मराठी साहित्य – मीप्रवासीनी ☆ मी प्रवासिनी  क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

✈️ मीप्रवासीनी ✈️

☆ मी प्रवासिनी  क्रमांक-६ – सौंदर्य संपन्न आणि संशोधक क्रोएशिया ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

टर्की एअरलाइन्सने ऑस्ट्रिया इथे पोहोचलो. ऑस्ट्रियाहून बसप्रवास करून क्रोएशियाची राजधानी झाग्रेब इथे गेलो.  क्रोएशिया हा मध्य युरोपमधील एक छोटासा, सौंदर्यसंपन्न  देश आहे. झाग्रेब हे त्याच्या राजधानीचे शहर सावा नदीच्या काठी एका डोंगररांगांच्या पायथ्याशी वसले आहे.

रोमन काळापासून हे ऐतिहासिक महत्त्वाचे शहर आहे. गाईड बरोबर जुन्या शहराचा फेरफटका केला. एका मोठ्या चौकाच्या  सभोवताली असलेल्या आकर्षक दुकानांतून लोकांची खरेदी चालली होती. खाण्यापिण्याचा आनंद घेणाऱ्यांची गर्दी उसळली होती. पुढील चौकात झाग्रेब शहराचा तेरा चौरस मीटर लांब रुंद असलेला मिश्रधातूमध्ये बनविलेला नकाशा बघायला मिळाला. एका दगडी वेशीच्या कमानदार,उंच दरवाजातून आत गेल्यावर चौदाव्या शतकात बांधलेले सेंट मार्क चर्च दिसले. याचे उतरते छप्पर अतिशय देखणे आहे. छपरावर छोट्या छोट्या लाल व हिरवट टाईल्स चौकटीमध्ये बसविलेल्या आहेत. उजव्या बाजूला लाल-पांढऱ्या टाइल्सचे सोंगट्यांच्या पटासारखे डिझाईन आहे. यापुढे हिरवट रंगाच्या टाईल्स वर तीन सिंह  लाल टाइल्स मध्ये आहेत. चर्चच्या सभोवतालच्या उंच कोनाड्यात बारा धर्मगुरू दगडावर कोरलेले आहेत. हिरव्या सोनेरी रंगाच्या टाईल्सचा बेल टॉवर शोभिवंत दिसतो. एकोणिसाव्या शतकात इथे मोठा भूकंप झाला पण सुदैवाने बेल टॉवर अबाधित राहिले.

‘मार्शल टिटो स्क्वेअर’हा झाग्रेबमधील सर्वात मोठा चौक आहे.रुंद रस्ते, पुतळे, कारंजी, रेस्टॉरंटस्, मॉल्स रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या छोट्या बागा यामुळे हा चौक शोभिवंत दिसतो. रस्त्याच्या कडेला असलेल्या अनेक दुकानातून क्रोशाचे विणकाम असलेल्या सुंदर लेस, रुमाल, ड्रेस नजाकतीने मांडले होते. तऱ्हेतऱ्हेचे टाय होते. गाईडने सांगितले की नेकटाय आणि फुटबॉल यांची सुरुवात क्रोएशियाने केली.

झाग्रेबपासून साधारण दोन तासांवर ‘प्लिटविक लेक्स नॅशनल पार्क’ आहे.  अनेक डोंगर, दर्‍या, नद्या, धबधबे, सरोवरे असलेला हा एक खूप मोठा नैसर्गिक विभाग आहे. २९५ चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेला प्लिटविक लेक्स परिसर फार प्राचीन काळापासून म्हणजे हिमयुगानंतर अस्तित्वात आला असे शास्त्रज्ञ म्हणतात. हा संपूर्ण विभाग चुनखडीच्या डोंगरांनी व्यापलेला आहे. या खडकांची सतत झीज होत असते. त्यामुळे डोंगर उतारावर अनेक घळी तयार झाल्या आहेत. त्यातून जलधारा कोसळत असतात. त्यांचे अनेक लहान-मोठे तलाव तयार झाले आहेत. निळ्या-हिरव्या रंगाचं गहिरं पाणी आणि त्यात तरंगणारी पांढऱ्या स्वच्छ कापसाच्या ढगांची प्रतिबिंबे मोहक दिसतात.

गाईड बरोबर जंगलातील थोडी पायवाट चालून एका छोट्या दोन डब्यांच्या रेल्वेत बसलो. दोन्ही बाजूंना बर्च, पाइन, ओक अशा सूचिपर्णी वृक्षांचे घनदाट जंगल होते. पाच मिनिटात गाडीतून उतरून परत चालायला सुरुवात केली. अनेक पायर्‍यांची चढ-उतर केली. छोट्या जंगलवाटेमधून ठिकठिकाणी निळ्या हिरव्या रंगांचे तलाव आणि त्यात अनेकांगांनी उड्या मारणारे असंख्य धबधबे यांचे नेत्रसुखद दर्शन होत होते. निसर्गाला अजिबात धक्का न लावता हे पायी चालण्याचे मार्ग तयार केले आहेत. वर्षानुवर्षे या चुनखडीच्या डोंगरांमधील कॅल्शिअम विरघळल्यामुळे ते सच्छिद्र झाले आहेत. या सातत्याने होणार्‍या प्रक्रियेमुळे या डोंगरातून येणारे झरे, धबधबे यांचा प्रवाह बदलत राहतो. वाहून गेलेल्या कॅल्शिअमचे पुन्हा लहान-मोठे दगड, बंधारे बनतात. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा ओघ बदलत राहतो. मोठे धबधबे निर्माण होतात. इथल्या लहान-मोठ्या सोळा सरोवरांपैकी एका सरोवरातून यांत्रिक बोटीतून फेरफटका मारला. किनाऱ्याजवळील मातकट रंगाच्या पाण्यातून बोट निळसर हिरव्या नितळ पाण्यात शिरली. किनाऱ्यावरील उंच, हिरव्या वृक्षांची छाया त्यात हिंदकळू लागली. गार गार वाऱ्याने शिरशिरी भरली होती. चालून चालून पाय दमले होते पण डोळे आणि मन तृप्त झाले होते.

घनदाट सूचिपर्ण वृक्षराजी आणि अनेक प्रकारच्या ऑर्किड्सनी समृद्ध अशा इथल्या जंगल दऱ्यांमध्ये जैवसमृद्धी आहे. अनेक प्रकारची फुलपाखरे, विविध पक्षी, वटवाघळे, तपकिरी अस्वल आणि अन्य वन्य प्राणी यांच्या नैसर्गिक सहजीवनाचे अस्तित्व कसोशीने जपलेले आहे वृक्षांच्या जुन्या ओंडक्यांचा उपयोग करुन त्यापासून लाकडी बाके, कडेचे लाकडी कंपाउंड, उपहारगृहांचे लाकडी बांधकाम, पाय वाटेवरून घसरू नये म्हणून बसविलेल्या लाकडाच्या गोल  चकत्या सारं तिथल्या निसर्गाशी एकरूप होणारं आहे. ट्रेकिंग, सायकलिंग, केबल कार,बोट रोईंग अशा अनेक प्रकारांनी धाडसी तरुणाई इथल्या निसर्ग वैभवाचा मुक्त आनंद घेत होती. प्लिटविक लेक्स नॅशनल पार्कला युनेस्कोने १९७९ साली वर्ल्ड नॅचरल हेरिटेज…. जागतिक नैसर्गिक वारसा संपत्ती असा दर्जा दिला आहे .

क्रोएशियाला शास्त्रीय संशोधनाची महान परंपरा आहे. आज दैनंदिन व्यवहारात आपण अनेक गोष्टींचा सहजतेने वापर करतो त्यातील कितीतरी महत्त्वाचे शोध येथील जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला ( Nikola Tesla १८५६–१९४३) यांनी लावले आहेत. त्यांची प्रयोगशाळा व ऑफिस असलेली इमारत झाग्रेब इथे बघायला मिळाली.

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांनी ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीमध्ये डायरेक्ट करंटचा (DC ) शोध लावला त्याच वेळी निकोला टेस्ला यांनी अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक करंटचा (AC ) शोध लावला. त्यामुळे इलेक्ट्रिकच्या  वापरामध्ये सुरक्षितता, सहज वहन व किमतीमध्ये बचत झाली. नुसते बटण दाबून इलेक्ट्रिकचे दिवे लावताना आपण निकोला टेस्ला यांची आठवण ठेवली पाहिजे. टीव्ही चॅनल्स बदलताना, एसी लावताना आपण रिमोट कंट्रोलचा वापर करतो त्याचे संशोधन निकोला टेस्ला यांचेच. फ्रीज, मिक्सर, वाशिंग मशीन, हेअर ड्रायर अशा अनेक वस्तू ज्यावर चालतात त्या इलेक्ट्रिक मोटरचा शोध टेस्ला यांनीच लावला. रेडिओचा शोध प्रथम मार्कोनी यांच्या नावावर होता. पण हा शोध टेस्ला यांनीच प्रथम लावल्याचे सिद्ध होऊन १९४ ३ साली त्यांना या संशोधनाचे पेटंट देण्यात आले. थर्मास, गॅस लायटर हेही त्यांचेच संशोधन!

त्यांच्या सन्मानार्थ इलेक्ट्रिक कारला टेस्ला असे नाव देण्यात आले आहे.

विसाव्या शतकापासून क्रोएशिया उद्योगधंदे, व्यापार, शैक्षणिक संस्था, दळणवळणाची साधने यांतही आघाडीवर राहिले आहे .मोठ्या पुलांची बांधणी, सस्पेन्शन ब्रिज, टर्बाइन्स, पॅरॅशूट जम्पिंग, आपण वापरत असलेले चष्मे हे संशोधन क्रोएशियातील शास्त्रज्ञांचे आहे. टीव्हीची सॅटॅलाइट डिश, असे अनेक महत्त्वाचे शोध लावले फाउंटन पेन चा शोध लावणारे पिकाला मास्टरयांच्या नावाची पेन फॅक्टरी अजूनही झाग्रेब मध्ये आहे .एमपी थ्री चा शोध इथलाच. क्रोएशियाच्या नवीन पिढीनेही हा वारसा पुढे नेला आहे. कार पार्किंग बाय टेक्स्ट मेसेज, सोलर पाॅवरवर चालणारा मोबाईल चार्जर बनविले आहेत. फेरारी, पोर्शे अशा कंपन्यांशी स्पर्धा करणारी इलेक्ट्रिक कार कंपनी झाग्रेब पासून जवळच आहे. केवळ 45 लाख लोकसंख्या असलेल्या या देशातील संशोधन निश्चितच कौतुकास्पद आहे.

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-२] ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले 

? विविधा ?

☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-२] ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

त्यामुळे जमिनीत खोलवर तळघरासारखी खोली खोदली जायची व त्यात हळदीच्या हळकुंडाचा साठा केला जायचा. अशा ठेवलेल्या हळकुंडांना कीड लागत नसे. आणि काढल्यावर वजनात त्याचा उतारा जास्त पडे. २००५ सालचे पुरात पेवात पाणी शिरले. त्याचे स्फोट बरेच दिवस होत होते. त्यामुळे बरीचशी पेवात फारशी हळद साठवली जात नसावी. पेवे नष्ट झाली. हळदीच्या वायदेबाजारही इतरस्त्र स्थलांतरीत झाली.

पूर्वीपासूनच पूराचा धोका आहे. या हरिपूर गावचे वैशिष्ट म्हणजे कितीही पूर आला तरी गावाच्या दोन्ही देशीच्या आत पाणी येत नाही. २००५ साली सगळीकडे पाणी आले होते. पण वेशीच्या आत पाणी नव्हते.आयर्विन पूल बांधताना बागेतील गणपतीच्या उंचीवरून तो बांधला गेला की त्या उंचीपर्यंत पूराचे पाणी पोहचू शकत नाही.

पूर्वी नदीकाठी खूप वाळू होती. वरून पहाता माणसे त्यात अंगठ्याएवढी दिसत. ही वाळू लोह मिश्रित होती. त्याकाळी ती दूरवर घराचे बांधकामाला, पुलाचे बांधकामाला वापरत असत.

अशा या कृष्णाकाठी संगीत शारदा नाटकाचे लिखाण, नाटककार कै.गो.ब. देवल यांनी केले. घाटाच्या पारावर बसून त्यांना या नाटकाच्या संहितेची कल्पना स्फूरली. त्याकाळी समाजात जरठ -कुमारी विवाह होत असत. अशा समाजातील अनिष्ट रूढींवर टीकात्मक असे नाटक त्यांनी लिहिले. त्याचा पहिला प्रयोग १८९८ साली झाला. त्या

प्रयोगाच्या शताब्दी वर्षात म्हणजे १९९८ रोजी संगीत शारदाचा प्रयोग त्यांचे स्मरणार्थ पुन्हा (घाटावर ) मंच उभारून जोमात केला गेला, ‘रोटरी क्लब हरिपूर या संस्थेच्या सदस्य महिलांनी कै. गो. ब. देवलांचे घर सजविले. घाटावर त्यांची स्मरणीका म्हणून शीलान्यास बसविण्यात आला. देवलांप्रमाणेच इथले काव्यविहारी, गद्रे हे काव्यासाठी प्रसिद्ध होते.

ते गद्रेच्या घरात माडीवर बसून काव्य लिहीत. त्यांच्या कविता पाठ्य पुस्तकात आम्हाला अभ्यासण्यास होत्या. अलिकडल्या पिढीतील कै. अशोकजी परांजपे हे ही प्रतिभावान लेखक इथल्या मातीतीलच होते.

अशा संपन्न हरिपूरात १९२० साली इथले वैद्य कै. गो. ग, परांजपे यांनी वाचनालयाची स्थापना केली. त्याचे उद्घाटन करण्यास कै. लोकमान्य टिळक हरिपूरात आले होते. आजतागायत हे वाचनालय हरिपूर ग्रामपंचायतीकडून मोफत वाचनालय म्हणून चालविले जाते. सद्य स्थितीत हे वाचनालय रोटरी समाजदल हरिपूर यांच्या महिला सदस्या कार्यान्वित करत आहेत. रोटरीच्या माध्यमातून गावातील कचरा उचलण्यासाठी गाड्या देण्यात आल्या आहेत. घरोघरी जाऊन कचरा उचलला जातो. त्यामळे गावात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग नसतात.

इथला निसर्ग खरोखरच रम्य आहे. इथे प्राणवायू भरपूर प्रमाणात आहे. (oxygen zone ) त्यामुळे इथली हवा स्वच्छ, शुद्ध आहे.

नदीकाठामुळे इथे निरनिराळ्या पक्ष्यांचा वावर आहे. हरिपूरच्या घाटावर संध्याकाळी गेले असता, लाखो पोपट थव्यांनी आकाशात विहार करताना दिसतात. हे दृश्य विलोभनीय दिसते. मोरांचा ही इथे वास आहे.

माझे घराचे मागे नारळाची बाग आहे. एके दिवशी एक मोर इतक्या उंच झाडावर चढून बसला होता. आम्हाला अचंबाच वाटला. मोर काही उडणार पक्षी नाही. पण निरिक्षणानंतर रोज संध्याकाळी तो मोर, खालच्या झावळ्यातून हळूहळू एक एककरत वरच्या शेंड्यावर जाऊन झोपत असे. सकाळ होताच पुन्हा उतरून शेतात विहार करी. त्याचे लांडोरी सकट सगळे कुटुंबच इथे राहत होते.

आपण सांगलीच्या शास्त्री चौकातून हरिपूरच्या रस्त्याला लागलो की दूतर्फा चिंचेची मोठी मोठी झाडे फार काळापासून इथे आहेत. दरवर्षी त्या झाडांना विपूल चिंचा लगडतात. एप्रिल मे मध्ये चिंचा पिकल्यावर त्या ठेकेदार उतरवतात. चिंच हे फळ फलधारणा झाल्यापासून पूर्ण होण्यास १० ते ११ महिन्याचा कालावधी लागतो. हे मी इथल्या वास्तव्यात निरीक्षणातून पहात आहे. पक्कफळे काढल्यानंतर एप्रिल मे नंतर पानगळ होते. नवी पालवी फूटल्यावर लगेच काही दिवसात फुलोरा येतो. हळूहळू फलधारणा होऊन जुलै, ऑगस्ट मध्ये कोवळ्या चिंचा दिसू लागतात.

तुळशी विवाहापर्यंत पूर्ण चिंच कच्च्या स्वरूपात तयार होते. पुढे फळ पक्व होण्यास होळी नंतर सुरूवात होते. असे हे फळ दिर्घकाळी आहे. त्याकाळी एवढी झाडे मुद्दाम लावली असावीत. 

२००५ चे पूरात, आम्ही होडीतून ४ ऑगस्टला बाहेर पडलो. पाण्याचा जोर एवढा होता की होडी पाण्याबरोबर ढकलली जात होती.

आमच्या बरोबरच्या जिगरबाज माणसांनी कासरा चिंचेच्या झाडाला बांधत बांधत होडी गुळवणी मठापर्यंत नेली व तेथून उजवीकडे वळून कोल्हापूर रस्त्यावरील दैवज्ञभवनसमोर बाहेर काढली. म्हणजे त्यावेळी आम्हाला ३५ माणसांना दोन शेळ्या, एक कुत्रा, एक दीड महिन्याचे बाळ, एक ९० वर्षाच्या आजी, चिंचेच्या झाडांनीच वाचविले व मदत  केली. ज्यांनी लावली त्या राज्यकर्त्यांचे आभारच मानावे तेवढे कमी आहेत. सद्यस्थितीत हरिपूरचे रस्त्याकडच्या दुतर्फा शेतीचे, नागरिकरण होऊन अनेक वसाहती वसत आहेत. मागील भाग अंकलीपर्यंत खूप दाट शेतीच्या हिरवळीने नटलेलाच आहे. इथली वस्ती गावा पूरती मर्यादीत न राहता हरिपूर, सांगली रोडच्या दुतर्फा वाढते आहे. 

अलिकडे त्याबरोबरच काही नवीन मंदीरेही झाली आहेत. नदीकाठी वसलेले म्हादबा मंदीर, त्याचे अलिकडे लहानसे स्वामी समर्थ मंदीर त्याचे समोरील बाजूस आत गेल्यावर श्रीकृष्ण नीलयम मंदीर आहे.

गजानन कॉलनीचे आतील बाजूस गोंदवलेकर महाराजांचे ध्यान धारणा मंदीर वसलेले आहे. हरिपूर म्हणजे हरिचेच गाव सार्थ होते. इथे अध्यात्माचा सतत सर्वकडे आराधना, उपासना भक्ति,प्रवचन, किर्तन या सर्व कार्याची मांदियाळी आहे. रम्य निसर्गात चराचरातून भरून राहिलेला परमात्म्याचा इथे खरोखरच प्रत्यय येतो. भक्तांच्या दुःखी, संसारात गांजलेल्या मनाला इथे उभारी मिळते. पुन्हा प्रसन्न होऊन उमेदीने वाटचाल करण्याची! हरिपूर तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा संकल्प शासनाने केलेला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील काही वर्षात योग्य त-हेने विकसीत झाली तर हरिपूर गाव जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल.

(क्रमशः)

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ☆ श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

? जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ? श्री सुहास सोहोनी ?

(एक सांगीतिक कोडं! खाली दिलेल्या लेखात भारतीय संगीतामधील 37 रागांच्या नांवांची गुंफण केलेली आहे. लेख नीट लक्ष देऊन वाचा आणि ते राग  ओळखून दाखवा!!)

पूर्वी शिमगा, दसरा या सणांच्या दिवशी कोंकणात घरोघरी गोमू, बाल्ये, बहुरूपी, वासुदेव – हे लोक गाणी म्हणत यायचे. आताच्या काळात त्यांचं प्रमाण कमी कमी होत चाललेलंय्. त्यात जसे कोंकणातले स्थानिक लोक असायचे, तसे परराज्यातले लोक सुद्धा असायचे. मारवाडी, गुजरीतोड्ये, गौड प्रांतीय, तिरंगी, या समाजातले हे फिरस्ते लोक असायचे. हे सारे विविध भाषांतली लोकगीत म्हणायचे. तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ कुठे समजत होता? पण चाल ठेका धरायला लावायची. कोंकण, गोवा या प्रांतातल्या लोकांच्या रक्तातच संगीत भिनलेलं आहे! राजस्थानी फिरस्ते तर जौंधपुरी नाचही करून दाखवत असत. डोक्यावर भला मोठा, भुसा भरलेला पांढरा पक्षी घेऊन हंसाचा ध्वनी काढून दाखवणं, ही त्या पहाडी कलाकारांची खासियत होती. त्यांना तोडीस तोड म्हणून कुडाळ देसकार हिंडोल पक्ष्यांचा आवाज काढून मजा आणायचे. त्यातले काही दशावतारी नट देखील होते. ते नाटकांतली गाणी सुद्धा गायचे. ही नाट्यकला व तिचा मालवणी अविष्कार या गोष्टी परंपरेतून आलेल्या असत.  फाल्गुन सरल्यावर वसंताचं आगमन झालं की निसर्गात रंगीबेरंगी फुलांचं बहारदार प्रदर्शन भरायचं. अशा वेळी अंगावर पट्टे ओढलेले, काहीसे सुधारलेले, स्वतःला शंकराचे भक्त – भैरव वंशीय समजणारे, जंगलातले भिल्ल फुलांच्या माळा गळ्यात घालून यायचे आणि अडाण्यासारखे काही-बाही गायचे. काही वेळा बंगाली बैरागी जादूगार यायचे. ते स्वतःला दरबारी जादूगार मानायचे. कालीसह दुर्गामातेची पूजा करून ते जादूचे अघोरी प्रयोग करीत असत. एका कलिंगडाचे नुसत्या हातांनी क्षणार्धांत दोन तुकडे करून त्याच्या पोटातून बर्फाच्या गारा, मुलतानी मातीचे खडे, अशा वस्तू काढून जनांवर संमोहिनी घालीत असत. भीती वाटायची ते प्रयोग बघतांना. शहाणा माणूस पण वेडा व्हायचा. आणि हे सर्व चालू असतांना हातात डमरू आणि तोंडातून सतत ऱ्हाम्-ऱ्हीम्-ऱ्हुम् असं चालूच असे! कानडा प्रांतीय कलाकार प्राणी-पक्षी घेऊन यायचे. डमरूच्या ठेक्यावर बोकड, कुत्र्याचं पिल्लू, माकड, यांचे खेळ बघतांना हसून हसून पुरेवाट व्हायची! बोकडाचा नाच, माकडाच्या उड्या मस्तच! किती वेळ पाहिलं तरी समाधानच होत नसे. मग तो माकडवाला त्याच्या कानडी हिंदीत “अब बस हो गया जी! अब काफी हो गया जी” असं म्हणत पैसे गोळा करायला लागायचा. नंद म्हणजे उत्तर भारतीय गवळी समाजाचे लोक. हे गाई किंवा नंदीबैल घेऊन यायचे. ते श्रीकृष्णाची गाणी म्हणायचे. “लल्ला, बेडा कर दे पार, खोल दे बंद सरग के दार”. सोबत गोवंशीय वस्तू, म्हणजे गाईचं तूप, लोणी, घुंगुर, शिंगाना लावायचे गोंडे, अशा वस्तू (माल) सुद्धा ते विकायला घेऊन यायचे. काही वेळा पंजाबी सरदारजी खांद्याला हार्मोनियम लटकवून यायचे आणि नानकगुरूंची बिलावली भक्तीगीतं गायचे. कधी कधी नाथपंथीय अंगाला राख फासून यायचे व गोरखनाथांची कल्याणकारी हिंदी गाणी ऐकवायचे. अशी खूप खूप गाणी घरच्या घरी ऐकायला मिळाली त्या काळी!!

              ?????

© श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-१] ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? विविधा ?

☆ टुमदार व रम्य हरिपूर•• [भाग-१] ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले हरिपूर, हे कृष्णा -वारणा नद्यांच्या काठी वसलेले गाव! सांगलीहून वहात आलेली कृष्णा, हरिपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या, डाव्या अंगाने, शेताच्या पल्याड हरिपूरकडे वहात जाते. या कृष्णाकाठी, सुपीक जमिनीने, समृद्ध झालेला हा परिसर, निर्सगाच्या हिरवाईने नटल्यामुळे, प्रसन्न आणि रम्य भासतो.

१७६८ मध्ये गोविंद हरि पटवर्धन यांनी आपल्या वडिलांचे स्मारकाकरिता सांगलीची सहाशे बिघे जमिन स्वतंत्र काढून हरिपूर हे गाव वसविले. ते गाव शंभर ब्राह्मणांना (अग्नहार) दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे गाव वसविण्यास अनुमती दिली. यानंतर हरिपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार गावाची, त्यावेळी लोकसंख्या दोन हजार होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक हजार होती. त्यावेळी हरिपूर हे सांगलीपेक्षा मोठे होते.

हरिपूरची जमीन ब्राह्मणांना दान दिली होती, त्याबद्दल एक आख्यायिका आहे. ही जमीन दान दिल्यानंतरच्या काळात सांगलीकर राजे हरिपूरच्या वेशीवर पाय धुवत, हेतू असा की, दान दिलेल्या जमिनीतील माती सुध्दा, पावलासंगे परत येऊ नये. हरिपूरच्या संगमेश्वर देवालयातील घंटेवर कोण्या बाबाजी रामचंद्र गुरव याचा नामनिर्देश असून त्यावर शक १६२२ (इ.स.१७००) चा उल्लेख आहे.

हरिपूरच्या शेजारील सांगली त्यापुढील शतकात फारशी वाढलेली नव्हती. १८५० साली हरिपूर हे गाव बुधगावकर पटवर्धनांकडे गेले.  कृष्णा वारणा संगमावर, पुरातनकाळापासून असलेले गमेश्वर हे शिवाचं पवित्र स्थान, हरिपूरचे आराध्य दैवत आहे. प्रभु श्री रामचंद्र दंडकारण्यात जाताना इथे थांबले होते. त्यांनी वाळूचे लिंग स्थापन करून शिवप्रतिष्ठापना पूजे स्तव केली होती अशी कथा आहे.

कालांतराने काही गुराखी गाई चरण्यासाठी घेऊन येत. एक गाय रोज वेगळी चरत थोड्या लांब जाई. हे गुराख्याच्या लक्षात आल्यावर, तो गाईच्या मागे जाऊ लागला, तर ती गाय ठराविक स्थानी जाऊन आपल्या दूधाचा अभिषेक करीत असे. त्याने ही गोष्ट आपल्या राजापर्यंत पोहचवली. मग इथे तपासाअंती उकरून पाहिल्यावर वाळूचे शिवलिंग दृष्टोत्पत्तीस पडले, तेच हे संगमेश्वर देवालयातील स्थापित शिवलिंग होय. पुढे त्याकाळी तेथे देवालय उभं राहिले.

मिरजेला मार्कडेय नावाचा राक्षस होता .तो या लिंगाची भक्ती करीत असे. गुरूचरित्राच्या अध्यायात असं म्हटले आहे, मिरजेच्या मार्कडेय नामे संगमेश्वर पूजावा! संगमेश्वराची मूळ पिंड वालुकामय आहे. आताच्या स्थितीत या वालुकामय पिंडीवर दगडाचे लिंग करून नंतर बसविलेले आहे. यापिंडीवर पाण्याची धार धरली असता,बांबूंच्या कामटीने आतवर किती पाणी गेले हे बघत असत.

अशा या संगमेश्वराच्या पवित्र वाने पुनित झालेले हरिपुर गाव अध्यात्माचे अधिष्टान आहे. याच हरिपूरच्या वेशीतून आत प्रवेश केल्यावर कृष्णाचे मंदीर डाव्याबाजूस आहे. काव्यविहारी वासुदेव गद्रे, बुधगाव सरकारकडे होते. अक्काताई भट यांनी या कृष्ण देवालयाची स्थापना केली. पुढे ते गद्रे कुटुंबीयांचे मंदीर म्हणून नावारूपाला आले. इथे कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सव श्रावणात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भजन, किर्तन, गायन ह्यांची सातदिवस उपासना व भक्ती केली जाते. अष्टमीदिवशी रात्री  जन्मकाळाचे किर्तन होते. पारण्याचा नैवेद्य महाप्रसाद असतो. वर्षभर ह्या मंदिरात बरेच उपक्रम भक्ती व उपासना यावर आधारलेले चालतात. ग्रंथ वाचन पारायणे होतात. असे अध्यात्म्याचे अधिष्टान आणि परंपरा पुढील पिढीनेही अंगिकारलेली आहे.

संगमेश्वराचे मंदीराबाहेर, विष्णूमंदीर आहे. पुढे आल्यावर पंचायतन मंदीर आहे. तसेच वेशीच्या अलिकडे श्रीराममंदीर, विठ्ठलमंदीर आहे. हरिपूरच्या प्रवेशीचे बाहेरील बाजूस श्री हनुमान मंदीर आहे.

बागेतील गणपती हे गानकोकिळा लताबाई मंगेशकरांचे श्रध्दास्थान आहे. त्या सांगलीत आल्यावर इथे दर्शनास येतात. या देवालयाच्या स्थापनेची आख्यायिका अशी की, सांगलीच्या संस्थापिकाचे मूळ पटवर्धन घराणे कोकणातील कोतवड्याचे, जिथे दुर्वाचा रस प्राशन करून त्यांच्या पूर्वजातील कोणा एकाने उपासना केली. त्यांना दृष्टांत झाला. ‘तू चालत राहा, मागे वळून पहायचे नाही. तोवर मी तुझ्याबरोबरच असेन. मागे वळून पाहिलेस तर तेथेच माझी स्थापना कर!’ त्याप्रमाणे इथंवर आल्यावर मागे वळून पहाता देवाने इथे स्थापना कर असे सांगितल्याप्रमाणे नदीकाठी देव स्थापित झाला. सन १७६५ चे फाल्गून प्रतिपदा ते पंचमी या दिवसात प्रतिष्ठापना झाली असे ऐकिवात आहे.

या भक्तांची अखंड मांदियाळी आहे.संकष्टीस देवदर्शनास व रोजचेही दर्शन घेणारे भक्त आहेत. माघातील गणेश जन्म असतो. जन्मकाळ, महाप्रसाद सर्वच मोठ्या प्रमाणावर नवसाला पावणारा असा हा गणपती आहे.

श्रावण सोमवारची संगमेश्वराची जत्रा फार पुरातन काळापासून असते. माझ्या सासुबाई त्यांचे लहानपणी आणा, दोन आणे घेऊन चालत इथल्या जत्रेला जात असत. (साल साधारण १९२० ते १९२५ चे सुमारास) अशी आठवण आम्हाला सांगत असत. अजूनही इथली जत्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होते. असंख्य भक्तगणांची पहाटे पासून रीघ लागलेली असते ती रात्री पर्यंत ! बाहेरील आवारात जत्रेत असतात तशी खेळणी, पुंग्या, कलाकुसरीची चित्रे आदींचे विक्रेते असतात. घाटाच्या बाजूस चक्र, मुलांसाठी चे करमणुकीची खेळणी यांची रेलचेल असते. अशी श्रावणातले सर्व सोमवारी जत्रा असते.

इथे घरोघर कार्तिक व्दादशीला तुळशीचं लग्न दारात रांगोळी, ऊसाचा मंडप घालून केले जाते. आपण त्यासुमारास फेरफटका मारला तर हे सुंदर दृश्य गावातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या दारात शोभिवंत असं दिसून येते. शहरात अशी अंगणे पहायला मिळत नाहीत त्यामुळे इथे सर्व पहाण्यासारखेच असते. ही परंपरा खरोखरच सामान्य माणसांनी जपली आहे.

(क्रमशः)

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर

? मनमंजुषेतून ?

☆ क्षमा….. ☆ मा.भारती ठाकूर ☆

(नर्मदालयच्या मा. भारती ठाकूर यांनी लिहिलेली अप्रतिम कथा.)

नाशिकला आमच्या बागेत अनेक प्रकारच्या जास्वंदी फुललेल्या होत्या. रस्त्याने जाणारा-येणारा थोडावेळ थबकून त्यांच्या कडे न बघता गेला असं कधी होत नव्हतं. श्रावण महिना होता. माझ्या दारा समोरच पिवळ्या रंगाची पण आत लालसर –(गर्द गुलाबी) रंगाचा चांदवा असलेली जास्वंद खूप बहरली होती. साधारण दहा बारा फुट उंचीचे झाले होते ते झाड. रोज किमान 56-60 हून अधिक फुले झाडावर असायची. फार लाडकी जास्वंद होती ती माझी. तिने शेजारच्या सोनार काकांच्या बागेत अतिक्रमण करायला कधी सुरवात केली, समजलंच नाही. तिच्या फांद्या त्यांच्या बागेत जरा जास्तच पसरायला लागल्या. झाडाची फुले कोमेजून दुसऱ्या दिवशी खाली पडून त्याचा खूप कचरा व्हायचा. कोमेजलेल्या फुलांवर असंख्य चिलटे बसायची. ती मग दिवस भर घरात देखील फिरायची. कोमेजल्यावर फुले चिकट होत. त्यावर चुकून पाय पडलाच तर पाय सटकून माणूस खाली पडायची पण शक्यता असायची.

शेजारचे सोनार काका मला रोज सांगत, “अगं भारती, आमच्या बागेत आलेल्या या जास्वंदीच्या फांद्या कापून टाक बरं. मला त्रास होतो त्याचा.” मला त्यांचा त्रागा समजत असे. पण त्या फांद्यांवरच्या असंख्य कळ्या पाहिल्या की मी त्यांना प्रॉमिस करायची, “ काका, एवढ्या कळ्यांची फुले होऊन जाऊ देत ना. काही दिवसांनी असाही त्याचा बहर कमी होईल. मग कापतेच मी त्याच्या फांद्या. चालेल ना ?”

“ठीक आहे. पण लवकर काप. मी पडलो पाय घसरून तर ?” इति काका.

“हो, हो, लवकरच कापीन मी फांद्या. प्रॉमिस काका !” माझे ठरलेलं उत्तर .

एके दिवशी मी ऑफिसमधून घरी परतले तर काका बाहेरच उभे. “त्या फांद्या आत्ताच्या आत्ता काप . फार दिवसापासून ऐकतोय तुझं. आज कापते- उद्या कापते. आज आत्ता माझ्या समोर काप फांद्या.” एरवी अत्यंत प्रेमळ असे सोनार काका त्यादिवशी इतके का संतापले होते मलाही समजलं नाही. माझाही राग जरा अनावर झाला. घरात जाऊन मी झाडे कापायची कात्री आणि चांगला धारदार कोयता आणला. फक्त  त्यांच्या बागेतल्याच नाही तर माझ्याही बागेतल्या  जास्वंदीच्या झाडाच्या फांद्या कापल्या. दहा बारा फुट उंचीचे ते झाड मी अगदी अडीच तीन फुटी करून टाकलं . कंपाऊंड वॉलच्या पलीकडून सुद्धा ते आता काकांना दिसणार नव्हतं.

ती माझी कृती म्हणजे राग अनावर झाला की  माणूस किती विकृतपणे वागतो याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.

पश्चाताप तर लगेचच झाला. पण आता पश्चाताप करून काही उपयोग पण नव्हता. त्या फांद्या पुन्हा थोडीच जोडता येणार होत्या ? त्या रात्री जेवलेही नाही आणि झोपलेही नाही.

पावसाचे दिवस होते. झाड पुन्हा भराभर वाढलं. आश्चर्य म्हणजे एकही फांदी  सोनार काकांच्या बागेच्या दिशेने वाढली नाही. पुन्हा दहा -बारा फुट झाड वाढलं. पाने हिरवीकंच आणि टवटवीत. पण फूल मात्र एकही नाही. त्याच्या आसपासच्या झाडांवर असंख्य फुले पण याला मात्र एकही नाही. खतं-औषधे सर्व काही प्रयोग झाले. सहा महिने उलटले आणि माझी अस्वस्थता वाढली. काय करू मी ? सोनार काकांना पण ही घटना सांगितली. त्यांनाही खूप वाईट वाटलं.

एक दिवस कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रातल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सरस्वती दीदी यांचा फोन आला. त्यांनी वयाची पंच्याहत्तरी गाठली होती. झाडा झुडपांची आणि बागेची सरस्वती दिदीना खूप आवड होती. कन्याकुमारीच्या समुद्र किनाऱ्यावर -अगदी समुद्राच्या रेतीत सुंदर असे Beach Garden त्यांनी बनवलेले मी पाहिले होते. झाडांवरचे त्यांचे प्रेमही मला ठाऊक होते . त्यांचा फोन येताच मी जास्वंदीच्या झाडाची कथा अगदी अथपासून त्यांना सांगितली. ‘दीदी, त्या झाडाला आता कुठलं खत घालू म्हणजे त्याला पुन्हा छान फुले येतील?” मी अक्षरश: रडवेली झाले होते.

“There is no need for any fertilizer. Did you say sorry to that plant Bharati ? And say it honestly till it responds to you.” 

“काय? झाडाला सॉरी म्हणू ?” खरं तर डॉ जगदीश चंद्र बोस यांनी लावलेले वनस्पतींच्या बाबतीतले सर्व शोध माहीत होते. वनस्पतींना भावना असतात, ते प्रतिक्रिया व्यक्त करतात वगैरे. Secret of plants सारखी अनेक पुस्तकेही वाचली होती. पण प्रत्यक्षात आपल्याला स्वत:ला असा काही अनुभव येईल असा कधी विचारही मनात आला नव्हता. सरस्वती दिदी पुढे म्हणाल्या की अगदी रोज ठराविक वेळेला क्षमा मागायची. झाडाला कुरवाळायचं, इतरही गप्पा मारायच्या.

झाडाची क्षमा मागण्याचा माझा दैनिक कार्यक्रम सुरू झाला. पहिल्या दिवशी थोडं कृत्रिम वाटलं पण जसजसे दिवस वाढत गेले, एक व्याकुळता माझ्या बोलण्यात – स्पर्शात आपोआपच यायला लागली.

जास्वंदीशी बोलणं, तिला कुरवाळणं मलाही आवडायला लागलं.  तिला फुले कधी येतील या उत्सुकतेपेक्षा आमच्या  दोघींमध्ये एक वेगळं नातं तयार झालं ते मला अधिक महत्त्वाचं वाटलं.. दहा-बारा दिवस होऊन गेले.  एके दिवशी सकाळी जास्वंदीच्या पानामागे एक कळी लपून बसलेली दिसली.  जणू म्हणत होती, “शोध मला. बघ मी आलेय”.  आनंद गगनात मावेना म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं.  पण थोडा वेळच.  शेवटी मन शंकेखोर.  हा निव्वळ योगायोग  तर नाही ?  पण चार दिवसातच जास्वंदी कळ्यांनी  पानोपान बहरली. फुलेही उमलू लागली.  मग मात्र खात्री पटली की जास्वंदीने मला खरोखर क्षमा केली  आहे.

पहिला फोन सरस्वती दीदींना  केला.  माझ्या या आनंदात त्यांच्या इतकं दुसरं कोण सामील होऊ शकलं असतं?

त्या दिवशी जास्वंदीशी हितगुज करताना मी म्हणाले,  “आता जन्मात कधी मी असे वागणार नाही.  पण तू सुद्धा माझ्याशी पुन्हा कधी कट्टी घ्यायची नाही बरं का !”

 

©  भारती ठाकूर

नर्मदालय, लेपा  पुनर्वास (बैरागढ) जिल्हा खरगोन मध्य प्रदेश.

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – २ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[1]

जळतय

तळमळतय

हे विशाल वाळवंट

की

थोडा तरी

जीव लाव रे

हिरव्या प्राणांच्या

लाडक्या तृणपात्या

पण

हिरव्याच तोर्‍यात

मान उडवत ते

नाक मुरडून हिरवंगार

दुष्ट हसतं

आणि भिरभिरत जातं

दूर…दूर…

 

[2]

पृथ्वीचे आसूच

फुलवत ठेवतात

तिचं हसू

 

[3]

मुळं कशी?

जमिनीमधल्या

फांद्या जशी

फांद्या कशा?

हवेमधली

मुळं जशी

 

[4]

ही प्रचंड पृथ्वी

उग्र आणि कठोर

पण

किती मीलनसार झाली

तृणपात्यांच्या संगतीनं ……

 

≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡ ≡

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाणी रे पाणी ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

सौ. दीपा नारायण पुजारी

? जीवनरंग ?

☆ पाणी रे पाणी ….. ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆

रेडिओच्या जाहिरातीतील ताई सारखी विचारतेय, आई कधी येणार गं नळाला पाणी?

छोटूला  कळतच नाही आहे ही ताई रोज रोज अशी का विचारतेय? नळाला पाणी तर आहेच ना? मग?

त्यानं आजीच्या मागं एकसारखा तगादा लावला आहे.

छोटू: “आजी ही वेडी आहे का ग? की या ताईच्या घरात खरंच पाणी येत नाही नळाला?”

आजी: “नाही रे वेडी कशी? त्यांच्याकडं नळच  नाही. ऐकलं नाहीस का तिची आई तिला विहीर दाखवतेय ते?”

छोटू : “विहीर?”

आजोबा : “हो, अरे तुझ्या त्या पुस्तकात आहे बघ चित्र; वेल चं?”

छोटू : “Well? बापरे. . आजोबा त्यांना रोज वेल मधून पाणी काढावं लागतं? नळ नाही त्यांच्या कडं?”

“आजी , आपण जाऊया त्यांच्याकडं? मला बघायची आहे वेल”..

महानगरातल्या आलिशान सोसायटीत राहणाऱ्या छोटूला घरात नळ नसतात, पाणी नळाला येत नाही ही कल्पनाच करता येत नाही. मागं एकदा त्याच्या यूकेजी च्या’ मिस नं दूध कोण देतं? ‘ असा प्रश्न विचारला होता. छोटू म्हणाला, ‘पिशवी. ‘मिसनं बरंच समजावून सांगितलं. पण हा ऐकेचना. शेवटी त्याच्या आई बाबांना शाळेत बोलाविण्यात आलं. मग एकदा त्याला गावी जाऊन गोठा दाखवावा लागला. तेंव्हा कुठं बाळराजांना  गाय आणि म्हैस दूध देतात हे पटलं.

आजी : “हो, जाऊया हं. तुझ्या आई बाबांना रजा काढायला सांगू आणि जाऊ विहीर बघायला.”

छोटू एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं संध्याकाळी आई बाबा आल्यावर त्यांच्या मागं लकडा लावून गावी जायचं ठरवूनही टाकलं.

आजी मात्र विचारात हरवल्या. त्यांच बालपण जरी शहरात गेलं असलं तरी त्यांचे काका- काकू गावीच रहात होते. प्रत्येक दिवाळी, मे महिना या दोन्ही सुट्ट्यांत आजी म्हणजे यमू गावी जायची.

आजींच्या डोळ्यासमोर आठ-नऊ वर्षांची फ्राॅक घातलेली यमू आली. त्यांचं मन भूतकाळात गेलं. छोटू बरोबर बोलता बोलता त्या यमू बरोबर किटलीतून पाणी आणू लागल्या.

“आई, काकू मी येणार आहे पाणी आणायला.”

” खूप लांबून आणायचंय हं पाणी ठमाबाई. तुला नाही जमणार.” . . . काका

“हो आणि येताना थोडं ऊन होईलच. आमची चांदणी कोळपून जाईल.”. . . काकू

अशा कोणत्याही वाक्यांना न जुमानता यमू शांताक्कांच्या मागं लागून फळीवर ठेवलेली लहानशी किटली काढून घेईच. आई आणि काकूच्या मागं मागं ती छोटी छोटी पावलं टाकत चालायला लागे देखील.

शेतातल्या विहिरीवर पोचेपर्यंत तिच्या हातातली किटली शांताक्काकडं पोहोचे. तिच्या हातात, फ्राॅक च्या खिशात फुलं, पानं यांचं संमेलन भरले. प्रत्येक वेगळा रंग तिला खुणावत असे. पानांचा, फुलांचा वेगळा आकार तिला मोहात पाडत असे.

गावापासून जवळच असलेली विहीर. . . सगळ्या बायका इथं जमत आणि मग सुखदुःखाची देवाणघेवाण करत कपडे धुतले जात. दगडावर घासून , धोपटून जसा कपड्यातला मळ बाहेर पडे तसाच मनातला सुध्दा. स्वच्छ धुतलेल्या कपड्यांचे पिळे, आणि पिळ सुटलेली स्वच्छ मनं तसंच भरलेल्या कळशा घागरी घेऊन सगळ्या घरी परतत.

एवढा वेळ यमू कधी पाण्यात खेळे, कधी आपला फ्राॅक धुवून टाके तर कधी जवळच्या फुलझाडांत रमे. मे महिन्यात मात्र ही फुलझाडं वाळलेली असत. पिवळी पडलेली पानंही तिच्या वही पुस्तकात गोळा होत. शाळेतल्या मैत्रिणींना तिचा हा गावरान अल्बम वेड लावत असे. फिरकीच्या टोपणाची किटली भरुन घेऊन ती घरी परते.

क्वचित कधीतरी काकू नदीवर कपडे धुवायची टूम काढे. वारणा नदीचं तसं उथळ पात्र, खडकाळ काठ, गावापासून लांब असलेला, तिथं नेणारा धूळखात, सुस्त पडलेला, तापलेला मातीचा रस्ता, धूळ बसलेली झाडं, झुडपं, काटेरी निवडूंग! त्या रस्त्यावर काकूच्या मैत्रिणी भेटायच्या. रखरखत्या ऊन्हात, संसाराचा कोरडा भार गाठोड्यात बांधून, कोरड्या मनानं, झपाझप चालत त्या नदीकाठ गाठत. गळ्यात लाकडी ओंडका बांधलेली , पाण्यात डुंबण्यासाठी आसुसलेली जनावरं  जड पायांनी संथपणानं जाताना दिसत. धूळरस्ता त्यांनी उठवलेली अक्षर चित्रलिपी कोरडेपणानं वागवत राही.

हाताला काही तरी गार लागलं. आजी भानावर आल्या. आजोबा सरबताचा ग्लास हातात घेऊन ऊभे होते.

“काय, आठवणीतून आलात का बाहेर?”

आजीनं हसून ग्लास हातात घेतला.एक घोट घेऊन त्या म्हणाल्या,” परिस्थिती फारशी बदललेली नाही हो. आठवणीतील गाव काय आणि आपलं शहर तरी काय. आजची बातमी वाचलीत पेपर मधली?”

आजोबा:  “हं, इतकी वर्षे झाली स्वातंत्र्य मिळून, अजून दैनंदिन गरजा भागवता येत नाहीत.”

आजी:  “परदेशात बेसीनच पाणी देखील पिण्यायोग्य असतं.”

आजोबा:  “गल्फ कंट्रीज मध्ये समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी तयार होत. पाणी महाग आहे पण दुर्लभ नाही.”

आजी: “आणि जीवनदायी पाण्याचं महत्त्व पटवून द्यायला कमी पडलो आपण”.

आजोबा: “या भारतदेशाला पुन्हा एकदा भगीरथ प्रयत्न करावे लागणार बहुतेक.”

“आजी, आजोबा, आजोबा.” . छोटू  जोर जोरात हाका मारत होता.

“अगं ही भीमाक्का  बघ नळ सुरू ठेऊन कुठं गेलीय. बादली भरून वाहतेय ना.”

दोघंही आवाजाच्या दिशेनं निघाली.

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

मो.नं. ९६६५६६९१४८

Email:  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वैभवाचे दिवस भाग – ३ ☆ सुश्री सुचित्रा पवार

सौ.सुचित्रा पवार

? विविधा ?

☆ वैभवाचे दिवस भाग – ३ ☆ सुश्री सुचित्रा पवार ☆ 

आमच्या घराच्या जवळ गावंदर असल्याने आम्हाला निसर्गाचा आनंद भरभरून घेता आला. पिके कापणीला आली की पक्ष्यांची गर्दी व्हायची आणि ते पक्षी आमच्या अंगणातल्या झाडाझुडावर निवांत विश्रांती घ्यायचे. बाजूलाच लगेच शेते असल्याने त्यांची घरटीही आसपासच्या झाडांवर, खोबणीतून ढोलीतून असायची. संध्याकाळी खेळून दमलो की मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर निवांत बसून आकाशातले पाखरांचे थवे न्याहाळत राहायचो. ढगांच्या कापसात वेगवेगळे आकार शोधायचो, कधी हरीण कधी राक्षस कधी देव तर कधी शिवाजीमहाराज दिसायचे. आकाशात तिन्हीसांजेला होणारी रंगांची उधळण आणि तांबूस, केशरी, पिवळ्या, काळ्या  नानारंगी छटा पाहून हरकून जायचो; नित्यनेमाचे  निसर्गातील हे बदल आमच्या जीवनाचे अविभाज्य भाग होते. आसपासचे पशुपक्षी, फुलपाखरे, झाडेझुडे, दगड धोंडे, ओढे, नाले इतकेच काय दूरवर उन्हात झळझळणारे दाट मृगजळ देखील आमचेच वाटायचे; जवळ जाऊन त्यात हात बुडवावा असं वाटायचं; हे सारे आमचे सखेसोबतीच होते. शाळेत जाताना रमत गमत जाणे येणे आणि मग निसर्गातले हे दररोजचे बदल स्वीकारत अन न्याहाळत त्याच्याशी एकरूप होत जगणे अंगी मुरले होते. शेतातली पिके काढली की मुलांना पतंग उडवायला रान मोकळेच! कितीदा सड घुसून पाय रक्तबंबाळ व्हायचे, काटे टोचून पायात मोडायचे पण आनंदाच्या त्या क्षणांपुढे कोणत्याच वेदना क्षुल्लक होत्या.

निसर्गचक्राप्रमाणे आमचे खेळही बदलत असत, म्हणजे पावसाळ्यातले खेळ वेगळे, उन्हाळ्यातले खेळ वेगळे! पावसाळ्यात चिखलात खेळणे, मातीची भांडी बनवणे असले खेळ खेळत असू पण खरी खेळाची मजा उन्हाळ्यातच यायची. सुट्टी दीर्घकाळ चालायची आणि शाळा, अभ्यास असलं काहीच नसायचं, त्यामुळं सर्व सुट्टीवर आमचाच हक्क होता.आम्हाला उन्हाळ्यात कुठल्या कलासेस अथवा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला बसवले जात नव्हते. त्यामुळं अधून मधून घरी बोलवलं की सांगितलेलं काम करायचं आणि पुन्हा खेळायचं.

जोंधळ्याचे पीक निघून कडब्याच्या गंज्या परड्यात विसावयाच्या. मजबूत टणक गणगटे काढून साठवून ठेवायचे आणि गणगटांनी खेळायचे. प्रत्येकाच्या समसमान गणगट घेऊन चौकोनी किंवा गोल रिंगणात मांडून सपाट दगडाने (याला आम्ही व्हस्टर म्हणायचो)टिपून रिंगणातून बाहेर काढायचे असाच कोईंचा आणि चिंचोक्यांचा डाव असायचा. ओढलेल्या(जिंकलेल्या)कुया अंगणात पुरून ठेवायचो त्यावर ओळखीची खूण ठेवून दुसऱ्या दिवशी पुरून ठेवलेल्या कुया काढून खेळायचो. कधीतरी रात्री अचानक पाऊस यायचा आणि पुरलेल्या कोयी मुजुन जायच्या, थोड्या दिवसांत त्या जागेत आंब्याचे कोवळे तांबूस कोंब वरती यायचे मग लक्षात यायचे,  ‘इथं कोयी पुरल्या होत्या !’

याचबरोबर दुपारच्या वेळी सावलीत बसून काचा कवड्या, भातुकली, (भातुकलीच्या खेळात बोळकी, हिंगाचे, पोंड्सचे रिकामे झालेले डबे, टोपणे, सगळं चालायचं भातुकलीचा संसारसेट क्वचितच मिळायचा) गदी गाई,  गजगे,  बिट्या, जीबली, लपंडाव खेळत असू.

(मुलेही आमच्यासोबतच खेळत, भेदाभेद मुळीच नव्हता, छेडाछेडी किंवा आतासारखं अजून पहिलीत जात नाही तोपर्यंत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असले प्रकार नव्हते.) सर्वचजण सवंगडी निर्मळ निकोप मनाचे होते. कुणाही मुलाची ओळख ‘शेजारचा’ अशी नसायची, ‘माझा भाऊ ‘ अशीच असायची. चुकलं तर मरेस्तोवर मार असायचा, मुलगी ‘मोठी’ झाली की खेळ बंद व्हायचे लगोर, काट्याकोली, विष अमृत, सुरपाट्या गट्टया, आयरे, पत्यांच्या पानाने, विटी (चिन्नी )दांडू,  कबड्डीने खेळायची.

आमचे टाइम पास असायचे-एकत्र बसून गप्पा मारणे, ढगांचे आकार, आकाशाचे रंग न्याहाळणे,  पक्ष्यांचे, फुलपाखरांचे, वेगवेगळ्या कीटकांचे निरीक्षण करणे, झाडांच्या पानांच्या पिपाण्या करून वाजवणे, कर्दळीच्या बिया पानांच्या सुरळ्या करून  त्यावर ठेवून फुंकरीने उडवणे, चिकाडीचे तांबडे तुरे तोडून ते झाडाच्या ढोलीत खोबणीत ठेवून ‘कोंबडे झोपले’ म्हणायचे. बाभळीच्या गोल गोल शेंगा तोडून त्या पैंजण, जोडवी म्हणून पायाला बोटाला बांधून जोरजोरात पाय आपटायचे आणि शेंगा खूळ खूळ वाजवायचो. चिंचेचा कोवळा पाला, कोवळ्या चिंचा ओरबाडून खाणे किंवा त्यात मीठ टाकून दगडावर चेचून खाणे, जुन्या वहितली कोरी पाने काढून त्यांची वही शिवणे, फाटकी पुस्तके चिकटवणे हे असायचे.

तीन टाईम पोटभर जेवायचो, डाळींची किंवा वाळल्या कडधान्यांची आमटी न भाकरी, भाजी क्वचितच, दूध क्वचितच, भात फक्त संध्या काळीच तोही रेशनच्या तांदळाचा.

भाजलेली चवळी, मूग, हरभरे, फुटाणे, चुरमुरे मक्याची कणसे,  भुईमुगाच्या ओल्या शेंगा, सिजन मध्ये चवळी-मुगाच्या ओल्या शेंगा, ऊस, ज्वारीचे गोड बांड( ज्वारीचे टणक ताट),  ज्वारीचा हुरडा, हरभऱ्याचे डहाळे,  हिरव्या -पिकल्या चिंचा हे आमचे वरचे खाऊ होते.बिस्कीट, ब्रेड, पाव असले खाऊ आमच्या आसपास ही फिरकत नव्हते, चहाबरोबर कधीतरी शिळी चपातीच  कधीतरी पाच-दहा पैशांचा बटर बुडवून खायला मिळायचा.पाहुणे आले तर तेही चपाती उसळ किंवा भजी, वड्याच आणायचे त्यामुळं बेकरी वस्तुंना किंमत नव्हती. उन्हाळ्यात करवंद जांभळं, चोखून खायचे छोटे आंबे रानात -काट्याकुट्यात हिंडून खायचो.कुठल्याही विहिरीचे, हौदाचे पाणी कचरा बाजूला सारून घटाघटा प्यायचे. पाण्याची बाटली, ब्रिसलरी असलं आमच्या गावीही नव्हतं. दुधाच रिकाम पातेलं आणि तुपाची बेरी भाकरीबरोबर खायला ‘तू-मी’ व्हायचं. (आज त्याला कोण विचारत पण नाही)

क्रमशः….

© सुश्री सुचित्रा पवार

तासगाव

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 

 

 

 

? इंद्रधनुष्य ? 

☆ – देसाई गढी – ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

शिवराय दक्षिण दिग्विजय करून परतत होते. येताना बेलवडी हे गाव लागते. हे आता कर्नाटकात आहे. या गावात एक देसाईगढी आहे. ही मावळ्यांना जिंकायची होती. मोर्चे लागले …. लढाई सुरू झाली… एक  छोटीशी घडी… मावळे लढतायेत…पण गढी काही मिळेना… एक दिवस गेला …आठ दिवस गेले … पंधरा दिवस….तब्बल एक महिना लागला हि गढी जिंकायला… आणि जिंकली…. कोण होते त्या गढीत… कोण लढल एवढे चिवटपणे….. ती होती साविञी देसाई ….

ही लढवत होती ती गढी….

गढी ताब्यात आली… सावित्री कैद झाली …. राजे गढीत गेले .. गादीवर स्थानापन्न झाले… आणि सावित्रीला समोर आणले गेले … ती घाबरलेली.. गांगरलेली…आता माझ कस होणार …. तिला एक लहान मुल होत . त्याची काळजी लागली. मला शिवाजी मारणार . माझ बाळ अनाथ होणार . आता मी काय करू. राज्यांच्या समोर रडायला लागली …

महाराज मला मारा …

ठार मारा… पण माझ लहान बाळ आहे. माझ्या बाळाला मारू नका. हव तर माझा जीव घ्या .

हे तीचे शब्द ऐकून शिवाजी राजा गहिवरला… तीच्या बाळाला आणायची आज्ञा दिली … बाळ आणले … राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले. सावित्रीच काळीज धडधडत होते .. आता शिवाजी माझ्या मुलाला मारणार .. काय करावे.

तेवढयात राजांनी आज्ञा दिली. सावित्री ला बंधमुक्त केले. ती धावत राज्यांच्या पायावर झुकली. माझ्या लेकराला मारू नका……..

 

आणि या शञूच्या बाईसाठी..

शिवाजी राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडले.

ताई………….

ताई  … कोण म्हटले मी तुम्हाला मारणार … या बाळाला मारणार … मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ माझा भाचा झाला.

आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय… काही तरी दिले पाहिजे ना…

 

ताई या बाळाच्या दुधभातासाठी मी ही जिंकलेली गढी त्याला देतोय… आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडी साठी..

अस म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले. सन्मानाने तीला गादीवर बसवले . तीचा सन्मान केला. काय होतय हे तीला कळत नव्हते .. पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने वहायला लागले.

राजा.. मी तुला शञू समजले..

मी वैरी समजले..

पण तुच भावा बहिणीच नात निर्माण करून या अबलेचा सन्मान केला…

धन्य शिवाजी राजा..

धन्य त्याचे माता पिता..

 

ही कथा इथच संपत नाही

शिवाजी निघुन गेले. पण शिवरायांचे शिल्प त्या बहिणीने उभारले.

यात गादीवर शिवाजी बसले आहेत..लहान मुल मांडीवर आहे. राज्यांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे. या चमच्याने आपले छञपती बाळाला दुध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे. अस शिल्प चित्र आजही त्या कर्नाटकातील बेलवडी गावात पहायला मिळते.

 

हेच शिल्प भावा बहिणीच्या प्रेमाची साक्ष देत आहे…

 

किती महान माझा शिवाजी राजा होता हो..

 

शिवरायांना सख्खी बहिण नव्हती

पण स्वराज्यातील प्रत्येक परस्ञी शिवाजी राजाला आपला भाऊ मानत होती .

आणि तुम्हाला सांगायची गरज नाही

काय नात आहे हे भाऊ बहिणीचे…

आणि काय नात आहे शिवाजी राजाच.

माझा शिवाजी भाऊ बहिणीच प्रेम शिकवून गेला .

 

किती बर होईल हे शिवाजी आपल्याला कळले तर…

वादाच्या पलिकडले शिवाजी …

बहिणीचा भाऊ शिवाजी …

 

माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर …

कोणत्याही स्ञीवर अत्याचार होणार नाही .

निर्भया सारखी प्रकरणे होणार नाहीत .

कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तीचा शिवभक्त भाऊ उभा असेल .

 

मध्यरात्री कामावरून सुटणारी तरूणी बिनधास्त असेल

कारण तिला विश्वास असेल

हा शिवबाचा महाराष्ट्र आहे.

शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे.

माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे

 

प्रत्येक भावाने प्रत्येक गृपवर पाठवावा

हि विनंती ..

जय श्रीराम.

? ?

आहारात ‘सत्व’,

वागण्यात ‘तत्व’,

आणि

बोलण्यात ‘ममत्व’

असेल

तरच जीवनाला ‘महत्त्व’ येते.

?? ??

संग्राहक : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 93 ☆ आठवण – ७ एप्रिल २०२१ ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 93☆

☆ आठवण – ७ एप्रिल २०२१ ☆ 

आज अभिनेता जितेंद्र चा जन्मदिवस! मी शाळेत असताना जितेंद्र चे खुप सिनेमे पाहिले. शिरूर मध्ये असताना जितेंद्र चं वेड लागलं ! मला आठवतंय, बूँद जो बन गयी मोती, गीत गाया पत्थरों ने, गुनाहों का देवता, अनमोल मोती, औलाद, फर्ज, विश्वास, जिगरी दोस्त…..हे सगळे शिरूर ला तंबूत पाहिलेले सिनेमा.

एकदा मी आणि माझी मैत्रीण ज्योती धनक सतरा कमानी पुलापर्यंत फिरायला गेलो होतो. मी फूल है बहारों का, बाग है नजारों का और चाँद होता है सितारों का…. मेरा तू.. . तू ही तू….  हे गाणं गुणगुणत होते. ज्योती नी विचारलं “जितेंद्र आवडतो का तुला?” मी म्हटलं, हो…” जितेंद्र आणि शशी कपूर…. “त्यावर ज्योती म्हणाली, “शशी कपूर चं लग्न झालंय, जितेंद्र करेल तुझ्याशी लग्न.”

जितेंद्र माझ्याशी लग्न करेल असं मला मुळीच वाटलं नव्हतं, कारण गुड्डी मधल्या जया भादुरी इतकी अतिभावनिक मी कधीच नव्हते. पण ज्योती धनक नी चेष्टेने का होईना , म्हटलेलं ते वाक्य तेव्हा लई भारी वाटलं होतं, त्या नंतर मी जितेंद्र चा प्रत्येक सिनेमा पाहिला.

पन्नास वर्षां पूर्वीची ही आठवण !… जुन्या आठवणी येताहेत कारण आत्मचरित्र लिहायला घेतलं आहे… ज्योती धनक ला आठवतंय का हे पडताळून पहायला आवडेल मला, तसा योग येवो!

*********

आणि तो योग आला व्हाटस् अॅप मुळे जुन्या मित्र मैत्रिणींचे मोबाईल नंबर मिळवणं सोपं झालंय!

एका मित्राने ज्योती धनक चा नंबर दिला. मी तिला फोन केला, आणि विचारलं “तुला आठवतोय का हा जितेंद्रचा किस्सा?”

ती म्हणाली, “म्हणजे काय, मला सगळं आठवलं ”

ज्योती खुप छान बोलली, खुप आपुलकीने, आयुष्यात घडून गेलेल्या घटना परत येत नाहीत पण त्याच्या साक्षीदार असलेल्या मित्र मैत्रिणींमुळे ते क्षण आठवणीत का होईना परत जिवंत करता येतात.

आणि हेच आयुष्यातलं काव्य आहे.

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares
image_print