मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 10 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

 

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 10 ☆ सौ. अमृता देशपांडे  

” श्यामची आई ” या साने गुरुजींच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आचार्य प्र.के.अत्रे लिहितात,” साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहून काढले. त्यातले प्रत्येक अक्षर न् अक्षर गुरुजींनी गहिवरल्या अंतःकरणाने आणि डबडलेल्या डोळ्यांनी लिहिले आहे. त्यातले प्रत्येक वाक्य गळ्यातून अन् दाबून ठेवलेल्या हुंदक्यातून निर्माण झाले आहे.

गुरुजींच्या जीवनाचा झरा शक्य तितका निर्मळ ठेवण्याची आटोकाट काळजी तिने घेतली. मन कशाने स्वच्छ करता येईल ? अश्रूंनी…म्हणून अश्रूंचे हौद परमेश्वराने डोळ्यांजवळ भरून ठेवले आहेत.’ असुवन जल सींच सींच प्रेमवेलि बोई ‘ हा अश्रूंच्या पाण्याने मन शुध्द करून त्यात प्रेम आणि भक्ती ची वेल वाढवण्याचा मीराबाईचा मंत्र गुरूजींना त्यांच्या आईनेच शिकवला. आपल्या जीवनवेलीला आत्मशुद्धीच्या आसवांचे शिंपण घालावयाला आईने गुरुजींना लहानपणापासून शिकवले. अश्रूंचा इतका उदात्त आणि सुंदर अर्थ कालातीत आहे,
” मिळतिल कवने, मिळतिल दुर्मिळ तत्त्वांचे बोल
दिव्य अश्रूंनो! तुम्हांपुढति परि
ते सगळे फोल……

समाप्त 🙏🏻

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नवरात्र आणि रत्नागिरीच्या किल्ल्यावरील भगवती देवी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ नवरात्र आणि रत्नागिरीच्या किल्ल्यावरील भगवती देवी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

बालपणीच्या काही आठवणी या कायमच्या मनामध्ये रुतून राहतात. आज पेठ किल्ल्यावरील भगवती मंदिराचा फोटो पाहिला आणि रत्नागिरीच्या आठवणी जाग्या झाल्या. नवरात्र सुरू झाले की हमखास भगवती देवीची यात्रा आठवते. या देवीचे मंदिर ज्या किल्ल्यावर आहे. त्याचे  ऐतिहासिक नाव जरी ‘रत्नदुर्ग’ असले तरी आमच्या लेखी तो ‘पेठ किल्ला’ आहे. एरवी शांत निवांत असलेल्या त्या किल्ल्यावर वर्दळ दिसे ती नवरात्रातच! त्या किल्ल्याच्या एका टोकावर दीपग्रह होते.तिथून समुद्राचे दर्शन होई.समुद्रातील दीपग्रह, त्यावरील पडाव, मोठ्या बोटी आणि निळा आसमंत पाहताना खूपच छान वाटत असे. किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावर भगवती देवीचे मंदिर होते. या ठिकाणी यात्रेनिमित्त लहानपणी जाणे होत असे.

गाभूळलेल्या चिंचेसारख्या आंबट गोड आठवणी ! शाळेत असताना नवरात्रात भगवतीच्या यात्रेला जाणे हा एक कार्यक्रम असे. पूर्वी वाहने कमी होती आणि रस्ता ही साधा होता. किल्ल्यावर चढून जायचे म्हणजे बराच वेळ लागत असे. नवरात्रात सकाळी लवकर उठून घरातील मोठ्या मंडळींबरोबर चालत जाऊन भगवती देवीचे दर्शन आणि तेथील जत्रा अनुभवात होतो. जरा मोठे झाल्यावर मैत्रिणींबरोबर जाण्यात अधिक मजा येई. जाताना वाटेत काकड्या घेणे, कोरडी भेळ घेणे आणि गप्पा मारत हसत खेळत किल्ला चढणे अशी मजा असे.

त्यावेळची एक आठवण म्हणजे बुढ्ढी के बाल ! गुलाबी रंगाचे ‘बुढ्ढी के बाल’ एका मोठ्या काचेच्या पेटीत घेऊन तो बुढ्ढी के बाल वाला फिरत असे, पण घरचे लोक ते चांगले नसते म्हणून घेऊ देत नसत आणि ते देत नसत म्हणून जास्त अप्रूप वाटत असे. किल्ल्यावर एक सिनेमावाला चौकोनी खोके समोर घेऊन उभा असे आणि तो सिनेमातील काही फिल्म दाखवत फिरत असे. अर्थात तिथेही आम्ही कधी गेलो नाही ! आम्ही फक्त मंदिरात दर्शन आणि भेळेची गाडी या दोनच गोष्टी पाहिल्या होत्या.

किल्ला चढताना वाटेत भागेश्वराचे मंदिर होते. त्याचा जिर्णोद्धार भागोजी कीर यांनी केला होता. थांबण्याचा पहिला टप्पा तिथेच असे. ते मंदिर आधुनिक पद्धतीने छान बांधलेले होते. तिथून पुढे मोठा चढ चढून देवीच्या मंदिरापर्यंत जाता येई. रत्नदुर्ग किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व होते. पण गावापासून लांब असल्याने फक्त नवरात्रातच आवर्जून जाणे होई. पावसाचे चार महिने संपल्यावर सगळीकडे भरभरून हिरवागार निसर्ग दिसत असे. जांभळी पिवळी रान फुले किल्ल्यावर पसरलेली दिसत. सूर्याची किरणे अजून तरी तापायला लागलेली नसत. त्यातच तिथल्या पावसाची एक गंमत असे. नवरात्राच्या पहिल्या एक-दोन दिवसात पाऊस पडला की तो माळेत सापडला असेच म्हणत. त्यामुळे नऊ दिवस आता रोज थोडा तरी पाऊस पडणारच असे म्हटले जाई. अर्थात पाऊस आता बेभरवशाचा झाला आहे. तो कधी कुठे येईल सांगता येत नाही. आम्हाला अर्थातच त्या रिमझिम  पावसात भिजायला आवडत असे. किल्ल्यावर जत्रेमध्ये हौशे,नवसे आणि गवसे असे सगळ्या प्रकारचे लोक भगवतीला येत असत. गावची जत्रा असल्यामुळे खेळण्याचे स्टॉल्स, खाऊची दुकानं, नारळ, उदबत्ती, बत्तासे, साखरफुटाणे, यांची दुकाने अशी अनेक प्रकारची तात्पुरती दुकाने असत.

आम्ही जत्रेत फिरून थोडाफार खाऊ घेत असू.  बरोबर आणलेले डबे खाल्ले जात ! बाहेर विकत घेऊन खाण्याचे ते दिवस नव्हते. सातव्या माळेच्या जत्रेचे विशेष महत्त्व असे. त्यादिवशी शाळा लवकर सुटायची, तोच मोठा आनंद असे. पुढे कॉलेजला गेल्यावर आनंदाचे विषय बदलले. किल्ल्यावर जाता येताना पिपाण्या वाजवणे, टिकटिकी घेणे, फुगे घेणे, दंगा करणे, यासारखे तरुणाईचे उद्योग चालू असत ! तेव्हा ती पण एक मोठी मजा होती. आज भगवती मंदिराचा फोटो व्हाट्सअप वर पाहिला आणि पुन्हा एकदा त्या जत्रेतील पाळण्यातून वर- खाली वेगाने माझे मन भूतकाळात फिरून आले.

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प,भाग ३८ परिव्राजक १६.बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प भाग ३८ परिव्राजक १६.बेळगांव ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

स्वामीजी १६ ते २७ऑक्टोबर १८९२ मध्ये बेळगांवमुक्कामी आले. महाराष्ट् म्हणजे तेव्हाचा मुंबई प्रांत ! तेव्हा बेळगांव मुंबई प्रांतात होते. कोल्हापूरहून भाटे यांचे नावाने गोळवलकर यांनी परिचय पत्र दिलं होतंच.  श्री. सदाशिवराव भाटे वकिलांकडे स्वामीजींचं अत्यंत अगत्यपूर्वक स्वागत झालं. त्यांना पाहताक्षणीच हा नेहमीप्रमाणे एक सामान्य संन्यासी आहे अशी समजूत इथेही झाली असली तरी त्यांचं काहीतरी वेगळेपण आहे हे ही त्यांना जाणवत होतंच. भाटे कुटुंबीय आणि बेळगावातले इतर लोक यांना कधी वाटलं नव्हतं की काही दिवसांनी ही व्यक्ती जगप्रसिद्ध होईल. बेळगावचे हे श्री भाटे वकिल यांचे घर म्हणजे विदुषी रोहिणी ताई भाटे यांच्या वडिलांचे घर होय.

मराठी येत नसल्यामुळे भाटे कुटुंबीय स्वामीजींशी इंग्रजीतच संवाद साधत. त्यांच्या काही सवयी भाटेंना वेगळ्याच वाटल्या म्हणजे खटकल्या. पहिल्याच दिवशी स्वामीजींनी जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून विडा मागितला. त्याबरोबर थोडी तंबाखू असेल तरी चालेल म्हणाले. संन्याशाची पानसुपारी खाण्याची सवय पाहून भाटेंकडील मंडळी अचंबित झाली. आणखी एक प्रश्न भाटे यांना सतावत होता तो म्हणजे, स्वामीजी शाकाहारी आहेत मांसाहारी? शेवटी न राहवून त्यांनी स्वामीजींना विचारलंच की आपण संन्यासी असून मुखशुद्धी कशी काय चालते? स्वामीजी मोकळेपणाने म्हणाले, “मी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीधर आहे. माझे गुरु श्रीरामकृष्ण परमहंस यांच्यामुळे माझे जीवन जरी संपूर्ण बदलले असले तरी, त्याधीचे माझे आयुष्य मजेत राहणार्‍या चारचौघा तरुणांप्रमाणेच गेले आहे. संन्यास घेतल्यावर इतर सर्व गोष्टी सोडल्या असल्या तरी या एक दोन सवयी राहिल्या आहेत. पण त्या फारशा गंभीर स्वरुपाच्या नाहीत. म्हणून राहू दिल्या आहेत. पण आपोआपच सुटतील”. आणि शाकाहारीचं उत्तर पण भाटेंना मिळालं. “ आम्ही परमहंस वर्गातील संन्यासी. जे समोर येईल त्याचा स्वीकार करायचा. काहीही मिळालं नाही तर उपाशी राहायचं”.

खरच असं व्रत पाळणं ही कठीण गोष्ट होती. मनाचा निश्चय इथे दिसतो. स्वामीजी सलग पाच दिवस अन्नावाचून उपाशी राहण्याच्या प्रसंगातून गेले होते. भुकेमुळे एकदा चक्कर येऊन पडलेही होते. तर कधी राजेरजवाडे यांच्या उत्तम व्यवस्थेत सुद्धा राहिले होते. पण त्यांना कशाचाही मोह झाला नव्हता हे अनेक प्रसंगातून आपल्याला दिसलं आहे. जातीपातीच्या निर्बंधाबद्दल ही शंका विचारली तेंव्हा, आपण मुसलमानांच्या घरीही राहिलो आहोत आणि त्यांच्याकडे जेवलोही आहोत असे सांगितल्यावर, हे संन्यासी एका वेगळ्या कोटीतले आहेत हे समजायला वेळ लागला नाही.

आज लॉकडाउनच्या  काळात दारूची दुकाने उघडली तर परमोच्च आनंद झाला लोकांना. जणू उपाशी होते ते. १०ला उघडणार्‍या दुकानांसमोर सकाळी सातपासूनच उभे होते लोक ! दुकानांसमोर दारू घ्यायला रांगाच रांगा लागल्या होत्या. यात स्त्रिया सुद्धा मागे नव्हत्या. खांद्याला खांदा देऊन लढत होत्या !  हे दृश्य पाहिल्यावर स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीची किती आवश्यकता आहे हे जाणवून मन खिन्न होते. 

एकदा भाटेंचा मुलगा संस्कृत भाषेचा अभ्यास करताना पाणीनीच्या अष्टाध्यायीतील सूत्र म्हणत होता. त्यातल्या चुका स्वामीजींनी दुरुस्त करून सांगितल्या तेव्हा या अवघड विषयाचे ज्ञान असणे ही सामान्य गोष्ट नाही असे भाटे यांना वाटले. एक दिवस काही परिचित व्यक्तींना एकत्र करून त्यांनी स्वामीजींबरोबर संभाषण घडवून आणले. त्यात एक इंजिनियर होते. ‘धर्म हे केवळ थोतांड आहे, शेकडो वर्षांच्या रूढी चालीरीती यांच्या बळावर समाजमनावर त्याचे प्रभूत्त्व टिकून राहिले आहे किंबहुना लोक केवळ एक सवय म्हणून धार्मिक आचार पाळत असतात’, असं त्यांचं मत होतं. पण स्वामीजींनी बोलणे सुरू केल्यावर त्यांना ह्या युक्तिवादाला तोंड देणं अवघड जाऊ लागलं. आणि अखेर शिष्टाचाराच्या मर्यादेचा  भंग झाल्यावर भाटेंनी त्यांना (म्हणजे एंजिनियर साहेबांना) थांबवलं. पण स्वामीजींनी अतिशय शांतपणे परामर्श घेतला. ते प्रक्षुब्ध झाले नाहीत. कोणाच्याही वेड्यावाकड्या बोलण्याने सुद्धा स्वामीजी अविचल राहिले होते. याचा उपस्थित सर्वांवर परिणाम झाला.या चर्चेचा समारोप करताना स्वामीजी म्हणाले, “ हिंदुधर्म मृत्युपंथाला लागलेला नाही हे आपल्या देशातील लोकांना समजावून सांगण्याची वेळ आली आहे. एव्हढच नाही तर, सार्‍या जगाला आपल्या धर्मातील अमोल विचारांचा परिचय करून देण्याची आवश्यकता आहे. वेदान्त विचाराकडे एक संप्रदाय म्हणून पहिले जाते हे बरोबर नाही. सार्‍या विश्वाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य त्या विचारात आहे हे समजून घेण्याची आवश्यकता आहे”. स्वामीजींची ही संभाषणे आणि विचार ऐकून बेळगावचा सर्व सुशिक्षित वर्ग भारावून गेला होता.                                                                          

बेळगावातील मुक्कामात रोज सभा होऊ लागल्या. शहरात स्वामीजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. वेगवेगळ्या विषयांवर सभांमध्ये वादविवाद व चर्चा झडत असत. स्वामीजी न चिडता शांतपणे प्रश्नांची उत्तरे देत. कोपरखळ्या मारत विनोद करत स्वामीजी समाचार घेत असत.

या बेळगावच्या आठवणी वकील सदाशिवराव भाटे यांचे पुत्र गणेश भाटे यांनी लिहून ठेवल्या आहेत. स्वामीजी त्यांच्याकडे आले तेंव्हा ते (गणेश)  बारा-तेरा वर्षांचे होते. स्वामीजीच्या वास्तव्याने पावन झालेली त्यांची ही वास्तू भाटे यांनी रामकृष्ण मिशनला दान केली आहे. स्वामी विवेकानंदांनी या मुक्कामात वापरलेल्या काठी, पलंग, आरसा या वस्तू ते राहिले त्या खोलीत आठवण म्हणून जपून  ठेवल्या आहेत, त्या आपल्याला आजही  पाहायला मिळतात.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवीन फंडा… सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ नवीन फंडा… सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

विरंगुळा म्हणून आजी आपल्या लेकाकडे राहायला आली.  आज रविवार, सगळे घरी एकत्र भेटतील या विचाराने  सुखावली.

सकाळी उठल्यावर पाहते तर तीन खोल्यात तीन माणसं बघून भांबावली. लेकाची आणि सुनेची खोली वगळून तिने नातीच्या रूमकडे पावलं टाकली. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला पाहून, ‘ये बस’ म्हणाली. ‘नाश्त्याला काय करायचं, हे विचारायला आले होते’, असं म्हणत आजी मऊ गादीवर बसताच बेडमध्ये रुतून गेली. नातीने तिघांच्या फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. स्वीगीने मागवून घेऊया, असा आईचा रिप्लाय आला. घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक पाहून आजी आश्चर्यचकित झाली. इथे हाकारे ऐकू आले नाहीत, तरी मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो, असं नात म्हणाली. गृह कलह टाळण्याचा नवीन फंडा बघून आजी इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली. आजी तिच्या सेपरेट रूममध्ये मोबाईलसह दहा दिवस सुखाने राहिली. मुलाला-सुनेला आशीर्वादाचा इमोजी आणि नातीला gpay करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली.

लेखिका :सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घर खरचं कोणामुळे फुटते… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ घर खरचं कोणामुळे फुटते… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

बहुतेक वेळा याचे खापर स्त्रियांच्या माथी मारले जाते. पण कोणाचेही घर एकट्या स्त्रीमुळे फुटत नाही, तर ते फक्त स्वार्थामुळे फुटत असते, आणि तो स्वार्थ कुटुंबातील स्त्री , पुरुष यापैकी कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो . 

मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते. मग पतीला समर्थन देणे हे पत्नीचे कर्तव्य असते.  आणि असे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्री अतिउत्साही बनते आणि सर्वांच्या डोळ्यावर येते. खरेतर हा फक्त धूर असतो, स्वार्थाची आग पुरूषाच्या हृदयात लागलेली असते. माणसाला दुरुन धूर दिसतो ,आग दिसत नाही .

स्त्रीने कितीही प्रयत्न केला, तरी  घरातील पुरूष निःस्वार्थी आणि खंबीर असेल, तर तिला घर कधीच फोडता येत नाही. 

कैकयीच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, पण दशरथ निःस्वार्थी होते. त्यांनी जीवन संपवले, पण घर फुटू दिले नाही.  

वडिलांच्या आज्ञेनुसार स्वतःची काहीच चूक आणि दोष नसताना श्रीराम यांनी वडलांच्या वचनासाठी विनातक्रार आनंदाने वनवास स्वीकारला, पण भरतानेही त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन सेवकाप्रमाणे राज्य सांभाळले, कारण हे सर्व पुरुष निःस्वार्थी होते. कैकयीच्या स्वार्थाचा आणि प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही. उलट तिलाच घरात एकटे रहावे लागले आणि आयुष्यभर निंदा सहन करावी लागली.

पुरुष निःस्वार्थी असेल तर जगातील कोणत्याही स्त्रीला घर फोडता येत नाही.  पण जर पुरुष स्वार्थी बनला तर कोणत्याच स्त्रीला घर एकत्रित ठेवता येत नाही हेही तितकेच खरे आहे. 

धृतराष्ट्राच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला. गांधारी आणि कुंती या दोघींनाही स्वार्थ नव्हता. या दोघींनीही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. पण त्यांनाच काय,  भगवान श्रीकृष्णांनी प्रयत्न केला तरीसुध्दा घर आणि कुळ वाचवता आले नाही. पुरुषाच्या मनात स्वार्थ निर्माण झाला तर देवालासुध्दा घर वाचवता येत नाही.  यात स्त्रियांना दोष देऊ नका.

एक भाऊ दुसऱ्या भावाची जेवणासाठी वाट पहातोय, हा आईवडीलांसाठी सर्वात सुख आणि समाधानाचा क्षण असतो आणि आईवडील हयात असताना घराच्या  वाटणीचा दिवस हा त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद क्षण असतो .

याबाबतीत त्यांना सुख द्यायचे की दुःख द्यायचे हे सर्वस्वी मुलांच्या हातात– म्हणजेच त्यांच्या मनातील स्वार्थावर अवलंबून असते.

म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी उगीचच फक्त घरातील स्त्रीला बदनाम करू नका. 

घर कधीच फक्त स्त्रियांमुळे फुटत नाही, तर ते एका कुणाच्या स्वार्थामुळे फुटते. आपल्या घराचे घरपण हे बहुतांशी स्त्रीमुळे टिकून असते.  ज्या घरातील पुरुष आणि स्त्री दोघेही खंबीर व निस्वार्थी असतात , त्यांचे घर कधीही फुटू शकत नाही हे नक्की. 

 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिना अखेरचे पान – 9 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्रावणातील इंद्रधनुच्या कमानीखालून पुढे सरकत सृष्टीने भाद्रपदाच्या अंगणात पाऊल टाकलेले असते. कॅलेंडरवरील ऑगस्ट चे पान बाजूला सारून सप्टेंबरचे पान झळकू लागते. एकीकडे ऑगस्ट महिन्याला टा टा बाय बाय करत असताना दुसरीकडे ‘कम सप्टेंबर’ चे स्वर ऐकण्यासाठी कान आतुर झालेले असतात. हे स्वर हवेत विरतात ना विरतात तोच लेझिम, झांज पथके सरावासाठी बाहेर पडतात आणि अवघा परिसर दुमदुमवून टाकतात. गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते सक्रीय होतात आणि पावती पुस्तकाना पाय फुटून घराघरांचे उंबरे झिजवू लागतात. गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवणा-या मूर्तीकारांची लगबग चालू असते. इकडे गौरी बरोबर घरात प्रवेश मिळावा म्हणून गौरीची रोपे दाटीवाटीने उभी असतात. प्रत्येक फुलझाडाला बहर आलेला असतो. जरा बाहेर नजर टाकली तर पांढ-या, पिवळ्या, तांबड्या, निळ्या, गुलाबी अशा विविध रंगांनी बागा, माळरान नटलेले दिसतात. श्रावणातील उरलेल्या जलधारा अंगावर ऊन घेण्यासाठी अधूनमधून येत असतात. अशा या मंगल वातावरणात श्रीं चे आगमन होते. आरत्या आणि भक्तीगीतांचीचढाओढ सुरू होते. अकरा दिवसांचा मुक्काम आटोपून, पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण स्विकारून, गणराय लाटांवर आरूढ होऊन बघता बघता दृष्टीआड होतात. सजावटीची टेबले आणि भिंती रिकाम्या करताना मन उदास होत असते.

या भाद्रपद म्हणजेच सप्टेंबर महिन्यात असे काही दिवस असतात ज्यांना राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय महत्व आहे. आपण पाच सप्टेंबर हा सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळतो. याच दिवशी स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांची पुण्यतिथि असते. 14 सप्टेंबर  1949 ला हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून आपल्या संसदेने मान्यता दिली. तेव्हापासून 14 सप्टेंबर हा हिंदी दिन आहे. 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा करून भारतरत्न एम्. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचे स्मरण आपण करत असतो. शिवाय 17 सप्टेंबरला पारंपारिक पद्धतीने विश्वकर्मा दिनही साजरा होतो. मराठी माणसासाठी महत्वाची घटना म्हणजे मराठवाड्याची निजामशाहीतून मुक्तता. तो दिवस ही 17 सप्टेंबर हाच आहे. याशिवाय शेगावचे संत गजानन महाराज यांची पुण्यतिथि व संत मुक्ताबाई यांची जयंती भाद्रपद महिन्यातच असते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही सप्टेंबर महिन्यात काही दिवस विशेष म्हणून साजरे केले जातात. चांगल्या उत्पन्नाद्वारे गरीबी कमी करणा-या नारळाच्या पिकाचे महत्व जाणून 2 सप्टेंबर हा नारळदिन म्हणून साजरा केला जातो. सप्टेंबर 12 हा पालक दिन, 15 हा लोकशाही दिन, 16 हा ओझोन दिवस, 18हा बांबू दिवस असे साजरे होत असतात. उद्देश एकच, त्या त्या विषयाचे महत्व सर्वांना समजावे व तिकडे लक्ष वेधून घ्यावे. याप्रमाणेच सप्टेंबर 22 हा कॅन्सर पेशंट कल्याण दिन, 23 सप्टेंबर विषुव दिन, 26 हा कर्णबधीर दिन व पर्यावरण रक्षण दिन तर 27 सप्टेंबर हा पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो. अशा विविध कारणांसाठी दिवस साजरे करून समस्या, वैशिष्ट्ये, आठवणी यांकडे विशेषत्वाने पाहिले जाते.

सणासुदीचे दोन महिने यथेच्छ ताव मारून श्रावण, भाद्रपद… ऑगस्ट-सप्टेंबर… आता जरा सुस्तावलेले असतात. आनंदाचे एक पर्व काही काळासाठी थांबलेले असते. त्यातून बाहेर पडताच स्मरण होते ते पूर्वजांचे. पितरांचे पुण्य स्मरण करून त्यांच्या शांती मिळावी साठी प्रार्थना आणि त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा व्यक्त करण्याचा पितृपंधरवडा श्रद्धेने पाळला जातो. सर्वपित्री अमावस्येची रात्र संपून नवरात्रीचा जागर करण्यासाठी मन पुन्हा उभारी घेते आणि सर्व अनिष्टांचे उल्लंघन करण्यासाठी दस-याच्या सोनेरी सणाची वाट पहात असते.

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मुलगी…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ मुलगी… ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

वडिलांनी आपल्या मुलीचा साखरपुडा केला. होणारा नवरामुलगा सुस्वभावी व चांगल्या घरचा, त्याच्या आई-वडिलांचा स्वभाव देखील घरकुलाला शोभावा असाच होता. वडिलांना आनंद होताच पण मुलीला मिळणा-या चांगल्या सासरवरुन त्यांच्या डोक्यावर असलेल्या अपेक्षांचं ओझं कमी झाले होते.

एक दिवस लग्नाआधी मुलाकडून मुलीच्या वडिलांना त्यांच्याकडे जेवणाकरिता बोलविण्यात आले होते.

वडिलांची तब्येत बरी नव्हती, तरी पण त्यांना तब्येतीचे कारण मुलीच्या होणा-या सासरकडच्यांना देता आले नाही.

मुलाकडच्यांनी मोठ्या आदरसत्काराने त्यांचं स्वागत केलं. मग मुलीच्या वडिलांकरीता चहा आणण्यात आला.

मधुमेहामुळे वडिलांना साखर वर्ज्य करायला आधीच सांगण्यात आले होते. परंतू पहिल्यांदाच लग्नापूर्वी मुलीच्या होणा-या सासरकडून आलेल्या बोलावण्यामुळे आणि त्यांच्या घरात असल्यामुळे वडिलांनी गपगुमान चहाचा कप हातात घेतला.चहाचा पहिला घोट घेताच त्यांना आश्चर्य वाटले…! चहात साखर अजिबात नव्हती. शिवाय त्यात वेलदोड्याचा सुगंधही येत होता. त्यांनी विचार केला की, ही लोकंदेखील आपल्या घरच्या सारखाच चहा घेतात.

दुपारचं जेवण– ते सुद्धा घरच्यासारखंच होतं. जेवणानंतर त्यांना थोडा आराम करता यावा म्हणून डोक्याखाली दोन उशा व पातळ पांघरूण देण्यात आलं. उठल्यावर त्यांना बडीशेप घातलेलं पाणी पिण्यास देण्यात आलं .

मुलीच्या होणा-या सासरहून पाय काढतांना वडिलांना त्यांच्या आदरातिथ्यात घेतलेल्या काळजीबद्दल विचारल्याशिवाय राहवलं नाही. त्यांनी मुलाकडच्यांना याविषयी विचारले, ” मला काय खायचं, प्यायचं, माझ्या तब्येतीला काय चांगलं हे, आपल्याला एवढया उत्तमप्रकारे कसे काय माहिती ??” यावर मुलीच्या होणा-या सासूबाई म्हणाल्या, ” काल रात्रीच तुमच्या मुलीचा फोन आला होता. ती म्हणाली माझे सरळ स्वभावी बाबा काही म्हणणार नाहीत. त्यांच्या तब्येतीकडे बघता आपण त्यांची काळजी घ्यावी ही विनंती.” हे ऐकून वडिलांचे डोळे पाणावले होते. 

वडील जेव्हा घरी पोहचले तेव्हा समोरच घराच्या भिंतीवर असलेल्या त्यांच्या स्वर्गवासी आईच्या तसबीरीवरुन त्यांनी हार काढून टाकला. हे पाहून पत्नी म्हणाली, ” हे आपण काय करता आहात ?? “

यावर डोळ्यात अश्रू आणीत मुलीचे बाबा म्हणाले, ” माझी काळजी घेणारी आई या घरात अजूनही आहे, ती कुठेच गेलेली नाही… ती या लेकीच्या रुपात याच घरात आहे.”

जगात सर्वच म्हणतात ना, मुलगी ही परक्याचे धन असते…. एक दिवस ती सोडून जाईलचं. पण मी जगातील सर्व आई-वडिलांना सांगू इच्छितो की, मुलगी कधीच तिच्या आई-बापाच्या घरातून जात नसते. तर ती त्यांच्या हृदयात राहते. आज मला अभिमान वाटतो आहे की, मी एका ‘ मुलीचा बाप ‘ आहे..!!”

लेखक – अज्ञात

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हनुमान चालीसा… ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ हनुमान चालीसा☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

हनुमान चालीसा कधी लिहिली गेली हे तुम्हाला माहीत आहे का? नसेल तर जाणून घ्या. 

कदाचित काही लोकांनाच हे माहित असेल? सर्वजण पवनपुत्र हनुमानजींची पूजा करतात आणि हनुमान चालीसाही पाठ करतात. पण ते केव्हा लिहिले गेले, कुठे आणि कसे झाले हे फार कमी लोकांना माहीत असेल.

गोष्ट इ.स. १६०० ची आहे* हा काळ *अकबर आणि तुलसीदासजींच्या काळातील होता.

एकदा तुलसीदासजी मथुरेला जात होते. रात्र होण्यापूर्वी त्यांनी आग्रा येथे मुक्काम केला. लोकांना कळले की तुलसीदासजी आग्रा येथे आले आहेत. हे ऐकून त्यांच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली.

सम्राट अकबराला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्याने बिरबलाला विचारले की “ हा तुलसीदास कोण आहे?”

तेव्हा बिरबलाने अकबराला सांगितले की, “ त्याने रामचरितमानसचा अनुवाद केला आहे. हे रामभक्त तुलसीदासजी आहेत. मीही त्यांना पाहून आलो आहे, त्यांची एक अद्भुत आणि अलौकिक प्रतिमा आहे.” 

अकबरनेही त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि “ मलाही त्यांना भेटायचे आहे,” असे सांगितले.

सम्राट अकबराने आपल्या सैनिकांची एक तुकडी तुलसीदासजींकडे पाठवली आणि तुलसीदासजींना सम्राटाचा निरोप दिला की ‘ तुम्ही लाल किल्ल्यावर उपस्थित रहा.’  हा संदेश ऐकून तुलसीदासजी म्हणाले की, “ मी प्रभू श्रीरामाचा भक्त आहे, माझा सम्राट आणि लाल किल्ल्याशी काय संबंध?” त्यांनी लाल किल्ल्यावर जाण्यास स्पष्ट नकार दिला.

हे प्रकरण सम्राट अकबरापर्यंत पोहोचल्यावर त्याला फार वाईट वाटले. आणि सम्राट अकबर रागाने लाल लाल झाला आणि त्याने तुलसीदासजींना बेड्या ठोकून लाल किल्ल्यावर आणण्याचा आदेश दिला. तरी बिरबलाने अकबराला असे न करण्याचा सल्ला दिला. पण अकबराला ते मान्य नव्हते, आणि तुळसीदासांना साखळदंडांनी बांधून आणण्याची आज्ञा केली.

तुलसीदासजींना साखळदंड घालून लाल किल्ल्यावर आणण्यात आले तेव्हा अकबर म्हणाला की “ तुम्ही करिष्माई व्यक्ती आहात, थोडा करिष्मा दाखवा आणि सुटका करुन घ्या .”

तुलसीदासजी म्हणाले-“ मी फक्त भगवान श्री रामचा भक्त आहे, जादूगार नाही, जो तुम्हाला काही करिष्मा दाखवू शकेल.”

हे ऐकून अकबर संतापला. आणि त्यांना बेड्या ठोकून अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला.

दुसऱ्या दिवशी लाखो माकडांनी मिळून आग्राच्या लाल किल्ल्यावर हल्ला करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला.

लाल किल्ल्यावर सगळीकडे गोंधळ माजला होता, मग अकबराने बिरबलला बोलावून विचारले,” बिरबल काय चालले आहे?”

तेव्हा बिरबल म्हणाला, “महाराज, मी तुम्हाला आधीच सावध केले होते. पण तुम्ही सहमत झाला नाहीत. आणि आता करिश्मा बघायचा असेल तर बघा.”

अकबराने तुलसीदासांना ताबडतोब अंधारकोठडीतून बाहेर काढले.  आणि साखळ्या उघडल्या गेल्या.

तुलसीदासजी बिरबलाला म्हणाले की “ मला अपराधाशिवाय शिक्षा झाली आहे. मला अंधारकोठडीतील भगवान श्री राम आणि हनुमानजींची आठवण झाली. मी रडत होतो.आणि रडताना माझे हात स्वतःहून काहीतरी लिहीत होते. हे ४० –चतुर्भुज हनुमान जी यांच्या प्रेरणेने लिहिलेले.”

तुलसीदासजी तुरुंगातून सुटल्यावर म्हणाले, “ ज्याप्रमाणे हनुमानजींनी मला तुरुंगातील संकटातून बाहेर काढून मदत केली आहे, त्याचप्रमाणे जो कोणी संकटात सापडला आहे आणि हे पाठ करतो, त्याचे दुःख आणि सर्व संकटे दूर होतील. ती हनुमान चालीसा म्हणून ओळखली जाईल.”

अकबरला खूप लाज वाटली आणि त्याने तुलसीदासजींची माफी मागितली आणि त्यांना पूर्ण आदर आणि पूर्ण संरक्षण देऊन, लगेच मथुरेला पाठवले.

आज सर्वजण हनुमान चालिसाचे पठण करत आहेत. आणि या सर्वांवर हनुमानाची कृपा आहे. आणि सर्वांचे संकट दूर होत आहेत.—– म्हणूनच हनुमानजींना “संकट मोचन” असेही म्हणतात.

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात. कसे ते बघा—-

१ ) चर्च मधे दिल्यास—त्याला ऑफरींग म्हणतात.

२) शाळेत दिले— तर त्याला फी म्हणतात.

३) लग्नात दिले=== तर त्याला हुंडा म्हणतात.

४) घटस्फोटात दिले— तर त्यालापोटगी म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले— तर त्याला उसने दिले म्हणतात.

६) शासनास दिले— तर त्याला कर म्हणतात.

७) न्यायालयात दिले— तर त्याला दंड म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले– तर त्याला पेन्शन म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले— तर त्याला पगार म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले— तर त्याला बोनस म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास— त्याला कर्ज म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना—त्यास हप्ता म्हणतात.

(१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास— त्याला टिप म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास— त्याला खंडणी म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास— त्याला लाच म्हणतात..

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास—त्याला भाडे म्हणतात.

१७) सामाजिक / धार्मिक कार्यास दिल्यास— त्याला देणगी म्हणतात.

(१८) देवालयास/ मंदिरास दिले—- तर नवस म्हणतात.

१९) लग्नकार्यात दिले— तर त्याला आहेर म्हणतात.

आता प्रश्न असा आहे की —–

२०) पतीने पत्नीस पैसे दिल्यास—- त्याला काय म्हणावे ?

      अहो सोपं आहे— एवढंही माहीत नाही का ?

— त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.

 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नवरात्र…नवा विचार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ नवरात्र…नवा विचार ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नवरात्राची सुरवात म्हणजे घटस्थापना! नवरात्री चा हा उत्सव असतो मांगल्याचा, उत्साहाचा. अमरावती मध्ये तर ह्या सगळ्या नऊ दिवसांना सोहोळ्याचं रुपं येतं. अशा उत्सवांमुळे घरोघरी, गावोगावी चैतन्याचं वातावरण प्रस्थापित होतं.

नवरात्राचे नऊ दिवस म्हणजे ह्या देवीरुपी शक्तीची निरनिराळी रुपं, वेगवेगळे साज आणि कर्तृत्वाचे झळाळते तेज ल्यायलेले ते मुखवटे ह्यावर नजर पडली तरी दिपून जाते ती नजर.

नवरात्रात घटस्थापनेपासून ते दस-यापर्यंत नऊ दहा दिवस उत्साहाचे आणि लगबगीचे. अमरावती आणि यवतमाळ ह्या दोन्हीही गावांमध्ये नवरात्राचा अनुपम सोहळा हा असतो पण त्याचं स्वरूप मात्र अगदी वेगवेगळं.

अमरावती मध्ये अंबादेवी आणि एकवीरादेवी ह्यांची जागृत देवस्थानं आहेत.आणि अमरावती मध्ये गुजराती समाज भरपूर असल्याने त्यांचा नऊ दहा दिवस टिप-यांचा आणि गरब्याचा खेळ असतो. त्यामुळे संपूर्ण अमरावती नवरात्रमय झालेली असते.

सध्या दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भावामूळे सगळे सणंवार साजरे करण्याची गणितचं बदललीत. परंतु खूप बदाबदा कोसळून गेल्यानंतर उघडीप मिळाल्यानंतर झपाट्याने वर्दळीला सुरवात होते तशी स्थिती ह्या नवरात्रात बघायला मिळतेयं.नवरात्रात अंबादेवी व एकवीरा देवीच्या दरबारात खूप मोठमोठी दिग्गज कलाकार मंडळी आपली कला वा आपली गायकी पेश करतात. खूप दुरदुरून बाहेरगावांहून देवीच्या दर्शनासाठी लोकं गर्दी करतातच. देवीरोडवर जणू जत्राच भरलेली असते.

नवरात्रात आमच्या घरीही नवरात्र असतं.रोज नऊ दिवस देवीला फुलांची माळ आणि अखंड नंदादीप असतो.नवरात्र उठताबसता म्हणजेच घटस्थापना आणि दस-याला जेवायला सवाष्ण असते.

यवतमाळ चे नवरात्र दुर्गादेवींच्या प्रतिष्ठापनेमुळे प्रसिद्ध आहे.खूप लांबूनलांबून लोक यवतमाळला देवी आणि त्यांच्याजवळील आरास, देखावे बघायला गर्दी करतात. असंं म्हणतात की बंगालमधील कलकत्त्यानंतर दुर्गादेवींच्या उत्सवात दुसरा क्रमांक यवतमाळचा लागतो. यवतमाळला जवळपास दीडदोनशे दुर्गादेवींची स्थापना केली जाते आणि विशेष म्हणजे सगळ्या मूर्ती एकसे एक सुंदर,तेजःपुंज पण तरीही सगळे मुखवटे एकसारखे न दिसता अगदी वेगवेगळे.

..नवरात्रात कुणी नऊ दिवस ऊपास, कुणी नऊ दिवस मौनव्रत तर कुणी नऊ दिवस अनवाणी राहून आपली श्रध्दा प्रकट करतात.

संपूर्ण नवरात्रभर  महिला वर्ग वेगवेगळ्या रंगांच्या साड्या परिधान करतात. अमरावती चे कपडामार्केट खूप प्रसिद्ध. नवरात्रात येथे कपड्यांच्या व्यापारात खूपमोठी उलाढाल होते.

ह्या नऊ दिवसाच्या देवीच्या नवरात्रात स्त्रीयांना, कुमारिकांना देवीचे प्रतीक समजून सन्मान दिल्या जातो, त्यांचे पूजन केले जाते.

पण खरतरं नवरात्रातच फक्त देवीलाच मखरात बसवायचे असे नव्हे तर देवीरुपात आपल्या अवतीभवती असणाऱ्या महिलांनाही तेवढाच सन्मान प्रदान करणे हे जास्त संयुक्तिक.

अर्थातच महिलांचा आदर करणारे असतात त्याचप्रमाणे महिलांना कस्पटासमान समजणारे लोकही असतात.काही महिलांना न्याय देणारे असतात तर काही फक्त महिलांवर अन्याय करायलाच जणू जन्म घेतात. काही जणं महिलांवर कौतुकाची बरसात करतात तर काही जणं फक्त महिलांच्या पायाखाली निखारेच फुलवितात. शेवटी काय तर हो उडदामाजी काळेगोरे हे असणारच.

नुसता नवरात्र म्हणून महिलांचा उदोउदो करायचा की संपूर्ण आयुष्य महिलांकडे देवीच्याच आदरयुक्त नजरेनं बघायचं ह्याचं प्रत्येकाचं समीकरणचं वेगवेगळं असतं बघा.

मी मागे केलेल्या रचनेने आजच्या पोस्ट ची सांगता करते. ती रचना खालीलप्रमाणे.

फक्त नवरात्र आले की मगच मानसिकता बदलायची,

      सवय आहे ही माणसा तुझी फार जुनी 

देवी समजून नऊ दिवस पुजायचे

आणि मग वर्षभर तिला गृहीत धरून चालायचे

त्यापेक्षा नको मानूस तिला देवी,नको बसवूस मखरात

अरे ती फक्त आधी माणूस आहे हे ठेव आधी ध्यानात

एकदा का तिला देवीत्व बहाल केलंस की

तुझं मात्र सगळं पुढील खूप सोप्पं झालं

देवीत्वाच्या ओझ्याखाली बिचारीचे मनोगत

मौनव्रताने अलगद मूक झालं 

बनविलीस तिला मूर्ती त्यागाची, तुझी झोळी मात्र कायम ठेवलीस भरलेली 

त्याग, समर्पण करता करता ही मात्र रिक्त होऊन स्वतः थकलेली. म्हणून माणसा देवीत्व बहाल करायच्या ऐवजी आधी तिला माणूस म्हणून जाणायला शीक

समजून उमजून तिला घेतलसं तर स्त्री च्या अस्तित्वाचे संतुलन होईल नीट, अस्तित्वाचे संतुलन होईल नीट.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares