मराठी साहित्य – विविधा ☆ रसिका तुझ्याचसाठी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  विविधा ?

☆ रसिका तुझ्याचसाठी… ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज २३ डिसेंबर— 

रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते —

हृदयात दाटलेली भावांजली वहाते —-”

आपल्या रसिक श्रोत्यांप्रती आणि रसिक वाचकांप्रती जणू कृतज्ञता व्यक्त करत, असे भावपूर्ण काव्य लिहिणारे श्री. गंगाधर महाम्बरे यांचा आज स्मृतिदिन.(३१/१/१९३१ – २३/१२/२००५) 

प्रतिभावंत कवी, गीतकार, लेखक, बालसाहित्यकार, आणि याच्या जोडीने, अनुवादक, ग्रंथपाल, कोशकार– असे चतुरस्त्र व्यक्तिमत्व लाभलेले श्री. महाम्बरे. ते कोकणातून पुण्यात आल्यावर पूर्ण वेळ साहित्यक्षेत्रात रममाण होण्याआधी, त्यांनी वृत्तपत्र व्यवसाय सुरु केला होता. आणि नंतर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये बरीच वर्षे ग्रंथपाल म्हणूनही ते कार्यरत होते. 

अर्थात  ही त्यांची अगदी सुरुवातीची ओळख. खरी ओळख ” एक बहुरंगी बहुढंगी साहित्य-निर्माते ” हीच., 

 त्यांच्या साहित्यनिर्मितीतले वैविध्यही खरोखरच थक्क करणारे. त्यांनी अगदी वेगवेगळ्या विषयांवर पुस्तके लिहिली आहेत. ती अशी —-

१ ) साहित्यविश्वाला समृद्ध करणारे लेखन —
आनंदाचे डोही, मराठी गझल, उत्तुंगतेचा सह्जस्पर्श, उषःकाल ( कवितासंग्रह ), किशोरनामा –
 ( कथासंग्रह ), रंग जीवनाचे ( कादंबरी ), रसिकेषु ( ललितलेखन ), वॉल्ट डिस्ने चरित्र, व्यक्तिचित्रे, सैगल, चार्ली चॅप्लिन : काळ आणि आज, विस्मरणापलीकडील पु.ल., प्रतिभावंतांच्या सहवासात,
बिजलीचा टाळ ( कादंबरी ), भावगीतकार ज्ञानेश्वर, सापेक्षी समीक्षा, प्रवासातील प्रतिभावंत,
माणसं जनातील-मनातील, मौनांकित ( चरित्र ). त्यांनी नाटककार आणि बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक असणाऱ्या मामा वरेरकर यांचे चरित्र ‘ एक अविस्मरणीय मामा ‘ नावाने लिहिले आहे. तसेच दादासाहेब फाळके यांचेही चरित्र त्यांनी लिहिलेले आहे.
 
२ ) अगदी वेगळ्या विषयांवरील पुस्तके —
कोकणातले व्यवसाय व त्यासंबंधीचे मार्गदर्शन, ऑटोरिक्षा ( देखभाल व दुरुस्ती ), महिलांसाठी उद्योगव्यवसाय, लाखमोलाचे उद्योगव्यवसाय, चला जाणून घेऊ या ! अंकशास्त्र. मौलिक मत्स्यव्यवसाय, मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, मोडी शिका, भगवान गौतम बुद्ध आणि बौद्धधर्म, लघुउद्योगाची लक्ष्मणरेषा, महाराष्ट्रातील समाजसुधारक, विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक कल्पकता, विद्यार्थ्यांसाठी उद्योगव्यवसाय, शुभंकरोती, — आणि असे बरेच काही मार्गदर्शक लेखन. याखेरीज, २१ व्या शतकाचा मराठी-इंग्रजी शब्दकोश, आणि चित्रपट क्षेत्रातल्या तांत्रिक शब्दांचा कोशही त्यांनी तयार केला होता.

श्री. महाम्बरे यांच्या काव्यनिर्मितीतही– भावगीते, चित्रपट गीते, आणि नाट्यगीते, अशी विपुलता होती.—– कंठातच रुतल्या ताना, तू विसरुनी जा रे–, निळा सावळा नाथ, पाण्यातले पहाता प्रतिबिंब, पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, बोलून प्रेमबोल तू लाविलास छंद, संधीकाळी या अशा, सावलीस का कळे, तूच खरा आधार- देवा, अशी कित्येक उत्कट भावकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत.

धाकटी मेहुणी, युगे युगे मी वाट पहिली, सोबती, सौभाग्यकांक्षिणी, अशा चित्रपटातली त्यांची गीते प्रसिद्ध झाली होती. तसेच, गा भैरवी गा, चाफा बोलेना, तेथे कर माझे जुळती, या नाटकांमधली गीते त्यांनी लिहिलेली होती.

त्यांना मिळालेले पुरस्कार —– “ मौलिक मराठी चित्रगीते “ या रसग्रहणात्मक पुस्तकाला ‘ राष्ट्रपती सुवर्णकमळ ‘ – नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल दिल्ली तर्फे १९८३ सालचा ‘ पोएट ऑफ दि इयर ‘ पुरस्कार, – चित्रपट महामंडळाचा ‘ चित्ररत्न पुरस्कार’, – गोमंतक मराठी अकादमीची सन्माननीय फेलोशिप,– म.स.प.चा ना.घ.देशपांडे पुरस्कार ‘, –केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक पुरस्कार. मॉरिशस नभोवाणीवर त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या होत्या, आणि ‘ रसिक तुझ्याचसाठी ‘ या गीताची ध्वनिमुद्रिका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती, या विशेष गोष्टी सांगितल्याच पाहिजेत अशा.

श्री. गंगाधर महाम्बरे यांना आजच्या स्मृतिदिनी भावपूर्ण श्रद्धांजली.

आज  “ कवितेचा उत्सव “ या सदरात वाचूया श्री. महाम्बरे यांची एक सुंदर काव्यरचना.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गराज सेल—- ☆ डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ गराज सेल—- ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

दर वर्षी अमेरिकेचा दौरा होतोच. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातीच्या शाळेला सुट्टी असली तरी मुलीला जावयाला ऑफिस असतेच. मग मी नातीला बघायला, तिची शाळा सुरू होईपर्यंत USA मुक्कामी असते.

ते दिवस मोठे सुंदर असतात.  उन्हाळा सुरू झालेला, पण उबदार उन्हाळा. झाडे नव्याने हळूहळू छान फुलून येतात.

एकदा फिरताना मुलीच्या कम्युनिटीमध्ये काही घरांसमोर निळे फुगे लावलेले दिसले. कुतूहलाने विचारले, ” हे कसले ग फुगे?” 

मुलगी म्हणाली, ” अग पुढच्या आठवड्यात गराज सेल आहे ना–त्याची खूण आहे, की लोकांना समजावे–इथे आहेत सेलच्या वस्तू.” 

मी हरखून गेले आणि म्हटले, ” अदिती मला  केव्हाचा बघायचाय ग हा सेल. खूप ऐकलंय याविषयी.” 

अदिती हसायलाच लागली. म्हणाली, ” आई, मागच्या खेपेला वृद्धाश्रम बघून झाला.  आता या वेळी गराज सेल ? ” 

” हो, अनायसे आलेच आहे, तर नेच मला. “

 ती कबूल झाली. छोट्या आद्याला जावयाने सांभाळायचे कबूल केले आणि त्या रविवारी आम्ही गराज सेल बघायला निघालो.

तिच्या कम्युनिटीत जवळजवळ आठशे बंगले आहेत. आम्ही कारने जिथे फुगे दिसतील तेथे थांबत होतो—प्रत्येक ठिकाणी किती व्यवस्थित सामान लावले होते–गडबड नाही, गोंधळ नाही. प्रत्येकाच्या गराजमध्ये आणि समोरही खूप जागा असते. तिथे नको असलेले सामान ठेवले होते. समोर खुर्ची टाकून मालक किंवा मालकीण बाई बसल्या होत्या. किती प्रकारचे सामान  हो।

मुलांची खेळणी-अगदी नवी चकचकीत असावी अशी, पुस्तके, क्रोकरी, काय नव्हते तिथे ?  अगदी  फ्रीज-टी.व्ही. सुद्धा बघितले. मला इतकी मजा वाटत होती.

हा सेल शनिवार-रविवार असतो. त्यासाठी आधी  कम्युनिटीची नाममात्र फी भरावी लागते, मगच ते विशिष्ठ फुगे देतात. दोन्ही दिवस ९ ते १ पर्यंत वेळ असते. १ वाजता सेल बंद होतो.

खूप लोक या सेलमधून  संसारोपयोगी वस्तू घेतात. कोणीही मोडके तोडके असे काहीही ठेवत नाही. आणि अगदी नाममात्र किमतीत हे मिळते. 

उद्देश फक्त एकच —आपल्या वस्तू  हलवणे,  ज्यांचा आता घरमालकाला उपयोग नसतो. मुले मोठी झाली की खेळणी पडून राहतात. मोठा tv घ्यायचा तर आधीचा कुठे ठेवणार? आपल्या इकडच्यासारखा exchange तिकडे नाही.

अशीच फिरताना मला माझ्या खूप आवडत्या, सिडने शेल्डनची कोरी पुस्तके दिसली. मोठे खोके भरून बाहेर ठेवली होती. केवढा आनंद झाला सांगू—लेक म्हणाली,” बाई ग ही सगळी घेणारेस की काय ? बॅगेचे वजन माहीत आहे ना ?”

मी सरळ खाली वाकून ती बघू लागले. किंमत फक्त 1 डॉलर लिहिली होती. मला इतका आनंद झाला. जवळ आरामखुर्चीवर एक खूप म्हाताऱ्या बाई विणत बसल्या होत्या.

मी त्यांना ‘ हलो ‘ म्हटले आणि विचारले,” बघू ना ही मी पुस्तके?”

त्या म्हणाल्या ,” बघ की. कुठून आलीस ? इंडियातून का ? ” मी ‘ हो ‘म्हटले. माझ्या खांद्याला लोकरीची विणलेली सुंदर स्लिंग बॅग होती–माझ्या आईने विणलेली.  त्यांनी ती बघितली आणि म्हणाल्या, ” मी ही बॅग बघू का ?”

मी म्हटले, ” हो,बघा ना. माझ्या आईने विणलीय. तिला खूप हौस आहे विणायची. तुमच्या एवढीच आहे ती आता. “

त्या हसल्या आणि म्हणाल्या, “ मी ८९ वर्षाची आहे. माझ्या मुलाचे हे घर आहे. तोही आता ६५ वर्षाचा आहे. कोण कोणाला सांभाळणार ? मी आपली  वृद्धाश्रमात राहते. इकडे अशीच पद्धत आहे. तेच बरेही पडते. चांगला आहे मी राहते तो वृद्धाश्रम. “ 

त्यांनी माझी स्लिंग बॅग नीट बघितली– “ छानच विणली आहे “ म्हणाल्या.

मी पटकन ती रिकामी केली. अदितीच्या purse मध्ये माझे सामान टाकले आणि त्यांना म्हणाले, “ घ्या ही तुम्हाला .नवीनच आहे हं. मी इकडे येणार म्हणून आईने नवीन विणून दिली.”  त्या खूप संकोचल्या..  ‘नको नको. मी सहजच म्हटले अगदी.’ असं म्हणत राहिल्या. 

“ पण तुम्हालाही आवडते ना विणायला, म्हणून देतेय,”

त्या खुश झाल्या.  म्हणाल्या “ थँक्स डिअर. आता मी अगदी अशाच विणून माझ्या वृद्धाश्रमातल्या मैत्रिणींना देईन.: मला सांग, तू  इकडे का आली आहेस ? “

“ ही माझी मुलगी. तिला छोटी मुलगी आहे ४ वर्षाची. तिला सुट्टीमध्ये सांभाळायला  मी आलेय.” 

“  थांब हं जरा “ असं म्हणत त्या तुरुतुरु आत गेल्या आणि एक भलेमोठ्ठे  टेडी बेअर घेऊन आल्या. अदितीच्या हातात देऊन म्हणाल्या, “ नवीनच आहे हं हे. माझा नातू मोठा झाला त्याचे आहे. घे तुझ्या बेबीला. खेळेल ती याच्याशी. याचे नाव ब्लु बेरी आहे बरं का–माझ्या नातवाने ठेवलंय ते. “ 

आम्ही संकोचलो आणि म्हणालो, “ नको हो. उगीच कशाला ? “ 

पण त्यांनी ते परत घेतले नाही. उलट म्हणाल्या, ”तुझ्या आईला सांग, खूप छान विणतात त्या. मला एक गोड गिफ्ट मिळाली इंडियातून–थँक् यू सो मच–हे कसे म्हणतात तुमच्या भाषेत?” 

मी म्हटले,” आभारी आहे “ 

त्या म्हणाल्या, “ आईला सांग आभारी आहे “ 

आम्ही त्यांचा निरोप घेतला. अदितीने त्यांचा फोन नंबर घेतलाच होता. 

म्हणाल्या,” कधी जमले तर ये ग मला भेटायला आईला घेऊन माझ्या वृद्धाश्रमात. “ 

आम्ही घरी आलो. आद्याने  टेडी बघताक्षणीच कडेवर घेतले. त्याचे नाव विचारले.आणि त्या ब्लु बेरीशी जी काय दोस्ती तिने केली की विचारू नका. २४ तास ते तिच्या बरोबर।–अगदी 

झोपताना जेवतानासुद्धा. 

मी भारतात परत आले. एकदा फोनवर बोलताना अदिति म्हणाली, 

“ आई,त्या जेनी आजी गेल्या ग. मी त्यांना भेटायला गेले होते एकदा तेव्हा तुझी चौकशी करत होत्या. झोपेतच गेल्या म्हणे. त्यांच्या मुलाने कळवले मला. “ 

–मला वाईट वाटले. त्यानंतर जेव्हा केव्हा मी गराज सेल बघते, तेव्हा त्या गोड, निळे डोळे असलेल्या, पांढरेशुभ्र कापसासारखे  केस असलेल्या, बाहुलीसारख्या दिसणाऱ्या जेनी आजीची आठवण येते.

©  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-2 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-2 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

(त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..)

इथून पुढे —-

यातल्या १७१ दरवाज्यांपैकी ४८ लोखंडी दरवाजे भद्रावतीच्या पोलाद कारखान्यात बनवले होते.  आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या प्रत्येक दरवाज्यावर दहा टनांचा भार असूनही ते स्वत: वर खाली होऊ शकत होते..

जेव्हा जलाशयात पाण्याची पातळी वाढायची, तेव्हा पाणी विहिरीत पडायचं, ज्यामुळं विहिरीची पातळी वाढून स्वयंचलित दरवाजे आपोआप उघडून जायचे आणि अतिरिक्त पाणी निघून जायचं अन् विहिरीची पातळी जशी कमी व्हायची तसे दरवाजे आपोआप बंद होऊन पाण्याचा प्रवाह थांबत होता..

संपूर्ण जगभरात असं अभिनव तंत्र पहिल्यांदाच वापरलं जात होतं.  याची नंतर युरोपासह इतर अन्य देशात काॅपी झाली..

‘ धरणाची उंची न वाढवता त्याची जलक्षमता वाढवणं ’ ही कल्पना कुणाच्या स्वप्नात देखील आली नसेल पण विश्वेश्वरैय्यांनी ते करून दाखवलं– ते ही इथं पुण्यातल्या खडकवासल्यात..

‘मुठा’ नदीच्या पुराला नियंत्रित करण्यासाठी त्यांनी खडकवासला धरणावर पहिल्यांदाच स्वयंचलित दरवाज्यांचा प्रयोग केला होता..या प्रयोगाचं त्यांनी पेटंटही घेतलं होतं..

धरण निर्मितीसोबतच विश्वेश्वरैय्यांनी देशाच्या औद्योगिक विकासातही भरीव असं योगदान दिलं..

धरण आलं तशी वीज आली– आणि जशी वीज आली तसे उद्योगधंदे बहरू लागले..

औद्योगिकीकरणाचे खंदे समर्थक असल्यानं त्यांनी बंगलोर इथं “ भारतीय विज्ञान संस्थान “ या ठिकाणी धातूकाम विभाग–वैमानिकी–औद्योगिक वहन आणि अभियांत्रिकी, अश्या अनेक विभागांची पायाभरणी केली..

औद्योगिकीकरणास त्यांचा फक्त ढोबळ पाठिंबा नव्हता.  यामागं देशांतर्गत अशिक्षितपणा-गरीबी-बेरोजगारी-अनारोग्य याबाबत मूलभूत असं चिंतन होतं..

उद्याेगधंद्यांचा अभाव–सिंचनासाठी मान्सूनवरची अवलंबिता–पारंपरिक कृषी पद्धती–प्रयोगांची कमतरता– यामुळं विकासात येणारा अडथळा रोखण्यासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम करत आपल्या कार्यकाळात म्हैसूर राज्यातल्या शाळांची संख्या ४५०० वरून १०,५०० पर्यंत नेली.  फलस्वरुप विद्यार्थ्यांची संख्या १,४०,००० वरून ३,६६,००० पर्यंत वाढली..

मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहासोबतच पहिलं फर्स्ट ग्रेड काॅलेज सुरू करण्याचं श्रेयही त्यांचंच..

सोबत म्हैसूर विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता..

हुशार मुलांना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, शेतकी–अभियांत्रिकी–औद्योगिक प्रशिक्षणासाठी महाविद्यालये, यासाठी त्यांनी दूरगामी नियोजन केलं..

“ उद्योगंधदे म्हणजे देशाची जीवनरेखा “ असं मानत त्यांनी रेशम-चंदन-धातू-स्टील– अश्या उद्योगांना जर्मन आणि इटालियन तंत्रज्ञांच्या मदतीनं विकसित केलं..

त्यांची धडपड आणि आशावाद निव्वळ स्वप्नाळू होता असं नाही.  तर ‘फंड’ हे वास्तव ध्यानात घेऊन त्यांनी बॅंक ऑफ म्हैसूरची मुहूर्तमेढ रोवली..

तब्बल ४४ वर्षे सक्रिय सेवा देऊन १९१८साली विश्वेश्वरैय्या लौकिकार्थानं निवृत्त झाले, तरी त्यांनी समाजजीवनातलं आपलं काम सोडलं नाही.  किंबहुना अडीअडचणीला भारतीय अभियंत्यांना प्रशिक्षित करून अनेक बंद पडलेली कामं मार्गी लावली..

म्हैसूरमध्ये ऑटोमोबाईल आणि एअरक्राफ्ट फॅक्टरीचं स्वप्न बघत त्यांनी एचएएल आणि प्रिमिअर ऑटोमोबाईलचं बीज पेरलं आणि निवृत्तीनंतरही बख्खळ काम करून ठेवलं..

आपल्या आयुष्यात असंख्य बहुमानांनी सन्मानित झालेल्या त्यांना १९५५ साली वयाच्या ९५व्या वर्षी जेव्हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न’ जाहीर झाला तेव्हा त्यांनी तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंना एक पत्र लिहिलं,– ” मला या उपाधीनं सन्मानित केलं म्हणून मी तुमचं कौतुक करेन अशी अपेक्षा तुम्ही बाळगलीत, तर तुमच्या पदरी निराशा पडेल..मी सत्यांच्या मुळाशी जाणारा माणूस आहे ”

नेहरूंनी त्यांच्या या पत्राची प्रशंसा करत त्यांना “ राष्ट्रीय घडामोडींवर बोलणं–शासकीय धोरणांवर टीका करण्याचं स्वातंत्र्य नेहमी अबाधित असेल..पुरस्कृत करणं म्हणजे शांत बसवणं नव्हे ”—

असं उत्तर दिलं..

वयाची शंभरी उलटल्यानंतरही विश्वेशरैय्या कार्यमग्न राहिले आणि १४ एप्रिल १९६२ या दिवशी रुढार्थानं हे जग कायमचे सोडून गेले असले, तरी इतिहासात त्यांचं नाव कायमचं कोरलं गेलं..

विश्वेश्वरैय्या हे ना जन्मानं महान होते,ना त्यांना कुठला दैदिप्यमान वारसा होता,ना हे महात्म्य त्यांचावर कुणी थोपवलं होतं..

कठीण परिश्रम–ज्ञानपिपासु वृत्ती–अथक प्रयत्न–समाजाभिमुख वर्तन,- यामुळं त्यांना हे ‘महात्म्य’ प्राप्त झालं होतं..

प्रचंड बुद्धिमान अभियंता आणि तितकेच कुशल प्रशासक असणाऱ्या विश्वेश्वरैय्यांचा जन्मदिन..

त्यांच्या सन्मानार्थ “ अभियंता दिन “ म्हणूनही साजरा केला जातो..

या ऋषितुल्य व्यक्तित्वाला विनम्र अभिवादन

समाप्त 

— प्रज्ञावंत देवळेकर 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: सावित्री ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ सावित्री ☆ सौ कुंदा कुलकर्णी ☆ 

सावित्री ही सृष्टी कर्त्या ब्रह्मदेवाची पत्नी. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली . महाप्रलयानंतर भगवान नारायण बराच काळ योग निद्रेत मग्न होते. ते जागृत झाले तेव्हा त्यांच्या नाभीतून एक दिव्य कमळ उगवले. त्या कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. ब्रम्हा हा विश्वाचा मूळ निर्माता, प्रजापती, पितामह आणि हिरण्यगर्भ आहे. पण अख्ख्या विश्वात त्याचे मंदिर फक्त राजस्थान येथील पुष्कर सरोवरात आहे. याचे कारण त्याची पत्नी सावित्री  हिने दिलेला शाप.

ब्रम्हा कृतयुगे

पूज्यस्त्त्रेतायां

यज्ञ उच्चते !

द्वापरे पूज्यते

विष्णूवहं

पूज्यश्चतुर्ष्वपि

( ब्रम्हांडपुराण)

कृतयुगात ब्रम्हा पूज्य, त्रेतायुगात यज्ञ पूज्य, द्वापार युगात विष्णू पूज्य व चारही युगात मी( शिव) पूज्य आहे. असे ब्रम्हांड पुराणात सांगितले आहे. या श्लोकावरून सुरुवातीच्या काळात ब्रम्हा ची पूजा प्रचलित होती हे समजते. त्यानंतर वैदिक धर्मात यज्ञयागा ला प्राधान्य मिळाले.

ब्रह्मा आणि त्यांची पत्नी सावित्री यांनी एकदा मोठा यज्ञ करायचे ठरवले. सृष्टीचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी पुष्कर येथे यज्ञाचे आयोजन केले. नारदादी सर्व देव , ब्राह्मण उपस्थित झाले. यज्ञा चा मुहूर्त जवळ आला पण सावित्री चा पत्ता नव्हता. मुहूर्त साधण्यासाठी भगवान विष्णूच्या आदेशाने ब्रह्माने नंदिनी गायीच्या मुखातून एका स्त्रीची निर्मिती केली. तिचे नाव गायत्री ठेवले. पुरोहितांनी ब्रम्हाचे तिच्याशी लग्न लावले व यज्ञास सुरुवात केली. इतक्यात सावित्री तेथे आली. आपल्या जागी गायत्री पाहून ती रागाने बेभान झाली. तिने ब्रम्हा ला शाप दिला की ज्या सृष्टीच्या कल्याणासाठी यज्ञ सुरू केलास आणि माझा विसर पडला त्या सृष्टीत तुझी पूजा कोणीही करणार नाही. तुझे मंदिर बांधण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा नाश होईल. पतिव्रतेचा शाप खरा ठरला व आज तागायत ब्रह्मदेवाचे मंदिर कुठेही बांधले गेले नाही. तिची शापवाणी ऐकून सर्व देव देवता भयभीत झाले त्यांनी तिला शाप मागे घेण्याची विनंती केली. काही वेळाने तिचा राग शांत झाला व तिने ऊ:शाप दिला या पृथ्वीवर के वळ पुष्कर मध्ये तुझी पूजा केली जाईल. तेव्हापासून पुष्‍कर खेरीज कुठेही ब्रह्मदेवाचे देऊळ नाही व पूजाही केली जात नाही.

सावित्रीने ब्रम्हा ला शाप दिलाच पण विष्णूनेही साथ दिली म्हणून त्याला ही शाप दिला की तुम्हाला पत्नी विरहाच्या यातना भोगाव्या लागतील. भगवान विष्णू ने राम अवतार घेतला त्यावेळी त्याला 14 साल पत्नी विरह सहन करावा लागला. नारदाने ब्रह्माच्या विवाहाला संमती दिली म्हणून नारदाला शाप दिला तुम्ही आजीवन एकटेच रहाल. नारद मुनींचे लग्न झाले नाही. ब्राम्हणांनी हे लग्न लावले म्हणून सर्व ब्राह्मण जातीला शाप दिला तुम्हाला कितीही दान मिळाले तरी तुमचे समाधान कधीच होणार नाही तुम्ही कायम असंतुष्टच रहाल. ज्या गायीच्या मुखातून गायत्री निर्माण झाली त्या गाईला शाप दिला की कलियुगात तुम्ही घाण खाल. व हे सारे अग्नीच्या साक्षीने घडले म्हणून अग्नीला शाप दिला की कलियुगात तुमचा अपमान होईल. राग शांत झाल्यावर कोणाचेही न ऐकता ती पुष्कर तीर्था च्या मागे रत्नागिरी पर्वतावर निघून गेली. त्या ठिकाणी सावित्री मंदिर बांधले आहे. समुद्रसपाटीपासून दोन हजार तीनशे फूट उंचीवर ते मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी शेकडो पायऱ्या चढाव्या लागतात. पण भाविक लोक आजही तिथे जातात.

राजस्थानात पुष्कर मध्ये ब्रम्हा इतकेच सावित्रीला पूज्य मानतात. तिला सौभाग्यदेवता मानतात. स्त्रिया भक्तिभावाने तिथे तिची पूजा करतात. तिथे मेंदी बांगड्या बिंदी तिला अर्पण करून भक्तिभावाने ओटी भरतात आणि सौभाग्याचे दान मागतात. इथे राहून सावित्री आजही आपल्या भक्तांचे रक्षण करते. अशी ही तेजस्वी पतिव्रता. पण अन्याय सहन करू शकली नाही. व तिचा राग योग्य असल्यामुळे ब्रह्मदेवाचे ही तिच्यापुढे काही चालले नाही. या सर्व प्रकारा मध्ये गायत्रीची काहीच चूक नव्हती म्हणून तिने तिला कोणताही शाप दिला नाही हे तिचे मोठेपण. आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या या मानी देवतेला कोटी कोटी प्रणाम.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शि ट्टी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ शि ट्टी ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“एक…. दोन…. तीन…. चार….

चार…. तीन…. दोन…. एक….”

लहानपणी शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासाला, एक, दोन, तीन, चार या ऑर्डरवर आणि नंतर गुरुजींनी त्याच ठेक्यात वाजवलेल्या शिट्टीच्या तालावर, माझ्या पिढीतल्या अनेकांना कवायत केल्याचे आठवत असेल !  एवढ्या लहानपणी शिट्टीशी येणारा आपला (निदान माझा तरी) तो तसा पहिलाच प्रसंग असावा ! गुरुजींच्या गळ्यात, रंगीत दोऱ्यात अडकवलेल्या, स्टीलच्या चकचकित शिट्टीचा आवाज अजूनही माझ्या कानात घुमतो आहे ! त्या काळी, ती इतक्या जोरात कशी वाजते, ह्याचेच अप्रूप वाटायचे ! पण या शिट्टीच्या आवाजाचे वर्णन आपल्या मराठी साहित्यात, फु s s s र s s s, फु s s s र s s s  असे करण्याचा पहिला मानकरी किंवा पहिली मानकरीण (शिट्टी हा स्त्री लिंगी शब्द असल्यामुळे आणि तिचा स्त्रियांशी जवळचा संबंध येतो हे नंतर वयात आल्यावर कळल्यामुळे, ही शंका मनांत डोकावली, इतकंच !) कोण असावा अथवा असावी, हा माझ्या मते संशोधनाचा विषय होईल !कारण बशीतून चहा पितांना काही जणांच्या तोंडातून येणाऱ्या आवाजाचे वर्णन सुद्धा अनेक विद्वान लेखक, लेखिकांनी फु s s s र s s s, फु s s s र s s s असेच केल्याचे आढळते ! आपली मराठी भाषा एवढी समृद्ध असतांना, दोन टोकाच्या, दोन वेगवेगळ्या आवाजांसाठी एकाच प्रकारची शब्द रचना वाचतांना, माझ्या कानांत नेहमी वेगळीच शिट्टी वाजते, एव्हढं मात्र खरं ! असो !

पुढे शालेय जीवन संपता संपता, कॉलेज प्रवेशाच्या आधी माझे बरेचसे मित्र वेग वेगळ्या प्रकारच्या शिट्ट्या, तोंडाने वाजवण्यात पारंगत झाले होते ! त्याचा काही मित्रांना कॉलेजच्या उर्वरित वर्षात चांगलाच उपयोग झाला ! कारण त्यांनी घातलेल्या शिट्टीरुपी कुहू कुहूला, त्यांच्या त्यांच्या मैनांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे, भविष्यात त्या पैकी काहींची लग्ने आपापल्या मैनांशी झाली ! पुढे हेच यशस्वी कोकीळ संसारात पडल्यावर, आपापल्या मैनांचा “अहो, जरा चार शिट्ट्या झाल्यावर आठवणीने कुकर खालचा गॅस बंद करा !” असा आदेश ऐकायची सवय त्यांना करून घ्यावी लागली, हा भाग निराळा ! पण कॉलेजातील काही उर्वरित कमनशिबी कोकीळ, मैनांना भुलवण्याच्या नादात शिट्ट्या वाजवून, वाजवून आपापल्या तोंडाची नुसतीच वाफ फुकट घालवत राहिले ! काही वात्रट मित्रांच्या म्हणण्यानुसार, त्या सगळ्या मित्रांच्या फुकट गेलेल्या वाफेच्या एकत्रित शक्तीवर, माथेरानला जाणाऱ्या आगगाडीचे छोटे इंजिन नक्कीच धावले असते म्हणे !

इंजिनावरून आठवण झाली. ज्या काळात आम्ही आत्ताच्या “ट्रेनला” आगगाडी म्हणायचो, त्या अठरा वीस डब्याच्या अजगरा सारख्या लांबच लांब मेल किंवा एक्सप्रेसमधून प्रवास करायची बरेच वेळा त्या काळी वेळ आली ! तेंव्हा त्या गाडीचा गार्ड, गाडी सुटतांना जी शिट्टी फुकायचा ती इतकी कर्कश्य असायची की, फलाटावरच्या हजारो लोकांचा गोंगाट भेदून, वीस डबे सोडून असलेल्या इंजिन ड्रायव्हरला बरोब्बर ऐकू येत असे ! मग तो इंजिन ड्रायव्हर सुद्धा ऑल क्लिअरचा हिरवा झेंडा गार्डच्या दिशेला फडकावून, एक दोन दणदणीत इंजिनाच्या शिट्ट्या देवून आगगाडी सुरु करत असे ! गेले ते दिवस उरल्या त्या फक्त आठवणीतल्या अशा शिट्ट्या !

फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे असं बघा जेंव्हा पोलीस त्यांच्या निळ्या टोपी पासून निळी हाफपॅन्ट अशा गणवेषात होते, तेंव्हा त्यांची ती स्टीलची लांबूडकी शिट्टी नुसती ऐकून चोर एका जागी थिजून जात असत ! एवढी ताकद त्या काळी फक्त त्यांच्या शिट्टीत होती ! पण सध्या गणवेशापासून सारेच ‘खिशाचे गणित’ बदलले असल्यामुळे त्या पूर्वीच्या शिट्टीला सध्याच्या युनिफॉर्ममधे खिसाच नाही, मग ती शिट्टी तरी कशी असेल ? कालाय तस्मै नमः !

एखाद्या कलाकाराची रंगमंचीय कला पिटातल्या प्रेक्षकाला आवडल्यावर, त्या कलाकाराला वन्समोअरसाठी वाजणाऱ्या टाळयांच्या जोडीला, वाजणाऱ्या शिट्यांची जातकुळी फार म्हणजे फारच वेगळी असते मंडळी ! त्या टाळ्या, शिट्या ऐकून एखादा कलाकार प्रेक्षकांची वन्समोअरची हौस पुरवतो सुद्धा, पण त्या साऱ्या गदारोळात खऱ्या रसिक प्रेक्षकांची फारच गोची होऊन जाते ! रंगमंचीय कला अविष्काराला अशी दाद मी एकवेळ समजू शकतो, पण चित्रपटगृहात हिरोच्या एखाद्या डायलॉगवर किंवा हिरोईनच्या नाचावर, तो आवडला म्हणून कानठळ्या बसण्या इतक्या शिट्ट्या वाजवायच प्रयोजन, माझ्या सारख्या रसिक प्रेक्षकाच्या बुद्धीच्या आकलना पलीकडलं आहे !

सांप्रतकाळी समस्त महिला वर्ग, पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात यशस्वीपणे बरोबरी करत असतांना, या शिट्टी वाजवायच्या पुरुषांच्या पूर्वी पासून मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात कशा बरे मागे राहतील ? उदाहरणच द्यायच झालं, तर काही भगिनी शिट्टीवर वेगवेगळी गाणी म्हणण्याचे दोन अडीच तासाचे स्वतंत्र कार्यक्रमच सध्या सादर करत आहेत, हे आपल्याला ठाऊक असेलच !

मंडळी, सध्या मी शिट्टीचा जनक कोण ?  याच बरोबर ती शिट्टी पहिल्यांदा कोणी कशी वाजवली व त्याच्या आवाजाचे त्या काळी कोणावर कसे चांगले अथवा वाईट परिणाम झाले या विषयी संशोधन करत आहे ! पुढे मागे ‘शिट्टी’ विषयावरच एखादा प्रबंध लिहून, तो उत्तर प्रदेश मधल्या एखाद्या युनिव्हर्सिटीत सादर करून, डॉक्टरेट पदरात पाडून घ्यायचा विचार माझ्या डोक्यात शिट्टी वाजवून गेलाय एवढं मात्र नक्की !

ता. क. – उत्तर प्रदेशातल्या अनेकांनी “शिट्टी!” याच विषयावर आधीच डॉक्टरेट मिळवल्याचे कळले ! पण मी आशा सोडली नसून, मध्य प्रदेशातील एखाद्या युनिव्हर्सिटीत मी माझी “शिट्टी!” वाजवायचीच, असा निर्धार केला असून, आपल्या “शिट्टी” रुपी शुभेच्छांची या कामी मला नक्कीच मदत होईल !

© श्री प्रमोद वामन वर्तक

३०-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मेरा देश बदल रहा है.. ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ मेरा देश बदल रहा है… ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

केंद्र सरकारकडून नुकताच ‘ पद्म पुरस्कार वितरण समारंभ ‘ संपन्न झाला . यंदा अनेक सामान्य व्यक्तींना त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यांच्यापैकीच एक नाव म्हणजे पर्यावरणवादी तुलसी गौडा. तुलसी गौडा यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्रीने सन्मानित केले .

तुलसी गौडा यांना त्यांच्या झाडे व वनस्पतींच्या अफाट ज्ञानामुळे  ‘एनसायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट’ असे म्हटले जाते.

72 वर्षीय तुलसी गौडा मागील अनेक दशकांपासून जंगल संवर्धनाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी कार्य करत आहेत. गौडा या कर्नाटकच्या होनाल्ली गावातील आहेत. हलाक्की आदिवासी कुटुंबात वाढलेल्या तुलसी यांनी एकटीने राज्यात लाखो झाडे लावली आहेत.

त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र त्यांना झाडे आणि औषधी वनस्पतीचे अफाट ज्ञान आहे. वनविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वनीकरणाच्या कार्यक्रमात देखील त्या सहभागी होतात व स्वतः लावलेले झाड वाढत नाही तोपर्यंत त्याची काळजी घेतात.

अश्या या महान समाजसेविकेच्या चरणी लक्ष लक्ष प्रणाम —-

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-1 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ मी मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या – भाग-1 – प्रज्ञावंत देवळेकर ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

गोष्ट आहे इथली भारतातलीच जेव्हा इथं इंग्रजांचं राज्य होतं..

कुठल्यातरी लोहमार्गावर प्रवाश्यांनी खच्चून भरलेली रेल्वे चालली होती आणि प्रवाशांत काही मोजक्या भारतीयांसोबत बरेचसे इंग्रज मंडळीही होते..

त्या रेल्वेच्या एका डब्यात साध्या पोशाखातला एक सावळासा शिडशिडीत तरुण प्रवासी शांतपणं खिडकीबाहेरचा निसर्ग न्याहाळत होता..

त्या तरुणाचं रंगरूप आणि कपडे बघून त्याला अडाणी समजणारे काही इंग्रज प्रवासी आपसात कुजबूज करत हसत होते..

‘आपल्यालाच हसतायेत’ हे ठाऊक असूनही तो साधा सावळा तरुण त्यांचाकडं लक्ष्य न देता आपल्याच विचारात दंग होता आणि हे बघून त्याच्याबद्दल कुजबूज करणारे जास्तच हसत होते..तेवढ्यात ‘त्या’ तरुणानं अचानक उभं रहात रेल्वेची साखळी खेचली..

एव्हाना रेल्वेनं वेग पकडला होता पण या तरुणानं साखळी ओढल्यानं रेल्वे अचानक थांबली..

‘ हा आपली तक्रार करतो की काय? याला इथं उतरायचं तर नसेल? वेडा तर नाही?’ सहप्रवाश्यांच्या मनात एक ना अनेक शंका डोकावल्या..

काहींनी तर त्याला बावळट,मूर्ख म्हणत शिव्याही घातल्या..

तेवढ्यात डब्यात गार्ड आला आणि त्यानं अंमळ रागातच विचारलं,” कुणी आणि का साखळी खेचली रे ?” 

साखळी खेचणारा साधासा तो तरुण पुढं आला– ‘ मी खेचली.’ त्याचं हे उत्तर ऐकून गार्डनं त्याला खालून वर न्याहाळलं आणि काही बोलणार तोच तरुण पुढं सांगू लागला,” मला वाटतं इथून साधारण काही फर्लांग अंतरावर रेल्वेचा रूळ तुटलाय.”

“ॲंऽऽ तुला इथूनच कसं कळलं बुवा? ” गार्ड अद्यापही रागातच होता..

“ महोदय..गाडीच्या नैसर्गिक वेगात थोडा फरक पडलाय आणि रुळांतून येणारा आवाजही मला काहीसा बदलल्यासारखा वाटतोय..ही धोक्याची घंटा आहे..”

“अच्छा एवढी हुशारी? चल बघूनच घेऊ”– म्हणत गार्ड त्या तरुणाला घेऊन डब्यातून खाली उतरला..

फर्लांगभर अंतरावर बघतो तर काय? एका ठिकाणी रुळाचा जोड खरोखरच निखळला होता, आणि नटबोल्ट इतस्तत: पसरले होते..

हे सगळं बघून इतर प्रवाश्यांचे अन् विशेषत: इंग्रजांचे तर डोळे पांढरे झाले..

त्या साध्याश्या तरुणाच्या समजदारीमुळं मोठा अपघात टळला होता..लोकं त्याचं कौतुक करू लागले..इंग्रजासोबतच गार्डलाही स्वत:ची क्षणभर लाज वाटली ‘आपलं नाव? ’ त्यानं अदबीनचं तरुणाला विचारलं..

“मी मोक्षगुंडम विश्वेशरैय्या..मी एक अभियंता आहे”

त्याचं नाव ऐकून सगळेच क्षणभर स्तब्ध झाले कारण या नावानं तोपर्यंत देशभरात ख्याती मिळवली होती..

लोकं त्या तरुणाची माफी मागू लागले..”अरे पण तुम्ही माफी का मागताय?” विश्वेश्वरैय्यांनी हसत विचारलं..

“ते..आम्ही..तुमची जरा खिल्ली..”

“ मला तर नाही बुवा काही आठवत. ” मंद स्मित करत विश्वेश्वरैय्यांनी सगळ्यांना लागलीच माफही करून टाकलं..

१८८३साली अभियांत्रिकी परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विश्वेश्वरैय्यांचं पहिलं प्रेम ‘ स्थापत्य अभियांत्रिकी ’ अर्थात सिव्हिल इंजिनिअरींग..

आपल्या करीयरच्या पहिल्या काही वर्षातच —-

त्यांनी कोल्हापुर-बेळगाव-धारवाड-विजापूर-अहमदाबाद-पुणे, इथं शहरांसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा योजनेत भरपूर काम केलं..

१९०९ साली त्यांची म्हैसुर राज्याचा ‘ मुख्य अभियंता ‘ म्हणून नियुक्ती झाली.  सोबतच रेल्वेचं सचिवपदही मिळालं..

तिथं ‘कृष्णराज सागर’ धरणनिर्मितीत त्यांच्या योगदानाबद्दल भरपूर चर्चा झाली, कारण यामुळं प्रचंड मोठं क्षेत्र पाण्याखाली आलं होतं आणि वीजनिर्मितीसोबतच म्हैसुर-बंगलोर या शहरांना पाणीपुरवठाही झाला..

‘कृष्णराज सागर’ धरण विश्वेश्वरैय्यांच्या तांत्रिक कौशल्याचं अन् प्रशासकीय वकुबाचं प्रतीक ठरलं..

आता सोपं वाटत असेल, पण त्याकाळी इतकी मोठाली धरणं बांधणं तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड होतं..हायड्रोलिक इंजिनिअरींग तितकीशी विकसित नव्हती. आणि सगळ्यात मोठं आव्हान तर सिमेंटचं होतं..इतकं सिमेंट आणायचं कुठून? तेव्हा देश याबाबतीत संपूर्णपणे आयातीवर अवलंबून होता. आणि थोडक्यात सांगायचं तर ऐपतही नव्हती..

जलाशयात पाणी नियंत्रित करण्यासाठी विश्वेश्वरैय्यांनी पुस्तकापलिकडं जात विशेष तांत्रिक प्रयोग केले..त्यांनी धरणाच्या भिंतीजवळ विहिरीसदृश्य गोलाकार संरचना केली आणि त्यांना स्वयंचलित दरवाज्यांशी जोडलं, आणि दरवाजे धरणाच्या भितींच्या आत बसवले..

क्रमशः….

— प्रज्ञावंत देवळेकर 

संग्राहक – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर

मो. 9822363911

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ अजून त्या झुडुपांच्या मागे……कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ अजून त्या झुडुपांच्या मागे……कवी वसंत बापट ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆ 

वसंत बापट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमीत्त…

वसंत बापट यांचे खरे नाव विश्वनाथ वामन बापट. पण त्यांचे साहित्यविश्वातले प्रसिद्ध नाव मात्र वसंत बापट कवी, ललीत गद्यलेखक. प्रवासवर्णनकार, स्वातंत्र्यशाहीर, वक्ता, प्राध्यापक म्हणून जनमनात त्यांची प्रतिमा आहे..

वसंत बापटांच्या आयुष्याची घडण आणि त्यांची कविता यांच्यात निकटचे नाते आहे. सामाजिक आणि राष्ट्रीय अंदोलनाच्या काळात, समाजात जागृती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी काव्य लेखन केले. जनजागरण हे त्यांच्या प्रारंभीच्या कवितेचे प्रयोजन होते. राष्ट्रीय गीते, स्फूर्तीगीते, पोवाडे, वगनाट्ये, लिहीली. त्यामुळे त्यांच्या कवितेचे रुप प्रचारात्मक होते.

पण तरीही बापट मूलत: प्रेमकवीच आहेत.

कवी स्व वसंत बापट

प्रेमभावनाआणि निसर्ग चित्रण यांचे सहचर्य बापटांच्या कवितेत दिसून येते.प्रेमभावनेच्या अविष्कारासाठी पार्श्वभूमी म्हणून बापटांनी निसर्ग जवळ केला आहे…

अशीच एक मनातली कविता अथवा ओठावरचं गाणं,अगदी ह्रदयात वसलेलं म्हणजे…

 

अजुन त्या झुडपांच्या मागे

सदाफुली दोघांना हसते

,अजुनी आपुल्या आठवणींनी

शेवंती लजवंती होते..

 

तसे पहाया तुला मला ग

अजुन दवबिंदु  थरथरतो

अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव

अजुन ताठर चंपक झुरतो..

 

अजुन गुंगीमधे मोगरा

त्या तसल्या केसांच्या वासे

अजुन त्या पात्यात लव्हाळी

होतच असते अपुले हासे

 

अजुन फिक्कट चंद्राखाली

माझी आशा तरळत आहे

गीतांमधले गरळ झोकूनी

अजुन वारा बरळत आहे…

हे गाणं आठवणीतलं.वारंवार ऐकावं असं..

अतंत्य हळुवार आणि भावपूर्ण काव्य!

या काव्यात गतायुष्यातल्या प्रेमाच्या मधुर सुखद आठवणी आहेत.त्या आठवताना कवीचं मन अत्यंत कोमल झालेलं आहे.अगदी फुलासारखं नाजुक नितळ सुगंधी..

अजुन त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते..

इथे झुडुप याचा अर्थ चाकोरीत गुंतलेलं जीवन.

आणि त्या झुडपाच्या मागे प्रीतीच्या आठवणी दडल्यात .आणि त्याकडे पाहून मनातली सदाफुलीही अशीच हळुच हसते…

या संपूर्ण कवितेत प्रीतीविषयक भावनांना सदाफुली, शेवंती दवबिंदु ,चंपक मोगरा लव्हाळी यांचं रुप दिलं आहे…

तसे पहाया तुला मला ग अजुन दवबिंदु थरथरतो…

ताठर चंपक झुरतो..

विसरायचंच असा निर्धार केलेल्या मनाला ताठर चंपकाची उपमा दिली आहे…पण उत्कट भावनांमुळे त्याचा ताठरपणा लवचिक होतो आणि अंतस्थ तो झुरत आहे..

प्रेमकाव्य उलगडतांना, या निसर्गातल्या कोमलतेचा त्यांनी रुपकात्मक आधार घेतला आहे… दवबिंदुंचं थरथरणं, झुरणारा चंपक  या कवीच्या अस्तित्वाचाच भाग आहेत. भावनांना यांत सहज गुंतवले आहे… एकेकाळचे त्यांच्या प्रीतीचेही ते साक्षीदार अजुनही मनांत दडलेले आहेत… पुन्हा एकदा मीलनाची ओढ असणार्‍या कवीमनाला हे कुठेतरी आतून जाणवत आहे..

प्रेयसीच्या आठवणींनी थरथरणं, झुरणं हे व्यक्त करताना त्यांनी किती सुंदर निसर्ग चित्रच मनासमोर साकारलं आहे.

कवीने प्रांजळपणे सांगितलं आहे की पात्यांमधल्या लव्हाळ्याचं हंसणं,तिच्या केसात माळलेल्या मोगर्‍याचा सुगंध अजुनही मनात तसाच दरवळत आहे.

शेवटच्या कडव्यात कवी अधिक भावुकआणि आशावादी आहे.

अजुन फिकट चंद्राखाली

माझी आशा तरळत आहे

गीतामधले गरळ झोकूनी

अजुन वारा बरळत आहे..

 

फिकट चंद्राखाली हे शब्द प्रीतीच्या अंधुक धूसर

पूर्णत्वासाठी आहे..अंत:र्मनात एक कोंडलेला वारा अजुनही आहे आणि तोच  मनातलं हे मीलनाच्या आशेचं गरळ या माझ्या गीतांतून बरळत आहे…

यात गरळ, बरळत आहे हे कठोर शब्द संस्कारक्षम मनावर चढवलेल्या मुखवट्यांना प्रवाहाविरुद्ध जाऊन फोडणार्‍या मानसिकतेसाठी वापरले आहेत.

बाकी शब्दांची कोमलता,आणि भावनांचा झुळझुळता काव्यरुपी झरा अत्यंत नादमयआणि लयबद्ध आहे..खरोखरच ,मनावर हळुहळु पांघरत जाणारी ,धुंद करणारी ही प्रेमाची  काव्यरचना आहे..

 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गरज क्रांतीकारकांची… ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ गरज क्रांतीकारकांची… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

माणूस परंपरेला चिकटून जगण्यातच धन्यता मानतो. तिथेच जीवनाची सार्थकता शोधत जगत राहतो.  त्याची ही जीवनशैली बदलण्यासाठी एका  तत्त्वनिष्ठ अजोड क्रांतीची गरज भासते आणि मग वेळोवळी सामाजिक गरजे नुसार तिच्यात काही बदलही घडत जातात. शस्त्राच्या धाकाने घडवला जाणारा बदल हा क्रांतीचा पहिला प्रकार आहे. पण घडलेली ही क्रांती तात्कालिक असते. कालांतराने तिच्यावर परंपरेचे दडपण येते. ती क्षीण बनते आणि शेवटी परिणाम शुन्य ठरते. प्रगतिशील विचार मांडणी आणि त्या नुसार विचारपूर्वक  केली जाणारी कृती हा क्रांतीचा दुसरा प्रकार आहे. पण हिच्यात सर्वसंमतीचा अभाव जाणवतो म्हणून तिच्यात म्हणावा तसा प्रभावी प्रभाव दिसत नाही. शिक्षणातून घडणारी क्रांती हा तिसरा प्रकार. ही क्रांती मात्र चिरंतन टिकणारी असते. कारण ती व्यक्तीमनाचा ठाव घेणारी असते व तिला भक्कम मजबूत पाया प्राप्त झालेला असतो. जनात होणा-या क्रांतीपेक्षा मानवी मनात होणारी क्रांती ही सर्वश्रेष्ठ असते आणि ती दिर्घ काळ टिकते. शिक्षणाने मने प्रगल्भ होतात. पहिल्या दोन्ही क्रांती शिक्षणामुळेच घडत असतात. म्हणूनच शैक्षणिक क्रांतीला सर्वोच्च स्थान प्राप्त झाले आहे हे नक्की. व्यक्तिच्या अंगी असणा-या सुप्त गुणांचा विकास, मानवी कर्तृत्वाला पोषक वातावरण निर्मिती, जीवन समृद्ध करणा-या चिरंतन मुल्याना प्रोत्साहन, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची शिकवण , आणि माणसाला मिळालेल्या मूलभूत  स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे कार्य ख-या अर्थाने शैक्षणिक क्रांतीच करत असते. म्हणूनच ती स्थायी स्वरुपाची  क्रांती आहे. आणि तिची  प्रेरणा गुरू मुळेच मिळते. जो माणसाला  अज्ञानापसून मुक्त करतो, वैचारिक दाशस्यातून व गुलामगिरी तून मुक्त करतो, जातीपातीच्या परंपरागत कैदखान्यातून मुक्त करतो, भूतकाळाच्या उसन्या आवेशातून मुक्त करतो, मानवीस्वभावात साठून राहिलेल्या विकृती पासून मुक्ती मिळवून देतो, लिंगभेदाच्या परंपरागत जाचक जुनाट समजुतींच्या विळख्यातून मुक्त करून नवविचार प्रेरणा देतो. तोच खरा गुरू असतो. तोच जीवनाला आकार देणारा मार्गदर्शक ठरतो.

माणसाला आपल्या जीवनमूल्यांची खरी जाणीव होऊन त्याच्या जीवनाला पूर्णत्व आणि कृतार्थता प्राप्त  करून घ्यायची असेल तर, माणसाच्या अंगी प्रज्ञा , प्रतिभा , प्रार्थना , नम्रता , प्रयत्न , व कृतज्ञता या सहा गुणांचा सुंदर समन्वय असणे अत्यावश्यक आहे. प्रज्ञा माणसाचा सर्वांगीण विकास करून योग्य सुधारणावादी पर्यावरण बनवते. प्रतिभेच्या साथीला सहवेदना आणि संवेदनशीलता असेल तर माणसाला सखोल स्वरुपात समजून घेता येते. त्या योगाने नाविन्यपूर्ण नव निर्मीती ही करता येते. माणसाच्या अंगी असणारा अहंकार नष्ट करून माणसाला ईश्र्वराच्या सानिध्यात नेण्यासाठी प्रार्थनेची आवश्यकता असते. नंम्रता माणसाच्या अंगी असणा-या मूलभूत स्वरुपाच्या चांगल्या गुणवत्तेला विनंम्रभावे अभिवादन करते. प्रयत्न माणसाला प्रगतीची वाटचाल करायला शिकवत उन्नतीच्या व यशाच्या दिशेने मार्गाक्रमण करावयास प्रेरणा देतो. कृतज्ञता माणसाला माणुसकी शिकवते. माणसांशी जवळीक साधते व केलेल्या उपकाराचे स्मरण ठेवून समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रवृत्त करते. प्राप्त परिस्थितीशी अथक संघर्ष करत उद्दिष्टांच्या दिशेने वाटचाल करणे वाटते तितके सोपे नाही. पण जो ध्येयोपासक असतो तो साधक बनतो . साधनाकरतो. आणि सा-या संकटावर मात करत यशाची वाट निर्धोकपणे चालत राहतो . त्यालाही क्रांतीच म्हणावे लागेल. मानवी जीवनात सुखापेक्षा दु:खेच अधिक असतात. पण जे दुःखाने दु:खी होत नाहीत,ते दु:खालाच दु:खी करून सहज विजय मिळवतात तेच खरे क्रांती कारक असतात. ते आपल्या दु:खाचे कधीच प्रदर्शन मांडत नाहीत. त्याचे भांडवलही करत नाहीत आणि त्यांच्या पुढे शरणागतीही पत्करत नाहीत. आज अशाच क्रांतीकारकांची गरज आहे. ते मिळाले तर भारत पुन्हा सुवर्ण भूमी होईल. यात काही शंका नाही. आजच्या काळाची ही प्रमूख गरज आहे .असे मला वाटते.

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ लोककथा ७८ ☆ सुलू साबणे – जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ लोककथा ७८ ☆ सुलू साबणे – जोशी ☆

“लोककथा ७८” 

शोषितांच्या व्यथा मांडणारं – एका घटनेवर आधारित – “लोककथा ७८” हे श्री.रत्नाकर मतकरी लिखित नाटक ‘बालगंधर्व रंगमंदिरा ‘त होणार होतं. मी आणि अशोक डेक्कन जिमखाना बस-स्टँडवर उतरून ‘बालगंधर्व’ कडे चालत निघालो.  रंगमंदिराच्या बरंचसं अलिकडेपासून भिकार लोकं ठिकठिकाणी अर्धेउघडे, कळकट, हातात गाठोडी, अलमिनची भगोली, काठ्याबिठ्या असं किडुकमिडुक सामान घेऊन – खूप चालून आल्यावर दमून अंग टाकतात, तशी दिसू लागली. असे पोटासाठी भटकत फिरणारे तांडे दिसायचे/ दिसतातही अजून अधूनमधून ! तर ही माणसे पार रंगमंदिरांतसुद्धा आडवारलेली दिसली. त्यांचं अवतीभंवती लक्षच नव्हतं. तेवढं त्राणही त्यांच्या अंगात दिसत नव्हतं. समजेचना काही. अशा राजरस्त्याला असा तांडा कधी थांबत नाही. हे लोक कसे, मोकळ्या जागेत, तेही पाणवठ्याकाठी, पण एकत्र दिसत. मनात आलं, यांना कुणी हटकलं कसं नाही? एकीकडे त्यांची अवस्था बघवत नव्हती. पहिली घंटा झाली. आम्ही अस्वस्थ मनाने आत जाऊन बसलो. तिसरी घंटा झाली, पडदा सरकत गेला— आणि मागच्या दारांमधून हे सर्व ‘भिकार’ लोक  आवाज न करता प्रेक्षकांतून चालत रंगमंचावर पोहोचले– आणि नाट्यप्रयोग सुरू झाला. प्रयोग तर  जीवघेणा सुंदर झाला. संपल्यावर सर्व प्रेक्षागृह खिन्नमनस्क,  सुन्नमनस्क अवस्थेत बुडून गेलं होतं. लेखक मतकरींनी दिग्दर्शनातही बाजी मारली होती. या नाट्यप्रयोगाने ठराविक साचा मोडला, रंगमंच आणि प्रेक्षागृहातल्या अदृष्य भिंती नष्ट केल्या– आणि हे नाटक अंगावरच आलं. मनाचा ठाव घेऊन ‘गेलं’, असं म्हणणार नाही, पण ते तिथं ठाव मांडून बसलंय, हे इतक्या वर्षांनीसुद्धा जाणवतं आहे – अशा वयांत, जेव्हा नावं, संदर्भ, सगळं सगळं पुसट होऊ लागतं – तेव्हा श्री. मतकरी आपल्याला किती विविध गोष्टींशी कायमचे जोडून गेलेत आणि आपल्या जाणिवा आणि आयुष्य समृद्ध करून गेलेत, हे लक्षांत घेऊन नतमस्तक व्हावेसे वाटते. त्यांना कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली !!!

 

— सुलू साबणे – जोशी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares