मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 1 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

 

? विविधा ?

महिनाअखेरचे पान -1 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

महिनाअखेरचे  पान

बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपत आला आणि आज तर जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस ! इंग्रजी कालगणनेप्रमाणे हा पहिला महिना असला तरी भारतीय कालगणनेप्रमाणे या महिन्यात सुरूवातीला मार्गशीर्ष महिन्याचे काही दिवस येतात व अमावस्येनंतर पौष महिन्याचे दिवस येतात.कालगणनेच्या वेगवेगळ्या पद्धतीमुळे प्रत्येक महिन्यातच असे काही दिवस येत असतात.पण आपण मात्र या दोन्ही पद्धती विचारात घेऊन त्यांना आपलेसे केले आहे.एकीकडे आपल्या कालगणनेप्रमाणे आपण आपले सण,उत्सव,परंपरा जतन करत आलो आहोत तर दुसरीकडे जागतिक कालगणनेला स्विकारून त्यातील नोंदीनुसारही आपण सर्वांबरोबर वाटचाल करत आहोत.

नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव संपतो ना संपतो तोच आणखी एक गोड संदेश आपल्या कानावर येतो.तो म्हणजे ‘गोड गोड बोला’.संक्रांतीच्या सणाला लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच एकमेकांना ‘ तिळगूळ घ्या,गोड बोला ‘ असा आपुलकीचा संदेश देत तिळगूळ  आणि तिळाच्या वड्या वाटून आनंद,स्नेह,प्रेमच वाटत असतात.लहान मुलांचा उत्साह पाहून आपणही लहान होऊन जातो आणि   ‘ग्गो ग्गो बोला’ म्हणत त्यांच्याबरोबर लहान होऊन जातो. संक्रांतीचा आदला दिवस भोगी व पुढचा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. थंडीच्या या दिवसांत तिळ आणि गूळ यांच महत्व सांगणारा हा सण आपल्या पूर्वजांच्या आरोग्यविषयक दक्षतेचे प्रतिक आहे.आपल्या प्रत्येक सणामागील विज्ञान आपण समजून घेतले तरच या परंपरा,सण जतन करता येतील.

या पारंपारिक सणाव्यतिरिक्त अन्य काही महत्वाच्या घटना या जानेवारी महिन्यात घडून जातात.त्या सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्वाच्या आहेत.याच महिन्यात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,राजमाता जिजाऊसाहेब ,स्वामी विवेकानंद आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असते.सावित्रीबाई फुले यांनी स्त्री उद्धारासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन हा दिवस बालिका दिन व महिला मुक्तिदिन म्हणून  साजरा केला जातो तर स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन युवादिन म्हणून साजरा होतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी महात्मा गांधी,भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री आणि समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथि याच महिन्यात असते.या सर्वच थोर विभूतींचे स्मरण  या निमित्ताने केले जाते.

या महिन्यातीतल आणखी एक महत्वपूर्ण दिवस म्हणजे 26जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन!याच दिवशी 1950 साली आपण प्रजासत्ताक राज्यपद्धती स्विकारली व लोकशाहीच्या मार्गाने आपला राजकिय व सामाजिक प्रवास सुरू झाला.

असा हा वर्षाचा पहिला महिना आज संपत आहे आणि उद्यापासून काळाचा प्रवेश पुढील महिन्यात होत आहे.भेटू पुढच्या महिनाअखेरीला. तोपर्यंत गोड गोड बोला…

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग २ – खरे शिक्षण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग २ – खरे शिक्षण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

[भारतीय संस्कृतीतमध्ये आपल्या जीवनात असणार्‍या गुरूंना अर्थात मार्गदर्शन करणार्‍या व्यक्तिंना अत्यंत महत्वाचे स्थान आहे, हे महत्व आपण शतकानुशतके वेगवेगळ्या पौराणिक, वेदकालीन, ऐतिहासिक काळातील अनेक उदाहरणावरून पाहिले आहे. आध्यात्मिक गुरूंची परंपरा आपल्याकडे आजही टिकून आहे. म्हणून आपली संस्कृतीही टिकून आहे.

एकोणीसाव्या शतकात भारताला नवा मार्ग दाखविणारे आणि भारताला आंतरराष्ट्रीय विचारप्रवाहात आणणारे, भारताबरोबरच सार्‍या विश्वाचे सुद्धा गुरू झालेले स्वामी विवेकानंद.

आपल्या वयाच्या जेमतेम चाळीस वर्षांच्या आयुष्यात, विवेकानंद यांनी  गुरू श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्यत्व पत्करून जगाला वैश्विक आणि व्यावहारिक अध्यात्माची शिकवण दिली आणि धर्म जागरणाचे काम केले, त्यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना आणि प्रसंगातून स्वामी विवेकानंदांची ओळख या चरित्र मालिकेतून करून देण्याचा हा प्रयत्न आहे.] 

मुलांना कोणत्या शाळेत घालायचं हा मोठा प्रश्न आजच्या पालकांसमोर असतो. खरय की शिक्षण आपल्या आयुष्यातला महत्वाचा घटक असतो. शिक्षण हे औपचारिक आणि अनौपचारिक दोन्हीही. औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय, महाविद्यालयीन, पुस्तकी शिक्षण, तर अनौपचारिक शिक्षण  म्हणजे घरात कुटुंबात,बाहेर समाजात, आजूबाजूला घडणार्‍य घटना यातून मिळालेले शिक्षण व मोठ्यांनी केलेले  संस्कार सुद्धा. शाळेत घेतलेले पाठ्यपुस्तकांतले शिक्षण म्हणजे निव्वळ  माहिती असते. ब्रिटीशांनी घालून दिलेल्या या शिक्षण पद्धतीमुळे आपल्या देशात जीवनमूल्ये शिकवणार्‍या, व्यवहारज्ञान शिकविणार्‍या गोष्टी विद्यार्थ्यांना मिळत नाहीत. शिक्षण क्षेत्रातली आजची स्थिति बघता स्वार्थ आणि मानवी मूल्यांची घसरण याच वरचढ होत आहेत.

हे तर स्वामी विवेकानंदांना तेंव्हाच कळलं होत. त्यांचाही या शिक्षण पद्धतीला विरोध होता. शिक्षणविषयी त्यांची मते आजही  डोळे उघडणारी आहेत. ते म्हणतात, “ आपल्याला जीवन घडविणारे, माणूस निर्माण करणारे, व चांगले विचार आत्मसात करविणारे शिक्षण हवे आहे. तुम्ही जर चार पाच विचार आत्मसात करून आपल्या जीवनात व आचरणात उतरविलेत तर अवघे ग्रंथालय मुखोद्गत करणार्‍या व्यक्तिपेक्षाही तुमचे शिक्षण सरसच ठरेल. जे शिक्षण सामान्य लोकांमध्ये चारित्र्यबल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करू शकत नाही ते काय कामाचे? यामुळे किल्ली दिलेल्या यंत्रासारखे तुम्ही राबता. ज्यामुळे सामान्य  माणूस स्वताच्या पायावर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. चारित्र्य घडविणारे, मानसिक बल वाढविणारे, बुद्धी विशाल करणारे आणि स्वावलंबी बनविणारे असे शिक्षण आम्हाला हवे आहे”

हे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही तंतोतंत लागू आहेत. आजच्या शिक्षण क्षेत्राला आणि देशाला पण .आजच्या घडीला भरकटलेला युवक, टंगळमंगळ करुन वेळ वाया घालविणारा युवक, दिशा नसणारा व ध्येय नसणारा युवक, रस्त्यारस्त्यात, चौकात हास्यविनोद करणारा, छेड छाड करणारा, आंदोलने, मोर्चे यात स्वार्थासाठी व कुणी संगितले म्हणून सहभागी होणारा युवक उद्याच्या भारताची चिंता आहे.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूको मत चौहान….भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ चूको मत चौहान – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला !) इथून पुढे —-

चंद बरदाईच्या निर्देशानुसार सात मोठ्या लोखंडी तव्यांना ठराविक दिशेने व अंतरावर ठेवण्यात आले होते…. पृथ्वीराजांचे डोळे काढून आंधळे करण्यात आले असल्याने त्यांना चंद बरदाई च्या साहाय्याने दरबारात आणले गेले. घौरीला “शब्दभेदि बाणाचे दृश्य” नीट पाहता यावे म्हणून त्याच्या उच्च स्थानासमोरील मोकळया जागेत पृथ्वीराजांच्या बसण्याची सोय करण्यात आली होती… ते स्थानापन्न झाल्यावर त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण देण्यात आले…

चंद बरदाई घौरीला म्हणाला,”खाविंद, माझ्या राजांचे साखळदंड आणि बेड्या काढण्यात याव्यात, जेणेकरून त्यांना आपल्या या अद्भुत कलेचे प्रदर्शन करता येईल” 

घौरीला त्यात काहीच धोका वाटलं नाही कारण, एक तर पृथ्वीराज डोळ्याने ठार आंधळा… चंद बरदाई सोडला तर त्याचा कोणी सैनिक नाही… आणि माझे सारे सैन्य माझ्याजवळ दरबारात उपस्थित आहे! त्याने लगेच पृथ्वीराजांना मोकळे साकारण्याचे फर्मान सोडले. 

चंद बरदाईने आपल्या परमप्रिय राजाला चरणस्पर्श करून सावध राहण्याची विनंती केली… त्याने आपल्या राजाचे गुणगान करणाऱ्या बिरुदावल्या म्हंटल्या… आणि त्याच बिरुदावलीच्या माध्यमातून चंद बरदाईनेआपल्या राजाला संकेत दिला….. 

“चार बांस, चौबीस गज, अंगुल अष्ठ प्रमाण।

ता ऊपर सुल्तान है, चूको मत चौहान।“

अर्थात् चार बांस, चोवीस गज आणि आठ वित एव्हढ्या उंचीवर सुल्तान बसला आहे…. तेव्हा राजे चौहान… कोणतीही चूक न करता तू नेम साधून आपले लक्ष्य साध्य कर!

या सांकेतिक बिरुदावलीतून पृथ्वीराजांना मोहम्मद घौरीच्या बसण्याच्या अंतराचा अचूक अंदाज आला. 

चंद बरदाईने घौरीला पुन्हा विनंती केली,” महाराज, माझे राजे हे आपले बंदी आहेत, त्यामुळे आपली आज्ञा झाल्याशिवाय ते शस्त्र चावणार नाहीत, तेव्हा आपण स्वतः त्यांना ऐकू जाईल एव्हढ्या उच्चरवाने माझ्या राजांना बाण चालवण्याची आज्ञा द्यावी”

घौरी या प्रशंसेने भारावून गेला आणि त्याने मोठ्याने उद्घोषणा केली, “चौहान चलावो बाण!… चौहान चलावो बाण!!…. चौहान चलावो बाण!!!”

घौरीचा आवाज ऐकल्या बरोबर पृथ्वीराज चौहान यांनी आपल्या धनुष्यावर चढवलेल्या बाणाची प्रत्यंचा ओढली आणि गौरीच्या आवाजाच्या दिशेने बाण सोडला नि त्या बाणाने अचूकरित्या घौरीच्या छातीचा वेध घेतला! 

काय होतंय हे कळायच्या आत, “या अल्लाह! दगा हो गया” अशी किँकाळी फोडत मोहम्मद घौरीचा देह सिंहासनावरून खाली कोसळला! 

दरबारात एकाच गोंधळ उडाला…. सारे सरदार हादरून गेले… तीच संधी साधून चंद बरदाई धावत आपल्या प्राणप्रिय राजाच्या जवळ आला… त्याने घौरी मृत होऊन कोसळल्याची बातमी आपल्या राजाला सांगितली… आपल्या बहादूर राजाला वंदन केले… दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले… चंद बरदाई आणि पृथ्वीराजांना याची कल्पना होती कि, घौरी चा मृत्यू झाल्यावर त्याचे सैन्य आपल्याला छळ-छळ करून ठार मारणार… त्यामुळे आधीच ठरल्याप्रमाणे दोघांनी एकमेकांवर वार करून वसंत पंचमीच्या शुभ दिवशी माता सरस्वतीला आपल्या प्राणांचे अर्घ्य दिले!

पृथ्वीराज चौहान आणि कवी चंद बरदाई यांची हि आत्मत्यागाची शौर्य गाथा आपल्या भारतीय मुलांना अभिमानाने कथन करणे, त्यांच्यापर्यंत पोचणे आवश्यक आहे, म्हणून आज आपल्यासमोर आणली आहे. आपण देखील ही शौर्यगाथा आपल्या मुलांसोबत शेअर कराल हीच अपेक्षा. धन्यवाद!

समाप्त 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 2 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 2 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

मुक्तांगणचा शिल्पकार मुक्तांगणी दाखल..

डॉ. अनिल अवचट:

…….(ती ठाण्याची अनिता सोहोनी. अनिलचं तिच्याशीच लग्न झालं. अनिलच्या सामाजिक कामाचा आत्मा तीच होती. अनेक वेळा त्याने तसं माझ्याकडे बोलूनही दाखवलं होतं.)…..क्रमशः

मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, म्हणजे बावीस डिसेंबरची. सकाळी साडेसातलाच अनिलचा फोन आला.”सुध्या, मी तुझ्याकडे येतोय, आहेस ना. खालचं तुझं ऑफिस उघडं आहे नां..” इतक्या सकाळी ऑफीस उघडत नाही. तू वरच ये असं मी त्याला सांगितलं. इतक्या सकाळी अनिल येत नसायचा. दुपारी, कधी संध्याकाळी असा यायचा. या वेळी मात्र त्याने ही वेळ का निवडली होती समजेना. अखेर आठच्या सुमारास अनिल आला. मी खाली आलो, त्याची अवस्था नाजूकच होती. त्याला सुट्टं चालणं त्रासदायक वाटत होत. त्याचा ड्रायव्हर अविनाश आणि मी एकेका दंडाला धरुन घरात नेलं. घरात माझी बायको आणि मी दोघेच होतो. काय खाणार विचारल्यावर म्हणाला की मी पोहे खाल्ले आहेत, तरी पुन्हा थोडे खाईन आणि चहा पण घेईन. त्याने त्याचं ’आणखी काही प्रश्न’ हेे नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक मला दिलं. पेन मागून घेतला आणि त्यावर लिहिलं,’ प्रिय सुधा, तुझ्याकडे आल्यावर वेगळंच वाटत असतं’ खाली सही केली. अक्षर नेहमीसारखं नव्हतं. हाताला थोडा कंप होता.  मी म्हणालो,” अनिल, हे प्रश्न कधीच संपायचे नाहीत, आणखी काही, मग परत आणखी काही…. असं सुरुच राहणार. तू अनेक प्रश्नात हात घातला आहेस आणि शक्य ते सगळं केलं आहे. आता स्वत:कडे लक्ष दे”.

पोहे खात आणि नंतर चहा घेत आम्ही भरपूर गप्पा मारल्या. त्याचा एकूणच अ‍ॅप्रोच यावेळी मला थोडा विचित्र वाटला होता. उगा तो निर्वाणीची भाषा बोलतोय असंही वाटून गेलं होतं. तो नेहमीच आल्यावर भरपूर बोलायचा. बहुतेक वेळा आम्ही दोघेच असायचो. अनेक खाजगी गोष्टी शेअर करायचा. माझ्या ’एक होतं गाव ’ या पुस्तकाला प्रस्तावना त्याने लिहिली होती. त्यात त्याने म्हटलं होतं, ” सुधाकरची कमाई माझ्या तुलनेत खूप मोठी आहे’. हे वाक्य काढून टाक असं मी त्याला सुचवलं होतं. अरे हे वास्तवच आहे, तू जे काही केलंस ते खरोखर मोठं आहे. मी हे वाक्य काढणार नाही. आणि ते तसंच आहे. त्या दिवशी त्याने सांगीतले होते की तुझं ’पिंपळपार’ तिसर्‍यांदा वाचलं. काय आहे माहीत नाही, पण पुन्हा पुन्हा वाचावसं वाटतं. भरपूर गप्पा झाल्यावर तो नेहमीप्रमाणे म्हणाला सुध्या, आता एक गाणं म्हणतो. त्या दिवशी त्याने आनंद सिनेमातलं ’कही दूर जब दिन ढल जाए’ हे गाणं म्हटलं. त्यादिवशी हे गाणं म्हणताना त्याच्या आवाजात शेवटी शेवटी चरचरीत अशी कातर आणि आर्तता आहे असं मला वाटून गेलं. त्यालाही हे म्हणताना आतून वेगळंच जाणवत असावं. मलाही गलबलून गेलं होतं. तो प्रत्येक भेटीत एक गाणं म्हणायचाच, पण गाणं वेगळं असायचं आणि मूडही वेगळा असायचा. या पूर्वीच्या भेटीत त्याने आनंदाचे डोही आनंद तरंग हा अभंग म्हणला होता.

अनिलच्या घरी गेलं की तो पुस्तकाच्या खोलीत, जी पुस्तकाचं गोडाऊन वाटावी अशी झालेली होती, बसलेला असायचा. अघळ पघळ मांडी घातलेला अनिल, समोर आपण बसलेलो आणि गप्पा व्हायच्या. मधुनच तो बासरीवर काही वाजवून दाखवायचा. आमच्या गप्पांना त्याच्या सामाजिक कामाचा, व्यसनमुक्तीचा असा काही संदर्भ नसायचा. वेगळ्याच दिशेला गप्पा व्हायच्या. सुनंदा वहिनींच्या जाण्यानंतर अनिल आतून पोकळ झाला होता आणि त्याची आई इंदुताईंच्या जाण्यानंतर तर त्याच्यातली पोकळी जाणवतही होती. त्या दिवशी अनिल आला त्यावेळी त्याची अवस्था फार चांगली नव्हती. ’मला चक्कर येते’ असं म्हणाल्यावर मी त्याला तू सध्या बाहेर पडू नकोस अशी सूचनाही केली होती. या वयात थोडं जपूनच राहा, पडलास तर भलतंच काही व्हायला नको.

अनिलला आता आपल्याकडे फार काळ नाही याची जाणीव झाली असावी आणि तो मित्रांना, घरच्यांना भेटून घेत असावा. जे काही करु ते जीव ओतून करु, सगळ्या कलांचा आस्वाद घेऊ, अनेकांच्या अडचणींने कळवळून जाऊ, जमेल ती सगळी मदत करु असा विचार करणारा, साधी राहाणी असलेला अनिल. शाकाहारी पण चवीने खाणारा अनिल. अनिल एक अपवादात्मक आगळं व्यक्तिमत्व होतं. मला नेहमीच बरं वाटायचं की अनिल त्याच्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टी विश्वासाने माझ्याकडे बोलायचा. जगण्याच्या सगळ्याच पैलूंचा आस्वाद घेत, प्रचंड सामाजिक कार्य करत आयुष्य जगलेला अनिल म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व होतं. एक जवळचा, उत्तुंग व्यक्तिमत्वाचा मित्र हरपला याचं मोठंच दु:ख आहे. त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

 – सुधाकर घोडेकर

प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चूको मत चौहान….भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ चूको मत चौहान – भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

अफगाणिस्तानातील काबूलच्या अंधार कोठडीत एक नर-सिंह उद्विग्नपणे येरझाऱ्या घालीत होता…. ज्या हातांतील तलवारीने शत्रूंच्या टोळधाडीला पळता भुई थोडी करून चारीमुंड्या चीत केले होते तेच हात साखळदंडांनी करकचून बांधले गेले होते… पळत्या घोड्यावर मांड ठोकणाऱ्या पायात भारी भक्कम बेड्या टाकून त्यांना जायबंदी केले गेले होते…. त्याच्या फोडल्या गेलेल्या डोळ्याच्या खोबणीत आजही प्रतिशोधाचा अंगार प्रज्वलित होता… अशा या बहाद्दर वीराचे नाव होते “हिंदशिरोमणी पृथ्वीराज चौहान”!

अजयमेरूच्या (अजमेर) या राजपूत वीराने परदेशी इस्लामिक आक्रमक मोहम्मद घौरी ला सोळा वेळा पराभूत केले होते आणि प्रत्येक वेळी उदारपणा दाखवत त्याला जिवंत सोडले, परंतु सतराव्या वेळेस त्यांचा पराभव झाला, तेव्हा मोहम्मद घौरी ने त्यांना सोडले नाही. त्याने त्यांना बंदिवान करून काबुल-अफगाणिस्तानात नेले. सोळा वेळेस पराभूत झाल्यावर ज्या घौरीने दया म्हणून प्राणाची भीक मागितली तोच घौरी बंदी केलेल्या पृथ्वीराजांवर आसूड ओढत होता आणि इस्लाम स्वीकारण्यासाठी अनन्वित छळ करीत होता. “प्राण गेला तरी बेहत्तर पण इस्लाम स्वीकारणार नाही” असे म्हणून डोळ्यास डोळा भिडवणाऱ्या पृथ्वीराजांचे डोळे फोडण्यात आले होते! 

पृथ्वीराजांचा इमानी राजकवी “चंद बरदाई”, आपल्या राजाला, पृथ्वीराजांना भेटायला थेट काबूलला पोहोचला! तेथील कैदेत असताना पृथ्वीराजांची दयनीय अवस्था पाहून चंद बरदाईच्या मनाला तीव्र धक्का बसला… आपल्या राजाचे असे हाल करणाऱ्या घौरीचा त्याने सूड घेण्याचे ठरवले… आपली योजना त्याने आपल्या राजांना सांगितली आणि विनंती केली कि, “हे राजा, आपण या घौरीला इतकेवेळा माफ केले, पण आता या सापाच्या अवलादीचा वध करण्याची वेळ आली आहे!” 

चंद बरदाई घौरीच्या दरबारात आला…. त्याने घौरीला सांगितले की, “आमचा राजा एक महाप्रतापी सम्राट आहे… तो एक महावीर योद्धा तर आहेच पण माझ्या राजाची तुला अवगत नसलेली एक खासियत म्हणजे, आमचे राजे ध्वनी-लक्ष-भेदनात प्रवीण आहेत! नुसत्या आवाजाच्या रोखाने बाण चालवून अचूक सावज टिपण्यात ते तरबेज आहेत!  जर तुमची इच्छा असेल तर आपण त्याच्या शब्दभेदी बाणांची अद्भुत कामगिरी स्वतः पाहू शकता! 

यावर घौरीचा विश्वासच बसेना, तो म्हणाला, “अरे, मी तर तुझ्या राजाचे दोन्ही डोळे फोडले आहेत… मग तो आंधळा कसा काय धनुष्यबाण चालवणार?”

चंद बरदाई अदबीने उत्तरला, “खाविंद, तुम्हाला खरं वाटत नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष ही विद्या पाहू शकता… माझ्या राजांना इथे दरबारात बोलवा… काही अंतरावर लोखंडाचे सात तवे ठेवा…. आणि त्यांचा आवाज करायला सांगा…. माझे राजे आपल्या धनुष्यबाणाने त्या सातही तव्यांचे भेदन करतील!” 

घौरी कुत्सितपणे हसला नि म्हणाला, “तू तर फारच प्रशंसक आहेस तुझ्या राजाचा! पण एक लक्षात ठेव…. जर का तुझा राजा हि कला दाखवू शकला नाही, तर त्याच दरबारात मी तुझे आणि तुझ्या राजाचे डोके उडवून लावीन!” 

चंद बरदाईने घौरीची अट मान्य केली आणि बंदिगृहात आपल्या लाडक्या राजांच्या भेटीला आला. तिथे त्याने पृथ्वीराजांना घौरीसोबत झालेली बातचीत सांगितली, दरबाराची सविस्तर मांडणी विशद केली आणि दोघांनी मिळून आपली योजना आखली….

ठरल्याप्रमाणे घौरीने दरबार भरवला आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी आपल्या राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांना आमंत्रित केले…. भालदार चोपदार यांनी मोहम्मद घौरी दरबारात येत असल्याची वर्दी दिली…. आणि घौरी आपल्या उच्च आसनावर विराजमान झाला! 

 क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ खुंट्याजवळचे दाणे ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ खुंट्याजवळचे दाणे ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

कबाल– कबीराचा मुलगा.  एकदा काशीतून फिरत असता त्याला एका घराचे दार उघडे दिसले. त्याने आत डोकावून पाहिले तर तिथे एक बाई दळण दळत  होती. 

कबाल खूप वेळ उभा राहून ते पाहात होता. दाणे जातात कुठे ???

त्याला रडू आले. त्याचा समज झाला की सर्व दाण्यांचे पीठ झाले व ते मेले. 

त्याने विचार  केला, ‘ आपणही या काळाच्या चक्कीत असेच पिसले जात आहोत.’

कबाल घरी आला, वडलांजवळ जाऊन रडू लागला— 

कबीर महाराज विचारताहेत—-” कबाल अरे काय झाले  रे ? “

कबाल सर्व पाहिलेलं सांगतो, आणि म्हणतो—” जात्यामध्ये सर्व दाणे  मेले . “

कबीर कबालाला घेऊन त्या बाईच्या घरी गेले.  जात्याची वरची पाळी बाजूला करुन  दाखविली. 

खुंट्याजवळ २ , ४ दाणे तसेच चिकटलेले होते—–

ज्या दाण्यांनी त्या खुंट्याचा आधार घेतला होता ते तसेच होते. कबालच्या भाषेत ‘ ते वाचले..’.

 —-आपल्याही संसाराच्या जात्याला एक खुंटा आहे.–

       तो म्हणजे “ सदगुरु.” —-

       त्यांना धरुन ठेवावे — 

        त्यांचा आधार घ्यावा — 

        जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते —

 —- विनाशाची भिती टाळायची असेल तर अविनाशी खूंटा सदगुरु—

     त्यांचा आधार घ्यावा—-

     तो घट्ट धरुन ठेवावा — 

—-जीवाला निर्भय करणारी एकच विभूति —-

     “ती म्हणजे सदगुरु होय .”

 

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वाढदिवस ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

 ? विविधा ?

?वाढदिवस ☘️ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆ 

— कॅलेंडरची पानं वा-याने फडफडली,ती नीट करतांना लक्षांत आलं ..उद्या वाढदिवस आहे आपला..! त्या तारखेभोवती आतां लाल वर्तुळाची खूण करणार माणूसच नाही आता..मग आता वाढदिवसाच अप्रुपही फारस वाटत नाही.

–तरीही नेहमीप्रमाणेच साखर झोपेत असतांनाच माझ्या वाढदिवसाला, अंजलिच्या म्हणजे आमच्या लेकीच्या -“वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा ग आई..!”

या फोननेच जाग आली.आणि मग दिवसभर नातवंड, जावई, माझी भावंड,मैत्रीणी,यांची शुभेच्छांची बरसातच सुरू झाली.

यानिमित्तानं झालेल्या संवादाच्या आनंदात हा दिवस संपूच नये,असं वाटत राहील ….एक वर्षानं वय वाढलंय आपलं..ही जाणीवही होत नाहीय….

 — खरं सांगायच तर…आयुष्य गिरक्या घेत पुढं सरकलं तरी प्रत्येक वर्षी या दिवसाच्या वळणावर मनं क्षणंभर विसावतच. धुक्याआड गेलेले चेहरे डोळ्यासमोर येतात. ज्यांच्यामुळेआपण आज आहोत, ज्यांचे हात सदैव आपल्या पाठीवर मायेने फिरतात असं वाटत, ते आपले जन्मदाते आईवडील, त्यांचे स्मरण प्रथम होत.अन् नकळत डोळे पाणवतात. स्मृतींचे पंख फडफडूं लागतात. आतांपर्यंत साजरे झालेले-केलेले घरातील सगळ्यांचेच वाढदिवस, -आम्हा उभयतांचे, मुलीचे, नातवंडांचे, सगळे-सगळेच आनंददायी क्षणं,आठवतात. अन् वाटत खरंच…

जीवन किती गतिमान आहे.बालपण, किशोरवयं, तारुण्यं, प्रौढत्व, त्यातून वृध्दत्वाकडे वाटचाल. हा प्रवास चालू असतो. निसर्गाच्या उत्पत्ती, स्थिती, लय, या तत्वाची जाणीवही असते प्रत्येकाला.! ऋतूमागून ऋतू जातात.

हिरव्या पानांचा रंग पिवळा होऊ लागतो.वयाप्रमाणे स्नेही-सोबती बदलत जातात. जुने मागे पडत जातात.नात्या-गोत्यांच रुंदावलेल वर्तुळ थोडं अंतरावरच राहत.अन् मनांत येत..वर्षांनुवर्ष साजरा होणारा वाढदिवस, आतां केवळ उपचार राहीला आहे का?मग वाढदिवसाचा आनंद विरघळू लागतो.भेटकार्डावरच्या शब्दांची भुरळ पडेनाशी होते. फुलदाणीत ऐटीत विसावलेल्या फुलांकडे पाहून, ती उद्या  कोमेजणार याने मनं कोमेजू लागलं तरं योग्य नाही.आपल्या नाठाळ मनाला समजायलाच हवं..आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण मनाने,बुध्दीने,वयाने परिपक्व होत जातो.आपल्या जगण्याला सकारात्मक दृष्टिकोन देत, कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या घेऊन जगणं आनंदाच करायच हे ठरवायचं ते वाढदिवशीच. या वळणावर क्षणंभर विसावतच मागे वळून पाहिलं अन् उत्सवाचे,आनंदीक्षणं, मनाच्या कुपीत हळूंवारपणे जपून ठेवले.नव्या उमेदीने पुढील आयुष्याची वाटचाल करण्यासाठी पाऊलं उचलतांना आतां मनांत वयाचा हिशोब नाही. याक्षणी मनांत फक्त प्रसन्नता झुळझुळतेय. सगळं धुकं विरुन लख्ख कांहीतरी समोर आल्यासारखी..! 

अन् मी कागदावर लेखणी टेकवली….

© सुश्री शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड- पुणे.

मोबा. ९५९५५५७९०८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 1 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ डाॅ.अनिल अवचट…भाग 1 … सुधाकर घोडेकर ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

मुक्तांगणचा शिल्पकार मुक्तांगणी दाखल..

डॉ. अनिल अवचट यांचं निधन..

कुणाचं अंतिम पर्व कसं असेल याची कुणीच कल्पना करु शकत नाही. आयुष्यभर सतत कामात असणारा एखादा या अंतिम पर्वात काम नाही, किंवा काही करण्याइतकी शक्ती उरली नाही म्हणूनही खचून जातो. अनेकांना या पर्वात समाजात घडत असलेल्या अनेक घटना छळतात आणि आपण काही तरी करायला पाहिजे ही खंत लागते आणि आता आपल्या हातून हे काही होण्याची शक्यता नाही याचं प्रचंड दु:ख होत असतं. त्यांची ही तळमळ अतिशय प्रामाणिक आणि नैसर्गिक असते. त्यांना पडणार्‍या अशा प्रश्नांची मालिका संपतच नसते, कारण वय झालं, शक्तीहीन झाले तरी यांच्या संवेदना तितक्याच, किंबहुना अधिक तीव्र असतात. अनिल अवचटांबाबत हे जवळपास असंच झालं होतं. खूप काही करायचं बाकीच आहे असं त्याला सारखं वाटायचं. त्याचं नुकतंच एक पुस्तक प्रकाशित झालं आहे,” आणखी काही प्रश्न” हे त्याच्या या मानसिकतेचंच उदाहरण आहे.

अनिलच्या सामाजिक कार्याबाबतची खडा न् खडा माहिती जवळपास सगळ्यांना आहे. त्याच्या लोकसत्तामधल्या ड्रग्जच्या व्यसनात अडकलेल्या तरुणाईवरची लेखमाला त्याला सामाजिक कार्यात खेचून घेऊन गेली आणि पुढे त्यातून मुक्तांगणची निर्मिती झाली. अनिलने केलेल्या अनेक सामजिक उपक्रमांची तपशीलवार माहिती बहुतेकांना आहेच. अनिल एक ’छांदिष्ट’ होता. शिक्षणाने डॉक्टर होता, हाडाचा सामाजिक कार्यकर्ता होता, चित्रकार होता, ओरिगामी कलाकार होता, तो उत्तम लिहायचा, बासरी वाजवायच, गायचा, कविता करायचा. हे सगळे छंद त्याने नुसतेच जोपासले नव्हते तर या प्रत्येकातून तो आनंद मिळवायचा. व्यसनमुक्ती केंद्र हे तर त्याचं मोठंच आकर्षण होतं. थोडक्यात काय तर सार्वजनिक अनिल अवचट सगळ्यांनाच माहीत होते.

अनिल माझा लहानपणापासूनचा मित्र. आम्ही काही महिन्यांच्या अंतराने एका वयाचे. अनिलचे वडील डॉक्टर होते आणि अनिलनेही डॉक्टर व्हावं ही त्यांची इच्छा होती. त्यांनी त्याला तसंच वाढवलं होतं आणि अनिल डॉक्टरही झाला. तो ज्यावेळी एमबीबीएस ला बीजे मधे होता त्या पहिल्या वर्षी मी आणि आणखी एक मित्र त्याला भेटायला कॉलेजवर गेलो होतो. अनिलने आम्हाला तिथल्या कॅन्टीनमधे नेले होते. थोड्या वेळाने आत काही मुली येताना दिसल्या. अनिलने त्यातल्या एका मुलीकडे खूण करुन सांगितले, ” ती निळ्या साडीतली मुलगी दिसते ना, तिच्याशी मी लग्न करणार आहे”. त्यावेळी मी विचारलं होतं, की ठरलंय का, तर अजून नाही पण होईल. ती ठाण्याची अनिता सोहोनी. अनिलचं तिच्याशीच लग्न झालं. अनिलच्या सामाजिक कामाचा आत्मा तीच होती. अनेक वेळा त्याने तसं माझ्याकडे बोलूनही दाखवलं होतं…..

क्रमशः…..

 – सुधाकर घोडेकर

प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट छोटी डोंगराएवढी ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ गोष्ट छोटी डोंगराएवढी☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

( ——असे होणार का कधी भारतात..??? ) 

नुकताच मकरंद अनासपुरेने आय.बी.एन.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत एक किस्सा सांगितला.

तो काही वर्षांपूर्वी सिडनीला गेला होता, तेव्हाची गोष्ट.—

(खरं तर छोटी पण डोंगराएवढी)—-

एअरपोर्टवर ठरल्याप्रमाणे त्याला घ्यायला जोशी आडनावाचा त्याचा एक मित्र गाडी घेऊन आला होता. तो मित्र मूळचा ठाण्यातला. पण गेल्या २५  वर्षांपासून ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालेला.

रस्त्याने गाडीतून जात असताना मकरंद म्हणाला,

“अरे कसले सुंदर रस्ते आहेत यार इथले. एक खड्डा लागला नाही आतापर्यंत.

नाही झेपणार रे असला प्रवास मला, थोडी तरी आदळआपट झाली पाहीजे राव.”

यावर त्याचा मित्र हसला म्हणाला,

“तुला माहीत आहे हे रस्ते कोणी बनवले?”

मकरंदने विचारलं,

“कोणी?”

“या तुझ्या ड्रायव्हर ने!”

“काय???” मकरंदला खूप आश्चर्य वाटलं.

” तू  बनवलेस हे रस्ते ?—-अरे मग भारतात राहून का नाही बनवलेस असे रस्ते?”

यावर मित्र हसला, आणि फक्त एवढंच म्हणाला पुढे—–

“अरे भारतात रस्ते ‘इंजिनिअर’ नाही तर ‘राजकारणी’ बनवतात.” राजकारण्यांच्या तावडीतून विकासाला मुक्त करा.” 

विजय जोशी हे ठाण्याचे असून त्यांना order of Australia हा भारतरत्नच्या तोडीचा पुरस्कार तेथील सरकारने दिला आहे… कडू आहे पण सत्य आहे. 

संग्राहक : – श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जगणे आपुल्याच हाती..! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ जगणे आपुल्याच हाती..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

मानवीजीवन आजच्या तुलनेत पूर्वीचं चांगलं होतं का? आणि उद्याचं कसं असेल? चांगलं की वाईट? यावर चर्चा होत असताना ‘जुनं ते सोनं’ असं सर्रास ठासून सांगितलं जातं. हे खरं तर मला खूप एकांगी वाटतं.चांगलं म्हणजे काय? जे मनाला भावते, आनंद, समाधान देते ते. मन प्रसन्न करते ते.

इच्छा-आकांक्षा मनाशी बाळगून स्वप्नं पहातच प्रत्येक जण जगत असतो. इच्छापूर्ती मनाला समाधान देते. इच्छा पूर्ण नाही झाली तर अर्थातच मन उदास होते.स्वप्नांचंही तसंच. एखादं स्वप्न मनाशी बाळगून त्या दिशेने वाटचाल सुरू केली की माणूस जिवापाड प्रयत्न, कष्ट करीत रहातो.ध्येयपूर्ती स्वप्न सत्यात उतरल्याचं समाधान देते. प्रयत्न प्रामाणिक नसतील, परिस्थिती अनुकूल नसेल, तर या वाटचालीत येणाऱ्या अपयशामुळं स्वप्नभंगाचे दुःख मनात घर करुन रहाते.

जगण्याचे कांही कालातीत नियम आहेत.पेरल्याशिवाय उगवत नाही आणि जे पेरु तेचं उगवतं हा भूत, वर्तमान, भविष्य या त्रिकाळातील जगण्याला सारखाच लागू पडणारा एक महत्त्वाचा नियम.

मानवी जीवन म्हणजे सुखदुःख, यशापयश, अनुकूलता आणि प्रतिकूलता या साऱ्यांचा पाठशिवणीचा खेळच असतो. आणि इतर खेळांसारखाच हा खेळही खिलाडूवृत्तीने खेळणेच अपेक्षित असते. तरच या खेळातील हार किंवा जीत सारखाच आनंद देते.

काळ भूत, वर्तमान,भविष्य कोणताही असो या जीवन प्रवासाचे नियम सारखेच असतात. त्यामुळे मानवी जीवन भूतकाळात कसं होतं?चांगलं की वाईट याचं उत्तर हे किंवा ते इतकं सरळ साधं असूच शकत नाही. शिवाय मानवी जीवन चांगलं कि वाईट हे आपण आपल्या वर्तमानाच्या तुलनेतच ठरवणार असतो. त्यामुळे आजच्या तुलनेत तेव्हा काय चांगलं होतं किंवा वाईट होतं याचा विचार करणे हे ओघानंच आलं.आणि असं झालं तर त्यातून मिळणारं उत्तर फसवंच असणार.कारण भूतकाळातला ‘मी’ आणि वर्तमानकाळातला ‘मी’ दोन्ही एकच व्यक्ती असूनही परस्पर भिन्न व्यक्तिमत्त्वे वाटावीत इतका जमीन-अस्मानाचा फरक आपल्यात पडलेला असतो. काळानुरूप होत गेलेले, स्वीकारले गेलेले जीवनशैलीतील बदल आता अंगवळणी पडलेले असतात. त्यामुळे घराचं घरपण, नात्यांची घट्ट वीण, आपले प्राधान्यक्रम, खानपानाच्या सवयी, या सगळ्यातच आमूलाग्र बदल झालेला असूनही जर आज मी आनंदात असेन आणि आजच्या सुखसोयी,स्वास्थ्य, आर्थिक सुबत्ता, वैचारिक स्वातंत्र्य, हे सगळं इतक्या मुबलक प्रमाणात तेव्हा नसतानाही तेव्हासुध्दा जर मी आनंदात असेन तर तो आनंद नेमका कशामुळे निर्माण होत होता याचा मूलभूत विचारच आपल्यापुढील प्रश्नाचे नेमके उत्तर शोधायला मदत करू शकेल.

काळ कोणताही असो आपण जगतो कसे यावरच आपल्या जीवनाची गुणवत्ता अवलंबून असते. म्हणूनच मानवी जीवन चांगलं किंवा वाईट हे नेहमीच व्यक्तिसापेक्ष असतं. तरीसुद्धा सर्वांसाठीच आनंदापेक्षाही कृतार्थता जास्त मोलाची असते. आयुष्याच्या संध्याकाळी, मागे वळून पाहताना आपल्या जगण्याचा लेखाजोखा मनोमन मांडत असता जर मनाला कृतार्थ समाधान मिळालं तरच आपलं भूतकाळातलं जीवन चांगलं होतं असं म्हणता येईल.ती कृतार्थता नसेल तर मात्र ते चांगलं असू शकणार नाही.

आपण कसं जगायचं हे आपल्याच हाती असतं. अनुकूल परिस्थिती असूनही जे नाही त्याबद्दल दुःख करत बसणारी माणसं जशी असतात तशीच प्रतिकूल परिस्थितीतही संकटांशी हिमतीने दोन हात करीत जगताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद शोधत, सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करताना त्यांच्याही आयुष्यात आनंद पेरीत समाधानानं जगणारी माणसेही असतात. या दोन परस्पर विरुद्ध प्रवृत्ती म्हणता येतील. या प्रवृत्तींनुसार जीवन चांगलं किंवा वाईट असणार हे ओघानंच आलंच. आणि याच दोन्ही प्रवृत्ती भूत, वर्तमान, आणि भविष्यकाळातही असणारच आहेत.

कृतार्थतेचा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यभर कालातीत महत्त्व असणारी जीवनमूल्ये असोशीने सांभाळणे अगत्याचे आहे. हे जर घडलं तरच आजच्या बालपिढीचं भविष्यकाळातील मानवी जीवन नक्कीच सुखकर, चांगलं असेल. पण त्या जीवनमूल्यांचे संस्कार करण्याची जबाबदारी मात्र आपल्यासारख्या अनुभवाने ‘शहाण्या’ झालेल्या पिढीचीच आहे हे विसरून चालणार नाही. 

 

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares