मराठी साहित्य – विविधा ☆ सण,परंपरा आणि वर्तमान… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ सण,परंपरा आणि वर्तमान… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

काल हरतालिकेचा सण होता. हे दिवसच मुळी उत्साहाने सणवार साजरे करण्याचे. हरतालिका असूनही बँकेला सुट्टी नसल्याने घरचं आवरुन,पुजा ,नमस्कार,नैवेद्य आटोपून बँकेला निघाले. परंतु मस्त सणाचा दिवस असूनही समोरचे दृश्य बघून मनं खट्टू झालं, वाईट वाटलं,खरचं शिक्षणाने,प्रगतीने माणसात सुधारणा होण्याऐवजी तो अधिकाधिक बिघडतच चालला आहे हे समोरचे दृश्य बघून लगेच लक्षात आलं.

आमच्या काँलनीमध्ये बरीच झाडं आहे. त्यामध्ये फुलझाडांचा सुद्धा समावेश आहे. मग हरतालिकेच्या पूजेचे निमित्त करून काही स्त्रिया आणि मुली अक्षरशः पत्री आणि फुलं ह्यासाठी अख्खी झाडच्या झाडं ओरबाडीत होत्या. बर चार शब्द समजावण्याचा प्रयत्न केलाही असता जर त्या स्त्रिया काँलनीतील वा पाहणीतील असत्या तर. खरचं जिवंत झाडांना रक्तबंबाळ करून स्वतःवर फुलं,पत्री वाहून घेणं देवाला तरी आवडेल का हो ?

मी तरी स्वतः नियम घालून घेतला आहे फक्त एक बिल्वपत्र  आणि एक फूल सगळ्या पूजांच्या वेळी वहायचं.मला खात्री आहे माझा महादेव हा एकशे आठ बिल्वपत्रांपेक्षाही माझ्या एका बिल्वपत्रातच संतोष पावेल.

काळ बदलला की सुधारणा ह्या होतात. पण सुधारणा ह्या फक्त हक्क मागणं,बरोबरी करणं, अरेतुरे संबोधणं, न बघणेबल वस्त्र परिधान करणं, व्यसनांमध्ये पुरुषांच्या वरचढ होऊ बघणं, स्वातंत्र्याचा गैरवापराने वरचढ स्थान मिळवणं ह्या नसून आपल्या मानसिकते मध्ये चांगला,सकारात्मक बदल करणं,काळ बदलला की थोडाबहुत चांगला बदल करणं, स्वतःची सामाजिक उन्नती, उत्कर्ष ह्याकडे लक्ष देणं ह्याला सुधारणा म्हणावं हे समजायला हवं.  पण कुठल्याही व्यक्तीने बदलेल्या काळाचा, झालेल्या बदलांचा, सोयीस्कर सुधारणा हे लेबल वापरण्याचा जर आपल्या सोयीचा अर्थ लावून आपल्या सवयी सुरू ठेवल्या तर समाजाचा -हास,अनर्थ हा अटळ.

काही मुली म्हणतात हे पूजेला पत्री,फुलं तोडणं जुन्या पिढीकडूनच आम्ही शिकल़ो तर ह्यावर उत्तर असं, जुना काळच वेगळा, झाडांच्या रुपात तेव्हा विपुल नैसर्गिक संपत्ती होती, शिक्षणाचा अभाव होता, वेळेची मुबलकता होती आणि मुख्य म्हणजे ह्या निमित्ताने त्या स्त्रियांना चार भिंतीबाहेर पडायला मिळायचे.

उपवासांचे ही तसेच. पुर्वी मनावर धार्मिक रुढींचा खूप पगडा होता. अंधश्रद्धेच जाळं खूप फोफावलं असायचं, स्त्रिया स्वतःच्या प्रकृती विषयी काळजी न घेता त्याबद्दल अनास्था बाळगतं. साधकबाधक आहार, प्रकृती ह्या विषयी अज्ञान होतं .पण आता काळ बदललायं. स्त्रियांना शिक्षणामुळे आहार, प्रकृती ह्याविषयी माहिती उपलब्ध होते.त्यामुळे आपल्या वयानुसार  प्रकृती ला, झेपतील त्या पद्धतीने उपवास करावेत.

ह्या सणांच्या निमित्ताने जपल्या जाणाऱ्या परंपरा व आधुनिक धार्मिकता ह्यामध्ये सांधून पण कुठलेही टोक न गाठता सुवर्णमध्य साधला जाऊ शकतो ह्याचं भान आलं खरं.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ☆  श्री दिनेश डोंगरे ☆

??

ज्येष्ठा कनिष्ठा गौरी ☆  श्री दिनेश डोंगरे ☆

“स्वच्छता ज्याचे घरी, लक्ष्मी तेथे वास करी “ असे सार्थपणे म्हटले जाते. 

स्वच्छता – अस्वच्छता

भाव – अभाव

धर्म – अधर्म

उल्हास – आळस

उपद्रवी – अनुपद्रवी

सुसंवाद – वाद विवाद

प्रिय – अप्रिय

चांगले – वाईट

इष्ट – अनिष्ट

या सर्व परस्पर विरोधी बाजू किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.

तद्वतच “अलक्ष्मी – लक्ष्मी ” या सुद्धा परस्पर विरोधी.  परंतू  ज्येष्ठा – कनिष्ठा अशा बहिणी आहेत.

दोन्हीही बहिणींची समुद्रमंथनातून अवतीर्णता झालेली आहे.

लक्ष्मीस जो मान देवता म्हणून मिळाला, तो मान ज्येष्ठ असूनही आपणास नाही, अशी खंत अलक्ष्मीस होती व त्याचे निराकरण करण्याच्या हेतूने श्रीविष्णू यांनी वरदान देत, अलक्ष्मीचे पूजन लक्ष्मीबरोबर वर्षातून एकदा होईल, असे नियोजन करविले. त्यानुसार पार्थीव श्रीगणेश पूजन कार्यकाळात येणार्‍या अनुराधा नक्षत्रावर “अलक्ष्मी-लक्ष्मीचे” अवाहन करणेचे, तद्नंतर दुसरे दिवशी येणार्‍या जेष्ठा नक्षत्रावर “अलक्ष्मी व लक्ष्मीचे” पूजन, नैवेद्य अर्पण करणेचे व तिसर्‍या दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करणेचे, असा अनुक्रम नियोजित केला गेला. त्याअन्वये “जेष्ठ” बहीण असलेल्या “अलक्ष्मी” व कनिष्ठ बहीण “लक्ष्मी” असे  दोघींचेच पूजन करताना ” जेष्ठाकनिष्ठागौरी ” असे नामकरण केले जाऊ लागले.

इथे ” गौरी ” या शब्दाचा अर्थ ‘ निष्पक्षतेच्या देवता ‘ असा घ्यावा.

“अलक्ष्मी-लक्ष्मी “ या दोन्ही बाजूंसोबतचे  पूजन म्हणजे ‘ निष्पक्षता ‘ जाणावी.

या अनुसार, चांगली व वाईट बाजूसह, अनिष्ट गोष्टींबद्दलसुध्दा मनात पूज्यभाव बाळगणे, हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते.

व्यावहारिक भाषेत ” अलक्ष्मी ” म्हणजे व्यय (खर्च), आणि “लक्ष्मी “ म्हणजे आय (आवक)ज्येष्ठा व मूळ नक्षत्र ही भयानक नक्षत्र आहेत, आणि यातूनच ” मुळावरच आला ” असे उच्चारण वापरले जाऊ लागले.

अलक्ष्मीचे पूजन होणे, हे  तिच्यासाठी सुखावह असते, व वर्षभरासाठी विमा काढल्यासारखे पूजन करणार्‍याच्या (व्यय ) खर्चावर नियंत्रण मिळवले जाते. त्यात आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहण्याचे संकेत मिळतात, हे जाणावे.

त्यासाठी मनोभावे वार्षिक नियोजनाप्रमाणे ” अलक्ष्मी-लक्ष्मी “—ज्येष्ठा-कनिष्ठा गौरी पूजन अंगीकारावे.

दिपावलीत  लक्ष्मीपूजनावेळी वेगळ्या स्थानी केरसुणीचे म्हणजेच झाडूचेही  पूजन केले जाते, कारण झाडू हे “अलक्ष्मीचे” आयुध म्हणजे अस्त्र आहे. तिचा कोप म्हणजे आपल्याकडील संपन्नतेवर झाडू फिरवला जाणे. यासाठी तिचे त्यावेळीही पूजन केले जाते.

जेष्ठा कनिष्ठा गौरी पूजनासाठी उभ्या सजवलेल्या स्थितीत असणाऱ्या दोन जणी म्हणजे या  “अलक्ष्मी आणि लक्ष्मी “. 

त्या तीनही दिवसात या दोघींचेही विनम्र नमन असावे.

खड्या स्वरुपात असणार्‍या “अलक्ष्मी-लक्ष्मी ” —

या पद्धतीच्या पूजेसाठी दोन खडे जलवाहत्या नदीतून आणावेत. कारण या जलदेवता आहेत.

पाच किंवा सात खडे आणणे म्हणजे अलक्ष्मी, लक्ष्मीसह गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, कावेरी अश्या पवित्र जलदेवता आणल्या, असे मानून पूजन व्हावे, जेणेकरुन पाण्यासारखा वाहता पैसा येत राहील व अलक्ष्मीच्या  प्रसन्नतेने आपल्या खर्चावरही अंकूश राहील. आपल्याला वाहता पैसा यावा असे वाटते, पण खर्च मात्र वाहता नसावा असेही वाटते, त्याकरिता “अलक्ष्मी-लक्ष्मी ” दोघींचे एकत्रित पूजन श्रीविष्णूंनी अग्रेषीत केले आहे असे मनोमन जाणावे.

अलक्ष्मी असण्याचे लक्षण म्हणजे – अघोरी वृत्ती, अस्वच्छता, उपद्रवी अवगुण, कलह, अमिषप्रियवर्तन, आळस हे आहे व ते टाळणेच इष्ट जाणावे.

त्यामुळेच कुठेही स्थिर न असणार्‍या लक्ष्मीचे चिरकाल स्थैर्य अवागमनासह राहणेचे होते.

गरजूंना मदत करीत लक्ष्मीला फिरते ठेवणे केंव्हाही फलदायी असते. लक्ष्मी कोंडून ठेवल्यास अयोग्यतेचे  जाणावे.

श्रीगजानन महाराज यांनी त्यांच्या समक्ष

“अर्पण निधी साठवू नये” 

“अस्वच्छता नसावी” आणि “यात्रा थांबवू नये”—असे ब्रीद संस्थान शेगांवसाठी अधोरेखीत केलेले आहे, हे वास्तव.

त्यानुसार आजही वर्षभराचा खर्च कितीही असला, तरी येणार्‍या अर्पणनिधीचा वापर सातत्याने नवनव्या संधीतून केला जातो, पण बँक डिपॉझिट करुन लक्ष्मी साठवण्याचे होत नाही.

या श्रीगजानन महाराजांच्या कृपादृष्टीने आजही संस्थान श्रीक्षेत्र शेगांव उत्तरोत्तर फलद्रूप होत आहे.  सुखासमाधानाने

 ” सेवाकार्य यज्ञ ” अखंड चालू आहे, हे आपण पहात आहोतच.

या लेखातून केलेली व्यक्तता न भावल्यास दुर्लक्षित करणेचे असावे ही विनंती व क्षमस्व. 

आशय भावल्यांस निश्चीतच अनुकरण व्हावे, ही माझी सदिच्छा व सर्वांना अनुकरणासाठी शुभेच्छा!

 

।। नमो जेष्ठाय च कनिष्ठाय च  स्तेतानाम् पतये नमः ।।

अर्थात –

” ज्येष्ठा कनिष्ठासह उपद्रवी अवगुणांनीही नमन “

।। ॐ नमो श्रीगजानन ।।

© श्री दिनेश डोंगरे

बीड

मो ९८६०९४२२५०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवस सुगीचे… भाग 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

 दिवस सुगीचे सुरू जाहले –

ओला चारा बैल माजले—

अशी एक सुगीचे यथार्थ चित्रण करणारी फार सुंदर कविता आम्हाला तिसरी-चौथीत होती. शेतकऱ्यांसाठी सुगी म्हणजे धामधुमीचा काळ. त्यातल्या त्यात खरीप अर्थात दिवाळीपूर्वीचा हंगाम म्हणजे वेगवेगळ्या पिकांची काढणी,कापणी, मळणी आणि धान्य घरात आणेपर्यंतचा सर्व कालावधी हा अतिशय व्यस्त,धामधुमीचा आणि आनंदाचा असतो.आतापर्यंत केलेल्या वेळेचे, पिकाचे नियोजन, आणि शेतात केलेल्या कष्टांचे चीज सुगीत होणार असते. आणि वर्षभर शेतकऱ्यांचे कुटुंब, गुरा-ढोरांच्या पोटापाण्याची बेगमी, या सुगीवरच अवलंबून असते. पीक कसे आले?यावरही सुगीचे फलित अवलंबून असते. सुगीच्या दिवसात शेतकरी कुटुंबाला वेळकाढूपणा करून, टंगळमंगळ करून चालत नाही, की एखाद्या गावाला शिवालाही जाऊन चालत नसते. घरादाराला कुलूप घालून सर्वांची रवानगी शेतात करावी लागते. कधी कधी तर शेतावरच मुक्काम ठोकायला लागतो. त्यावेळी सर्वत्र कसे एकदम धावपळीचे चित्र असायचे.

खरे तर वैशाख सुरू झाला कीच बी बेवळा जमवण्याची तयारी सुरू व्हायची. मान्सूनचे वारे वाहू लागत आणि हवेतील उष्मा थोडासा कमी होई. भुईमुगाच्या शेंगा फोडायला सुरुवात व्हायची, कारण हे बी तयार करून ठेवायला लागायचे. बाकी कडधान्ये राखेत असत, ती पटकन चाळून घेता येत. पण शेंगदाण्याचे तसे नसते. घरच्याच पोत्यातील देशी शेंगांचे बी काढावे लागे. घरोघरी आयाबाया,पोरं- ठोरं शेंगा फोडायला सुरू करायची. हे कामसुद्धा रोजगाराने असायचे. चार-आठ आण्याला मापटाभर शेंगदाणे फोडून द्यायचे. सर्व शेंगा फोडून झाल्यावर मग मापट्याच्या हिशोबाने पैसे आणि थोडेसे शेंगांचे घाटे रोजगाऱ्यास मिळत. शेंगा फोडून झाल्या की बी अर्थात शेंगदाणे निवडण्याचे काम करावे लागे. फुटके,डाळी झालेले,बारीक बारीक शेंगदाणे वेचून, मोठे टपोरे शेंगदाणे पेरणीसाठी बाजूला काढावे लागत.आकाशात इकडे तिकडे पळणारे काळे काळे ढग आता स्थिरावू लागत. थंड हवा वाहू लागे आणि बियांचे आतून रुजणे सुरू होई.

उकाड्याने हैराण झालेल्या जीवास अचानकच आलेला एखादा पावसाचा शिडकावा दिलासा देई.वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आसमंतात भरून जात. कोकीळ आणि पावशाचे प्रियाराधन तार स्वरात सुरू व्हायचे आणि शेतातील राहिलेला काडी कचरा वेचून ढेकळं फोडून जमीन एकसारखी करायला सुरुवात व्हायची. मृग नक्षत्र सुरू होताच इथं तिथं मिरगी किडे दिसत. बायका त्यांना हळदकुंकू लावून पूजत. पावसाची वर्दी देत गार गार वारे वाहू लागत आणि पाठोपाठ टपोऱ्या थेंबासह जलधारा कोसळू लागत.

घन घन माला नभी दाटल्या । कोसळती धारा ।।

असेच काहीसे वातावरण असायचे. मातीचा सुगंध चहूबाजूस दरवळू लागायचा. तप्त धरणी पाऊस पिऊन तृप्त व्हायची.

इकडं आमच्या शाळा सुरू व्हायच्या. पावसात भिजत भिजत शाळेला जायला नको वाटायचे. उलट कांबळी पांघरून घरातूनच पाऊस पहावा वाटायचा. कौलांच्या वळचणीच्या पाऊसधारा झेलाव्या वाटायच्या. शेतातल्या मऊ मातीत पाय रुतवू वाटायचे.सर्वांबरोबर शेतात जाऊन शेतातली कामे करावी वाटायची. चुलीपुढील ऊबीत बसावे वाटायचे. तरीही शाळेला जावे लागायचेच. कुणाची तरी जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीने घ्यायची. वह्या लगेच मिळत नसत आणि तसेही प्राथमिक शाळेत पाटीचा वापर जास्त होत होता, वही एखादं दुसरीच.

राखेतला बी बेवळा चाळून काढायची धांदल उडायची. आठवणीने कुरी सांदीकोपऱ्यातून बाहेर येऊन सुताराकडे दुरुस्तीला किंवा सांधायला येऊन पडत. देशी चवळी, मूग, उडीद, मटकी, काळा श्रावण, कुशीचा हुलगा, तूर, ज्वारी राखेतून काढून चाळले जायचे. देशी पावट्याचे बी, सूर्यफुलाचे, कारळ मुरडान घालायला सोबत असायचे. पसाभर हावऱ्या (पांढरे तीळ) गठूळ्याच्या एका टोकाला आठवणीने बांधल्या जायच्या. पेरणी झाली की असेच विस्कटून द्यायच्या. अडशिरी पायलीभर हावऱ्या आरामात निघायच्या.

दहीभात,नारळ पेरणीच्या श्रीगणेशाला आणि धरणीच्या शांतीसाठी. घात अर्थात वाफस्याची वाट प्रत्येकजण पहात असायचा. ओल किती खोल गेलीय याची चाचपणी व्हायची अन पेरणीची एकच धांदल उडायची. बैलगाडीत कुरी,बी बेवळा टाकून घरदार पेरणीला निघायचं. गावात सकाळी सकाळीच सामसूम व्हायची. पेरणी झाली आणि लगेच पाऊस आला की आनंदाला उधाण यायचं, कारण बी व्यवस्थित मुजून रुजणार याची पक्की खात्री व्हायची.

वैशाख-जेष्ठ महिना अशा प्रकारे सुगीच्या तयारीच्या धामधुमीतच न पेरणीतच संपून जायचा.

आषाढाचे काळे काळे कुट्ट पाण्याने ओथंबलेले ढग आकाशात गर्दी करायचे अन भुर भुर पाऊस सतत चालू रहायचा. सोबत बोचरा भिरभिर वारा. बाया माणसं पोत्याची खोळ घेऊन शेताला जायचे. गुराखी पोत्याची खोळ,काठी घेऊन गुरे चारायला निघायची. सततच्या भुरभुरीने सगळीकडे हिरवे पोपटी गवताचे कोंब जिकडे तिकडे उगवत. माळराने, टेकड्या, डोंगर हिरवाई पांघरून बसत. जनावरांना ती हिरवाई भुरळ पाडायची आणि ती हावऱ्यागत इथं तिथं मनसोक्त चरत रहायची. उन्हाळ्यात कडबा खाऊन भकाळलेलं पोट आता चांगलंच टूमटूमित व्हायचं.शेतात वित दोन वित पीक वाऱ्यावर डोलायचं. पिकाबरोबरच तणही गर्दी करायचं, इतकं की पीक मुजुन जायचं. दिवस दिवस खोळ पांघरून बायका खुरप्याच्या शेंड्याने शेंड्याने अलवार पिकाच्या मोडाला धक्का न लावता तण वेचत रहायच्या. कधी अभंग, कधी सुखदुःखाच्या गोष्टी तर कधी पिकाचा अदमास बांधत शिवारे पोत्याच्या खोळीत आणि बांगड्यांच्या किणकिणीत गजबजून जायची. सततच्या रिपरिपीने सगळीकडे चिखल चिखल व्हायचा.

मूळ नक्षत्राच्या खिचड्याला बायकांची धांदल सुरू व्हायची. उखळीत जुंधळ कांडून चुलीवर रटरटत असायचे. करडं भिजवून उखळात चेचून त्यातून दूध काढलं जायचं. ओढ्या ओघळीच्या खळखळ पाण्यावर जनावरांना मोकळं सोडलं जायचं. गळ्याइतक्या पाण्यात म्हशी, रेडकं मनसोक्त डुंबत राहायची. मालक गोड शीळ घालत चिखलाने बरबटलेली अंगे दगडाने घासून घासून स्वच्छ करायचा. बैलांना ओंजळीनं पाणी मारत मारत मायेने हात फिरवत कांती तुकतुकीत करायचा. ओल्या गवताने तृप्त झालेली जनावरे धुतल्यावर अजूनच तजेलदार दिसायची आणि ही नवी कांती बघून शेतकरी प्रसन्न व्हायचा. खिचडा,आंबील खाऊन जनावरे सुस्त होत.

पुरणपोळीचा घास सगळ्या जनावरांना मिळायचा. नवे कासरे, शिंगांचे गोंडे आणि आरशाच्या रंगीबेरंगी झुली पाठीवर लेऊन लेझीम,वाजंत्र्याच्या गजरात सजलेले बैल मिरवणुकीत सामील व्हायचे. ( या दोन दिवसात किती पण अडचण, नड-अड असली तरीही शेतकरी बैल औताला अथवा बैलगाडीला जोडायचे नाहीत.) आंब्याच्या पानांची तोरणे मातंग समाजातील लोक गोठ्याला, घराला आणून बांधत. गावभर मिरवून दृष्ट काढून बैल गोठ्यात विश्रांती घेत. अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा,काटे वाळकं वेलीवर लोंबकळत. बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.

क्रमशः …

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सकारात्मकता ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

अल्प परिचय:

संप्रति :असिस्टंट ब्रांच मँनेजर, अभिनंदन सहकारी बँक अमरावती
आवड : वाचन आणि थोडबहुत लिखाण.

? विविधा ?

☆ सकारात्मकता ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सकारात्मक असणं ही आपल्या जीवनात हवी असलेली अत्यावश्यक बाब. आपण स्वतः सुखी,समाधानी राहण्यासाठी आपणच त्या दृष्टीने पावलं उचलणं हे ही महत्वाचचं. ह्याची सुरवात जर आपल्याकडून योग्य रितीने झाली तर मग आपोआप आपल्याला मार्गदर्शन, मदत ही मिळतेच.

परंतु हे आपलं सध्याचं जीवनमान हे अतिशय धावपळीचं, दगदगीचं झालयं. पूर्वी कामांचा ताण हा घरगुती स्वरूपातील होता. स्त्रियांना बाहेरच्या क्षेत्रातील ताणतणावाचा फारसा सामना करावाच लागत नव्हता. आता काळात, परिस्थितीत खूप बदल झाल्याने स्त्रियांना खुल्या क्षेत्रात त्या करीत असलेल्या नोकरी वा व्यवसायात निरनिराळ्या अडचणींचा सामना करून त्यातून यशस्वीपणे मार्ग देखील काढावा लागतो.

जसाजसा काळ पुढेपुढे जातो तसतसे आधुनिक तंत्रज्ञानामुळे कामं करण्याच्या पद्धतीत फरक पडत जातो. ह्या बदलत्या पद्धतीचे काम हे नवीन पिढी त्यामानाने जास्त लवकर आत्मसात करते. कामामुळे एक प्रकारच समाधान नक्की मिळतं. तसचं अडल्या नाडल्यांना, गरजूंना, सहका-यांना मदत केल्याने एक आगळवेगळं आत्मिक समाधान लाभतं.

सुख, शांती, समाधान ही लहानशी पण खूप महत्वाची गोष्ट मिळविण्याचा साधा, सोप्पा सरळ उपाय म्हणजे आपल्याकडून दुस-याला उत्स्फूर्तपणे केल्या गेलेली मदत.

सहकार क्षेत्रात, ह्या बँकींग क्षेत्रात ह्या गोष्टीचे महत्त्व तर जरा जास्तच कळले, लक्षात आले. मदत ही करायचीच आहे, उपयोगी हे पडायचं आहे तर आपण आईस्क्रीम सारखं न जगता मेणबत्तीसारखं जगावं. वितळून जातांना पण फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्या ला प्रकाश देऊनच जावं.

ही मदत करतांना दोन महत्त्वाच्या गोष्टींचे पालन करावे हे माझं स्वतः चं वैयक्तिक मतं. पहिली गोष्ट म्हणजे  मदत करतांना ही एका हाताची दुसऱ्या हाताला पण कळायला नको. व दुसरी गोष्ट म्हणजे मदत ही करतांना ती खरोखरच गरजूंना मिळायला हवी.म्हणजेच काय तर कुठलीही मदत करतांना निस्वार्थ भावनेने गाजावाजा न करता केल्या गेली तर अश्याप्रकारे केल्या गेलेली मदत ही आपल्याला चिरंतर सुख,समाधान, संतोष देऊन मनाची अवस्था एका उंचीवर जाऊन बसेल हे नक्की.

काल अशीच एक मस्त शार्टफिल्म बघण्यात आली.”शाम होने को है” हे त्या फिल्मचे नाव. दोन भिन्नलिंगी व्यक्तींनी परस्परांना केलेल्या मदतीकडे आपण फक्त आणि वैषयीक आणि दुषीत नजरेनेच बघतो ही खरीच सत्यातील शोकांतिका आहे. परंतु ही आपल्या दुषीत नजर बदलण्याचे, मनातील कलुषित विचार झटकण्याचे काम ही फिल्म करते. ह्या फिल्मची स्टोरी सांगून मी त्यातील मजा, उत्सुकता अजिबातच घालवणार नाही. फक्त इतकच सांगते कुठलिही घटना वाईट नसते, त्या घटनेकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन व आपला स्वतःचा अप्रोच मात्र आपण बदलविला पाहिजे. ह्या फिल्ममधील मुलीची सकारात्मकता आणि तिचे विचार खरचं अनुकरणीय. साध्या गोष्टीतही खूपदा सहजसुंदर आनंद, सुख, समाधान दडलेलं असतं फक्त त्यासाठी हवी पारखी नजर आणि हे सगळं हुडकून काढण्याचा जिज्ञासा. शिवाय भिन्नलिंगी व्यक्तींमध्येही नुसती आणि नुसती वैषयीक भावना नसून त्यामध्ये जिव्हाळा व मदतीची पण भावना असूच शकते हा डोळ्यात अंजन घालणारा दृष्टिकोन.

तेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरुर बघण्या सारखी शार्टफिल्म “शाम होने को है “त्याची लिंक खालील प्रमाणे.

शार्टफिल्म यूट्यूब लिंक  Please click here >>👉   “शाम होने को है”

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

22/08/2022

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ फसवणूक…. ??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ फसवणूक…. ??? ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

एक आजी ….वय वर्षे असावे कदाचित 90 वर्षे…. 

कुत्री मांजरं …. जनावरं असली तरी एकमेकांना ती चाटतात प्रेमाने…. पण काही घरांमध्ये म्हाताऱ्या….  आजारी…. आपल्या लोकांचा हात हातात घेणे “Below Dignity” समजतात….

खुरटलेलं झाड असेल तरी ते आपल्या निष्प्राण फांदीला धरून ठेवतं मरेपर्यंत…. 

डुक्कर गटारात लोळतं असेलही…. परंतु आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन रस्त्याने दिमाखात फिरत असतं… त्याला जणू हेच दाखवायचं असतं डुक्कर असलो, तरी आम्ही आई बापाला सांभाळतो ! 

जनावरं जिथं आपल्या आई बापाला सांभाळून प्रेम करतात….  तिथं माणसाचा जन्म मिळालेली काही मंडळी आपल्या आई बापाला विसरून जातात….

अशीच ही एका सुखवस्तू घरातली आजी…. 

पायताण जुनं किंवा खराब झालं तर फेकून देतात….  तिच्यापासून आपल्याला काहीच फायदा नसतो….

अशीच मुलाबाळांनी फायदा असेपर्यंत वापरून…. जीर्ण झालेली एक आजी उकिरड्यावर फेकून दिली…. पायताण समजून….! 

रस्त्यावर ही आजी मला भेटली तेव्हा म्हणाली, “ मला काहीच दिसत नाही रे बाबा….”

तिच्या डोळ्यावर चष्मा होता…. मी तो चष्मा हातात घेऊन  नीट पाहिला, त्याला दोन्ही काचा नव्हत्या….  

ती फक्त फ्रेम घालत होती…. 

मी तिला म्हणालो, “ म्हातारे चष्म्याला काचच नाही, दिसंल कसं तुला ? “

ती हसत म्हणाली, ‘आस्सा होय मला वाटलं… माझे डोळे कामातनं  गेलेत … आत्ता कळलं माझे डोळे चांगले आहेत….चष्मा खराब झालाय… “ 

वाईटातून ही चांगलं शोधणारी ही आजी…. 

मी म्हणालो, “ चल डोळे तपासून चष्मा करून देतो…”

ती म्हणाली,  “नको …. चष्मा दिलास तरी आता कोणाला बघू बाबा  …? “

तरीही हट्टाने मी तिला मोटरसायकलवर बसवलं…. मोटर सायकल वर लहान मुलीला “पप्पा” जसा कमरेभोवती विळखा घालून बसायला सांगतो,  त्याप्रमाणे मी तिला माझ्या कमरेला विळखा घालून मोटर सायकलवर बसायला सांगितलं…. फार मोठ्या मुश्किलीने ती बसली…. 

डोळे तपासून आलो…. चष्मा करायला टाकला….!

चष्मा तयार झाल्यानंतर मी तो तिच्या डोळ्यावर अडकवला….  

चष्मा घालून तिने इकडे तिकडे टकामका पाहिलं…. 

तिला दिसायला लागलं होतं….  ती हरखली…. 

तिने बोचकयातून एक पिशवी काढली…. त्या पिशवीतून तिने बरीचशी चिल्लर काढली…. 

मला तिने पैसे मोजायला सांगितले. मी सगळी चिल्लर मोजली. एकूण रुपये 192 होते…. 

मला काही कळेना…. मी शून्य नजरेने तिच्याकडे पहात विचारलं….. “ हे काय ? “

ती म्हणाली,  “ मागल्या महिन्यात नातवाचा वाढदिवस होता,  त्याला काहीतरी घ्यायचं म्हणून पैसे साठवत होते… किती पैसे साठले ते मला माहित नाही…. तू मोज… आता नातू तर येणार नाही….  पण हे सगळे पैसे तू घे..”

मी म्हणालो,  “अगं आज ना उद्या येईल ना नातू तुझा… मला नको देऊस हे पैसे…! “

डोळ्याला पदर लावून ती म्हणाली, “ हो मी पण हाच विचार करते आहे गेल्या दहा वर्षापासून ….. येईल माझा नातू कधीतरी…. जो दहा वर्ष आला नाही तो आता इथून पुढे काय येणार ?”– ती डोळ्याला पदर लावून रडत म्हणाली….

“आता तूच माझा पोरगा आणि नातू आहेस आता हे सगळे पैसे तू घेऊन जा….” 

हे पैसे ती गेले चार महिने साठवीत होती…. नातू येईल या आशेवर….. पण….. नातू आलाच नाही…

यानंतर मी माझ्याकडच्या पाचशेच्या दोन नोटा काढल्या आणि आजीच्या हातावर टेकवत म्हणालो, “ आयला म्हातारे, तुला सांगायलाच विसरलो बघ. पण तुझा नातू मला मागच्या महिन्यात भेटून गेला आणि म्हणाला….” माझ्या आजीला हे एक हजार रुपये द्या…. मला तिची खूप आठवण येते…. पण मी तिला भेटू शकत नाही…. मला ती खूप आवडते आणि मला तिची खूप आठवण येते हा निरोप तिला नक्की द्या …..”

आजीने या पाचशेच्या दोन्ही नोटा घेतल्या आणि चिल्लर सुद्धा…. आणि कपाळाला लावून ती रडायला लागली….. मी म्हणालो,  “ आता रडतेस कशाला म्हातारे ? नातवाने तुला गिफ्ट दिलंय ना ? आता तरी तू आनंदी रहा की…. पुढे कधीतरी येऊन भेटणारच आहे असं मला म्हणाला तो…. “ 

आजीने रडतच हात जोडले आणि मला खूण करून जवळ बोलावले…. 

आणि कानात म्हणाली, “ सगळ्या जगाने फसवलं मला….. आता तू सुद्धा फसवलंस….माझा नातू मरून दहा वर्षे झाली आहेत डाक्टर … !” 

अंगावर आलेले ते शहारे मी अजूनही घेऊन फिरतो आहे अश्वत्थाम्यासारखे….. !!!

(यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी माझा एके ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार झाला…. सर्व वातावरण प्रसन्न आणि भारावलेले होते…. पण माझ्या डोक्यातून सकाळचा प्रसंग जात नव्हता….. 

माझं भाषण आटोपून मी माझ्या खुर्चीत बसलो आणि मला मिळालेल्या श्रीफळाकडे सहज पाहिलं, मला तोही हिरमुसल्या सारखा वाटला…! निर्जीव गोष्टींना भावना असतात मग सजीवांना का असू नयेत… ??? )

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पोत नात्यांचा… ☆ सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ पोत नात्यांचा… ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

आई ही कॉटनच्या साडीसारखी असते. शेवटपर्यंत तिच्या स्पर्शातून फक्त मायाच पाझरत राहते.खूप तणावाच्या किंवा आनंदाच्या प्रसंगी आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपण्याच सुखं अनुभवणं हा एक  शब्दातीत अनुभव असतो.

बायको ही सिंथेटिक साडीसारखी असते. आकर्षक रंग आणि टिकाऊपणा हे तिचे गुणधर्म. कोणत्याही प्रसंगात ती टिकून राहते,  निभावून जाऊ शकते.  पण संशयाच्या अगर उपेक्षेच्या ठिणगीने पटकन पेट घेते.

प्रेयसी ही गर्भरेशमी साडीसारखी असते. सर्वांच्याच नशिबात असते असे नाही. तिच्या भावनांचा,मनाचा रेशीमपोत केवळ नजरेलासुद्धा जाणवतो,सुखावतो.  मनाच्या तळाशी जपून ठेवावासा वाटतो.

मुलगी अथवा बहीण ही भरतकाम केलेल्या साडीसारखी असते. सासर आणि माहेरच्या धाग्यांना कुशलतेने एकत्र आणून एक सुंदरसे डिझाईन तयार करते. तिला सगळेच धागे जपावे लागतात, कारण कोणतेही धागे तुटले तरी सगळ्याच भरतकामाची शान जाते. सासरची नाती जपता जपता ती माहेरच्या अंगणात रमत राहते.

मैत्रीण ही एखाद्या उबदार शालीसारखी असते.आपल्या मैत्रीचं पांघरूण घालून तुम्हाला जपत राहते, निष्पाप मनानं, कोणतीही अपेक्षा न ठेवता ! ती आहे ही जाणीवच आधार देणारी असते. न उच्चारलेले शब्द ऐकून जी हवा असलेला भावनिक, मानसिक आधार देऊ शकते ती खरी मैत्रीण !!

संग्राहिका : सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दृष्टी आणि दिशा…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ दृष्टी आणि दिशा ! ☆ श्री अरविंद लिमये ☆

दृष्टी ! समोर दिसणारी दृष्ये नजरेद्वारे आपल्या डोळ्यांनी अवलोकन करण्याची निसर्गदत्त क्षमता म्हणजे दृष्टी ही दृष्टी या शब्दाची सरळ,सोपी व्याख्या.पण ती दृष्टी या शब्दाच्या  असंख्य कंगोऱ्यांना दृश्यमान करण्यास तशी अपुरीच पडणारी. कारण त्या विविध कंगोऱ्यांचा वेध अशा मोजक्या शब्दांद्वारे घेता येणं शक्य नाहीच.

दृश्य, दृग्गोचर, दृष्टीभ्रम, दृष्टीमर्यादा, दृष्टीक्षेप,दर्शक, दृष्टांत,दर्शनी,दर्शनीय,-हस्वदृष्टी दीर्घदृष्टी,तीक्ष्णदृष्टी,जीवनदृष्टी, दूरदृष्टी,काकदृष्टी,पापदृष्टी असे ‘दृष्टी’ या शब्दांच्या अर्थसावल्यांनी आकाराला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द. या प्रत्येक शब्दांची व्याप्तीही तितकीच व्यापक.

हे सगळे शब्द दृष्टी या शब्दाच्या अर्थाशी थेट नातं सांगणारे आहेत. या खेरीज एरवी ऐकताना त्यांचा दृष्टी या शब्दाशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाहीय असं वाटावं असे दृष्टी या शब्दाचे इतरही अनेक अर्थ व्यक्त करणारे शब्दही आहेतच.लक्ष,अवधान, चित्त,दिशा,रोख,कल, मनोवृत्ती, कुवत,विचारबुद्धी,पारख असे दृष्टी या शब्दाचेच विविध अर्थरंग ल्यालेले अर्थपूर्ण शब्द दृष्टी या शब्दाची व्याप्ती समजून घेण्यास प्रवृत्त करणारे आहेत.

सुरुवातीस सांगितलेल्या दृष्टी या शब्दाच्या सरळसोप्या व्याख्येनुसार दृष्टी ही समोरची दृश्ये अवलोकन करण्याची निसर्गदत्त देणगी आहे हे खरे पण ही दृष्टी स्वायत्त नाहीय.ती जे अवलोकन करते म्हणजेच पहाते ते पहाण्याचे फक्त एक माध्यम या भूमिकेतून.सुंदर दृश्यांच्या अवलोकनातून मिळणाऱ्या सुखाला ‘नेत्रसुख’ असं म्हंटलं जात असलं तरी ते खऱ्या अर्थाने दृष्टीला होणारे सुख नाहीच.तो  दृष्टीद्वारे मनाला होणारा सुखाचा स्पर्श असतो.त्याला दृष्टीसुख म्हणतात ते या अर्थाने.दृष्टीला होणारे नाही तर दृष्टीमुळे मनाला होणारे सुख ! मनात उमटणारी ही सुखद भावना नंतर नजरेच्या रूपात आपल्या डोळ्यांत तरळत असते एवढेच.याउलट एखादं दृश्य जर अतिशय दुःखद, भयानक किंवा थरारक असलं तर दुःख,भिती थरार या भावना अशाच आधी मनातच उमटत असतात आणि  नंतर त्याच भावना नजरेतून व्यक्त होतात. म्हणूनच काय,किती,आणि कसं बघायचं हे दूरदृष्टीने ठरवायची सवय आपल्या मनाला आपणच लावायची असते.ती सवय चांगली असेल तर आपल्यासाठी सुखकारक, हितावह आणि ती वाईट किंवा अतिरेकी असेल तर मात्र दु:ख देणारी म्हणून हानिकारकच ठरते.

किती पहायचं याचं अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर मोबाईल,टीव्ही पहाण्याचं घेता येईल.ते पहाणं कामासाठी किंवा ठराविक वेळेकरता असेल तर हितकारकही ठरु शकेल आणि ते पहाण्याची सवय अतिरेकी असेल तर हानिकारक!

काय पहायचं हे आपल्याच स्वाधीन असतं.दैनंदिन वावरातही समोर येणारी प्रत्येक गोष्ट आपण पाहू शकतोच पण पहातोच असे नाही. घराबाहेर पडताना कुठे जायचं याचे नेमके भान आपल्या मनात पक्के असते आणि त्याचेच विचार मनात घोळत असल्याने नजरेसमोरून जाणारी सगळीच माणसे,दुतर्फाची दुकाने, आजूबाजूच्या हालचाली आपल्याला दिसू शकत असल्या तरी आपण त्या पहात नसतोच. आपलं लक्ष्य असतं आपल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचणं हेच आणि त्यामुळे आपलं लक्ष असतं ते रस्त्यातले खाचखळगे, मागून पुढून येणारी वाहने, अशा आपल्यालाअडसर निर्माण करू शकणाऱ्या गोष्टींकडेच फक्त. त्यामुळे काय पहायचं हे आपणच आपल्याही नकळत ठरवलेले असते. आपलं लक्ष विचलित झालं तर मात्र अचानक अपघातही होऊ शकतो. अपघात झालाच तर त्याला तो ज्याच्यामुळे  झाला तोच नाही फक्त तर आपणही जबाबदार ठरतोच. दैनंदिन अनुभवातले हे ‘लक्ष्य’ आणि ‘लक्ष’ आपल्या आयुष्यातल्या वाटचालीतही तितकेच महत्त्वाचे ठरत असतात. नेमके ‘लक्ष्य’ ठरवून लक्षपूर्वक केलेली वाटचाल उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यकच असते.

चित्रपट,नाटक,टीव्ही ही माध्यमे दृष्टीद्वारे केलेल्या अवलोकनातून फक्त करमणूकच करीत नसतात तर विचारांना दिशाही देत असतात.त्यातील अभिरुचीपूर्ण कलाकृती आनंद न् समाधानाबरोबरच विचारांना योग्य दिशाही देतात.विचारांना मिळणारी ही दिशाच आपला दृष्टीकोन व्यापक बनवत असते.

त्या कलाकृती उथळ,बेगडी,सवंग करमणूक करणाऱ्या असतील तर त्यातून मिळणारं समाधान क्षणभंगूर तर असतंच आणि मनातल्या विचारांना वहावत नेणारंही.त्यामुळे निर्माण होणारा संकुचित दृष्टीकोन आयुष्यात आपल्याला भरकटत न्यायला निमित्त मात्र ठरतो.

आयुष्याकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक की नकारात्मक हे आपल्या विचारांची दिशाच ठरवत असते.म्हणूनच दृष्टी आणि दिशा यांचं आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व ओळखता येणं हे महत्त्वाचं !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पारसी – लेखक – विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पारसी ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

पारसी – नुसतं माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून चालत नसतं

🔥 बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं.

🔥 मूळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण. तिथेच *झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. या धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे.

🔥 पण हे पारसी भारतात कसे आले याची एक कथा सांगितली जाते.

असं म्हणतात की ७ व्या शतकात मुस्लीम अरब टोळ्यांनी पर्शियावर आक्रमण केले. धर्मांतर करू लागले. आक्रमकांना तोंड देण्याएवढी ताकद या झोराष्ट्रीयन समाजाकडे नव्हती. यातूनच मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले.

🔥 अशीच एका जहाजात भरून निघालेल्या पारशी कुटुंबांची नौका गुजरातमधल्या “ नवसारी ” इथल्या किनाऱ्यावर येऊन पोहोचली. तिथल्या राजासमोर त्यांना उभं करण्यात आलं. त्यांचा म्हातारा प्रमुख समोर आला. राजाला व त्याला एकमेकांची भाषा येत नव्हती.

🔥 राजाने एक दुधाने काठोकाठ भरलेला पेला मागवला आणि त्या पर्शियन लोकांच्या प्रमुखाला सुचवलं की आमचा देश असा काठोकाठ भरलेला आहे, आता आम्हाला आणखी माणसे नकोत.

🔥 तेव्हा तो पारसी माणूस हसला. त्याने त्या “दुधात थोडासा मध टाकला.” त्याचा अर्थ होता, की आम्ही इथे दुधात मध मिसळल्याप्रमाणे राहू व या देशाची गोडी वाढवू. राजा खूश झाला. त्याने पारसी लोकांना भारतात राहण्याची परवानगी दिली.

🔥 पारसी लोक बुद्धिमान होते, उद्यमी होते. ते गुजरात बाहेर पडले, देशभर पसरले. इथल्या मातीशी एकरूप झाले.

🔥 ब्रिटीश भारतात आले तेव्हा पारसी लोकांनी त्यांची भाषा शिकून घेतली. याचा त्यांना प्रचंड फायदा झाला. ब्रिटिशांच्या “मुंबई” सारख्या “बेटावर” त्यांनी बस्तान बसवलं. आधुनिक शिक्षणपद्धतीचा स्वीकार केला. अनेक पारसी कुटुंबांनी आपलं नाव कमावलं . पैसा कमावला.

🔥 पण पारसी फक्त पैशांच्या मागे लागलेले नव्हते. हजारो वर्षांपूर्वी आपल्यावर झालेला अन्याय, हालअपेष्टा ते विसरले नाहीत. आपल्या इतिहासाची जाणीव ठेवली. त्यामुळे जिथे जातील तिथे आपल्या कमाईतला वाटा समाजाला काहीतरी देण्यासाठी वापरला.

🔥 पुण्यात ब्रिटीशांनी लष्करी छावणी उभारली तेव्हा त्यांच्या मदतीसाठी इंग्रजी भाषा जाणणारे स्थानिक कर्मचारी लागणार होते. त्यांनी उच्चशिक्षित पारसी लोकांना पुण्यात आणलं. कॅम्पच्या बऱ्याच भागात हे पारसी वसले. इथलं  आल्हाददायक हवामान त्यांना मानवलं . त्यामुळे अनेक पारसी कुटुंबांनी आपलं बिऱ्हाड पुण्यात कायमच हलवलं.

🔥 पारसींप्रमाणेच आपला देश सोडून परागंदा झालेले “बगदादचे ज्यू डेव्हिड ससून” हे देखील भारतात आले होते. व्यापारात त्यांनी व त्यांचे पारसी पार्टनर “जमशेदजी जिजीभॉय” यांनी प्रचंड पैसा कमावला होता. ●यातूनच पुण्यात पहिले हॉस्पिटल उभे राहिले. त्याला त्यांचे नाव देण्यात आले, डेव्हिड ससून रुग्णालय.●

🔥 पुण्यात १८६७ साली डेव्हिड ससून रुग्णालय उभे राहिले. हे हॉस्पिटल उभे राहत असताना एक पारसी उद्योजक “बैरामजी जीजीभॉय” हे मुंबईहून पुण्याला आले होते. त्यांनी मुंबईत अनेक शिक्षण संस्था उभारल्या होत्या. जीजीभाय यांनी पुण्यात ससून रुग्णालयाच्या शेजारी एक लहानसं ” वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र “ उभं केलं. त्याला त्यांचंच नाव देण्यात आलं”.

🔥 १८७१ साली स्थापन झालेलं ●हे वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र पुढे जाऊन पुण्याचे सुप्रसिद्ध बी. जे. मेडिकल कॉलेज बनलं.●

🔥 एकोणिसाव्या शतकात पुण्याला प्लेगसारख्या रोगराईने चांगलंच सतवलं होत. इंग्रजांच्या राज्यात पुण्यात आरोग्य सेवा म्हणाव्या तशा सुधारलेल्या नव्हत्या. अजूनही लोक वैद्य, हकीम यांच्यावर अवलंबून असायचे. ससून सोडले तर मोठे रुग्णालय नव्हते.

🔥 याकाळात छोटी छोटी पारसी रुग्णालये उभी राहत होती. असाच एक दवाखाना चालवणाऱ्या “एडलजी कोयाजी” यांनी एक हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. पारसी समाजातील उद्योगपती पुढे आले. “वाडियांनी” त्यांना पैशांची मदत केली. तर “सर कोवासजी जहांगीर” व “लेडी हिराबाई” या दांपत्याने जागा दिली. अत्याधुनिक हॉस्पिटल उभारून दिलं .●या हॉस्पिटलला त्यांच्या मुलाचं- जहांगीरच नाव देण्यात आलं.●

🔥 १९४६ साली त्याकाळच्या सर्वोत्तम सेवा सर्वसामान्य रुग्णांना अत्यल्पदरात  उपलब्ध करून देण्याचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये प्रयत्न करण्यात आला होता. याच जहांगीर हॉस्पिटलमध्ये हृदयरोगावर उपचार करायला ” केकी बैरामजी ” हे सुप्रसिद्ध डॉक्टर होते. त्यांनी अमेरिकेतून हृदयरोगावरील विशेष उपचारांचे प्रशिक्षण घेतलं होतं. पण तिथेच स्थायिक होण्याऐवजी ते आपल्या मूळ गावी पुण्याला परत आले. जहांगीर हॉस्पिटलमध्ये त्यांचे काही कारणांनी एडलजी कोवासजी यांच्याशी मतभेद झाले. यामुळे केकी बैरामजी यांनी स्वतःच फक्त चार खाटांचं  एक हॉस्पिटल सुरु केलं. त्यावेळच्या गव्हर्नरने त्यांना जागा दिली होती. या गव्हर्नरच्या बायकोच्या स्मरणार्थ हॉस्पिटलचं नाव ” रुबी हॉल क्लिनिक “ असे करण्यात आले. एकेकाळी ४ बेडचे हॉस्पिटल पुढे जाऊन ७५० बेडचे पुण्यातले सर्वात अत्याधुनिक रुग्णालय बनले.

अशीच कथा के.ई.एम हॉस्पिटलची.

पुण्याच्या रास्ता पेठेत “सरदार मुदलियार” यांचं एक छोट प्रसूतीगृह होतं. सर्वसामान्य गरीब रुग्णांचा आधार असलेले हे हॉस्पिटल चालवणे सरदार मुदलियार यांना अवघड जात होते. त्यांनी जहांगीर हॉस्पिटलच्या एडलजी कोयाजी यांना एखादा तज्ञ डॉक्टर व चांगला प्रशासक मिळवून देण्याची मागणी केली. त्यावेळी एडलजी यांनी प्रसूतीशास्त्रात उच्च पदवी घेतलेल्या आपल्या वहिनीकडे, म्हणजेच “बानू कोयाजी” यांच्याकडे ही जबाबदारी दिली.

🔥 काही महिन्यांसाठी लक्ष द्यायचं म्हणून डॉ.बानू कोयाजी यांनी ही जबाबदारी उचलली खरी, मात्र केईएम हे त्यांचं पुढच्या आयुष्यभराचं मिशन बनलं. बानू कोयाजी यांनी केईएमचं कार्यक्षेत्र पुण्याच्या ग्रामीण भागापर्यंत वाढवलं . त्यांचं कार्य फक्त वैद्यकीय सेवेपुरतं मर्यादित राहिलं नाही, तर कुटुंब नियोजनासारख्या समाजहिताच्या कार्यक्रमांसारख्या, जनजागृती करणाऱ्या अनेक उपक्रमांची त्याला जोड दिली.

🔥 डॉ. बानू कोयाजी हे पुणेकरांसाठी एक आदराचं आणि आपलेपणाचं नाव बनलं. 

आजही ही जहांगीरपासून ते केईएमपर्यंतची अनेक रुग्णालये पुण्यात तितक्याच कार्यक्षमतेने कार्य करत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या संकटात, मेडिकल इमर्जन्सीमध्ये या हॉस्पिटल्सनी पुण्याला जगवलं आहे.

🔥 “सायरस पूनावाला” यांच्यासारखे उद्योगपती औषध निर्मितीच्या क्षेत्रात जगभरात ओळखले जातात.

🔥 प्रत्येक समाज पिढ्यानपिढ्या आपापल्या परंपरा जपत असतो.  पण पुण्याच्या पारसींनी वैद्यकीय क्षेत्रात छाप पाडून एक वेगळीच ओळख निर्माण केली– एक अजरामर पायंडा पाडला.

टिपः माझाच धर्म श्रेष्ठ म्हणून माणसं जगत नसतात…  प्रत्येक धर्मियाचा आदर हेच भारतीयत्व…  Live & Let Live

🔥 रतन टाटा, आदर पूनावाला, डाॕ.बानू कोयाजी, डाॕ.ग्र्ँट, होमी भाभा अशा अनेक पारसीधर्मियांनी देशासाठी सर्वस्व अर्पण करुन भारताचा नावलौकिक वाढवला आहे.

🔥 आणि कोणत्याही जाती धर्माचा द्वेष हे महान लोक करत नाहीत…बघा जमलं तर विचार करा…….. 

 

संग्राहक : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले  ☆ सुस्वागतम् की स्वागतम् ? – लेखक – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ सुस्वागतम् की स्वागतम् ?  – लेखक – श्री अनिल कुमकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

हा अनुभव बारामतीतच नाट्यसंमेलनाच्या वेळी आला. त्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणून विद्याधर गोखल्यांच्या हस्ते कवी मोरोपंतांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले होते. ठरलेल्या वेळी गोखले, जब्बार पटेल वगैरे प्रतिमा पूजनासाठी सिद्धेश्वर मंदिरामागच्या मोरोपंत स्मारकाच्या जागेत आले. त्या वेळी तो जुना वाडा होता. मोरोपंतांच्या खोलीची नि बाहेरची सजावट करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले होते. मी बाहेर पताका वगैरे लावून रांगोळीने ‘सुस्वागतम्’ असा शब्द लिहून ठेवला होता. 

गोखल्यांनी प्रतिमेचे पूजन केले. नंतर त्यांना ‘चार शब्द’ बोलण्याची विनंती केली गेली. गोखल्यांनी कवी मोरोपंतांबद्दल, स्मारकाच्या व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. पण त्यानंतर मात्र ” रांगोळी छान काढली आहे, पण मराठीच्या शुद्धलेखनाची किमान मोरोपंतांच्या बारामतीत तरी हेळसांड होऊ नये “, असे शब्द ऐकवले.

रांगोळीत “सुस्वागतम्” हा एकच शब्द होता. त्यात काय चुकले हे मला कळेना. शिवाय गोखल्यांनी ‘चार शब्द’ बोलताना जाहीरपणे हे सांगितल्याने काहीशी अपमानकारक स्थिती झाली होती. शेवटी त्यांनीच खुलासा केला. 

“सुस्वागतम् “या शब्दाचे मूळ ‘ग’ या संस्कृतमधील धातूमध्ये आहे. त्याला व्याकरणाच्या नियमानुसार ‘तम्’ हा प्रत्यय लागून गतम् असा शब्द बनतो. गतम् शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आगतम्’ असा शब्द बनतो. त्या आगतम् शब्दाला ‘सु’ हा आणखी एक उपसर्ग लागून तो शब्द ‘स्वागतम्’ असा बनतो. एकदा ‘सु’ हा उपसर्ग लावल्यावर पुन्हा ‘सु’ लावून “सु सु” का करता? ” असे त्यांनी बोलून दाखवले.

त्या वेळी सगळ्यांच्या समोर चूक काढल्यामुळे गोखल्यांचा मनातून राग आला होता. पण पुढे त्यातूनच व्याकरणाचा अभ्यास कमी पडतो आहे, हे जाणवले. माझ्या शुद्धलेखनाबद्दल नि मराठीच्या भाषिक प्रभुत्वाबद्दल कौतुकाचे शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतात. त्याचे श्रेय कै. गोखल्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मराठी, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नि गुजराथी, कानडी, बंगाली, उर्दू वगैरे लिपी शिकाव्या वाटल्या.  नाट्यसंमेलनाच्या वेळच्या या घटनेला आता निदान २५ वर्षे तरी झाली असतील. पण अजूनही व्याकरणाचा अभ्यास करावा वाटतो. हे सगळे गोखल्यांमुळे घडले. 

लेखक – श्री अनिल कुमकर

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

?  विविधा ?

☆ कैलासाहून पृथ्वीवर गणेशआगमन… ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆

आज कैलासावर अगदी लगबग चालली होती! गणपती बाप्पा दहा दिवसासाठी पृथ्वीतलावर जाणार होते. त्यातच आज पार्वती चा उपवास! अगदी कडकडीत! बारा वर्षे रुईची पाने चाटून, वनात राहून, तपश्चर्या करून तिने शंकराला प्राप्त करून घेतले होते.

हिमालयाने, तिच्या पित्याने स्वर्गातील उत्तमोत्तम स्थळं सुचवली असतील तिला!पण हा भोळा शंकर तिच्या मनी वसला होता! त्यासाठी  तिने उग्र तपश्चर्या करून शंकराची मर्जी संपादन करून घेतली होती.कैलासावर त्यांचे सुखाचे राज्य चालले होते.

कार्तिकेयाच्या जन्मानंतर सुखावले. दुसऱ्या बाळाची चाहूल लागताच पार्वती आणखीच आनंदली! या बाळाच्या जन्माच्या खूप आख्यायिका आहेत.कोणी म्हणतं, घामाच्या मळापासून गणराया ची निर्मिती झाली. गणरायाला हत्तीचे तोंड कसे मिळाले याची कथा वेगळीच आहे, एकदा पार्वती माता स्नान गृहात होत्या. त्यांनी गणपतीला दारात बसवून ठेवले होते आणि कुणाला हि आत पाठवू नको,  असे त्याला सांगितले होते. अचानक शंकराची स्वारी आली पण गणपती काही त्यांना आत सोडेना! तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या शंकराने त्याचे मस्तक उडवले. मग पार्वतीने खूप शोक केला, तेव्हा शंकरांनी तिला गणपतीला पुन्हा त्याचे मुख आणून देतो असे आश्वासन दिले! दुसऱ्या दिवशी जो कोणी शंकराच्या दृष्टीस प्रथम पडेल ते मुख आणायचे ठरले. ठरल्याप्रमाणे सकाळी शंकराची स्वारी बाहेर पडली, तेव्हा त्यांना पहिले दर्शन हत्तीचे झाले. मग काय! शंकरांनी त्याचा वध करून ते मुख घरी आणले आणि गणपतीला बसवले. तेव्हापासून गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड मिळाले. आणि छातीवर सोंड ठेवणारा, सुपाएवढे कान असणारा असा गणपती बाप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला. तोच वक्रतुंड महाकाय असा गणपती बाप्पा आपल्याला पूजनीय झाला.

या गणपतीला सर्वांच्यात मिसळून राहण्याची फार हौस! कैलासावर कंटाळा आला म्हणून पृथ्वीवर माणसांबरोबर राहायला येतो तो दहा दिवस! पार्वती माता काळजीने सांगते,’ हे भूक लाडू घेऊन जा. लवकर परत ये. तिथेच रमून राहू नकोस. तुझ्या उंदरासाठी सुद्धा मी खाऊ देते!

त्याची काळजी घे. आधीच हरितालिका व्रत करून पार्वतीदेवी थकलेली असते. तरी ती  गणपतीला लाडू करून देते! कार्तिकेयाला ही गणपती जाणार, म्हणून वाईट वाटत असते. तो गणपतीला म्हणतो, ‘ कसा रे जाणार तू एवढ्याशा उंदरावरून?’ पण गणपती त्याच्या त्या छोट्याशा वाहनावरून जायला सिद्ध झालेला असतो. शंकरबाबा गणपतीला सांगतात, ‘ तिकडे फार मोदक खात बसू नकोस! लवकर परत ये.’ त्या सर्वांना गणपतीला सोडताना फार वाईट वाटत असते.

तर इकडे पृथ्वीवर धूम धडाका चालू असतो, गणरायाच्या आगमनाच्या तयारीचा! आरास, महिरपी, वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग अशी सगळी तयारी चालू असते. स्त्रिया गणपतीच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती पाहुणा येणार असल्यामुळे त्याच्यासाठी खिरापत, मोदका ची तयारी होते.

नवीन वस्त्रे, दागिने यांनी बाजारपेठ सजते.लोक उत्साहाने तयारी करतात. घरातील वातावरण उत्साहाने  भरलेले असते. मुलांना मोदकाचे वेध लागलेले असतात. आरत्या म्हणायच्या असतात. गणपती पाहुणा येणार म्हणून दारात रांगोळी काढली जाते, तोरणं लावली जातात, गणरायासाठी वेगळाच थाट! त्याला कुठे बसवू या, त्याचे स्वागत कसे करूया, या विचारात फुलांच्या, लाईटच्या, कागदांच्या, रंगीबेरंगी माळा व दिवे लावले जातात. तो हा हरितालिकेचा दिवस असतो.

जणू पार्वती आधी पृथ्वी वर येऊन त्याच्या स्वागताची सर्व तयारी झाली आहे ना घरोघरी, ते पाहून जाते! उद्या ती त्याची आई म्हणून मिरवणारे असते, तर दोन दिवसांनी तीच गौरी बनून माहेरवाशीण म्हणून येणार असते. ही दोन्हीही नाती प्रेमाची असतात! दोन्ही नात्यात तिचे हे रूप मनोहर दिसते! तोच उत्साह निसर्गातही दिसून येतो. पावसाच्या सरी वर सरी येत रहातात आणि वातावरणात प्रसन्नता आणतात.

गणरायाचे आगमन होताच सगळीकडे आनंदीआनंद पसरतो.

कैलासा वरून पृथ्वीवर आणि आपल्या घरात! उंदराच्या वहानावरून! उद्या बाप्पा ला मोदकाचे जेवण मिळणार!

आणि रोज आरती प्रसादाने आसमंत जागा रहाणार!

संकटनाशक गणपती सौख्याची, आरोग्यदायी नवी लाट घेऊन येणार आहे, म्हणून गर्जू या,

🙏 गणपती बाप्पा मोरया! 💐

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares