मराठी साहित्य – विविधा ☆ मूलाधार जगण्याचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ मूलाधार जगण्याचा..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

कांही शब्द अगदी सहज जरी कानावर पडले तरी आपल्या मनाला होणाऱ्या त्यांच्या स्पर्शाने मनात भावनांचे तरंग उमटतात. पण एखादाच शब्द असा असतो की त्याच्या स्पर्शाने मनात उमटणारे असे भावतरंग विविधरंगी असतात. रस हा शब्द भावनांचे असे अनेक रंग स्वतःत सामावून घेतच आकाराला आलेला आहे आणि म्हणूनच तो अल्पाक्षरी असला तरी अनेक अर्थाने बहुरंगी, बहुपेडी शब्द आहे असे मला वाटते.

रस म्हणजे चव, रुचि, गोडी, आवड. रस म्हणजे औत्सुक्य, कुतूहल, जिज्ञासाही. रस म्हणजे द्रव या अर्थाने जलांश, चीक, स्त्राव,अर्क, पाक असंही बरंच कांही. एका दोन अक्षरी छोट्याशा शब्दातल्या सहज सुचणाऱ्या अर्थांच्या या विविध रंगछटा !

रसद हा ‘अन्नपदार्थ’ किंवा ‘साधन’ या अर्थाचा शब्द रस या शब्दावरुनच तयार झाला असावा असे मला वाटते ते रस या शब्दाच्या अनेक अन्न/खाद्यपदार्थांशी असलेल्या जवळीकीमुळे. रस या शब्दाचं अन्नपदार्थांशी असणारं थेट नातं ध्वनित करणारी ‘रसगुल्ला’, ‘आमरस’ ,’सुधारस’ या सारखी मिष्टान्ने आणि सामीष आहारामधला सर्वप्रिय असा कोल्हापूरी तांबडा-पांढरा ‘रस्सा’ ही कांही प्रातिनिधिक उदाहरणे ! यातील मिष्ट पदार्थ असोत वा सामिष त्यांच्याशी चव, रुचि, गोडी,आवड यासारख्या रस या शब्दाच्या अर्थांचे थेट नाते तर चटकन् जाणवणारेच.

रस या शब्दाचं मला जाणवलेलं वेगळेपण हे की त्याच्या चव ,रुचि, गोडी, आवड या अर्थांची रसनातृप्तीशी असणारी सांगड ही एक बाजू असली तरी चव, रुचि, गोडी, आवड या अर्थांचा संबंध फक्त रसनेशीच नाहीय.  एखादा छंद आवडीचा असेल तर तो जोपासण्यात ‘रस’ असतो म्हणजेच ‘गोडी’ वाटते,एखाद्या कामात ‘रुचि’ असेल तर ते काम करणे कटाळवाणे म्हणजेच ‘बेचव’ वाटत नाही.जगणं असं आनंदी, तृप्त करणारं होण्यासाठी जगण्यात  ‘चव’, ‘रुचि’, ‘गोडी’, ‘आवड’ या अर्थाने ‘रस’ हा असायलाच हवा. एरवी ते ‘निरस’च होईल. यामुळेच रस हा जसा जिव्हेचा विषय आहे तसाच किंबहुना त्यापेक्षाही जास्त तो जगण्याचा विषय आहे !

रस या शब्दाच्या अर्थांमधील अशा विविध छटांमुळे या शब्दातून निर्माण झालेली रसदार, रसरशीत, रसपूर्ण, रसभरित, रसहीन, निरस, रसाळ अशी अनेक विशेषणे भाषेचे सौंदर्य खुलवणारी आहेत.

गुणग्रहण, गुणदोष विवेचन, रसास्वाद, रसविमर्श, मूल्यमापन, परीक्षण, आलोचना, समीक्षा, टीका अशा विविध अर्थछटांनी युक्त असा ‘रसग्रहण’ हा शब्द, तसेच रसज्ञ (रसिक), रसपरिपोष किंवा रसवत्ता (कवित्व), रसज्ञता (अभिरुचि), रसवंती(वाणी), रसायन (सरमिसळ, औषध), रसभंग (विरस), रसोत्कर्ष (बहर) यासारखे विविधरंगी शब्दही रस या शब्दातूनच आकाराला आलेले आलेले आहेत. 

शृंगार, वीर, करुण, अद्भूत, हास्य, भयानक, बीभत्स, रौद्र, शांत  हे मनातल्या भावना व्यक्त करणारे नवरसच नाहीयेत फक्त तर जीवनाशी असं अतूट नातं असलेले जीवनरसच आहेत. ही अशी रसयुक्त विविधता नसती तर जगणं निरस, कंटाळवाणंच झालं असतं. या अर्थाने हे वैविध्यपूर्ण, अनेकरंगी रस हे आपल्या जगण्याचे मूलाधारच म्हणायला हवेत!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बंध राखीचे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ बंध राखीचे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रक्षाबंधन निमित्ताने विवेकची…माझ्या भावाची आठवण येते. सण साजरा होतो.

भावाला प्रेमाने नारळीभात, मिठाई खायला घालतो.त्याला ओवाळतो. भाऊही भेटवस्तू देऊन

बहिणीला खूश करतो.राखी पौर्णिमा साजरी होते !

पण मला आठवतो तो दिवस, जेव्हा विवेकने माझे खरोखरच रक्षण केले होते! त्याच्या विश्वासावर मी भरलेला ओढा पार करून गेले होते!

जवळपास ४०/४५ वर्षांपूर्वीची गोष्ट! मी तेव्हा हाॅस्टेलवर शिकायला होते.आणि माझा भाऊ नुकताच इंजिनिअर होऊन एस् टी मध्ये नोकरीला लागला होता.मी तेव्हा सांगलीत रहात होते आणि तो कोल्हापूरला होता.आई-वडील तेव्हा मराठवाड्यात नांदेड जवळील एका लहान गावात नोकरी निमित्ताने रहात होते.वडिलांची प्रमोशनवर बदली रत्नागिरीहून नांदेडला झाली आणि युनिव्हर्सिटी बदल नको म्हणून मी सांगलीलाच होते.दिवाळीच्या सुट्टीत घरी जायला मिळत असे.

त्या वर्षी नेहमी प्रमाणे मला सुट्टीसाठी नांदेडला पोचवायला विवेक येणार होता. तेव्हा एस् टी च्या गाड्याही फारशा नव्हत्या. संध्याकाळी कोल्हापूर -नांदेड अशी सात वाजता बस असे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी

९-३०/१० पर्यंत नांदेडला जाई. अर्थात वाटेत काही प्राॅब्लेम नाही आला तर! त्यावर्षीचा तो प्रसंग मी कधीच विसरत नाही. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यासाठी मी आणि माझा भाऊ सांगलीहून एस् टीत बसलो तेव्हा पाऊस होताच. कदाचित मिरजेच्या पुढे ओढ्याला पाणी असण्याची शक्यता होती. त्या मोठ्या ओढ्याचं नाव होतं हातीदचा ओढा! विवेक एसटीत असल्याने त्याला हे सर्व माहीत होते, पण नंतर वेळ नसल्यामुळे ‘आपण निघूया तरी’ असे त्याने ठरवले. मिरजेच्या स्टॅण्डवर त्याने ब्रेड, बिस्किटे,फरसाण असा काही खाऊ बरोबर घेतला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. शिरढोणच्या दरम्यान ओढा भरभरून वाहत होता. रात्रीचे नऊ वाजले होते. बाहेर धुवाधार पाऊस! रात्रभर आम्ही ओढ्याच्या एका तीरावर एस् टी मध्ये बसून होतो. पावसामुळे बाहेरचे वातावरण आणखीनच भयाण वाटत होते. कधी एकदा सकाळ होईल असं वाटत होतं!

एकदाची सकाळ झाली. गाडीतून खाली उतरून बाहेर पाहिले तर दोन्ही तीरावर भरपूर गाड्या अडकून पडल्या होत्या. कंडक्टरने सांगून टाकले की पाणी थोडं कमी झाले आहे, आपापल्या जबाबदारीवर पलीकडे जा आणि तिकडच्या एस टी.त  बसा! एक एक करत लोक ओढा पार करत होते. सामान डोक्यावर घेऊन चालले होते. माझे तर काही धाडसच होत नव्हते! भाऊ म्हणाला, ‘आपण जर असेच बसलो तर पलीकडे जाऊ नाही शकणार!’ आणि ओढा क्रॉस करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शेवटी तो स्वतः एकदा ओढा पार करून  पाणी कितपत आहे ते पाहून आला. विवेक चांगला पोहणारा होता आणि मला तर अजिबात पोहता येत नव्हते. पाण्याची भीती वाटत होती, पण त्याने मला धीर दिला. मला म्हणाला, ‘ मी हात घट्ट पकडतो, पण तू चल .’ आणि खरंच, त्याने एका हातात सामान आणि दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट धरून ओढ्यापलीकडे मला न्यायला सुरुवात केली. ओढ्यामध्ये काटेरी झुडपे, लव्हाळी यात पाय आणि साडी अडकत होते.. माझी उंची कमी असल्याने अधूनमधून पाण्यात पूर्णडोके खाली जाई, आणि गुदमरल्यासारखं होई. पण मला धीर देत आणि माझं मनगट घट्ट धरून विवेक मला नेत होता. कसेबसे आम्ही ओढ्यापलीकडे गेलो. नंतर बॅगमधील सुके कपडे आडोशाला बदलून दुसऱ्या गाडीत बसलो. आणि पुढचा प्रवास पार पडला! आयुष्याच्या प्रवासात असा एखादा आठवणींचा प्रवास माणसाला अंतर्मुख करतो. भावाचं नातं आणखीनच दृढ करतो… इतकी वर्षे झाली तरी मला तो दिवस तेवढाच आठवतो!

आणि भावाने बहिणीचे संरक्षण करायचं असतं ते कृतीने दाखवणारा माझा भाऊ डोळ्यासमोर उभा राहतो.. आता विवेक पंचाहत्तरीकडे वाटचाल करत आहे. पण अजूनही आमचे भाऊ बहिणीचे नाते तितकेच घट्ट आहे! ….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रोड हिप्नोसिस म्हणजे काय..? – डॉ श्रीकांत गुंडावार ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? इंद्रधनुष्य ?

☆ रोड हिप्नोसिस म्हणजे काय..? – डॉ श्रीकांत गुंडावार ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते. रस्त्यावर वाहन चालवतांना साधारण पणे 2.5 तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते. संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही, परिणाम रोड हिप्नोसिस…  तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होण्याचे पहिले कारण आहे.

रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो कोणत्या वेगाने जात आहे, किंवा समोरून येणाऱ्या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही, सहसा टक्कर 140 किमी पेक्षा जास्त वेगाने असते. रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर 2.5 तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी, थोडी विश्रांती घ्यावी, 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे. तसेच वाहन चालवताना काही ठिकाणे आणि इतर वाहने लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या 15 मिनिटांतील काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सह प्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. रोड संमोहन हे सहसा रात्रीच्या वेळी घडते आणि अशावेळी प्रवासी झोपलेले असतांना परिस्थिती खूप गंभीर होते.

डोळे लागले तर अपघात अटळ आहे, पण डोळे उघडे असतांना मेंदू क्रियाशील असणे अत्यंत महत्त्वाचे आहे… सुरक्षित रहा आणि सुरक्षित वाहन चालवा !!

लेख स्रोत सौजन्य: 

डॉ श्रीकांत गुंडावार, रेडिओलॉजिस्ट, पूना.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हर पल यहाँ जी भर जियो … ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

? विविधा ?

☆ हर पल यहाँ जी भर जियो … ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

हर पल यहाँ जी भर जियो …

खरंच…

जे क्षण मिळतात ते  जसे मिळतात जसं आयुष्य मिळतं तसं खूप चांगलं चांगलं छान छान सकारात्मक आनंदी जगून घ्यावं माणसानं…..

कारण..

जो है समा कल हो ना हो…

हेच अंतिम सत्य…

आता एकदम असं वेगळ्याच प्रकारचं तत्त्वज्ञान मी का सांगते आहे ?..असा नक्कीच प्रश्न तुमच्या मनात आला असेल …

 

तर मंडळी ..

माझी जीवस्य  मैत्रीण मागील वर्षी अनंताच्या प्रवासाला निघून गेली…

वय अवघं ४० वर्षांचं..

इतक्या लहान वयात असं तिचं  न परतीच्या मार्गावर जाणं… वेदनादायक तर आहेच.. पण विचार करायला लावणारं देखील आहे..

तीचा च विचार चालू आहे खरं तर मनात…

वाटलं..

किती आणि काय काय राहिलं असेल मनात..  किती स्वप्न असतील..  स्वतःलाही आयुष्यात खूप काही करायचं राहून गेलं असेल ना तिचं…

असे सगळे विचार मनात गोफ धरत असताना पटकन असं वाटलं ..

हर पल यहा जी भर जियो..

जो है समा.. कल हो ना हो…

 नेहमीच  सगळे लेखक कवी आयुष्य क्षणभंगुर आहे .. असं म्हणतात..

येणं .. जाणं हे कधीच आपल्या हातात नाही…

हेआपल्याला माहिती  असूनही आपण इतक्या दिमाखात  … मीच आहे…

मी सगळं काही करू शकतो…

मुठ मारेन तिथे पाणी काढेन  अशा  अविर्भावात..

 खरंच चालत असतो..

 वेगवेगळ्या नको असलेल्या अनेक गोष्टी  राग लोभ मस्तर … बाळगून असतो..

 परमेश्वराने दिलेले हे सुंदर असं जीवन  हे अशा सगळ्या गोष्टींनी मलिन करून जगायची काय आवश्यकता आहे..?

 

खरं तर..

 माणूस म्हणजे हे सगळं आलंच मन आहे.. भावना आहे.. विचार आहेत.. नाती आहेत असे खूप गुंते आयुष्यात असतातच …

आणि खरं सांगू का..

 एक वय ही असतं..

 जे व्हा असतो ..

थोडा  अविर्भाव ..

थोडा बेफिकीरपणा..

 थोडा अहंकार ही…

 तरी कुठेतरी एक कायम लक्षात असू द्यायचं की परमेश्वरानं दिलेलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्या परमेश्वराला आपल्याकडून  चांगल्याचीच अपेक्षा आहे..

साने गुरुजी म्हणतात की..

 झाडावर येणार फुल त्याचा जन्म किती लहान..

 पण ते आपल्या अस्तित्वानं सगळ्या जगाला आनंद देतं… तर मग माणसाकडून परमेश्वरांनं किती अपेक्षा करावी ..

माणसं म्हणजे देवाच्या  या नंदनवनातील फुले च आहेत..

म्हणून म्हणते..

आनंद द्या..

दिलखुलास पणे कौतुक करा.. फुकाचा हव्यास..

फुकाचा डामडोल..

फुकाचा मान्यस्थपणा..

फार काळ नाही टिकत..

म्हणूनच महाराजा…

जे वाटतं ना.. ते करून घ्यावं माणसानं…

खरंच..

 मोगऱ्याचा सुगंध अनुभवावा.. कधी पावसात भिजण्याची मजा घ्यावी..

 कधी शांत निरव रात्री आकाश तारकांनी भरलेलं असताना ते निहाळत बसावं…

नदीचं वहाणं…

समुद्राच्या आवेगात येणाऱ्या लाटा…

पक्ष्यांचा किलबिलाट…

सारं.. सारं मुक्तपणे कवेत घ्यावं कधीतरी..

निसर्ग जे भरभरून आपल्याला देतोय त्याची जाणीव ठेवावी त्याचे अनुभव घ्यावेत..

आपले विचार आपली वाणी आपला आचार नेहमी सौम्य सकारात्मक असू द्यावा

 नात्यांचा गुंता हळुवार सोडवावा..

सुख.. दुःख.. आशा ..निराशा या हिंदोळ्यावर आयुष्य झुलत राहणारच हो..

निसर्गात सुध्दा रातकिड्यांची किरकिर नकोशी वाटते .. पण कोकीळेचं कूजन मोहून टाकतच ना… आणि सोनचाफ्याचा सुगंध..सोन्याचा नाही दिला .. परमेश्वराने …

 म्हणून च जे आहे ते आनंदाने स्विकारणं योग्य….

आणि..

 मन प्रसन्न असेल तर असं सगळं सहज निभावणं शक्य असतं .. आपण स्वतः बरोबर सभोवतालच्या वातावरण ही असंच प्रसन्न आनंदी ठेवू शकतो..

 हीच तर त्या परमेश्वराची अपेक्षा आहे माणसाकडून..

 खरंच असा विचार केला पाहिजे नक्की आपण…

  कारण शेवटी…

 पल पल बदल रही है

 रूप जिंदगी..

 धूप है कभी..

कभी हे छॉव जिंदगी..

 हर पल यहॉ जी भर जियो..

 जो है समा..

 कल हो ना हो..

© सौ.सीमा राजोपाध्ये..

8308684324

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ टाटा सुमो… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ टाटा सुमो… – लेखक – अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

टाटा मोटर्सचे सर्व मोठे पदाधिकारी दररोज दुपारचं जेवण एकत्रच घेत असत, परंतु गेल्या काही दिवसांपासून सुमंत मुळगावकर हे नेमके लंचच्या सुमारास आपली कार घेऊन बाहेर जात आणि लंच संपल्यानंतर लगेच पुन्हा आपल्या कार्यालयात परत येत. 

अशी चर्चा होती की टाटा मोटर्सचे काही डीलर्स त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लंचसाठी बोलावून घेतात. 

एक दिवशी टाटा मोटर्सच्या काही पदाधिकाऱ्यांनी लंच ब्रेकच्या वेळी मुळगावकर यांच्या कारचा पाठलाग केला. मुळगावकरांनी आपली कार एका महामार्गावरील ढाब्यापाशी उभी केली, त्यातून ते खाली उतरले, ढाबेवाल्याला जेवणाची ऑर्डर दिली. टाटा मोटर्सची उत्पादनं वाहून नेणारे ट्रक ड्रायव्हर्स तिथेच  जेवण करीत होते. त्यांच्यासोबत बसून त्यांनी आपलं दुपारचं जेवण घेतलं.  टाटा ट्रक्समध्ये काय चांगलं आहे आणि काय बदलायला हवं याबद्दल त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, त्या चर्चेचं टिपण तयार केलं आणि मग ते तिथून आपल्या कार्यालयात परतले. हे पाहून हे सर्व पदाधिकारी थक्क झाले होते. मुळगावकर कोणत्या कारणासाठी लंचच्या वेळेस बाहेर जातात हे त्यांना कळलं होतं. या माहितीचा उपयोग करून टाटा ट्रक्स मध्ये कोणत्या सुधारणा करायला हव्यात याचा विचार करून ते टाटा ट्रक्सच्या गुणवत्तेत सुधारणा करीत.

कोणत्याही कंपनीच्या उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कंपनीतर्फे टाटा सुमोची भेट मिळणं हा त्याचा आजही सर्वोच्च सन्मान समजला जातो 

‘सुमो’ या ब्रँड नेम मधील सुमो हे नांव अनुक्रमे सुमंत आणि मुळगावकर या नावांच्या आद्याक्षरांपासून तयार झालंय. 

मुळगावकरांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना सन्मान देणाऱ्या टाटांचंही या निमित्तानं मनःपूर्वक अभिनंदन.

आजपर्यंत सुमो म्हणजे जपानी कुस्तीगीर एवढंच मला माहीत होतं…

लेखक : अनामिक 

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जमलं तर बघा… ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ जमलं तर बघा… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

कोणतीही गोष्ट न चिडता,न रागावता, न ओरडता समोरच्याला सांगणे ज्याला जमलं त्याला आयुष्य आनंदाने जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोप्पं आहे. पण त्याला न दुखावता ती गोष्ट सांगणं खूप अवघड आहे.

निसर्गाचा नियमच आहे की एका जागी दुसरी गोष्ट आली की पहिली निघून जाते. जसे पाणी आले की धूळ किंवा घाण निघून जाते, हवा आली की उष्णता निघून जाते ,प्रकाश आला की अंधार निघून जातो— तसे आपल्याला चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघून जातात.

 जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं आहे .आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे- कारण तेव्हाच तर कळतं कोण हसतंय, कोण दुर्लक्ष करतंय ,आणि कोण सावरायला येतंय. कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचे असते.आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात. कारण आपण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो पण टिकवून नाही ठेवू शकत.

आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला म्हणतात नशीब ,सर्व काही असूनही रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडूनही आनंद देतं त्याला म्हणतात आयुष्य.

माणूस घर बदलतो, माणूस मित्र बदलतो ,माणूस कपडे बदलतो, माणूस पक्ष/गट बदलतो तरी तो दुःखीच असतो, कारण तो आपला स्वभाव बदलत नाही.

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटावा तसं हळू हळू आयुष्य निघून चाललंय, आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठे होत चाललोय. 

प्रेम “माणसावर” करा- त्याच्या “सवयींवर” नाही. “नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर पण “त्याच्यावर” नाही. “विसरा” त्याच्या “चुका”, पण त्याला नाही . –कारण “माणुसकी” पेक्षा मोठं काहीच नाही…

 हे सगळे फक्त समजदार  लोकांसाठी आहे,कारण जे लोक पावला पावलावर बदलतात ते लोक कधीच बदलत नाहीत . 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २६- भाग १ – पूर्व पश्चिमेचा सेतू – इस्तंबूल ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २६ – भाग १ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ पूर्व पश्चिमेचा सेतू– इस्तंबूल ✈️

‘अंकारा’ ही आधुनिक टर्कीची (Turkey) राजधानी आहे पण टर्कीची (टर्कीचे आता ‘टर्कीये’ (Turkiye )असे नामकरण झाले आहे.) ऐतिहासिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व व्यापारी राजधानी ‘इस्तंबूल’ आहे. इस्तंबूलचं पूर्वीच नाव कॉन्स्टॅन्टिनोपल. जुन्या सिल्क रूटवरील  (रेशीम मार्ग) या महत्त्वाच्या शहरात प्राचीन आणि अर्वाचीन संस्कृतीचा सुंदर संगम झाला आहे. जुन्या वैभवाच्या खुणा अभिमानाने जपणाऱ्या इस्तंबूलचं भौगोलिक स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र यांच्यामध्ये असलेलं टर्की हे  मुख्यतः आशिया खंडात येतं. पण इस्तंबूलचा वायव्यकडील थोडासा भाग युरोप खंडात येतो. इस्तंबूलच्या एका बाजूला मारमारा समुद्र तर दुसऱ्या बाजूला बॉस्पोरसची खाडी आहे. बॉस्पोरस खाडीवरील पुलाने  युरोप व आशिया हे दोन खंड जोडले जातात.

इस्तंबूलला लाभलेले स्वच्छ, सुंदर समुद्रकिनारे, थंड कोरडी हवा यामुळे मे महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जगभरच्या प्रवाशांनी इस्तंबूल फुलून जाते. समुद्रस्नान, सूर्यस्नान करण्याची मजा, ताजी रसरशीत फळं, तरतऱ्हेच्या भाज्या, विपुल प्रमाणात असणारे अंजीर, बदाम, खजूर, अक्रोड, पिस्ते आणि समृद्ध सागरी मेजवानी यामुळे प्रवाशांचं, खवय्यांचं हे आवडतं ठिकाण आहे. ऑलिव्ह फळांचा हा मोठा उत्पादक देश आहे. लज्जतदार जेवणामध्ये, तरतऱ्हेच्या सॅलड्समध्ये मुक्तहस्ताने ऑलिव्ह ऑइल  वापरले जाते.

रोमन, ग्रीक, ख्रिश्चन, ऑटोमन साम्राज्याचे सुलतान अशा वेगवेगळ्या संस्कृती इथे हजारो वर्षे नांदल्या. या कालावधीत निर्माण झालेली अनेक वास्तूशिल्पे म्हणजे कलेचा   प्राचीन  अनमोल वारसा आजही टर्कीने कसोशीने जपला आहे. कालौघात काही वास्तू भग्न झाल्या तर काही नष्ट झाल्या. तरीही असंख्य उर्वरित वास्तु प्रवाशांना आकर्षित करतात.

इस्तंबूलमधील ‘अया सोफिया म्युझियम’ हे एक चर्च होतं. चौदाशे वर्षांपूर्वी सम्राट जस्टिनियन याने ते बांधलं . एका भव्य घुमटाच्या चारही बाजूंना चार अर्ध घुमट आहेत.  त्या घुमटांना आतील बाजूनी सोनेरी आणि निळसर रंगाच्या लक्षावधी मोझॅक टाइल्स लावल्या आहेत. वास्तूच्या भिंती आणि खांब यांच्यासाठी गुलबट रंगाच्या संगमरवराचा वापर केला आहे. छताला ख्रिश्चन धर्मातील काही प्रसंग, मेरी व तिचा पुत्र अशा भव्य चित्रांची पॅनल्स आहेत. इस्लामच्या आगमनानंतर यातील काही पॅनेल्स प्लास्टर लावून झाकायचा प्रयत्न झाला.घुमटाच्या खालील भिंतींवर कुराणातील काही अरेबिक अक्षर कोरली आहेत. उंच छतापासून  लांब लोखंडी सळ्या लावून त्याला छोटे छोटे दिवे लावले जायचे.   पूर्वी या दिव्यांसाठी ऑलिव्ह ऑइल वापरत असंत. ऑलिव्ह ऑइल ठेवण्याचा एक भला मोठा संगमरवरी कोरीव रांजण तिथे एका बाजूला चौथ्यावर ठेवला आहे. आता हे दिवे इलेक्ट्रिकचे आहेत.घुमटांना आधार देणारे खांब भिंतीत लपविलेले आहेत. त्यामुळे प्रथमदर्शनी आधाराशिवाय असलेले हे भव्य घुमट पाहून आश्चर्य वाटतं.

तिथून जवळच सुलतान अहमद याने सोळाव्या शतकात सहा मिनार असलेली भव्य मशीद उभारली आहे. ती आतून निळ्या इझनिक टाइल्सने सजविली आहे. म्हणून या वास्तूला  ‘ब्लू मॉस्क’ असं नाव पडलं आहे .उंचावरील रंगीबेरंगी काचेच्या खिडक्या, असंख्य हंड्या- झुंबरं, त्यात लांब सळ्यांवरून सोडलेले छोटे छोटे दिवे त्यामुळे सकाळच्या सूर्यप्रकाशात सर्वत्र सोनेरी निळसर प्रकाश पाझरत होता.

मारमारा समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेला ‘टोपकापी पॅलेस’ म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानांच्या वैभवाची साक्ष  आहे. इसवीसन १४०० ते१८०० ही चारशे वर्षं इथून राज्यकारभार चालला. त्या भव्य महालात वेगवेगळे विभाग आहेत. भल्यामोठ्या स्वयंपाकघरातील महाकाय आकाराची भांडी, चुली, झारे, कालथे, चिनी व जपानी सिरॅमिक्सच्या सुंदर डिझाइन्सच्या लहान मोठ्या डिशेस, नक्षीदार भांडी बघण्यासारखी आहेत. काही विभागात राजेशाही पोशाख, दागिने मांडले होते. तीन मोठे पाचू बसविलेला रत्नजडित टोपकापी खंजीर आणि ८६ कॅरेट वजनाचा सोन्याच्या कोंदणात  बसविलेला  लखलखीत हिरा, रत्नजडित सिंहासन वगैरे पाहून डोळे दिपतात. सुलतानाच्या स्त्री वर्गाचं राहण्याचं ठिकाण म्हणजे ‘हारेम’ राजेशाही आहे. बाहेरच्या एका मनोऱ्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीची जागा आहे.

बास्पोरसच्या किनाऱ्यावर ‘अल्बामाची’ हा सुलतानांनी बांधलेला युरोपियन धर्तीचा राजवाडा आहे. उंची फर्निचर, गालीचे, सोन्या चांदीने नटविलेले,मीना वर्कने  शोभिवंत केलेले चहाचे सेट्स, डिशेस, वेगवेगळ्या खेळांची साधने सारे चमचमत होते. ‘हारेम’ विभागात माणकांसारखी लाल, बखरा क्रिस्टलची दिव्यांची लाल कमळं, त्याचे लाल लाल लोलक,लाल बुट्टीदार गालीच्यांच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात भरत होते. फ्रेंच क्रिस्टल ग्लासचे कठडे असलेला, लाल कार्पेटने आच्छादित केलेला रुंद जीना उतरून आम्ही खालच्या भव्य हॉलमध्ये आलो. सगळीकडे सुंदर शिल्पे मांडलेली होती. भिंतीवरील भव्य छायाचित्रे नजर खिळवून ठेवत होती. हॉलमध्ये साडेसातशे दिव्यांचं, चार हजार किलो वजनाचं भव्य झुंबर आहे. हे झुंबर ज्या छताला बसवलं आहे ते छत इटालियन, ग्रीक, फ्रेंच अशा कारागिरांच्या कलाकृतींनी सजलेलं आहे. छत अशा पद्धतीने रंगविलं आहे की ते सरळ, सपाट असे न वाटता, इल्युजन पेंटिंगमुळे घुमटाकार  भासत होतं.

‘हिप्पोड्रोम’ हे रोमन काळामध्ये रथांच्या शर्यतीचं ठिकाण होतं. जवळच इजिप्तहून आणलेला ओबेलिक्स म्हणजे ग्रॅनाईटचा खांब उभा केला आहे. त्यावर इजिप्तशियन चित्रलिपी कोरलेली आहे. त्यापासून थोड्या अंतरावर डेल्फीहून म्हणजे ग्रीसमधून आणलेला सर्पस्तंभ आहे. त्याची सोन्याची  ३ मुंडकी लुटारुंनी फार पूर्वीच पळविली आहेत. जवळच एका जर्मन सम्राटाने सुलतानाला भेट म्हणून दिलेलं कारंजं आहे.

तिथून थोड्या अंतरावर सम्राट जस्टिनियन याने चौदाशे वर्षांपूर्वी बांधलेला टोरेबातान सरा नावाचा जलमहाल आहे. जमिनीखाली असलेला हा जलमहाल अजूनही चांगल्या स्थितीत आहे. ग्रॅनाईटच्या लाद्यांवर जुन्या महालांचे सुस्थितीतील ३५० खांब उभे करून त्यावर गच्चीसारखं बांधकाम केलं आहे. लांबवर असलेल्या डोंगरातील पाणी पाईपने  इथे आणून त्याचा साठा करून ठेवंत असंत. युद्धकाळात या साठ्याचा उपयोग होत असे. या जलमहालाचा एक खांब म्हणजे ‘मेडूसा’ या शापित सौंदर्यवतीचा मुखवटा आहे. मेडूसाचा हा मुखवटा उलटा म्हणजे डोकं खाली टेकलेला असा आहे. तिच्याकडे सरळ, नजरेला नजर देऊन कोणी पाहिलं तर ती व्यक्ती नष्ट होत असे अशी दंतकथा आहे.

इस्तंबूल भाग १ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोळ्यांतले पाणी…भाग 3 ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ डोळ्यांतले पाणी…भाग – 3 ☆ सौ. अमृता देशपांडे  

प्रसंग साधेच. सर्व सामान्यांच्या  घरात घडणारे. पण त्यातल्या डोळ्यातल्या पाण्यानं भावनांचं गहिरेपण कळतं.

40वर्षापूर्वी ची गोष्ट. रमण 18 वर्षाचा, BSc पहिल्या वर्षाला अॅडमिशन घेतली होती. सुशिक्षित आणि सुसंस्कृत आईवडील. समाजात त्यांना खूप मान. पण हा सामाजिक मान आणि त्यांची आर्थिक परिस्थिती म्हणजे एका काठीची दोन टोकं. कधीच एकमेकांना न मिळणारी.  काॅलेजला जायचे म्हणजे पुरेसे कपडे तरी पाहिजेत. अगदी छानछोकी नाही तरी जेमतैम दोन पॅन्ट आणि शर्ट! भाऊ भाऊ एकमेकांचे कपडे वापरायचे.  होती जी पॅन्ट, ती पण जुनी झालेली. त्यादिवशी रमणची रोजची बस चुकली. प्रॅक्टिकल चुकले म्हणून प्रोफेसर रागावले. घरातून निघताना काही खाल्लं नव्हतं, म्हणून  कॅन्टीनमध्ये गेला तर खिशात पैसे नव्हते. तसाच काॅलेजवर परतला, दुस-या तासाला उशीर नको म्हणून गेटवरून उडी मारून शाॅर्टकट घ्यायला गेला,  तर पॅन्ट खिशापासून गुडघ्यापर्यत टर्रकन फाटली. रमणच्या डोळ्यांसमोर अक्षरशः अंधार झाला. तडक निघाला आणि पॅन्टचा तुकडा सावरत घरी आला. सकाळ पासून घडलेल्या घटनांनी तो अस्वस्थ झालाच होता. त्यात हे संकट! अचानक घरी आलेला बघून आणि त्याचा गोरापान चेहरा तांबडा लाल झालेला बघून ताईनं जवळ जाऊन विचारलं, काय झालं रे?  तेव्हा पॅन्ट दाखवून ताईला मिठी मारून रडायला लागला. त्या रडण्यात दुःख होतं, ते त्याच्या आवाक्यात नसणा-या आर्थिक परिस्थिती चं. प्रोफेसरांच्या सर्वांसमोर रागावण्याचं, वडिलांच्या धाकाचं, आणि उद्या काय? या नैराश्यपूर्ण प्रश्नाचं.  असे अनेक तरूण आहेत रमणसारखे,  अगतिक,  आणि परिस्थितीनं गांजलेले..त्यांच्या डोळ्यातले पाणी नैराश्याचं, असहाय्यतेचं! 

जर रमण त्यावेळी रडला नसता, त्यानं स्वतःच्या भावना रडून मुक्त केल्या नसत्या तर त्याच्या मनात चीड, राग, अशा वैफल्यग्रस्त वृत्ती निर्माण झाल्या असत्या.  त्यातून आईवडिलांना रागाने बोलणे, अपमान करणे,  त्यांच्या पासून दूर जाणे हे घडलं असतं.  पण रडून मोकळा झाल्यामुळे त्याचं मन त्या क्षणी तरी शांत झालं. नंतर तो परिस्थिती चा समजूतदारपणे विचार करेल,  जे घडलं ते स्वीकारून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल.आणि तेच योग्य असेल ना?

डोळ्यातल्या पाण्याचं योग्य वेळी उतरणं माणसाला सद्सद्विवेक बुद्धी स्थिर ठेवायला मदत करते.

(क्रमशः… प्रत्येक मंगळवारी)

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ लेडीज फर्स्ट — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? जीवनरंग ?

☆ लेडीज फर्स्ट — भाग – 2 – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

(बऱ्याचश्या मुलांना पालकांनी भाषण लिहून दिल्याचं जाणवत होतं, तरी मुलांची स्मरण शक्ती, बोलण्यातले उतार चढाव, श्रोत्यांच्या नजरेत बघून बोलणं, प्रत्येक गोष्ट खरोखर कौतुकास्पद होती. ) इथून पुढे —–

जवळजवळ पाच ते सहा भाषणं झाल्यावर रोहितचा नंबर आला. त्याने मात्र स्वतःच भाषण तयार केलं होतं , कारण शोभनाला तेच अपेक्षित होतं.

“व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मला सर्वांत प्रिय व्यक्ती म्हणजे माझे बाबा ! मी असे का म्हणतोय ते तुम्हाला माझे बोलणे ऐकून झाल्यावर समजेलच.

बाबा मला अगदी छोट्या छोट्या प्रसंगातून खूप महत्वाच्या गोष्टी समजावून सांगतात. मी आपणासमोर काही प्रसंग सांगणार आहे. 

पहिली गोष्ट बाबांनी शिकवली ती म्हणजे, स्त्रीचा सन्मान. पण सन्मान म्हणजे नुसती पूजा नव्हे तर सक्षम बनवणं, संधी उपलब्ध करून देणे. बाबांनी जे शिकवले, तसंच ते स्वतः ही वागले.  

माझी आई जेव्हा लग्न होऊन घरी आली त्यावेळेस ती फक्त बारावी झालेली होती. घरात अगदी पुराणमतवादी वातावरण होते, पण बाबांनी सगळ्यांशी विरोध पत्करून आईला शिकवायचे ठरवले. तिला कॉलेजला अॅडमिशन घेऊन दिली आणि तिला स्वतःची स्कुटर दिली व ते स्वतः बसने जात. ते आईला म्हणत ‘ तुला घरातली सर्व कामं करून कॉलेजला जावे लागते खूप दमछाक होते तुझी. ‘ आणि  अश्याप्रकारे, आपल्या शाळेला लाभलेल्या ह्या आदर्श मुख्याध्यापिका साकारल्या.

एवढंच नाही तर तीन वर्षांपूवी बाबांना बँकेमार्फत फोर व्हिलर गाडी मिळाली, त्यावेळेस देखील बाबा आईला म्हटले ‘ तू गाडी वापरत जा, मी जाईन स्कुटरने. हे बघ तू शिक्षिका आहेस, शिक्षकांनी शाळेत कसं भरपूर ऊर्जेने जायला हवं, कारण तुम्ही शिक्षक लोक पिढ्या घडवायचं काम करता, तुम्ही जेवढे कम्फर्टेबल असणार तेवढं मुलांना चांगलं शिकायला मिळेल.’  

दुसरी गोष्ट सांगतो, त्यांनी नेहमी श्रमाला प्रतिष्ठा द्यायला शिकवले. घरी येणारा कोणीही कष्टकरी असो, त्याला प्रेमाने वागवायचे असे ते सांगत. कधीही छोट्या छोट्या व्यावसायिकाबरोबर पैशाची घासाघीस करू देत नसत. 

अगदी रस्त्यावरून जातांना एखादा ढकलगाडीवाला जरी जात असेल, तर ते त्याला आधी जाऊ देतात . ते म्हणतात,

 ‘ आपल्याला गाडीवर जायचं असतं, पण त्याला एवढं वजन स्वतः ढकलत न्यायचं असतं.’

त्यांनी शिकवलेली अजून एक गोष्ट सांगतो. खरं म्हणजे तो एक प्रसंग होता. माझी परीक्षा जवळ आली होती आणि मी आईला, पहाटे लवकर उठवायला सांगून झोपलो होतो, पण तिने उठवले नाही आणि मग मला उशिराने जाग आल्यावर जोरात भोंगा पसरवला. घरात मोठाच गोंधळ निर्माण झाला. मी काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतो, तेव्हा बाबा आले आणि मला बाजूला नेऊन म्हणाले, ‘ मी काय सांगतो ते नीट ऐक आणि मग ठरव, रडायचं की काय करायचं. हे बघ बाळा दुसरी मुलं अभ्यास करायला लागतो म्हणून रडतात.  पण आमचा मुलगा अभ्यास करायला मिळाला नाही म्हणून रडतो , किती भाग्यवान आहोत आम्ही. आणि दुसरं एक सांगतो, आपल्याला येणाऱ्या अडचणी, दुःख आणि सुख या सर्व गोष्टींना आपण स्वतःच जबाबदार असलं पाहिजे. असं असेल तरच आपल्याला त्यातून मार्ग काढायला सुचतं. दुसऱ्याला जबाबदार धरलं तर कधीही तो प्रश्न सुटत नाही. आता तूच ठरव, जे झालं त्याला कोण जबाबदार?’

बाबाचं म्हणणं ऐकून मला एकदम काहीतरी सुचलं, रडणं बिडणं कुठेच पळून गेलं. दुसऱ्या दिवसापासून मी घड्याळामध्ये अपेक्षित वेळेचा गजर लावून झोपू लागलो आणि तेव्हापासून अगदी वेळेवर, कुणीही न उठवता देखील उठतो.

असे कितीतरी प्रसंग सांगता येतील, पण वेळेचं भान ठेवलं पाहिजे. 

तर अशाप्रकारे बाबांनी मला बरीच अमूल्य अशी मूल्ये शिकवली. आईने शरीराचं संगोपन केलं तर बाबांनी संवेदनशील मन जोपासलं. 

आई ही हिऱ्याची खाण असेल तर बाबा त्यातला हिऱ्यांना पैलू पडणारे जवाहीर आहेत. 

आणि म्हणून माझी सर्वात आवडती व्यक्ती म्हणजे माझे बाबा. आई तर प्रिय आहेच, परंतु आईपेक्षाही बाबा माझ्यासाठी माझे हिरो आहेत. माझे बाबा इज द ग्रेट..!

सर्वाना नमस्कार, जय हिंद !”

रोहितचं भाषण संपल्यावर सगळे उभे राहिले आणि बराच वेळ टाळ्या सुरू होत्या. 

बक्षीस अर्थात रोहितलाच मिळाले. बक्षीस वाटपाच्या वेळेस त्याच्या आई आणि बाबांना देखील स्टेजवर बोलवण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते बक्षीस वाटप होते. शोभनाला आज आपल्या नवऱ्याचा आणि मुलाचा खूप अभिमान वाटला.

विजयला तर जणू  जगण्याची नवी उमेद मिळाली, आणि रोहित– रोहितच्या आनंदाचे खरे कारण तर फक्त त्यालाच माहीत होते. 

बक्षीस वाटपाच्या वेळी विजय सर्वात मागे उभा होता तेव्हा कुलगुरू म्हटले, “विजयराव पुढे या .”

तेव्हा विजय नम्रपणे म्हणाला , “नाही सर,  लेडीज फर्स्ट.. !”

—  समाप्त —

लेखक : अज्ञात. 

संग्राहिका : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी कृतज्ञ आहे… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

सौ .कल्पना कुंभार

??

☆ मी कृतज्ञ आहे… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆

मी कृतज्ञ आहे

त्या विद्यामंदिराची ..

जिने मला घडवले

ओळख करून दिली जगाची ..

 

बोट पकडूनी आईचे .. टाकले

पहिले पाऊल त्या मंदिरात…

कुशीत घेतले बाईनी ..

नेले मला वेगळ्याच विश्वात..

 

 गिरवायला शिकवले ग म भ न 

 जिथे बोट धरुनी बाईंनी..

मी नेहमीच कृतज्ञ त्या शाळेशी 

अलंकृत केले मला जिने संस्कारांनी..

 

शाळेच्या त्या चार भिंतीत

आयुष्याचे ध्येय समजले..

पंखात भरारी घेण्याचे

बळही तिनेच दिले…

 

मित्र मैत्रिणी..सखे सोबती

भेटले त्या मंदिरात…

सरस्वतीचा वरदहस्त

बाईंच्या आशीर्वादात..

 

क्रीडांगणावर रमले मन

व्यायामाने सुदृढ तन..

राष्ट्रभावना जागृत होण्या

साजरे केले राष्ट्रीय सण…

 

अभ्यासाबरोबरच कलेशी

नाळ जोडली जिथे अलवार ..

वर्तन घडता काही चुकीचे

कधी कधी मिळाला छडीचा मार ..

 

नेहमीच मी कृतज्ञ

माझ्या या शाळेशी ..

घडवले मला जिने 

नाळ जोडली मातीशी ..

        

मला अजूनही आठवतो तो दिवस .. शाळेचा पहिला दिवस.. किती रडले होते मी.. आणि त्यानंतर एक वेगळच जग अनुभवलं.. माझ्यासारखेच रडणारे कितीतरी जण.. पण प्रत्येकाच्या पाठीवरून हात फिरवत.. त्याच्याशी गोड बोलून त्याला कुशीत घेणाऱ्या बाई.. रडता रडता एकमेकींकडे पहात .. हात घट्ट पकडून ठेवणाऱ्या मैत्रिणी.. मला इथेच भेटल्या..

चार भिंतीच्या या शाळेत काय काय नाही शिकले मी.. अभ्यास तर होतच होता.. पण माझ्यातला लेखनाचा गुणही इथेच सापडला मला.. कला, क्रीडा, विविध गुण दर्शन या कार्यक्रमातून आम्ही सगळेजण समृद्ध होत गेलो… अन् अमाप कौतुक नजरेत  साठवत ही शाळा आम्हाला घडवत गेली..

चुकताना सावरलं अन् आयुष्याचं एक ध्येय दिलं.. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पंखांना पुरेस बळही दिलं ते शाळेनेच.. सांस्कृतिक कार्यक्रमातून.. खेळातून.. विविध उपक्रमांतून.. जणू ही शाळा आम्हा सगळ्यांना आकार देत होती… घडवत होती.. घडवताना ठोकेही देत होती बरं का…

आज मागे वळून बघताना सगळ अगदी सगळ आठवतं.. अन् या माझ्या विद्यामंदिरा बद्दल मन कृतज्ञतेने भरून येत… त्यावेळी नाही व्यक्त होता आलं.. पण आता या माध्यमातून मला नक्कीच कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे..

मी खूप कृतज्ञ आहे माझ्या शाळेशी..

शतशः नमन तिच्या प्रत्येक पायरीशी ..

तिच्या प्रत्येक कोपऱ्यात साठवलेल्या आठवणींशी…

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल : 9822038378

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares