☆ भारतातली काही निवडक बिघडलेली वेडी माणसं… – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆
भारतातली काही निवडक बिघडलेली, वेडी माणसं.. !!!
ही माणसं अशा कामात गढून गेलेली असतात कि ज्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळत नाही. उलट पाहणाऱ्यांच्या विचित्र नजरा सहन कराव्या लागतात. तरीही कोणीतरी आज्ञा दिली आहे अशा थाटात ते आपलं काम करत राहतात !!!
१) रायगड १००० वेळा चढून जायचा संकल्प गायक श्री सुरेश वाडकरांनी केला आणि आतापर्यंत साधारणपणे ९०० वेळा ते रायगड चढले आहेत. सोबत अनेकांना घेऊन जातात आणि गड चढताना गडावरच्या पक्ष्यांसारखा आवाजही काढतात. तो आवाज ऐकून पक्षी त्यांना प्रतिसादही देतात.
🌹
२) श्री जेधे नावाचा तरुण २७ जानेवारी आणि १६ ऑगस्टला एक गोणी घेऊन बाहेर पडतो आणि रस्त्यात पडलेले झेंडे, तिरंगी बिल्ले गोळा करतो. सायंकाळपर्यंत जमेल तितकं चालत जातो. शेवटी गोणी भरते. त्या गोणीला एक हार घालतो, नमस्कार करतो आणि ती डम्पिंग ग्राउंडवाल्यांच्या ताब्यात देऊन येतो. हे सगळं कशासाठी तर तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून…!!! कचऱ्यातून आपलं अन्न काढतो असे समजून कुत्रे त्याच्यावर भुंकतात. तो हे काम करतो तेव्हा वेडा वाटतो. त्याला ह्यातून काही मिळत नाही, तरीही तो कर्तव्य समजून दोन दिवस काम करतो.
🌹
३) डोंबिवलीतही एक वेडे आजोबा आहेत.
रेल्वे रूळ ओलांडायला कितीही मनाई केली, दंड केला तरी घाईत असणारे प्रवासी रूळ ओलांडतातच. आजच्या जीवनशैलीमध्ये इतकी धावपळ आहे की प्रसंगी जीवावर उदार होऊन जगावे लागते. पण डोंबिवलीमध्ये एक आजोबा आहेत, ते काय करतात तर जिथून अनेक लोक रेल्वे रुळांवर शिरतात तिथे सकाळी आडवे उभे राहतात. दोन्ही हात लांब पसरवून ते रेल्वे रुळाकडे येणाऱ्यांना अडवतात. मधेच दोन्ही हात जोडून विनंती करतात की “रूळ ओलांडू नका, पुलावरून जा”. पण समोर लोकल लागली असल्यामुळे अनेकजण त्यांचे हात बाजूला करून रुळावरून धावत सुटतात. डोंबिवली हे तर मृत्यू समोर उभा असेल तरी धावणार शहर ! तिथे ह्या आजोबांचं कोण ऐकणार… ? तरीही आजोबा नेहमी येऊन उभे राहतात. त्यांना माहित आहे की आज हे रूळ ओलांडतील, पण तसे करणे धोकादायक होते, इतके तरी मनात येईलच. आज रूळ ओलांडले तरी उद्या घरातून लवकर निघतील आणि पुलावरून सुरक्षितपणे जातील.
🌹
४) मुंबईच्या लोकलमधून फिरणारा एक असाच “वेडा” सिंधी दिसतो.
दिसायला खरंच गबाळा आहे. पण काम फार मोलाचं करतो. ऐन उन्हाळ्यात जेव्हा सगळी लोकल तापते, जीव तहानेने व्याकुळ होतो तेव्हा हा सिंधी डब्यात चढतो. त्याच्या हातात दोन मोठ्या थैल्या असतात. थैली उघडतो आणि आपल्या चिरक्या आवाजात “जलसेवा” असे ओरडत तो डब्यामध्ये फिरू लागतो. त्यावेळी त्याने थंड पाणी आणले आहे हे पाहून प्रवासी सुखावतात. पाणी पिऊन तृप्त होतात. एकदा एकाने ह्या सिंध्याला बोलतं केलं होतं. त्याने सांगितलं,
“आम्ही सिंधी लोक तहानलेल्याला पाणी देणं ही झुलेलालची सेवा समजतो. ” आम्ही उल्हासनगरमध्ये खूप प्रॉडक्ट निर्माण केले. ते विकून पैसे कमावले. पण आम्ही कधी पाणी विकलं नाही. पण, अब वक्त बदल गया… , आता प्यायला मोफत पाणी मिळत नाही, खरीदना पडता है.
🌹
५) एका दैनिकात एका वाचकाने लिहिले होते की, मी आता ७२ वर्षांचा आहे. ह्या ७२ वर्षात मी एकदाही मातृभूमीवर थुंकलो नाही.. !!!
किती छोटी प्रतिज्ञा केली ह्या माणसाने. जमिनीवर न थुंकण्याची ! आज घडीला भारतातील प्रत्येक भाषेत एक वाक्य भाषांतरित झाले आहे आणि ते म्हणजे; थुंकू नका… !!! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थुंकणे जास्तच घातक बनले होते ! प्रत्येकाने वरील माणसासारखा “वेडा” विचार केला तर स्वच्छतेवर होणार प्रचंड खर्च वाचेल.
🌹
६) शर्मा नावाचा एक असाच वेडा आहे. तो कुठेही चारचौघात गप्पा मारताना ऍसिडिटी टाळण्याचे उपाय सांगतो – जेवल्यावर लगेच झोपू नका, अति तिखट खाऊ नका. जेलुसिल, रॅनटॅक घेण्यापेक्षा डाळिंबाचा रस किंवा कोकमाचा रस प्या, असे उपाय सुचवतो.
सतत मानसिक ताण असलेल्या व्यक्तीला हमखास ऍसिडिटी होते. म्हणून मानसिक ताण असणाऱ्यांनी कोणती योगासने करावीत हे भर रस्त्यावर करून दाखवतो.
म्हणून ह्या माणसाला “ऍसिडिटी मॅन” नाव पडलं आहे. कोणाची ओळख असो वा नसो हा माहिती सांगितल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तो का करतो ? तो स्वतः एका मोठ्या कंपनीत केमिकल इंजिनिअर आहे. काही मित्रांना ऍसिडिटी होते हे पाहून ह्याने उपाय शोधले. त्यांना करायला लावले. त्यांचा त्रास कमी होताच ह्याने इतरांना सांगायला सुरुवात केली. रसायनशास्त्र शिकून पैसे मिळवून झाले, आता समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करायचा असे त्याला वाटते. वरवर पाहता हा वेडेपणाच आहे. पण ज्याला सतत आम्लपित्ताचा त्रास होतो त्याला शर्मा हवाहवासा वाटतो.
🌹
७) असेच एक आहेत डॉ. भरत वटवानी. पती-पत्नी दोघेही सायकियाट्रिस्ट आहेत. एकदा त्यांना एक भिकारी दिसला. तो गटारीचं पाणी पीत होता. वटवानींनी त्याला आधी प्यायला शुद्ध पाणी दिलं. मग त्यांना कळलं की हा मुलगा गावातून शहरात आला असून इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. पण मानसिक संतुलन बिघडले आणि तो शहरभर भिकाऱ्यासारखा फिरू लागला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला त्याच्या घरी पाठवले. पुढे वटवानी पती-पत्नी रस्त्यावर दिसणाऱ्या अनेक मानसिक रुग्णांवर स्वतःच्या खर्चाने उपचार करत गेले. म्हणून त्यांना Ramon Magsaysay पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले.
ह्या व्यवहारी जगात काही अशी माणसे दिसतात की त्यांनी चालवलेलं काम पाहून त्यांना वेड लागलं असावं असे वाटते. अशी ही बिघडलेली माणसे आहेत. आपल्याला समाज, मातृभूमी, आपला देश खूप काही देत असतो. कृतज्ञता म्हणून आपणही खारीचा वाटा द्यायला हवा हा विचार त्यामागे असतो. अशा वेड्या माणसांमुळेच जग सकारात्मक बनतं.
आपणही पृथ्वीतलावर आलो, भारतात जन्मलो. ह्या समाजाचे, मायभूमीचे पांग फेडण्यासाठी थोडा वेडेपणा करायला हवा.
ही अशी वेडी मंडळी पाहिली की शहाणी माणसे खुजी वाटू लागतात. त्यांचं काम समजून घेतल्यावर लक्षात येतं की, ते जे करतात ती माझीही जबाबदारी आहे.
🌹
एक अभंग आहे…. ;
“आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडाना”
नीट वाचलं की समजतं;
आम्ही “बी घडलो, “
तुम्ही “बी घडाना….
🌹
माहिती संग्राहक : अज्ञात
संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈