मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….!) इथून पुढे —- 

पॅरालिसिस होऊन गेल्यानंतर त्या रुग्णांमध्ये काहीही केलं तरी विशेष सुधारणा होत नसते, तरीही माझ्या या आजोबांना हॉस्पिटलमध्ये एडमिट केलं.

हेतू पुन्हा तोच…. किमान काही दिवस हॉस्पिटलमध्ये का होईना, पण  चांगल्या ठिकाणी  तरी राहतील आणि दोन वेळच्या जेवणाची तरी सोय होईल. 

एके दिवशी या ही हॉस्पिटल मधून सुद्धा फोन आला, तुमच्या पेशंटचं जितकं काही करता येणं शक्य आहे ते आम्ही केलं आहे, पेशंटला डिस्चार्ज देत आहोत, कृपया त्यांना घेऊन जावे. 

आता या आजोबांना कुठे घेऊन जाऊ ?  की सोडू परत बागेबाहेरच्या त्याच फूटपाथवर यांना ? की सांगू त्यांना ?  पडून राहा इथे बागेबाहेर …. मरणाची वाट बघत ! 

प्रसंग तिसरा – पुणे कॉर्पोरेशनकडून शनिवारवाड्याकडे जात असताना,  तिथल्या पुलावर अचानक एक फोन आला, मी गाडी थांबवून तो फोन घेतला.

माझं सहज लक्ष गेलं, पुलाच्या कठड्यावर एक मध्यम वयाची व्यक्ती बसली होती. त्याला दिसत नव्हतं, हे त्याच्या हालचालींवरुन मला समजलं, जागेवरच बसून त्याची काहीतरी चुळबूळ चालली होती.

थोडा चुकला, तर पुलाच्या कठड्यावरून सरळ खाली पाण्यात पडेल…. त्याला कुठेतरी सुरक्षित जागेत बसवून द्यावं, असा विचार करून त्याच्या जवळ गेलो, त्याला सुरक्षित जागेत हलवलं आणि सहज विचारपूस केली… 

याचं सध्याचं वय साधारण 42

सर्वसामान्य लोकांप्रमाणेच याला दिसत होतं, पण घरच्या कटकटीमुळे वैतागून पुण्यात आला, एका हॉटेलमध्ये नोकरी करून स्वतःपुरता व्यवस्थित जगत होता.

एके दिवशी, म्हणजे त्याच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी एका अपघातात डोक्याला मार लागला आणि यात त्याची दृष्टी गेली. 

दृष्टी गेली, तशी नोकरी गेली….  घर आधीच सुटलं होतं…. आता तो भिक्षेकरी म्हणूनच जगायला लागला. फूटपाथ वर राहायला लागला 

जन्मतः ज्यांना दृष्टी नसते ते लहानपणापासून परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात….

पण वयाच्या चाळीसाव्या वर्षी, दृष्टी जाणे हा धक्का अतीभयानक असतो. ते परिस्थितीशी जुळवून घेऊ शकत नाहीत….! 

अचानक पणे बसलेल्या अशा धक्क्यातून कुणीच लवकर सावरू शकत नाहीत. अशात घरच्यांचा आधार असेल तर ठिक , पण ज्याला कोणाचाच आधार नाही, अशा दृष्टी गेलेल्या व्यक्तीने जगायचं कसं ?

याची कहाणी ऐकून, मी याच्या जवळ ओढला गेलो…. 

यानंतर आधुनिक वैद्यक शास्त्रात डोळ्यांच्या संदर्भात ज्या काही ट्रीटमेंट असतील त्या सर्व ट्रीटमेंट त्याला पुण्यातल्या नामांकित Opthalmologist कडून दिल्या. पण कसलाही फरक पडला नाही….

शेवटी माझा मित्र डॉ. समीर रासकर याने सांगितलं, निसर्गापुढे आपण हरलो आहोत, याला आयुष्यात कधीही दिसणार नाही. 

याला हे समजल्यानंतर, ज्या पद्धतीने तो कळवळून रडला होता, ते कारुण्य मला इथे शब्दात मांडता येणं शक्य नाही. 

तरीही त्याच्या मनाला उभारी देऊन, त्याला एक व्यवसाय टाकून दिला.

फुटपाथवर बसून तो हा व्यवसाय करायचा. 

रात्री कुठेतरी आडोशाला झोपायचा.  भुरटे चोर येऊन याला त्रास द्यायचे,  झालेली कमाई काढून घेऊन पळून जायचे….  दिसत नसलेला हा….  याने प्रतिकार कसा करावा? 

आता, वैतागून तो आत्महत्येची भाषा करायला लागला. 

कुणाच्यातरी देखरेखीखाली त्याला ठेवावं असं मला वाटू लागलं…. अन्यथा डिप्रेशन मध्ये त्याने स्वतःचा अंत करून घेतला असता…!

नेमकं काय करावं मी ? या एका मागोमाग आलेल्या तीन प्रसंगांनंतर…..? 

पहिल्या बाबांची सोय कुठे करावी….?  या विचारात असताना दुसरे बाबा समोर आले…..आता या दोघांची सोय कुठे करावी ?  या विचारात असताना हा तिसरा अचानकपणे समोर आला…

कुणीतरी परीक्षा घेत होतं माझी….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: ऋषिका जुहू ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ ऋषिका जुहू ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

ऋषिका जुहू

वैदिक काळामध्ये लोपामुद्रा, आदिती, विश्वावरा, इंद्राणी, सर्परागिणी, शाश्वती  अशा अनेक ऋषिका होऊन गेल्या. वेदांच्या स्तोत्रांच्या किंवा मंत्रांच्या जाणकार, त्यांचे रहस्य समजून घेणाऱ्या, त्यांचा प्रचार करणाऱ्या त्या सर्व स्त्रिया ऋषिका नावाने प्रसिद्ध आहेत. आपण आज जहू या ऋषिके ची माहिती घेऊया.

ऋषिका जुहू  ब्रह्मवादिनी होती. ब्रह्मवादिनी म्हणजे उपनयन करणारी आणि अग्निहोत्र करणारी. वेदांचा अभ्यास करणारी आणि घरातील लोकांची निस्वार्थ सेवा आणि स्वेच्छेनं मिळालेल्या अन्नपाणी पैशांनी जगणारी. ब्रह्मा + वादिनी= ब्रम्ह .ब्रम्हाला साक्षात आत्मतत्व म्हणतात. . ब्रह्मतत्त्वाचे अध्ययन करू इच्छिणारी ब्रह्मवादिनी. तिचे उपनयन करुन तिला वेदाध्ययन करता येत असे .खूप तपस्या करून ब्रम्हाचे ज्ञान रसिकांना पोचवण्याचे  काम ब्रह्मवादिनी करते.

ऋषिका जुहू आणि ब्रह्मदेव हे पती-पत्नी होते म्हणून तिला ब्रह्म जाया असेही म्हणतात. काही कारणाने ब्रह्मदेवाने तिचा त्याग केला. पण ऋषिका जुहू अजिबात घाबरली किंवा विचलित झाली नाही. ती पतिव्रता होती. धर्मपरायण होती आणि म्हणून तिचा धर्मपरायण निर्णायक मंडलावर पूर्ण विश्वास होता. त्या काळात पत्नीचा त्याग करणे हा मोठा अपराध मानला जात असे .अशा पतीना प्रायश्चित्त घ्यावे लागत असे. वायू अग्नी सूर्य सोम आणि वरुण या देवतानी ब्रह्मदेवाला प्रायश्चित्त दिले. सर्वात प्रथम सोम राजाने  ब्रह्मदेवाला या पवित्र चारित्र्याच्या स्त्रीचा निसंकोचपणे स्वीकार करण्यास सांगितले. वरूण देवता आणि मित्र म्हणजे सूर्याने देखील त्यास अनुमोदन दिले. मग अग्नि देवतेने तिचा हात धरून तिला तिच्या पतीकडे सोपवले. सर्व देवांनी ब्रह्मदेवाला सांगितले तुझ्या पत्नीने खूप तपस्या केली आहे. त्यामुळे तिचे  रूप अति उग्र झाले आहे. तिला शत्रू कधीच स्पर्श करू शकणार नाही. तिचे चारित्र्य शुद्ध आहे. ती पापी मुळीच नाही.ती  तेजस्विनी आहे. निष्पाप आहे.  निरपराध आहे.निर्दोष आहे .तिच्यावर अन्याय होता कामा नये. ब्रह्मदेवाला ते पटले आणि ऋषिका जुहूचा पत्नी म्हणून त्याने स्वीकार केला. पण ब्रह्मवादिनी असूनही ऋषिका जुहू ला अन्यायाविरुद्ध लढावेच लागले.

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी

हृदयी अमृत, नयनी पाणी.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे

डॉ अभिजीत सोनवणे

@doctorforbeggars

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ तीन पिढ्या…!!! – भाग-1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

प्रसंग पहिला – साधारण सहा महिन्यांपूर्वीचा…

नेहमीप्रमाणे याचकांच्या भेटीला निघालो असताना, पुण्याच्या मध्यवर्ती गजबजलेल्या भागात एका सरकारी ऑफिसच्या गेट बाहेर, दाढी वाढलेल्या आणि अत्यंत गलिच्छ अवतारात, उकिरड्यात झोपलेल्या बाबांना विव्हळताना पाहिलं.

जवळ जाऊन पाहिलं तर पायाला भली मोठी जखम झाली होती आणि त्यात अक्षरशः किडे वळवळत होते.

बाबांची ओळख झाली, त्यांची व्यथा समजून घेतली. 

यानंतर किडे बाहेर काढण्याची वेगवेगळी औषधे वापरून रस्त्यावर ड्रेसिंग करत राहिलो. जखम बरी झाली झाली… म्हणता म्हणता पुन्हा बिघडायची.

मला जाणवलं की, हे किडे रस्त्यात अशी मला दाद देणार नाहीत…. रस्त्यावरचे किडेच ते….!

आपल्या आजूबाजूलाही असतात असे अनेक किडे…. दुसऱ्यांची आयुष्य पोखरणारी….!

तर यांना माझे मित्र डॉ. शोएब शेख यांच्या मॉडर्न हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केलं.  इथल्या टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा करुन बाबांचा पाय वाचवला. 

दवाखान्यात होते, तोवर अन्नपूर्णा प्रकल्पातून जेवणाची सोय लावून दिली.

मला आपलं एकच सुख… बाबा जोपर्यंत ॲडमिट आहेत तोपर्यंत हॉस्पिटलमुळे निवारा तरी आहे…. दोन वेळच्या जेवणाची सोय तरी होतेय. किमान रस्त्यावर तरी आता यांना पडून राहावं लागत नाही. 

एके दिवशी हॉस्पिटल मधून फोन आला, येत्या काही दिवसात बाबांना डिस्चार्ज करत आहोत, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे, त्यांना घेऊन जावे. 

डिस्चार्ज झाल्यानंतर मी त्यांना कुठे घेऊन जाणार होतो ?  परत त्याच रस्त्यावर ?  त्याच जागेवर ?? त्याच उकिरड्यात सोडून येऊ?? त्यांच्या मुलानेही हेच केलं होतं…. मी पण तेच करू ??? 

प्रसंग दुसरा – पुण्यामध्ये एक प्रसिद्ध बाग आहे. अनेक दानशूर मंडळी येथे अन्नदानाचे काम करत असतात.

इथे भीक मागणारी मंडळी मला एक गठ्ठा भेटतात,  मी इथेही वार लावून येत असतो. 

एके दिवशी बागेशेजारच्या फुटपाथवर एक आजोबा पडलेले दिसले. जवळ गेल्यानंतर कळलं यांना Paralyais झाला आहे , वाचा जवळपास गेली आहे. 

आता यांच्याशी बोलायचं कसं ?  यांचा भूतकाळ कसा जाणून घ्यायचा ? 

ज्यांना बोलता येत नाही,  ते किमान हातवारे करून, खाणाखुणा करून काहीतरी सांगतात, त्यातून काहीतरी दिशा मिळते.

परंतु पॅरालिसीस झालेल्या या बाबांकडे हे दोन्ही मार्ग नव्हते….  ना ते खाणाखुणा करु शकत,  ना स्वतःची वेदना शब्दात मांडू शकत….!

पण वेदनेला शब्दांची गरज नसते…. संवेदनेला भाषा नसते….! 

निष्प्राण डोळ्याने माझ्याकडे बघत मला बोबड्या बोलीत काहीतरी ते सांगण्याचा प्रयत्न करायचे….. परंतु मला काहीही कळायचं नाही.

ते जमिनीवर पडून असायचे…. मी यांच्याकडे गेलो कि काही न बोलता यांच्या डोळ्यातून टपटप आसवं गळायची…. आपल्याला पाहून कुणाची तरी आसवे टपकली तर समजावे, आपल्या बरोबर तो त्याचा गतकाळ वाटू इच्छितोय….! 

मी जवळ बसलो कि माझा हात धरायचा ते प्रयत्न करायचे….. बुडता माणूस जसा मिळेल तो आधार शोधतो तसा….

मला कळलं, हे माझ्यात आधार शोधत आहेत….!

एकदा त्यांनी हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत मला इशारा केला…. मला कळलं, यांना भूक लागली आहे, मी बाजूच्या हॉटेलमधून काहीतरी मागवलं…. आणि त्यांच्या तोंडापुढे  नेलं…. पण त्यांनी तोंड फिरवलं….

मला काहीच कळेना….

यानंतर त्यांनी मनगटावर बोट ठेवलं…. आणि पुन्हा हाताची पाच बोटं तोंडाकडे नेत, माझ्याकडे बोट दाखवलं ….

ओह…. त्यांना म्हणायचं होतं…. खूप वेळ झालाय पोरा, तू जेवून घे…..!

मी त्यांच्या या बीन बोललेल्या वाक्यावर रडलो होतो तेव्हा …!!!

जो स्वतः उपाशी आहे, तो दुसऱ्याला म्हणतो…. जेवून घे….! खूप मोठं मन लागतं याला…..

असं हे बीन शब्दाचं, बीन भाषेचं आमचं नातं….! 

माझ्या आजोबांसारखा….. आजोबांसारखा कसला…. आजोबाच की….! 

क्रमशः….

© डॉ. अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ राहूनच  गेलेलं  काही – भाग 1 ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

अलीकडं घरी आम्ही दोघेच असतो.हे सकाळी दवाखान्यात जातात. त्यानंतर साधारणपणे मी एकटीच असते. त्यामुळे माझ्या दुपारवर कोणाचाही हक्क नसतो. आजही मी एकटीच दिवाणवर लोळत पडले होते. दाराची बेल वाजली. कोण बाई एवढ्या ऊन्हाचं? असं म्हणत मी दार उघडलं. दारात एक तरुणी उभी होती.

‘हाय’ ती घुसलीच घरात.

माझ्या कपाळावरील आठ्या बघून सुध्दा ती हसत हसत गळ्यातच पडली.

‘कोण तू?’ मी घुश्शातच विचारलं.( खरंतर अगोचर म्हणायचं होतं. पण जीभ आवरली.)

तोपर्यंत ती बया हातपाय पसरुन सोफ्यावर पसरलीही!

मोठ्यानं हसून म्हणाली,’ बघ, विसरलीस ना मला?’

‘छे बाई, काय ते गडगडाटी हसणं? असं का हसतं कुणी?’

आत्तापर्यंत माझं निरीक्षण पूर्ण झालं होतं.

उंच, शेलाटी, जाड- जाड दोन लांब वेण्या; त्याही पुढं घेतलेल्या! बॉटल ग्रीन बेलबॉटम, डबल कॉलरचा लाईट पिस्ता कलरचा थोडा ढगळा टॉप, कानात छोटे छोटे स्पिनर्सवाल्या डुलणाऱ्या रिंग्ज …… अं … अं …. अं.. ही तर..

‘बरोब्बर अगं मी तूच ..ती.. ती कॉलेजमधली दीपा’.

 टाळीसाठी लहानसा हात पुढं आला. मीही टाळी दिली.

‘काय हा अवतार दीपा? साडी, टिकली, बांगड्या.. . ‘

या वाक्याकडं दुर्लक्ष करून स्वयंपाकघरात जाता जाता मी विचारलं… ‘कॉफी?’

‘पळ्ळेल…’

आता मी ही हसत हसत आत वळले.

ती केंव्हाच ओट्यावर चढून पाय हलवत बसली.

‘हे काय नेसकॅफे? ब्र्यू नाही? ‘

‘नाही गं, ह्यांना ब्र्यू नाही आवडत.’

‘हो क्का? ‘

मग ओट्यावर बसूनच कॉफी चे घुटके घेत भरपूर गप्पा झाल्या.

कॉलेजच्या दीपाला मी निरखत राहिले. मला ती न्याहाळत होती. अल्लड, अवखळ, निरागस, दीपा. ठाम पण शांत दीपा. साधी, सरळ तरीही मैत्रिणींच्या घोळक्यात राहणारी, डोळ्यात सुंदर, निरामय, साधीशी स्वप्नं…

तेव्हढ्यात करकचून ब्रेक लागल्याचा आवाज आला. लोकांचा गलका ऐकू येऊ लागला. आरडाओरडा, गाड्यांच्या हॉर्नचे कानठळ्या बसवणारे आवाज…. दोघींनीही कानावर हात ठेवले. ती तर कपाळावर आठ्यांच जाळं घेऊन, हातात डोकं खुपसून बसली.काही वेळानंतर आवाज थोडे कमी झाले.

‘काय ग, असल्या कोलाहलात कुठं घेतलंस घर?’

‘विसरलीस तुला हवं होतं शांत, रमणीय परिसरात छोटंसं घर. कुठं आलीस तू? ‘

‘हं. हे डॉक्टर आहेत ना! मध्यवर्ती ठिकाणी बरं पडत त्यांच्या व्यवसायासाठी.’ मी पुटपुटले.

‘एवढ्या कलकाटात!, बापरे!!. कल्पनाच करवत नाही.

‘सोप्पं जातं त्यांना. खाली दवाखाना वर घर.मुलांनाही शाळा-कॉलेज जवळ. भाजी मार्केट दोन मिनिटांवर.’

‘काय म्हणतेयस ऐकूही येत नाही नीट.’

‘असू दे ग.’

‘काय? क्क क्क काय….?

रस्त्यावरचे आवाज पुन्हा वाढले बघ. धन्य आहेस बाई तू. तूच बैस इथं तुझं घर सांभाळत. मी कलटी घेते.’बाय बाय. करत ती निघूनही गेली. मी दीपा. . दीssपा . .  अशा हाका मारत राहिले.

पण ती कधीच जीना उतरुन पळाली.

मी मात्र सोफ्यात विचार करत बसले. बरोब्बर बोलली ती. तेच तर स्वप्न होतं. लहान असलं तरी चालेल, घर हवं शांत वसाहतीत, गर्दी पासून दूर.. खरंच राहूनच गेलं…

कितीदा बोलूनही दाखवलं ह्यांना की एखाद्या कमी वर्दळीच्या जागी घर होतं मनात माझं, स्वप्नातलं, इवलंसं. इथला रस्ता सकाळी सहा वाजल्यापासूनच बोलू लागतो. गाड्यांची खडखड, हॉर्न ची पीं पीं, सायलेन्सर काढलेल्या बाईक्सचा कर्णकर्कश आवाज. या सगळ्यात पक्ष्यांची किलबिल ऐकू येतच नाही. हलक्याशा झुळूकीनं डोलणाऱ्या पानांची सळसळ वाऱ्यावर विरुन जाते. रेडिओ टीव्ही मोठ्या आवाजात कोकलत असतील तरच कान वेधतात. हा वर्दळीचा रस्ता रात्री बारा वाजेपर्यंत वहात असतो. कर्णकटू सूरात वेडेवाकडे आलाप? गात असतो. ओरडत असतो. मनातलं शांतता वाटणारं घर दूर राहिलंय. हरवून गेलंय. बांधायचंच राहून गेलं… राहूनच गेलं.

क्रमशः ….

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग तिसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग तिसरा ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

(हिंदीभाषिकांकडून  ” आपकी हिंदी बहूत अच्छी है “असे अभिप्राय जेव्हा मला मिळू लागले तेव्हा मला एक मोठी लढाई जिंकल्याचा आनंद झाला.) इथून पुढे —–

सुरुवाती सुरुवातीला उत्तर भारतीयांच्या शब्दप्रयोगाचं मला खूप हसू यायचं. त्यातले मुख्य म्हणजे स् वर्ण प्रथम असलेली जोडाक्षरे. एकदा श्रीराम सेंटरला एक हिंदी नाटक पाहायला आम्ही गेलो होतो. हिंदीतले खूप नामवंत कलाकार त्यात होते. एक असाच गंभीर प्रसंग त्यात चालला होता…. आणि नायक नायिकेला एका मोठ्या संवादात,” मैं पुरुष हूँ और तुम एक इस्त्री हो”…असे जेव्हा म्हणाला,तेव्हा एकदम मला जोरात आलेल्या हसण्याच्या आवाजानं आजूबाजूचे, मागचे पुढचे लोक माझ्याकडं रागानं बघू लागले होते.

खूप जण हल्ली जाणीवपूर्वक स्कूल, स्टेशन असं म्हणायला लागलेत. पण बरेच जण अजून इस्कूल, इस्टेशन  असेही म्हणणारे आढळतात. कोणी कोणी अनावधानाने बोलून पण जातात—

” सुनिता वो राईस इस्पून (भातवाढी)जरा इधर देना.” माझी एक उच्चशिक्षित मैत्रिण मला म्हणाली होती—-“ माझा एका विद्यार्थी इस्कूल म्हणायचा. माझे खूप प्रयत्न करून झाले पण काही उपयोग झाला नाही. मग एकदा मी त्याच्या आईला ते सांगितले. तर ती म्हणाली ” मुझे कहाँ बोलना आता है जो उसको आएगा. फिर भी मैंने उसको बताया है कि बेटा,सकूल या अस्कूल बोला करो।” कपाळावर हात मारून घ्यायची वेळ माझ्यावर आली होती.

मोठे मोठे सुशिक्षित नेते सुद्धा भाषण करताना…’ देश में महिलाओं का जीवन अस्तर हमें उपर उठाना है…’ अशा तर्‍हेची वाक्ये बोलून जातात। हे जरा तरी ठीक आहे. पण ‘ देश को हम अस्थायी किंवा अस्थिर सरकार देंगे, किंवा यह मेरा अस्पष्ट मत है।’ असं म्हणत असतात तेव्हा त्याचा एकदम विरुध्द अर्थ होतो, याची त्यांना जाणीवही नसते.

‘स ‘च्या ठिकाणी ‘श’ आणि ‘श’च्या ‘स’ हे तर पहाडी, बिहारी,पूर्व यु.पी.तल्या लोकांत नॉर्मलच असतं. तो थोडा अर्धमागधीचा प्रभाव पण म्हणता येईल. पण बिहारी लोक ‘ हम हूँ ना ‘ ..’मैं नरभसा गई’ (मी नर्व्हस झाले ),हमारा भिलेज (व्हिलेज ),अशा तऱ्हेने बोलतात, नंतर मला त्याही शब्दांचे अर्थ चांगले कळू लागले. तोंडात रोशेर गोला भरून बोलणारी माझी बंगाली मैत्रीण ‘’आज शोपिंग के लिए कोमला नगर मत जाना.आज वहाँ बोंद है.”  किंवा अशा तऱ्हेचं काही बोलली तर त्यावर हसणं मी बंद केलं.

आठ कोसावर भाषा बदलते म्हणतात. ते तर खरे आहेच. पण थोड्याथोड्या कालांतरानेही भाषा बदलते. पूर्वी अंकल, आंटी, सर, मॅडम यापुढे ‘जी’ लावायची जी पद्धत होती, ती आता बंद झालीय. एकदा माझी आई दिल्लीला माझ्याकडे आली होती. मी एका वयस्कर ऑंटीबरोबर फोनवर बोलत होते…आणि माझं हाँजी,हाँजी चालू होतं.( जिथे साधारणपणे मराठी हो,हो- हो, बर,बरंय असं बोललं जातं.) ” तू इतरांची किती हांजी- हांजी करतेस गं “हे माझ्या आईचे बोलणे ऐकून मला खूप हसू कोसळेले होते. 

एकेकाळी बहू शब्दाचा अर्थ आजच्यासारखा सून असा होत नव्हता. तर तो होता ‘ब्याहता.’ वह शर्मा,वर्मा, गुप्ता कोई भी… उनके खानदान की,घरकी ब्याहता…मतलब बहू. और नरेश की बहू, रामलाल की बहू, मतलब सून नाही तर…उसकी पत्नी. पण काळाच्या ओघात ती आता सूनच ! काळाबरोबर भाषा बदलते याचे हे एक उदाहरण.

आता तर दिल्लीची भाषा हिंदी ऐवजी  हिंग्लिश झालीय.

दरवर्षी हिंदी दिवस साजरा करताना ‘हिंदी को बढावा दो’ असे सगळ्या साहित्यिकांना, विचारवंतांना कळकळीने सांगावे लागतेय. 

पण हेही खरे आहे की, बोली भाषा बदलत गेली की त्यानुसार साहित्यिक भाषाही हळूहळू बदलत जाणारच.ती जिवंत भाषेची खूण आहे. बदलणे हा निसर्गाचा आणि सजीवांचाही नियमच आहे. त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी विचारपूर्वक बदल स्वीकारणे हेच प्रासंगिक आहे.

* समाप्त *

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

उषाराणी – – निशाराणी ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

“थांब,भास्करा,थांब ! असा जाऊ नकोस.

अरे तू येणार या कल्पनेनच मी किती आरक्त झाले होते. आठवतयं ना तुला, माझं ते रूप? हवेत गारवा सुटला होता. तुझ्या लक्ष लक्ष किरणांतील एखादा किरण, वांड मुलासारखा, तुला न सांगताच, आगाऊपणानं पुढं आला होता. पण ते ही बरंच झालं. त्याच्या येण्यानच मला तुझ्या येण्याची चाहूल लागली. मी लगबगीनं उठले. अंगावरची श्यामल वस्त्रे दूर सारली. त्या नादात चांदण्यांची पैंजणं कुठं विखुरली समजलही नाही. मी तुझ्या स्वागतासाठी सज्ज झाले. तुला आवडेल असं शुभ्र वस्त्र परिधान केलं. पण काय सांगू? त्या धवल वस्त्राला लाल, गुलाबी छटा  केव्हा आल्या माझं मलाही समजलं नाही. केवळ तुझ्या येण्याच्या चाहुलीन केवढा फरक पडला होता बघ! तुझं तेजस्वी दर्शन होणार या कल्पनेनच माझी अवघी काया शहारून उठली. चेह-यावर  रक्तिमा चढला.तो सा-या आसमंतात पसरला. खरच मित्रा,तुझ्या दर्शनासाठी मी किती व्याकुळ झालेली असते ते तुला कसं समजणार?

सोन्याच्या पायघड्या घालून तुझ्या आगमनाची वाट  पहात असते. आणि तू असा निष्ठूरपणे निघून जातोस? नाही, भास्करा तुला थांबावच लागेल. माझ्या प्रेमासाठी तरी थांबावच लागेल.

मान्य आहे मला की तुझ्या मागे फिरता फिरता माझं रूप मला बदलावं लागतं. मला हे ही मान्य आहे की थांबणं, गतिहीन होणं हे तुला मान्यच नाही. तुझ्या तेजाला ते शोभणारही नाही. म्हणून तर तुझी वेडी झालेली ही उषाराणी तुझी पाठ सोडायला तयार नाहीय.पण तू तरी  असा निष्ठूर का होतेस? अरे, तुझं तेजच इतकं दिव्य आहे की त्याच्यापुढे माझ्या सौंदर्याचा रक्तिमा. फिका पडून जातो. पण तरीही तुझा सहवास मला हवा आहे.मी अगदी निस्तेज झाले तरी तुझा सहवास मला हवा आहे.

पण तू तर ऐकायला तयारच नाहीस. तुझी पाऊले तर वेगानेच पडत आहेत. क्षणभर मागे वळून पहा. पाहिजे तर मी तुला आवडेल अशा रूपातच पुन्हा येते. तोच रक्तिमा, तोच शितल वारा सारं काही घेऊन येते. तुझी ही उषाराणी, तुझी अभिसारिका बनून, तुझ्या साठी संध्याराणी   होऊन  आली आहे. आता तरी थांब.माझं हे रूप   पाहशील तर तुला नक्कीच आपल्या प्रभातसमयिच्या  मंगल भेटीची आठवण होईल.थांब जरासा.

पण नाही, तू थांबणार नाहीस. सा-या विश्वासाठी वणवण भटकशील. पण माझा एक शब्दही ऐकणार नाहीस. ठीक आहे. तुझी मर्जी. तुझ्यासारख्या सामर्थ्यशाली,तेजस्वी प्रियकराला समजावणं माझ्या कुवती बाहेरचं आहे.

पण एक लक्षात  घे. तू. निघून चाललायस. आता माझ्या जीवनात काळोखच काळोख आहे.ही शुभ्रवस्त्र मला आता परिधान करवत नाहीत. हा रक्तिमाही मला आता नकोसा झालाय. बघता बघता माझा चेहराही काळवंडेल. तुझ्या विरहात माझी अवस्था दयनीय दयनीय होऊन जाईल. माझेच काय, सा-या जगाचे व्यवहार थंडावतील.

तू ही एक लक्षात ठेव.

मी तुझ्या तेजाची पूजक आहे. तुझ्या तेजानं मी दिपून तर जातेच. पण ते तेज तस मी सहजासहजी हातचं सोडणारही नाही.तुझी वाट पाहीन. मला खात्री आहे,तुलाही माझ्या विरहाची किंमत कळेल. आपलं निघून जाणं चुकलं असं तुला वाटेल आणि तू नक्की परत येशील,तुझ्या तेजाचा ताफा   घेऊन येशील मला दिपवायला.

पण……पण मनात अपराधीपणाची भावना बाळगून येशील.माझ्या समोर एकदम येणं तुला जमणार नाही. म्हणूनच आपला एखादा किरण दूत म्हणून पाठवशील, माझा अंदाज घेण्यासाठी.

मला तुझी चाहूल लागेल मी तर काय, प्रेमवेडीच!

तुझ्या येण्याच्या चाहुलीनं मी पुन्हा विरघळेन.

माझ्या कांतिवर पुन्हा एकदा रक्तिमा चढेल.

तुझ्या स्वागतासाठी मी पुन्हा एकदा हसतमुखानं सामोरी येईन.

रानपाखरांना सांगेन मंजुळ गायन करायला.

विरहात तापलेल्या तुझ्या देहाला थंडावा मिळावा म्हणून वा-यालाही आमंत्रण देईन.

मला खात्री आहे, तू नक्की येशील.

उशीरा का होईना, ख-या प्रेमाची किंमत तुला कळेल.

ये, भास्करा, ये.

तुझ्या विरहात काळवंडलेली ही उषाराणी, तिच निशाराणीचं रूप टाकून, चांदण्याचा चंदेरी शालू फेकून, पुन्हा एकदा उषाराणी बनून तुझ्या स्वागतासाठी सज्ज आहे.

मला माहित आहे, हा पाठलाग जीवघेणा असला तरी हे नातं युगायुगांच आहे. कधीच  न संपणारं. अगदी कधीच न संपणारं.!”.

 

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हिंदी आणि मी— भाग पहिला ☆ सुश्री सुनिता गद्रे

सुश्री सुनिता गद्रे

 

? मनमंजुषेतून ?

 ☆ हिंदी आणि मी— भाग पहिला ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट! माझे लग्न ठरले आणि माझ्या आजीला नातीला लग्नानंतर दिल्लीला…इतके दूर पाठवावे लागणार या विचाराने रडूच कोसळले.

” जावयांना इकडे बदली करून घ्यायला सांग. तिकडची भाषा वेगळी.लोक वेगळे. त्यांचे रीतीरिवाज… सगळेच वेगळे. वेळ प्रसंगी मदतीची गरज वाटली तर ही बिचारी काय करणार?” तिने बाबांच्या मागे टुमणेच लावले .(तेव्हा आता सारखे घरोघरी फोन, हाता- हातात मोबाईल नव्हते.)

“अगं जावयांचा जॉब ट्रान्सफरेबल नाही.” बाबा आपल्या आईला समजावत होते,” आणि हल्ली या चिमण्या तर नवरोबाबरोबर सातासमुद्रापार पण मजेनं उडून जातात… तिथं दिल्लीची काय कथा? ना पासपोर्ट ना व्हिसा…ठरवलं की एक -दोन दिवसात येथे हजर!..”

माझ्यासाठी म्हणायचं झालं, तर जिने महाराष्ट्राची राजधानी, मुंबई पण पाहिली नव्हती तिला देशाच्या राजधानीत वास्तव्य करायला मिळणार होतं. इतर सगळ्या गोष्टींबरोबर हा एक प्लस पॉइंट पण होता…. अन् भाषेचं काय विशेष? मला एस. एस .सी. ला हिंदीत 75% मार्क मिळाले होते. (तेही त्या वेळच्या कडक मार्किंग सिस्टीममधे!) …मी टिळक विद्यापीठाच्या हिंदीच्या तीन परिक्षातही प्रथम श्रेणी मिळवली होती. आणि हां, हिंदी पिक्चर बघतोच की आपण. छान कळतात ते …मी भाषेच्या बाबतीत थोडी ओव्हर- कॉन्फिडन्टच होते. (तेव्हा महाराष्ट्रात टेलिव्हिजन पोहोचला नव्हता आणि शेंबड्या पोरालासुद्धा हल्ली जसे हिंदीत बोलता येते, तितपत  हिंदीही  कोणाला बोलता येत नसायचे.)

यथावकाश आम्ही दिल्लीला पोहोचलो. ( तिलक ब्रिज की मिंटो ब्रिज ?)  नक्की आठवत नाही, पण ट्रेन तिथे थांबली होती आणि गाडीतून घडलेल्या दिल्लीच्या पहिल्या दर्शनातच मी तिच्या प्रेमात पडले होते.

दुसऱ्या दिवशी घरमालकिणीचा छोटा मुलगा आमच्याकडे आला.  “ऑंटीजी कल आप दोनों के लिये हमारे घर में दावत है .” वह बडा खुश होकर बोल रहा था. “वह सब कुछ मम्मीजी आपको बतायेगीही. लेकिन अभी आप को मम्मीजी ने बुलाया है .थोडी देर के लिये ! अंकल आज घर पर नहीं है नं…”  मी ,उद्या आम्ही दोघं मिळून येऊ असे सांगून नकार देणार होते. पण तो इतक्या गोड आवाजात बोलत होता की मला नाही म्हणवलेच नाही. मिठाईचा एक पॅक घेऊन मी त्या छोट्या बरोबर त्यांच्या घरी गेले आणि त्याच्या आईच्या हातात तो देऊन मी वाकून त्यांना एका हाताने चरणस्पर्श केला.( हिंदी पिक्चर स्टाईल मधे!)

बसल्यावर सगळ्यात प्रथम माझं लक्ष त्यांच्या गळ्याकडं गेलं. ओह्, मंगळसूत्र नाही म्हणजे या विधवा असाव्यात. चार-पाच मुलं मुली मला निरखून पाहत होते.( त्यांना सहा मुली आणि दोन मुलगे आहेत, हे ह्यांनी सांगितल्यावर मला आश्चर्यच वाटलं होतं .पण कुटुंबनियोजनाचा दिल्लीत खूप धज्जा उडवला जातो हे मला नंतर कळले. ) त्यांना एवढयांचं पालन-पोषण एकटीनं करणं ही बाब मला खूप अवघड वाटली. पण घरमालकांची ओळख झाल्यावर मला कळलं की विवाहित स्त्रीनं मंगळसूत्र घालायची तिथे पद्धतच नाही.लग्नानंतर पायात जोडवी घालतात .

“बैठो आराम से ” माझ्या हातात पाण्याचा ग्लास देऊन  ऑंटीजी म्हणाल्या …नंतर हिंदीतून प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. आणि जमतील तशी उत्तर मी देऊ लागले.

” तुम्हारा पिहर कहा है?”… हा शब्द कधीच वाचनात आला नव्हता.” पिहर मिन्स ?” मी विचारती झाले .त्या सर्वांना माझ्या एकंदरीत सगळ्या बोलण्याचं हसू येत होतं आणि मी नर्वस होऊ लागले होते. “मतलब मायका…. मम्मी का घर.”    मी उत्तर देईपर्यंत पुढचा प्रश्न उपस्थित झाला.

” तुम्हारा दहेज का सामान कहाँ है?”

‘म्हणजे हुंडा’- मी मनात म्हणाले. आणि….हुंडाबंदीसाठी मोठी लेक्चरं झाडणार्‍या मला,  फर्राटेदार हिंदीतून आपलं म्हणणं पटवून देता आलं नसतं, याची जाणीव झाली.. म्हणून  मी प्रथम गप्पच राहिले. पण नंतर हसून मी प्रसंग सावरुन घेतला. मी मनसोक्त थापा मारल्या.

अजी वो सोफासेट, फ्रिज, और हेवी सामान नां? वो और बहूत सारा सामान मैं ससुराल छोड आई हूँ. बहुत दूर का मामला हैं ना इसलिये. सिर्फ थोडीसी ज्वेलरी लाई हूँ. चार -चार सेट दिये है मेरे मम्मी- पापाने. उधर अभी टीव्ही पहूँचा नही है, तो उसके पैसे भी दिये है उन्होंने.”– आपल्या विचारांवर नव्हे तर उत्तरावर मी खूष झाले होते.

क्रमशः—-

© सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऐसी कळवळ्याची जाती ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ ऐसी कळवळ्याची जाती ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

तुकारामांनी म्हटलेली ही कळवळ्याची जाती, काही माणसे उपजतच घेऊन येतात. ते त्यांच्या सहजवृत्तीतूनच होते.

माझा भाचा आदित्य हा त्यातलेच एक उदाहरण. 

किती लहान होता तो. एक दिवस घरी आला आणि म्हणाला,” मला लवकर खायला दे, खूप भूक लागलीय. “

आई म्हणाली, ‘ डबा नाही का खाल्लास? ” तर काहीच बोलेना.

एवढ्यात शेजारचा  कुशल आला. ” म्हणाला काकू ,आज ना,डबा खायच्या सुट्टीत गंमतच झाली. आम्ही डबा खायला सुरवात करणार, इतक्यात बागेला पाणी देत असलेला माळ्याचा मुलगा चक्कर येऊन पडला आदित्य लगेच उठून गेला. तो मुलगा उपाशी होता,सकाळपासून. 

अहो,आदित्यने स्वतःचा डबाच देऊन टाकला त्याला. आम्ही नाही बाबा दिला.’

आदित्य तरी गप्पच होता.आदित्यला काकू रागावत नाहीत,हे बघून कुशल निघून गेला. 

स्वातीने त्याला पोटाशी धरले. ” आदित्य,खूप गुणी मुलगा आहेस रे. पण कसा निभाव लागेल बाबा तुझा या जगात…. ? “

आदित्यचे  छंदही जगावेगळेच होते. एक दिवस कचरा पेटीजवळ कुडकुडत असलेले कुत्र्याचे पिल्लू घेऊन आला. वर आईला म्हणाला,” आई रागावू नकोस ना. माझ्या वाटणीचे दूध आणि पोळी त्याला दे.” 

ते पिल्लू काय मग—घरचेच झाले. रोज आदित्यची रिक्षा आली की पळत पळत रिक्षामागे धावायचे. तो शाळेतून यायची वेळ झाली की असेल तिथून येऊन पायरीवर वाट बघत बसायचे. 

त्यांच्या घरातल्या कामवाल्या बाईला हा भांडी घासायला मदत करायचा. तिच्या मुलाला शिकवायचा. त्याचा अभ्यास घ्यायचा. अजूनही तो मुलगा– गणेश हे विसरला नाही. 

म्हणतो,” आदित्य दादामुळे मी शिकलो. नाहीतर बसलो असतो असाच, वाईट संगतीत. 

आदित्यदादामुळे मी  graduate झालो. किती वेळा गुपचूप माझी फी भरलीय त्यांनी—

माझी  मुलगी पण लहानपणी जगावेगळीच होती. सगळ्या जगाचा तिला कळवळा. तिचा आवाज अतिशय सुंदर म्हणून मी तिला गाण्याच्या क्लासलाही घातले होते शाळेतला गाण्याचा कोणताही कार्येक्रम श्रुतीशिवाय व्हायचाच नाही. एकदा शाळेतून गाण्याच्या बाईंचा निरोप आला, ” येऊन भेटा.”– मी गेले भेटायला. त्या म्हणाल्या,” श्रुती यावेळी भाग घेणार नाही म्हणते. असे का? ती असे कधी करत नाही.” 

घरी आल्यावर मी विचारले तर म्हणाली, “आई, बाईंनी, माझ्या पट्टमैत्रीण गौरीला गाण्यातून काढून टाकले. तिला किती वाईट वाटले असेल अग. मग तिच्याशिवाय मी कशी घेऊ भाग ?”

मी कपाळाला हात लावला–‘ देवा।कसे होणार या मुलीचे पुढे आयुष्यात.’

एकदा तर तिने कळस केला. 

गणितात हिला १00 पैकी १00 मार्क मिळाले. आणि तिची मैत्रीण कमी मार्क मिळाले म्हणून रडत होती. हिने बाईना सांगितले, ” बाई,माझ्यातले 10  मार्क द्या ना अनुजाला, म्हणजे तिचे मार्क वाढतील.” 

या असल्या स्वभावाची तर मला चिंताच वाटू लागली पुढे पुढे.

एकदा म्हणाली, ” तुम्ही दोघेही डॉक्टर आहात ना, मग माझ्या शाळेत शिबिर घ्या की. 

आमच्या शाळेतल्या गरीब शिपाई आणि शिपाईबाईना कोणीच तपासत  नाही. “

 आम्हाला तिचे इतके कौतुक वाटले. आम्ही तिच्या शाळेत खरोखरच फक्त सेवक वर्गासाठी शिबिर घेतले. मुख्याध्यापक बाईनी श्रुतीचे त्यासाठी मुद्दाम आभार मानले. पण ही शांत बसली होती. तिला ना गर्व, ना आपण फार काही केल्याचा अभिमान—-

आणि हे स्वभाव कायम राहतात. तीव्रता कमी जास्त होते,पण जात मात्र नाहीत. अर्थात ही माणसे इतकी सरळ असतात–सुदैवाने त्यांचे काही वाईटही होत नाही म्हणा. 

पण मग पुढे, लबाड जगात, माणसे ओळखायची कला यांना येत नाही. अनपेक्षित फटके बसले, की कळवळतात. पण धडे कुठे घेतात ?नाहीच। मूळ स्वभाव जात नाही.

यथावकाश श्रुतीचे लग्न झाले. अगदी लाखात एक नवरा मिळाला, आणि परदेशात निघूनही गेली एकदा भारतात सुट्टीवर आले होते दोघे. सहज बोलताना जावई म्हणाला, ” तुमची मुलगी वेगळीच आहे हो।” 

म्हटले ‘ बाप रे,आता काय ऐकावे लागतेय.’

म्हणाला, ” हिचा गेल्यागेल्या लगेचच वाढदिवस होता. तर मी विचारले पार्टीला कोणाकोणाला बोलवायचे ग .तर गप्पच बसली. मग म्हणाली,पार्टी बिर्टी नको. मला इथला अनाथ मुलांचा आश्रम दाखव. आपण त्या  मुलांच्यात सबंध दिवस घालवू. त्यांना खाऊ पुस्तके, गिफ्टस देऊ. 

चालेल ना तुला ? “

त्याला इतका अभिमान वाटला तिचा. तो दिवस त्यांनी अक्षरशः एन्जॉय केला त्या मुलांबरोबर. 

आता दरवर्षी ते त्या आश्रमातच आपला वाढदिवस साजरा करतात. 

नंतर  तिला मुलगा झाला. त्याला घेऊनही हे तिकडेच जाऊ लागले, आणि त्याचाही वाढदिवस तिथेच साजरा करू लागले. मुलानेही सही सही आईचा सहृदय स्वभाव उचललाय. तो वेडा तर स्कॉलरशिपचे मिळालेले पैसेही,कोण्या गरीब मुलाची फी भरून खर्च करून टाकतो.

‘ कुठून येते हे?’–मला खूप आश्चर्य वाटते. आता  माझा भाचा आदित्य मोठा झालाय. खूप छान नोकरी आहे त्याला बोटीवर. परवा आला होता तर अंध शाळेत गेला, आणि खूप मोठी रक्कम त्या मुलांना लॅपटॉप घेण्यासाठी देऊन आला.म्हणाला,” मला शक्य आहे म्हणून पैसे दिले

डोळे तर नाही ग देऊ शकत.” 

आमचे डोळे नुसते भरून आले. केवढे हे मोठे मन. 

आपल्या तुकोबा माउलींनी तर ही जात केव्हाच ओळखली होती हो. किती द्रष्टे असतील तुकोबा—-म्हणूनच म्हणून गेलेत —

ऐसी कळवळ्याची जाती

करी लाभावीण प्रीती.

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?विविधा ?

☆ सिंधुसागर ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कै. सिंधुताई सपकाळ

नवे वर्ष सुरु झाले आणि एका ध्यासपर्वाचा अस्त झाला. मन उदास झाले.नकळत एक पोरकी पोकळी मनात जाणवू लागली.

मृत्यु हे अंतीम सत्य आहे. राम गेले, कृष्ण गेले ,अनेक विभूतीअनंतात विलीन झाल्या..जणू पृथ्वीतलावरचे त्यांचे अवतार कार्य संपले आणि ते निघून गेले.

सिंधुताईंच्या बाबतीतही असेच म्हणावे लागेल.

“..यांनी त्यांचे जीवन अर्पिले हो….”नकळत हेच उद्गार ओठावाटे बाहेर पडतात.

सिंधुताईंचा अचेतन ,शांत देह पाहतांना ,क्षणभर वाटले,या डोहातून शब्द झंकारताहेत…

“देखना एक दिन वक्ख्त भी तेरा गुलाम होगा।

मंझीले उन्हीको मिलती है, जिनके सपनोमे जान होती है..।।

संघर्षमय जीवनात त्यांनी  चैतन्यमय स्वप्ने उराशी बाळगली…

त्यांचं बाळपण खडतर..यौवनात अवहेलना..

ऊपेक्षा ,लाथाडणं ,वणवण ,पायात काटे अन् डोक्यावर प्रखर उन हीच तिच्या जीवनाची खडबडीत वाट…पण ती चालली.निर्धाराने.धडाडीने.तिची जिद्द ,तिचा विश्वास,आणि धुक्यातली तिची स्वप्नं ,आणि नारीशक्ती हेच भांडवल.डोळ्यातून गळलेला एकेक अश्रु तिने जपून ठेवला .कारण त्या अश्रुंची तिला फुले करायची होती…त्या अश्रुंतूनच निर्माण झाले विचारांचे मोती..जे तिला मिळालं नाही त्या प्रेमाचे मोती तिने  उपेक्षित ,अत्याचारित,नाकारलेल्यांवर मनसोक्त उधळले…त्या अनाथांची ती माय झाली..

निराधारांची आधारस्तंभ बनली..

एक गर्भवती स्त्री गोठ्यात एका बालिकेला जन्म देते..दगडाने ठेचून तिची नाळ कापते..स्मशानातल्या चितेवर भाकरी भाजून स्वत:च्या दुग्धधारा  जपते अन् आतल्या आत धुमसते ,पेटते ..एका युद्धासाठी तयार होते.

तिचं सोसणं तिला संपवत नाही तर घडवतं.

बळ देतं ,ताकद देतं..न्याय कुणाकडे मागायचा..

आपणच आपल्या जन्माचा न्याय करायचा ,या प्रेरणेने तिची कूसच रुंदावते…

ती एकाचीच नव्हे तर हजारो मुलांची माय बनते..

त्यांच्यासाठी  शिक्षणाची मोट बांधते.स्वावलंबनाची कास धरते.तिच्या वक्षातला पान्हा मग सागर बनतो..प्रेमाचा सिंधुसागर…..

सागर आटत नाही…

आज देहाने सिंधु अस्तित्वात नाही..

पण या सागरातल्या एकेका थेंबात तिचे अस्तित्व आहे…

बुडे तो सूर्य ऊरे तो आभास..

ज्याला नाही ठाव ते तर आभाळ…

आणि या आभाळमायेपुढे सदैव नतमस्तक…

एक प्रेममय ,सुखमय,शांतीमय समभावी समाज

निर्माण करण्याच्या निर्धाराचं सुगंधी फुल सिंधुचरणी वाहून श्रद्धांजली अर्पित….

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बोलता बोलता भाग 6 ☆ श्री सुधीर गाडगीळ

श्री सुधीर गाडगीळ

? मनमंजुषेतून ?

☆ बोलता बोलता भाग 6 ☆ श्री सुधीर गाडगीळ ☆

बर्मिगहॅमला मुलाखतींच्या राज्यात शिरण्यापूर्वी चंदू बोर्डे, नाना पाटेकर यांच्यासह क्रिकेटदेखील खेळलोय. त्या वेळी बॅटिंग करत होते श्रेष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर. वयाचं- कर्तृत्वाचं अंतर असूनही सी. रामचंद्र गळ्यात हात टाकून, गाण्यांच्या जुन्या आठवणी जागवताना मजजवळ फोटो आहे. कन्नडभाषी सुधा मूर्ती स्वच्छ मराठीत कोल्हापुरात माझ्या गप्पाष्टकात सहभागी झाल्यात आणि पुण्यातल्या दर्शन हॉटेलमध्ये नारायण मूर्तीशी झालेल्या नमनाच्या भेटी त्यांनी खुलवून सांगितल्यात. विजय तेंडुलकरांशी गुन्हेगारी जगतावर बोलण्यात रमलोय.

आता माझ्या मुलाच्या वयाचे सारे स्टार्स आहेत. विश्वजीत कदम, पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, अमित देशमुख असे राजकारणात आहेत. तर राहुल- महेश काळे, शौनकसारखे गायक गाजतायत. या नव्या पिढीसमवेतही माझे सूर जुळलेत. नुकतंच दुबईला महेश-राहुलशी गप्पा मारत, सुबोध भावेला आठवत आम्ही ‘पाडवा’ साजरा केला.

जाता जाता एक सांगतो मला अजिबात न आवडणाऱ्या माणसांची मुलाखत घ्यायची वेळ आली तरी मी टाळत नाही. कारण त्या निमित्ताने माझं ‘न’ आवडणं, हे गैरसमजावर आधारित आहे का, हे तपासता येतं आणि माझी चूक असेल तर माझीच मनातली ‘मतं’ पुसून टाकून, मैत्र वाढवता येतं. जॉर्ज फर्नाडिस ते बाबामहाराज सातारकर, सिंधुताई सपकाळ ते निर्मलाताई पुरंदरे, पु. भा. भावे ते अनिल अवचट अशा परस्पर टोकाच्या मतप्रणालींशी झालेला संवाद सांगणं म्हणजे स्वतंत्र ग्रंथच होईल. फक्त इथे नोंद घेतो. न नोंदता आलेले हजारभर !

एकच सांगतो, या साऱ्या माणसांशी बोलताना जमा झालेले ‘संदर्भ’ मुलाखतींच्या राज्यात उपयोगी पडलेत आणि संदर्भाची सतर्कता, बोलण्यातली अनौपचारिकता, मांडणीतली उत्स्फूर्तता यामुळे ‘माणसं’ मात्र जगभर जोडली गेली आहेत.’ बोलणं आणि माणसं जोडणं हा अदृश्य पाया ‘ हीच माझी सृष्टीआडची दृष्टी आहे. यातूनच निर्मिलेला एक नवा उद्योग सांगतो नि थांबतो. जगभर ‘आय. टी. कपल’ नोकरीनिमित्त गेली आहेत. मी कार्यक्रमाच्या निमित्तानं जगभरच्या या तरुण तंत्रज्ञांना भेटतो. त्यांचे महाराष्ट्रातले आई-वडील गाठतो. एक दिवस या आजी-आजोबांसमवेत गप्पा मारत त्यांची दैनंदिनी चित्रबद्ध करतो आणि हे सारे चित्रण त्यांच्या परदेशात स्थायिक झालेल्या नातवंडांकडे पाठवतो. या ‘पॅकेजिंग ग्रॅण्डपा’ मोहिमेत मी रमलोय. घरातलं कुणी अचानक गेलं तर ग्रुप फोटोमधला फोटो एन्लार्ज करून त्याला हार घातला जातो आणि ‘हारातलाच चेहरा खरा’ असं पुढच्या पिढय़ा समजतात. त्यामुळे चालते, बोलते, हसते, खेळते आजी-आजोबा असतानाच त्यांना कॅमेऱ्यात बोलकं करत पकडून ठेवा; ही सध्या माझी ‘संवाद मोहीम’ आहे. अर्काइव्हल सेन्स असलेल्यांना या चित्रबद्ध संवादाचं महत्त्व नक्की कळेल.

क्रमशः….

© श्री सुधीर गाडगीळ 

पत्रकार,  निवेदक 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares