आवडला आणि मग मी माझ्या परीने स्वाध्याय म्हणजे नेमकं काय, पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांच्याबद्दलची माहिती अभ्यासायला सुरवात केली आणि त्या माहितीचा, स्वाध्यायचा आवाका बघून अक्षरशः आवाक झाले.

….खूपदा आपल्याला आपल्यात करायच्या सुधारणा, बदल हे कळत असतात खरं, पण ते म्हणतात नं कळतं पण वळतं नाही ह्यानुसार हे बदल, ह्या सुधारणा अत्यावश्यक असूनही आपण चक्क त्याकडे कानाडोळा करतो. मानवी स्वभावच आहे तो. पण कधीतरी ती वेळ येते आणि आपण आपल्यात ह्या बदलांचं आणि  सुधारणांचं बी रोवायला लागतो. हा सकारात्मक बदल आपल्यात खूप चांगलं चिंतन,मनन केल्यानेच होतो हे नक्की. मग ही ऊर्जा आपल्याला अमूलाग्र बदलवते,चांगल्या सुधारणा घडवून आणते.

हे सगळं स्वाध्यायमध्ये पण समजावून सांगितले आहे. १९ ऑक्टोबर– स्वाध्याय परिवाराचे प्रणेते मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. मा. पांडुरंगशास्त्री हे मराठी तत्त्वज्ञ होते, व्यासंगी होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर ‘ मनुष्य गौरव दिन ‘ म्हणून साजरा करतात.आज स्वाध्यायचे लाखो अनुयायी कॅरिबियन, अमेरिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, मध्य पूर्व आणि आफ्रिका यासह ३५ पेक्षा जास्त देशांमध्ये, प्रत्येक राहण्यायोग्य खंडात आढळू शकतात. श्री. आठवले यांचे ” देवाच्या दैवी पितृत्वाखाली वैश्विक बंधुत्व ” हे स्वप्न पूर्ण करणे हे स्वाध्याय परिवाराचे ध्येय आहे.

मा.पांडुरंगशास्त्री आठवलेंचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोजी रोहे या कोकणातील गावी झाला. शास्त्रींनी सरस्वती पाठशाळेत पारंपरिक शिक्षण,संस्कृत व्याकरण, वेदांत,साहित्य, इंग्रजी भाषा साहित्य, ह्यांचा सखोल अभ्यास केला. त्यांना पुढे रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सदस्यत्व देऊन सन्मानित केले होते.

त्यांनी ग्रंथालयातील सर्व शाखेतील प्रमुख लेखकांच्या ग्रंथांचे अध्ययन केले. वेद,उपनिषदे, स्मृती, पुराणे ह्यावर चिंतन,मनन केले.  मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत पांडुरंगशास्त्री यांनी संस्थेच्या व्यासपीठावरून नियमितपणे न चुकता वैदिकांच्या तेजस्वी जीवनवादाचा, म्हणजे थोडक्यात जीवन जगणे, जीवनाची आराधना करणे व जीवनावर खोल विचार करणे, ह्याचा प्रामुख्याने पुरस्कार केला.ह्या व्यासंगी व्यक्तीला अनेक पुरस्कार प्राप्त झाले.इ.स. १९९२ मधे त्यांना टिळक पुरस्कार मिळाला. तो पुरस्कार देतांना तेव्हाचे राज्यपाल चिदंबरम सुब्रमण्यम म्हणाले  ‘ विद्वत्ता आणि दैवी शक्तीचा संगम झाल्यावरच समाजाचे आणि देशाचे हित सुरक्षित राहते. पांडुरंगशास्त्री आठवले यांची शिकवण सर्व समाजाने आचरण्यात आणण्याची गरज आहे. पांडुरंगशास्त्री हे आजच्या युगातील देदीप्यमान आशेचा किरण आहेत.” खरचं किती अभिमानास्पद कर्तृत्व नं.

….अनुभवांच्या जोरावर मा.आठवले न्यायव्याकरणशास्त्रात व इंग्रजी भाषेत निष्णात झाले. वयाच्या २२ व्या वर्षी ते दादाजी भगवद्गीता पाठशाळेच्या व्यासपीठावरून रोज सायंकाळी भगवद्गीतेवर व रविवारी सकाळी सकाळी भारतीय परंपरेतील विविध दर्शनांवर व इतर विचारप्रणालींवर तरूणांचे अभ्यासवर्गही घेऊ लागले. दिवसभरातील मधला वेळ ते एशियाटीक सोसायटीच्या ग्रंथालयात आधुनिक मानव्य विद्यांवरील ग्रंथांचे वाचन करू लागले. त्याच बरोवर शरीरशास्त्राचाही अभ्यास केला. हा अध्ययन-अध्यापनाचा क्रम सततच चालू होता. जपानमध्ये आयोजित केलेल्या जागतिक धर्म परिषदेत त्यांना जाण्याचा योग आला. या परिषदेतील ‘अवतारवाद ’  व ‘ सामाजिक शक्ती-भक्ती ‘ या विषयांवरील त्यांचे प्रतिपादन अत्यंत प्रभावी ठरले. डॉ. कॉम्प्टन या नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन पदार्थ वैज्ञानिकाने भरघोस आर्थिक प्रलोभनांसह अमेरिकेच्या व्याख्यान दौ-याचे दादाजींना आमंत्रण दिले. दादा अंतर्मुख झाले आणि जागतिक किर्ती व प्रचंड पैशांचे प्रलोभन नम्रपणे नाकारून ते मायदेशी परतले.

भगवंत केवळ आकाशात नाही, मंदिरात नाही, तर माणसा-माणसाच्या ह्रदयात आहे. माणसातल्या या ईश्वरावर श्रद्धा ठेवण्याचा हा  संदेश देणारे स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले हे खरोखरच आदर्श, विचारवंत व्यक्तिमत्व होऊन गेलं. त्यांनी सामान्य  माणसाला स्वतःची ओळख देण्याचं, त्याला उभारी देऊन सक्षम बनविण्याचे उदात्त कार्य पार पाडलं. अंधश्रध्दा, फसवा ईश्वरवाद, व्यसने आणि परिस्थितीपुढे हतबल झालेल्या समाजाला गीता-विचारांची दिशा दाखवणा-या हया स्वाध्याय चळवळीला आणि तिचे  प्रणेते  मा. पांडुरंगशास्त्री आठवले ह्यांना नुकत्याच झालेल्या जयंती निमित्ताने शतशः प्रणाम.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दुसरी आई ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆  दुसरी आई  ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

 एकदा एका गरोदर पत्नीने मोठया उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले-

“आपल्याला काय होईल?

काय अपेक्षा आहे तुमची,

 मुलगा की मुलगी?

तुम्हाला काय वाटतं ?”

 

 त्यावर पती म्हणाला:-

“जर आपल्याला मुलगा झाला तर,मी त्याचा अभ्यास घेईन,

त्याला गणितं शिकवीन,

त्याच्याबरोबर मी मैदानावर

खेळायला, पळायला पण जाईन,पोहायला शिकवीन अशाअनेक गोष्टी मी त्याला शिकवीन.”

 

हसत हसत बायकोने

यावर प्रतिप्रश्न केला:-

“आणि मुलगी झाली तर?”

 

यावर पतीने खूप छान उत्तर दिले-

 

“जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही.”

 

 पत्नीने मोठया कुतूहलाने विचारले-

 “का?असे का.?”

 

पती म्हणाला,

” मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेल.

 

मी कसे आणि कोणते कपडे घालावेत,मी काय खायचं, काय नाही खायचं,कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे,

आणि काय नाही बोलायचं,हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल.

थोडक्यात जणू माझी

‘दुसरी आई’होऊन ती माझी काळजी घेईल.

 

मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन.

 

एखादया गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तोही ती आनंदाने समजून घेईल.”

 

पति पुढे म्हणाला-

“तिला नेहमी असे वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे.

 मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं, की माझ्या बाबांची मी छोटीशी आणि गोड बाहुलीच आहे.माझ्यासाठी ती आख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल.”

 

यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले-

“म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का,

की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेल,

आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही “

यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला:-

“अगं तसं नव्हे गं,कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल,

 पण त्याला हे सगळं शिकावं लागेल ,मुलीचं तसं नाही,

 मुली या जन्मतः हे सगळं शिकूनच जन्माला येतात.

एक वडील म्हणून तिला माझा,आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल”

 

निराशेच्या सुरात पत्नी म्हणाली,

“पण ती आपल्या सोबत आयुष्यभर थोडीच रहाणार आहे?”

 

यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणाला-

“हो.तू म्हणतीयेस ते खरंय.ती आपल्या सोबत नसेल,पण जगाच्या पाठीवर ती कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही.कारण ती आपल्या सोबत नसली तरी,आपण मात्र नक्की तिच्या सोबत असू.तिच्या हृदयात, तिच्या मनात, कायमचे!!

अगदी तिच्या शेवटच्या श्वासा पर्यंत.

 

 कारण,

 मुली ह्या परी सारख्या असतात,त्या जन्मभरासाठी, आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात !

 

खरोखर मुली ह्या,

परी सारख्याच असतात!

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – पुष्प – भाग ४० – परिव्राजक १८. गोमंतक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार– विचार–पुष्प – भाग ४० – परिव्राजक १८. गोमंतक ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

बेळगावहून स्वामीजी मार्मा गोवा मेलने निघाले आणि मडगाव येथे उतरले. बेळगावचे सुप्रसिद्ध डॉक्टर विष्णुपंत शिरगावकर यांनी गोव्यातल्या व्यवस्थेसाठी मडगाव इथले त्यांचे विद्वान मित्र सुब्राय लक्ष्मण नायक यांना परिचय पत्र दिले होते आणि स्वामीजींची निवास आणि भोजन व्यवस्था करायला सांगितली होती. स्वामीजींना घ्यायला स्टेशनवर नायक स्वत: जातीने हजर होते, तेही शेकडो लोकांच्या समवेत. आणि काय आश्चर्य त्यांनी स्वामीजींना घोडा गाडीतून मिरवणूक काढून समारंभपूर्वक घरी नेले. हे सर्व स्वामीजींना खूपच अनपेक्षित होते. आयुष्यात त्यांना असा अनुभव प्रथमच आला होता. स्वामीजींचा परिचय झाल्यावर त्यांनी सुब्राय नायक यांना आपला गोव्याला येण्याचा हेतु सांगितला. ख्रिस्त धर्माविषयीचे मूळ ग्रंथ त्यांना इथे अभ्यासायचे होते. ज्या ज्या प्रांतात जी जी वैशिष्ठ्ये असायची त्याची माहिती ते करून घेत.  

सुब्राय नायक हे तीव्र मेधाशक्ती असलेले वेदान्त आणि आयुर्वेद शास्त्राचे जाणकार होते. शिवाय संस्कृतमधील न्यायमीमांसा व  ज्योतिष यातही पारंगत होते. नायक हे त्यावेळी धार्मिक आणि सामाजिक नवजागरणाची धुरा वहात होते. त्यांच्यासाठी तर स्वामीजींचे आपल्या घरात वास्तव्य आणि सहवास म्हणजे एक चांगली पर्वणीच होती.

मठग्राम म्हणजेच मडगाव हे पोर्तुगीजांचा प्रभाव असलेले दक्षिण गोव्यातले ऐतिहासिक शहर. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मध्यभागी  पश्चिम घाटात वसलेला गोवा समुद्र तटावरील रमणीय भूभाग म्हणून सर्वांनाच आकर्षित करतो. १५१० पासून हा भाग पोर्तुगीजांच्या हुकूमाखाली जवळ जवळ साडेचारशे वर्ष होता. पोर्तुगीजांनी साम, दाम, दंड, भेद य मार्गाने इथले अनेक तालुके काबीज केले होते. आशियातले सर्वात मोठे ख्रिश्चन यात्रा स्थळ, ‘बसिलिका ऑफ बॉम जिझस’ इथे गोव्यात आहे. प्राचीन मंदिरं आहेत. या वास्तू वैशिष्ठ्यपूर्ण वास्तूकलेसाठीही प्रसिद्ध आहेत. विवेकानंदांचा गोव्याला भेट देण्याचा हाच उद्देश होता. देवदर्शना बरोबरच गोव्यातली प्रमुख स्थळे, तिथली धर्मपीठे, जुने चर्च, फोंडा प्रदेशातील मंदिरे, पुरातन देवालये यांची माहिती करून घेणे आणि या प्रदेशातील ग्रामीण आणि शहरी लोकजीवन, समाजावरील धर्माचा प्रभाव व इतिहास जाणून घेणे हा पण दूसरा उद्देश होता.

सुब्राय नायक यांच्या घराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. चारशे वर्षापूर्वी धर्मांध ख्रिश्चनांनी मडगावची ग्रामदेवता असलेल्या श्री दामोदर मंदिराचा आणि गावातल्या इतर हिंदू मंदिरांचा विध्वंस केला. हिंदूंना गावात एकही मंदिर शिल्लक राहिलं नाही. अशा परिस्थितीत नायक कुटुंबाने श्री दामोदर या आपल्या कुलदेवतेला राहत्या घराच्या मोठ्या गर्भगृहात स्थान देऊन वाचविले आणि पुढे सर्व हिंदूंना ते भक्तीसाठी खुले करून दिले. इथेच नंतर मठग्रामस्थ हिंदू सभेची स्थापना केली गेली. मडगावातल्या आबाद फारीया  रोडवरचं ‘नायक मॅन्शन’ सामाजिक संस्कृतिक आणि नियमित उपक्रमाचं स्थान बनलं. याला दामोदर साल म्हणून ओळखतात. साल म्हणजे हॉल. गोव्यातील काही विशिष्ट घरांपैकी सुब्राय नायक यांचं पारंपारिक चौसोपी वाड्याचे एक प्रशस्त घर जिथे स्वामीजी काही दिवस राहिले होते.

स्वामीजींच्या सहवासामुळे त्यांची समाजोद्धाराची तळमळ, वैदिक तत्वज्ञानाद्वारे लोकांची उन्नती करण्याची त्यांची क्षमता, जीवनातील सर्वोच्च कर्तव्याविषयी असलेली अत्त्युच निष्ठा पाहून सुब्राय नायक प्रभावित झाले . स्वामीजींच्या गायन वादनातल्या परिपक्वतेचा अनुभव सुद्धा यावेळी गोवेकर मंडळींनी घेतला.

इथल्या वास्तव्यात स्वामीजींनी एकदा एक चीज काही रागातून पाऊण तास गायली. सर्वजण आश्चर्य चकित झाले. नायक यांनी, लयकारीची उत्तम जाण असलेले प्रसिद्ध तबला वादक व संगीतातल्या पिढीजात घराण्यात जन्मलेले खाप्रूजी अर्थात लक्ष्मणराव पर्वतकर, यांना बोलवून घेतले आणि स्वामीजींसमोर तबला वादन करायला सांगितले. त्यांनी सफाईदार तबलावादन सादर केले. हे ऐकून स्वामीजी म्हणाले, “लाकडाच्या खोक्याच्या कडेवर बोटे फिरवून आवाज काढता, तसाच आवाज वरच्या चामड्याच्या थरातून काढता आला पाहिजे”. खाप्रुजींना हे काही पटेना. त्यांना वाटलं स्वामी चेष्टाच करताहेत. तोच स्वामीजी उठले, कोचावरून खाली बैठक मारून बसले आणि तबल्याच्या चामड्यातून सुंदर आवाज काढून दाखविला. हा प्रकार पाहून सर्व श्रोते दि:ग्मूढ झाले. पर्वतकर यांनी स्वामीजींची क्षमा मागून साष्टांग नमस्कार घातला. याच खाप्रूमामा पर्वतकरांना पुढे १९३८ मध्ये प्रख्यात गायक अल्लादिया खाँ यांच्या हस्ते ‘लयभास्कर’ पदवीने गौरविण्यात आले. स्वामीजींची भेट ही पर्वतकर मामांच्या आयुष्यातली भाग्याचीच घटना म्हणायला हवी.

स्वामीजींना गोव्यातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुरातन लॅटिन ग्रंथातून ख्रिश्चन धर्माचा इतिहास व तत्वज्ञान याचा अभ्यास करायचा होता. तिथल्या समाजावर होणार्‍या धर्मपरिवर्तनाचा प्रभाव जाणून घ्यायचा होता. असे दुर्मिळ ग्रंथ इथे उपलब्ध होते. रायतूर (राशेल) येथील सेमिनरी १५७६ मध्ये बांधलेले असे प्राचीन होते, तिथे प्राचीन हस्तलिखिते आणि मडगावतील प्रसिद्ध वकील जुजे फिलिप अल्वारीस यांना बोलवून स्वामीजीची ओळख करून दिली आणि सेमिनरी व तिथले ग्रंथ दाखविण्याची सोय नायक यांनी केली. तिथल्या पाद्रींची ओळख करून दिली, स्वामीजी दोन दिवस रायतूरला सेमिनरीत राहिले, स्वामीजींनी त्या सेमिनरीतल्या विद्यार्थ्यांची पण भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. आजही त्या लायब्ररीत स्वामीजींचा फोटो लावला आहे.

रायतूरच्या भेटीनंतर मडगावात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची जिकडे तिकडे चर्चा झाली. दूरदुरून पाद्री लोक तसेच ख्रिश्चन समाजातील अनेक विद्वान, जज्ज, बॅरिस्टर मडगावमध्ये त्यांना भेटायला येत. स्वामीजी फ्रेंच, लॅटिन, इंग्रजी भाषेत त्यांना आपली अभ्यासपूर्ण मतं समजाऊन सांगत. अशी अधिकारसंपन्न व्यक्ती सर्वजण प्रथमच पाहत होते, हे बघून सगळीकडे त्यांचं कौतुक होत होतं. सुब्राय नायक यांनी तर स्वामीजींच्या गुण गौरवासाठी श्री दामोदरच्या प्रांगणात मोठी सभा भरवली. याला लोक प्रचंड संख्येने हजर होते. त्यांनी शिकागोच्या धर्म परिषदेला जाण्यासाठी स्वामीजींना शुभेच्छा दिल्या. स्वामीजी वेंगुर्ल्याच्या नगर वाचनालयात ‘संचित,प्रारब्ध व क्रियामाण’ या विषयावर व्याख्यान द्यायला पण गेले होते. वेंगुर्ला हे अरब,डच, पोर्तुगीज या राजसत्तांनी निर्माण केलेलं महत्त्वाच व्यापारी बंदर होतं. इथे १६३८ मध्ये डच वखार होती. हा इतिहास जाणून घेण्यासाठी स्वामीजी प्रत्यक्ष तिथे गेल्याचे दिसते.

गोवा येथील कवळ्याच्या शांतादुर्गा मंदिरात त्यांनी काली मातेचं एक पद खड्या आवाजात म्हणून लोकांना मंत्रमुग्ध केलं होतं. म्हाडदोळच्या म्हाळसादेवी पुढे सुंदर ख्याल गायन केलं, श्री मंगेशाच्या देवळात रागदारीतलं ध्रुपद गायन केलं.

असा भरगच्च कार्यक्रम गोवा इथं पार पाडून स्वामीजी पुढच्या प्रवासासाठी धारवाडला जायला निघाले. तेंव्हा सुब्राय नायकांबरोबर अनेक प्रतिष्ठित लोक, शेकडो नागरिक, कॅथॉलिक पाद्री निरोप द्यायला आले होते. निघण्यापूर्वी नायकांनी स्वामीजींना एक फोटो काढून मागितला होता. हाच फोटो आज पण त्या दामोदर साल मध्ये लावला आहे. ज्या खोलीत ते राहिले ती खोली, त्या वस्तु आजही नायकांच्या वारसांनी सुरक्षित जपून ठेवल्या आहेत. सुब्राय नायकांनी पुढे १९१० मध्ये संन्यास घेतला आणि ते स्वामी सुब्रम्हण्यानंद तीर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले.  

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ORS चे जनक डॉ. दिलीप महालानोबिस – सुश्री योगीन गुर्जर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ ORS चे जनक डॉ. दिलीप महालानोबिस सुश्री योगीन गुर्जर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

आज आपल्याला अचानक अशक्तपणा आला , जुलाब वगैरे आजारामुळे शरिरातील पाणी कमी झाले तर डॉक्टर आपल्याला ORS– oral rehydration therapy– घ्यायला सांगतात. बाजारात सहज उपलब्ध असलेले पाच रुपया पासून लहान लहान पाकिट sachet आपण पाण्यात घोळुन पितो व दोन पाच मिनिटांत तरतरी वाटते .

आज जगभरात ORS वापरले जाते. या ORS चे जनक एक भारतीय डॉक्टर होते हे वाचून तुम्हाला धक्का बसेल.

ते आहेत प.बंगाल मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ दिलीप महालानोबिस. 

डॉ दिलीप महालानोबिस हे एक भारतीय बालरोगतज्ञ होते, जे अतिसाराच्या आजारांवर उपचार करण्यासाठी “ओरल रिहाइड्रेशन थेरपी “ च्या वापरासाठी प्रख्यात होते. १९६० च्या मध्यात त्यांनी भारतातील कलकत्ता येथील जॉन्स हॉपकिन्स इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग येथे कॉलरा आणि इतर अतिसाराच्या आजारांवर संशोधन केले. 

अशा जगभरातील कोट्यवधी लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे १६ ऑक्टोबर २०२२ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी कोलकता येथील एका इस्पितळात निधन झाले. 

( जन्म १२ नोव्हेंबर १९३२ )

त्यांचे कार्य नोबेल पारितोषिक मिळण्याइतके मोठे होते.

पण भारत सरकारने सुद्धा पद्म पुरस्कार दिला नाही.

तळ टिप:- यांच्या निधनाची मराठी माध्यमांनी दखल घेतली नाही म्हणून हा छोटासा लेख.

लेखिका : सुश्री योगीन गुर्जर 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बलिप्रतिपदा व भाऊबीज ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ बलिप्रतिपदा व भाऊबीज ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

बलिप्रतिपदा किंवा पाडवा

तिसरा दिवस बलिप्रतिपदा किंवा पाडवा ! या दिवशी आपले नवीन वर्ष सुरू होते. पाडवा हा एक चांगला मुहूर्त असतो, त्यामुळे सोने खरेदी, वाहन खरेदी यासारख्या मोठ्या खरेद्या या दिवशी केल्या जातात. पती-पत्नीच्या नात्याला नव्याने उजाळा देण्याचे काम पाडव्याच्या निमित्ताने होते. त्यामुळे बायकांना या दिवशी नवऱ्याकडून मनासारख्या भेटी मिळवता येतात. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळून मिळणाऱ्या ओवाळण्याची आतुरतेने वाट बघत असतात! असा हा आनंदाचा पाडवा असतो…. भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज! बहिण भावाच्या आनंदाचा दिवस! यानिमित्ताने मुली माहेरी येतात आणि आई वडील भावंडां बरोबर सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद आता शिगेला पोहोचलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकालाच काही ना काही भेटी मिळालेल्या असतात तसेच एकमेकांच्या भेटी ही होतात. सणाचे दिवस कसे संपतात कळत नाही पण चार दिवसाची दिवाळी आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा देऊन जाते! तसेही आता आपण वर्षभर फराळाचे पदार्थ खातोच, कपडे खरेदी तर कायमच चालू असते त्यामुळे याचे महत्त्व फारसे वाटत नाही.

पण पूर्वीच्या काळी फराळाचे पदार्थ, कपडा खरेदी या गोष्टी प्रासंगिक असत. त्यामुळे दिवाळी कधी येते याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असत. तरीही अजूनही आपल्याकडे दिवाळी म्हणजे दिव्यांचा आनंदाचा सण म्हणून आपण उत्साहाने साजरा करीत असतो…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भीमाबाईचं पुस्तक प्रेम… प्राची उन्मेष ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ भीमाबाईचं पुस्तक प्रेम… प्राची उन्मेष ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांची ‘ बैल ’, कवी शंकर बोराडे यांची ‘ गांधी ’, लक्ष्मण महाडिक यांची ‘ माती ’,लता पवार यांची ‘आपली मैत्रीण ’, प्रा.व.ना.आंधळे यांची ‘ आई,मला जन्म घेऊ दे ’, असे कवी आणि त्यांच्या कवितांमध्ये हरवून जायचं असेल तर तुम्हाला नाशिक-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावरील ‘ रिलॅक्स कॉर्नर ’ हे उपहारगृह गाठावं लागेल. भीमाबाई जोंधळे या सत्तर वर्षाच्या तरुण आजी हे उपहारगृह चालवत असून त्यांचं अनोखं पुस्तकप्रेम बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. त्यांच्या या उपहारगृहामध्ये पोटाच्या भुकेबरोबर वाचनाची भूक भागविण्यासाठी हजारो मराठी पुस्तके आहेत. 

पुस्तकं चाळता चाळता न्याहारी घेण्याची अनोखी शक्कल भीमाबाईंनी चालवली आहे. वय झालं म्हणून भीमाबाई हात बांधून बसल्या नाहीत. त्यांच्या हाताने बनलेली मिसळ आणि झुणका भाकर खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. केवळ चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या या आजी सकाळी चार वाजता उठतात. गेल्या बावीस वर्षांपासून त्या पेपर एजन्सी चालवत असून मोहाडी, जानोरी, सय्यद पिंप्री आदी ठिकाणी वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. सकाळी गठ्ठे बांधून त्या विक्रेत्यांना देत असतात. हे काम करता करताच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्याचे त्या सांगतात. त्यांचं शिक्षण खतवड शाळेत झालं. मोहाडीच्या देशमुख आणि धनगर गुरुजींचे संस्कार त्यांना मिळाले. शाळेत अण्णासाहेब कवडे यांच्या हाताने मिळालेल्या पाच रुपयांच्या आरश्याचे बक्षीस जीवनाला वेगळीच दिशा देऊन गेल्याचे त्या सांगतात. 

लग्न झाल्यावर अवघ्या दोन एकर जमिनीत त्या स्वतः पिके घेत असत. सहा रुपये रोजाने देखील त्या काम करीत असत. महामार्गावर बारा वर्षापूर्वी एक छोटी टपरी टाकून त्यांनी हॉटेल सुरु केलं. तेव्हाच वृत्तपत्र टाकण्याचे काम देखील सुरु झालं. मराठी वाचन माणसाला सुसंस्कृत बनवत असते याचा अनुभव आल्याचे सांगत, दोन तीन कविता देखील त्या म्हणून दाखवतात. कवी दत्ता पाटील यांनी देखील त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं. विशेष म्हणजे टपरीतून एका छोट्या हॉटेलपर्यंत त्यांचा प्रवास बघावयास झाला आहे. भीमाताईंनी नोटाबंदीच्या काळात अनेक भुकेलेल्यांना मोफत जेवण दिलं होतं. भीक मागणाऱ्यांना पैसे न देता खाऊ घालण्याची संस्कृती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. त्यांच्या उपहारगृहामध्ये प्रत्येक टेबलावर दोन पुस्तके ठेवलेली असतात. बाळा नांदगावकर,भाई जगताप,अरुण म्हात्रे, अतुल बावडे,बाबासाहेब सौदागर अश्या ज्येष्ठ, नामांकित साहित्यिक, कवींनी या हॉटेलला भेट देऊन आजींच्या कार्याचा गौरव केला आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा वाढदिवस असेल तर त्याला एक पुस्तक आजी भेट देतात. मुलांनी मोबाईलपासून दूर राहावे आणि पुस्तकाच्या दुनियेत हरवून जावे या उद्देशाने त्या पुस्तक वाचन चळवळ चालवत आहे. आता मुलगा प्रवीण हा आईच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे. त्याने आज पर्यंत तब्बल ७२ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची सून प्रीती यादेखील त्यांना या कामात मदत करीत असतात. 

पुस्तकांसोबत या हॉटेलमध्ये पारंपरिक वस्तू देखील बघायला मिळतात. पाटा, वरवंटा आदी वस्तू मुलांना दाखवून त्या कशा वापरायच्या याचं प्रात्यक्षिकही त्या देत असतात. मराठी पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रिलॅक्स कॉर्नरला भेट द्यायला हवी.

भीमाबाई सांगतात, “ मी गेली बावीस वर्ष वृत्तपत्र वाटपाचा व्यवसाय करते आहे. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे हॉटेल व्यवसाय सुरु केला. सध्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालल्याचं दिसतं. त्यातूनच मला ही कल्पना सुचली. आज आमच्याकडे शेकडो पुस्तके आहेत. त्याचे वाचन करण्यासाठी नाशिकमधून नागरिक येतात याचं समाधान वाटतं. ही पुस्तक चळवळ व्यापक व्हावी हीच अपेक्षा आहे.

– प्राची उन्मेष, नाशिक

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दाद देणे…. सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ दाद देणे…. सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कधी ही दाद ‘ अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..’ अशी खानदानी असते. कधी ‘असा बालगंधर्व आता न होणे..’ अशी काव्यात्म असते ,कधी ‘ आपके पाँव देखे, बहुत हसीन हैं , इन्हें जमींपर मत उतारिए,मैले हो जाएंगे,’ अशी रूमानी असते, तर कधी ‘ इक रात में दो-दो चाँद खिले’ अशी अस्मानी असते.

परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात  थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती. ‘बिच्चारी,’ अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच, लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले,”Your attire is so beautiful!! I like it! ” मला अशी चकित, आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास  करून गेली.

मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. ‘कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान’ असंच  म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढराशुभ्र ,चमकदारदाट बॉबकट आणि      

चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव!  बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं,”Excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. ” तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि  मला म्हणाली,” good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!” आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!

त्या दिवशी कोल्हापूरच्या ‘ ओपेल’ होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये ‘दहीबुत्ती’ हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार  कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला  🙂 )मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- ‘शेफसाहेब, तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! ‘तेरे हात मुझे  दे दे ठाकुर!’ असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ‘ टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले,”कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला,” तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?” मी म्हटलं,” त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!”

माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वैष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं, “वैष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल, असं नाही वाटत मला.” वैष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,

मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का, अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या, “मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,

वैष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला,” एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही.” त्या पुढे म्हणाल्या,” मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील.” मी चकित! वैष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण….! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!

बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची.

कोण प्राध्यापिका असतील,कशा   शिकवणा-या असतील अशा विचारात असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, “मी—. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे.”

माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या, खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकौशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं,” बाई,तुम्ही किती छान शिकवलंत…” आणि मला पुढे बोलवेच ना !  माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत…!!

लेखिका : सुश्री संजीवनी बोकील

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

 नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन

नरकासुराचा वध या दिवशी केला गेला म्हणून हा विजय उत्सवाचा दिवस! दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस! गेले चार आठ दिवस  घराघरातून दिवाळीची तयारी सुरू होत असे. घर स्वच्छ करणे, डबे लख्ख घासून पुसून ठेवणे, फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ बनवणे., लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळी हे तर व्हायलाच हवे, त्यातूनही उत्साह असेल तर अनारसे, चिरोटे! ज्या घरी दिवाळसण असेल तिथे तर अधिक उत्साह! लेक,जावई आणि सासरकडील मंडळी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी! या दिवशी लक्षात रहाते ते नरकासुर वधाचे रेडिओ वर लागणारे कीर्तन! लवकर उठून दिवे, पणत्या लावून घरातील बाईची लगबग सुरू होते.सुवासिक तेल चांदीच्या वाटीत काढून ,पाट रांगोळी करून सर्वांना उठवायची जबाबदारी जणू तिचीच!मग मुलांचे उठल्यापासून फटाके उडवायची घाई आणि आईची आंघोळीची गडबड यांत वेळ कसा जातो कळत नाही!मुले किल्ल्यावर मावळे मांडण्यात गर्क,तर मुली रांगोळी काढण्यात!मग सर्वांना एकत्र गोळा करून तो फराळाचा मुख्य कार्यक्रम!  आपल्या कडे पहिल्या दिवशी सकाळी सर्वांना ओवाळण्याची पध्दत आहे. हे सर्व झाले की आधी जवळ मंदिर असेल तर देवदर्शन आणि मग फराळ  हे चालू राही.! फराळ आणि त्या नंतर दही पोहे खाण्याची  आमच्या कडे पध्दत होती.त्यामुळे पोट थंड रहाते!

असा हा नरक चतुर्दशी चा पहिला फराळ झाला की दिवाळीची सुरुवात झाली… लक्ष्मीपूजन काही वेळा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एका च दिवशी असते. अशावेळी सकाळचे फराळ झाले की दुपारच्या लक्ष्मी पूजनाची तयारी करावी लागायची. एकदा लक्ष्मीपूजन झाले की दिवाळीचे महत्त्वाचे काम आवरलेले असे. आताही बराच वेळा लक्ष्मीपूजन झाले की लोक फिरायला बाहेर पडतात….

 व्यापारी लोकांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे असते. या दिवशी दुकान ची पूजा केली जाते. नवीन वह्या आणून वही पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला भाताच्या लाह्या, बत्तासे, पेढे याचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. बाजारपेठेमध्ये फटाक्यांची आतषबाजी  होते आणि दुकानांवर भरपूर रोषणाई केलेली असते. असा हा लक्ष्मीपूजनाचा सोहळा खूप महत्त्वपूर्ण असतो…

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares