मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कार्ल्याची एकविरा देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ कार्ल्याची एकविरा देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

एकवीरा आईचे मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला या लेण्यांजवळ आहे..

कार्ला निवासीनी शक्तीदायीनी श्री एकविरा देवी आई महाराष्ट्राची आराध्य कुलदेवता, हाकेला धावणारी, नवसाला पावणारी आई एकविरा देवी म्हणजेच आदिमाता रेणुका.. परशुरामाची माता… 

जगप्रसिद्ध कार्ला लेणीच्या तोंडाशी असणारे एकविरा देवीचे मंदिर म्हणजे कोळी बांधवांबरोबरच तमाम महाराष्ट्राचे श्रद्धास्थान… या देवीची मूर्ती ही स्वयंभू असून हे देवस्थान पांडवकालीन असल्याचे मानले जाते… आई एकविरेचे स्थान कार्ला गडावर स्वयंभू असून अतिशय प्राचीन आहे. आईची मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात प्रगटलेली “शेंदूर चर्चित” आहे.. लेण्यांमध्ये असलेले तिचे स्थान हे मंदिराचे वेगळेपण.. प्राचीनता आणि तिचे लोभस रूप यामुळे या देवीचे  महत्व काही वेगळेच आहे..  

आपण मंदिरात प्रवेश केल्यावर प्रथम आपल्या  नजरेस पडतो आईचा चांदीचा नक्षीदार गाभारा.. ते नयनरम्य नक्षीकाम पाहून मन मोहून तर जातेच  पण आईचे  लोभस रूप पाहून आपण आपलेच राहत नाही.. ते लोभस तेजस्वी रूप डोळ्यात साठवत डोळ्यातून अश्रू कधी वाहू लागतात ते समजतही नाही.. तेजस्वी नेत्र असलेल्या या देवीच्या मुखमंडलावरील हास्य व ते प्रसन्न रुप पाहून मन अगदी उल्हासित होतं. मनात नवीन चैतन्यं निर्माण होतं..

शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होताच वातावरणात एक वेगळीच उर्जा सामावल्याची अऩुभूती होते. एका अद्वितीय शक्तीचा जागर या नऊ दिवसांमध्ये केला जातो.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत एकविरा मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक दर्शन घेण्यासाठी व देवीचा नवस फेडण्यासाठी येतात.

    !! एकविरा आई तू डोंगरावरी

        नजर हाय तुझी कोल्यांवरी  !!

असे म्हणत आराध्य दैवत असलेल्या  आणि नवसाला पावणारी म्हणून कोळी समाजात एकविरा देवीचं स्थान पूजनीय आहे…नवसाला पावणारी कोळी बांधवांचे आराध्य दैवत असणारी देवी..  

देवळाच्या भोवती निसर्ग सिध्दहस्ताने वंदन करत आहे. कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी सर्वच भाविकांची ती स्फूर्तीदेवता आहे..

डोंगरातलं स्थान, प्रसन्न रूप, जागरूक देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महत्व असलेल्या  या देवीचं लोभसवाणं रूप प्रत्येक भक्ताने एकदा तरी डोळ्यात साठवून घ्यायलाच हवे..  नव्या उमेदीने जगण्यासाठी आई एकविरेचे दर्शन व परिसरातील निसर्ग- सौंदर्याने आपले मन प्रफुल्लित होऊन जाते हे मात्रं निश्चितच… 

 

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सप्तशृंगीचे रूप :  पुण्याची चतु:शृंगी  ☆ संग्रहिका – सुश्री शैला मोडक

? इंद्रधनुष्य ? 

☆ सप्तशृंगीचे रूप :  पुण्याची चतु:शृंगी  ☆ संग्रहिका – सुश्री शैला मोडक ☆ 

भक्तांची अगाध श्रद्धा बघुन देव – दिकांना, स्व:स्थान सोडून भक्ताकडे धाव घेतली, यातीलच एक पौराणिक कथा म्हणजे पुणेनिवासीनी चतु:शृंगी ही देवी आहे.

इसवी सन ६१३ मध्ये पुणे येथे फक्त दहा-बारा घरे असल्याचा उल्लेख सापडतो. राष्ट्रकूट वंशातील कृष्ण राजा याने तयार केलेल्या दानपत्रामध्ये (इ.स. ७५८) या शहराचे नाव ‘पुण्य विषय’ असे असल्याचे आढळते. पुढे त्याचे ‘पुनक विषय’ झाले. आणि इ. स. ९९३ मध्ये ते ‘पुनवडी’ झाल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर ते पुणेश्वर मंदिरामुळे ‘पुणे’ असे झाले असावे. एकंदर पुणे नावविषयी अशा आख्यायिका आहेत.

चतु: शृंगी पुण्यात कशी आली ती कथा पुढे आहे.

नाशिक जवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी.

पुण्यात विद्यापीठ परिरसरात सेनापती बापट रस्त्यापासून सुमारे दीडशे फूट उंच चढून गेल्यावर चतु:शृंगी मातेचे विलोभनीय दर्शन होते. चतु:शृंगी माता स्वयंभू व जागृत असून ती नवसाला पावते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. 

या मंदिरासंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते.

पेशव्यांचे पुण्यातील एक सावकार दुर्लभशेठ पीतांबरदास महाजन हे देवीचे परमभक्त होते. दरवर्षी ते नाशिकजवळील श्रीसप्तशृंगी गडावरील देवीच्या यात्रेस जात असत. कालमानाने ते अतिशय वृद्ध झाले व वारी चुकणार असे त्यांना वाटू लागले व ते अतिशय दु:खी झाले. तेव्हा श्रीसप्तशृंगी देवी त्यांच्या स्वप्नात आली व पुण्याच्या वायव्येस असलेल्या डोंगरावर आपण वास्तव्यास असल्याचे त्यांना सांगितले. त्याप्रमाणे त्यांना या डोंगरावर देवीचे स्वयंभू स्थान आढळले.परंतु वेळेआधीच दुर्लभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यांना आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दूर्लभशेठने मंदिर बांधले.

वणीची सप्तशृंगी येथे अवतरली सप्तशृंगी देवीच्या मंदिरापाशी डोंगराची सात शिखरे होती असे म्हणतात. आता तेथे चारच शिखरे दिसतात म्हणून या देवीला चतु:शृंगी’ हे नाव मिळाले

पुणे शहरातील नरपगीर गोसावी यांना देवी प्रसन्न झाल्यामुळे त्यांनी तेथे सभामंडप, पायऱ्या व विहीर बांधली.

हनुमान जयंती चैत्री पौर्णिमा शनिवार, पूर्वा नक्षत्र शके १६८७ हा देवीचा प्रकटदिन आहे. चैत्र पौर्णिमेचा हा विशेष दिवस देवीचा प्रकट दिन म्हणून दरवर्षी मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. मंदिराचा सभामंडप, धर्मशाळा, पाय-या, विहीर, रस्ते, दागदागिने हे सर्व भक्तांनी श्रद्धेने अर्पण केले आहे.

चतु:शृंगी मंदिराच्या परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून नवरात्रीत मोठी जत्रा भरत असे, ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालत असे.

पुण्यात उत्तर पेशवाईत दुर्लभशेठने नाणी पाडण्याचा म्हणजेच टाकसाळीचा मक्ता घेतला होता, तसेच नाशिकजवळही दूर्लभशेठची एक टाकसाळ होती. दूर्लभशेठने पुण्यात एक धर्मशाळा बांधली व तेथे कालियामर्दनाची मूर्ती स्थापन केली. 

*लक्ष्मीरस्त्यावर सतरंजीवाला चौकानजीक ही मूर्ती आजही पाहायला मिळते. चतु:श्रुंगी हे पूर्वीपासून पुणेकरांचे श्रद्धास्थान राहिले आहे. नवरात्रात गावातून तालीमबाज नारळाचे तोरण घेऊन चतु:श्रुंगी येथे पहाटे पळत जात असत. आता तालीमबाज व पळत जाणे बाजूला पडले असले, तरी आजही पुण्याच्या पेठांमधून चतु:श्रुंगीला तोरण वाहण्याची प्रथा सुरू आहे.

 चतु:श्रुंगीचे दुसरे एक मंदिर रविवार पेठेत आहे हे मात्र थोडक्याच जणांना माहित असेल. सुमारे २०० वर्षांपूर्वी किसनदास राजाराम यांनी येथे देवीची स्थापना केली व बढाई समाजाने मंदिर बांधले. येथे देवी तांदळा स्वरूप आहे. सुभानशा दर्ग्याच्या चौकातून गोविंद हलवाई चौकाकडे जाऊ लागले की उजव्या बाजूस हे मंदिर आहे.

अशी चतु:शृंगी देवीची पौराणिक कथा आहे.

संग्राहक : सुश्री शैला मोडक

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नऊ संख्या आणि नवरात्र ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ? 

☆ नऊ संख्या आणि नवरात्र ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व :-

■ नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं : साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.

■ दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार : शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.

■ दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं : अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.

■ महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं : वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), श्री एकवीरादेवी (कार्ला).

■ नवरात्रींचे ‘नऊ’ रंग : लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.

■ नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा : रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

■ नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं : माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.

■ ‘नऊ’ प्रकारची दानं : अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

■ नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार : श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

■ प्रसिद्ध ‘नऊ’ नाग : शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

■ समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड : भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).

■ मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश : अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.

■ मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म : धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.

■ मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था : मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू

 

संग्राहक : सुहास सोहोनी 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनोखे व्रत नवरात्रीचे…. ☆ प्रस्तुती – सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

?  वाचताना वेचलेले ?

☆ अनोखे व्रत नवरात्रीचे ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे 

खरं तर हा लेख नसून मनापासून केलेलं एक आवाहन आहे.

नवरात्रात अनेक व्रते केली जातात. कोणी नऊ दिवस उपवास करतात,गादीवर झोपणं वर्ज्य करतात.वहाणा वापरत नाहीत, तर कोणी नऊ दिवस जोगवा मागतात. हल्ली एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. तसा तो वाईट नाही, पण त्याचा अतिरेक झाला आहे. मुख्य म्हणजे हा प्रकार धार्मिक नाही . कोण्या एका व्यापाऱ्याने स्वतःचा व्यवसाय वाढावा म्हणून नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या, ड्रेस वापरण्याची टूम काढली आणि सर्वांनी ती डोक्यावर घेतली. प्रत्येकीला ते सहज शक्य आणि परवडणारे असतेच असे नाही. कुणीतरी असली धार्मिक आधार नसलेली प्रथा चालू करतात आणि सर्वजण ती अंधपणे आचरणात आणतात. ह्या प्रथांची रूढी बनते

 चला तर आपण नवीन प्रथा सुरू करूया. नवरात्रातला प्रत्येक दिवस सत्कारणी लावायचा असे आपण व्रत घेऊया. उतायचे नाही  मातायचे नाही, घेतला वसा टाकायचा नाही हे पक्के करू या.

पहिला दिवस-  या दिवशी आपण स्वतःपासून सुरुवात करुया, स्वतःचे लाडकोड स्वतः पूर्ण करू या, हवं ते खाऊया आणि आवडते छंद जोपासूया. पण मनाशी एक गोष्ट पक्की करायची की मन मारायचं नाही, कुठलीही इच्छा दडपायची नाही. कुठल्याही कारणाने पुढे ढकलायचे नाही.

दुसरा दिवस–  हा दिवस आपल्या जवळच्या लोकांचे लाड.कौतुक करण्यात घालवूया. त्यांना आठवणीने  त्यांचं तुमच्या आयुष्यातलं महत्त्व जाणवून देऊया. प्रत्येकाला हे मनापासून ऐकायचं असतं.

तिसरा दिवस–  हा दिवस देऊया मैत्रिणींना आणि स्नेह्यांना.  दुरावले असतील तर फोन करा. जवळ असतील तर एकत्र ‌जमून आनंदात वेळ घालवा. ” माझ्यासाठी मैत्री किती महत्वाची आहे “ ही भावना त्यांच्यापर्यंत पोचू द्या.

चौथा दिवस-  या दिवशी गरजू व्यक्तींना मदत करायची. ही मदत पैसे, वस्तू, शब्द कोणत्याही स्वरुपात चालेल. मग ती व्यक्ती वृद्धाश्रम- अनाथ आश्रम येथील चालेल_

पाचवा दिवस  – विद्या “ व्रत “ आहे असं म्हणूया. शिक्षणासंदर्भात जिथे जेवढी जमेल तशी मदत करू या. विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य द्या, किंवा कुणाला काही शिकवा. शाळेला, ग्रंथालयाला मदत करा.

सहावा दिवस – हा दिवस राखून ठेवूया मुक्या प्राण्यांसाठी. ” गोशाळांना” भेट द्या. प्राण्यांना स्वतः चारा खाऊ घाला.  प्राणी संस्थांना मदत करा.

सातवा दिवस – हा दिवस निसर्गासाठी ठेवूया. एक तरी रोपटे लावूया, आणि निसर्गाचे संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखू या

आठवा दिवस – हा देशासाठी ठेवू या. माझा देश, माझे राष्ट्र, माझा जिल्हा यासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार करूया.  आपला परिसर स्वच्छ ठेवू या.  सरहद्दीवरील सैनिकांना दोन प्रेमाचे शब्द पाठवूया

नववा दिवस-  ” पूर्णाहुतीचा” दिवस. सर्व वाईट चालीरीती, रुढी आणि दुष्ट विचारांची आहुती देऊ या. सकारात्मक विचारांच्या  पुरणाच्या दिव्यात माणुसकीच्या ज्योती लावून त्याआदीशक्तीची आरती करु या. आपुलकीचा, एकात्मतेचा गोड प्रसाद वाटू या.

दहावा दिवस – सीमोल्लंघनाचा दिवस. आप़ण केलेल्या निर्धाराप्रमाणे, आपले मन नकारात्मक विचारांचा उंबरठा ओलांडून पुढे गेले आहे का हे बघा. मन मोकळं करा, लिहा बोला पण व्यक्त व्हा.  कारण विचार आणि कृती बदलणे हेच खरे सीमोल्लंघन होय .मग आनंदाचा सोनेरी दसरा आपल्या आयुष्यात कायम असेल आणि प्रसन्न झालेल्या आदिशक्तीचा कृपाशिर्वाद ही पाठीशी असेल.

—-ही सगळं करताना त्या त्या दिवसाच्या रंगाचे कपडे परिधान करू नका असे नाही.  पण नुसता कपड्याचा रंग बदलण्यापेक्षा आपले मळकट झालेले विचार बदलूया.

बोला मग हे व्रत घ्यायला आवडेल ना तुम्हाला?

आई जगदंबेचा उदो उदो

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? विविधा ?

☆ उदे ग अंबे उदे  भाग १ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

अश्विन महिना लागला, की शुद्ध प्रतिपदेपासून  नवमीपर्यंत नऊ दिवस, आणि हो, नऊ रात्रीसुद्धा नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होते. नवरात्रोत्सव हा देवीचा उत्सव. महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखील भारतातील देवीस्थाने गजबजून जातात. देवीच्या मंदिरातून श्रद्धाळू भाविकांची अपार गर्दी उसळते. ‘उदे ग अंबे  उदे’  म्हणत देवीच्या उदयाची आकांक्षा बाळगली जाते. तिला आवाहन केलं जातं.

आदिशक्तीच्या मातृस्वरुपाला अंबा,  जगदंबा़, किंवा अंबाभवानी म्हणतात. याच शक्तीने, प्रकृतीने,  निर्गुणाला चेतवून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती केली. तीच जन्मदात्री,  धात्री, पालनकर्ती आणि रक्षणकर्तीही. हीच महालक्ष्मी,  महासरस्वती,  महाकाली या रुपांनी त्रिविध आणि त्रिगुणात्मक बनते. तिची नाना रुपे आहेत. तिला नाना नावांनी ओळखले जाते. तिची स्थाने जशी अनेक आहेत, तशीच तिच्याठायी मानवी मनाने वेगवेगळी सामर्थ्ये कल्पिली आहेत. भवानी,  रेणुका,  चामुंडा,  शांतादुर्गा,  पद्मावती, संतोषी, जोगेश्वरी,  शाकांबरी  ही त्यापैकीच काही नावे.

महालक्ष्मी हे जगदंबेचेच एक रूप आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर,  मुंबई,  केळशी,  आडिवरे, कुडाळ, वाई इ. ठिकाणी महालक्ष्मीची मंदिरे आहेत,  तथापि कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या स्थानाचे महात्म्य खूप आहे. तिच्या नावाने पिठा-मिठाचा जोगवा’ मागत कोल्हापूरला जाताना भाविक महिला म्हणतात,

‘कोल्हापूरवासिनी ग अंबे दे दर्शन मजसी

तुझ्या कृपेने जाती लयाला पापांच्या राशी’

आपल्याला पिठा-मिठाचा जोगवा’ सत्वर’ घालायला ती सांगते. कारण तिला दूरवर कोल्हापूरला जायचय. देवीला बांगड्या,  हार-गजरे अर्पण करायचेत. साडी-चोळी नेसवून खण-नारळाने तिची ओटी भरायचीय. ती सौभाग्याची देवता आहे,  असा स्त्रियांचा विश्वास आहे. लोकमानसात हे विचार,  संस्कार,  श्रद्धा,  भावना खूप खोलवर रुजलेल्या आहेत.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे पार्वतीचं रूप, की लक्ष्मीचं, याबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. पुराणकथा व अन्य ग्रांथिक आधार बघितले, तर ती शिवाची पार्वती आहे, तसेच विष्णूची लक्ष्मीही आहे, असे सांगणार्‍या कथा आपल्याला वाचायला मिळतात.

कोल्हापूर हे आद्य आणि महत्वाचं शक्तिीपीठ आहे. महत्वाच्या साडेतीन पीठातील ते पहिले महत्वाचे पीठ. या शक्तिपीठांबद्दल अशी कथा सांगितली जाते, की दक्ष प्रजापती आणि असिक्वीनी यांना जगदंबेच्या वरदानाने सती नावाची एक सर्वज्ञ व अवतारी कन्या झाली. तिने शंकराशी विवाह केला. दक्षाला ते पसंत नव्हते. पुढे दक्षराजाने एक यज्ञ केला. त्यात सतीचा अपमान झाला, म्हणून तिने यज्ञवुंâडात उडी घेतली. त्यामुळे शंकर संतप्त झाला. त्याने यज्ञकुंडातून अर्धवट जळलेले निष्प्राण शरीर बाहेर काढले व ते खांद्यावर टाकून त्याने तांडव सुरू केले. त्यामुळे सगळी पृथ्वी भयभीत झाली, तेव्हा नारायणाने शिवालायातून बाहे काढण्यासाठी आपल्या सुदर्शन चक्राने व धनुष्यबाणाने मागच्यामागे सतीच्या देहाचे अवयव तोडण्यास सुरुवातकेली. या पवित्र देहाचे अवयव पृथ्वीवर १०८ ठिकाणी पडले. तिथे  तिथे शक्तिपीठे निर्माण झाली. कोल्हापूर (किंवा  पूर्वी यालाच करवीर नगरी म्हणत) इथे सतीच्या हृदयापासूनचा वरचा भाग पडला. सर्व अवयवात मस्तक हे प्रधान,  त्यामुळे सर्व शक्तिीपीठात कोल्हापूर हे सर्वोच्च व आद्य शक्तिपीठ मानले जाते. दुसरे शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी. तिसरे म्हणजे माहूरची रेणुका व अर्धे पीठ म्हणजे वणीची सप्तशृंगनिवासिनी.

कोल्हापूरवासिनी अंबाबाई, हे लक्ष्मीचं, रूप आहे,  असं सांगणारी कथाही पुराणातआहे. एकदा काश्यपऋषी यज्ञ करत असताना, त्याचा हविर्भाग कुणाला अर्पण करणार असे नारदाने विचारले,  असता कोणती देवता यासाठी योग्य, असा विचार सुरू झाला. मग ते ठरण्याची जबाबदारी भृगु ऋषींवर टाकण्यात आली. ते प्रथम ब्रह्मलोकी गेले. नंतर कैलासावर शंकराकडे गेले, पण या दोघांनीही त्यांची दखल घेतली नाही. ते रागावून वैकुंठाला गेले. तिथेही विष्णू-लक्ष्मी बोलत होते. त्यांचे  काही भृगुऋषींकडे लक्ष गेले नाही. ते संतापले आणि  त्यांनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. पुढे विष्णुचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी ऋषींचे स्वागत केले आणि म्हणाले, ‘आपल्यासारख्या महात्म्याचे दर्शन मोठ्या पुण्याईने होते. माझ्या खडकासारख्या छातीवर लाथ मारल्याने आपले पाऊल दुखावले तर नाही ना?  बोला मीआपले काय प्रीयकरू?’ त्यांचा हा दिव्य भाव पाहून भृगुऋषींचा राग पळून गेला. त्यांनी आपल्या पावलाचे चिन्ह कायमचे छातीवर धारण करायला सांगितले व ते मृत्यूलोकी निघून गेले व तिथे जाऊन त्यांनी विष्णू हाच हविर्भागदेण्यासाठी योग्य आहे,  असे सांगितले. तेव्हापासून’ भक्तवत्सलांछन’ हे बिरुद विष्णूदेवाने अलंकाराप्रमाणे मिरवले आहे.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जागर… ☆ सौ राधिका भांडारकर

सौ राधिका भांडारकर

?  मनमंजुषेतून ?

☆ जागर… ☆ सौ राधिका भांडारकर 

नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मी माझे काही विचार या लेखातून मांडण्याचा प्रयत्न करते—-

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम:

नम:प्रकृत्यै  भद्रायै नियत:प्रणता स्मताम् ।।

अश्विन शुद्धप्रतिपदेपासून घरोघरी घटस्थापना होते. देवीचे मूर्त तेज वातावरण उजळते.मंत्रजागर, आरत्या, यांचा नाद घुमतो.उदबत्त्या ,धूपार्तीचे सुगंध दरवळतात. दररोज नवनवे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात. नऊ दिवस नऊ रंगांची वस्त्रेही परिधान केली जातात. सर्वत्र उत्साह, मांगल्य, पावित्र्य पसरलेले असते.

लहानपणापासून आपण एक कथा  ऐकत आलो आहोत– महिषासुराची.  या महिषासुराने पृथ्वी आणि पाताळात  अत्याचार माजवला होता. आणि त्यास स्वर्गाचे राज्य हासील करायचे होते. सर्व देव इंद्रदेवांकडे जाऊन ,महिषासूरापासून रक्षण करण्याची प्रार्थना करतात. इंद्र आणि महिषासुरात युद्ध होते व या युद्धात इंद्रदेव पराभूत होतात. हतबल झालेले देव ब्रह्मदेवाकडे येतात.व आसुरापासून रक्षण करण्याची विनंती करतात. महिषासुराचा वध हा मनुष्यमात्राकडून होणे असंभव होते. मग ब्रह्मा, विष्णु,महेश यांच्या तेजातून एक स्त्रीशक्ती निर्माण केली जाते. ही स्त्रीशक्ती म्हणजेच आदीमाया.–“ आदीशक्ती.दुर्गामाता.”

शंकराचे त्रिशूळ, विष्णुचे चक्र, वरुणाचा शंख, यमाची गदा, तसेच कमंडलु, रुद्राक्ष, अशा दहा शस्त्रांची परिपूर्ण शक्ती…दशभुजा दुर्गा..सर्वशक्तीमान रुप– तिचे आणि महिषासुराचे घनघोर युद्ध होते. व महिषासुराचे दारुण मर्दन होते. म्हणून ही महिषासुरमर्दिनी—सिंहारुढ ,पराक्रमी, तेज:पुंज देवी.

नवरात्रीचे ,महाराष्ट्रात आणखी एक विशेष म्हणजे भोंडला. भोंडला म्हटले की शालेय जीवनातले दिवस आठवतात. नवरात्रीत सगळ्या सख्या,नऊ दिवस वेगवेगळ्या सखीकडे जमतात. पाटावर सोंडेत माळ धरलेल्या हत्तीचं चित्र काढायचं, अन् त्या पाटाभोवती फेर धरुन एकेक प्रचलित लोकगीतं गायची—तर असा हा भोंडला, भुलाई, हादगा —

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा।।

–अशी सुरुवात होऊन मग गाणी रंगत जातात. सख्या आनंदाने फुलतात. आणि मग शेवटी—

बाणा बाई बाणा स्वदेशी बाणा

गाणे संपले खिरापत आणा..।।

खिरापत ही गुलदस्त्यातील. ती ओळखायची. अन् नंतर चट्टामट्टा करायचा…नवरात्रीच्या या उत्सवातील, असा हा पारंपारिक खेळ…सामुहिक आनंदाचा सोहळा.

अर्थात् नवरात्र म्हणजे देवीचाच उत्सव. तिची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा ,कूष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री ही निरनिराळी नऊ नावे असली, तरी ती त्या एकाच आदीशक्तीची विविध रुपे आहेत. देवीच्या कथाही अनेक आहेत. पण सामाईकपणे ही नारीशक्ती आहे.आणि तिचा अवतार,अहंकार, क्रोध, वासना, पशुप्रवृत्ती, यांचा संहार करण्यासाठीच झाला आहे…

दरवर्षी नवरात्री उत्सवात या सर्वांचं,मोठ्या भक्तीभावाने  पूजन,पठण होते. गरबा, दांडीयांचा गजरही या आनंदोत्सवाला सामायिक स्वरुप देतोच..

पण मग एका विचारापाशी मन येऊन ठेपतं—-आपले सर्वच सण, हे आध्यात्मिक संदेश घेऊन येतात..अर्थपूर्ण.नैतिक संदेश.—पण उत्सव साजरे करताना या संदेशाचं काय होतं..?

ज्या स्त्रीशक्तीची नऊ दिवस पूजा केली जाते, दहाव्या दिवशी अनीतीचा रावण जाळला जातो, आणि मग अकराव्या दिवसापासून पुन्हा तीच हतबलता…??

खरोखरच स्त्रीचा सन्मान होतो का? स्त्री सुरक्षित आहे का आज? ज्या शक्तीपीठाची ती प्रतिनिधी आहे , त्या स्त्रीकडे किंवा त्या स्त्रीबाबत विचार करण्याचा समाजाचा दृष्टीकोन नक्की कसा आहे ?  —-आज तिच्या जन्माचा आनंदोत्सव होतो का? का तिला उमलण्याच्या आतच खुडलं जातं…?

ज्या पवित्र गर्भातून विश्वाची निर्मीती होते, त्या देहावर पाशवी,विकृत वासनेचे घाव का बसतात…?

विद्रोहाच्या घोषणांनी काही साध्य होते का?–समाजासाठी मखरातली देवी,आणि आत्मा असलेली, चालती बोलती स्त्री.. ही निराळीच असते का?—–

असे अनेक प्रश्न ,अनेक वर्षे युगानुयुगे,अगदी कथांतून, पुराणातून, इतिहासातून व्यक्त झाले आहेत.

आणि आजही ते अनुत्तरीत आहेत.

स्त्रीचा विकास झाला म्हणजे नक्की काय झाले? ती शिकली. आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाली. उच्चपदे तिने भूषविली,  तिच्या वागण्या बोलण्यातही फरक पडला. तिचा वेशही बदलला. ती आत्मनिर्भरही  झाली—-पण तिचा संघर्ष संपला का? तिचे हुंदके,तिची घुसमट,तिची होरपळ..आहेच त्या चौकटीत—एका मोठ्या रेषेसमोरची ती एक लहान रेषच–दुय्यमच. म्हणून डावलणं आहेच. सन्मान कुठे आहे तिचा…? 

मग हा जागर कधी होणार? तिच्या सामर्थ्याचं त्रिशूळ, बुद्धीचं चक्र, विचारांची गदा, सोशिकतेचं कमंडलु ,भावनांची रुद्राक्षं, तेजाचे तीर —जेव्हां धार लावून तळपतील ,तेव्हाच या शक्तीपीठाचा उत्सव सार्थ ठरेल…

नवरात्री निमित्ताने जोगवा मागायचाच असेल तर  स्त्री-जन्माच्या  पावित्र्याचा. .मांगल्याचा .शक्तीच्या आदराचाच असला पाहिजे हे मनापासून वाटते…

हे देवी ! तुझ्या दशभुजा, सर्व शस्त्रांसहित पसर आणि तुझ्या दिव्य तेजाचंच दर्शन दे…..!!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ देणाऱ्याची भूमिका कशी असावी? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

आमच्या जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापटांच्या एकत्रित काव्यवाचनाचा कार्यक्रम ठेवला होता. शनिवार दुपार होती ती. कार्यक्रम रंगला. संपला. मी या मंडळाचा त्या वर्षाचा कार्यवाह. मानधनाची पाकिटे तिन्ही कविवर्यांना दिली. 

विंदा म्हणाले, “तुमचे हाडाचे हॉस्पिटल कुठे आहे?”

“टाटाच्या समोर… जवळच आहे…. पाहायला जायचं आहे का कुणाला? …” मी म्हणालो.

विंदांचा वाटाड्या होऊन आम्ही ऑर्थोपेडीक सेंटरमध्ये गेलो. काही रुग्णांचा मुक्काम तिथे अनेक महिने असायचा. विशेषतः फ्रॅक्चरचे रुग्ण. घरात संडासापासूनच्या सोयीची कमतरता. त्यामुळे हॉस्पिटलात सक्तीचा निवास. नवीन पेशंट्सचा दट्ट्या असायचा. मग वॉर्डातले काही पेशंट्स पॅसेजमध्ये यायचे. पॅसेजमधून वॉर्डाबाहेरच्या मोकळ्या जागेत.

विंदाना ज्या बाईंना भेटायचं होतं त्या अशाच एका पॅसेजमध्ये होत्या. शाहीर अमर शेखांच्या पत्नी. आम्ही त्यांना “शोधून” काढलं. विंदांनी त्यांची चौकशी केली. खिशातून पाकीट काढलं. आमच्या मंडळाने दिलेल्या मानधनाच्या पाकिटात त्यांनी जिना चढतानाच थोडे पैसे (स्वतःजवळचे) भरले होते. ते पाकिट त्यांनी बाईंच्या हातात दिलं. 

“औषधासाठी होतील म्हणून शिरूभाऊंनी दिले आहेत. मी आज इथे कार्यक्रमाला येणार होतो. म्हटलं नेऊन देतो.”

थोड्या वेळाने आम्ही बाहेर पडलो. मीही विंदांबरोबर बसस्टॉपवर आलो. विचारू की नको अशा मनातल्या गोंधळावर मात करत मी प्रश्न विचारला. तोही घाबरतच. 

“तुम्ही त्यांना मदत केलीत, पण शिरूभाऊंचे नाव का सांगितलंत?…” 

शिरूभाऊ म्हणजे बहुधा त्यांचे मित्र श्री. ना. पेंडसे असावेत.

विंदांनी त्यांच्या खास नजरेने माझ्याकडे आरपार बघितलं.

 “असं बघा… घेणाऱ्याचं मन आधीच बोजाखाली असतं की आपल्याला कुणाकडून तरी मदत घ्यावी लागतेय… अशावेळी याचक होतं मन. देणाऱ्याकडून समोरासमोर घेताना त्रास वाढतो. कमी नाही होत… अशावेळी आपण निरोप्या झालो तर समोरच्याचा त्रास वाढत तरी नाही… शेवटी महत्त्वाचं काय… त्या व्यक्तीला मदत मिळणं… कुणी केली हे नाही….”

माझी विंदांशी काही ओळख नाही. ही आमची शेवटची भेट. पण माझ्या मनात त्या वेळी लागलेले हजारो वॅटचे लाईट अजून विझलेले नाहीत.

 देणाऱ्याने देताना, घेणाऱ्याच्या भूमिकेत स्वतःला नेणे …. ते सारे क्लेष क्षणभर अनुभवणे  …..  पुन्हा देण्याच्या भूमिकेत येणे …  आणि  “इदं न मम” असं म्हणत यज्ञवृत्तीने दान करणे.

मी empathy ची व्याख्या मानसशास्त्राच्या पुस्तकातून शिकण्याआधी कवीकडून शिकलो याचा मला अभिमान आहे…

 

डॉ. आनंद नाडकर्णी

(विषादयोग)

 

संग्राहक : सुहास पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केळवे गावची श्री शितला देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ? 

☆ केळवे गावची श्री शितला देवी ☆ संग्रहिका – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

  !!   तू केळव्याची शितल आई 

       तुझ्या महतीची ही पुण्याई

       तुझ्या कीर्तीनेच धाव घेती जर्जर

       तुझ्या प्रसादाने मुक्त होती सत्वर

       तुझी थोरवी ही देशोदेशी जाई  !!

  

मनाला शितलता देणारी केळव्याची केळवे गावची श्री शितला देवी

केळव्याच्या समुद्र किनाऱ्या जवळ असलेले श्री शितला मातेचे सुंदर आणि अति प्राचीन मंदिर आहे. मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे. केळवे गावाचे प्राचीन नाव कर्दलीवन केळवे हे एक बेट आहे… गावाला पौराणिक आणि ऐतिहासीक महत्व लाभले आहे…. राम वनवासात असताना त्याचा प्रवास केळवे (कर्दलीवन) या  गावतून झाला होता अशी आख्यायिका आहे. या मंदिरात अतिप्राचीन अशी तेजस्वी शितला मातेची मूर्ती आहे.. 

चैत्र शुद्ध पौर्णिमेला श्री शितलाईची खूप मोठी यात्रा भरते.. नवरात्रोत्सव आणि यात्रोत्सव हे दोन देवीचे उत्सव मानले जातात..  नवरात्रोत्सवात संपूर्ण मंदिर आणि परिसरातील दिव्यांची रोषणाई केली जाते.. देवीपुढे नऊ प्रकारची धान्ये पेरतात नऊ घर रामकुंडातल्या पाण्याने भरून स्थापिले जातात.. रोज झेंडू फुलांच्या दोन माळा देवीसमोर टांगल्या जातात.. देवीला नूतन वस्त्रांनी, अलंकारांनी सजविले जाते 

भरजरी कपड्यांनी सुवर्णलंकारांनी नटलेल्या देवीचे अतिशय विलोभनीय सौंदर्य व तेजस्वी रूप डोळ्यांत साठवत आपण तिच्या समोर आपोआप नतमस्तक होतो..

नऊ दिवसात रोज निरनिराळे कार्यक्रम सादर होत असतात.. भजन, कीर्तन, गायन इ. कार्यक्रम उत्साहाने होत असतात.. अष्टमीला होमहवन होतो..यावेळी मातेचे दर्शन अतिशय विलोभनीय व  सुखकारी असते.. माता दोन्ही हातांनी भाविकांना भरभरून देते. 

या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकर ह्यांनी केला होता. शितला मातेच्या मंदिरात सिद्धीविनायक, पार्वती बरोबर शंकराची पिंडी स्थानापन्न आहे.. मंदिराच्या बाहेर हनुमानाचे छानसे मंदिर आहे. शितला मातेच्या समोर राम कुंड आहे.. सितामातेला जेव्हा तहान लागली होती तेव्हा श्री रामाने आपल्या बाणाने त्या तलावाची निर्मिती केली होती अशी आख्यायिका प्रचलीत आहे आणि म्हणून ह्या तलावाला रामकुंड असे म्हणतात.  हनुमान जयंतीच्या दिवशी शितला देवीची यात्रा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा होतो..  यात्रा उत्सव कालावधीत शितलादेवी मंदिराच्या आजुबाजूचा परिसर आनंदाने, रोषणाईने आणि भक्त भाविकांच्या अलोट गर्दीने भरुन गेलेला असतो…

हे शितला देवी तू जगाची माता तूच जगाचा पिता आणि तूच जग थारण करणारी आहेस अशा शितला देवीला

माझा नमस्कार…

संग्रहिका –  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ घाल घाल पिंगा वा-या – कृष्ण बलवंत निकंब ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. अमृता देशपांडे

सौ. अमृता देशपांडे

? काव्यानंद ?

☆ घाल घाल पिंगा वा-या – कृष्ण बलवंत निकंब ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. अमृता देशपांडे ☆

घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची कर बरसात ll

 

सुखी आहे पोर सांग आईच्या कानात

आईभाऊसाठी परि मन खंतावत ll

 

विसरली का ग भादव्यात वर्ष झालं

माहेरीच्या सुखाला ग मन आंचवलं ll

 

फिरुन फिरुन सय येई जीव वेडावतो

चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो ll

 

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार

हुंगहुंगुनिया करी कशी ग बेजार ll

 

परसात पारिजातकाचा सडा पडे

कधी फुले वेचायाला नेशील तू गडे  ll

 

कपिलेच्या दूधावर मऊ दाट साय

माया माझ्या वर तुझी जशी तुझी माय ll

 

आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला

माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll 

********

का आणि कसे कुणास ठाऊक, एखाद्या कवितेची, गीताशी,  एखाद्या वाक्याशी किंवा व्यक्तिशी आपले नाजुक भावबंध जुळले जातात.  कधीही, कुठेही क्षणभर जरी आठवण झाली तरी त्यांच्याशी संलग्न भावना तीव्रतेने जाग्या होतात आणि झपकन मन तिथे पोचतं.

माझंही त्यादिवशी असंच झालं. माझ्या अतिशय आदरणीय प्राध्यापकांनी ह्या कवितेची आठवण करून दिली. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं गाणंच मला भेट दिलं. हे गाणंअसं मला अचानक भेटेल, अशी मी कधी कल्पना सुध्दा केली नव्हती. मी थोडीशी चकित झाले, खूप खूप आनंदित झाले. ” कशी करू स्वागता ” अशी माझी धांदल उडाली.

ही कविता मी इयत्ता चौथीत असताना पहिल्यांदा ऐकली.मराठी च्या तासाला बाईंनी शिकवायला सुरुवात केली.  शब्दांचे अर्थ सांगितले.

पिंगा, मन खंतावतं, चंद्रकळेचा शेव, यांचे अर्थ समजले. कपिला गायीची नंदा कशी खोडकर होती, हे न सांगताच कळलं.पण ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला” हे सांगत असताना बाईंचा आवाज वेगळाच झाला आणि डोळ्यात पाणी आलं,  हे जाणवलं. ( तेव्हा बाईंना आज बरं वाटंत नाही असं वाटलं)

पुढे आठव्या इयत्तेत परत या कवितेनं पिंगा घातला.  ही कविता परत एकदा अभ्यासक्रमात आली. आतापर्यंत कवितेचे शब्दशः अर्थ समजले होते. आता शिकवताना बाईंनी कवितेचा भावार्थ  सांगितला, त्यातल्या स्त्री सुलभ भावनांची घडी उलगडली,  आणि तेव्हा अनेक  भावना आणि कल्पना मनाच्या उंबरठ्यावर फुलांसारख्या उमलल्या. त्यांची नवी ओळख झाली. तो एक सुंदर अनुभव होता.

” लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला आपल्या आईची, भावाची, माहेरची आठवण होऊन तिचे मन गलबलते आणि ती भिरभिरणा-या वा-यालाच सांगते की, ” अरे वा-या, असाच पिंगा माझ्या माहेरच्या परसात घाल आणि आईला सांग, मला तिची आणि सगळ्यांचीच खूप आठवण येते. आपली कपिला आणि तिची नंदा यांचीही आठवण येते. परसातला पारिजातकाचा सडा मला खुणावतोय.  कधी नेशील मला फुलं वेचायला? कपिलेच्या दुधावरची  मऊ दाट साय अजून माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. आई, विसरलीस का? अग, एक वर्ष झालं भाद्रपद महिन्यात मला इथे  येऊन.  माहेरी जायला मन आतुरलं आहे. परत परत आठवण येते सर्वांची आणि डोळे भरून येतात,  ते पुसून पुसून माझ्या चंद्रकळेचा पदरही  ओलाचिंब होतो. “

इतका सारा निरोप ती वा-याला सांगते,  पण सुरवातीलाच सांगते कि,

 ” आईच्या कानात सांग, तुझी लेक सासरी सुखात आहे “.

कारण आईची काळजी तिला ठाऊक आहे,  माझी लेक कशी असेल? या विचारात ती हरवली असेल,  म्हणून निरोपाच्या सुरवातीलाच ती आईचे मन निर्धास्त करते. आणि मग पुढे ती माहेरच्या आठवणीनी भिजलेला पदर दाखवते. माहेरच्या लाडक्या लेकीचं लग्न झाल्यावर तिला आलेल्या एक प्रकारच्या पोक्तपणाचं , शालीनतेचं हे लोभस रूप.

मन आठवणींनी गदगदून गेलंय.  ” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला,  माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll ” असं म्हणत ती गप्प होते. आणखी काही बोलणं शक्यच नसतं!

इथेच कविता संपते. मन व्याकुळ असतानाही ती वा-याला विनवीते की, माझ्या माहेरच्या परसात जा आणि सुवासाची बरसात कर.

सुवासाची बरसात ‘  या शब्दातून माहेरी सर्वजण सुखात असोत, सर्वांना स्वास्थ्य मिळो , ही तिच्या मनातली इच्छा ती व्यक्त करते.  पृथ्वीतलावरच्या प्रत्येक स्त्रीची , मग ती कोणत्याही वयाची असो,  तिच्या मनातली ही भावना कवीने ” माहेरी जा सुवासाची कर बरसात ” पाचच शब्दात व्यक्त केली आहे.  सासरी गेलेल्या मुलीच्या अंतःकरणातला एक हळवा कोपरा म्हणजे ” माहेर” . कवी कृ.ब. निकुंब यांनी स्त्री मनाची तरल स्पंदने अतिशय साध्या पण थेट काळजाला भिडतील अशा  शब्दात मांडली आहेत.

गायी – वासरे, चंद्रकळेचा उल्लेख, ऐसपैस किंवा टुमदार घर,  दारातला पारिजातकाचा सडा या सगळ्या खुणा तो पूर्वीचा काळ सुचवतात.

कृ.ब. निकुंब यांनी ‘ उज्वला’,

‘ उर्मिला’ या काव्यसंग्रहातूनही  स्त्रीमनाचे  हळुवार तरंग व्यक्त केली आहेत. त्यांच्याच एका  कवितेतली ओळ आहे,

 ” जिथे वाळू-रणी झाले,  जीव तृषार्त व्याकुळ l

तेथे होऊ द्या हो रिती, 

माझ्या अश्रूंची ओंजळ ll

आता काळ बदलला, सर्वच बदलले. कवितेतले संदर्भ कालबाह्य झाले. पण अजूनही  अगदी पन्नाशीतल्या, साठीतल्या,  सत्तरीतल्या स्त्रीला विचारलं कि कवितेतल्या खजिन्यातली कुठली कविता तुला वाचायला आवडेल तर ती नक्कीच ही कविता  पसंत करेल.

कालिदासानं प्रियकराचा निरोप प्रेयसीला पाठवण्यासाठी ‘ मेघदूत ‘ धाडला.  तसाच निकुंबांचा हा ‘  वायुदूत ‘.

अतिशय संवेदनशील शब्द,  काळजाला हात घालणारे भावदर्शन,  आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं मन हेलावून टाकणारी व्याकुळता. कविता वाचून झाल्यावर किंवा हे गाणं ऐकत असताना इतक्या वर्षांनी सुद्धा अश्रूंची ओंजळ रिती होतेच. हा परिणाम म्हणजे शब्दांचं आणि स्वरांचं सामर्थ्य म्हणायचं का हळुवार स्पंदनांची परमोक्ती? दोन्हीही.

जेव्हा माझं विश्व माहेर आणि सासर यात विभागलं गेलं,  तेव्हा मला कळलं कि ‘ कविता वाचताना बाईंचा आवाज कापरा का झाला, डोळ्यात पाणी का आलं’ . जेव्हा कवितेतल्या संवेदना  स्वतः अनुभवल्या  तेव्हा या अजरामर गीताच्या ओळी मनात सतत रुंजी घालू लागल्या. आता ते बालपण ही सरलं आणि तारुण्य ही सरलं, माहेरी आईही नाही . आई असलेलं माहेर आणि आई नसलेलं माहेर यात फरक असला तरी ” घाल घाल पिंगा वा-या माझ्या परसात l माहेरी जा सुवासाची कर बरसात ‘ ह्या ओळी कानावर पडल्या  कि डोळे भरलेलं मन  मागे, आठवणींच्या खुणा शोधत धावतंच. भाऊ- भावजयीच्या संसारात हरवलेलं माहेर शोधत धावतं.   माहेराची फुले वेचायला आसुसतं. नकळत जड मनातून शब्द येतात,

” आले भरुन डोळे पुन्हा गळाही दाटला l

माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला ll”

आता भाऊ वहिनी भाचे कंपनी यांच्या रूपातल्या माहेरासाठीही  परत मन वायुदूताला निरोप धाडतं,

” घाल घाल पिंगा वा-या

माझ्या परसात

माहेरी जा सुवासाची कर बरसात “ll

 

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा 

9822176170  

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नारीशक्ती ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ नारीशक्ती ☆ संग्राहिका – सौ.अंजली दिलिप गोखले ☆ 

तू नऊ दिवस नऊ रंग परिधान केलेस किंवा नाही केलेस तरी, हे कबूल आहे की, तू आहेस म्हणून रंगहीन आयुष्य रंगीत होतं! 

केवळ शास्त्रात सांगितलंय म्हणून नाही, तर त्यानिमित्ताने वर्षभर कपाटात पडून राहणाऱ्या जरीच्या साड्या बाहेर पडून तुला उत्साहाने नेसायला मिळतात हे सत्य नाकारू शकत नाही! 

दांडिया खेळलीस किंवा नाही खेळलीस, तरी आपण हे नाकारू शकत नाही की घरातील सर्वांच्या आयुष्याचा खेळ केवळ तू आयुष्यात असण्याने सुखकर होतो! 

तू नऊ दिवस उपवास कर किंवा उठता बसता उपवास कर, तरी सर्वांना हे माहिती आहे की घरातल्यांची उपासमार होऊ नये म्हणून तू आयुष्यभर तुझ्या जीवाचं रान करतेस!

तू घट बसव किंवा तुझ्या देवीला फुलांनी सजव, पण पुरुषांच आयुष्य मात्र तूच सजवलं आहेस!

तू दिवा लाव किंवा पणती लाव, पण या विश्वाच्या निर्मितीपासून तुझ्यामुळेच पुरुषांच्या आयुष्यात प्रकाश आहे!

थोडक्यात काय तर…

तूच धरती आहेस…

तूच आकाश आहेस…

तूच सुरुवात आहेस…

आणि शेवटही तूच आहेस!

तुझ्याच कुशीत जन्माला येऊन तुझ्याच कुशीत विसावून निर्धास्तपणे आयुष्य जगणाऱ्या समस्त पुरुषांनी तुझ्यातील स्त्रीत्वाला सलाम करायला हवा!

प्रत्येक स्त्री मधील नारी शक्तीला मानाचा मुजरा!!

संग्रहिका – सौ.अंजली दिलिप गोखले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares