मराठी साहित्य – विविधा ☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

कॉफी ही माझ्या आयुष्याशी चहाइतकीच जोडली गेलेली आहे. एखाद्या पावसाळी संध्याकाळी खिडकीत बसून गरम कॉफीचे घोट घेताना त्या निसर्ग सौंदर्याची, मोहक वातावरणाची मनावर होणारी जादू किंवा जेव्हा पहिल्यांदा डेटला जातात त्यावेळी त्या प्रेमळ क्षणांची साथ द्यायला सोबत असते ती कॉफी किंवा मग रात्रीच्या निरव शांततेत मंद गाण्याच्या सोबतीने वाफाळत्या कॉफीचा आस्वाद घेताना मिळणारी कमालीची स्वस्थता किंवा पुस्तक वाचताना कॉफीची सोबत असली तर वाचनाचा आनंद द्विगुणीत होतो.. एखाद्या सुंदर दिवसाची सुरुवात व्हावी ती गरमा-गरम कॉफी आणि चविष्ट केक स्लाईससोबत तर क्या बात है…!

कॉफी म्हणजे  विचार, निवांतपणा, संगीत, दरवळणारा सुगंध, मनाची तरतरी, हसू, गप्पा, वाचन, पाऊस, तो आणि ती, आनंद, मैत्र व मी आणि लिखाण…

कॉफीचे माझ्या आयुष्यात निश्चितच एक स्थान आहे. फिल्टर कॉफी असो की कॅफे मोका, कोल्ड काॅफी असो वा कॅपिचुना काॅफी इ. या साऱ्याच प्रकारांनी माझ्या मनात जागा केली आहे..

माझी दिवसाची सुरुवात कॉफीने होते…कॉफी नुसतं असं म्हटलं तरी माझ्या आजूबाजूला कॉफीचा सुगंध दरवळायला लागतो.. काॅफीचा मग ओठांना लावण्याआधीच तिचा मस्त सुगंध काहीतरी आत हलकेच जागं करतं असतो अगदी तसचं जसा पावसाच्या सरींनी दरवळणारा मातीचा गंध… येणा-या आठवणींच्या वर्षावाची जाणीव करून देत असतो.

आठवणींच्या सुगंधात मन चिंब चिंब भिजत असते… काय सांगायचे असते त्याला ? एक वेगळीच आभा का दाटते मनात ?

कारण काॅफीच नातचं असतं हळव्या  जगाशी बांधलेलं रूजू पाहणारं नवं नातं…हे नवं नात स्वीकारताना येणा-या आनंदाच्या सरी झेलू पाहणारं…  खरचं काॅफीचा तो मस्त सुगंध जेव्हा अलगद जवळ येतो तेव्हा नव्या जाणीवांचा बांध अलगद बांधला जातो…

माझ्यासाठी अतिप्रिय काही असेल तर ते म्हणजे गरम स्ट्राँग कॉफी. कॉफी म्हटलं की आठवते तिची जिभेवर रेंगाळणारी थोडी स्ट्राँग कडवट चव.. हो कडवट कारण कॉफी प्यायची तर स्ट्राँगच…कडवट

गोड आणि कॉफी… झोप उडवून तरतरी आणणाऱ्या पेयामध्ये कडक कॉफीचा नंबर पहिला असेल असे माझे मत .. कॉफीला पर्यायी एकतर काही नसावं आणि असलंच तरी कॉफीची सर त्याला नसावी… सुस्ती-आळस-कंटाळा दूर सारून स्फूर्ती आणि ताजंतवानं करण्यात कॉफी फायदेशीर असल्याचं मी तरी अनुभवलं आहे आणि अनुभवत आहे

कामाचा लोड कितीही असू द्या किंवा शीण आला असेल आणि त्याच वेळी समोर कॉफीचा वाफाळलेला कप जेव्हा समोर दिसतो त्या कॉफीचा घोट जेव्हा घशाखाली उतरतो ना तेव्हा हा सगळा शीण, कंटाळा व आळस क्षणार्धात कुठच्या कुठे पळून जातो..

कॉफीचं महत्त्व माझ्या लेखी खूप आहे कारण वेळोवेळी सुख-दुःखात, महत्त्वाच्या क्षणी माझा आत्मविश्वास वाढवण्यात आणि मला खंबीर करण्यात जर कोणाची साथ असेल तर ती माझी सखी कॉफीची..!

लेखन हा माझा आवडता छंद त्यामुळं काही सुचत नसेल आणि कॉफी प्यायली तर माझं डोकं जाम भारी काम करतं थोडक्यात काय तर  माझ्या रिफ्रेशमेंटसाठी कॉफी तिचं काम चोख पार पाडते..

माझ्यासाठी कॉफी म्हणजे बिस्मिल्ला खाँसाहेबांच्या सनईसारखी आहे… रोज हवी असे नाही पण जशी विशेष प्रसंगी ती असल्याशिवाय पूर्णता नाही तसेच काहीसे कॉफीचे आहे.. निवांत आहे, सुंदर माहोल आहे, निसर्ग त्याच्या सौंदर्याची उधळण करत आहे अशा प्रसंगी कॉफी हवीच.. ! त्याशिवाय त्या प्रसंगाला, त्या क्षणाला पूर्तता नाही…

मी एकटीनं एन्जॉय करायची जागा म्हणजे बुक कॅफे..  पुस्तकांच्या दुकानात असलेलं कॉफी शॉप किंवा कॉफी शॉपमध्ये असणारी लायब्ररी असं बुक कॅफेचं स्वरूप.. निवांतपणे, पुस्तक आणि कॉफीच्या सान्निध्यात वीकएंड साजरा करायला हे हक्काचं ठिकाण मनाला आनंद देऊन जाणारं असं मनापासून नमूद करीन.. शांत तरीही छान पॉझिटिव्ह वातावरण..,

पुस्तके वाचताना सोबतीला वाफाळत्या कॉफीचा कप आणि काही समविचारी मित्र- मैत्रिणी सोबत मैफल जमवता आली तर ? ही कल्पनाच भन्नाट नाही ..!

काॅफीचा घुटका घेताना फेसबुक न्याहाळणे हा माझा आवडता संध्याकाळचा कार्यक्रम.. माझ्यासाठी ते फार मोठे विरंगुळय़ाचे चार क्षण.. आजही मी तेच करते..

कॉफी हा प्रवास आहे ठिकाण नाही

जी चालण्यात मजा आहे ती पोचण्यात नाही…अशी ही बहुरंगी, बहुरूपी आणि अनेक आठवणींची साक्षीदार असलेली कॉफी मी तरी दैवी पेयच मानते..!

माझ्या आजवरच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर साक्षीदार म्हणून या कॉफीने मला सोबत केलीये..!

लव्ह यू कॉफी!

एक छोटेसे टेबल सोबत मी व काॅफी

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप्पा आणि तो… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

बाप्पा आणि तो… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆

बाप्पा आलास काय आणि गेलास ही. अगदी आमच्या मुलासारखाच.  तो पण पूर्वी असाच यायचा. शिकायला म्हणून अमेरिकेला गेला आणि तो कायमचा तिकडचा झाला. सुरुवातीला, आला की जरा स्थिरस्थावर होतो ना होतो, तोच  आठ दहा दिवसांत परत जायचा. अगदी तुझ्यासारखाच. आता तू तरी दरवर्षी नित्यनियमाने ठरलेल्या वेळेस न विसरता येतोस. पण त्याचे  तसे नाही. गेले कित्येक वर्षे तो येतो सांगून आला नाही. दरवर्षी तुझ्यासारखीच त्याचीही वाट बघतो पण काही खरं नसतं. येण्याच्या एक दिवस आधी त्याचा फोन येतो. कामानिमित्त त्याला घरी यायला जमणार नाही असे तो सांगतो तेव्हा हिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात आणि नेमक्या त्या माझ्या भुरकटलेल्या डोळ्यांना दिसतात. पण तुझे मात्र तसे नसते. तू येतोस वेळेवर आणि जातोस ही वेळेवर. चटका लावून जातोस पण ठीक आहे. मनाला पुढच्या एक वर्षासाठी उभारी देऊन जातोस. मला आणि हिला जगण्याची एक नवीन उमेद देतोस आणि आशेची नवीन पालवी मनात उभी करतोस. आज ना उद्या तो घरी येईलच ह्याची मनात आशा निर्माण करतोस.

— बाप्पा खरं सांगू, आता आमचीच खात्री नाही रे. अरे आमचेच विसर्जन होते की काय असे वाटू लागले आहे. आता तूच सांग, आमच्या दोघांतील एकाचे विसर्जन झाल्यावर तू किंवा तो आलास तरी आत्तासारखे तुमचे लाड होणार आहेत का ? अरे पुढच्या वेळेला तुम्ही आलात आणि आमच्या दोघांतील एकाचे कायमचे विसर्जन झाले असेल तर तुम्ही आलात काय आणि परत गेलात काय, आम्हाला त्याचे अप्रूप राहील का ? म्हणूनच बाप्पा एक काम कर. तूच त्याचे कान उपट आणि त्याला बुद्धी देऊन आम्हाला भेटायला पाठव. अरे त्याला जरा समज दे आणि सांग, तो लहान असतांना त्याच्या हट्टापायीच आम्ही तुला घरी विराजमान केला होता ना. त्याच्यासाठी म्हणून तुझे सगळे लाड आम्ही पुरवत होतो ना. अरे आता आम्हाला वयानुसार तुझे साग्रसंगीत लाड करायला जमत नाही. पण तो  येईल आणि आल्यावर त्याला सगळे पहिल्यासारखे दिसायला पाहिजे म्हणून आम्ही ते सगळे करतोय. पण आता थकलोय रे आम्ही.

बाप्पा, एक मात्र चांगले आहे. जशी तू पुढच्या वर्षी येण्याची आशा लाऊन जातोस, तसा तो लांब असला तरी कधीतरी येईल ह्याची आशा लागून रहाते. ह्याबाबतीत तरी आमचे नशीब थोर की तो आहे म्हणून, तो कधीतरी परत येईल ह्याची खात्री वाटते.  बाप्पा तो, तुझ्या काय किंवा आमच्या दोघांच्या विसर्जनाला जरी आला नाही तरी त्याला मात्र तू उदंड आयुष्य दे आणि त्याला त्याच्या उतारवयात पोरका मात्र करू नकोस.

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी नक्की या.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शारदोत्सव ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

शारदोत्सव ☆ सौ. अमृता देशपांडे  

घरोघरीचे गणपती विसर्जन झाले आणि अनंतचतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सवाची धामधूम संपली की वेध लागतात ते शारदीय नवरात्रोत्सवाचे.

दरवर्षी नवरात्र आले की, हमखास आठवण होते ती आमच्या शाळेच्या

“शारदोत्सवाची.”

आमची शाळा फक्त मुलींची.  म.ल.ग.हायस्कूल, कोल्हापुर. मी पहिली ते अकरावी तिथेच शिकले. आमच्या शाळेत अश्विन नवरात्रीत ” शारदोत्सव ” साजरा केला जात असे.  त्यामुळे देवी उपासनेचे संस्कार घरात आणि  शाळेत ही झाले.

कोल्हापुरवासिनी श्री अंबाबाई, घरची देवी श्री एकवीरा, आणि शाळेतली श्री सरस्वती अशा पूजनाच्या उत्सवाचे नवरात्रीचे दिवस संस्मरणीय आहेत. संस्कारक्षम वयातला देवीशक्तीचा उत्सव आध्यात्मिक आणि वैचारिक मानसिकतेचा भक्कम पाया ठरला.

शारदोत्सवाच्या आधीच्या आठवड्यात तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या कामांसाठी 4/4 मुलींचे ग्रुप केले जायचे. डेकोरेशन करणे, पूजेची तयारी करणे – यात पूजेची भांडी रोज स्वच्छ करणे, तेल,तूप, अगरबत्ती,  कापूर, हार फुले, प्रसाद ( फळे)याची जमवाजमव, खरेदी करणे, यातून टीम वर्क,  कुठलेही काम करण्याची तयारी हे गुण अंगवळणी पडत. आम्ही मैत्रिणी  या कुठल्याही कामामध्ये  दरवर्षी अतिशय उत्साहाने सहभाग घेत होतो . त्यावेळी शाळेत वातावरण खूप प्रसन्न असायचे.शाळेत आहोत असं वाटण्यापेक्षा एका ऊर्जेने भारावलेल्या मंदिरात आहोत, असेच वाटायचे.  अगरबत्तीच्या घमघमाटाने  सगळे वातावरण भारावून  गेलेले असायचे.

सर्व तयारी करून शाळा भरण्याच्या वेळी सामूहिक आरती होत असे.  संगीत हा विषय शिकवणारे टेंबेसर व नंतर सौ.शैलाताई कुलकर्णी पेटी ( हार्मोनियम) वाजवून साथ द्यायचे.

‘दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी , अनाथ नाथे अंबे करुणाविस्तारी  ‘ ही आरती झांज, हार्मोनियम च्या तालावर सुरात म्हणताना एक प्रसन्न आनंद व्हायचा.

पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेली,  वीणा हाती असलेली,  कमळात आसनस्थ, नेत्रांतून अपार प्रेम,  माया बरसणारी देवी सरस्वतीची मूर्ती अजुनही डोळ्यांसमोर येते.

आरती-प्रसाद झाल्यावर शाळा सुरु होत असे. चार वाजल्यानंतरचे तास नसायचे. कारण त्यावेळेत रोज व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. पहिल्या दिवशी वेदशास्त्र संपन्न प.पू.जेरेशास्त्री यांचे देवी शक्ती,  देवी अवतार अशा विषयांवर प्रवचन असे. त्यानंतर रोज प्रख्यात लेखक, वक्ते, निर्माते, चित्रकार,  उद्योगपती,  शिक्षणतज्ज्ञ,अशा थोर व दिग्गज व्यक्ती, कलाकारांचे व्याख्यान आयोजित करण्यात येत असे. प्रा.शिवाजी भोसले, श्रीमती लीलाताई पाटील,  भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे,  कॅप्टन थोरात, मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची व्याख्याने अजूनही आठवतात.

प.प.जेरेशास्त्री जे काही सांगायचे ते सगळेच तेव्हा समजायचे असे नाही,  पण ते काहीतरी भव्य दिव्य छान वाटायचे.

आपल्या प्रवचनामध्ये सुंदर मानव बनण्यासाठी तुमचे मन सुंदर असले पाहिजे, निर्मळ असले पाहिजे,  असे सांगायचे. त्याचा अर्थ पुढे आयुष्यात समजून आला. मोठ्या व्यक्ती कोण, त्या का मोठ्या आहेत, हे समजून घेणे याची शिकवण मिळाली.  एका जागी तीन तास बसून व्याख्यान कसे ऐकायचे, याची सवय झाली. शारदोत्सवाचे ते नऊ दिवस अतिशय उत्साहाचे व भारलेले होते. सरस्वती पूजनाने व व्याख्यानाच्या विषयांतील शब्दांचा, विचारांचा परिणाम नकळत मनावर होत होता. आमचे शिक्षक आणि शिक्षिका ( आमचे सर आणि बाई) त्या विचारांना अनुसरूनच शाळेतल्या इतर कार्यक्रमांची आखणी करत, आणि भाषणातले विचार दैनंदिन व्यवहारात ही कसे अंगिकारायचे,  हे आम्हां मुलींकडून करवून घेतले जाई. त्यामुळे दरवर्षी अकरावीची पास झालेली बॅच ही सुसंस्कारितच असेल, हेच आमच्या शाळेचे ध्येय, प्रयत्न आणि यश होते.

प्रत्येक स्त्री मध्ये देवीशक्तीचा अंश असतो. स्वतःतल्या शक्ती चा आदर ठेवून समाजात वावरणे, स्त्री अबला नाही तर सशक्त,  स्वयंपूर्ण आहे, याची जाणीव होणे, तसेच आत्मशक्तिचा अहंगंड न ठेवता किंवा आपण कुणापेक्षा वरचढ आहोत, या भ्रामक कल्पना न बाळगता  त्या शक्तीचा वापर स्वतःच्या प्रगतीसाठी, समाजाच्या सेवेसाठी,  देशसेवेसाठी करणे ह्याचे बाळकडू देणारा शाळेतला शारदोत्सव त्या काळातल्या आमच्या पिढीच्या मानसिकतेचा सुसंस्कारित पैलू होता.

नवरात्र म्हटले की शाळेचे ते दिवस अजूनही आठवतात. मनोमन देवीला नमस्कार केला जातो.

त्यावेळी म्हणत होतो ते,

” या कुंदेन्दु तुषार हार धवला ” हा श्लोक आणि

” विधी तनये शारदे कामदे” हे गीत प्रत्येक नवरात्रात ओठावर येते.

श्री शारदा देवी आणि माझ्या शाळेला भक्तीभावनेने नमन!

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 8 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 8  ☆ सौ. अमृता देशपांडे  

संतसाहित्य,  संतवाडॄमय , सद्गुरूंची चरित्रे,  देवदेवतांच्या पोथीवाचन हा एक वेगळाच अनुभव असतो. हे वाचन करताना दैवी लीला, सद्गुरुंचा शाब्दिक दिलासा आणि त्यानुसार येणा-या अनुभवांनी,  प्रीतीने मन भारावून जाते. ह्रदय भरून येते. नकळत डोळे पाझरू लागतात. ते पाणी असतं कृतज्ञतेचं. आस्तिकतेला आश्वस्त करणारं, श्रद्धा अधिक दृढ करणारं. ह्रदयस्थ आत्मा  अश्रूंच्या रूपाने गुरुचरणावर लीन होतो.  हा अनुभव वर्णनातीत आहे. तो ज्याचा त्यानंच अनुभवायचा असतो.

असं हे डोळ्यातलं पाणी म्हणजे भावना व्यक्त करण्याची भाषा. दुःख, यातना, वेदना, राग, प्रेम, ममता, असूया, विरह, कृतज्ञता,  अगतिकता अशा अनेक भावनांचं मूर्त स्वरूप.

” प्रेमस्वरूप आई वात्सल्यसिंधू आई……” हे गाणं ऐकताना केव्हा मी रडायला लागते तेच कळत नाही.  दुस-याच्या डोळ्यात पाणी बघून आपले डोळे भरून येतात.

परजीवास्तव जेथ आतडे

कळवळुनी येई

त्या ह्रदयाविण स्वर्ग दुजा या

ब्रम्हांडी नाही

रडणं ही क्रिया म्हणा किंवा भावना म्हणा , अगदी नैसर्गिक आहे.  हसण्याच्या  वेळी मनमुराद हसावं, तसंच मनमोकळेपणाने रडावं. आरोग्यासाठी दोन्ही चांगलं ! मोकळेपणाने हसता न येणं किंवा रडताही न येणं यासारखी निराशेची आणि लाजिरवाणी गोष्ट दुसरी नाही .

अर्थात काही जणांना उगीचच रडण्याची सवय असते. सतत तक्रार,  सतत रड.अशावेळी

” सुख दुखतःय” हा शब्दप्रयोग योग्य वाटतो. वरवरचे अश्रू म्हणजेच नक्राश्रू. काही जण दुसरा रडत असेल तर तायाला हसतात, चिडवतात. काही जणांना दुस-याला दुःखी बघून आनंद होतो. या वृत्तीसारखी वाईट गोष्ट दुसरी असूच शकत नाही.

जन्मापासून मृत्यूपर्यंत डोळ्यातलं पाणी मन, भावना,  यांचं खरेपण व्यक्त करत असतं.पुरूषांपेक्षा स्त्रियांचं मन हळवं असतं हा एक सर्व साधारण समज आहे. पुरूषांनी रडायचं म्हणजे अगदी बायकी पणाचं वाटतं हाही एक ” समजच ” आहे.पण तो योग्य नाही. एखादा कलाकार, पुरूष असो किंवा स्त्री,  आपली कला रंगमंचावर सादर करताना जर भूमिकेशी समरस झाला तर खोट्या अश्रूंसाठी ग्लिसरीन वापरण्याची गरज पडत नाही. त्याचं संवेदनाशील मन त्याला साथ देतं.  तोच अभिनय खरा असतो, आणि तोच प्रेक्षकांवर परिणाम करतो. म्हणून मन संवेदनशील असणं व ते तद्रूप होणं गरजेचं असतं.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिक्षक दिन मुबारक… सुश्री संध्या शिंदे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ शिक्षक दिन मुबारक… सुश्री संध्या शिंदे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

वर्गातल्या सगळ्यांना भागाकार करता आला त्या दिवशी कित्येक कोटींची लॉटरी लागल्यागत सुखाची झोप लागणारा प्राणी आहे मी !

“मज्या आईनं विष पेलं रात्री. पण तुम्ही आज मॉनिटर निवडणार,म्हणून आलो शाळेत.मला मॉनिटर व्हयचंय मॅडम!” म्हणत काळीज चिरणारा, केस कापण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हातानेच वेडीवाकडी कटिंग करणारा—- यश …

मी वर्गात चिडचिड केल्यावर जवळ येऊन हळूच “मिष्टर ला भांडून आलात का मॅडम?” म्हणणारी — तेजू…

शाळेच्या मागच्या गेटच्या पायर्‍यांवर बसलेल्या लहान बहिणीच्या जबाबदारी पोटी “बाथरूमला जायचंय” असं मला वारंवार खोटं बोलून वर्गाबाहेर, तिच्याकडे जाण्यासाठी माझा ओरडा खाणारा — माऊली….

केवळ माझ्या गाडीवर फेरफटका मारण्याची लहर आली म्हणून “मला घरी नेऊन सोडा.” असा हट्ट करणारी,आईचा नंबर माहीत असूनही तो न देता मला गावभर उन्हातान्हात फिरवणारी बालवाडीतली  

टुचभर  — सिद्धी….

पडलेला दात कंपासमध्ये जपून ठेवणारी, डोळ्यातलं बुबुळ कुत्र्याने दातांनी ओरबाडल्यावरही आईजवळ  हट्ट करून, तिच्यासोबत शाळेत येऊन चाचपडत मला मिठी मारणारी—- वीरा…..

निसर्गाने आधीच दिलेले टप्पोरे डोळे अजूनच मोठे करून, दोन्ही कमरेवर हात ठेवून ” मी बुटकी आहे, म्हणून तुम्ही मला असं करतात ना?” असा चिमण्या आवाजात बिनाबुडाचे आरोप करणारी, मला पामराला सतत कचाकचा भांडणारी – थाक्ची….

“मला घरी आई नाही, पण शाळेत माझ्या मॅडम माझी आई आहेत.” असं शेवटच्या पानावरच्या निबंधात लिहिणारी  — आकांक्षा….

बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवसांची सुट्टी मिळवण्यासाठी मला साडीचं आमिष दाखवणारा — अर्णव…

मनाविरुद्ध, परिस्थितीसमोर हतबल होऊन आईसोबत ऊसतोडीला गेलेलं व सर्पदंशामुळे मातीआड झालेलं हसरं दुःख.. — सौरभ….

आपल्या बाळाला कडेवर घेऊन धावत धावत येऊन माझ्या वर्गात  शिरलेली , ” माझं नाव या हजेरीत लिहा! “असं पोटतिडकीने म्हणणारी उध्वस्त— संगीता….

माझ्या साडीच्या निऱ्या धरून वर्गाबाहेर फरफटत आणून ” मेरकु चाय पीने का जी…. घरकु जान दो…नै तो तुम पिलाव चाय…तुमको दुवा लगेगी जी! ”  असं जोरजोरात ओरडणारी  डेंजर — अलिजा….

खोडरबरमुळे वहीवर होणारा कचरा साफ करण्यासाठी अब्बूचा दाढीचा ब्रश शाळेत घेऊन येणारी— जोया…

पर्समध्ये झुरळ बघितल्यावर मी किंचाळत टेबलवर चढल्यावर माझी उडालेली तारांबळ, फजिती माझ्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपणारा मॉनिटर—- नयन….

एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याक्षणी डेस्क लागून रक्तबंबाळ झालेला, मला अस्वस्थ अस्वस्थ करून सोडणारा  — विश्वजीत….

काय काय अन् किती सांगू..?  मर्यादा आहेत…

एकोणविसावं वर्ष सुरू आहे…

एकोणवीस बॅचेस…

असंख्य चालत्या फिरत्या जिवंत कादंबऱ्या वाचल्यात मी यादरम्यान……… 

या 19 वर्षांत एकही दिवस, एकही क्षण ह्या लेकरांनी माझ्यातल्या शिक्षकाला मरू दिलं नाही… मरु काय, झोपू दिलं नाही……. झोपूच काय……..  पण साधं पेंगू सुद्धा दिलं नाही…

कुठलंही सिस्टम, वर्क प्लेस  म्हटलं की राजकारण, हेवेदावे, चढउतार हे आलेच.

पण का कुणास ठाऊक? वर्गाच्या चौकटीआत शिरताना ते सगळं सगळं टेन्शन दाराबाहेर ……… 

लेखिका – संध्या शिंदे

(अंबाजोगाई जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका)

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ महाभारतातील  “नऊ सार सूत्रे” ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ महाभारतातील नऊ सार सुत्रे… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

महाभारतातील  ” नऊ सार सूत्रे  “

१) ” जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल ” – कौरव.

२) ” तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील.”- कर्ण.

३) ” मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल.”-  अश्वत्थामा.

४) ” कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल.” – भीष्म पितामह.

५) ” संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते ” – दुर्योधन.

६) ” विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते.”- धृतराष्ट्र.

७) ” मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे.”  – अर्जुन.

८) ” प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही.”-  शकुनी.

९) ” नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही.”   – युधिष्ठिर.

या नऊ सूत्रांकडून धडा घ्या, अन्यथा महाभारत होणे निश्चित आहे.

जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.

दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा.अन्यथा आपली केव्हा वाट  लागेल हे कळत नाही. 

“माणसाचा दर्जा हा जात, धर्म व मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो माणुसकीच्या विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो—- शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही.”

लेखक : अनामिक 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३५ परिव्राजक १३.गुजरातचे दिवस ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

खेत्री म्हणजेच खेतडीहून स्वामीजी पुन्हा अजमेरला आले. श्री हरविलास सारडा यांच्याकडून तीन चार दिवसांनी ते बेबार इथं गेले असता, शामजी कृष्ण वर्मा अजमेरहून कामानिमित्त बेबारला आले होते, तेंव्हा ते स्वामीजींना बरोबर घेऊनच आले. हरविलास यांनी शामजींना स्वामीजींचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांची देशभक्ती याबद्दल सर्व सांगितलं होतं. शामजींच्या घरी स्वामीजी पंधरा दिवस राहिले होते. तिथे स्वामीजींचा शामजींबरोबर धार्मिक आणि तत्वज्ञानवर संवाद होत असे. हरविलास यांचे राजस्थानमध्ये समाज सुधारणेचे मोठे काम होते तर, राजकीय क्षेत्रातल्या सर्वात जहाल क्रांतिकारकांच्या चळवळीला मदत करणारे पंडित शामजी कृष्ण वर्मा. (आपल्याला शामजी कृष्ण वर्मा हे व्यक्तिमत्व  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रात आपल्याला भेटले आहे.) या दोघांची भेट आणि झालेली वैचारिक देवाण घेवाण आश्चर्यकारकच आहे.

यानंतर स्वामीजी अबुच्या मार्गाने निघाले असता त्यांना तिथे ब्रम्हानंद आणि तुरीयानंद भेटले. यावेळी स्वामीजी फार उदास होऊन त्यांना म्हणाले, “ राजस्थान मधले लोकांचे दारिद्र्य पाहून माझे अंतकरण फाटून गेले आहे. त्यामुळे मला धड रात्री नीट झोप पण लागत नाही”. आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रु वाहू लागले. ते जरी खेत्रीला राजवाड्यात राहिले होते, तरी त्यांचा गावातील लोकांचा संपर्क आला होता. रोज कुठे ना कुठे खेडेगावात पण प्रवास झाला होता. तेंव्हा ग्रामीण भागातल्या लोकांचे दर्शन झाले होते. शेतकरी आणि झोपड्यातून राहणारी मुलेबाळे त्यांनी पहिली होती. अंगावर पुरेसे कपडे नाहीत, पोट खपाटीला गेलेलं, चेहरे निस्तेज हे दारिद्र्याचं दृश्य त्यांच्या अंतकरणाला भिडलं होतच. राजा अजीतसिंग यांच्याशी बोलताना सामान्य माणसापर्यंत शिक्षण कसं पोहोचवता येईल. शिक्षण हे दारिद्र्य कमी करण्यास कसं उपयोगी पडेल यावर चर्चा होत असत आणि एखादा छोटासा संस्थानिक आपल्या प्रजेचा कल्याणकारी विचार करेल तर हजारो माणसांचं जीवन तरी सुखी होईल हे स्वामीजींना समजत होतं म्हणून ते तशी दृष्टी देण्याचा प्रयत्न संस्थांनीकांच्या भेटीत सगळीकडेच करत होते.

राजस्थान मधला प्रवास आटोपता घेऊन स्वामीजी आता गुजरातेत अहमदाबादला आले. काही दिवस भिक्षा मागून मिळेल तिथे राहिले नंतर, उपन्यायाधीश श्री बालशंकर उमियाशंकर यांच्याकडे राहिले, जैन साधूंची भेट घेतली. त्यांच्या बरोबर जैन तत्वज्ञानवर चर्चा केली. पुढे लिमडी संस्थानला ते आले. लिमडीचे राजे, श्री ठाकुर जसवंतसिंग स्वामीजींच्या दर्शनाने प्रसन्न झाले. स्वामीजींना त्यांनी राजवाड्यातच काही दिवस ठेऊन घेतलं, ठाकुर जसवंतसिंग इंग्लंड आणि अमेरिकेचा प्रवास करून आले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांना आधुनिकतेचा स्पर्श झाला होताच. पण तरी सुद्धा भारताच्या सनातन धर्माचा त्यांना अभिमान होता. त्यामुळे स्वामीजींचे विचार त्यांना पटले होते. वेदान्त विचारांचा प्रसार करण्यासाठी स्वामीजींनी पाश्चात्य देशात जावे ही कल्पना त्यांनीच प्रथम स्वामीजींना सुचवली असं म्हणतात. लिमडीहून जुनागडला जाताना ठाकुरांनी स्वामीजींना परिचय पत्र दिले.

भावनगर व सिहोरला राहून ते जुनागड इथं आले. इथल्या वास्तव्यात ते जुनागड संस्थानचे दिवाण श्री हरीदास बिहारीदास देसाई यांच्याकडे राहिले होते. इथला परिसर स्वामीजींच्या विचारांना अनुकूल होता. काही शतकांपूर्वी नरसी मेहता हे संत इथे होऊन गेले होते. शहरापासून जवळच गिरनार पर्वताचा पायथा इथं होता. तिथे जाण्याच्या मार्गावरच अनेक टेकड्यांवर पसरलेली हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांची मंदिरे होती. गिरनार पर्वताच्या पायथ्याशी सम्राट अशोकाने लिहिलेला प्राचीन शिलालेख दोन हजार वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष देत होता. त्यावर, प्रजेला सन्मार्गाने जाण्याचे आवाहन करणारी वचने कोरली होती. धर्म वचनांचा असा नम्रतेने पुरस्कार करणारा सम्राट अशोक खरं तर भारताचा एक वारसाच होता आणि हा इतिहास आपण कसा विसरून गेलो आहोत याची तिथल्या लोकांना स्वामीजींनी आपल्या विवेचनातून जाणीव करून दिली होती.

दिवाण साहेब स्वामीजींबरोबर अनेकांच्या भेटी आणि चर्चा घडवून आणत होतेच. हे संवाद मध्यरात्री पर्यन्त रंगत. स्वामीजींनी इथे, येशू ख्रिस्ताचे जीवन, त्याचा युरोप वर झालेला परिणाम तिथली संस्कृती राफेलची चित्रकला, धर्मोपदेशक, त्यांच्या संघटना, यामागे कशी येशू ख्रिस्ताची प्रेरणा आहे हे लोकांना समजून संगितले. युरोपमध्ये झालेली धर्मयुद्धे सांगितली. त्याच बरोबर भारतीय संस्कृतीतली तत्वे कशी युरोप मध्ये पोहोचली आहेत हे सांगीतले. मध्य आणि पश्चिम आशियाचा इतिहास सांगितला आणि जगत अध्यात्म विचारात आपल्या भारतीय संस्कृतीचा कसा महत्वाचा आणि फार मोठा वाटा आहे हे पण सांगीतले. स्वदेशीचा अभिमान आणि श्रीरामकृष्ण यांचा परिचयही तिथल्या सुशिक्षित लोकांना करून दिला. सर्वंकष विचार करणार्‍या अशा व्यक्तीचा सहवास लाभला आणि भेट झाली यात जुनागड च्या लोकांना धन्यता न वाटली तरच नवल होतं.

इथून स्वामीजी वेगवेगळ्या स्थळांना भेटी देऊन आले. भूज, कच्छ, वेरावळ आणि वेरावळ पासून जवळच असलेला, प्राचीन इतिहासाशी नातं सांगणारं प्रभासपट्टण इथे गेले. तेंव्हा त्यांनी गझनीच्या महंमदाने उध्वस्त केलेले सोमनाथचे भग्न मंदिर पाहिले. अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले छोटे मंदिर पाहिले.  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार पटेल यांनी खंबीर धोरण स्वीकारून उभं केलेलं सोमनाथ मंदिर आज आपल्याला दिसतं.

प्रभास पट्टणहून स्वामीजी पोरबंदरला आले. हे ही एक संस्थान होते. तिथले प्रशासक श्री शंकर पांडुरंग पंडित यांच्या नावाने स्वामीजींना जुनागडहून परिचय पत्र दिल्याने स्वामीजी त्यांच्याकडे उतरले होते. हे पंडित वेदवाङ्ग्मयाचे अधिकारी व्यक्ति होते. त्यावेळी त्यांचे वेदांचे भाषांतराचे काम चालू होते. स्वामीजींची ओळख झाल्यावर सुरूवातीला त्यांनी स्वामीजींची कठीण भागाचे भाषांतर करण्यासाठी मदत घेतली. पण  नंतर स्वामीजी या कामात खूप रमले. भाषांतरासाठी मदत म्हणून ते तिथे राहिले.

शंकर पांडुरंग पंडित हे मोठे विद्वान होते. युरोपातील अनेक देशात ते प्रवास करून आले होते. त्यांना फ्रेंच आणि जर्मन भाषा येत होत्या. त्यांचं स्वतच मोठं ग्रंथालय होतं. याचं आकर्षण स्वामीजींना वाटलं होतं. पंडितांनी स्वामीजींना पहिल्या भेटीत सांगितलं होतं की, कितीही दिवस रहा आणि ग्रंथालयाचा हवा तेव्हढा वापर करा. या ओढीने स्वामीजी पुन्हा पोरबंदरला येऊन भाषांतरा साठी राहिले आणि त्यांची वेदांचा अभ्यास करण्याची फार दिवसांची इच्छा पण पूर्ण झाली.

स्वामीजींचे विचार अनेक वेळा ऐकल्यानंतर पंडित त्यांना म्हणाले होते, “स्वामीजी, आपल्या देशात तुमच्या विचारांचं चीज होणार नाही. तुम्ही पाश्चात्य देशात गेलं पाहिजे. भारतीय परंपरा आणि संस्कृती जाणण्याची जिज्ञासा असणारी माणसं तिकडं आहेत. तुम्ही तिथं जाऊन आपल्या धर्मातली सनातन तत्व स्पष्ट केलीत तर, त्याचा प्रभाव पाश्चात्यांवर झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही फ्रेंच भाषेचा अभ्यास केलात तर युरोप मध्येही खूप उपयोग होईल. यावर स्वामीजी म्हणाले, “मी एक संन्यासी आहे, माझ्या दृष्टीनं पूर्व काय आणि पश्चिम काय दोन्ही सारखी आहेत. तशी वेळ आली तर मी पश्चिमेकडे जाईन”. 

आधुनिक दृष्टी असलेल्या, जग पाहिलेल्या आणि हिंदुधर्माचा उत्तम व्यासंग असणार्‍या पंडितांची ओळख आणि भेट आणि वेदांचं भाषांतर करण्याची कष्टाची का असेना मिळालेली संधी यामुळे इथला स्वामीजींचा प्रवास फलदायी झालेला दिसतो. 

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? मनमंजुषेतून ?

☆ बाबा…अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

हाफ चड्डीत सायकलच्या पुढच्या दांडीवर एका बाजूला दोन पाय टाकून तिरका बसायचो आणि बाबा अंगातला सगळा जोर लावून पायडल मारत सायकल पुढे न्यायचे. त्यावेळी मला फक्त सायकलला झूम करून येणारा वेगच समजायचा आणि मन सुखावून जायचं.. त्यामागे बाबांनी दातओठ खाऊन लावलेला तो जोर कधी जाणवलाच नाही! संसाराचा सगळा गाडा त्यांनी आणि आईनी असाच जोर लावून पुढे नेला. मला समजला तो माझ्या आयुष्याला मिळत राहिलेला वेग… समजली ती फक्त माझी होत असलेली प्रगती – शारीरिक वाढीतली, खेळातली, स्पर्धांमधली,  शिक्षणातली, व्यवहारज्ञानातली… आणि मी अभिमानानं सुखावत गेलो… त्यामागे आई-बाबांनी लावलेला जोर त्यांनी कुठून आणि कसा आणला हे समजलंच नाही.

ते वयच नव्हतं बहुदा, हे असलं काही समजून घेण्याचं. पण कालचक्राला सगळं समजतही असतं आणि उमजतही! प्रत्येक गोष्टीत बाबांना गृहीत धरणारा, ते आहेत, ते बघतील, ते करतील असं म्हणणारा मी अलगद स्वतः बाबांच्या भूमिकेत कधी शिरलो, समजलंच नाही.

तेव्हा आम्ही फरशीवरच्या बाजारात गणपती बाप्पा आणायला जायचो. ही मूर्ती घेऊ की ती घेऊ असं व्हायचं. वेगवेगळ्या मूर्ती बघत असताना त्यातून आपल्या घरी कुठली  न्यायची याची निवड माझं ‘वय’ करायचं तर बाबांचा अनुभव आणि सुजाणपणा ती निवड करायचा. ” पण बाबा ती कित्ती मस्त आहे? ती मूर्ती का नको? ” असा हट्ट करणारा, प्रसंगी रडणारा मी, ” अरे! ही बघ ही घेऊया. ती छान आहे, पण ती नाही चालणार आपल्याकडे.” हे उत्तर ठामपणे कधी देऊ लागलो समजलंच नाही.

” बाबा आज मी करू देवपूजा ?” ” बाबा आज मी करू बाप्पांची आरती? ” अशी हट्टपूर्वक विनंती करणारा मी कधी या सगळ्या गोष्टींना सरावलो समजलंच नाही.

–आणि “अजून थोडा मोठा झालास की कर “, “अरे हात दुखतील तुझे ताम्हन धरून, थोडा मोठा झालास की करायचीच आहे आरती,” असं म्हणणारे बाबा, अलगद आरतीच्या वेळी गर्दीत सगळ्यात मागे जाऊन कधी उभे राहू लागले तेही समजलंच नाही.

आज वयाच्या अशा नेमक्या टप्प्यावर आलोय की सगळा पट उलगडल्यासारखा वाटतोय. मला पडणारे प्रश्न माझ्या मुलाला पडू लागलेत, मी करायचो तो हट्ट मुलगी करू लागलीये. आणि त्यावेळी  बाबा द्यायचे तशी उत्तरं माझ्या तोंडी आलीयेत.

आजही बाप्पा आणायला आम्ही एकत्र जातो. ‘ सायकल ‘ची जागा आता ‘ फोर व्हीलर ‘ नं घेतलीये. पण ” तुम्ही या घेऊन, मी हिच्याबरोबर घरी थांबून स्वागताची तयारी करतो,” असं बाबा कधी म्हणायला लागले समजलंच नाही.

आरतीचं ताम्हन मला जड होईल, असा विचार करणाऱ्या बाबांना, आज चार आरत्या पूर्ण होईपर्यंत सलग उभं राहणं जड होऊ लागलंय. त्यांचा तो जोर कधी, कसा निघून गेला समजलंच नाही.. 

बाबा …  मला सायकलच्या दांडीवर बसवून वेगात पायडल मारण्याचा तो जोर तुम्ही कुठून, कसा आणला होतात, आणि तो कधी, कसा निघून गेला समजलंच नाही. पण तो जोर गेला कुठे?– याचा उलगडा झालाय मला..

तो सगळा जोर तुम्ही माझ्या मनगटात भरलाय आणि ती सगळी जिद्द मला वारसा म्हणून दिलीये हे आता मला नक्की समजलं आहे!

आजही मला तुम्ही खूप आवडता…. अगदी गणपती बाप्पांइतकेच !!!!

{सर्व बाबा लोकांना समर्पित.}

लेखक –  अज्ञात

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “भारतीय संगीताची आवश्यकता…” ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? इंद्रधनुष्य ?
☆ “भारतीय संगीताची आवश्यकता…” ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित 

आपल्या मेंदूचे उजवा आणि डावा असे दोन भाग असतात. उजव्या मेंदूचे काम सर्जनशीलता,  कला, अंतर्ज्ञान. डाव्या मेंदूचे काम कारणमिमांसा, निर्णयक्षमता, गणित, शास्त्र, पृथक्करण, भाषा, तर्क, आणि रोजचे पूर्ण रुटीन. 

फक्त लहानपणीची काही वर्षे आपला उजवा मेंदू काम करतो, नंतर त्याचे काम करणे हळूहळू बंद होते.संगीत ऐकल्यामुळे उजव्या मेंदूतील १७ केंद्रे ऍक्टिव्हेट होतात. संगीतोपचार म्हणजे ” उजव्या मेंदूचे अभ्यंगस्नान “. 

संगीत उपचारांमध्ये संगीत हे माध्यम असते.

आपल्या शरीरातील एकूण एनर्जीच्या २५ टक्के एनर्जी मेंदूला आवश्यक असते. बाकी  शरीरासाठी आपण पौष्टिक आहार घेतो, व्यायाम करतो, परंतु शरीराच्या प्रत्येक क्रियेसाठी जबाबदार असलेल्या मेंदूसाठी अक्षरशः काहीच करत नाही. 

संगीत उपचाराचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आपण कमी जास्त प्रमाणात डाव्या मेंदूच्या अधिपत्याखाली असतो. संगीतोपचारामुळे मेंदूच्या उजव्या भागातील केंद्र ऍक्टिव्हेट केली जातात जे खूप जरुरी आहे. म्हणून रोज वीस मिनिटे तरी संगीत ऐकावे. संगीताच्या माध्यमातून ब्रेन प्रोग्रामिंग होते, त्याप्रमाणे भावना बनतात.

संगीताचे फायदे… 

१) संप्रेषण कौशल्य (कम्युनिकेशन स्किल) सुधारते. 

२)  स्मरणशक्तीमध्ये वाढ होते. संगीतामुळे मेमरी स्ट्रॉंग होते, विशिष्ट संगीताच्या साह्याने त्या वेळची परिस्थिती     आठवते.

३) एकाग्रता वाढते. 

४) रागावर नियंत्रण ठेवता येते. 

५) शारीरिक वेदनांवर नियंत्रण ठेवता येते. 

६) ताण तणावावर नियंत्रण ठेवता येते. 

७) स्ट्रेस हार्मोनची पातळी योग्य प्रमाणात राखण्यास मदत होते…. वाद्य वाजवताना बोटांच्या हालचाली मेंदूसाठी उत्तम असतात.

गाणे म्हणणे का जरुरी आहे —- संगीताचा उगम कला म्हणून झाला नसून, भावनांचे प्रकटीकरण करण्यासाठी झाला आहे. ५ टक्के लोक संगीत तयार करतात व ९५ टक्के लोक त्याचा आनंद घेतात. हे कला म्हणून ठीक आहे. आपल्याला लोक नावे ठेवतील ही गोष्ट मनातून काढून टाकून प्रत्येकाने फ्रीली येईल तसे गायले पाहिजे. 

ओरिजिनल गाणे ऐकून तेच गाणे स्वतः म्हणण्याचा प्रयत्न करणे, या प्रयत्नाला आपला मेंदू सर्वात जास्त सकारात्मक प्रतिसाद देतो. मोठ्यांनी गाण्याचा प्रयत्न केला, तर लहान मुले व तरुण मंडळी सुध्दा गाण्याचा प्रयत्न करतील व त्याचा सकारात्मक परिणाम सर्वांनाच होईल.. पटकन मूड चेंज होण्यासाठी तरुण वयात आपण जी गाणी ऐकत होतो, त्याच पद्धतीची किंवा तीच गाणी ऐकावीत. संगीताचा कोणताही साईड इफेक्ट नाही. 

संगीत हे मानवासाठी वरदानच आहे…

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ १५  सप्टेंबर अभियंता दिन / १७ सप्टेंबर विश्वकर्मा दिन ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

15 सप्टेंबर. ! अभियंतादिन. तमाम इंजिनिअर्सनां शुभेच्छा. अभियंतादिन ज्या व्यक्तीच्या अफाट, अचाट कर्तृत्वामुळे अस्तित्वात आला त्या व्यक्तीला आपण विसरुच शकणार नाही.

हे आदर्श अभियंता म्हणजे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या, ज्यांना”‘नाईट कमांडर” म्हणून ओळखल्या जातं. त्यांचा जन्म 15 सप्टेंबर 1861 चा.

त्यांचे वडिल हे एक संस्कृत विद्वान होते व हिंदू ग्रंथांचे भाष्यकार असून आयुर्वेदिक वैद्य होते. मात्र हे पंधरा वर्षांचे असतानांच वडीलांचे निधन झाल्याने ह्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळला होता. वडील खूप हुषार होते परंतु तेव्हाचा काळ हा सरस्वती व लक्ष्मी एकत्र नांदत नसते ह्या पध्दतीचा होता. त्यामुळे त्यांचे वडील बुध्दीमान असूनही पैसा गाठीशी न जोडून ठेवल्याने त्यांच्या पश्चात ह्यांच्या कुटूंबाला परिस्थीतीचे चटके खूप सोसावे लागले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण चिकबळ्ळापूर येथे तर उच्चमाध्यमिक शिक्षण बंगलोर येथे झाले. ते १८८१ साली मद्रास येथुन बी. ए. ची परीक्षा उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. स्थापत्य अभियांत्रीकीचे पुढील शिक्षण त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे मध्ये पुणे येथे घेतले. १८८३ मध्ये ते इंजिनिअरिंगच्या पदवी परीक्षा प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

अभियांत्रिकीमध्ये स्नातक झाल्यावर, त्यांनी मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी केली. नंतर त्यांना भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून एका कामगिरीचा श्रीगणेशा करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले त्यांनी, दख्खन क्षेत्रात पाटबंधाऱ्यांची एक अतिशय क्लिष्ट योजना राबविली. त्यांनी ‘सांडव्याची स्वयंचलीत पूरनियंत्रण द्वार प्रणाली’ विकसीत केली व त्याचे पेटेंट घेतले जी सन १९०३ मध्ये पहिल्यांदा पुण्याजवळील  खडकवासला धरणास लावण्यात आली. ही द्वारे, धरणातील साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता, उच्चतम स्थितीस वाढविण्यास वापरण्यात आलीत. या द्वारांच्या कामात मिळालेल्या यशामुळे, ती दारं ग्वाल्हेर व म्हैसूर येथील धरणांवर बसविण्यात आली.

सर विश्वेश्वरैया ह्यांनी हैदराबाद शहराचे पूरापासुन संरक्षण करण्यासाठी जी प्रणाली विकसित केली त्याने त्यांना सत्कार मुर्ती च्या रांगेत बसविण्यात आले. विशाखापट्टणम  बंदरास समुद्री पाण्यापासुन गंजरोधक करण्याची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. सर मो. विश्वेश्वरैया ह्यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासुन ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची संपूर्ण जबाबदारी स्विकारुन देखरेख केली. या धरणाचे बांधकामाने तेव्हाच्या काळातील हे आशियातील सर्वात मोठे सरोवर ठरले. ह्यामुळेच ते  ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून ओळखले जावू लागले.

त्यांचे म्हैसूर राज्याचे नोकरीदरम्यान, त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, , किटकनाशक प्रयोगशाळा, भद्रावती आयर्न व स्टील वर्कस्, श्री जयचमाराजेन्द्र पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, मैसुर चेंबर ऑफ कॉमर्स असे अनेक औद्योगीक प्रकल्प सुरु केलेत. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. त्यांचे वेळेचे नियोजन, प्रामाणिकपणा आणि झोकून देऊन समोरील काम यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेणे हीच त्यांची शेवटपर्यंत ओळख बनली. तिरुमला-  तिरुपती दरम्यानच्या रस्तेबांधणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले.

सर विश्वेश्वरय्या ह्यांची सुरत येथून  पुण्याच्या सेन्ट्रल डिव्हिजनमध्ये असिस्टन्ट  चीफ इंजिनिअर या पदावर बदली झाली. पुणे विभाग हा मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये मोडत असे. या पुणे विभागातच मुंबई प्रेसिडेन्सीमधील सर्वात मोठे असे दोन साठवण जलाशय होते. खडकी क्यानटोन्मेंट विभागाला गाळलेल्या पाण्याचा पुरवठा केला जात असे. मुळा नदीच्या एका कालव्यातून हे पाणी फिफे जलाशयात येत असे. मुळा नदी उन्हाळ्यात कोरडी पडायची तर पावसाळ्यात पूर येउन दगडी बंधाऱ्यावरून पाणी वाहून फुकट जात असे. अस्तित्वात असलेले दगडी धरण उंच करायचे तर पायाच्या भिंतीना अधिक  जलस्तंभामुळे धोका संभवला असत. मग अधिक पाणी साठवण्यासाठी काय मार्ग काढावयाचा ?हा सगळ्यांसमोर यक्ष प्रश्न पडला. श्री विश्वेश्वरय्या यांच्यावर मोठीच जबाबदारी पडलेली होती. परंतु अशा स्थितीत न डगमगता खंबीरपणे त्यांनी या सांडव्यावर ७ ते ८ फूट अधिक पाणी साठवू शकतील असे दरवाजे बनवण्याचे ठरवले आणि स्वतःच्या तल्लख बुद्धीने त्यांनी स्वयंचलित दरवाज्यांचे डिझाईन तयार केले. धरणाच्या  सांडव्यावर आणखी ८ फूट जलस्तंभ अडवतील असे ऑटोमाटिक दरवाजे त्यांनी बनवले. पावसाळ्यात या दरवाज्यांमुळे ८ फूट पाणी अडल्यानंतर जर आणखी अधिक पाणी वाढू लागले तर हे दरवाजे ऑटोमॅटिकली उघडत आणि जादाचे पाणी वाहून जात असे. एकदा का जादा पाणी येण्याचे थांबले की ते दरवाजे बंद होत. हा एक महान आणि क्रांतिकारी शोध त्यांनी लावला. सरकारने त्यांच्या नावाने ह्या  ऑटोमाटिक दरवाजांचे पेटंट त्यांना करून दिले. हे दरवाजे ग्वाल्हेरच्या   आणि कृष्णाराज सागर या धरणांवर बसवले गेले. तसे पाहता  ते  पूर्ण संशोधन श्री  विश्वेश्वरय्या यांचे होते. त्यामुळे त्याच्या पेटंट पोटी  सरकारने त्यांना पेटंट मनी देऊ केला परंतु अतिशय नम्रपणे त्यांनी ते नाकारले. मी ब्रिटीश सरकारच्या नोकरीत असताना हे डिझाईन केले आहे त्यामुळे  त्या पेटंटचे पैसे  घेणे माझ्या नीतिमत्तेला धरून नाही असे त्यांनी सरकारला सांगितले. स्वयंचलित दरवाज्यांचे हे डिझाईन इतके चांगले होते  की हे जलाशयावर बसवलेले हे दरवाजे पाहण्यास ते पन्नास वर्षांनी स्वतः गेले तरी ते दरवाजे उत्तम रीतीने काम करीत होते. पुण्याचा जलसिंचन विभाग पाण्याच्या मोठ्या साठ्यांमुळे आणि धरणांमुळे सन १९०० च्या सुमारास प्रसिद्ध होता. परंतु ज्या भागाला कालव्यांद्वारे पाणी पुरवठा होतो ते प्रांत सुबत्ता प्राप्त करत आणि धरणांच्या खालील भागांना किंवा कालव्याच्या उप शाखांना कमी पाणी पोचत असल्यामुळे तिथे पाणी कमी पडत असे. मोठे व धनवान शेतकरी मुख्य कालव्यातून जास्त पाणी घेत आणि दूरवर वसलेल्या कालव्याबाजूच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी अपुरे पडत असे. ही विषमता दूर करण्यासाठी श्री विश्वेश्वरय्या यांनी पाळीपाळीने किंवा चक्राकार पद्धतीने पिकांना पाणी देण्याची विशेष योजना आखली. कालव्याच्या वरील भागातील श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेमुळे मन मानेल तसे पाणी घेता येणार नव्हतेह त्यामुळे त्यांनी आपले म्हणणे केसरीचे तत्कालीन संपादक लोकमान्य टिळक यांच्याकडे मांडले आणि केसरीतून दर आठवड्याला  या चक्राकार पद्धती विरुद्ध लिखाण छापून येऊ  लागले. विश्वेश्वरय्यानी आपली ही योजना सरकारला विशद केली आणि विरोध करणाऱ्या जमीनदार शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून ही योजना प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली. ब्लॉक सिस्टीम या नावाने  ही योजना प्रसिद्ध आहे आणि अजूनही भारतभर हीच पद्धत अवलंबिली जाते.

सर विश्वेश्वरय्या ह्यांच्या बुद्धीमत्तेचे  भारतीयांबरोबरच इंग्रज लोकसुद्धा कौतुक करू लागले. ब्लॉक पद्धतीनुसार वर्षातून तीन पिके वर्तुळाकार क्रमाने घ्यायची आणि उपलब्ध पाणी वापरूनच अधिक लाभ क्षेत्रात पिके काढायची अशी पद्धत आहे. तीन पिकातील एक भात किंवा उस हे सर्वाधिक पाणी लागणारे पीक असावे आणि आणि दुसरे मध्यम पाण्यावर तयार होईल असे असावे तर तिसरे पीक कमीतकमी पाणी लागेल असे असावे असे विश्वेश्वरय्या यांनी निश्चित केले.  एकाच जमिनीत वेगवेगळी पिके पाळीपाळीने घेतल्यास मातीचा कस कमी होत नाही. सगळया  रयतेला हे पटण्यासाठी त्यांनी मोठ्या जमीनदारांना असा प्रयोग निदान एकदा तरी करून पाहण्याची सूचना केली. मोठ्या जमीनदारांनी ते मानले आणि हा प्रयोग कल्पनातीत यशस्वी झाला. सामान्य शेतकरीसुद्धा ब्लॉक सिस्टीमच्या जलसिंचनासाठी तयार झाला. मुंबई सरकारचे ज्येष्ठ सदस्य सर जोन  मूर माकेंझी यांनी या पद्धतीसाठी श्री.  विश्वेश्वरय्या यांचे तोंड भरून कौतुक केले. पाण्याच्या संयमित वापरामुळे डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होउन मलेरिया सारख्या  रोगालाही आळा  बसला.

सन १९०८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती नंतर म्हैसूर या भारतातील मोठ्या व महत्त्वाच्या राज्याचे दिवाण म्हणून त्यांना नियुक्त केले गेले. कृष्णराज वोडेयार चतुर्थ या म्हैसूरच्या महाराजांच्या पाठिंब्यामुळे सर विश्वेश्वरया यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान दिले. इतर अनेक कामांसोबत, सन १९१७ मध्ये बंगळूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची त्यांनी स्थापना केली. ही भारतातील पहिली अभियांत्रिकी संस्था होती, जी अद्यापही कर्नाटकातील एक प्रतिष्ठित संस्था आहे.

म्हैसूर येथे असतांना त्यांनी जनतेसाठी केलेल्या कामांमुळे, त्यांना’नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केल्या गेल.

सर मो. विश्वेश्वरैया यांना आंतरराष्ट्रीय इंस्टीट्युट ऑफ सिव्हिल इंजिनिअर्स ह्या लंडन स्थित संस्थेने सन्माननिय सदस्यत्व तर इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स च्या बंगलोर शाखेने फेलोशिप देऊन त्यांचा सन्मान केला. देशातील अनेक विद्यापिठांनी त्यांना ‘डॉक्टर’ ही अनेक विद्याशाखातली पदवी देऊन गौरविले. ते सन १९२३ च्या इंडियन सायन्स कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.

अशी अद्वितीय, असामान्य माणसं आपल्या देशाची खरी संपत्ती असतात. वयाच्या 101 व्या वर्षी दिनांक 14 एप्रिल 1962 रोजी ह्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि जगातील तमाम इंजिनिअर्स ना ह्या अभियंता दिनाच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares