मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ याला म्हणतात कृतज्ञता!… लेखक : डॉ. मिलिंद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ याला म्हणतात कृतज्ञता!… लेखक : डॉ. मिलिंद कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

आज एक डोळे ओलावणारा आणि कोकणी माणसाला सलाम करावासा वाटणारा प्रसंग घडला…

त्याचे झाले असे…

दुपारी 3 वाजता खारेपाटणहून डॉ. बालन उमेश यांचा मला मेसेज आला ..की तुमचा gpay नंबर बदलला आहे का?

मी या आधुनिक जगाला घाबरून असल्याने पहिला संशय आला की झाली काही तरी गडबड..

आधी balance चेक केला..तो तर ओके होता…मग उमेशजी ना फोन केला…ते म्हणाले अहो 1400 रुपये पाठवायचे होते…

आणि नंतर मी, त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून उडालोच…

आयला! या कलियुगात असले काहीतरी ऐकायला ..पाहायला..अनुभवायला मिळणे म्हणजे सॉलिड धक्काच होता..

मिथिला मनोहर राऊत. गाव बेरले…ही मुलगी डॉ. नितीन शेट्ये सरांकडे 2006  साली टायफॉइडसाठी ऍडमिट होती…ती बरी झाली आणि तिच्या वडिलांची आर्थिक स्थिती काही बरी नव्हती…सरांनी, जे काही 3 हजाराच्या जवळपास बिल होते, त्यात त्यांनी जे काही पैसे दिले ते शांतपणे स्वीकारले आणि त्यांच्या दृष्टीने तो विषय संपला…त्यानंतर आज 2024…..18 वर्षांनी ती मुलगी कमावती झाली….तिचा पहिला पगार झाला आणि तिला तिचे वडील नेहमी जे हळहळून सांगायचे की बायो त्या डॉक्टरांचे 1400 देऊचे हत…त्याची आठवण आली…बेरले खारेपाटण जवळ आहे..

ती मुलगी 1400 रुपये घेऊन तिच्या फॅमिली डॉक्टर म्हणजे बालन सरांकडे गेली आणि तुम्ही हे पैसे सरांना पोचवा म्हणाली…

18 वर्षे….एक कोकणी माणूस राहिलेले देणे, डॉक्टरांचे देणे आठवणीत ठेवतो…पहिल्या पगारातून आठवणीने पोच करतो….हा कोकणी माणूस आहे. प्रामाणिक, सच्चा,मनाचा श्रीमंत आणि जाण ठेवणारा..डॉक्टरने पोरगी बरी केली हा उपकार मानणारा कोकणी माणूस…कृतज्ञ असणारा कोकणी माणूस…

डॉक्टर म्हणजे देव असे आतून मानणारा कोकणी माणूस..आणि ती मुलगी ….खरेतर पुढच्या पिढीतील…पण तीही अस्सल कोकणी निघाली…बापाची रुखरुख लक्षात ठेवणारी..पहिल्या पगारातून 1400 रुपये बाजूला काढणारी…अस्सल कोकणी कन्या..

ती जेव्हा बालन सरांकडे गेली तेव्हा तिने तिचे आजारपण…राहून गेलेले देणे…डॉक्टरांचा मोठेपणा ..बापाची रुखरुख हे सगळे सांगितलेच…पण एक महत्त्वाचा प्रश्न विचारला…..सर..त्यावेळचे 1400 म्हणजे आत्ताचे किती होतील हो?…उमेश बालन सरांना याचे उत्तर देणे जड गेले…ते म्हणाले आजचे खूप होतील पण तुझी भावना ही त्याचे व्याज भरूनसुद्धा वरती उरेल…

मी शेट्ये सरांना हा किस्सा सांगायला फोन केला तेव्हा तेही अवाक झाले…..त्यांना आठवत नव्हते की असे कोणाचे येणे आहे..असे कोणी नंतर देतो, सांगून गेले आहे…

पण ते आतून हलले…त्यांच्यासाठी

डॉक्टर होण्याचा…पेशंट बरे करण्याचा …पैसे नसतील तर राहू देत किंवा नंतर द्या म्हणण्याच्या प्रवासाचा हा एक कृतार्थ क्षण होता….

आम्ही तिघेही अवाक होतो…..

या लाल मातीत हा प्रामाणिकपणा, कृतज्ञता,जाण,आठवण…..भाव असा रुजलेला आहे…हा खरा सुगंध या मातीला आहे…

इतक्या वर्षांनी पहिला पगार हाती आल्यावर आज ती ज्या भावनेने देणे परत द्यायला गेली…ती भावना खूप मोठी आहे…शेट्ये सर तर म्हणाले, पैसे नकोच पण तिला सलाम करणारे काहीतरी करूया…

हे लिखाण हा त्या मुलीला…तिच्या वडिलांना…त्यांच्या अस्सल कोकणी संस्कारांना….कोकणी वृत्तीला…इथल्या मातीला आणि अजून जिवंत असणाऱ्या माणुसकीला सलाम करण्यासाठी आहे….

लेखक: डॉ.मिलिंद कुलकर्णी

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “रुलाके गया सपना मेरा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “रुलाके गया सपना मेरा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

पौर्णिमेचं  शशीबिंब आज माझ्या गवाक्षाशी बराच वेळ थबकलं.. तिथून न्याहाळलं होतं त्याला मी त्या गवाक्षात उभी असताना… आणि पुढे जाताना एक मंद स्मित रेषा आपल्या चेहऱ्यावर फुलवून निघायचं ठरवलं… अन मी नकळतपणे  आलेही… नव्हे नव्हे ओढले गेले.. त्या गवाक्षापाशी… हळूच मान लवून बघत राहीले… रस्त्यावरती सांडलेला चांदणचुरा चमचमताना किती गोड नि मोहक दिसत होता… हरपून बसले भान माझं..वेडं लावलं मला त्यानं स्वत:चं… नजर मिटता मिटत नव्हती नि कितीही पाहिलं तरी तृप्ती होत नव्हती… तरी बरं त्यावेळी आजुबाजूला.. खाली रस्त्यावर कुणी कुणीच नव्हते.. माझ्याकडे पाहत.. प्रेमात पडलीस वाटतं असचं एखाद्याला मला चिडवायला मिळालं असतं…

मी पण छे.. काही तरीच काय तुमचं…नुसत्या नजरेने पाहिलं तर ते का प्रेम असतं… असं मी स्वतःशीच म्हणाले… हो स्वतःशीच.. तिथं माझं ऐकायला तरी कोण होतं… पण मी ते सांगताना खूप लाजले तेव्हा गालावरची खळी खट्याळपणानं सारं काही सुचवून गेली… असा किती वेळ माझा.. माझाच का आम्हा दोघांचाही.. गेला.. नंतर रोजचा तसाच जात राहिला… भेटण्याची वेळ नि भेटण्याचं ठिकाणं ठरून गेलेलं….

नंतर हळूहळू त्याचं येणं उशीरा उशीरानं होऊ लागलं… माझी चिडचिड होऊ लागली… आधीच भेटायचा वेळ तो किती थोडा .. त्यात याच्या उशीरानं येण्यानं भेटीचा क्षण संपून जाई…तो नुसता जात नसे तर माझ्या मनाला चुटपूट लावून जाई.. हुरहुर लागे जीवाला ..  उद्यातरी  भेटायला वेळ भरपूर मिळेल नं… छे तसं कुठं घडायला दोन प्रेमी जीवांच्या आयुष्यात… नाही का…

आणि एक दिवस त्याचं येणचं झालं नाही… विरहाचं दुख काय असतं ते त्या दिवशी कळलं… मी गवाक्षात उभी होते नेहमी सारखी.. पण आज चंद्र प्रकाश नव्हता ..  होता तो काळोख सभोवताली… डोळे भिरभिरत होते त्याची वाट पाहताना…रस्त्यावरचा मर्क्युरी दिव्याचा प्रकाश माझी छेड काढू पाहताना  नारळाच्या झावळीतून तिरकस नजरेने बघत होता… आमच्या आठवणींच्या सावल्यांचा खेळ माझ्या नजरेसमोर मांडताना.. इतकंच कानात सांगून गेला…’ वो जब याद आये बहूत याद आये…’  आणि आणि माझं वेडं मन गुणगुणत होतं… ‘ रूला के गया सपना मेरा.. ‘

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग २८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग २८ ☆ श्री अरविंद लिमये ☆

 (पूर्वसूत्र– माझी यापुढची उत्कर्षाची वाट वळणावळणाची असणाराय असं सर म्हणाले ते अनेक अर्थांनी खरं ठरणार होतं आणि त्या वाटेवरचं पहिलं वळण हाकेच्याच अंतरावर माझी वाट पहात तिष्ठत थांबलेलं. पण आता मी निश्चिंत होतो. मनात उत्सुकता होतीच पण ना कसलं दडपण ना अस्वस्थता. कारण सर म्हणाले तसं ‘तो’ होताच माझ्या सोबत आणि त्या वळणवाटेवरही तो असणारच होता सोबतीला.. !)

प्रमोशन प्रोसेस अपेक्षेपेक्षा लवकरच आवरलं आणि जुजबी आवरावर करायलाही पुरेसा वेळ न देताच एक दिवस अचानक मला प्रमोशन मिळाल्याची बातमी आली आणि पाठोपाठ माझी ट्रान्सफर ऑर्डर! 

माधवनगरला झालेली माझी बदली पुढच्या उत्कर्षाच्या वाटेवरचं एक छोटसं वळणंच होतं पण ते इतकं हाकेच्या अंतरावर उभं असेल असं मात्र मला वाटलं नव्हतं. इथं येऊन कसंबसं एक वर्षच होत आलेलं आणि लगेचच निरोप घेऊन बाहेर पडायचा क्षण असा पुढे ठाकलेला!

या एका क्षणाने आमच्या छोटेखानी संसाराची सगळी घडीच विस्कटून जाणार होती. पण त्याचा विचार करायलाही आता फुरसत नव्हती. माझं पोस्टिंग ‘सोलापूर कॅंप’ ब्रॅंचला झालं होतं. गुरुवा‌री ४ आॅगस्टला आॅर्डर आली आणि दोनच दिवसांत म्हणजे शनिवारी रिलीव्ह होऊन मला सोमवारी सोलापूरला हजर व्हायचं होतं!इथल्या ऑफिसरुटीनमधल्या बारीकसारीक गोष्टी मार्गी लावण्यातच दोन दिवस कापरासारखे उडून गेले आणि बॅग भरून मी सर्वांचा निरोप घेऊन बाहेर पडलो.

सोलापूर कॅम्प ब्रॅंचला अनेक आव्हाने माझी वाट पहात होती. मी तिथे जॉईन झालो ती तारीख होती ८ऑगस्ट १९८८!

८-८-८८ हा तारखेतला एकाच संख्येचा विचित्र योगायोग मला गंमतीचा वाटला होता! पण त्यामुळेच माझ्या सर्विस-लाइफ मधे बदलीनंतर विविध कार्यस्थळी मी जॉईन झालो त्या सर्वच तारखा विस्मरणात गेलेल्या असल्या तरी सोलापूर ब्रॅंचमधली ही तारीख मात्र या अपवादात्मक योगायोगामुळे जशी माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे तसेच ती 

ब्रँचसुद्धा तिथे घडलेल्या माझी कसोटी पहाणाऱ्या एका प्रसंगामुळे आणि मी त्या कसोटीला उतरल्याची प्रचिती देणाऱ्या नंतर अल्पकाळातच आलेल्या एका अकल्पित, अतर्क्य अशा गूढ अनुभवामुळे माझ्या कायमची लक्षात राहिलेली आहे! त्या अनुभवाने मला स्पर्शून गेलेल्या, चित्तवृत्ती प्रफुल्लित करणाऱ्या आनंदाचे माझ्या मन:पटलावर कोरले गेलेले अमीट ठसे आज पस्तीस वर्षांनंतरही मी आवर्जून जपून ठेवलेत!

‘सोलापूर कॅम्प’ ही पोस्टल कॉलनी, कृषीनगर, विकासनगर या रेसिडेन्शियल एरियापासून हाकेच्या अंतरावर असणारी आमची ब्रॅंच. माझं वास्तव्य कृषीनगरमधे होतं.

 माधवनगरहून सांगलीला फॅमिली शिफ्ट करून शक्यतो सलिलचं माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत तरी बदली होईल तिथे जमेल तितके दिवस मी एकट्यानेच जायचं असं, तातडीनं निर्णय घेणे आवश्यक होतं म्हणून, आम्ही ठरवलं ते सर्वांच्याच दृष्टीने सोयीचं होतं. त्यावेळी आई भावाकडे सातारला होती. रुटीन बसेपर्यंत सोबत म्हणून आमच्या सांगलीच्या बि-हाडी ती येऊन राहिल्यामुळे मला तिकडची काळजी नव्हती. कृषीनगरपासून ब्रॅंच फार तर चालत पाच मिनिटांच्या अंतरावर. रहिवासी क्षेत्रातल्या नागरिकांच्या सोयीसाठी ब्रॅंच सकाळी ८. ३० ते १२. ३० आणि दुपारी ३ ते ६ अशी दोन शिफ्टमधे कार्यरत असे. त्या भागात व्यावसायिक आणि व्यापारी वर्गाचे प्रमाण जवळपास नसल्यासारखेच. त्यामुळे ठेवी-संकलन आणि कर्ज वितरण या दोन्ही आघाड्यांवर यश मिळवणं हे ब्रॅंच-मॅनेजर म्हणून खूप अवघड आणि आव्हानात्मकच होतं. मी चार्ज घेतल्यानंतरचे चार-सहा दिवस ही पार्श्वभूमी अंगवळणी पडण्यातच गेले. स्टाफ तसा पुरेसा होता आणि चांगलाही. जवळजवळ सगळेचजण अनुभवी होते. अपवाद फक्त रिसिव्हिंग कॅशिअर म्हणून काम करणाऱ्या सुजाता बोबडेचा!

सुजाता बोबडे तशी नवीन होती. तिचा सहा महिन्यांचा प्रोबेशन पिरियड नुकताच संपलेला होता. त्यामुळे ती बँकरुटीनमधे अद्याप रुळलेली नव्हती. तरीही या अल्पकाळात अपेक्षित असणारी कार्यकुशलताही ती दाखवू शकत नव्हती. कसलंतरी दडपण असल्यासारखी सतत गप्प गप्प असायची. हेडकॅशिअर श्री. सुहास गर्दे स्वतःकडचं वर्कलोड सांभाळून तिला हातभार लावायचे म्हणून तिचं रुटीन बऱ्यापैकी व्यवस्थित सुरू असे एवढंच. त्यामुळेच सुजाताच्या वर्क-परफॉर्मन्सबद्दल मी फारसा समाधानी नव्हतो. अर्थात अशा कुठल्याच व्यक्तीबद्दलचे पूर्वग्रह मी जाणीवपूर्वक नेहमी तपासून पहात असल्यामुळे माझ्याकडून तोवर कोणतीच कडवट प्रतिक्रिया व्यक्त होणार नाही याची मला काळजी घेणे आवश्यक होते.

त्यानंतर हळूहळू मला मिळत गेलेली सुजाताबद्दलची माहिती मात्र तिच्याबद्दलचे माझे पूर्वग्रह थोडे सौम्य व्हावेत अशीच होती!

रिझर्व्हड कॅटेगरीतून निवड होऊन साधारण वर्षांपूर्वी ती या ब्रॅंचला जॉईन झाली होती. त्याआधीच तिचं नात्यातल्याच एका मुलाशी परस्पर लग्नही ठरलं होतं. मुलगा एम. बी. बी. एस करत होता. त्याचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न करून घ्यायला त्याच्या घरचे तयार नव्हते आणि तोवर वाट पहायला तिच्या घरचे. यातून काहीच मध्यममार्ग निघत नाहीय हे लक्षात येताच खूप दिवस वाट पाहिल्यानंतर या दोघांनी घरच्या विरोधाला न जुमानता नुकतंच परस्पर रजिस्टर लग्न करून टाकलं आणि दोन्ही घरच्यांनी या लग्नाला ठाम विरोध केला. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून दोघांनाही बेदखल केलं. त्यामुळे सुजाता नेहमीच दडपणाखाली असायची. तिने नवऱ्याच्या शिक्षणाची आणि घरखर्चाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेऊन वेगळं बि-हाड केलं. नवऱ्याचं शिक्षण आणि हिची नोकरी अशी तारेवरची कसरत सुरू झाली. मी जॉईन झालो त्याच दिवशी तिचा मॅटर्निटी लिव्हचा अर्ज माझ्या टेबलवर होता! 

हीच सुजाता बोबडे मला लवकरच येणाऱ्या त्या अतर्क्य अशा गूढ अनुभवाला निमित्त ठरणार होती याची त्या क्षणी मला कल्पना कुठून असायला?

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “देवीचे नवरात्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “देवीचे नवरात्र” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आज देवीचे नवरात्र बसले आहे. ती देवी कशी आहे ? – – –

केसापासून पायाच्या नखा पर्यंत सर्वांग सुंदर आहे. नाना अलंकार तिने घातलेले आहेत. कोटी कोटी चंद्राचे तेज तिच्या मुखावर आहे. ती तेजस्वी, प्रफुल्लित आहे. इंद्रनील मण्यासारखी तिची कांती आहे. ती विश्वाची स्वामिनी, जगतजननी आहे. अशी ही देवी सुंदर, कोमल, शांत, नाजूक आहे. , , पण इतकच तिच वर्णन आहे का? नाही….. ती अष्टभुजा आहे. तिच्या हातात गदा, चक्र, शंख, धनुष्य बाण, शुल, पाश, खड्ग अशी अनेक शस्त्रे आहेत. अनेक भयानक अशा दुष्ट राक्षसांना तिने ठार मारलेले आहे. ती चंडिका आहे. प्रत्यक्ष देवांनीही तिची स्तुती केलेली आहे… अत्यंत नाजुक, शांत, कोमल पण वेळप्रसंगी भयानक रूप धारण करून दृष्टांचा नाश करणारी आहे. राक्षसांना शिक्षा करणारी आहे. निरनिराळ्या रक्षसांना शासन करून तिने यमलोकात धाडलेले आहे.

या देवीकडे फक्त देवी म्हणून न बघता…. एक स्त्री म्हणून बघूया… ती पण आपल्यासारखीच आहे. अशा या देवीचा अंश आपल्याही शरीरात आहे.

आपण तिची प्रार्थना करूया. प्रार्थना करून झाली की आपण तिच्याकडे काहीतरी मागतो.

आता असा विचार करा की काय मागायचे?… लौकिकात जे हवे आहे ते सगळे मागून झालेले आहे. आता थोडं वेगळं काही मागू या…

राक्षस म्हटलं की अति भयंकर, क्रूर, अक्राळ विक्राळ असं काहीस स्वरूप आपल्यासमोर येतं…

पण लक्षात घ्या की…

राक्षस ही एक वृत्ती आहे… ती विचारात, कृतीतही असू शकते.

ते प्रचंड, मोठेच असतात, त्यांचे आकार भयानक असतात असे नाही… काही मनाला नकळत सूक्ष्मपणे सतत त्रास देणारेही असतात… काही बहुरूप्यासारखे असतात… वरून गोड गोड बोलून फसवणारे ही असतात. त्यांच्यातला राक्षस ओळखायला शिकुया…..

आपण त्यांच्याशीही लढू या… अशा बारीकसारीक लढाया रोजच लढाव्या लागतात. त्यासाठी देवी सहाय्य करेलच. पण आपल्यालाही आपल्या मनाची शक्ती वाढवायची आहे हे लक्षात ठेवायला हवे.

त्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे आहेत.

अगदी साध्या साध्या गोष्टींचा विचार करा. एखाद्या न पटलेल्या गोष्टीला ठामपणे नकार द्यायला पण अंगी सामर्थ्य यावं लागतं. ते यायला हवं….. तसंच वेळ प्रसंगी शांत राहण्यासाठी मनाची शक्ती आवश्यक असते. ” मौन” ही आपली आपण आपल्याशीच लढलेली लढाई असते. ती पण जिंकता आली पाहिजे.

पण आता तेवढ्याने भागणार नाही. आता परिस्थिती अशी आहे की आपल्या अंगात जोश ही यायला हवा…. शत्रूला भ्यायचं नाही तर… त्याच्याशी सामना करायचा.. निकरानी आणि सर्व शक्तीनिशी.. लढायचं… असं ती आपल्याला शिकवते… शत्रूला नामोहरम करून मगच देवी थांबते… विजय मिळेपर्यंत झुंजायचं ही तिची वृत्ती आपणही अंगी बाणू या.

देवीच गुणगान करा. श्री सूक्त. कुंकुमार्चन, देवी अथर्वशीर्ष, सप्तशतीचा पाठ हे सर्व काही करा.

मात्र आता तिच्याकडे ही प्रार्थना करा…..

हे देवी मला निर्भय आणि सबल कर… आज जगात वावरताना प्रत्येकीला.. प्रत्येकीला असं बनायला हवं आहे. तसेच तिला आश्वासन द्या की मी पण माझ्याकडून होईल तितका प्रयत्न करीन आणि तो मनापासून करा.

देवी यश देईलच..

दोन भुजा असलेल्या अनेक जणी अष्टभुजा असल्यासारख्या अनेक आघाड्यांवर लढत असलेल्या माझ्या आसपास आहेत.. त्यांच्या इतक आपल्याला जमलं नाही तरी चालेल… पण थोडा आपण प्रयत्न जरूर करूया. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ या. आईसाहेबांचा आशीर्वाद आपल्याला मिळेलच.

त्या मातृरूपेण संस्थिता, लक्ष्मी रुपेण संस्थिता इत्यादी वर्णनानंतर देवीच वर्णन ” शक्ति रूपेण संस्थिता ” असेही आहे… हे आपण निश्चित लक्षात ठेवूया.

अशा या देवीला माझा नम्रपणे नमस्कार.

एका मागणीचा जोगवा तुझ्यासमोर पदर पसरून मागते ग आई…….

 “ आम्हाला अंतरीक बळ दे शक्ती दे. ”.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कुंदाची फुलं… ☆ सुश्री सुनीता पाटणकर☆

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ कुंदाची फुलं… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

माझ्या अंगणात एक कुंदाच झाड आहे. जाई, जुई, मोगरा, गुलाब, जास्वंदि यांच्या दिसण्याचा आणि सुवसाचा मोह सगळ्यांना, बिचाऱ्या कुंदाकडे कुणाचंच लक्ष नाही.

आता थंडी सुरू झाली, दरवळणारी जाई आणि जुई नाजूका गारठली, मलूल झाली. पण कोणताही गंध नसणारी, शुभ्र पांढरी कुंदकळी भरून आली. एकदम मस्त ताजीतवानी, भरभरून बहरली.

टपोरी, स्वच्छ, निर्मळ फुल परडीत विसावली. दातांच्या शुभ्र कुंदकळ्या अशी उपमा देतात, त्याचीच आठवण आली.

तिच्याकडे पाहिलं आणि वाटलं किती साधी, सरळ आहे ही, एरवी फारसं लक्ष देत नाही, म्हणून रागवत नाही, फुगत नाही, रडवेली होत नाही, आणि अजिबात उन्मळूनही पडली नाही.

खरचं खूप शिकता येईल हिच्याकडून … आपलं काम आपण चोख बजावत रहायचं, मग इतरेजन कसे वागतात, काय करतात त्याचा कशाला विचार करायचा !

मी सकाळी उठून देवासमोर उभी होते, तर लक्षात आलं, काल देवाला वाहिलेली कुंदाची फुलं काल होती तितकीच आज अजूनही शुभ्र आणि टवटवीत आहेत. अशी ही कुंदाची फुलं…… खरचंच खूप प्रेरणादायी वाटली…..

……. म्हणून हा लेखनप्रपंच.

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘वंदे भारत ट्रेन’ चे निर्माते : श्री. सुधांशु मणी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

वंदे भारत ट्रेन’ चे निर्माते : श्री. सुधांशु मणी ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

या देशात असे अनेक रियल हिरो आहेत जे आपल्याला माहिती नाहीत..

सुमारे ८ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, २०१६ची. सुधांशु मणी नावाचे रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. यांच्या रिटायरमेंटला केवळ दोन वर्षे बाकी होती.

सहसा रिटायरमेंटच्या वेळी जेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्‍याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्‍याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्‍याने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.

ICF म्हणजे Integral Coach Factory …. रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना….

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, ‘ काय करणार?’

ते इंजीनियर म्हणाले, ‘ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे…. ‘

ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती. चाचणी सफल होती पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती. अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.

रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले…

“ Are You Sure, We Can Do It ? “

उत्तर होते….. ” Yes Sir !”

“ किती पैसे लागतील R&D साठी ?”

“ फक्त १०० कोटी रु सर !”

रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.

त्या अधिकार्‍याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले. दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले त्याला आपण ‘ ट्रेन १८ ‘ म्हणजेच वन्दे भारत रॅक नावाने ओळखतो.

आपल्याला ठाऊक आहे का… या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती. ट्रेन १८ भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.

या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण की हिचा प्रत्येक डबा स्वतःच ‘सेल्फ प्रोपेल्ड’ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.

दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक “ वन्दे भारत ट्रेन “ या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.

या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मणी.

सुधांशु मणी यांच्यासारख्या देशाच्या प्रगतीसाठी ध्येयवेड्या विभूतीला त्रिवार सलाम !

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

?  वाचताना वेचलेले  ? 

☆ “व्यापार आणि दया…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक

 भाजीवाली रोजच्यासारखी दुपारी दारात आली आणि तिने ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमीसारखी ओरडली, “काय आहे भाजी?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,…. ” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले. “

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी, ” – भाजीवाली.

“पन्नास पैशाला दे, चार घेते, ” – आई.

“नाय जमणार, मावशी, ” – भाजीवाली.

“मग राहू दे, ” – आई.

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन, “- भाजीवाली.

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते, ” – आई.

“नाय जमणार, ” – भाजीवाली म्हणाली

आणि पुन्हा गेली.

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून पारखून चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले.

भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवलीस का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन, मग सैपाक, मग जेवण, “- भाजीवाली.

“थांब जरा. बस इथं. मी आणते. ” म्हणत आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळे दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केलीस, पण नंतर, जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिलेस. “

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

“व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये. “

कवी :अज्ञात

संग्राहक  : श्री कमलाकर नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक पटलावर गांधीजी…” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “जागतिक पटलावर गांधीजी☆ श्री जगदीश काबरे ☆

✅ १९०९ सालापासून प्रख्यात रशियन लेखक लिओ टॉलेस्टॉय गांधीजींना ओळखत होते. कारण त्यांचा गांधीजींशी पत्रव्यवहार होता.

✅ १९२० सालापासून हो चि मिन्ह यांच्यावर गांधींचा प्रभाव होता. भारताची तुलना त्यावेळच्या व्हिएतनाममधील परिस्थितीशी करताना ते एकदा म्हणाले होते, “तिकडे तुमचे एक महात्मा गांधी आहेत, इकडे मी महात्मा गांधी आहे. ” आणखी एकदा, “मी आणि इतर काहीजण क्रांतिकारी आहोत, पण तरीही आम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींचे शिष्य आहोत, ” असेही ते म्हणाले होते.

✅ १९३१ साली जगप्रख्यात टाईम मासिकाच्या मुखपृष्ठावर गांधी झळकले होते.

✅ १९३१ साली अल्बर्ट आईन्स्टाईनने गांधींना पत्र लिहिले. त्यात आईनस्टाईन गांधींना उद्देशून म्हणाले होते: “येणाऱ्या पिढ्या क्वचितच विश्वास ठेवतील की, खरोखरच हाडामांसाचा असा मनुष्य (गांधी) कधी प्रत्यक्ष या पृथ्वीतलावर वावरला होता. “

✅ १९३१ साली महान जागतिक कलाकार चार्ली चॅप्लिन यांनी गांधींची भेट घेतली होती.

✅ १९४० साली नेल्सन मंडेला यांना गांधींच्या अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गाने स्वातंत्र्यलढा लढता येतो हे समजलं. त्याने प्रभावित होऊन त्यांनी गांधींचा सत्याग्रही मार्ग दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी चोखाळला म्हणून नेल्सन मंडेलांना दक्षिण आफ्रिकेचे गांधीजी म्हटले जाते.

✅ १९४० सालीचा मानव अधिकार कार्यकर्ते मार्टिन ल्युथर किंग यांना गांधीपासून प्रेरणा मिळाली आणि ते वर्णद्वेषाच्या विरोधात लढा उभारला. त्यांना अमेरिकेचे गांधी असे संबोधले जाते.

✅ १९४२ साली लुई फिश्चरने गांधींची भेट घेतली होती आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन १९६२ साली त्यांनी गांधी चरित्र लिहिले.

✅  १९४८ साली एका माथेफिरू हिंदू दहशतवाद्याने गांधीहत्या केली. त्याची दखल जगभरातील सर्व महत्वाच्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर घेणारी बातमी प्रसिद्ध केली होती.

✅  १९८२ साली बेन किंग्जले निर्मित आणि रिचर्ड ॲटनबरो दिग्दर्शित चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हा ॲटनबरोला प्रश्न विचारण्यात आला होता की, ‘तुमच्यासमोर जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन, विन्स्टन चर्चिल, माओत्से तुंग, हिटलर असे जागतिक स्तरावरील नेते होते तरीही तुम्ही चित्रपटासाठी गांधींचीच निवड का केली?’ त्यावर त्यांनी दिलेले उत्तर आजही विचार करण्यासारखे आहे. ते म्हणाले, ‘जगातील इतर सगळ्या नेत्यांनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी हातात तलवार घेतली होती. फक्त हा एकच असा माणूस आहे जगात की, ज्याने नि:शस्त्र लढा देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ‘

✅ जगात गांधीजींवर येशू ख्रिस्ताच्या खालोखाल मोठ्या प्रमाणात पुस्तके लिहिली गेलेली आहेत. एवढेच काय पण जगातील बहुसंख्य देशात गांधीजींचे पुतळे उभारले गेलेले आहेत आणि टपाल तिकिटे काढलेली आहेत. जगात अनेक विद्यापीठात गांधींचे विचार शिकवले जात आहेत.

✅ गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी ‘महात्मा’ अशी उपाधी दिली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ‘राष्ट्रपिता’ म्हणून त्यांना संबोधत त्यांना मानाची सलामी दिली.

✅ १५ ऑगस्ट १९४७ जेव्हा अख्खा देश स्वातंत्र्य दिनाचा आनंद उपभोगत होता त्याच वेळेला दंगलग्रस्त नौखालीमध्ये गांधीजी निधड्या छातीने एकटे फिरत होते आणि दंगली शमविण्याचा प्रयत्न करत होते. त्यात ते यशस्वीही झाले. म्हणून माउंटबॅटन यांनी त्यांना कौतुकाने ‘वन मॅन आर्मी’ असे म्हटले.

✅ थोडक्यात मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी, उर्फ राष्ट्रपिता, उर्फ आधुनिक भारताचे शिल्पकार, उर्फ अहिंसेचे पुजारी, उर्फ सत्याग्रहाचे जनक किती मोठे होते हे जगाला माहित आहे.

 ❎ तरीही आज बापूजींचा तिरस्कार करणारे कृतघ्नपणे बापूजींच्या चित्रावर पुन:पुन्हा गोळ्या झाडत आहेत.

©  जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दुनिया फक्त विश्वासावर चालते…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “दुनिया फक्त विश्वासावर चालते” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

आळेफाटा ते करमाळा प्रवास करत असताना माझ्या बाजूला एक मॅडम बसल्या होत्या. चार तासांचा प्रवास होता.

लेडीज बाजूला असल्यानंतर जरा अवघडल्यागत होतंच. दोन तास होऊन गेले. छोट्या छोट्या स्टँडवर गाडी थांबत होती. प्रवासी उतरत होते, चढत होते. आणि मला तहान लागली होती. गाडी मिरजगाव स्टँडला थांबली. एक वडापाव विकणारा माणूस खिडकीजवळ येऊन ओरडायला लागला.. ”गरमा गरम वडापाव. ” मला पाणी हवं होतं पण त्याच्याकडे फक्त वडापाव होते. मी त्याला म्हणलं “पाण्याची बाटली नाहीय का दादा?” त्यावर तो बोलला “नाहीय भाऊ. पैसे द्या मी आणून देतो लगेच. ” मी पटकन त्याला वीस रुपये दिले. आणि तो वीस रुपये घेऊन गर्दीतून वाट काढत बाटली आणायला निघून गेला.

माझ्या बाजूला बसलेल्या त्या मॅडम मोठ्याने हसल्या आणि म्हणाल्या, “गेले तुमचे वीस रुपये. ” आणि त्या पुन्हा हसायला लागल्या. मी म्हणलं, “तो पाणी घेऊन येईल. ” त्या पुन्हा हसत म्हणाल्या “तो येणारच नाही. त्यावर मी त्यांना म्हणलं, ” मॅडम तो येईल कारण, दिवसभर घसा ताणून ओरडुन एक एक रूपया कमवणारा तो माणूस आहे. त्याला वीस रुपयाचे महत्त्व माहित आहे. ही कष्टावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि ही दुनिया विश्वासावर चालते. यावर माझा विश्वास आहे. ” त्या मॅडम पुन्हा म्हणाल्या “बरं बघूया काय होतंय पुढे. ?”

गाडी सुरू झाली. कंडक्टरने दार ओढून घेतलं आणि बेल वाजवली. तशा मॅडम पुन्हा माझ्याकडे पाहून हसल्या. त्यांनी त्यांच्याजवळची पाण्याची बाटली बाहेर काढली व मला म्हणाल्या “घ्या प्या पाणी. आणि इतकाही विश्वास ठेवून जगणे बंद करा जरा.. ” त्यांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटत होतं.

गाडी सुरू होऊन स्टॅण्डच्या गेटवर आली आणि ड्रायव्हरने कचकन गाडीला ब्रेक मारला. आणि माझ्या खिडकीजवळ उभा होता तो वडापाव वाला. धावत पळत येऊन त्याने आवाज देऊन गाडी थांबवली होती. त्याने माझ्या हातात बाटली दिली. बाटली देताना तो म्हणाला. ,

“भाऊ दुनिया फक्त विश्वासावर चालते. ” माझा डायलॉग त्याने सेम मारला होता. गाडी पुढं निघाली. आणि माझी मान ताठ झाली.

त्या मॅडमची बाटली मी त्यांना परत दिली. आणि विश्वासाने हातात आलेली पाण्याची बाटली मी ओठाला लावत म्हणालो, “मॅडम भुकेची वेदना ओंजळीत लपवून जगण्याचा अभंग गाणारी माणसं या जगात आहेत…फसवणाऱ्या लोकांची संख्या कितीही वाढलेली असली तरीही, ही दुनिया विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास जपणाऱ्या लोकांमुळे टिकून आहे.. म्हणूनच दुनिया फक्त विश्वासावर चालते यावर माझा विश्वास आहे.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “Admit झालेली नाती !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

“Admit झालेली नाती ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

 

आई मरावी पण ही जगावी असं महत्त्व प्राप्त झालेलं नातं म्हणजे मावशी! आणि बहिणीवर असलेलं प्रेम आपल्या म्हणजे भाचरांच्या माध्यमातून व्यक्त करणारा आपल्या आईचा भाऊ म्हणजे मामा! दोन्ही नात्यांच्या संबोधनांचा आरंभ ‘मा’ या अक्षराने होतो.. मा म्हणजे… माया, मार्दव आणि मातृत्व!

रुग्णालयांत डॉक्टर्स, नर्सेस (सिस्टर्स) यांच्या खांद्याला खांदा लावून रुग्णसेवा करणाऱ्या महिलेला मावशी आणि पुरुषाला मामा असे संबोधण्याची सुरुवात आपल्याकडे अगदी नकळत झालेली असावी! यामागे योगायोग नाही… रुग्ण कोणत्याही वयाचा असो… त्याने मामा, मावशी यांचे थोडे का असेना प्रेम आयुष्यात कधी ना कधी अनुभवलेले असतेच. या अनुभवामुळे केवळ असे संबोधन असलेल्या व्यक्ती सुश्रुषा करीत असतील तरी सकारात्मक परिणाम होत असावा!

रुग्णाची प्रत्यक्ष शारीरिक स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांत हे मामा, मावशी अग्रभागी असतात, असे दिसते. रुग्णालयातील सिस्टर्स, वॉर्ड बॉईज, ब्रदर्स यांच्याप्रमाणे मामा, मावशी प्रशिक्षित नसतात… हे सेवक कित्येक वर्षांच्या अनुभवातून पारंगत होत जातात… त्यांच्या कामात आपसूक सफाईदारपणा येत जातो. किंबहुना एखाद्या रुग्णालयाच्या आरोग्यसेवेचा बराचसा भार ही वैयक्तिक पण आता सार्वजनिक पातळीवर रूढ झालेली नाती पेलत असतात, असे वाटते!

डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांनी आपापले व्यवसाय स्वतः निवडलेले असतात… पण मामा, मावशी गरजेतून उदयाला येतात! रुग्णाला धीराचे चार शब्द सांगण्याचा, एखादा सल्ला देण्याचा अधिकार यांना वयपरत्वे प्राप्त होत जातो… आणि बरे होऊन घरी निघालेल्या रुग्णाच्या नातेवाईक मंडळी कडून बक्षिसी मिळवण्याचा हक्कही (काही) मामा – मावशींनी स्वयंप्रेरणेने पदरात पाडून घेतलेला आढळून येतो!

छोट्या रुग्णांना हे न टोचणारे लोक भावत असावेत. कुणी काहीही म्हटले तरी शरीर धर्म चुकत नाही आणि त्याची घाण तर असतेच. या वासाची तमा न बाळगता, घृणा न करता मामा, मावशी रुग्णसेवा करीत राहतात… या कामाची कितीही सवय असली तरी हे काम सोपे नाही हे मान्य करावेच लागेल!

अर्थात, वेगवेगळ्या रुग्णालयांत रुग्णांना या नात्यांकडून येणारे अनुभव निरनिराळे असू शकतात. पण ही सुद्धा अखेर माणसेच आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी यांनी स्वीकारलेले काम अंती मानवसेवेचे ठरते, हेही खरेच !

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print