मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

 ☆ मनमंजुषेतून ☆ आगळं वेगळं सुख ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ ☆ 

आम्ही दोघेच शिळोप्याच्या गप्पा करत बसलो होतो. सोसाट्याचा वारा सुटला आणि त्यापाठोपाठ पाऊस कोसळला. इतका की आम्हाला एकमेकांचे आवाज ऐकू येईनात. मग आम्ही दोघेच आमच्या नव्या नवलाईच्या दिवसांच्या आठवणी मनातल्या मनात आळवत शांत बसून राहिलो.

तीस वर्षांपूर्वी नवीन लग्न झालं. आम्ही आनंदात चिंब भिजत होतो आणि गळणाऱ्या घरात राहत होतो. कौलारू घर गळतीन भरून जायचं .   ठेवायची पातेली आणि थांबला पाऊस की त्यातलं मळकट पाणी द्यायचं  ओतून. ओली जमीन कोरडी करायची आणि पुन्हा परस्परांच्या प्रेमात चिंब व्हायचं असे ते छान दिवस होते.

दोघांनी मिळून घराच स्वप्न पाहिलं खूप मेहनत घेतली. तेव्हापासूनआमचा आयुष्य घाईगडबडीत झालं. उठा, आवरा, पळा, कामावरून या, झोपा ,आवरा, लवकर पळा असं चुकीचं पण आवश्यक. कारण भविष्यात सुख मिळायला हवं. भविष्याबाबत ची अनिश्चितता आयुष्याच्या नाण्याची दुसरी बाजू असते. अशीच स्वस्त पणाने मी आताही घरात बसले होते. शिळोप्याच्या गप्पात कुठेच अनिश्‍चितता डोकावत नव्हती.  गप्पा सरणाऱ्या नव्हत्याच….. पावसाने थांबलेल्या होत्या. अचानक छतावरून एक पावसाचा  थेंब माझ्या डोक्यात पडला. भांबावून जात मी वरती पाहिले. ज्या घराला तीस वर्षे पुरी झाली होती. त्या वास्तुने आलेला पुराचा तडाखा सोसला होता.  आमच्या घराने गतवर्षी इतक्या पावसाने सुद्धा कुठे गळती झाली नव्हती म्हणून आम्ही दोघेही खूप आनंदात होतो.

मी छताकडे पाहिले .एका कोपऱ्यातून टप टप टप संततधार सुरू झाली होती. ती पाहताना माझे डोळे मिटले. जणू बाहेरचा पाऊस  या डोळ्यात आला होता. आमच्या नव्या संसाराच्या नवलाईच्या दिवसाच्या आठवणी जाग्या करत होता. पंखात बळ आल्यावर आमची पाखरे घरट्यातूनउडून गेली होती.

पुन्हा एकदा दोघेच होतो.

पुन्हा एकदा पाऊस होता.

पुन्हा एकदा छत गळत होतं.

तेच टपटपणारे थेंब नव्हते.   यंदा या अनिश्चित वातावरणात कोणी छताची दुरुस्ती करणार आहे नव्हतं.

नवा पाऊस पडणार होता.

मनाचा आभाळ स्वच्छ करणार होता. काऊच घरटं दुरुस्त होणारच होतं. तोवर आठवणींचे आगळेवेगळे थेंब टपटपत राहणार होते……. राहणार होते.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुंबर ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

☆ विविधा ☆ झुंबर ☆ सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

आज सन्कष्टी चतुर्थी! सान्गलीच्या गणपती मन्दिराची आठवण आली. ‘झुम्बर’ म्हन्टल की मला सान्गलीचे गणेश मन्दिर डोळ्यासमोर येते. त्या दगडी कमानीतून प्रवेश करून प्रत्यक्ष मन्दिरात गेलं की ते काचेचे झुम्बर लक्ष वेधू न घेत असे. गणेशाची सुबक, सुंदर मूर्ती, प्रसन्न वातावरण आणि मन्दिराचा प्रशस्त अन्तर्भाग !विविध रंगाच्या हन्ड्यानी आणि एका  मोठया

काचेच्या झुम्बराने सजवलेले मन्दिर बघत बसावेसे वाटत असे. गणपतीत आणि सणासुदीला ही झुम्बरे दिवे लावल्यावर लखलखत असत. त्या  मोठया  झुम्बराचा प्रकाश मन्दिर उजळवून टाकत असे.

पूर्वी च्या काळी राजेरजवाड्याच्या महालान्ची, दरबाराची शोभा अशा झुम्बरानी खूपच वाढवली होती. बडोदा, म्हैसूर सारख्या ठिकाण चे राजवाडे पहाताना अशी झुम्बरे राजाच्या रसिकतेचे

आणि ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून छताला टान्गलेले, दिसत असे. मोन्गलकालीन  कथा असलेल्या सिनेमात सुध्दा अशी काचेची झुम्बरे कौशल्याने वापरलेली असत!

आता हा झुम्बर प्रकार फारसा दिसत नसला तरी दिवाळीत, सणासुदीला, गणपतीच्या सजावटीत अशी झुम्बरे वापरली जातात. झुम्बराचा आकार कधी गोल तर कधी निमुळता होत गेलेला दिसतो. असन्ख्य काचेच्या लोलकानी झुम्बर बनलेले असते. त्यात रन्गीत दिव्याची भर टाकून

ते अधिक सुशोभित केले जाते !

रोषणाईतला हा झुम्बर प्रकार निसर्गातही आपल्याला पहायला मिळतो. जाम्भळ्या, पिवळ्या रंगाची कँशियाची फुले झुबक्यातून झुम्बरासारखी लोम्बकळताना पाहिली की ती नैसर्गिक झुम्बरे मनाला लोभवतात. केशरी फुलांचे गुच्छ ही असेच दिसतात !

आणखी एका ठिकाणी मला हे झुम्बर आवडलं, ते म्हणजे द्राक्षेबागेत !द्राक्षाच्या बागेतत्या मान्डवाखालून फिरताना द्राक्षाचे घोस झुम्बरासारखे आणि ती टपोरी द्राक्षे मण्यासारखी बघून मन हरखून जाते !

निसर्गात अशी वेगवेगळ्या प्रकारची झुम्बरे पहाताना पौर्णिमेच्या रात्री आकाशाच्या छताला चान्दण्यान्ची असन्ख्य झुम्बरे टान्गलेली आणि  त्यामध्ये चान्दोबा एखाद्या चांदव्यासारखा

दिसतो .त्यांच्या कडे बघता बघता माझ्या  मनात विचारांची छोटी छोटी झुम्बरे साकार होऊ लागतात! आठवणीची आणि विचारांची  अशी असन्ख्य झुम्बरे मनाच्या आकाशात लटकलेली

असतात. ती साकार, होऊ लागतात शब्दांच्या रूपात!

एक एक शब्दांची गुम्फण करतांना मनाच्या पटलावर अशा झुम्बरान्ची सुंदर आरास तयार होते. ही शब्द झुम्बरे शब्दात अशी काही उतरतात, की त्यांची एक सुंदर आरास तयार, होते आणि त्यातूनच एखादे कवितेचे किंवा लेखाचे ‘झुम्बर – शिल्प ‘कागदावर उतरते.

 

© सौ. उज्वला सहस्त्रबुद्धे

मो.नं . 8087974168

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ लागेबांधे ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆  लागेबांधे ☆ श्री अरविंद लिमये ☆

वेळा सांगून येत नाहीत असं म्हणतात. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण, सुखद असो वा दु:खद तो स्थितप्रज्ञतेने स्विकारावा असं म्हणतात. पण ते शक्य होतंच असं नाही. बर्याचदा नाहीच होत. क्षण दु:खाचा, संकटाचा असेल तर नाहीच. अशीच एखादी अप्रिय घटना पुढे येणार्या संकटातलं गांभिर्य कमी करायला निमित्तही ठरु शकते. नव्हे नियतीनेच या घटनांमागचा कार्यकारणभाव नियत केलेला असतो. फक्त ते आपल्याला माहित नसतं एवढंच. पण समजतं, तेव्हा मनाला होणारा  दिलाशाचा स्पर्श,  अंगाची लाहीलाही करणार्या, असह्य

चटके देणार्या उन्हात अचानक थंड गारव्याचा शिडकावा करणार्या ओलसर काळ्या ढगासारखा सुखद भासतो. त्याचीच ही गोष्ट!

२०१६ मधे आम्ही पुण्याच्या  ‘क्वेस्ट टूर्स ‘तर्फे’ सेव्हन सिस्टर्स’

टूरला गेलो होतो. आसाम, मेघालय, अरुणाचल करुन आमचा मुक्काम काझीरंगा अभयारण्याजवळच्या एका लाॅजवर होता. टूरचे अकरा दिवस मजेत गेले होते. चाळीस जणांचा मोठा ग्रूप, पण प्रत्येकाला नावाने ओळखण्याइतका जवळ आलेला. आता नागालॅंड,  मणिपूर, त्रिपुरा होईपर्यंत ओळखी अधिक घट्ट होण्यापूर्वीच ती अप्रिय घटना घडली. त्यामुळे आम्ही जवळ आलो खरे पण असे ‘समदु:खी’ म्हणून. . !

कारण काझीरंगाला दुपारचं जेवण आवरुन आम्ही नागालॅंडसाठी प्रस्थान ठेवलं ती अनपेक्षित अरिष्टाची सुरुवात होती. आम्ही हास्यविनोद,

गप्पा, गाणी यात सर्वजण दंग असणातानाच नागालॅंड बाॅर्डरच्या खूप आधीच एका चेकपोस्टजवळ आमच्या गाड्या अडवण्यात आल्या. टूर मॅनेजर आणि ड्रायव्हर काय झालंय ते पहायला खाली उतरले आणि हताश होऊन परत आले. नागालॅंड बाॅर्डरपासून आत सर्वदूरपर्यंत सशस्त्रपोलिसांचा बंदोबस्त होता. अचानक सुरु झालेल्या आंदोलनाने उग्ररुप धारण केले होते. त्याच दरम्यान एके ठिकाणी बाॅंम्बस्फोट होताच १४४ कलम लागू केले होते. यामुळे पुढे जाणं

शक्यच नव्हते आम्ही पुन्हा मागे फिरुन काझीरंगाच्या त्याच लाॅजवर आश्रयाला आलो. टूरचा मनसोक्त आनंद घेत

असतानाच दूधात मिठाचा खडा पडावा तसं झाल़ं न् सगळ्यांचा आनंद विरजून गेला. इतर सर्वजण अगदी माझी पत्नीसुध्दा स्वत:चं वैषम्य लपवू शकले नव्हते पण मी मात्र स्वस्थचित्त होतो. त्यामागचं खरं कारण जाणवायला पुढे पुलाखालून बरंच पाणी जायला हवं होतं. पण त्याक्षणी मात्र आमच्यापेक्षाही कितीतरी पटीने टूर मॅनेजरच्यासमोर असंख्य प्रश्न आ वासून उभे असल्याचे मला जाणवले. विचार करण्यात वेळ न घालवता त्याने सगळी सूत्रे तत्परतेने हलवायला सुरुवात केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्वेस्टच्या मॅनेजमेंटशी त्वरीत संपर्क साधला. सविस्तर चर्चा करुन टूर पॅकअप करायचा निर्णय घेतला. अशा अपरिहार्य कारणाने

टूर अर्धवट सोडायला लागली तर करारानुसार टूरकंपनी पैसे परत करायला बांधील नसते. तरीही कंपनीमार्फत आम्हा सर्वांची परतीची मूळ रिझर्वेशन्स कॅन्सल करुन कंपनीखर्चाने लगेचची रिझर्वेशन्स लगोलग करुन दिली गेली आणि हिशोबाने होईल ती बाकी रक्कम प्रत्येकाच्या बॅंक खात्यावर थेट जमा करण्याचे आश्वासन दिले. (आणि नंतर ते पाळलेही!)

परतीच्या प्रवासासाठी निरोप घेताना, आनंदाऐवजी असा

विरसच सर्व प्रवाशांच्या मनात होता. अर्थात हे अपरिहार्यही होतंच. म्हणूनच सर्वानी मनाविरुध्द का होईना ते स्विकारलंही.

परतीचा प्रवास सुरु झाला, तरी आरती, माझी पत्नी मात्र गप्पगप्पच होती. तिला बोलतं केलं, तर विषय तोच.

“खूप आधीपासून प्लॅनिंग करुन, एडवांस बुकिंग करुनसुध्दा काय झालं ते पाहिलंत ना?”ती म्हणाली.

“आपण नागालॅंडच्या लाॅजवर चेक इन केल्यानंतर कर्फ्यू लागला असता तर काय करणार होतो आपण?उरलेले दिवस आणि पैसे सगळंच फुकट गेलं असतं आणि आपण पुन्हा अधांतरीच. आत्ता आपण सुखरुप आहोत आणि मार्गीही लागलोय हे महत्वाचं. . “स्वत:चीच समजूत काढल्यासारखं मी बोललो तरी ते खरंही होतंच. पण नियतीने माझ्यापुरता नियत केलेला या घटनेमागचा नेमका कार्यकारणभाव मलातरी तेव्हा कुठे माहित होता?

आम्ही दोघे अकल्पितपणे खूप दिवस आधीच परत आल्याचं पाहून आमच्या दोन चिमुरड्या नातींच्या उत्साहाला तर उधाणच आलं. त्यांच्या त्या बालसुलभ उत्साहात आमचं ट्रीप अर्धवट राहिल्याचं दु:ख नकळत विरुन गेलं. चहापाणी, बॅगा आवरणं, आणि ट्रीपमधे आलेल्या अडचणीबद्दल सविस्तर सगळं सांगणं यात रात्रीची जेवणंही आवरत आली. गप्पात सून भाग घेत असली तरी नेहमीसारखी मोकळी वाटत नव्हती आणि सलील, माझा मुलगा कांहीसा गंभीर. माझं जेवण झालं तसं तो जवळ येऊन बसला.

“बाबा, तुम्ही टेन्शन घेणार नसाल तर एक सांगायचं होतं. ”

“बोल ना, काय झालंय?”

“उदयदादाचा काल कोल्हापूरहून फोन आला होता. पुष्पाआत्याबद्दल”

“तिचं काय?”मी मनोमन चरकलो होतोच. माझ्या आवाजातली थरथर त्यालाही जाणवली असणाराच. . .

ती माझी मोठी बहीण. आम्हा लहान भावंडांसाठी तिने खाल्लेल्या खस्तांवरच तर आमचं स्थैर्य उभं राहू शकलं होतं. तरीही स्वत: कांही केल्याचा टेंभा कधी मिरवला नाहीन. उलट आमच्या लहानसहान गोष्टींचंही कौतुक मात्र उदंड. अतिशय मितभाषी, हसतमुख. माझ्या तर विशेष जवळची. तिला कांही झालं असल्याच्या कल्पनेनेच मी कासावीस झालो.

“तुम्ही ट्रीपला गेला होतात.  तुम्ही तिकडे काळजी करीत रहाल म्हणून तुम्हाला फोन न

करता त्याने काल मला कळवलं होतं. ”

“झालंय काय पण?”

“आत्याच्या डाव्या हाताचं बोट खूप दिवसांपासून दुखत होतं म्हणे. आधी तिने फार लक्ष दिलं नव्हतं. बोटाला थोडी सूज जाणवली तेव्हा मग डाॅ. ना दाखवलं. बरेच दिवस औषध घेऊनही फरक पडेना म्हणून आर्थोपेडिकना दाखवलं.  एक्सरेमधे बोटाच्या हाडाला इन्फेक्शन झाल्याचं दिसून झा्

आलं. आठ दिवसांच्या अॅंटिबायोटीक्सनंतरही सूज वाढलीच. आता बोटाच्या हाडाचा भूगा होऊन इन्फेक्शन वाढत चालल्याने इतर बोटाना त्रास नको म्हणून बोट कापायचं ठरलंय.  दादाने दुसर्या आर्थोपेडिकचं सेकंड ओपिनीयनही घेतलंय आणि दोन दिवसानी सोमवारी आॅपरेशन करायचं ठरलंय. “ऐकता ऐकता मी गंभीर झाल्याचं पाहून सलिल बोलायचं थांबला क्षणभर.

“बाबा, आत्ता नऊच तर वाजलेत.  तुम्ही फोन करता का आत्याला? बोला तिच्याशी. म्हणजे तिला न् तुम्हाला दोघानाही बरं वाटेल. “मी मानेनेच नको म्हंटलं.  “मी उद्या कोल्हापूरला जाऊन येतो. समक्षच भेटतो. त्याशिवाय मलाच चैन पडणार नाही. . “मी शांतपणे सांगितलं खरं, पण ती शांतता वरवरचीच होती. आतून मात्र मी तिळतिळ तुटत होतो. रात्रभर डोळ्याला डोळा नव्हता.  माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या,  माझ्यावर उदंड प्रेम करणार्या माझ्या ताईचं माझ्या आयुष्यातल़ं नेमकं स्थान ती संकटात असल्याचं कळल्यानंतर असं

जाणवलं आणि हतबल मी कासावीस होत कूस बदलत राहिलो. तिचं हे दुखणं काय किंवा आॅपरेशनचा निर्णय काय, तिने नेहमीच्याच सहनशीलतेने आणि धिरोदात्तपणे स्विकारला असेलही कदाचित, पण मलाच ते स्विकारता येईना. ट्रीप अर्धवट सोडून यावं लागल्याने मला आधी समजलं तरी. आणखी दोन आठवड्यांनी आलो असतो तर तिचा बोट कापलेला हातच पहावा लागला असता. नुसत्या कल्पनेनेच अंगावर सरसरुन काटाच आला. पण मला आधी समजून तरी उपयोग काय?तिचं बोट मी वाचवू शकणाराय थोडाच?माझ्या हतबलतेने मी अधिकच अस्वस्थ झालो. उलटसुलट विचारांच्या ग्लानीत तरंगत असतानाच माझ्या

मिटू लागलेल्या नजरेसमोर

सांगलीच्याच डाॅ. परांजपेंचा मला आश्वस्त करणारा चेहरा तरळून गेल्याचा भास मला झाला आणि त्याच ग्लानीत झोप कधी लागली समजलंच नाही. सकाळी उशीरा जाग येत असतानाच नजरेसमोर तरळून गेलेला तो चेहरा आठवला न् मी कांहीतरी सापडल्याच्या आनंदाने  ताडकन् उठून बसलो.  मी सावरलोय हे पाहूनसलिललाही बरं वाटलं.

“लगेच चहा घेऊन आवरताय का?कोल्हापूरला जाऊन येऊ लगेच. “ही म्हणाली.

“नाही. . नको. दुपारनंतरच निघू म्हणजे तिचाही आराम होईल. “मी म्हणालो. सकाळी लवकरची अपाॅईंटमेंट घेऊन डाॅ. परांजपेना भेटलो. ताईच्या तक्रारीबद्दल सविस्तर कल्पना दिली.

“मला जखम बघावी लागेल. सगळे रिपोर्टसुध्दा. मगच कांही सांगता येईल. “डाॅ. म्हणाले आणि ते योग्यही होतंच.

“पण आज शनिवार. मी दुपारनंतर तिला भेटायला जाणाराय. तिला आणायचं म्हंटल़ं तर उद्या रविवार. सोमवारी तर ऑपरेशन होणाराय. ”

डाॅ. आमच्या घराजवळच रहातात. त्यामुळे त्यानी रविवारी घरी आलात तरी चालेल असं सांगितलं. मला तर तो शुभशकुनच वाटला.

दुपारच्या कोल्हापूरच्या भेटीत सविस्तर चर्चा झाली. माझ्या आग्रहाखातर त्यांनी डाॅ. परांजपेना भेटायची तयारी दाखवली. दुसर्या दिवशी माझा भाचा न् सून ताईला कारने घेऊन आले. जखम पाहून त्यानी सगळे रिपोर्टस् नजरेखालून घातले. ते काय बोलणार याची जीवाचे कान करुन वाट मी पहात राहिलो.

“बोट वाचेल. पण आत्ता १००% खात्री देत नाही. आत्ता फक्त ८०%. बाकी २०% माझी औषधं सुरू झाल्यानंतर मिळणार्या प्रतिसादावर अवलंबून असेल. तरीही तुमच्या आर्थोपेडिकना विश्वासात घेऊन हे सगळं सांगा. मला खात्री आहे, आॅपरेशन पुढे ढकलायला ते विरोध नाही करायचे. ”

डाॅ. परांजपेनी स्वत: तयार केलेलं एक विशिष्ठ तेल रोज बोटाला मसाज करण्यासाठी दिलं. ड्रेसिंग करायची न् मसाज करायची पध्दत, औषधाच्या गोळ्या घ्यायच्या वेळा, सगळं समजावून सांगितलं. ताईच्या सूनेनं ती सगळी जबाबदारी मनापासून स्विकारली आणि पारही पाडली. पुढे जवळजवळ सहा महिने हे प्रोसेस सुरु होतं. कणाकणानं सुधारणा होत अखेर बोट वाचलं. . !

त्यानंतरच्या प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबिजेला जेव्हा ताई मला ओवाळते तेव्हा त्या निरांजनांच्या प्रकाशात माझ्याही नकळत माझी नजर तिच्या हातातल्या तबकाखाली लपलेल्या त्या बोटाचा वेध घेत रहाते. . !

या घटनेनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय पण ही आठवण मात्र वाहून नाही गेली. जाणं शक्यही नाही. ट्रीप अर्धवट राहून परत यावं लागण्यात माझ्या न् ताईच्या लागाबांध्यातला एक हळवा धागा नियतीने असा अलगद गु़ंफलेला होता या  जाणिवेच्या दिलासा देणार्या गारव्याने मनाला मिळणारं अनोखं समाधान कधीच न विरणारं आहे. . . !

© श्री अरविंद लिमये

सांगली

मो ९८२३७३८२८८

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

☆ मनमंजुषेतून ☆ जेष्ठ नागरिक दिन ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

(काही तांत्रिक अडचणीमुळे  ‘जेष्ठ नागरिक दिन,’ हा  लेख काल लागू शकला नाही. तो आज लावत आहोत. –  ब्लॉग संपादक)

आयुष्यात घडलेल्या घटनांच्या माध्यमातून मला जे काही शिकायला मिळाले किंवा समाजात इतर ठिकाणी पाहावयास मिळाले त्याचेच हे सार. .

एक पिढी आणि दुसरी पिढी. . .  दरम्यान कोसळून पडलेल्या पुलाप्रमाणे घडलेल्या घटनांवर आधारित. .

वार्धक्याने वाकलेल्या खांद्याविषयी. . ज्यावर बसून आपण अनेक गोष्टींचा मनमुराद आनंद लुटला. . कंपवायूने थरथरत असलेल्या हातांनी कधी काळी मुलांना हाताला धरून चालायला शिकविले पडता पडता सावरले त्या हातांनी. . . मुलांना शांत झोप लागावी म्हणून ज्या ओठांनी अंगाई गीत म्हटले. . . त्याच ओठांना आपल्या मुलांकडून “गप्प बसा,  एक शब्दही बोलू नका ” असा धमकीवजा आदेश मिळतो.  हे सत्य आहे. . .  पण जमाना बदलला आहे.  त्याच बरोबर जीवनही बदलले आहे. . .

आमच्या वयाच्या लोकांनी आठवावे? कसे आपण नात्यांमध्ये एकमेकांच्या बंधनात गुरफटलेलो होतो.  आई वडिलांच्या हसर्‍या चेहर्‍यात साक्षात ईश्वराचे रूप बघत होतो.  त्यांच्या चरणी स्वर्ग दिसत होता. . पण आताची पिढी जरा जास्तच हुशार झाली आहे.  आणि खरं सांगायचे झाले तर अगदी प्रॅक्टिकल झाली आहेत. . . आजकालची पिढी (मात्रं काही अपवाद आहे हं बरं ) आई वडिलांना शिडीसमान मानते.  शिडीचा उपयोग फक्त वर जाण्यासाठीच असतो असा त्यांचा झालेला गोड गैरसमज. . . शिडी जुनी झाली की इतर अडगळीच्या वस्तूंबरोबर ती सुद्धा अडगळीत जाते किंवा कधी जाईल याचा भरवसा देता येत नाही. . आपल्या संसाराच्या ह्या रहाटगाडयात मुलांना योग्य संस्कार देण्यात कुठे कमी पडलो की काय? असा प्रश्न उपस्थित राहतो किंवा कळत देखील नाही. .  असो. . . .

जीवन हे एखाद्या वृक्षासारखे असते.  आई- वडील हे काही कुठल्या शिडीच्या पायर्‍या नव्हेत.  तर ते जीवनाच्या वृक्षांचे मूळ आहेत.  झाड कितीही मोठे होऊ दे हिरवेगार राहू दे. . परंतू त्याचे मूळच कापून टाकले तर ते हिरवेगारपणाचच काय ?मग ते समूळ झाडचं नष्ट होईल.

मुलांच्या जीवनातील पहिले पाऊल उचलण्या मध्ये ते मदत करू शकतात तर तीच मुलं आपल्या वृद्ध आई वडिलांच्या लडखणार्‍या पावलांना सावरण्याचा प्रयत्न का करू शकत नाही?  आयुष्यभर आपल्या मुलांच्या सुखाची,  त्यांच्या आरोग्याची कामना करणारे,  त्यांच्या साठी कष्ट करणारे आई वडील या जगात कमी आहेत का? ज्यांच्यासाठी आपल्या आवडीनिवडीला तिलांजली देऊन त्यांना मोठे करणाऱ्या,  समाजात त्यांना मानाचे स्थान प्राप्त करून देणाऱ्या या आई वडिलांना आजच्या पिढीकडून किती उपेक्षा सहन करावी लागते/होते. त्यांना किती कष्टमय जीवन जगावे लागते.  आधार असूनही निराधार अवस्थेत रहावे लागत आहे.  आजकाल तर  असे चित्र पाहावयास मिळत आहे आणि पाहण्यातही आले आहे.  परंतू आजची ही पिढी हे विसरू पहात आहे कि आज ही स्थिती त्यांची झाली आहे तीच परिस्थिती उदया तुम्ही जेंव्हा वृद्ध व्हाल त्यावेळी तुमच्यावरही येणार आहे.

आपण देखील उद्या वृद्ध होणार आहोत.  आपल्यालाही प्रेमाची,  शारिरीक व मानसिक आधाराची गरज भासणार आहे. . . .  म्हणूनच म्हणते वेळीच सावध व्हा. . .

आपल्या वृद्धपकाळासाठी शक्यतो आधीपासूनच तरतूद करून ठेवा. . . जर आपण मुलांचे पालनपोषण करू शकतो तर स्वतःचे पालनपोषण शेवटपर्यंत नाही का करू शकणार?

असा मी मनाला विचारलेला प्रश्न. . . . पण त्याचे उत्तर मात्र अनुत्तरीतच. . .

 

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

9870451020

≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गरज ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा ☆ गरज ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆ 

जगण्यासाठी ‘ प्राणवायूची’ गरज! जीवनासाठी ‘जीवनाची’ (पाण्याची) गरज! तसेच उदर भरणासाठी ‘अन्नाचीही’ गरज! लज्जारक्षणासाठी ‘कापडाची’ गरज!

विश्रांतीला ‘रात्रीची’ गरज! नव्या दिवसाच्या सुरुवातीला ‘रवीराजाची’ गरज! एवढ्या मोठ्या ‘संसाराला’ ‘पृथ्वीची’ गरज!

पृथ्वीवरील मानव जात ह्या अस्तित्वासाठी ‘कळात-नकळत सर्व वायू, खनिजे,धातू’ आदींची गरज!

मानवी गरजांसाठी ‘झाडे,पशु,पक्षी ‘ व ‘निसर्गाची’ आदींची हि गरज!

मानव, पशू , पक्षी, जलचर,उभयचर याना वंशवृद्धी साठी ‘प्रजननाची’ गरज!

जन्म दिलेल्या वंशाला कर्तव्य रुपी ‘सांभाळण्याची,घडवण्याची ‘ गरज!

अर्भकाला ‘पान्हयाची’ गरज! ‘वात्सल्याची’ गरज! प्रेमाच्या ‘कुशीची’ व ‘उबेची’ गरज!

कालपरत्वे, ‘शिक्षणाची’ गरज!

हे शिक्षण फक्त पुस्तकीच नव्हे, तर ‘संस्कार, धर्म, नीतिमत्ता, माणुसकी, सामाजिक बांधिलकी, थोर मोठ्यांचा आदर, सर्वांशी नम्रता, प्रेमभाव, सहनशीलता, त्याग वृत्ती, जबाबदारीची जाण, मर्यादा आदीं शिकण्याची गरज! काही वेळेस हे शिक्षण आपोआप मिळत असते–अनुकर्णातून, अनुभवातून। पण एक माणूस म्हणून ह्या सर्व गोष्टी मिळवाण्याची गरज!

नियम व शिस्तीची गरज! मग ती स्वतापूर्ती नसून प्रत्येकाशी संबधीत जोडली जाते!

ह्या सर्व जीवनाचे ‘ रहाट गाडगे! चालवण्यासाठी मुख्यत्वे ‘चलनाची’ गरज!

‘चलन’ मिळवण्यासाठी, ज्ञान, हुशारी, चतुराई, दिवसरात्र धावपळ व कष्टाची गरज!

आपल्याकडचे ज्ञान दुसर्यांना देण्याचीही गरज! शिकण्याबरोबर शिकवण्याचीही गरज!

कचेरीत व इतर कामाच्या ठिकाणी नीटनेटकेपणा, कर्तव्यदक्षता, व्यवहार व शिष्टयाचाराची गरज!

स्वतःच्या आवडी, छंद जोपासणे व त्यातून आनंद मिळवण्याचीही गरज!

मग काहीजण संगीत म्हणतील, ऐकतील, काहीजण काव्य करतील, काही वाद्य वाजवतील, काही चित्रकार होतील,काही जण स्वैर गार झुळूक घेऊनही सुखवतील।  — जीवनाचे अवघड समीकरण सोडवताना , काही turning पॉईंट येतील. त्यावेळी कुठेतरी शांत प्रसन्न संगीत, छंदजोपासणे, समाज कल्याण आवड असणे, व करणे, ह्यातून नव्याने आपण पुन्हा घडत असतो, त्यामुळे हे छंद जोपासणे हि सुद्धा ‘गरजच’!

दैनंदिन जीवनाच्या रेलचालीत, अगदी लहान गोष्टी, वस्तू, माणसे सर्वांची आपल्याला पर्यायाने गरज लागते, भासते।

एकमेकांवर अवलंबून असलेल्या गोष्टी तर ‘गरजे’ शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत!

आणि आज प्रत्येक व्यक्ती,नाती,कचेरीत कर्मचारी, कितीही बुद्धिजीवी असुदेत एकमेकांवर, अस्तित्वावर अवलंबून असतो.

सगळं ‘मीच’ करू म्हटलं तर काहीच धड होत नाही. आणि ‘मला कोणाची गरजच नाही’ हे विधान ‘अहं’  पणाने परिपूर्ण असते. हा अहं सोडनेही ‘हितावह’ व गरजेचे असते.

आयुष्यात चालताना पडणे, धडणे, जखम होणे,चटके बसने, हेलकावे खाणे असे विविध  परवानगी आपण विविध कसोट्यातून उतरत असतो, तीही एक ‘गरजच’ त्यातून धडे घेणेही गरजेचे असते ।त्यातून खूप काही शिकत असतो आपण.

मनुष्य योनीत जन्माला येऊन जीवयातील मखमल, हिरवळ टिकवण्यासाठी काही तडजोडी कराव्यात, काही झटकून टाकावे, काही वगळावे, काही स्वीकारावे, मनाला व दुसर्यांना आनंद मिळवा म्हणून कुठलाही राग न ठेवता ‘माफ’ करावे, हि सुद्धा ‘गरज’ क्लेश तुन क्लेश व इतर वृत्ती वाढतात, त्याला वेळीच समजून आळा घालण्याची ‘गरज’.

दुसर्यांचे हित करताना, चिंताताना, आनंद द्यावा व आनंद मिळवावा. हि सुद्धा ‘गरजच’ मारून मुटकून काहीच मिळत नसते, ‘प्रेमानेच प्रेम मिळते’ , ‘प्रेमानेच प्रेम टिकते’ हे प्रेम टिवण्याचीही ‘गरजच’.

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ दानयज्ञ ☆ सौ. वीणा रारावीकर

☆ विविधा ☆ दानयज्ञ ☆ सौ. वीणा रारावीकर ☆ 

अधिक “अश्विन” सुरू झाला आहे. अधिक महिन्यात दानधर्म करावा असे सांगितले जाते. इतकेच नव्हे, तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे, याचे नियमही असल्याचे सांगितले जाते. या कालावधीत दान केलेल्या एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, असेही सांगितले जाते.

संस्कृतमधील एक श्लोक सर्वांनाच परिचित आहे.

शतेषु जायते शूरः सहस्त्रेषु च पण्डितः ।

वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवति वा न वा ॥

शूर माणूस शंभरात एक, पण्डित हजार मध्ये एक, वक्ता दहा हजार मध्ये एक परंतु दाता मिळणे मुश्किल असते.

भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये दानाला अधिक महत्त्व आहे. अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे. आजही आपण “दानशूर असावे ते  कर्णासारखे” असेच म्हणत असतो.

दान हे सत्पात्री सुध्दा असले पाहिजे. सत्पात्री दान म्हणजे जे दान आपण देत आहोत ते योग्य व्यक्तीला दिले गेले पाहिजे. जी गोष्ट देत आहोत ती गोष्ट घेण्याची त्याची पात्रता पाहिजे. ज्या वस्तूची ज्या माणसाला गरज आहे, त्याचवेळी ती दिली गेली पाहिजे.

म्हणून दान म्हणजे धन किंवा संपत्ती या स्वरुपातच दिले गेले पाहिजे असे काही नाही. श्रीमंतांकडे देण्यासाठी धनदौलत असेल, तर एखाद्या कलाकाराकडे त्याची कला तर गरीब शिक्षकाकडे त्याचे ज्ञान. रुग्णसेवेला समर्पित डाॅक्टर आणि देशसेवेला अर्पण झालेला सैनिक आपल्या जीवाची आहुती या “दान” यज्ञात करतच असतात. सध्याच्या कोव्हीडच्या महामारीत अनेक लोक आपापल्या परिने दान करत आहेत. एकमेकांना मदत करत आहेत.

आपल्यासारखे सामान्य लोक रक्तदान करतात. मरणोत्तर नेत्रदान करतात. यापेक्षा पुढे जाऊन काही लोक अवयवदान किंवा देहदान करतात. देहदान आपल्याकडे सर्वात प्रथम कोणी केले असेल तर दधीची ऋषींनी. गीतेतील श्लोकाप्रमाणे आत्मा अमर, अविनाशी  असतो.

“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।

न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।। ”

आत्म्याचे कोणत्याही शस्त्राने टुकडे करता येत नाहीत. अग्निने तो जळत नाही किंवा पाणी त्याला ओला करू शकत नाही. वायू त्याला शोषून घेऊ शकत नाही. माणसाचा मृत्यू झाला की आत्मा एक शरिर सोडून दुसऱ्या शरिरात प्रवेश करतो. मग हे मृत शरिर सुध्दा कोणाच्यातरी उपयोगी पडलं तर किती चांगली गोष्ट आहे.

आपले लाडके कवीवर्य विं.दा. करंदीकर यांनी दानाचे महत्व सांगणारी कविता लिहिली.

“देणार्‍याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणार्‍याचे हात घ्यावे”

त्यांनी स्वतःसुध्दा देहदान करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला आहे. नवीन चांगले डाॅक्टर आपल्याला हवे असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक अशी ही गोष्ट आहे. तसेच अवयवदान, त्वचादान यांनी आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.

आपल्याकडे धार्मिक कार्यातदेखील दान करतात. स्वतःच्या लग्नाच्या पत्रिकेत “अवयवदान, नेत्रदान फाॅर्म भरा, हाच तुमचा आहेर” असे एक-दोन लोकांनी छापले होते. आणि त्याप्रमाणे लग्नसमांरभात संध्याकाळी येणाऱ्या मंडळींना फाॅर्म भरण्यासाठी सोय केली केली होती.

अशा दानयज्ञात आपण आपले नेत्रदान, देहदान, अवयवदान याचे फाॅर्म भरून आहुती टाकली, तर याचे पुण्यफळ हजार पटींनी जास्त मिळेल, असे मला वाटते.

 

© सौ. वीणा आशुतोष रारावीकर

लोअर परेल, मुंबई

(ता.क. – माझ्या आई-वडील दोघांचेही २०१२ साली देहदान केले आहे.)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अब्राहम लिंकन ना पत्र ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

सौ.अंजली दिलिप गोखले

☆ विविधा ☆ अब्राहम लिंकन ना पत्र ☆ सौ.अंजली दिलिप गोखले

‘लिंकन साहेब, बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही माझ्या सारख्या एका सामान्य शिक्षकाला अतिशय मनापासून जबाबदारी चे पत्र लिहिले होते. तुमच्या गोंडस गोड मुलाला घडविण्याचे काम सोपविताना त्या शिक्षकाला मानाचे स्थान दिले होतेत.

लिंकन साहेब एका कायम स्वरूपी विनाअनुदानीत शिक्षकाचे तळमळीने लिहिलेले हे पत्र वाचाल ना?

तुमचे ते पत्र, तरुणपणी वाचूनच मी मोठ्या ध्येयाने प्रेरीत होवून , जिद्दीने, कष्टाने, एक नाही, दोन नाही, तीन पदव्या मिळविल्या. त्या मिळवताना झालेल्या माझ्या कष्टाची मला फिकिर नाही . पण लिंकन साहेब, त्यासाठी माझ्या आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कधी काढल्या गेल्या, मला समजले नाही . त्या पदव्या मिळवत असताना, माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील काळजीचे जाळे मी कधीच विसरू शकत नाही. त्यांना निर्मळ आनंद मी कधी आणि कसा देऊ शकेन याचाच विचार माझ्या मनामध्ये कायम पिंगा घालत असतो.

मात्र लिंकन साहेब, माझ्या या त्रासाचा परिणाम मी माझ्या विद्यार्थ्यावर कधीच होवू देणार नाही . जो थोडा वेळ मला, त्यांना ज्ञानदान करायला मिळतो, तो मी सार्थकी लावतो . त्यांना मनापासून शिकवतो . मला ज्या काही चांगल्या गोष्टी माहिती आहेत, त्या त्यांना समजावून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यांच्या समवेत मला थोडाच वेळ मिळतो, कारण कायम स्वरूपी विना अनुदानीत शाळेत तासिका तत्वावर मीकाम करतो . खरच सांगतो, लिंकन साहेब , माझ्या कामावर मी मनापासून प्रेम करतो.

त्या प्रेमाचा मोबदला, माझ्या आईवडिलांना समाधान देण्यात मला उपयोगी पडत नाही, हीगोष्ट माझ्या मनाला खूप सलते , यातना देते . मात्र यावरती मी विचार करून मार्ग शोधलाय . शाळेमध्ये शिकवून झाल्यावर, माझ्या एका विद्यार्थ्याच्या शेतामध्ये मजूरी करून मिळकत वाढवायचे मी ठरवले आहे. परिश्रम, कष्ट, आणि मेहनत याच्या जोरावर मी आई वडिलांना समाधान देणार आहे . त्यांच्या चेहऱ्यावरील हसू मला पहायचे आहे.

मी एक हाडाचा शिक्षक आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर मी कार्यरत रहाणार आहे.

न हरणारा कायम

स्वरूपी

विनाअनुदानीत

शाळेतला एक

शिक्षक.

© सौ.अंजली दिलिप गोखले

मिरज

फोन नंबर ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गणित ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ गणित ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

माणसाचे आयुष्य हे एक गणितच आहे नाही का? माणसाने जन्मभर नुसती गणितच तर सोडवायची असतात. कधी बेरीज तर कधी गुणाकार करायचा असतो कधी वजाबाकी तर कधी भागाकार, पण कधी आणि कुठे कोणती सूत्रे वापरायची हे मात्र त्याला समजले पाहिजे.

काय गंमत आहे नाही का? माणसाच्या आयुष्याची सुरवात होते ती गणिताने आणि शेवट ही गणितानेच होतो..

शाळेत आपण वजाबाकी, बेरीज, गुणाकार, भागाकार सारे काही शिकतो. अंकांशी खेळायला शिकतो. पण प्रत्यक्षातही आपल्याला जन्मभर तोच खेळ खेळायचा असतो ह्याचा आपण विचारही केलेला नसतो.

अंकांची बेरीज करता करता आपण अनेकांशी कळत न कळत बेरजेच्या रुपात कधी जोडले जातो हेच कळत नाही. हां अर्थात बेरजेच्या रुपात रहायचे की वजाबाकी व्हायचे हे आपल्यावर आहे म्हणा.

शाळेत गुणाकार, भागाकार करताना ती सूत्रे शिकताना खूप कंटाळा यायचा, वैताग येई नुसता, पण आज लक्ष्यात येते आपले सारे आयुष्य सूत्रांवर तर आधारलेले आहे.

आई म्हणायची माणसाचे पाढे कसे तोंडपाठ पाहिजेत, गणितात पैकीच्या पैकीच पाहिजेत. तेव्हा नाही पण आता पटते एकदा काही गणित चुकले की आयुष्याचे सारे गणित चुकत जाते. मग बेरजेची कधी वजाबाकी होती तेच कळत नाही आणि गुणाकाराचा भागाकार व्हायला ही वेळ लागत नाही.

आपल्या आयुष्याचे गणित कसे पाहिजे तर आपल्याला दुसर्‍यांच्या आनंदाचा गुणाकार करता आला पाहिजे तर दुःखाचा भागाकार. नात्यांची बेरीज करता आली पाहिजे तर त्यांच्या अडचणींची वजाबाकी करता आली पाहिजे.

शेवटी आयुष्य हा एक गणिताचाच तर खेळ आहे. जो मांडायचाही आपणच आणि खेळायचाही आपणच आहे. आपल्यालाच तर ठरवायचे आहे की कशाची बेरीज करायची आणि कशाची वजाबाकी.

ज्याला हे जमले त्याला आयुष्याचे गणित उत्तम जमले नाही का??

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️6.8.2020

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ भरली ओंजळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

संक्षिप्त परिचय 

वेगवेगळ्या दिवाळी अंकातून कविता व लेख प्रसिद्ध,

“मनपंख” हा कथा व लेख संग्रह प्रसिद्ध.

☆ विविधा ☆ भरली ओंजळ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

ओंजळ ती केवढी; भासते छोटी; मात्र ही असते खूप मोठी. आपली सुखदुःख तिच्यात मावतात.मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीतच पेलता येतात. ओंजळीत मायेचं चांदण मावत. आणि ओंजळ भरून आपण जेव्हा धान्य पेरतो. तेव्हा आपल्याला निसर्ग ते राशीच्या रुपाने परत करतो.ओंजळीत आकाश उतरतं व सप्तसागरांच पाणीही मावू शकतं. ओंजळीत म्हणे ब्रम्हांडही मावतं. झोपेतून जाग सकाळी आपण करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे. बोटांच्या अग्रावर लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती, आणि मुळाशी गोविंद आहे. करदर्शन करताना आपण त्यांच स्मरण करतो. मगच आपण उद्योगाला लागतो.दारी आलेल्या अथितीला विन्मुख न पाठवता आपण त्याला पसाभर धान्य /पीठ देतो. आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा आशिर्वाद ओंजळीतूनच घेतो. सुर्याला अर्घ्य अर्पण करतात ते ही ओंजळीतूनच…

साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल तेवढेच अन्न पुरेसं असत. त्यापेक्षा जास्त खाल्ल तर अजीर्ण होत. तेवढच पाणी माणसाची तहानही भागवतं. उषःपानही ओंजळीनंच करायचं असत. माणसाच्या अनेक क्रुतींशी व भावनांशी ओंजळीच फार घट्ट नात असतं. ओंजळ हे दात्रुत्वाचं रुप आहे. समर्पणाच्या भावनेच द्योतक आहे.  स्रीची लाजही ओंजळीतच मावते. सुवासिनीची ओटी आपण ओंळीनेच भरतो.

ओंजळ स्विकारली तर ती परतही करावी लागते. ओंजळ कधीच रिती होत नाही. ती पुन्हा पुन्हा भरत जाते.ओंजळ सांगते, ‘आधी द्या मगच घ्या’. ओंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या, झिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या…!

जगणे आता उत्सव व्हावे

आनंदाच्या ओंजळीने भरुन जावे

पैसा अडका याही पेक्षा

ओंजळभर आंनद मिळावा

मन समाधानाने भरुन जावं

दुखरे क्षण सोडून द्यावे

जगणे सारे आनंदी करावे

आनंदाने, समाधानाने  भरल्या ओंजळीने मरण यावे.

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झंपूच्या करामत ☆ श्री विनय माधव गोखले

☆ विविधा ☆ झंपूच्या करामत ☆ श्री विनय माधव गोखले ☆ 

२०१३ साली कोथरुड भागात वानरांच्या टोळीने लोकांचे मोबाईल चोरण्याचा सपाटा लावला होता. इतका हैदोस घातला होता की शेवटी ’सकाळ’ वाल्यांनाही त्यांची दखल घेऊन मोठी बातमी छापणे भाग पाडले होते. ह्या चौर्यकर्मामध्ये अग्रभागी होता आमचा “झंपू” बालक! बरं, मला झंपू बद्दल एवढी माहिती कशी? ह्याचे उत्तर असे की, झंपू आमच्या घराच्या मागील पेरूच्या बागेतच तर रहायला होता! म्हणजे जवळजवळ आमचा ’सख्खा शेजारी’च म्हणा हवं तर!

सकाळ-सकाळी “हूप..हूप!” अशी दीर्घ आरोळी उठली की आम्ही ओळखायचो, वानरसेना जवळच कुठे तरी आली आहे. आम्ही मोठया उत्सुकतेने गॅलरीत आलो की चार-पाच किंवा जास्त वानरांचा कबिला समोरच फांद्यांवर बसून नीलमोहराची कोवळी पाने खात असलेला दृष्टीस पडायचा. कावळ्यांची एकसारखी हैराण काव-काव सुरु झाली की समजायचे कोणीतरी वानर कुठेतरी घरटयाजवळ धोकादायक अंतरावर आले आहे. एखादा हुप्प्या समोरील गच्चीच्या कठडयावरून मोठया ताठयात शेपटी वर करून निघाला की कावळे त्याच्या आजूबाजूने झडप घातल्यासारखे उडायचे. झंपूला मात्र कावळ्यांच्या कलकलाटाचा राग यायचा. शेजारील इमारतीच्या गच्चीवर हा पठ्ठा मस्तपैकी दोन्ही हाताने डिश टी व्ही केबलला धरून लोंबकळलेला असायचा. कावळे जवळ आले की केबलचा हात सोडून, हवेत हात मारून कावळ्यांना मारायला बघायचा आणि पडतापडता पुन्हा केबल पकडायचा. मधूनच कधी कधी आमच्या गॅलरीत कपडे वाळवायच्या चिमट्यांच्या रिंगला एकाच हाताने धरून लोंबकळायचा. वाळत घातलेले कपडे, रुमाल ओढून खाली फेकून द्यायचा. एका खिडकीच्या सज्जावरून दुसर्‍या सज्जावर उडी मारायचा आणि खारींना घाबरवायचा. उंची, खोली, लांबी असे कसलेही धोके त्याला जाणवत नसत. कळपात नव्याने दाखल झालेल्या एका पिल्लाबद्दल तर झंपूला भारी आकर्षण. पिल्लाला त्याच्या आईच्या पोटापासून हाताने अलग करून त्याला सारखे खेळायला ओढायला बघायचा. एकंदरीतच काय, तर सर्व वानरांच्या आणि विशेषत: झंपूच्या लीला बघताना आमची अगदी हसून-हसून पुरेवाट व्हायची.

ह्याच टोळीला आणि खासकरून झंपूला मोबाईलचे आकर्षण कुठून पैदा झाले हे काही आम्हाला कळले नाही. घरामध्ये घुसखोरी करून मोबाईल फोन पळवायला लागले. ज्याचा फोन गेलेला असायचा ती व्यक्ती फोन करकरून कुठे ’आपली’ रिंग ऐकू येते का हा प्रयत्न करायची. इकडे फोनचा रिंग टोन वाजला किंवा थरथरू लागला की वानरबुवा खुश! मग तर तो फोन जाम सोडायचे नाही. झंपूचे डोके लहान असल्याने तो खिडक्यांस लावलेल्या गजांच्या जाळीमधून सहज आत प्रवेश मिळवायचा. एखाद्या फ्लॅटच्या गॅलरीचे दार चुकून उघडे राहिले की सरळच आत यायचा. अर्थात जिने चढून माणसांप्रमाणे राजरोस येणे सुध्दा त्याला निषिध्द नव्हते. फक्त घंटी वाजवून दार उघडायला लावता येते, तेवढेच शिकायचे बाकी ठेवले होते.

एकदा झंपूने माझ्या समोरच्या घरातील टी. व्ही. चा रिमोट कंट्रोलच मोबाईल फोन समजून पळवला. माझ्या खालच्या फ्लॅटमधील मालकिणबाईंनी मोठया हुषारीने उशाखाली लपवून ठेवलेला ब्लॅकबेरी त्याने एखादा सराईत चोर जसा पाळत ठेवून पळवतो अगदी तसाच पळवला. एके दिवशी आरडाओरड ऐकून मी स्वयंपाकघरात गेलो तर झंपूची स्वारी आमच्या फ्रीजवर चढून बसली होती. काठी उगारल्यावर “चीं…चीं” करत त्याने तिथून उडी मारली ती जेवणाच्या टेबलावर, तिथली भांडी पाडून उडी घेतली ओटयावर, तिथून खिडकीत आणि मग गजांतून बाहेर. एका दुपारी सहज खिडकीबाहेर नजर टाकली तर झंपूसाहेब दोन पाइपांच्या बेचक्यात चक्क झोपलेले दिसले, ते सुध्दा छातीशी कुठला तरी मोबाईल फोन कवटाळून!

झंपूच्या बंदोबस्तासाठी प्राणिसंग्रहालयात फोन केला तर म्हणाले “वानरांना कायद्याने काहीही करता येत नाही. चुकून मेले तर आमच्यावर सदोष मनुष्यवधाचा दाखल होईल ना! अहो, वानर कुणालाही इजा करत नाही. फक्त ते आले की फटाके वाजवा, आवाज करा, त्यांना खायला काहीही देऊ नका, त्यांच्या नजरेस नजर देऊ नका, त्यांना (वानरांप्रमाणे) वाकुल्या दाखवून चिडवू नका!” इ. इ. अशातच एके दिवशी सकाळमध्ये ’मोबाईल-चोर’ वानरास पकडल्याची बातमी छापून आली आणि आम्ही सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला! फक्त त्या धरपकडीमध्ये वानर जखमी झाले हे वाचून वाईटही वाटले. खरेच ह्या प्रकरणात झंपूचा काय दोष? केवळ मानवी वस्तीत जन्म घेतला एवढाच? असो. सध्या तरी आम्ही ’सुरक्षित दिन आ गए।’ ह्याच आनंदात आहोत!

 

© श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print