मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याचे धडे गिरवताना… ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? विविधा  ?

☆ आयुष्याचे धडे गिरवताना…☆ सौ .कल्पना कुंभार ☆

आयुष्याचे धडे गिरवताना…

खरं आयुष्य उमगत गेलं…

    –  सौ.कल्पना कुंभार..

आपल्या आयुष्यात असे काही क्षण येतात ज्यामुळे कळत नकळत आपली जीवनाकडे पहाण्याची दृष्टीच बदलून जाते..काही व्यक्ती ,काही प्रसंग ,काही चित्रपट, नाटकं तर काही पुस्तक आपल्याला आयुष्य कसं जगावं ..? याचा धडाच देतात व जगणंच बदलून टाकतात..

एकदा  लहानपणी दुसरी तिसरीला असताना मी माझ्या कुटुंबियांसोबत आमच्या गावी गेले होते. तेथे गेल्यावर दुसऱ्याच दिवशी मम्मी पहाटे लवकर उठली व गोठ्यात गेली..मलाही जाग आली होती म्हणून मीही गेले मागून.. तिने गोठा स्वच्छ केला व म्हशीची धारही काढली.. मी सगळं पहात तेथेच बसले होते..मी मम्मीला म्हणाले, ” मम्मी, तुला घाण वाटत नाही का ग गोठ्यात..?मला तर खूप वास येतोय व शेण बघून कसतरीच होतय..आणि तुला दूध काढायला कसं येत ग..?तुला भीती नाही वाटली म्हशींची.??”

मम्मी म्हणाली, ” अग जस आपण आपलं घर स्वच्छ करतो तस हे म्हशीच घरच आहे..आणि   तुला एक सांगू ..नेहमी लक्षात ठेव ..माणसानं वाईट काम करताना लाज बाळगावी ..चांगलं काम करताना नाही..मी गोठा स्वच्छ केला कारण ते स्वच्छ राहिले तर जनावरांच आरोग्य चांगलं राहील व आपलंही…”

मी पुन्हा म्हणाले, ” मम्मी , पण तू तर खूप शिकलेस ..शिक्षिका आहेस..मग असलं का काम करायचं..?” मम्मी हसली व म्हणाली , ” बाळ,कोणतंही काम लहान मोठं नसत ग..आणि आपण खूप शिकलो तरी आपल्या काही गरजा भागविण्यासाठी काम करावेच लागते ..आणि कष्टाच काम करण्यात लाज कसली..? ज्या कामामुळे आपले ,आपल्या कुटुंबाचे व समाजाचे नुकसान होईल ते काम करायला लाजावे..”

त्यावेळची ही घटना मला खूप काही शिकवून गेली.. आणि आयुष्यभर लक्षात ही राहिली..कोणतंही काम कमी दर्जाचं नसत..त्यामागचे कष्ट व प्रामाणिक हेतू महत्वाचा..मग अस कष्टाचं काम करायला लाजायच कशाला..??आपण जीवनात कितीही शिकलो..खूप पैसा मिळवला तरी मातीशी पाय घट्ट रोवून उभं रहायचं..हे मी नकळत शिकले..

माझ्या लहानपणापासून च मला माझ्या पणजोबा व पणजी चा सहवास लाभला..त्यांना एकच लेक..ती म्हणजे पप्पांची आई.. त्यामुळे त्यांना संभाळणार कोण..?असा जेंव्हा प्रश्न निर्माण झाला तेंव्हा पप्पा त्याना इचलकरंजी ला घेऊन आले..पणजी मी लहान असतानाच गेली पण माझे पणजोबा..आम्ही बाबा म्हणायचो त्यांना..खूप प्रेमळ पण तेव्हढेच कडक स्वभावाचे..उंच,धिप्पाड शरीरयष्टी.. जणू पैलवानच..सगळेच घाबरायचे त्यांना..सगळं वेळेत लागायचं त्यांना..मम्मी शाळेच्या गडबडीतही खूप छान सांभाळायची त्यांचा स्वभाव..कधीच चिडलेल किंवा आदळआपट केलेलं पाहिलं नाही  मी तिला…

एकदा बाबा आजारी होते..उठताही येत नव्हतं..सगळ्या चादरी ही घाण झाल्या होत्या.. त्यांनाच सांगताना लाज वाटत होती . पण माझ्या पप्पानी व मम्मीने कसलीही तक्रार न करता..ते शी व शु च सगळं स्वच्छ तर केलंच..मम्मी ने बाबा ना आंघोळही घातली..बाबांचेच डोळे पाणावलेले मी पाहिले त्यावेळी.. नंतर मी व दादाने त्या दोघांना विचारले, ” तुम्हाला शी काढताना घाण नाही वाटली..?” पप्पा म्हणाले, ” त्यांनी मी लहान असताना माझी पण शी काढलीच होती..त्यांना कधी घाण वाटलं नाही..मग मला कसं वाटेल..आणि माणूस जसजसा म्हातारा होतो ना..तसा तो लहान मुलांप्रमाणे वागायला लागतो..मग आपल्याला मोठं व्हाव लागतं.. कोणीही समोर असू दे..त्याच्या वेळेला पडताना नेहमी मन स्वच्छ ठेवायचं..कशाला घाण नाही म्हणायचं..हेच जगणं आहे बाळांनो…” आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ..पप्पा व मम्मी दोघेही शाळेला गेल्यावर..पप्पांच्या प्रमाणेच माझ्या दादालाही बाबांची शी काढताना पाहिलं..आणि हा प्रसंग मनावर कोरला गेला..दोन वर्षांपूर्वी जेंव्हा माझे सासरे आजारी पडले तेंव्हा मलाही त्यांचं सगळं करताना अजिबात घाण वाटलं नाही..आणि माझ्या बाबांच्या डोळ्यात जस पाणी होतं तसच पाणी मला माझ्या  आहोंच्या डोळ्यांत त्यावेळी दिसलं… माझ्या मुलांसाठीही कदाचित आयुष्यातील तो एक धडाच होता…

या lockdown मध्ये जेंव्हा मी आजारी पडले तेंव्हा माझ्या दहावी मध्ये असलेल्या लेकाने कपडे मशीन मध्ये धुऊन उन्हात वाळत घालण्यापासून ते मला ताट वाढून हातात देण्यापर्यंत न लाजता काम केले . मला भावनिक आधारही दिला..तेंव्हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कार कसे पाझरत जातात  हे समजलं..या कोरोनाच्या काळातही आजी आजोबांचं ऑक्सिजन रोज जेंव्हा माझी लेक चेक करायची तेंव्हा त्यांच्या डोळ्यांतील अभिमान माझ्याही डोळ्यांत उतरत होता..

आज आयुष्याचा धडा गिरवताना या विषयाबद्दल विचार करताना मला आणखी एक प्रसंग तुम्हा सर्वांना सांगू वाटतो..

मी बीए करत होते..त्या रात्री पप्पाना एकदम अस्वस्थ वाटू लागलं..श्वास घेताना त्रास होऊ लागला..तेंव्हा दादाने त्याना life line ला ऍडमिट केलं..त्यांना हार्ट अटॅक आला होता..कसलंस इंजेक्शन ही दिलं डॉक्टरनी.. दादा त्यावेळी MD करत होता. पप्पाना ICU मध्ये ऍडमिट करून दोनच दिवस झाले होते आणि…मम्मीची आई..माझी आजी हार्ट ऍटॅक ने गेली.. गावाकडून फोन आला रात्री..मला तर काहीच समजेना..काय करावे..दादा दवाखान्यात थांबला होता.. त्याने गाडी ठरवली व मम्मी व तिच्या मैत्रीणीला सोबत म्हणून गावी पाठवलं.. सगळं आवरून मम्मी पहाटे परत आली..आणि माझ्या गळ्यात पडून खूप रडली….सहा वाजले होते..न झोपता आवरून नाश्ता व चहा घेऊन लगेच   सात वाजता ती दवाखान्यात पप्पांसमोर हजर होती..जणू काही झालंच नाही..हसत सगळं  करत होती..स्वतः च दुःख बाजूला सारून पप्पांच्या विनोदावर तिला हसताना बघून मला मात्र खूप रडू येत होतं..पण कसं काय मलाही माहीत नाही..मीही खंबीर होत गेले.. त्यानंतर पप्पांची बायपास सर्जरी झाली जी खूप क्रिटिकल होती..देवाची कृपाच ती सर्जरी यशस्वी झाली..पण पप्पांची तब्बेत खूपच नाजूक झाली होती.. कोणताही मानसिक ताणतणाव त्यांना द्यायचा नाही असं डॉक्टरनी सांगितलं त्यामुळे पप्पांपासून ही घटना आम्ही एक वर्षभर लपवली.. त्यासाठी किती खोटं बोलावं लागलं..हे सांगताच येणार नाही मला.. घराच गेट वाजलं की बाहेर पळत जायचं..येणाऱ्या व्यक्तीला आजींचा विषय काढू नका असं तिथेच सांगून घरात घायच असं मी जवळजवळ वर्षभर केलं..या घटनेने मला शिकवलं ..आपलं दुःख कितीही मोठं असलं तरी एखादयाच्या जिवापेक्षा मोठं काहीच नाही…..

खरच असे कितीतरी प्रसंग , व्यक्ती किंवा क्षण आपल्या आयुष्यात हे येतच असतात..पण त्यातून नेमकं काय वेचायच हे ज्याचं त्यानं ठरवायचं..पण हेही तितकंच खरं त्या घटना चांगल्या असो किंवा वाईट ..शिकवून जातात बरच काही..आणि आयुष्याच्या पुस्तकातील एक धडा बनून नेंहमीच मार्गदर्शन करत रहातात …आपलं कुटुंब हे एका स्वच्छ, नितळ, गोड पाण्याच्या झऱ्यासारखं आहे..झरा जसा पुढे पुढे जाताना ही आपली खरी चव सोडत नाही..तसच आपलं आयुष्य ही असच  वाहत असत..त्यामध्ये कुठेही वाईट विचार मिसळले जाणार नाहीत यासाठी पालकांनी सजग ..जागरूक रहाणं महत्वाचं..कुटुंबात रुजलेले संस्कार हे समाजासाठी नक्कीच उपयोगी पडतात..कळत नकळत आपण इतरांना जपू लागतो.. त्यांना मदत करू लागतो..पण हे तेंव्हाच होतं जेंव्हा एखादं कुटुंब संस्काराच्या भरभक्कम पायावर उभं असत..

कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हटलच आहे….

सांगा कसं जगायचं..??

 कण्हत कण्हत की गाणं म्हणत

तुम्हीच ठरवा…

 

दुवा देत हसायचं की शिव्या देत रडायचं

तुम्हीच ठरवा..कसं जगायचं..??

 

पेला अर्धा भरला आहे असं देखील म्हणता येत..

पेला अर्धा सरला आहे असं देखील म्हणता येत

मग भरला आहे म्हणायचं

की सरला आहे म्हणायचं..

तुम्हीच ठरवा..

सांगा कसं जगायचं..??

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:: 9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 4 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 4 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

त्याला (authentic) म्हणतात?

सकाळी न्याहरीला चुलीवर खूप वेळ शिजत ठे4वलेली घरच्या तांदुळाचे अटवलं, मऊ भात शिजत ठेवलेला असे त्यातच दारच्या वेलाची तोंडली शिजायला टाकलेली असत भाताबरोबर ती मऊ लुसलुशीत होत. खायला केळीच्या पानाच्या फाळक्यावर वाढून घेतले जाई. हे केळीच्या पानाचे फाळके मी व मावशी वाडीत जाऊन हाताने काढून आणत असू केळीच्या मोठ्या उभ्या पानातून अलगद आडवे पान कापुन घेऊन मग मधल्या दांड्यातून ते फाडून घ्यायचे. पण हा मधल्या दांड्याला जोडलेला पानाचा भाग काढायचे कौशल्याचे आणि रोजच्या सवयीचे असल्याने मावशी लीलया काढी. मी कधी प्रयत्न केला तर पान फाटे पण हळूहळू तेही जमले टाकीवर धुवून घेऊनच आत येत असू.

तर असे हे फाळके हारीने मांडून त्यावर गरम गरम भात आणि प्रत्येकाच्या पानात मऊ झालेले तोंडले ते कुस्करून त्यात दही तिखट मीठ प्रत्येकाने आपापले मिसळायचे हे तोंडल्याचे झटपट भरीत भाताबरोबर मुटू मुटू खाऊन तृप्तीची ढेकर द्यायची.

कधीकधी आजी तांदळाची उकड करत असे तीही रुचकर लागे पोहे घरचे असत घरच्या भाताचे जरा जाडसर करून आणलेले. त्यात दारातला नारळाचा चव लाल तिखट मीठ साखर व तेल एवढेच घालायचे त्याला म्हणायचं हात फोडणीचे पोहे इतके रुचकर लागत. आम्ही ते केव्हाच मटकावत असू. आंब्याचा हंगाम असल्याने सर्व झाडांना पाडाला आलेले आंबे लटकलेले असत. वारं सुटलं की आंबे बदा बदा खाली पडत. रायवळ, तोतापुरी, पायरी, अशी विविध जातीची झाडे होती. 

सकाळी भिक्षुकीची कामे आवरली की आजोबा घरी येत. उंच, गोरे, कानात बिगबाळी, धोतर व पांढरा शर्ट परिधान केलेला असे. ओल्या सुपार्या कातरून जेवण झाल्यावर अडकीत्त्याने कातरत मुखशुद्धी करिता खायला घेत, भिंतीत एक गोल तोंडाचा कोनाडा होता. त्यातही काही साहित्य ठेवलेले असे. कधी ते ओटीवर लोडाला टेकून बसलेले असत. आम्ही वाडीत आंबे मिळतील का असे त्यांना विचारात असु, ते म्हणत, “जा आंबा मिळेल!” मग भराभरा वाडीत जात असू. आंबे पडायची वाट बघत असू. एक गाणं ही म्हणत असू. ते असे, “आपटं धोपटं, पायलीचा पोपटं, पहिला आंबा पडेल तो देवाला!” आणि मग वारं येई आणि धपकन आंबे पडत. ते वेचून आणत असू. या रायवळ आंब्याचे ‘कोयाडं’ करत. बाठी पातेल्यात पिळायच्या, सालीचा गर पाण्यातून काढायचा, ते पाणी दाट असायचे, ते बाठीत ओतायचं खमंग मेथी, हिंग, मोहरीची फोडणी त्या पाण्याला द्यायची, मीठ, तिखट, गुळ घालून उकळी आणायची झालं ‘कोयाडं’ तयार. इतके रुचकर लागते की दिल आणि रसना खुश व्हावी. 

दुपारची जेवण झाल्यावर मोठी माणस अंमळशा झोपत, आम्ही मुल धाकटे मामा, मावशी आम्ही दोघ भावंड असा आमचा बेड्यात (गोठा) पत्याचा वख्खईचा डाव पडे दोन-तीन तास रंगत रंगत संध्याकाळ होई. त्याबरोबर दारच्या कैर्या तिखट-मीठ लावून खाता खाता आनंद सोहळाच साजरा होई. काहीवेळा ओटीवर असलेल्या खांबांना धरून आम्ही खांब, खांब, खाम्बोल्या असा खेळहि खेळत असू. अधूनमधून समुद्राकाठी संध्याकाळी फिरायला जाण ही होई. समुद्र तसा जरा दूर पश्चिम दिशेकडे होता, १ किलोमीटर  चालत जावे लागे. ही घरे पूर्वेकडे होती. समुद्रात पाण्यात खेळणे, वाळूवर किल्ले करणे, कधी कवड्या शिंपले  वेचणे चालू असे. काहीवेळा समुद्राच्या लाटेबरोबर लाट विरली की शंख , गोगलगायीचे गोल शंखही वाहात येत, चुकून वेचायला गेल तर आत किडा असेच मग जोरात फेकून देत असू. पुन्हा पाण्यात! थोडी भीतीही वाटे. मग सूर्याचे सागरात हळूहळू अस्ताला जातानाचे दृश्य विलोभनीय असे, मग सायंकाळचे तांबूस रंग आकाशात रेंगाळत थोड्यावेळात संधी प्रकाश दिसू लागे. आमची पावले घराकडे परतत. उन्हाळा म्हटलं की, काळीमैना डोंगराची मैना करवंद आणि जांभळं यांचाही हंगाम जोरात असे, मी व मावशी शेताच्या पलीकडे डोंगरीवर जात असू. तिथे करवंदीच्या जाळ्या भरपूर होत्या. इतकी ताजी करवंद खाण्यात अप्रूपच असे. वाडीत जांभळीची जांभळे वेचून ती गोडीही चाखण्यात आनंद असे. 

एका चुलत मामाचे घर शेजारी होतं तिथे बकुळीचे उंच झाड होतं. संध्याकाळच्या वेळेस बकुळीच्या फुलांचा सडा पडे आम्ही तीही आनंदाने वेचत असू. घरी जाऊन नारळाच्या झावळीचे कोवळे हिरं काढून बकुळीचा गजरा ओवत असू. त्या बकुळीचा घमघमाट अजूनही मला येत असल्यासारखा भासतो बकुळ फुलं सुगंधाने भरलेली कुपीच जणू! वाळलं तरी त्याचा परिमल आनंद देत राही.

—-क्रमश:

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित

?इंद्रधनुष्य?

☆ दया.. ☆ संग्राहक – सौ. स्मिता पंडित ☆ 

भाजीवाली रोजच्या सारखी दुपारी दारात आली आणि ओरडून विचारले, “भाजी घ्यायची का मावशी?”

आई आतून नेहमी सारखी ओरडली, “काय आहे भाजीला?”

“गवार हाय, तंबाटी, पालक,….” एवढे बोलताच आई म्हणाली, “थांब आले”

दारात येऊन आईने भाजीवालीच्या डोक्यावरचा भारा पाहिला आणि विचारले, “पालक कसा?”

“रुपयाची गड्डी” – भाजीवाली

“पन्नास पैशाला दे, चार घेते” – आई

“नाय जमणार मावशी “- भाजीवाली

“मग राहू दे”  – आई

भाजीवाली पुढे गेली आणि परत आली. “बारा आण्याला दीन” – भाजीवाली

“नको. पन्नास पैशाला देणार असशील तर घेते” – आई

“नाय जमणार” – भाजीवाली

.. आणि पुन्हा गेली

थोडे पुढे जाऊन परत आली. आई दारातच उभी होती. तिला माहीत होते की भाजीवाली परत येईल. आता भाजीवाली पन्नास पैशाला द्यायला तयार झाली. आईने भारा खाली घ्यायला मदत केली, नीट निरखून परिक्षण करुन चार गड्ड्या घेतल्या आणि दोन रुपये दिले. भाजीवाली भारा उचलायला लागताच तिला चक्कर आली. आईने काळजीने विचारले, “जेवली का नाही?”

“नाय मावशी. एवढी भाजी विकली की दुकानात सामान घेऊन , मग सैपाक, मग जेवण” – भाजीवाली. 

“थांब जरा. बस इथं. मी आले” म्हणत, आईने दोन चपात्या आणि भाजी, चटणी एका ताटात तिला आणून दिली. नंतर थोडा वरणभात दिला. जेवण झाल्यावर एक केळं दिले. पाणी पिऊन भाजीवाली गेली.

मला राहवलं नाही. मी आईला विचारले, “तू  एवढ्या निर्दयपणे किंमत कमी केली पण नंतर जेवढे पैसे वाचवले त्यापेक्षा जास्त तिला खायला दिले.”*

आई हसली आणि जे म्हणाली ते आयुष्यभर मनात कोरले गेले…

—-“ व्यापार करताना दया करु नये आणि दया करताना व्यापार करु नये”…. 

 

संग्राहक : स्मिता पंडित 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ विविधा ☆ ☆ कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने…) ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर  सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस !

 तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील  हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर   सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले!सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर  असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी  पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे  द्रौपदीला दाखवून  दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच  देवरूप  आणि  मानव  रूप यांच्या सीमेवर होतं!  जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून  द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून

तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं !कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो .सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या

स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो ,तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो .आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात !पावसाच्या सरी बरोबरच  पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी  एक हातचा तुझ्याकडे , परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 3 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

घरात परतत असू………. च्या पुढे?

आजीने केलेले ताजे लोणचे आमटी भात तोंडल्याची भाजी खाताना जेवणाची मजा येत असे. तसे पूर्वी भाकरी पोळी कमीच दोन्ही वेळा भातच असे. भाकरी संध्याकाळी तांदळाच्या गरम गरम आजी पंगत बसली की करत असे त्या भाकरी सोबत नारळाची लसुण व लाल तिखट, किंचीत आंबट घातलेली चिंच मीठ साखर आणि पाट्यावर वाटलेली चटणी लज्जतदार लागे.

असे करत रात्रीची जेवणे झाल्यावर, अंथरुणं पडतं फार उन्हाळा व उकाडा वाढला की मागच्या दारी घातलेल्या तात्पुरत्या मांडवात बिछाने घालत वार्यावर झोप लगेच येई काही वेळा गप्पा रंगत. मोठा मामा भुताच्या गोष्टी सांगत असे. त्यामुळे सुरुवातीला उत्कंठा वाटे पण नंतर बोबडी वळे. गिर्हा, जखीण, मुंजा, अशी काहीतरी नाव असत रात्रीच्या वेळी ते अधिकच भयप्रद होई. मग अंगाचे मुटकुळे करून डोक्यावर पांघरूण घेऊन डोळे गच्च मिटले जात. सकाळ कधी होई ते कळत नसे.

सकाळी उठून प्रात:र्विधी आवरण्याची घाई असे. तोंड धुण्यापासून सर्व मागच्या हौदावर जाऊनच करावे लागे. हल्ली सारखी घरातल्या घरात बेसिन नळाला पाणी अशी सोय नव्हती. शौचालाही खूप लांब घरापासून पाचशे फूट अंतरावर जावे लागे. पत्र्याची चौकोनी बांधलेली बंदिस्त खोली मागे चर पाडलेला असे. लहान मुलांसाठी लांब लाकडे टाकून केलेली तळात चर असलेली व्यवस्था म्हणजे त्याला ठाकुली म्हणत.

हौदात पाणी येण्याकरता विहिरीवर रहाट असत. मोठे लाकडी चक्र त्यावर सुंभा च्या दोरीने आडवे बांधलेले पत्र्याचे डबे किंवा मातीचे पोहरे म्हणजे मडके असे. त्या चक्राचा लांब दांडा विहिरीच्या बाहेरच्या बाजूला असे त्याला ही लाकडी चक्र जोडलेले असे आणि वरून खाली उभा खांब जमिनीत उभा केलेला असे. त्या खांबाला दुसरा एक आडवा बांबू जोडून ते जोखड बैलाच्या पाठीला बांधत बैलाच्या डोळ्यावर झापड बांधलेले असे मग त्याला जुंपले की तो गोल गोल फिरत राही.म्हणजे चाकांना गती मिळून रहाट फिरू लागे तसतशी एक एक पोहरा विहिरीत सर सोडलेल्या माळे वरून पाण्यात बुडे व भरून निघून रहाटावरून उलट होत वरच्या बाजूला जोडलेल्या पत्र्याच्या पन्हाळात उलटा होऊन पाणी पडे ते पुढे सिमेंट बांधलेल्या दांड्या तून थेट वेगाने हौदाकडे वाहू लागे मग टाकी भरून घेतली जाई

त्याच पाण्याने खाली गुरांना पाणी प्यायची टाकी असे तीही भरे मग या दोन्ही टाक्यांची तोंडे गच्च कपड्याच्या बुचाने रोखली जात आणि पाणी नारळ पोफळीची जी बाजू त्यादिवशी पाणी सोडायची असेल तिथे सोडले जाई. याला शिपणं करणे असे म्हणत. हे रोजचं काम आणि प्रत्येक घरातून सकाळच्या वेळी चालू असे.रहाटाचा कुईsss कुईsss आवाज येणे ठरलेलेच असे.

वेगवेगळ्या ऋतूत तेथे वेगवेगळी मजा असे उन्हाळ्याच्या सुट्टीत आंबे फणस जाम कोकम, पोह्याचे पापड याची मज्जा असे कोकम फळे आणून फोडून टाकून  बियांचा गर एका पातेल्यात जमा होई. वरची टरफले साखर भरून बरणीत ठेवली जात मिठ ही घातले जाई मग त्याला भरपूर रस सूटे. रस ओतून घेऊन त्यात प्रमाणात पाणी साखर मीठ घातले, थोडी जिरेपूड की झालं कोकम सरबत तयार हे ताज्या फळाचे सरबत अप्रतिम चवीचे लागे उन्हाळ्यात तखलीकीने कोरडा पडलेला घसा शांत होई

जाम हे किंचित पांढरे हिरवी झाक असलेले भरपूर पाण्याचा अंश असलेले फळ प्यास लागलेली शमन करत असे. एखादा दिवस पापड करण्याचे ठरे. लाकडी उखळीत पोह्याचे पीठ तिखट मीठ हिंग पापड खार पाणी हे प्रमाणात घालून मुसळाने कुटले की पापडाचा गोळा तयार होई, काही वेळेला कांडपिणी असत त्या कुटून देत मग मावशी, आई, आजी व मी मोठे मोठे पोळपाट घेऊन सरासरा पापड लाटत असू. मावशीचा लाटण्यावर खूपच हात चाले मग कोण जास्त पापड लाटतो अशी शर्यत ही लागे. असे पापड उन्हात घालून वाळल्यावर खाण्यातली मजा काही औरच असे. ताकातले हि पापड आजी चविष्ट करीत असे. तसे पापड आता मूळ चवीचे खायला मिळत नाहीत. हल्ली त्याला (authentic) म्हणतात. 

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य –  वाचताना वेचलेले ☆ मराठी भाषेचा सुंदर आविष्कार☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

 ☆ मराठी भाषेचा सुंदर आविष्कार☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

तुझ्यासाठी आज फक्त 

पावसाचा शृंगार केलाय—- 

 

इवल्याशा थेंबांचा 

कंबरपट्टा विणलाय—–। 

 

टपोऱ्या थेंबांचे 

डूल घातलेत कानात—– 

 

मोठ्ठ्या सरीची 

मोहनमाळ घातलीये गळ्यात—-। 

 

लवलवणाऱ्या हिरवाईची 

काकणं भरलीत हातात—–

 

टपटपणारया पागोळ्यांचा 

नाद गुंफलाय घुंगरात——-।

 

चमचमणाऱ्या बिजलीची 

चंद्रकोर रेखलीय कपाळावर—–

 

आणि सावळया मेघांची 

काजळरेषा पापणीवर——।

 

सप्तरंगी इंद्रधनू 

ल्यायलेय अंगभर—– 

 

वाऱ्याचा सळसळाट 

घुमतोय पदरावर——। 

 

तुला आवडतं ना म्हणून

मातीच्या सुगंधाचं 

अत्तरही माखलंय—–

 

अन गोजिरवाणं श्रावणफूल 

केसात माळलंय——।

 

बघ तरी सख्या——

 

तुझ्यासाठी 

आज 

नखशिखांत 

पाऊस 

बनून 

आलेय———!!

. .

काय सुंदर अविष्कार आहे, मराठी भाषेचा. . !!

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित

? विविधा ?

☆ घरात मोठं कुणीतरी पाहिजे हो…! – साभार व्हाट्सएप्प ☆ संग्राहक : सौ. स्मिता पंडित ☆

उद्या ह्याच पायरीवर तुम्ही असणार आहात…!

पूर्वी घरांत उंबरठे आणि मोठी माणसं असायची. त्यामुळे घराचा कारभार मर्यादेत आणि धाकात चालायचा…!

कुठल्याही कार्याचा श्रीगणेशा करण्याआधी घरातील जेष्ठ मंडळीचा सल्ला घेतला जायचा, त्यांच्या अनुभवाचे सर्व विचार करायचे, त्यामुळे घरातील देवघरा नंतर महत्वाचे स्थान म्हणजे घरातील वयस्करांचे होते…!

आताची वास्तविकता पार वेगळी आहे. काळानुसार घरात गुळगुळीत फरश्या बसल्या आणि घरातील सदस्य घराच्या मर्यादा आपआपल्या सोयीने ठरवू लागले.  स्वयंपाकघर  काय अन्  देवघर काय.. सगळीकडे घरभर चपला घालून फिरायला सुरुवात झाली…!

मोठी माणसं नाहीशी होत आहेत त्यामुळे धाक नावाची गोष्ट सुद्धा लोप पावत चालली आहे. मर्यादा, धाक , शिस्त , संस्कृती इत्यादि प्रकारच्या या गोष्टी हल्ली व्हॉट्स ऍप वर सकाळी सकाळी वाचण्यापुरत्या राहिल्या आहेत…!

पूर्वी ह्याच गोष्टी, चालीरीती घरातील मोठी माणसे सांगायची. म्हणून घरात मोठी वयस्कर माणसे पाहिजेत. संध्याकाळी दिवे लावणीला शुभंकरोति – रामरक्षा- आरतीचे स्वर कानावर पडायलाच पाहीजेत. रात्री घरी उशिरा आल्यानंतर काळजीपोटी प्रश्नोउत्तरे झालीच पाहिजेत…!

रात्रीचं उरलेलं अन्न टाकून देण्याऐवजी त्याला फोडणी -तडका देऊन आणखी चविष्ट व चटपटीत बनवून सकाळच्या न्याहरीत वाढणारं कुणीतरी पाहिजे…

मोजून-मापून खर्च कसा करायचा याचे धडे शिकवणारं… चुकलं तिथे रागवायला व कधीतरी तोंड भरून कौतुक करायला…!

घरात कुणीतरी मोठं पाहिजे हो…!

एकाच छताखाली सर्वांना एकत्र पद्धतीत बांधून ठेवणारं, टिव्ही बंद ठेवून सर्वांनी सोबत जेवण कां करावं यामागचं कारण उत्तमरित्या पटवून देणारं, घराबाहेर पडतांना देवापुढचा अंगारा कपाळावर लावणारं, आनंदाच्या वेळी पटकन देवापुढे साखर ठेवणारं, तर संकटाच्या वेळी आपल्यासाठी देवाला पाण्यात ठेवून माळ जपत प्रार्थना करणारं…

खरंच घरात कुणीतरी मोठ पाहिजेच…!

पिकलेले पांढरे केस असू देत की अंधुक झालेली नजर.. आशीर्वाद देताना थरथरणारे हाथ असू देत की सुरकुत्या पडलेलं शरीर..  लिंबू-मिरचीला मानणारे विचार असू देत की कावळ्याच्या शापाला घाबरणारे मन..  एक गोष्ट चार-चार वेळा सांगणारं बडबडं मुख असू दे की कमी ऐकू येणारे कान.. कसं कां असेना पण सांगसवर करणारं …

घरात कुणीतरी मोठं पाहिजेच…!

ज्या झाडाला फळं-फुलं येत नाही त्या झाड़ाला आपण बिनकामी झाड म्हणतो. परंतु ते झाड़ फळ-फुलं जरी देत नसलं तरी निदान सावली तरी देतं.. त्या सावलीसारखीच घरातील मोठी-वयस्कर माणसं असतात…!

त्यांच्या असण्यानेच आपल्याला नकळत खूप आधार होतो. त्यांचे अस्तित्व आपल्यासाठी खुप मोलाचे असते. घरातून बाहेर पडतांना डोकं ठेवून नमस्कार करण्यासाठी घरात ते अनुभवी पाय पाहिजेतंच…!

घरात मोठं कुणीतरी पाहिजेच हो….!

 

✍ साभार – व्हाट्सएप्प  

संग्राहक : सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले

श्रीमती सुधा भोगले

? मनमंजुषेतून ?

☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 2 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

(१९५६-१९७० च्या या आठवणी)

मग घरात प्रवेश मिळे…… च्या पुढे?

मामाच्या घरापुढे सारवलेलं अंगण असे. आठ दहा उंच दगडी पायर्या चढून गेले की घराच्या लांबी इतका पुढे खांब असलेला (हल्लीचा व्हरांडा) जवळ जवळ ५० फुट लांब ओटीच्या बाहेर पडवीचा भाग आणि मग चौकोनी ओटी, त्यावर गादी, तक्के अशी बैठक असे. भिंतीत बरेच कोनाडे होते. या कोनाड्यात धाकटे मामा, ‘बुगुबुगु’ असा तोंड घालून,नंदीबैलाचा आवाज काढीत. तो आत घुमत असे. मी लहानपणी त्या ‘बुगुबुगु’ आवाजाला घाबरत असे. डाव्या अंगाला एक दार आहे. तेथे आत बापूंच माजघर आहे, त्या माजघराला हे नाव पडले होते. पूर्वी एकत्र कुटुंब असे, त्यातल्या एकाचे नाव असेल. ओटीवर उजवीकडे काळ्या पॉलीशचे पितळी चकत्या असलेले दर्शनी दार, त्यातून प्रवेश केला की मोठ माजघर, एकीकडे उजव्या हाताला लागतो लाकडी बांधलेला झोपाळा. समोर स्वयंपाकघरात जायचे दार, डाव्या हाताला देवघर त्याच्या समोर मागच्या पडवीत जायचे दार दाराच्या आत छोटीशी ओटी सारखी जागा व समोर उतरले की पुन्हा घराच्या लांबी एवढीच मोठीच्या मोठी पडवी एका बाजूला नारळ ठेवलेले असत, भिंतीवर कोयताळे असे. त्यात निरनिराळे कोयते असत. समोरच बाहेर पडायचे दार टाकीकडे वाडीत जायला यायला. इकडे उजवीकडे चुली घातलेल्या होत्या. तेथेच पडवीत शिंकाळे टांगलेले होते. त्यात नारळ फोडला की उरलेल्या कवडी बागेतून आणलेल्या भाज्या केळीचे फाळके ठेवलेले असत. पडवीला अर्धीभिंत व त्यावर गजाचे उघड्या भिंतीवर रोवलेले मोकळे ढाकळे आवरण, ज्यातून मुक्तपणे हवा खेळे. त्यामुळे त्यावेळी फ्रीज नसले तरी नारळ भाजी हवेच्या गारव्यात टिकून राही. अलीकडल्या भिंतीला घुसळखाम्बा म्हणजे साईचे ताक साधे ताक घुसळण्यासाठी केलेले. दोन भिंतीतील हुक त्याला अडकवलेल्या दोऱ्या, त्यात रवी उभी करून बरणीत सोडायची व दुसरी दोरी रविला गुंडाळायची आणि दोरीची दोन टोके मागे पुढे ओढली की रवी अलगद ताकात फिरून लोणी चट्कन येई हे एक यंत्र म्हणाना कां? सोपं सुटसुटीत! पुढे गेल्यावर उजवीकडे दार होते बाहेर पडायला त्याच्याबाहेर सुम्भाच्या दोरीच्या शिंकाळ्यात छोटे मातीचे मडके टांगलेले असे. त्यात दात घासायला ‘कणे’ ठेवलेले असत. कणे म्हणजे भाताच्या वरची निघालेली फोलपटे, जाळून त्यांची केलेली राखुंडी, दात घासण्यासाठी व भांडीही स्वच्छ करण्यासाठी वापरत असत. तेथून बाहेर पडले की समोरच बांधलेला मोठा सिमेंटचा हौद आहे. तो सतत विहिरीच्या पाण्याने भरलेला असे. पाणी घ्यायला पितळी तपेल्या असत. किंवा छोट्या पत्र्याच्या बादल्या असत. एका बाजूला मोठी धोंड आडोसा केलेली, नारळाचे झाप विणून त्त्याला लावलेले असत. त्याने गोठा, घरे शाकारली जात. हे झाप विणायला बायका रोजंदारीवर येत असत. नारळाच्या हिरव्या झावळ्या काढून त्या चटई सारख्या विणल्या जात. ती एक उत्कृष्ठ कला होती. आता कितपत टिकून आहे माहित नाही. 

हौदाच्या उजव्या अंगास पाणी तापवायला चूल घातलेली असे. जळण वाडीतले भरपूर असे. नारळाची चोड, (अखंड नारळ सोलून निघालेली साल) नारळाच्या वाळलेल्या झावळ्या इतर काटक्या असत. पाणी काढून धोंडीवर बादलीत आणायचं भर घालायची की अंघोळीची तयारी व्हायची लहानपणी आजी कौतुकाने न्हायला घाली रिठ्याने केस धुवायची शिकेकाईनेही असे. किती जपले तरी थोडे तरी पाणी डोळ्यात जाई व डोळे चुरचुरत. पण आजीने घातलेली कौतुकाची अंघोळ या लाडावलेल्या नातीला मनापासून आवडे. 

माजघरातून उजव्या हाताला दार होते ते दुकानाच्या पडवीत उघडे. तेथेच लागून जिना होता, घराच्या माळ्यावर जायला, दुसरा आतून डाव्या बाजूला बापूच्या माजघराजवळ होता. पूर्वी खेडेगावातलं किराणा मालाचं दुकान आजोबा चालवत असत. म्हणून त्या पडवीला कायमचे नाव दुकानाची पडवी असे पडले. लाकडी झोपाळ्याच्या उजव्या हाताला बाळंतीणीची खोली होती. आणि एरवीची आजी आजोबांची खोली असे. त्यात महत्वाचे अंगावरचे डाग, रक्कम इत्यादी ठेवलेले असे. 

समोरच्या बाजूस स्वयंपाकघाराचे दार होते. आत प्रवेश करताच उजवीकडे दाराच्या बाजूला मांडणी. डावीकडे माजघराच्या भिंतीला भिंतीत कपाट, आणि पूर्वेच्या भिंतीला खाली दोन चुली, बाजूला वैल हि होता. पडवीच्या भिंतीला पाण्हेरे ( पाण्याचे हंडे , पिंप ठेवायची जागा) तेथे बाजूला हात धुवायला छोटी मोरी होती. बाहेर जायचे दाराच्या उजव्या हाताला भिंतीतले फडताळ असा हा स्वयंपाकघराचा सरंजाम. तेव्हा पितळी ताटे, वाट्या, भांडी, वापरायची पद्धत होती. ताटांना कल्हई लावली जाई.

आम्ही मुंबई हून आल्यावर घरात प्रवेश केल्यावर पहिले हौदावर (टाकी) जाऊन हात पाय धुवत असू. मग चपला घालून मामाच्या वाडीत भिरी भिरी हिंडून वाडीभर प्रत्येक झाडा पानांचे निरीक्षण करत असू. बोटीतून आल्याने डोळ्यात व डोक्यात सतत एकतास हलणारे फिरणारे पाणी पाहिल्याने काहीवेळ डोक्यात फिरल्यासारखी जाणीव होत राही. वाडी पाहतानाही असेच फिरल्यासारखे होई, पण सर्व नजरे खाली घालून आम्ही जेवायची हाकाटी आल्यावर घरात परतत असू.

—–क्रमश: 

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ गिरगावातला गोविंदा ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

 

श्रावण महीना सुरू झाला की आपल्या सणांची सुरवात होते आणि नकळतच मन गिरगावात पिंगा घालायला लागते.

नाग पंचमी, राखी पौर्णिमा ह्यानंतर आठवड्यानी येणारी गोकुळाष्टमी हा सण गिरगावकर मोठ्या उत्साहाने आणि जोशाने साजरा करत. 

१९६३ सालचे ‘ब्लफमास्टर’ सिनेमा मधील शम्मी कपूरचे गोविंदयाचे गाणे हे गिरगावातील मांगलवाडीत चित्रित झाल्याने 

गिरगावातील गोविंदयाला खूपच प्रसिद्धी मिळाली. संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी हे तेंव्हा गिरगावात रहात असल्याने त्यांनी गिरगावातील गोविंदयाचे हुबेहूब चित्रण करून गिरगावातील गोविंदयाचे जगभर दर्शन घडविले. 

गिरगावात गोविंदा हा प्रत्येक वाडीमध्ये साजरा होत असे. प्रत्येक वाडीची गोविंदा टोळी ही आपल्या वाडीच्या हंड्या फोडल्या कि आपल्या आजूबाजूच्या दुसऱ्या वाडीच्या हंड्या फोडायला बाहेर पडत असत. ‘गोविंदा आला रे आला मडकी सांभाळ ब्रिजबाला’ तसेच ‘एक दोन तीन चार, XXX दादाची पोरे हुशार’ असे गात आणि नाचत गल्लोगल्ली फेरफटका मारला जायचा. तेंव्हा गिरगावात दादा लोकांची कमी नव्हती. जो गोविंदयाला जास्त पैसे देईल त्याचे नाव जोडले जायचे. हे करताना डावा  हात पुढच्याच्या पॅन्टला धरून, कमरेत वाकून, उजवा हात हलवत एक एक पाऊल  ठराविक लयीत टाकला जायचा. ह्याचे चित्रणही ब्लफमास्टरच्या गाण्यामध्ये व्यवस्थित केले आहे. त्या गाण्याच्या चित्रीकरणात मूळचे गोविंदा खेळणारे दिसत आहेत. हाल्फ पॅण्ट आणि बनियन ह्यावर गोविंदा बाहेर पडत असे. वाडीतील काही जण नेवैद्य म्हणून फळांचे ताट नाहीतर गोड  शिरा असे गोविंदा समोर ठेवत असत. गोविंदावर सर्व बाजूनी पाण्याचा वर्षाव केला जायचा. त्यामध्ये एखादयाकडून गरम पाणी अंगावर पडल्यास, अजून पाणी टाकण्याची मागणी केली जायची. ‘तुमच्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा’ असे मोठ्याने ओरडून वाडीतील रहिवाश्याना अजून पाणी टाकण्यास उद्युक्त केले जायचे. काही टवाळ मुले लांबूनच पाण्याचे फुगे मारायचे. ते फुगे मारण्यात एवढं तरबेज असत कि ज्याला फुगे लागायचे त्याला कळायचेही नाही कि फुगे आले तरी कुठून. वरून होणारा पाण्याच्या फुग्यांचा मारा चुकवत वाडीच्याबाहेर पडणे म्हणजे एक मोठे दिव्यच असे. 

पूर्वी गोविंदा हा राष्ट्रीय सण म्हणूनच मानला जायचा आत्तासारखे राजकीय सणाचे स्वरूप त्याला नव्हते. त्यामुळे टी शर्ट आणि मोठ्या बक्षिसांच्या थैल्यांचे आमिषही नव्हते. 

काही मोठ्या वाड्यांचे गोविंदा बरोबर एक सीन ही असे. एका ट्रक मध्ये वाडीतल्याच मुलांना चेहऱ्यावर रंग लावून पुराणातील एखाद्या प्रसंगाचे दर्शन घडत असे. नंतर काही राजकीय घडामोडींचे किंवा त्यावेळेच्या ज्वलंत घडामोडीचे विषय घेऊन सीन बनवले जायचे. 

बहुतेक हंड्या ह्या तीन ते चार थराच्या असायच्या. पूर्वी हंड्यांमध्ये उंचीची स्पर्धा नव्हती. हंड्या फोडून थोडे फार जे काही पैसे मिळायचे त्यामधून सगळ्यांना वडापाव मिळाला तरी बरे वाटायचे आणि जर काही जास्त प्रमाणात पैसे मिळाले असतील तर रात्री भुलेश्वरच्या कन्हैया ह्याच्या किंवा किका स्ट्रीटच्या पाव भाजीच्या गाडीवर त्याचे सेलिब्रेशन होत असे.  

त्याकाळी गिरगावात ठाकूम – माकूम, ढोल – ताशा हि वाद्य जाऊन कच्छी बाजा आणी ढोल हा जास्त वापरात येत होता. १९५१ च्या अलबेला सिनेमात संगीतकार सी रामचंद्रांनी त्याचा पहिला वापर हा भोली सुरत ह्या गाण्यासाठी केला होता. 

कच्छी बाजा आणि ढोल ह्याशिवाय गोविंदयाला पूर्णत्व मिळत नसे. तसे वाजवणारे खूप जण होते पण सनईवर अबूभाई आणि पोंक्षे, विजय चव्हाण, इब्राहिम, परश्या असे मोजकेच प्रमुख ढोल वाजविणारे ठरवायचे असले कि वर्गणी जमवण्यावर जोर द्यायला लागायचा. त्यासाठी वाडीतले सगळे एकवटून कामाला लागायचे. एकदा का गोविंदयाच्या दिवशी कच्छी बाजाचा आवाज यायला लागला कि आपोआप वाडीतले सगळे जमा होऊन आणि आपसूक टोळी तयार होऊन गोविंदा नाचायला सुरवात होत असे. कधी कधी दोन गोविंदा समोरासमोर आले आणि त्यामध्ये वरील दिग्गज वाजवणारे असले कि जुगलबंदी हि व्हायचीच आणि ऐकणाऱ्यांसाठी आणि नाचणाऱ्यांसाठी तो एक आयुष्यभरासाठी आठवणींचा ठेवा असायचा. 

पूर्वी राजेश खन्ना रहात असलेली ठाकुरद्वारच्या कोपऱ्यावरची सरस्वती निवास येथेच एक उंच हंडी बांधली जायची. ती हंडी फोडायला लालबाग, उमरखाडी असे लांबून गोविंद्याच्या टोळ्या येत असत. एखादा गोविंदा ती हंडी फोडायचा प्रयत्न करतोय असे समजले कि पूर्ण ठाकूरद्वारचे चारही रस्ते खचाखच भरून जायचे. प्रत्येकजण एक विलक्षण अनुभूतीचा साक्षीदार होण्यासाठी धडपडत असे. पहिले तीन थर आरामात लावले जायचे. चौथ्या थरापासून थरार चालू होयचा. पाचवा थर हा फक्त दोन  जणांचाच असायचा. प्रत्येकाचे श्वास रोखले जायचे. पाचव्या थरानंतर हंडी फोडायला दोन एक्के का तीन एक्के म्हणजे एकावर एक असे दोघे का तिघे लागतत ते ठरायचे आणि हंडीला कसाबसा फोडणाऱ्या गोविंदाचा हात लागायचा आणि हंडी फोडली जायची. हंडी फोडणारा आणि सगळे थर लगेच हळूहळू सावरत खाली यायचे आणि एकच जल्लोष व्हायचा. कच्छी बाजा जोरात वाजायला लागायचा आणि नुसता गोविंदाच नाही तर सगळेच जोशात नाचायला लागायचे. हंडी फुटल्याचे एक वेगळेच समाधान सगळ्यांच्या चेहऱ्यावर असायचे. संध्याकाळ पर्यंत सगळीकडे असेच उत्साहाचे वातारण असायचे. सकाळपासून गजबजलेला गिरगाव रात्रीमात्र शांत आणि थकलेला असायचा पण तो एका दिवसापुरताच कारण दुसऱ्यादिवशी पासून लगेच गणेशोत्सवाच्या तयारीला गिरगावात सुरवात व्हायची. 

अजूनही गिरगाव सोडून गेलेला गिरगावकर गोविंदयाच्या दिवशी एकतर गिरगावातील गोविंदयाला हजेरी लावतो नाहीतर जेथे असेल तेथे गिरगावचा माहोल बनवून गोविंदा साजरा करतो. पण त्याचे मन मात्र गिरगावातच घिरट्या घालत रहाते हे ही तितकच खरं.

       

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

सौ. राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ गोकूळ अष्टमी निमित्त – कृष्णा …… ☆ संग्राहक : सौ. राधिका भांडारकर ☆ 

जन्माष्टमीच्या निमित्ताने वाचलेली, कै. दुर्गा भागवतांनी लिहिलेली ही सर्वोत्तम पोस्ट:

?

कृष्णा,

तुला कसलं संबोधन लावायचं? तू आकाशासारखा वाटतोस मला, आकाश कसं सतत माथ्यावर असतं आपण जिथे जाऊ तिथे सोबत करतं पण त्याचा निळा रंग बोटावर नाही घेता येत…

खरं म्हणजे तुझं नाव घेतल्यावर तू मानवी रूपात डोळ्यासमोर येतच नाहीस.. आधी येते ती आकाशाची गडद निळाई आणि मग त्यामागोमाग लहरत येतं एक मोरपीस… तुझं मोरपीस!

तुझ्याइतका मानवी जीवनात मिसळलेला कुठलाच देव नाही बघ! प्रत्येक नातं तू समरसून जगलास आणि वेळ येताच ते नातं त्यागून मोकळाही झालास! कधी परत वळून बघितलंस का रे मागे? तुझ्यामागे त्या माणसांचं काय झालं असेल तुझ्याशिवाय ?

तुझं सगळंच अतर्क्य! तू प्रचलित नियम मोडलेस. जन्म घेतलास वसुदेव देवकीच्या मथुरेत पण वाढलास नंद यशोदेकडे गोकुळात! दहीदुधाच्या चो-या केल्यास, भलत्या वयात गोपिकांची छेड काढलीस. सुदामा, अर्जुन, उद्धव यांचा मित्र तू होतासच पण द्रौपदीचा सुद्धा ‘सखा’ झालास. हे सुंदर नातं तू भारतीय स्त्रीला दिलंस. ‘बाईचा मित्र’ ही संकल्पनाच नव्हती तुझ्याआधी आपल्याकडे, ‘तो’ स्त्रीचा पिता, पती किंवा पुत्र असावा अशी आपली समाज रीत! विवाहित राधेचा प्रियकर झालास. अगदी प्रेमाचं प्रतिक म्हणून नाव घेताना राधेचं नाव तुझ्याआधी येतं.

पुढे अष्टनायिकांचा पती झालास तरी जरासंधाच्या तावडीतून सोडवलेल्या सोळा सहस्र स्त्रीयांना अभय दिलंस. तुझ्यानंतरही अनेक वर्षांनी सूरदासांनी तुझं बालपण त्यांच्या पदांतून मांडलं, मीरेने तुला ‘नटनागर गिरिधारी’ म्हणत साद घातली.

एक सांग, तू अनेक नाती निभावलीस पण जीव जडवलास तो फक्त राधेवर…! खरं ना? गोकूळ सोडल्यावर परत तू बासरी वाजवल्याचे उल्लेख कुठेच आढळत नाहीत.

गीतेत ‘यदा यदा हि धर्मस्य’ म्हणत तू परत येण्याचं वचन दिलं आहेस. पण आता युद्धासाठी नको रे येऊस, आम्ही माणसं म्हणजे एक एक बेट झालोय, यावर नात्यांचे पूल बांधायला ये!

आणि हो, येताना रुक्मिणीला नाही आणलंस तरी चालेल पण राधिकेला सोबत घेऊन ये, म्हणजे तुझी बासरी ऐकायला मिळेल.

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!

—–दुर्गा भागवत.

संग्राहक : सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares