मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जरा हे वाचून बघायचं का ? – डाॅ. प्रज्ञावंत देवळेकर ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून  ?

☆ जरा हे वाचून बघायचं का ? – डाॅ.प्रज्ञावंत देवळेकर ☆ संग्रहिका – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(घरचा साबण सोडा घेऊन जगाची धुणी धुण्यापूर्वी जरा हे वाचून बघायचं का?  डॉ प्रज्ञावंत देवळेकर यांचा महत्वाचा लेख ! कुणी पत्रकार काय म्हटला, आर माधवनने कसे चांगले संस्कार दिलेत मुलाला,पैशाचा माज वगैरे चर्चा करण्या आधी …जरूर वाचा——-) 

शहारुखच्या पोराचं सोडा,  हीच घटना त्याच्या करिअरसाठी लाॅंचपॅड ठरेल..

तुम्ही तुमच्या घरातल्या-आजूबाजूच्या मुलांशी यावर बोला आणि यावर त्यांची प्रतिक्रिया बघा..

‘लिया माल, व्हाट्स दी बीग डिल? क्रुझरपे वो क्या चाय पिने जायेंगा क्या?’ असं मध्यमवर्गीय घरातले आणि आर्यनपेक्षाही लहानं पोरं पटकन बोलतात किंवा फक्त सूचक हसतात..

हे सगळं “आपण नक्की कुठं चाललं आहोत?” असा प्रश्न नक्की निर्माण करतं..

वाईट याचं वाटलं की ‘त्यानं’ व्यसन करणं म्हणजे फक्त ‘सरड्याची धाव शेवटी कुंपणापर्यंत’ ठरलं..

इतकी सोपी व्याख्या मौजेची आणि नशेची? जी आहे बापाचा पैसा म्हणून विकत मिळते..

अडकवला कॅमेरा गळ्यात–धुंडाळलं जंगल–शोधली खेकड्याची नवीन प्रजाती—.याला म्हणतात ‘कैफ’ 

आर्यनची ‘बातमी’ झाली पण अगदी त्याच्याहून लहान शाळकरी मुलं कोणकोणत्या व्यसनात अडकली नाहीयेत हे विचारा..व्हाईटनर ही अगदी पहिली पायरी..

माझ्या एका शाळकरी पेशंटनं गावाहून येतांना बस डोक्यावर घेतली कारण काय तर त्याला पेट्रोल हुंगायचं व्यसन होतं..ड्रायव्हरला विनंती करत कसंबसं पेट्रोलपंपावर गाडी थांबवली आणि त्याच्या पालकांनी वीस रुपयात रुमाल पेट्रोलनं भिजवून घेतला आणि कसंबसं पुण्यापर्यंत आले..

मुळात संप्रेरकांमुळं या वयात व्यसनांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते—

सुरुवातीला सहज गंमत म्हणून मुलं या व्यसनांकडं वळतात आणि नंतर ते व्यसन त्यांची गरज होते..मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एकदा का व्यसन लागलं की ७० ते ९० टक्के व्यक्ती ते सोडण्यास तयार नसतात..

निकोटिनशिवाय एमडी व मॅफ्रेडॉनसारख्या अमली पदार्थाच्याही विळख्यात तरुणाई सोबत आता शाळकरी विद्यार्थीही अडकलेत..

जेलच्या ‘आत-बाहेर’ होणारे काही पेडलर्स माझे पेशंट आहेत..

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘बुक’ या नावानं विद्यार्थ्यांमध्ये एक पावडर प्रसिद्ध आहे आणि याच वयोगटात केटामाईन, मॅजिक मशरूम यासारख्या अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे..

अगदी शाळकरी वयातली मुलं काय काय व्यसन करतात हे बर्‍याच जणांना सांगूनही पटणार नाही—–

ग्लू-पेंट-ड्रायक्लिनिंगचं केमिकल-बॉण्ड-आयोडेक्स-स्टिकफास्ट-फेविक्विक-गॅसोलिन-हेअरस्प्रे-डिओड्रंट-थिनर-नेलपेन्ट रिमूव्हर-आयोडेक्स-पर्मनंट मार्कर आणि काय नाही? यात आता मुलीही मागं नाहीत..

बरं हे पदार्थ घेण्याच्याही वेगवेगळ्या अभिनव पद्धती आहेत..

  • ‘डायरेक्ट अ‍ॅप्लिकेशन’ म्हणजे थेट नाकात किंवा तोंडात उडवणं, बोटाला किंवा शर्टाच्या कॉलरला लावणं, रुमालास लावून हुंगणं..
  • ‘बॅगिंग’-
  •  म्हणजे कागद किंवा प्लास्टिकच्या पिशवीत तो पदार्थ उडवून त्यातून नाकाने आणि तोंडाने हवा आत घेणं..
  • ‘हफिंग’ म्हणजे या पदार्थानं भिजवलेला कपड्याचा तुकडा तोंडात ठेवणं..
  • ’स्निफिंग’ म्हणजे तो पदार्थ ज्या कंटेनरमध्ये आहे त्याचा नाकानं वास घेणं..
  • जवळपास हजारो असे पदार्थ आहेत जे अश्या प्रकारे वापरले जातात..

या पदार्थात असणाऱ्या रसायनात ब्युटेन,क्लोरोफ्लूरो कार्बन यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो ज्यामुळं थेट मेंदूला ‘किक’पोहोचते..

तुमच्या संबंधित-आजूबाजूच्या शाळकरी मुलांच्या कपड्यांवर पेंट किंवा ऑईलचे डाग असतील, ते जवळ आल्यावर एखाद्या केमिकलचा वास येत असेल,त्यांच्या तोंडाच्या आजूबाजूला चट्टे किंवा जखमा असतील,नाकातनं वारंवार पाणी वहात असेल, डोळे लाल दिसत असतील, नजर भिरभिरती असेल, नखांवर डाग असतील, स्वभाव चिडचिडा असेल, बोलण्यात अडखळत असतील तर आधी त्यांचे मित्र कोण आहेत याचा तपास करा, त्यांना विश्वासात घ्या..

प्रारंभी मौज वाटली तरी या सगळ्याचा परिणाम प्रामुख्यानं हृदय-त्वचा-पचन संस्था-श्वसनसंस्था-किडनी यासोबतच मेंदूवरही होतो..

ब्रेकिंग न्यूजचं काय? आज आहे.  उद्या दुसरी येईल.  पण या पिढीचं काय? यावर साकल्यानं कुणी बोलणार नाही हे सगळं जाणवलं म्हणून हा प्रपंच !

#ByPradnyawant 

©️ डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

संग्रहिका :  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सहवास कुणाचा ? ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ सहवास कुणाचा ? ☆ संग्रहिका  – सुश्री मीनल केळकर ☆ 

?

? दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व  कष्टपूर्ण आहे हे कळेल.

? दहा मिनिटे बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.

? दहा मिनिटे साधु संन्याशा समोर बसा, आपल्या जवळील सर्वकाही  दान करून टाकावे असे वाटेल.

? दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्या समोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल.

? दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल.

? दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.

? दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.

? दहा मिनिटे चांगल्या शिक्षका समोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.

? दहा मिनिटे शेतकरी/कामगार यांच्या समोर बसा, त्यांच्या काबाड कष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल.

? दहा मिनिटे सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल.

? दहा मिनिटे मित्रांसमोर बसा; स्वर्ग? स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असे तुम्हाला वाटेल.

सहवास कुणाचा हे खूप महत्त्वाचं !!!

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बंधन ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ बंधन ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

तसे पहायला गेले तर बंधन, बांध म्हणजे अडवणे, कुंपण घालणे. आपली जागा कुंपणाने किंवा सीमारेषेने बंदीस्त केली की त्यात कुणी अतिक्रमण करत नाही हा बंदिस्तपणा आवश्यक असतो, करावा लागतो.मात्र मनुष्य असो की प्राणी खरेच त्याला बंधन आवडते ?त्याचे उत्तर ‘नाही ‘असेच येईल. पक्षी उन्मुक्त हवेत फिरतो कोणत्याही झाडाच्या फांदीवर बसतो, झोके घेतो, वेगवेगळी फळे चाखतो, घरटे बांधतो अन गाणे गातो. बंध मुक्त जीवन असे असते,  आणि ते असे स्वैर असतात म्हणूनच आनंदाने गातात. पिंजऱ्यातल्या पक्षाला कधी गाताना पाहिलंय ? कारण त्याचे नैसर्गिक वागणे, फिरणे, उडणे आपण कैद करतो आणि म्हणून तो त्याचा आनंद गमावतो. गाईलेच कधी तर ते कदाचित रडगाणेच असेल!

“प्रत्येक मनुष्य जन्मतः स्वतंत्र असतो अन त्याला स्वतंत्र रहाण्याचा अधिकार आहे” फ्रेंच राज्यक्रांतीने मानवास दिलेले एक सूत्र ! जिथे बंधन अर्थात बद्धता असते तिथं हक्कांची, अधिकाराची पायमल्ली होते अन मग अशी बंधने जाचक ठरतात, प्रगतीस मारक ठरतात ;असे असले तरी मनुष्यास अनेक प्रकारची बंधने असतात मनुष्याच्या जीवनास आकार प्राप्त होण्यासाठी त्याला ठराविक बंधने त्या त्या वयात योग्य असतात, त्यालाच मर्यादा म्हणतात. मनुष्याने अमर्याद वागून कर्तव्य विसरू नये म्हणून मग नात्यांची बंधने घातली  त्यातलेच एक रक्षाबंधन ! रक्षा अर्थात रक्षण करण्याची जबाबदारी ! बहिणीचे सर्व परस्थितीत पित्याच्या पश्चात रक्षण, संगोपन, पालन करणे आणि बहिणीने आईच्या पश्चात भावास आईचे निरपेक्ष प्रेम देणे, काळजी घेणे म्हणजेच रक्षाबंधन होय !

कोणतेही  प्रेमाचे बंधन माणसाला हवेहवेसे वाटते, या बंधनात आपुलकी आणि आपल्या माणसाची काळजी,  हीत असते पण बंधनाचा अतिरेक झाला की अन्याय अन गुलामगिरी वाढते, म्हणून बंधन हे धाग्याप्रमाणे असावे ते नाजूक जरूर असावे पण चिवट, लवचिक असावे जेणेकरून कोणत्याही स्वार्थापोटी किंवा गैर समजापोटी तुटू नये ! कोणत्याही नात्यात बंधनातून जबरदस्ती झाली की नाते ताठर बनून तुटते म्हणूनच नात्यात स्वातंत्र्य अबाधित राखून अदृश्य बंध घट्ट व्हावेत की जेणेकरून कुणाचा जीव घुसमटणार नाही.

आज प्रत्येक सण, नाते औपचारिकतेकडे झुकतेय प्रेमाची भेट आनंददायी असते पण सण येताच बहिणीचे मन भावाच्या भेटवस्तुकडे लागणे अन मनासारखी गिफ्ट मिळाली नाही तर रुसवे फुगवे मग भावालाही हे सर्व नकोसे वाटून त्याने हे बंधन टाळणे असेच काहीसे होतेय !

खरे तर हा सण एकदिवसाचा नसून बहीण भावाने आजन्म पाळावयाचा आहे, जसे आपण भावावर हक्क गाजवू पहातो तसेच कर्तवय तत्परताही हवी, भाऊ जसा आपला असतो तशीच वाहिनी ही आपली समजून तिच्यावरही आपल्याला निरपेक्ष प्रेम करता यायला हवे म्हणजे नात्यात कटुता येणार नाही.कोणतेही नात्यांचे बंध जटिल न होता अलवार गुंफण झाल्यास वीण घट्ट होते अन नाते चिवट, अतूट होते.

आजच्या दिवशी प्रत्येक बहिणीचे डोळे भावाच्या वाटेकडे असतात,  राख्या बाजारात येताच  बहीण हौसेने छान छान राख्या भावासाठी निवडते, खरेच ज्याला प्रेमळ बहीण लाभते तो भाऊ भाग्यवान आहे अन जिला खंबीर साथ देणारा पाठीराखा भाऊ लाभतो ती बहीण ही भाग्यवानच !आजच्या दिवशी भावाच्या कपाळावर तीलक अन हातात राखी नसणे किती दुर्भाग्य ! ज्याला सख्खी बहीण नसेल त्याने मानस बहिणीला जीव लावावा व नात्याचे प्रेमळ बंध आयुष्यभर निभवावे, टिकवावे  अन या पवित्र नात्याचे निर्भेळ प्रेम मिळवावे !

 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स्टाॅप किपींग….. डाॅ.संजय सावंत ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

? मनमंजुषेतून ?

☆ स्टाॅप किपींग….. डाॅ.संजय सावंत ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

Stop keeping

काल सकाळी सकाळीच माझ्या एका मित्राने , डॉक्टर दीपक ने एक मेसेज पाठविला , 

Stop keeping your cloths & shoes for special occasion , Wear them whenever you can ,, 

Now a days being alive is a special occasion !!! 

आजच्या परिस्थितीत लागू पडेल असा किती सुंदर आणि अर्थपूर्ण मेसेज आहे बघा ,,, 

सणासुदीला किंवा लग्नसमारंभासाठी घालता येतील म्हणून तुमचे मौल्यवान कपडे आणि शूज  नुसते कपाटात ठेवून देऊ नका , आजचा दिवस तुम्ही जिवंत आहात हाच तुमच्यासाठी सर्वात मोठा सण व क्षण आहे ,,, 

खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका वृद्ध दाम्पत्याकडे व्हिजिट साठी गेलो होतो,  दोघेही 80 च्या आसपास असावे , राहणीमान , कपडालत्ता यावरून अत्यंत गरीब वाटायचे , फी देतानासुद्धा घासाघीस करायचे , औषधे लिहून दिली तरी अर्धीअधिक आणायचे , कसली चैन नाही , कोणी नातेवाईकांचा येणं जाणं नाही , कधी चांगलंचुगल खाणं नाही  कि कपडा नाही परंतु असते एखाद्याची परिस्थिती नाजूक असं म्हणून मी दुर्लक्ष करायचो एक दिवस माझ्या व्हिजिट बॅगमध्ये प्लास्टिक चा एक मोठा बॉक्स होता रिकामा होत आला होता ,  बाबा मला म्हणाले डॉक्टर साहेब मला तो बॉक्स द्याल का ? मी लगेच त्यांना तो देऊन टाकला ,,, कशासाठी पाहिजे असं विचारताच थोडं गडबडून गेले पण बायको पटकन बोलून गेली ,  त्यांना 1000 च्या नोटा ठेवण्यासाठी पाहिजे , मी अचंबित निघताना पुन्हा म्हणाले , अजून एखादा असेल तरी पुढच्या वेळी द्या मला , यात बसणार नाहीत , त्यावेळी माझे व्हिजिट फी दहा रुपये होती   ती देण्यास देखील ते नाखुश असायचे , विचारांचं काहूर डोक्यात घोंघावत असतानाच गाडीला किक मारून घरी आलो ,,, 

दुसऱ्या दिवशी सकाळीच ओपीडी मध्ये शिरतो न शिरतो तोच कंपाउंडर म्हणाला सर काल सकाळी तुम्ही व्हिजिटला गेला होता ते आजोबा सकाळीच गेले ,,, पटकन माझ्यासमोर नोटांनी गच्च भरलेला त्यांचा तो प्लास्टिकचा बॉक्स आला ,,,  ना खुद खाऊंगा ना खाने दुंगा असं आयुष्य जगतच कसलाही उपभोग न घेता नोटांचा बॉक्स खाली ठेवून बाबा वर गेले होते , आपण अमर आहोत किंवा अजून खूप जगणार आहोत या भ्रमानेच ते गेले ,

मागच्या महिन्यात आईचे वर्ष श्राद्ध झालं तिच्याकडे भरपूर किमती साड्या होत्या , मोठी बॅग भरली होती , काहींच्या तर घड्या देखील मोडल्या नव्हत्या , परंतु ती नेहमी साध्याच साड्या वापरायची , अर्थात वयोमानाने विरक्ती आल्यामुळे असेल कदाचित परंतु या साड्यां मुळे  नीता व तिचा नेहमी वाद व्हायचा ,,  कशाला नुसत्या ठेवून दिल्या आहेत बॅगेत ,,,  कुणी बघितलं तर म्हणतील डॉक्टरांची आई असून कसल्या साड्या  घालते वगैरे वगैरे ,, मला कोण बघणार आहे , तिचे नेहमीचे उत्तर , जेवढ्या चांगल्या साड्या होत्या त्या गरजूंना देऊन टाकल्या , बाकीच्या साड्यांची बॅग तशीच पडून आहे !!

आपल्या वॉर्डरोब मध्ये अनेक नवीन साड्या , पॅन्ट शर्ट पडून असतात , एवढ्या भारी साड्या , शर्ट , पॅन्ट रोज वापरायला कशाला घालायचा म्हणून तशाच पडून असतात , कधीकधी त्या घालायच्या मुहूर्तही उजाडत नाही , आणि समजा लग्न समारंभ किंवा इतर सणासुदीला घालायच्या म्हटल्या तर त्याची फॅशन आउट डेटेड झालेली असते  , त्या योग्य वेळी वापरल्या असत्या तर त्याचा उपयोग झाला असता ,, कपड्यांच्या बाबतीतच नव्हे तर घरामध्ये अशा अनेक गोष्टी आपण नंतर वापरून असं म्हणत म्हणत कालबाह्य होऊन जातात व तशाच लोळत पडतात ,,, 

आपल्या आयुष्यामध्ये वस्तूंच्या बाबतीत जी गोष्ट घडत असते तीच आपल्या मनातील चांगल्या-वाईट विचारांच्या बाबतीत देखील घडत असते , बरेचदा आपल्या आयुष्यात येणारे  मित्र नातेवाईक कुटुंबातील सदस्य यांच्याबद्दल आपल्या मनात असणारा स्नेह , प्रेम , आपुलकी आपण आपल्या इगो किंवा संकुचित  वृत्तीमुळे बोलून दाखवत नाही , मग बरेचदा वेळ निघून जाते ,  कारण बोलण्यासाठी ती व्यक्ती उरलेली नसते , संचय वस्तूंचा असो वा मनातील विचारांचा , त्याचा योग्य विनियोग , वापर झाला नाही तर त्यांची किंमत शून्य होऊन जाते , तेव्हा मित्रांनो आजचा उगवलेला दिवस हाच आपल्यासाठी occasion असतो ,  त्याच्यावरच आपला अधिकार असतो ,  म्हणून तुमच्याजवळ असलेले मौल्यवान  ते  वस्तू वा विचार आजच वापरून टाका त्या आउट डेटेड होण्याअगोदर !!!

 

डॉ संजय मंगेश सावंत 

संग्रहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शाळीग्राम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ शाळीग्राम ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

विष्णूचे प्रतीक म्हणून शाळीग्रामची पूजा केली जाते.

 नेपाळमध्ये पशुपतीनाथापासून साधारणतः १५० कि.मी. अंतरावर असलेल्या मुक्तनाथ येथे गंडकी नदीमध्ये ‘शाळीग्राम’ नावाचे दगड सापडतात. त्याशिवाय या ठिकाणी अशा दगडांचा मोठा डोंगरच असून या दगडापासून मूर्तीसुद्धा तयार करण्यात येतात तसेच या दगडांवर यंत्रे कोरण्याची प्रथाही प्रचलित आहे.

 विशिष्ट प्रकारची चक्रे आणि मुखे यावरून या दगडांची परीक्षा केली जाते. 

या दगडावर लहानशी सोन्याची रेखाही असते. 

शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते, ती अशी हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचे एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामाचा दगड एक हजार वर्षे राहिल्यानंतर श्रीविष्णू वज्रकीर या किड्याच्या रुपाने त्यात शिरून तेथे चक्राची आकृती कोरतो. अशा शाळीग्रामांचे निरनिराळे प्रकार असून त्यावरून त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. ती पुढीलप्रमाणे—–

१) शुभ्र – वासुदेव 

२) निळा -हिरण्यगर्भ 

३) काळा – विष्णू 

४) तांबडा – प्रद्युम्न 

५) गडद हिरवा – श्रीनारायण 

६) गडद निळा – नरसिंह किंवा वामन 

७) बारा चक्रे असलेल्या शाळीग्रामाला अनंत हे नाव प्राप्त झाले आहे. 

शाळीग्रामाचे असे ८९ प्रकार सांगितलेले आहेत. शालिग्रामचे निरनिराळ्या प्रकारानुसार त्याचे उपयोग —

१) वामन शाळिग्राम – हा छोटा आणि गोलाकार दगड असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास अहं, काम, क्रोध यासारख्या विकारांमधून मुक्ती मिळते.

२) अनंतक शाळिग्राम – विविध रंग-रुप आणि ज्यावर नागाच्या फणासारखे चिन्ह असतात. या शाळिग्रामची उपासना कुटुंबाला संकटापासून वाचवणारी तसेच दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे.

३) कृष्ण शाळिग्राम – गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो. या शाळिग्रामची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होते.

४) कूर्म शाळिग्राम – निळा रंग, तीन रेषा आणि बिंदूने अंकित असते ही शीळा. या शाळिग्रामची पूजा शांती, धैर्य, सुख, ताकद प्रदान करणारी मानली गेली आहे.

५) वराह शाळिग्राम शीळा – विषम आकार आणि मध्ये दोन चक्राचे चिन्ह असणारी ही शीळा लवकर लक्ष्य आणि कार्यसिद्धी करून देणारी आहे.

६) हयग्रीव शाळिग्राम शीळा – या शिळेवर पाच रेषा आणि अंकुशाचा आकार असतो. भगवान विष्णूच्या हयग्रीव अवताराप्रमाणे ही शीळा संकटमोचक आहे.

७) दामोदर शाळिग्राम – निळा रंग आणि यामध्ये निळ्या रंगाची चक्रकार शिळा, याच्या केवळ दर्शनाने जीवनात चमत्कारिक बदल घडून येतात

८) लक्ष्मीनारायण शाळिग्राम – दोन चक्र असलेल्या या शिळेची उपासना वैभव आणि शांती प्रदान करणारी आहे.

९) मत्स्य शाळिग्राम शिळा – ही शिळा कमळाच्या आकाराची असते. या शाळीग्रामची पूजा केल्याने अमाप धन, सुख व  

अपत्याची इच्छा पूर्ण होते.

दक्षिणेतल्या बर्‍याच विष्णू मंदिरामधून विष्णूच्या गळ्यात शाळीग्रामांची माळ घातलेली असते. 

माध्व संप्रदायाचे वैष्णव लोक शाळीग्रामाला प्रत्यक्ष विष्णूच्या मूर्तीपेक्षाही श्रेष्ठ समजतात. पंचायतन पूजेतही विष्णूचा प्रतिनिधी म्हणून शाळीग्रामच असतो. 

माध्व लोक प्रायश्‍चितासाठी पंचगव्याऐवजी शाळीग्रामाचे तीर्थ घेतात. शाळीग्रामात विश्‍वातील सर्व पूज्य वस्तूंचा अंतर्भाव होतो. शाळीग्राम फुटला तरी अपूज्य ठरत नाही.

शाळीग्रामाविषयी पद्मपुराणात एक कथा सांगितली आहे ती अशी ——

विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. शनि या पापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच गेला. ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठविले. विष्णू घाबरला आणि त्याने शनिला ‘उद्या ये’ असे सांगितले. दुसर्‍या दिवशी शनि गेल्यावर विष्णू जागेवर नाही. शोध घेतला असता विष्णू गंडकी शीळेचा पर्वत होऊन राहिल्याचे समजले. शनिने वज्रकीट नावाच्या किड्याचे रुप घेतले आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला. विष्णूला हे पोखरणे सहन होईना त्याच्या अंगातून घामाच्या धारा बाहेर आल्या. त्याच्या  पुढे कृष्ण गंडकी व श्‍वेत गंडकी म्हणून दोन नद्या झाल्या. बारा वर्षानंतर विष्णू शनिच्या त्रासातून मुक्त झाला. त्याने निजरुप घेतले. आपले प्रतीक म्हणून गंडकीतल्या शाळीग्रामांची लोकांनी पूजा करावी असे त्याने सांगितले.

शालिग्राम 

★याला स्वयंभू मानले जाते.

★यांची प्राण प्रतिष्ठा करण्याची गरज नसते.

★कोणताही व्यक्ती हे घरात किंवा मंदिरात स्थापित करुन पूजा करु शकतो.

-शाळीग्राम वेगवेगळ्या रुपांमध्ये मिळते. काही अंडाकार असतात तर काहींमध्ये छिद्र असतात. या दगडामध्ये शंख, चक्र, गदा किंवा पद्मने खुणा तयार केलेल्या असतात.

संग्राहक – सौ.अंजली दिलिप गोखले

मो  8482939011

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नाते जुळले मनाशी मनाचे ! ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ नाते जुळले मनाशी मनाचे ! ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

काही दिवसांपूर्वी पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचे साहित्य पुन्हा एकवार चाळले गेले. “व्यक्ती आणि वल्ली” पुन्हा वाचताना ‛ते चौकोनी कुटुंब’ हातात आले. शिष्टाचाराच्या सर्व चौकटी असोशीने पाळणारे ते कुटुंब! खाणे- पिणे- हसणे- मनोरंजन या सर्वांच्याच चौकटी ठरलेल्या! ‛अगदी हसतानासुद्धा ओठ किती फाकवायचे?’ याचाही नियम ठरला असावा असे हे कुटुंब! पुलंच्या शैलीत हे सर्व वाचताना हास्याच्या उकळ्या फुटल्या नाहीत तर नवलच!

पण ते वाचतानाच माझ्या मनात विचार आला की प्रत्येक घरालाही स्वतःचा असा एक स्वभाव असतो. आणि त्यावरुन मग मला एक प्रसंग आठवला.मध्ये एकदा माझ्या एका मैत्रिणीकडे एक वस्तू अर्जंट द्यायला मी भर दुपारी गेले. माझ्या दुर्दैवाने नेमकी ती घरी नव्हती. मग ती वस्तू शेजारी ठेवून जावी म्हणून मी शेजारच्या घराची बेल दाबली. दोन मिनिटांनी त्या दाराची एक फट हळूच उघडली गेली व एक तिरसट स्वर कानी आला,“ काय्ये?” मी भीतभीतच माझे काम सांगितले. त्यावर, “दुसऱ्याच्या वस्तू आमच्या घरात ठेवायला हे काय गोडावून आहे काय?” असा प्रतिप्रश्न करुन दार धाड्कन लावून घेतले गेले. त्याचवेळी समोरच्या घरातील एक आज्जी हा प्रसंग पहात होत्या. माझा उतरलेला चेहरा बघून त्यांनी मला हाक मारली व घरात बोलावले. त्यांनी माझी चौकशी केली व माझ्याकडील वस्तू घेऊन ती मैत्रिणीला दयायचे आश्वासन दिले. शिवाय माझ्याशी थोड्या गप्पा मारुन सरबतही प्यायला दिले. मला एकदम प्रसन्न वाटले. चौकोनी कुटुंब डोक्यात असल्याने मी पहिल्या कुटुंबाला ‛ संकुचित कुटुंब’ असे नाव दिले तर आज्जीच्या वागण्याने त्या घराला घरपण देणाऱ्या कुटुंबाला मी ‛अतिथ्यशील कुटुंब’ असे नाव दिले.

काही कुटुंब इतकी ‛अघळपघळ’ असतात की यांच्या स्वभावापासून घरापर्यंत सर्व काही अघळपघळ असते. यांच्या घरात जागोजागी पसारा तर  असतोच पण यांच्या अतिथ्याचा पसाराही इतका अस्ताव्यस्त असतो की काही वेळा समोरची व्यक्ती त्या आदरातिथ्यानेच गुदमरुन जाते.

हे जसे कुटुंबाच्या स्वभावाचे झाले , तसे काही कुटुंबांना स्वतःचा गुणधर्म, वारसा असतो.वीणा देव, अरुणा ढेरे, प्रकाश संत या लेखक मंडळींच्या घरी भिंतीसुद्धा पुस्तकांच्या असाव्यात. म्हणूनच ही ‛ पुस्तकांची कुटुंबे’! तर मंगेशकर, शाहीर साबळे, आनंद – मिलिंद शिंदे यांच्या कुटुंबाला सुरांचे वरदान मिळाले आहे. म्हणून ही ‛गाणारी कुटुंबे’! आमट्यांच्या कुटुंबात सेवाभाव पिढीजात मुरलेला! म्हणूनच हे ‛समाजसेवी कुटुंब’! कपूर घराण्याला अभिनयाचा वारसा आहे. म्हणून ते ‛अभिनेत्यांचे’ कुटुंब!

पण यालाही काही अपवाद असतातच.घरात कसलेही शिक्षणाचे वातावरण नसताना ‛डॉ. आनंद यादव’, ‛नरेंद्र जाधव’, ‛ अब्दुल कलाम’ यासारख्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात उंच भरारी मारताना दिसतात.तर विद्वानांचे कुटुंब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‛गोवारीकर’ कुटुंबात ‛वसंत गोवरीकरांसारखे’ शास्त्रज्ञ व ‛आशुतोष गोवारीकर’ सारखा अभिनेता – दिग्दर्शकही निर्माण होतात.

याउलट सध्या अशीही अनेक कुटुंब आहेत की त्यातील अनेक मुले- मुली कोणतीही पार्श्वभूमी नसताना सोशल मीडियावर आपला प्रभाव दाखवत आहेत. कलर्स मराठीवरील लोकप्रिय झालेला ‛मॉनिटर’ हर्षद नायबळ त्याचेच एक उदाहरण आहे. अशा अनेक वाहिन्यांवर अनेक हर्षद, अनेक लता-आशा, अनेक  शाहरुख-सलमान खान आजकाल बघायला मिळत आहेत.पण त्यातील ‛काळी बाजू’ पण लक्षात घेतली पाहिजे. काहीवेळा या प्रसिद्धीमुळे मुलांपेक्षा  पालकांचीच महत्वाकांक्षा वाढीस लागते आणि या कोवळ्या कळ्यांचे बालपणच हरवून जाते. आयुष्यात त्यांची झालेली एखादी हार त्यांचे पालकच सहन करु शकत नाहीत आणि मग असे कुटुंब ठरते  ‛अतिमहत्वाकांक्षी’! श्रीदेवी, मधुबाला याना लहानपणी हे भोगावे लागले आहे.

हल्लीच पालकांच्या अपेक्षा पूर्ण करु न शकल्याने एका तरुणीने आत्मदहन केले.मुंबईतील एका डॉक्टरच्या मुलीने आत्महत्या केली. आय.ए. एस. ऑफिसर असणाऱ्या एका जोडप्याच्या मुलाने इंटरनेटवरील गेमच्या आहारी जात स्वतःची जीवनयात्रा संपवली.दहावी- बारावीचे निकाल जवळ आल्यावर तर अशा अनेक घटना कानावर पडतात. मग प्रश्न पडतो “मुलांच्या या नकारात्मकतेला जबाबदार कोण? पालक, समाज की बदलती नीतिमूल्ये?” म्हणूनच आपल्यालाच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

घराला घरपण देतात ती माणसेच! कुटुंब परिपूर्ण, परिपक्व बनते ते त्यांच्यातील स्नेहाच्या बंधाने! रोज पायाशी घुटमळणारे मांजर, खिडकीत येणारे चिऊ-काऊ, दारात फुलणारी अबोली किंवा जाई-जुईसुद्धा या प्रेमाच्या धाग्याने फुलतात , बहरतात. मग घरातील माणसांमधील नातीसुद्धा या धाग्यातच गुंफली गेली तर कुटुंबातील व्यक्ती केंद्राभोवती  फिरणाऱ्या चाकाच्या आऱ्याप्रमाणे कुटुंबातूनच ऊर्जा घेऊन उंच भरारी मारतील, पण त्याचवेळी एका धाग्याने घराशीही जोडले जातील. जिथे सुसंवाद असेल अशा अनेक कुटुंबांनी बनलेल्या समाजामध्ये आत्ताच्या काळात भेडसावणारी एकाकी पडणाऱ्या वृद्धांची समस्या, नकारत्मकतेकडे झुकणाऱ्या  युवा वर्गाच्या समस्या आणि या दोन पिढ्यांच्या कात्रीत सापडलेली मध्यमवयीन पिढीच्या समस्या आपण बऱ्याच अंशी सोडवू शकू.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जेव्हा टायटॅनिक स्वत: आपली दिशा बदलू पाहतं – सुश्री मनीषा कोठेकर☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ जेव्हा टायटॅनिक स्वत: आपली दिशा बदलू पाहतं – सुश्री मनीषा कोठेकर☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

स्त्रियांच्या  स्थितीत बदल होऊन आपण खूप पुढे आलो आहोत.तरी देखील  अजून स्त्रियांचे प्रश्न सुटले आहेत असे म्हणता येत नाही. नवनवीन समस्या आपल्यासमोर येतच आहेत. अशावेळी आजच्या  स्त्रीची नेमकी स्थिती काय हे जाणून घेणे याची गरज भासते.

समाज हे एका अर्थी टायटॅनिक सारखे अवाढव्य आकाराचे जहाजच. त्याची दिशा बदलायची तर बाहेरून  खूप मोठी शक्ती(external force ) लावायला हवी. मात्र ज्यावेळी टायटॅनिकच्याच प्रत्येक कणाला आपली दिशा बदलावी असे वाटते व ते सर्व मिळून प्रयत्न करतात तेव्हा कुठल्याही बाह्यशक्ती विनाही हे सहज शक्य होऊ शकतं.

असाच एक प्रयोग महिलांसंबंधीच्या अध्ययनाबाबत झाला . ‘भारतातील महिलांची स्थिती ‘ हे  भारतातील महिलांच्या स्थितीचा वेध घेणारे  देशव्यापी अध्ययन नुकतेच महिलांच्या संबंधी कार्य करणा-या ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र’ द्वारा करण्यात आले.  

भारत हा सर्वदृष्टीने विविधतेने नटलेला देश. संस्कृती, भाषा, शैक्षणिक -सामाजिक -आर्थिक स्थिती, समस्या या सगळ्यांच्या वेगवेगळया. अशा वेळी महिलांच्या स्थितीचे आकलन करावयाचे म्हणजे सगळ्या प्रकारच्या स्थितीतील महिलांपर्यंत पोहोचणे व त्यांची स्थिती जाणून घेणे गरजेचे होते. शिवाय अशाप्रकारचे अध्ययन  खूप काळ सुरू राहिले तर ते कालबाह्य किंवा असंगत होऊ शकते .त्यामुळे कमीत कमी वेळात एवढे प्रचंड मोठे सर्वेक्षण करावयाचे तर त्यासाठी तेवढेच मनुष्यबळही गरजेचे. आज भारतातील विविध संघटनांमध्ये कार्यरत  महिला कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. या कार्यकर्त्यांनी निर्णय केला की आपण हे काम करावे. यापैकी अनेक संघटनांचे कार्य देशव्यापी आहे, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून देशातील कानाकोपऱ्यात पोहोचून महिलांची स्थिती व त्यांच्या समस्या जाणून घेणे शक्य होते.

शिवाय कार्यकर्त्यांच्या द्वारे सर्वेक्षण होणार म्हटल्याने त्या क्षेत्राची त्यांना नीट माहिती होती. स्थानिक कार्यकर्ते असल्याने भाषेचा अडसर नव्हता. या सगळ्यांनी हा अध्ययनाचा ‘द्रोणागिरी पर्वत’ उचलून धरला.

अध्ययनाचे केंद्र नागपूर ठरले.वेगवेगळया प्रकारच्या समित्या ठरल्या. प्रकल्प संचालक म्हणून डॉ.मनीषा कोठेकर वर जबाबदारी दिल्या गेली. एक तज्ञांची एक केंद्रीय समिती स्थापण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात आले.

देशभरात सर्व २९ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेश व ६४%  जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण झाले.यात आंतरराष्ट्रीय सीमावर्ती जिल्हे देखील मोठ्या प्रमाणात होते.  साधारण ६००० महिला कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. ८०,०००हजाराच्या जवळपास महिलांच्या मुलाखती घेऊन सर्वेक्षणाचे काम पूर्ण केल्या गेले.

२०१६ मधे अध्ययनासंबंधी निर्णय झाला व १७ मधे कामाची पूर्ण आखणी होउन १८ मधे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले.त्यानंतर डाटाएन्ट्री , त्याचे विश्लेषण ,रिपोर्ट लिहिणे व छपाई हे संपूर्ण काम नागपूरातून झाले.२४ सप्टेंबर २०१९ला दिल्लीला प.पू.सरसंघचालक मा.मोहनजी भागवत,मा.निर्मला सितारामन व मा.शांताक्काजींच्या प्रमुख उपस्थितीत या अध्ययनाचे दोन खंड,executive summery व महिलांच्या  विशिष्ट स्थितीवरील अध्ययनावरील २६ पुस्तकांचे विमोचन झाले.

महिलांना जेव्हा आपली स्थिती बदलावी असं स्वत: वाटतं व त्या एकसुराने आणि  एकदिलाने काम करायचे ठरवतात तेव्हा स्थिती बदलण्याच्या दिशेने त्यांनी टाकलेले ते दमदार पाऊल असतं अन् मग त्यांना त्यांच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी कुणीही थांबवू शकत नाही .

ले. : मनीषा कोठेकर

संग्राहक : सुनीत मुळे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर

? वाचताना वेचलेले ?

 ☆ बाॅन्ड (Bond) – सुश्री नेहा बोरकर देशपांडे ☆ प्रस्तुती श्री संजय जोगळेकर ☆ 

#प्रिय_आईस,

वर्ष झाले ना …. मी घरापासून लांब राहतोय …

खरं सांगायचं तर मला सुरुवातीला सगळं समजून घ्यायला म्हणजे कॉलेज, हॉस्टेल ,नवीन शहर ,नवे सोबती…. वेळ लागला…. त्यामुळे घरची आठवण येत नव्हती असं काही नाही. पण बाकीच्या उठाठेवीच खूप होत्या. 

खरंच खूप चांगले आहे इथे.. अभ्यास आहे… वातावरण छान आहे मित्रांच्या पण अजून जवळून ओळखी होतात. 

तू मला नक्कीच खूप मिस करत असशील ना…. आणि बाबा पण…. 

तू कशी आहेस?  मलाच हसू येतंय…. की मी हा प्रश्न विचारतोय !  तुझ्यावर हसणारा.. काहीवेळा ओरडणारा … चिडणारा… 

पण आज खरंच मनापासून वाटलं म्हणून विचारलं गं…. बरी आहेस ना तू…. 

परवा काय झालं अगं….  रूमवरच्या मित्राला जरा बरं वाटतं नव्हतं… म्हणून त्याला इंडक्शनवर मस्त गरम पाण्यात आलं उकळून लिंबू मीठ घालून गरमच प्यायला सांगितले….त्याच्यापुरती थोडी तुपावर डाळतांदुळाची खिचडी केली… त्याला खूप बरं वाटलं…. तरतरीत झाला तो.. 

सगळ्या नव्या मित्रांच्यामध्ये मी एकदम हिट झालो….. तेव्हा माझी कॉलर टाईट…. तेव्हा तू हवी होतीस….मला घरी तू सगळं करायला शिकवायचीस…. कधी कंटाळा करत तर कधी उत्साहात मी पण शिकलो.  पण त्याचा असा कोणाला कधी उपयोग होईल वाटलंच नव्हतं… केलेलं कधी वाया जात नाही, तू म्हणतेस ना…. पटलंच एकदम… 

कामावी तो सामावी असं तू म्हणतेस ना…. सगळ्या मित्रांना मदत पण करतो …… 

घरी किती ओरडायची गं मला …. पण त्याचा उपयोग इथे होतो…. कसा माहीतेय…… माझं लवकर आवरून होतं…. कपाट नीट असतं….  अगदी वापरलेले सॉक्सपण रात्रीच भिजवून सकाळी आंघोळ करताना धुवून टाकतो…..  बाकीचे मित्र म्हणतात … अरे आम्हाला पण आठवण करत जा ना….. तेव्हा तू आठवतेस…… 

मी चिडायचो तुझ्यावर सारखी भुणभुण करते म्हणून.  पण तू म्हणायचीस….. बाहेरच्यांनी कोणी तुला  बोललेलं  मला चालणार नाही…… अगदी त्या श्यामची आई पुस्तकातल्या प्रमाणे….  

फोनवर इतकं बोलता आलं नसतं गं… ..म्हणून आज हे पत्र….. 

आज पासून घरून आणलेले पांघरुण मी वापरणार आहे…. इतके दिवस बाकीचे हसतील , मला कमकुवत समजतील म्हणून वापरत नव्हतो…. पण आता नाही… परिक्षा संपली की येईनच…. तू आतापासून तयारीला लागू नको काय….. मी परत फोन करेन….

अभ्यास करतोच आहे….. 

आता घरी आल्यावर इथल्यासारखं वागायचा प्रयत्न करीन….. पण मग तुझा ओरडायचा कोटा पूर्ण कसा होणार….. ?  

ओरडण्याचा आवाजच तर मला परत येताना साठवून ठेवायचा आहे …. कानात, मनात, ह्रदयात….. 

बाबांना सांग….. 

दोघे भांडू नका…..

मी आल्यावर काय करशील खायला?……

त्याची लिस्ट व्हाट्सअप करतो?

ए आई, आणि व्हिडिओ कॉल लावू नको गं….. 

चल बाय– खूपच सेंटी होतोय मी…… 

काळजी करु नकोस….. 

 

फक्त तुझाच

(अजून तरी??)

ले.: नेहा बोरकर देशपांडे 

(नव्याने बाहेरगावी शिकायला गेलेला मुलगा. आईला तर  वाटणारचं…. पण आज मुलाची बाजू मांडायचा प्रयत्न केला आहे. ) 

…. कशी वाटली जरूर सांगा….

संग्राहक : संजय जोगळेकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैने तेरे लिये ही ☆ सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ मैने तेरे लिये ही ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

मैने तेरे लिये ही …?

मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने …गाणं ऐकताना मन कसं आनंदानं भरून गेलं ..अन तुझी आठवण आली . होय ! …कोण तू ? चेहरा …रंग रूप ..काही काही निश्चित नाही ,डोळ्यासमोर तुझे कुठलेच चित्र ,आकृती नाही; तरी मी तुझ्यासाठी ही स्वप्ने चुनते नुसते सातच का ?नाही ..अगणित रंगांची ,गंधाची ,आकारांची फुले वेगवेगळ्या ऋतूत बहरून येऊन आनंदाने श्रुष्टीत डोलावीत अन आनंदाचा सोहळा साजरा करावा अशीच ती नानाविध स्वप्ने मी तुझ्यासाठी विणते .तुला यत्किंचित कल्पनाही येणार नाही ..का ? हेही माहित नाही ती पूर्ण ही होत नाहीत …होणार नाहीत तरीही का ,का ही स्वप्ने मी गुंफावी ?कधी कधी कोडेच उलगडत नाही .

पण प्रत्येक क्षणाला स्वप्नांची माळ गुंफणे सुटत नाही. कारण ….कारण ती गुंफण्यात एक आनंद असतो …असा की खरेच त्या अनिश्चित आकाराच्या स्वप्नाला कोण पाहू शकत नाही पण मी अनुभवू शकते अन युगे न युगे ही स्वप्ने रचते फक्त फक्त तुझ्यासाठी कारण तुझ्यासाठी काही करताना मला आनंद होतो ! होय ,कधी राधा ,कधी मीरा ,कधी रुक्मिणी ,कधी उमा ,सत्यभामा ,सीता अन गीताही होऊन चरोंचरी तुझ्या साठीच फक्त …पण तू अनभिज्ञ .निर्विकार ,बेफिकीर …अजाणता ….तुला कळतच नाही अन कळणारही नाहीत या मनाच्या सुख संवेदना अन दुःखाच्या सूक्ष्म छटा …तरीही मी गुंफतेय …विणतेय …जपतेय ..रंगीत स्वप्ने फक्त तुझ्यासाठी …कारण ….तुला त्या स्वप्नात गुंफलेय म्हणूनच तर हे आंतरिक सुखावणे फक्त त्या अपूर्ण स्वप्नांसाठीच !!

स्वप्नातल्या कळ्यांची फुले फुलतच नसतात तरीही कळ्या उमलू पहातातच न ??

© सौ.सुचित्रा पवार

22/4/19

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फी बंदा रूपया….अनिल नलावडे ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे

? मनमंजुषेतून ?

☆ फी बंदा रूपया….अनिल नलावडे ☆ संग्राहक – सुश्री माधुरी परांजपे ☆

भारतातील अग्रगण्य स्ट्रक्चरल ऑडिट कंपनी या स्ट्रक्टवेल इंजिनिअरिंग चे सर्वेसर्वा श्री चेतन रायकर सर ही अशीच एक राष्ट्रभक्तीने प्रेरित वेडी व्यक्ती आहे..26/11 या दिवशी जेव्हा कसाबने मुंबईवर हल्ला केला आणि ताज हॉटेल जाळत त्याचे अपरिमित नुकसान केले त्यानंतर सर्व स्थिरसावर झाल्यावर श्री रतन टाटा यांनी ताज पुन्हा नव्याने उभारण्यासाठी अखंड भारतात निविदा मागवल्या.. 

बऱ्याच प्रथितयश कंपन्यांकडून भरपूर रकमेच्या निविदा दाखल झाल्या.. यथोचित दिवशी सगळ्या निविदा उघडल्या गेल्या आणि त्यात एक निविदा आश्चर्य रित्या घोषित केली गेली.. 

ज्यामध्ये ताज हॉटेलच्या संपूर्ण कामाचा मोबदला फक्त आणि फक्त नाममात्र एक रुपया होते…सगळेच खजील झाले अथवा हसले तरी असतील.. पण जेव्हा रायकर सरांना विचारले गेले तेव्हा त्यांनी एकाच वाक्यात सांगितले ताज वरील हल्ला हा मी माझ्या राष्ट्रावरील हल्ला मानतो.. आणि राष्ट्राचे नुकसान हे पैशात मोजता येत नाही.. 

मिलिंद, एक वेळ उध्वस्त झालेल्या इमारती पुन्हा नव्याने उभ्या करता येतील पण दुभंगलेली मने पुन्हा सावरणे खूप कठीण.. ताज हॉटेल हे आपल्या राष्ट्राचे एक भूषण हॉटेल आहे.. रतन टाटांसारख्या सच्चा राष्ट्रनिष्ठेने भारावलेल्या व्यक्तीने ते कष्टाने बांधलेले आहे.. त्याचा चिरा आणि चिरा हा इमानदारीच्या घामाने उभारला गेला..

अशा वेळी त्याची पुनर्बांधणी करताना किती पैसे मोजायचे आणि टाटां सारख्या गब्बर उद्योगपतीला कसे लुबाडायचे हाच विचार इतरही निविदांमधून नक्कीच डोकावला असेल.. पण रायकर सर, हरीश साळवे सर यांच्यासारखी व्यक्तिमत्वे जो पर्यंत या भारतात आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायाचा बाजार मांडलेला नाही तोपर्यंत हा देश अखंड अबाधित राहील.. ठरवून सुदधा याचे कुणी वाईट करू शकणार नाही. असो, अर्थातच जे अपेक्षित होते तेच झाले. टाटांनी श्री रायकरांना मानाने सन्मानाने पाचारण केले आणि हे देवकार्य त्यांच्याच पदरात टाकले… आणि हो, महत्वाचे म्हणजे रतन टाटा सुदधा तेवढेच देश भक्त आहेत हे आपण सगळ्यांनीच विसरता कामा नये.. कारण काम पूर्ण झाल्यावर त्यांनी श्री रायकरांना यथोचित सन्मानाने बोलावून रायकरांच्या निष्ठेचा गौरव करून त्यांना हट्टानेच झालेल्या कामाचा खर्च घ्यायला लावला. कारण शेकडो कामगार, इंजिनिअर ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करून देण्यासाठी अहोरात्र झटत होते.. टाटांचे याकडे बारीक लक्ष्य होते.. त्यांच्या सारख्या कर्मचाऱ्यांचा अतीव आदर करणाऱ्या उद्योगपती कडून ही गोष्ट कशी नजरंदाज होऊ शकते ?.

हे सगळं लिहिण्याचा खटाटोप एवढ्या साठीच की राष्ट्रभक्ती ही आपल्या देशवासीयांमध्ये कुटून कुटून भरलेली आहे.. 

मग तो सामान्य नागरिक असो की या देशाचा सर्वोच उद्योगपती असो की हरीश सरांसारखा मोठ्ठा आतंरराष्ट्रीय वकील असो, जेव्हा जेव्हा राष्ट्राच्या अस्मितेचा , स्वाभिमानाचा विषय येतो तेव्हा तेव्हा पैसा, मान, इज्जत, कुटुंब, व्यवसाय याहीपेक्षा राष्ट्र प्रथम ही भावना वाढीस लागते..कारण ते भूमीचे पिध्यापिढयांचे संस्कार आहेत..आणि म्हणूनच हा देश आजही इतक्या वर्षांनंतर सुदधा संपूर्ण जगात पाय भक्कम रोवून उभा आहे.. मानाचा मुजरा त्या हरीश साळवे सरांना, त्यांच्या कार्याची नोंद घेणाऱ्या सुषमा स्वराज या माऊलीला, श्री चेतन रायकर सरांना आणि सदैव राष्ट्रासाठी जगणाऱ्या श्री रतन टाटांना.. 

धन्यवाद, 

अनिल नलावडे

संग्राहक : सुश्री माधुरी परांजपे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares