मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बारीपाडा…भाग -1 ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ बारीपाडा…भाग -1  ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

वाचाच अन् लाजाही थोडं …

श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात?

जे लोक दिवस भरात २००रु ची दारु ३००रु ची कोंबडी फस्त करतात त्यांनी ?

बारीपाडा हे महाराष्ट्रातले एक छोटेसे गाव (ता. साक्री, जि. धुळे). पलीकडे गुजरातचा डोंगराळ डांग जिल्हा पसरलेला.

मागील महिन्यात शासन जेव्हा अन्नसुरक्षेच्या ‘भिकमाग्या’ विधेयकाची तयारी करत होतं तेव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात १०० च्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी वस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहित नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या.

एका म्हातार्‍या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयकाबाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली….

मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला…. ‘ काय देवून राहिले भाऊ त्यात? ’

मी आपलं पोपटपंची केल्याप्रमाणे, ‘ १ रूपयाला ज्वारी/बाजरी, २ रूपयाला गहू, ३ रूपयाला तांदूळ ’ असं सांगितलं.

ती म्हातारी हसून म्हणाली, ‘ ज्वारी आमी खाईना, गहू बी जमत नाई.’ मला वाटले आता हिला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील.

मी म्हणालो, ‘तांदूळ खाता ना तुम्ही?’

तिने मान डोलावली….. ‘ मग हा तांदूळ तूम्हाला मिळंल की खायला ’….मी.

म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली. ‘ त्यो तसला तांदूळ आमी खाईना.’

मला कळेना शासनाच्या या भिकमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे?

मग मला बाजूला उभ्या असलेल्या एका तरूण पोरानं समजावून सांगितलं… ‘ साहेब, यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबेमोहोरासारखा घमघम वास येतो. त्याचं नाव इंद्रायणी. हा तांदूळ हे लोक शेतात स्वत:पुरता घेतात. बाहेर फारसा विकतही नाहीत.’

मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको.

मग मी त्या तरूणाला विचारले… ‘ गावात इतर गोर गरीब असतील ना. त्यांना तर हे अन्न फायद्याचे ठरेल.’

त्या तरूणाने मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेले. अतिशय चांगले बांधलेले सभागृह. तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते. त्यात गावची लोकसंख्या, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, असली बरीच माहिती होती. एका मोलाच्या माहितीकडे त्याने माझे लक्ष वेधले. त्याने काहीही न बोलताही माझे डोळे खाडकन उघडले.

तिथे लिहीलं होतं…. ” दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्य “.

या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही, ग्रामपंचायतीचे सभागृह, शाळेच्या खोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही, तिथे हे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दरिद्री नाही.

— म्हणजे तिकडे दिल्लीला ‘ सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भुकेने मरत आहे. त्याला कसे जगवले पाहिजे, ’ असं सर्व नेते सांगत आहेत. आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानाने सांगत आहे की आमच्या गावात दारिद्य्ररेषेखाली कुणीच नाही.

गावात ४ थी पर्यंत शाळा. शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं. शाळेत रजा न देता गैरहजर राहणार्‍या शिक्षकाला गावानं ५००० रूपयाचा दंड ठरवून दिला आहे. परिणामी इथे नौकरी करायला दांडीबहाद्दर मास्तर घाबरतात. गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते. व्यवस्थित नाल्या काढलेल्या. कुठेही घाण कचरा साठलेला नाही.

अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतीवर ठळकपणे लिहून ठेवलेले. सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली.

मी विचारले, ‘ याची काय गरज? ’

माझ्या सोबतचा तरुण पोरगा म्हणाला… ‘ कुनीबी फोन लावून इचारू शकते ना भाऊ.’

म्हणजे इकडे दिल्लीला संसदेत विरोधी पक्षांनी गोंधळ घालावा म्हणून सत्ताधारीच प्रयत्न करतात. कारण काय तर गोंधळात महत्त्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात. चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचूप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर. तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकर्‍यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीनं काम करत आहे.

क्रमशः… 

संग्राहिका : हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रवास… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ प्रवास… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना 

हरलो का जिंकलो, काही उमजेना 

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो 

 आलेल्या प्रसंगाशी लढत राहिलो —

 

खाच खळगे, काट्या झुडपातून मार्गस्थ झालो 

 धडपडत, चाचपडत, पडून, उभा राहिलो

 तरतरीत, टवटवीत होऊन ताजातवाना झालो 

 पुढे मखमली गालिच्यावरून चालत राहिलो पण —

गालिच्याखालची टोकेरी दगड टोचत राहिली 

 जमिनीवरच्या मातीची आठवण देत राहिली —

 

काही प्रसंगी हरून जिंकलो  

तर काही प्रसंगी जिंकून हरलो 

काही लढाया डोक्याने लढलो 

तर काही लढाया मनाने जिंकलो 

 

—डोक्याच्या लढायांना सर्व साथीला होते 

     मनाच्या लढायांना फक्त हृदयच साक्षीला होते —

 

काय कमावले, काय गमावले हिशोब जुळत नाही 

काय जमवले, काय हरवले काहीच कळत नाही—

 

सुख दुःखाच्या खेळामध्ये कठपुतळी झालो 

 नशिबाच्या लाटेवर तरंगत वहात राहिलो —

 

 सुख काय, दुःख काय, सारे सारखे वाटत गेले 

 त्याच्या पलीकडे जाऊन—

 माणूस होऊन, दुसऱ्यांसाठी, जगावेसे वाटत राहिले —

 

होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना 

हरलो का जिंकलो, काही उमजेना 

पण महत्वाचे हे की —

जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो 

सुखदुःखाच्या पलीकडे बघत राहिलो —

 

आणि—

आणि फक्त नी फक्त— 

आनंदाची देवाण घेवाण करत राहिलो 

आंनदाची देवाण घेवाण करत राहिलो 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! ☆ ना गी ण ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🐍 ना गी ण ! 😅 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

रविवार असल्यामुळे, नाष्टा वगैरे करून फुरसतीत दाढी करत होतो आणि तेवढ्यात दारावरची बेल वाजली. तोंड फेसाने माखल्यामुळे बायकोला म्हटलं, “बघ गं जरा कोण तडमडलय सकाळी सकाळी ते !” “बघते !” असं बोलत बायकोने दरवाजा उघडला. “मकरंद भावजी तुम्ही एवढ्या सकाळी आणि ते ही लुंगीवर आणि हे तुमच्या बरोबर कोण आलंय ?” हिचा तो तार स्वर ऐकून मी घाबरलो आणि टॉवेलने तोंड पुसत पुसत बाहेर आलो. “काय रे मक्या, काय झालंय काय असं एकदम माझ्याकडे लुंगीवर येण्या इतकं?” “वारेव्वा, मला काय धाड भरल्ये ? अरे तुलाच ‘नागीण’ चावल्ये ना ? वहिनी म्हणाल्या तसं मोबाईलवर, म्हणून शेजारच्या झोडपट्टीत राहणाऱ्या ह्या ‘गारुडयाला’ झोपेतून उठवून आणलंय, तुझी नागीण उतरवायला !” “अरे मक्या गाढवा नागीण चावली नाही, नागीण झाल्ये मला !” “असं होय, मला वाटलं चावल्ये, म्हणून मी या गारुड्याला घेवून आलो !” मी गारुड्याला म्हटलं “भाईसाब ये मेरे दोस्त की कुछ गलतफईमी हुई है ! आप निकलो.” “ऐसा कैसा साब, मेरी निंद खराब की इन्होने, कुछ चाय पानी….” मी गपचूप घरात गेलो आणि पन्नासची नोट आणून त्याच्या हातावर नाईलाजाने ठेवली. तो गारुडी गेल्यावर मी मक्याला म्हटलं “अरे असं काही करण्या आधी नीट खात्री का नाही करून घेतलीस गाढवा ? आणि नागीण चावायला आपण काय जंगलात राहतो का रे बैला ?” पण मक्या तेवढ्याच शांतपणे मला म्हणाला “अरे जंगलात नाहीतर काय ? ही आपली ‘वनराई सोसायटी’ आरे कॉलनीच्या जंगलाच्या बाजूला तर आहे ! आपल्या सोसायटीत रात्री अपरात्री बिबट्या येतो हे माहित नाही का तुला ?” “अरे हो पण म्हणून…” “मग नागीण का नाही येणार म्हणतो मी ? गेल्याच आठवड्यात बारा फुटी अजगर पकडाला होता ना आपल्या पाण्याच्या टाकी जवळ, मग एखादी नागीण…” शेवटी मी त्याची कशी बशी समजूत काढली आणि त्याला घरी पिटाळलं !

पण मक्या गेल्या गेल्या बायको मला म्हणाली, “आता साऱ्या ‘वनराईत’ तुमच्या या नागिणीची बातमी जाणार बघा !” “ती कशी काय ?” “अहो आपल्या ‘वनराई व्हाट्स ऍप गृपचे’ मकरंद भाऊजी ऍडमिन आणि अशा बातम्या ते ग्रुपवर लगेच टाकतात !” तीच बोलणं पूर होतंय न होतंय तोच आमच्या दोघांच्या मोबाईलवर, एकाच वेळेस मेसेज आल्याची बेल वाजली ! बायकोच भाकीत एवढ्या लवकर प्रत्यक्षात उतरेल असं वाटलं नव्हतं ! तो मक्याचाच व्हाट्स ऍप मेसेज होता ! “आपल्या ‘वनराईत’ बी बिल्डिंगमध्ये राहणारे वसंत जोशी यांना नागीण झाली आहे. तरी यावर कोणाकडे काही जालीम इलाज असल्यास त्यांनी लगेच जोशी यांच्याशी संपर्क साधावा, ही कळकळीची नम्र विनंती !” मी तो मेसेज वाचला आणि रागा रागाने मक्याला झापण्यासाठी मोबाईल लावणार, तेवढ्यात परत दाराची बेल वाजली ! कोण आलं असेल असा विचार करत दरवाजा उघडला, तर वरच्या मजल्यावरचे ‘वनराईतले’ सर्वात सिनियर मोस्ट गोखले अण्णा दारात काठीचा आधार घेत उभे !

“अण्णा, तुम्ही ? काही काम होत का माझ्याकडे ?” “अरे वश्या आत्ताच मक्याचा व्हाट्स ऍप मेसेज वाचला आणि मला कळलं तुला नागीण झाल्ये म्हणून ! म्हटलं चौकशी करून यावी आणि त्यावर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे तो पण सांगावा, म्हणून आलो हो !” “अण्णा माझे डॉक्टरी उपाय चालू आहेत, बरं वाटेल एक दोन….” मला मधेच तोडत अण्णा म्हणाले “अरे वश्या ह्या नगिणीवर आलो्फेथीचे डॉक्टरी उपाय काहीच कामाचे नाहीत बरं !” “मग?” “अरे तिच्यावर आयुर्वेदिकच उपाय करायला हवेत, त्या शिवाय ती बरं व्हायचं नांव घेणार नाही, सांगतो तुला!” “पण डॉक्टर म्हणाले, तसा वेळ लागतो ही नागीण बरी व्हायला, थोडे पेशन्स ठेवा!” “अरे पण पेशन्स ठेवता ठेवता तीच तोंड आणि शेपटी एकत्र आली, तर जीवाशी खेळ होईल हो, सांगून ठेवतो !” “म्हणजे मी नाही समजलो ?” “अरे वश्या ही नागीण जिथून सुरु झाल्ये ना ती तिची शेपटी आणि ती तुझ्या कपाळावरून जशी जशी पुढे जात्ये नां, ते तीच तोंड !” “बापरे, असं असतं का ?” “हो नां आणि एकदा का त्या तोंडाने आपलीच शेपटी गिळली की खेळ खल्लास!” “काय सांगताय ? मग यावर काय उपाय आहे म्हणालात अण्णा ?” “अरे काय करायच माहित्ये का, रात्री मूठ भर तांदूळ भिजत घालायचे आणि सकाळी मूठभर हिरव्यागार दुर्वा आणून त्यांची दोघांची पेस्ट करून त्याचा लेप करून या नागिणीवर लावायचा ! दोन दिवसात आराम पडलाच म्हणून समज !” “अहो अण्णा, पण नागीण आता कपाळावरून केसात शिरत्ये, मग केसात कसा लावणार मी लेप ?” “वश्या तुझ्याकडे इलेक्ट्रिक रेझर असेलच ना, त्याने त्या सटवीच्या मार्गातले केस कापून टाक, म्हणजे झालं !” “अण्णा पण कसं दिसेल ते ? डोक्याच्या उजव्या डाव्या बाजूला रान उगवल्या सारखे केस आणि मधून पायावट! हसतील हो लोकं मला तशा अवतारात !” “हसतील त्यांचे दात दिसतील वश्या ! तू त्यांच हसणं मनावर घेवू नकोस!” “बरं बघतो काय करता येईल ते !” अण्णांना कटवायच्या हेतूने मी म्हणालो. “नाहीतर असं करतोस का वश्या, सगळं डोकंच भादरून टाक, म्हणजे प्रश्नच मिटला, काय ?” “अहो अण्णा, पण तसं केलं तर लोकं वेगळाच प्रश्न नाही का विचारणार ?” “ते ही खरंच की रे वश्या ! तू बघ कसं काय करायच ते, पण त्या सटविच तोंड आणि शेपटी एकत्र येणार नाही याची काळजी घे हो बरीक ! नाहीतर नस्ती आफत ओढवायची !” असं म्हणून अण्णा काठी टेकत टेकत बाहेर पडले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला !

मी किचनकडे वळून म्हटलं “अगं जरा चहा टाक घोटभर, बोलून बोलून डोकं दुखायला लागलंय नुसतं !” आणि सोफ्यावर बसतोय न बसतोय तर पुन्हा दाराची बेल वाजली ! आता परत कोण तडमडल असं मनात म्हणत दार उघडलं, तर दारात शेजारचे कर्वे काका हातात रक्त चंदनाची भावली घेवून उभे ! मी काही विचारायच्या आत “ही रक्त चांदनाची भावली घे आणि दिवसातून पाच वेळा त्या नागिणीला उगाळून लाव, नाही दोन दिवसात फरक पडला तर नांव नाही सांगणार हा धन्वंतरी कर्वे !” असं बोलून आपल्या शेजारच्या घरात ते अदृश्य पण झाले! ते गेले, हे बघून मी सुटकेचा निश्वास टाकतोय न टाकतोय तर लेले काकू, हातात कसलासा कागदाचा चिटोरा घेवून दारात येवून हजर ! लेले काकूंनी तो कागद मला दिला आणि म्हणाल्या “या कागदावर किनई एका ठाण्याच्या वैद्याच नांव, पत्ता आणि फोन नंबर आहे, ते नागिणीवर जालीम औषधं देतात ! आधी फोन करून अपॉइंटमेंट घ्या बरं ! त्यांच्याकडे भरपूर गर्दी असते, पण लगेच गुण येतो त्यांच्या हाताचा ! आमच्या ह्यांना झाली होती कमरेवर नागीण, पण दोन दिवसात गायब बघा त्यांच्या औषधी विड्याने ! आणि हो काम झाल्यावर हा पत्त्याचा कागद आठवणीने परत द्या बरं का !” एवढं बोलून लेले काकू गुल पण झाल्या !
मी त्या कागदावरचा नांव पत्ता वाचत वाचत दार लावणार, तेवढ्यात ए विंग मधल्या चितळे काकूंनी एक कागदाची पुडी माझ्या हातावर ठेवली आणि “ही आमच्या ‘त्रिकालदर्शी बाबांच्या’ मठातली मंतरलेली उदी आहे ! ही लावा त्या नागिणीवर आणि चिंता सोडा बाबांवर! पण एक लक्षात ठेवा हं, ही उदी लावल्यावर दुसरा कुठलाच उपाय करायचा नाही तुमच्या नागिणीवर, नाहीतर या उदीचा काही म्हणजे काही उपयोग होणार नाही, समजलं ?” मी मानेनेच हो म्हटलं आणि आणखी कोणी यायच्या आत दार बंद करून टाकलं ! आणि मंडळी घरात जाऊन पहिलं काम काय केलं असेल, तर PC चालू करून त्यावर “Please do not disturb !” अस टाईप करून त्याची मोठ्या अक्षरात प्रिंटरवर प्रिंट आउट काढली आणि परत दार उघडून पटकन बाहेरच्या कडीला अडकवून दार लॉक करून, शांतपणे सोफ्यावर आडवा झालो !

© प्रमोद वामन वर्तक

१२-०८-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र जीवांचे… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

? विविधा ?

☆ मैत्र जीवांचे… ☆ सौ. सीमा राजोपाध्ये ☆

  पावसाने पुन्हा आपली बॅटिंग सुरू केली आहे. डोळे मिटून आपला संततधार पडतोय बिचारा..

 त्यामुळे सकाळी उठून बघते तो काय…..

 पाऊस तर सुरूच आणि समोरच्या रस्त्यावर साचलेले पाण्याचे तळे …

 घराच्या जवळ कन्नड शाळा आहे.  सकाळी दोघे जण..६/७ वी मधील असतील…

 खांद्यावर हात टाकून आपल्ं दप्तर भिजू नये याची काळजी घेत… पाऊस पडत असताना सुद्धा… निवांत एका छत्रीतून

, कधी  कधी चालताना पाणी  उडवत असं निघाले होते..

 बाहेरच्या कुठल्याही वातावरणाचा त्यांच्यावर  परिणाम होतच नव्हता …..

छान काही गप्पा रंगल्या होत्या…

मनात आलं…

लहानपण दे गा देवा…मुंगी साखरेचा रवा …..

आणि आठवलं…

 खांद्यावर हात टाकून एकमेकांला टाळी देत मारलेल्या दिलखुलास गप्पा …

कोणी थोडासं कोणी नर्वस वाटलं तर पाठीवर हात मारत.. काय झाले आज??? अशी आपुलकीने केलेली विचारणा..

 एखादं कुणी शांत शांत वाटलं तर  सूर्य कुठे उगवला नक्की .. इकडे शांतता कशी?? असं म्हणत..त्याला/तिला बोलतं करणं..

 कुणाच्या ही नवीन गोष्टी च…  दिलखुलास कौतुक करणं… एकत्र डबा खाणं…

अभ्यास एकत्र करणं..

कुणी चार-पाच दिवस शाळेला नाही आलं तर का आला नसेल अशी काळजी करणं..

 नाही तर सरळ त्याच्या घरी जाऊन बिनधास्त धडकणं…

कंटाळा येईपर्यंत खेळणं…

 असं हे छोट्या छोट्या गोष्टीतून  मोठं मोठं प्रेम दाखवणारं आपलं बालपण आणि त्याच बालपणातील हे

 मैत्री जीवांचे

 

मैत्र जीवांचे…

 किती गोड…

 किती सुंदरता..सहजता..

 लहानपणी कुठल्याही गोष्टीचा फारसा विचार.. काळजी  नसताना… झालेली

  दिलखुलास..निरागस अशी ही शाळेतील मैत्री…

 नंतर पुढे कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींशी आपलं सहज सहज  नातं जोडून जाते..

 

 मैत्रीमध्ये सहजता खूप असते आणि त्या मुळे खरंतर सुरक्षित कवच  त्याला  तयार होते..

आणि मैत्री घट्ट होत जाते

 

कॉलेजमध्ये

 मग……

शाळेत असताना पावसात भिजू नये म्हणून ..एकाच छत्रीत २/३जाणारे आपण.. कॉलेजमध्ये मात्र मुद्दाम छत्री घरी विसरून जातो आणि मित्र मैत्रिणीबरोबर त्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटतो…

 ठरवून एखादा तास ऑफ करणं एकमेकाचे नोट्स एकमेकाला देणं..

एखाद्याच्या घरात काही अडचण आली तर सगळ्यांनी मदत करणं..

 कारण कॉलेजला येईपर्यंत तेवढी मॅच्युरिटी आलेली असते..

 बऱ्याच गोष्टींचे अर्थ कळत असतात …

त्यामुळे हसत खेळत तितकाच अभ्यास करत कॉलेजचे मोरपंखी दिवस या मैत्रीच्या धाग्यात पटापट निघून जातात…

 आणि खरं तर या्चमुळे आयुष्य भरासाठी अविस्मरणीय होतात..

आणि मग ..

एखाद्या दुःखात ही डोळ्यात येणारं पाणी लपवलं जातं .. चेहऱ्यावर हसू ठेवत धीर दिला जातो…

 कशासाठी.. आणि कशामुळे..

तर

 आपण मोठे झाल्यावर देखील छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद .. सहजता.. सुरक्षितता ..  प्रेम आपुलकी..  काळजी  एका मोठ्या अव्यक्त नात्यांत मिळतं असते तेच..

 मैत्र जीवांचे.

 

 मैत्री दिन झाला…

खूप सारे मेसेज वाचले..

बघितले..

 मर्यादा नसलेलं तरीही मर्यादेतच राहणार असं हे  सुरेख नातं… सर्वात जवळचं..

 सर्वात जास्त हक्काचं..

 अधिकार हट्ट याबरोबर कर्तव्य ही  जाणणारं.. असं हे अनमोल नातं ….

 मैत्र जीवांचे…

 कधी.. कसं.. कुणाबरोबर जुळून जातं समजत नाही..

आणि मग असे हे मैत्र जीवाचे…

 माणूस आपोआपच आपल्याही नकळत जपू लागतो…

 विचार आचार परिस्थिती  रूप रंग वय असा कुठलाही अडसर यामध्ये नसतोच…

 कधी कधी दोन समांतर रेषा सारख्या जाणाऱ्या व्यक्तीतही मैत्रीचा बंध फार घट्ट असतो… त्याचं कारण एकच की.. छोट्या छोट्या गोष्टीतून मोठा मोठा आनंद देणार असं हे नातं..

 मैत्र जीवांचे…

 

आजच्या या सोशल मीडियाच्या जगात .. या आभासी दुनियेतही असे प्रामाणिक मनस्वी मैत्रीचे धागे गुंतलेले आपल्याला दिसतात…

ते जपले जातात…

आनंदाची बरसात होतं असताना दुःख अडचणी अलगद बाजूला केल्या जातात….

कशासाठी आणि कशामुळे..

तर तिथे असतात ऋणानुबंध…

आपुलकीने जपलेले…

मैत्र जीवांचे..

© सौ.सीमा राजोपाध्ये..

8308684324

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सविताची व्यथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ सविताची व्यथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

मध्यंतरी  एका शिबिरासाठी एका खेडेगावात गेलो होतो. शिबिर झाले, पण ड्रायव्हर येईपर्यंत म्हटले, जरा फिरुया बाजारात.– खेड्यातला तो बाजार. पण तो बघतानाही गम्मत आली आम्हाला.

सहज मागे बघितले तर चेहरा खूप ओळखीचा वाटला. मी हाक मारायच्या आधीच तिने मला हाक मारली.

“ अग, इकडे कुठे तू?” 

सविता मध्ये फारसा बदल नव्हता झाला. अंगाने भरली होती,आणि श्रीमंतीचे तेज मात्र आले होते अंगावर.

“ सविता, इकडे राहतेस तू? अशा खेड्यात ?”

“ हो ग..चल बघू घरी माझ्या.” –तिने मला ओढतच तिच्या घरी नेले. छानच होता तिचा बंगला. शहरी पद्धतीने बांधलेला, सगळ्या आधुनिक सोयी असलेला. तिने बाईला हाक मारून चहा आणि काही खायला आणायला सांगितले.

“ सविता, कित्ती वर्षानी भेटतोय आपण. पुण्याला येत नाहीस का  कधी? आणि मुलं ?”  मी विचारले.

“ मुलगी चित्रा लग्न होऊन दिल्लीला गेली. मुलगा कुणाल डॉक्टर झाला,पुढचे शिकायला ऑस्ट्रेलियाला गेलाय.”

सविताचे सगळे चांगलेच झालेले दिसत होते.

सविता म्हणाली,” आठवतंय तुला ? अठराच वर्षाची होते ग मी. रमेशच्या प्रेमात पडले. त्याची आमची जात वेगळी, आई बाबांनी केवढा तमाशा केला, त्यावेळी घरातून पळून जाऊन लग्न करणे म्हणजे दिव्यच होते. पण आमच्या समोर दुसरा पर्यायच नव्हता. तोही बिचारा शिकतच होता. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याच्याही घरी विरोधच होता. तुला माहीत आहे की, तू आलेली होतीस मला भेटायला. नव्या पेठेत एका खोलीत रहात होतो बघ भाड्याने. तुला सांगते, नवीनवलाई संपल्यावर खाडकन डोळे उघडले दोघांचे. रमेशला कधीही कष्टाची सवय नाही,

घरून तो म्हणेल तितके पैसे यायचे .पण  हे सगळे बंद झाले. फार कठीण गेले ते आम्हाला. एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीची नोकरी धरली त्याने. पगार किती माहीत आहे? दोनशे रुपये. मी तर कॉलेज सोडूनच दिले होते.  आईबाबांनी माझे नावच टाकले. पण सुदैवाने रमेश पास झाला. हातात डॉक्टरची डिग्री तरी आली. मग गेला वडिलांना भेटायला. त्यांनी आधी खूप  तांडव केले. पण निदान,भर बाजारपेठेतली एक पडकी ओसरी दिली. रमेशने त्या जागेत दवाखाना सुरू केला. तिथेच मागे अर्ध्या जागेत आम्ही संसार थाटला. माझ्या मावशीने  लपून छपून दिलेली चार भांडी,यावर सुरू केला मी संसार. अतिशय हाल काढले बघ आम्ही. पण देवाचीच कृपा म्हणायची,

हळूहळू रमेशचा जम बसायला लागला. त्याच्या हाताला यश येऊ लागले. पेशंट वाढायला लागले. मग सासऱ्यानी दुसरी मोठी जागाही दिली. तिकडे रमेशने आधी एक मजला बांधला. तुमच्या पुण्याचेच सर्जन बोलावून आम्ही छोटेसे हॉस्पिटल सुरू केले. दर रविवारी पुण्याहून येत सर्जन..तेव्हा हे गाव इतकेही नव्हते वाढले ग. गरज होती इथे हॉस्पिटलची… किती काय सोसलेय सांगू तुला.” सविताच्या डोळ्यात पाणी आले. “ आता समजते बरं कोणाचाही आधार नसला की  काय वाटते ते. काय ग वाईट होते रमेशमध्ये. मी इतकी सामान्य, बुद्धीनेही,दिसायलाही.

पण नाही.आईने कायमच वैर धरले माझ्याशी. मला मुलगी झाली ना, तर आईबाबा बघायलाही नाहीआले.

कसले ग हे पीळ माणसाला—मीच माझे बाळंतपण करून घेतले. ठेवली एक बाई मदतीला. कसले ग ते  बाळंतपण.

पण रमेश सतत माझ्या बरोबर होता. आम्हाला होतेच कोण? सासरचे बघायला पण आले नाहीत मुलीला.”

सविताला खूप वाईट वाटत होते.

“ तू माझी अगदी शाळेतली मैत्रीण म्हणून मी हे सांगतेय तुला. तुलाही खूप हळहळ वाटली होती तेव्हा.”

“ हो ग सविता. मी तुला भेटायला आले होते, तेव्हाचा तुझा अवतार अजून आठवतोय. गळ्यात काळी पोत, आणि हातात नुसत्या काचेच्या चार बांगड्या.” 

“ हो ना.आणि त्या खोलीचे भाडे कसे देणार,ही चिंता. तुला सांगते,इतका पश्चात्ताप झाला दोघांना. नव्याचे रंग एका महिन्यात उडून गेले, जेव्हा बाहेरचे पिठामिठाचे भाव समजले.”

“ अग मग निदान रमेश डॉक्टर होईपर्यंत तरी का नाही थांबलात? रागावू नको हं मी विचारले म्हणून.”

“ कसे थांबणार होतो बाई.आईने कोंडून ठेवले होते मला. तुला माहीत आहे नं ती कशी होती ते. वर पुन्हा कोणतातरी मुलगा आणला, म्हणाली, ‘ चार दिवसात लग्न लावते बघ तुझे याच्याशी.’  मी कशीबशी निसटले. मग लग्न करण्याशिवाय पर्यायच नव्हता बघ.” 

एक सुस्कारा टाकून ती पुढे म्हणाली.,“ आता मागे वळून बघितले तर वाटते, मी हे धाडस का केले आणि त्यालाही करायला लावले. हा चकवा माणसाला भुलवतो, काही सुचू देत नाही बघ. कसले प्रेम अन काय ग. भूलच पडते बघ बुद्धीवर.” सविताला हुंदके अनावर झाले.

मी तिला जवळ घेतले, “अग वेडे,आता झाले ना सगळे छान? मुलगा डॉक्टर झाला, मुलगी शिकली-सुखात आहे सासरी. चांगली डॉक्टर सूनबाई आलीय. काय हवे अजून तुला?”

सविता म्हणाली, “ तेही खरेच ग. पण आधीच्या जखमा विसरू म्हणता विसरता येत नाहीत ना .मूर्खासारखी शिक्षण सोडून बसले. रमेशला पुढचे शिकता आले नाही.–असो. म्हणून मी एक धडा घेतला. मुलांना सांगितले,आपली शिक्षणे पूर्ण झाल्याशिवाय, पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न नाही. मुले गुणी निघाली ग माझी. सून आणि मुलगा, पुढे शिकायला ऑस्ट्रेलियाला गेलेत. सून माझी डोळ्यांची सर्जन आहे आणि लेक मुलांचा डॉक्टर. केली की नाही जिद्द पुरी.”

“ सविता, खरोखर जिंकलेस हो, या यशासारखे दुसरे यश नाही.”

“ हो ग. पण या सगळ्यात माहेर तुटले माझे. आईबाबा कधीही आले नाहीत. मी गेले होते चार वेळा. पण त्यांनी दारही उघडले नाही मला.”

“ सविता,जाऊ दे ते. छान केलास की संसार.”

सविताने मला तिचे घर दाखवले. हॉस्पिटल दाखवले. रमेशलाही  खूप आनंद झाला मला भेटून.

‘आता मुलगा आला की आणखी दोन मजले वर बांधणार आहोत ‘ म्हणाला.

निघताना सविताने माझी ओटी भरून सुंदर साडी दिली. मला अगदी अवघडल्यासारखे झाले.

“नाही म्हणू नको ग. तू आमचे सगळे सगळे  दुर्दैवाचे अवतार बघितलेस. आता  आमचे हे  वैभवही  तू बघावेस ही देवाचीच इच्छा होती. नाहीतर तू असल्या खेड्यात कशाला येशील आणि आम्हाला भेटशील ? आता  लेकाचे मोठे हॉस्पिटल बांधून होईल तेव्हा नक्की येशील ना?”  रमेशने मनापासून विचारले.

“ नक्की येणार. भाच्याचे आणि सूनबाईचे कौतुक करायला.” मी म्हणाले.

सविता रमेशने मनापासून पुन्हा यायचे आमंत्रण देऊन मला निरोप दिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पवित्र -आनंददायी वास्तू ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ पवित्र -आनंददायी वास्तू ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆

एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.

त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे 100 वर्ष जुने लिचीचे झाड होते.

 त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.

काही काळानंतर घराचे नूतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.

त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि हाँगकाँग येथील, वास्तुशास्त्राचे तज्ञ मानले जाणारे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.

काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे. मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.

घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मूल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले.  त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता.  तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले -” दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?”

ते मोठ्या सहजतेने म्हणाले, “ मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..”

मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की “ तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.”

घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, ” जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ थांबू शकतो का? “

मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की,  ” कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.”

मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, ” या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही.”

त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले – का?

मास्टर काओ – ” जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील – ते ठिकाण , ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय पवित्र-आनंददायी-फलदायी असेल “.

— मित्रांनो, आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.

जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.

आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा “वास्तू”सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.

संग्राहक : सुनीत मुळे 

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘हरवू पहाणारा थारा!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘ हरवू पहाणारा थारा!’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

‘वळचण’ म्हणजे एक आडोशाची जागा. अंधारी.., सहज नजरेस न पडणारी.. आणि म्हणूनच सुरक्षित! जुन्या काळातल्या कौलारु घरांच्या उतरत्या छपराचा पुढे आलेला भाग आणि वासा यामुळे निर्माण झालेला हा आडोसा म्हणजेच  ‘वळचण’ ! ही वळचण प्रत्येक घराचाच एक अविभाज्य भाग असायची. उन्हाची काहिली सहन न होऊन पसाभर सावलीच्या असोशीने किंवा अचानक एखादी पावसाची जोरदार सर येताच घरट्याकडे झेप घेण्याइतकी उसंत मिळाली नाही म्हणून पक्षी अतिशय विश्वासाने धाव घ्यायचे ते हाकेच्या अंतरावरच्या अशा कौलारू घरांच्या वळचणींकडेच!

अतिशय शांत जलाशयावर अचानक एखादा खडा पडताच असंख्य तरंग उमटत रहातात. ‘वळचण’ या शब्दाचा मनाला स्पर्श होताच असंच होतं. कधीही सहजासहजी डोकं वर न काढता मनाच्या वळचणीला अंग चोरून पडून राहिलेल्या जुन्या काळातल्या कितीतरी आठवणी त्या स्पर्शाने जाग्या होत मनात त्या जलाशयावर उमटणाऱ्या तरंगांसारख्याच झुलत रहातात.. !

वळचणीला कांही काळापुरतं आश्रयाला येणाऱ्या पक्षांसाठी त्या कौलारु घरांबाहेरची वळचण हा हक्काचा निवारा असायचा कारण त्यांना तिथे घरातली माणसं हुसकून न लावता आवर्जून थारा द्यायची. हा थारा आश्रयाला आलेल्या पक्षाला निश्चिंतता देणारा म्हणूनच सुरक्षित वाटायचा. वळचणीला आलेल्या पक्ष्यांच्या मनात संकोच्यापोटी आलेलं दबलेपण नसायचं आणि घरातल्या माणसांच्या मनातही उपकार करीत असल्याची भावना नसायची. ते नैसर्गिकपणेच आकाराला येत रुढ होत गेलेलं माणूस आणि निसर्ग यांचं आनंदी सहजीवनच होतं. आज मनाच्या वळचणीला विसावलेल्या त्या  काळातल्या असंख्य आठवणी मन:पटलावर जेव्हा तरंगतात तेव्हा त्या सहजीवनातील निखळ आनंदच आज कुठेतरी हरवून गेल्याच्या दुखऱ्या जाणिवेने निर्माण केलेली अस्वस्थता त्या आठवणींमधे अधिकच झिरपत जाते.

त्या आठवणी आहेत वळचणींच्याच पण त्या वळचणी कौलारु घरांच्या उतरत्या छपरांआडच्या वळचणी नाहीयत तर त्या अशा असंख्य कौलारु घरांमधल्या सर्वसामान्य आर्थिक स्तरावरच्या ओढग्रस्त जीवनशैलीतही त्या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या  वळचणींच्या आठवणी आहेत!

घराच्या आडोशाच्या वळचणीने पक्ष्याला दिलेला थारा त्या पक्षासाठी चटके देणाऱ्या उन्हात अचानक आकाशात डोकावणारा एखादा ओलसर काळा ढगच असायचा.. किंवा.. अनपेक्षित आलेली एखादी गार वाऱ्याची झुळूकही ! तोच दिलासा त्या कौलारु घरातल्या घरपणांनी जपलेल्या वळचणी घरी आश्रयाला आलेल्या आश्रितांना अगदी सहजपणे देत असायच्या !

अशा घरांमधे उतू जाणारी श्रीमंती कधीच नसायची. घरात खाणारी पाचसहा तोंडं आणि मिळवणारा एकटा. प्रत्येक घराचं चित्र हे एखाददुसरा अपवाद वगळता असं एकरंगीच. अगदी पै पैचा खर्चही विचारपूर्वक, अत्यावश्यक असेल तरच करायचा हे ठामपणे ठरवून देणारं काटेकोर आर्थिक नियोजन आणि तरीही आपल्या चाहूलीने अस्वस्थता वाढवणारी महिनाअखेर या अशा घरांसाठी नेमेची येणाऱ्या पावसाळ्यासारखी सवयीचीच होऊन गेलेली. अशा घरातल्या बेतासबात शिक्षण झालेल्या गृहिणीही हे दरमहाचं तूटीचं अंदाजपत्रक कौशल्याने सांभाळून त्यातूनही स्वतःच्या होसामौजांना मुरड घालून वाचवलेला एखाददुसरा आणा अचानक येऊ शकणाऱ्या अडीअडचणीसाठीची बेगमी म्हणून धान्याच्या डब्यांच्या वळचणीला सुरक्षित ठेवीत असायच्या.

विशेष म्हणजे अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही या घरांनी स्वतःच्या मनातल्या वळचणींच्या खास जागा गरजूंसाठी आवर्जून निर्माण करुन सातत्याने जपलेल्या असायच्या. शिक्षणाच्या ओढीने घराबाहेर पडलेल्या एखाद्या गरीबाच्या मुलाची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत दूर करायला अशी घरेच त्या मुलाचे आठवड्यातल्या जेवणाचे एकेक दिवस वाटून घेत त्याला वार ठरवून देत. ते शक्य नसेल ती घरे स्वतःच्या घरी त्याची पथारी पसरायला लागणारी वीतभर जागा देत. ठरावीक दिवशी माधुकरी मागायला येणाऱ्या सेवेकऱ्यासाठी घासातला घास काढून अशा घरांमधे एखादा चतकोर माधुकरी घालण्यासाठी आठवणीने बाजूला  काढून ठेवला जात असे.

प्रतिकूल परिस्थितीतही गरजूना आश्रय देणाऱ्या, त्याला आधार वाटावा असा मदतीचा हात देऊ पहाणाऱ्या या घरांच्या घरपणाने आवर्जून जपलेल्या या जणू कांही वळचणीच्या जागाच तर होत्या !

आज काळ बदलला. घरं बदलली. माणसंही. हळूहळूच पण सगळंच बदलत गेलं. त्याचबरोबर पूर्वीचं जीवनशैलीतच दीर्घकाळ मुरलेलं समाजाप्रती असणाऱ्या गृहित कर्तव्याचं भानही. आज ते नाहीय असं नाही. पण पूर्वी प्रतिकूल परिस्थितीतही घरोघरी आवर्जून जपलेल्या वळचणींसारखं मात्र निश्चितच नाहीय. पूर्वी ते सर्रास असायचं आणि आज ते अपवादात्मकच दिसतं हे नाकारता येणार नाही.

हरवू पहाणाऱ्या हा वळचणींचा थारा नव्या काळानुसार नव्या रुपात  प्रत्येकाने निर्माण करणं न् तो जपणं हे आवश्यक आहे आणि अशक्यप्रायही नाही हे जाणवायला मात्र हवं!

समाजाकडून वर्षानुवर्षे कांही ना कांही रुपात सतत कांहीतरी घेतच आपण मोठे होत असतो. समाजाचे ते ऋण परतफेड करता येणारं नसतंच. तरीही अशा स्वनिर्मित वळचणींच्या रुपाने देणाऱ्याने स्वतःच्या मनात उपकार करीत असल्याची भावना न ठेवता घेणाऱ्यालाही संकोच वाटू नये अशा पध्दतीने हरवू पहाणारा वळचणीच्या आडोशाचा थारा जपणे समाजाप्रती असणारा कृतज्ञभाव व्यक्त करायला पूरकच ठरेल हे लक्षात घ्यायला हवं.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न  ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

परिचय 

नांव – राजीव गजानन पुजारी

शिक्षण – बी. ई. (मेकॅनिकल), DBM

नोकरी – मे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, किर्लोस्करवाडी येथून मॅनेजर मेंटेनन्स म्हणून निवृत्त त्यानंतर वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे कांही वर्षे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले.

आवड – प्रवास, वाचन, लेखन

प्रसिद्ध झालेले साहित्य –

  • कॅलिफोर्निया डायरी हे प्रवास वर्णनात्मक पुस्तक
  • नासाची मंगळ मोहीम ही दहा लेखांची लेखमाला दै. केसरी मध्ये प्रसिद्ध
  • मराठी विज्ञान परिषदेच्या पत्रिका या मासिकांतून
    • जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण,  
    • नासाची आर्टिमिस योजना,
    • लेसर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन

हे लेख प्रसिद्ध

  • अक्षर विश्व् या दिवाळी अंकांत
    • माझी मिनी गुजरात सहल हे प्रवास वर्णन आणि
    • भेदीले शून्य मंडळा ही विज्ञानकथा प्रसिद्ध
  • रेडिओ मराठी तरंग वर
    • विक्रम साराभाई स्पेस सेन्टरला भेट आणि
    • भेदीले शून्य मंडळा या विज्ञान कथेचे वाचन
  • सावरकर शाळेच्या रविवारच्या व्याख्यान मालेत जेम्स वेब अंतरीक्ष दुर्बीण या विषयावर व्याख्यान
  • नृसिंहवाडी येथील पुजारी घराण्याची ई. स. 1435 पासून ते 2022 पर्यंतची वंशावळ संकलित करून श्री दत्त देवस्थानकडे सुपूर्द.

? इंद्रधनुष्य ?

☆ भवानी संग्रहालय -एक सत्यातील स्वप्न  ☆ श्री राजीव ग पुजारी 

औंधच्या यमाई देवीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही कोल्हापूरहून औंधला गेलो. औंधच्या डोंगरावर यमाई देवीचे सुंदर मंदिर आहे. गाडीने थेट देवळापर्यंत जाता येते. गाडी पार्क केल्यावर एक लहान किल्लावजा बांधकाम आहे. त्याच्या आत देवीचे मंदिर आहे. देवीची मूर्ती काळ्या पाषाणात व जवळजवळ दोन मिटर उंच आहे. मूर्ती खूप देखणी आहे. मंदिर व परिसर अनेक पिढ्यांपासून पंत कुटुंबियांच्या अधिपत्याखाली आहे. त्या कुटुंबातील सध्या हयात असलेल्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी सात किलो वजनाचे कळस मंदिरावर चढवले आहेत. 

या देवीविषयी अशी हकीकत सांगण्यात येते की, श्रीराम वनवासात असतांना रावणाने सीताहरण केले, त्यामुळे श्रीराम अत्यंत दुःखी होऊन शोक करू लागले. त्यावेळी देवी सीतामाईचे रूप घेऊन श्री रामासमोर आली. त्या शोकाकुल अवस्थेतही रामाने देवीस ओळखले व तो तिला ‘ये माई’ म्हणाला, म्हणून देवीचे नाव यमाई पडले. 

देवीचे दर्शन घेऊन खाली उतरताना प्रसिद्ध भवानी संग्रहालय लागते. हे संग्रहालय औंधचे राजे, पंतप्रतिनिधी यांनी १९३८ मध्ये उभारले. सध्या ते महाराष्ट्र सरकारद्वारा संचलित केले जाते. संग्रहालयामध्ये दुर्मिळ चित्रकृती व शिल्पकृती यांचा उत्कृष्ट संग्रह आहे. 

येथील कलाकृती एवढ्या अप्रतिम आहेत की आपण जणू स्वप्नांच्या दुनियेत आहोत असे वाटत राहते. चित्रकलेच्या दालनांमध्ये बहुतेक सर्व सर्व शैलींची चित्रे ठेवली आहेत. उदा. जयपूर शैली, मुघल शैली, कांग्रा, पंजाब, विजापूर, पहाडी, मराठा वगैरे. प्रसिद्ध भारतीय तसेच विदेशी चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. राजा रविवर्मा, एम्.व्ही.धुरंधर,माधव सातवळेकर, कोट्याळकर, रेब्रांट,लिओनार्डो द् विंची,बार्टोना मोरिला,जी.जी.मोरिस वगैरे नामवंत चित्रकारांची चित्रे येथे बघायला मिळतात. स्वराज्याची शपथ, शिवराज्याभिषेक, दमयंती वनवास, पद्मपाणी बुद्ध, लास्ट सपर,मोनालीसा वगैरे प्रसिद्ध चित्रे येथे आपणास पाहायला मिळतात. किरीतार्जुन युध्दाचा  नव्वद चित्रांचा संच बघण्यासारखा आहे. 

येथील धातू व संगमरवरी पाषाणातील शिल्पांचा संग्रहही अप्रतिमआहे.वर्षा,ग्रीष्म,वसंत, हेमंत, शिशिर आणि शरद हे वर्षातील सहा प्रमुख ऋतू. या ऋतूंना स्त्री रूपात कल्पून त्यांची नितांत सुंदर शिल्पे येथे पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतू शिल्पाला साजेशी काव्यपंक्ती त्या शिल्पाला जणू बोलती करते. उदाहरणार्थ,

        ‘वसंत वाटे अतिगोड साचा, 

        शृंगार केला विविध फुलांचा, 

        वेणीत कानात करी  कटीला, 

        गळ्यात दुर्डित उणे न त्याला’ 

या काव्यपंक्ती आणि ऋतू वसंत ललनेचे मूर्तरूप एकमेकांना साजेसे असेच आहे. नऊवारी साडी, उजव्या खांद्यावर पदर घेऊन, एका हातात फुलांची परडी,तर दुसऱ्या हातात कमलपुष्पे. शिवाय मनगटांवर फुलांच्या माळा, दंडांवर फुलांचाच बाजूबंद आणि फुलांचा कमरबंध असे नानाविध पुष्पालंकार परिधान करीत, गळ्यात मोत्यांचा लफ्फा-साज घालून सुहास्य वदनी ऋतू ‘वसंता’ पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करते.  या उलट, ग्रीष्म ऋतू  वा ‘ग्रीष्मकन्या’. उन्हाच्या झळांनी व्याकुळ, थोडीशी थकलेली, अगदी अलंकारही नकोसे वाटणारी. एका हातात पंखा आणि दुसऱ्या हाताने केसांच्या वेणीला मुक्त करणारी ‘ग्रीष्मबाला’ आणि त्याला साजेशी काव्य रचना, 

         ‘घे विंझणा वातची उन्ह आला, 

          ये घाम वेणीभार मुक्त केला, 

          त्यागी तसे आभरणासी बाला,

           हा ग्रीष्म तापे सुकवी तियेला’.   

हातांत आरतीचे  तबक घेऊन, बंधू व पतीस भाळी कुंकूमतिलक लावून दसरा व दिवाळी निमित्ताने ओवाळण्यास  सिद्ध झालेली गुर्जर वेषातील युवती म्हणजे आपली ‘शरद कन्या’. काव्य पंक्ती अगदी तिला साजेशा आहेत.

          ‘मोदे करी सुंदर वेगळा

         बंधूसी तैसी युवती पतीला

        कुर्वंडीते,कुंकुम लावी भाळी

        शरद ऋतूचा दसरा दिवाळी

हेमंत सुंदरीचे वर्णन केले आहे ते असे,

        ‘हेमंत आला तशी थंडी आली 

        घेऊन उणीशी निवारलेली

         शेकावया शेगडी पेटवीली

        बाला सुखावे बहु शोभावीली’

‘शिशिर बाले’चे वर्णन केले आहे ते असे,

      ‘लोन्हा गव्हाच्या बहु मोददायी

      हुर्डा तसा शाळूही शक्तिदायी

      काढावया घेऊनिया विळ्यासी

      बाळा तशी ये शिशिरी वनासी’

 — मराठी शिल्पशैलीत साकार झालेल्या या सहा ऋतूकन्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या ‘ऋतूराज्ञी’ शोभाव्यात अशाच आहेत. 

औंधच्या राजांच्या प्रोत्साहानामुळे अनेक शिल्पकार येथे तयार झाले. त्यातील प्रमुख म्हणजे पांडोबा पाथरवट. ते व त्यांची मुले राजाराम व महादेव यांनी साकारलेली हस्तीदंतातील शिल्पे निव्वळ अप्रतिम. एखादा माणूस दगडातून इतके नाजूक कोरीवकाम कसे करू शकतो याचे पदोपदी आश्चर्य वाटत राहते. ही शिल्पे दगडातून नव्हे तर लोण्यातून कोरल्यासारखी वाटतात. 

हेन्री मूर या जगप्रसिध्द शिल्पकाराने बनवलेले ‘मदर अँड चाईल्ड’ हे शिल्प आपणास येथे बघायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन पुतळे येथे पहायला मिळतात. एक घोड्यावर बसलेला व दुसरा उभा. उभ्या पुतळ्यात महाराज म्यानातून तलवार बाहेर काढतांना दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरील त्वेषपूर्ण भाव निव्वळ अप्रतिम.

संग्रहालयाच्या मध्यभागी एक अवाढव्य बुद्धीबळाचा पट आपले लक्ष वेधून घेतो. पटावर दिसतात ते शस्त्रसज्ज सैनिक-प्यादी,परस्पर विरोधी राजे,वजिर,अंबारीयुक्त हत्ती, घोडे आणि ऊंट. असे म्हणतात की, यावर प्रत्यक्ष बुद्धीबळाचा खेळ खेळला जात असे व प्यादी उचलून ठेवायला माणसे असत.

या संग्रहालयातील प्रत्येक दालन बघायला कमीत कमी एक दिवस लागेल. म्हणजे पूर्ण संग्रहालय बघायला १५ दिवस सुद्धा  अपूरे पडतील. मी तर ठरवलंय 15 दिवस वेळ काढून निवांत आणखी एकदा हे अप्रतिम संग्रहालय बघायचेच.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

फोन -9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆  आप्तज ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

अंधार कशामुळे होतो हे कळत नसलेल्या आदी मानवाला रात्र असह्य वाटायची, पण अगदी एक प्रहरात डोळा लागलेला असताना त्याला पक्षाची किलबिल ऐकू यायची, आकाशात पूर्वेला कुणीतरी रंगाचं दुकान थाटलेले असायचं.

काळी रात्र विराट जात असल्याने घाबरलेला आनंदून जायचा. आनंदाने उमाळे फुटत असतानाच सूर्य उगवून लख्ख दिसायचा.

नवा दिवस , एक नवी उमेद , जणू पुनर्जन्म…या उत्साहलेल्या मनाच्या निर्मळ माणसाने सूर्याला नाव दिले मित्र…………अनुभवातून, निसर्गाच्या भव्य रूपातून प्रसवलेली सृजनता.. त्याच्या एकटेपणाचा शाप दूर करणारा नभोमंडलातला प्रदीप्त आप्तज……….किती सुंदर नाव दिले त्या सूर्याला. मित्र….प्रकाश असतो सतेज आणि सतिश ….     …… त्याच्याविना आयुष्य फक्त अंधार…………मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा………

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनीक्रमांक २५- भाग ३ -कारीबू केनिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक २५- भाग ३ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कारीबू केनिया ✈️

केनियातील मसाईमारा आणि टांझानियातील गोरोंगोरो,सेरेंगेटी  हा सारा सलग, एकत्रित, खूप विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहे. राजकीय सोयीसाठी त्याचे दोन विभाग कल्पिलेले आहेत. इथले एक आश्चर्य म्हणजे ‘ग्रेट मायग्रेशन’! दरवर्षी ठराविक वेळेला लाखो प्राणी झुंडीने स्थलांतर करतात ते बघायला जगभरचे प्रवासी आवर्जून येतात. साधारण जुलै पर्यंत टांझानियातील गोरोंगोरो, सेरेंगेटी  इथले हिरवे गवत संपते, वाळते. अशावेळी फक्त गवत हेच उदरनिर्वाहाचे साधन असलेले  लक्षावधी वाइल्ड बीस्ट, झेब्रे, हरणे ग्रुमिटी आणि मारा या नद्या ओलांडून, हजारभर मैलांचे अंतर कापून, केनियाच्या मसाईमारा विभागात येतात. कारण मार्च ते जूनपर्यंत केनियात पडणाऱ्या पावसामुळे तिथे भरपूर ओला चारा असतो.  मसाईमारा विभागात जेंव्हा नोव्हेंबर ते फेब्रुवारीमध्ये हिरवे गवत संपते, वाळते तेंव्हा हे प्राणी पुन्हा सेरेंगेटी, गोरोंगोरो इथे स्थलांतर करतात. त्यांच्या स्थलांतराच्या काळात सिंह, चित्ता, बिबळ्या तिथे बरोबर दबा धरून बसलेले असतात. आणि नदीतील मगरी तर त्यांची वाटच पहात असतात.आयते चालून आलेले भक्ष त्यांना मिळते तर काही वेळेला एका वेळी हजारो प्राणी नदी प्रवाह ओलांडून जात असताना त्यांच्या वजनाने सुसरी दबून जातात. नदीच्या आजूबाजूला कोल्हे, तरस, गिधाडे हीसुद्धा उरलेसुरले  मिळवायला टपून असतात. शेकडो वर्षांची ही निसर्गसाखळी घट्ट टिकून आहे. नाहीतरी नद्या, वारा, पक्षी, प्राणी यांना सरहद्दीची बंधने नसतातच. लाखो मैलांचे अंतर कापून आपल्याकडे सयबेरियातील फ्लेमिंगो व इतर पक्षी ठराविक काळापुरते येतात व त्यांच्याकडील कडाक्याची थंडी संपल्यावर परत आपल्या ठिकाणी जातात. निसर्गाने पक्ष्यांना, प्राण्यांना बहाल केलेली ही जीवनशक्ती आहे.

आज लवकर नाश्ता करून, चार तासांचा प्रवास करून नैवाशा लेकला पोहोचलो. या विस्तीर्ण जलाशयातून एक तासाची सफर होती. त्या विस्तीर्ण तलावाच्या कडेने झाडे- झुडपे, पाणवनस्पती होत्या. खडकासारखे दिसणारे पाणघोडे डुंबत होते. इथले खंड्या पक्षी ( किंगफिशर ) काळ्या- पांढऱ्या रंगाचे होते. ते पाण्यावर धिरट्या घालून, लांब चोचीत अचूक मासा पकडून, झाडावर घेऊन जात. जलाशयाच्या कडेने पिवळ्या चोचींच्या बदकांचा थवा चालला होता. लांब लाल चोच आणि उंच लाल पाय असलेला पांढराशुभ्र बगळा बकध्यान लावून मासे टिपत होता. आमच्या नावाड्याने पाण्यात भिरकावलेला मासा, लांब झाडावर बसलेल्या गरुडाने भरारी घेऊन अचूक टिपला. एका बेटावरील झाडीत जिराफ, लांब माना आणखी उंच करून झाडपाला ओरबाडीत होते. बेटावर उतरून थोडे पायी फिरलो. गेझल्सचा (हरिणांचा) खूप मोठा कळप कमानदार उड्या मारीत पळाला. हरिणांसारखेच पण चांगले मोठे, काळपट तपकिरी रंगाचे, पाणीदार डोळ्यांचे, उंच शिंगे असलेले ॲ॑टीलोप नावाचे  प्राणीही होते.

आज ‘ग्रेट रिफ्ट व्हॅली’ या प्रदेशातून लेक नुकरू नॅशनल पार्क इथे जायचे होते. चहा व कॉफीचे मळे रस्त्याच्या कडेला होते. डोंगर उतारावर शेती होती. खालच्या उंच सखल पोपटी दरीमध्ये निळ्याशार पाण्याची छोटी- मोठी तळी, सूर्यप्रकाशात निळ्या रत्नासारखी चमकत होती. ही ग्रेट रिफ्ट व्हॅली म्हणजे मूळ मानवाचे जन्मस्थान मानले जाते. संध्याकाळी लेक नुकरू या मचुळ पाण्याच्या सरोवरापाशी गेलो. भोवतालच्या दलदलीत असंख्य काळे- पांढरे पक्षी चरत होते. हेरॉन, पेलिकन, शुभ्र मोठे बगळे होते. कातरलेले पंख असलेले स्पर विंगड् गूझ होते.

विषुववृत्ताची कल्पित रेषा केनियामधून जाते. दुसऱ्या दिवशी माउंट केनिया  रीजनला जाताना, वाटेत थॉमसन फॉल्स नावाचा धबधबा पाहिला. एका गावामध्ये ‘इक्वेटर’ अशी पाटी होती. तिथे थोडा वेळ थांबलो. तिथून माउंट केनियाकडे जाताना रस्त्यावर अनेक धावपटू स्त्री-पुरुष पळताना दिसले. इथल्या ‘केनिया स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये ऑलम्पिक पदक विजेते धावपटू घडविले जातात. समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचावर असलेल्या या गावात केनियातीलच नाही तर अन्य देशांचे खेळाडू प्रशिक्षणासाठी येतात.

१६०००.फूट उंच असलेल्या माउंट केनियाच्या उतरणीवर ‘सेरेना माउंट लॉज’ हे गर्द जंगलातील हॉटेल ५२०० फूट उंचीवर आहे. संपूर्ण हॉटेल महोगनी आणि सीडार वृक्षांचे लाकूड वापरून बांधलेले आहे. प्रत्येक रूममधील काचांच्या मोठ्या खिडक्यातून पुढ्यातला छोटा, नैसर्गिक मचुळ पाण्याचा तलाव दिसत होता. तलावाच्या आजूबाजूच्या जमिनीत खनिज द्रव्य आहेत. ही खनिज द्रव्य मिळविण्यासाठी, इथली माती चाटण्यासाठी जंगली प्राणी रात्री या पाण्यावर येतात. हॉटेलला मोठे फ्लड लाईट लावून ठेवले होते. वेगवेगळे प्राणी पाण्यावर आले की हॉटेलचा स्टाफ आपल्याला सूचना द्यायला येतो. तसेच एक घंटाही वाजवतात. रानटी म्हशी, हरिणे, रानडुक्कर, हैना असे अनेक प्राणी आम्हाला काचेतून दिसले.

माउंट केनिया हा थंड झालेला ज्वालामुखी पर्वत १६००० फूट उंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या शिखरावरील बर्फ चमकताना दिसत होते. केनियाच्या आग्नेय दिशेला हिंदी महासागर आहे. युगांडा, टांझानिया, सुदान, सोमालिया हे देश सभोवती आहेत. १९६३ मध्ये केनियाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. तेंव्हा जोमो केन्याटा  हे पहिले पंतप्रधान झाले. शेतीप्रधान असलेल्या या देशातून चहा व कॉफीची निर्यात होते. अलीकडे ताजी गुलाबाची व इतर फुले युरोपमध्ये निर्यात केली जातात. पर्यटन हेही उत्पन्नाचे मोठे साधन आहे.

देवाघरचे हे समृद्ध निसर्ग वैभव एक प्रवासी म्हणून आपल्याला आवडते परंतु तिथल्या सर्वसामान्य माणसाचे जीवन फार कष्टाचे, गरिबीचे आहे.

आक्रमक घुसखोर स्वभावाला अनुसरून  चिनी ड्रॅगनने आपला विळखा जवळजवळ सर्व आफ्रिकेला घातला आहे. एअरपोर्ट, बंदरे, रस्ते अशा सोयी उभारून देणे, त्यासाठी प्रचंड कर्ज देणे आणि कर्ज फेड न झाल्याने ते प्रोजेक्ट गिळंकृत करणे अशी ही कार्यशैली आहे.( याबाबतीत नेपाळ व श्रीलंकेचे उदाहरण आहेच). आफ्रिकेतील शेतजमिनी, खाणी यामध्ये चीनने प्रचंड गुंतवणूक केली आहे. केनियामध्येही चिनी गुंतवणुकीचा वाढता ओघ आहे.

नैसर्गिक व खनिज संपत्तीचे वरदान असलेल्या या देशांना ब्रिटनने आधीच लुटले आहे. आता देशातील सर्वसामान्य माणसाच्या प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी केनिया  आणि इतर आफ्रिकी देशांनी चिनी कर्जांच्या काटेरी सापळ्यात न अडकता पुढील वाटचाल केली तर ते हितावह होईल. पण…….

केनिया भाग ३ व केनिया समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares