माणसाचं मन किती विचित्र असत ना.?? आता इथे तर क्षणांत दुसराच विचार मनात डोकावून पहातो…
मन कधीच शांत किंवा स्थिर नाही रहात..सतत काही न काही विचार हे चालूच असतात मनांत….अगदी झोपेतही…
मन कधीच समजू शकत नाही आपण त्याला…त्याचा थांग लागण खरचं खूप अवघड..कधी ते अगदी लहान वाटतं…मुंगीप्रमाणे…तर कधी गरुड होऊन उंच आकाशी भरारी मारू लागतं….
या मनाचे ना अनेक कप्पे आहेत..काही उलगडणारे..सहज..सोपे तर काही न उलगडणारे… गूढ…
या गूढ कप्प्यात अनेक आठवणी बंदीस्त करून ठेवलेल्या असतात जणू…अन बाहेर लावलेलं असतं भल मोठं कुलूप…अहंकाराच…
हा अहंकार जेंव्हा वितळू लागतो तेंव्हा हे कुलुपही नकळत तुटून पडत…अन अनंत आठवणी फेर धरू लागतात या मनभोवती….या आठवणीतून बाहेर पडणे वाटत तितकं सोपं नक्कीच नसत….त्यासाठी हवा असतो एक भरभक्कम आधार…प्रत्येकालाच..
असा आधार..अशी साथ ज्याला लाभते..तो खरचं खूप भाग्यवान… मनाच मनाशी जुळलेलं नातं जर घट्ट असेल तर कितीही वादळ आली तरी हातातले हात सुटत नाहीत…आणि मन पुन्हा गुंतू लागतं त्या अलवार मिठीत….त्याच्या प्रेमात…त्याच्या स्वप्नांत… जो ठाम उभा असतो प्रत्येक वादळात… आपल्यासमोर..
☆ केल्याने होत आहे रे… ‘बालसखा’ ची निर्मिती ☆ श्री आनंदहरि ☆
आयुष्य हे अनाकलनीय असते असे म्हणले तर ते फारसे चुकीचे होईल असे वाटत नाही.. एखादी गोष्ट ठरवूनही, प्रयत्न करूनही साध्य होतेच, घडतेच असे नाही. तसेच ध्यानी-मनी नसताना एखादी चांगली गोष्ट मात्र घडून जाते, साध्य होते… ‘ बालसखा ‘ या बाल-कुमारांच्या साहित्याने आणि चित्रांनी नटलेल्या दिवाळी-बालदिन अंकाबाबत असेच झाले.
इस्लामपूर येथील आमच्या ‘नटरंग ‘ या नाट्यसमुहाचे प्रमुख अमृत शिंगण यांचा ३० ऑक्टोबरला फोन आला. ख्यालीखुशाली विचारून झाली आणि त्यांनी अचानक विचारले,
‘एखादा छोटासा दिवाळी अंक काढता येईल काय ? ‘
या प्रश्नाने मनात उलट सुलट विचार सुरू झाले… छोटासा दिवाळी अंक काढण्याचा विषय आणि दिवाळी तर तोंडावर आलेली ? सहज दिनदर्शिका पाहिली.. ३० ऑक्टोबरला ठळक अक्षरात नमूद असणाऱ्या तिथीवर नजर गेली.. सफला एकादशी.. मुहूर्त.. तिथी याचा कधीच विचार करत नसतानाही सहज मनात आले- ‘प्रयत्न करायला’ काय हरकत आहे ? लगेच चर्चाही झाली. शब्दशिल्प प्रकाशनच्या दिलीप क्षीरसागर सरांची सक्रीय साथही लाभली.
लहान मुलांच्या साहित्यलेखनाला, चित्रकलेला एक व्यासपीठ मिळावे म्हणून बाल-कुमारांच्या साहित्याने आणि चित्रांनी सजलेला छोटासा दिवाळी-बालदिन अंक, नटरंग ग्रुप, इस्लामपूर आणि शब्दशिल्प प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. आणि नामकरण ही झाले ‘बालसखा ‘
‘बालसखा ‘ बालदिनी प्रकाशित करण्याचे निश्चीतही झाले…हातात केवळ १५ दिवसांचा अवधी होता.. छपाई, बांधणीसाठी आठ दिवस लागणार होते. चर्चा झाली, सगळे ठरले त्यावेळी अचानक ‘त्रिशूल ‘ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध संवाद आठवला,
“मै पांच लाख का सौदा करने आया हूँ, मगर इस वक्त मेरी जेब में पांच फुटी कवडियां भी नही है !”
स्थिती साधारण तशीच होती. त्याच दिवशी सर्व साहित्य समूहावर मुलांनी स्वलिखित साहित्य, चित्र पाठवण्याचे आवाहन पाठवले. दोन दिवसांतच मिरज येथील बालकवयित्री हर्षदा महेशकुमार कोष्टी हिची कविता आणि नागपूर येथून बालचित्रकार तन्मय सिताराम माटे आणि पुण्याहून ईशान्वी कुलकर्णी यांची चित्रे आली. मनाला हुरूप आला. नंतर साहित्य, चित्रे येतच राहिली… ‘ बालसखा ‘अंकातील साहित्यकृतीसाठीची चित्रे-रेखाटने इस्लामपूर येथील नववीमध्ये शिकणाऱ्या कु.वैष्णवी टिळे हिने रेखाटायलाही सुरवात केली आणि चित्रकार गणेश पोतदार यांनी अल्पावधीतच अतिशय सुंदर मुखपृष्ठचित्र दिले.
वेळापत्रक आखले होते त्यानुसार ३२ पृष्ठांचा ‘ बालसखा ‘अंक तयार होऊन छापायला गेला. नियत वेळेनंतर आलेले साहित्य, चित्रे समाविष्ट करता आली नाहीत. अगदी कमी वेळेत ‘बालसखा’ अंकाची निर्मिती झाली असल्याने काही त्रुटी राहणे साहजिकच होते.. पण पुढील वर्षी नियोजनबद्ध, पुरेसा अवधी घेऊन याहून अधिक पृष्ठांचा ‘ बालसखा ‘अंक प्रकाशित करण्याचे निश्चितही झाले. एवढ्या कमी कालावधीतही सांगली जिल्ह्याबरोबरच सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, नागपूर जिल्ह्यातून बाल-कुमारांचे साहित्य, चित्रे प्राप्त झाली, प्रसिद्ध करता आली याचा आनंद झाला.
ठरवल्याप्रमाणे १४ नोव्हेंबरला बालदिनादिवशी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वासराव सायनाकर सर, वाचन चळवळीत अग्रभागी असणारे नामवंत साहित्यिक, वक्ते प्रा. संजय थोरात, प्रसिद्ध कवी आणि ‘प्रतिभा’ दिवाळी अंकाचे संपादक धर्मवीर पाटील, मुक्तांगणचे विनोद मोहिते यांच्यासमवेत प्रातिनिधिक बाल-कुमार साहित्यिक-चित्रकारांच्या हस्ते आणि बाल-कुमार व त्यांच्या पालकांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ बालसखा ‘ चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
‘बालसखा’ चा निर्मिती प्रवास आठवताना, अंक पाहताना शालेय जीवनात गुरुजनांनी मनावर चांगलाच बिंबवलेला सुविचार आठवतो,
(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्येसुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)
“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट” हे गाणं मनावर रुंजी घालत होतं. आणि तेव्हाच ‘स्वातंत्र्याची गाथा’, मला डोळ्यासमोर दिसायला लागली. यावर्षी आपल्या भारतमातेला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होत आहेत. अमृत महोत्सव साजरा होत आहे.गेल्या 75 वर्षांचा लेखाजोखा पहाण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यासाठी कित्येकजण आपल्या संसारावरच काय,पण आयुष्यावरही तुळशीपत्र ठेवून मृत्यूला सामोरे गेले आहेत. इंग्रजी सत्ता संपुष्टात आणण्यात यश मिळालं, पण तरीही पूर्णविराम झालाच नव्हता.
1947 पर्यंत 600 पेक्षा अधिक छोटी मोठी संस्थाने भारतात होती. त्यांना मर्यादित स्वायत्तता असली तरी, सार्वभौमत्व ब्रिटिशांचे होते. महात्मा गांधींची भूमिका, स्वातंत्र्याबरोबरच सरंजामशाही संपुष्टात आणून,खऱ्या अर्थाने लोकशाही स्थापन होऊन, अखंड भारत व्हायला हवा, अशी होती. त्यावेळेचे गृहमंत्री श्री वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांशी बोलणे करून, त्यांना पटवून, भारतात विलीन करून घेतले. शेवटी काश्मीर 27 ऑक्टोबर 1947 ला,आणि जुनागढ 20 फेब्रुवारी 1948 ला विलीन झाले. शेवटी राहिले ते हैदराबाद संस्थान. 1900 साली एका करारान्वये,ब्रिटिशांचे संरक्षित राज्य म्हणून दर्जा असलेले हैदराबाद संस्थान, लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे होते. शिवाय दक्षिण- उत्तर भारताच्या मध्ये, म्हणजे भारताच्या ह्रदय स्थानावर असल्याने, व्यवस्थापनाच्या दृष्टीने अवघड होते. महाराष्ट्र, कर्नाटक, आणि तेलंगणाचे भाग मिळून हे संस्थान होते.तीनही भाषा तेथे बोलल्या जात होत्या. 85 टक्के लोक हिंदू होते. उरलेले मुसलमान, ख्रिश्चन, अशी विभागणी होती. वल्लभभाई पटेल यांची वर्षभर निजामाबरोबर बोलणी चालू होती. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. स्वातंत्र्यप्राप्तीच्यापूर्वीच 11 जून 1947 रोजी निजामाने, ” आपण कोणत्याही संघराज्यात सामील होणार नाही”,अशी घोषणा केली. ‘आपल्या संस्थानाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळू शकतो ‘, अशी स्वप्ने तो पहात होता. हैदराबादला समुद्रकिनारा नसल्याने, पोर्तुगीजांकडून गोवा आपण विकत घ्यावे व बंदर वापरण्याचे अधिकार मिळवावेत, असे त्याचे प्रयत्न सुरू झाले.
निजाम उल मुल्क म्हणजे जगाचा प्रशासक. ती एक पदवी होती.सात निजामांनी मिळून, दोनशे वर्षे हैदराबादवर राज्य केले. हा शेवटचा निजाम म्हणजे, उस्मान अली खान.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती !. त्याकाळात त्याची संपत्ती 250 अरब अमेरिकी डॉलर, शिवाय सोने, आणि आभूषणांची भांडार होती.स्वतःला तो अहम समजत होता. राज्यकारभारात अल्पसंख्य मुस्लिमांना प्राधान्य देऊन, हैदराबाद इस्लामी संस्कृतीचे केंद्र बनावे,यादृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू झाले.
त्या काळात लोकमान्य टिळकांनी शाली बंडा येथे गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि पुढे याची व्याप्ती वाढत गेली.त्यामुळे जनतेत चेतना निर्माण झाली. हैदराबादची जनता भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा हा एक भाग समजत होती. राज्यात तिरंगा फडकवता येत नव्हता. मुल्ला अब्दुल कयूम खानानेही स्वदेशी आंदोलनात भाग घेतला. इतकेच नाही तर,त्याने गणेशोत्सवालाही पाठिंबा दिला होता. रँड खून खटल्यातील चाफेकर यांना सहा महिने हैदराबादला लोकांनी लपवून ठेवले होते. अखेर निजामाच्या पोलिसांनी त्यांना इंग्रजांच्या स्वाधीन केले. न जुमानणाऱ्या ‘ शौकत उल इस्लाम ’ सारख्या सुधारणावादी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी सुरू झाली. १८८५ च्या काँग्रेसच्या स्थापनेनंतर, जनमत त्यांच्या बाजूनेच होते.पण निजामाने त्यांच्याविरोधात जायला सुरुवात केली. वृत्तपत्रांवर निर्बंध घातले. प्रत्यक्ष भूभागातील 40 टक्के भाग जमीनदारांचा, आणि 60 टक्के निजामाचा. प्रत्यक्ष कारभार असा होता. बेहिशोबी सारावसुली, वेठबिगारी पद्धती, राबवून घेणं, शेतकऱ्यांकडून सक्तीने कामे करून घेणं, जुलूम जबरदस्ती, कर्जफेड न झाल्यास जमिनी बळकावून त्यांना भूमिहीन करणे, हे प्रकार चालू होते. असह्य होऊन अखेर जनता असंतोषाने पेटली. 1946 मध्येच सरंजामशाही विरोधात चळवळ सुरू झाली. चितल्या ऐलम्मा या नावाच्या एका कर्तबगार स्त्रीने आंदोलनाला सुरुवात केली. आणि ते नंतर 4000 खेड्यात पसरले. दलित समाजानेही संघटित होऊन चळवळ सुरू केली. जनतेने विलीनीकरणासाठी सशस्त्र आंदोलन व सत्याग्रह करायला सुरुवात केली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंद भाई श्रॉफ, नारायण रेड्डी,बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली,जीवाची पर्वा न करता, संग्राम सुरु केला, व संस्थानच्या कानाकोपऱ्यापर्यंत पिंजून काढला. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.
“नमस्कार, काहीही म्हण मोरू पण आजच्या तुझ्या नमस्कारात नेहमी सारखा उत्साह नाही !”
“म्हणजे काय पंत, मी नाही समजलो ?”
“अरे म्हणजे जुलमाचा राम राम कसा असतो ना, तसा वाटला आजचा तुझा नमस्कार आणि तुझा चेहरा पण पडलेला दिसतोय !”
“पंत, सकाळी सकाळी बातमीच अशी कानावर आली, की मूडच गेला सगळा.”
“तू असा कोड्यात बोलणार आहेस का बातमी सांगणार आहेस ?”
“मला वाटलं आत्ता पर्यंत तुम्हाला ‘लक्ष्मी….’!”
“अरे मोरू, दिवाळी आली आणि गेली सुद्धा, तुझं ‘लक्ष्मी पूजन’ राहील असेल तर……”
“पंत, मी या दिवाळीत लक्ष्मी पूजन अगदी मुहूर्त साधून केलं आहे. मी बातमी सांगतोय ती ‘करूर’ काकांच्या ‘लक्ष्मी’ बद्दलची !”
“हां हां, ते ‘दक्षिण भारतातून’ आपल्याकडे
येवून बऱ्याच वर्षापासून
कुटुंबा सोबत राहतायत, तेच ना ?”
“हो हो, तेच ते !”
“त्यांच काय झालं मोरू ?”
“अहो त्यांची ‘लक्ष्मी’ पळून गेली ‘विलास’ बरोबर !”
“अरे बापरे, करूर काकांना शॉक बसला असेल ना ?”
“हो ना पंत !”
“पण मोरू कुठे पळाले असतील हे दोघे, तुला काही कल्पना ?”
“अहो, कल्पना कशाला करायच्या आपण, त्या दोघांनी चक्क पेपरात बातमीच दिली आहे, की आम्ही दोघ आता ‘सिंगापूरला’ रहाणार आहोत म्हणून !”
“बापरे, मुलीच्या या अशा वागण्यापुढे आई बापावर काय प्रसंग आला असेल हे त्यांच त्यांनाच ठाऊक !”
“मी तेच म्हणतोय, भारतातलाच एखादा शोधला असता तिनं, तर नक्की मिळाला असता ‘करूरांच्या लक्ष्मीला.’ तशी रूपाने, अंगापिंडाने बरी होती की ती !”
“जाऊ दे रे मोरू, तू असा चेहरा पाडून बसू नकोस, ‘लक्ष्मीच्या’ नशिबात ‘सिंगापूर’ होत म्हणायचं आणि गप्प बसायचं ! शेवटी ‘लक्ष्मी’ कुणाचीही असो, ती चंचल असते हेच खरं !”
“हो ना पंत, आपल्या हातात तेवढंच आहे.”
“मोरू ‘लक्ष्मी’ सिंगापूरला गेली ठीक आहे पण आता तुला एक गोड बातमी देतो, म्हणजे तुझा गेलेला मूड थोडा तरी परत येईल !”
“कसली बातमी पंत ?”
“अरे आता आपली ‘अन्नपूर्णा’ परत येणार आहे आणि ती सुद्धा तब्बल शंभर वर्षांनी, त्यातच आनंद मानायचा झालं !”
“पंत, आता ही ‘अन्नपूर्णा’ कोणाची कोण आणि ती कुठून परत येणार आहे ?”
“म्हणजे तू पेपरातली ‘अन्नपूर्णेची’ बातमी वाचली नाहीस का ?”
“नाही पंत, कुठली बातमी ?”
“अरे मोरू, वाराणसीतील मंदिरातून १०० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेली आणि कॅनडातील एका विद्यापीठाच्या कला दालनात ठेवण्यात आलेली ‘अन्नपूर्णा’ या हिंदू देवतेची मूर्ती, कॅनडातील संबंधित विद्यापीठ लवकरच भारताकडे सुपूर्द करणार आहे !”
“अरे व्वा पंत, खूपच चांगली बातमी दिलीत, ‘लक्ष्मी सिंगापुरी’ गेल्याच दुःख आहेच, पण शंभर वर्षांनी परत येणाऱ्या ‘अन्नपूर्णेचे’ स्वागत करायला या तुमच्या बातमीने मनांत थोडा उत्साह संचारला आहे, हे नक्की ! धन्यवाद पंत !”
काळाकुट्ट मेघ होऊन बरसावे मनसोक्त …निथळत रहावे प्रेयसीच्या बटामधून ..मोती होऊन …शुष्क धरणीला तृप्त करत …निथळत राहावे तिच्या सर्वांगावरून नद्या ,झरे होऊन .द्यावी नवी नव्हाळी अन न्याहाळत राहावे अनिमिष नेत्रांनी …तिचे नवे कोवळे हिरव्या पाचूच्या शालूतील हिरवकंच सौंदर्य! जावे .-कुण्या तृषार्त चातकाच्या चोचीत सामावून.
डोलत रहावे अवखळ वाऱ्यासोबत शेतात भरलेले कणीस होऊन ….भागवावी भूक कुण्या भुकेल्या पाखराची अन कुणा लेकराची !
“दादा घरी चला. हा मारुती सुद्धा हिंदीत का बोलतोय ?मला नको असला ‘पवनपुत्र हनुमान’. चला ना दादा.” असं किरकिरणं…. आणि मग नंतर जोर-जोरात रडणं… आणि लोकांचं “अहो काका, त्या पोराला बाहेर घेऊन जा .असं दटावणं…पडद्यावर पिक्चरचा सीन चालू… तर टॉकीजमधे लोकांचं ओरडणं.
“काय कार्टं आहे .मगाशी खुर्चीवर उभं राहून पडद्यावर पडणाऱ्या प्रकाशझोतात हात घालत होतं…आणि आता हे रडणं.” आजूबाजूचे प्रेक्षक जाम वैतागले होते.
शेवटी दादा-आमचे आजोबा माझ्या चुलत भावाला- सुहासला हाताला धरुन ओढत बाहेर घेऊन गेले. डोअरकिपरजवळ स्वतः बसले अन् तो शहाणा बाहेर खिशातनं गोट्या, भोवरा काढून खेळत बसला… मधनंमधनं, खिशात भरलेल्या टॉफ्या,चिरमुरे, फुटाणे, शेंगदाणे फस्त करत राहिला.
मध्यंतर झालं. आम्ही बाहेर गेलो. आपल्या दोन्ही खिशात, टाइमपास म्हणून आणलेला दादांच्या पिशवीतला चिमणचारा (खादगीचा माल)भरला.. आणि आम्ही दंगा न करता शांतपणे सिनेमा बघू असं दादांना आश्वासन देत, जाता जाता न चुकता सुहासच्या डोक्यावर टपल्या मारत…त्याला रडवत पुन्हा आपल्या सीटवर येऊन बसलो.
ही कित्ती जुनी गोष्ट आहे, जवळजवळ साठ पासष्ठ वर्षापूर्वीची. तेव्हाचा सिनेमा नंतर पिक्चर आणि आता मूव्ही झालाय.
तर तेव्हाची ही कहाणी. आम्ही सांगलीच्या गावभागातील महाबळ वाड्यातील ,जॉइंट फॅमिलीत राहणारी , महाबळांच्या घरातली नवरत्नं …पुरे ,पक्के गावभागी सांगलीकर…. जणू सदाशिवपेठी पुणेकरांची धाकटी भावंडं…एवढी ओळख पुरेशी आहे…
आमच्या घरी आमचे सतरा जणांचे कुटुंब. आजी-आजोबा त्यांची तीन मुले, तीन सुना आणि नऊ नातवंडे. शिवाय पाहुणे- रावळे ,ठराविक वारी जेवायला येणारे माधुकरी- असे भरगच्च कुटुंब .श्राद्धपक्ष, सणवार, उत्सव, व्रतवैकल्ये, उपासतापास यात पूर्णपणे गुरफटून गेलेला एक सुखी समाधानी परिवार.
आम्ही मुलं आजीपासून, तिच्या तापट स्वभावामुळेआणि तिच्या सोवळ्या-ओवळ्यामुळे जरा दूरच असायचो. फक्त जेवणाच्या वेळी आम्ही तिच्या दृष्टीला पडायचो. पण आजोबा- दादांजवळ आम्ही बिंदास….! आमचं घर तसं तेव्हाचं रसिकच म्हणायला पाहिजे. त्या काळात आमच्याकडे ग्रामोफोन होता. एक आजी सोडली तर… काका-काकू आई बाबा सगळ्यांनाच नाटक, सिनेमाची आवड. एक काका गायक (गवई). आजोबा पूर्वीच्या बालगंधर्वांच्या नाटकाचे शौकीन ! त्यामुळे दादांबरोबर मधूनमधून सिनेमाला जाणं हा आम्हा मुलांसाठी आनंदाचा विषय असायचा .आम्हाला दाखवले जाणारे सिनेमे पण पौराणिक ऐतिहासिक असे असायचे. रामराज्य, संपूर्ण रामायण, भूमिकन्या सीता, गजगौरी, मायाबाजार, पवनपुत्र हनुमान, सती अनुसूया, गुरुदक्षिणा, आणि असेच पौराणिक…. तर बाल- शिवाजी, राजा शिवछत्रपती, पावनखिंड, महाराणी येसूबाई, रामशास्त्री प्रभुणे, इत्यादी… ऐतिहासिक ! कथा साधारण माहिती असायची. त्यामुळे तर संवाद कळले काय किंवा नाही कळले काय,आणि सिनेमा हिंदीत असला काय ! काही फरक पडायचा नाही.
पण जेव्हा दादा आम्हाला झनक झनक पायल बाजे, मदर इंडिया, बघायला घेऊन गेले होते, तेव्हा ते सिनेमे आम्हाला समजलेही नाहीत आणि आवडलेही नाहीत.तो नाचणारा माणूस तर अजिबातच आवडला नाही. मदर इंडियातले काही प्रसंग आवडले ,जे गमतीदार होते. इतरही प्रसंग बरेचसे कळले.पण संवादाच्या नावाने ठणठणाटच… आणि त्या रडक्या, धाकट्या सुहासला बरोबर घेऊन जायचे सोडल्यामुळे ‘चिमणचारा’ खात आमचा छान टाईम पास व्हायचा. मेच्या सुट्टीत आत्या आल्या की आणखी पाच जणं पाहुणे मेंबर….. प्रताप किंवा सरस्वती टाकिजला सिनेमा पाहिला की नंतर अमराई चक्कर, हा ठरलेला प्रोग्रॅम. किंवा रेल्वे स्टेशनवर गाडीचे इंजिन पूर्ण वळत असलेले दृश्य पाहून मगच घरी जायचे,हे ठरलेले.
आम्हाला सगळ्यात जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे ‘जागृती.’ तो पाहिल्यावर बरेच दिवस आम्ही भारावून गेल्यासारखे जागृतीच्या चर्चेत रमून गेलो होतो. जागृतीनं आम्हाला हसवलं होतं आणि रडवलंही. दादांनी टॉकिजच्या बाहेर मिळणारी त्याच्या गाण्यांची तीन पुस्तके घेऊन दिली होती… आमच्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागून.!…ते पाठांतराची स्पर्धाही घेणार होते. म्हणून आम्ही त्यातली सगळी गाणी तोंडपाठ केली होती.आओ बच्चो तुम्हे दिखाऊ झाँकी हिंदुस्तान की…. दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल… हम लाए है तुफान से कश्ती निकालके..चलो चले माँ…अशी सगळीच. ही स्पर्धा काही झाली नाही. पण तेव्हा तोंडपाठ झालेली गाणी अजूनही लक्षात आहेत.
हळूहळू मोठी होणारी भावंडं ग्रुपमधून बाहेर पडली आणि छोटी छोटी सामील झाली. आम्ही तीन-चार जण मधले, त्यामुळे कायमचे मेंबर.
मोठ्या झालेल्या एका जीनियस भावाने घरातले सामान वापरून एक प्रोजेक्टर तयार केला होता. भिंग एका लाकडी फळ्यांच्या साच्यात बसवून, मधे कोठेतरी फिल्मा ठेवून आणि मागून टॉर्चचा झोत सोडून ,तारेवर घातलेल्या पांढर्याशुभ्र धोतरावर फिल्मांची प्रतिमा म्हणजे आमचा सिनेमा दिसायचा. फिल्म बहुतेक उलट्या ठेवाव्या लागायच्या… खाली डोकं वर पाय… आम्ही कायमचे मेंबर लोक आनंद, जयश्री टॉकीज आवारातील तुटलेल्या फिल्म गोळा करायचं काम करायचो. एक पहिली सर्टिफिकेटवाली फिल्म आणि एक दि एंडची फिल्म… मधे आलटून पालटून पंचवीस-तीस फिल्मांचा आमचा सिनेमा म्हणजे घरातल्या आणि शेजारपाजा-यांच्या कौतुकाचा विषय होता.
हिंदी सिनेमाची गाणी आम्ही आमचे जबरदस्त, भारी शब्द वापरून म्हणायचो. अर्थाशी याचा अर्थातच काही संबंध नसायचा. एकदा तर आमच्या एका चिमुरड्या भावानं माँटेसरीत ऍडमिशन झालेल्या दिवशी बाईंनी गाणं म्हणायला सांगितल्यावर जोरदार आवाजात ,’ हसता हुआ नूरानी चेहरा… म्हणतम्हणत शेवटी…. दिलरूबा,दिलरुबा ऐवजी….जिंदाबाद, जिंदाबादचा हवेत हात उंचावून नारा देत सगळ्या वर्गाला पाच -सहा वेळा जिंदाबाद… जिंदाबाद म्हणायला आणि बाईंना कोपरापासून हात जोडून नमस्कार करायला भाग पाडलं होतं.
जेव्हा मी पाचवीत होते.. तेव्हा आमच्या वडिलांची सांगलीहून बदली झाली… आणि आम्ही बरेच मधले मेंबर दूर झालो….दादा पण थोडे थकले होते ,त्यामुळे आमची सिनेमाची ती गंमत संपुष्टातच आली .पण अजूनही राहिल्यात त्या त्याच्या मनाला गुदगुल्या करणाऱ्या गोड आठवणी—
नैमिषारण्यात मनु शतरूपा तपस्थली असे एक ठिकाण पाहिले. आणि हे दोघे कोण याची उत्सुकता वाढली. तेव्हा कळले की मनूचे वंशज म्हणजे आपण सगळे मानव आहोत व शतरुपा त्यांची पत्नी. म्हणजे मनू आपले आद्य पिता आणि शतरूपा आद्यमाता.
शेषशायी भगवान श्रीविष्णू यांच्या नाभीतून एक कमळ उदयाला आले. त्यातून ब्रह्मदेव प्रगट झाले. श्री विष्णू यांनी ब्रह्मदेवाला आज्ञा केली की तू आता सृष्टी निर्माण कर. ब्रह्मदेवाने आपल्या उजव्या खांद्यातून या विश्वातील प्रथम पुत्र म्हणून मनूची निर्मिती केली. डाव्या खांद्यातून या विश्वातील प्रथम कन्या शतरूपा हिची निर्मिती केली. हे दोघे अतिशय सदाचारी होते. त्यांनी खूप वर्ष राज्य केले. त्यांच्याकडे अनेक शास्त्रे व अनेक विद्या होत्या. त्यांचा उपयोग करून त्यांनी या विश्वामध्ये असलेले अनंत भोग शोधून काढले. त्यांचा पुरेपूर उपभोग घेतला. त्यांना सात पुत्र व तीन कन्या झाल्या. त्यातला सर्वात मोठा पुत्र उत्तानपाद.
आपण आकाशात ध्रुव नावाचा तारा पहातो. अवकाशात असे आढळपद मिळवणारा ध्रुव हा उत्तानपाद राजा चा मुलगा. शतरूपा त्याची आजी. शतरूपा ही पहिली महिला जिला मार्गदर्शन करण्यासाठी आई, आजी, मैत्रीण, शिक्षिका कोणीच नव्हते. ती जन्मजात हुशार होती. गरोदरपण, बाळंतपण हे आज किती अवघड झाले आहे हे आपण पहातो पण कोणत्याही साधनांशिवाय शतरूपाने दहा अपत्यांना जन्म देऊन ती वाढवली. त्यांना योग्य शिक्षण दिले. तिची संध्या, ब्राम्ही, सरस्वती अशीही नावे आहेत.
शतरूपा महान पतिव्रता होती. पतीबरोबर तिने अनेक वर्षे राज्य केले पण त्या नंतर दोघांना असे वाटू लागले की आपण आता राज्यत्याग करून मनुष्य जन्माची परम माहिती प्राप्त करून घ्यावी. आपला मोठा मुलगा उत्तानपाद याच्याकडे राज्यकारभार सोपवून शतरूपा मनु बरोबर साधना करण्यासाठी नैमिषारण्यात गेली. एवढ्या विश्वाची राणी पण सर्वसंगपरित्याग करून नैमिषारण्यात व्रतस्थ जीवन जगू लागली. फक्त पालेभाज्या फळे आणि कंदमुळे खाऊन हे दोघे उपजीविका करू लागले. पुराणात असा उल्लेख आहे की दोघांनी सहा हजार वर्षे फक्त पाणी पिऊन काढली. त्यानंतर सात हजार वर्षे त्यांनी हवा घेणेही सोडले. एका पायावर उभे राहून कठोर तप केले. तेवीस हजार वर्षांच्या या निरासक्त उग्र तपामुळे भगवान विष्णू प्रसन्न झाले व त्यांनी दोघांना सगुण रुपात दर्शन दिले .वर मागण्यास सांगितले .या दोघांनी भगवंतांना मनोभावे प्रार्थना केली की, जे रूप महादेवाने आपल्या हृदयात खोलवर दडवून ठेवलेले आहे त्या रूपाला आम्ही याची देही याची डोळा पाहू इच्छितो. भगवान विष्णू आपल्या निळसर स्वरुपात त्यांच्यासमोर प्रगट झाले. गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानस या ग्रंथात या भेटीचे वर्णन अत्यंत रसाळ पणाने केले आहे.
भगवंतांनी वर माग असे म्हणताच दोघांना धैर्य आले व त्यांनी आम्हाला तुमच्यासारखा पुत्र मिळावा असा वर मागितला. भगवान म्हणाले “तथास्तु”. पुढच्या जन्मी हेच दोघे दशरथ कौसल्या होऊन आयोध्या येथे राज्य करू लागले व भगवान विष्णू श्रीराम म्हणून त्यांच्या पोटी अवतरले. या मनु व शतरूपाची संतती म्हणजे आपण सारे मानव. अशी ही आपली आद्य माता शतरूपा. हिला शतशः वंदन.
एखादी गोष्ट एका ठराविक पद्धतीने करायची सवय एकदा लागली की ती गोष्ट त्याच पद्धतीने नाही झाली, त्यात कांही अनपेक्षित अडचण आली तर मन बेचैन होतं. अंगवळणी पडलेली एखादी विशिष्ट रीत एखाद्या क्षणी तशीच नाही अनुसरता येत. अट्टाहासानं तसं करणं आपलंच मन कधीकधी नाही स्विकारत. तेव्हा आपण अस्वस्थ होतो. द्विधा मन:स्थितीतील त्या अस्वस्थ मनाला बुद्धीची जर योग्य साथ मिळाली तरच विचारांना एक नवी दिशा मिळते. एरवी रीतसर सगळं करायच्या अट्टाहासात ती दिशा मात्र हरवून बसते.
त्याचीच ही गोष्ट.
गोष्ट तशी साधीच..पण
माझ्यासाठी मात्र तो अनुभव अतिशय मोलाचा. म्हणूनच आज चाळीस वर्षं उलटल्यानंतरही मी तो विसरु शकलेलो नाहीय.
तो क्षणच तसा होता. कसोटी पहाणारा.माझ्या बुध्दीची.., माझ्या श्रध्देची.., माझ्या आस्तिकतेची..!!
होय. मी आस्तिक आहे. रोजची नित्य देवपूजा हा केवळ अंगवळणी पडलेला म्हणून नव्हे, तर वर्षानुवर्षं मी श्रद्धेनं जपलेला नित्यनेम आहे.
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधे एक पुसट रेषा असते असे म्हणतात. ती रेषा मला मात्र त्या कसोटीच्या क्षणी स्पष्ट दिसली आणि मी सावरलो. साधारण १९७८-७९ सालातला हा प्रसंग. माझं पोस्टींग कोल्हापूरला होतं. तिथे एकात एक अशा तीन खोल्यांच्या भाड्याच्या जागेत आम्ही राहायचो. माझी रोजची देवपूजा म्हणजे फुलं हवीतच. त्याशिवाय पूजा कशी पूर्ण होणार? ती जागाच अशी होती की फुलपुडी लावण्याशिवाय पर्यायच नव्हता. सकाळी उठल्यावर चूळ भरली कि मी आधी फुलवाल्याने पहाटे कधीतरी शटर मधून टाकलेली ती फुलपुडी घेऊन आत आणून ठेवायचो. रोजच्याप्रमाणे त्यादिवशी फुलपुडी उचलायला गेलो तर ती नेहमीच्या जागेवर पडलेली नव्हतीच. मग लक्षात आलं,त्या दाराच्या आडोशाला ठेवलेल्या शूजस्टॅन्डमधल्या माझ्या एका बुटाच्या खाचेत ती फुलपुडी पडलेलीय. मी नाराज झालो. ती फुलपुडी तशीच आत घेऊन आलो. त्यातल्या फुलांवर पाणी शिंपडून घेतलं. तेवढ्यापुरतं मनाचं समाधान झालं. पूजेला बसलो. देव धुऊन पुसून ताम्हणात ठेवले. गंध लावलं. नेहमीप्रमाणे फुलं वहायला हातात घेतली आणि अडखळलो. ती फुलं देवाला वहावीत असं वाटेचना. मग देवाला न वहाताच ती फुलं परत तबकांत ठेवली. देवाला हळद-कुंकू वाहिलं.निरांजन लावून नैवेद्य दाखवला. काहीतरी निसटून गेल्याची रुखरुख मात्र मनात होतीच. पण क्षणभरच. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली पुसटशी रेषा ओळखण्याचा तो क्षण होता. एरवी बुद्धीमुळे भ्रम होतो असं म्हणतात. पण माझ्या बुद्धीने त्या क्षणी ती रेषा नकळत ओलांडू पाहणाऱ्या माझ्या मनाला सावरलं होतं.योग्य आणि अयोग्य यातल्या फरकाची नेमकी जाणिव करून दिली होती.पूजेला फुलं नसल्याने मनाला झालेली नाराजी बुद्धीने अलगदपणे दूर केली होती. हे अयोग्य आहे हे पटवून दिलं होतं.केवळ रीतीपेक्षा, उपचारांपेक्षा शुचिर्भूतता महत्त्वाची आहे हे समजावून सांगितलं होतं. आणि मग मनातली रुखरुख विरून गेली. मन शांत झालं. डोळे मिटले. हात जोडले आणि अतिशय नम्रपणे ‘त्या’ला सांगितलं,’ देवा,आता उद्यापासून तुझी रोजची पूजा ही अशीच. जेव्हा केव्हा माझ्या दारांत एखाद्या लहानशा कुंडीत कां होईना पण चारदोन फुलं फुलतील तेव्हाच मी ती तुला वाहीन’.
पुढं जवळजवळ सोळा वर्षं ही देवपूजा अशीच सुरु राहिली. 1993 साली सांगलीतल्या वास्तव्यात आम्ही आमच्या गाव भागातल्या स्वतःच्या फ्लॅटमधे शिफ्ट झालो तेव्हा बाल्कनीतल्या कुंड्यांमध्ये निशिगंध लावला. आवर्जून लावलेल्या त्या निशिगंधाला लगडलेल्या शुभ्र सुवासिक फुलांची ओंजळ भक्तीयुक्त अंतःकरणाने मी जेव्हा ‘त्या’च्या चरणी प्रथम वाहिली,त्या पूजेनंतर मनाला स्पर्शून गेलेली सुखसंवेदना अपूर्व अशी होती. आज आमच्या’त्रिदल’ या वास्तूत सभोवतालच्या प्रशस्त बागेतल्या विविध रंग-रूप-वासांच्या फुलांनी दोन तीन मोठ्या परड्या तुडुंब भरून तेवढीच फुलं झाडा वेलींवर शिल्लक असतात.त्या परड्यांमधल्या ताज्या टवटवीत फुलांचे वाटे कितीतरी परिचितांच्या घरच्या देवघरां मधल्या ‘त्या’च्यापर्यंत पोहोचतात आणि कृतार्थता म्हणजे काय याचा अर्थ यथार्थपणे मनाला स्पर्शून जातो.देणारा तोच आणि घेणाराही तोच.पण त्यात आपलं निमित्तमात्र असणंही खूप सुखदायी असतं याचा अनुभव मला रोज नव्याने येत आहे.’त्या’चं आस्तित्त्व मनोमन मानलं त्या अजाण वयातल्या क्षणापासून सुरू झालेल्या ‘त्या’ला जाणण्याच्या असंख्य प्रक्रियां मधला तो एका क्षणभराचा अनुभव! त्यानंतर बरंच काही घडलं.लेखनाइतकीच वाचनाची आवड होती,पण त्या वाचनात नकळत विविधता आली.अगदी योगायोगाने वाचनात आलेलं ‘साद देती हिमशिखरे’ हे श्री.जी. के.प्रधान यांचं पुस्तक मला प्रभावित करून गेलं होतं. श्री.हरी भाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ आणि ‘मृत्यूचे महात्म्य’ या छोटेखानी पुस्तकांनी अतिशय मौलिक असं जगण्याचं आणि मृत्यूचंही महत्त्व मला समजावून सांगितलं.श्री.संजय पंडित यांच्या ‘मनाचे व्यवस्थापन’ या पुस्तकाने माझ्या मनातली श्रद्धा अक्षरश: खरवडून काढली आणि विचारांना योग्य मार्गावर आणलं.नरेंद्र दाभोळकरांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा,भ्रम आणि निरास, उच्चाटन अंधश्रद्धेचे,यासारख्या पुस्तकांनीही माझ्या मनातली श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या दरम्यान असणारी पुसटशी रेषा अधिक ठळक केली हे मला आवर्जून सांगावसं वाटतं.
प्रत्येक वेळी रीतसर वागण्याच्या अट्टाहासामागे भावनांचा अतिरेक असतोच. त्या भावनांना बुद्धीची जोड मिळाली तरच त्या त्या वेळी तेवढ्यापुरती कां होईना रीतीभातीना योग्य मुरड घालणं शक्य होतं आणि ते आनंददायीही असतंच याचा प्रत्यय देणाऱ्या अनुभवाची ही गोष्ट!
गोष्ट तशी साधीच…,पण अनुभव मात्र लाख मोलाचा..! म्हणूनच आवर्जून सांगावा असा..!
आम्ही पुणं सोडून शिरूर घोडनदी या तालुक्याच्या ठिकाणी नवीन बि-हाड केलं ! शिरूर मधे आमचे नातेवाईक- बाबासाहेब पवार रहात होते, खरं तर ते देवासचे सरदार पवार,आजोबांची बहिण (माँसाहेब) बाबासाहेब पवारांच्या वडिलांची सावत्र आई ! त्यांच्याच गावात पिंपरी दुमाला येथे आम्ही स्थायिक झालो होतो. त्यांनीच आम्हाला शिरूरला भाड्याचं घर बघून दिलं, ते जिथे रहात होते ते घर सोडून दुसरं घर !
पवारांचं घर मोठं आणि प्रशस्त होतं. दोन मजली स्वतंत्र वाडा, पवार काकींचं व्यक्तिमत्व सरंजामदारणीसारखंच रूबाबदार होतं !त्यांच्या घरातलं वातावरण आणि राहणीमान उच्चभ्रू होतं !
त्यांनी आम्हाला दाखवलेलं घर पलिकडच्या वाड्यात वरच्या मजल्यावर होतं. घर छान होतं. आमचं ते घर सरदार पेठेत होतं, पण येण्याजाण्याचा रस्ता पाठीमागच्या बाजूने होता ते गैरसोयीचं वाटे. तिथे आम्ही चार पाच महिनेच राहिलो. त्या घराच्या समोरच एक दोन मजली घर होतं. त्या घराची मालकीण मुस्लिम होती, ती मुंबईला रहात होती….त्या घरात कोणीच रहात नसल्यामुळे त्या घराला “भूतबंगला” म्हणत. पण आईला ते घर आवडलं आणि आम्ही त्या चार खोल्यांच्या प्रशस्त घरात रहायला गेलो. कुणीही शेजार पाजार नसलेला तो एक स्वतंत्र बंगलाच होता. पाठीमागे छोटंसं अंगणही होतं. आम्ही विद्याधाम प्रशाला या शाळेत जात होतो. मी सातवी अ मधे प्रवेश घेतला तेव्हा पहिल्याच दिवशी माझी राणी गायकवाड नावाच्या मुलीशी ओळख झाली. लता रजपूत, संजीवनी कळसकर, चित्रा कुलकर्णी,मंगल पंढरपूरे, सुनंदा बेलावडे, माधुरी तिळवणकर, पुढे आठवीत फैमिदा शेख, सरस बोरा, उज्वल, निर्मल या वर्गातल्या मुली होत्या. ती शाळा मला खुप आवडली. मी पहिली कविता आठवीत असताना लिहिली- हस्तलिखित नियतकालिकासाठी !
माझी धाकटी बहीण खूप हुषार होती, तिने पहिला नंबर कधीच सोडला नाही.
आम्ही तीन सख्खी, तीन चुलत भावंडे अशी सहा मुलं, आई आणि आमच्या गावाकडच्या एक काकी आईला सोबत म्हणून आलेल्या. त्या एकट्याच होत्या, पती लवकरच वारले, एकुलत्या एक मुलीचं लग्न झालं होतं, त्यामुळे बरीच वर्षे काकी आमच्याकडेच राहिल्या ! त्या पहाटे उठून बंब पेटवत आणि सगळ्यांच्या आंघोळी होईपर्यंत बंबावर लक्ष देत. त्यांनी आईला स्वयंपाकघरात कधीच मदत केली नाही. त्यांना स्वयंपाक येत नव्हता की करायला आवडत नव्हता माहीत नाही पण तशी ती खूप तडफदार बाई होती. पूर्वी त्या वडनेरहून पिंपरीला घोड्यावर बसून येत. आम्ही त्यांना वडनेरच्या काकी म्हणत असू. माझे आजोबाही जवळपासच्या गावात, शेतावर घोड्यावर बसूनच जात ! ह्या काकी म्हणजे आजोबांच्या चुलतभावाची सून !
आमच्या त्या “भूतबंगला” घरात आम्ही एक वर्ष राहिलो. मला ते घर खूपच आवडायचं. पण आमच्याकडे पहिलवान असलेला वडिलांचा मामेभाऊ आला होता. रात्री झोपेत तो खूप जोरात ओरडला. आम्ही सगळे जागे झालो, “या घरात भुताटकी आहे, कुणीतरी अज्ञात शक्तिने माझा हात ओढला ” असं तो म्हणाला !
नंतर काही दिवसांनी आम्ही ते घर सोडलं आणि थोडं पुढे भूविकास बँकेशेजारी बरमेचा निवास मधे रहायला गेलो. हे ही घर बरंच मोठं होतं ! सरदार पेठेत तीन घरं बदलल्यानंतर वडिलांनी छत्रपती सोसायटीत बंगला बांधण्यासाठी प्लाॅट विकत घेतला !
शिरूरमध्ये वडिलांची पत प्रतिष्ठा होती. सगळे त्यांना बाजीरावशेठ म्हणत !तीन दुकानात आमची खाती होती आणि तिथून कुठलीही वस्तू आणायची आम्हाला मुभा होती.
शिरूर या शहराला माझ्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे. माझी जडणघडण शिरूरमध्येच झाली, शिरूरमध्ये रेडिओ ऐकायचं वेड लागलं, वाचनाची आवड निर्माण झाली. खूप सिनेमा पाहिले. राणी गायकवाड ही खूप जिवाभावाची मैत्रीण मिळाली…. वडनेरच्या काकी, गावाकडून आणलेली कली ही कामवाली पोरगी, जना मोलकरीण या सा-यांना माझ्या आईनं मोठ्या हिकमतीनं सांभाळलं. आई नेहमी आजारी असायची पण रोजचा स्वयंपाक कधीच टाळला नाही, सुगरणच होती ! तिनं आम्हाला खूप आरामशीर सुखवस्तू आयुष्य जगू दिलं !
खंत एकच– शिरूरमधे मला काॅलेज अर्धवट सोडावं लागलं, तो जो “हादरा” मला बसला,, त्यामुळे मी खूप निराशावादी कविता केल्या.
☆ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
गेल्या काही दिवसात शिवशाहीरांवर लिहिलेले कितीतरी लेख वाचले. त्यांच्या मृत्यूमुळे झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. आज साठी- सत्तरीला असणाऱ्या प्रत्येकाने कधी ना कधी बाबासाहेबांची व्याख्याने ऐकली असतील ! तो धबधब्याच्या अखंड प्रवाहासारखा वाणीचा अखंड स्त्रोत एकदा सुरू झाला की त्या प्रवाहाखाली सचैल स्नान करण्याचे भाग्य ज्यांना लाभले ते खरंच भाग्यवंत ! सुदैवाने हे भाग्य आम्हाला मिळाले ! आता पुष्कळांनी त्यांच्या आठवणी काढल्या असतील ! खूप छान लेखन वाचायलाही मिळतंय, तरीही मला आठवणारे ते रत्नागिरीतील शिवव्याख्यानाचे आठ दिवस व्यक्त करावेसे वाटत आहेत.
साधारणपणे 66/ 67 सालची गोष्ट असेल. रत्नागिरीला महिला विद्यालयाच्या मैदानात बाबासाहेबांच्या व्याख्यानाचा महोत्सव होता. पूर्ण महोत्सवाचे तिकीट काढले होते. रोज रात्री ठराविक वेळेला (बहुतेक आठ किंवा साडेआठ, नक्की आठवत नाही) व्याख्यान सुरू होत असे. वेळेच्या बाबतीत अतिशय कडक असलेले बाबासाहेब, व्याख्यानाची सुरुवात करण्याच्या वेळेनंतर पाच मिनिटातच गेट बंद करायला लावत असत. त्यानंतर कोणालाही आत प्रवेश नसे आणि बरोबर एक तासानंतर व्याख्यान संपत असे. तीही वेळ अगदी कटाक्षाने पाळली जाई. भारावलेल्या मनस्थितीत लोक बाहेर पडत असत. जणू काही शिवकालातच आपण सर्वजण वावरत असू ! लहान मुलांचे रडणे, ओरडणे त्यांना अजिबात चालत नसे. त्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी असा त्यांचा आग्रह असे. कारण अशा व्यत्ययामुळे रसभंग होत असे, तो त्यांना आवडत नसे. आम्ही जिवाचे कान करून त्यांचा प्रत्येक शब्द ऐकायचा प्रयत्न करत असू. काहीजण त्यांच्या व्याख्यानाचे टिपण काढत असत. त्यावेळी त्यांची सही घेण्यासाठी आम्ही धडपडलो होतो तेही आठवते ! त्यांची
पल्लेदार वाक्यं, खानदानी भाषा, डोळ्यासमोर मूर्तिमंत शिव- इतिहास निर्माण करण्याची क्षमता ! खरोखरच ते सर्व अद्भुत होते ! ‘ शिवरायांचा आठवावा प्रताप…’ सांगणारे रामदास स्वामी शिवाजी महाराजांच्या काळातच होते, त्यांनी शिवाजीमहाराज अनुभवले, पण बाबासाहेबांनी ते पुन्हा आपल्यासमोर सत्यात आणले !
शाळेत असताना शिवरायांचा इतिहास इयत्ता चौथीच्या पाठ्यक्रमात आम्ही शिकलो. पुढे मोठे झाल्यावर बाबासाहेबांच्या ‘राजा शिव छत्रपती’ पुस्तकाचे भाग पारायणासारखे वाचून काढत होतो. कितीही वेळा वाचले तरी शिवचरित्र हे कायमच नवीन वाटते ! मुलांना शिकवतानाही शिवचरित्र ऐकवत होतो.
बाबासाहेब पुरंदरे आणि लता मंगेशकर यांच्या संदर्भात एक गोष्ट आठवते ती म्हणजे, लतादीदींच्या 90 व्या वाढदिवसाच्या वेळी बाबासाहेब म्हणाले होते की, ‘तुमचा शंभरीचा वाढदिवस करायला मी नक्की असेन !’ आता प्रत्यक्षात जरी ते नसले तरी त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी कायमच राहणार आहे. शिवरायांचा आणि त्या काळाचा बाबासाहेबांना इतका ध्यास होता की ते खरोखरच त्या काळात जगत असत. त्यांच्या घरातील मंडळींना मानाने हाक मारली जात असे. तसेच मुजरा केला जाई असेही ऐकून होतो !
आज शंभराव्या वर्षी त्यांचे निधन झाले असले तरी बाबासाहेबांचा मृत्यू झालेलाच नाही– ते त्यांच्या विचारातून आणि ग्रंथातून अमर झालेले आहेत !
बाबासाहेबांविषयी माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीने लिहिणे म्हणजे अवघडच आहे ! पण त्यांची भाषणे ऐकली होती त्यांचे स्मरण झाले. त्यामुळे त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त कराव्या असे वाटले म्हणून हा छोटासा लेख !