सातारला असताना वेदमूर्ती विवेक शास्त्री गोडबोले यांच्याबरोबर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे काम करायला मिळाले. गुरूजी अनेक धार्मिक कार्यक्रमांचं नेटकं आयोजन करत असत. एकदा त्यांनी आषाढी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना धोतरे , घोंगडी शाली व स्त्रियांना साड्या स्वखर्चाने वाटायचे ठरवले . आम्हालाही वारीचा सोहळा अनुभवायचा होता त्यामुळे आम्ही तीस-चाळीस जण त्यांच्या बरोबर निघालो. सातारला दोशी बंधू यांची पार्ले बिस्कीट कंपनी आहे. त्यांनीही भरपूर बिस्किटांचे बॉक्स वारकऱ्यांना देण्यासाठी पाठवले. सकाळी सातला आम्ही गुरुजींच्या पाठशाळेत जमलो. सगळे जमेपर्यंत झिम्मा फुगडी गाणी फेर, विठ्ठल नामाचा गजर सुरू झाला आणि वारी चा उत्साह ओसंडून वाहायला लागला. आठ वाजता दोन मोठ्या बसेस निघाल्या. वाटेत भजन भारूड गवळण जप रंगतदार किस्से यात चार तास कसे निघून गेले कळलेच नाही. माळशिरस च्या पठारावर उतरलो. पोटपूजा उरकून घेतली. आता मात्र” भेटी लागी जीवा लागलीसे आस ” अशी पालखीची तळमळ प्रत्येकाला लागली. आणि लांबून टाळ-मृदंगाच्या नादात विठ्ठल नामाचा गजर ऐकायला यायला लागला. अनेक भगव्या पताका फडकू लागल्या.” निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम ” म्हणत नाचत शुभ्र वेषातले वारकरी तल्लीन होऊन स्वयंशिस्तीने पुढे जाताना दिसू लागले. आपले वय विसरून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन नाचणाऱ्या महिला पाहून जागच्याजागी आम्हीसुद्धा नाचायला लागलो. मागून सुंदर धिप्पाड खिलारी बैल जोडी आपल्या खांद्यावर रथ ओढत आली. संपूर्ण रथ फुलांच्या माळांनी सुशोभित केलेला होता. पालखीचे दर्शन घेण्यासाठी व पादुकांची पूजा करण्यासाठी झुंबड उडाली. बिस्किटांचे बॉक्स उघडून प्रत्येकाला बिस्किट पुडा देताना खूप आनंद होत होता. गुरुजी व त्यांचे शिष्य गरजू वारकरी हेरून त्यांना कपडे वाटप करत होते. दोन तास कसे गेले कळलेच नाही. विठ्ठल भक्ती ची गंगा अखंड वाहत होती. वारकऱ्यांची रांग संपत नव्हती. अखेर आमच्याकडचे सामान संपले व आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. तो अपूर्व अद्भुत एकमेवाद्वितीय अविस्मरणीय अवर्णनीय अद्वितीय असा सोहळा आजही आठवतो. वारीमध्ये उच्चशिक्षित भाविक सुद्धा होते. कुणीही कसलाही बडेजाव मिरवत नव्हते. मन मंदिरात जपून ठेवलेला हा वारीचा सोहळा आठवला की आजही खूप प्रसन्न वाटते.
☆ इतिहास बदलणारा उंदीर — श्री सौरभ वैशंपायन ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆
सर्वसाधारणपणे उंदीर हा पराकोटीची नासाडी करणारा अत्यंत उपद्रवी जीव समजला जातो. शास्त्रीय प्रयोगासाठी ते पांढरे उंदीर वापरताना आपण बघतो, ते वगळता उंदीर हा पाळीव प्राणी म्हणून कोणी वापरताना दिसत नाही. पण काही प्रशिक्षित उंदीर जीवितहानी टाळत आहेत आणि त्याबद्दल त्यांच्यातील एकाला सुवर्ण पदक दिलं गेलं होतं याबद्दल वाचलं आहे का?
आपल्या बोलण्यात सिंहाचा वाटा किंवा खारीचा वाटा हे शब्दप्रयोग येत असतात, पण भविष्यात त्यात उंदराचा वाटा अशी भर पडली तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हे काय आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात एक चक्कर मारावी लागेल व त्याचा आज होणारा भीषण परिणाम जाणून घ्यावा लागेल.
व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेच्या विरोधात लढणारे शेकडो व्हिएतकाँगी म्हणजे व्हिएतनामचे स्वातंत्र्यसैनिक सीमा ओलांडून कंबोडियातील जंगलात लपून बसायचे. त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी किंवा त्यांना रोखण्यासाठी विमानातून हजारो टन बॉम्ब तर टाकले गेलेच पण सोबत लाखो भू-सुरुंग पेरले गेले. वरून टाकलेल्या बॉम्बपैकी अनेक बॉम्ब चिखलात, शेतात रुतून बसल्याने फुटलेच नाहीत. ते आजही तसेच जिवंत आहेत. तेच भू-सुरुंगांच्या बाबतीत. अमेरिकेने पेरलेल्या भू-सुरुंगातून आजही मृत्यूचे किंवा अपंगत्वाचे पीक निघते आहे. दरवर्षी शेकडो नागरिक शेतात, जंगलात काम करताना, लहान मुले खेळताना अजाणतेपणी अश्या बॉम्ब/भू-सुरुंगावर वजन पडल्याने प्राणास मुकतात किंवा अपंग होतात. अशाप्रकारे अपंग झालेल्यांचा अधिकृत आकडा तब्बल ६४ हजारांचा आहे. लाखो चौरस किमी.मध्ये लपलेले हे पन्नास लाखांहून अधिक बॉम्ब/भू-सुरुंग शोधून काढणे म्हणजे गवताच्या गंजीत टाचणी शोधण्यागत आहे. शिवाय शोधताना अपघात होतात ते वेगळे. अपघात होऊ न देता काम करणे अत्यंत वेळखाऊ, किचकट आणि खर्चिक काम. कंबोडिया हा देखील शेतीप्रधान देश. एखाद्या शेतात हे भू-सुरुंग न शोधता काम करायला जावं तर जिवाची जोखीम. म्हणजे गेली दशकानुदशके दररोज लाखो कंबोडियन नागरिक जीव मुठीत धरून कामावर जात आहेत. सगळ्याच बाजूने बिचाऱ्यांची कुचंबणा.
अशावेळी मदतीला आला एक उंदीर. तोच उंदीर जो एरवी शेतकऱ्यांचा मोठा शत्रू समजला जातो. त्याचं नाव – “मगावा”. हे त्याला लाडाने दिलेलं नाव. मगावाचा अर्थ “ध्यान केंद्रित असलेला”. तर हा मगावा मूळचा टांझानियातील “आफ्रिकन जायंट पोच्ड रॅट” प्रजातीचा उंदीर. हे उंदीर आकाराने सश्याइतपत मोठे असतात. अत्यंत तीव्र घाणेंद्रिय आणि मातीत कित्येक फूट खोल असलेल्या गोष्टीचा वास घेण्याची आश्चर्यकारक क्षमता असलेला हा मगावा कंबोडियन नागरिकांसाठी जणू देवदूत ठरला. जन्मानंतर पहिले दहा आठवडे त्याची व्यवस्थित वाढ झाल्यावर त्याला भू-सुरुंग बनवायला जी स्फोटकं किंवा मिश्रण वापरले जाते त्याचा गंध ओळखण्यासाठी प्रशिक्षित केलं. मोठमोठ्या लाकडी खोक्यात माती भरून त्यात ती मिश्रणे ठेवून त्याला तितका भाग ओळखण्याचे प्रशिक्षण दिले. बरोबर शोध घेण्याच्या बदल्यात त्याला अत्यंत चविष्ट फळे मिळत.
यासाठी मगावा आणि त्याच्यासारखे अजून काही उंदीर “ऑन फिल्ड” काम करत आहेत. वजनाने हलका असल्याने भू-सुरुंगावर त्याच्या वजनाचा काहीच परिणाम होत नाही. या उंदरांना एक छोटा बॉडी हार्नेस घालून त्यातून एक दोरी पास केली जाते व त्यांना एका सरळ रेषेत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालवलं जातं. मगावा २०० चौरस मीटरचा परिसर अर्ध्यातासात बिनचूक पिंजून काढू शकत असे. हेच काम करायला माणसाला अत्यंत प्रगत माईन-डिटेक्टर्स घेऊनदेखील चार दिवस लागतात. जून २०२१ मध्ये वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या आयुर्मानानुसार मगावा “म्हातारा” झाल्याने या कामातून त्याला निवृत्ती दिली। मात्र तोवर मगावाने १,७७,००० चौरस मीटरहून अधिक परिसर निर्धोक केला. त्याने ७१ भू-सुरुंग आणि डझनावारी इतर प्रकारची जिवंत स्फोटके शोधली होती. इतक्याश्या जीवासाठी हे काम खरोखर प्रचंड आहे. मगावाने एकही चूक न करता जो परिसर निर्धोक केला त्याची खात्री लोकांना पटविण्यासाठी मगावा ज्या भु-सुरुंग शोधणाऱ्या पथकासोबत काम करतो त्यांनी त्या जागी फुटबॉल मॅचेस खेळून दाखवल्या. ते बघून त्या परिसरातील नागरिक निश्चिंत झाले. मगावा हा कंबोडियन लोकांचा लाडका हिरो झाला.
त्याच्या याच कामाचे कौतुक म्हणून लंडनस्थित PDSA या संस्थेने सप्टेंबर २०२० मध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. PDSA ही संस्था १९१७ पासून माणसाला आपत्तीतून वाचविणाऱ्या प्राणी-पक्ष्यांचा ३ प्रकारची पदके देऊन सन्मान करते आहे. पैकी युद्धकाळात विशेष कामगिरी करणाऱ्या पशु-पक्ष्यांना डिकीन मेडल दिले जाते. हा पुरस्कार म्हणजे प्राण्यांचा “व्हिक्टोरिया क्रॉस” समजला जातो. याशिवाय शांतताकाळात विशेष काम करणाऱ्या प्राणी-पक्ष्यांना सुवर्ण किंवा रौप्य पदक दिले जाते. आजवर PDSA ने कुत्रे, मांजरी, घोडे आणि कबुतरांचा सन्मान केला होता (यावर मी माझ्या “परिंदे” या ब्लॉग मध्ये मागेच लिहिलं होतं – http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2015/01/blog-post_21.html ). मगावा हा असे पदक/पुरस्कार प्राप्त करणारा पहिला उंदीर. PDSA ने प्राण्यांसाठी ब्रिटनमध्ये ४२ दवाखाने उघडले असून तिथे प्राण्यांवर मोफत उपचार होतात.ज्यांना सन्मान प्राप्त झाला आहे त्या प्राण्यांची कृतज्ञता म्हणून खरोखर ते मरेपर्यंत बडदास्त ठेवली जाते. जानेवारी २०२२ मध्ये मगावाने अखेरचा श्वास घेतला तोवर त्याचीही अशीच काळजी घेतली गेली.
तर अशी आहे ही सामान्य लोकांच्या जीवनासोबत एका अर्थी इतिहासही बदलणाऱ्या एका छोट्याश्या “हिरोरॅट” मगावाची छोटीशी तरीही खूप मोठी गोष्ट.
— श्री सौरभ वैशंपायन
संग्राहिका :- सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘स्वामी विवेकानंद’ यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका ‘विचार–पुष्प’.
तीर्थंभ्रमणाला निघायच्या आधी पण नरेंद्रनाथ आंटपूर, वैद्यनाथ, शिमूलतला इथे कित्येकदा आले होते. उजाडल्यानंतर सूर्य किरणे सर्व दिशांना पसरतात हे सांगायची गरज नसते. तसे स्वामीजी जिथे जिथे जातील तिथे तिथे प्रभाव पाडत असत. असाच अनुभव ते फिरलेल्या प्रत्येक प्रांतात दिसतो. बिहार प्रांत फिरत फिरत ते हिंदू भारतभूमीचं हृदय समजल्या जाणार्या काशीला आले. इथे ते संस्कृत भाषेचे पंडित आणि साहित्य व वेदांत पारंगत असलेले सद्गृहस्थ श्री प्रमदादास मित्र यांच्याकडे राहिले. स्वामीजींना त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदरभाव वाटू लागला. पुढे पुढे तर ते वैदिक धर्म आणि तत्वज्ञान याबद्दल काही शंका असली की ते प्रमदादास यांना पत्र लिहून विचारात असत. आपले आजोबा दुर्गाप्रसाद हे संन्यास घेतल्यावर काशीत आले होते. श्रीरामकृष्ण पण इथे येऊन गेले होते. तिथे मद्रासी, पंजाबी, बंगाली, गुजराथी, मराठी हिंदुस्तानी अशी प्रभृती सर्वजण, आचारांची भिन्नता असूनही एकाच उद्देशाने विश्वेश्वराच्या मंदिरात एकत्र येत असत. यात नरेंद्रनाथांना या विविध लोकांमधला ऐक्याचा विशेष गुण भावला. म्हणूनच त्यांना सगळीकडे फिरून भारत जाणून घ्यावसा वाटला होता.
शिवाय इंग्रजांची सत्ता, गुलामी असताना वर्तमान अवस्थेत, देशातील आध्यात्मिक संस्कृती कशी आहे, सामान्य लोक कसे जगताहेत? शिक्षणाची काय परिस्थिति आहे? सनातन धर्म सगळीकडे कसा आहे? याची सगळीकडे हिंडून माहिती करून घ्यावीशी वाटली. त्यासाठी ते इथून निघून कन्याकुमारी पर्यन्त शहरे, खेडी, विविध लोक, शेतकरी, गरीब, दीन दुबळे, राजे रजवाडे, संस्थानिक आणि जे जे आवश्यक त्यांच्या भेटी घेत अवलोकन करता करता भ्रमण करत होते.
उत्तरेत फिरून झाल्यावर ते शरयू तीरावरच्या अयोध्येला येऊन पोहोचले. काशी आणि अयोध्या ही धर्मक्षेत्र होती. त्यामुळे स्वामीजींचे आध्यात्मिक मन तिथे रमले. ‘अयोध्या’ जिच्या मातीशी सूर्यवंशी राजांच्या गौरवाची स्मृती जोडलेली आहे. शरयू नदीच्या तीरावरून आणि घाटावरील विविध मंदिरातून फिरतांना त्यांच्या डोळ्यासमोर प्रभू श्रीरामचंद्रांचे चरित्रच उभे राहिले. आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, अशा प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्येत आल्याबरोबरच त्यांना लहानपणची रामसीतेची भक्ती, रामायण प्रेम, वीरभक्त श्री हनुमानवरची गाढ श्रद्धा आणि आईच्या तोंडून ऐकलेल्या रामाच्या कथा सारे सारे आठवले असणारच. काही दिवस इथे त्यांनी रामायत संन्याशांच्या समवेत श्रीरामनामसंकीर्तनात घालवून पुढे ते ऑगस्ट१८८८ मध्ये लखनौ- आगरा मार्गाने पायी पायी चालत वृंदावनच्या दिशेने निघाले.
लखनौला त्यांनी बागा, मशिदी, नबाबाचे प्रासाद बघितले. आग्र्याला आल्यावर तिथल्या शिल्प सौंदर्याचा जगप्रसिद्ध नमुना ‘ताजमहाल’ मोगलकालीन इमारती, किल्ले पहिले. मोगल साम्राज्याचा इतिहास त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. लखनौ आणि आग्रा या ऐतिहासिक स्थळं सुद्धा त्यांच्या मनात भरली. कारण ती भारताच्या इतिहासाच्या पर्वाची महत्वाची खूण होती आणि स्वामीजी त्याबद्दल पण जागरूक होते. म्हणून एक वैभवशाली साम्राज्याची स्मृती म्हणून ते पाहत होते.
शिवाची काशी पाहिली, श्रीरामची अयोध्या पाहिली आता भगवान श्री कृष्णाच्या वृंदावनला स्वामीजी पोहोचले. राधा कृष्णाची लीलाभूमी असलेल्या वृंदावनात, मर्यादित परिसरात असलेले विविध प्रकारचे, भिन्न काळात बांधले गेलेले वास्तूकलेचे, अनेक मंदिरांचे नमुने त्यांना पाहायला मिळाले. वृंदावनला ते बलराम बसुंच्या पूर्वजांनी बांधलेल्या कुंजामध्ये राहिले. तिथे यमुनेच्या वळवंटात असो की भोवताल च्या परीसरात असो सगळीकडेच, श्रीकृष्णाच्या बासरीचा मधुर ध्वनी येतोय असे वाटावे अशा काव्यात्मक आणि भक्तिपूर्ण वातावरण त्यांनी अनुभवले. गोवर्धन पर्वताला त्यांनी प्रदक्षिणा घातली. तेंव्हाच त्यांनी मनाशी संकल्प केला की, कोणाकडेही भिक्षा मागायची नाही. कोणी आपणहून आणून दिले तरच त्या अन्नाचा स्वीकार करायचा. हे बिकट व्रत त्यांनी घेतले. एकदा तर त्यांना पाच दिवस उपाशी राहावे लागले होते. पण इथे त्यांनी दोन वेळा परमेश्वर भक्तीचा ईश्वरी अनुभव घेतला आणि श्रीकृष्णाची भक्ती आणखीनच दृढ झाली.
पुढे ते हरिद्वारला गेले. वाटेत जाता जाता ते हाथरस च्या स्थानकावर बसले असताना, त्यांना थकलेल्या अवस्थेत स्थानकाचे उपप्रमुख असलेले शरदचंद्र गुप्त यांनी पाहिले. आणि, “स्वामीजी आपल्याला भूक लागलेली दिसते आपण माझ्या घरी चलावे” अशी विनंती केली. स्वामीजींनी लगेच हो म्हटले आणि त्यांच्या घरी गेले. स्वामीजींचे व्यक्तिमत्व बघून शरदचंद्र गुप्त आकर्षित झाले होते , त्यांनी स्वामीजींना काही दिवस इथे राहावे असा आग्रह केल्याने ते खरच तिथे राहिले. सर्व बंगाली लोक संध्याकाळी एकत्र जमत. आपला धर्म आणि समाज यावरील सद्यस्थितीबद्दल स्वामीजी बोलत. आपल्या मधुर आवाजात गीतं म्हणत. येणारे सर्व बंगाली मोहित होऊन जात. त्यांच्यातील भांडणे जाऊन एकोपा निर्माण झाला.
एकदा चिंतेत असताना शरदचंद्रांनी स्वामीजींना पाहिलं आणि विचारलं, “आपण एव्हढे कसल्या विचारात आहात?” स्वामीजी म्हणाले, “मला खूप काम करायचं आहे. पण माझी शक्ती कमी. काम मोठं आहे. मातृभूमीचं पुनरुत्थान घडवून आणायच आहे. तीचं आध्यात्मिक सामर्थ्य क्षीण झालं आहे. सगळा समाज भुकेकंगाल आहे. भारत चैतन्यशाली झाला पाहिजे. अध्यात्मिकतेच्या बळावर त्यानं सारं जग जिंकलं पाहिजे”. अशा प्रकारचे संवाद होत होते. चर्चा होत होत्या. काही दिवसांनी स्वामीजी तिथून निघतो म्हटल्यावर, शरदचंद्र जाऊ नका म्हणून विनवणी करू लागले आणि ‘मला आपला शिष्य करून घ्या’ असेही म्हणू लागले. तुम्ही जिथं जाल तिथं मी तुमच्या मागोमाग येईन हा त्यांचा दृढ निश्चय ऐकून, “शेवटी तुम्ही माझ्याबरोबर येण्याचा आग्रहच धरता आहात तर घ्या हे भिक्षा पात्र आणि स्थानकातले जे हमाल आहेत त्यांच्या दरात जाऊन भिक्षा मागून आणा” असे स्वामीजी म्हटल्याबरोबर, शरदचंद्र तडक उठले आणि भिक्षा पात्र घेऊन सर्वांकडून भिक्षा मागून आणली. स्वामीजी अत्यंत खुश झाले. त्यांनी शरदचंद्रांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. असे शरदचंद्र गुप्त हे स्वामीजींचे पहिले शिष्य झाले, आणि मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन, नोकरीचा राजीनामा देऊन, स्वामीजीं बरोबर ते हाथरस सोडून हृषीकेशला आले. त्यांचे नाव स्वामी सदानंद असे ठेवण्यात आले. असा सुरू होता स्वामीजींचा प्रवास .
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 2 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆
हा दिवस जाहीर झाल्यापासून प्रत्येक वर्षी आम्ही हा दिवस याचना करणाऱ्या लोकांसाठी आयोजित करत आहोत… !
डॉ मनीषा सोनवणे ही खरंतर योगाची मास्टर ट्रेनर…. मास्टर ट्रेनर म्हणजे शिक्षकांचा शिक्षक…. !
मागील तीन वर्षांपूर्वी एका पत्रकाराने मनीषाला म्हटले होते, ‘अहो तुम्ही मास्टर ट्रेनर आहात…. सेलिब्रिटींचे योगासन घेण्याऐवजी, भीक मागणाऱ्या लोकांची योगासने काय घेत बसले आहात ?
मनीषा म्हणाली होती, ‘भीक मागणाऱ्या लोकांनाच आम्हाला सेलिब्रिटी बनवायचं आहे … ‘
—तर… आजच्या दिवशी आम्ही आमच्या वृद्ध आई-वडिलांना, ज्यांना भीक मागावी लागते अशांना, लालमहाल परिसर आणि शनिवार वाड्यावर घेऊन आलो… तिथे योगाचे धडे दिले…. नाचलो…. विठ्ठल नामाचा गजर केला….!
माझे बंधुतुल्य मित्र श्री धनंजय देशपांडे उर्फ डीडी हे हा कार्यक्रम लाईव्ह करत होते…. हा माणूस म्हणजे हरहुन्नरी… ! या माणसाला शब्दात कसा पकडू ??? इथे शब्द थिटे होतात…
त्यांनी मला विचारलं हाच एरिया का निवडला ? —लाल महाल आणि शनिवार वाडा ही इतिहासाच्या हृदयातली दोन स्थाने आहेत….
तशीच आई आणि बाप ही आपल्या प्रत्येकाच्याच हृदयातली दोन स्थानं आहेत…
आई बापाचा सन्मान करायचा…. तर याहून दुसरे श्रेष्ठ स्थान नाही, म्हणून हा एरिया निवडला…. !
—यावर डिडीनी मला घट्ट मिठी मारली…. !
कृष्ण सुदाम्याची ती भेट होती… मला या निमित्ताने आज कृष्ण भेटला…. !
श्री नितीन शिंदे, मधु तारा सोशल फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष…. अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रीय सहभाग…. हा माणूस सध्या कोट्याधीश आहे…. पैशाने आणि मनानेसुद्धा !
हा माणूस रिक्षा पंचायतीचा पुणे जिल्हाप्रमुख आहे !
यांना कोणी विचारले, तुम्ही काय करता ? तर हे बेधडक सांगतात, ‘काय नाय ओ…. मी रिक्षा चालवतो… !’
यावरून एखाद्याला वाटतं हे “रिक्षावाले काका” आहेत…
नाही… , कोट्याधीश असून हा माणूस दिवसभर स्वतः रिक्षा चालवतो…. आणि रस्त्यात अडल्या नडल्या, अंध-अपंग यांना दवाखान्यात स्वखर्चाने ॲडमिट करतो, कोणताही कॅन्सर पेशंट असेल तर त्याला ऍडमिट करून त्याच्या ट्रीटमेंटचा खर्च ते स्वतः करतात…
आज वाटण्यासाठी किराणा मालाची पोती आम्ही आणली होती…
या वेड्या माणसाने शंभर शंभर किलोंची ही पोती स्वतःच्या पाठीवर वाहून आणली….
मी जरा रागावून माझ्या या मित्राला म्हणालो, ‘तुम्ही कशाला त्रास घेतला ? वेडे आहात का ?
ते म्हणाले…., ‘बास्स का राव डॉक्टर …. माझे पूर्वीचे निम्मे आयुष्य हमाली करण्यात गेले…’
“धन्याचा तो माल…. मी भारवाही हमाल …. “
या “येड्या” माणसाच्या मी पायाशी झुकलो आणि त्याने मला उठवून हृदयाशी लावलं …. !
ही आणि अशीच अनेक “वेडी” माणसं आम्हाला आज भेटून गेली… पाठीवर हात ठेवले….
श्री प्रभाकर पाटील सर, सौ विजयाताई जोशी, श्री जुगल राठी सर, डॉ बजाज सर, सौ गौरीताई पेंडसे, श्री बंकटलाल मुंदडा, सौ आरोही दिवेकर…. आणखी किती नावे लिहू?
यातील प्रत्येक व्यक्ती हे एक स्वतंत्र पुस्तक आहे….
या प्रत्येक व्यक्तिमत्वास शब्दात बांधण्यास मी असमर्थ आहे…. !
आजच्या योग दिनानिमित्त आलेले सर्व माझे आईबाप हे मला “वारकरी” दिसत होते…
आमच्याकडे तुळशीमाळ नव्हती…. म्हणून आम्ही त्यांच्या गळ्याभोवती हात गुंफले….
टाळ सुध्दा नव्हते आमच्याकडे… मग आम्ही टाळ्या वाजवल्या….
याचना करणाऱ्या या आई बापाच्या पायाखालची माती अबीर बुक्का म्हणून आम्ही आज कपाळाला लावली….
सर्व भेटलेल्या आईंनी डोक्यावरून हात फिरवून कडाकडा बोटे मोडली आणि तिथे मृदंग वाजत असल्याचा भास झाला….. आम्ही फुगड्या घातल्या नाहीत…. परंतु रिंगण करून खेळलो…. जणू…
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई I
नाचती वैष्णव “आई” रे II
मनीषाच्या डोईवर “तुळशी वृंदावन” नव्हते म्हणूनच की काय …. कित्येक आईंनी तिच्या डोईवर पदर धरला….
शेवटी अल्पोपहार करवून… सर्वांना शिधा दिला !
सर्व आईंना नमस्कार करण्यासाठी आम्ही त्यांच्या पायाशी झुकलो…. त्यांनी खांदे धरून उठवत आम्हाला पदरात घेतलं…. जणू “माऊली” भेटली… !
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने, “भिक्षेकरी आणि गावकरी” ही दोन विरुद्ध टोक आम्ही यानिमित्ताने जोडण्याचा प्रयत्न केला…!
लाचारीची आहुती वाहून, स्वाभिमानाचा यज्ञ पेटवण्याचा प्रयत्न केला….
“Humanity” म्हणजे काय ? हे आम्हाला कळत नाही…. पण माणूस म्हणून जगण्या – जगवण्याचा आम्ही प्रयत्न केला….. या वृद्ध आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचे, समाधानाचे हसू आज पाहिले आणि आम्हाला इथेच अख्खं पंढरपुर दिसू लागलं…
सरतेशेवटी गर्दीच्या गोंगाटात…. भरधाव वाहनांमधून वाट काढत, त्यांच्या हाताला धरून आम्ही त्यांना रस्ता क्रॉस करून दिला…
जाताना त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहून सहज मनात विचार आला…. खरंच रस्ता कोणी कोणाला क्रॉस करून दिला ?
प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईने आमचा हात धरून आम्हालाच गर्दीचा हा रस्ता क्रॉस करवून दिला होता….
परतीच्या प्रवासाला चाललेली ती पाऊले पाहून….विठ्ठल-रखुमाईच्या चरणांचा साक्षात्कार झाला….
☆ फणसकिंग… श्री प्रदीप कोळेकर ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे – जोशी ☆
हरिश्चंद्र देसाई यांच्या ‘झापडे’ येथील बागेला दिलेल्या भेटीत उलगडला गेला तो एका अवलीयाचा “शासकीय कर्मचारी (एक्सरे टेक्निशियन) ते फणसकिंग” असा थक्क करणारा प्रवास.
एक शेतकरी वयाच्या 55 व्या वर्षी फणस लागवडीचा निर्णय घेतो. खरं तर हे निवृत्तीचे वेध लागणारे आणि नातवंडाच्यात रमण्याचे वय. पण हा माणूस या वयात देश-विदेशातील फणसाच्या जातीचा अभ्यास करतो, त्या बहुतांश फणसाच्या जातीची रोपे मिळवतो..अश्या 70 ते 80 प्रकारच्या फणसाच्या जातीची, 3000 हजार फणसाची झाडे आपल्या झापडे येथील 13 एकर जागेत लावतो.
बरं, एवढं करून एखादा माणूस फणसाच्या फळाची, त्याच्यापासून मिळणा-या उत्पन्नाची वाट पहात कोकणी शेतक-यासारखा निवांत राहील ना! पण, हा वेडा माणूस आपल्या IAS ची परिक्षा देत असलेल्या मुलाला चक्क नोकरीचा नाद सोड सांगतो. त्याला जॅकफ्रूट इंटरनॅशनल परिषदेला घेऊन जातो. मुलाचे मन परिवर्तन करण्यात यशस्वी होतो आणि मुलाच्या साथीने महाराष्ट्रातील “जॅकफ्रूटकिंग” म्हणून आपले आणि कोकणचे नाव जगाच्या नकाशावर आणतो.
बरं, हा फणसाच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस – मग जगाला फणस लागवडीचे पर्यावरणविषयक आरोग्यविषयक फायदे पटवून देतो. उभ्या महाराष्ट्रात फणस लागवड शेतक-यानी करावी म्हणून फणसाची रोपे तयार करतो. अशी हजारो रोपे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला पुरवतो.
आता यंदा ह्या माणसाने साठी पार केली. तुम्ही म्हणाल, आता शेतकरी म्हणून याने क्षितीज गाठलंय, आता स्वतःला सिद्ध करायचे काय बाकी राहिलं आहे ? —- पण, संतुष्ट रहाणे म्हणजे जणू शरीराला जडलेली व्याधी असा ह्या माणसाचा पक्का समज असावा—–
म्हणून हा हिमाचल प्रदेशला जातो. तेथील दर्जेदार सफरचंदाची रोपे आणतो आणि आपल्या नर्सरीत लावतो. मशागत करतो. आपल्या 900 काजू झाडांच्यामधे सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवेन, असे छातीठोकपणे सांगतो. हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि देहबोलीतला आत्मविश्वास आपली खात्री पटवतो .
शेतीत अभिनव प्रयोग करणे आणि ते यशस्वी करून दाखवण्याचा छंद जडलेली ही वल्ली. हा एक दिवस जंगल साफ करायला घेतो आणि ठरवतो यातील एकही जंगली झाड मी तोडणार नाही, पण यातून उत्पन्नही मिळवेन.
हा याचा आणखीन एक संकल्प..! ‘या झाडांवर (नैसर्गिक स्टीक’वर) मी काळीमिरीच्या (ब्लॅकपेपर) वेली सोडेन, मी येथे कृषी-पर्यटन सुरू करेन.’ हे त्यांचे आत्मविश्वासपूर्वक बोलणे ऐकल्यावर, जिद्दीला सलाम करणे एवढे एकच काम आपलं रहातं.
फणस हेच भविष्यात माणसाचे अन्न असेल असे तत्वज्ञान सांगून हा माणूस थांबत नाही, तर पिकलेल्या फणसापेक्षा कच्चा फणस माणसाची भूक भागवेल.. असा सिद्धांत मांडत, आपल्या बागेत फणासापासून कुरकुरित चिप्स बनवायचा प्लॅन्ट टाकतो. फणसापासून बिर्याणी ते कबाब, पकोडा ते डोसा आणि आईस्क्रीम ते मिठाई आणि असेच अन्य खाद्यपदार्थ कसे बनवता येतील याचा ध्यास घेऊन माहिती घेत रहातो…
“पुरूषाचे नशीब पाते-यात” अशी एक जुनी म्हण आहे. ती म्हण हा माणूस सिद्ध करण्यासाठी जणू इरेला पेटला आहे की काय? हे यांच्या शेतीतील कारवाया ऐकून/पाहून वाटते…. चक्क फणसाची हिरवी पाने हा माणूस टनच्या टन विकतो.
आंतरराष्ट्रीय कंपनीची चालून आलेली पार्टनरशीप.. बघू नंतर म्हणून टाळतो. तर दुसरीकडे.. काजूच्या झाडांचा पालापातेरा, जो कधीच कुजत नाही, त्याचे हा खत म्हणून तयार करायच्या मागे लागतो… ही खतनिर्मीती भविष्यात फक्त हाच माणूस करू शकेल. कारणहा शेतीमधला ‘एडिसन’आहे.
‘कल्पवृक्ष कन्येसाठी’च्या ऐवजी हा सासू-सास-यांना फणस द्या म्हणतो आणि फणस देखील कसा बहुगुणी आहे सांगत सासुरवाडीकडून आणलेल्या फणसाच्या जातीपासून “देसाई कप्पा” नावाची फणसाची नवी जात विकसित करतो आणि थेट कल्पवृक्षांच्या माहेरघरात केरळात जाऊन विकतो.
समस्या, अडचण हे शब्द या माणसाला कुठल्याही शिक्षकाने शिकवले नसावेत किंवा हा त्या दिवशी वर्गात गैरहजर असावा, यावर मी ठाम आहे. अहो, माकडांचा बंदोबस्त असो, गवा – रेड्यांचा उच्छाद असो, या माणसाकडे जालीम (रामबाण नको, संवेदनशील आहे) उपाय या माणसाकडून जाणून घ्यावा.
बरं, तांत्रिक समस्या म्हणाल तर त्यात हा टेक्निशियनचा बाप. हजारो मीटर विद्युतवहन विनाघट कसे करावे, हे प्रात्यक्षिकासह तुम्हाला दाखवून देतो..
एवढ्याने स्तंभित होऊन जाऊ नका, तुम्हाला हा माणूस फणासाची पिकलेली पिवळी पाने विकत घ्यायला लावणार आहे…. अठळा बदामच्या भावात विकणार आहे आणि फणसाचा समानार्थी शब्द हरिश्चंद्र देसाई असा तुमच्या शब्दकोषात बदल करायला भाग पाडणार आहे.
खरं सांगतो, एखाद्या फळझाडावर वेड्यासारखं प्रेम करणारी अशी व्यक्ती उभ्या आयुष्यात, @57 मी पाहिलेली नाही. या साठ वर्षाच्या तरुणाला तारूण्य, उर्जा, जिद्द, आत्मविश्वास ईश्वर मुक्तहस्ते प्रदान करेल यात शंका नाही. कारण, फणसाशी इमान राखणारा हा “फणस-राजा” हरिश्चंद्र या वरदानास पात्र आहे.
लेखक – प्रदीप कोळेकर, संस्थापक – माय राजापूर
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही? -एलोन मस्क.
एलोन मस्क सांगतात की त्यांची मुलगी गरीब माणसाशी लग्न का करू शकत नाही.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेत ‘वित्त आणि गुंतवणूक’ या विषयावर एक परिषद झाली होती. वक्त्यांपैकी एक होते एलोन मस्क आणि प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की सर्वजण हसले. प्रश्न होता, “तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात, तुमच्या मुलीने गरीब किंवा शामळू पुरुषाशी लग्न केले तर तुम्ही ते मान्य कराल का?.”
त्यांनी दिलेले उत्तर आपल्या प्रत्येकामध्ये काहीतरी बदल घडवू शकते.
एलोन मस्क म्हणाले, “सर्वप्रथम हे समजून घ्या की, ‘संपत्ती’ म्हणजे आपल्या बँकेच्या खात्यात खूप पैसे असणे नव्हे. संपत्ती ही प्रामुख्याने संपत्ती निर्माण करण्याचे एक साधन असते.
उदाहरणार्थ लॉटरी किंवा जुगार जिंकणारी व्यक्ती. जरी त्याने शंभर कोटी जिंकले तरी तो श्रीमंत माणूस होत नाही: तो खूप पैसा असलेला गरीब माणूस आहे. कारण लॉटरी चे बक्षीस मिळाल्याने करोडपती झालेले नव्वद टक्के लोक पाच वर्षांनंतर पुन्हा गरीब झालेले आढळून आले आहे.
आपल्याकडे पैसे नसूनही श्रीमंत असलेल्या अनेक व्यक्तीही आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर बहुतेक उद्योजकांचे देता येईल. त्यांच्याकडे पैसा नसतानाही ते संपत्तीच्या मार्गावर अग्रेसर आहेत, कारण ते त्यांची आर्थिक बुद्धिमत्ता विकसित करत आहेत आणि ती म्हणजे संपत्ती होय.
श्रीमंत आणि गरीब कसे वेगळे आहेत? सोप्या भाषेत सांगायचे तर: श्रीमंत अजून श्रीमंत होण्यासाठी मरतात, तर गरीब हे श्रीमंत होण्यासाठी मारू शकतात.
जर तुम्हाला एखादी तरुण व्यक्ती प्रशिक्षण घेण्याचा, नवीन गोष्टी शिकण्याचा निर्णय घेतांना, जो सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो, तर समजून घ्या की तो/ती एक श्रीमंत व्यक्ती आहे.
जर तुम्ही एखादी तरुण व्यक्ती बघाल जी सतत सरकार ला दोष देते, आणि श्रीमंत असलेले सगळे चोर आहेत असे समजणारा आणि सतत टीका करत रहाणारा तरुण दिसला तर तो गरीब माणूस आहे हे समजून चला.
श्रीमंतांना खात्री आहे की त्यांना उड्डाण भरण्यासाठी फक्त माहिती आणि प्रशिक्षण आवश्यक आहे, गरीबांना वाटते की प्रगती साधण्यासाठी इतरांनी त्यांना पैसे दिले पाहिजेत.
शेवटी, जेव्हा मी म्हणतो की माझी मुलगी गरीब माणसाशी लग्न करणार नाही, तेव्हा मी पैशांबद्दल बोलत नाही. मी त्या माणसामधील संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल बोलत आहे.
हे बोलल्याबद्दल मला माफ करा, पण बहुतेक गुन्हेगार हे गरीब लोक असतात. जेव्हा त्यांना समोर पैसे दिसतात तेव्हा त्यांचे डोके फिरते, म्हणूनच ते लुटतात, चोरी वगैरे करतात … ते याच्याकडे एक संधी म्हणून बघतात कारण ते स्वतःहून पैसे कसे कमवू शकतील हे त्यांना माहित नसते.
एके दिवशी एका बँकेच्या सुरक्षा रक्षकाला (गार्ड) पैशांनी भरलेली बॅग सापडली, ती बॅग घेऊन तो बँक मॅनेजरकडे द्यायला गेला.
लोक या माणसाला मूर्खशिरोमणी म्हणाले, पण प्रत्यक्षात हा स्वतःकडे पैसे नसलेला असा एक श्रीमंत माणूस होता.
एका वर्षानंतर, बँकेने त्याला स्वागतकक्षात रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीची संधी दिली, तीन वर्षांनंतर तो ग्राहक व्यवस्थापक (कस्टमर मॅनेजर) झाला होता आणि दहा वर्षांनंतर तो या बँकेचा प्रादेशिक व्यवस्थापक (रिजनल मॅनेजर) म्हणून काम पहात आहे. त्याच्या हाताखाली शेकडो कर्मचारी आहेत आणि ती सापडलेली बॅग त्याने चोरली असती तर त्यातील रकमेपेक्षा त्याच्या वार्षिक बोनसची रक्कम जास्त आहे.
‘संपत्ती’ ही सर्वप्रथम मनाची एक अवस्था मात्र असते!
तर… तुम्ही श्रीमंत आहात की गरीब? स्वतःच ठरवा.
मुळ इंग्रजी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद करून मी हा लेख तयार केला आहे. आवडल्यास शेअर करतांना लेखात बदल न करता नावासह शेअर करा ही विनंती.
-मेघःशाम सोनवणे
इंग्रजी लेखाचे लेखक – अनामिक.
मराठी अनुवाद – मेघःशाम सोनवणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आंतरराष्ट्रीय योगा दिन – भाग – 1 ☆ डॉ मनीषा आणि डॉ अभिजीत सोनवणे ☆
नमस्कार. मी डॉक्टर मनीषा अभिजीत सोनवणे….
रस्त्यावर नाईलाजाने भीक मागणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनाचा आम्ही प्रयत्न करत आहोत…. Doctor for Beggars म्हणून….
दरवर्षी आम्ही आमच्या भीक मागणाऱ्या लोकांसमवेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतच असतो….
यावेळीही आम्हाला प्रश्न विचारला, यंदा भीक मागणाऱ्या लोकांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार का ?
होय …. नक्कीच करणार आणि आमच्या भीक मागणाऱ्या लोकांच्या समवेतच तो साजरा करणार….
यावर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे “Yoga for Humanity”—-
हल्लीच्या महागाईच्या काळात ह्युमॅनिटी…. “माणुसकी” सुद्धा खूप महाग झाली आहे.
तुम्ही ज्यांना भिकारी म्हणता ते असतात तरी कोण…? आपल्याकडे युज अँड थ्रो ची पद्धत आहे…. म्हणजे एखाद्या गोष्टीचा वापर करून झाला की ती फेकून द्यायची…. मुलं बाळं, सुना नातवंडं, हे सुद्धा आपल्या आई बापाचा, आजी आजोबाचा ‘Use’ करून झाला की त्यांना ‘Throw करतात… ` It’s a new fashion….Yoooo !!! `
आई बापाला कुष्ठरोग, टीबी यासारखे रोग झाले की, हे रोग आमच्या ‘Kids’ ना होवू नयेत यासाठी सध्याचे जागरूक Mom and Dad आपल्या आई बाप आणि आजी-आजोबांना रस्त्यावर फेकून देतात— अक्षरशः तुटलेल्या चपलेगत….
आणि मग जगण्यासाठी या आई बाप आणि आजी-आजोबांना नाईलाजाने भीक मागावी लागते…
अशा नाईलाजाने भीक मागणाऱ्या…लोकांनी टाकलेल्या आईबाबांसाठी आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहोत…पोरांनी टाकून दिलेल्या …. तुटलेल्या या चपला “पादुका” म्हणून आम्ही डोक्यावर घेणार आहोत….
`योग` हा शब्द मूळ संस्कृतातील “ युज “ या धातूपासून तयार झाला आहे. आणि याचा अर्थ “जोडणे….”
येणारा हा आंतरराष्ट्रीय दिन भीक मागणाऱ्या लोकांसमवेत साजरा करून, गावकरी आणि भिक्षेकरी ही समाजातली iदोन टोकं जोडण्याचा प्रयत्न आम्ही यानिमित्ताने करणार आहोत….
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…” आई बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात..” हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत….
चितेवर जाण्याआधी त्यांच्यात चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने करणार आहोत….
नळ दुरुस्त करणारा कारागीर कितीही कुशल असला तरीसुद्धा डोळ्यातलं पाणी थांबवायला आपल्या माणसाचीच गरज असते….
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने…. “युज अँड थ्रो” केलेल्या या आई-बाबांचा हात हातात घेऊन….. त्यांचं “आपलं माणूस” होण्याचा यानिमित्ताने प्रयत्न करणार आहोत…..
Yoga for humanity…. !
ह्युमॅनिटी चा अर्थ जर “ माणुसकी “ असा असेल तर त्यातला एक अंश आम्ही जगण्याचा प्रयत्न करणार आहोत….
21 तारखेला शनिवारवाड्याशेजारील फुटपाथवर आम्ही हा सोहळा सकाळी ११ वाजता आयोजित करत आहोत….
आमच्या या सोहळ्यामध्ये कसलाही डामडौल नसेल …येथे कोणी सेलिब्रिटी नसतील…
इथे फक्त असतील समाजाने फेकलेले…थकलेले ….आयुष्याच्या अंताला लागलेले आई आणि बाप !
आमच्या या सोहळ्यात आपणही सहभागी झालात तर त्यांना आणि आम्हाला नक्कीच आनंद होईल….
या निमित्ताने आपण उद्या गोरगरिबांना शिधा देत आहोत…. !!!
या शिध्याने त्यांचं ८ दिवसच पोट भरेल…. पण आम्ही मात्र कायमचे तृप्त होवू….!
निसर्गाची किमयाच अशी की ….घेऊन मिळतो तो “आनंद” आणि देऊन मिळतं ते “समाधान“…!
बऱ्याच वेळा आपण पेडगावचे शहाणे किंवा वेड पांघरून पेडगावला जाणे. असे वाक्प्रचार वापरतो. पण असा कधी विचार केला आहे का ? की पेडगावच का ? दुसरे कुठले गाव का नाही ? पाहू या तर मग :-
६ जून १६७४ला शिवराज्याभिषेक संपन्न झाला. ह्या अद्वितीय सोहळ्यासाठी एकूण साधारण १ कोटी रुपये खर्च आला. हा खर्च राजांनी मुघलांकडून कसा वसूल केला ? त्याची ही गमतीशीर हकीकत आणि गनिमी काव्याचे एक उत्कृष्ट उदाहरण :-
अहमदनगर जिल्ह्यात ‘पेडगाव’ नावाचं एक गाव आहे. तिथे बहादूरखान कोकलताश नावाचा औरंगजेबाचा महामुजोर सुभेदार होता. आपल्या शिवाजी महाराजांना अशी खबर मिळाली की २०० उच्च प्रतीचे अरबी घोडे आणि साधारण १ कोटी रुपये (तेव्हा होन ही मुद्रा होती, रुपये नव्हते) बहादुरगडावर आले आहेत. आणि तिच्या रक्षणासाठी मोठी फौजही तैनात आहे. ही सगळी मालमत्ता लवकरच दिल्लीस रवाना होणार आहे. आता महाराजांनी आज्ञा दिली की २००० चं सैन्य बहादुरगडावर चढाई करेल आणि ही सर्व लूट लुटून आणेल (बलाढ्य ऐवज आणि ते २०० उमदा अरबी घोडे).
कोणास ठाऊक कशी पण खानाला ही बातमी समजली , तेव्हा तो माजोरडा चेष्टेने हसत म्हणाला, ” सिर्फ २००० मराठा मावळे ! उनके लिये तो किलेके दरवाजे खोल दो. अंदर आतेही खदेड देंगे,काट देंगे.”
तारीख १६ जुलै १६७४, पेडगावच्या त्या बहादूरगडातून मुघल सैन्याला दूरवर धूळ उडताना दिसली. घोडदौड येत आहे हे त्यांच्या लक्षात आले. धोक्याच्या तुताऱ्या वाजल्या आणि गडावर आधीच तयार असलेली खानाची प्रचंड सेना सज्ज झाली. त्यांनी किल्ल्याचे दरवाजेही उघडले. जसे गाफील मावळे जवळ आले, तसा लगेच खानाच्या सेनापतीने चढाईचा हुकूम दिला. अनपेक्षितपणे झालेल्या या प्रतिकाराने सगळे २००० मावळे बिथरले आणि जीव वाचवायला ते मागे फिरले. पण त्यांचे घोडे जोरच पकडत नव्हते. मात्र खानाची संपूर्ण फौज जशी जवळ येऊ लागली–खूप जवळ आली– तशी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून घोड्यांनी वेग पकडला आणि मावळ्यांनी पाठ दाखवून मागे धूम ठोकली. बहादूरखान स्वतः त्यांच्या समाचारासाठी मुघल सैन्याच्या पुढे होता. अनेक कोस ही घोडदौड चालत राहिली. कारण मावळ्यांच्या घोडदौडीतली भीती बहादूरखानास चेव आणीत होती. शेवटी मावळे पार पसार झाले, संपूर्ण २०००ची फौज वाचली खरी, पण आपले शिवबा हरले रे !
खानाच्या फौजेत एकच जल्लोष झाला. शिवाजीच्या फौजेला हरवून पळायला लावणे हे काही छोटे काम नाहीच.` शिवबांची फौज हरली, पळ काढला ! ` ही जीत औरंगजेबास कळल्यावर आपल्याला केवढे इनाम मिळेल ? ह्या आनंदात बहादूरखान छाती फुगवून घोड्यावरून डौलत डौलत परतत होता. तितक्यात सगळं सैन्य एकदम शांत झालं आणि डोळे विस्फारून दूरवर असलेल्या बहादूरगडाकडे बघू लागलं. धुराचे मोठ मोठे लोट किल्ल्यातून बाहेर पडताना दिसत होते. खानाने भीतीने आवंढा गिळत किल्लेदाराला विचारलं, “अगर हम सब यहाँ हैं, तो किलेपर कौन है?” “कोई नही जहापन्हा. आपकाही हुकुम था की सबने मिलकर शिवाजी के उन २००० मावलों पर चढ़ाई करनी है “. आता किल्लेदार, सेनापती, आणि स्वतः खानाचे धाबे दणाणले. कारण काय आक्रित झालं असणार ह्याचा त्यांना अंदाज आला. आणि त्याच सोबत छत्रपती शिवाजीराजे ही काय चीज आहे हे ही ध्यानात आलं. आणि त्यांची भीती खरी ठरली. एक घोडेस्वार दौडत आला, आणि , “हुज़ूर, गज़ब हो गया, हम सब लुट गए, बर्बाद हो गए. आप सब वहां २००० मराठाओं के पीछे दौड़े, और यहाँ किलेपर ७००० मराठाओंने हमला करके सब लूट लेके चले गए हुज़ूर !”.
अशा प्रकारे राज्याभिषेकाचा खर्च एक कोटीही वसूल, शिवाय २०० उच्चप्रतीचे अरबी घोडे छत्रपतींच्या ताफ्यात— आणि हे सगळ नाट्य घडलं एकही मावळा न गमावता, रक्ताचा एक थेंबही न सांडता.
आता लक्षात आलं का ? की हे सगळं नाट्य घडलं कुठे, तर पेडगावला. खानाला वेड बनवलं ते त्या पेडगावात. आणि म्हणून,
पेडगावचे शहाणे
आणि
वेड पांघरून पेडगावला जाणे
हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला लाभले.
छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
माहिती संग्राहक : माधव केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
21 जून—-वर्षातील सर्वात मोठा दिवस…जवळपास 14 तासांचा दिवस आज…आज सूर्यास्त जरा उशिराच होतो…आजच्या दिवसाला सोल्सटाइस (Solstice)असहि म्हणतात.
सर्वानाच माहीत आहे कि, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आणि पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे दिवस मोठा असतो.पृथ्वीच्या अक्षाच्या सूर्याशी असलेल्या कोनानुसार , संपूर्ण उत्तर गोलार्धात 21 जून हा वर्षातील मोठा नी दक्षिण गोलार्धात सगळ्यात लहान दिवस असतो.
उत्तरायणात,सूर्याचा हळूहळू उत्तरेकडे प्रवास सुरु होतो…तो उत्तरेकडे सरकत असता,दिवसाचा कालावधी वाढतो. उत्तरेकडच्या सूर्याचा हा प्रवास 21 जून पर्यंत चालतो. सूर्य या दिवशी विश्वववृत्ताच्या जास्त उत्तरेकडे असतो म्हणून ह्या दिवसाचा कालावधी अधिक असतो.
आता योग:-
योग माझ्या गुरूंनी सांगितलेला…माझ्या वाचनातला,आचरणातला आणि जाणिवेतला!!!
योग हि साधना आहे…हे शास्त्र आहे…हा अभ्यास आहे! भगवान श्रीकृष्णांनी शिकवलेला मूळ योग आहे. हा श्रद्धेचा सर्वोच्च दिव्य मार्ग आहे.शास्त्रीय,नियमित आणि भावनापूर्ण परमेश्वर ध्यानाचा मार्ग आहे.
मानवाला अज्ञानातून मुक्त करून, शारीरिक,मानसिक नी अध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण असा हा योग!!!💐
योग साधनेत, त्यातील अभ्यासाच्या प्रकारांमध्ये योग किंवा योगा प्रकार करणेअसाच विचार माणसाना येतो. किंवा तसाच विचार लोक करतातही.
पण नुसत्याच व्यायाम प्रकारांनी आपल्या शरीरात ऊर्जा हवी तेवढी निर्माण होत नाही. ते प्रकार शास्त्र शुद्ध हवेत.शरीराला प्राण शक्तीची गरज असते.
शरीराच्या पेशींना,अधिकाधिक क्रियाशील बनवण्यासाठी सुर्यप्रकाश,शुद्ध हवा, सात्विक व शुद्ध तरल पदार्थ,पाणी आणि फळाची आवश्यकता असते.
शरीरातील स्नायू,पेशी,हाडं, मज्जासंस्था, रक्त या सर्वांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. हि ऊर्जा दैनंदिन जीवनात सतत वापरली जाते,पण अशीच आणि अधिकाधिक ऊर्जा आपण आपल्या इच्छाशक्तीच्या वापराने व्यायामाच्या शास्त्र शुद्ध पद्धतीतून साधनेतून निर्माण जर शकतो.आणि आपली प्राणशक्ती अधिकाधिक चैतन्यमय बनवू शकतो.
हा योग म्हणजे आपल्याला वाटणारा नुसताच शरीराचा व्यायाम नसून, त्याद्वारे आपल्या देहात,अंतरात प्राणशक्ती निर्माण करणे आणि शरीर हे प्रत्यक्ष ऊर्जेचे स्रोत बनवणे .
यातील विशिष्ट व्यायाम, प्राणायाम,श्वासावर नियंत्रण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे शरीरात निर्माण होणारी शक्ती(ऊर्जा) आणि त्याद्वारे राखले जाणारे शारीरिक,मानसिक संतुलन!!!
यात ध्यान साधना खूप महत्वाची आहे.ध्यानाने मन शांत होते. चंचल मन एकाग्र होते. ध्यानाचेही शुद्ध शास्त्र आहे. ध्यानाचा शास्त्रोक्त अभ्यास करणे महत्वाचे आहे. ध्यान म्हणजे आपल्या प्राणशक्तीला – इच्छा शक्तीच्या अधिन आणणारी शक्ती!
ध्यानाच्या विज्ञानाला राजयोग म्हणूनही ओळखले जाते.. म्हणजेच ईश्वर प्राप्तीचा राजमार्ग!!!💐
आजचा 21 जून सर्वात मोठा दिवस, हा भौगोलिक दृष्ट्या आहे. आणि आपले पंतप्रधान मोदीजींनी 21 जून 2015 मध्ये जाहीर केलेला व तेव्हा पासून सुरु असलेला, योग दिवस याचा तसा काही सबंध नाही…
पण आजच्या योग दिवसाचा व सर्वात मोठ्या दिवसाचा योगायोग म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग म्हणावयास हरकत नाही. आणि हे लक्षात घेता मला आलेले विचार….
नेहमीच सूर्योदयाच्या नव्या किरणांना आकर्षित होणारी मी… नव्या दिवसाचे नवे स्वप्न उराशी बाळगणारी मी…नव्या अरुणोदयला साक्ष ठेऊन इच्छा आकांक्षा नी आव्हानांना सामोरी जाणारी मी…आज खूप आनंदाने आपण सर्वाना ह्या मोठ्या दिवसाच्या शुभेच्छा देते!💐
नेहमीपेक्षा आज मोठा दिवस, म्हणचे जास्त वेळ प्रकाश,तेज,सूर्याच्या किरणांचा तेजाचा जास्त वेळ संपर्क!
वेळ तीच, घड्याळहि तेज,रोजचे दैनंदिन कामकाजहि तेच! पण तो सूर्य संपूर्ण त्रिलोक्याला तेजाळणारा… आज सूर्योदय नवी कांती देणारा… नुसते आपल्यालाच नव्हे, तर पर्वताना, नद्यांना,झाडांना,पक्षांना,प्राण्यांना,साऱ्या चराचराला एका दिव्या प्रमाणे मिळालेले तेज… दिवसभरात अगदी सूर्यास्तापर्यंत विविध रंगांनी, ढंगानी मिळेल… सकाळ, दुपार व संध्याकाळच्या विविधरंगी छटा सर्वाना सुखी करोत… दिवसभरातील विविध रंगी छटांनी केलेले नृत्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधःकार नष्ट करून, नव दिशा दाखवू देत…
सूर्याचा हा प्रकाश…हे तेज…नी तेजाळणे सर्वांचे रक्षण करो!💐👍
आज धकाधकीच्या , धावपळीच्या योगात आपल्याला आपल्या मनाकडे लक्ष द्यायला अजिबात फुरसत नसते…पण आजच्या दिवशी मनाकडे आवर्जून लक्ष द्यावं… आणि ते सुदृढ व्हावं यासाठी करावा योग!!💐
योग दिवसाच्या व सर्वात मोठ्या दिवसाच्या सानिध्यात ध्यानस्थ होऊन सूर्याच्या सोनेरी किरणांच्या स्नानाने, आपल्या मनातील राग, लोभ, मोह, मत्सर, असूया, घृणा, भेदभाव, जातीयवाद यांचा नाश होवो. तन मन निरामय होऊन अंतःकरण व चित्त शुद्धी होवो ….सायंकाळच्या ध्यानाच्या तेजाने म्हणजेच संधिप्रकाशाची लाली जणू गुलाल उधळलाय असे वाटावे…
आजच्या दिवशी सुर्याचे तेज जास्त असणार! त्यामुळे दिवसभरात त्या तेजाचे , कुटस्थाकडे (दोन भुवयांमधील स्थान) न पाहताही ‘अद्वितीय चक्षु’ म्हणून सतत दर्शन होणार… त्याचे दर्शन किती घ्यायचे हे आपली हाती आहे!👍💐
आजचा योग दिवस नी मोठा दिवस म्हणून हि योग साधना! हि रोजचीच का होऊ नये?? हा योग दिवस सर्वांचाच रोजचा असावा… कारण रोजच्या नियमित योगाने, रोजच्या ध्यानाने आपल्या अंतरातील तेज वाढून, आपल्याला एक अनामिक आत्मिक आनंद मिळणार आहे, मग तो दिवस मोठा असो किंवा लहान…आपल्याच कुटस्थातील तेज, शांती, आणि ब्रह्मानंद 🙏🏻 … काय वर्णावा!!!!👍💐