मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आयुष्याचे गणित ☆ प्रस्तुति – कालिंदी नवाथे

? वाचताना वेचलेले ?

☆ आयुष्याचे गणित ☆ प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ 

आयुष्याचे गणित चुकले असे कधीच म्हणू नये.

आयुष्याचे गणित कधीच चुकत नसते, चुकतो तो चिन्हांचा वापर.

बेरीज,वजाबाकी, गुणाकार,भागाकार ही चिन्हं योग्य पद्धतीने वापरली  की  उत्तर मनासारखे येते.

आयुष्यात कुणाशी बेरीज करायची, कुणाला केंव्हा वजा करायचे, कधी कुणाशी गुणाकार करायचा आणि भागाकार करताना  स्वतः व्यतिरिक्त किती लोकांना सोबत घ्यायचे हे समजले की उत्तर मना-जोगते येते.

आणि हो,  मुख्य म्हणजे जवळचे नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट यांचा हातचा एक समजू नये, त्यांना कंसात घ्यावे ! कंस सोडविण्याची हातोटी असली की गणित कधीच चुकत नाही.

प्रस्तुति –  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रावण- दहन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? विविधा ?

☆ रावण – दहन ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

रावणाचे  मनोगत 

दसऱ्याच्या दिवशी रावणाला जाळताना हजारोंनी माणसं जमली होती. त्यामध्ये कितीतरी रावणच होते. एक दोघे राम होते पण हतबलतेने ते गप्प होते. लढवय्या राम मात्र एकही नव्हता. तो रामराज्यात फक्त सीतेच्या वाटेला आला होता. 

जळताना रावणाने मोठयाने ओरडून सांगितले—-” बघा तुमच्याच आतमध्ये डोकावून आणि करा हिशोब स्वतःच्या चारित्र्याचा.” 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच मर्यादेच्या सीमा नाही ओलांडल्या. कायम विचार केला तिच्या मानाचा. 

तुम्हीतर दिवसाढवळ्या नुसत्या वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडता, वर दिमाखाने मिरवत, सभ्यपणाचा बुरखा लावून मलाच जाळता. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा.– पण मी कधीच विचार नाही केला तिच्या अत्याचाराचा.– निर्भयासारख्या कितीजणींना भक्ष्य केलय तू मानवा, कळस झाला आहे तुझ्या अविचाराचा.– विचार कर तुझ्यातल्या राक्षसाला जाळायचा. 

हो.. हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला जबरदस्तीचा. 

तुझ्यासारखा तूच नीच, जो जोर दाखवितो अबलांवरती आपल्या बळाचा. जरा तरी विचार कर त्यांच्या नाजूक मनाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा– पण मी कधीच विचार नाही केला आक्रमकतेचा. 

तू तर मान नाही राखत कुठच्याच स्त्रीचा, मानवा कधीतरी तूच खून कर तुझ्यातल्या दानवाचा. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा—-पण कधीच  नाही विचार केला तिच्या अपमानाचा. 

अरे मला जाळण्याआधी मानवा जरा स्वतःला विचार, हुंड्याच्या मोहापायी तू किती सीता जाळल्या आणि वंशाच्या दिवट्यासाठी गर्भात किती कळ्या मारल्या. 

हो..हो, केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा— पण कधीच नाही विचार केला बीभत्सपणाचा.– 

तुम्ही तर करता चुराडा, न उमललेल्या फुलांचा आणि त्यांच्या भावी स्वप्नांचा. 

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.

मानवा लाज बाळग नाव घ्यायला मर्यादा पुरुषाचे.—

कधी न कधी तुलाही भोगायला लागेल फळ आपल्या कर्माचे.

हो.. हो..शंभरदा सांगेन, हो.. हो.. हो. शंभरदा सांगेन,– केला आहे मी गुन्हा सीतेच्या अपहरणाचा —-कारण मला रामाकडूनच पाहिजे होता मोक्ष मानाचा. 

मानवा तूच प्रयत्न कर स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा, मला जाळताना विचार कर–

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

स्वतःतला मी जाळण्याचा. 

रावणाच्या मनोगताला दिलेले मानवाचे उत्तर 

(दसऱ्याच्या दिवशी जळताना रावणाने मोठयाने ओरडून दिले स्पष्टीकरण आपल्या गुन्ह्याचे,  आणि मानवाला विचार करायला लावत  सांगितले-’ स्वतःतला मी जाळायला ‘-) 

त्यावर मानवाचे उत्तर ——–

हो.. हो, आहेत रावणा आमच्यामध्ये, वखवखलेल्या नजरेनेच अब्रूचे लचके तोडणारे,—-

पण त्याहूनही जास्त जण आहेत आपल्या जरबी नजरेनेच,  त्या समाजकंटकांना वठणीवर आणणारे.—- 

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही निर्भयासारख्याना भक्ष्य करणारे—- 

पण त्याहूनही कितीतरी जण आहेत त्यांच्यासारख्या राक्षसांना लक्ष्य करणारे.—-  

हो.. हो, आहेत रावणा आमच्यात, काही जण अबलांवरती जबरदस्ती करणारे—–

पण अनेक जण आहेत स्वतःच्या बळावरती, त्यांना फाशी देऊन जमीनदोस्त करणारे—- 

हो. हो, आहेत रावणा आमच्यात, काहीजण स्त्रीचा अपमान करणारे,—-

पण अनेक भारतपुत्र आहेत, सीमेवर आमच्याच माय लेकींची रक्षा करणारे—-

रावणा तू नको विचार करूस, 

रावणा…… तू नको विचार करुस—-  

आमच्यात राहून तुझ्या नातलगांनी हुंडयापायी किती सीता जाळल्या आणि गर्भात किती कळ्या मारल्या—–

त्याही पेक्षा जास्त आम्ही कितीतरी सीता वाचवल्या आणि उमलत्या कळ्यांना लक्ष्मी मानल्या.—-

रावणा,२६/११ च्या हल्ल्यात तुझ्यासारख्याच नराधमानी निरागसांचा नरसंहार केला—- 

तेव्हा आमच्यातल्याच असंख्य रामांनी सामोरे जाऊन त्यांचाच खात्मा केला—– 

रावणा लाज बाळग, 

रावणा लाज बाळग—-

स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देऊन, वर गमज्या मारतोस—

सीतेच्या अपहरणाचा गुन्हा करून–

मोक्ष रामाकडून मानाचा मागतोस—- 

तुझ्यासारख्या असंख्य रावणांना मारायला आता नाही गरज आमच्यातल्या रामाची,

तुझ्यासारख्या असंख्य दानवांना जाळायला आता—-

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

झाली आहे नजर सक्षम— सीतेची.

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जावे त्यांच्या वंशा ☆ सौ. सावित्री जगदाळे

सौ. सावित्री जगदाळे

☆ मनमंजुषेतून ☆ जावे त्यांच्या वंशा ☆ सौ. सावित्री जगदाळे ☆

गावाकडे घर केलं तेव्हाच घराशेजारी दोन गुंठे जागेत भाजीपाला करायचा असं ठरवलं. यावेळी शेतात मूग पेरला. कडेने  पावटा, भेंडी, गवार, दोडका, गोसाळी, कारले यांच्या बिया  टोकल्या. वांगी, फ्लॉवर, कोबी, मिरच्या यांची रोपे लावली. शेपू, चाकवत, पालक, मेथी, कोथींबीरच्या  बियांची चिमूट चिमूट लावली. सतत पाऊस पडत होता त्यामुळे पाणी द्यायची गरज पडली नाही. मूग चांगला आला. शेंगा काळ्या पडू लागल्या की तोडायच्या. पहिल्या दिवशी दोन बादल्या भरल्या. वाकून तोडाव्या लागत त्यामुळे कंबर दुखू लागली. तरी घरच्या शेतातला आणि खत, किटकनाशके न वापरता आलेला. त्यामुळे त्याचं समाधान जास्त. नंतर एक दोन दिवसांनी थोड्या निघत राहिल्या. यासाठी गौरी गणपती गावाकडेच बसवायचे ठरवले. त्यामुळे वरचेवर मुगाच्या शेंगा तोडता येतील. गौरी गणपती बसवताना सून, मुलगा आलेले. घरातली सगळी कामे  झाल्यावर सुनबाई कुठेतरी फिरून येऊ म्हणाली. खेड्यात शेताशिवाय कुठे जाणार…

लांबच्या शेतात गेलो. हल्ली जास्त ऊसाचीच शेती केली जाते. आमच्या शेतात उंच वाढलेला ऊस होता. टॅक्टरने नांगरल्या मुळे बांध राहतच नाही. मग शेतातूनच वाट काढत जावं लागतं. शेजारच्या सोयाबीनच्या शेतातून निघालो. गुडघ्या एवढं पीक त्यात गवतही भरपूर. अनेक ठिकणी लाल मुंग्यांची वारुळे. साप असण्याची शक्यता. नीट बघूनच चालावे लागते. आम्ही दोघे, सूनबाई, सहा वर्षाचा नातू असे निघालो. मुलगा आदल्या दिवशीच जाऊन आल्यामुळे येणार नाही म्हणाला. त्याला अनुभव आलेला.

 थोडे चालणं झाल्यावर ह्यांनी मागे वळून बघण्याच्या नादात वारुळावर पाय पडला. त्यांच्या पॅण्टवर सगळीकडे लाल मुंग्याच. पॅण्ट काढून मुंग्या झटकून मग पुन्हा घातली. थोड्याफार मुंग्या आम्हालाही चावल्या. शौर्य नाचायला लागला. सूनबाई म्हणाली, कशाला आलोय आपण इकडे? म्हटलं तुलाच हौस फिरायला जायची.  माझ्या आणि शौर्यच्या कपड्यांना कुसळे भरपूर लागली. सोयाबीनचे शेत संपल्यावर ऊसाच्या शेतातून जावं लागलं. ऊसाचे काचोळे हाताला कापत होते. हाताने ऊस धरला तरी मागच्या येणाऱ्या च्या अंगावर पडत होता. शौर्य वैतागला. ऊसाच्या बाहेर आल्यावर शेजारच्या काकी मुलाला बघून म्हणाल्या, आमच्या शेतातून वाट होती की. इकडून यायचं नाही का?  त्यांचा मूग काढल्यामुळे शेत मोकळं होतं. शेजारी हिरवंगार आल्याचे भरघोस पीक होते. पुन्हा एक ऊसाचे शेत ओलांडून उंबराच्या झाडाखाली आलो. तिथे कपड्यावरची कुसळे काढली. शौर्यने खाऊ खाल्ला. नुकतीच एका शेतात ऊसाची लागण केलेली. गेल्यावर्षी भुईमूग, हरभरा होता तेव्हा शेत छान वाटत होतं.

आता उंच वाढलेल्या ऊसामुळे जंगलात आल्यासारखे वाटत होते. थोडावेळ थांबून निघालो. येताना मात्र शेजारच्या आल्याच्या, मुगाच्या शेतातून आलो. तरी वर खाली बांध, पावसाने भरपूर तण वाढलेले आणि निसरडी जमीन. सापाची भिती. मुंग्यांची वारूळे चुकवत आलो. रस्त्यावर आल्यावर  सुटकेचा निश्वास सोडला. हे दोन तीन दिवसांनी शेतात चक्कर मारतात. त्यांना काही वाटले नाही. पण आम्हाला ट्रेकींगपेक्षा अवघड अनुभव आला. शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव झाली. रोज किती यातना त्यांना सहन कराव्या लागतात. जावे त्यांच्या वंशा तेव्हाच कळते.

 

© सौ. सावित्री जगदाळे

संपर्क – १००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ व्यक्त – अव्यक्त….वैशाली ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? वाचताना वेचलेले ?

☆ व्यक्त – अव्यक्त….वैशाली ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

मनुष्य आणि इतर प्राणी यांच्यामधील महत्वाचा फरक म्हणजे, शब्दांनी समृध्द मनुष्य शब्दांद्वारा आणि शब्दांशिवायही  आपल्या भावना व्यक्त करु शकतो. अव्यक्त राहूनही  परस्परांना समजून घेणारं  नातं खूप छान फुलतं—शब्दांचे खतपाणी घालण्याची फार गरजच नसते.

पण सतत असं राहून चालणार नाही. काही विशिष्ट प्रसंगातच हे योग्य ठरतं.

एरवी वेळोवेळी व्यक्त होणं खूप आवश्यक—नाहीतर मग संवाद संपू शकतो. आणि कुठेतरी गैरसमजाचे बीज नकळतं रोवल्या जातं. 

व्यक्त होणा-यांचे ही वेगवेगळे प्रकार असतात. कोणी स्वतःबद्दल काहीच सांगू इच्छीत नसतं—व्यक्तच होत नाही.  तर कोणी सतत व्यक्त होत राहतं.—या दोन्ही परिस्थितीमध्ये हवा तसा संवाद शक्यच होत नाही.

संतुलीतपणे व्यक्त होणं ही एक कलाच आहे. कुठे केव्हा किती बोलावं, व्यक्त व्हावं, हे कळणं खूप आवश्यक—-

याचबरोबर व्यक्त कोणासमोर व्हायचं,  हे देखील तितकंच महत्वाचं —समोरची व्यक्ती कुठलेही मत न लादणारी, पूर्वग्रह न ठेवता,  निरपेक्षपणे ऐकणारी हवी. व्यक्त होणा-याबरोबरच ऐकणाराही प्रगल्भ हवा. तेव्हाच एखाद्या कठीण प्रश्नातून बाहेर पडण्याचं  सामर्थ्य मिळतं.

व्यक्त अव्यक्त दोहोंमधुन असावा संवाद— 

प्रत्येक नात्यामधील मिटेल मग वाद—-

——वैशाली

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ कौसल्येचा राम…. महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे

श्री विकास मधुसूदन भावे

परिचय  

श्री विकास मधुसूदन भावे कला शाखेचा पदवीधर असून रिलायन्स एनर्जी लिमिटेड या कंपनीत ३४ वर्षे नोकरी करून २०१० मध्ये सेवानिवृत्त झाले. ‘ स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा….’ यासारखे तरल भावकाव्य लिहिणारे विख्यात कविवर्य कै. म. पां. भावे या त्यांच्या वडिलांकडून त्यांना कवितेचा वारसा मिळाला आहे.

‘त्रिमिती‘ हा  कवितासंग्रह प्रकाशित.

चित्रकविता ही त्यांची खासियत आहे.

महाराष्ट्र टाईम्स मधील वाचनीय सदरात त्यांची पुस्तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत. अनेक नियतकालिके, साप्ताहिके, मासिके व दिवाळी अंकांमधून त्यांच्या कथा, लेख, कविता प्रकाशित झाल्या आहेत.

वडील कविवर्य कै. म.पां.भावे यांच्या ‘अरे संसार संसार ‘ या विडंबन गीतांच्या कार्यक्रमात व अन्य गाण्यांच्या कार्यक्रमात निवेदक म्हणून त्यांचा सहभाग.

रेडिओ विश्वासवर ‘मला आवडलेले पुस्तक‘ या कार्यक्रमात त्यांनी दोन वेळा पुस्तक परीक्षण सादरीकरण केले आहे.

अक्षरमंच कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय स्पर्धा क्रमांक ४ मध्ये ‘ कलावंत’ या विषयात सर्वोत्कृष्ट काव्यलेखनात त्यांच्या कवितेला दुसरा क्रमांक, अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान,कल्याण तर्फे आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखनात ३ रा क्रमांक , फेब्रुवारी २०२० मध्ये मराठी ग्रंथसंग्रहालय ठाणेतर्फे भरविण्यात आलेल्या ‘ चांदणे संमेलनात ‘ विडंबन स्पर्धेत दुसरा क्रमांक, ‘ रोज एक कविता ‘ या फेसबुक पेजतर्फे घेण्यात आलेल्या ‘ चित्रावरुन कविता ‘ या स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक अशाप्रकारे बक्षिसे व पारितोषिकांनी ते गौरवांकित आहेत.

☆ काव्यानंद ☆ कौसल्येचा राम…. महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ श्री विकास मधुसूदन भावे

Best Bhojpuri Video Song - Residence w

स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’

रसग्रहण: कौसल्येचा राम….

“कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम”.—- कवी, गायक,आणि संगीतकार या तिघांच्याही कौशल्यामुळे हे गाणं केंव्हाही ऐकलं तरी आपल्या हृदयावर राज्य करतं, आणि थोडाफार काळ का होईना, भक्तीचा मळा आपल्या चंचल मनामधे फुलत रहातो. या गाण्याचे शब्द आहेत शब्दप्रभू गदिमा यांचे. भक्ती अशी असावी,  दृढ विश्वास असा असावा की  परमेश्वर तुमच्या मदतीला धावून यायलाच हवा, हे गदिमा एका ओळीतच सांगतात—

“भाबड्या या भक्तासाठी देव करी काम”

भक्त हा ‘ भाबडा ‘ असावा. परमेश्वरावर अढळ विश्वास आणि निस्सीम भक्ती …. जी कोणत्याही प्रसंगात जराही डळमळीत होत नाही. भाबडा म्हणजे असा माणूस जो आपली सर्व कामं करताना “ईश्वरेच्छा बलियेसी” असा विचार करून प्रत्येक ठिकाणी ईश्वराचं अधिष्ठान आहे अशी मनाची पक्की बैठक तयार करतो.

एक एकतारी हाती भक्त गाई गीत

एक एक धागा जोडी जानकीचा नाथ

कबीराची श्रीरामांच्या प्रती असलेली भक्ती एवढी श्रेष्ठ दर्जाची आहे की  एकतारी घेऊन प्रभू रामचंद्रांची स्तुतीभजनं म्हणताना तो देहभान विसरून जात असे. प्रल्हादानं लहान वयात केलेल्या भगवंतभक्तीचं फळ म्हणून विष्णूने नृसिंहरूप धारण करून प्रल्हादाचं रक्षण केलं आणि त्याचा भक्तीमार्ग निष्कंटक केला.  तर नामदेवाच्या हट्टापुढे प्रत्यक्ष पांडुरंगाला सगुण रूपात येऊन प्रसाद भक्षण करावा लागला.  प्रभू रामचंद्रांनी कबीराची त्यांच्याप्रती असलेली निर्मळ भक्ती पाहून एकतारीच्या पार्श्वभूमीवर एकेक धागा विणत कबीराचं काम करण्यात कोणताही कमीपणा मानला नाही. तुमचा भक्तीभाव आणि भक्तीमार्ग जर  खरा असेल तर देवही तुमचं काम करतोच करतो हा विश्वास या घटनेमधून सामान्य माणसाला मिळतो.

दास रामनामी रंगे राम होई दास

एक एक धागा गुंते रूप ये पटास

नामाचा महिमा हा फार मोठाअसतो हे सर्व संतांनी सांगून ठेवलं आहे.  राघवाचा निस्सिम भक्त कबीरही आपल्या एकतारीची सुंदर साथ घेत रामनाम घेण्यामधे अगदी रंगून गेला आहे. भक्तांची काळजी देवाला असते असं म्हणतात आणि म्हणूनच कबीराचं काम पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी पुढाकार घेतला आहे. श्रीरामांच्या पवित्र हातातून धाग्याला धागा  जोडला जातोय आणि हळूहळू कबीराचा शेला आकार घेतो आहे. पण कबीराला मात्र या गोष्टीचं भान नाहीये. “दास रामनामी रंगे राम होई दास” या शब्दांमधून गदिमांची काव्यप्रतिभा आणि शब्दयोजना या दोन्ही गोष्टींचा एकत्रित अनुभव आपल्याला अनुभवायला मिळतो‌.

विणुन सर्व झाला शेला पूर्ण होई काम

ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम

लुप्त होई राम कौसल्येचा राम

खरी भक्ती आणि खोटी भक्ती यातला फरक माणसाला जरी समजला नाही तरी परमेश्वराला तो निश्चितच कळतो. त्याप्रमाणेच परमेश्वर आपल्या भक्तांसाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना मदत करायची की नाही हे ठरवत असतो. कबीराची श्रीरामांवर असलेली श्रद्धा आणि भक्ती सर्वज्ञात तर होतीच, पण प्रभू रामचंद्रांनाही त्याच्या भक्तीविषयी खात्री पटली म्हणूनच कबीराची आणखी कोणतीही परीक्षा न घेता स्वहस्ते मदत करून  शेला विणून पूर्ण केला. अर्थात प्रभू रामचंद्रांनी स्वहस्ते विणलेल्या त्या शेल्यावर जागोजागी रामनामाची मोहोर उमटली होती.  संपूर्ण शेला विणून कबीराचं काम पूर्ण केल्यानंतर मात्र प्रभू श्रीराम तिथून अदृश्य झाले.

हळूहळू उघडी डोळे पाही जो कबीर

विणुनीया शेला गेला सखा रघुवीर

कुठे म्हणे राम कौसल्येचा राम

श्रीरामांच्या भजनामधे तल्लीन होऊन गेलेला कबीर काही काळानंतर भानावर आला. विणून पूर्ण झालेल्या संपूर्ण शेल्यावर जेंव्हा त्याने “श्रीराम” “श्रीराम” अशी अक्षरं पाहिली, तेंव्हा त्याच्या लक्षात आलं कि आजूबाजूचं जग विसरून ज्या दैवताच्या भजनपूजनात तो रंगून गेला होता, त्या प्रभू श्रीरामांनी आपल्या हातांनी कबीराचा शेला विणून, एकप्रकारे त्याचीच सेवा केली होती.

माणिक वर्मा यांच्या आवाजातील “देव पावला” चित्रपटातील या गाण्याला संगीत दिलं आहे महाराष्ट्र भूषण पु ल देशपांडे यांनी. गदिमांनी लिहिलेलं हे गाणं माणिक वर्मा यांच्या गोड आवाजात ऐकताना मनाला ख-या भक्तीची साक्ष पटत जाते.

© श्री विकास मधुसूदन भावे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग ३ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागा. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. भागात आपण पहिले – . दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस. )

या घटनेचा किंवा  पुराणकथेचा, मिथकाचा, लौकिक व्यवहाराशी अनुबंध कसा जोडला जातो,  तेही पहाणे योग्य होईल. नवरात्रात अनेक घरातून कुलाचार असा आहे, की नवरात्राच्या आदल्या दिवशी देवांची पूजा करून ते पेटीत,  डब्यात घालून ठेवतात. पुढे नऊ दिवस देवांची पूजा केली जात नाही. त्याचे कारण एकीला विचारले असता कळले, की देव या काळात तपश्चर्येला बसलेले असतात, म्हणून त्यांना हलवायचे नाही. त्यासाठी त्यांची पूजा करायची नाही. म्हणजे ते हलवले, तर त्यांच्या तपश्चर्येत विघ्न येईल. ‘आता देव बसणार’, वा ‘देव बसले’ असा शब्दप्रयोग व्यवहारात अनेकदा ऐकला होता, पण त्याचा खरा अर्थ तेव्हा कळला.

महिषासुरमर्दिनीने अहोरात्र नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून, त्याला आणि धूम्रवर्ण,  शंभु-निशुंभ इ. अनेक दैत्यांचा वध करून स्वर्ग आणि पृथ्वी भयमुक्त केली, पण लोकाचार बघितला, तर लक्षात येतं,  की नवरात्रोत्सव हा देवीच्या केवळ शक्तिरुपाचा उत्सव नाही. तो तिच्या मातृरुपाचा,  तिच्या सृजन शक्तीचाही उत्सव आहे.   नवरात्रात अनेक घरातून देव बसतात,  म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे तपश्चर्येलाबसतात. त्या काळात त्यांची पूजा होत नाही. पण त्याचवेळी अनेक घरातून विशेषत: कृषीसंस्कृतीशी संबंधित घरातून घटस्थापना केली जाते. म्हणजे पत्रावळीवर माती पसरून त्यात नवविधा बियाणे रुजत घातले जाते. वर मातीचा घट ठेवून त्यात पाणी घातले जाते. शेजारी दिवा ठेवला जातो. त्यावर रोज एक फुलांची माळ चढवून घटाची पूजा केली जाते. हे म्हणजे भूदेवीची पूजा,  उपासना असते. इथे घरात प्रतिकात्मक शेतच तयार केले जाते. घट हा पाण्याच्या स्त्रोताचे प्रतिक आहे, तर दिवा सूर्याचे. पीक उगवून येण्यासाठी माती,  पाणी,  सूर्यप्रकाशाची गरज असते. ते इथे प्रतिकात्मक स्वरुपात आणले जाते. मातीच्या घटातील पाणी पाझरते. बियाणे रुजतात. अंकुरतात. हळूहळू वाढू लागतात. दसर्‍याच्या दिवशी सोने म्हणून ते अंकूर कापून सोने म्हणून देण्याची प्रथा अनेक घरातून आहे. कृषी संस्कृतीचे धान्य हेच धन,  हेच सोने नाही का? या प्रथेप्रमाणे लक्षात येते,  नवरात्रातील देवीचा उत्सव हा तिच्या मातृरुपाचा उत्सव असतो.

आई जन्मदात्री असते. पालनकर्ती,  रक्षणकर्तीही असते. घटस्थापनेच्या रुपाने तिच्या सृजन शक्तीची उपासना केली जाते. ती पालनकर्तीही असते. नवरात्रात विविध पक्वान्ने केली जातात,  आणि शरिराचे पोषण अधीक अस्वाद्य रुपात होते. पण पोषण केवळ शरिराचेच होऊन भागणार नाही. मनाचेही व्हावयास हवे. नवरात्रीच्या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन,  व्याख्याने,  गीत-नृत्य,  तसेच अनेकविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या सार्‍यातून मनाचे पोषण होते. व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आई रक्षणकर्ती असते. शत्रू नेहमी बाहेरचेच असतात,  असे नाही. आपले स्वभाव दोष हेही आपले शत्रूच. खोटे बोलणे,  अहंकार,  द्वेष,  मत्सर असे किती तरी स्वभावदोष आपले व्यक्तिमत्व काजळून टाकतात. आपल्या मुलात हे दोष रुजू, वाढू नयेत,  म्हणून आई प्रयत्नशील असते. मुलांना प्रसंगी रागावूनसुद्धा त्यांच्यातील असले दोष दूर करण्याचा प्रयत्न करते.  नवरात्रातील भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्याने, इत्यादीं मधून देखील त्याची शिकवण दिली जाते. सुसंस्कार करण्याचा प्रयत्न होतो.

अशा तर्‍हेने जन्मदात्री,  पालनकर्ती,  रक्षणकर्ती या तिन्ही दृष्टीने नवरात्रातील देवीची उपासना ही तिच्या मातृरुपाचीही उपासना असते. नवरात्रात अनेक घरातूनपिठा-मिठाचा जोगवा मागायची चाल आहे. एकनाथांनी एक अतिशय सुंदर रुपकात्मक ‘जोगवा’ लिहिला आहे. नि:संग होऊन वारीला निघालेली ही देवीची उपासक वर सांगतलेले स्वभाव दोष त्यजून वारीला कशी जाते, हे बघण्यासारखे आहे. त्यांनी लिहिले आहे,

अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोहमहिषासुरमर्दनालागुनी।

त्रिविध तापाची करावया झाडणी । भक्तालागी तू पावसी निर्वाणी।

☆ ☆ ☆ ☆ ☆ 

नवविध भक्तीचं भक्तीचं नवरात्र ।  धरोनी सद्भाव अंतरीचा मित्र।

ओटी भरोनी मागेन ज्ञानपुत्र । दंभ सासरा सांडेन कुपात्र ।।

आता मी साजणी झाले गे नि:संग। विकल्प नवर्‍याचा सोडियेला संग।

केला मोकळा मारग सुरंग । आईचा जोगवा जोगवा मागेन ।।

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  !! पत्नीचे नऊ अवतार !! ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

 !! पत्नीचे नऊ अवतार !!  ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆ 

१) सकाळी गृहिणी म्हणून घरकामात व्यस्त असणारी –     अष्ट भुजा

२) मुलांना शिकविणारी –      सरस्वती

३) घर खर्चात पैसे वाचविणारी –      महालक्ष्मी

४) घरात गृहिणी म्हणून स्वयंपाक करणारी  –      अन्नपूर्णा

५) घरातील समस्यांचे निवारण करणारी –      पार्वती

६) लादी पुसताना नवरा मध्येच लुडबुडला तेव्हा –        दुर्गा

७) बाजारातून नवऱ्याने खराब वस्तू आणल्यास –      कालीमाता

८) नवऱ्याने माहेरबद्दल काही वाईट बोलल्यास –      महिषासुरमर्दिनी

९) नवऱ्याने चुकून दुसऱ्या बाईची स्तुती केली तर –      रणचंडी

 

नशीबवान आहेत लग्न झालेले पुरुष ज्यांना घरी बसल्या बसल्या देवीच्या नऊ अवतारांचे दर्शन होते. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ??

 

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वैद्यानां शारदी माता – वैद्य अश्विन सावंत ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? वाचताना वेचलेले ?

☆ वैद्यानां शारदी माता – वैद्य अश्विन सावंत ☆ संग्रहिका – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर☆ 

या सूत्राचा अर्थ असा की वैद्यांसाठी शरद ऋतु हा  मातेप्रमाणे असतो. शरद ऋतुमध्ये (म्हणजे  ऑक्टोबर हिटच्या उष्म्याच्या   दिवसांमध्ये)  रोगराई एवढ्या मोठ्या प्रमाणात बळावते की त्यामुळे वैद्य-डॉक्टर मंडळींसाठी तो सुगीचा काळ ठरतो.

वर्षाऋतुनंतर येणारा शरद ऋतु म्हणजे पावसाळ्यातील शीत-आर्द्र (थंड-ओलसर) वातावरणानंतर येणारा उष्ण-दमट वातावरणाचा उन्हाळा. बरं, वातावरणात होणारा हा बदल हळूहळू झाला तरी त्याचा  परिणाम तितक्या  तीव्रतेने होणार नाही. मात्र मागील काही वर्षांपासुन (तुम्हीं-आम्हीं भूमातेची कत्तल चालवली आहे तेव्हापासुन)  हा वातावरणबदल अचानक होऊ लागला आहे. काल-परवापर्यंत पाऊस व थंड वातावरण आणि लगेच एक-दोन दिवसात अंगाची काहिली करणारा उन्हाळा!याला काय म्हणायचे? या अचानक होणा~या बदलाबरोबर शरीराने कसे काय जमवून घ्यायचे?

कधी कधी तर दिवसा आकाशात सूर्य तळपत असतो, उकाडा वाढतो,घामाच्या धारा वाहू लागतात आणि अचानक सायंकाळी वारे वाहू लागतात, ढग जमून येतात,काळोख दाटून येतो आणि पाऊस पडू लागतो किंवा रात्री ढग गडगडायला लागतात,विजा चमकू लागतात व धुवांधार पाऊस पडू लागतो. कोणता ऋतु समजायचा हा?दिवसा उन्हाळा-रात्री पावसाळा?

निसर्गात असे विचित्र बदल चोविस तासांमध्ये होत असतील तर शरीराने त्या बदलांबरोबर कसे जुळवून घ्यायचे? वातावरणातल्या या   अकस्मात  बदलांबरोबर जुळवून घेण्याची शरिराची धडपड म्हणजेच या दिवसात दिसणारे आजार! याचमुळे काश्यपसंहितेने ’ऋतुमध्ये होणारा अकस्मात बदल’ हे  शरीर-संचालक वात-पित्त-कफ या तीन दोषांमध्ये विकृती होण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले आहे आणि ते  आयुष्य क्षीण करण्यास कारणीभूत होते असेही म्हटले आहे.

दुसरीकडे  जरी पाऊस थांबला तरी शरदात  वाढलेली सूर्यकिरणांची  तीव्रता वर्षा ऋतुमध्ये ओलसर-गार वातावरणाची सवय झालेल्या शरीराला सहन होत नाही. शरीरातला ओलावा (मोईश्चर) सुर्याच्या उष्णतेमुळे सुकून जातो . ओलावा कमी झाल्याने शरीरातले विविध स्त्राव  संहत होतात.पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने पित्त सुद्धा तीव्र होते. एकंदरच शरदातल्या  उष्म्यामुळे शरीरात उष्णता (पित्त) वाढून शरीर विविध पित्त विकारांनी  त्रस्त होते. त्यात तुम्ही जर उन्हाळा सुरु झाला म्हणून वर्षा ऋतुला (पावसाळ्याला)  अनुकूल झालेल्या आपल्या आहारविहारामध्ये अचानक बदल केलात तर तो बदल शरीराला अधिकच रोगकारक होईल आणि  या नाही तर त्या  पित्तविकाराने  त्रस्त व्हाल, त्यात पुन्हा तुम्ही पित्त (उष्ण) प्रकृतीचे असाल तर अधिकच! 

शरद ऋतुमध्ये एकंदर  शरीराभ्यन्तर परिस्थिती अशी असते आणि लोकांमध्ये सुद्धा अशी लक्षणे दिसतात की शरीरामध्ये केवळ पित्ताचा नाही तर पित्ताबरोबरच वात व कफ अशा तीनही दोषांचा प्रकोप होतो की काय अशी शंका येते. वास्तवात हारीतसंहितेने शरद ऋतुमध्ये कधी कधी, काही-काही शरीरांमध्ये वात-पित्त-कफ या तीनही दोषांचा प्रकोप सुद्धा होतो असे म्हटले आहे. तीनही दोषांचा प्रकोप म्हणजे शरीर विकृत आणि विविध रोगांना आमंत्रण.  

त्यामुळेच या  दिवसांत  कुटुंबामधील एकतरी सदस्य काही ना काही आरोग्य-तक्रारीने त्रस्त असतो. म्हणूनच तर शरदऋतु हा अनेक आजार निर्माण करुन  वैद्यांना भरपूर रुग्ण पुरवून त्यांना खुष ठेवतो, म्हणून त्याला वैद्य-डॉक्टरांची काळजी घेणारी आई ,या अर्थाने ’वैद्यानां शारदी माता’ असे संबोधले आहे.    

( मानवी आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या ऋतुचर्या या विषयाची सविस्तार माहिती देणाऱ्या ऋतुसंहिता या वैद्य अश्विन सावंत लिखित आगामी पुस्तकामधून)

 

संग्रहिका –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! मोरूचा आगाऊ दसरा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? ? मोरूचा आगाऊ दसरा ?

“नमस्कार पंत !”

“नमस्कार, नमस्कार ! काय रे मोरू, आज बरेच दिवसांनी शुक्राची चांदणी…..”

“काय पंत, मी तुम्हाला चांदणी वाटलो की काय ?”

“सॉरी सॉरी मोरू, अरे पेपर मधे तो आपला चांदणी बार……”

“आपला चांदणी बार ?”

“अरे तसं म्हणायची एक पद्धत असते मोरू, आपला या शब्दाचा अर्थ तसा शब्दशः घ्यायचा नसतो !”

“ते माहित आहे मला, पण तुमच्या त्या चांदणी बारच काय ?”

“मोऱ्या, माझा कुठला आलाय चांदणी बार, आम्ही सगळे…… “

“अरे हो, मी विसरलोच पंत, तुमचे ‘खाऊ पिऊ मजा करू’ हे पेन्शनरांचे मित्र मंडळ दर महिन्याला वेगवेगळ्या बार मधे जाते ना !”

“अरे हळू बोल गाढवा, हिच्या कानावर गेलं, तर आत्ता दिवसा ढवळ्या मला चांदण्या दाखवायला कमी करणार नाही ही !”

“ओके, पण त्या चांदणी बारच काय सांगत होतात तुम्ही पंत ?”

“काही नाही रे मोरू, त्या बारची एक बातमी आली आहे पेपरात, ती वाचत असतांना नेमका तू टपकलास, म्हणून चुकून तुला चांदणी म्हटलं एव्हढच !”

“कसली बातमी पंत, हॅपी अवर्सचा टाइम वाढवला की काय ?”

“मोरू एक काम कर, आता घरी जाताना हा पेपर घेवून जा आणि सावकाश चांदण्या बघत… सॉरी सॉरी.. सावकाश सगळ्या बातम्या वाचून, संध्याकाळी आठवणीने तो परत आणून दे ! आणि आता मला सांग इतक्या दिवसांनी, सकाळी सकाळी शुचिर्भूत होऊन किमर्थ आगमन ?”

“काही नाही पंत, सोनं द्यायला आलो होतो !”

“कमाल आहे तुझी मोरू, तू दुबईला गेलास कधी आणि आलास कधी ? चाळीत कोणाला पत्ता नाही लागू दिलास !”

“तसं नाही पंत, मी काय म्हणतोय ते जरा…. “

“आणि तुझ ही बरोबरच आहे म्हणा, तिकडे जायला वेळ तो कितीसा लागतो, फक्त अडीच तासाचा काय तो प्रवास ! अरे इथे हल्ली लोकांना दादर ते वाशी जायला तीन….. “

“पंत, सोनं काय फक्त दुबईला मिळत ?”

“तसंच काही नाही, पण दुबईला स्वस्त असतं असं म्हणतात आणि सध्या IPL पण चालू आहे ना, म्हणून म्हटलं तू एका दगडात दोन….. “

“पंत, खरं सोनं देण्या इतका मी अजून ‘सुरेश अंधानी’ सारखा श्रीमंत नाही झालो !”

“आज ना उद्या होशील मोरू, माझे आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी !”

“पंत, नुसते आशीर्वाद असून चालत नाहीत, त्यासाठी कापूस  बाजारात उभे राहून, सूत गुंड्या विकणाऱ्या बापाच्या पोटी, मोठा मुलगा म्हणून जन्मावं लागत, त्याला एक धाकटा निक्कमा भाऊ असावा लागतो, जो परदेशातल्या भर कोर्टात हात वर करून, मी कफल्लक आहे, असं अर्मानी सूट बूट घालून छाती ठोक पणे सांगू शकेल आणि…. “

“अरे मोरू, तू सोन्या वरून एकदम अँटिलीया… सॉरी सॉरी… भलत्याच सत्तावीस मजली अँटिनावर चढलास की !”

“पंत, आता तुम्ही विषयच असा काढलात, मग मी तरी किती वेळ …. “

“बरं बरं, पण तू ते सोनं का काय ते…. “

“हां पंत, हे घ्या सोनं, नमस्कार करतो !”

“मोरू, अरे ही तर आपट्याची पानं, यांना सोन्याचा मान दसऱ्याच्या…… “

“दिवशी, ठावूक आहे मला पंत !”

“आणि अजून नवरात्र यायचे आहे, संपायचे आहे आणि तू आत्ता पासूनच हे का वाटत फिरतोयसं ?”

“अहो पंत, त्या दिवशी यांची किंमत खऱ्या सोन्यापेक्षा कितीतरी जास्त असते ना, म्हणून !”

“धन्य, धन्य आहे तुझी मोरू !”

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग २ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

 ( मागील भागात आपण पहिले –  तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून भक्तवत्सलांछनहे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे. आता इथून पुढे )

भृगुऋषी निघून गेले, पण लक्ष्मीला मात्र त्यांच्या वर्तनाचा राग आला. ती म्हणाली, ‘तुमच्या हृदयातील माझ्या निवासावर,  आलिंगन स्थानावरच त्यांनी लाथ मारली. हा माझा घोर अपमान आहे. तुम्ही त्यांना काहीही न बोलता, त्यांचे आगत-स्वागत केलेत. पण मला हे सहन होत नाही. मी आपल्या सान्निध्याचा व या वैकुंठाचा त्याग करून, परमदिव्य अशा महाक्षेत्री करविरास ( म्हणजेच  कोल्हपुरास) जाते. विष्णूने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकले नाही. ( देव-देवताही माणसांसारख्याच रुसतात,  फुगतात तर! – देव,  दानवा नरे निर्मिले – केशवसुत ).

पुढचा कथा भाग असा,  लक्ष्मी गेल्यानंतर विष्णूला चैन पडेना. तिच्या लाभासाठी त्याने दहा वर्षे तपश्चर्या केली. मग नंतर आकाशवाणी झाली, की सुवर्णमुखरी नदीच्या उत्तर तिरावर तपोभूमी तीर्थ स्थापन कर. तिथे देवलोकातील दिव्य कमळे,  नाना परिमळाचे वृक्ष लाव. तिथे १२ वर्षे तप कर. त्याप्रमाणे विष्णूने सरोवर निर्माण केले. वृक्ष लावले व तपश्चर्या केली. तिथे पद्मतीर्थात लक्ष्मी प्रगटली. तीच पदमवती होय. तिने कल्हार (कृष्णकमळ) फुलांची माळ विष्णूच्या गळ्यात घातली. विष्णूने त्यानंतर पुष्करणी जवळिल शेषाचलावर वस्तव्य केले. हे पुढे वेंकटगिरी या नावाने प्रसिद्धीस आले. इथे वेंकटेशाच्या हृदयावर लक्ष्मीची मूर्ती आहे, पण त्याच्याशेजारी ना लक्ष्मी आहे, ना पद्मावती. पद्मावतीचे  मंदीर खाली सरोवराजवळ आहे. लक्ष्मीचा निवास कोल्हापुरी आहे. त्यामुळे कोल्हापूर हे वैष्णव क्षेत्रही झाले. जनमानसावरील हा ठसा स्पष्ट आणि गडद होण्याच्या दृष्टीने,  पुढे नवरात्रात तिरुपती देवस्थानहून महालक्ष्मीसाठी किती तरी लाखांचे शालूही येऊ लागले. ही प्रथा कधीपासून सुरू झाली, हेही अभ्यासकांनी अभ्यासायला हरकत नाही.

सर्वसामान्य श्रद्धाळू भाविकांच्या दृष्टीने मात्र देवी जगदंबा,  मग ती पार्वती असो,  की लक्ष्मी,  जगाची माता आहे. शक्तिमान आहे. भक्तांच्या  मनोकामना  पूर्ण करणारी आहे. दुष्टांचे निर्दाळण करणारी आहे. एवढेच त्यांना पुरेसे असते.

देवीने अनेक असुरांचा नाश केला. शुंभ-निशुंभ, धूम्रवर्ण, रक्तबीज आणखी किती तरी… देवी महात्म्यात त्याचे वर्णन आहे. प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास द्यायचा. तेव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची प्रर्थना केली. मग त्यांनी कोलासुराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराला मारून लोकांना संकटमुक्त केले. या घटनेवरून त्या नगरीला कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले. कोलासुर म्हणजे रानडुक्कर. ते शेतीची नासधूस करते. देवीने त्याला मारून शेतीचे रक्षण केले. म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची देवताही मानली जाते.

दुर्गा, महिषासुरमर्दिनी हेही त्या महालक्ष्मीचेच रूप. त्याबद्दल अशी कथा सांगितली जाते, की देव-दानवांचा संग्राम झाला. त्यात असुरांचा जय झाला. असुरांचा राजा महिषासुर इंद्र झाला. त्याने देवांचे अधिकार हिरावून घेतले. देव दीन झाले. ते ब्रह्मदेवाकडे गेले व त्याच्यासह शंकर आणि विष्णू यांच्याकडे गेले.  ते ऐकून शंकर क्रोधित झाले. त्यांच्यामुखापासून तेज निघाले, तसेच सर्व देवांच्या मुखातून तेज निघाले.  ते तेज एकत्र झाले. ते तेज एकत्र मिळून एक नारी झाली. पुढे देवी महात्म्यात म्हंटले आहे, ‘तीच भवानी जगदंबा । त्रैलोक्याची जननी अंबा । जी हरिहराते स्वयंभा। उत्पन्न करिती जाहली । म्हणजे, जिने देवांना उ्पन्न केले,  त्यांच्या तेजापासून तिनेभक्तकार्यासाठीपुन्हा अवतार घेतला, असे वर्णन आहे. शंकराच्या तेजापासून तिचे मुख झाले. यमाच्या तेजापासून केस,  विष्णूच्या तेजापासू नबाहू,  अशाप्रकारे विविध देवांच्या तेजापाससून तिचे विविध अवयव बनले. नंतर  सतत नऊ दिवस व नऊ रात्री तिने महिषासुर व असुर सैन्याशी युद्ध केले आणि महिषासुराचा व सर्व असुर सैन्याचा वध केला आणि देवांना आणि पृथ्वीला असुरांच्या तावडीतून मुक्त केले. या कालावधीत देवही तपश्चर्येला बसले होते. आपल्या तपाचे पुण्य त्यांनी देवीला अर्पण केले. अखेर नऊ दिवस आणि नऊ रात्रींच्या तुंबळ युद्धानंतर महिषासुराचा वध झाला. दसरा हा देवीच्या विजयोत्सवाचा दिवस.

क्रमशः......

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares