मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खरं प्रेम…? ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

 

?  वाचताना वेचलेले ? 

☆ खरं प्रेम……? ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकरी कुस्करून द्यायची.

पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा… 

एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.  

घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहिलं . ‘ मेलं की काय ‘ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं. 

त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघितलं, आणि चक्क ‘ शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..’ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!

त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टीपॉयवरचा चष्मा आणून दे…  अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.

मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘ अग मन्या दिसत नाही गं कुठं ? ‘ बायकोला सतत विचारत राहायचा.

असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबली. 

मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅनमधे बसला.  नवऱ्याने हे बघितले.  हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.

नवरा म्हणाला, ” मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरांसाठी आहे. तुझ्यासाठी नाही.

“ मला माहितेय..! पण मला जायचंय आता.”— मन्या शांतपणे बोलला.

” मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.  माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता.” काकुळतीला येवून नवरा बोलला.

मन्या गोड हसला, आणि बोलला, ” तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर? “

” म्हणजे काय शंका आहे का तुला? “

” मित्रा, अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेव्हा तोंड घालत होतो, तेव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा. पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो,  तुला हवं तसं करू लागलो…. तेव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय? ” 

नॉट सो स्ट्रेंज यार…!!   वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?  समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं. 

पण जेव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेव्हा त्याचं आपल्यासोबत असणंही आता नकोसं वाटतं. आपण त्याला टाळत राहतो—-भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

— आश्चर्य आहे ना ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?—–

— आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं, अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!

 

संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 7 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 7 ☆ सौ. अमृता देशपांडे  

प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्यातला ह्रद्य प्रसंग म्हणजे तिची लग्नाच्या दिवशी सासरी पाठवणी…ही वेळ तिच्या साठी तर कठीण असतेच, पण आईवडील,  बहीण भाऊ,  मित्रमैत्रिणी यांच्यासाठी सुद्धा कठीण असते. लेकीचं लग्न ठरलेल्या दिवसापासून तयारीत गुंतले  असताना हे सगळेजण काळजात एक हुरहुर घेऊन वावरत असतात. प्रत्येक जण प्रेम, आपुलकी,  जबाबदारी यांची वसने स्वखुशीने अंगी लेवून कार्यतयारीत  मग्न असतो. धुमधडाक्याने लग्न करायचे, कुठेच काही कमी होऊ नये,  हा एकच ध्यास असतो. त्यातून वधूबद्दलचे प्रेमच ओसंडत असते. एकदा का अक्षता पडल्या, आणि जेवणे पार पडली की इतके दिवस आवरून धरलेलं अवसान  पूर्णपणे गळून पडते आणि डोळ्यांच्या पाण्याच्या रूपाने घळाघळा वाहू लागते.  आईला लग्न ठरल्य्पासून पोटात आतडे तुटल्यासारखे वाटतेच. वडिलांनी कन्यादानात लाडक्या लेकीचा हात जावयाच्या हातात देताना थरथरत्या स्पर्शातून खूप काही सांगितले असते.मुलीकडच्या सर्वांना तिचे जन्मापासूनच आतापर्यंतचे सहवासाचे क्षण आठवत असतात.  आता इथून पुढे ती आपल्या बरोबर नसणार याचे वाईट वाटते. पण ती सासरी आनंदात रहावी ही भावनाही असते. अशी डोळ्यातल्या पाण्याची शिदोरी घेऊन सासरी गेलेली लेक तिथे फुलते, फळ ते, बहरते,  आनंदी होते.त्यातच आईवडिलांना समाधान असते. तिने सासरी समरस होऊन सासर आपलेसे करणे,  हेच आणि हेच अपेक्षित असतं त्यांना… पाठवणीच्या वेळी आलेलं डोळ्यातलं पाणी दोन्ही परिवारांच्या ह्रदयातला सेतू असतो. म्हणून लग्नात अश्रूंनी ओलीचिंब झालेली पाठवणी ही प्रत्येक धर्मात एक संस्कारच आहे. इथे अश्रू अक्षतांप्रमाणेच पवित्र आणि मंगलरूप धारण करतात.  म्हणूनच त्यांना गंगाजमुना म्हणतात.गंगाजमुना या पवित्र नद्या.  जल जेव्हां प्रवाहीत असते, तेव्हा सगळा कचरा वाहून जाऊन स्वच्छ पाणी वहात असते. वाहून न गेलेले पाणी साचलेले डबके होते. पाण्याने प्रवाहीत असणे, हाच त्याचा धर्म.  डोळ्यातून पाझरणा-या गंगाजमुना नी हा क्षण पवित्र आणि अविस्मरणीय होतो.

मराठी चित्रपट सृष्टीत या प्रसंगावरून ‘ लेक चालली सासरला, ‘ ‘ माहेरची साडी’ असे कित्येक चित्रपट वर्षोंवर्ष गर्दी खेचत होते. गीतकार पी. सावळाराम यांचं ” गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ हे गाणं त्रिकालाबाधित आहे.  कानावर पडताच काळीज गलबलतं…स्त्रीवर्गच नाही तर प्रत्येक पुरूष ही कासावीस होतो. ” सासुरास चालली लाडकी शकुंतला, चालतो तिच्यासवे तिच्यात जीव गुंतला” हे हुंदके एका ऋषींचे…..

” बाबुलकी दुवाएँ लेती जा

जा तुझको सुखी संसार मिले

मैकेकी कभी ना याद आए

ससुरालमें इतना प्यार मिले”

हे नीलकमल या सिनेमातलं गाणं, 

हम आपके है कौन?  यातलं

” बाबुल जो तूने सिखाया,  जो तुमसे पाया,  सजन घर ले चली ” हे  गाणं किंवा हल्लीच्या “राजी”  मधलं “उंगली पकडके तुमने चलना सिखाया था ना दहलीज ऊंची है पार करा दे”

नीलकमल 1960-70 या दशकातला, हम आपके है कौन? हा सिनेमा 1990 च्या दशकातील,  तर राजी 2020 चा. साठ वर्षांच्या काळात किती तरी मोठे बदल झाले, शतक ओलांडलं,  पण या प्रसंगाची भावना तीच, आणि डोळ्यातलं पाणी ही तेच!

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काष्ठशिल्पाची कथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ काष्ठशिल्पाची कथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

नारायण धारप, रत्नाकर मतकरी, या सिद्धहस्त लेखकांची मी जबरदस्त चाहती. त्यांच्या भयकथा, त्यातली पात्रे, त्या आफ्रिकेतली गूढ वर्णने, ते वाडे– सगळे मनावर विलक्षण गारुड करतात. असा त्यांचा एकही कथासंग्रह नसेल,जो मी वाचला नसेल. सांगायचे कारण, ते लिहितात त्या सगळ्याच काही कपोलकल्पित गोष्टी नसतात. काही सत्यकथाही असणारच—-कारण मलाही एकदा असाच एक भयंकर अनुभव आलाय—–

—–  गोष्ट आम्ही युरोप टूरला गेलो तेव्हाची. त्यालाही झाली  सहज १५  वर्षे. आम्ही तेव्हा फ्लोरेन्सला गेलो होतो.

तिथून पिसाही फार लांब नाही. आम्ही पिसाचा झुकता मनोरा बघितला,आणि हिरवळीवर छान पाय पसरून बसलो.

 रोम, इटलीला आफ्रिकन लोक फार मोठ्या संख्येने दिसतात. नाना वस्तू ते विकताना आढळतात. मी आणि माझी बहीण अशा दोघीच एका कंपनीबरोबर टूरला गेलो होतो.

“ ताई,चल ना जरा मार्केट मध्ये चक्कर मारू “, स्मिता म्हणाली.

बाकीचे लोक म्हणाले,’ जा तुम्ही,पण लवकर या बरं का.उगीच कुठे चुकलात तर पंचाईत होईल.’ 

आम्ही मार्केट बघायला निघालो. काय सुरेख सुरेख वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. अर्थात युरोमध्ये किमतीही अफाटच होत्या म्हणा. नुसत्या की चेन्स दहा युरो खाली नव्हत्या. अतिशय सुंदर, लेदरच्या टोट बॅग्स बघूनच समाधान मानावे.

पुढे गेलो तर दोन आफ्रिकन मुले अतिशय गुळगुळीत केलेले असे टेबलवर ठेवायचे लाकडी मोठे शोपीस विकत होती. काय सुरेख होते ते केलेले. काळेभोर शिसवी लाकडाचे. पाच गुळगुळीत डोके असलेले पुरुष एकमेकांना वेढून गोल करून वाकून उभे होते—-असे ते सुंदर काष्ठशिल्प बघून मी थबकलेच. मला अतिशय आवडले ते  .आमच्या हॉलमधल्या सेंटर टेबलवर काय मस्त दिसेल हे, असा विचारही आला मनात. मी जवळ जाऊन बघितले,तर त्यांचे चेहरे क्रूर वाटले मला. पण तरी मी त्या मुलाला विचारून उचलून बघितले ते शिल्प— आणि माझ्या अंगावर एकदम भीतीचा काटा उभा राहिला. मी ते पटकन खाली ठेवले—

— मला अशा  संवेदना,इतरांपेक्षा जास्त  तीव्र होतात आणि लगेचच समजते की हे चांगले नाही. हा सेन्स मला अगदी लहानपणापासूनच आहे. मला जाणवत होते की ते काष्ठशिल्प अगदी वाईट शक्तीने भारलेले आहे. पण तरीही मला ते घ्यायचा मोहच होत होता. तो मुलगा त्याची किंमत खूप कमी करायलाही तयार होता. मला तर तीव्रपणे असे जाणवले   की कसंही करून ते विकून त्याला मोकळं व्हायचंय.

मी त्याला विचारले, “ हे कुठून आणलंय तुम्ही? ”

सुदैवाने त्याला बऱ्यापैकी इंग्लिश येत होते. म्हणाला की असेच कोणीतरी त्याला विकलेय. “ पण तुम्ही घ्या ना हे. बघा ना किती सुंदर काम केलंय, अगदी गुळगुळीत केलंय. तुम्ही कुठून आलात? इंडिया का ? इंडिया चांगला देश आहे   असं ऐकलंय मी.” तो म्हणाला.  

मी पुन्हा त्या पुतळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. माझ्या डोळयांसमोर अचानक अंधार आला— एकदम एखाद्या गूढ जंगलात कसले तरी पडघम  वाजताहेत असा भास झाला. पण काही केल्या मला त्या पुतळ्यासमोरून हलताच येईना. आता तर मला त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते.  माझी बहीण स्मिता शेजारीच उभी होती.

तिलाही असं काहीतरी वेगळंच जाणवलं असावं. तिने माझा हात ओढला आणि म्हणाली, “ ताई नको घेऊ हे . फार भयानक दिसतंय. किती हिडीस दिसतायत ही माणसं. कसा काय आवडलाय हा पुतळा तुला .शी…. अजिबात नको घेऊ हं. “ 

त्या मार्केटमध्ये आम्हीच दोघी उरलो होतो. बाकी लोक निघून गेले होते. तो मुलगा तर आता असं म्हणायला लागला होता की “ मी हे तुम्हाला गिफ्ट देतो, पण हे घ्याच तुम्ही.”  तो ते माझ्या हातात कोंबूच लागला. आणि माझ्या अंगावर भीतीच्या लाटा  उसळू लागल्या—स्मिताला काहीतरी जाणवले. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, “ ताई इथे नक्की काहीतरी गडबड आहे. आपण अगदी मूर्खासारख्या उभ्या आहोत.– लवकर पळ इथून.” —-

तिने मला तिथून अक्षरशः खेचत पळत न्यायला सुरुवात केली . तरी मी मागे ओढ घेतच होते.

“ थांब ना !आपण घेऊया की ग तो गिफ्ट देतोय तर.” मी मागे बघत बघत म्हणत होते. स्मिताने आता धावायला सुरुवात केली. परका प्रदेश– परकी भाषा– रस्ते– काहीच माहीत नव्हतं .आणि आतातर आम्ही कुठे आलोय हेही आठवेना. तिने मला कसेतरी फरपटत लांब नेले. तो मुलगा हातवारे करून बहुतेक आम्हाला त्याच्या भाषेत वाईट शिव्या देत होता. धावत धावत आम्ही आमच्या लोकांना येऊन भेटलो तेव्हा जीव भांड्यात पडला स्मिताचा.

तरीही मी म्हणतच होते तिला, “ अगं, निदान परत एकदा जाऊन नुसतं बघून तरी येऊया. किती सुंदर केलेय ग ते.” 

आमच्या ग्रुपमधल्या लोकांनाही हे माझं सगळं काहीतरी वेगळं चालल्याचं जाणवलं असावं. त्यांनी घाईघाईने मला कडक कॉफी दिली आणि लगेचच आम्ही बसमध्ये बसलो.

सुदैवाने आमचा तिथे रात्री मुक्काम नव्हता. रात्री मला फणफणून ताप भरला. मलाच विचारून स्मिताने माझ्या बॅग मधल्या गोळ्या मला दिल्या. मला गाढ झोप लागली. स्मिताने सकाळी मला उठवलं—” ताई, बरं वाटतंय का?” 

“ हो मस्त वाटतंय ! का ग?” 

 “ का ग काय? मूर्ख कुठली। रात्रभर मी जागत बसलेय तुझ्या जवळ. काय बोलत होतीस अग रात्रभर. कोणत्या तरी अगम्य भाषेत कोणाशी तरी जोरजोरात वाद घालत होतीस. मला इतकी भीती वाटत होती ना ताई. मग कधीतरी तुझं ते विचित्र बोलणं थांबलं आणि तुला झोप लागली. नाही तर मी खरंच कोणालातरी आपल्या रूममध्ये झोपायला बोलावणार होते.– ताई,अग हे सगळे त्या पुतळ्याचे प्रताप बाई. काहीही नाहीये का आठवत?” 

“ नाही ग. पण सॉरी स्मिता !खूप  त्रास दिला ग मी तुला.खरंच सॉरी! पण तो पुतळा बघितल्यावर मला काहीच सुचेना.

जणू मोहिनीच पडली मला त्याची. कुठंतरी जाणवत होतं की ती वाईट शक्ती आहे. पण तरीही जणू ते शिल्पच म्हणत होतं की ‘ घे मला ‘. खरं सांगते आहे. “ 

स्मिता म्हणाली ,” अक्षरशः ओढत ओढत आणलं तुला तिथून.” पण मला हेही आठवत नव्हतं .

 मग आम्ही तिथून आणखी दुसऱ्या शहरात गेलो. नंतर पुन्हा मला असा काहीच त्रास झाला नाही. आमची सगळी ट्रीप खूपच सुंदर झाली.

आमच्या ग्रुपमधले नव्याने  दोस्त झालेले लोक म्हणाले, ‘ काय ज्योतीताई, आम्ही पण काय घाबरलो होतो त्या दिवशी. स्मिताताईंची तर वाटच लागली होती.” 

— मला  मात्र हे काहीही आठवत नाही. मी तो पुतळा बघितला एवढेच मला आठवते. पुढचे काहीही नाही.

म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावे— परक्या माहीत नसलेल्या ठिकाणी  काही घेऊ नये असे आपले पूर्वीचे जुने लोक सांगतात ते मुळीच चुकीचे नाही— हा अनुभव तर हे चांगलेच शिकवून गेला मला–आणि स्मिताला पण.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सौर शिडाचे अंतराळजहाज – भाग-1 ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ सौर शिडाचे अंतराळजहाज – भाग-1 ☆ श्री राजीव ग पुजारी 

आपण सर्वांनी शिडाच्या जहाजाविषयी ऐकलेले असते. चित्रात आपण असे जहाज पहिलेले असते. पूर्वीच्या काळी दर्यावर्दी लोक अशा जहाजांच्या सहाय्याने समुद्र प्रवास करीत असत. या जहाजास जाड कापडाची शिडे लावलेली असतात. या शिडांवर वारा आपटल्यावर वाऱ्याच्या दाबाने जहाजास गती मिळते. पण एखाद्या अंतराळयानास शीड आहे व त्यावर सूर्यप्रकाश आदळल्यावर यानास गती मिळते हे आपण स्वप्नातच बघू शकतो. पण लवकरच अमेरिकेची अंतराळ संस्था अर्थात नासा हे स्वप्न सत्यात उतरविणार आहे.

चंद्रभूमीला भेट देऊन तेथे तळ स्थापण्याच्या नासाच्या महत्वाकांक्षी आर्टिमिस योजनेतील पहिली मोहीम अर्थात आर्टिमिस -१ ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणार आहे. आर्टिमिस-१ यान प्रक्षेपणानंतर कांही वेळातच NEA स्काऊट (Near Earth Asteroid Scout) हे अंतरिक्ष जहाज अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. हे जहाज पृथ्वीजवळील 2020GE या अशनीला भेट देणार आहे. या जहाजाला सौर शिड असणार आहे आणि सूर्यप्रकाश या शिडावर पडल्यावर सूर्यप्रकाशातील फोटोन्सच्या दाबाने हे जहाज 2020GE या अशनीकडे मार्गक्रमण करणार आहे.

आता आपण नासाच्या सौर शिड अंतराळ जहाजा संबंधी विस्ताराने जाणून घेऊ :—-

NEA स्काऊट हा बुटाच्या खोक्याएव्हढ्या आकाराचा क्यूबसॅट प्रकारातील उपग्रह असून त्याला साधारण रॅकेटबॉलच्या मैदानाएव्हढे ऍल्यूमिनियमचा थर दिलेले सौर शीड बसविलेले आहे. आर्टिमिस-१ ने प्रक्षेपीत केल्यावर हे शीड उलगडेल व सूर्यप्रकाशाचा वापर करून या क्यूबसॅटला 2020GE या अशनीकडे नेईल.

2020GE हा अशनी एखाद्या शाळेच्या बसपेक्षाही लहान असून, एखाद्या अंतराळयानाने अभ्यासासाठी निवडलेला सर्वात लहान अशनी आहे. नासाची सुदूर अंतराळातली अशा प्रकारची ही पहिलीच मोहीम आहे. ज्याला भेट द्यायची तो  2020GE  हा पृथ्वीचा एक निकटतम अशनी (Near earth asteroid) असून तो आकाराने ६० फुटांपेक्षा कमी आहे. आजपर्यंत ३३० फुटांपेक्षा कमी लांबीच्या अशनीचे एव्हढ्या जवळून अन्वेषण करण्यात आलेले नाही. हे जहाज त्याच्यावर बसविलेल्या वैज्ञानिक कॅमेऱ्याच्या मदतीने या अशनीचे जवळून निरीक्षण करेल. त्याचे आकारमान, आकार, गती आणि भूपृष्ठीय गुणधर्म आदींचा अभ्यास करेल, आणि त्याचवेळी या अशनीच्या आसपास काही धूळ किंवा दगडधोंडे आहेत का याकडे लक्ष देईल. कॅमेराचे रिझॉल्युशन एका चित्रपेशीला (pixel) ४ इंच असल्याने या मोहिमेच्या वैज्ञानिकांचा गट हे नक्की करू शकेल की, 2020GE हा एखाद्या खडकासारखा घन आहे, का  ‘बेन्यू ‘ सारख्या मोठया लघुग्रह भावंडासारखा लहान लहान धोंडे आणि माती यांचा गठ्ठा आहे.

या मोहिमेच्या, दक्षिण कॅलिफोर्नियास्थित नासाच्या जेट प्रॉपलशन लॅबोरोटरीतील मुख्य शास्त्रीय अन्वेषक ज्यूली कॅस्टिलो – रॉगेज म्हणाल्या, ” पृथ्वीवरील अनेक वेधशाळांनी  NEA स्काऊटसाठी १६ ते १०० फूट मापादरम्यानचे अनेक अशनी हेरून ठेवले होते. 2020GE अशा अशनींचे प्रतिनिधित्व करतो की ज्यांच्याविषयी सध्याच्या घडीला आपणाकडे अत्यंत कमी माहिती आहे.”

नासाच्या ग्रहीय संरक्षण समन्वयीन कचेरीसाठी पृथ्वीच्या निकटतम अशनींच्या शोधाचा एक भाग म्हणून काम करत असतांना, ऍरिझॉनाच्या ‘ कॅटलीना नभ सर्वेक्षणा ‘ला १२ मार्च २०२० ला हा अशनी सर्वप्रथम नजरेस पडला.

हंट्सविले, अलाबामा येथील मार्शल अंतराळ उड्डाण केंद्र हा नासाचा प्रगत अन्वेषण प्रणाली विभाग आणि जेट प्रॉपलशन लॅबोरेटरी यांनी विज्ञान व तंत्रज्ञान यांचे प्रात्यक्षिक स्वरूप ‘ NEA स्काऊट ‘  ही मोहीम विकसित केली आहे. ही मोहीम  पृथ्वीच्या निकटतम लहान अशनींसंबंधीच्या नासाच्या माहितीत भर घालेल. या मोहिमेसाठी वापरण्यात येणारे सौर जहाज सहा एकक क्यूबसॅट फॉर्म फॅक्टरने बनवले आहे. सप्टेंबर २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात  नासाच्या फ्लोरिडास्थित केनेडी स्पेस सेंटर येथून उड्डाण भरणाऱ्या ‘ स्पेस लॉन्च सिस्टीम ‘ या शक्तिशाली प्रक्षेपकावर असणाऱ्या दहा दुय्यम अभिभारांपैकी NEA स्काऊट हा एक अभिभार आहे. प्रक्षेपक आणि ओरियन यान यांना जोडणाऱ्या अडॅप्टर रिंगला जोडलेल्या डिस्पेन्सरद्वारा NEA स्काऊट अंतराळात सोडला जाईल.

ही मोहीम भविष्यातील मानवीय व यंत्रमानवीय मोहिमांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल. या प्रकारच्या मोहिमांद्वारा अशनी व लघुग्रह यांचेवरील खनिजद्रव्ये पृथ्वीवर आणणे आणि पृथ्वीच्या निकटतम अशनी व लघुग्रहांपासून पृथ्वीचे रक्षण करणे या विषयी ज्ञान मिळेल.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ द टर्न ऑफ टाईड – ऑर्थर गार्डन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

द टर्न ऑफ टाईड – ऑर्थर गार्डन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे. 

त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली… शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले ……  ‘‘ मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची खात्रीही देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी. ’’ 

गॉर्डन तयारच होते…

त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले….  ‘‘ या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा. पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको. दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’ 

दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले… 

सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली… 

त्यावर लिहिले होते … ‘ ऐका.’ 

‘काय ऐकायचे… ?’  त्यांना प्रश्‍न पडला… 

ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले… एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…

झाडीतून वाहणारी हवा…… मध्येच समुद्रावरून येणारा वारा,….. विभिन्न पक्षांचे आवाज,….. दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्‍या पक्षांचे आवाज…, 

अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या… 

जणू काही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते… 

आपणही या निसर्गाचा असाच साधा, सहज भाग आहोत, हे त्यांना जाणवले… 

मनातला सर्व कोलाहल थांबला… एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता……. 

बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही… दुसर्‍या चिठ्‌ठीची वेळ झाली होती……. 

त्यावर लिहिले होते,… ‘ मागे वळून पहा.’……. त्यांना काय करायचे कळले नाही. पण सूचनांचे पालन करायचेच होते. त्यांनी विचार करणे सुरू केले……. भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला… आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,.. बालपणीचे सवंगडी,.. कट्‌टी आणि क्षणात होणारी दोस्ती,.. त्या हसण्या-रडण्यातील सहजता,.. अकृत्रिम वागणे,.. इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले……  भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले…. 

आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते, हे आठवून त्यांचा ऊर भरून आला…….  आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो. संबंधात कृत्रिमता, दिखाऊपणा, औपचारिकता जास्त आली. या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्‌ठी उत्सुकतेने उघडली……. 

त्यात लिहिले होते, ‘‘ आपल्या उद्दिष्टांची छाननी करा .’’

गॉर्डन म्हणतात, “ मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही. पण मी सखोल परीक्षण केले……  ‘ आपले उद्दिष्ट काय..? यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत…’ “  त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते…… 

सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्‌ठी उघडली….  

त्यात लिहिले होते, ‘‘ सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये.’’ 

त्यांनी एक शिंपला घेतला … आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या… आणि ते घरी जायला निघाले… 

समुद्राला भरती येत होती… त्यांनी मागे वळून पाहिले….  एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….

गॉर्डन म्हणतात, “ त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…”. 

संग्राहक : सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ३४ परिव्राजक १२ – आदर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ३४ परिव्राजक १२ – आदर ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

 खेतडीचे राजे अजितसिंग, वयाच्या नवव्या वर्षीच गादीवर बसलेले. हे संस्थान छोटंच होतं. त्यांच्या संस्थांनाची प्रगती आणि विकास होण्यात त्यांना अडचण वाटायची ती, अशिक्षित प्रजा. त्यामुळे त्यांना अनेक प्रश्न सतावत असत. जगमोहनलाल यांनी राजेसाहेबांची स्वामीजींबरोबर भेट ठरवली. पहिल्याच भेटीत दोघंही जुना परिचय असल्यासारखे मनमोकळे बोलू लागले. औपचारिक परिचय झाल्यावर अजितसिंग यांनी पहिलाच प्रश्न विचारला, “स्वामीजी जीवन म्हणजे काय?” स्वामीजी म्हणाले, “परिस्थितीच्या दडपणाचा प्रतिकार करत करत माणसाच्या ठायी असलेल्या आंतरिक शक्तीचा जो विकास आणि आविष्कार होतो ते जीवनाचे स्वरूप होय”. या उत्तराने प्रभावित होऊन त्यांनी पुढचा प्रश्न विचारला,“शिक्षण म्हणजे काय?” स्वामीजी म्हणाले, “मी असं म्हणेन की, विशिष्ट विचारांशी माणसांच्या जाणिवांचा जो अतूट असा संबंध निर्माण होतो, त्याला शिक्षण हे नाव द्यावं”. वा, म्हणजे फक्त अनेक विषयांची माहिती करून घेणे एव्हढाच शिक्षणाचा मर्यादित अर्थ नाही. त्यातील तत्वांमुळे जाणीव आणि भावना एकरूप होऊन जीवनाला विशेष अशी दिशा यातून मिळाली पाहिजे. तेंव्हाच त्याला खरे शिक्षण म्हणता येईल. स्वामीजींनी घेतलेल्या अनुभवावरून त्यांचे हे शिक्षणाबद्दल मत झाले होते.

यानंतर वरचेवर स्वामीजी आणि महाराज यांच्या भेटी होत राहिल्या. अनेकवेळा स्वामीजी भोजनासाठी जात. काहीवेळा काही निमंत्रित व्यक्तीही पंगतीला असत. एकदा खास भोजन आयोजित केले असताना महाराजांनी ठाकूर फत्तेसिंह राठोड, अलिगड जवळच्या जलेश्वरचे ठाकूर मुकुंदसिंग चौहान, जामनगरचे मानसिंह यांनाही बोलावले होते. या खास व्यक्तींमध्ये राजस्थान मधले समाजसुधारक हरविलास सारडा ज्यांनी तिथल्या बालविवाह प्रतिबंधित कायदा प्रयत्न करून संमत करून घेतला होता त्या काळात पुढे हा कायदा त्यांच्याच नावाने ओळखला जाऊ लागला असे लोक यावेळी उपस्थित होते.

हरविलास अजमेरचे आर्य समाजाचे अध्यक्ष पण होते. त्यांच्या याआधी स्वामीजीबरोबर अजमेर, अबू, इथेही भेटी झाल्या झाल्या होत्या. वेदान्त, स्त्रियांच्या सुधारणा, संगीत, मातृभूमीचं प्रेम आणि स्वतंत्र बाणा अशा अनेक विषयांवर चर्चा झाल्या होत्या. स्वामीजींचा त्यांच्यावरही खूप मोठा प्रभाव पडला होता.

राजे अजितसिंग यांच्याबरोबर तर त्यांचे नातेच जुळले होते. ते वयाने समवयस्कही होते. त्यामुळे घोड्यावरून रपेट मारणे, खेळ खेळणे, अशा काही गोष्टी ते एकत्र करत आणि आस्वाद घेत. स्वामीजी गाणं म्हणायला लागले की राजे स्वत: हार्मोनियमची त्यांना साथ करायला बसत. अशा प्रकारे संगीत ते तत्वज्ञानपर्यंतच्या त्यांच्या सर्व आवडीनिवडी जुळल्या होत्या. जसा राजस्थानच्या गौरवशाली इतिहासा बद्दल स्वामीजींना आदर होता तसा स्वामीजींच्या आध्यात्मिक अधिकाराचा आजीतसिंगांना आदर होता. या सहवासातून राजे अजितसिंग, जगमोहन, आणि काही जणांनी स्वामीजींकडून दीक्षा घेतली. अजितसिंग खेत्रीचे सत्ताधीश होते तरी पण, शिष्य म्हणून गुरुचं स्थान त्यांच्या दृष्टीने उच्चच होते. गुरुविषयी नितांत आदर आणि भक्ति होती. एव्हढी की, गुरुची सेवा आपल्या हातून घडावी असं त्यांना मनापासून वाटायचं.

स्वामीजी तेंव्हा राजवाडयातच राहत होते. ते झोपले असताना अजितसिंग हळूच येऊन पंख्याने वारा घालायचे, त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून काळजी घ्यायचे, त्यांचे पाय दाबून द्यायचे. एकदा तर स्वामीजींना जाग आली आणि त्यांनी पाय दाबताना थांबवले तर, “माझा शिष्य म्हणून सेवा करण्याचा हक्क हिरावून घेऊ नका” असं काकुळतीला येऊन अजीतसिंगांनी त्यांना सांगितलं. भर दिवसा लोक आजूबाजूला असताना अजितसिंग स्वामीजींना गुढगे टेकवून प्रणाम करीत. इतकी नम्रता ते या पदावर असताना सुद्धा होती. पण स्वामीजींनी त्यांना या पासून परावृत्त केले कारण, नाहीतर त्यांचा प्रजेमधला जो आदरभाव होता त्याला धक्का पोहोचू शकत होता याचं भान स्वामीजींना होतं.

खेतडीला स्वामीजी दोन ते तीन महीने राहिले. गहन आणि तात्विक प्रशनाची उत्तरे स्वामीजींनी तर त्यांना दिली होतीच. पण आधुनिक विज्ञानातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र यातील महत्वाच्या सिद्धांताचा परिचय पण त्यांना करून दिला होता स्वामीजींनी. स्वामीजींच्या सूचनेवरून राजवाड्यात एक प्रयोगशाळा सुरू करण्यात आली. गच्चीवर एक दुर्बिण बसविण्यात आली. स्वामीजी व अजितसिंग दोघेही गच्चीतून त्याद्वारे आकाशातील तार्‍यांचे निरीक्षण करत असत. स्वामीजींचा संस्थानच्या बाहेरील सुद्धा लोकांशी संबंध येत असे. सर्वांना ते भेटत असत.

या वास्तव्यात स्वामीजींना खूप काही शिकायला मिळाले होते. एकदा राजवाड्यात नर्तकीचे गायन आयोजित केले होते. तंबोर्‍याच्या तारा जुळल्या, गाणे सुरू होणार तसे अजितसिंग यांनी स्वामीजींना ऐकायला बोलवले. तेंव्हा स्वामीजींनी त्यांना उत्तर पाठवले, आपण संन्यासी आहोत, कार्यक्रमास येऊ शकत नाही. हे त्या गायिकेच्या मनाला लागलं. तिने षड्ज लावला, आणि संत सूरदासांचे भजन म्हणण्यास सुरुवात केली. ध्रुवपद होतं,

हमारे प्रभू अवगुण चित न धरो,

समदर्शी प्रभू नाम तिहारो,

अब मोही पार करो!      

अर्थ – हे प्रभो माझे अवगुण मनात ठेऊ नका, आपल्याला समदर्शी म्हणजे सार्‍या भूतमात्राकडे समान दृष्टीने पहाणारे असे म्हणतात, तेंव्हा आपण माझा उद्धार करा .

रात्रीच्या शांत वेळी हे आर्त आणि मधुर सूर स्वामीजींपर्यंत पोहोचले. गीतातला पुढच्या ओळींचा अर्थ होता,

‘लोखंडाचा एक तुकडा मंदिरामध्ये मूर्तीत असतो, तर दूसरा एक कसायाच्या हातात सूरीच्या रूपात असतो, पण परिसाचा स्पर्श होताच,त्या दोहोंचे सुवर्ण होऊन जाते. आपण तसे समदर्शी आहात. आपण माझा उद्धार करा’.

एका ठिकाणचे पाणी नदीच्या प्रवाहात असते, तर दुसर्‍या ठिकाणी ते कडेच्या गटारातून वाहत असते.  पण दोन्ही पाणी एकदा गंगेला जाऊन मिळाले की, सारखेच पवित्र होऊन जाते. आपण तसे समदर्शी आहात, कृपा असेल तर माझा उद्धार करा’.

हे शब्द स्वामीजींच्या अंत:करणाला जाऊन भिडले. नंतर स्वामीजींनी त्या गायिकेची क्षमा मागितली. आपण बोलतो आणि वागतो त्यात विसंगती असते. या दोन्हीत एकरूपता साधायला हवी हा धडा स्वामीजींनी कायम लक्षात ठेवला. त्यांचा दृष्टीकोन बदलला.

जीवनातल्या यात्रेतल्या प्रत्येक वळणावर स्वामीजी स्वत: सतत शिकत राहिले होते आणि दुसर्‍यालाही काहींना काही देत होते. अशा प्रकारे स्वामीजींनी आता सहा महिन्यांनी खेत्रीचा जड अंतकरणाने निरोप घेतला.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अर्थपूर्ण प्रथा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

☆ अर्थपूर्ण प्रथा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक  हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का, की हे गौरी गणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मन तसंच घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेलं असतं. घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं.

ह्या सणावारांच्या निमित्ताने का होईना, आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो. ह्या निमित्तानेच आपल्याकडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे, नातलग,आपले नेहमीचे रुटीन बदलून गौरीगणपतीच्या निमित्ताने एकत्र येतात. अशी  एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांचं नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा, पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमिटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो. जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं, तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्तीसाठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण  एकदा माहेरी चक्कर मारून 

येते, तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची तिची खात्री पटली, की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी. त्या औटघटकाच येणार. पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आणि आनंदाचा शिडकावा करुन जाणार, प्रेमाची, मायेची पखरण करुन जाणार. त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री आणि विश्वास पण तेवढाच असतो. जरी बाप्पाचे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच. त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.

आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरड-कानवला देतो. मुरड-कानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरड-कानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून, म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.

सहज करता येण्यासारख्या गोष्टी, आणि जुन्या प्रथा, ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही, झालाच तर फायदाच होतो, त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या  गोष्टी– उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला, महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे,  तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ  पैसासुपारी ठेवणे, अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते, त्या मनोमन  पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.

परत एकदा गौरीगणपतींना “ कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या “ ही हक्काची विनंती करते. 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नीरजा भनोत : एक भारतीय वीरांगना ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ नीरजा भनोत : एक भारतीय वीरांगना ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

आज आपल्या पैकी खूप जणांना नीरजा भनोत कोण हेही माहीत नसेल. नीरजा भनोत ही एक भारतीय वीरांगना होती, जिने १९८६ साली  तिच्या स्वतःच्या जीवावर खेळून आणि बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचवले आणि वयाच्या 23 वर्षी शहीद झाली. ती भारतातील सर्वात लहान वयाची “अशोक चक्र” हे  वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरली होती. पण नंतर भारतीय त्यांच्या सवयीप्रमाणे या विरांगनेला  विसरून गेले. 

नीरजा भनोत ही हरीश भनोत, या हिन्दुस्थान टाइम्स मध्ये असणाऱ्या पत्रकाराची मुलगी आणि ‘PAN AM 73‘ या एयरलाइन्स कंपनी मध्ये सीनियर पर्सर म्हणून काम करणारी मुलगी. 

५ सप्टेम्बर १९८६ मध्ये पाकिस्तानमधील कराची या विमानतळावर मुंबई ते अमेरिका अश्या जाणाऱ्या PAN AM 73 एयरलाइन्सच्या विमानाला चार अतिरेक्यांनी गन पॉइंट वर वेठीस धरले. त्या विमानात ४०० प्रवासी होते. नीरजा सुद्धा याच विमानात होती. अतिरेक्यांना ते विमान इस्राइलमधल्या कोणत्या तरी इमारतीला धडकावयाचे होते. 

विमानात पायलट नसल्यामुळे अतिरेकी विमान घेऊन जाऊ शकत नव्हते. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला एका पायलटची मागणी केली. पण पाकिस्तान सरकारने ती मागणी फेटाळली. अतिरेक्यांनी पाकिस्तान सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रवाशांना मारायची धमकी दिली. त्यांनी नीरजाला सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करायला सांगितले. त्यातून अमेरिकन प्रवाशांना निवडून, मारायची धमकी देवून, ते पाकिस्तानवर आणि अमेरिकेवर दबाव टाकू इच्छित होते. 

नीरजाने पासपोर्ट गोळा केले, पण शिताफीने त्यातील अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून बाकीचे पासपोर्ट अतिरेक्यांना दिले. त्यानंतर त्या अतिरेक्यांनी एका ब्रिटिश प्रवाशाला मारायची धमकी देवून पाकिस्तान सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण नीरजाने त्या अतिरेक्यांना समजावून त्या ब्रिटिश प्रवाशाचे प्राण वाचविले. 

नीरजाच्या एका क्षणी असे लक्षात आले की आता विमानातील इंधन संपेल आणि विमानात पूर्ण अंधार होईल. या परिस्थितीचा फायदा उठवायचा असे नीरजाने ठरवले आणि त्याप्रमाणे तिने प्लानिंग सुरु केले. तिने प्रवाश्यांना जेवण देण्याच्या बहाण्याने विमानातील आपत्कालीन दरवाजाबद्दल माहिती देणारी पत्रके प्रवाशांपर्यंत पोहोचविली. तिने जसा विचार केला होता तसेच घडले. थोड्या वेळाने विमानातील इंधन संपले आणि विमानात पूर्णपणे अंधार पसरला या परिस्थितीचा फायदा घेऊन नीरजाने विमानाचे  सर्व आपत्कालीन दरवाजे उघडले. प्रवाश्यांनी देखील पटापट विमानाबाहेर उड्या मारल्या. 

अतिरेक्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला. काही प्रवाश्यांना गोळ्या लागल्या पण ते बचावले. सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडेपर्यंत नीरजा विमानात थांबली होती. आता ती विमानातून बाहेर पडणार, इतक्यात तिला एका लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकायला आला. एवढ्या वेळात पाकिस्तानी कमांडोज पण विमानाच्या आत पोहोचले होते. त्यांनी त्या चार अतिरेक्यांपैकी तीन जणांना मारून टाकले. नीरजा त्या मुलाला  शोधून विमानाच्या बाहेर पडत होती, तेवढ्यात तो चौथा अतिरेकी तिच्यासमोर आला. तिने त्या मुलाला आपत्कालीन दरवाजाच्या बाहेर फेकून दिले आणि त्या अतिरेक्याने झाडलेल्या गोळ्या स्वतःच्या अंगावर घेतल्या. त्यातच तिचा अंत झाला. १७ तास अतिरेक्यांशी झुंजत चारशे प्रवाशांना वाचवून नीरजाचा झालेला अंत सर्व जगाला दुःख देवून गेला. 

नीरजाने वाचविलेला तो लहान मुलगा मोठा झाल्यावर वैमानिक झाला. स्वतःच्या भावना व्यक्त करताना तो म्हणाला की, “ माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर नीरजाचा हक्क आहे.” 

भारताने नीरजाला “ अशोक चक्र “ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केले.

पाकिस्तानने  तिला “ तमगा-ए-इन्सानियत “ हा सर्वोच्च पुरस्कार दिला. 

अमेरिकेने “ जस्टिस फॉर विक्टम ऑफ क्राइम अवार्ड “ हा वीरता पुरस्कार देवून तिला सन्मानित केले.

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गौरी विसर्जन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ गौरी विसर्जन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींच विसर्जन झालं घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या  विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक  हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का हे गौरीगणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेयं. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मनं तसचं घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेल असतं. घर कसं भरल्याभरल्यासारखं वाटतं.

ह्या सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो.नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे,नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात.ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमीटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो.

जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्ती साठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण  एकदा माहेरी चक्कर मारून येऊन,तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची खात्री पटली की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणे गौरी ह्या सुद्धा  माहेरची आठवण सतत मनात पिंगा घालणारच किंवा मधून मधून माहेराची ओढ वाटणारच त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी त्या औटघटकाच येणार,पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आनंदचा शिडकावा करुन जाणार,प्रेमाची मायेची पखरण करुन जाणार.त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री विश्वास पण तेवढाच असतो.जरी बाप्पा चे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.

आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरडकानवला देतो.मुरडकानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरडकानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.

सहज करता येण्यासारख्या गोष्टी,जुन्या प्रथा ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही झालाच तर फायदाच होतो त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा, अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या  गोष्टी उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे  तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ  पैसासुपारी ठेवणे अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते,त्या मनोमन  पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.

परत एकदा गौरीगणपतींना कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या ह्या हक्काच्या विनंतीने आजच्या पोस्ट ची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेली दोन वर्ष कोरोनामुळे सगळ्या सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमाला मर्यादा आल्या होत्या. ढोल, ताशा, डॉल्बी यांचे आवाज घुमत नव्हते. मिरवणुका काढल्या जात नव्हत्या.  नकळत सगळ्या कार्यक्रमांना निराशेची झालर लागली होती. पण यंदा मात्र गणपती उत्सव धूम धडाक्यात चालू आहे.  माणूस हा उत्सव प्रिय आहे. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धीदाता गणेश आणि शक्ती- स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हींचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्ही उत्सवांचा उद्देश समाजात स्फूर्ती रहावी, जिवंतपणा रहावा, समरसता यावी असाच आहे.

पण अलीकडच्या काळात या सर्वांना थोडी वाईट गोष्टींची साथ येऊ लागली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणुका, सजावटीमधील अतिरिक्त स्पर्धा, तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवादरम्यान होऊ लागल्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिथे परमेश्वर हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटते. कोरोनामुळे मोठ्या मिरवणुकांना बंदी आली. काही अनिष्ट गोष्टी आपोआपच कमी झाल्या. वैयक्तिक पातळीवर घराघरातून गणपती बसवले गेले. परंतु सार्वजनिक कार्यक्रम दोन वर्षे बंद होते. यंदा पुन्हा नव्या जोमाने गणेशोत्सव साजरा केला गेला. आता महानगरपालिका विविध ठिकाणी विसर्जनासाठी हौद, निर्माल्यासाठी कुंड, यासारख्या गोष्टींची व्यवस्था करते. त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. देश, परदेशातही पुण्याच्या गणपतीचे महत्त्व फार आहे.

यंदा दोन वर्षानंतर गणपती उत्सव पुन्हा एकदा उत्साहात साजरा होत आहे. वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दलचे राग, द्वेष, मतभेद यांचे गणपती बरोबरच विसर्जन झाले पाहिजे. आणि चांगल्या भावना दुर्वांप्रमाणेच वाढीला लावल्या पाहिजेत. दुर्वा जशा जमिनीला चिकटून वाढत वाढत जातात, विस्तारत असतात, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून समाजजीवनाचा विस्तार केला पाहिजे. शाडूच्या मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो. त्या गणपतीची माती विरघळून तळाशी एकत्र येते- पुन्हा पुढच्या वर्षी नवीन निर्मितीसाठी ! तशी आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची, चांगले समाजमन निर्माण करण्याची राहिली पाहिजे. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. तो गणराया दहा दिवसात आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवून जातो. घरातील लहान मुलाबाळांपासून सर्वांनाच गणपतीचे आकर्षण असते. गणपती दुकानात ठरवण्यापासून ते विसर्जनापर्यंत सर्व घर गणपतीमय झालेले असते. अलीकडे तर शाळातूनही शाडूची गणेशमूर्ती करायला शिकवतात. तसेच बऱ्याच घरी स्वतः केलेल्या मूर्ती बसवल्या जातात. असा हा गणपती बाप्पा ! त्याचे विसर्जन करायचे दिवस आले की सर्वांनाच फार वाईट वाटते ! कोणाकडे दीड दिवस, तर कोणाकडे पाच दिवस गणपती असतो.  काहींच्याकडे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन होते. अनंत चतुर्दशीला सर्वच गणपतींचे विसर्जन होत असते. या काळात पाऊस कमी झालेला असतो, परंतु काही वेळा बरेच दिवस पाऊस असतोही !. तरीही लोक उत्साहाने सार्वजनिक गणपती आणि त्यांचे देखावे बघायला जातात. एकूणच गणपतीचे हे दिवस उत्साहाचे असतात.

नुकताच मोबाईलवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक लहान मूल गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तयार नसते आणि अक्षरशः रडत असते. त्यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोर भट” नावाची कथा आठवली.त्या गोष्टीतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की, गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे. आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन इतके विषण्ण होई की घरी येऊन त्या रिकाम्या मखरासमोर ते दुःखी चेहऱ्याने बसत असत. खरोखरच बाप्पाला निरोप देताना मन भारावून जाते आणि अंतरीचा उमाळा भरभरून वाहू लागतो आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणतो –” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..”

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares