☆ हीच खरी महालक्ष्मी… लेखक – अनामिक ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
पण काहीही म्हणा —
ज्या ज्या घरात सगळ्या सुना , मुलं , जावा , नातवंडं एकत्र येतात, सर्वजण मिळून कामं करतात,
तिथं खरंच प्रसन्न वाटतं, करमतं ! दोन तीन दिवस अगदी मजेत जातात !
मित्र हो ,
हे करमणं , मजा वाटणं , प्रसन्न वाटणं म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मी आलेली असते !
ती येते , रहाते ,जेवते आणि जातांना म्हणते–
‘खुशाल रहा– असंच मिळून मिसळून रहात जा ! ‘
कुणी आणि का लावलं असेल आपल्यामागे हे सगळं ?
शास्त्रीयदृष्ट्या असेल का काही अर्थ या सणसमारंभांना ?
थोडा विचार केला , चिंतन केलं तर आपल्याला कळेल……….
या सणाच्या निमित्ताने आपलं घर भरून जातं–आपुलकीला उधाण येतं–माणसं एकत्र येतात ,भेटतात , बोलतात
आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात ……!
बैठकीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची , पावलांची दाटी हीच खरी लक्ष्मी …….!
चार दिवस सर्व कुटुंबाचं एका छताखाली येणं – गुण्यागोविंदाने रहाणं – आणि सुखदुःखाच्या गप्पा गोष्टी करणं …… हीच खरी लक्ष्मी !
पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक– दिरानी वहिनींकडे हक्काने मागितलेला कपभर चहा –’ तुम्ही राहू द्या, मी करते ‘ असा एका जावेने दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट …… हीच खरी लक्ष्मी ….!
मित्रहो त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका. ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते– पण मनाने श्रीमंत होते.
सुशिक्षित नसतीलही– पण नम्र होते.
एखाद्या वेळेस रागवत असतील– पण डुख धरत नव्हते.
ते फॉरेन रिटर्न नव्हते– परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची हे त्यांना चांगलं कळत होतं.
योग्य वेळी योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं …… हीच खरी लक्ष्मी !
मला मला करण्यापेक्षा, तू घे , तू घे चा आग्रह करणे—
आधी काहीतरी खाऊन घ्या आणि नंतर काम करा —अशी ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना —
घर, कुटुंब आणि नातं टिकण्यासाठी प्रत्येक सदस्याने केलेला त्याग —
…हीच खरी महालक्ष्मी ….!
लेखक : अनामिक
संग्राहक : सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला भावलेला गणेश ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
परवाच संकष्टी झाली. गणपतीची आरती, मंत्रपुष्पांजली आणि नंतर अथर्वशीर्ष म्हणू लागले ” ओम् नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि—–” असं म्हणून झालं .आणि माझ्या मनात गणेश तत्वाबद्दल विचार सुरू झाले .गणपती, गणेश ,गजानन, विनायक ,गजमुख अशी गणेशाची कितीतरी नावं आहेत. हत्तीचे मुख असलेली ,रत्नजडित किरीट घातलेली, तुंदिलतनू असलेली, उंदीर पायाखाली घेतलेली, अशी सुंदर पार्थिव मूर्ती हीच गणेश का? मला भावलेला गणेश यापेक्षा आणखी कितीतरी वेगळा आहे. प्रत्येक गोष्टीला दोन रुपे असतात .एक डोळ्याला दिसणारं स्थूल रूप किंवा व्यक्तरूप .आणि दुसरं शक्तिमान असलं तरी, डोळ्याला न दिसणारं ते सूक्ष्म किंवा अव्यक्त रूप. भाव हा सूक्ष्म असतो. त्यामुळे मला भावलेल्या गणेशाचे रूप हे सूक्ष्म स्वरूपाचं आहे.
“गण” याचा अर्थ संख्या किंवा मोजणे, मोजमाप करणे वगैरे वगैरे–‘ब्रह्म’ हे अनंत अपरिमित आहे . या ब्रम्हांडातूनच अनेक ब्रम्हांडांचा जन्म झाला. त्यातलंच एक अगदी छोटं आपलं जग . जग हे अंतापासून सांतापर्यंत व अपरिमितापासून परिमितापर्यंत येतं, तेव्हा ते मोजमाप करण्यायोग्य होतं. मोजमाप करणारी शक्ती, गणितज्ञांचा गणितज्ञ तोच गणेश. प्रत्येक गोष्टीला एक मिती असते. जसं की, चिकू , आंबा, फणस, यातील प्रत्येकाचं पान, फूल, फळ, निरनिराळ असतं. आंब्याच्या झाडाला चिक्कू किंवा लिंबू लागत नाही. किंवा गुलाबाला जाई जुई लागत नाही. अशी निसर्गात एक नियमबद्धता आहे. ही नियमबद्धता जेव्हा असंतुलित होते, तेव्हा निसर्गच ती संतुलित करण्याचा प्रयत्न करू लागतो. आणि मग भूकंप, ज्वालामुखी, पूर, आवर्षण अशा गोष्टी घडायला लागतात. निसर्गाची ही नियमबद्धता टिकविणारा नियंत्रक तोच गणेश.
आपले जग हे पृथ्वी, आप ,तेज, वायू ,आकाश अशा पंचमहातत्वांनी बनलेले आहे .ही पाच तत्वे ठराविक प्रमाणात एकमेकात मिसळून त्याचे पंचीकरण झाले. उदाहरणार्थ अर्ध्या आकाश तत्वात उरलेली चारही तत्वे, प्रत्येकी एक अष्टमांश अशी गणना झाली. या गणनेच्या मुळाशी असलेली अधिष्ठात्रि देवता ( त्वं मूलाधार स्थितोसि नित्यम् ) ती शक्ती म्हणजेच गणेश.
ही सृष्टी ओंकारातून जन्माला आली. ओंकार हा नाद स्वरूप आहे. गणेशाचे रूपसुद्धा ओंकार प्रधान असल्याचे म्हटले आहे. आणि गणेश हा गणनाकार नाद आहे. म्हणजे या सृष्टीच्या मुळाशी जी सृजन शक्ती आहे ती म्हणजे गौरी नंदन गणेश. प्रत्येक गोष्ट ओमच आहे असे मांडुक्क्य उपनिषदामध्ये सांगितले आहे. आकाशातून पृथ्वीवर पडणारा पाऊस हे जलतत्त्व, आकाशाकडे झेपावणाऱ्या ज्वाला किंवा उष्णता हे अग्नी तत्व, या दोन्हींमधील गाठ, हे पृथ्वीतत्व, तेथून निघणारी रेषा हे वायूतत्व, वरील चंद्रकोरीची दोन्ही टोके मन आणि बुद्धी, आणि त्यावरील टिंब हे चैतन्य. आणि हे सगळं ज्याच्यामध्ये सामावलं आहे हे आकाशतत्व. अशी ही अष्टधा प्रकृती तोच गणेश.
गणेशाचा एक वैज्ञानिक अर्थही मला भावला आहे. पदार्थाचा, वस्तूचा सगळ्यात लहानात लहान घटक म्हणजे अणू. अणूच्या केंद्रकात, प्रोटॉन व न्यूट्रॉन असतो. व त्यांच्या बाहेरून इलेक्ट्रॉन फिरत असतो. त्याची अष्टक स्थिती प्राप्त करून त्याला स्थिर होण्यासाठी धडपड असते. त्याची गणना करून त्याला स्थिर होण्यासाठी पूरक बनून त्याची आठ आकड्यांपर्यंत गणना करून देतो, ती शक्ती म्हणजेच गणेश. कदाचित अष्टविनायकाची संकल्पना यावरूनही पुढे आलेली असावी.
निर्मिती करणारा ब्रह्मा, सातत्य राखणारा विष्णू ,आणि विलयाला नेणारा तो महेश. या सर्व शक्ती म्हणजेच गणेश. आपण तरी काय करतो !– पार्थिव गणपती घरी आणतो. आनंदाने, अपूर्वाईने, त्याची पूजा करतो. उत्सव करतो. आणि विसर्जन म्हणजे जल तत्वात विलय करतो. हेच चक्र निसर्गात चालू आहे. झाडे, पर्वत, समुद्रातील बेटे यांची उत्पत्ती होते, स्थैर्य येते, आणि विलय होतो. आणि परत पुन्हा नवीन जन्म ! आणि या सगळ्यासाठी लागणारी शक्ती तोच गणेश.
‘गुर‘ हा धातू प्रयत्न करणे, उद्योग करणे हा अर्थ दर्शवितो .गुरंपासून गौरी शब्द बनतो .गौरी म्हणजे सतत उद्यमशील अशी शक्ती. ऊर्जेचे दुसरे नावच गौरी. या ऊर्जेचा उत्सर्ग, अर्थात तिचा मळ म्हणजे गणेश. संस्कृतमध्ये
‘मळ‘ धातू हा ‘धारणे‘ या अर्थी वापरतात. ऊर्जेने धारण केलेली, सृष्टी निर्माण करणारी ,गणनाकार, नादमय, ईश्वरी शक्ती म्हणजे गौरी नंदन गणेश.
या विश्वाच्या मागे राहून कार्य करणारी शक्ती म्हणजे, एक फार मोठे रहस्य आहे. गूढ आहे .ते उलगडणेही तितकेच अवघड व कठीण काम आहे. आणि ते काम करणारा ज्ञानमय, विज्ञानमय असा गणेश असतो.
गणेश उत्सव चालू आहे .सर्व शक्तीच्या प्रतीकाची, पार्थिव गणेशाची पूजा करत असताना, निसर्गाचा ऱ्हास न करता ,त्याचे रक्षण करणे हीच भावात्मक पूजा, खऱ्या अर्थाने पूजा होईल. आणि प्रत्येकाला गणेश प्रसन्न होईल. गणपतीबाप्पा मोरया.
१) कोणालाही न दुखवता जगणे, याच्याइतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि……ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरज राहत नाही.
२) कामासाठी वेळ द्या :- कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या :- कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे .
खेळण्यासाठी वेळ द्या :- कारण ते तारुण्याचे गुपित आहे.
वाचनासाठी वेळ द्या :- कारण तो ज्ञानाचा पाया आहे.
स्वत:साठी वेळ द्या:- कारण आपण आहोत तर जग आहे.
….आणि अतिशय महत्वाचे….. ” दुसऱ्यांसाठी वेळ द्या कारण. ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..
३) ‘ पश्चात्ताप ‘ कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि ‘ काळजी ‘ कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही….!
म्हणूनच… वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे…!!
४ )माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे. कुणी पाहत नाही, असा अर्थ काढू नये. कारण जेव्हा नियती त्याचा हिशोब करते, तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही.
५)भावना कळायला मन लागतं,
वेदना कळायला जाणीव लागते,
देव कळायला श्रद्धा लागते,
माणूस कळायला माणुसकी लागते,
चांगलं जगायला सुंदर विचार लागतात,
आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी, समाधानी, निरामय आयुष्य लागते.
६) माणसाने माणसावर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा “दरवाज्याचा” जन्म झाला, त्या विश्वासावर देखील आघात झाला तेव्हा “कुलूपाचा” जन्म झाला आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही. तेव्हा मात्र “सीसीटीव्ही” चा जन्म झाला.
७)जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे , अंतःकरणात जिद्द आहे, भावनांना फुलांचे गंध आहेत, डोळ्यासमोर खुले आकाश आहे……. तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…
८) देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असते.. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात……. कारण आपण *ओंजळीत पाणी पकडू तर शकतो…पण टिकवून नाही ठेवू शकत…आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात….कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावा लागतो…
९) संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते, ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
१०) कधी अडल्या नडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहचत असेल, तर ईश्वराचे आभार माना. कारण तो समर्थ असतांनाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केलेली असते. आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात—-
काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी.
११)माणूस मनापर्यंत पोहोचला … तरच नातं निर्माण होतं …नाहीतर ती फक्त ओळखच ठरते … !! असे जगा की आपली “उपस्थिती” कुणाला जाणवली नाही तरी चालेल…पण आपली “अनुपस्थिती ” मात्र जाणवली पाहिजे..!!!
१२) चांगले कर्म , चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
“एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते. जास्त वापरली तर झिजते. काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे. मग कोणाच्याही उपयोगात न येताच गंजण्यापेक्षा, इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तम “
संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे
९८२२८४६७६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या 26 वर्षाच्या तरुण मुलाचे पार्थिव घेऊन जेव्हा त्याचेच सहकारी तिरंग्यात लपेटून त्याला घरी आणतात, तेव्हा आईवडील, बहीण भाऊ, आप्तमित्र या सर्वांच्या डोळ्यातलं पाणी… इथेतर शब्दच मुके होतात. संवेदना स्तब्ध होतात.आईच्या कुशीतून जन्म घेऊन मातृभूमी ची सेवा करताना भूमातेच्या मांडीवर विसावलेला तो वीर! प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी त्या मातापित्याच्या त्यागाला, धारातीर्थी पडलेल्या शूराला अश्रू वंदना देत असतं. भारतमातेने आपला तिरंगी पदर आपल्या सुपुत्राला पांघरलेला असतो. मानवंदना देणारे ते अश्रू ही स्वतःला कृतार्थ मानत असतात.
शहीद जवानांची बातमी कानावर पडताच थेट काळजाला भिडते. दुःखाला अभिमानाची किनार असलेली ही भावना इतर सर्व भावनांपेक्षा श्रेष्ठ आहे. देशभक्ती चा कठोर वसा घेतलेल्या आणि ‘ तुजसाठी मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण’ या ध्यासाने सीमेवर रक्षण करणारा जवान जेव्हां धारातिर्थी पडतो तेव्हा अश्रू रूपानी ‘ भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्या साठी’ हा संदेश सर्व सैनिकांना पोचवत असतो. तेच त्यांच्या लढण्याचं बळ असतं..
☆ पहाटे तुळशीला पाणी का घालावे?… डाॅ. संतोष ढगे ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆
आपल्या पुर्वासुरींनी पहाटे प्रत्येकाने तुळशीला पाणी घालावे असे सांगीतले आहे. त्यापाठीमागे पुढील दोन महत्वाची कारणे आहेत —–
📖 अध्यात्मिक महत्व-
याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते. जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो. आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू-संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते. त्याला कसे रोखायचे, असा प्रश्न सर्व देवांना पडतो. मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात. विष्णूनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली, तेव्हा त्यांना असे कळते की, त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते. तिच्या पातिव्रत्याच्या सामर्थ्यांनेच जालिंदर विजयी होत असतो. त्याला पराजीत करायचे असेल, तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो. ते करण्यास कुणीही धजावत नाही. अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात. जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात. आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते. तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच, जालिंदराचा मृत्यू होतो. देवांनी मारलेल्या बाणाने त्याचे शीर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते. नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते, “ तू कोण आहेस?” त्यावर विष्णू आपल्या खऱ्या रूपात प्रकटतात. संतप्त झालेली वृंदा विष्णूला ‘ तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे घडला, तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सहन करावा लागेल, ‘ असा शाप देते. भगवंत तिची क्षमा मागतात. तेव्हा वृंदा म्हणते, “ तू मला आता भ्रष्ट केलेस, आता मला कोण स्वीकारील ?” तेव्हा भगवंत म्हणतात, “ मी तुझा स्वीकार करतो. इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल.” त्यानंतर वृंदा सती गेली. पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला. देव दगड होऊन पडले. त्यालाच ‘शालिग्राम’ म्हणतात.
ज्या ठिकाणी तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिथे तुळशीचे रोप उगवले. तीच ही तुळस. वृंदेच्या नावावरूनच ज्या ठिकाणी तुळस लावली जाते, तिला ‘वृंदावन’ असे म्हटले जाते. तीच तुळस कृष्णाने, पांडुरंगानेही धारण केली. तिला भगवंताने स्वीकारले याचे प्रतीक म्हणून ‘ शालिग्राम ’ हा जो दगड आहे, त्याला देव मानून त्याचा विवाह तुळशीसोबत लावला जातो. ती भगवंतांची प्रिय होते, म्हणूनच तिला धारण करणा-यांवर भगवंत प्रेम करतो, अशी श्रद्धा आहे. याच विचाराने वारक-यांनीही तुळशीला आजतागायत पूजनीय मानले आहे.
📖 वैज्ञानिक महत्व-
जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन-O2 व रात्री कार्बन डाय ऑक्साईड-CO2 सोडते. अपवाद फक्त पिंपळ, कारण पिंपळ रात्रीही ऑक्सिजन सोडतो. म्हणूनच भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की, सर्व वृक्षात मी अश्वत्थ –पिंपळ आहे. मात्र तुळस ही जगातील एकमेव अशी वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन, रात्री कार्बन डाय ऑक्साईड व फक्त पहाटेच्या वेळी 0.03% इतका ओझोन-O3 वा़यू सोडते. व या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत 5HTPn-सेरॉटोनीन नावाचे संप्रेरक (Neurotransmiter) स्त्रवते. ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकारक शक्ती (Immune System) बळकट होते. आयुर्वेदानुसार तुळशीमुळे सर्दी,खोकला, ताप, त्वचारोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कँन्सर, होत नाहीत. कारण तुळशीच्या बिया, मुळे, खोड, पाने, फुले (मंजिरी) हे सर्वच औषधी आहेत. शिवाय तुळशीतून निघणाऱ्या शुभ स्पंदनांमुळे वातावरण शुद्धी होते.
या सर्व बाबींचा गहन विचार करुनच पुर्वासुरींनी पहाटे तुळशीला पाणी घालण्यास सांगितले आहे.
॥ इति सर्वेश्वरी चरणार्पणमस्तु ॥
– ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
– त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
– जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
– तिथे भक्तीची कमतरता नसते.
– जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
– जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते.
– आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते.
सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया: |
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुःख भाग्भवेत् ||
“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते” — स्वयंपाक करताना आजी म्हणायची. भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते.
मला नवल वाटतं आजीवर्गाचं. त्यांना बरोबर माहित असायचं – कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते.
पूर्वी घरोघरी कर्ता पुरुष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा. कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ,” हो हो बरोबर आहे तुमचं ” म्हणून होणारा वाद टाळायची. नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची.
‘चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो ‘ असं ती म्हणायची .
घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही. सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची. म्हणूनच त्यांचे संसार विना कलह झाले कामवाल्या बाई बाबतही असंच – तिने कधी दांडी मारली, कधी उशीरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त. मग अशावेळेस “का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ? काळजी घे गं बाई– चल दोन घास खाऊन घे“ असं म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील.
थोडी माणूसकी खूप मोठं काम करते. थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात —- आजी नेहमी म्हणायची “ आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं. “
आताची सतत अरे ला कारे करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं.
ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.
थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो.
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
एक ऐतिहासिक आणि सौंदर्यपूर्ण नगररचना असलेल्या जयपूर शहरात स्वामीजी खूप कमी काळ राहिले. जयपूर मध्ये एक सभापंडित व्याकरणाचे जाणकार होते. त्यांनी पंडितांकडून पाणीनीच्या व्याकरणातील सूत्रे समजावून घेण्याचा प्रयत्न केला. पंडितजींनी अनेक प्रकारे समजावून सांगून ही तीन दिवसाच्या प्रयत्नांनंतर सुद्धा स्वामीजी आकलन करू शकले नाहीत. पंडितजी त्यांना म्हणाले, “स्वामीजी माझ्याजवळ शिकल्याने आपला विशेष फायदा होईल असे वाटत नाही. तीन दिवस झाले, मी तुम्हाला एक सूत्रही समजावून देऊ शकलो नाही. आपण हा प्रयत्न थांबवावा. या बोलण्याने स्वामीजी या सुत्राचा अर्थ समजण्यासाठी, निश्चय करून एकांतात तीन तास बैठक मारून बसले आणि सूत्राचा अर्थ लक्षात आल्यावर खोली बाहेर येऊन, तो पंडितजींना सुबोध शैलीत म्हणून दाखवला. एव्हढंच नाही तर सूत्रा मागून सूत्र आणि अध्याया मागून अध्याय त्याच पद्धतीने ते वाचत राहिले. पंडितजी आश्चर्यचकीत झाले. एकदा ही आठवण सांगताना स्वामीजींनी म्हटले आहे, “मनाचा पूर्ण निर्धार असेल तर, काहीही साध्य करणं शक्य असतं. एखादा पर्वत असावा आणि त्यातील मातीचा कण अन कण वेगळा करावा अशा प्रकारे मनुष्य कोणताही कठीण विषय आत्मसात करू शकतो”. अशा प्रकारे दोन आठवड्यात शक्य तेव्हढे त्यांनी पंडितजिंकडून शंका निरसन करून घेतले होते. या आधी पण वराहनगर मठात त्यांनी दोन वर्ष पाणिनी च्या व्याकरणाचा अभ्यास केला होता.
जयपूर संस्थानचे लश्कर प्रमुख सरदार हरिसिंग यांच्याकडे काही दिवस स्वामीजी राहिले होते. त्यांच्या प्रवसातला हा अनुभव अत्यंत वेगळा होता. हरिसिंग यांचा भारतीय तत्वज्ञानाचा खूप चांगला अभ्यास होता. ते वेदांती होते, परब्रम्ह मनात असत. मूर्तिपूजेवर त्यांचा विश्वास नव्हता. ते साकाराचे पक्के विरोधक आणि निराकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या बरोबर तासन तास अनेक चर्चा होत होत्या. सगळे ज्ञान काही फक्त बुद्धीच्या जोरावरच मिळत नसते, काही वेळा ते भावनिक पातळीवर सुद्धा मिळते. कारण ते जाणिवेच्या पातळीवरचे असते. असाच अनुभव स्वामीजींनी हरिसिंग यांना दिला.
एका संध्याकाळी ते दोघ फिरायला बाहेर पडले होते. त्याच रस्त्यावर समोरून भगवान श्रीकृष्णाची मिरवणूक चालली होती. यात भक्त आर्त स्वरात आणि भावभक्तीने भजने म्हणत होती. दोघेही ती मिरवणूक पाहत थांबले असताना, स्वामीजींनी हरिसिंगना स्पर्श केला आणि म्हटले, “तो पहा साक्षात भगवंत आहे”. हरिसिंग देहभान हरपून एकटक बघू लागले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या. क्षणात ते एका वेगळ्याच विश्वात गेले. हरिसिंग यांनी हा अनुभव घेतल्या नंतर स्वामीजींना म्हणाले स्वामीजी माला साक्षात्कारच झाला. तासण तास चर्चा करून मला जे उमगलं नव्हतं, ते सारं मला आपल्या या स्पर्शाने ध्यानात आणून दिलं. श्रीकृष्णाच्या त्या मूर्तीत मला खरोखर जगच्चालक प्रभुंचं दर्शन घडलं”. असाच अनुभव स्वामीजींनी दक्षिणेश्वरच्या मंदिरात कालिमातेचं दर्शन घेताना घेतला होता. साकारावर विश्वास न ठेवणार्या स्वामीजींना हा अनुभव आला होता.
आता स्वामीजी जयपूरहून अजमेरला गेले. राजस्थान मधलं एक महत्वाचं ठिकाण. संपूर्ण भारतात एकमेव असं ब्रम्हदेवाचं मंदिर इथे आहे. त्याचं दर्शन आणि मोईनूद्दीन चिस्ती या दर्ग्याचं दर्शन घेऊन तिथला मुक्काम हलवला आणि राजस्थानच्या वळवंटातल्या साडेपाच हजार फुट उंचीच्या अबुच्या पहाडावर आले. त्यावेळी हा परिसर अतिशय शांत, उन्हाळ्यात तर हवा थंड आणि आल्हाददायक आणि अनेक संस्थांनिकांची प्रासादतुल्य निवासस्थाने होती. ब्रिटिश रेसिडेंटचा मुक्काम यावेळी इथे असे. त्यामुळे ते ऐश्वर्याचं लेणं भासत असे. पण याचा स्वामीजींना काही फरक नव्हता पडणार कारण त्यांना यात काहीच रस नव्हता. त्यांना हवी होती शांतता आणि एकांत स्थान. त्यांना आकर्षण होतं अशा ठिकाणी ध्यानधारणा करण्याचं. चम्पा ही गुहा त्यांना सापडली आणि त्यात ते राहू लागले.
रोज संध्याकाळच्या शांत प्रहरी स्वामीजी तलावाच्या काठाने चक्कर मारत. इतर संस्थांचे कोणी न कोणी तिथे येत जात असत. एकदा खेत्री संस्थानचे मुन्शी जगनमोहन लाल आले. ते उत्तम कार्यप्रशासक होते. त्यांना राजस्थानी, पर्शियन, संस्कृत, इंग्रजी या भाषा उत्तम येत होत्या. त्यांनी आपले खेत्रीचे राजा अजितसिंग यांना स्वामीजींनी भेटावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यांची भेट ठरली.
– आज घरं कसं रिकामं-रिकामं वाटतं. अगदी पाहुणे येऊन गेल्यावर वाटत तसंच!मनंही थोडं उदासच.
श्रावण कधी संपला कळलंच नाही.
अन् आतां किती पटकन् गौरी-गणपती आले अन् गेलेही. खरंच, रोजच्या दिवसाला कशी चक्र॔ लावलेली असतात नाही?तरी, त्याच्या पाऊलखुणा असतातच.
आमची एकुलती एक लेक सासरी गेली अन् घराबरोबर मनंही उदासलं.
तेव्हा आम्ही निर्णय घेतला, आपणही श्रीमहालक्ष्मी म्हणजे ‘गौराई ‘आपल्या घरी आणायच्या. ‘श्रीगणेशा’बरोबर ‘गौराई’म्हणजे, आनंदाची पर्वणीच!
आज किती वर्ष झाली, प्रत्येक वेळी नव्या उत्साहाने, गौरी -गणपती घरी आणल्या. त्याच्या येण्यानं जणूं दूरदेशी गेलेला मुलगाच भेटायला येतो. लाडक्या लेकी ‘ गौराई ‘माहेरपणाला येतात., असंच वाटत. आमची लेक मदतीला येते., नातवंडही यायला लागली. मग सगळा उत्साहच!
विद्येच्या.. आरोग्याच्या.. पावलांनी आली, म्हणत घरभर, हळदी-कुंकवाच्या पावलांवरुन या गौराई फिरवून आणायच्या. छानशा आराशीत, मखरात बसवायच्या. नवीनसाड्या-दागिन्यांनी सजवायच्या. बाजूला अखंड तेवत राहील अशी समई ठेवायची. पुढे ओटीचे खणं, फळं, हळदी-कुंकवाचे करंडे,
कुंची घातलेलं त्यांच बाळ अन् धान्याच्या राशी, फराळाची तबकं, सुरेखशी रांगोळी, याने सगळं मंगलमय होत जात. मग, नुसती धांदल, गडबड…, श्रीगणेश अन् गौराईची पूजा, नैवेद्य, आरती, ..सवाष्ण, ब्राह्मण.. याचा आनंद आगळाच!शब्दात न सांगता येणारा..
रात्री सगळं आवरल्यावर निवांतपणे गौराईपुढे ‘ लक्ष्मी स्तोत्र, गणरायाच्या पुढे अथर्वशीर्ष म्हणतांना डोळे पाझरु लागतात. गणरायात कधी मला लाड करवून घेणा-या, व. प्रसन्न हंसणा-या मुलाचा भास होतो, तर कधी.. घरादारावर मायेची सावली धरणारं प्रेमळ, वडिलधारी कुणी वाटत. गौराईंपुढे बसून एकटक त्याच्या डोळ्यांकडे पाहतांना वाटत.. अरे, ही तर आपली आईच दोन रुपातली!तिचीच प्रेमळ, धीर देणारी..
कधी वाटत या तर माझ्या लेकीच.. ज्येष्ठा-कनिष्ठा.. आमच्या लेकीसारख्या मनाची जागा व्यापणा-या, आईशी संवादून, सुख-दु:खाचे क्षणं वाटून घेणा-या, कां प्रिय सख्या?माहेर-सासरच्या आठवणी जागवणा-या.. श्रीमहालक्ष्मीचीच ही दोन रुप.. गौराई.. ! म्हणजे ‘स्त्री’रुपचं.
मग तीआई-जगज्जननी असो कि, सखी, लाडाची लेक असो, तीन दिवस कोडकौतुक करवून घेणारी माहेरवाशीण. !
नकळत डोळे टिपले जातात. मनं आनंदाने बहरतेच. मनांतले ‘सल’अलगद रिते होतात तिच्यापुढे.
मग कोण काय म्हणतंय याची चिंता कशाला?त्या सगळं पाहताहेत.. त्याच्या डोळ्यांच्या कोप-यात पाण्याचं तळं साठत. ओठांच्या पाकळीत हसूं उमलून सांडत आहे. हे सारे क्षणं फक्तं नी फक्त माझे अन् त्यांचेच! तीन दिवसांनी त्या, श्रीगणेशा’बरोबर आपला निरोप घेणार हेही माहित असत. ‘ पुनरागमनायच ‘ म्हणून त्यांच्यावर अक्षतां टाकतांना नेहमीच गळा भरुन येतो. सगळं छान पार पडल्याच समाधानही असत.
एक एक आराशीच्या वस्तू, फराळाची तबकं, जाग्यावर जातात. त्याच्या साड्या, दागिने पेटीत जातात. हळदी कुंकवाची धामधूम थंडावते. एक सुनंपण येत. वाटत..
त्या वळून पाहताहेत, आमच्या लेकी सारख्याच. !अन् नकळतं मनांत शब्द उमलतात…
भादव्याला पावसाची उघडीप मिळाली असली तरी ढगांचे पुंजके आकाशातून वस्ती करायचेच. अंगणात गौरीच्या रोपांना लाल, पांढरी, गुलाबी फुले यायची. त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी भिरभिरत रहायच्या.
ऊन चांगलंच भाजून काढायचं. पिकात शिरलं की गदमदुन जायचं. मूग, उडीद, अळसुंद(चवळीसारखेच पण तोंड काळे असते. देशी चवळी पूर्ण लाल असते किंवा पूर्ण पांढरी तोंड लाल)काळे श्रावण, कुशीचे हुलग्याच्या शेंगा वेलीवर तटतटू लागायच्या. बायका कम्बरेला वट्या बांधून वाळल्या शेंगा तोडू लागायच्या. जोंधळा कम्बरेला लागायचा. घरोघरी ओल्या मूग, अळसुंद, काळ्या श्रावणाची आमटी उसळ असायची. तोडून आणलेल्या शेंगा उन्हात वाळत पडायच्या, त्यांचा तटतट आवाज होऊन बी खाली पडायचे, टरफल मुरगळुन बाजूला व्हायची. उन्हाच्या रटाने लाल, पांढऱ्या अळ्या बाहेर पडू लागायच्या, चिमण्या त्यावर टपलेल्या असायच्या. जवळच्या बांबूच्या आड्यातल्या, कौलारू घराच्या वळचणीतून भुरदिशी चिमण्या यायच्या आणि बाहेर पडलेल्या अळ्या गट्टम करायच्या.
शेंगा चांगल्या वाळल्या की बडवून वाऱ्याला लावून स्वच्छ झाडून पाखडून किडके, मरके कडधान्य काढून स्वच्छ कडधान्ये पुन्हा कडकडीत ऊन खाऊन गरजेपुरती डब्यात बसायची, पुढील वर्ष्याच्या बियासाठी गाडग्या मडक्यातल्या, कणगीतल्या राखेत विसवायची आणि गरजेपेक्षा जास्त असतील तर बाजारात चार पैसे मिळवून द्यायची, तेलामीठाला हातभार.
कडधान्ये विसाव्याला ठेवेपर्यंत अश्विन येऊन टपकायचा. अंगणातल्या उंच उंच झेंडूच्या शेंड्याला फांदीच्या टोकातून इवल्या इवल्या कळ्या डोकवायच्या.
तुरीला फुलं-कळ्या यायला सुरुवात व्हायची. माळाच्या मटकीला कुठं फुलं कुठं शेंगा लागायच्या. जोंधळा पोटरीला आलेला असायचा, कधी निसवत असायचा. निसवलेल्या कणसावर इवली इवली फुले दिसायची. असंख्य मधमाशा कीटक इकडून तिकडे कणसावर भिरभिरत रहायचे. खाली पडलेल्या फुलांवर मुंग्या तुटून पडायच्या. भुईमूगाला पिवळी पिवळी फुले लागत. बहराला आलेली पिके वाऱ्यावर डोलायची. पिकातल्या वाऱ्याचा एक अनामिक नाद सगळ्या शिवारभर घुमत रहायचा. वाऱ्याच्या साथीने डुलणारे शेत पाहून शेतकरी मनही आनंदाने फुलून यायचे.
ढगांच्या प्रचंड गडगडाटात हत्तीचा पाऊस हजेरी लावून गेलेला असे. निवळसंख ओढे, ओघळी खळखळ वाहत असत. शेते जीव्हळून पांदीतून पाणी वहात असे. शेतातली कारळाची पिवळीधम्मक फुले वाऱ्यावर डुलत असत. सूर्यफूले एकेका पाकळीने उमलू लागत. उमललेली पिवळीजर्द फुले शेताला शोभा आणत. भुंगे, मधमाश्या फुलांना मिठी मारून बसत. जुंधळा हुरड्याला येई. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून हुरडा भाजला जाई. टपोरी कणसे खुडून आगीवर खरपूस भाजून सुपात चोळून पाखडून त्यावर चटणी मीठ टाकून चविष्ट हुरडा शेतकऱ्याच्या घरात हमखास असे. मक्याची कणसात दूध भरलेलेअसे. उकडून, भाजून, सोलून, गरम फुपुट्यात खरपूस वाफवलेली कणसे पोटभर खायला मिळत. भूमीपूजनाला धपाटी, कढी, वडी, कडाकणी, बाजरीचं उंड, भेंडी, दही भाताचा नैवेद्य शेताला दाखवला जाई आणि काढणीला आलेली पिकं काढायची धांदल सुरू होई.
सरत्या अश्विनात आणि निघत्या कार्तिकात डासं वारं भिरभिरत असे. आकाश निरभ्र झालेले असे. डास्या वाऱ्याने त्वचा तटतटू लागायची. थंडीची चाहूल लागायची. भुईमुगाची पाने काळपट तपकिरी रंगावर यायची. उंच उंच जोंधळ्याच्या डोलत्या पिकांवर पाखरांचे थवे भिरभिरायचे. मचाणी बांधल्या जायच्या, गोफणी तयार व्हायच्या. म्हातारे कोतारे, तरणे शेतावर वस्ती करत, कुणी पहाटेच उठून पाखरं राखायला जायचे. शेताशिवारातून हाकाट्यांचे आवाज, रिकाम्या डबड्यांचे आवाज घुमू लागत.
पावसाने उकणून गेलेल्या खळ्यांची डागडुजी होई.
कार्तिकच्या मध्यावर किंवा शेवटी गाव ओस पडत. खुडणी कापणीला जोर येई. कणसं खुडायची, जोंधळा पाडायची एकच धांदल उडायची. धारदार विळे बोट कापत तर कधी पायात सड घुसत. आसपासच्या औषधी पाल्याला चुरून रस काढून जखमेवर लावून चिंधकाची दशी काढून पट्टी बांधली जाई. शेंगा काढणीला नांगराची तजवीज आणि तोडणीला बायका, पोरांना शेंगाच्या रोजावर बोलवायची धांदल उडे. शेंगांचा सॉड (उतार)बघून एकूण गोळ्यांची संख्या ठरे. जितका उतार जास्त तितकी गोळ्यांची संख्या जास्त. १४, १८, २० अश्या संख्येत गोळे ठरायचे. दिवसभर रोजगाऱ्याने तोडलेल्या शेंगांचे समसमान गोळे करून त्यातला १ गोळा म्हणजेच पाटी, अर्धी पाटी किंवा दीड पाटी शेंगा दिवसभर शेंगा तोडणाऱ्यास मिळत. दिवसभर नांगरलेल्या शेतातले वेल वेचणे, ढीग घालणे मग शेंगा तोडायच्या. माणसांच्या आवाजाने राने गजबजून जात.
तूर मटकी काढून झाली की खरिपाचा हंगाम संपे पण माणसांच्या आणि गुरांच्या वर्षभराच्या पोटा पाण्याची सोय होई. खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.
श्रावण अमावास्या झाली की कोल्हापूरच्या गल्ल्यातून आवाज घुमू लागतो भावल्या घ्या गनुबं…. हा आवाज ऐकला की घरच्या आयाबाया लगबगीने बाहेर येतात आणि आवाज देणाऱ्या कुंभार मावशीला थांबवून त्यांच्या डोक्यावरची जड बुट्टी उतरून खाली घेतात. वर झाकलेला मेणकापड, त्याखालचं सुती कापड बाजूला सरकवली की डोळे दिपून जातील अशा बाहुल्या म्हणजे हरतालिकांचे रंगीत जोड दिसतात. त्याच्याबरोबरच असते ती निव्वळ काळ्या मातीची अनाकर्षक अशी पाच ते सहा इंचाची एक आकृती. लांबून बघितलं तर एखादा पंचकोन वाटावा अशी, पण उचलून घेतल्यावर लक्षात येते की, तळपायाला तळपाय जुळवून घातलेली इवलीशी मांडी जमिनीला समांतर पसरलेले इवले हात, त्यातला उजवा हात रिकामा, डाव्या हातात मसुराएवढी गोळी ( तो म्हणजे लाडू म्हणे) आणि त्या मूर्तीचा चेहरा बघितला की एवढा वेळ अनोळखी वाटणाऱ्या आपल्या नजरेत अचानक ओळख दिसते. नुसती ओळख नाही तर वात्सल्याची भावना दाटून येते– कारण तो चेहरा असतो गजमुख, त्याचे छोटेसे सुपासारखे कान, डोक्यावर किरीट — ओळख पटते — गणोबा!
होय गणोबाच ! हा गणपती विघ्नहर्ता- मंगलमूर्ती- वरद विनायक- वगैरे सगळ्या विशेषणांच्या पलीकडचा. कारण हा गणोबा असतो तो गौरीचा बाळ. गणू हे त्याचं नाव, पण माहेरी येणाऱ्या लेकधनिणीचा पोरगा, त्याला नुसतं नावाने कसं बनवायचं म्हणून आदरार्थी लावलेला ज्योतिबा खंडोबा यांच्याप्रमाणे बा नावाचा प्रत्यय म्हणून तो ‘ गणोबा. ’
वास्तविक भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू होणारा गणेशोत्सव म्हणजे पार्थिव गणपती व्रत. या व्रताची मूळ देवता म्हणजे हा गणोबा, कारण पूर्णब्रम्ह ओमकार आपल्या उदरी पुत्ररूपाने यावा यासाठी माता पार्वतीने श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी अशी रोज मातीची गणरायाची मूर्ती घडवून व्रत केले आणि त्याचे फलस्वरूप म्हणून भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गिरीजात्मज अवतार झाला. याची स्मृती म्हणून दरवर्षी आपण हे पार्थिव गणपती व्रत करतो. पार्थिव म्हणजे पृथ्वीपासून बनलेला. आपले सगळे सणवार हे निसर्गाशी, पर्यावरणाशी मिळतेजुळते असे आहेत. नुसते मिळतेजुळते नव्हे तर एकरूप आहेत. जे सृष्टीत घडतं आहे त्याची संपूर्ण जाणीव आणि सृष्टीच्या बदलाबद्दलची कृतज्ञता यांचा समन्वय म्हणजे आपले सण.
गणोबा हा नेहमी काळ्या मातीचा घडवतात. हा गणोबा गणेशाच्या जन्माच्या कथेचे रहस्य देखील उलगडतो. आपणा सर्वांना माहिती आहे की, पार्वतीने स्वतःच्या शरीरावरच्या मळापासून (अर्थात हा मळ म्हणजे अंगावरच्या त्वचेचा घाणीचा थर नव्हे, तर स्नानापूर्वी लावलेल्या केशर चंदनाच्या उटीचा थर)– तर त्या थरापासून पार्वतीने स्वतःचा गण तयार केला. गणोबासाठी वापरली जाणारी माती ही नदीच्या गाळाची असते. श्रावण भाद्रपद म्हणजे नद्यांनी वाहून आणलेला गाळ संचित झाल्याचे दिवस. हा गाळ शेतीसाठी किती उपयुक्त असतो हे सुज्ञास सांगणे न लगे. या गाळाच्या मातीतच गणेशाची जन्मकथा उलगडते. पृथ्वी म्हणजे साक्षात जगन्माता पार्वती. या पार्वतीच्या अंगावरचा मळ पावसाच्या धारांनी धुवून निघतो आणि मैदानी प्रदेशात स्थिरावतो. हा गाळ जणू संपन्नता घेऊन येतो. म्हणूनच की काय, कुंभार बांधव याच गाळापासून या पार्थिव गणपतीची निर्मिती करतात.
खरंतर व्रत-विधीप्रमाणे यजमानाने स्वतःच्या हाताने असा मातीचा गणपती घडवणे अभिप्रेत आहे. पण मूर्ती शास्त्रानुसार गणरायाची मूर्ती घडवणे हे सगळ्यात अवघड काम आहे, कारण त्याची सोंड- हात- पाय- लंबोदर यांचा समन्वय साधणे नवख्या माणसाला शक्य होत नाही. बरेचदा सोंड गळून पडते आणि गणपतीचा मारुती होतो. म्हणूनच ‘ करायला गेलो गणपती झाला मारुती ‘ अशी म्हण प्रचलित झाली असावी. म्हणून या कामात कुंभार बांधवांचे सहाय्य घेण्याची पद्धत निर्माण झाली आणि हा पार्थिव गणपती कुंभार वाड्यातून येऊन आपल्या घरामध्ये विसावू लागला.
माणसाला मुळातच सौंदर्याचे आकर्षण. या आकर्षणापोटी आणि कुंभार बांधवांच्या अंगभूत कलेमुळे पार्थिव गणपतीच्या रूपामध्ये फरक पडत गेला. हाताच्या ओंजळीत मावणाऱ्या काळ्या गणोबापेक्षा चित्रकारांनी चितारलेला, मंदिरात मूर्तिकारांनी घडवलेला गणपती भक्ताच्या मनाला भुरळ पडू लागला आणि मग चतुर्भुज सिंहासनाधिष्ठित अशा गणरायाच्या मूर्तींची निर्मिती सुरू झाली. मग वेगवेगळे रंग आले आणि या रंगात देवाची वस्त्रं, अलंकार, शरीर रंगवलं जायला लागले. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप आलं तसं मूर्तींचे आकार वाढत गेले. पुढे जशी नैसर्गिक माती कमी पडू लागली, किंवा मूर्तीच्या भंग पावण्याच्या भीतीमुळे टिकाऊ मूर्तीची मागणी वाढू लागली, तशा साच्यातून घडणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती निर्माण व्हायला लागल्या. मूर्तिकारांचे, भक्तांचे काम सोपे झाले.
पण नकळत मूळ व्रताचा उद्देश बाजूला पडत चालला. पण त्याची स्मृती म्हणून आजही कितीही मोठी मूर्ती आवडली तरी या मूर्तीच्या उजव्या हाताला या काळ्या गणोबाचं स्थान असतंच. त्याचं स्थान उजव्या हाताला असतं, हे तो या व्रताचा मूळ अधिकारी असल्याचं खरे लक्षण आहे. वास्तविक गणोबा गणपती दोन नाहीत. गणोबा ही व्रताची शास्त्रोक्त मूर्ती, तर मोठी मूर्ती आपल्या हौसेची. आजही गौरीपूजनादिवशी याच गणोबाला गौरीच्या पदरात ठेवला जातो. संचारी गौर अपत्यप्राप्तीचा अभिलाष असणाऱ्या स्त्रीच्या ओट्यात याच गणोबाला देते. तिच्या दृष्टीने जिला गणोबा खेळवता आला तिला आई होण्याचा सन्मान मिळाला, कारण गौरीचं हे अवखळ बाळ सांभाळणं किती अवघड आहे हे फक्त गौरीलाच माहिती आहे. — असा हा काळा सावळा पण जिव्हाळ्याचा लाडका गणोबा !
“ श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः “
माझं माहेर खानदेशातलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादे !! लग्न करून कोल्हापूरला आल्यावर गणेशचतुर्थीच्या २-३ दिवस आधीच * गणूबा घ्या ओ गनुबा… भावल्या घ्या हो भावल्या * अशी तार स्वरात हाक कानी पडली.. मला आश्चर्य वाटलं- ‘ अगंबाई गणपती असे दारावर विकायला येतात?’ सहज कुतुहल म्हणून त्या बाईला बोलावलं आणि पहिल्यांदाच या गनुबाचं– नव्हे गणोबाच दर्शन घेऊन झालं. कारण मला वाटतं महाराष्ट्रात फक्त कोल्हापूर- सांगली भागातच *गणोबा” ची मूर्ती पूजण्याची पद्धत असावी. खूप मोठमोठ्या मूर्तींबरोबर तर गणोबा फुकट मिळतो म्हणे !! आणि तो गणोबा पण मोठ्या गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान होतो.. उत्सवमूर्ती होऊन !
आणि मग हा गणोबा गौराई पुत्र.. गौरीजागरणाच्या गाण्यातून अधिक बाळरूपात भेटला- गन्या गन्या गनेशा !! गणानं घुंगरू हरवलं…. किंवा गण्या हटून का बसला? — अशासारखी ती गाणी — खास “ गणोबा “ साठी म्हटली जाणारी.