मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पुजारी हॉटेल ☆ श्री शामसुंदर महादेवराव ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

 

??

☆ पुजारी हॉटेल ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

डॉ. आंबेडकर चौक हा आमच्या गावातील एक प्रमुख चौक. याच चौकात असलेलं पुजारी हॉटेल आपल्या अनेक वैशिष्ट्यांनी वेगळेपण जपून होतं. आमच्या बालपणापासून ते तारुण्यापर्यंतच्या आमच्या जीवनात या हॉटेलचे अनेक अनुभव स्मृतीपटलावर कोरले गेले आहेत .आज सहजच पुजारी हॉटेलच्या जागेवर बांधल्या गेलेल्या शोरुम कडे पाहिलं आणि पुजारी हॉटेलच्या आठवणी मन:चक्षुसमोरून सरसरत गेल्या.

पुजारी हॉटेल म्हणजे काही भव्यदिव्य वास्तू नव्हती. दहा बाय वीस पंचवीस फूट क्षेत्रफळ असलेल्या टिनाच्या शेडमध्ये हे हॉटेल होते. पण इतके लहान असले तरी आम्हाला ते कधी अडचणीचे  वाटले नाही. पश्चिम व दक्षिण दिशेला असलेले दरवाजे आम्ही कधी बंद झालेले पाहिले नाहीत .दोन तीन टेबलं , त्याभोवती खुर्च्या.  कोपऱ्यात एक निमुळता टेबल व त्यामागे लाकडी खुर्ची म्हणजे मालकाचे काऊंटर. उत्तरेकडे सदैव पेटत असलेली भट्टी.  कोपऱ्यात पाण्याचे टाके, त्यावर पाण्याचा नळ. याच टाक्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जायचे. नोकरही चार ग्लास बोटात धरून टाक्यातील पाण्यात बुडवत आणि तसेच टेबलवर आणून ठेवत. आणि याला त्यावेळी कुणाचाही आक्षेप नसायचा. मिनरल वॉटर तर माहीतच नव्हते, पण कुणी आजारी पडल्याचे कधी ऐकले नाही .नगर परिषदेच्या नळाचे पाणी म्हणजे शुद्ध पाणी असा तेव्हा नियम होता . .या हॉटेलचे वेगळेपण म्हणजे ते जवळपास दिवसरात्र सुरू असायचे.  रात्री दोन तीन तास लाईट बंद केले की हॉटेल बंद. हॉटेलचे नोकर तिथेच रहायचे .काही विशिष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध म्हणावे तर तसेही नव्हते .भजी, आलुबोंडे ,शेव चिवडा असे नेहमीचेच पदार्थ तिथे मिळायचे. मिठाई म्हणजे जिलेबी व केव्हातरी बनविलेले पेढे बस. पण केव्हाही गरम मिळणारा एक पदार्थ तिथे मिळायचा तो म्हणजे मिसळ, त्याचीही  रेसिपी ठरलेली होती. हॉटेलच्या भट्टीवर सदैव एक गंज मांडलेला असायचा- त्यात  केव्हातरी बनविलेली दह्याची कढी सदैव गरम होत राहायची. मिसळ म्हणजे दोन चार भजी, त्यावर शेव चिवडा, आणि गरम कढी टाकलेली असायची.

हे पुजारी हॉटेल पदार्थासाठी महत्वाचे नव्हते, तर ते अनेकांचा आधार होते. त्याकाळी चंद्रपुरात सायकल रिक्षे होते.रात्री सर्वत्र सामसूम झाल्यावर असे रिक्षावाले हॉटेलच्या आश्रयाने उभे असायचे. रात्री साडेबाराला सिनेमाचे शो संपायचे ,अनेक लोक चहा नाश्त्यासाठी याच हॉटेलचा आश्रय घ्यायचे. दुसरे महत्वाचे म्हणजे तेव्हा  पॅसेंजर ट्रेन हेच लोकांच्या आवागमनाचे साधन होते. नागपूरकडे जाणारी व नागपूरकडून येणारी- अशा दोन्ही गाड्या मध्यरात्रीच येत असत. या दोन्ही गाड्यांचे प्रवासी रात्रीचा वेळ पुजारी हॉटेलच्या आसपास घालवीत असतं. साधारणतः रात्री दोन तीन पर्यंत सुरू असलेले ते हॉटेल पहाटे पाचला पुन्हा सुरू व्हायचे. रात्रीच्या गाडीने आलेले पाहुणे पहाट होईपर्यंत हॉटेल परिसरात थांबायचे, कारण तिथे रात्रीही वर्दळ असायची.

हॉटेलमध्ये नॅशनल एको कंपनीचा रेडिओ होता, जो सकाळी सहाला सुरू व्हायचा तो रात्री रेडिओ प्रक्षेपण बंद होईपर्यंत सुरू असायचा. हॉटेललगत एक मोठे सिरसाचे झाड होते.. त्यावर एक मोठा स्पीकरबॉक्स लावलेला होता. तो रेडिओला जोडला असल्यामुळे रेडिओचे सर्व कार्यक्रम परिसरात ऐकू जायचे.  त्यावेळी “ सिलोन ब्रॉडकास्टिंग कारपोरेशन का व्यापारी विभाग “ हे रेडिओ स्टेशन प्रसिद्ध होते.बिनाका गीतमाला, आपहीके गीत, भूले बिसरे गीत, असे अनेक कार्यक्रम ऐकण्यासाठी लोक तिथे थांबायचे .अमीन सयानीचा आवाज ऐकू आला की लोकांची पावले नकळत थांबत. आमच्यासाठी तर ते घड्याळही होते.आमची सकाळची शाळा असायची. साडे सातला शाळा सुरू व्हायची. सात वीस ला प्रार्थना व्हायची . हॉटेलपासून शाळा पाच मिनिटाच्या अंतरावर होती. सव्वासातला रेडीओवर `सत्तेशू समाचार` हा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारा कार्यक्रम लागायचा व नंतर समाचार लागायचे. आम्ही तिथे पोहोचलो की कोणता कार्यक्रम सुरू आहे ते ऐकायचो.समाचार सुरू नसतील तर  बरोबर प्रार्थनेला हजर. नाहीतर उशीर म्हणून छड्या बसत असेत . सिरसाचे ते झाड आणखी एका बाबतीत मनोरंजक होते.  या झाडावर गावातील सिनेमा थियेटरमध्ये लागलेल्या सिनेमाचे बोर्ड टांगलेले असायचे. कोणत्या टॉकीजमध्ये कोणता सिनेमा लागलाय ते तिथे समजायचे .शाळा सुटली की तिथे उभे राहून ते बोर्ड पाहणे हा आमचा आवडीचा विषय होता .

“पुजारी हॉटेल“ या नावातील `पुजारी` या शब्दाचाही एक इतिहास आहे. पुजारी हे मालकांचे आडनाव नव्हे, तर मालकाचे वडील गुजरात राज्यातून चंद्रपूरच्या लक्ष्मीनारायण मंदिराचे पुजारी म्हणून आले होते. पुढे त्यांचे मूळ आडनाव मागे पडून पुजारी हेच नाव प्रसिद्ध झाले.

हॉटेलचे एक आणखी वैशिष्टय म्हणजे हॉटेलमध्ये लावलेले फोटो. यात अनेक राष्ट्रीय पुरुषांचे फोटो होते.आम्ही शिकतांना दहावीत काँग्रेसच्या स्थापनेचा इतिहास शिकला होता. काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी, बद्रुद्दिन तय्यबजी,दादाभाई नौरोजी. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, यालन ह्यूम, वेडरबर्न, या सर्वांचे फोटो तिथे लावले होते. हे त्यांचे अनौपचारिक शैक्षणिक कार्यच होते.

आणखी एक वैशिष्टय म्हणजे या हॉटेलच्या दर्शनी भागात  बँडवाल्यांची वाद्ये लटकवलेली असायची.कारण हॉटेल मालकांच्या  लहान भावाची इंडिया बँड पार्टी होती.त्या परिसरातील बँडवाल्यांनी आपसातील भांडणाला कंटाळून त्यांना आपले प्रमुख नेमले होते. ` बँड पार्टीचे ब्राम्हण प्रमुख ` हे कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे. गावातील सर्व लग्नाचे बँड पुजारी होटलातच ठरायचे. महत्वाचे म्हणजे ही बँडपार्टी व त्याचे ` पुजारी ` हे मालक अजूनही आहेत . नुकताच त्यांनी त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.

असे हे वैशिष्टयपूर्ण पुजारी हॉटेल नवीन पिढीने विकले– तिथे दुसरे शोरुम उभे राहिले. पण माझ्या पिढीतील अनेक चंद्रपूरकर या हॉटेलला कधीही विसरू शकत नाहीत —कारण ते फक्त हॉटेल नव्हतेच.

©  श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोत्र म्हणजे काय ?.☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

?  वाचताना वेचलेले ? 

☆ गोत्र म्हणजे काय ?.☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

गोत्र म्हणजे काय ?

धार्मिक विधी करताना बऱ्याच वेळा `आपले गोत्र काय ` असा प्रश्न गुरुजी विचारतात तेव्हा ` गोत्र म्हणजे काय `असा

प्रतिप्रश्न करणारे देखील असतात, अशावेळेला पूर्वजांपैकी कोणी एक पुरुष असे उत्तर देऊन वेळ मारुन नेणारेही  काही जण असतात. पण तसे नसून गोत्र ही वैदिक धर्माने दिलेली देणगी आहे. जन्मवंश शास्त्र दृष्ट्या अत्यंत सूक्ष्मस्तरीय एक मानवशाखा आहे.

“धर्मसिंधु” ग्रंथामध्ये गोत्राचे लक्षण पुढील प्रमाणे दिलेले आहे—

`तत्र गोत्र लक्षणम् – विश्वामित्रो जमदग्निर्भरद्वाजो$थ गौतमः ।

अत्रिर्वसिष्ठः कश्यप इत्येते सप्तऋष्यः ॥ ‘

विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, गौतम, अत्रि, वसिष्ठ,आणि कश्यप हे सात ऋषी आहेत. व आठवे ऋषी अगस्त्य हे

होत. यापैकी प्रत्येक ऋषीचे आपत्य म्हणजे गोत्र होय. त्या त्या ऋषींच्या नावांना गोत्र असे म्हणतात.

प्रमुख गोत्र व त्यांची प्रवरे

१ अत्रि : आत्रेय -आर्चासन -श्यावाश्व

२ अघमर्षण : वैश्वामित्र -अघमर्षण-कौशिक

३ आंगिरस : आंगिरस -आंबरीष -यौवनाश्व

४ आयास्य : आंगिरस -आयास्य -गौतम

५ आर्ष्टिषेण : भार्गव – च्यावन -आप्न्वन – आर्ष्टिषेण -अनूप

६ उपमन्यु : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु

७ कण्व : आंगिरस -आजमीढ -कण्व

८ कपि : आंगिरस -आमहीयव -औरुक्षयस

९ काश्यप  : काश्यप  -अवत्सार -नैधृव( काश्यप ) -अव्त्सार -असित

१० कुत्स : आंगिरस -माधांत्र -कौत्स

११ कौंडिण्य : वासिष्ठ -मैत्रावरुण -कौंडिण्य

१२ कौशिक : वैश्वामित्र –अघमर्षण -कौशिक

१३ गार्ग्य : आंगिरस -शैन्य -गार्ग्य

१४ जामदग्न्य : भार्गव – च्यावन -आप्न्वन -और्व -जामदग्न्य

१५ नित्युन्द : आंगिरस – पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

१६ नैध्रुव : काश्य्प -अव्त्सार – नैध्रुव

१७ पाराशर :वासिष्ठ -शाक्त्य -पाराशर

१८ बादराण : आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

१९ बाभ्र्व्य : वैश्वामित्र -देवरात -औदास

२० बिद : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व – बिद

२१ भारव्दाज : आंगिरस बार्हस्पत्य -भारव्दाज 

२२ मित्रायु :भार्गव – च्यावन -देवोदास

२३ मुद्ग् गल : आंगिरस -भार्ग्याश्व -मौद्ग्गल्य

२४ यस्क : भार्गव वैतहव्य -सावेतस

२५ रथीतर :आंगिरस -वैरुप -रथीतर

२६ वत्स : भार्गव – च्यावन -आप्न्वन-और्व -जामदग्न्य

२७ वासिष्ठ : वासिष्ठ -इंद्रप्रमद -आभ्रद्ववसु

२८ विष्णुवृद्ध :आंगिरस -पौरुकुत्स्य -त्रासदस्यु

२९ वैश्वामित्र : वैश्वामित्र -अघमर्षण -कौशिक

३० शांडिल्य : शांडिल्य -असित -देवल

३१ शालाक्ष : वैश्वामित्र -शालंकालय -कौशिक

३२ शौनक : भार्गव -शौनहोत्र -गार्स्तमद

प्रवर म्हणजे काय ?

गोत्रांची संख्या अगणित असली तरी धर्माने त्यांची व्यवस्था सुलभ व्हावी म्हणून त्यांची विभागणी पन्नास गणामध्ये केलेली आहे. प्रत्येक गोत्रांना प्रर्वतक ऋषी असतात. काही गोत्रांना एक, काही गोत्रांना दोन, काही गोत्रांना तीन ते पाचपर्यंत प्रवर्तक असतात. या प्रवर्तक ऋषी गणांना प्रवर असे म्हणतात.

काही समाजामध्ये आजही सप्रवर विवाह वर्ज केला जातो. तसेच उपनयन प्रसंगी बटूस गोत्र प्रवर ,स्वतःची वेदशाखा,

सूत्र, स्वतःचे नक्षत्र व चरण नाम यांची माहिती करुन दिली जाते.

ही माहिती शेयर करण्याचे कारण म्हणजे आपले पूर्वज आणि आपली हिंदू संस्कृती किती संपन्न होती ह्याचे हे छान उदाहरण आहे…..

जेनेटिक्सचा अभ्यास करणाऱ्यांनी हे मान्य केलेले आहे की एका गोत्रात लग्न केल्यामुळे अनेक आजार ( जेनेटिकली ट्रांसमिटेड डिसीज ) होऊ शकतात आणि आपल्या पूर्वजांनी जे नियम घालून दिले आहेत ते योग्य आहेत…..

त्यातील बऱ्याच गोष्टीची उकल जेनेटिक्सवाले आता करत आहेत …

आपली हिंदू संस्कृती अतिशय पुढारलेली आहे . त्यामुळे योग्य अभ्यास करून मगच त्यावर टीका करा….

धन्यवाद ………….

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मौल्यवान पण दुर्लक्षित’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ ‘मौल्यवान पण दुर्लक्षित’ ☆ श्री अरविंद लिमये ☆

संवादाचे एक माध्यम ही वाणीची ओळख परिपूर्ण ठरणारी नाही.तिची घडवण्याइतकीच बिघडवण्याची शक्ती जाणून घेऊन तिचा योग्य पध्दतीने वापर करणे अगत्याचे आहे असे मला वाटते.कुठे,कसे,किती बोलायचे आणि कुठे मौन पाळायचे यावरच वाणीद्वारे संवाद साधला जाणार की विसंवाद वाढणार हे अवलंबून असते.

वाणी माणसे जोडते तशीच तोडतेही.एखादे काम सुकर करते तसेच कठीणही.वाणी मन प्रसन्न करते आणि निराशही.ती आनंद देते कधी दु:खही.पण तिच्या या चांगल्या किंवा वाईट देण्याघेण्याच्या बाबतीत ती परस्वाधीनच असते.कारण तिचा वापर करणारे ‘आपण’ असतो ‘ती’ नाही.

मात्र या सगळ्याचे या आधी अनेकांच्या लेखनात सविस्तर विवेचन झालेले असल्याने या विषयाच्या एका वेगळ्यादृष्टीने महत्त्वाच्या कंगोऱ्याबाबत प्रामुख्याने आवर्जून कांही सांगायचा मी प्रयत्न करतो.

‘वाणी’ हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे हे वाचताना थोडं अतिशयोक्तीचं वाटेल पण ही वस्तुस्थिती आहे.

विविध घटकांनी बनलेल्या आपल्या व्यक्तिमत्त्वातला ‘चेहरा’ सर्वसाधारणपणे काळजीपूर्वक जपला जातो कारण आपलं व्यक्तिमत्त्व चांगलं दिसण्यासाठी आपला चेहराच महत्त्वाचा आहे असाच सर्वसाधारण समज असतो. त्यासाठी मुद्दाम वेळ काढून, भरपूर खर्च करून आपला चेहरा सतत ताजातवाना, टवटवीत राहिल, तो चांगला दिसेल याबाबत सर्वजणच दक्ष असतात.पण आपली वाणी म्हणजेच आपला आवाजसुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वातले तितकेच महत्वपूर्ण अंग आहे याबद्दल बरेच जण अनभिज्ञ असतात. त्यामुळे वाणीतील दोष आपल्या आकर्षक आणि रुबाबदार व्यक्तिमत्वावर क्षणार्धात नकारात्मक परिणाम करणारे ठरू शकतात याचा फारसा कुणी गंभीरपणे विचार करीत नाही. त्यामुळे अर्थातच ते दोष दूर करण्याच्या दृष्टीने कुणी फारसे प्रयत्नशीलही नसतात.

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या परिपूर्णतेत, सौंदर्यात तिच्या वाणीचेही खास महत्त्व आहे.किंबहुना  चेहऱ्यापेक्षाही कणभर जास्तच. व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न, उमदं आणि चेहरा हसतमुख सुंदर असणारी व्यक्ती समोर येताच प्रथमदर्शनी आपण प्रभावित होतो खरे,पण त्या रुबाबदार व्यक्तीच्या वाणीत कांही दोष असतील तर तिने बोलायला तोंड उघडताच आपला विरस होतो.प्रथमदर्शनी निर्माण झालेला आपल्यावरील त्या व्यक्तीचा प्रभाव भ्रमनिरास व्हावा तसा क्षणार्धात विरून जातो.याचप्रमाणे सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व असणारी,क्वचित कधी कुरुप असणारी एखादी व्यक्तीही केवळ तिच्या वैशिष्ट्यपूर्ण वाणीमुळे आपले लक्ष वेधून घेते.फोनवरचा कर्कश्श आवाज ऐकताच आपल्या कपाळावर नकळत आठी उमटते. तोच आवाज जर स्वच्छ, स्पष्ट, लाघवी असेल तर आपल्याला ती व्यक्ती पूर्वी कधीही प्रत्यक्ष भेटलेली नसली तरी तिचे बोलणे ऐकत रहावे असे वाटते.अर्थातच इथे तिच्या वाणीच्या गुणवत्तेला तिच्या बोलण्याची पध्दत,त्यातील आदरभाव,मुद्देसूदपणा, लाघव या गोष्टीही पूरक ठरत असतात. यावरुन आपल्या वाणीचे, आवाजाचे आपल्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीतले महत्त्व समजून येईल.

गायक-गायिका, निवेदक, शिक्षक,वकील,विक्रेते अशा विविध व्यवसाय करणाऱ्यांच्या बाबतीत वाणीची गुणवत्ता महत्त्वाची असतेच.किंबहुना आवाजाची जाणिवपूर्वक केलेली सुयोग्य घडण ही या़च्याच बाबतीत नाही फक्त तर इतर सर्वांच्याच बाबतीतही तितकीच अत्यावश्यक बाब ठरते‌.

निसर्गत:च आपल्याला लाभलेली स्वरयंत्राची देणगी हे आपले स्वरवाद्यच.मग ते बेसूर वाजणार नाही याची काळजीही आपणच घ्यायला हवी हे ओघाने आलेच.

स्वरयंत्राची रचना आणि कार्यपध्दती याची सर्व शास्त्रीय माहिती आवर्जून करुन घेणे ही आवाजाची निगा राखण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी म्हणता येईल.त्यानंतर गाण्यासाठी असो वा बोलण्यासाठी हे स्वरवाद्य परिपूर्ण करुन ते सतत कार्यक्षम ठेवणे गरजेचे आहे.त्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे ॐकाराचा नियमबद्ध रियाज ! इथे ॐकाराचा सरधोपट उच्चार कुचकामी ठरतो.तो नेमका कसा,कधी आणि किती करावा हे जाणकारांकडून समजून घेऊन अंमलात आणणे अगत्याचे आहे.परिपूर्ण आवाज आणि निर्दोष वाणीसाठी ॐकार साधना आणि ॐकार प्राणायाम यांचं प्रशिक्षण देणारी माध्यमेही आज उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग मात्र करुन घ्यायला हवा. शब्दस्वरातील स्पष्टता, दमश्वास वाढणे,आवाज मुलायम,वजनदार होणे,बोलण्यात किंवा गाण्यात सहजता येणे,वाणी शुध्द होणे, बोबडेपणा, तोतरेपणा यासारखे वाणीदोष नाहीसे होणे, आवाजातली थरथर दूर होऊन आवाज मोकळा होणे असे अनेक फायदे या ॐकार साधनेमुळे मिळवणे सहजशक्य आहे. त्यासाठी चिकाटी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे महत्त्व मात्र जाणवायला हवे.परिपूर्ण निर्दोष वाणी ही फक्त विशिष्ट व्यवसाय व कलांच्या बाबतीतच आवश्यक असते हा एक गैरसमज आहे.आपले व्यक्तिमत्त्व सर्वांगसुंदर आणि निर्दोष होण्यासाठी ती सर्वांसाठीच तेवढीच आवश्यक आहे.

कर्णबधीर किंवा मुक्या व्यक्ती त्यांच्यातल्या व्यंगामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीशी सतत संघर्ष करीत जशा स्वयंपूर्ण होतात तसेच त्या व्यक्तींकडे पाहिले की आपल्याला सहजपणे उपलब्ध झालेल्या वाणीची देणगी किती मोलाची आहे हेही आपल्याला नव्याने समजते.त्या मौल्यवान वाणीची योग्य निगा राखली तरच ते मोल मातीमोल होणार नाही हे मात्र विसरुन चालणार नाही.

आपण पैसे मिळवण्यासाठी अपार कष्ट करतो.आपला आवाज हेही आपले मौल्यवान असे आरोग्या’धन’च तर आहे.ते सहज उपलब्ध झालेय म्हणून त्याकडे दुर्लक्ष करुन कसे चालेल? ते मोलाचे धन आपणच जाणिवपूर्वक जपायला हवे !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 2 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 2 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

(पण डोंगरदऱ्यात, जंगलात ,रात्र दाटत असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.)–

इथून पुढे —

नेमकी त्या दिवशी अमावास्या होती.जसजसा काळोख दाटू लागला, मनातल्या नकारात्मक  भावनांचे साम्राज्य सुरु झाले. तहान, भूकेच्या  पलिकडे पोहोचलेली मने स्वत:ला संभाळूनही थकली. अगदी बधीर झाली. तरीही प्रवास चालूच राहिला. अखेर आमच्या त्या दिवशीच्या मुक्कामी पोहोचताच भावनांचा कडेलोट झाला. ग्रुपमधल्या इतरानी केलेल्या प्रेमळ सहकार्यांने आणि  सहअनूभुतीने मन अगदी भरून आले..!

त्या दिवशीचा प्रवास सगळ्यांसाठीच आव्हानात्मक ठरला होता. आमच्यातील काही जण  मात्र या प्रवासामुळे थोडे  जास्त धास्तावले होते.

पुढची सकाळ मात्र पुन्हा एक नवा उत्साह घेऊन समोर आली. डोले, म्याचोरमुले अशी सुंदर गावे गाठत आम्ही पुढे पुढे जात होतो. आता सात आठ तास चालणे, डोंगर चढणे- उतरणे  अंगवळणी पडू लागले होते. जसजशी आम्ही उंची गाठत होतो, निसर्ग आपली अधिक हृदयंगम रुपे दाखवत होता. आता हवेतील गारठा वाढला. हिरवाई लोपून लहान झुडपांचे राज्य सुरु झाले. दगडावर पोपटी आणि  केशरी शेवाळाचे मनमोहक patterns  पहायला मिळाले.दिवसातील तापमान 2-3 अंश असे तर रात्री उणे 3 -4 अंश! अंगावर सहा ते सात थर लेऊन आम्ही या बदलत्या वातावरणाचा सामना करत होतो. या सगळ्यात जमेची बाजू ही की आमच्या ग्रुपमधील सगळ्यांची आता छान मैत्री होऊ लागली होती. शेर्पा मदतनीसांच्या मेहनतीकडे आणि सहकार्याकडे पाहून तर माणुसकीचे जवळून दर्शन घडत होते.

अशात प्रवासाचा सहावा दिवस उजाडला. आमची अर्धी यात्रा सुखरुप पार पडली होती. आज आम्ही गोक्यो नावाच्या गावी मुक्काम करणार होतो. हा दिवस आमच्या पुढे काय घेऊन उभा असणार आहे याची काही कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे आदल्या दिवशीचा थकवा पार करुन मजला दरमजल करत आम्ही सर्व गोक्योला पोहोचलो. दुसर्या दिवशी सकाळी लहानसा प्रक्टिस ट्रेक होता. तो ही 3 तासांचा. नाही म्हणायला वावच नव्हता. गेल्या काही दिवसात शरीराने कौतुकास्पद साथ दिली होती. खरंच सांगते, या प्रवासाने माझ्या मनात मानवी शरीराबद्दल असीम कृतज्ञता दाटून आली आहे!!!! निसर्गाच्या या निर्मितीला, तिच्यातील उर्जेला आणि क्षमतेला मन:पूर्वक सलाम!!!!

तर आता आम्ही गोक्यो री या 5800 मीटर्सवरील ठिकाणी जायच्या तयारीत होतो. काल ज्या सहचर मैत्रिणीला थोडा जास्त थकवा होता तिने आज पूर्ण विश्रांती घेण्याचे ठरवले. आम्हीही पाच सहा जणानी जमेल तितके अंतर गाठून परत येण्याचे ठरवले.इथे कोणाचीच कोणाशी तुलना, स्पर्धा नव्हती. आपली स्वत:ची क्षमता पाहून निसर्गाला जमेल तसा प्रतिसाद देत पुढे जात राहणेच योग्य होते. आमची ही मैत्रीण तीन चार तासांच्या विश्रांती नंतर आम्हाला जॉईन होणार होती. आम्ही नेहमीप्रमाणे जुजबी न्याहारी करुन हाडे गोठवणा र्या थंडीचा सामना करत सराव ट्रेकसाठी निघालो. पावलागणिक धाप लागत होती.5800 मी.(19000 फूट) उंचीवर यापेक्षा फार वेगळे अपेक्षित नव्हते. त्यामुळे सावकाश पावले टाकत आमचा सहा जणांचा चमू हळूहळू चालला  होता. खडा  चढ असल्यामुळे पावले सांभाळून टाकणे फार गरजेचे होते. ‘बरं झालं, आज प्रज्ञा आली नाही’कुणीतरी म्हणालं  सुद्धा! इतक्यात आमच्यापैकी एकाला थोडं चक्करल्या सारखं वाटलं म्हणून तासाभराच्या चढाईनंतर आम्ही तिथूनच मागे फिरण्याचा निर्णय घेतला.

का कुणास ठाऊक, आजची मोहीम अर्धी सोडल्याच्या दु:खापेक्षा मनात सुटकेचा नि :श्वासच जास्त होता.आम्ही पाच सहा जण  परत हॉटेल वर आलो. मग शेकोटीच्या भोवती बसून गरम गरम मसाला चहा पित गप्पा मारु लागलो.आता हवा छान होती. गोक्यो तलावाच्या निळयाशार   प्रवाहाला चारी बाजुनी गोठलेल्या पांढर्याशुभ्र हिमप्रवाहांची पार्श्वभूमी उठाव देत होती. तळ्यात काही बदके पोहत होती. आमच्यापैकी ज्या लोकानी सकाळी ट्रेकला जायचे टाळले ते तळ्याभोवती फेरी मारायला गेले. आम्ही मात्र खिडकीच्या काचेतून आत येणारे ऊन खात निवांत गप्पा छाटत बसलो. दोन तासात एक एक करत इतर मंडळी येऊ लागली. डायनिंग हॉल गजबजू लागला. सगळे आले की न्याहरी करण्याचा विचार होता. गरम पाणी पीत, तलावाची शोभा बघत आम्ही खिडकीपाशी बसलो होतो आणि अचानक खाली काही धावपळ जाणवली. काय झाले आहे हे नीट कळले नाही पण आमचे शेर्पा मदतनीस, ग्रुपमधील तज्ञ डॉक्टरना बोलावण्याकरता आले. क्षणभरात पळापळ झाली.कोणालातरी काही त्रास होतो आहे असे कळले.ग्रुपमध्ये प्रत्येक क्षेत्रातील नामवंत डॉक्टर होते. सगळेच धावत त्या ठिकाणी पोहोचले. क्षणभरात सगळे वातावरणच बदलले….आमची मैत्रीण मृत्यूशी झुंज देत होती. इतक्या उंचीवरच्या गावातील वैद्यकीय सुविधा किती अपुर्या असतात याची त्यावेळी  सगळ्याना जाणीव झाली. तरी सगळ्या डॉक्टर मित्र मैत्रिणींनी चार तास शर्थीचे प्रयत्न  केले. होती नव्हती ती सर्व औषधे, उपचार केले गेले. लुक्ला  गावावरुन काही मदत मिळू शकेल का, यासाठी प्रचंड फोनाफोनी झाली. पण निसर्गानेही असहकार पुकारला होता. आभाळात ढग दाटू लागले. अशा वातावरणात हेलिकॉप्टर तिथवर पोहोचणे कठीण झाले. आम्ही तिच्या इतके निकट असूनही आमची ही मैत्रीण केव्हाच आम्हाला सोडून अनंतात विलीन झाली होती…..

सगळे सुन्न झालो होतो….

सगळ्यानाच जबरदस्त धक्का बसला होता. शब्द आणि अश्रू थिजले होते. बराच काळ भयाण सुन्नतेत गेला. मग भावनांचे आणि  विचारांचे काहूर माजले….

“असं झालं असतं तर…असं केलं असतं तर..”  याचं युद्ध प्रत्येकाच्या मनात चालू झालं…..आता कशाचाच काही उपयोग नव्हता….काळाने अत्यंत आकस्मिकपणे आम्हा सगळ्यांवर हा प्रहार केला होता..

खिडकीबाहेर आभाळही गच्च दाटून आले होते. त्या दिवशी तिथून कोणालाही हलणे शक्य नव्हते.

“पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…दोष ना कुणाचा….” ग.दिंचे शब्द मनात घोळवत जड अंत: करणाने आमची ही यात्रा अर्ध्यावर  सोडून आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला…

समाप्त

लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बिचारा तेरा… ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

बिचारा तेरा ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

अंधश्रद्धांचं पीक जगभर उगवतं, वारेमाप वाढतं ! त्याला एक सुद्धा देश अपवाद नाही.

ग्रीक-रोमन संस्कृतीत १३ हा आकडा बिचारा फुटक्या नशिबाचा आहे. अशुभ आहे. घातकी आहे. कृतघ्न आहे. सर्व घाणेरडी बिरुदं चिकटलेला हा १३ ! पूर्वीच्या काळाचं सोडा, अगदी आजही हजारो युरोपियन्स्, ख्रिश्चन्स् या १३ ला टरकून असतात ! आकडे मोजतांना, नंबरिंग करतांना १२ नंतर एकदम १४ मोजतात !! १२ बिस्किटं खाऊन झाल्यावर १३ वं  न खाता एकदम १४ वं  खातात. सगळाच खुळ्यांचा बाजार !

या १३ आकड्याच्या भीतीला म्हणतात Triskaidekaphobia!

ट्रिस्कायडेकाफोबिया !! … हुश्श्श् !!

😄

१३ तारीख अगदी टाकावू– कोणतीही कामे करण्यास. लढाया, अवजड उद्योग यांचा मुहूर्त ठरवतांना १३ तारीख येत नाही ना हे कांटेकोरपणे पाहिलं जातं. त्यासाठी इतर अडचणी पत्करल्या जातात.

१३ तारखेच्या या टरकूपणाला नांव आहे –

Paraskevi Dekatria Phobia

पॅरस्केविडकॅट्रियाफोबिया !! …

हुश्श्श्श्श्श्श्श्श् !! (शची संख्या वाढल्येय् इकडे कृपया लक्ष असावे, ही विनंती ! 😄 )

युरोपातल्या  इमारतींच्या लिफ्टमधून मजल्यांचे आकडे तर दिसतातच, त्यात १३च्या जागी रक्ताळलेल्या हृदयाचे चित्र काढलेले असते !

विमानांच्या हॅंगर्सना नंबर देतांना ११, १२, १२-A, १४, १५ असे दिले जातात.

असे किती प्रकार ! आपल्याकडे सुद्धा अनेक ठिकाणी राजकारण्याच्या अनेक कामांत आकड्यांची गिनती सोईनुसार सोडली जाते. पण ती अंधश्रद्धा नव्हे. गणपतीच्या सहस्रनामपूजेत अनेक भटजीबुवा एक सोडून एक नांव वाचतात ! ही पण अंधश्रद्धा नव्हे ! याला म्हणतात बेरक्यांचा इरसालपणा … !!

असो. चालायचंच !

आणि १३ तारीख शुक्रवारी येत असेल तर अति अति वाईट !

मागच्या शुक्रवारी नेमकी १३ तारीख होती ! १३ एप्रिल २०२२. जे अंधश्रद्धेला न हसता घरीच बसले, कोणतंही काम केलं नाही,  नवीन काम काढलं नाही. घराबाहेर पडले नाहीत – त्यांनी शुक्रवार घरच्या घरीच मनमुरादपणे साजरा केला … त्याचा काठोकाठ आनंद लुटला …अंधश्रद्धा मातेचा विजय असो … ॥

😄

️️️️️©  सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार”… सुमित्र माडगूळकर ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ “देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार”… सुमित्र माडगूळकर ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆ 

डिसेंबर १९७७…. कोयना एक्सप्रेस धडधडत निघाली होती …

गीतरामायणाचे जनक सीताकांत लाड खिडकीतून बाहेर पाहत होते…. अनेक आठवणी मनात दाटून आल्या होत्या. पंचवटीच्या प्रांगणातील आठवणींनी मन भरून येत होते …गीतरामायणाचे ते भारलेले दिवस..लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद…रेकॉर्डिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत गदिमांकडून गीत मिळवण्यासाठी झालेली धावपळ.. पंचवटीच्या दारात प्रभाकर जोगांना पाहून “आला रे आला ,रामाचा दूत आला.. आता गाणं घेतल्याशिवाय तो काही जाणार नाही..” असे ओरडणारे गदिमा. 

त्यांच्या समोर हसत खिदळत बागडणारे … गीतांचा तगादा लावल्यावर गदिमांच्यातले लहान मूल म्हणत होते…. 

” गीताकांत स. पाड ,पिडाकांत ग. माड …नाही कशाचीच चाड, मी ही भारलेले झाड…मी ही भारलेले झाड…. “

आपल्या लाडक्या मित्राला शेवटचा निरोप देऊन दोन मित्र सीताकांत लाड व गदिमांचा ‘नेम्या’ (नेमिनाथ उपाध्ये) परतीच्या प्रवासाला निघाले होते.. गदिमांबरोबर लहानपणापासून असलेल्या  ‘नेम्या’ ला प्रत्येक स्टेशनावर आपल्या अण्णाच्याच आठवणी येत होत्या.. रात्री अपरात्री किर्लोस्करवाडीला उतरल्यावर तीन मैल चालत कुंडलचे प्रवास … गारठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीत उबेसाठी स्मशानात घालवलेल्या त्या भयानक रात्री … तेथे केलेले मुक्काम… शंकराच्या भूमीत गदिमांनी धडाधडा केलेले ‘शिवलीलामृताचे’ प्रवचन.. अगदी आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरु- क्षणार्धात गतस्मृतीत भरारी घेत होते.

‘मिरज’ स्टेशनच्या आधी लांबून काही अस्पष्ट स्वर येते होते… कोणीतरी गात होते …. एकदम खड्या आवाजात…

“उद्धवा अजब तुझे सरकार…. “

एक आंधळा भिकारी गात गात पुढे सरकत होता .. 

गाडीच्या कम्पार्टमेन्टमधे काही कॉलेजियन्सचा ग्रुप रमी खेळत बसला होता … बोचऱ्या थंडीला ‘बुढा मर्कट’ ब्रँडची साथ होतीच… मैफल रंगात आली होती. 

त्यांच्यापैकीच एकजण ओरडला “अरे साल्यांनो,गदिमा सुरु झालाय ! ऐका की !”

या आवाजाने अर्धवट झोपेत असलेला कोपऱ्यातला घोंगडी पांघरून बसलेला म्हाताराही कान टवकारून उठून बसला… 

भिकाऱ्याने खड्या आवाजात परत सुरुवात केली… 

” झाला महार पंढरीनाथ “… 

“एक धागा सुखाचा” …” इंद्रायणी काठी” … भिकारी गात होता …

नेम्या व लाड खिडकीजवळील आपल्या जागेवरून आनंद घेत होते.. पल्लेदार आवाज.. त्यात काहीसे उच्चार दोष. … शब्द – ओळी वरखाली झालेल्या .. 

पण आधीच ‘रम’लेली मंडळी अजून गाण्यात रमून गेली होती.. 

त्या युवकांपैकीच कोणीतरी फर्माइश केली “म्हण .. आणखी म्हण … पण फक्त गदिमांच हं !” 

भिकारी म्हणाला ” त्यांचीच म्हणतो मी साहेब,दुसरी नाही. या लाइनीवर खूप खपतात .. कमाई चांगली होते.. त्यांना काय ठावं, त्यांच्या गीतांवर आम्ही कमाई करतो म्हणून .. “

गरीब भिकाऱ्याचा स्वर थोडा हलल्यासारखा वाटला….आवंढा गिळून भिकारी म्हणाला….

” ते गेले तेव्हा दोन दिवस भीक नाही मागितली साहेब !… ” 

या आंधळ्या गरिबाला कोठून कळले असावे आपला अन्नदाता गेला-रेडिओवरून ?,गदिमा गेले तेव्हा महाराष्ट्रात अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नव्हत्या .सगळेच शांत होते,डब्यातल्या सगळ्यांनी आपापल्या परीने त्याचा खिसा भरला… तो पुढे सरकत होता… 

गदिमांचा तो आंधळा भक्त गातच होता..

तूच घडविसी, तूच फोडिसी, 

कुरवाळिसी तू तूच ताडीसी

न कळे यातून काय जोडीसी

देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार 

विठ्ठला, तू वेडा कुंभार….

हळू हळू त्याचा आवाज परत अस्पष्ट होत गेला.. कोयना एक्सप्रेसची धडधड परत वाढत गेली.. तरुण मंडळी परत आपल्या कामात ‘रम’माण झाली.

म्हटले तर काहीच घडले नव्हते … म्हंटले तर खूप काही घडून गेले होते… 

एका महाकवीच्या हृदयाची स्पंदने …. एका भिकाऱ्याच्या हृदयाची स्पंदने… जणू काही फरक राहिलाच नव्हता… काही दिवसांपूर्वी अनंतात विलीन झालेले ते कोण होते?.. 

सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हृदयात स्थान मिळवणारा असा महाकवी आता परत होणार नव्हता…

 – सुमित्र माडगूळकर 

संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डाॅक्टर आणि वेटिंग रूम… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ डाॅक्टर आणि वेटिंग रूम… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

माणूस आजारी पडला, की त्याला दहा दवाखाने फिरायला लागतात. दहा डॉक्टरांच्या दहा तर्‍हा. एकाच एक मत, तर दुसर्‍याचं बरोबर त्याच्या विरुद्ध. प्रत्येक जण वेगवेगळ्या चाचण्या करून घ्यायला सांगतो. एकाचा रिपोर्ट दुसर्‍याला चालत नाही. खरं तर दोन दिवसांपूर्वी सुद्धा रक्त आपलेच असते बरं का! पण तरीही त्याचे आलेले रिपोर्ट दोन दिवसांनंतर दुसर्‍या डॉक्टरांना चालत नाहीत. तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं आणि मला अनेक डॉक्टरांच्या तसेच तिथे असणार्‍या वेटिंग रूमच्या अनेक तर्‍हा अनुभवायला मिळाल्या.

मी माझ्या नेहमीच्या डॉक्टर काकांच्या क्लिनिक मधे माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले होते. नेहमी प्रमाणे दवाखाना खचाखच भरलेला होता. काहींना टेस्टचे रिपोर्ट दाखवायचे होते तर काहींना तपासून घ्यायचे होते. काहीजण आपल्या पेशंट बरोबर आले होते.

जे बरोबर आले होते ते उगीचच इकडून तिकडे कर नाहीतर मोबाईल बघ, ओळखीचे कोण असेल तर इकडच्या तिकडच्या गप्पा मार असं काहीतरी करत बसले होते. एका लहान आजारी मुलाला घेऊन त्याची आई आली होती, तिच्या मात्र जिवाची घालमेल चाललेली होती.

सारखं, त्याच्या डोक्याला हात लावून किती ताप आहे पहात होती. एक आजी खूप अस्वस्थ वाटत होती ती सारखी आपल्या नवऱ्याला काय आला असेल हो रिपोर्ट असं विचारतं होती.

एक गृहस्थ मात्र उगीचच केबिन च्या आत डोकावून डॉक्टर दिसतात का ते पहात होते. त्यांना एकदाचे ते दिसले आणि त्यांनी चक्क उठून त्यांना नमस्कार केला आणि आपल्या सौ ला म्हणाले बरीच वर्ष झाली ओळखतो मी ह्यांना अगदी देव माणूस.

दोन आज्या एकमेकांना आपापली व्यथा सांगून आपला आजार दुसरी पेक्षा किती सौम्य किंवा गंभीर आहे ह्याची खात्री करून घेत होत्या. त्यातलं फारस दोघींना ही कळत नव्हते ही गोष्ट वेगळी.

एका कोपर्‍यात दोघी मैत्रिणी आजार आणि त्यावरचे घरगुती उपाय ह्यावर चर्चा करत होत्या, तर दुसरीकडे दोघी जणी कोणत्यातरी भाजीची रेसीपी सांगण्यात गर्क होत्या. इतक्या की त्यांचा नंबर आलेला ही त्यांना कळले नाही. थोडक्यात काय दवाखाना असला तरी वातावरण गंभीर नव्हते.

मी ही तशी इथे रिलॅक्स असते. भीती नसते मनात ना दडपण असते. कारण हे माझे डॉ काका म्हणजेच डॉ शिवानंद कुलकर्णी खूप शांत आणि प्रेमळ आहेत. विनाकारण एखाद्या आजाराचं खूप मोठं चित्र उभ करत नाहीत, ना टेंशन देतात. चेहर्‍यावर नेहमी हास्य असते मग तुम्ही अगदी दवाखाना उघडल्या उघडल्या जा किंवा बंद व्हायच्या वेळी. काही होत नाहीगं एवढ्या गोळ्या घे, बरी होशील… एवढ्या त्यांच्या वाक्यांनेच निम्मे बरे व्हायला होते.

मला नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे ते एकाच वेळी सहा, सहा पेशंट आत घेतात. त्या पेशंटची बडबड, गलका चालू असतो तरीही ते एवढे शांत कसे काय राहू शकतात ? प्रत्येकाचा आजार वेगळा, कोण खोकत असतो, कोण कण्हत असतो कोणाचे इंजेक्शन असते, कोणाचे ड्रेसिंग, तर कोणाचे आणि काय. तरी काका आपले प्रत्येकाशी तितक्याच आपुलकीने चौकशी करत असतात. म्हणून तर ते प्रत्येकाला आपले वाटतात…

असो इथली तपासणी करून मी orthopedic दवाखान्यात गेले. तिथे तर पेशंटचा समुद्रच होता. समुद्र म्हणल्यावर ओळखले असलेच तुम्ही. हा समुद्र म्हणजे मिरजेचे नामांकित आणि तज्ञ डॉक्टर G. S. कुलकर्णी. आता आपल्याला किती वेळ वाट पहावी लागेल ह्या विचारानेच निम्मे दमायला झाले. मनात आले कशाला लोकं इतकी धडपडून आपली हाडं मोडून घेतात काय माहीत.

आधीच टेंशन आलेलं त्यात आजूबाजूला सगळेच पेशंट मोडक्या अवस्थेत. कोणाचा हात बांधला होता तर कोणाचा पाय फ्रॅक्चर होता .कोणाच्या मानेला पट्टा, तर कोणाच्या कंबरेला.

एकीकडे एक्सरे साठी गर्दी होती तर दुसरीकडे MRI साठी. कोण ड्रेसिंग साठी आले होते तर कोणाचे प्लास्टर घालणे चालू होते. थोडक्यात काय तर दवाखान्याचे वातावरण गंभीर होते. इथे कोणीच relaxed नव्हते.

मी एका कोपर्‍यात माझा नंबर येण्याची वाट पाहत बसले. तिथेच बाजूला एक लहान मुलगा आपल्या प्लास्टरवर चित्र काढत बसला होता. ते पाहून मला खूप छान वाटले आणि माझ टेंशन कुठल्या कुठे पळून गेलं. मोठी माणसं विनाकारण एखाद्या गोष्टीचा जास्त बाऊ करतात असं मला वाटलं.

तिथला नंबर माझा झाला आणि मला काही व्यायाम करण्याचा सल्ला दिला गेला. नशिबाने मला मानेचा दागिना लागला नव्हता. म्हणुन तिथून मी physiotherapist कडे गेले.

तिथे ही बाहेर बरेचजण बसले होते आपला नंबर कधी येणार ह्याची वाटं बघत. मीही वाट पाहू लागले. तिथे एक गृहस्थ त्यांचे व्यायाम दुसर्‍या गृहस्थांना शिकवत होते जणू त्यांची आता त्यात पीएचडी झाली होती. मला तर हे बघून हसूच येत होते. तेवढ्यात तिथे एक आई आपल्या तान्हुल्याला घेऊन आली. त्याला कोणतातरी गंभीर आजार झाला होता. बाळाला मानही वर करता येत नव्हती. हातात ही काहीतरी दोष होता. आईच्या चेहर्‍यावर काळजी दाटली होती. ते पाहून मात्र मला खूप वाईट वाटले. देवाकडे मनोमन प्रार्थना केली की ह्या बाळाचा आजार लवकर बरा होऊदे रे बाबा.

शेवटी एकदाचा नंबर आला माझा.

बरेच व्यायाम आणि सूचना घेऊन मी बाहेर पडले. मला जरा शंका जास्त असतात, त्यामुळे मी खूप शंका त्या डॉक्टरांना विचारल्या. त्यांच वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक शंकेचे निरसन जितक्या वेळा मी विचारेन तितक्या वेळा न चिडता सांगत होते. त्यांनी मला शांत पणे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. हे म्हणजे माझे physiotherapist डॉक्टर सुनील होळकर. प्रत्येक व्यायाम दोन दोनदा दाखवला आणि माझ्याकडून तो करून ही घेतला. त्यामुळे मनातली भीती नाहीशी झाली, आणि आपण लवकरच बरे होऊ ह्याची खात्री पटली.

अश्या तर्‍हेने अनेक दवाखाने फिरून मी घरी पोहोचले. घरी पोचले तेव्हा खूप दमून गेले होते. पण आज मला अनेकांची आजारपणे, तक्रारी, हाल, वेदना पहायला, अनुभवायला मिळाल्या होत्या. अनेक प्रश्न होते लोकांचे, ज्याची उत्तर शोधण्यासाठी ते दवाखाने फिरत होते. काहींना उत्तर मिळाली होती तर काही उत्तर मिळायच्या प्रतिक्षेत होते.

ह्या सगळ्यात आणखीन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे जितक्या व्यक्ति तितक्या तक्रारी असतात. प्रत्येकांचे डॉक्टर वेगवेगळे असतात.

काही डॉक्टर उग्र, गंभीर, तर काही शांत, प्रेमळ असतात.

प्रत्येक डाॅक्टरांना रोज तेच तेच आजार आणि असंख्य पेशंट तपासायचे असतात. तेच तेच निदान अणि त्याच त्याच टेस्ट सांगायच्या असतात, रोज तेच प्लास्टर आणि रोज तेच तेच व्यायाम शिकवायचे असतात.

त्यांना तेच तेच असतं पण पेशंट साठी मात्र प्रत्येक गोष्ट नवीन असते. कारण ती त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत असते. जे डॉक्टर हे लक्षात ठेऊन पेशंटशी न दमता, न थकता आपुलकीने बोलतात ते आपलेसे वाटून जातात. आपल्या मनात त्यांच्या बद्दल एक आदर, एक विश्वास निर्माण करतात आणि नकळत मनात एक वेगळं घर बनवून जातात.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ७ जून : जागतिक पोहा दिन… संकलन : मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ ७ जून : जागतिक पोहा दिन… संकलन : मिलिंद पंडित ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

७ जून हा जागतिक पोहा दिन म्हणून साजरा केला जातो. पोह्यांचा नाश्ता माहित नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही. प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविष्ट तसेच आरोग्यदायी देखील आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात पोह्याच्या नाश्त्याला पंसती आहे. जे लोक डायटिंग करतात. त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता अत्यंत आरोग्यदायी समजला जातो.

महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थान मध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. भारतात पोह्याचा शोध नेमका कुठे लागला हे कोणाला माहिती नाही. 

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस आणि २३.१ टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात. 

आज या लेखात जागतिक पोहे दिनानिमित्त पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

कार्बोहायड्रेटस चा उत्तम स्त्रोत :

पोह्यात ७६.९ टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात २३ टक्के फॅट्स असतात. कार्बोहायड्रेटस मुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.

शरीराला लोहाचा पुरवठा होता :

पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण :

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

पचनास हलके :

पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि खूप कमी लागते.

लठ्ठपणा येत नाही :

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी २५० कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

प्रस्तुती : बिल्वा अकोलकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ एक अविस्मरणीय पण अधुरी यात्रा भाग – 1 – लेखिका – डॉ. सुप्रिया वाकणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

अनेक दिवसांपासून ठरलेला एखादा प्रवास… आव्हानात्मक, साहसी असेल तर त्यासाठी काही दिवसांपासून रोजचा दिनक्रम सांभाळून सुरु केलेली शारीरिक आणि मानसिक तयारी… प्रवासासाठी लागणार्या साधन सुविधांची जमवाजमव, कपडे-खाऊची बांधाबांध ,प्रवासाचा दिवस जवळ येऊ लागताच आप्त आणि मित्रांच्या शुभेच्छानी वाढू लागलेली उत्सुकता…काही दिवसांसाठी बंद रहणार्या घराची व्यवस्था….अशा सगळ्या धामधुमीत केलेले तुम्हा आम्हा सगळ्यांचेच प्रवास खूप छान आठवणी गाठीला बांधतात. निसर्गरम्यतेमुळे मनाला तजेला आणि चिरंतन आन्तरीक समाधान देऊन जात असतात.म्हणून तर प्रत्येक जण अशा प्रवासाची आतुरतेने वाट पहात असतो आणि तेथून आल्यावर त्या क्षणांना इतरांसोबत  वाटून पुन्हा पुन्हा तो आनंद उपभोगत असतो. फोटोरुपाने ते क्षण जपत आणि जगत रहातो ; पण काही प्रवास वेगळ्या अर्थी अविस्मरणीय ठरतात….

अशाच एका अविस्मरणीय प्रवासाची अधुरी कहाणी तुम्हाला सांगावीशी वाटली.

तर झालं असं..

चार सहा महिन्यांपूर्वी ‘एवरेस्ट बेस कैंप’ला जायचा बेत ठरला. आमच्या कुटुंबातील आम्ही सहाही जण (तीन भाऊ आणि त्यांच्या पत्नी) या प्रवासाची आपापल्या परीने तयारी करत होतो.आमचे नवरे यात उत्साहाने सामिल झालेले असल्याने आम्ही तिघी जावा प्रवासाच्या आखणीबाबत अगदी निश्चिंत होतो.निदान मी तरी प्रवासाच्या मार्गक्रमणाबाबत अगदीच गाफिल होते. चाळीस तज्ञ आणि सूज्ञ लोकांबरोबर प्रवास करताना ‘आपण केवळ प्रवासाचा आनंद लुटावा ‘अशी माझी साधी सोपी धारणा!!

कमीत कमी संख्येने कपडे आणि खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्याच्या सूचनांचे आम्ही पालन करण्याचे ठरवले.19000 फुटांवरचे जग आणि तिथले जगणे पहिल्यांदा अनुभवण्यासाठी आमची तयारी झाली होती.

29 एप्रिलला मुंबईहून आम्ही दोघे आणि इतर तीन जण विमानाने दिल्लीला पोहोचलो.तिथे इतर दहा बारा पुणेकर आम्हाला भेटले.संध्याकाळी चार पर्यंत काठमांडूला पोहोचल्यावर उरलेल्या पंचवीस तीस भारतीय सहप्रवाशांची भेट झाली.चाळीस लोकांच्या या चमूत भारतीयांबरोबर काही अमेरिकन आणि ब्रिटिश प्रवासीही होते.ग्रुपमधील जवळ जवळ सर्व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि  पूर्वाश्रमीचे घट्ट मित्र!त्यांच्या साठी हे एक अनोखे कौटुंबिक reunion होते.आम्हीच यामध्ये थोडे नवखे होतो. सगळ्यांशी ओळखी होण्याकरता काही दिवस नक्कीच लागले असते.या चमूमध्ये बरेच प्रवासी पहिल्यांदाच गिर्यारोहणाचा अनुभव घेणार होते.चोवीस वर्षांच्या तरुणांपासून पासष्टीपर्यंतच्या वयोगटातील सगळे या साहसी यात्रेसाठी उत्सुक होते.प्रवासी कंपनीची सगळी मदतनीस माणसे, गाईड्स यानी मोठ्या प्रेमाने आमचे स्वागत केले आणि उद्यापासून सुरु होणार्या प्रवासाबाबत सूचनाही दिल्या. एकंदरीत वातावरणात उत्साह आणि उत्सुकता भरल्याचे जाणवत होते.येत्या काही दिवसात आंघोळीची गोळी घ्यावी लागणार असल्यामुळे मस्त अंघोळ करुन घेतली आणि साद देणार्या हिमशिखरांची स्वप्ने बघत लवकरच झोपी गेलो….

दुसर्या दिवशी बांधून दिलेली न्याहारी सोबत घेऊन 15 जणांच्या  गटाला घेऊन जाणार्या लहानश्या विमानाने ‘ लुक्ला ‘ नावाच्या विमानतळी उतरलो.आसमंतातील गारवा, शुद्ध ताजी प्रदुषणरहित हवा मनाला उत्तेजित करत होती.नवीन ओळखी करत, गप्पा टप्पा मारत, हसत खिदळत, रस्त्यात भेटणार्या देशी परदेशी गिर्यारोहकाना ‘नमस्ते’ या शब्दानी अभिवादन करत चाळीस जणांचा आमचा चमू आणि इतर 10 नेपाळी शेर्पा मदतनीस पुढे निघालो.पाइन वृक्षांच्या 

हिरवाइने नटलेल्या डोंगररांगा, नागमोडी वळणाच्या कच्च्या पाऊलवाटा , अखंड सोबत करणारा खळखळता नदीप्रवाह, मधूनच दूरदर्शन देणारी हिमशिखरे, सुखद गारवा आणि  मस्त उत्साही गप्पा….प्रवासाची सुरुवातच इतकी छान झाली…रोज साधारण पाच सहा तासांचे चालणे अपेक्षित होते. माझ्या आतापर्यंतच्या इतर जुन्या ट्रेकच्या अनुभवावरुन ‘दुपारच्या जेवणानंतर विश्रांती ‘असे गणित माझ्या मनात बसले होते.परंतु या ट्रेकची गणिते थोडी वेगळी आहेत हे हळू हळू लक्षात येऊ लागले.

त्या दिवसाच्या प्रवासाचा टप्पा ‘फाकडिंग’ या गावापर्यंत होता.तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला 7 तास लागले.प्रत्येकाचा वेग, क्षमता, शारिरीक आणि मानसिक तयारी वेगवेगळी! शिवाय 2500 मीटर  उंचीवरची विरळ हवा प्रत्येकासाठीच आव्हानात्मक होती.दिवसाअखेरी ,प्रचंड थकल्यानंतर आयता मिळणारा साधा ‘डाळ भात’ही गोड लागत होता.

बिछान्यावर पडताच झोप लागली.

दुसर्या दिवसाची सुरुवात भरपेट न्याहारीने होणे गरजेचे असले तरी ग्रुपमधील अनेकाना म्हणावी तशी भूक नव्हती.पाठीवरच्या सैक मध्ये काही पौष्टिक खाऊ आणि दोन लिटर पाणी घेऊन  आमचा प्रवास सुरु झाला.गिर्यारोहणात शारिरीक तयारी इतकीच मानसिक तयारी गरजेची असते,हे जाणवत होते.थकलेल्या शरीराला सोबतचा निसर्ग जोजवत होता.दिवसाअखेरी जडावलेले पाय आणि डोळे साध्याश्या अंथरुणावरही निवांत होत होते.

दर दिवशी जसजसे आम्ही अधिक उंची गाठू लागलो तसतशी  परिस्थिती अधिक आव्हानात्मक  होत चालल्याचे जाणवू लागले.काहींचे पोट बिघडले,काहींची डोकी जड झाली, काहींची झोप हरवली तर काहीना प्रचंड थकवा जाणवू लागला.चालताना धाप लागणे तर सहाजिकच होते. पण एखाद दोन दिवसात परिस्थिती आटोक्यात येऊ लागली. आम्ही या नवख्या वातावरणाला सरावत होतो. कोणालाही मेडिकल imergency  लागली नाही.

रोज सात आठ तासांचे चालणे होत होते.कधी ग्रुपबरोबर आणि बर्याच वेळा एकल असा हा प्रवास होत होता.स्वत:शी गप्पा मारायची, वाद घालायची, समजावणीची, चुचकारायची खूप संधी मिळाली.नव्या लोकांकडे बघून खूप शिकायला मिळाले.प्रतिकूल परिस्थितीमधील स्वत:च्या  गरजा आणि क्षमता नव्याने कळल्या.निसर्गाची अपरिमित ताकद तर पावलगणिक जाणवत होती.पंचमहाभुतांनी व्यापलेल्या वातावरणाचा आपणही एक भाग आहोत याची संवेदना होत होती.निसर्गशक्ती धीरगंभीरतेने आम्हा सर्वांच्या अस्तित्वाला साथ करत होती. 

एका प्रवासात तर डोले नावाच्या गावी मुकामी पोहोचायचे होते.त्या दिवशी आम्ही 14 तास चाललो.शरीराने प्रवास पूर्ण करण्यासाठी बंड पुकारले.पण  डोंगरदर्यात, जंगलात, रात्र दाटत  असताना ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यावाचून गत्यंतरच नव्हते.

 क्रमशः…

लेखिका : डॉ. सुप्रिया वाकणकर.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

? वाचताना वेचलेले ?

☆ आई…! ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆ 

इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’ आवडते यावर निबंध लिहायला दिला.

प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे  वर्णन लिहिले.

राहुलच्या मजकुरात त्याने शिर्षक लिहीले – “ऑफलाइन आई…!”

मला “आई” पाहिजे, पण “ऑफ लाईन” पाहिजे.

मला एक “अशिक्षित” आई हवी आहे, जिला “मोबाईल” कसा वापरायचा हे माहित नाही पण माझ्या बरोबर सर्वत्र जाण्यासाठी ती उत्सुक असेल.

मला “जीन्स” आणि “टी-शर्ट” घातलेली “आई” नको तर छोटूच्या आईसारखी साडी नेसलेली “आई” हवी आहे.  मी जिच्या मांडीवर डोके ठेवून बाळाप्रमाणे झोपू शकतो अशी आई पाहिजे .

मला “आई” हवी, पण “ऑफलाइन” हवी. तिला “माझ्यासाठी” आणि माझे बाबांसाठी “मोबाईल” पेक्षा  “जास्त वेळ” असेल.

ऑफलाईन “आई” असेल तर बाबांशी भांडण होणार नाही.

जेंव्हा मी संध्याकाळी झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ती मला एक गोष्ट सांगेल.

आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नको, घरी काहीही बनव. मी आणि बाबा आनंदाने खाऊ.

मला फक्त ऑफलाइन “आई” पाहिजे आहे.

इतकं वाचून मॉनिटरचा हुंदका  संपूर्ण वर्गात ऐकू आला.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वर्ग शिक्षिकेच्या डोळ्यातून अश्रू वहात होते.

आयांनो, आधुनिक रहा पण आपल्या मुलाचे बालपण जपा, ते मोबाईल च्या नादाला लागून हिरावून घेऊ नका! ते परत कधीच येणार नाही. 

संग्राहिका – माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares