मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ MMM ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ MMM – श्री सुनीत मुळे ☆ 

… कॉलेजला जाईपर्यंत मला MMM म्हणजे मालाडचा MM मिठाईवाला एवढंच माहीत होतं…

… पुढे कधीतरी MMM म्हणजे मदन मोहन मालवीय हे मला कळले…

… पण गमतीने जनता MMM म्हणजे Money Making Machine म्हणत असे…

… बनारस हिंदू विश्वविद्यालय बांधताना जमिनीपासून निधीपर्यंत… पंडित मदन मोहन मालवीय यांनी गोळा केलेली साधनसंपत्ती बघितली तर…” मनी मेकिंग मशीन “चा अर्थ कळतो…

… सुमारे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी बनारस हिंदू विश्वविद्यालय उभे करण्यासाठी त्यांनी काही कोटींचा निधी अत्यंत प्रेमाने व कुशलतेने गोळा केला होता…

… याच देणगीसाठी ते हैदराबादच्या निजामाला भेटले… विश्वविद्यालयाच्या नावातील “हिंदू” हा शब्द नबाबाला खटकत होता… पण निधीसाठी हिंदू या शब्दाशी तसूभरही तडजोड करायला पंडित मदन मोहन मालवीय तयार नव्हते…

… समोर बसलेल्या पंडितजींकडे पाहून आपल्या पायावर घेतलेला पाय हलवत नवाब बोलत होता… नबाबाच्या पायात मोजडी होती… एका अर्थी अप्रत्यक्षपणे नवाब पंडितजींना वहाण दाखवत होता… 

… पंडित जागेवरून उठले आणि अत्यंत नम्रतेने त्यांनी नबाबाच्या पायातली मोजडी काढून घेतली… नबाबाने दुसरा पाय पुढे केला.  पंडितजींनी तीही मोजडी काढून घेतली आणि ‘ बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी आपल्याकडून हीच देणगी असे मी समजतो ‘ म्हणून बाहेर पडले…

… आपण पंडितजींना जोडे दिले या आनंदात… नवाब खुशीत गाजरं खात होता…

… आणि तोपर्यंत नबाबाच्या कानावर बातमी येऊन धडकली… पंडितजी त्याच्या मोजड्यांचा हैदराबादच्या भर चौकात लिलाव करणार आहेत… नबाबाच्या अब्रूचं खोबरं व्हायची वेळ आली होती…

… आणि खरंच दुसऱ्या दिवशी सकाळी पंडितजी नबाबाच्या मोजड्या घेऊन लिलावासाठी हैदराबादच्या भर चौकात उभे राहिले… लिलावाची बोली सुरू झाली… नबाबाचा खास माणूस प्रत्येक बोलीच्यावर आपली बोली लावू लागला… पंडितजींचे जिवलग सहकारी गर्दीतून नबाबाच्या खास माणसाच्या बोलीच्या वर प्रत्येकवेळी बोली लावत होते… अर्थात तशी योजना खुद्द पंडितजींनीच केली होती…

…पंडितजींची अपेक्षा होती तेवढी बोली नबाबाच्या खास माणसाने लावली… बहुदा ती तीन-साडेतीन लाखाच्या आसपास असावी… पंडितजींनी आपल्या जिवलग सहकाऱ्यांना डोळ्याने इशारा केला… बोली थांबली… लिलाव संपला…

… आपल्याच मोजड्या… तीन साडेतीन लाख रुपये मोजून नबाबाने हैदराबादच्या भर चौकातून खरेदी केल्या… आणि हो–हे शे-सव्वाशे वर्षापूर्वीचे तीन साडेतीन लाख रुपये… जेव्हा ६४ पैशांचा रुपया होता, आणि एका रुपयाला ३२ नारळ मिळत होते… 

… “हिंदू” या एका शब्दासाठी आपल्या बुद्धीमत्तेचे सगळे कसब पणाला लावणारा… नबाबाची सगळी गुर्मी मस्ती उतरवून त्याच्याच मोजड्या त्याच्याच गळ्यात मारणारा… भारत मातेचा थोर सुपुत्र… MMM… देशाच्या स्वातंत्र्यासाठी तनमनधन अर्पण करणारा हा आधुनिक महर्षी… स्वातंत्र्यापूर्वी अवघे दहा महिने आधी स्वर्गवासी व्हावा हा काय दैवदुर्विलास…

पंडितजींच्या चरणी शतकोटी वंदन

संग्राहक :- श्री सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भोग जे येती कपाळी ☆ सुश्री प्रज्ञा मिरासदार

? विविधा ? 

☆ भोग जे येती कपाळी ☆सुश्री प्रज्ञा मिरासदार ☆ 

एक म्हातारी साधारण साठ एक वयाची रस्त्याच्या कडेला रडत बसलेली दिसली. चांगल्या घरातली वाटत होती. कुणी असं दिसलं की नकळतच माणुसकी जागी होतेच. तसेच मीही तिच्या जवळ गेले आणि विचारलं ” काय झालं आजी? रडताय का?” तशी ती म्हणाली ” भोग आहेत भोग! माझ्या नशिबाचे भोग भोगतीय मी!” रडणं थांबत नव्हतंच.मग तिला पाणी दिलं. इतरांच्या मदतीनं तिला उचललं. एका बऱ्याशा हॉटेलमध्ये नेलं. खाऊ पिऊ घातलं. नंतर तिला बोलतं केलं. तिनं सांगितलेली तिची हकिकत अंगावर काटा आणणारी होती.

तिचा नवरा कोरोनानं गेला. बऱ्यापैकी पैसा तो बाळगून होता. मुलगा सून नातवंडे , स्वतः चं घर ,सगळं व्यवस्थित होतं. पण अलीकडे सुनेला ती घरात नकोशी झाली होती. सुनेच्या सांगण्यावरून मुलानं तिच्या बॅ॑क अकाउंटला स्वतः ची नावे लावली होती. आणि हळूहळू तिच्या सगळ्या पैशांवर डल्ला मारला.आज तर कहरच झाला होता. मुलगा घरी नाही हे पाहून सुनेने तिला घराबाहेर हाकलून दिलं . आणि वर पुन्हा धमकी दिली की परत आलात तर मीच रॉकेल ओतून पेटवून घेईन.

“आता याला काय म्हणायचं? माझंच नशीब फिरलं.भोग का भोगायला लावतोय देव मला? काय वाईट केलं मी कुणाचं?” म्हातारीच्या रडण्याला अंत नव्हता. अगदी करूण प्रसंग होता.

भोग!!! का भोगायला लावतो देव आपल्याला? या प्रश्नाचं उत्तर काही सापडत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात भोग हे भोगावेच लागतात.देवादिकांनाही भोग चुकले नाहीत. राम, कृष्ण या सर्व मानवी अवतारात देवानेही भोग भोगले. संत ज्ञानेश्वर, त्यांची भावंडे, संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा वगैरे संतांना सुद्धा

भोगांनी सोडले नाही.तिथं तुमची आमची काय कथा?? स्वरूप वेगवेगळं असतं. पण दु:ख म्हणजे भोग का? की सुखाचेही असतात भोग? देवानं सगळ्यांना सुख दुःख दिलंय. कुणाच्या वाट्याला कमी जास्त सुख दुःख आहेच. जे नशिबी येतात ते भोग भोगावेच लागतात.

कोणाला ते भोग भोगण्याची ताकद असते किंवा येते.म्हणजेच मनाचा खंबीरपणा त्याच्याकडे असतो. जो मनाने दुबळा , कमकुवत असतो.त्याला भोगातून दु:खच वाट्याला येतं.त्यातूनच माणसाला क्वचित शहाणपण येतं.

भोग आणि उपभोग या अगदी भिन्न गोष्टी आहेत. त्या उपभोगाला सुख या शब्दाची झालर आहे. हे उपभोग सुखासाठीच असतात. अर्थात त्या उपभोगांनी सुख मिळतं की नाही ,कुणास ठाऊक!!! पण माणसांची प्रवृत्ती उपभोगाकडे जास्त झुकते. एकदा का उपभोगाची सवय झाली की ते उपभोग नाही मिळाले तर माणसाला तेच आपले भोग आहेत असे वाटते. म्हणजेच भोग हे निरनिराळ्या प्रकारचे असतात. ते भोगायला लागतातच. त्यांची तीव्रता तुम्ही त्याला कसे तोंड देता यावर कमी जास्त होते.

“भोग जे येती कपाळी, ते सुखाने भोगतो”

असं कविवर्य सुरेश भट म्हणतात. एखाद्या स्त्रीचा पती अकाली गेला, तिच्या वाट्याला फरफट आली तर ते तिचे भोग झाले. पण एखाद्या स्त्रीचा पती म्हातारपणी, अंथरूणाला खिळून होता, नंतर गेला तर तो ‘सुटला’ असं वाटतं. ते त्या  स्त्रीचे भोग ठरत नाहीत. म्हणजे परिस्थिती नुसार भोगाची किंमत होते. कमकुवत मन असलेला कमजोर पडतो आणि आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग अवलंबितो.

भोगातून बाहेर पडण्यासाठीही माणूस मार्ग शोधतो. देवधर्म, उपासतापास, नवससायास,हे मार्ग अवलंबितो. स्वतःचं मन स्थिर ठेवणं हा उपाय येथे महत्वाचा आहे. त्यासाठी जप, नाममंत्र, गुरूपदेश यांचाही आधार घेतला जातो. कुणी साधनेचा मार्ग चोखाळतात. तर कुणी साधनेच्या नावाखाली मूळ मुद्द्यापासून दूर पळतात.

योग, प्राणायाम, योग्य व्यायाम, नेहमी नकारात्मक विचार न करता चांगला , सकारात्मक विचारच करणे इत्यादी गोष्टींनी मन स्थिर राहण्यास मदत होते.

एकदा भोग भोगून झाले की ते पुन्हा येणार नाहीत याचाही भरवसा नसतो. जे खरोखर नशीबवान , त्यांना नसतील लागत ते भोगायला. पण काहींच्या नशिबी खरंच काही अडचणी, भोग ठाण मांडून बसलेले असतात.

खरोखरच साधना करून किंवा कोणी चांगला गुरू भेटला तर यातून तो मार्ग दाखवू शकतो. त्यासाठी देवांवर, गुरूंवर ,माणसाची दृढ श्रद्धा, भक्ती, विश्वास हवा. पंढरपूरला आषाढीच्या सोहळ्याला माणसांचा महासागर लोटतो. ते केवळ एका पांडुरंगाच्या श्रद्धेपोटी, भक्तीपोटीच!! त्या बिचाऱ्या वारकऱ्यांच्या नशिबात भोग नसतील का? असतीलच!!! पण विठोबाच्या चरणापाशी आल्यावर त्यांना त्यांच्या भोगांचा तात्पुरता विसर तरी पडतो.

म्हणजेच जे देवाने दिले, दैवाने दिले ते भोग सुखाने भोगावेत. त्यासाठी श्रद्धा, भक्ती, साधना आवश्यक आहे. बाकी आपापल्या भोगातून सुटका कशी करून घ्यायची हे ज्याचे तोच जाणतो.

राहता राहिला प्रश्न त्या म्हातारीचा!! तर तिला महिला बाल कल्याण समिती कडे सुपूर्द करून तिचे भोग कमी करण्याचा थोडा तरी प्रयत्न केला आहे.

© सुश्री प्रज्ञा मिरासदार

पुणे 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाबासाहेब…शुभा गोखले. ☆ सुश्री मीनल केळकर

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

? बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे ?

?  मनमंजुषेतून ?

☆ बाबासाहेब…शुभा गोखले. ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

पद्मविभूषण महाराष्टभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शतक-वर्षात पदार्पण करत आहेत याचा आनंद सोहळा मनात सुरु असतांनाच, त्यांच्या निधनाची दुःखद बातमी ऐकावी लागली, आणि त्यांच्याविषयीच्या आठवणी मनात दाटून आल्या. त्यातली ही एक अगदी पहिली आठवण —–

पुण्यात रहात असल्यामुळे त्यांना अनेक प्रसंगी पाहण्याचं भाग्य मला लाभलंय… मग ते ‘ जाणता राजा ‘’च्या प्रयोगादरम्यान असो,  नाहीतर टिळक स्मारकमधे राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार समारंभात असो.  पण एका छोट्या प्रसंगी त्यांची-माझी झालेली प्रत्यक्ष भेट मी कधीच विसरू शकत नाही ! 

साधारण ४०-४५ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. पुण्यातल्या पेशवे-काळातल्या  विश्रामबागवाड्याला जुन्या वैभवाकडे परत नेण्याचा बाबासाहेबांनी विडा उचलला होता. त्याचाच भाग म्हणून असावा बहुधा, त्यांनी एक  प्रदर्शन तिथे आयोजित केलं होतं. प्रदर्शन दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणार होतं, पण संध्याकाळचे ७ वाजून गेले असल्याने  दुसऱ्या दिवशीची तयारी म्हणून सगळ्या पाट्या, बॅनर वगैरे विश्रामबागवाड्याच्या तळमजल्यावर लागलेलेही  होते.  त्यावरची तारीख न पाहताच मी घाईघाईने वर पोहोचले (कारण प्रदर्शनाची वेळ ७.३०पर्यंत लिहिलेली होती)! 

आत गेले तर पांढरी दाढी असलेलं एक तेजस्वी व्यक्तिमत्व प्रदर्शनाच्या तयारीवर शेवटचा हात फिरवत होतं. बाकी कुणीच नव्हतं ! माझी चाहूल लागल्यावर त्यांनी वळून प्रेमाने विचारलं, “ अगं आजच आलीस का ? प्रदर्शन तर उद्यापासून आहे ! “

मी पण निर्भयपणे सांगितलं की, “ आता खाली पाटी दिसली म्हणून आले. आम्ही लांब रहातो. आणि आता  परत गावात येता येणार नाही पुढच्या दोन दिवसांत ! “

मग त्यांनी ‘ बरं ‘ म्हणून सगळ्या प्रदर्शनाचं दर्शन घडवत मला वाड्याच्या गतवैभवाची कथा सांगितली. 

अशी exclusive treatment मिळणारी मी किती भाग्यवान होते हे कळायचं ते वय नव्हतं ! प्रदर्शनाची सैर संपल्यावर, शेवटाकडे पोहोचल्यावर तिथली पाटी वाचून मी चक्क फ्रॉकच्या खिशातून आठ आणे काढून त्यांना देऊ केले ! त्यांना माझं काय करावं हेच कळेना ! “ अगं राहू देत “ ते म्हणाले.  तर माझा एकच धोशा…’ प्रदर्शन बघण्याचं मूल्य ५० पैसे आहे ना पण !’ शेवटी माझी समजूत काढत म्हणाले की,” ते मूल्य उद्यापासून प्रदर्शन सुरू झाल्यावरसाठी आहे ! “ —   मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिला की ‘ शाळेत  इतिहास छान शिक ! ‘

—-आता इतक्या वर्षांनंतर या सगळ्या संस्कारांचं महत्व पटतंय ! आपला बहुमोल वेळ एका शाळकरी मुलीसाठी इतक्या सहजपणे खर्च करायची त्यांची तयारी, आता मला माझ्या विद्यार्थ्यांंसाठी केव्हाही वेळ द्यायला नेहमीच प्रेरणादायी ठरते ! 

श्री. बाबासाहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!

– शुभा गोखले

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ समाज प्रबोधनाचे सरदार: गं .बा. सरदार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ समाज प्रबोधनाचे सरदार: गं .बा. सरदार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

गंगाधर बाळकृष्ण सरदार

 (२ ऑक्टोबर १९०८-१ डिसेंबर १९८८)

गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचं सारं लेखन समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन या गोष्टी केंद्रस्थानी ठेवून केलेले आहे. समाजाचे निकोप परिवर्तन व्हायचे असेल, तर सांस्कृतीक विषमता आणि आर्थिक दु:स्थिती नाहीशी व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती. त्यांच्या सामाजिक चिंतनाचा प्रभाव स्वाभाविकपणे त्यांच्या साहित्यिक दृष्टीकोणावर पडला आहे. सामाजिक दायित्व ते मानतात, त्यामुळेच साहित्याची निखळ कलावादी भूमिका त्यांना मान्य नाही.

गं .बा. सरदार यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील जव्हार गावी झाला. त्यांचे शिक्षण जव्हार, पुणे, मुंबई इथे झाले. त्यानंतर नाथाबाई दामोदर ठाकरसी या महिला विद्यालयात मराठीचे व्याख्याते म्हणून त्यांची निवड झाली. ६८ला ते मराठीचे प्रपाठक  म्हणून निवृत्त झाले.

जव्हार मध्ये आदिवासी बहुसंख्येने आहेत. त्यामुळे त्यांचे जीवन, त्यांची दु:खे, समस्या इ.शी त्यांची जवळून ओळख झाली. घरातील वातावरणही समतावादी होतं.त्यामुळे सामाजिक भेदाभेदापलीकडे जाऊन माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांना लाभली.

शालेय जीवनात स्वामी रामतीर्थ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता. सावरकरांच्या विचारांनेही त्यांना काही काळ मोहित केलं होतं. नंतर ते गांधीवादाकडे वळले होते. मिठाच्या सत्याग्रहात ते सामील झाले होते आणि त्यासाठी त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता. पण पुढे बदलत्या काळात, त्यांना गांधीवादाचे अपूरेपण जाणवू लागले. मग ते साम्यवादी विचारधारेकडे ओढले गेले. सक्रीय राजकरणाकडे न वळता, ते लेखन-भाषण याद्वारे समाज प्रबोधन करू लागले. त्यांची ग्रंथसंपदा पहिली तरी त्यांचे समाज प्रबोधनाशी असलेले अतूट नाते लक्षात येईल.

अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका हा त्यांचा पहिला ग्रंथ १९३७ साली प्रसिद्ध झाला.  १८८५ ते १९२० या कालखंडात मराठी गद्याचा विकास झाला, त्याची पार्श्वभूमी अव्वल इंग्रजी काळातील मराठी गद्यलेखकांनी कशी तयार करून ठेवली, याचे विवेचन त्यांनी यात केले आहे. त्यासाठी त्यांनी १८०० ते १८७४ या काळातील विविध ग्रंथांचा परामर्श घेतला आहे.

सरदारांची आणि ग्रंथसंपदा सांगायची तर १.महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी -१९४१ , २.न्या. रानडेप्रणीत, सामाजिक सुधारणेची तत्वमीमांसा, ३.आगरकरांचे सामाजिक तत्वविचार , ४. म. फुले विचार आणि कार्य , ५ .प्रबोधानातील पाउलखुणा – १९७८       ६. नव्या युगाची स्पंदने –  १९८४, ७. नव्या ऊर्मी नवी क्षितिजे – १९८७ , ८. परंपरा आणि परिवर्तन- १९८८. पुस्तकांची ही नावे वाचली तरी  प्रबोधनाकडे त्यांचा असलेला कल स्पष्ट होतो.

रानडे, चिपळूणकर, यांच्या पूर्वी महाराष्ट्रात चेतनादायी ठरेल असे काम ज्यांनी केले पण ज्यांची उपेक्षा झाली, त्या अव्वल इंग्रजी काळातल्या, भाऊ महाजनी, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रम्हचारी म. ज्योतिबा फुले ह्यांच्या कार्याचे विवेचन त्यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या कार्यामागे न्या. रानडे यांचे तात्विक अधिष्ठान काय होते, प्रबोधनाच्या इतिहासात त्यांचे स्थान काय होते, याचे विवेचन त्यांनी केले आहे. आगरकरांच्या सामाजिक चिंतनाचा परामर्श घेऊन धर्म , सामाजिक परिवर्तन, आणि आर्थिक प्रश्न हयासंबंधी आगरकरांच्या विचारांचे विवेचन केले आहे. म. फुले यांच्या जीवांनीष्ठेचा शोध घेऊन त्यांच्या विचारांचा सामाजिक आशय त्यांनी विषद केला आहे.

त्यांच्या स्फुट लेखातून भारतीय राष्ट्रवाद, आणि ऐहिक निष्ठा, नव्या महाराष्ट्राचे भवितव्य, संस्कृती संवर्धन आणि ज्ञानोपासणा ह्यातील अनुबंध, समाज प्रबोधन आणि धर्मजीवन, व्यक्ति आणि सामाजिक संस्था यातील अनुबंध संकुचित विचारांमुळे प्रबोधनाला पडणार्‍या मर्यादा अशा अनेक विषयांचे  विवेचन त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे , म. ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, म.गांधी, कर्मवीर भाऊराव  पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, या थोर सुधारकांच्या कार्याचा परिचय करून दिला आहे.

त्यांच्या काही लेखातून दलित साहित्याचे समालोचन आर्थिक आणि सांस्कृतिक अशा दोन्ही आघाड्यांवर घेतले आहे. जनमानसात नवीन जाणीवा रुजवणार्‍या दलित साहित्यिकांचा विद्रोह सरदारांना स्वागतार्ह वाटतो. भविष्य काळात खर्‍या अर्थाने भारतीय समाज एकात्म बनला, तर दलित वाङमायाच्या स्वतंत्र अस्तत्वाचे प्रयोजन रहाणार नाही, असे त्यांना वाटते, पण तोपर्यंत त्या साहित्याचे वेगळे दालन आणि व्यासपीठ आवश्यक आहे, असं त्यांना वाटतं.  समाजाचे निकोप परिवर्तन व्हायचे असेल, तर सांस्कृतिक विषमता आणि आर्थिक दु:स्थिती नाहीशी व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती.

’संतवाङमायाची सामाजिक फलश्रुती’  या त्यांच्या गाजलेल्या ग्रंथात, त्यांनी संतांच्या कामगिरीचा परामर्श घेतला आहे.  संतांनी मराठीसंस्कृतिक विकासात काय योगदान दिले, याचा विचार सामाजिक दृष्टीकोन ठेवून केला आहे. संतांच्या विचारामुळे सामाजिक प्रगतीत अडसर निर्माण झाला, हे काही अभ्यासकाचे मत त्यांना मान्य नाही. ‘ज्ञानेश्वरांची  जीवननिष्ठा या १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथात त्यांनी ज्ञानेश्वरांचे तत्वज्ञान आणि कार्य याच विवेचन केले आहे. याचप्रमाणे ‘तुकाराम दर्शन -६८, रामदास दर्शन – १९७२, एकनाथ दर्शन- ७८ हे ग्रंथ संपादले आहेत.

गं. बा. सरदारांच्या संपादित ग्रंथात महाराष्ट्र जीवन : परंपरा , प्रगती आणि समस्या ( २ खंड – १९६० ) आणि संक्रमण काळाचे आव्हान ( १९६६) हे २ ग्रंथ विशेष उल्लेखनीय ठरले आहेत. अनेक अभ्यासक, आणि विचारवंत यांनी लिहिलेले लेख यात समाविष्ट केलेले आहेत.

आयुष्यात त्यांनी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन लेखन केले. त्यांना अनेक सन्माननीय पदे मिळाली. १९७८ साली मुंबई येथे झालेल्या दलित साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते, तर १९८० साली बार्शी येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाशिक आणि जळगाव येथे भरलेल्या अन्याय निर्मूलन परिषदेचे ते अध्यक्ष होते. मनोर ( त. पालघर) जंगल बचाव आदिवासी परिषद भरली होती. या परिषदेचेही ते अध्यक्ष होते.

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि इतिहास संशोधक मंडळ इ. विविध संस्थांमध्ये त्यांनी काम केले. त्यांचे पुणे येथे १ डिसेंबर १९८८ रोजी निधन झाले.त्यानंतर हेमंत इनामदार यांनी  त्यांच्यावरचा  गं. बा. सरदार: व्यक्ती आणि कार्य हा ग्रंथ १९९८ मध्ये लिहून प्रसिद्ध केला.

साभार  – इंटरनेट

©️ श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रेम…. ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ? 

☆ प्रेम…. ☆सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे खरंच किती भावार्थ लपला आहे नाही या गाण्यात…प्रेम ही ईश्वरी देणगी आहे.. प्रेम हे ठरवून कधीच होत नाही..

प्रत्येक व्यक्ती कधीना कधी कोणावर ना कोणावर प्रेम करतेच नाही का..

कुणीतरी आपल्यासाठी आपल्याला आवडतं म्हणून काही करणं म्हणजे प्रेम असतं.  प्रेम हे केवळ व्यक्तीवर  असतं ? तर नाही.. ते भावनेवर असतं त्याच्या/ तिच्या अस्तित्वावर असतं.. त्याच्या / तिच्या  सहवासात असतं… प्रेम हे दिसण्यात असतं ? तर  ते  नजरेत असतं.. जगायला लावणाऱ्या उमेदीत असतं.. प्रेम निर्बंध असतं..त्याला वय ,विचारांचं बंधन कधीच नसतं. जेंव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते तेव्हा अख्खं जग सुंदर दिसू लागतं…त्याचे संदर्भ मनातल्या मंजुषेशी जुळलेले असतात…ते एक अनामिक नातं भावनांच्या मनस्वी लाटा वाहवणार असतं…एक हुरहूर,ओढ आणि तेवढीच धडधड वाढविणारही असतं. कांहीही नसताना खूप कांही जपणार आणि जोपासणार असतं. अश्या अनामिक नात्याची उत्कटता शब्दांत व्यक्त करताचं येत नाही…

प्रेम सहवासाने वाढते.. ते कृतीतून  स्पर्शातून व्यक्त होते.. प्रेमामुळे तर आपुलकी स्नेह निर्माण होतो.

सर्वोच्च प्रेमाची परिणीती म्हणजे त्याग…

आपल्या प्रिय गोष्टीचा त्याग करणे हे ही एक प्रकारचे प्रेमच असते नाही का..! शेकडो मैल केलेला प्रवास म्हणजे प्रेमाची परिसीमाच नाही काय?.. प्रेम ही एक सर्वोच्च शक्ती आहे.

प्रेमामुळेच विविध महाकाव्यांची निर्मित झाली.. प्रेम हे  पहाटेच्या धुक्यात असते… रातराणीच्या सुगंधात असते..खळखळ वाहणाऱ्या निर्झरात असते तर प्रेम पहाटेच्या मंद झुळकीतही असते बरे.. इतकं नाही तर दूरदूर जाणाऱ्या रस्त्यात सुद्धा प्रेम असते… प्रेम गालावरच्या खळीत असते…झुकलेल्या नजरेत असते…

ओथंबलेल्या अश्रूत ही असते.. शीतल चांदण्यात ,आठवणींच्या गाण्यात, चिंचेच्या बनात, निळ्याशार तळ्यात..दोन ओळींची चिठ्ठीसुद्धा प्रेम असतं..घट्ट घट्ट मिठीसुद्धा असते.

गुणगुणाऱ्या भुंग्याला पाहून लाजणाऱ्या फुलात ही प्रेम असते.

सृष्टीच्या प्रत्येक रचनेत चराचरात निसर्गात प्रेम असते आणि आहे…

विरह हा प्रेमाचा खरा साक्षीदार …

वाट पाहण्यातील आतुरता, हुरहुर, ती ओढ, ती न संपणारी प्रतीक्षा.. वेळ किती हळूहळू जातोय असं वाटणारी ती जीवघेणी अवस्था. …तो किंवा ती कधी येईल ? ही वाटण्यातील अधीरता, तो किंवा ती आपल्याला फसवणार तर नाही ना ? अशी मनात येणारी दृष्ट शंका… किती किती भावना नाही का ?

मी तिच्यावर /त्याच्यावर प्रेम करावे. त्याला /तिला अजिबात जाणीव नसू नये. .मी निष्ठापूर्वक प्रेम करावे त्याची उपेक्षा व्हावी. ..त्यामुळे झालेले दुःख मला प्राणापेक्षा प्रिय आहे. .ही कधी संपत नाही अशी गोष्ट आहे नी न संपणारी रात्र आहे. .फक्त आणि फक्तच ज्योत बनून तेवत रहाणे हेच तर खऱ्या प्रेमाचे भाग्यदेय आहे नाही का ? ….पण खेदाची बाब ही आहे की प्रेम या सर्वोच्च भावनेचा,त्याच्या पवित्रतेचा अर्थच लोकांना अद्याप समजलेला नाही.. नसावा त्यामुळे तर विकृतीकडे पाऊले उचलली जात आहेत…

प्रेमात वासनेला मुळीच स्थान नसते तर तिथे हळूवार नाजूक स्पर्श हवा असतो. दोन जीवांच्या अत्युच्च प्रेमामुळेच तर सृष्टीची निर्मिती झाली आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद प्रेमात असते नुसते मनच नाही तर जगही प्रेमामुळे जिंकता येते.

प्रेम म्हणजे स्वतः जगणं आणि दुसऱ्याला जगवण आहे… प्रेमाचा परिस्पर्श ज्याला होतो त्याचे सारे आयुष्य उजळून निघते..म्हणूनच याला देवाघरचे लेणे असे संबोधले आहे…

प्रेम हृदयातील एक भावना.. कुणाला कळलेली.. कुणाला कळून न कळलेली.. कुणी पहिल्याच भेटीत उघड केलेली.. तर कुणी आयुष्यभर लपवलेली… कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली.. तर कुणाची गंमत झालेली.. कुणाचे आयुष्य उभारणारी.. तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी.. फक्त एक भावना.. !

© सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार

सौ.अस्मिता इनामदार

⭐ मनमंजुषेतून ⭐

☆ मोक्ष कशात आहे ? – मुकुंद पुराणिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार☆

चुनीलालजींना चालतांना कष्ट पडतात, पण आठवड्यातून कमीतकमी ३ वेळा ५०० मीटर लांब असलेल्या शंकर मंदिरात ते नियमित जात असतात. भाविक प्रवृत्तीचे आहेत. भगवान शंकराचं मंदीर आमची इस्टेट आहे, असं म्हणत ते दर्शनाला जातात. चांगली गोष्ट आहे ! 

माणूस श्रद्धावानच असावा. दगडाच्या देवावर, देवस्वरूप माणसांवर, सत् अशा कार्यांवर माणसाची श्रद्धा असणं स्वाभाविक आहे. पशू नसल्याचं… आणि माणूस असल्याचं ते एक लक्षण आहे. 

पण देवळांतील देवावर श्रद्धा ठेवत असता, आपल्या क्षेत्रात काही अन्य सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांद्वारे, राष्ट्र चिंतन,राष्ट्र आराधन, राष्ट्र उपासना चालत असते, तिकडे चुनीलालजी ढुंकूनही वळत नाहीत. 

मोक्ष हा वैयक्तिक पुरुषार्थ आहे. देवळात जाण्याने मोक्ष मिळतो….आणि मातृभूमीच्या संवर्धनार्थ योजिलेल्या कार्यात,आयामात, प्रकल्पांत तो मिळत नाही,असं वाटणं कितपत योग्य आहे ? 

मला वाटतं, या क्षेत्रात मोक्ष तर मिळतोच… पण ‘धर्म-पुरुषार्थ’ ही घडतो. आपल्या वैयक्तिक सत्कर्मात व संस्थांच्या सेवा प्रकल्पात धर्म आहे, ऋणमोचन आहे, ऋण फेडल्याचं समाधान आहे… हे आम्ही लक्षात घ्यायला हवे की नको ?  

जय भोलेनाथ ! जय श्रीकृष्ण ! प्रभू श्री रामचंद्रकी जय ! याच सुरात व याच भाव-भक्तीने, तन्मयतेने “भारत माता की जय !” चा जयजयकार तितकाच मोक्षदायी नाही का ?

देवासमोरचं कीर्तनसुद्धा आता अध्यात्मिक कमी व राष्ट्रीय अंगाने जाणारे अधिक होते आहे…. तेव्हा मोक्ष संकल्पनेचे तात्पर्य-अर्थ  देव, देऊळ यातच सिमीत आहेत… असं मानणं उचित नाही.

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी राष्ट्र कारण केलं… संत गाडगेबाबांनी स्वच्छकारण केलं… कुणी महापुरूषांनी दलित समाजोद्धाराचं कार्य केलं… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व स्वयंसेवकांनी सेवा कार्ये पार पाडली, पाडताहेत…. मातृभूमीच्या रक्षणार्थ सैनिकांनी बलिदान केले… आजही करताहेत… या सर्वांना  ‘धर्म व मोक्ष’  हे दोन पुरूषार्थ तर प्राप्त झालेच, शिवाय अधिक काही ! 

जीवनाचा परमार्थ उलगडण्याचे  जिथे प्रामाणिक प्रयत्न होतात, तिथेही धर्म व मोक्षाचं दान पडतं, हे समजून घ्यायला हवे. 

आपल्याला काय वाटतं ?

ले : मुकुंद पुराणिक

संग्रहिका – सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 2 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

(पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली ! ) इथून पुढे ——-

गडाच्या चढाला प्रारंभ केला, त्या वेळी तर अक्षरश: काळोख दाटला, आणि त्यांत सुया टोचाव्यात, तसे अंगावर कोसळणारे पावसाचे थेंब. कसेबसे रात्री नऊ -दहाच्या सुमारास गडावर पोहोचलो, अन् शेडग्याने धर्मशाळेत गोळा करून ठेवलेले सर्पण जाळीत रात्रभर अंगे शेकीत बसून राहिलो. सहज चर्चा निघाली किल्ले बघण्याची. बाबाने बोलता बोलता म्हटले, की सिंहगड, पुरंदर, राजगड अन् तोरणा हे किल्ले मी असंख्य वेळा पाहिले आहेत ! एकूण दुर्ग किती पाहिले, ते आठवत नाही!

पुरंदर हे तर बाबाचे घरच. पुरंदरे हे नावच त्या किल्ल्यावरून पडलेले. एवढ्याने भागले नाही. या घराण्याला पर्वतीजवळची दोन चाहूर जमीन मलिकंबरने इनाम दिलेली. वतनाचे ते कागद अजून सुरक्षित आहेत. त्यानंतर मराठेशाहीत या घराण्याने तोलामोलाची स्वराज्यसेवा केलेली. पूर्वजांच्या कमरेला तलवार सदैव बांधलेली. 

पण अशा तर किती पूर्वजांच्या किती कुलदीपकांनी आपापल्या तलवारी मोडीत फुंकून टाकल्या आहेत. आपापल्या वतनांच्या कागदांनी पाणी तापवायचे बंब पेटविले आहेत. पूर्वजांच्या प्रतिष्ठेचे एरवी मोल ते किती ? 

पण ते या बहाद्दराने सांभाळले. त्याला शिकल करून, सहाणेवर धरून ते पाजळले. त्याची लखलखीत तलवार हाती पेलली ! 

बखरींचा अभ्यास तर अनेकांनी केला आहे. पण अशी शब्दकळा कुणाजवळ ? बाबाचे शिवचरित्र वाचू लागावे, तर भरजरी पाटाव नेसलेली, कानी-नाकी अलंकार ल्यालेली, वज्रचुडा पहेनलेली, कुण्या कुळवंताची कुळवंतीच हाती नीरांजन घेऊन उभी आहे, असा भास होऊ लागतो. बाबाने अवघ्या बखरी वाचल्या आहेत. अवघे शिवचरित्रसाहित्य साक्षेपाने, पदरमोड करून धांडोळले आहे. आणि मग एक नवी लखलखीत, तेजाने पुंजाळलेली सप्रमाण बखरच लिहिली आहे! धन्य आमची पिढी, की तिच्यात बाबासारखा बखरकार जन्मास आला !

पण हे एवढे शिवमहाभारत लिहूनही लटके प्रौढत्व कसे ते अंगी अजिबात नाही. अंगीचे शैशव या साऱ्या उद्यमामुळे हारपले नाही. एवढा प्रचंड खटाटोप, हा नजर फाडून टाकणारा प्रवास, हे डोंगरदऱ्या भटकणे, हे सगळे करूनही मूळचा अवखळपणा लवलेश उणावला नाहीं. 

छत्रपतींच्या जीवनाचा सारा तपशील जसा मितिवार, प्रहर-घटिकानिशी मुखोद्गत, तसेच, इतर पाठांतर काही कमी नाही. गडी जरा खुलू द्या. रानांत भटकत असतां सभ्यतेचे बंध थोडे सैल होऊं द्या. मग पाहा चुटक्या – चुटक्यांचा धबधबा कसा वाहूं लागतो, ते. कुणाकुणाच्या नकला, कुणाकुणाचे स्वर, कुणाकुणाचे खाकरणे, ठसकणे, अगदी सही सही ! इतिहासाच्या पंचपक्वान्नाच्या जोडीला लावणी- फटक्यांची चटणी-लोणचेही हजर ! 

पु.लं. नी ‘तुझे आहे तुजपाशी’ मध्ये कुण्या एका मुलीविषयी लिहिले आहे, की तिने जन्मभर चालतच रहावे ! 

बाबासाहेब पुरंदरे हा मनुष्य संगतीला लाभला. की वाटते, याने जन्मभर बोलतच रहावे ! असे साभिनय बोलणें, की त्याला तुलनाच नाही ! 

नागपूरचा एक प्रसंग सांगतो. विदर्भ साहित्य संघ आणि मोरभवन अशा दोन टोलेजंग इमारती एकीसमोर एक उभ्या आहेत. मध्ये सडकच काय ती. एका अतिशय विख्यात, वक्तृत्वाबद्दल सुप्रसिद्ध, एका काळी मराठी वाचकांवर अनभिषिक्त सम्राटपद गाजविलेल्या, पिकलेल्या प्राध्यापकांची शृंगाराने सिक्त झालेली व्याख्याने मोरभवनात सुरू होती. त्याच वेळी या तरूणाची शिवचरित्रावरील व्याख्याने समोरील विदर्भ साहित्य संघात चालू झाली. शिवचरित्र हे शिवधनुष्यच आहे. भलत्याने त्याला स्पर्श करू नये. 

पण कौतुक सांगतो, की ज्या वयात शृंगार अतिशय रोचक वाटतो, अशा तरूणांचे जथेच्या जथे मोरभवनातली शृंगाररसाने आर्द्र व्याख्याने टाकून विदर्भ साहित्य संघात गर्दी करू लागले. 

अशी ही जुगुलबंदी आठ दिवस चालली होती. शेवटी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह तुडुंब भरून लोक बाहेर उभे राहून बाबांचा वाक्प्रवाह पिऊन जाऊ लागले. 

शेवटी मोरभवनांतील एका पेन्शनर श्रोत्याने कुतूहल म्हणून विचारले, 

“काय, हो ? इथे काय राज कपूर पाहायला लोक जमले आहेत काय ?” 

उत्तर मिळाले, 

“नव्हे ! इथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शिवराज्याभिषेकाचा प्रसंग सांगत आहेत !”

                                                                                                               समाप्त

लेखक  – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ का टा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

⭐ का टा ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी….”

हे गाणं ऐकायला आलं, की माझ्या मनांत विचार येतो, बेंबीच्या देठापासून ओरडण्याची पाळी, तो ‘काटा’ इतका रुतेल (कुठे, ते ज्याचे त्याने आपापल्या कल्पनाविलासाने रंगवायला, माझी काहीच हरकत नाही !) एवढी वेळच स्वतःवर का येऊ द्यायची म्हणतो मी ? आता ‘काटा’ म्हटला की तो टोचणारच, त्याचा तो स्वभावधर्मच नाही का ? मग तो आपला स्वभावधर्म कसा सोडेल ? अहो ‘काटा’ तर निर्जीव, इथे माणसा सारखा सजीव माणूस सुद्धा, मरेपर्यंत आपला स्वभावधर्म सोडत नाही, तर तो त्या निर्जीव ‘काट्याने’ तरी का बरे सोडावा म्हणतो मी ? आपणच त्याच्या पासून चार हात लांब रहायला नको का ? बाभळीच्या वनात शिरायच आणि काटे टोचले म्हणून गावभर बोंबलत फिरायचं, ह्यात कुठला आलाय शहाणपणा ?

गुलाबाच्या वाटीकेत टपोरे, मनमोहक रंगाचे गुलाब लागलेत म्हणून त्याला काटेच नसतील, असं कसं होईल ? उलट जितका गुलाब मोहक, सुगंधी तेवढे त्याला अणकुचिदार आणि जास्त काटे असं निसर्गाच जणू समीकरणच ठरून गेलं आहे म्हणा नां ! सध्या सायन्स नको तितकं पुढे गेलेलं असल्यामुळे, काही शास्त्रज्ञानी वेगवेगळ्या बिन काट्याच्या गुलाबाच्या जाती पैदा केल्या आहेत असं म्हणतात ! खरं खोटं तो फुलांचा राजाच जाणे !

जी गोष्ट सुंदर गुलाबांची तीच गोष्ट चवीच्या बाबतीत म्हणालं तर माशांची ! एखाद्या माशाच्या अंगात जेवढे जास्त काटे, तेवढा तो मासा चवीला लय भारी असं म्हणतात ! मी स्वतः कोब्रा असल्यामुळे, त्या लय भारी चवीच्या माशाच्या काट्याच्या वाट्याला कधी जायचा प्रसंग आला नाही ! हे आपलं माझ्या नॉन व्हेज खाणाऱ्या काही मित्रांकडून मिळालेलं फुकटच जनरल नॉलेज बरं का ! याच मित्रांच्या, काट्या सकट मासे खातांना कोणा कोणाच्या घशात कसा काटा अडकला, मग तो काटा काढायला काय, काय युक्त्या कराव्या लागल्या, याचे रसभरीत किस्से खूप ऐकले आणि मनसोक्त हसलो ! कोणी अशा वेळेस डझन डझन केळीच काय खाल्ली, कोणी दहा बारा ग्लास पाणीच काय प्यायले, एक ना अनेक ! पण मी म्हणतो, ऊस गोड लागला म्हणून  जसा कोणी मुळासकट खात नाहीत, तसा मासा कितीही चविष्ट असला, तरी तो काट्या सकट खायच्या भानगडीत पडायचेच कशाला ? शेवटी काटा तो काटाच आणि तो सुद्धा घशा सारख्या नाजूक अवयवात अडकलाय, ही कल्पनाच माझ्या अंगावर काटा आणते बघा ! पण या अंगावरच्या काट्याच एक बरं असत मंडळी, तो ना कधी आपल्याला टोचत ना आपल्या शेजाऱ्याला !

“भय्या काटा मत मारो, काटा मत मारो, बरोबर वजन करो !” अस धेडगुजरी हिंदी आपण कधी, आपल्या बायको बरोबर भाजीला गेला असाल तर आणि तरच ऐकलं असण्याची शक्यता आहे ! एवढं त्या भय्यावर ओरडून सुद्धा तो काटा मारायचा आपला जन्मसिद्ध हक्क काही सोडत नाही तो नाहीच ! वर, मी काटा न मारता वजन केलं आहे, तुमचा विश्वास नसेल तर कुठल्याही भाजीवाल्याकडे जाऊन (उंदराला मांजर साक्षी !) वजन करा, कमी भरलं तर भाजी फुकट घेवून जा, असा घीसापिटा ठेवणींतला डायलॉग बायकोला ऐकवतो ! या वर, बायको पण, बघितलंत हाच भय्या किती प्रामाणिक आहे, असा चेहरा करून आपल्याकडे बघते आणि आपण पण तिला बरं वाटावं म्हणून, तोंड देखलं हसतो !

फार, फार पूर्वी पासून आपल्या “भारतात” कुठलीही एखादी खाण्याची वस्तू, ही स्वतःच्या हातानेच खायची चांगली आणि रास्त पद्धत होती ! आपल्यावर साहेब राज्य करून गेल्या नंतर, त्याने ज्या अनेक वाईट गोष्टी मागे ठेवल्या, त्यात काट्या चमच्याचा नंबर फार वरचा लागावा ! नंतरच्या स्वतंत्र “इंडियात” सगळ्याच हॉटेल मधून, मग या काट्या चमच्याने आपले स्थान कायमचे पक्के करून टाकले ! जेंव्हा केंव्हा माझी हॉटेलात जाण्याची वेळ येते, तेंव्हा मी पाहिलं काम काय करतो माहित आहे ? तर, माझ्या डिशच्या आजूबाजूची सगळी काटे, चमचे, सुऱ्या ही आयुध उचलून बाजूला ठेवतो ! मंडळी, स्वतःच्या हाताने उदरभरण करण्याची मौज काही औरच असते, या माझ्या मताशी बहुतेक मंडळी सहमत असावीत ! काय आहे ना, स्वतःच्या हाताने जेवल्या शिवाय मला जेवल्याच समाधान मिळत नाही, हे ही तितकंच खरं, मग तो काटा, चमचा सोन्याचा का असेना !

मंडळी, मी एक साधा सरळमार्गी, नाका समोर चालणारा मध्यमवर्गीय असल्यामुळे, माझं कोणाशीच वैर नाही ! त्यामुळे माझ्यावर कधी कोणासारखी, काट्याने काटा काढायची वेळ कधीच आली नाही आणि सध्याच माझं वय पहाता, अशी वेळ या पुढे यायची अजिबातच शक्यता नाही ! आणि तुम्हांला सांगतो, मुळात काट्याने काटा काढतात यावर माझा विश्वासच नाही ! कारण तसं करतांना मी कधी कोणाला बघितल्याचे आठवत पण नाही ! असो ! पण हां, काही जणांच्या टोचलेल्या काट्याचा नायटा होताना मात्र मी बघितलं आहे मंडळी !

शेवटी, आपण सर्व आपल्या जीवनात मार्गक्रमण करीत असलेल्या वाटेवर, कुठल्याही प्रकारच्या कंटकांचा त्रास आपल्याला कधीच होऊ देवू नकोस, अशी त्या जगदीशाच्या चरणी प्रार्थना करतो !

शुभं भवतु !

ता. क. – हा लेख वाचतांना कोणाच्या मनाला किंवा आणखी कुठे, कळत नकळत काटे टोचले असतील तर, त्याला मी जबाबदार नाही !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१९-११-२०२१

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुलसी विवाह ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? मनमंजुषेतून ?

☆ तुलसी विवाह ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नुकतीच दिवाळी संपली आहे, पण तरी परवापासून सुरु झालेल्या तुळशीच्या लग्नामुळे अजूनही मस्त सणाचे  वातावरण आहे, नुसते आजूबाजूला नाही, तर फेसबुक वर पण..

आज असंच दिरांशी बोलता बोलता , तुळशीच्या लग्नाचा विषय  झाला … आम्ही सांगलीत असताना दिरांकडे धडाक्यात ते लग्न साजरे करायचो.. तेव्हा माझ्या मनात लहानपणापासून पाहिलेली तुळशीची लग्नं आठवायला लागली ! आणि वाटलं की खरंच आपण का करतो तुळशी चे लग्न ?,हे आताच्या पिढीला समजेल अशा पध्दतीने सांगायला पाहिजे ! म्हणून हा लेखनप्रपंच !

आम्हीही लहानपणापासून तुळशीचे लग्न पाहिलंय. पण आता मुलींना त्याची कारणमीमांसा पण लागते. त्यामुळे मी लगेच त्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली. 

यामागची पौराणिक कथा आहे ती अशी–जालंदर नावाचा असुर देवांना अजिंक्य झाला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. विष्णूने जालंदरचे रूप घेऊन वृंदेचे सत्वहरण केले. 

तेव्हा जालंदराने तिला शाप देऊन दगड केले. तेव्हा ती सती वृंदावनात प्रकट झाली. हीच ती  ‘तुळस ‘— विष्णूने याचे प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी विवाह केला. विष्णूच्या कृष्णावतारात हे लग्न झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि कृष्णाला तुळस वहातो.

—– या सर्व पुराणकथा झाल्या !

पण आताही आपण तुलसी विवाह का करतो ? आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत केलेली आहे. निसर्गातील प्राणी, पशू- पक्षी, वनस्पती, वृक्ष- वेली, हे आपले सगेसोयरे आहेत. 

त्यामुळे माणूस या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव करतो. जसे वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा… पंचमहाभूतांचे त्या निमित्ताने स्मरण केले जाते. 

तुलसी विवाहाची प्रथा ही अशीच आली असावी. तुळस ह्या वनस्पतीचे शास्त्रीय महत्व आहे. तुळशीचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे आहे. तिच्या मंजि-यांपासून असंख्य रोपे तयार होतात. सर्वांना ऑक्सिजन मिळावा म्हणून पूर्वी घराभोवती तुळशीची झाडे वाढवली जात. तुळशीमुळे कीटक येत नाहीत, इतकंच काय डासही कमी होतात. तुळशीचा रस अंगाला लावला की डास चावत नाहीत. तुळशीची पाने औषधी आहेत. तुळशीच्या पानांचा रस खोकल्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या रोगांवरही तुळशीचा रस उपयोगी असतो. अशी ही बहुगुणी तुळस पूजेसाठी योग्य ठरली !

पूर्वी च्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे समाजात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना घराबाहेरची मोकळी हवा मिळत नसे. अशा विचाराने बहुतेक तुळशीला रोज स्त्रियांनी पाणी घालण्याची पध्दत  आली असावी. पूर्वी वाडा संस्कृती होती, तेव्हा वाड्यात शिरले की  मधोमध तुळशी वृंदावन असे. 

ती एक पवित्र जागा असे, जिथे संध्याकाळी घरातील स्त्रिया, मुले बाळे बसून शुभंकरोती, परवचा म्हणत असत. तुळशीसमोरच्या पणतीच्या शांत उजेडात मनही शांत होऊन जाई !

या दिवसात चिंचा,बोरे,आवळे यायला सुरुवात होते. ही फळे म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’ चा साठाच जणू ! त्यामुळे तुळशी विवाहाच्यावेळी ही सर्व फळे पूजेसाठी असत.आपोआपच घरातील मुलांना ती  खायला मिळत. उसाची मोठी झाडे आणून ती तुळशीला मांडव म्हणून वापरली जात. दिवाळी  झाल्यानंतर मुलांसाठी तुळशीचे लग्न हा एक आनंददायी कार्यक्रम असे. दिवाळीत राहिलेले फटाके 

तुळशीच्या लग्नात उडवून संपवायचे. दिवाळी फराळ संपत आला असला तरी नवीन लाडू, करंजी लग्नासाठी बनवली जात असे. तुळशीचे लग्न झाले की विवाह- मुहूर्त सुरू होत असत. आणि वातावरण सणांकडून लग्न समारंभाकडे वळत असे.

तुळशीचे लग्न ही गोष्ट आता जरी कालबाह्य वाटत असली तरी तुळशीचे गुणधर्म काही नाहीसे होत नाहीत ! निसर्ग आणि ईश्वर  यांची सांगड आपल्या संस्कृतीत अशा पध्दतीने घातली गेली आहे. शिक्षणामुळे ज्ञान वाढले, सुबत्ता आली, पण अशांतता ही वाढली. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक बेट बनले आहे !  हे असे प्रसंग लोकांना जोडून ठेवायला मदत करतात. . हल्ली लोकांना एकटेपणा मुळे इतक्या मानसिक समस्याना तोंड द्यावे लागते.. नुसती  भौतिक प्रगतीच नाही तर मन:स्वास्थ्य  जपणे हे तितकेच महत्वाचे आहे . आपल्या संस्कृतीतून हे  आपसूकच घडून येत असे

— दुसऱ्याच दिवशी तुळशीचे लग्न करून मुलीने पण तुळशी लग्नाचे फोटो पाठवले. स्वत: छान साडी नेसलेला, नातीने परकर पोलके घातलेला, आणि नातवाने तुळशीसाठी अंतरपाट

धरलेला आणि हे सर्व कौतुकाने जावई बघत आहेत—असे फोटो मोबाइलवरून आले.आणि क्षणार्धात माझे मन विमानाच्या वेगाने दुबईला पोचले…तुलसी विवाह कसा साजरा झाला हे बघण्यासाठी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

?इंद्रधनुष्य?

मावशी नावाचे सुख ☆ संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

मावशी बरोबरचं नातं खरंच खूप छान असतं . हे नातं भावनिक पातळीवर खूप आनंद देणारं असतं.

मावशी भरभरून प्रेम देते…

आपल्या जन्माआधीच, म्हणजे अगदी आपण आईच्या पोटात असतानाच मावशीची आणि आपली एक वेगळीच अदृश्य नाळ जोडलेली असते…

आपल्या जन्माने तिला झालेला आनंद अवर्णनीय असतो.

खरंच मावशी नेमकी कोण असते हो ???

आई नसताना तुमच्यासाठी तुमची हक्काची माया देणारी ,

मावशी.. ही तुमची प्रेमळ हाक ऐकताच तुम्हाला भरभरून प्रेम देणारी…

आपल्या आवडीचं , लपवून ठेवलेलं  खाऊ घालणारी…

आपल्या लहानपणाची साक्षीदार , आपल्या लहानपणीच्या आठवणी तिच्याशिवाय पूर्ण होत नाहीत…

तिचं वाढणारं वय आणि त्यामुळे वाढणार्‍या जबाबदार्‍या आपल्याला तिच्यापासून दूर करतात , पण ते तुम्हाला आवडलेलं नसतं , तुमच्याही नकळत…

‘तू अगदी तुझ्या मावशी वर गेलायेस’… असं कोणी म्हटलं तर एक वेगळंच स्मित हसू आपल्या चेहर्‍यावर उमटतं…

अगदी आजही मावशीसाठी आपण कोण असतो ???

आपल्या जन्मापूर्वीपर्यंत तिला कदाचित लहान मुलं अजिबात आवडत नसावीत…!!!

पण , तरीही तुम्हाला पहिल्यावर तिच्या पोटात मायेचे झरे लोटतातच कसे ??? का कुणास ठाऊक…!!!

आपल्या लहानपणी तुमची केअरटेकर , तुमच्या आईची हक्काची असिस्टंट अशा जबाबदार्‍या तिने यथार्थ पार पाडलेल्या असतात…

आपल्यासाठी एखादं म्हणून गिफ्ट घ्यायला ती जाते … आणि  प्रत्यक्षात … जे जे आवडेल ते ते तुमच्यासाठी ती घेऊन येते , अगदी सहज…

तुमची आवडनिवड मनापासून जपते अन् दर वाढदिवसाला काहीतरी तुमच्यासाठी स्पेशल गिफ्ट देते…

सर्वात महत्वाचं म्हणजे… तुमच्याप्रती तिची माया आटतंच नाही, तिचे स्वतःचे मूल  झाल्यावरही…

आईएवढेच तुमचे लाड करणारी , कशाचीही अपेक्षा न ठेवणारी , तुमच्या आई-वडिलांची ती सावली असते…

 

संग्राहक : – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares