मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग ५ – प्रेरणा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग ५ – प्रेरणा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

एकोणीसाव्या शतकात मुंबईत उत्तमोत्तम वास्तु उभ्या राहत होत्या. साहेबाला लाजवेल असं उत्तम हॉटेल जमशेटजी टाटा यांना आपल्या देशात बांधायच होतं. गेटवे ऑफ इंडिया अजून निर्माण झालं नव्हतं. समुद्रात भराव घालून तिथं काम चालू होतं. त्यामुळे त्यांच्या दूरदृष्टीने ओळखलं की हीच जागा पुढे आकर्षण ठरेल म्हणून तिथेच जागा निश्चित करून हॉटेलचा मुहूर्त केला. जर्मनी, अमेरिका, बर्लिन, पॅरिस, टर्की इथून ऊंची शोभिवंत सामान आणले गेले. जो माणूस पोलाद कारखाना, इमारती, गिरण्या काढतो तो हा भटारखाना का चालू करतोय असा प्रश्न त्यांच्या बहिणीला पडला होता . पण जमशेटजी टाटांना आपल्या लाडक्या मुंबई शहराला एक ताजमहाल भेट द्यायचा होता. स्वत: लक्ष घालून ते काम पूर्ण करत होते. हेच ते जगप्रसिद्ध हॉटेल ताज. अशा अनेक वास्तूंबरोबरच नवनवे उद्योगधंदे भारतात टाटांनी उभे केले. जग फिरून आल्यानंतर माझ्या देशात पण असे प्रकल्प, अशी विद्यापीठे. संस्था झाल्या पाहिजेत अशी जमशेट टाटांची इच्छा होती. ‘स्वदेशी’ हाच त्यांचा उद्देश होता.     

इंग्लंड मध्ये सुधारणेचे वारे वाहत होते. ते भारतापर्यंत पोहोचले होते. हवामान खातं, विज्ञान केंद्र, प्रयोगशाळा, संस्था, विद्यापीठं यातही गुंतवणूक होऊन ती सुरू होत होती. मिशनर्‍यान्ची  कामं सुरू झाली होती. पण त्याच वेळी भारताच्या भविष्याचा विचार जमशेटजी करत होते. देशहिताच्या दृष्टीने भारतात, त्यांना एक विज्ञान संशोधन संस्था उभी करायची होती, ती विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि ते रुजण्यासाठी. त्यासाठी त्यांनी स्वामी विवेकानंदांना पत्र लिहिलं की, “काही वर्षापूर्वी आपण एका बोटीत सहप्रवासी होतो तेंव्हा आपल्यात बर्‍याच विषयांवर चर्चा झाली. देश आणि समाज या विषयावरच्या आपल्या मतांनी माझ्या मनात तेंव्हापासून घर केलंय. या कामात ध्येयवादी व्यक्तीनं काम केल्यास, परिणामकारकता वाढेल व देशाचं नावही गौरवानं घेतलं जाईल”.

ही भेट झाली होती, जेंव्हा स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्मपरिषदेत सहभागी होण्यासाठी जात होते. तर जमशेट टाटा, जपानहून अमेरिकेत शिकागो इथे औद्योगिक प्रदर्शनासाठी निघाले होते. योगायोग असा की ‘एम्प्रेस ऑफ इंडिया’ या बोटीवर दोघंही बरोबर प्रवास करत होते. या भेटीत एकमेकांची चांगली ओळख त्यांच्या विचारांच्या आदान प्रदानाने झाली होती. एकमेकांचे ध्येयवादी विचार बघून दोघंही भारावून गेले होते. त्यांना या स्वप्नांसाठी व प्रचारासाठी विवेकानंदांची साथ हवी होती. जमशेटजींच्या स्वप्नातील ही संस्था, भारतातील एक अद्वितीय अशी, विज्ञान संशोधन आणि शिक्षणात अग्रेसर असलेली, ‘इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स’  आज बंगलोर इथं आहे. ही संस्था म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या बरोबर झालेल्या संभाषणातून पेरलेलं बीजं च होतं. दोघांचंही ध्येय होतं मातृभूमीचं सर्वांगीण पुनरुत्थान.  

हे आज सांगायच कारण म्हणजे, अजूनही टाटा कुटुंबाचा हाच लौकिक कायम आहे. देशाच्या विकासात ,त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज जगभरात कोरोना नं धुमाकूळ घातला आहे. देशादेशांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. पुढचे आर्थिक संकट आ वासून उभे आहे. या संकटात टाटा ट्रस्ट कडून रतन टाटा यांनी मोठं योगदान दिलं आहे. १५०० कोटीची मदत त्यांनी देऊ केली आहे. देशसेवेत योगदनाची हीच ती काळाची गरज त्यांनी ओळखली. प्लेगच्या साथीत पण जमशेट टाटा यांनी असेच योगदान दिले होते. असं हे  टाटा कुटुंब आपल्या देशाचा ‘अभिमान’ आहे.

क्रमशः ....

 

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

इतक्यात समर्थ श्लोक म्हणत, म्हणत आले. समर्थाचिया सेवका वक्र पाहे. असा भूमंडळी कोण आहे? जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही. उपेक्षिकदा रामदासाभिमानी.  निंदा करणारे लोकही, समर्थांचा जयजयकार करायला लागले. समर्थांनी वेणाबाईंच्या अंगावरुन काठी फिरवली.  वेणाबाईंचे आई-वडील “भिक्षा तरी घ्या,” असे म्हणत होते. तेव्हा समर्थ म्हणाले,” जी गोष्ट तुम्हाला नको ती मला द्या. उद्या चाफळला आम्ही वेणा बाईंना बरोबर घेऊन जाऊ.” दुसरे दिवशी सकाळी समर्थ, शिष्यगण यांच्यासह वेणाबाई  चाफळला निघाल्या.

सामाजिक जीवनातील कोंडमार्यातून त्या आता मुक्त झाल्या .चाफळ चे निसर्गसौंदर्य, मोकळी हवा, राम सीतेच्या चैतन्यमय मूर्ती, आणि पवित्र वातावरणाने  त्या  प्रसन्न आणि तृप्त झाल्या. चाफळला राहिलेल्या  आक्कास्वामी त्यांना मोठ्या बहिणी सारख्या होत्या. तेथे राहून दासबोधाचे अध्ययन, रामचरितमानस वाचण्यात त्या रंगून जायला लागल्या. त्या नंतर त्या स्वतःही काव्य करायला लागल्या. समर्थ सर्वत्र फिरता-फिरता जेव्हा चाफळला येत ,तेव्हा त्यांच्या निरूपण आणि कीर्तनात त्या तल्लीन होऊन जात असत. हळूहळू स्वतः काव्य करून रामासमोर कीर्तन करायला लागल्या. अनेकदा भिक्षाटनासाठी जाताना समर्थां बरोबर वेणाबाईही जात असत. त्यांची किर्तनाची कला पाहून, लोक प्रभावित होत असत. त्यांच्या रसाळ वाणीचे कीर्तन ऐकण्यासाठी ,वामनपंडितां सारखे विचारवंतही येत. आणि प्रशंसा करत. अनेकदा वीणा घेऊन वेणास्वामीच्यामागे उभे रहात असत. अनेकदा लोक आपले धार्मिक अध्यात्मिक प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. तेव्हा वेणाबाई इतक्या चातुर्याने उत्तरं देत की स्वतः समर्थ ही खुष होत असत. एकदा काशीचे सुप्रसिद्ध गागाभट्ट रामदासांशी तत्वज्ञान विषयक चर्चा करण्यासाठी पंढरपूरला आले. रामदासांनी वेणाबाईंना बोलावून घेतले .दासबोधाच्या सहाय्याने, एक विश्व तत्त्वाची कल्पना ,गागाभट्टांना स्पष्ट करून सांगण्याची वेणाबाईंना आज्ञा झाली .वेणाबाईंच्या  विद्वतप्रचुर विवेचनाने गागाभट्ट खुश झाले. आता त्या खऱ्या अर्थाने वेणास्वामी झाल्या. त्यांनी रचलेल्या एका पदात, शिवराज्याभिषेकाचे वर्णन आहे. त्यावरून शिवराज्याभिषेकाच्या त्या साक्षीदार होत्या असे म्हणता येईल .भक्त जन संत सज्जन। गोब्राम्हण प्रतिपाळाचे  करती स्तवन ।अनंत कोटी ब्रम्हांड भूपाळ जमले। वेणी सोहळा पाहती । (श्री वेणी कवन आणि पंचीकरण पद – 24 ).

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

वेणा सद्गुरुंचे स्मरण करीत रामायण, भागवत यांचे पारायण करीत राहिली. एके दिवशी समर्थ रामदास स्वामी कोल्हापूरला आले आहेत ,अशी बातमी समजली. वेणाला खूप आनंद झाला. घरातल्या मोठ्यांनी वेणाला माहेरी जाण्याच्या इच्छेला मान दिला .काही दिवसासाठी वेणा माहेरी गेली .आता ती वणाच्या वेणाबाई झाल्या होत्या. समर्थांची कीर्तने महालक्ष्मीच्या प्रांगणात होत होती. कीर्तन ऐकताना श्रोतृवृंद मुग्ध होऊन जात असे. गोपजी व राधिका दोघेही स्वामींचे शिष्य बनले होते. सकाळी समर्थ शिष्यां बरोबर मनाचे श्लोक  गात भिक्षेसाठी जात, तेव्हा गल्लीतील मुलेही जात. लेकीसुना भिक्षा देत असत. स्वामी सर्वांच्या ओळखी करून घेत. कीर्तनातून राम भक्ती, सदाचरण आणि आत्मविश्वासाचे बीजारोपण करत असत. कोल्हापुरात आल्यापासून वेणाबाई रोज कीर्तनाला जात. आणि पुढे बसत. एके दिवशी समर्थांनी तिला ओळखले. आपल्या कीर्तनाच्या पूर्वरंगात त्यांनी सांगितले की, सन्मार्गावर जात असताना, लोक निंदेस घाबरण्याचे कारण नाही. उत्तर रंगात त्यांनी भक्तशिरोमणी संत मीराबाई यांचे आख्यान लावले. सर्वजण ऐकण्यात तल्लीन झाले. किर्तन झाल्यावर वेणा बाईंनी समर्थांच्या चरणी लोटांगण घातले. तत्वचर्चा सुरू झाली. रोज किर्तन झाल्यानंतर, प्रश्न-उत्तरे सुरु झाली .एके दिवशी तर चर्चा संपेना .रात्र संपून पहाट व्हायला लागली .समर्थांचे शिष्य आणि वेणाबाई तेवढेच राहिले. अखेर समर्थांनी वेणा बाईंना घरी जायला सांगितले.

व्हायचे तेच झाले.एकटी तरुण मुलगी रात्री उशीरा घरी येते अस म्हणून लोकांमधे कुजबुज सुरु झाली.लोक शंका कुशंका घेऊ लागले. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला लागले.घरोघरी चर्च्या व्हयला लागल्या.लोक वेणाबाईंच्या आई वडिलांना दोष द्यायला लागले.त्यांना धमक्या द्यायला लागले.निंदकांनी वेणाबाईंनाबदनाम करण्याचा निश्चय केला.वेणांनी आपले निर्दोषत्व अनेक परींनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण नाही.काही उपयोग झाला नाही. गोपजींवर लोक दडपण आणायला लागले. आणि अखेर “मीराबाई  प्रमाणे तूही विषाचा पेला पिऊन दाखव”अस म्हणून एक जण विषाचा पेला खरोखरच घेऊन आला. गोपजींनाही या बदनामीपेक्षा हिचे मरणे श्रेयस्कर वाटू लागले. वेणाबाईंनाही  खोट्या जगात रहाण्यापेक्षा परमेश्वरचरणी जाणे योग्य वाटायला लागले. त्यांनी श्रीरामाचे आणि स्वामी समर्थांचे स्मरण केले. हातात विषाचा पेला घेतला. रामनाम घेताघेता वीष पिऊन टाकले.

तास, दोन तास, तीन तास गेले. पण वेणाबाईंवर त्याचा काही परिणाम झाला नाही. फक्त कातडी काळी ठिक्कर पडली. आता लोकही घाबरले.”आमच्याकडून अपराध झाला आहे”असे म्हणून क्षमायाचना करु लागले. आई वडील तिला घरात आत घेऊन जायला लागले. पण तिने उत्तर दिले तुम्ही मला वीष दिलेत, तेव्हाच मी तुमची उरले नाही. तुमची वेणा मेली.आता  वीष पिऊन जिवंत झाली. ती आता प्रभू रामाची दासी झाली आहे.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ द टर्न ऑफ टाईड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ द टर्न ऑफ टाईड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.)

त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला.

शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली…

शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले …

 

‘‘मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे.

बरे व्हाल याची खात्रीही देतो.

पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी.’’

 

गॉर्डन तयारच होते…

 

त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले,

‘‘या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा.

सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा.

पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको.

दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही.

या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’

 

दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले…

 

सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली…

 

त्यावर लिहिले होते … ‘ऐका.’

 

काय ऐकायचे… ? 

त्यांना प्रश्‍न पडला…

 

ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले…

एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…

 

झाडीतून वाहणारी हवा…

मध्येच समुद्रावरून येणारा वारा,..

विभिन्न पक्षांचे आवाज,..

दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्‍या पक्षांचे आवाज…,

 

अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या…

 

जणुकाही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते…

 

आपणही या निसर्गाचा असाच साधा,

सहज भाग आहोत,

हे त्यांना जाणवले…

 

मनातला सर्व कोलाहल थांबला…

एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता…

 

बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही…

दुसर्‍या चिठ्‌ठीची वेळ झाली होती…

त्यावर लिहिले होते,…

 

‘मागे वळून पहा.’

त्यांना काय करायचे कळले नाही.

पण सूचनांचे पालन करायचेच होते.

त्यांनी विचार करणे सुरू केले….

 

भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला…

आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,..

बालपणीचे सवंगडी,..

कट्‌टी आणि क्षणात होणारी दोस्ती,..

त्या हसण्या-रडण्यातील सहजता,..

अकृत्रिम वागणे,..

इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले….

भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले….

 

आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते,

हे आठवून त्यांचा ऊर भरून आला…

आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो.

संबंधात कृत्रिमता, दिखावूपणा, औपचारिकता जास्त आली.

या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्‌ठी उत्सुकतेने उघडली…

त्यात लिहिले होते,

 

‘‘आपल्या उद्दिष्टांची छाननी करा.’’

गॉर्डन म्हणतात, मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही.

पण मी सखोल परीक्षण केले…

आपले उद्दिष्ट काय..?

यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत…

त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते…

सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्‌ठी उघडली.

त्यात लिहिले होते,

 

“सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये.’’

त्यांनी एक शिंपला घेतला …

आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या…

आणि ते घरी जायला निघाले…

समुद्राला भरती येत होती…

त्यांनी मागे वळून पाहिले..,

एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….

 

गॉर्डन म्हणतात, त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…

 

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

?  विविधा ?

☆ संत  वेणास्वामी – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(सूर्याच्या लेकी या महाग्रंथासाठी निवड झालेला सौ.पुष्पा प्रभूदेसाई यांचा संत वेणास्वामी हा लेख क्रमशः ई-अभिव्यक्ती च्या वाचकांसाठी:

“सूर्याच्या लेकी” हे नावच मुळी इतके समर्पक आहे की, सूर्याच्या तेजा प्रमाणे समाजात स्वत:च्या तेजाचा, ज्ञानाचा ,प्रकाश पसरविला आणि तोही अनंत हाल-अपेष्टा सहन करून! इतकेच नाही तर त्या तेजाचा समाजाला उपयोग करून दिला. भारतात अशा अनेक शूरवीर कर्तबगार आणि संत स्त्रिया होऊन गेल्या.

अशा अनेक स्त्रियांपैकी मला मनोमन भावल्या त्या समर्थ रामदास यांच्या शिष्या ‘संत वेणाबाई ‘त्याच ‘संत वेणास्वामी’. दक्षिणकाशी समजल्या जाणाऱ्या, कोल्हापुरात गोपजी देशपांडे गोसावी राहात होते. पुराणग्रंथ, तत्वज्ञान आणि ज्योतिषाचे ते ज्ञाते होते. श्री जगदंबा महालक्ष्मीच्या कृपेने त्यांना एक कन्यारत्न झाले.(इ. स.१६२८) . तिचे नामकरण झाले ‘वेणा.’ वेणा दिसायला सुंदर तर होतीच, पण खेळात खूप रममाण होणारी होती. कोड कौतुक खूप होत होते. कुतुहल म्हणून यांनी कन्येची पत्रिका पाहिली. तिच्या पत्रिकेत वैधव्य असा योग होता. आणि त्याचबरोबर अध्यात्मिक पातळीवर उच्च स्थान प्राप्तीचा योग होता. ही गोष्ट त्यांनी घरी सांगितली नाही. ती जात्याच हुशार होती. त्यामुळे वडिलांनी तिला लिहायला वाचायला शिकविले .एकनाथांचे “भावार्थरामायण” “भागवत” ग्रंथ ही वाचायला लागली. घराण्यात राम भक्तीचा पूर होता. लहान असतानाच वेणा ‘अध्यात्मरामायण’ तोंडपाठ म्हणू लागली .राम भक्ती ही वेणाच्या रक्तात होती. आई बरोबर भजन, कीर्तन ऐकायला जात असे. या काळात समर्थ रामदासांचा संप्रदाय महाराष्ट्रात नुकताच उदयाला आला होता. तत्कालिन प्रथेप्रमाणे आठव्या वर्षी मिरज येथील चंदुरकर देशपांडे यांच्या एकुलत्या एक मुलाशी तिचे लग्न झाले. घर संपन्न होते.  ती माहेरी गेली.  आणि एके दिवशी सर्वजण जेवायला बसले होते ,आणि वेणाला  , मिरजेला बोलावल्याचा सांगावा आला. तिचे पती स्वर्गवासी झाल्याची बातमी आली. हसण्या खेळण्याच्या वयात बाराव्या वर्षी वैधव्य आले. तत्कालीन सामाजिक पद्धतीनुसार केशवपन झाले. आणि ती अळवण (लाल लुगडे) नेसायला लागली. कोवळ्या वयातील अशा रूपातील वेणाचे चित्र डोळ्यासमोर आले की आपल्यालाही बेचैन होते.

तिने स्वतःला सावरले. धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यात मन गुंतवू लागली .आपल्या सासरी ती राहात असे. सासरच्यांनीही तिला शिक्षणात मागे पडू दिले नाही. एकदा रामदासस्वामी भिक्षेसाठी दारात आले,” जय जय रघुवीर समर्थ”, तुंबा भर दूध मिळेल का? सासूबाईंनी आतूनच सांगितले. दूध आहे , पण ते मारुतीच्या अभिषेकासाठी ठेवले आहे. ठीक. म्हणून समर्थ निघून गेले. पण ही गोष्ट वेणाच्या मनाला लागून राहिली. एकदा ती घरातील कामे आटोपून, तुलसी वृंदावना  जवळ ‘एकनाथी भागवत, वाचत बसली असताना ,समर्थ रामदास भिक्षेसाठी दारात आले. वेणा वाचत बसलेली पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला विचारले “मुली हे तुला समजते का “वेणाने उत्तर दिले,” समजत नाही ,समजून घेण्याचा प्रयत्न करते .मनात प्रश्न येतात. पण सांगणार कोण?” वेणाची तत्व जिज्ञासा पाहून समर्थांनी तिच्या शंका विचारल्या. 25 प्रश्न तिने विचारले. जीव आणि शिवा चे लक्षण ,आत्मा परमात्मा, मायेचे स्वरूप ,त्यावर सत्ता कोणाची, चैतन्य काय आहे? आद्याचे स्वरूप काय आहे? शून्य शून्य पण चैतन्य, जन्म मृत्यू आणि बद्धमुक्त कोण आहे? सगुण निर्गुण, ब्रह्म मार्ग कोण सांगेल? असे पंचवीस प्रश्न तिने विचारले. त्यानंतर समर्थांनी तिच्या प्रश्नांना उत्तरे दिली .आणि वेणाला सांगितले की ,रोज हे वाचत रहा. तुला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. समर्थ स्वामी निघाले. त्यांना पहात राहिली. तिला सद्गुरु मिळाला.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोडेन, पण वाकणार  नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆

? मनमंजुषेतून ?

☆ मोडेन, पण वाकणार  नाही. ☆ सौ. राधिका माजगांवकर पंडित ☆ 

आमचे काका ती. स्व. दामोदर सखाराम माजगांवकर देहू रोड येथे मिलीट्रीत होते. आर्मीतल्या, ब्रिटीश राजवटीत हुतात्मा झालेल्या शूरवीरांची कथा सांगण्यांत त्यांचा हातखंडा होता. ऐकतांना प्रसंग डोळ्यांसमोर  उभा रहायचा. लहानपणी मनावर ठसलेली, कोरलेली अंगावर शहारे  आणणारी ही कथा आहे – श्री.कर्णिकांची.

पुण्यातल्या श्री जोगेश्वरीवरून बुधवार चौकाकडे जाणाऱा सरळ रस्ता – थोडक्यात म्हणजे हल्लीचं श्रीदगडूशेट गणपती मंदिर, श्री गणेश वास्तव्य आहे ना, तोच तो रस्ता. त्याच्या डावीकडे फरासखाना पोलीस चौकी आहे. तिथेच एक दीपस्तंभ अजूनही कित्येक वर्षांचा, जुना झाला तरी भक्कमपणे उभा आहे आणि त्यावर नाव कोरलंय – “भास्करदा कर्णिक”.                                                                        

कर्णिकांनी आपल्या देशासाठी फार मोठ्ठं बलिदान केलं आहे. पण आज पुणेकर त्यांना विसरले आहेत. हा स्तंभ म्हणजे कसलं प्रतिक आहे? कुणाच्या नावाची ही निशाणी आहे? त्याबद्दल कसलीच, काहीच माहिती नसलेली अशी ही वास्तु सध्या उपेक्षित ठरलीय. कारण श्री. कर्णिकांच्या बरोबरच त्यांची निशाणी, काळाच्या पडद्याआड गेलीय. पण त्यांचा आदर्श, त्यांचं बलिदान, त्यांचं नाव आपण मनात जागवूया.

श्री.भास्करदा कर्णिक ऑर्डिनन्स फॅक्टरित नोकरीला होते. हुषार आणि अत्यंत धाडसी होते. त्या काळचे १९४०-४२ सालचे उच्चपदवी विभूषित असे असलेले हे धडाडीचे तरुण! देशासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनात विलक्षण उर्मी होती. ऑर्डिनन्स फॅक्टरीतच नोकरीला असल्याने तेथील सामग्री जमवून धाडसाने यांनी हातबॉम्ब तयार केले. थोडे थोडके नाही, तर अर्धा ट्रकभरून बॉम्बची सज्जता  झाली आणि हा बॉम्बहल्ला करण्यासाठी कर्णिकांना देशप्रेमी साथीदारही मिळाले. त्यांची नांवे सांगायलाही अभिमान वाटतो, श्री. गोरे, श्री दीक्षित, श्री काळे, श्री जोगेश्वरी मंदिरातील’ व्यवस्थापक गुरव श्री भाऊ बेंद्रेही त्यांना सामील होते. इतकंच काय, देवीच्या मंदिरातच हे बॉम्ब लपवले होते. अखेर धाडसी खलबत होऊन निर्णय ठरला. आणि कॅपिटॉलवर बॉम्ब टाकण्यांत ते यशस्वी झाले. पण हाय रे देवा! कसा कोण जाणे दुर्दैवाने ब्रिटीशांना सुगावा लागला आणि साथीदारांसह श्री. कर्णिक पकडले गेले.

फरासखान्यात ह्या देशप्रेमींना आणण्यांत आलं. आजचा सध्याचा मजूर अड्डा आहे ना?तीच ती  जागा. पुराव्याअभावी बाकीचे साथीदार सुटले. पण श्री.कर्णिक मुख्य आरोपी म्हणून, डाव फसल्यामुळे अडकले. पण ते डगमगले नाहीत. परिस्थितीचं  भान त्यांना आलं. लघुशंकेसाठी परवानगी मागून ते बाजूला गेले. क्षणार्धात खिशातली विषारी पुडी त्यांनी गिळून घेतली. चार पावलं चालल्यावर फरासखान्याच्या पहिल्या पायरीवरच ते कोसळले आणि तिथेच त्या क्षणीच त्यांनी देशासाठी देहत्याग केला.

तर मंडळी असा आहे त्या पायरीचा इतिहास. मोडेन पण वाकणार नाही, हे ब्रीदवाक्य स्मरुन तो देशप्रेमी हुतात्मा झाला. त्यांची आठवण स्मृतिचिन्ह म्हणून उभा केलेला स्तंभ आता जुना झालाय. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय. मध्यंतरी बराच काळ गेला. भास्करदा कर्णिक ही अक्षरेही आता पुसट झालीत. आणि आता ह्या हुतात्म्याचाही दुर्दैवाने पुणेकरांना विसर पडलाय.

संपली श्री भास्कर दा. कर्णिक  ह्यांची  कथा. ज्यांना ही कथा माहित आहे, ते दगडूशेट गणपती मंदिरातून बाहेर पडतात, डावीकडे वळून स्तंभापुढे उभे रहातात, क्षणभर विसावतात  आणि नतमस्तक होतात.

तर मंडळी आपणही या थोर हुतात्म्याला मनोभावे श्रध्दांजली देऊयात. ??

भारतमाताकी जय!

मित्र मैत्रिणींनो, एक गोष्ट नमूद करून, आवर्जून सांगाविशी वाटते. माझे ती.स्व.काका मिलिट्रीत असल्यामुळे त्या हुताम्याचं हौतात्म्य ते जाणत होते. अजूनही इतिहासकालीन दोन दीपमाळा श्रीजोगेश्वरीसमोर   भक्कमपणे उभ्या आहेत. तिथे आम्ही रहात होतो. फरासखाना तिथून आम्हाला अगदी जवळच होता. काका थकले होते. काठी  टेकत टेकत मला सोबत घेऊन “श्री.कर्णिक स्तंभा”जवळ जाऊन नतमस्तक होऊन मानाची सलामी, मानवन्दना हुतात्मा श्री. कर्णिकांना ते द्यायचे.

धन्य ते हुतात्मा – श्री. कर्णिक आणि धन्य ते माझे देशप्रेमी काका. त्या दोघांना आपण कडक सॅल्यूट करूया. तर अशी होती ही श्री. कर्णिकांची गौरवपूर्ण  धाडसी गाथा.

तेथे कर माझे  जुळती. ??

© सौ राधिका माजगावकर पंडित,

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! बॅलेन्टाईन डे ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? बॅलेन्टाईन डे ! ?

“काय पंत, आज एकदम ठेवणीतला ड्रेस घालून स्वारीचे प्रस्थान कुठे ?”

“अरे आज आमच्या सिनियर सिटीझनचा ‘बॅलेंटाईन डे’ आहे बर.”

“तुमची काहीतरी गडबड होत्ये पंत, तुम्हाला ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणायचं आहे का ?”

“उगाच नेहमी सारखा आगाऊ पणा नकोय, तो ‘व्हॅलेंटाईन डे’ तुमचा, आमचा ‘बॅलेंटाईन डेच’ आहे आज.”

“म्हणजे मी नाही समजलो?”

“अरे परवा लेल्याचा मुलगा आला US वरून आणि येतांना त्याने ‘बॅलेंटाईन स्कॉच’ आणली आहे आमच्या सिनियर सिटीझन ग्रुपसाठी.  मग लेले म्हणाला या सगळयांनी घरी शनिवारी संध्याकाळी, आपण आपला ‘बॅलेंटाईन डे’ साजरा करू.  म्हणून त्याच्याकडेच चाललोय.”

“Ok, एन्जॉय करा पण लेले काकूंना हे चालत ?”

“अरे नाही चालत, पण त्या गेल्यात पुण्याला, सत् संग करायला आणि तोच मोका साधून आमचे आज ‘बॅलेंटाईन डेच’ सेलेब्रेशन आहे.”

“पुण्याला आणि सत् संग करायला ?”

“का, पुण्याचे लोक सत् संग करत नाहीत ?”

“तसच काही नाही, पण आपल्या शिवाजी पार्कात कुठंही सत् संग चालत नाही की काय, उगाच एव्हढे त्यासाठी लांब पुण्याला कशाला जायला हवे ?”

“तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण त्यांचे माहेर पुण्याचे, उभे आयुष्य पुण्यात…. “

“गेले असेल, पण सत् संग तो  सत् संग, तो मुंबईत केला काय आणि पुण्यात केला…. “

“असे तुला वाटत, पण त्यांच मत थोडं वेगळे आहे.”

“यात कसलं आलं आहे मत, सत् संग सगळीकडे सारखाच असतो ना ?”

“अरे त्या इथे पण एक दोनदा

सत् संगाला गेल्या होत्या, पण त्यांच म्हणणं असं पडलं की इथल्या सत् संगाला पुण्याची सर नाही.”

“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो?”

“अरे ती एक पुण्याची मानसिकता आहे, आमच्याकडे जे जे आहे, मग ते काहीही असो, ते जगात कुठेच नाही आणि आपण मुंबईकर त्यांचा तो भ्रम दूर करू शकत नाही, एव्हढे बरीक खरे.”

“ते ही खरच आहे म्हणा.”

“आणि लेले काकू पुण्याला गेल्यात हे आमच्या दृष्टीने बरेच नाही का ? नाहीतर आम्ही आमचा ‘बॅलेन्टाईन डे’ कसा साजरा केला असता, काय बरोबर ना ?”

“Ok, एन्जॉय करा पंत, पण मला एक कळत नाही हे तुमच्या नातवाचे चांदीचे बोंडले कशाला घेतले आहे तुम्ही बरोबर ?”

“अरे आज आम्ही तेच पेग मेझर म्हणून वापरणार आहोत !”

“काय, चांदीचे बोंडले पेग मेझर म्हणून वापरणार तुम्ही ?”

“तुझी चेष्टा कळते बर मला, पण आता वय झाले. तुझ्या वयाचा होतो तेव्हा….. “

“ते तुम्ही मागे एकदा सांगितले होतं आणि माझ्या ते चांगल लक्षात आहे.  आत्ताच्या या तुमच्या पेग मेझरच काय ते…. “

“सांगतो, सांगतो.  मगाशीच मी तुला म्हटलं, लेले काकू मूळच्या पुण्याच्या, तर त्यांनी

पुण्याला जाताना, लेल्याने काही उद्योग करू नयेत म्हणून, पार्टीचा सगळा सरंजाम कपाटात ठेवून, चावी आपल्या बरोबर नेली आहे पुण्याला, अस मला लेल्यानेच  सकाळीच फोन करून कळवले, म्हणून हे…. “

“पण म्हणजे तुमची ‘बॅलेन्टाईन’ पण कपाटात…… “

“नाही नाही, ती आधीच जोशाच्या घरी सुखरूप आहे आणि जोश्या ती येतांना घेऊनच येणार आहे.”

“काय सॉलिड फिल्डिंग लावली आहे तुम्ही लोकांनी पार्टी साठी, मानलं तुम्हाला !”

“मानलंस ना, मग आता तू जा तुझ्या रस्त्याने आणि मी…. “

“जातो जातो, पण एक शंका आहे.”

“आता कसली शंका?”

“पेग मेझरच काम झाल, पण ग्लासचे काय, पाहिजे तर माझ्याकडचे….. “

“काचेचे अजिबात नको आणि तुझ्या कडचे नकोच नको, उगाच सगळीकडे बोंबाबोंब करशील.”

“मग काय द्रोणातून स्कॉच…. “

“उगाच वाटेल ते बडबडू नकोस, तेव्हढी अक्कल आहे आम्हाला.”

“पण मग ग्लासांचा प्रश्न… “

“आम्ही सोडवला आहे.”

“तो कसा काय पंत?”

“अरे असं बघ, आमच्या ग्रुप मधे बहुतेक सगळ्यांनाच डायबेटीस आहे आणि प्रत्येकाकडे जांभळाच्या झाडाच्या खोडापासून बनवलेला लाकडी ग्लास आहे, त्यामुळे तो पण प्रश्न…. “

“निकाली लागला असंच ना ?”

“बरोबर ओळखलस !”

“पंत, म्हणजे पेग मेझर आणि ग्लासांचा प्रश्न तर सुटला, पण मग ही ‘बेनाड्रील सिरप’ची बाटली कशाला बरोबर घेतली आहे तुम्ही? “

“अरे सांगतो सांगतो, एकदा अशाच सेलेब्रेशनच्या वेळेला कुलकर्णीला एक पेग मध्येच झाली आणि सगळ्यांनी ठरवले की आता त्याला आणखी द्यायची नाही.”

“बर मग !”

“मग काय, पठया ऐकायला तयार नाही, आणखी पाहिजे म्हणून हट्ट धरून बसला. पण त्याची एक पेग नंतरची अवस्था बघून त्याला आणखी स्कॉच द्यायला कोणीच तयार नव्हतं.”

“पुढे”

“पुढे काय, जोश्यानेच अक्कल चालवून देतो, देतो म्हटलं आणि त्याचा ग्लास घेवून गेला किचन मधे आणि कपाटातली बेनाड्रीलची बाटली काढून ते चांगल अर्धा ग्लास भरून वर  पाणी टाकून ग्लास फुल करून दिला कुल्कर्ण्याच्या हातात, तेव्हा कुठे तो थंड झाला आणि आज पण कुलकर्णी पार्टीला आहे, म्हणून म्हटलं असावी एखादी बेनाड्रीलची बाटली इमर्जंसी म्हणून.”

“खरच धन्य आहे तुमची पंत !”

“आहे ना, मग येतोस का आम्हाला कंपनी द्यायला, बोल ? “

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रभू…. ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ प्रभू…. ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

प्रभू…..

कोणताही अर्ज केला नव्हता की कुणाचीही शिफारस नव्हती,…..

असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्व ही नाही तरीही अखंडपणे तू माझे हे हृदय चालवत आहेस…..

चोवीस तास जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस…..

मला माहीत नाही खाल्लेले न थकता पचवून सातत्यपूर्ण कोणतीही तक्रार न करता चालणारे कोणते यंत्र तू फिट करुन दिले आहेस..,..

पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेश वहन करणारी प्रणाली कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे काही समजत नाही…..

मी मात्र ती कशी चालते हे सांगून खोटा अहं पोसतो आहे…..

लोखंडाहून टणक हाडांमध्ये  तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याचा मला मागमूसही नाही……

हजार हजार मेगापिक्सल वाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहे…

दहा-दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,…..

अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली,…..

वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाज निर्मिती करणारी स्वरप्रणाली आणि त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग-डिकोडींग करणारे कान नावाचे यंत्र,…..

पंच्याऐंशी टक्के पाण्याने भरलेला शरीर रुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही…..

अद्भूत,…..

अविश्वसनीय,…….

अनाकलनीय……

अशा शरीर रुपी मशीन मध्ये कायम मी आहे याची जाणीव करुन देणारा अहं देवा तू असा काही फिट बसविला आहे की… आणखी काय मागाव मी……

आता आणखी काही हवंय अशी मागणी सुद्धा शरम वाटायला भाग पाडते……

आज एव्हढेच म्हणावेसे वाटते मी या शरीराच्या साहाय्याने तुझ्या प्रेम सुखाची प्राप्ती करावी यासाठीच्या तुझ्या या जीवा-शिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन अशी सद्बुद्धी मला दे……

तूच हे सर्व सांभाळतो आहे याची जाणीव मला सदैव राहू दे…

देवा तुझे खूप खूप आभार…..

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ विदुषी घोषा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ विदुषी घोषा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

ऋग्वेद काळात अनेक ऋषिका होऊन गेल्या. त्यातील घोषा या विदुषी ची कथा आपण ऐकूया.

घोषा ही दीर्घतामस ऋषींची नात व कक्षीवान ऋषींची कन्या. ऋषींच्या आश्रमात ती सगळ्यांची लाडकी होती पण दुर्दैवाने लहानपणीच तिच्या सर्व अंगावर कोड उठले. त्यामुळे तिने लग्नच केले नाही. अध्यात्मिक साधनेत तिने स्वतःला गुंतवून टाकले. तिला अनेक मंत्रांचा साक्षात्कार झाला. तिने स्वतः अनेक मंत्र आणि वैदिक सूक्ते रचली. ऋग्वेदाच्या दशम मंडलात तिने दोन पूर्ण अध्याय लिहिले आहेत. प्रत्येक अध्यायात 14/ 14 श्लोक आहेत. आणि सामवेदामध्ये सुद्धा तिचे मंत्र आहेत.

ती साठ वर्षांची झाली. त्यावेळेला तिच्या एकदम लक्षात आले की आपल्या पित्याने अश्विनीकुमारांच्या कृपेमुळे आयुष्य, शक्ती आणि आरोग्य प्राप्त केले होते. आपणही अश्विनीकुमार यांना साकडे घालू.

अश्विनी कुमार यांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोषाने उग्र तप केले.”अभूतं गोपा मिथुना शुभस्पती प्रिया

अर्यम्णो  दुर्या अशीमहि ” अश्विनीकुमार प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तिच्या इच्छेनुसार त्यांनी तिचे कोड नाहीसे केले  व ती रूपसंपन्न यौवना बनली. त्यानंतर तिचा विवाह झाला. तिला दोन पुत्र झाले. त्यांची नावे तिने घोषेय आणि सुहस्त्य अशी ठेवली. दोघांना तिने विद्वान बनवले. युद्ध कौशल्यात देखील ते निपुण होते.

घोषाने जी सूक्ते रचली याचा अर्थ असा आहे की,”हे अश्विनी देवा आपण

अनेकांना रोगमुक्त करता.आपण अनेक रोगी लोकांना आणि दुर्बलांना नवीन जीवन देऊन त्यांचे रक्षण करता. मी तुमचे गुणगान करते .आपण माझ्यावर कृपा करून माझे रक्षण करा आणि मला समर्थ बनवा. पिता आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देतो तसे उत्तम शिक्षण, आणि ज्ञान तुम्ही मला  द्या. मी एक ज्ञानी आणि बुद्धिमान स्त्री आहे. तुमचे आशीर्वाद मला दुर्दैवा पासून वाचवतील. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलांनी आणि नातवांनी चांगले जीवन जगावे. तिच्या तपश्‍चर्येने प्रसन्न होऊन  अश्विनी कुमारांनी तिला मधुविद्या  दिली . वैदिक अध्यापन शिकवले. रुग्णांना रोगमुक्त  करण्यासाठी , अनुभव, ज्ञान मिळवण्यासाठी, त्वचेच्या आजारापासून बरे होण्यासाठी गुप्‍त शिक्षण विज्ञान शिकवले.

अशाप्रकारे कोडा सारख्या दुर्धर रोगाने  त्रासलेल्या या घोषाने वेदांचे रहस्य उलगडून दाखवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. तिने एकाग्रतेने अभ्यास केला आणि तिला वैदिक युगातील धर्मप्रचारिका ब्रह्मवादिनी घोषा हे स्थान प्राप्त झाले. अशा या बुद्धिमान, धडाडीच्या वैदिक स्त्रीला शतशत नमन.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वाढदिवसामीच मला चाॅकलेट दिलं,

एक घट्ट मिठी मारून “लव यू ” म्हटलं,

मीच केलय एक प्राॅमिस मला,

कायम खूश ठेवणार आहे मीच मला….

Priority लिस्टवर माझं स्थान नेहेमीच शेवटी,

ते आणिन आता थोडतरी वरती,

सगळ्यांचं सगळं करताना विसरणार नाही स्वतःला,

मीच एक फूल दिलय आज मला….

खूप खूप वर्षांनी खाली ठेवलाय

तो सुपरवुमनचा किताब,

मन होऊन जाऊदे फुलपाखरू आज…

नाही जमत मला तिच्यासारखा स्वयंपाक,

आणि येत नाही तिच्यासारखं रहायला झक्कास,

येत नाही टाईम मैनेजमेंट मला,

काँम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गैजेट्स मधे मी “ढ” गोळा….

आज मान्य मला माझे सारे दोष अन् कमतरता,

माझ्यातला वैशाख,

कारण आज उतरवून ठेवलाय,

मी आदर्श भारतीय नारीचा पोषाख….

हिचे केस, तिची उंची, हिचा रंग, तिचा आवाज,

नको ती तुलना, नको ती इर्ष्या,

तोच स्त्रीयांचा खरा शाप…

आज मी मिळवणार आहे अपूर्णतेतल्या पूर्णतेचा उःशाप….

मी शिकवणार आहे मला, जशी आहे तशी आज,

आरश्यासमोर उभी राहून बघणार आहे स्वतःला,

ना कोणाची

बायको, सुन, आई, मुलगी म्हणून… फक्त मला…

गुणदोषांसकट स्वतःच्या प्रेमात पडायचय मला…

का हवा मला

नेहेमीच घोड्यावरून येणारा स्वप्नातला राजकुमार?

मीच होणार माझ्या सुखाची शिल्पकार…

आत्ममग्नतेच्या तळ्याकाठी बसेन काही काळ,

आणि फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग!!!

Happy Valentine’s day  To All Women

 

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares