मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆पानं…” ☆ प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆

? वाचताना वेचलेले ?

🍃 “पानं…”  🍃 प्रस्तुती – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

काही पानं भरवायची असतात – (वही)

काही पानं वाढायची असतात – (जेवण)

काही पानं रंगवायची असतात – (खायची पानं)

काही पानं जाळायची असतात – (पालापाचोळा)

काही पानं जपायची असतात – (पिंपळ)

काही पानं कुटायची असतात – (पुदिना)

काही पानं लुटायची असतात – (आपटा)

काही पानं खुडायची असतात… (चहाची पानं)..

काही पानं तोरणात सजवायची असतात… (आंब्याची )

काही पानं केसात घालायची असतात… (केवड्याची )

काही पानं जोडायची असतात – (पुरवणी)

काही पानं लपवायची असतात – (प्रगती पुस्तक)

काही पान दुमडायची असतात, तर काही नवीन उघडायची असतात.  – (पानं सुख- दुःखाच्या क्षणांची)

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गरज सरो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ गरज सरो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

याही गोष्टीला खूप खूप वर्षे झाली.

सहज मनात आले, काय करत असेल सरोज आता? माझ्या दवाखान्यात ते कुटुंब नेहमी येणारे.

मी त्यांची फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्या तिघी मुली,औषधाला यायच्या. दिसायला देखण्या. कॉन्व्हेंटमध्ये अगदी हौसेने घातलेले आईवडिलांनी.

परिस्थितीही छानच होती त्यांची. आईवडील नोकरी करत आणि या बहिणी आपले शाळा-कॉलेज सांभाळून

घराकडेही लक्ष देत.

 त्यादिवशी रंजूताई, म्हणजे मुलींच्या आई सरोजला घेऊन आल्या. “ ताई, सरोजला खूप खोकला झालाय हो.

आज आठ दिवस खोकतेय आणि डॉक्टरकडे चल म्हटले तर नकोच म्हणतेय. जरा चांगले औषध द्या तिला.”

 मी म्हटले, “ सरोज, वजन किती वाढलंय ग तुझं .काही व्यायाम करतेस  की नाही? “ 

 बोलत बोलतच मी तिला टेबलावर घेतले. स्टेथोस्कोप  छातीवर ठेवायला  घेणार, तर मला भलतेच दृश्य दिसले.

सरोजचे पोट केवढे मोठे झाले होते. मी नीट तपासले. मला चक्क बाळाचे हृदयाचे ठोके ऐकू येत होते. सरोज जवळजवळ आठ महिन्यांची गर्भवती होती.

 तिने माझी नजर चुकवली.

“ सरोज,हे काय?? तुला कल्पना आहे ना,हे काय झालेय याची?”

  मी हात धुवून बाहेर आले. तिच्या आईला म्हटले, ” सरोजला काय झालंय याची कल्पना आहे का तुम्हाला? ”

“ नाही हो बाई. काही गंभीर झालंय का.” 

“ रंजूताई, तुम्हाला मुद्दाम करताय म्हणू, का समजत नाही म्हणू .सरोजला दिवस गेले आहेत,आणि तिला आठवा महिना चालू आहे.आता पूर्ण डिलिव्हरी करण्या शिवाय इलाजच नाही. मी म्हणते , सरळ लग्न का लावून देत नाही जो कोण असेल त्याच्याशी? ” 

त्या एकदम पांढऱ्याच पडल्या. “अहो काहीही काय. कारटे, अग काय बोलताहेत या डॉक्टर बाई? मला कसे समजले नाही? “ त्या जोरजोरात रडू लागल्या.

 सरोजने सांगितले, की  चार महिने training ला आलेला  आणि त्यांच्याच घरी राहिलेला तिचा सख्खा चुलतभाऊ होता तो.

“ अहो मग आता द्या लग्न लावून.” 

त्यावर ती म्हणाली, “ मी नाही लग्न करणार त्याच्याशी. दारुडा आहे तो.”

रंजूताई म्हणाल्या, “ अहो,सख्ख्या चुलत भावाशी कोणी लग्न करते का? आमच्या घरी हे चालणारच नाही.” 

“ अहो, मग  हे आधी नव्हते का समजत? आणि आठ महिने गप्प बसलीस तू, हो ग? आणि तुझ्या संमतीनेच ना हे घडले? रंजूताई, चूक तुमचीही आहे. लांबून सुद्धा समजते दिवस असलेली बाई. तुम्हाला समजू नये हो?

काय म्हणावे तुम्हा मायलेकींना…. “ मीच हादरून गेले होते हा प्रकार बघून.

त्या घरी गेल्या. दुसऱ्याच दिवशी सरोजचे वडील भेटायला आले. त्यानी विचारले, “ बाई, काय करू मी…. 

तोंड दाखवायला जागा नाही ठेवली हो .तुम्हीच मार्ग सांगा.” ते माझ्या पायाशी वाकले.

“ अहो असे काय करता ? आपण तिची डिलिव्हरी करूया. दुसरा उपायच नाही. मग ते बाळ नाईलाजाने एखाद्या चांगल्या संस्थेला देऊ. ते देतील दत्तक, चांगल्या आई बापाना. काय हो हे….  इथे लोकांना मूल होत नाही म्हणून  लोक रडतात. माझ्याचकडे मी रोज देतेय किती जोडप्याना  ट्रीटमेंट… आणि इथे बघा. काय देव तरी.” 

मी हताश होऊन बडबड केली. मला आश्चर्य वाटत होते, ‘कमाल आहे हो या मुलीची. काय केले असते हिने?

मी जर तपासून सांगितले नसते तर?’

  त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचे renovation चालले होते. म्हणून मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे तिची  डिलिव्हरी करायचे ठरवले. माझ्या सरांना ही सगळी कल्पना मी देऊन ठेवलीच होती. पुढच्याच आठवड्यात त्यांचा फोन आला.“ तुझी सरोज पेशंट आली आहे. ये तू.”

 मी लगेचच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. सरोजला चांगल्याच कळा येत होत्या. एवढ्या मरण यातना होत असतानाही ती हू का चू करत नव्हती.

 सरोज ने एका मुलाला जन्म दिला. आठ पौंडी मुलगा होता तो.

 तिने एक रुपयाचेही औषध,टॉनिक काहीही न घेतासुद्धा ते इतके सुदृढ मूल जन्माला आले होते.

  मी, आमचे डॉक्टर सर, त्यांच्या डॉक्टर मिसेस, सगळे हळहळलो.

 बाई म्हणाल्या, “ काय ग ही  देवाची  लीला तरी.  मूल व्हावे म्हणून दोन बायकांची  केवढी मोठी  precedure कालच केली आम्ही. त्या तळमळत आहेत,मूल मूल करत. सरोज, काय करून बसलीस बाई.”

सरोजने ते बाळ बघितले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि म्हणाली, “ न्या त्याला. देऊन टाका.” 

   आम्ही सगळे थक्क झालो. तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता, की केलेल्या कृत्याचा पश्चाताप.

मीच अतिशय हळहळले. सरांना म्हटले की ‘ किती गोजिरवाणे बाळ आहे हो हे. काय पाप या बिचाऱ्याचे.

कोण दत्तक नेईल, कुठे जाईल….. ‘ ते बाळ मजेत मुठी चोखत पाळण्यात पडले होते.

आधीच ठरवलेल्या आणि सर्व माहिती देऊन ठेवलेल्या संस्थेला मी फोन केला. एका तासात त्यांच्या सोशल वर्कर बाई आल्या. त्यांच्या हातात सुंदर कपडे, बाळासाठी  छान ब्लॅंकेट होते.

त्या मायेने सरोजजवळ गेल्या. त्यांनी तिच्याकडून फॉर्म भरून घेतला….’ मूल दत्तक द्यायला आपली हरकत नाही, मग ते परदेशात पाठवायलाही माझी परवानगी आहे,’ असा बराच मोठा फॉर्म होता तो.

 सरोजने सह्या केल्या.

 “ बाळा, तुला याचे काही नाव ठेवायचे आहे का?” त्यांनी तिला विचारले.

सरोज कडवट हसली. 

“ कसले नाव ठेवताय. नकोसा असताना आला जन्माला.. कर्णासारखा. ठेवा करण नाव त्याचे.”

तिने मान फिरवली. त्या बाई, मी,आमचे डॉक्टर हतबुद्ध झालो.

सर म्हणाले, “ अग, इतकी वर्षे मी हॉस्पिटल चालवतोय, पण अशी  पेशंट नाही बघितली.”

 आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रु होते, पण सरोज मात्र निर्विकार. तिची आई ते बाळ मांडीवर घेऊन टाहो फोडून रडत होती.

 संस्थेच्या बाई ते बाळ घेऊन गेल्या. आम्हाला म्हणाल्या, “ तुम्ही काळजी नका करू. आमच्याकडे दोन दोन वर्षे वेटिंग लिस्ट असते मुलांसाठी. हे बाळ चांगल्या घरी देऊ आम्ही. नशीब असेल तर जाईलही परदेशात. कल्याणच होईल त्याचे.” 

दुसऱ्याच दिवशी सरोज डॉक्टरांना विचारून घरी निघून गेली. “ अग थांब एखादा दिवस,” असे म्हटले, तरी  न ऐकता गेलीच ती. त्या नंतर ते कुटुंब मला कधीच भेटले नाही.

 

  —-अशीच कधीतरी मलाच आठवण येते,

काय झाले असेल पुढे त्या बाळाचे?…. 

सरोजने लग्न केले असेल का?….. 

पण याची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत.

त्या  लोकांनी, माझी गरज संपल्यावर माझ्याशी सम्बन्धच ठेवला नाही!!!

‘ गरज सरो,वैद्य मरो,’ हे माझ्या बाबतीत तरी त्यांनी खरे ठरवले।

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भेट… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ भेट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

आयुष्यात भेटणारं कोणीच अकारण भेटत नसतं

विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं आयुष्यातलं ते एक पान असतं —-

 

भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं

म्हणूनच बहुदा त्याने दोघांच्या भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं —–

 

मित्र असोत वा शत्रू ,  प्रत्येक जण जणू एक पुस्तक असतं

ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं ——

 

शंभर टक्के चांगलं किंवा शंभर टक्के वाईट कोणीच नसतं 

प्रत्येकात चांगलं असं काही ना काही दडलेलंच असतं —–

 

त्यातलं चांगलं ते अधिक आणि वाईट ते उणे करायचं आहे

” मीपण ” पूर्ण वजा करून ” माणूसपण ” तेवढं जमा ठेवायचं आहे —–

 

स्वतःसाठी जगताना थोडं दुसऱ्यासाठीही जगता येतं का पाहायचं आहे 

कोणासाठी आधारवड तर कोणासाठी श्रावणधारा होऊन बरसायचं आहे —–

 

म्हणून मला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात माझ्यासाठी इवलासा कोपरा असू दे

त्यांच्याही आयुष्यात विधात्याने लिहिलेलं माझ्या नावचं फक्त एक पान असू  दे —–

 

——-असेल ना? 

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासू आणि दुधीभोपळ्याची भाजी ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासू आणि दुधीभोपळ्याची भाजी ! 😂 💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“काय गं हे सुनबाई ?”

“काय झालं आई ?”

“अगं आज चहाला काही चव नां ढव, नुसता पुचकावणी झाला आहे !”

“अहो रोजच्या सारखाच तर केलाय ! तुमच्या तोंडाची चव गेली असेल, म्हणून तसा लागतं असेल !”

“माझ्या तोंडाची चव जायला मी काय आजारी आहे ?”

“तसं नाही, पण या वयात जाते म्हणे कधी कधी जिभेची चव, त्यासाठी आजारीच पडायला हवं असंच काही नाही !”

“आता हे ज्ञानामृत तुला तुझ्या आईनं पाजलं वाटतं ?”

“हॊ !”

“मला वाटलंच !”

“म्हणजे ?”

“ते जाऊदे ! मला सांग, चहाची पावडर वगैरे बदलली आहे कां या महिन्याच्या वाण सामानात ?”

“अजिबात नाही आई ! पण असं कां वाटलं तुम्हांला ?”

“नाही, तुम्हीं हल्लीच्या मुली ! एखादा चहाचा नवीन ब्रँड आला आणि त्यावर एक काचेचा मग फुकट मिळतोय म्हटल्यावर, ती नवीन चहा पावडर घ्यायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही, म्हणून म्हटलं !”

“नाही आई, चहा पावडर पण तीच आहे आणि दुध पण रोजचंच आहे !”

“तरी चव काही नेहमी सारखी नाही ती नाहीच !”

“आई द्या तो चहा माझ्याकडे, त्यात थोडी चहा पावडर आणि आल्याचा तुकडा टाकून उकळून आणते परत !”

“आता राहू दे सुनबाई ! तुला सांगते पूर्वी अख्ख्या मुंबईत कोपऱ्या कोपऱ्यावर इराणी हॉटेल असायची !तर त्यांच्या मुबंईतल्या कुठल्याही हॉटेलात जा, चहाची चव तीच, आता बोल !”

“म्हणजे आई, तुम्ही पूर्वी इराण्याकडे चहा प्यायला जायचात ?”

“काय तुझी अक्कल ! अगं मी कशाला जाते इराण्याकडे चहा प्यायला, अगं हे सांगायचे तसं !”

“बघा, म्हणजे तुमचा पण चहा कधीतरी बिघडायचा नां आई ?”

“कळलं कळलं, जास्त अक्कल नको पाजळूस !”

“बरं, आता तुम्ही चहा तसाच पीत असाल, तर मी लागू कां दुपारच्या स्वयपाकाला ?”

“लाग, पण जाण्याआधी मला सांग, मी केलेली कालची दुधी भोपळ्याची भाजी बाबूने खाल्ली नां ?”

“खाल्ली ? अहो आई, विलासने एकट्याने त्या दुधी भोपळ्याच्या भाजीचा पार फडशा पाडला ! मला आणि मुलांना उष्टवायला सुद्धा ठेवली नाही त्यानं ती !”

“मग ठीक आहे, जा आता तू, दुपारच्या स्वयपाकाचे काय ते बघ.”

“मी जाते, पण त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का आई ?”

“विचार, खुशाल विचार तुझ्या मनांत काय प्रश्न आहे तो.”

“मला सांगा आई, मी जर दुधीभोपळ्याची भाजी केली तर….”

“माझा बाबू आणि मुलं त्याला तोंड सुद्धा लावत नाहीत आणि मी केली तर सगळेजण बोटं चाटून पुसून कशी खातात ? हेच विचारणार आहेस नां तू ?”

“हॊ, अगदी बरोबर!”

“अगं मी जेंव्हा दुधीभोपळ्याची भाजी करते नां, तेंव्हा त्यात एक खास पदार्थ आवर्जून घालते, म्हणून तर बाबू आणि त्याच्या बरोबर मुलं सुद्धा ती भाजी आवडीनं खातात हॊ !”

“कोणता पदार्थ आई ?”

“ते माझं सिक्रेट आहे सुनबाई !”

“पण मला सांगायला काय हरकत आहे आई ? अहो तुम्हीं गेल्यावर…..”

“अगं त्या दुधीभोपळ्याच्या भाजीच्या सिक्रेटसाठी माझ्या मरणावर टपलीस की काय ?”

“काही तरीच काय आई ? मी कशाला तुमच्या मारणावर टपू ?”

“अगं पण आत्ताच म्हणालीस नां, ‘तुम्हीं गेल्यावर’ म्हणून ?”

“बघा, तुम्हीच कसा अर्थाचा अनर्थ करता ते आई !”

“कसला अर्थाचा अनर्थ करत्ये मी ?”

“अहो तुम्ही गेल्यावर म्हणजे, तुम्हीं कधी गावाबीवाला गेलात आणि माझ्यावर दुधीभोपळ्याचीच भाजी करायची वेळ आली, तर तुमची रेसिपी माहित असावी, म्हणून विचारलं !”

“असं होय ! मला वाटलं….”

“आई, मी काही बोलले की तुम्हीं नेहमीच पराचा कावळा करता ! ते राहू दे, ते तुमचं भाजीच सिक्रेट आता तरी सांगाल का मला ?”

“अगं काही नाही गं सुनबाई, माझ्या बाबुला लहानपणापासून आपल्या कोपऱ्यावरच्या ‘लक्ष्मी फरसाण मार्ट’ मधली तिखट, मसालेदार कचोरी आवडते !”

“हॊ, ठाऊक आहे मला ते, विलास आणतो ती कचोरी अधून मधून. मुलं सुद्धा आवडीनं खातात ती कचोरी.”

“अगं तुला सांगते, ही जी दुधीभोपळ्याची भाजी आहे नां ती कितीही पौष्टिक असली, तरी त्याला नाक मुरडणारी लोकंच जास्त!”

“बरोबर.”

“माझा बाबू सुद्धा लहानपणी त्याला तोंड लावायचा नाही, पण नंतर नंतर त्याला ती आवडायला लागली बघ आणि आता तर काय एकट्याने सगळी भाजी फस्त करतो !”

“हॊ ते सगळं खरं आहे, पण अशी अचानक बाबुला आणि मुलांना तुमची दुधीभोपळ्याची भाजी आवडायचं कारण काय ?”

“कचोरी !”

“का sss य ? कचोरी ?”

“हॊ  sss य ! आपल्या ‘लक्ष्मी फरसाण मार्टची’ कचोरी !”

“आई, तुम्हीं जरा नीट एक्सप्लेन कराल का मला ?”

“अगं काही नाही, एकदा मी काय केलं बाबू त्या दुधीभोपळ्याच्या भाजीला तोंड लावत नाही म्हणून, त्यात एक दिवस चांगल्या तीन चार कचोऱ्या खलबत्त्यात कुटून घातल्या आणि तुमच्या भाषेत सांगायचं तर rest is history !”

“कमालच केलीत तुम्हीं आई !”

© प्रमोद वामन वर्तक

२९-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नका सांगू कुणाला… ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

? विविधा ?

☆ नका सांगू कुणाला… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

गांधीबाबा कधीकाळी तुम्हाला ओरडून सांगत होते, ” खेड्याकडे चला ” पण ते आता पुन्हा आठवू नका आणि कोणालाही परत सांगू ही नका.

तुम्ही निघून आलात तरी खेडी तगून होती. रडत खडत स्वतःला जपत होती. अर्धपोटी राहून पोट बांधून जगत होती. आपल्या फाटक्या हाताने निसर्गाला अंजारात गोंजारत होती. पण त्यांचे हात तोकडे पडत होते, पूर्वीच त्यांचं संपन्न अवस्थेतल जितंजागत जगणं सावरायला. तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि अखेर देशोधडीला लावलं . त्यात जितका दोष तुमचा त्याहून अधिक होता शासनकर्त्यांचा. तुम्ही भौतिक सुखाला लाचावलात आणि आधिभौतिकाला  संपवायला कारणीभूत ठरलात. आता पुन्हा त्यांच्याकडे ढुंकूनही पाहू नका, आणि कृपया कोणाला खेड्याकडे चला असं मुळीच सांगू नका. खेडी जगतील कि मरतीत याचा विचार सुद्धा करू नका. दोलायमान झालेल्या भौतिक सुखाच्या डोलाऱ्यात झुलत बसा. पण पुढे जाऊन तुमचा भ्रमनिरास होणार आहे यावरून मात्र तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. सावरा स्वतःला आणि जगण्याच्या नव्या प्रबंधांची आखणी करा. विसरा ती माती तुम्हाला पोसणारी,‌ वाढवणारी. आई बापाची तमा न बाळगणाऱ्या तुमच्या पिढीला एक दिवस नक्कीच “दिवसा चांदण्य दिसतील ”  तो काळ आता झपाट्याने तुमच्याकडे झेपावतो आहे. म्हणूनच तुमचं पोट बाजूला ठेवून कसं जगता येईल याचाच विचार करत, आघाशा सारखी भौतिक सुखं लुटता येतीलतितकी लुटा. सोडा विचार खेड्यांचा, तिथल्या अजरामर मातीचा, कारण ती कधीच नाशिवंत ठरणार नाही. आपले गुणधर्म विसरणार नाही काळ नक्की बदलेल. आणि तिला नक्कीच सोन्याचे दिवस येतील. पुन्हा खेड्यांची नंदनवनं होतील. यात तीळमात्र शंका नाही. म्हणूनच सांगू नका कुणाला “खेड्याकडे चला” म्हणून.

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-3 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-3 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

(माझे अजाण नातवंडं..  अंगणात नागड्याने बागडते आहे…) इथून पुढे —-

सुमित्र किती भाग्यवान! त्याच्यावर त्याच्या अलौकिक आजोबांनी दोन बालकविता लिहिल्या आणि एका गाजलेल्या कवितेचा उगम त्याच्या निरागसपणे रांगण्याने झाला. पपा त्याच्याकडे बघून नेहमी म्हणत,  “हा माझा आजा बाबा बामण आहे. तोच पुढे माझे नाव चालवणार आहे.” खरंच पपा द्रष्टे होते…..

१९९८ साली सुमित्र उपकरणशास्त्रात द्विपदवीधर झाला. नंतर त्याने त्याच्या आवडीनुसार संगणकक्षेत्रात प्रवेश केला. आपल्या अलौकिक आजोबा गदिमांचे साहित्य नवीन तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते त्यांच्या आवडीच्या संगणक इंटरनेट माध्यमात देणे आवश्यक आहे, हे त्याने ओळखले. १ ऑक्टोबर १९९८ रोजी गदिमांच्या जयंतीचे निमित्त साधून त्याने मराठी साहित्यातील लेखकाची पहिली मोठी वेबसाईट – गदिमा डॉट कॉम ही निर्माण केली. यासाठी त्याने रात्रंदिवस १८, १८ तास काम केले. काही दिवसातच महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रातून बातमी झळकली…. “गीतरामायणाचे सूर आता इंटरनेटवर…..” जगभरातल्या मराठी रसिकांनी या वेबसाईटचे मनापासून, भरभरून स्वागत केले. जगभरात जिथे मराठी शब्द कानावरही पडत नव्हते, अशा परदेशस्थ मराठी बांधवांच्या घरा-घरातून गदिमा – बाबूजींचे गीतरामायण ऐकू येऊ लागले. ई मेल-वरूनही असंख्य प्रतिक्रिया सुमित्रला येऊ लागल्या. “आज तुमच्या साईटवर गीतरामायण ऐकले आणि मी इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे काय गमावले हे लक्षात आले.” अशा असंख्य प्रतिक्रिया देशा परदेशातून नव्या पिढीकडून येऊ लागल्या.

या नंतर त्याने गीतरामायणावर स्वतंत्र वेबसाईटची निर्मिती, Sony Music च्या बरोबर ‘जोगीया’ हा music album केला व गदिमांच्या गीतरामायण, चित्रपट गीतांच्या संगणक सीडी/डीव्हीडी/पेन ड्राईव्हचीही निर्मितीही सुमित्रने केली. त्या वेळी आपल्या आजोबांची दुर्मिळ गाणीही मिळवून वेळप्रसंगी पैसे मोजूनही विकत घेतली. त्या वेळी जे पैसे त्याला मिळत, ते सर्व तो त्याच्या आजोबांच्या वेबसाईटसाठी खर्च करत असे.

अलीकडे आपल्या आजोबांच्या अनेक हृद्य आठवणी तो लिहून ‘ग.दि.माडगूळकर’ या फेसबुक पेजवर टाकतो. गदिमाप्रेमी रसिकांची त्याला छान दादही मिळते. गदिमा शताब्दीत त्याने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने चार दिवसांचा स्वतंत्र गदिमा सांस्कृतिक महोत्सव, चित्रप्रदर्शन पुण्यात भरवले होते, ‘तो राजहंस एक’, ‘गदिमान्य’सारखे गदिमांच्या गाणी-आठवणींवर स्टेज शो त्याने केले, अलीकडेच मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘वसंत व्याख्यानमालेत’ त्याने गदिमांच्या आठवणी सांगून रसिकांना मुग्ध केले होते.

गीतरामायणाला ६० वर्षे पुरी झाल्यावर त्याने गीतरामायणाचे फेसबुक पेज निर्माण केले. तसेच आपल्या मोबाईलवर गीतरामायण ऐकता येईल, असे एक ऑडिओ ॲपही त्याने तयार केले होते. आपल्या अद्वितीय आजोबांची महती जाणून त्यांचे साहित्य तरुण पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी त्याची जी तळमळ आहे ती माझ्या मातृहृदयाला खूप सुखावते. गदिमांच्या स्मारकासाठी तो झटतो आहे, गेल्या वर्षी त्याने पुणे महानगरपालिकेकडून गदिमांचे स्मारक कोथरूड येथे मंजूरही करून घेतले, लवकरात लवकर ते आता मार्गी लागावे, राजकीय निष्क्रियतेमुळे फक्त सरकारी कागदावरच राहू नये, असे वाटते.

समृद्ध वारसा जतन करणे आणि तो परत आपल्या पुढच्या पिढीच्या हातात देणे आणि त्यांनी तो वसा आणखी पुढे नेणे, यासारखे दुसरे समाधान नाही.

पपा खूप वेळा खादी सिल्कचा झब्बा घालत असत. एकदा त्यांच्या झब्ब्यातले सिल्कचे कापड उरल्यावर ताईंनी मला दिले. मी त्यातून अगदी पपांसारखाच एक छोटासा सिल्कचा झब्बा सुमित्रला शिवून घेतला आणि छोटासा पांढरा पायजमा… तो ज्या दिवशी शिवून आला त्यादिवशी लगेच त्याने घातला.. अगदी आपल्या आजोबांसारखा झब्बा बघून तो आनंदाने नाचू लागला… पपांनाही त्याने त्याच्यासारखा झब्बा घालायला लावला.

मग त्या दिवशी संध्याकाळी पपांचे बोट धरून अंगणात त्याने त्यांच्यासह खूप फेऱ्या मारल्या. अजूनही सिल्कचा झब्बा घातलेले ते पाठमोरे पपा… आणि त्यांचे बोट धरून चालणारा, तसाच सिल्कचा झब्बा घातलेला सुमित्र… यांच्या पाठमोऱ्या आकृती मनावर ठसल्या आहेत….  

अजूनही त्याने धरलेली आपल्या आजोबांची करांगुली त्याच्या हातात मला माझ्या अश्रूभरल्या डोळ्यांपुढे दिसते आहे….. ती अजूनही तशीच त्याच्या हातात  आहे, असे मनोमन वाटते…. 

5 जून 2022!  सुमित्र, तुझा  वाढदिवस! खूप खूप मोठा हो, बाळा! आमच्या आशीर्वादाला काही शक्ती असतील तर त्या नेहमीच तुझ्या पाठीशी उभ्या राहतील. पपांच्या शब्दांत आशीर्वाद द्यायचा झाला तर…. “तव भाग्याला नुरोत कक्षा..”

तुझी आई,

— समाप्त — 

लेखिका – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बिच्चारा वजन काटा — ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ बिच्चारा वजन काटा — ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार

रात्री पण ice cream चा मारा चाललाय फार

व्यायाम करायचा निश्चय येणाऱ्या सोमवारचा करून

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

उन्हाळ्याच्या सुरवातीलाच खायची ती ओल्या काजूची उसळ

आणि चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ

रसरशीत बिट्ट्या चोखताना सगळं तोंड जातंय माखून

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

काहीही न करताच येतोय रोज इतका घाम

वजन कमी करण्यासाठी वेगळे नको काही काम

हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “हो.. माहितीये मला..” ☆ योगिया ☆

? विविधा ?

☆ “हो.. माहितीये मला..” ☆ योगिया

महाराष्ट्रात सध्या जे काय चाललंय ते आपण सगळेच बघतोय. मला राजकारणातलं काही कळत नाही पण या सगळ्यामागे जे मूळ कारण आहे ते म्हणजे  “संवादाचा” अभाव.  ट्विटर / फेसबुक असूनही संवाद काही झाला नाहीये. आपलं तरी रोजच्या जीवनात काय झालंय? हल्ली माझ्या असं लक्षात आलंय कि कोणीही कोणाशीही बोलायला गेलं कि बोलणंच खुंटत कारण पहिल्या एक -दोन वाक्यानंतर प्रतिसाद असतो ” हो.. माहितीये मला.. ” आणि मग संवादच खुंटतो. मग ते नवरा बायको असो , पालक –  बालक असो, आजी-आजोबा  – नातवंड असो.  मित्र असोत. गुरु -शिष्य असोत, तज्ञ-जाणकार आणि शिकाऊ असोत. पण हाच अनुभव.

परवा घरी आलो आणि बायकोला सांगायला लागलो कि चांदणी चौकात ट्रॅफिक जाम जॅम होता..पुढे सांगणार होतो कि कसे हाल झाले…. त्यात आज नेमका ऑफिसला कसा उशीर झाला.. ती ऐनवेळची मिटींग … साहेबांनी केलेलं कौतुक ..प्रमोशन चा चान्स .. वगैरे,वगैरे पण माझं वाक्य कट करून ती म्हणाली “कि हो माहितीये मला..” , मला व्हाट्स ऍप वर व्हिडिओ आलाय..हा बघ .”  माझी पुढे बोलायची इच्छाच नाही झाली.   

IPL बघत होतो. मुलगा खाली खेळून आला. आल्या -आल्या त्याला आनंदाची बातमी सांगितली कि कोहोली आउट झाला (तो मुंबई फॅन आहे). तो म्हणाला “हो.. माहितीये मला.. . त्यावरचे इन्स्टा वर मिम्स पण आले आहेत कि तो अनुष्काच्या पदरा मागे लपलाय वगैरे.” तो कसा आउट झाला, त्याचा कोणी कॅच कसा अफलातून घेतला, नवीन बॉलरचा गुगली कसला भारी होता वगैरे सांगायचं राहून गेलं.

मुलगी शिकायला अमेरिकेला जायची होती. तिला म्हंटलं चल तुला माझ्या मित्राकडे घेऊन जातो..तो तिथे ४ वर्षे होता. तो तुला सांगेल तिकडे कसं असतं. ती म्हणाली बाबा “हो.. सगळं  माहितीये मला.” …मुलगी अमेरिकेला जायच्या आधी मित्राकडे जायच्या निमित्ताने तिच्याबरोबर तास दोन तास घालवायचे ठरवले होते.  जरा तिकडच्या कल्चर बद्दल तिच्याशी बोलू ठरवलं होतं ते राहून गेलं.

बाबांना ऐकू कमी येतं. म्हणून परवा म्हंटल त्यांना “मन कि बात” मधे मोदी काय बोलले ते सांगावं . जरा त्यांच्या बरोबर वेळ घालवता येईल. मी सुरवात केली तर तेच म्हणाले “हो.. माहितीये मला..” .. त्यांच्या जेष्ठांच्या ग्रुप वर आल्रेडी भाषण टाईप करून आलं होतं. 

बऱ्याच दिवसांनी ४ दिवसासाठी माहेरी गेले होते. आईशी खूप गप्पा मारायच्या होत्या. आईला म्हंटलं “आमच्या शेजारी नवीन बिऱ्हाड आलंय”. आई म्हणाली “हो.. माहितीये मला..  त्यांच्या ट्रक आला तेव्हाच तू फोन करून सांगितलं होतंस कि बहुदा तुमच्या शेजारचेच आले असावेत. मग आर्ध्यातासाने फोन करून तूच नाही का सांगितलंस कि कुलकर्णी म्हणून नगरचे आहेत. स्टेट बँकेत आहेत. दोन मुलं आहेत म्हणून. इ. इ . इ.  ” चार दिवसांसाठी गेलेली मी दोन दिवसांनीच परत आले.

परवा नातू धावत धावत आजी कडे गेला. आजी -आजी रिझल्ट लागला. पण पहिल्या वाक्यानंतर आजीचं म्हणाली “हो.. माहितीये मला.. आईने व्हाट्स ऍप केला होता..  गणितात ९४, शास्त्रात ९० … वगैरे वगैरे. नातवाला काय काय सांगायचं होतं, मी कितवा आलो, मित्रांपेक्षा कसे छान मार्क्स पडले, टीचर्स कशा गुड म्हणाल्या  , पण त्याच्या फ्लोच एकदम कट झाला आणि  नातू मोबाईल खेळायला पळाला.

मला माझं बालपण आठवलं. चौथीत असताना इतिहासात शिवाजी महाराज आले.  मी रोज शाळेतून आल्या आल्या इतिहासाच्या तासाला काय झाले ते आजी-आजोबांना , मग संध्याकाळी आई-बाबांना सांगायचो.  मला आठवतंय कि मी एक दिवस आल्या आल्या आजीला सांगितलं कि शिवाजी महाराजांनी शाईस्तेखानाची  बोटे छाटली.

आजीने विचारलं “हो का ? का छाटली पण”

मग मी का ,कसं ,कुठे सांगितलं… आजी प्रश्न विचारत राहिली आणि आम्ही थेट स्वराज्याची शप्पथ पर्यंत पोहोचलो. आता हसू येतं कि आजीला काय हे माहित नसेल? पण ती इतक्या निरागसपणे विचारात राहिली कि त्यावेळी मला वाटत होत मी आजीच्या ज्ञानात भर घालतोय.

शेवटी आजोबांनी एक प्रश्न विचारला “का रे पण उजव्या हाताची छाटली का डाव्या ?”

पुढे २  वर्षे मी याचा शोध घेत होतो. त्यादरम्यानच मग बाबांनी बाबासाहेब पुरंदरेंबद्दल सांगितलं. मग मी त्यांच्या पत्ता शोधून हा प्रश्न पोस्टाने त्यांना विचारल्याचं पण आठवतंय. त्यावेळी माहित नव्हतं यालाच ध्यास म्हणतात.

२ आठवडयांनी आजीनी विचारलं “मग शिवाजी महाराजांनी पुढची कुठली मोहीम हाती घेतली?”

“अंग इतिहासाचा तासच झाला नाही ..भूगोल शिकवला”

“काय शिकवलं भूगोलात” –  आजोबा

“गोदावरी नदी बद्दल”

“हा ते भाक्रानांगल धरण धरण बांधलंय ना पैठणजवळ”

“आजोबा तुम्हाला काहीच माहित नाही…ते जायकवाडी धरण” पहिलं मातीच धरण , मग गोदावरीला दक्षिण गंगा का म्हणतात .. गंगा , यमुना , सिंधू ..सिंधूच्या पार अटकेपर्यंत मराठे कसे गेले..पेशवे .. राजाराम महाराज , संभाजी महाराज ते परत शिवाजी महाराज … आता गंमत वाटते कि आम्ही कुठूनही कुठेही पोहोचायचो.”

“छोटू बाबा ..आम्ही तुझ्या एवढे होते तेव्हा हे धरणच नव्हतं त्यामुळे माहित नाही मला”….. आजोबा

आता माझ्या आजोबांना काय हे माहित नसेल पण आव तर असा आणायचे आणि माझ्याकडून माहिती काढून घ्यायचे..पाहायचे मला किती माहित आहे. नंतर आई -बाबांना सांगत असावेत कारण काही दिवसांनी आमची एक दिवसाची ट्रिप भाटघर  धरणावर झाली. आईचा एक चुलत भाऊ तिथे इंजिनिअर होता. मग त्याने धरण , पाणी कसं मोजतात, कॅचमेंट एरिया , धरणाची दारं , वीज कशी बनते , धरणाचं अर्थशास्त्र असं काय काय सांगितलं.  कदाचित पुढे मागे नुसतं वाचून माहिती झालं असतही पण कळलं कधीच नसतं. ते धरणावर कळलं. माझा आवाका वाढला हे निश्चित.

आता असं वाटतं कि आजी -आजोबा जर म्हणाले असते कि “हो.. माहितीये मला..” तर कदाचित हे सगळं कळलंच नसतं किंवा कधी तरी मी नुसतं वाचलं असत पण अनुभवलं नसतं. आजी-आजोबांना शिवाजी समजून सांगताना माझ्यात तो चढायचा असं आजोबा म्हणायचे. ते सगळं आता आठवतंय. खरंच ते म्हणले नाहीत “हो.. माहितीये मला..” आणि मी समृद्ध होत गेलो.

माणूस हा मुळात संवादशील प्राणी आहे. संवाद हि त्याची गरज आहे. बऱ्याचवेळा त्याला त्याचा अनुभव शेअर करून दुसऱ्याच्या  जाणिवेत व्हॅल्यू ऍड करायची असते. दुसऱ्याला सांगताना आपला अनुभव पडताळून पहायचा असतो. तो बोलतो तेव्हा माहिती सांगतो पण भावना शेअर करतो. पण “हो.. माहितीये मला..” या वाक्याने त्याच्या उत्साहाच्या धबधब्याच्या रूपांतर झऱ्यात होत आणि मग तो आटूनच जातो. आणि मग भावनांचा दुष्काळ वगैरे निर्माण होतो. मग चिडचिड. त्यापासून दूर राहण्यासाठी परत डिव्हाईस ला जवळ करायचं.. मग आहेतच लाईक्स, मिम्स , इन्स्टा स्टोरीज .त्यातून कळलेली अर्धवट माहिती (हे अर्धवट माहिती प्रकरण फार डेंजर आहे ..अफवा, दुस्वास , असहिष्णुता येथेच जन्म घेतात) आणि मग परत “हो.. माहितीये मला..”

एका विचित्र चक्रात आडकतोय आपण. चक्र कसलं ..समाज स्वास्थ्य बिघवडणारा चक्रव्यूव्हच तो.  ठेवायचं का आपण “हो.. माहितीये मला..” ला जरा दूर. समोरचा बोलत असताना त्याचं पूर्ण ऐकण्या एवढा वेळ काढू ना आपण.  “हो.. माहितीये मला..”  ऐवजी  “हो का..माहित नव्हतं ..मग पुढे काय झालं” असं म्हणून पाहू ना काही दिवस. नक्की फरक पडेल. मला खात्री आहे.  (प्लीज यावर हो.. माहितीये मला..म्हणू नका).

जरूर करून बघा. शेअर करून बघा. 

– योगिया

([email protected] / ९८८१९०२२५२)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-2 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-2 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

(हा विचारही त्यांच्या हळव्या कविमनाला सहन झाला नव्हता…)इथून पुढे —-

या सगळ्या प्रसंगातून एका सुंदर बालगीताचा जन्म झाला…. ते बालगीत असे होते….

आल गट्टी –गाल गट्टी

सोन्याची गट्टी फू…

तुला मी खेळात घेणार नाही

जेम गोळ्या देणार नाही 

आलास तर घेईन गालगुच्चा 

अंगावर सोडीन भू….

                     

पं गाडी, कुक गाडी, 

मामाघरची हम्मा गाडी

आम्ही सगळे भूर जाऊ

एकटाच बस जा तू …..   

                        

पप्पू, बिंटी, वेदा, राणी

आम्ही खेळू छप्पा पाणी 

तूच एकटा बाथरूममध्ये 

रडवे डोळे धू……

किती गोड बालगीत आहे हे…. सुमित्र लहानपणी बोबडे बोलायचा. त्यामुळे ‘सोन्याशी’ न म्हणता पपांनी लाडिकपणे ‘सोन्याची’ असा शब्द वापरला आहे आणि नंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर त्यांना त्याच्याशी करायचीय ‘कट्टी फू’, पण लाडक्या नातवाशी ‘गट्टी’ असल्यामुळे ‘कट्टी फू’ शब्द न वापरता ‘गट्टी फू’ असा शब्द वापरला आहे.

एकदा असेच रात्री जेवण झाल्यावर पपा सुमित्रचे बोट धरून पंचवटीच्या अंगणात शतपावली करत होते. समोर आकाशात चंद्र शोभून दिसत होता. त्याने पपांना प्रश्न विचारला, “हा चंदामामा कोण असतो? त्याला पाय नसतात. मग तो पळतो कसा? तो मामा असून घरी का येत नाही?” त्याला पपांनी योग्य ती उत्तरे दिली आणि दुसरे एक बालगीत जन्माला आले.

सांगा ना हो आजोबा 

कोण असतो चांदोबा? 

     

पंख नाहीत, पाय नाहीत 

फिरतो कसा कुणाला माहीत?

बघावे तेव्हा खुशीत असतो

हसत असतो वेडोबा.

    

आजी म्हणते ‘चंद्रदेव’ 

रागवेल तो, आधी जेव 

नाहीतर तुझा दूध भात 

पळवून नेतील बोकोबा.

‘चंदामामा’ म्हणते आई 

घरी कधी तो येत नाही 

असला कसला भाऊ तिचा हा 

उंचावरचा शहाणोबा.

बाबा म्हणतात “कळेल कळेल”

तुझे उत्तर तुला मिळेल 

मोठा हो, शाळा शिक 

आजच कसला खोळंबा?

अधांतरी हा फिरतो गोल

त्याला कसले देता मोल? 

चांद म्हणजे माती, दगड 

बडबड करिती दादोबा.

सुमित्र सहा सात महिन्याचा असताना बालकृष्णासारखा एक पाय ओढत घरभर रांगू लागला होता. पपा व्हरांड्यात लिहीत बसले असले तरी त्यांचे सुमित्रकडे बारीक लक्ष असायचे. तो रांगत रांगत व्हरांड्यात गेला की, पायऱ्यांवरून पडेल अशा भीतीने ते त्याला उचलून घेत आणि हाक मारत, “माया, हा इथे आलाय बघ रांगत रांगत…”, मग मी किंवा कोणीतरी त्याला उचलून आत आणून हॉलचे दार तो पपांना त्रास देऊ नये म्हणून लोटून घेत असू. तो बंद दारापर्यंत जाऊन परत मागे फिरत असे.

एकदा असेच त्याची अंघोळ झाल्यावर त्याचे अंग पुसून कपडे घालण्याआधी तो भराभर रांगत आपल्या आजोबांना भेटायला गेला. नुकत्याच वर्तमानपत्रात वाचलेल्या देशा- विदेशातल्या विचित्र घटना आणि त्याची कल्पनाही नसणारे निरागस, अजाणपणे वावरणारे त्यांचे नातवंडं याचा दुवा त्यांच्या मनात नकळत सांधला गेला आणि पपांच्या एका सुंदर कवितेने जन्म घेतला. कवितेचे नाव होते – ‘नागडे नातवंडं’ 

त्या कवितेचा भावार्थ असा होता….. आजकाल मानवतेची विटम्बना होईल इतकी समाजात नीतीमूल्ये ढासळत आहेत. एकत्र कुटुंबपद्धती मोडीत निघाली आहे. सत्यालाच न्याय मिळेल आणि त्याचा विजय होईल अशी शाश्वती राहिली नाही. जगावर स्वामित्व गाजवण्यासाठी सत्ताधारी देश तीव्र संघर्षापर्यंत पोहोचत आहेत. जगात ही जी विपरित परिस्थिती निर्माण होतेय, जी उलथापालथ होतेय – त्याची या भावी निरागस पिढीला काही कल्पना नाही. ती अजाणपणे, निरागसपणे, निश्चिन्तपणे जगात वावरते आहे. ‘नागडे नातवंडं’ म्हणजे ही निरागस, तिसरी पिढी! खूप सुंदर कविता आहे ती….

त्या कवितेतील काही ओळी अशा होत्या….

प्रलय जवळ आला आहे 

अनीतीचा कळस झाला आहे 

न्यायाचे नाव राहिलेले नाही 

सत्याला गाव राहिलेले नाही 

असे वाटते आहे की

आभाळातील नक्षत्रमाळ तुटून 

धरणीच्या मस्तकावर पडते आहे

माझे अजाण नातवंडं अंगणात 

नागड्याने बागडते आहे…

क्रमशः…

  – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ स्त्रियांच्या विविध आणि सुंदर छटा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

स्त्रियांच्या विविध आणि सुंदर छटा… ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

डेअरी दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो. तिथे एकाच ठिकाणी ” दूध, दही, ताक, लोणी, तूप “

बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!  पाहूया कसे ते..?—-

दूध” 

दूध म्हणजे लग्नापूर्वीचं जीवन: कुमारिका.

दूध म्हणजे माहेर . दूध म्हणजे आईवडिलांशी नातं —शुभ्र, सकस, निर्भेळ—-

स्वार्थाचं पाणी टाकून वाढवता येत नाही,ते लगेच बेचव होतं. 

त्यावेळी तिला आपल्यासारखं जग सुद्धा स्वच्छ ,सुंदर,निरागस दिसतं.

दही

कन्यादानाचं विरजण लग्नात दुधाला लागलं की  कुमारिकेची वधू  होते . दुधाचं  नाव बदलून दही होतं ! 

दही म्हणजे त्याच अवस्थेत थिजून घट्ट होणं !–लग्नाच्या दिवशी मुलीची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भूमिकेत थिजून राहते. –दही म्हणजे मुलीचं आपल्या लग्नाशी असलेलं घट्ट नातं. ” कितीही मारहाण करणारा,व्यसनी,व्यभिचारी, मनोरुग्ण किंवा नुस्ता कुंकवाचा धनी असलेला नवरा असला “ तरी” स्त्री त्याच्याप्रती  एवढी निष्ठा का दाखवते ? नवरा हा “पती परमेश्वर” म्हणून ? नव्हे –

तर याचं उत्तर म्हणजे तिचं आपल्याच लग्नाशी असलेलं घट्ट नातं.

ताक” 

सर्वसामान्य स्त्रिया लग्नात दही झाल्या की दुसऱ्या दिवसापासून संसाराच्या रवीने घुसळल्या जातात,त्यांची आता सून होते, म्हणजे “ताक” होतं.– ” दूध जसं सकस तसं ताक बहुगुणी.”

‘बडबडणारी सासू असो ( वात प्रकृती ) किंवा  खवळलेला नवरा असो  (पित्त प्रकृती)’–ताक दोघांनाही शांत करतं.. हा यावरचा उत्तम उपाय आहे असं आयुर्वेद म्हणतो.

“ताक” म्हणजे सुनेचं सासरशी नातं. सासरी स्त्री ताकासारखी  बहुगुणी असावी लागते. सगळ्या प्रश्नावर तीच उपाय. तिथे दूध पचत नाहीच ! ‘दूध’ पाणी घालून बेचव होतं पण ‘ताक’ मात्र पाणी घालून वाढत राहतं आणि अनेक वर्ष  संसारातल्या सगळ्या प्रश्नांवर कामी येतं .

लोणी” 

अनेक वर्ष संसाराच्या रवीने घुसळून घेत ताक सर्वाना पुरुन उरतं. मग २० वर्षांनी जेव्हा माझं फलित काय असा प्रश्न ताक विचारतं, तेव्हा मऊ,रेशमी, मुलायम, नितळ लोण्याचा गोळा नकळत वर आलेला दिसतो . हे लोणी म्हणजे नवऱ्याशी नातं. रवीच्या प्रत्येक घुसळणीत ह्या नात्याचे कण  कण  ‘लोणी’ होऊन हळूच बाजूला जमा होत असतात हे तिच्या लक्षात येत नाही. कानावरच्या चंदेरी बटा खरं तर रोज आरशात  लाजून तिला सांगत असतात. पण तिला त्यांची ही भाषा कळत नाही . तरुण दिसण्यासाठी ती त्या बटांचं तोंड काळं करते. ‘ताकाला’ पुन्हा ‘दूध’ व्हायचं असतं, हा वेडेपणा नाही का ?

तूप

‘लोणी’ ही तिची अंतिम अवस्था नसते म्हणून ते फार काळ धरून ठेवता येत नाही. ते आपलं रूप बदलतं . नव-याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता घरासाठी, नातवांसाठी आज्जीचं नवं रूप घेते – आणि त्याच लोण्याचं आता कढवलेलं “साजूक तूप होतं”.  वरणभात असो ,शिरा असो ,किंवा बेसन लाडू असो, घरातल्या प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर  साजूक तूप पडतं आणि जादू घडते.

देवासमोरच्या चांदीच्या छोट्या निरांजनात तुपाच्या लहानश्या गोळ्यात खोचलेली वात  बघितली की मला घरासाठी येताजाता हात जोडणारी चंदेरी केसांची आजी दिसते.

घरासाठी, कुटुंबासाठी प्रार्थना करत करत हे ‘तूप’ संपून जातं.हीच ती स्त्रीची  अंतिम उच्च  अवस्था होय.

” दूध ते तूप ” हा असा अनोखा स्त्रीच्या आयुष्याचा प्रवास. 

” स्त्री आहे तर श्री आहे असं  म्हटलं तर वावगं ठरू नये.”

—” असा हा स्त्रीचा संपूर्ण प्रवास- न थांबणारा, सतत धावणारा,न कावणारा, न घाबरणारा, कुटुंबासाठी झिजणारा, कुटुंबाची काळजी घेणारा “. —–

ह्या प्रवासास तथा समस्त स्त्री वर्गास मानाचा मुजरा ll.

संग्राहिका : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares