मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी

?इंद्रधनुष्य? 

☆ लेखक, संशोधक पं. महादेवशास्त्री जोशी ..केशव साठ्ये ☆ संग्रहिका – सुश्री सुलु साबणेजोशी ☆

आज “धायरी” पुण्यातील एक विकसित होणारे उपनगर म्हणून ओळखले जाते. पण एकेकाळी ते गावाबाहेरचे निर्जन ठिकाण होते. धायरी या नावाला ओळख दिली ती महादेवशास्त्री जोशी यांनी. गोवा ही जन्मभूमी आणि पुणे ही कर्मभूमी असलेल्या जोशी यांचा १२ डिसेंबर हा स्मृतीदिन. त्या निमित्त या लेखक-संशोधक महादेवशास्त्री यांना ही आदरांजली!

बापाविना पोरे वाढवणाऱ्या थोर मातांच्या कहाण्या आपल्याला नेहेमीच वाचायला  मिळतात. पण आई स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्ताने तुरुंगात गेलेली आणि इकडे बाप मुलांना वाढवतो. डॉक्टर – संशोधक करतो. आईविना मुलांना वाढवताना आपले सामाजिक सांस्कृतिक योगदान देण्यात हे पिताश्री कोठेही कमी पडत नाहीत, हे वाचले की, निर्धार आणि कष्ट एकत्र आले की कुटुंबाचा काय कायापालट होतो हे समजते. महादेवशास्त्री यांचा  जन्म गोव्याचा. पण नाव  काढायचे, मोठे व्हायचे म्हणून ते पुण्यात आले आणि पुणेकरच  झाले.

भिक्षुकी, पूजा, ज्योतिष या पिढीजात पेशापासून प्रयत्नपूर्वक दूर राहात त्यांनी लेखन हाच आपल्या आयुष्याचा श्वास आणि ध्यास केला. भाषेवर प्रभुत्व होते आणि कल्पनाशक्तीही अचाट होती. योगायोगाने एका मासिकात उपसंपादक म्हणून नोकरीही मिळाली. मोठ्या हिमतीने त्यांनी स्वतःची ज्ञानराज प्रकाशन ही संस्था सुरु केली. स्वतःमधील लेखकाचा सन्मान करण्यासाठी केलेला हा प्रयोग कालांतराने यशस्वीही झाला. 

या संघर्षमय आयुष्याला एक वेगळी कलाटणी देणारे एक आव्हान समोर ठाकले. १९५५ मध्ये गोवा-मुक्ती संग्रामाची धामधूम सुरु झाली. यांना पुण्यात स्वस्थ बसवेना. या स्वातंत्र्य-यज्ञात उडी घ्यायचीच, असा निर्धार त्यांनी केला. कुठे मच्छरदाणी शिव, बांगड्या वीक, असे करत संसाराचा गाडा ओढायला मदत करणारी पत्नी पुढे आली आणि म्हणाली – “ तुमच्यावर संसाराची, उदरनिर्वाहाची जबाबदारी आहे, तुम्ही नका भाग घेऊ, मी जाते.” शेवटी हे तयार झाले आणि सुधाताई जोशी यांनी या  संग्रामात बेधडक उडी घेतली. थोडीथोडकी नव्हे १३ वर्षांची त्यांना शिक्षा झाली. पण ४ वर्षातच त्यांची सुटका झाली. 

हा त्यांचा त्याग अतुलनीय आहेच, पण महादेवशास्त्री यांनी सुधाताई यांच्याशिवाय कच्च्याबच्यांचा सांभाळ केला आणि ते करताना आपली साहित्यसेवाही सुरु ठेवली. पत्नीशी झालेल्या ताटातुटीनंतर “भारतीय संस्कृती कोश”सारखा ग्रंथ त्यांनी निर्माण केला. १० खंडात भारतीय संस्कृतीची सांगोपांग चर्चा करणारे साहित्य निर्माण करण्याचा त्यांनी चंग बांधला. किती वर्षे लागतील, किती पैसा लागेल याची तमा न बाळगता महादेवशास्त्री यांनी या कामात स्वतःला बुडवून घेतले. 

शास्त्रीबुवांच्या लेखनात आणखी एक पैलू होता – तो म्हणजे कथालेखकाचा. “कन्यादान” हा चित्रपट, अतिशय गाजलेला “मानिनी” हा सिनेमा त्यांच्याच लेखणीतून पडद्यावर अवतरला. “थांब लक्ष्मी कुंकू लावते”, “जिव्हाळा”, “वैशाख वणवा” या लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या चित्रपटांच्या श्रेयनामावलीत लेखक म्हणून यांचे नाव कोरलेले आहे. हे असे काम पुढेही मिळणे सहज शक्य होते. पैसाही चांगला मिळाला असता. पण “संस्कृतीकोश” हे ध्येय त्यांनी डोळ्यासमोरून ढळू दिले नाही. 

आज आपण विकिपीडिया सर्रास वापरतो. ५० वर्षांपूर्वी हा कोशही एक प्रकारचा विकिपीडियाच होता. १० खंड लिहिणे म्हणजे काय, हे जे लिहिणे जाणतात, त्यांनाच कळेल. एवढे करून ते थांबले नाहीत. मुलांसाठीही चार खंडात भारतीय संस्कृती त्यांनी रसाळपणे नोंदवली. “आत्मपुराण” हे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक गाजले. 

धायरीचे गावकरी त्यांना खूप मानत असत. त्यांचे अंत्यसंस्कारही धायरीतच झाले. तिथेच मोठी श्रद्धांजली सभाही झाली. तेव्हा एका गावकऱ्यांनी   काढलेले उद्गगार शास्त्रीबुवा किती थोर होते, याची साक्ष देणारे आहेत. जोशी यांच्याच मुलाने ते एका लेखात सांगितले आहेत. 

गावकरी म्हणाला, “शास्त्रीबुवा म्हंजी लई मोठा मानूस. मोठा म्हंजी किती मोठा? तर असं बघा, त्यांनी एव्हढी बुकं लिहिली. ती बुकं जर येकावर येक, येकावर येक ठेवली, तर त्यांची उंची बाबांच्या उंचीपेक्षा जास्त होईल. एवढा मोठा मानूस होता हा.’’

महादेवशास्त्री जोशी यांना विनम्र अभिवादन !

– केशव साठये

संग्राहिका : सुश्री सुलु साबणे-जोशी.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गोष्ट बाराची ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ गोष्ट बाराची… ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

ऐका गोष्ट बाराची—–

12/12/12/12/12

बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक—-

मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती—१२ची

फूट म्हणजे १२ इंच

एक डझन म्हणजे १२ नग.

वर्षाचे महिने १२,

नवग्रहांच्या राशी १२

गुरू,शनी, मंगळ हानिकारक समजले जातात….१२ वे

तप….१२ वर्षाचे,

गुरुगृही अध्ययन….१२ वर्षे

घड्याळात आकडे…..१२,

दिवसाचे तास …..१२,

रात्रीचे तास …..१२ ,

मध्यरात्र म्हणजे रात्रीचे..१२

मध्यान्ह म्हणजे दुपारचे..१२

एकादी गोष्ट तुटली फुटली म्हणजे तिचे वाजले….१२

सकाळच्या बाजारात उरला सुरला माल– १२ च्या भावात 

पूर्वी मुलीचा विवाह १२ व्या वर्षी करत..

इंग्लंडमध्ये १२ पेन्सचा १ शिलिंग

बाळाचे नामकरण– १२ व्या दिवशी 

मृत व्यक्तीचे धार्मिक विधीही १२ दिवसांचे..

ज्योतिर्लिंग…..१२ आहेत,

कृष्ण जन्म….रात्री १२

राम जन्म दुपारी…१२ ,

मराठी भाषेत स्वर…१२– त्याला म्हणतात…बाराखडी

१२ गावचा मुखीया,

जमिनीचा उतारा ७/१२चा

इंजिनिअरींग, मेडीकल, किंवा इतर कोर्सेससाठी प्रवेश – १२ वी नंतर 

खायापिया कुछ नही , गिलास फोडा–बाराना

बारडोलीचा सत्याग्रह 

पळून गेला ——पो’बारा’

पुन्हा पुन्हा ——-दो’बारा’

एक गाव— १२ भानगडी

लग्न वऱ्हाडी —- ‘बारा’ती

बलुतेदार,बारभाई,बारावाटा…सगळे १२,

बेरकी माणूस म्हणजे –१२ गावचं पाणी प्यायलेला

तसेच कोणाचेही न ऐकणाऱ्या  रगेल व रंगेल व्यक्तीला १२ चा आहे असे म्हणतात.

काही लोकांच्या तोंडावर नेहमीच वाजलेले असतात ते पण– 12 

अशी आहे ही १२ चीं किमया….

कोणालाच दोष देऊन  उपयोग नाही…

महिनाच  “बाराचा” आहे—–

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: महाभारतातील अंबा ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

महाभारतातील अंबा ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

एक सूडाचा प्रवास महाभारतातील अंबेचे जीवन हा स्त्रीत्वाचा हुंकार आहे. दोन महापराक्रमी पुरुषांच्या अहंकारात तिच्या आयुष्याची माती झाली तिच्या जीवाची प्रचंड तगमग झाली आणि सूडा कडे प्रवास सुरू झाला.

खरंतर ती काशीराजाची प्रेमळ सुस्वरूप हुशार कन्या. तिला अंबिका आणि अंबालिका नावाच्या दोन बहिणी होत्या.तिघी  वयात येताच काशीराजाने त्यांचे स्वयंवर मांडले. त्यात भीष्म व त्यांचा सावत्रभाऊ विचित्रवीर्य यांना जुन्या वितुष्टामुळे आमंत्रण नव्हते. भीष्मांना खूप राग आला आणि ते स्वयंवर स्थळी आले. त्याच वेळी सौबल चा राजा शाल्व याला अंबेने माळ घातली. चिडलेल्या भीष्माने तिथे सर्व राज्यांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला आणि अंबा ,अंबालिका, आणि अंबिका या तिघींचे हरण करून, रथात घालून ते आपल्या नगरीत परत आले. व आपला सावत्र भाऊ विचित्रवीर्य यांच्याशी लग्न करण्यास सांगितले. साहसी अंबेने  स्पष्ट सांगितले मला शाल्वाशीच लग्न करायचे आहे मी त्याला तन-मन-धनाने वरले आहे. तिच्या इच्छेनुसार भीष्माने तिला शाल्वाकडे पाठवले. पण शाल्वाने तिचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला ” भीष्माने तुझे हरण केले. परपुरुषाच्या स्पर्शाने तू भ्रष्ट, पतित झाली आहेस. तुझा कौमार्य भंग झाला आहे.” असहनीय उपेक्षा आणि प्रेम भंगाचे दारुण दुःख घेऊन ती भीष्मा कडे परत आली. “तुम्ही मला पळवून आणलेत, आता लग्न करा. ज्या स्त्रीचे हरण झाले त्या स्त्रीला वडिलांचे दरवाजे बंद असतात.” असे म्हणाली. भीष्म म्हणाले  “मी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली आहे “. बाणेदार आंबा म्हणाली,” मला तेच हवे. तुमची प्रतिज्ञा  मोडण्यासाठीच मी आले आहे. प्रतिज्ञा मोडलेल्या व्यक्तीला जीवंतपणी नरक यातना भोगाव्या लागतात तीच पीडा मला तुम्हाला द्यायची आहे.”भीष्माने नकार दिला. आणि सूडाने पेटलेल्या अंबेने त्यांना धमकी दिली,” तुमच्या मृत्युचे कारण मीच असेन.” आणि वैफल्यग्रस्त होऊन ती जंगलात भटकत राहिली. तिथे तिला परशुराम ऋषींचा शिष्य होत्रवाहण भेटला. त्यांनी सांगितले भीष्माला किंवा शाल्वाला योग्य धडा शिकवण्याचे काम माझे गुरु करतील. त्याच्याबरोबर ती परशुराम ऋषींकडे आली व त्यांना म्हणाली,” मला न्याय हवाय. केवळ स्पर्शाने कौमार्य बाधीत होते तर आजन्म ब्रह्मचर्याचे व्रत घेतलेल्या भीष्माने कोणत्या अधिकाराने मला स्पर्श केला? परपुरुषाबद्दल अनुराग ठेवणारी स्त्री सर्पिणी  प्रमाणे विषारी असते आणि ती पूर्ण कुटुंबाचा घात करते असे म्हणून त्याने मला परत पाठवले याचा अर्थ काय? परशुराम खरं तर तिची समजूत घालत होते पण तिचा युक्तिवाद त्यांना पटला. तिला मदत करण्यासाठी त्यांनी भीष्माला बोलावले पण भीष्म आले नाहीत. परशुराम ऋषी खूप संतापले आणि तेच भिष्मा वर चाल करून गेले. दोघेही तुल्यबळ योद्धे. तेवीस दिवस घनघोर युद्ध झाले. दोघांनी महाभयंकर अस्त्रांचा मारा सुरू केला. आता पृथ्वीचा विनाश होईल या भयाने नारदादी देवांनी मध्यस्थी करून युद्ध थांबवले. परशुरामाने तिला सांगितले आता मी तुला न्याय देऊ शकत नाही पण माझे गुरु आणि आराध्यदैवत भगवान महादेव यांच्याकडे तू जा. ते नक्कीच योग्य मार्ग दाखवतील. अंबेने अरण्यात घोर तपश्चर्या सुरू केली. गंगामातेने स्वतः तिची खूप समजूत घातली. पण अंबे ने जिद्द सोडली नाही. शेवटी शंकर प्रसन्न झाले पण ते म्हणाले या जन्मी  त्यांचा मृत्यु करता येणार नाही. पुढच्या जन्मी तुझ्यामुळेच त्यांचा मृत्यू होईल. अंबेने स्वतःच लाकडी चिता रचून त्यात उडी घेतली व आत्मसमर्पण केले.

पुढच्या जन्मी शिखंडी च्या रूपाने तिने द्रुपद राजाच्या घरी जन्म घेतला. महाभारताचे घनघोर युद्ध सुरू झाले. शिखंडी अर्जुनाचा सारथी होता. 18 दिवस घनघोर युद्ध झाले. पितामह भीष्मांनी पांडवांच्या सैन्याची धूळधाण उडवली. शिखंडीच्या आड लपून अर्जुनाचा रथ त्यांच्या समोर आला. शिखंडी ला पाहून मी महिलेविरुद्ध शस्त्र उचलत नाही असे सांगून भीष्मांनी आपली शस्त्रे खाली ठेवली ती संधी साधून अर्जुनाने मर्मी  घाव घातला आणि भीष्म धारातीर्थी पडले.

महाभारतातील सर्वात दाहक मृत्यू होता. अशाप्रकारे अंबेने आपला पण पूर्ण केला. अपमान आणि विटंबना असह्य झालेली एक स्त्री एका  महानायकाच्या मृत्यूचे कारण बनली. जन्मजन्मांतरीच्या सूडाची  कहाणी तिथली संपली पण तुमच्या आमच्या मनात ती सदैव घोळ तच राहणार. तिचा संपूर्ण जीवन प्रवास म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याचा लढा, मनपसंत पती निवडण्याच्या स्त्री अधिकाराचा लढा आणि अन्यायाविरुद्ध सर्वस्व झोकून दिलेला लढा.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व ज न ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ व ज न ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“मंत्री साहेबांनी ट्रस्टिंवर वजन टाकलं, म्हणून कामाचा ठेका मिळाला !”

वजन ! किती साधा, सरळ, कुठल्याही काना, मात्रा, वेलांटीच स्वतः वजन न वाहणारा शब्द !  पण तो उच्चारतांना आपल्याला त्याच वजन जाणवतं !

आता कुणा व्यक्तीच्या शब्दाला समाजात किती वजन आहे, हे माझ्या मते त्या व्यक्तीच्या समाजात असलेल्या खऱ्या, खोट्या प्रतिष्ठवर अवलंबून असतं ! अर्थात त्या व्यक्तीच्या शब्दाला ते वजन प्राप्त होण्यासाठी, तुमच्या माझ्या सारख्या सामान्य लोकांनी, स्वतःच वजन खर्च करून त्यांना त्या पदावर बसवलेलं असतं, हे आपण नंतर विसरूनच जातो ! कारण आपलं एखाद सरकारी किंवा दुसरं कुठलंही काम मार्गी लावण्यासाठी, त्या स्वतः वजनदार असलेल्या नेत्याने आपल्या शब्दाचे वजन टाकून ते काम करावं, असं आपलं स्वतःच तोळामासा वजन त्याच्यावर खर्च करून त्याला विनवणी करायची पाळी नंतर आपल्यावरच येते ! असा माझ्या सारखा अनुभव आपण पण घेतला असेल, हे मी आपल्यावर माझ्या शब्दांच कुठलंही वजन न टाकता, तुम्ही कबूल कराल !

मंडळी सध्याचा जमानाच वजनाचा आलाय त्याला कोण काय करणार ! म्हणजे असं बघा, आपलं एखाद काम होण्यासाठी कुणाचा कधी वजनदार शब्द कामी नाही आला, तर आपल्या अर्जावर काहीतरी वजन ठेवल्याशिवाय तो मंजूरच होतं नाही ! या बाबतीत अशा प्रसंगातून गेलेले काही वजनदार “पेपरवेटच” जास्त वजन, सॉरी प्रकाश टाकू शकतील !

माझ्या पिढीच्या लहानपणी जवळ जवळ प्रत्येक रेल्वे प्लॅटफॉर्मवर, एक किंवा दोन वजनं करायची मशीन्स असायची. त्या मशीनवर उभं राहून त्यात एक रुपयाचे एक नाणे टाकले, की आपलं वजन दाखवणार एक तिकीट त्या मधून बाहेर येत असे ! त्या तिकिटाची एक खासियत अशी होती की त्याच्या एका बाजूला वजन करणाऱ्या माणसाचं वजन आणि मागच्या बाजूला त्याच त्या दिवसाचं भविष्य एका ओळीत लिहिलेलं असायचं ! ह्या दोन्ही छापील गोष्टी कधीच बरोबर नसायच्या हा भाग निराळा ! हल्लीच्या काळातील जगभरातल्या कुठल्याही कसीनोत दिसणाऱ्या स्लॉट मशीनचा, ही वजनाची मशिन्स म्हणजे बाल्यावस्था म्हणायला काहीच हरकत नाही ! कारण दोन्ही मशिन्स लोकांना हातोहात फसवून फक्त पैसे गिळंकृत करण्यासाठी बनली आहेत, हे मोठेपणी उमगते ! पण तो पर्यंत आपले खिश्याचे वजन बऱ्या पैकी कमी झालेलं असतं !

आधुनिक सायन्स नुसार प्रत्येकाच्या उंचीच्या प्रमाणात त्याचे किंवा तिचे, किती वजन असावे याच एक कोष्टक ठरलेलं आहे ! पण कुणाचं शारीरिक वजन किती असावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, असं माझं वजनान हलकं फुलकं मत आहे ! माझ्या या हलक्या फुलक्या मताशी माझे काही वजनदार मित्र मैत्रिणी नक्कीच सहमत होतील, यात मला तिळमात्र (कारण तीळ सुद्धा वजनाने हलके फुलके असतात) शंका नाही ! कारण कसं असतं नां, शेवटच्या ‘महायात्रेचा’ प्रसंग वगळता, शेवटी प्रत्येकाला स्वतःच वजन स्वतःच आयुष्यभर स्वतःच्या दोन पायावर वहायचं असतं ! त्यामुळे दुसऱ्याच्या वजनाचा त्रास आपल्याला जाणवायच तसं काही कारण नाही म्हणा ! पण हां, एखादी व्यक्ती जर का चुकून माकून, काही कारणाने आपल्या अंगावर पडली आणि ती जर का आपल्या पेक्षा वजनाने भरभक्कम असेल तर ? तर फार तर फार काय होईल, आपली किती हाडं मोडायची शिल्लक राहील्येत, हे आपल्याला फक्त कुठला तरी चांगला ऑर्थोपेडीक डॉक्टरच त्याची वजनदार फी घेवून सांगू शकेल इतकंच !

सध्याची पिढी खूपच हेल्थ कॉनशस झाल्याच आपण बघतो आहोत ! वजन कमी करण्यासाठी निरनिराळी डाएटस करणं, जिम जॉईन करणं, असे प्रकार ही तरुणाईतली मंडळी आजकाल करत असते ! त्यातील किती टक्के तरुण, तरुणी आपल्या वजन कमी करण्याच्या ध्येयापर्यंत पोचतात हा मला एक न पेलवणारा वजनदार प्रश्न ! कारण कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी त्यात सातत्य आणि चिकाटी लागते ! पण या मंडळींपैकी काही आरंभशूरांमुळे, निरनिराळ्या जिम चालवणाऱ्या लोकांना आणि डाएटीशीयन लोकांना जरा बरे दिवस येवून त्यांची आर्थिक वजनं वाढल्याचे सध्या ऐकून आहे ! या बाबतीत एक मजेदार गोष्ट मला आठवते.  एका माणसाजवळ एक गाईचे वासरू होते. त्या वासराचा  काही कारणाने एकदा एक पाय मोडतो. त्यामुळे त्या वासराला नीट चालता येईनासे होतं. म्हणून तो माणूस त्या वासराला नेहमी कुठंही उचलून घेऊन जात असे. काही महिन्यांनी त्या वासराची गाय होते, तरी तो माणूस तिला उचलूनच नेत असे ! आता असं बघा, जर का कोणी त्या माणसाला एकदम गाय उचलायला सांगितली असती, तर ते त्याला शक्य झालं नसतं ! पण रोजच्या सरावामुळे तो पुढील काळात रोज गाय उचलू शकला, एवढं मात्र खरं ! समझने वालोंको……..! असो !

नुकत्याच ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने केलेल्या एका वैज्ञानिक संशोधना नुसार, मुंगी हा जगातला असा एकमेव कीटक आहे, जो वेळ पडल्यास स्वतःच्या वजनाच्या सुमारे ५० ते ५०० पट वजन उचलू शकतो, असं सिद्ध केले आहे ! बापरे, ऐकावे ते नवलंच म्हणायचं आणि आपलं शाब्दिक वजन सोडा, पण निदान शारीरिक वजन तरी आपल्या उंचीनुसार आधुनिक सायन्सच्या कोष्टकाच्या जवळ पास मेंटेन कसं ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे मंडळी ?

शेवटी, आपले सगळ्यांचे शाब्दिक वजन लोकांच्या कोणत्या ना कोणत्या चांगल्या कामासाठी, नेहमीच कामी येवू दे, अशी मी माझ्या पूर्ण सत्तर किलोच्या शारीरिक वजनाने त्या ईश्वराच्या चरणी दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो !

शुभं भवतु !

 

ता. क. – सर्वार्थाने वजनदार व्यक्ती काही “लाख डॉलर्स” खर्च करून, स्वतःचे वजन एखाद्या पिसासारखेच आहे असं अनुभवण्यासाठी, नुकत्याच रिचर्ड ब्रॉनसन यांनी चालू केलेल्या वर्जिन गॅलेकटीक या कंपनी तर्फे अवकाशात भ्रमण करून, तसा फिल घेवू शकतात बरं का !

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ -पदर- ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

? मनमंजुषेतून ?

☆ पदर ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

रविवार होता त्या दिवशी, मी प्रथमच पाहिले होते त्यांना..

त्या घरात प्रवेश करीत होत्या..आबांसोबत विवेक व विलासदादांसोबत..

पहायला आल्या होत्या त्या आमच्या बिंबाला–अदबीनं सावरत होत्या त्या– 

डोईवरला तो आपला पदर..!

 

मग पसंती..शकुनाची देणी-घेणी..वाडःनिश्चय-विवाहाची बोलणी

संबंधित नातेवाईकांची यादी– मी पाहिलं डोळ्यांच्या कडेनं,

जराशा झटक्यानंच लगबगीनं ओढून घेतला होता—

माईंनी तेव्हाही आपला पदर..!

 

नंतर आमंत्रणं..लगीनघाई–मिरवल्या होत्या मनसोक्त

थोरल्या लेकाच्या लग्नात..ठसक्यात,सासूबाईंच्या तोर्‍यात..

आठवणीत राहिला झळाळणारा—

तो रुंद काठाचा जरतारी पदर..!

 

ढग्यांची बिंबा आता राधिका झाली–

राधिका राधिका म्हणून माईंच्या सावलीत वावरू लागली..

मग सासूरवाशीणीला जवळचा,आधाराचा वाटला होता तो

माईंचाच…मायेचा पदर..!

 

अमळनेरच्या भल्या मोठ्या घरात–घर कसलं हो–चिरेबंदी वाडाच तो..

माणसांचा रगाडा..होता दबदबा–होते नोकर-चाकर फार–कधी शेतकामाचा भार

कामे वाटून सांगतांना..सूचना-सल्ले देतांना–खोचलेला असायचा

कमरेला तो माईंचा पदर..!

 

मग कधी समारंभ–पूजा-अर्चा..लग्न सोहळे–प्रसंगोत्तर माई भेटत..

दरवेळी वयाची बेरीज होतांना दिसलेल्या–काहीशा पाठीत झुकत चाललेल्या..

पण माईंच्या डोक्यावर डौलात दिसायचा मात्र..

तो सोनेरी भरजरी पदर..!

 

माईंच्या घट्ट बांध्याला, मोहक हसर्‍या गौरवर्णी रुपाला..

खानदानी घरंदाज व्यक्तिमत्वात भर घालणारा साजेसाच होता,

नेहमीच त्यांच्या डोईवरला तो पदर..!

 

लेका-बाळांच्या,सुना-नातवंडांच्या अखंड स्मरणात राहील

तो हरवलेला……तरीही ममतेचा वात्सल्याचा जिव्हाळ्याचा

माईंचा तोच मायेचा ऊबदार पदर..!!!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे

श्री विजय गावडे

? क्षण सृजनाचे ?

☆ सप्तपर्णी…. ☆ श्री विजय गावडे ☆  

दोनेक महिन्यापूर्वी मोहोराने भारलेले सातिवनाचे (सप्तपर्णीचे) डेरेदार वृक्ष आता मुंडावळ्यागत लोम्बणाऱ्या शेंगानी लगडलेत.  फळेच्छुक इतरही वृक्षवल्ली आपापल्या तान्हूल्या फळांचे लाड करतांना दिसताहेत.  वने आणि मने दोन्ही प्रफूल्लीत करणारी हि निसर्ग किमया आपसूकच कवितेत उतरते ती अशी

 

सप्तपर्णी

 

शेंगाळले सातिवन

वने झाली आबादान

रायवनातून घुमे

काक – कोकीळ कुंजन

 

कानी घुमतो पारवा

अंगी झोंबतो गारवा

गार गार वाऱ्यातून

मंद सुगंध वहावा

 

फुले कोमेजून आता

फळे सानुली रांगती

जंगलाच्या राऊळात

गोड अंगाई झडती

 

कोण फळानी बहरे

कोणी  लगडे शेंगानी

निसर्गाचं जसं देणं

घेई धरती भरुनी

 

भारावून वेडे पक्षी

गाती सुरात कवने

रानी वनि जणू भरे

गितस्पर्धा आवर्तने

 

मात करुनी असंख्य

निसर्गाच्या कोपांवर

दिसा मासी सावरे

धरणीमायेचा पदर

 

उठा आतातरी गेली

गत वरसाची खंत

घेऊ भरारी नव्याने

आसमंत ये कवेत.

 

© श्री विजय गावडे

कांदिवली, मुंबई

मो 9755096301 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? वाचताना वेचलेले ?

☆ फक्त प्रेम करा! ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

सख्खा भाऊ, सख्खी बहीण, सख्खी मैत्रीण, सख्खे काका, सख्खी काकू, सख्खी मावशी 

नेमकं काय असतं हे “सख्ख प्रकरण?” —–

 

सख्खा म्हणजे आपला सखा.

सखा म्हणजे जवळचा——जवळचा म्हणजे ज्याला आपण कधीही, केव्हाही, काहीही सांगू शकतो. 

त्याला आपलं म्हणावं,— त्याला सख्ख म्हणावं !

 

सध्याच्या कलियुगात, आपण काय करतोय हे सख्ख्या नातेवाईकांच्या कानावर पण पडता कामा नये इतकी खबरदारी घेतली जाते, तिथे सख्ख्य  नसते पथ्य असते.

 

ज्याच्या जवळ आपण मनातलं सारं काही सांगू शकतो, मोठ्ठ्याने हसू शकतो किंवा  काळजातलं दुःख सांगून स्फुंदून स्फुंदून रडूही शकतो त्याला सख्ख म्हणावं, त्याला आपलं म्हणावं !

 

ज्याच्याकडे गेल्यानंतर आपलं स्वागत होणारच असतं 

आपल्याला पाहून त्याला हसू येणारच असतं

अपमानाची तर गोष्टच नसते— फोन करून का आला नाहीस अशी तक्रारही नसते !

 

पंढरपूरला गेल्यावर विठ्ठल म्हणतो का —-

“ या या फार बरं झालं !” 

 

माहूरवरून रेणुका मातेचा, किंवा कोल्हापूरवरून महालक्ष्मीचा, किंवा तिरुपतीहून गिरी बालाजीचा आपल्याला काही Whatsapp call आलेला असतो का ?’ या ‘ म्हणून !

मग आपण का जातो ?— कारण भक्ती असते, शक्ती मिळते आणि संकटमुक्तीची आशा वाटते —-म्हणून ! – हा ही एक प्रकारचा ” आपलेपणाच !”

 

लौकिक अर्थाने, वस्तूच्या स्वरूपात देव आपल्याला कुठे काय देतो ? 

किंवा आपण नेलेले तो काय घेतो ? —काहीच नाही.

 

रुक्मिणी काय पाठीवरून हात फिरवून म्हणते का, 

“ किती जाड  झालीस ?  कशी आहेस ? सुकलेला दिसतोस, काय झालं ? “ 

—-नाही म्हणत.

मग दर्शन घेऊन निघतांना वाईट का वाटतं ?– पुन्हा एकदा मागे वळून का पहावं वाटतं ?

प्रेम, माया, आपुलकी, विश्वास, म्हणजेच ” आपलेपणा !”

 

हा आपलेपणा काय असतो ?—–

आपलेपणा म्हणजे भेटण्याची ओढ— भेटल्यानंतर बोलण्याची ओढ –-

बोलल्यानंतर ऐकण्याची ओढ—- आणि निरोप घेण्याआधीच— 

पुन्हा भेटण्याची ओढ !

 

ज्याला न बोलताही आपलं दुःख कळतं,  त्याला आपलं म्हणावं– 

आणि चुलत, मावस असलं, तरी सख्ख म्हणावं !

 

मी त्याचा आहे आणि तो माझा आहे ही भावना दोघांच्याही मनात सारखीच असणे …..

म्हणजे  ” आपलेपणा ! “

 

एक शब्दही न बोलता ज्याला पाहिल्या पाहिल्या डोळे भरून येतात,  आणि निःसंकोचपणे गालावरून ओघळू लागतात— 

तो आपला असतो —  ” तो सख्खा असतो !”

 

लक्षात ठेवा,

 

ज्याला दुसऱ्यासाठी “सख्ख” होता येतं, त्यालाच कुणीतरी सख्ख असतं. 

बाकी फक्त परिचितांची यादी असते —-

नको असलेल्या माणसांची गर्दी असते !—-

 

तुम्हीच सांगा—–

फक्त आईची कूस एक आहे म्हणून सख्ख म्हणायचं का ?—-

ज्याला तुमच्या दुःखाची जाणीवच नाही त्याला सख्ख म्हणायचं का ?—- 

 

आता एक काम करा —–

करा यादी तुम्हाला असणाऱ्या सख्ख्या नातेवाईकांची—- 

झालं नं मनात धस्स—- 

व्हायला लागली ना छातीत धडधड —-

नको वाटतंय न यादी करायला —-

रडू नका, पुसून टाका डोळ्यातलं पाणी— 

आणि मानायला लागा सर्वांना आपलं—- कोणी कितीही झिडकारलं तरी— 

कारण —–

राग राग आणि तिरस्कार करून काहीच हाती लागत नाही —-

जग फक्त प्रेमानेच जिंकता येतं —–

 

म्हणून फक्त प्रेम करा !!  फक्त प्रेम करा !!.

 

संग्राहिका : – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे

? विविधा ? 

☆ घर ☆ प्रस्तुती – सुश्री मानसी आपटे ☆ 

राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जीवावरच येतं नं…!

एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून.. निरोप देताना मग मनातल्या मनात आपणच घरात सांगतो, “येतो परत आठ दिवसांत तोवर सांभाळ रे बाबा”.. तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं!

मग कधी कधी आठ दिवसांनी परतण्याचा वायदा पाळायला जमत नाही.. आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजा समोर उभे राहतो ना तेव्हाचा सुकून काही वेगळाच असतो..! पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं..!

दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं.. जाताना बदललेले कपडे कुठल्याशा खुर्चीवर, बेडवर नाहीतर सोफ्यावर तसेच आळशासारखे गपचिप पडून असतात. तेव्हा गडबडीत विसळलेल्या कपबश्या तशाच ओट्यावर उपड्या निपचीत असतात … पोरांची वह्यापुस्तकं अन् खेळण्यांचा पसारा कोपऱ्यातल्या टेबलावर निवांत हातपाय पसरून बसलेला असतो.. कपाटाच्या आरश्यात स्वतः आरशालाही बघू वाटू नये असा एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो..! रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते, किचन मधली काही भांडी जाळीत मान टाकून बसलेली असतात.. फ्रीज उघडल्यावर त्यात उरल्या सुरल्या भाज्या, फळे, लोणची, तुपाचे डबे, विरजण दाटीवाटीने डोळे वटारून बघायला लागतात.. आपण गेल्यावर जागावाटपासाठी यांच्यातही युद्ध झालेलं असतं बहुतेक! त्याच हातापायीत कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो अन् दोनचार फळंही शहीद झालेली असतात..!! बेडरूमच्या दरवाजामागे निघताना खराखर विंचरलेल्या केसांची गुंतावळ लपून बसलेली असते… सिंक वॉशबेसिन बाथरूम बिचारे सुकून गेलेले असतात..वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅन सारखाच टांगणीला लागलेला असतो …भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं… आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!

रुसलेल्या रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते! मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते..! दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं ! ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते.. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा मिळवून देते.. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते ..त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं..!

घराला स्पर्श कळतात???.. हो कळतात!! त्याला आपली माणसेही कळतात.. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात .. आठवून पहा, काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.. !!

तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते तेव्हा लाडात आलेल्या लेकरासारखं घर तिच्याकडे पाहत असतं.. तिलाही  मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”…!

शेवटी “बाई” घराचीही “आई”च असते..!! हो नं! ?

प्रस्तुती – मानसी आपटे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत- भाग- दुसरा … बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ माझी सेवानिवृत्ती की साठीशांत भाग दुसरा… बीना ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(‘तुझा तुझ्या मातृभाषेतलाही शब्दसंग्रह कमी आहे म्हणून तुला राग व्यक्त करायला शिव्यांच्या कुबड्या घ्याव्या लागतात’.) — इथून पुढे —– 

वस्तू जागच्या जागी हव्यात, अंधारातही हात घातला तर ती वस्तू तिथेच सापडली पाहिजे ‘ हे  बरोबरच आहे. पण कधी कधी पसाराही हवासा वाटायला लागला आहे. नाही, खरंतर कधीतरी आळस करणंही ठीक आहे हे पटायला लागलंय. 

ज्यांच्यावर जिवापलीकडे प्रेम केलं, आपल्या गरजा बाजूला ठेऊन, स्वतः पलिकडे जाऊन ज्यांच्यासाठी केलं ती माणसं आपली आठवणही काढत नाहीत हे बघून पूर्वी त्रास व्हायचा. नंतर नंतर बाबांच्या ‘ करावं आणि रस्त्यावर ठेवावं. नाही तर घेणाऱ्याच्या डोळ्यातली लाचारी आपला अहंकार फुलवते ‘ या वाक्याचा अर्थ कळला. खरंच आपण आदर, सन्मानाच्या आधीन होत जातो, demanding होत जातो. मग तो नाही मिळाला की त्रास होतो. आता सत्पात्री दानाबरोबरच गुप्त दानाचा अर्थ आणि त्यातला निरपेक्ष आनंदही कळलाय. कारण मदत आपण दिलीये हे नकळता मदत मिळाल्याचा आनंद व्यक्त करणाऱ्या डोळ्यात आपली मदत घ्यावी लागल्याची लाचारी दिसत नाही. 

मी सहसा कुठल्याही भौतिक सुखात अडकणारी नाही. सकाळीच काय कित्येक दिवस चहा कॉफी नाही मिळाली तरी माझं डोकं दुखत नाही. हौसेनी जमवलेल्या क्रोकरी सेटमधलं काही फुटलं तरी समोरच्याला लागलं नाही न हे मला कायमच महत्त्वाचं वाटत आलेलं आहे. असं कितीतरी. 

पण तीन मोह मात्र अजून सुटता सुटत नाहियेत. भाजी, क्रोकरी आणि पुस्तकं हे माझे weak points. कपड़े, दागिन्यांच्या दुकानात न्या, सहसा फरक नाही पडत. पण साठी झाली तरीही एकटी असून भाजीचा, घरात जागा नसूनही क्रोकरीचा आणि हातात मोबाईल असला तरी पुस्तकांचा नाद काही सुटता सुटत नाहिये. तो तेवढा कसा सोडवावा हे कळत नाहीये, खरं तर सोडावासा वाटत नाहीये. कारण तो निरुपद्रवी आहे. असो. ते एक माझ्या माणूस असण्याचं, जिवंतपणाचं लक्षणच समजू या. थोडक्यात स्वतः पलिकडे जाऊन दुसऱ्याला प्लीज करण्याच्या अट्टाहासातला फोलपणा लक्षात आला आहे. 

वादातला निरर्थकपणा लक्षात आलाय. कलेतल्या स्वानंदधनाचा ठेवा सापडलाय. त्यामुळे लोकं ज्या वयात हातातून सगळं निसटतंय म्हणून खंतावतात, त्या वयात मी आनंदी आहे. 

हे सगळं अंगी बाणताना त्रास झाला, हो झालाच. पण आज मागे वळून बघताना समाधान वाटतंय. कारण त्यानी मला जसं निर्माण केलंय त्या माझ्या अस्तित्वाशी मी प्रामाणिक आहे.  एवढंच नव्हे तर तर वेळोवेळी त्यात चांगल्या गोष्टींची भर घालत स्वतःला समृध्द करत जगतेय. उठसूट त्याच्याकडे मागण्या, तक्रारी घेऊन जात नाही. पण त्याला ‘Thank you’ म्हणायला मात्र कधीच विसरत नाही. 

आता निवृत्ती घेतेय म्हणजे सगळ्यातून संन्यास घेणार का? तर तसं मुळीच नाहीये. उलट काही बंधनं शिथिल करून मजेत आयुष्य जगणार आहे . गेली कित्येक वर्षं बंद केलेलं socialization परत सुरू केलंच आहे, ते वाढवणार आहे . ( पण कोणाच्याही दबावाखाली येऊन स्वतः पलिकडे जाऊन मदत करणार नाही ). मग टपरीवर वडापाव खाणं असो की five star मधे जाणं असो, की आप्त इष्ट जमवून, गप्पा छाटत, midnight snacks, चहा कॉफी घेत रात्रभर धमाल करणं असो.

कोणी सांगितलं. याच्याशी बोलू नको, अमुक करू नको, तर म्हणेन, तू सांगितलंस म्हणून बोलीन किंवा नाही बोलणार; करीन किंवा नाही करणार असं काहीही होणार नाहीये. कारण दोन्ही प्रकारात मी कुठे असेन? तुलाच किंमत दिल्यासारखं होईल. मला वाटेल तिथपर्यंत बोलीन, करीन, मला वाटलं की थांबीन.

तसंच, कोणाचा गैरसमज झालाय असं दिसलं तर २-३ वेळा स्वतःहून बोलायचा प्रयत्न करीन. त्यानंतर ‘Leave it, Forget it’.  मी कोणाला emotional blackmail केलं नाही, आणि आता मीही होणार नाही. अपना फंडा तो भई ‘ Live, and Let Live ‘. ‘ Enjoy and let Enjoy ‘ वाला है —–

समाप्त.

लेखिका – बीना 

संग्राहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

प्रिय “ प “ — ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

“प” माणसाला खूप प्रिय आहे,आपण जीवनभर या “प” मागे धावत असतो

जे मिळते तेही या “प” पासून आणि जे मिळत नाही तेही या “प” पासून

              प    पति

              प    पत्नि

              प    पुत्र

              प    पुत्री

              प    परिवार

              प  प्रेम

              प   पैसा

              प   पद 

              प प्रतिष्ठा

              प प्रशंसा

              प प्यार

              प पार्टी

              प परीक्षा

              प पब्लिसिटी

           

ह्या “प” मागे लागून लागूनच आपण “प” पासून पाप करत राहतो

आणि मग आपले “प” पासून पतन होते…

आणि शेवटी शिल्लक राहते फक्त  “प” पासून पश्चात्ताप…

पापाच्या  “प” मागे लागण्यापेक्षा सर्वात चांगले आपण  “प” पासून परमेश्वर च्या मागे लागावे आणि  “प” पासून पुण्य कमवावे 

शेवटी  “प” पासून प्रणाम—–

संग्राहक : – सौ. अंजली गोखले

मो ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares