मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अखेरचा प्रवास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ अखेरचा प्रवास… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

अनुजाचा, मायाच्या मुलीचा फोन आला. माया आमची जवळची मैत्रीण. खरे तर आमच्याहून मोठी,

पण झाली खरी जवळची मैत्रीण. अनुजा मायाची मुलगी. काय काम असेल, असा विचार करत होते, तेव्हा अनुजाचा पुन्हा फोन आला—-“ मी भेटायला येऊ का मावशी ? “ आणि अनुजा संध्याकाळी भेटायला आली. 

——माया हल्ली एकटीच रहात असे. तिचा मुलगा आनंद गेली अनेक वर्षे जपानला स्थायिक झाला होता. माया आणि तिचे मिस्टरही अनेकवेळा जपानवाऱ्या करून आले होते. आनंदच्या जपानी बायकोचे आणि जुळ्या मुलींचे फोटोही बघितले होते आम्ही. अनुजाही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर होती. माया कॉलेजमध्ये प्रोफेसर होती .आणि तिचे यजमान एका कंपनीतल्या चांगल्या पोस्टवरून निवृत्त झाले होते. हल्ली खूप महिन्यात माया भेटलीच नव्हती मला. मध्यंतरी अचानकच मायाच्या यजमानांचे हृदयविकाराने निधन झाले, तेव्हा आम्ही सगळ्या भेटून आलो होतो.

माया स्वतःच्या मोठ्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. मायाने आपला छान ग्रुप जमवला होता. कधी ते ट्रीपला, कधी कोणाच्या farmhouse वर जात. एकटी राहणारी माया चांगली खम्बीर होती. तिचे आयुष्य तिने छान बेतले होते. तिच्या मैत्रिणी, कॉलेजचे मित्रमंडळी–अगदी  व्यस्त असे दिनक्रम मायाचा. पैशाची ददात नव्हती, आणि 

हौसही होतीच. कधीतरी आम्हालाही भेटायची माया. पण गेल्या जवळजवळ वर्षभरात भेट झालीच नव्हती तिची.

अनुजाचे काय काम असावे या विचारात मी पडले. अनुजा आली आणि म्हणाली, “ मावशी  वेळ न घालवता, मुद्द्याचेच बोलते. बाबा गेले तेव्हा अतिशय धीराने घेतले आईने. मी, दादा,म्हणालो,आई एकटी राहू नको, आमच्या घरी ये राहायला. पण ती म्हणायची,अरे तुम्ही आहातच की. पण होतंय तितके राहीन की मी. तुम्ही मुले काय रिकामी आहात का. आणि येतेच की मी अधूनमधून.” आम्हीही याला कधीच हरकत घेतली नाही. मी दर आठ्वड्याला चक्कर मारतेच. पण गेल्या वर्षभरात आईमध्ये हळूहळू बदल होताना दिसला मला. मावशी, तिचे लक्षच नसते आम्ही बोलतो त्याच्याकडे.अस्वस्थ हालचाल करते बोटांची. घरही पूर्वीसारखे छान आवरलेलेले नसते. अशी आई कधीही मी बघितलेली नाही ग. ती हल्ली स्वयंपाक तरी नीट करते की नाही, जेवते का नाही ,तेही मला माहित नाही.” 

“अनुजा,तू असे कर. काही दिवस तुझ्या घरी रहायला घेऊन जा, म्हणजे तुला ती चोवीस तास कशी रहाते हे नक्की समजेल. तिने विरोध केला,तरी नेच तिला. मला दर आठवड्याला फोन करून कळवत मात्र जा हं.”

अनुजाने मायाला तिच्या घरी नेले. नातवंडांनी उत्साहाने स्वागत केले आजीचे. त्यांना पूर्वीची आजी हवी होती. 

पण आत्ताच्या आज्जीमध्ये लक्षात येण्याइतका बदल झालेला त्यांनाही जाणवलाच . अनुजाने मायासाठी दिवसभराची बाई ठेवली. नशिबाने त्या बाई खरोखरच चांगल्या मिळाल्या. मायाबरोबर त्या पत्ते खेळत, तिला पुस्तक वाचायला बसवत. मायामध्ये जरा सुधारणा होत असलेली दिसली.औषधेही चालू केलेली होतीच.

मध्यंतरी महिनाभर बाई रजेवर गेल्या. आता मायाला २४ तास कोण कसे देऊ शकणार होते? पुन्हा माया तिच्या कोशात गेली. हळूहळू मायाचे बोलणे कमी झाले. टक लावून नुसती बघत बसायची.

“आई,अग घास घे ना, चावून खा ग.” मायाला  हळूहळू तेही उमजेनासे झाले.दैनंदिन नैसर्गिक विधीवरचा  तिचा ताबा सुटला. अनुजाने अथक प्रयत्न केले. बायकाही ठेवल्या. पण ते अनुभव काही फारसे चांगले आले नाहीत.

मायाचे घर तर केव्हाचेच बंद झाले होते. एकदा अनुजाने  मायाला  त्या  घरी नेले. तिच्या फ्लॅटजवळ आल्यावर माया नुसतीच भिरभिर बघत राहिली. शेजारच्या काकू भेटायला आल्या.“ मायाताई,चला आमच्याकडे कॉफी प्यायला.” काकूंनी प्रेमाने हात धरला. मायाने तो हिसडून टाकला,आणि ‘या कोण’ असे मुलीला विचारले.

‘ घरी– घरी ‘असे पुटपटू लागली. काकू हे बघून घाबरूनच गेल्या. हताश होऊन अनुजा मायाला घरी घेऊन आली.

 आता अनुजालाही आईला  सांभाळणे अतिशय अवघड होऊन बसले होते. 

अशी चार वर्षे गेली. मध्यंतरी आनंद येऊन भेटून गेला.“अनुजा,काहीही झाले तरी आईला वृद्धाश्रमात ठेवायचे नाही हं.” असे बजावून गेला. अनुजाला भयंकर रागही आला,आणि दुःख तर झालेच.’ काय हा मुलगा. आज इतकी वर्षे मी एकटी आईला सांभाळते आहे,कधी चौकशी केली का? किती ,कोणत्या अवघड परिस्थितीतून मी जातेय 

याची ‘– माझा नवरा देव माणूस आहे,तोही आईचे सगळे करतो. मला फक्त हा उपदेश करून आनंद मात्र निघून गेला. वावा.” अनुजाचा तोल सुटला होता . ती आनंदला म्हणाली होती ,” हो का? मग जा घेऊन जपानला. करते का बघू तुझी ती बायको. हे बघ आनंद, मला हौस नाही आईला वृद्धाश्रमात ठेवायची. पण तो निर्णय मी घेईन.पुन्हा मला असले सल्ले देणार असलास तर तू न आलेलाच बरा .” 

एक दिवस माया बाथरूममध्ये पाय घसरून पडली. खुब्याचे हाड मोडले आणि तिच्या यातनांना पारावार उरला नाही. हाडे इतकी ठिसूळ झाली होती की डॉक्टर ऑपरेशन करायला तयार होईनात. अनुजाने एका चांगल्या नर्सिंग होममध्ये मायाला हलवले. दिवस दिवस माया नुसती पडून राहू लागली.

आम्ही मैत्रिणी तिला भेटायला गेलो.“ माया,लवकर बरी हो ग. पुढची भिशी तुझ्याकडे करायचीय ना ?”

मायाच्या डोळ्यातून नुसतीच धार लागली. तिला बोलता तर येत नव्हतेच. खूप वाईट वाटले आम्हाला.

आणि आमच्याही भविष्याच्या सावल्या भेडसावू लागल्या. सगळ्यांचीच मुले दूरदेशी. “आज निदान अनुजातरी आई जवळ आहे, मला कोण आहे ग?” निर्मला हताशपणे म्हणाली. निर्मलाला दुर्दैवाने मुलं झालीच नाहीत.

मायाचा प्रवास झपाट्याने उतरणीकडे सुरू झाला. तिला फीडिंग ट्यूबने अन्न भरवावे लागू लागले. तिच्याकडे जाऊन आले, की खरोखरच वाईट वाटे. एका उमद्या,आनंदी जीवाची ही परवड बघवेनाशी झाली.

आणि एक दिवस अनुजाचा फोन आला, “ मावशी,आई गेली. तुझ्या ओळखीच्या नेत्रपेढीचा फोन नंबर दे. आईचे नेत्रदान करणार आहोत.”

आम्ही सगळ्या तिचे अखेरचे दर्शन घ्यायला गेलो. ‘ सुटली बिचारी,’ असेही वाटले.

—–पण असे आयुष्य तिच्या काय, कोणाच्याच वाट्याला येऊ नये असे वाटून आमचा जीव नुसता कासावीस झाला.

अनुजाच्या पाठीवर सांत्वनाचा हात ठेवून, काहीच न बोलता, आम्ही आपापल्या घरी परतलो —–

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ द्रौपदी मुर्मू ☆ प्रस्तुती – प्रा. मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ द्रौपदी मुर्मू ☆ प्रस्तुती – प्रा. मीनल केळकर ☆ 

ही कहाणी आहे एका शिक्षिकेची. ही कहाणी आहे एका झुंजार आदिवासी महिलेची. ही कहाणी आहे एका निस्वार्थी समाजसेविकेची . ही कहाणी आहे एका अध्यात्मिक प्रवासाची, ही कहाणी आहे एका जिद्दी समर्पित जीवनाची –ही कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची . 

कालपर्यंत फारसे कोणाला माहीत नसलेले द्रौपदी मुर्मू यांचे नाव आज खूपच चर्चेत आहे.राष्ट्रपतीपदाची त्यांची उमेदवारी घोषित होईपर्यंत तसे त्यांचे नाव अज्ञात होते. एका आदिवासी,गरीब,सामान्य कुटुंबातील महिलेला राष्ट्रपतीपदासारख्या सर्वोच्च पदाची उमेदवारी मिळते, हीच मुळी आपल्या शक्तीशाली लोकशाहीची थक्क करणारी सुंदर साक्ष आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा जीवनप्रवास थक्क  करणारा आहे. विशेषतः सर्वच स्त्रियांना द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भावूक करणारा व प्रेरणादायीही आहे. घराणेशाही,अमर्याद संपत्ती आणि खानदानाचा दर्प नसलेल्या सामान्य माणसाला अभिमान वाटावा अशीच कहाणी आहे द्रौपदी मुर्मू यांची .

ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यात एका अत्यंत सामान्य आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म २० जून १९५८ रोजी झाला.१९७९ साली त्या पदवीधर झाल्या.ओरिसा सरकारच्या सिंचन खात्यात कारकून झाल्या. पुढे त्या शिक्षक झाल्या.नगरसेवक झाल्या.आमदार झाल्या. मंत्री झाल्या. राज्यपाल झाल्या.आणि आता आहेत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार. घराणेशाही नाही, संपत्ती नाही, वारसा नाही. सारेच कसे थक्क करणारे आहे. त्यांच्या पतीचे नाव शामचरण मुर्मू आहे. 

आजही त्या मयूरभंज येथे एका साध्या दुमजली घरात राहतात.६४ वर्षाच्या द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. दलित,आदिवासी, लहान मुले यांच्या उत्थापनासाठी झटणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांची  वैयक्तिक जीवनात अनेक संकटामुळे अक्षरशः होरपळ झाली. कोणीही कोलमडले असते. त्याही कोलमडल्या, पण पुन्हा उभ्या राहिल्या. ताठ उभ्या राहिल्या.त्यांना दोन मुले व एक मुलगी. २००९ साली २५ वर्षाचा मुलगा मरण पावला. हा धक्का त्यांना सहन झाला नाही. त्या डिप्रेशन मध्ये गेल्या.जीवनातील सारे स्वारस्य निघून गेले. खचून गेल्या. याचवेळी त्या प्रजापिता ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक संस्थानात गेल्या.त्या अध्यात्माला शरण गेल्या.त्या पुन्हा उभ्या राहतात तोच दुसरा मुलगा २०१३ साली रस्ता अपघातात गेला.त्याच महिन्यात आई गेली, कर्तबगार भाऊही गेला. चार वर्षात जवळची सगळी माणसे हरवली.आणि २०१४ साली पती शामचरण मुर्मूही गेले.त्या एकाकी झाल्या. नियतीने त्यांच्यावर घोर अन्याय केला.

परंतू अध्यात्म त्यांच्या सोबत होते. त्यांनी दलित,आदिवासी यांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले. स्वतःचे दुःख जगाच्या दुःखात मिसळून टाकले. पुन्हा ताठपणे उभ्या राहिल्या. २०१५ साली झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पाच वर्षे काम केले. लवकरच विनम्र स्वभावाच्या कठोर प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक झाला. २०२१ पर्यंत त्या राज्यपाल होत्या.

२० जून रोजी त्यांचा वाढदिवस होता.आणि २१ जूनला भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा झाली. त्यांना हा आनंदाचा धक्का होता आणि देशालाही. त्या नेहमीप्रमाणे शिवमंदीरात गेल्या. स्वतः झाडू घेऊन मंदीर स्वच्छ केले. मंदीरातील कर्मचाऱ्याबरोबर सुखसंवाद केला. मयूरभंजमध्ये जल्लोष झाला. द्रौपदी मुर्मू या एका लहानशा घरातून ३५० एकर परिसर, १९० एकर बगीचा व ७५० कर्मचारी असलेल्या प्रशस्त राष्ट्रपतीभवनात लवकरच जातील. एक सामान्य शिक्षिका भारताची राष्ट्रपती होईल. हे भारतीय लोकशाहीचे केवढे नितांत सुंदर व विलोभनीय रुप आहे बरे !

संग्राहिका : प्रा. मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ सासू, सून आणि DP ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 सासू, सून आणि DP ! 😂💃श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“सुनबाई, ऐकत्येस का ?”

“काय आई ?”

“अगं बाबू उठला का गं ?”

“आई बाबू म्हणजे….”

“किती वर्ष झाली गं तुमच्या प्रेमविवाहाला सुनबाई ?”

“इश्श, तुम्हांला जसं काही माहीतच नाही !”

“मला माहित आहे गं, पण तुमच्या या प्रेमविवाहाआधी किती वर्ष फिरत होतात ते माहित नाही नां, म्हणून विचारलं !”

“अहो आई, या डिसेंबरला चौदा वर्ष पुरी होतील !”

“काय गं सुनबाई, तुमचा लग्नाआधी  आम्हांला अज्ञानात ठेवून फिरायचा तुमचा अज्ञातवासातील प्रेमाचा एक वर्षाचा काळ धरून, का…..?”

“नाही आई, ते वर्ष धरलं तर मग पंधरा होतील !”

“सुनबाई, जरी तुमचा एक वर्षाचा अज्ञातवास लग्ना आधीच संपला असला, तरी तुमची सगळी चौदा वर्षाची शिक्षा भोगून झाल्ये आणि तरी तुला बाबू कोण माहित नाही ?”

“अय्या, म्हणजे तुम्ही विलासला बाबू म्हणता आई ?”

“लवकर कळलं माझ्या बबडीला !”

“आता ही बबडी कोण आणलीत मधेच तुम्हीं आई ? विलासची कोणी माझ्या आधी दुसरी मैत्रीण होती का ?”

“कठीण आहे ! अगं मी माझ्या बबडीला म्हटलं नां ? मग ! ते सगळं सोड आणि मला सांग बाबू उठला का नाही अजून, नऊ वाजून गेले !”

“झोपू दे की जरा त्याला आई, आज रविवार तर आहे !”

“अच्छा, आज रविवार म्हणजे सुट्टी म्हणून झोपू दे म्हणतेस, तर मग आज जेवणाला पण सुट्टी वाटतं ?”

“मला सांगा आई, आत्ता पर्यंत किती रविवार मी तुम्हांला उपाशी ठेवलंय हॊ ?”

“तुझी काय बिशाद मला उपाशी ठेवायची !”

“नाही नां ? मग असं बोलवत तरी कसं तुम्हाला आई ?”

“अगं, एवढ्या उशिरा उठायचं मग अकरा साडेअकराला नाष्टा करायचा आणि दोन अडीचला जेवायचं, हे बरं दिसतं का ?”

“अहो आई, पण रोज तुम्हांला एक वाजता जेवायला मिळतंय नां, मग एक दिवस उशीर झाला तर कुठे बिघडत म्हणते मी ?”

“माझं नाही बिघडत गं, तुझा स्वयंपाक बिघडतो त्याच काय ?”

“स्वयंपाक बिघडतो ? म्हणजे काय आई ?”

“अगं काय आहे, आधीच उशीर झालेला असतो जेवायला, मग तू घाईघाईत स्वयंपाक करतेस आणि मग कधी भाजी तिखट तर कधी आमटी खारट होते, खरं नां ?”

“अहो एखाद्या रविवारी झाली असेल चूक, म्हणून काय लगेच नांव ठेवायला नकोयत माझ्या स्वयपाकाला !”

“मग लग्नाच्या बैठकीत, ‘स्वयंपाक येतो का’ असं मी जेंव्हा तुला विचारलं तेंव्हा अगदी तोंड वर करून कशाला म्हणायचं ‘स्वयंपाकाची भयंकर आवड !”

“बापरे ! इतक्या वर्षांनी हे बरं तुमच्या लक्षात आहे ! आणि हॊ, आहेच मला स्वयंपाकाची भयंकर आवड !”

“बरोबर आहे सुनबाई, पण तेंव्हा बोलतांना तुझी वाक्य रचना थोडी चुकली असावी असं मला आत्ता वाटतंय खरं !”

“कशी ?”

“अगं तुला ‘भयंकर स्वयंपाकाची आवड’ असं म्हणायचं असेल तेव्हा, खरं नां ?”

“अजिबात नाही, तुमचीच ऐकण्यात काही चूक झाली असेल आई !”

“असेल असेल, पण दुसरी एक गोष्ट नक्कीच तू आमच्या पासून इतकी वर्ष लपवलीस, त्याच काय ?”

“कुठली गोष्ट आई ?”

“तुझ्या अंगात देवी येते ते !”

“का sss य, काय म्हणालात तुम्ही? माझ्या अंगात देवी येते ?”

“हॊ ssss य ! आणि तू हे आमच्या पासून इतकी वर्ष लपवून ठेवलस, हे सत्य आहे ! बाबुला तरी माहित आहे की नाही कोण जाणे !”

“आई पुरे झालं आता ! ‘भयंकर जेवणापर्यंत’ ठीक होतं, पण आता हे अति होतंय ! कुणी सांगितलं हॊ तुम्हाला माझ्या अंगात…..”

“अगं कोणी सांगायला कशाला हवंय, मी मगाशीच तुझा DP बघितला आपल्या व्हाट्स अपच्या ‘फॅमिली कट्ट्यावर !”

“DP ? कसला DP ?”

“अगं केस मोकळे सोडून काढलेला तुझा DP आज तू टाकलायस नां, तो पाहून माझी खात्रीच पटली, नक्कीच तुझ्या अंगात…..”

“धन्य झाली तुमची आई ! अहो आज मी न्हायल्यावर लगेच सेल्फी काढून तो DP म्हणून ठेवलाय ! कळलं ?”

“कर्म माझं ! अगं मला वाटलं तुझ्या अंगात बिंगात येत की काय !”

“काहीतरीच असतं तुमच आई ! बरं आता जाऊ का नाष्टा बनवायला ?”

“जाशील गं, पण त्याच्या आधी माझं एक छोटंसं काम कर नां !”

“कसलं कामं आई ?”

“मला पण आपल्या ग्रुपवरचा माझा DP बदलायचा आहे ! तेवढा माझा फोटो काढ आणि आपल्या फॅमिली कट्ट्यावर DP म्हणून टाक आणि मग जा नाष्टा करायला !”

“ठीक आहे आहे आई ! या इथे खुर्चीत बसा आरामात, म्हणजे मी…..”

“अगं इथं नको, किचन मध्ये स्वयंपाक करताना काढ !”

“काय ? अहो मी लग्न होऊन या घरी आले तेव्हापासून तुम्ही किचन मधे कधी पाय तरी ठेवला आहे का ?”

“अगं पण DP मधे जे दिसत ते थोडंच  खरं असतं ?”

“म्हणजे ?”

“अगं सुनबाई तुझ्या कुठे अंगात येत, पण मला तसं वाटलं की नाही तुझा DP बघून ? तसंच मी स्वयंपाक करायची नुसती ऍक्शन केली म्हणून कुठे बिघडलं ?”

“नको आई, त्यापेक्षा माझ्या डोक्यात एक भन्नाट पोज आली आहे तुमच्या DP साठी !”

“कुठली गं पोज ?”

“तुमचं जेवणाचं ताट, मी केलेल्या वेगवेगळ्या चमचमित पदार्थांनी भरलं आहे आणि तुम्हीं अगदी समाधानाने त्यावर आडवा हात मारताय ! ही पोज कशी काय वाटते ?”

“चालायला लाग नाष्टा करायला लगेच !”

© प्रमोद वामन वर्तक

१५-०७-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ ॥ मार्गदर्शक चिंतन॥ -॥ कर्म की महत्ता॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆

॥ मार्गदर्शक चिंतन

☆ ॥ कर्म की महत्ता॥ – प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’☆

मानव जीवन का कर्म से बड़ा गहरा नाता है। बिना कर्म किये जीवन चल ही नहीं सकता। जन्म से मरण पर्यन्त मनुष्य सदा कुछ न कुछ तो करता ही रहता है। कर्म ही जीवन को गति देते हैं। कर्म ही उसके भविष्य का निर्माण करते हैं। रामचरित मानस में संत तुलसीदास जी ने लिखा है-

कर्म प्रधान विश्व करि राखा, जो जस करिय सो तस फल चाखा॥

विश्व में कर्म की ही प्रधानता है। जो जैसा करता है उसे वैसा फल मिलता है। जैसा लोग बोते हैं वैसा ही पाते हैं। इस दृष्टि से तो कर्म का सिद्धान्त बड़ा सीधा और सहज है। भले का परिणाम भला और बुरे का परिणाम बुरा। परन्तु संसार में हमेशा ऐसा ही घटता हमेशा नहीं दिखता। कभी तो होम करते भी हाथ जलते देखा जाता है। अच्छा करने चलो परिणाम उलटा निकलते दिखता है। और इसके विपरीत कभी सारे दुर्गुणों से युक्त दुष्कर्म करने वाले सब प्रकार के सुखी, यश, मान, पाते हुए उन्नति करते दिखते हैं। ऐसा क्यों होता है कहना बड़ा कठिन है। परन्तु धर्म-निष्ठ अध्यात्मज्ञानी इसका उत्तर देते हैं- स्मृति न होने से इस कथन की प्राभाविकता का सत्यापन तो नहीं किया जा सकता, किन्तु हर कर्म उचित समय पर विभिन्न वृक्षों की भाँति फल देते हैं- इस सिद्धान्त पर विश्वास करके अनिवार्यत: प्रारब्ध का विधान मानकर संतोष करना पड़ता है। यद्यपि कर्मांें के विपरीत फल देखकर वास्तविक जीवन मेें मन विचलित अवश्य हो जाता है। फिर जीवन में व्यक्ति क्या करे ? क्या न करे ? निश्चित रूप से जो त्रिकाल सत्य हो ऐसा कहना बड़ा कठिन और उलझन पूर्ण है। एक ही कर्म देश काल और परिस्थिति वश अच्छा या बुरा कहा जाता है। एक व्यक्ति यदि किसी अन्य को जान से मार डालता है तो कानून के अनुसार उसे फाँसी की सजा दी जाती है किन्तु भिन्न परिस्थितियों में यदि एक व्यक्ति जो दस लोगों की जान ले लेता है तो उसे परमवीरचक्र का सम्मान मिलता है और इतिहास में वह अमर हो जाता है। सबके आदर का पात्र बन जाता है।

समाज में व्यक्ति अपने कर्माे से ही अपनी छवि निखारता है। कर्माे से ही लोग भले-बुरे, सज्जन-दुष्ट, उदार-कठोर, दयालु-निर्दय या विश्वस्त और धोखेबाज कहे और पहचाने जाते हैं। 

मोटे तौर पर तो यही कहा जा सकता है कि समाज की मान्यता के अनुसार अच्छे कर्म किए जाने चाहिए और बुरों का त्याग किया जाना चाहिए। किन्तु क्या नैतिक है और क्या अनैतिक यह भी तो समय की कसौटी पर हमेशा एक सा नहीं होता इसीलिए गीता कहती है-”कर्मण: गहना गति:’‘ अर्थात्ï करमन की गति न्यारी। यही स्थिति अर्जुन की तब हुई थी जब रणक्षेत्र में वह अपने नाते रिश्तेदारों से घिरा हुआ, उन्हीं से युद्ध करने के लिए खड़ा था। समस्या थी, एक छोटे से राज्य के लिए वह युद्ध कैसे करे? किन्हें मारे, किन्हें न मारे ? क्या उसे पाप नहीं लगेगा। तब ऐसी द्विविधा की स्थिति में श्री कृष्ण ने अर्जुन को समझाया था-”कर्मणि एव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन्ï’‘ अर्थात्ï कर्ता का अधिकार केवल कर्म पर है फल पर नहीं अत: हे अर्जुन तू केवल कर्म कर। वह कर्म जो तेरा धर्माेचित कत्र्तव्य है। ”मा कर्मफल हेतुर्भूमासङ्गïोस्तु कर्मणि।’‘ केवल कर्म कर, कर्म के फल अर्थात्ï परिणाम पर मन को आसक्त मत कर। फल का निर्धारण तो स्वत: कर्म से ही होता है, फल की चिंता किये बिना तू केवल अपना कत्र्तव्य करता चल। गीता में ही आगे कहा गया है-”स्वधर्मे निधनं श्रेय: परर्धाे भयावह:।’‘ अपने धर्म अर्थात्ï कत्र्तव्यों का निर्वाह किया जाना ही सदा श्रेयस्कर है। और धर्म की सरल व्याख्या तुलसी दास ने जो की है वह है-

परहित सरित धरम नहिं भाई, पर पीड़ा सम नहिं अधमाई।

अत: स्पष्ट है कि जो कर्म बहुजन के लिए हितकर हो वह किया जाना चाहिए ऐसा न किया जाय जो दूसरों के लिए अहित कारी हो।

© प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’

 ए २३३, ओल्ड मीनाल रेसीडेंसी, भोपाल, म.प्र. भारत पिन ४६२०२३ मो ७०००३७५७९८ [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडल (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’/श्री जय प्रकाश पाण्डेय ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरु पौर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती!! ☆ सुश्री नीला ताम्हनकर ☆

? विविधा ?

☆ गुरु पौर्णिमे संदर्भात थोडी महत्वपूर्ण माहिती !! ☆ सुश्री नीला ताम्हनकर ☆

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा हा मंगलदिन आहे. ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

गुरूंचे अनेक प्रकार आहेत. १) पृच्छक गुरु, २) चंदन गुरु, ३) अनुग्रह गुरु, ४) कर्म गुरु, ५) विचार गुरु, ६) वात्सल्य गुरु, ७) स्पर्श गुरु.

दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस !

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः॥

“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण । अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. एक सदगुण अंगीकारासाठी गुरू, दोन अवगुण त्यागासाठी गुरु आणि तीन ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.

‘गुरुचरित्र’ या ग्रंथात श्री गुरुंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरुंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्व सांगितले आहे.

या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे साधक – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात.. परंतु खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वच नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही.

कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप. तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश. हे त्याचे त्रिगुणात्मक रूप आहे. या जगाचे पलीकडे जे परब्रह्म तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंच लागतो.  

कैलास पर्वतावर भगवान शंकराने पार्वतीमातेसह पारमार्थिक संवादात जगाच्या उद्धाराविषयी बोलताना गुरुंचे महत्व सांगितले आहे.. त्यास गुरुगिता असे म्हणतात..

गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व गुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात.

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी.

जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे. त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे.

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥

सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.

मित्रांनो साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये. तसेच आपल्याही गुरुंची निंदा कोणी केलेली ऐकू नये. तिथून निघून जावे. गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे.

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे !

संग्रहिका – सुश्री नीला ताम्हनकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

??

☆ प्रिय सावित्रीबाई… श्री गजानन धोंगडे☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

नमस्कार ! सकाळीच रेडिओवर ऐकलं की आज तुझी पुण्यतिथी. 

बायकोला सांगितलं, “अगं, आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी.”

मग स्वतःलाच विचारलं, “ सावित्रीबाईंची पुण्यतिथी ? कसं शक्य आहे ? अगं, माझ्या गावातली, शहरातली, 

देशातली प्रत्येक मुलगी जेव्हा शिक्षण घेऊन एखाद्या मोठ्या पदावर जाते, शिक्षणाच्या भरोशावर एखादा सन्मान प्राप्त करते, तेव्हा – तेव्हा तूच तर जन्माला आलेली असतेस. यंदा माझी पुतणी पदवी घेईल, म्हणजे यंदा तू माझ्या घरातही जन्माला येणार आहेस.  सुरुवातीला प्रश्न पडला की तुला काय म्हणावं ? बाई म्हणावं की आई म्हणावं ? आमच्याकडे गावात मोठ्या बहिणीला बाई म्हणतात. मग विचार केला, माझी आई शिकलेली, थोरली बहीण शिकलेली, मावशी शिकलेली, माझी पुतणी शिकतेय –म्हणजे तू तर प्रत्येकच रूपात माझ्याभोवती आहेस . 

सरकारचं घोषवाक्य आहे ‘ मुलगी शिकली, प्रगती झाली !’– 

मला वाटतं त्यात आणखी एक जोडावं ‘सावित्रीबाई जन्माला आली ‘.

आजही वाटतं तुला भारतरत्न मिळायला हवं होतं. मग लक्षात येतं की या देशातले अनेक भारतरत्न जे आहेत ते तुझ्या शिक्षण यज्ञामुळे झालेले आहेत. जेव्हा कुठल्या महिलेला भारतरत्न मिळत असेल तेव्हा तू ज्योतिबांना सांगत असशील ,  ‘अहो ऐकलं का आपल्या लेकीला भारतरत्न मिळालं ‘. 

तुझ्याबद्दलचा मुळातच असलेला आदर सहस्त्र पटींनी वाढतो तो तुझ्या स्वभावामुळे. 

दगड, शेण, असभ्य शब्दांचा मार सहन करीत तू तुझं काम करीत राहिलीस, म्हणजे आतून तू किती कणखर असली पाहिजेस–ते जिब्राल्टर रॉक म्हणतात तशी. तसूभरही ढळली नाही . आणि दुसरीकडे अत्यंत नम्र आणि प्रेमळ. 

कधी – कधी वाटतं टाईम मशिनने काळाच्या मागे जावं. लहान बनून तुमच्या घरात यावं.  ज्योतीबांच्या कोटाच्या खिशातल्या गोळ्या त्यांच्याच मांडीवर बसून खाव्यात. तुझ्याकडून लाड पुरवून घ्यावेत. 

मला एक प्रश्न नेहमी पडतो–’आपण करतो आहोत ते काम क्रांतिकारी आहे याची तुला जराशीही कल्पना नव्हती का ? कारण नखभर ही एटीट्यूड नव्हता तुझ्यामध्ये– नखभर सोडा, अणू – रेणू इतका सूक्ष्म पण नाही . 

हे कसं साध्य करायचीस ? नाहीतर आम्ही बघ– वितभर करतो आणि हात भर, त्याचाही  हल्ला, कल्ला करत ती दुखणी सांगत, ते यश सांगत गावभर हिंडतो. 

कदाचित म्हणूनच तू त्यावेळच्या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी म्हणून जी अक्षरं पाटीवर गिरवलीत, ती काळाच्या पाठीवर गिरवली गेलीत. 

आणि या भारतात जेव्हा – जेव्हा कोणी मुलगी, स्त्री शिक्षित होत राहील,  तेव्हा- तेव्हा ती अक्षरं गडद होत राहतील 

— पुन्हा – पुन्हा सावित्री जन्माला येत राहील. 

लेखक – गजानन घोंगडे

9823087650

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दत्त म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ दत्त म्हणजे काय ? ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

🙏🏻 दत्त म्हणजे 

अद्वैत, अतर्क्य, अद्भूत, अनाकलनीय, अनादी, अथर्व, अनंत, अंतर्यामी, अवधूत, अर्चना आनंतयोगी

 

🙏🏻 दत्त म्हणजे

आई, आदर, आदेश, आशिर्वाद, आत्मा, आशा, आदित्य, आदिनाथ, आनंद, अल्लख

 

🙏🏻 दत्त म्हणजे

इशत्व, इप्सित, ऊर्जा, उपासना, उन्नती, उत्पत्ती, ऐश्वर्य, ऐक्य, एकाधिकार

 

🙏🏻 दत्त म्हणजे 

ओमकार, औदुंबर, औक्षण, अंतरात्मा, अंतर्मन, अंतरंग, अथर्ववेद,  आठरापुरण

 

🙏🏻 दत्त म्हणजे

ऋणमोचन, ऋगवेद, कर्म, कर्ता, किर्ती, करूणा, कृष्ण, खरेपणा

 

🙏🏻 दत्त म्हणजे

गणेश, गती, गर्भ, गायत्री, गार्गी, चमत्कार, चारित्र्य, चातुर्य, चित्त, जन्म, जरा, जप, तप

 

🙏🏻 दत्त म्हणजे

दया, दिशा, दिप, दान, दशा, दिगंबर, दास, धडाडी, धाडस, धर्म, नम्रता, निती, नाती, नियम

 

🙏🏻 दत्त म्हणजे

प्रेम, प्रीती, प्रचिती, पापक्षालन, प्रभा, प्रतिभा, फळ, बळ, भाव, नाव, माया, ममता, माता, मर्म

 

🙏🏻 दत्त म्हणजे

राम, रूप, रंग, लक्ष्य, लक्ष्मी, लाभ, वज्र, व्रत, वर्तन, वर्म, विष्णू, शरणागती, शंकर, शितल, शुभ, षडरस

 

🙏🏻 दत्त म्हणजे

समर्पण, समाधान, साधना, सेवा, सेवक, सर्वस्व, स्मर्तृगामी, सामर्थ्य, समर्थ, सुहास, सविता, स्वामी, संस्कार

 

🙏🏻 दत्त म्हणजे

क्षमा, क्षेम, क्षण, ज्ञान, ज्ञानेश्वर, त्राता, त्राण, प्राण

 

🙏🏻 दत्त म्हणजे

श्रम, श्रद्धा, कर्म आणि धर्म आहे.

 

संग्राहक : श्री अनंत केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुरूपौर्णिमा…… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ गुरूपौर्णिमा… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆

धर्मपुराणानुसार आषाढ पौर्णिमे दिवशी व्यासांचा जन्म झाला .महर्षी व्यासांनी वेदांचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवन संपन्न केले आहे .या अमौलिक कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व्यासांचे पूजन केले जाते. हा दिवस ” व्यास पौर्णिमा “म्हणून ओळखला जातो. हाच दिवस”गुरुपौर्णिमा “म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान पूज्य मानले जाते. 

आपल्या देशात रामायण महाभारत काळापासून गुरु -शिष्य परंपरा चालत आली आहे .भारतीय गुरुपरंपरेत जनक -याज्ञवल्क्य, कृष्ण, सुदामा – सांदिपनी, कर्ण -परशुराम अर्जुन -द्रोणाचार्य स्वामी विवेकानंद -रामकृष्ण परमहंस, ज्ञानेश्वर -निवृत्तीनाथ ,चांगदेव- मुक्ताबाई यां नावांचा समावेश करता येइल.

आपला पहिला गुरु आई .ती आपल्याला बोलायला चालायला शिकवते, त्याचप्रमाणे वडील आपल्याला व्यवहार ज्ञान शिकवतात. वय वर्षे ५ते १६ हा काळ आपल्या आयुष्यात महत्त्वाचा असतो . या वयात संस्काराची गरज असते. हे अमूल्य संस्कार घरी आई वडील देतात तर शाळेत व्यक्ती सापेक्ष-मनुष्य सापेक्ष जीवन विचारसरणी शिकवली जाते.

” गुरु विना ज्ञान नाही, ज्ञाना विना शांती नाही आणि शांती विना आनंद नाही “हेच खरे. आपल्याला लहान मोठ्यांकडून बरेच काही शिकता येते पण त्यासाठी ते जाणून घेण्याचा दृष्टिकोन हवा.

केवळ व्यक्ती कडूनच ज्ञानमिळत असते असे नाही. तर  लहानपणापासून म्हातारपणापर्यंत जे जे विद्या देतात ते आपलेगुरु असतातच म्हणून निसर्ग हा आपला गुरु आहे .निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात ओहोळ रूपाने येणारी नदी वाहत असताना अनेक ओहळांना आपल्यात सामावून घेते आणि शेवटी समुद्राला जाऊन मिळते पण जाताना जमीन सुपीक करते शेती फुलवते पिण्यासाठी पाणी देते तिचा उपयोग वीज निर्मितीसाठी होतो सर्वांना आपल्यात सामावून घ्या, शांत राहून इतरांना मदत करा ही   शिकवण नदीकडूनमिळते. डोंगरावर वादळ वाऱ्यासारखी संकटे येतात पण खचून न जाता पुन्हा कामाला लागा असा संदेश डोंगर देतात. वृक्ष, झाडे झुडपे लता वेली वगैरे वनस्पतींचे प्राणीमात्रावर अगणित उपकार आहेत वनस्पती नसतील तर कदाचित प्राणी मात्र जगू शकले नसते. श्वास घेण्यापासून ते पोट भरण्यापर्यंत आपल्याला या सर्वांची गरज असते. हे सर्वजण फांद्या फुल फळे यांचे ओझे वाहतात आणि आपल्याला मधुर फळ देतात. वाटेवरच्या वाटसरूला सावली देतात. उन्हामध्ये कार्बन डाय-ऑक्साइड वायू शोषून ऑक्सिजन आपल्याला देतात , दातृत्वाची शिकवण देतात पण त्या बदल्यात निसर्ग आपल्याला काहीच मागत नाही म्हणून” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी “असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे.

एवढेच नव्हे चिमणी, पक्षी आपले घरटे बांधताना काटक्या गोळा करतात घरटे बांधतात त्या घरट्यामध्ये अंडी पण घालतात कधी कधी पाऊस वाऱ्याने ते खाली पडते पण हे पक्षी पुन्हा नवीन घरटे बांधतात.

घरात आढळणारा कीटक कोळी आपले जाळ विणत असताना अनेकदा खाली पडतो पण  तो जिद्दीने आपले जाळे तयार करतोच. आज आलेल्या संकटावर मात कशी करावी, सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याचे ज्ञान आपल्याला या कीटकांकडून मिळते.

मुंगी एक कण दिसला तरी इतर मुंग्यांना गोळा करतात, एखाद्या पदार्थाला मुंग्यांची रांग लागलेली आपण पाहतो.,झाडावरून घसरुन  मुंगी खाली पडते पण ती आपले  कार्य सोडत नाही तर पुन्हा वर चढून आपले ध्येय गाठते.संकटाला न घाबरता प्रयत्न करा यश तुमच्या पाठीशी आहे असे शिकवते जणू!अशीअनेक उदाहरणे देता येतील. म्हणून निसर्गासारखा नाही रे ‌सोयरा

गुरु,सखा बंधू मायबाप

त्याच्या कुशीमधये सारें व्यापताप

मिटती क्षणात आपोआप 

निसर्गाप्रमाणे ग्रंथ गुरुची महती सांगता येईल. ग्रंथा मधून भूतकाळातील गोष्टी समजू शकतात, तसेच वर्तमान काळ , भविष्यकाळ याबद्दल अफाट ज्ञान ग्रंथातून, पुस्तकातून मिळते.,  हे अमूल्य ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केले जाते. पुस्तकामुळे ज्ञानवृद्धी होते. सकारात्मक विचारसरणी बनते .आत्मविश्वास वाढतो .चांगले संस्कार होतात .कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी पाठबळ मिळते. या गुरूकडे जात धर्मभेद नाही ,काळाचे बंधन नाही म्हणून ग्रंथ हे  सुध्दा आपले गुरु आहेत. 

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

??

☆ गवसले की हरवले – भाग-2 ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(समोर पिंपळाचा पार होता . त्याभोवती असलेल्या ओट्यावर बसून घरूनच आणलेला डबा अनेक प्रवाशी खायचे. ) 

इथून पुढे —

बस थांबली की हॉटेलचा हलवाई कढई चा जाळ वाढवायचा तेल गरम झाले की नाही हे पाहण्यासाठी तो पाण्याचे छिटे मारायचा त्याचा चर्र चर्र आवाज यायचा, तेल गरम झाले की मग भजी तळली जायची, त्याचा गंध परिसरात पसरायचा, बरेच प्रवाशी गरम भजी घ्यायचे हॉटेलात टेबल वर बसून घरची शिदोरी खायचे. मालक कुणालाही विरोध करायचे नाही उलट पाणी पाठवायचे कधी कांदे मिरची द्यायचे. आई मला कधी भजी घेऊन द्यायची. तो कडकं मिशी वाला  मालक मला आठवतो लहान मुले असली की जिलबी चा एखादा आडा द्यायचा. मला मात्र दोन आडे द्यायचा. त्यामुळे तो मला अधिक आवडायचा. खाणे पिणे आटोपले की ड्रायव्हर ची वाट पाहात सर्व प्रवासी चर्चेत रंगायचे. एकमेकांची चौकशी केली जायची अनेकाचे नातेवाईक गावचेनिघायचे, जुन्या ओळख्या असल्याप्रमाणे लोक आत्मीयतेने  चर्चेत रंगायचे. मदतीची भावना एवढी तीव्र की अनेकांचे अवजड सामान उतरविण्यासाठी लोक बसवर चढायचे. बस लागणाऱ्या लोकांचे कान झापायचे त्यांना पाणी द्यायचे. एखादा प्रवाशी हळूच एखादी गोळी द्यायचा. कुणी आजीबाई पिशवीतून लवंग विलायची काढून द्यायची. तेव्हड्यात कंडक्टर काका जोरजोराने घंटी वाजवायचे. सर्व प्रवाशी धावपळ करीत चढले की ड्रायव्हर काका ला कुणीतरी तंबाखू द्यायचे नी ते चढले की दोनदा  टन टन वाजले की बस निघायची. आता बस ची गती थोडी वाढायची कारण पुढे घाट लागायचा व हळूहळू बस चालवावी लागायची त्यामुळे ड्रायव्हर काका गती वाढवायचे,मला मात्र घाट आवडायचा,रस्त्याची वळणे,तीव्र चढ़ाव उतार कुठे समोरुन येनारी वाहने त्याना साइड देतानाची घसाघिस सर्व मजेशिर वाटायाचे. सर्वात आवडणारी बाब म्हणजे पळसाची केसरी फुले, नी बहाव्याची पिवळी फुले त्यांनी बहरलेली झाडे, मध्येच शेळ्या मेंढ्यांच्या कळप हाकनारे आदिवासी, लभान समाजाच्या लोकांचे तांडे दिसायचे. त्यांच्या स्त्रियांचे रंगबिरंगी पेहराव हातातील पांढऱ्या बांगड्या नी कानातील लोंबकळत असलेली कर्णफुले सर्व पाहत रहावेसे वाटायाचे. सर्वात लक्षवेधक असायचे ते डोंगरावरून पडणारे धबधबे नी पाण्याचे वाहणारे ओहोळ. घाट संपला की एका खेड्यात बस थांबायची दुधाच्या खव्यासाठी हे आदिवासी गाव प्रसिद्ध होते तिथूनच शहराला खव्याचा पुरवठा व्हायचा,खव्यामुळे तिथे गुलाबजामुन ही मिठाई विकणारे हॉटेल होते . लोक मनसोक्त आस्वाद घ्यायचे सोबत खवा व गुलाब जामुन पार्सल घ्यायचे. आई मामासाठी हमखास खवा घ्यायची मला मात्र गुलाब जामून खायला मिळायचे. . . .

आणखी एक महत्वाचे म्हणजे बस थांबली की काही आदिवासी स्त्रिया यायच्या त्यांच्या जवळ विकण्यासाठी  सीताफळे,आवळे,जांभळं, टेंबर, खीरण्या,येरोण्या,बोर,कवठ असा रानमेवा असायचा लोक कमी पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न करायचे मात्र आई त्यांना योग्य किंमत द्यायची,म्हणायची रानावनात फिरून आणतात बिचाऱ्या दोन पैसे मिळालेच पाहिजे त्यांना. मी मात्र त्या स्त्रियांच्या अंगावर गोंदलेली चित्रे न्याहाळीत असो.

 स्पीड बेकरच्या धक्क्याने माझी तंद्री तुटली समोर टोल नाका होता यांत्रिक सुविधेने आपोआप त्याचे पैसे देऊन कार समोर निघाली.

 बस आता दहा मिनिटात माझे शहर येणार होते. नवीन महामार्गांने प्रवास सुकर झाला होता. वेळ वाचला होता. पण लहान असतानाच आलेला तो एकही अनुभव आला नाही. सिमेंटचे महामार्ग बनले काळाची गरज म्हणून पण  अनेक गोष्टींना पारखे करून. मनात विचार घोळू लागले या महामार्गांमुळे खरंच बरेच मिळविले की बरेच हरपले?

— समाप्त —

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नुकत्याच झालेल्याआषाढी एकादशीच्या निमित्ताने… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  विविधा ?

☆ नुकत्याच झालेल्याआषाढी एकादशीच्या निमित्ताने… ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

नारद मुनींच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्ण व रुक्मिणींनी द्वारकेला जाण्याचा निर्णय घेतला. पण तिकडे जाण्यापूर्वी पंढरीला लोकांचे निरोप घेण्यासाठी निघाले. प्रथम पुंडलिकाला भेटण्यासाठी त्याच्या कुटीजवळआले. पण आजच्या दिवशी पडलेल्या पावसामुळे कुटीसमोर चिखल असल्यामुळे त्यांनी अंगणातून पुंडलिकाला हाक मारली.

साक्षात परमेश्वर विष्णू दाराशी पाहताच पुंडलिक म्हणाला,” देवा मी माझ्या आई-वडिलांचे प्रातर्विधी उरकत आहे. कृपया आपण कुटी मध्ये येऊ नये. मी थोड्या वेळाने बाहेर येतो.” आणि श्री विष्णूंच्या पायाला चिखल लागू नये म्हणून त्याने जवळ असलेली एक वीट उचलली व मनोभावे नमस्कार करून अंगणात टाकली आणि विनवणी केली,” मी बाहेर येईपर्यंत कृपया या विटेवर उभे रहा”.

श्रीकृष्ण त्याच्या विनंती प्रमाणे दोन्ही हात कमरेवर ठेवून त्या टाकलेल्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाने आपल्या आई-वडिलांना श्री विष्णूचे दर्शन घडविले आणि श्रीकृष्ण आपल्या भक्ताची वाट पाहत विटेवर उभे राहिले. एक घटका होत आली तरीही पुंडलिक बाहेर आला नाही. विष्णूंना पाहून जनसमुदाय गोळा झाला.भगवंताला यायला उशीर का झाला हे पाहायला रखुमाई ही तेथे आल्या.

पांडुरंगाच्या हाकेला ही पुंडलिक का बाहेर आला नाही हे पाहण्यासाठी एक  सदगृहस्थ कुटीत गेले. तर पुंडलिकाचे आई वडील मरण पावले होते आणि त्यांच्या चरणी पुंडलिकाने आपल्या प्राणाचा त्याग केला होता.

त्याची अपार भक्ती पाहून पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले कोणत्याही पूजेत तुझे नाव प्रथम घेतले जाईल  “पुंडलिका” आणि जसा विटेवर उभा आहे त्या स्थितीत पाषाण रूपात ह्याच पंढरपुरात 28 युगे उभा राहून माझ्या भक्तांना दर्शन देत राहीन. त्यानंतर थोड्याफार अंतरावर थांबलेल्या रखुमाई त्याच ठिकाणी पाषाण रूपात उभ्या राहिल्या.

तेव्हापासून विठ्ठल रुक्माई च्या स्वयंभू मूर्तीच्या चरणावर माथा टेकवून आशीर्वाद घेण्यासाठी भक्तांची लागली ती अजूनही अखंडित व अविरतपणे चालू आहे.

पंढरपुरात श्रीकृष्ण रुक्मिणी पाषाण स्वरूपात स्थितप्रज्ञ झालेला तो पवित्र दिवस म्हणजे “आषाढी एकादशी”

संत ज्ञानेश्वरांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी दीडशेच्या संख्येने सुरू केलेली वारी आजही खांद्यावर भगवी पताका, टाळमृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करीत रणरणत्या उन्हात पावसा पाण्याची पर्वा न करता दरवर्षी ला खूप वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करतात.

घेईन मी जन्म‌ याचसाठी देवा

तुझी चरणसेवा साधावया.

तुकाराम महाराजांनी म्हटलेल्या या अभंगाप्रमाणे 200 ते  225 किलोमीटर अंतराची पायी वाटचाल करीत  वारकरी एकादशीला पंढरपूरला पोचतात.

“जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल”

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares